Wednesday, December 26, 2018

पुण्याजवळ बांधलेली महाकाय दुर्बिण


बहुतेक लोकांनी लहानपणी शाळेतल्या प्रयोगशाळेमध्ये एकादी दुर्बीण पाहिलेली असते. नेहरू सेंटरसारख्या काही संस्था आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी खास शिबिरे भरवून लोकांना ग्रहताऱ्यांचे दुर्मिळ दर्शन घडवतात. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियासारख्या ठिकाणी काही लोक समुद्रात दूरवर थांबलेली जहाजे दुर्बीणींमधून दाखवतात. या सगळ्या दुर्बिणींची रचना पाहिली तर त्यात एका लांब नळीच्या दोन्ही टोकांना विशिष्ट आकारांची भिंगे बसवलेली असतात. त्यामधून प्रकाशकिरण अशा प्रकारे रिफ्रॅक्ट होतात की पाहणाऱ्याच्या डोळ्यामधल्या पटलावर उमटलेली आकृती अनेकपटीने मोठी होते, त्यामुळे ती वस्तू जवळ आल्याचा भास त्याला होतो.

सतराव्या शतकातल्या गॅलीलिओने तयार केलेल्या शक्तीशाली दुर्बिणींमधून पहिल्यांदाच आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुध्दा कला असतात हे त्याने दुर्बिणींतून पाहिले तसेच शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली. शनी ग्रहाच्या पलीकडे असलेला नेपच्यून त्याला दिसला. गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्याने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगेही पाहून त्यांची नोंद केली. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ताऱ्यांनी भरलेली आहे असे त्याने सांगितले आणि ग्रह व तारे यांचे आकार ढोबळमानाने मोजण्याचाही प्रयत्न केला. 

गॅलीलिओच्या नंतर आलेल्या काळातल्या बहुतेक शास्त्रज्ञांना आकाशाचे निरीक्षण करण्याचे विलक्षण आकर्षण वाटले. त्यांनी दुर्बिणींमध्ये अनेक सुधारणा करून अधिकाधिक मोठे आणि स्पष्ट चित्र मिळवण्याचे प्रयत्न तर केलेच, शिवाय आकाशातल्या विशिष्ट ग्रहाचे किंवा ताऱ्याचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीला विशिष्ट कोनामध्ये बसवून आणि सावकाशपणे फिरवून त्याची बारकाईने मोजमापे घेण्याचे तंत्र विकसित केले. ब्रॅडली या शास्त्रज्ञाने ध्रुवाजवळच्या एका ताऱ्याची वर्षभर अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे करून त्या ताऱ्याचे आपल्या जागेवरून किंचितसे हलणे मोजले. ते मोजमाप एक अंशाचा सुमारे १८० वा भाग इतके सूक्ष्म होते. त्यानंतरच्या काळातसुद्धा दुर्बिणींची निरीक्षणशक्ती वाढवण्याचे प्रयत्न होतच राहिले आहेत. हबल नावाची प्रचंड दुर्बिणच अवकाशातल्या एका कृत्रिम उपग्रहावर बसवून तिच्यातून अथांग अवकाशाचा वेध घेतला जात आहे.

आपल्या डोळ्यांना फक्त दृष्य प्रकाशकिरण दिसतात, गॅलीलिओनेसुद्धा फक्त तेवढेच पाहिले होते, पण पुढील काळातल्या शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, एक्स रेज, गॅमा रेज, रेडिओ लहरी यासारख्या अनेक प्रकारच्या अदृष्य किरणांचा शोध लावला. सूर्य आणि इतर ताऱ्यापासूनसुद्धा असे अनेक प्रकारचे किरण निघून विश्वाच्या पोकळीमधून इतस्ततः पसरत असतात. ते साध्या दुर्बिणीमधून दिसत नाहीत. त्यांच्यासाठी विशेष प्रकारची उपकरणे तयार केली जातात. काही गॅमा किरण इतके प्रखर असतात की ते शिशाच्या जाड भिंतींमधूनसुद्धा लीलया आरपार जातात. त्याचे निरीक्षण करण्यासाठी कोलारच्या सोन्याच्या खाणीच्या तळाशी काही उपकरणे ठेवली आहेत. दोन तीन किलोमीटर जाड दगडमातीच्या थरांमधून पलीकडे गेलेल्या दुर्लभ अशा कॉस्मिक किरणांचा अभ्यास तिथे केला जातो. दूरच्या ताऱ्यांपासून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय महत्वाची प्रयोगशाळा पुण्याजवळ खोदाड इथे उभारली आहे. आजच्या काळातला अवकाशाचा अभ्यास अशा प्रकारच्या अनेक खिडक्यांमधून निरीक्षणे करून होत असतो.

जगप्रसिध्द ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना झाली असल्याचे मला पहिल्यापासून माहीत होते, पण एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) हे नांव मी तीन वर्षांपूर्वीच ऐकले. या दोन्ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या मागच्या बाजूला खडकी औंध रस्त्यावर आहेत. भारतातील अनेक विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संशोधक आयुकामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करत आहेत. एनसीआरए ही संस्था मुख्यतः नारायणगांवजवळील खोदाड येथे स्थापन केलेल्या विशालकाय दुर्बिणीचे (Giant Metrewave Radio Telescope) काम पाहते.

ही अशा प्रकारची जगातील सर्वात मोठी दुर्बिण आहे आणि जगभरातले संशोधक इथे येऊन प्रयोग आणि निरीक्षणे करतात. या खास प्रकारच्या दुर्बिणीमध्ये परंपरागत दुर्बिणीसारख्या लांब नळकांड्या आणि कांचेची भिंगे नाहीत. ४५ मीटर एवढा प्रचंड व्यास असलेल्या ३० अगडबंब अँटेना मिळून ही दुर्बिण होते. या अँटेनासुध्दा १०-१२ वर्गकिलोमीटर्स एवढ्या विस्तृत भागात पसरलेल्या आहेत. त्या सर्व अँटेना या भागामध्ये एकमेकीपासून दूर दूर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. यातली प्रत्येक अँटेना एका गोल आकाराच्या इमारतीच्या माथ्यावर मोठ्या यंत्रांना जोडून उभारल्या आहेत. आकाशातील विशिष्ट ग्रह किंवा तारे यांचे निरीक्षण करण्यासाठी यातली प्रत्येक अँटेना त्यावर फोकस करून त्याच्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. यासाठी तिला जोडलेल्या यंत्रांमधून अत्यंत मंद गतीने सतत फिरवत रहावे लागते. या ताऱ्यांपासून निघून पृथ्वीवर पोचणाऱ्या रेडिओलहरींची वेव्हलेंग्थ काही मीटर्समध्ये असते म्हणून या दुर्बिणीचे नाव GMRT असे आहे.

या तीसही अँटेनांमध्ये रेडिओलहरींमधून येणारे संदेश (Signals) कंट्रोल रूममध्ये एकत्र केले जातात आणि विशिष्ट काँप्यूटर प्रोग्रॅम्सने त्यांचे विश्लेषण केले जाते. जगभरातले शास्त्रज्ञ आपापल्या प्रयोगशाळांमध्ये हे प्रोग्रॅम तयार करतात तसेच एनसीआरएमध्ये असलेले विशेषज्ञ त्यात सहभाग घेतात. त्यासाठी आवश्यक असलेले काँप्यूटर्स आणि तज्ज्ञ यांनी इथली प्रयोगशाळा सुसज्ज आहे. जगामधील प्रमुख अशा अत्याधुनिक फॅसिलिटीजमध्ये तिचा समावेश केला जातो. गेल्या वर्षी ज्या संशोधनाला नोबेल प्राइझ मिळाले त्यातला काही हिस्सा या विशालकाय दुर्बिणीचा उपयोग करून केला होता असे त्यावेळी सांगितले गेले होते. विज्ञानविषयक बातम्यांमध्ये एनसीआरए किंवा जीएमआरटीचे नाव अनेक वेळा येते.

दूरच्या तारकांपासून येत असलेल्या या रेडिओलहरी अतीशय क्षीण असतात. पृथ्वीवर प्रसारित होत असलेल्या रेडिओलहरींचा उपसर्ग होऊ नये यासाठी ही मनुष्यवस्तीपासून दूर अशी एकांतातली जागा निवडली आहे. तिथे रेडिओ, टेलीव्हिजन वगैरे काहीही नाहीच. कुठल्याही प्रकारची विजेवर चालणारी यंत्रे अनाहूतपणे काही विद्युतचुंबकीयलहरी (Electromagnetic waves) उत्पन्न करतच असतात, त्यांच्यामुळे ताऱ्यांच्या निरीक्षणात बाधा (Noise) येऊ नये म्हणून त्या जागेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे कारखाने उभारायला परवानगी नाही. अशा पूर्णपणे निवांत जागी ही विशालकाय दुर्बिण बसवली आहे.

ही माहिती ऐकल्यानंतर हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पहायची मला खूप उत्सुकता होती, पण अशा खास ठिकाणी जाण्यासाठी आधी सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात आणि तिथे रेल्वे किंवा बस वगैरे जात नसल्यामुळे स्वतःच वाहनाची व्यवस्थाही करायला हवी. हे कसे साध्य करावे याचा मला प्रश्न पडला होता. पण मागच्या वर्षी ११-१२ सप्टेंबरला मला अचानक एका मित्राचा फोन आला आणि मी एनसीआरएमधल्या इंजिनिअरांना एकादे व्याख्यान देऊ शकेन का? असे त्याने विचारले. मी गंमतीत उत्तर दिले, "मी तर नेहमी तयारीतच असतो, पण माझे भाषण ऐकणाराच कुणी मला मिळत नाही." ही दुर्मिळ संधी अनपेक्षितपणे मिळत असल्याने अर्थातच मी लगेच माझा होकार दिला.

