Friday, December 05, 2008

अमेरिका ! अमेरिका !! - (उत्तरार्ध)


इंजिनियरिंग कॉलेजमधले कांही 'बडे बापके बेटे' असलेले सहाध्यायी तिथे प्रवेश झाल्याझाल्याच पुढे अमेरिकेत जाऊन एमएस करण्याचा त्यांचा बेत सर्वांना सांगायला लागले होते. ते ऐकून आपण सुध्दा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असा विचार माझ्याही मनात येत होता, पण त्या वेळी ते कर्मकठीण असल्यामुळे तो बेत तात्पुरता तहकूब करून मी तो विषयच बाजूला ठेवून दिला होता. माझ्या कांही मित्रांनी मात्र आपापल्या कांही धनिक मित्रांचे हात घट्ट धरून ठेवले आणि त्यांच्या आधाराने ते स्वतःसुध्दा एक दोन वर्षानंतर अमेरिकेला जाऊन पोचले. माझ्या सुदैवाने मला इथे मनासारखे काम मिळाले होते. त्यात रोजच्या रोज वेगळे कांही तरी वाचायला, पहायला, शिकायला आणि करायलासुध्दा मिळत होते. नवनवी आव्हाने समोर येत होती आणि ती स्वीकारून पेलून दाखवण्यातला आनंद मिळत होता. पगार बरा होता आणि काटकसर करून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा मनासारखा खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत होती. थोडक्यात म्हणजे मी त्यात रमलो होतो. शिवाय कामानिमित्य कधी ना कधी परदेशप्रवास घडणार याची जवळ जवळ खात्री होती. परदेशात जाऊन कायमचे तिकडे रहाण्याची मला
मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे हातचे सुखी जीवन सोडून पळत्याच्या पाठीमागे लागावे असे कांही तेंव्हा वाटले नाही आणि उच्च शिक्षणाच्या निमित्याने अमेरिकेला जाण्याची मनातली इच्छा हळू हळू विरून गेली.


माझ्या अपेक्षेनुसार परदेशी जाण्याच्या संधी मला मिळाल्या आणि त्रिखंडात थोडेसे भ्रमण झाले. त्यातला 'अपूर्वाई' आणि नवलाईचा भाग संपल्यानंतर मला त्याचेही खास कौतुक वाटेनासे झाले. सी एन एन सारख्या वाहिन्यांवरून अमेरिकेतल्या जीवनाची चित्रे आपल्याला रोजच घरबसल्या दिसतात आणि ती युरोपमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्यांपेक्षा फारशी वेगळी नसतात. आता तर अंतर्बाह्य पाश्चात्य धाटणीची दिसणारी घरे, ऑफीसे, दुकाने आणि मोटारगाड्या भारतात सर्रास दिसू लागल्या आहेत. अमेरिकेत प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याचा योग जरी वेळोवेळी हुलकावण्याच देऊन गेला असला तरी परिस्थितीत एवढे बदल झाल्यानंतर त्याची टोचणी वगैरे कधी बोचत राहिली नाही.
आमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने परदेशात गेली आहेत. त्यातही अमेरिकेत जाणा-यांचीच बहुसंख्या आहे. आपल्या मुलांना भेटून येण्याचे निमित्य करून आमच्या ओळखीतले बरेच लोक अमेरिकेची वारी करून आले. शेजारीपाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे सगळ्यांच्या मेळाव्यात कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेच्या प्रवासातले मजेदार अनुभव सांगून आणि तिकडच्या वातावरणाचे तोंडभर कौतुक करून झाल्यानंतर "तिकडे सगळे कांही खूपच छान असले तरी आपल्याला तर बुवा त्याचा भयंकर कंटाळा आला आणि म्हणून आम्ही कधी एकदा आपल्या घरी परत जातो असे झाले होते." वगैरे सांगायचे. आपल्यालाही असले कांही बोलण्याची संधी मिळावी एवढ्यासाठी तरी एकदा अमेरिकेला जाऊन यायला पाहिजे असे आता नव्याने वाटू लागले आणि आम्हीसुध्दा अमेरिकेला जाऊन यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे जे काम मी
चाळीस वर्षांपूर्वी करण्याचे टाळले होते ते नव्याने पुन्हा हातात घेतले.


पण चाळीस वर्षांपूर्वी मी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतो तसा आता नव्हतो. माझ्याकडे पासपोर्ट उपलब्ध होता आणि व्हिसा मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे कशा प्रकारची कागदपत्रे लागतात, तसेच ती कुठे मिळतात याची बरीच माहिती व पूर्वानुभव होता. त्यातले बरेचसे दस्तऐवज आधीच माझ्या संग्रहात होते ते बाहेर काढून चाळून पहायला सुरुवात केली. आवश्यक जागी अद्ययावत माहिती भरून त्यांचे नूतनीकरण करायचे आणि जे आपल्याकडे नसतील ते प्राप्त करून घ्यायचे काम करायला हळू हळू सुरुवात केली.


आजकाल इंटरनेटवर याबद्दल खूप मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली आहे. अशाच एका सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या स्थळाला भेट देऊन त्याबद्दल तिथे दिलेली माहिती उतरवून घेतली. ती अत्यंत उपयोगी होतीच, व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी पडणा-या संभाव्य कागदपत्रांची एक लांबलचक यादीसुध्दा त्यात मिळाली। पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची? त्यापेक्षा आपल्या घरी आपण निवांतपणे सुखात रहावे हे उत्तम असा विचार मनात आला.


पण इतर लोक काय करतात त्याचीही एकदा चौकशी करायचे ठरवले. नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले आणि तिकडे जायला निघालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गांठून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. त्यात थोडी फार तफावत असली तरी त्यांचा लसावि, मसावि काढून विशेष कष्ट न करता त्यातल्या त्यात कोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकतील त्यांची अखेरची यादी करून तेवढी गोळा करायची असे ठरवले. सुदैवाने तेवढ्यावर आमचे काम झाले आणि इंटरव्ह्यूत पास होऊन व्हिसा मिळाला. महत्वाचे असे कांही तरी मिळाल्याचा जो आनंद या वेळी झाला तसा आनंद कित्येक वर्षानंतर होत होता.

1 comment:

Anonymous said...

chan...wachto aahe...