१७ सप्टेंबर २०१७ ला खोदाडला जीएमआरटीमध्ये मागील वर्षीचा इंजिनियरदिन साजरा केला गेला. त्यात मुख्य पाहुणे आणि व्याख्याता म्हणून मला पाचारण करण्यात आले आणि अर्थातच माझी जाण्यायेण्याची सोय झाली आणि पाहुण्याला साजेशी बडदास्त ठेवली गेली. निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यानंतर अशा संधी क्वचितच मिळतात, ती मला मिळाली, त्या निमित्याने अनेक तरुण इंजिनियरांना भेटायला मिळाले आणि मुख्य म्हणजे जीएमआरटीमधली जगातली सर्वात मोठी रेडिओदुर्बिण विनासायास अगदी जवळून आणि आतून बाहेरून पहायला मिळाली.   

Saturday, December 15, 2018

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट


दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट।
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

कविवर्य ग दि माडगूळकरांनी जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य अशा शब्दांमध्ये गीतरामायणात सांगितले आहे. साधारण अशाच अर्थाचा "यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|" हा श्लोक महाभारतात आहे. ही उपमा मी असंख्य वेळा वाचली आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्नही सतत चाललेले असतात आणि ते बऱ्याच प्रमाणात  यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे.  प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच आणि ठरल्याप्रमाणे ती झालीही. आपल्या जीवनात आलेली काही माणसेसुद्धा काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असेही होतच असते, म्हणून मी याला अर्धसत्य म्हंटले आहे.

 काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे जातात, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही आणि अनेक वेळा ती पुन्हा कधीच भेटतही नाहीत. त्यांची गणना स्मृती ठेवुनी जाती या सदरातच करावी लागते.

माझे बालपण आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी नावाच्या एका लहानशा गावात गेले. दुष्काळी भागातल्या आमच्या या गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि तिथे अगदी साध्या पिण्याच्या पाण्यापासून ते अनेक गोष्टींचा नेहमीच खडखडाट असायचा. त्यामुळे शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तितकेसे मजेदार वाटत नव्हते. मोठेपणी परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते जुने खडतर लहानपण आपल्याला परत मिळावे अशी तीव्र इच्छा कधी मनात आली नाही. कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, त्यांचे बालपण आनंदाने ओसंडून गेलेले असेल, म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझ से मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन" असे त्यांना म्हणावेसे वाटले असेल पण आमची परिस्थिति तसे वाटण्यासारखी नव्हती. पण त्या गीतामधल्या "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची आणि वाटत राहणार आहे. त्याचप्रमाणे मी ज्या मित्रांबरोबर चढाओढीने या कागदाच्या नावा चालवत होतो, सायकलच्या टायरच्या किंवा सळीच्या रिंगा पळवत होतो, लपंडाव खेळत होतो त्यांना आता आमच्या सर्वांच्याच दुसऱ्या बालपणात पुन्हा भेटायची ओढ मात्र वाटते.

माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या हायस्कूलमधल्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी साधे बोलायलासुध्दा बंदी होती, मैत्री करणे कल्पनेच्या पलीकडे होते. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी गावातल्या मैदानावर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण संपल्यानंतर त्यातले फक्त तीन चारजण, तेही निरनिराळ्या ठिकाणच्या कॉलेजला जाऊ शकले. नोकरीचाकरी शोधण्यासाठी इतर मुलांची त्यांच्या कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सुऱ्या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझेच आमच्या गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत पार हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा मित्र निव्वळ योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा नक्की भेटायचे असे ठरवून पण आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात  मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी नंतर पुन्हा एकमेकांशी बोलणार कसे?

कॉलेजच्या जीवनामध्ये मी घरापासून दूर हॉस्टेलमध्ये रहात होतो. तिथे मला फक्त मित्रांचाच सहवास असायचा. त्या काळात मला अनेक नवे मित्र भेटले, मी त्यांच्या संगतीतही खूप रमलो, आम्ही सर्वांनी एकत्र खूप धमाल केली त्याचप्रमाणे अडीअडचणीला साथही दिली, जीवनातले कित्येक अनमोल क्षण मिळवले. पण पुन्हा वर्ष संपले की जुदाई आणि विदाई ठरलेलीच. एकदा संपर्क तुटला की "पुन्हा नाही गाठ" याचीच खूणगाठ मनाशी बांधून ठेवलेली.  जीवन असेच पुढे पुढे जात राहिले. नोकरीमधल्या दीर्घ कालावधीत आणखी  असंख्य नवे मित्र मिळत गेले, त्यातले काही जवळ राहिले, काही दूरदेशी चालले गेले आणि त्यांच्याशी संपर्क तुटत गेले.

टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता  वाढल्या आहेत. इंटरनेट आणि फेसबुक या माध्यमामधून मी शाळेतल्या जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण कदाचित माझे मित्र माझ्याइतके टेक्नोसॅव्ही झालेच नसावेत किंवा त्यांना या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला त्यांच्यातला कोणीच नेटवर सापडला नाही. सायन्स कॉलेजमधला माझा मित्र डॉ.एकनाथ देव मला सापडला, पण तो खूप वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला आहे. आता फेसबुकवर आमचे मेसेजिंग आणि फोटो पाठवणे सुरू आहे.

इंजिनियरिंग कॉलेजमधल्या मित्रांच्या बाबतीत मात्र मी बराच सुदैवी होतो. दहा पंधरा वर्षांपूर्वी मी मुंबईला रहात असतांना एकदा माझ्या घरी पुण्याहून एक पाहुणी आली होती. तिच्याशी बोलता बोलता समजले की अशोकराव जोशी या नावाचे तिच्या पतीचे कोणी काका की मामासुद्धा माझ्याच कॉलेजला शिकलेले आहेत. अशोक हे नाव आणि जोशी हे आडनाव धारण करणारे लाखो लोक असतील. पण माझ्याबरोबरसुद्धा एक अशोक जोशी शिकत होता आणि कदाचित तोच असू शकेल म्हणून मी लगेच तिच्याकडून त्यांचा फोन नंबर घेतला आणि फिरवला. तो चक्क माझा हॉस्टेलमेट अशोक जोशीच निघाला आणि आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. पण त्या काळात आम्ही मुंबईतच पण एकमेकांपासून खूप दूर रहात होतो आणि नोकरी व घर यांच्या व्यापात पार गुरफटून गेलो होतो. त्यामुळे आम्हा दोघांनाही प्रत्यक्ष भेटणे शक्य झालेच नाही. दोन तीन वेळा फोनाफोनी केल्यानंतर ते बंद झाले. 

तीन वर्षांपूर्वी पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या कॉलेजमधल्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याच्या शक्यता वाढल्या. मला तशी इच्छा होती, पण त्यांच्यातल्या कुणाशी गेल्या पन्नास वर्षात संबंध न आल्यामुळे कुठून सुरुवात करायची हेच मला उमजत नव्हते. पण गंमत अशी की योगायोगाने अशोक जोशीसुद्धा आतापर्यंत पुण्याला स्थायिक झाला होता आणि पुण्यातल्या मित्रांमध्ये सामील झाला होता. त्यातला सदानंद पुरोहित आमच्या स्नातकवर्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या कामाला उत्साहाने लागला होता. जोशीबुवांकडून त्याला माझे नाव कळताच त्याने लगेच मला फोन लावला आणि दुसरे दिवशी तो माझ्या घरी येऊन थडकला सुद्धा. हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असे झाले. मी लगेच त्यांच्या रेडीमेड ग्रुपचा सदस्य झालो आणि त्यांच्या मीटिंग्जना जायला लागलो. आम्ही एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला आणि या मित्रांबरोबर चॅटिंगही सुरू केले. त्यांच्यातले दोघेतीघे फेसबुकवर अॅक्टिव्ह होते, त्यांच्याशी मैत्री केली.

आता माझ्या संपर्कक्षेत्राच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या होत्या. कशी कुणास ठाऊक, पण बबन या नावाच्या एका माणसाने माझ्या फेसबुकावरच्या एका पोस्टवर कॉमेंट टाकली होती. त्याची विचारपूस केल्यावर तो माझा मित्र एट्या निघाला. त्याने फेसबुकवर बबन असे टोपण नाव घेतले होते. तो कॉलेज सोडल्यावर २-३ वर्षातच अमेरिकेला गेला होता आणि तिकडचाच झाला होता. आता फेसबुकवरून त्याच्याशी संपर्क सुरू झाला. तो भारतात आला असतांना एक दोन दिवस पुण्यात मुक्कामाला होता. मी त्याच्यासोबत एक ब्रेकफास्ट मीटिंग ठरवली आणि इतर समाईक मित्रांना बोलावले. लाटांबरोबर पार सातासमुद्रापलीकडे दूर गेलेला आणखी एक ओंडका आठ दहा इतर ओंडक्यांना पुन्हा भेटला आणि ते घडवून आणण्याचे पुण्य मला मिळाले.

आमच्याबरोबर कॉलेजमध्ये असलेला पण अजीबातच संपर्कात नसलेला शरदसुद्धा मला अचानकच फेसबुकवर भेटला. मी दहा वर्षांपूर्वी टाकलेला माझा फोटो त्याने ओळखला, माझी माहिती वाचली आणि मला मैत्रीची हाक दिली. पूर्वी कॉलेजात शिकतांनाही तो आमच्या कंपूमध्ये नव्हता त्यामुळे मला तो आता आठवतही नव्हता, पण त्याने दिलेल्या खुणा ओळखून मीही त्याचा हात हातात घेतला. या एका काळी फक्त तोंडओळख असलेल्या कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली.

एकदा त्याच्याशी बोलता बोलता दिलीप हा माझा एक गांववाला मित्र त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे शरदला घेऊन सरळ दिलीपच्या घरी जाऊन धडकलो.  त्या अकल्पित भेटीतून आम्हा दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एकत्र घालवलेल्या जुन्या काळातल्या अनंत आठवणी उजळून निघाल्या. मधल्या पंचावन्न वर्षात कुणी काय काय केले याची अगदी थोडक्यात माहिती करून घेऊन आम्ही वर्तमानकाळापर्यंत आलो. आमच्या शाळेतले इतर मित्र आता कुठे आहेत आणि काय करतात त्याचा दिलीपलाही पत्ता नव्हता, पण त्याला सुरेशचा फोन नंबर तेवढा माहीत होता. मग आम्ही लगेच त्याच्याबरोबर बोलून घेतले. आमचा आणखी एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला.

कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढाच होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे बालपण मुंबई महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे परंपरागत संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि तो थकवा घालवण्यासाठी आराम करण्यात तसेच इतर आवश्यक कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणाऱ्या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.

कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक अत्यावश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने त्या वेळी लावला नव्हता. हे कसे काय शक्य आहे? असा विचार करत मी त्याच्याकडे निरखून पहात असतांना तो माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे घाऱ्या, काय पाहतोय्स? मी कामत्याच आहे. माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा एकदा अचानक अदृष्य झाला. या वेळी तर तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.

२०१७ साली म्हणजे मधल्या काळात आणखी बारा वर्षे लोटल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणाऱ्या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका डॉक्टरच्या दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहकाऱ्यांशी बोलून एक पूर्ण  दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही अत्यंत जवळचा मित्र श्रीकांत भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे येऊ शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे अशोकला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. तेंव्हाही भोजकर चांगल्या मूडमध्ये आणि पूर्वीप्रमाणेच हसत खेळत होता. आम्ही चौघांनी तासभर चांगला हसत खिदळत पूर्वीच्या आठवणींवरून एकमेकांना डिवचत आणि पुन्हा कधी निवांतपणे भेटायचे याच्या योजना आखत काढला. पण ती श्रीकांतशी अखेरची भेट ठरली. काही महिन्यांनंतर मी पुन्हा त्या वास्तूमध्ये गेलो तो त्याचे अंत्यदर्शन घ्यायला.

ठरवल्याप्रमाणे मी कामतला घेऊन रवी या बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्यालाही सोबत घेऊन केशवकडे म्हणजे आमच्या दुसऱ्या एका जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या निरनिराळ्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त फेसबुक आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे आणि मोटारगाडीसारखे वाहन जवळ असल्यामुळे. अलेक्झँडर ग्रॅहॅम बेल, हेन्री फोर्ड आणि मार्क झुकरबर्ग यांचे आम्ही मनोमनी आभार मानले.       

पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले माझे कांही जुने मित्र गेल्या १-२ वर्षांमध्ये मला पुन्हा सापडले. त्यातल्या कांहींना मी प्रयत्नपूर्वक शोधून काढले आणि काही अवचित भेटले. आता पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणी पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.


Tuesday, December 11, 2018

आयुष्यातला तिसरा टप्पा आणि तिसरा कप्पा

बालपण, तारुण्य आणि वार्धक्य हे माणसाच्या आयुष्यातले तीन मुख्य टप्पे असतात हे सांगण्याची गरज नाही. "कैवल्याच्या चांदण्याला", "दयाघना का तुटले", "एक धागा सुखाचा" यासारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांमधून या टप्प्यांची वैशिष्ट्ये  दाखवली गेली आहेत. तिसऱ्या टप्प्यावर पोचलेल्या माझ्या वयोगटातल्या लोकांनी आता काय काय करू नये आणि काय काय करावे किंवा वेळ वाया न घालवता लगेच करून घ्यावे याबद्दल निरनिराळ्या शब्दांमध्ये निरनिराळ्या भाषातले ज्ञानामृत पाजणाऱ्या किती तरी सूचना वॉट्सॅपवरील महापंडित रोज पाठवत असतात. त्यात आता मी आणखी काय भर घालणार?

श्री. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात त्यानी असे लिहिले आहे की आपल्या आयुष्यात दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात, कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा.  कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळते आणि कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. पण त्याशिवाय एक तिसरा कप्पाही असायला हवा, आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा.

आपला आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी, व्यवसाय असे काहीतरी करावे लागते, ते पहिल्या कप्प्यात येते. ते करतांना कष्ट करावे लागतात, कधी अपमान कधी निराशा पदरात पडते, कधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पण कमाईच्या रूपात या सगळ्याची भरपाई मिळते असे समजून माणसे ते सगळे सोसतात. कुटुंबाच्या कप्प्यातसुद्धा अपेक्षाभंग, गैरसमजुती, चिंता वगैरे नकारात्मक गोष्टी कधी कधी तरी आपल्या वाट्याला येतातच. त्यातून विरंगुळा मिळण्यासाठी तिसरा कप्पा ठेवावा. तो फक्त स्वतःपुरता ठेवला तर त्यात जाऊन आपल्या मनासारखे, आपल्याला आवडेल ते आपण आपल्या सोईनुसार करावे आणि त्यातून फक्त आनंदच घेत रहावा अशी ही कल्पना आहे. 

शिरगावकरांनी बहुधा मध्यमवर्गातल्या मध्यमवयीन माणसांसाठी ही कल्पना मांडली असावी. गरीब लोकांचा कामाचा कप्पा कधी संपतच नाही आणि त्यांना तिसरा कप्पा उघडून त्यात रमायची फारशी संधी मिळत नाही. जन्मजात धनाढ्य लोकांना काम करणे ऐच्छिक असते आणि ते आपले सगळे आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार मौजमजा करत जगू शकतात.

हे कप्पे आणि टप्पे यांचा एकत्र विचार केला तर असे दिसते की जन्माला आलेले मूल हा तिसरा कप्पा घेऊनच येते. तान्हे बाळ फक्त स्वतःच्या मनासारखेच वागत असते. पण ते इतके दुर्बल असते की हंसणे, रडणे, ओरडणे आणि थोडीशी हालचाल एवढेच करू शकते. त्याच्या कुटुंबाचा म्हणजे त्याचा दुसरा कप्पाच त्याचे पूर्ण संगोपन करत असतो. ते थोडे मोठे होऊन त्याचे शिक्षण सुरू झाले की अभ्यास आणि शिस्त यांच्यामुळे त्याला कधी कधी मनाविरुद्ध वागणे भाग पडत जाते आणि त्याच्या स्वतःच्या अशा तिसऱ्या कप्प्यामधून त्याला हळूहळू बाहेर काढणे सुरू होते. पुढे मोठा झाल्यावर त्याला पहिला कप्पा सांभाळायचा आहे एवढ्यासाठीच हे करावे लागत असल्यामुळे तो भाग पहिल्या कप्प्यासारखाच समजायला हरकत नाही. म्हणजे दुसरा कप्पा हा बालपणातला मुख्य कप्पा असतो, तिसरा हळू हळू लहान लहान होत आणि पहिला वाढत जातो. कदाचित यामुळे काही मुलांच्या मनात कामाच्या कप्प्याबद्दल अढी पडत असावी.

तरुणपणी कामधंदा आणि कुटुंब म्हणजेच पहिला आणि दुसरा हे मुख्य कप्पे असतात आणि तिसरा स्वतःचा कप्पा ऐच्छिक असतो, काही लोक स्वतःच्या आवडी, छंद वगैरेंना जन्मभर जाणीवपूर्वक जोपासतात, यामुळे कदाचित त्यांना काम आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही किंवा निदान तशा टीकेला तोंड द्यावे लागते. काही लोक स्वतःच्या कप्प्याकडे पूर्ण दुर्लक्षही करतात. पण उतारवयाबरोबर शरीरातली शक्ती कमी व्हायला लागते आणि कष्ट सोसेनासे होतात, मुले आपापल्या मार्गाला लागल्यानंतर ती स्वतंत्र होत जातात. पहिला कप्पा आकुंचन पावत जातो तसाच दुसराही. यामुळे उतारवयाची चाहूल लागल्यावर तिसऱ्या कप्प्याची अधिकाधिक गरज निर्माण होते आणि काळाबरोबर ती वाढतच जाते.

माझ्या बाबतीत असे झाले की माझा जो तिसरा कप्पा लहानपणी तयार झाला होता त्यात कोणतेही विशिष्ट छंद किंवा आवडीनिवडी नव्हत्या, पण कुतूहल आणि हौस यांना जागा होती. कोणीही कुठलेही काम करत असतांना दिसला की मी ते लक्ष देऊन पहात असे, ते काम माझे नसले तरी ते शिकून घ्यायचा आणि जमले तर स्वतः करून पहायचा प्रयत्न करत असे. लश्करच्या एक दोन भाकऱ्या भाजायची ही वृत्ती माझ्याबरोबर राहिली. पहिल्या कप्प्यात मला नेमून दिलेले काम मी मन लावून करत असल्यामुळे मला कधी त्याचा त्रास वाटला नाही. पण ते करून झाल्यावर मी स्वतःच्या समाधानासाठी आणखी काही तरी करून त्यातून जास्तीचा आनंद मिळवत असे. सुदैवाने माझे कौटुंबिक जीवनही सुरळीत चालले होते. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात तिथला वैताग घालवण्यासाठी म्हणून मुद्दाम आणखी काही करायची खरे तर मला गरज पडत नव्हती, पण हा तिसरा कप्पा मी उघडून ठेवला होता आणि त्यात अधून मधून जात येत होतो.

आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्याची चाहूल लागली तेंव्हा मला त्या कप्प्याचा चांगला उपयोग झाला. नोकरी करणाऱ्या लोकांना सेवानिवृत्तीचे मोठे संकट वाटते तसे मला वाटले नाही. कुठलेही वेगळे काम समजून घेऊन ते शिकण्याची हौस असल्यामुळे प्राप्त परिस्थितीत जे सहज जमण्यासारखे होते ते करत गेलो. त्यात मजा आली तर ते केले, नाही तर सोडून दिले. माझा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून नव्हता, त्यामुळे तो माझा पहिला कप्पा नसून तिसरा होता. स्वान्तसुखाय चालवलेली  माझी ही ब्लॉगगिरी हाही त्यातलाच एक भाग आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

Monday, December 03, 2018

काचेचा इतिहास
गॅलिलिओने एका नळीमध्ये काचेची भिंगे बसवून दुर्बीण तयार केली आणि तिच्यामधून आकाशातल्या ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले, टॉरिसेलीने काचेच्या नळीत पारा भरून वायुभारमापक तयार केला आणि हवेचा दाब मोजला, सर आयझॅक न्यूटन यांनी काचेच्या प्रिझममधून सूर्याच्या प्रकाशकिरणांमधले सात रंग वेगळे करून दाखवले. अशा प्रकारे पूर्वीपासूनच विज्ञानामधील अनेक प्रयोगांमध्ये काचेचा उपयोग होत आला आहे. विज्ञानामधील प्रगतीमध्ये जसा धातूविद्येचा वाटा आहे तसाच काचेच्या निर्मितीमधील प्रगतीचासुद्धा आहे. आजसुद्धा प्रयोगशाळा म्हंटल्यावर आपल्याला काचेची टेस्ट ट्यूबच आठवते आणि डिजिटल आभासी जग आपल्याला काचेमधूनच दिसते. काच आणि संशोधन यांचेमध्ये खूप जवळचे नाते असल्यामुळे विज्ञानामधील प्रगतीचा वेध घेत असतांना काचेच्या इतिहासाबद्दलची माहिती समजून घेणे देखील गरजेचे आहे.

काच हा एकच विशिष्ट रासायनिक रचना (chemical composition) असलेला पदार्थ नसतो. ती एक प्रकारची स्थिति आहे आणि अनेक पदार्थ या स्थितीमध्ये येऊ शकतात किंवा आणता येतात. ही क्रिया निसर्गातसुद्धा घडत असते. ज्वालामुखींमधून बाहेर पडत असलेला अत्यंत तप्त असा लाव्हारस वेगाने थंड झाला तर त्या प्रक्रियेत लाव्हारसामधील कांही द्रव्यांपासून काचेचे तुकडे किंवा गोळे तयार होतात, वाळूवर आभाळातून वीज पडली तर निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊष्णतेमुळे तिथली थोडी वाळू वितळते आणि थंड होतांना तिची काच बनते. अणुबाँबच्या स्फोटाच्या ठिकाणीसुद्धा क्षणभरासाठी हजारो डिग्रींमध्ये तापमान वाढते त्यातून काच तयार होते. काचेच्या कारखान्यांमध्ये मुख्यतः वाळू, चुना आणि सोडा यांच्या मिश्रणाला खूप जास्त तापमानापर्यंत तापवून काच तयार करतात. त्यात इतर निरनिराळे धातू किंवा क्षार मिसळले तर तिचा रंग बदलतो आणि बाकीचे अनेक गुणधर्म बदलतात. काच तयार करतांना तिच्यात गरजेनुसार इतर अनेक पदार्थ घालून हवी तशी काच तयार केली जाते.

ज्वालामुखींमधून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या काचेचा उपयोग अश्मयुगापासून होत आला आहे. अशा काचेचे अणकुचीदार तुकडे अत्यंत कठीण आणि धारदार असल्यामुळे त्यांचा उपयोग हत्यारांसाठी होत असे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवनिर्मित काच तयार झाली. लोखंड किंवा तांबे यासारख्या धातूंच्या निर्मितीसाठी त्यांची खनिजे इतर पदार्थांबरोबर भट्टीमध्ये उच्च तापमानापर्यंत तापवली जात असतांना त्यांतल्या राखेमधून कदाचित कांही वेळा काचेचे तुकडे किंवा गोळेही निघाले असावेत. त्या काळातल्या कांही कारागीरांनी वाळू, चुना आणि सोडा यांना एकत्र भाजून त्यातून काच तयार करण्याचे कसब हस्तगत केले होते, पण तिचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जीवनात होत नव्हता. त्या काळातले राजेरजवाडेच त्या वस्तू वापरत असावेत. जुन्या काळातल्या अवशेषांमध्ये सापडणाऱ्या बहुतेक सगळ्या काचेच्या वस्तू मुख्यतः शोभेच्या आणि अर्थातच मौल्यवान असतात. हिरेमाणिकासारख्या अमूल्य रत्नांसारखे दिसणारे काचेचे नकली खडेही तयार केले जात होते आणि त्यांचाही उपयोग अलंकारांमध्ये होत होता. अशा प्राचीन काळातल्या वस्तूंचे अवशेष जगभरातल्या अनेक ठिकाणच्या उत्खननांमध्ये सापडले आहेत.

सुमारे सातआठशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये काचेची निर्मिती अधिक प्रमाणात व्हायला लागली. पुढील कांही शतकांमध्ये तिथल्या काही शहरांमध्ये उत्कृष्ट प्रतीची काच आणि काचेच्या वस्तू तयार करणारे कुशल कारागीर तयार झाले. त्यांनी काच तयार करण्याच्या तंत्रज्ञानात अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. जास्तीत जास्त पारदर्शक अशी काच तयार केली, कोणते रसायन वापरून किंवा मिसळून ती काच लाल, निळ्या, हिरव्या अशा वेगळ्या रंगाची होते याचा अभ्यास केला आणि काचेवर चित्रे काढण्याची कला विकसित केली. सर्वात महत्वाचे म्हणजे तापवलेली गरमागरम काच लवचिक झालेली असतांनाच तिच्यात नळीमधून जोरात फुंकर मारून एक मोठा फुगा तयार करायचा आणि त्याला चंबू, बाटली, नळी किंवा पेल्यासारखे आकार द्यायचे तंत्र विकसित केले. काचेला पसरून त्याचा मोठा आणि सपाट पत्रा (Sheet) तयार केला. काचेला पॉलिश करून गुळगुळित करायचे आणि चमकावण्याचे कौशल्य मिळवले. या सुधारणा होत असतांना काचेपासून वेगवेगळ्या आकारांची पात्रे, पेले, सुरया आणि नलिका अशा अनेक प्रकारच्या उपयोगी वस्तू तयार व्हायला लागल्या. पारदर्शक काचेपासून भिंगे आणि आरसे बनवले गेले. काचेच्या शीटपासून दारे आणि खिडक्यांची शोभिवंत तावदाने तयार केली जाऊ लागली. युरोपमधील बहुतेक सर्व जुन्या चर्चेसमधील दरवाजे आणि खिडक्यांवर अशी स्टेन्ड ग्लासची अत्यंत सुबक चित्रे पहायला मिळतात. गॅलीलिओच्या काळापर्यंत काचेच्या अनेक प्रकारच्या वस्तू तयार होऊ लागल्या होत्या. त्यामुळे पुढील काळातल्या प्रयोगशाळांमध्ये त्यांचा उपयोग प्रयोग करण्यासाठी होत गेला. 

काच सहसा रासायनिक क्रियेत भाग घेत नाही, ती हवापाण्याने गंजत नाही की सर्वसामान्य उपयोगातल्या द्रवात विरघळत नाही. त्यामुळे अनेक प्रकारची रसायने काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवता येतात. काचेचे विघटन आणि झीज होत नसल्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. पारदर्शक काचेच्या उपकरणांमधल्या वस्तू आणि त्यांच्यात चालत असलेल्या क्रिया सहजपणे दिसतात. कुठल्याही प्रकारचे मोजमाप करणाऱ्या साधनांमध्ये (Meter) फिरणारी सुई काचेमधून सहजपणे दिसते त्यामुळे डायलवर काचेचे झाकण असलेली असंख्य साधने (Instruments) निघाली. तेले, रसायने, औषधे वगैरेंवर प्रयोग करण्यासाठी अनेक पात्रांना जोडण्याची जुळवाजुळव करावी लागते ते काम काचेच्या नलिकांच्या माध्यमामधून सुलभपणे करता येते. काचेपासून मिळणाऱ्या अशा अनेक फायद्यांमुळे प्रयोगशाळांमध्ये काचेचा उपयोग वाढत गेला. धक्क्का लागून किंवा तापवतांना न फुटणाऱ्या, विशिष्ट घनता किंवा प्रकाशविषयक (Optical) गुणधर्म असलेल्या खास प्रकारच्या काचा तयार होत गेल्या. इतकेच नव्हे तर काचेचा धागासुद्धा (Fiber glass) तयार झाला. विज्ञानाची घोडदौड वेगाने व्हायला गेल्या दोन तीन शतकांमधील काचेच्या उत्पादनामधील प्रगतीची मोठी मदत झाली आहे.

 Monday, November 26, 2018

माझी डिजिटल दिवाळीमाझ्या लहानपणी दिवाळी म्हणजे अपरंपार महत्वाचा सण असायचा. त्या चारपाच दिवसांमधली खाद्यंति, नवे कपडे, दिवे, रांगोळ्या, फटाके, पाहुण्यांची गर्दी वगैरे सगळे काही जन्मभर लक्षात राहिले आहे. याचे कारण म्हणजे ते नेहमीपेक्षा खूपच वेगळे असायचे. त्या रेशनिंगच्या काळात रोजच्या आहारातली धान्येसुद्धा खुल्या बाजारात मिळायची नाहीत. रेशनच्या दुकानात जे आणि जेवढे धान्यधुन्य मिळेल तेच शिजवायचे आणि एकाद्या कालवणाबरोबर पोटात ढकलून भूक भागवायची अशी परिस्थिती होती. फक्त सणावाराच्या दिवशीच थोडे गोडधोड खायला मिळायचे. त्यामुळे दिवाळीतले चार दिवस रोज निरनिराळी पक्वान्ने आणि शिवाय इतर वेळी फराळाचे चविष्ट पदार्थ खाणे म्हणजे प्रचंड चंगळ होती. त्या काळात एरवी रोज जुनेच कपडे धुवून वापरायचे, उसवले तर शिवण मारून आणि फाटले तर ठिगळ लावून त्यांचे आयुष्यमान वाढवत रहायचे आणि मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान व्हायला लागल्यावर ते लहान भावाने घालायचे अशीच रीत होती.  दर वर्षी दिवाळीत मात्र नवे कपडे मिळत असल्यामुळे त्यांचे मोठेच अप्रूप वाटायचे.

आजकाल आपण सगळ्या प्रकारच्या मराठी पदार्थांशिवाय काश्मीरी राजमा ते दाक्षिणात्य डोसे, गुजराथी उंधियो ते बंगाली रोशगुल्ले, एवढेच नव्हे तर चिनी मांचूरिया ते इटालियन पिझ्झापर्यंत असंख्य खाद्यपदार्थ नेहमीच हॉटेलात जाऊन खातो किंवा ते घरबसल्या खायला मिळतात, कुठलेसे बंधू किंवा राम यांच्या नावांच्या खाद्यपदार्थांची पुडकी कपाटांमध्ये आणि डबे फ्रिजमध्ये पडलेले असतात. आपल्याला इच्छा होईल त्या क्षणी आपण गोड किंवा तिखटमिठाचा एकादा पदार्थ चाखू शकतो. त्यांच्या या वाढलेल्या उपलब्धतेमुळे आता दिवाळीतल्या खाण्याचे विशेष महत्वच वाटेनासे झाले आहे. त्याचप्रमाणे आपण नेहमीच भरमसाट कपडे खरेदी करत असतो आणि कृत्रिम धाग्यांचे आजकालचे कापड आटत नाही, विटत नाही की फाटत नाही आणि ते वर्षानुवर्षे नवे कोरेच दिसते. तरीसुद्धा दिवाळीला नेमाने नवे कपडे घेतो पण त्यापासून लहानपणी वाटायचा तेवढा आनंद मात्र आता मिळत नाही.

शिक्षण आणि नोकरीसाठी परगावी रहात असलेली आमच्या एकत्र कुटुंबातली झाडून सगळी मंडळी माझ्या लहानपणी दिवाळीला सहकुटुंब घरी जमायचीच. त्यांच्या आगमनाने आमचा वाडा एकदम गजबजून जात असे. त्यात लहान बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्या वयोगटातले लोक असायचे. मग गप्पागोष्टी, थट्टामस्करी, हास्यविनोद, गाणी, नकला, पत्ते आणि सोंगट्यांचे डाव वगैरेंमध्ये सगळा दिवस तर धमाल यायचीच, रात्रीसुद्धा गच्चीवर अंथरुणे पसरून त्यात दाटीवाटीने पडल्यापडल्या गप्पांचे फड खूप रंगायचे. लहानपणाबरोबरच हा अद्भुत अनुभव मात्र संपून गेला. पुढील काळात सारी भावंडे एक दोन खोल्यांच्या लहान लहान घरांमध्ये देशभर विखुरली आणि सर्वांना एकत्र आणण्यासाठी दिवाळीचे आकर्षण पुरेसे सशक्त राहिले नाही. मी मुंबईत असतांना दिवाळीमध्ये तिथल्या भावाकडे किंवा बहिणीकडे आवर्जून जात असे आणि एकादा दिवस ते माझ्याकडे येत असत. पुण्यामधली आप्त मंडळीसुद्धा दिवाळीतल्या एका दिवशी एकत्र जमत असत, पण हळूहळू हे भेटणेसुद्धा कमी होत गेले.

गेल्या काही वर्षांपासून आंतर्जाल (इंटरनेट) आणि दूरध्वनि (टेलीफोन) यांच्या माध्यमामधून मात्र जगभर पसरलेली आपली माणसे एकमेकांना जोडली गेली आहेत. पाहिजे तेंव्हा आपण त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना पिटुकल्या पडद्यावर डोळ्यांनी पाहू शकतो किंवा त्यांना समोर पाहता पाहता त्यांच्याशी बोलूही शकतो. वॉट्सअॅपवर सतत काही ना काही संदेशांची देवाणघेवाण चाललेली असते. त्यामुळे ते लोक इतके दुरावल्यासारखे वाटत नाहीत. या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे काही जुने आणि आधी दुरावलेले मित्र किंवा आप्तसुद्धा आता आपल्या संपर्कक्षेत्रात आले आहेत. 

या वर्षी दिवाळीला माझी नातवंडे त्यांच्या आईबरोबर 'मामाच्या गावाला' गेली होती. मुलाला ऑफिसमध्ये अत्यंत आवश्यक असे काम असल्यामुळे तो इथेच थांबला होता, पण घरी असतांनासुद्धा बहुतेक वेळ तो त्याच्या कँप्यूटरमध्ये डोके खुपसून आणि फोनवर कुणा सहकाऱ्याशी किंवा क्लायंटशी बोलत बसलेला असे. त्यामुळे 'मै और मेरी तनहाई' तेवढे एकमेकांना सोबत करत होतो पण इंटरनेटमधून अख्खी डिजिटल दुनिया मला भेटत होती आणि माझ्याशी बोलत होती. त्यातली काही माणसे खरीखुरी आणि आमच्या जवळची होती, तर काही मला या आभासी दुनियेत भेटलेली होती, त्यांनी आपला जो मुखवटा ठरवून दाखवला होता तेवढाच मला माहीत होता.या दुनियेमध्येसुद्धा मोठ्या धूमधडाक्याने दिवाळी साजरी होत होती. अगदी वसुबारसेपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाची व्यवस्थित सविस्तर सचित्र माहिती एका पाठोपाठ एक पहायला आणि वाचायला मिळत होती. वसुबारसेला कुठल्याही गोठ्यात न जाता मला सवत्स धेनूंचे दर्शन घडले. गाईच्या पोटात ३३ कोटी देव असतात म्हणे. एका शिल्पाच्या छायाचित्रात प्रतीकात्मक रीतीने गायीच्या पोटातले अनेक देव दाखवले आहेत. धनत्रयोदशीला समुद्रमंथनामधून धन्वंतरी प्रकट झाले म्हणून त्या दिवशी त्याचीही पूजा करतात हे मला माहीत नव्हते. तसेच दिवाळीत देवांचा खजिनदार कुबेर याचीही पूजा करतात म्हणे. देवादिकांनासुद्धा आजार होत असतील का? ते झाले तर धन्वंतरी आणि अश्विनीकुमार त्यांच्यावर कसले उपचार करत असतील? कुबेराकडे देवांचा कुठला खजिना असायचा? त्यात कुठले धन ठेवले असायचे? ते धन तो कुठे ठेवत असेल आणि त्याचा विनियोग कोण, केंव्हा आणि कसा करत असेल? असले प्रश्न मात्र कुणालाच पडत नाहीत. नरकचतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराला मारले असे मी लहानपणापासून ऐकत होतो, पण त्या दिवशी कालीमातेनेसुद्धा एकाद्या असुराला मारले असावे. मला आलेल्या एका शुभेच्छापत्रावर दिलेल्या चित्रात तसे दाखवले आहे तर दुसऱ्या चित्रात साक्षात शंकरालाच कालीच्या पायाशी दाखवले आहे. त्याचा उलगडा होत नाही.  श्रीकृष्णाचे नरकासुराला मारतांनाचे चित्र मात्र कुठे दिसले नाही.

अमावास्येच्या रात्री सगळीकडेच भक्तीभावाने लक्ष्मीपूजन आणि दिव्यांची जास्तीत जास्त आरास करतात, त्याच्यापाठोपाठ फटाक्यांचा धुमाकूळ सुरू होतो आणि बराच वेळ चालतो. आजकाल वायूप्रदूषण आणि ध्वनिप्रदूषणाचा विचार करून यावर अंकुश लावण्यासाठी बराच प्रचार होत असतो. या वर्षी निदान पुण्यात तरी त्याचा थोडा परिणाम झाला असावा असे वाटले. आमच्या भागात या वर्षी मी पहिल्यांदाच रहात होतो, पण आतापर्यंत इतर ठिकाणी जो कानठळ्या बसवणारा आवाज कानावर यायचा तसा या वर्षी इथे आला नाही. पाडव्याच्या दिवशी बालश्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला होता आणि त्याच्या छताखाली सर्व गोकुळाचे पावसापासून रक्षण केले होते. त्या घटनेनिमित्य या दिवशी उत्तर भारतात गोवर्धनपूजा करतात ही एक नवी माहिती समजली. कार्तिक शुद्ध द्वितियेला म्हणजे आपल्याकडल्या भाऊबीजेच्या दिवशी उत्तर भारतातले काही लोक चित्रगुप्त महाराजांची पूजा करतात हे आणखी एक नवे ज्ञान मला या वर्षी मिळाले.दिवाळीच्या दिवसांमध्ये माझ्या डिजिटल विश्वातल्या मित्रांनी (यात नातेवाईकांचाही समावेश होतो) असंख्य शुभकामनासंदेश (ग्रीटिंग्ज) तर पाठवलेच, त्यानिमित्य अनेक अफलातून विशेष लेख आणि कविताही फेसबुक आणि वॉट्सअॅपवर पाठवून दिल्या. काही लोकांनी शास्त्रीय संगीताचे आणि एका मित्राने खास दिवाळीवरील अनेक मराठी गाण्यांचे रेकॉर्डिंग पाठवले. शिवाय टेलिव्हिजनवर रोज सकाळी दिवाळीपहाटेचे विशेष कार्यक्रम दाखवले जात होतेच, इतरही काही ना काही खास कार्यक्रम असायचे. रोजच्या डेली सोप म्हणजे नेहमीच्या मालिकांमधल्या कुटुंबांमध्येसुद्धा दिवाळीमधला प्रत्येक दिवस अगदी साग्रसंगीत साजरा होतांना दिसत होता. अंगाला तेल लावून मालिश करणे, तबकात निरांजन आणि सुपारी ठेऊन आणि ओवाळून औक्षण करणे, सर्वांनी मिळून हास्यविनोद करत फराळ करणे वगैरे तपशीलासह दिवाळीतले घरगुती प्रसंग इतके हुबेहूब चित्रित केले होते की ते माझ्या आजूबाजूलाच घडत असल्याचे वातावरण निर्माण करत होते. गंमत म्हणजे खरी दिवाळी संपून गेली तरी यांची दिवाळी आणखी २-३ दिवस हळूहळू चाललेलीच होती.

माझ्या काही आप्तांनीसुद्धा आपल्या पोस्टमध्ये तो सण कुणीकुणी कसा साजरा केला यांची अनेक छायाचित्रे (फोटो) आणि चलतचित्रे (व्हीडिओ) पाठवली होती. त्यात फराळाचे पदार्थ, किल्ले, फुलबाज्या, ओवाळण्याचे कार्यक्रम वगैरे सगळे काही छान दाखवले होते. ती चित्रे पाहतांना मीसुद्धा मनाने त्यांच्या उत्साहात सहभागी होत होतो. त्याशिवाय रोज सकाळसंध्याकाळी टेलीफोन आणि व्हीडिओ कॉल्स होत होतेच.

मी कॉलेजशिक्षणासाठी आणि नोकरीसाठी घरापासून दूर रहात असतांनासुद्धा दरवर्षी दिवाळीला मात्र नेमाने घरी जात असे. दिवाळीच्या दिवशी एकट्याने घरात बसून राहण्याचा हा माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव होता. पण मी एकटा कुठे होतो? "लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी। भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी॥" असे म्हणत प्रत्यक्ष माणिक वर्मांनी माझ्या दिवाळीची सुरुवात करून दिली होती. साक्षात बिस्मिल्लाखानांच्या सुस्वर अशा शहनाईवादनाने माझी मंगलप्रभात सुरू होत होती. त्यानंतर पं.भीमसेनअण्णा आणि कुमारजी वगैरे थोर दिवंगत मंडळींपासून ते राहुल आणि कौशिकीपर्यंत आताची तरुण गायक मंडळी यांची शास्त्रीय संगीताची मेजवानी मिळत होती. शिवाय लतादीदी, आशाताई, रफी, मुकेश, किशोर वगैरेंची तर विविध प्रकारची हजारो सुरेल गीते साथीला होतीच. संगीत ऐकून झाले असेल तर वाचण्यासाठी अनेक विनोदी किंवा माहितीपूर्ण पोस्टांचा प्रवाह या सोशल मीडियावर अखंड वहात होता. त्यांच्याहीपेक्षा मजेदार अशी चित्रे, चलचित्रे आणि व्यंगचित्रे छान मनोरंजन करत होती. लिहायचा मूड आला तर माझे स्वतःचे ब्लॉग होतेच, फेसबुकवरही लिहिण्याची सोय होती. फेसबुक आणि वॉट्सअॅपवरील मित्र त्यावर 'आवडले' (लाईक)चे शिक्के मारून उत्साह वाढवत होते किंवा काही वेळा आपले शेरे मारत होते, तसेच मी इतरांच्या लेखनावर करत होतो. त्यावर मग उत्तरप्रत्युत्तरांच्या फैरी झडत होत्या आणि या विषयावर आपली मते भिन्न असल्यामुळे "वुई अॅग्री टु डिसअॅग्री"वर जाऊन त्या थांबत होत्या. हे सगळे एरवीसुद्धा चालतच असते. दिवाळीमुळे त्यात खंड पडला नव्हता. या सर्वांच्या साथीमुळे मला केंव्हाच एकटा पडल्यासारखे वाटलेच नाही.

तेंव्हा अशा रीतीने साजरी झालेली ही माझी पहिली डिजिटल दिवाळीसुद्धा मला आनंदाचे दोनचार क्षण देऊनच गेली.  या वर्षी मला आलेल्या आणि आवडलेल्या खास संदेशांचा एक संग्रह करून मी तो या ठिकाणी जपून ठेवला आहे.
https://anandghare.wordpress.com/2018/11/13/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE/

Friday, November 09, 2018

माझा चित्रांचा संग्रह - १ - दीपांचा इतिहास

मी नोकरीत असतांना शेवटी शेवटी माझ्यावर इतकी जबाबदारीची कामे पडली होती की त्यातून माझ्या वैयक्तिक कामासाठीच वेळ मिळत नव्हता, मग फावल्या वेळातले छंद कसे जोपासणार? पण त्याच काळात माझा जनसंपर्क अपार वाढल्यामुळे मला मिळणारी आमंत्रणपत्रे आणि ग्रीटिंग कार्ड्स यांची संख्या शिगेला पोचली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर ती शांतपणे पहावीत असा विचार करून मी ती टाकून न देता मी ढिगारा करून बाजूला ठेऊन दिली होती.  पण प्रत्यक्षात सेवेमधून मुक्त झाल्यानंतर आणखी अनेक अडचणी येत गेल्या आणि तो अव्यवस्थित ढिगारा वाढत गेला.

अशा प्रकारे माझ्याकडे गोळा होत असलेल्या असंख्य चित्रांना व्यवस्थित मांडून ठेवण्यासाठी त्यांची कशा रीतीने वाटणी करायची याचा मी विचार करत होतो. त्यात एकदा मला 'दिव्यांचा इतिहास' या विषयावरचा लेख मिळाला. तो वाचल्यावर मला एक कल्पना सुचली आणि माझ्याकडे असलेल्या दिव्याच्या सगळ्या चित्रांना एका डायरीत चिकटवून ठेवले. माझ्या संग्रहांबद्दल लिहितांना दीपावलीची वेळ साधून या संग्रहापासून सुरुवात करायची होती, पण त्यातही नकटीच्या लग्नासारखी सतराशे तांत्रिक विघ्ने आली. अखेरीस हे प्रेझेंटेशन ज्या स्थितीत होते तसेच आधी दाखवून टाकले. आणि नंतर फुरसतीने त्याचे थोडे थोडे संपादन केले.

एक चित्र म्हणजे हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हणतात. आता मी इतके शब्द कुठून आणणार? त्यापेक्षा चित्रेच दाखवलेली बरी. माझ्या संग्रहातील बऱ्याचशा चित्रांचे फोटो काढून ते सहा चौकटींमध्ये चिकटवले आणि या लेखात खाली दिले आहेत. साध्या मातीच्या पणतीपासून नक्षीदार टांगलेल्या दिव्यांपर्यंत प्रगत होत गेलेल्या दिव्यांची अनेक रूपे माझ्या या संग्रहामध्ये पहायला मिळतील.

आदिमानवाने अग्नीचा शोध लावल्यानंतर त्याचेपासून ऊष्णता आणि प्रकाश या दोन्ही गोष्टी मिळवणे सुरू केले. शेकोटी, चूल, शेगडी, भट्टी अशा साधनांमधून उष्णता प्राप्त केली तर पणती, निरांजन, समई वगैरे दिव्यांमधून उजेड मिळवला. त्यामध्ये होत गेलेल्या सुधारणा  कवि वि.म.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या आणि मी शाळेत शिकलेल्या एका कवितेत इतक्या छान दाखवल्या होत्या!

आधी होते मी दिवटी, शेतकऱ्यांची आवडती । 
झाले इवली मग पणती,घराघरांतून मिणमिणती। 
समई केले मला कुणी, देवापुढती नेवोनी । 
निघुनी आले बाहेर, सोडीत काळासा धूर।
काचेचा मग महाल तो, कुणी बांधुनी मज देतो । 
कंदील त्याला जन म्हणती, मीच तयांतिल परि ज्योती। 
बत्तीचे ते रूप नवे, पुढे मिळाले मज बरवे। 
वरात मजवाचून अडे, झगमगाट तो कसा पडे। 
आता झाले मी बिजली, घरे, मंदिरे लखलखली । 
देवा ठाऊक काय पुढे, नवा बदल माझ्यात घडे। 
एकच ठावे काम मला, प्रकाश द्यावा सकलांला । 
कसलेही मज रूप मिळो, देह जळो अन्‌ जग उजळो।

बिजली या एका शब्दात सांगितलेल्या दिव्यांची पुढे ट्यूबलाइट, निऑन, सोडियम व्हेपर आणि आता एलीडी पर्यंत अनेक रूपे येत गेली आहेत. पण केरोसीन, पेट्रोल किंवा वीज यांनी उजळणाऱ्या दिव्यांचा समावेश या संग्रहात केलेला नाही.


प्राचीन काळातल्या माणसाने दिव्यांसाठी खोलगट दगड, शिंप, नारळाची करवंटी यांचा उपयोग केला असावा, असे अश्मयुगामधील अवशेषांमधून दिसते, पण त्याने त्यात घालण्यासाठी तेल आणि वात कुठून आणली याचा पूर्ण उलगडा होत नाही. मातीची भांडी घडवताना त्यानं पणती घडवली. धातूंचे शोध लागल्यानंतर तांब्यापितळेचे दिवे तयार झाले. श्रीमंत लोकांनी चांदीचे आणि अतीश्रीमंत लोकांनी सोन्यापासूनही दिवे बनवून घेतले. मातीची पणती आणि धातूंचे दिवे या दोन्ही प्रकारांमध्ये कला आणि कौशल्य या दोन्हींचा विकास होऊन त्यांचे निरनिराळे आकार तयार केले गेले. त्यात निसर्गामधील पाने, फुले, पक्षी, प्राणी वगैरे होते तसेच कलाकाराच्या कल्पनेमधून तयार झालेले आकारही होते. "इतिहास भारतीय दीपोंका" या लेखाबरोबर दिलेल्या चित्रांमध्ये हे दाखवले आहेत.


भारतीय संस्कृतीमध्ये दीपकाला फार महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रम दीपप्रज्ज्वलनापासून सुरू होतो आणि पूजेच्या अखेरीला आरती असतेच. नवरात्रासारख्या उत्सवात देवीसमोर रात्रंदिवस तेवत राहणारा नंदादीप ठेवला जातोच, रोजच संध्याकाळी देवापुढे एक दिवा लावण्याची प्रथा होती. संधिकाळाच्या वेळेलाच दिवेलागणी असे नाव होते. दिव्याची अंवस आणि दीपावली हे तर खास दिव्यांचेच उत्सव असतात. देवळांच्या गाभाऱ्यामध्ये मोठमोठ्या समया असतातच, कांही ठिकाणी देवळांच्या समोर दगडांच्या उंचच उंच दीपमाळाही असतात.


दुसऱ्या चित्रामध्ये दाखवलेले सर्व दिवे देवघरात किंवा देवळांमध्ये ठेवण्यासाठी तयार केलेले आहेत. त्यामध्ये विविध घाट, सुंदर कलाकुसर आणि प्रतीकात्मकता आढळते. कांहींमध्ये देवतांची सुरेख चित्रे कोरलेली आहेत तर कांहीमध्ये पशुपक्षी. एका दिव्यात तर हत्तीवरील अंबारी आणि त्यातला माहूतसुध्दा दाखवला ओहे. कांहीं दिव्यांमध्ये एकच ज्योत आहे तर कांहींमध्ये अनेक वाती लावून अनेक ज्योतींसाठी सोय केलेली आहे.भारतामध्ये देवाधर्मासाठी फक्त तेलातुपावर जळणाऱ्या दिव्यांचाच उपयोग केला जात असे, तर पश्चिमेकडील थंड प्रदेशात उजेडासाठी मेणबत्त्या लावल्या जात असत. पेट्रोलियमचा उपयोग सुरू झाल्यानंतर केरोसीन जाळून उजेड देणारे काचेचे कव्हर असणारे चिमणे दिवे आणि कंदील आले. तिसऱ्या चित्रामधील शैलीपूर्ण रोशनदानीमध्ये मेणबत्ती लावलेली आहे आणि तिच्यासंबंधीचे एक काव्य लिहिले आहे. ॐ आकाराच्या आणि पक्षीदीपांची खास वैशिष्टे दिली आहेत. बाकीचे दिवे चित्रकारांच्या कल्पनेतले आहेत.


जगामधील सर्वात उंच समई, कोरियामधील एक अजस्त्र दिवा, मेणबत्तीत दडून बसलेली कमनीय सुंदरी, काही जाळीदार सुंदर दिवे आदींची वैषिष्ट्यपूर्ण चित्रे चौथ्या चित्रात आहेत.
पुढील दोन चित्रांमध्ये मुख्यतः चित्रकारांची कल्पकता दाखवली आहे आणि शेवटच्या चित्रामध्ये शुभ दीपावलीचे सुबक असे संदेश आहेत.Friday, November 02, 2018

धातूविद्येचा इतिहास

धातूविद्येचा इतिहास - भाग १
आर्किमिडीज आणि आर्यभटापासून ते जेम्स ब्रॅडलीपर्यंत जुन्या काळातल्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाची ओळख मी या मालिकेत करून दिली आहे. यातल्या प्रत्येकाने कांही प्रयोग करून नवी माहिती मिळवली आणि तिचा अभ्यास करून त्यामधून नवे शोध लावले होते, म्हणजे कांही नवे नियम किंवा सिद्धांत मांडले होते. हे प्रयोग करण्यासाठी त्यांनी निरनिराळी उपकरणे किंवा साधने वापरली होती. दोन हजार वर्षांपूर्वी आर्किमिडीजने एक तराजू, मोठे पातेले आणि परात यांचा उपयोग करून पाण्याच्या गुणधर्मांचा अभ्यास केला होता तर अठराव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रॅडलीने त्याच्या काळातसुद्धा अत्यंत प्रभावशाली आणि संवेदनशील अशा दुर्बीणीमधून दूरच्या एका ताऱ्याची निरीक्षणे केली होती आणि तो तारा पहातांना त्याच्या स्थानामध्ये पडलेला एक अंशाच्या दोनशेवा हिस्सा इतका सूक्ष्म फरक मोजला होता. विज्ञानातल्या प्रयोगांसाठी लागणारी असली साधने झाडाला लागत नाहीत की इतर कुठल्याही मार्गे निसर्गातून मिळत नाहीत. बहुतेक सगळ्या शास्त्रज्ञांनी ती मुद्दाम तयार करून किंवा करवून घेतली होती. ती मुख्यतः कुठल्या ना कुठल्या धातूंपासून बनवलेली होती. त्यासाठी आवश्यक असलेले विशिष्ट गुणधर्म असणारे धातू त्यांच्या काळात उपलब्ध झाले होते आणि त्यांना हवा तसा आकार देणे शक्य झाले होते म्हणूनच त्या शास्त्रज्ञांना ती साधने मिळाली आणि आपले संशोधन करता आले. वाफेच्या इंजिनात तर अनेक सुटे भाग तयार करून जोडले होते. जेम्स वॉटच्या काळात ते शक्य झाले होते म्हणून त्याला आपले इंजिन तयार करता आले. याचाच अर्थ असा होतो की विज्ञानामध्ये झालेली प्रगती मेटॅलर्जी किंवा धातूविज्ञानामधील प्रगतीशी निगडित होती. म्हणूनच विज्ञानामधील प्रगतीचा मागोवा घेतांना या विद्येचा थोडक्यात आढावा घेणे जरूरीचे आहे.

इतिहासपूर्व काळापासून मानवाने निरनिराळ्या अनेक धातू शोधून काढल्या आहेत. पण त्यातले विज्ञान म्हणजे थिअरीचा किंवा सैद्धांतिक भाग गेल्या एक दोन शतकातलाच आहे. तोंपर्यंत त्यासंबंधीचे बहुतेक सगळे काम प्रत्यक्ष प्रयोगांमधूनच होत होते. त्यामुळे या शास्त्रामधील संशोधनात तंत्रज्ञानाचाच खूप मोठा वाटा आहे. पण ज्या महान तंत्रज्ञांनी ते काम केले आणि निरनिराळ्या धातूंमधून असंख्य प्रकारच्या वस्तू तयार केल्या त्या कुशल कारागीरांची नांवे मात्र कुठेच नोंदवलेली नाहीत. विज्ञान हा सुद्धा पूर्वीच्या काळी तत्वज्ञानाचाच भाग समजला जात होता. तत्वज्ञांना जेवढा मान किवा प्रसिद्धी मिळाली तशी ती तंत्रज्ञांना कधीच मिळाली नाही. उदाहरणार्थ जगद्गुरु शंकराचार्य किंवा ग्रीक फिलॉसॉफर सॉक्रेटिस यांची शिकवण समजली नसली तरी सगळे लोक त्यांची नांवे आदराने घेतात पण मदुराईचे मीनाक्षी मंदिर किंवा रोमचे कोलोजियम पाहून सगळे लोक थक्क होत असले तरी त्या भव्य इमारती कुणी आणि कशा बांधल्या हे तिथल्या गाईडना देखील माहीत नसते. 

धातूविज्ञानाची प्रगति कुठल्या क्रमाने होत गेली याची त्रोटक माहिती उपलब्ध आहे. पुरातत्ववेत्त्यांना (आर्किऑलॉजिस्ट) ठिकठिकाणी केलेल्या उत्खननांमध्ये जे अवशेष मिळतात त्यांची तपासणी करून त्या वस्तूचे अंदाजे वय आणि ती कशापासून तयार केली होती याचा अंदाज लागतो आणि तिला तयार करण्याचे कौशल्य आणि विद्या यांची माहिती समजते. त्यावरून पाहता उत्क्रांतीचा क्रम समजतो. त्याच्या आधाराने मानवाच्या इतिहासाचे अश्मयुग किंवा पाषाणयुग (स्टोन एज), कांस्ययुग (ब्राँझ एज) आणि लोहयुग (आयर्न एज) असे ढोबळ भाग पाडले आहेत. यातले प्रत्येक युग काही हजार वर्षांचे आहे. जगातल्या निरनिराळ्या भागात त्या काळांमधले त्यांचे अवशेष मिळतात आणि ते यापुढेही मिळत राहणार आहेत. नव्या धातूचा शोध लागला म्हणून आधीच्या धातूचा उपयोग करणे थांबत नाही. ते सगळे धातू आजतागायत उपयोगात आहेतच. त्यामुळे त्यातला कोणता धातू सर्वात आधी कधी आणि कुठे तयार केला गेला याचा एक निश्चित असा क्रम सांगता येणार नाही.

माणूस अजून पाषाणयुगात असतांनाच सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी त्याला सर्वात आधी सोने सापडले. सोने हा एक असा धातू आहे की तो आगीमध्ये जळत नाही की पाण्यामध्ये गंजत नाही. त्याची आणखी कुणासोबत संयुगे न होता तो नैसर्गिक स्थितीमध्ये लक्षावधी वर्षे जमीनीत पडून राहिला आहे. यामुळे कधी माती खणतांना किंवा दगड फोडतांना त्यात चकाकणारे सोन्याचे लहानसे गोळे माणसाला मिळाले आणि त्याने ते जपून ठेवायला सुरुवात केली.  पण हा धातू पूर्वीपासूनच दुर्मिळ आणि मौल्यवान असल्यामुळे त्याचा उपयोग दागदागिने करण्यासाठी आणि धनदौलत म्हणूनच होत राहिला.

सुमारे सहा सव्वासहा हजार वर्षांपूर्वी तांबे हा पहिलाच धातू माणसाने कृत्रिम रीत्या तयार केला. त्याच्या खनिजाला म्हणजे एकाद्या ठिकाणच्या मातीला मोठ्या जाळात भाजत असतांना त्यातून वितळलेले तांबे बाहेर पडले. तो धातू कुठल्या मातीपासून आणि कसा तयार करायचा आणि त्याला कसा आकार द्यायचा यावर पुढील दोन अडीच हजार वर्षे अनेक प्रकारचे प्रयोग करून माणसाने त्यात हळूहळू प्राविण्य मिळवले. कांस्ययुगाच्या सुरुवातीचा भाग असलेल्या या कालखंडाला ताम्रयुग असेही म्हंटले जाते. शुद्ध तांबे फारच मऊ असल्यामुळे त्याचा लढाईसाठी फारसा उपयोग नव्हता. तांब्याचा शोध लागल्यानंतर माणसाला आर्सेनिक, कथील, शिसे असे आणखी कांही धातू सापडले आणि कांही कामांसाठी त्यांचाही उपयोग व्हायला लागला.  वितळलेल्या तांब्यामध्ये आर्सेनिक किंवा कथील असा दुसरा धातू मिसळला तर ते मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामधून जास्त कणखर आणि टिकाऊ पदार्थ तयार होतो असे सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी माणसाला समजले. अशा मिश्रधातूला कांस्य (ब्राँझ) म्हणतात. त्याचे गुणधर्म पाहता त्याचा अधिक प्रमाणात उपयोग व्हायला लागला आणि कांस्ययुग बहराला आले. ते आणखी सुमारे पुढील हजार वर्षे टिकले. काही ठिकाणच्या खाणीमधील खनिजातच तांब्याबरोबर इतर एकादी धातू मिसळलेली असल्यामुळे त्यामधून थेट कांस्यच तयार झाले. यामुळे कांस्ययुग हे पूर्वीपासून मानले जाते. जगाच्या पाठीवरील भारतासह अनेक देशांमध्ये केलेल्या उत्खननांमध्ये कांशाच्या मूर्ती तसेच शस्त्रास्त्रे सापडली आहेत. ताम्रयुगातल्या वस्तूंपेक्षा या किती तरी सुबक आहेत हे चित्रावरून लक्षात येईल.
----------------------------------------

धातुविद्येचा इतिहास - भाग २
ओल्या मातीपासून तयार केलेल्या वस्तूला भट्टीत भाजल्यावर कणखरपणा आणि टिकाऊपणा येतो हे माणसाला पाषाणयुगातच समजले होते आणि तो विटा, कौले, गाडगी, मडकी वगैरेंचा वापर करायला लागला होता. त्याने निरनिराळ्या प्रकारच्या आणि आकारांच्या भट्ट्या तयार केल्या. या कुंभारांच्या भट्ट्यांमध्ये दगडमातीवर केलेल्या प्रयोगांमधून तांबे, कथिल, शिसे यासारख्या धातूंचे शोध लागत गेले. कमी तापमानावर वितळणारे धातू कांस्ययुगात सापडले. त्यांचा अधिक अभ्यास आणि प्रयोग करून ते धातू आणि त्यांचे मिश्रधातू तयार करून त्यांना आकार देण्याच्या तंत्रज्ञानाचा विकास होत गेला.

सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी लोखंडाचा शोध लागला आणि त्याने जगाच्या इतिहासाचे रूप पालटले. तेंव्हा सुरू झालेले लोहयुग दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत तर चाललेले होतेच, किंबहुना ते अजून चाललेले आहे असेही म्हणता येईल. लोखंड हा धातू खनिजांच्या स्वरूपात पृथ्वीवर भरपूर प्रमाणात सापडतो, पण त्यापासून लोखंड तयार करण्याची क्रिया सोपी नाही. सुमारे साडेतीन ते चार हजार वर्षांपूर्वीच्या कांही उद्योगशील लोकांनी लोखंडाचे खनिज आणि कोळसा यांना चुनखडीसारख्या आणखी कांही पदार्थांसोबत खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये खूप जास्त तापमानापर्यंत भाजले आणि त्यातून लोखंड तयार केले. या धातूच्या अद्भुत गुणधर्मांमुळे त्याने इतर धातू आणि कांस्य यांना बाजूला सारून आघाडी मारली.  इतिहासातले कांस्ययुग संपून लोहयुग सुरू झाले असे म्हंटले जात असले तरी पुढील काळातही, अगदी आजमितीपर्यंत तांबे, कथिल, शिसे, कांस्य आदी त्या युगातल्या धातूंचा विशिष्ट कामांसाठी उपयोग होतच राहिला आहे.

लोखंडाचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांच्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग केला जातो. लहान भट्ट्यांमध्ये लोखंड तयार करतांना त्याच्या द्रवणांकापेक्षा (melting point) कमी तापमानावर तप्त लोखंडाचा स्पंजसारखा गोळा तयार होतो. त्याहून अधिक तपमानावर ते वितळते तसेच त्यात कर्ब (कार्बन) मिसळले जाऊन त्याचे कच्चे लोखंड (पिग आयर्न) बनते. प्राचीन काळातल्या कांही ठिकाणी पहिल्या आणि कांही जागी दुसऱ्या प्रकाराने लोखंड तयार होत होते. या दोघांच्याही गोळ्यांना पुन्हा तापवून ते मऊ झाल्यावर त्यांना ठोकून एकत्र जोडता येते तसेच गोल किंवा चपटा असा आकार देता येतो. या प्रकाराला रॉट आयर्न (Wrought Iron) म्हणतात. दिल्ली येथील प्रख्यात लोहस्तंभ खास प्रकारच्या रॉट आयर्नचा आहे.

लोखंडाला वितळवून आणि साच्यात ओतून वेगवेगळ्या आकारांच्या ओतीव लोखंडाच्या (Cast Iron) वस्तू तयार करता येतात. या वस्तू कणखर आणि मजबूत असतात, पण त्या कांही प्रमाणात ठिसूळ असल्यामुळे त्यांना तडे जाऊ शकतात. लोहामध्ये विशिष्ट प्रमाणात कर्ब आणि सिलिकॉन, मँगेनीज यांचेसारखी इतर कांही द्रव्ये मिळवली तर त्यामधून पोलाद तयार होते. हा धातू मजबूत तसाच लवचीकही असतो. पोलादाला तापवून पाण्यात बुडवले तर ते जास्तच कणखर होते. त्याला धार लावता येते आणि ती बोथट न होता टिकून राहते. यामुळे त्यापासून भाले, कट्यार, खंजीर आणि तलवारी यांच्यासारखी शस्त्रे तयार होऊ लागली आणि या पोलादी शस्त्रांमधून सामर्थ्य निर्माण झाले. आदिमानव लहान टोळ्यांमध्ये रहात होते. मानवाच्या हातात घातक शस्त्रे हातात आल्यानंतर मोठी राज्ये-साम्राज्ये तयार झाली, त्यांनी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी सेनादले बाळगली आणि त्यांच्या जोरावर ते लोक आक्रमणे व युद्धे करायला लागले. पुढे तोफा, बंदुका यासारखी लांब पल्ल्यावर मारा करणारी शस्त्रेही निघाली आणि त्यामुळे जगभरात कमालीची उलथापालथ झाली.
   
शस्त्रे आणि अवजारे यांचा विकास नेहमीच हातात हात घालून होत आला आहे. पोलादाचे गुण पाहून त्याचा उपयोग शेती, उद्योग आणि घरातदेखील व्हायला लागला. शेतकामासाठी कुदळ, पहार, कुऱ्हाड यासारखी, कारखान्यांसाठी हातोडे, घण, करवती वगैरे, यंत्रे आणि वाहने यांच्यासाठी चक्रे आणि घरातल्या उपयोगासाठी सुरी, कात्री, दाभण, तवा, झारा अशी अनेक अवजारे तयार होत गेली. लोहारकाम हा एक महत्वाचा उद्योग सुरू झाला. लोखंड आणि पोलादाच्या शोधानंतर अशा प्रकारे माणसाच्या जीवनाला आणि इतिहासाला कलाटणी मिळाली. या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुमारे अडीच तीन हजार वर्षांपूर्वी झाली. 

त्यानंतर लोखंड तयार करण्याच्या विद्येत अनेक सुधारणा होत गेल्या. चांगल्या दर्जाचे खनिज वापरणे, भट्ट्यांचा आकार वाढवणे, त्यांमध्ये जाळण्यासाठी चांगल्या ज्वलनशील लाकडांपासून केलेला कोळसा तयार करणे, आगीची आंच वाढवण्यासाठी भात्याने हवा पुरवत राहणे यासारखे प्रयत्न होत राहिले. साध्या कोळशाशिवाय दगडी कोळशाचाही उपयोग सुरू झाला. त्यामधून लोखंडाचे उत्पादन वाढत गेले. लोखंडामध्ये इतर धातू मिसळून निरनिराळ्या यंत्रांना किंवा शस्त्रांना उपयुक्त असे विशिष्ट गुणधर्म असलेले किंवा कमी गंजणारे अनेक प्रकारचे मिश्रधातू तयार होत गेले, त्यांना पत्रे, सळ्या किंवा नळ्या अशासारखे आकार देऊन आणि त्यांचा उपयोग करून नवी शस्त्रास्त्रे तसेच यंत्रे आणि उपयोगाची साधने तयार होत गेली .

धातुविद्येमध्ये सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत झालेल्या प्रगतीचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे. त्यानंतर म्हणजे वाफेच्या इंजिनाच्या शोधापासून सुरू झालेल्या यंत्रयुगामध्ये खाणीमधून खनिजे काढणे, त्यापासून निरनिराळे धातू निर्माण करणे, नवनवे नवीन धातू शोधून काढणे आणि या सर्वांपासून उपयोगाच्या वस्तू तयार करणे या सर्वच बाबतीत झपाट्याने वाढ झाली. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पुढील काळात झालेल्या प्रगतीची चर्चा करतांना त्याची माहिती येईल.

Sunday, October 07, 2018

प्रकाशाचा वेग कुणी आणि कसा शोधला ?धांवण्याच्या शर्यतीत भाग घेणारे धांवक १००, २०० मीटर किंवा एक दोन किलोमीटर अशी अंतरे धांवतात आणि त्यासाठी त्यांना किती वेळ लागतो हे अचूक मोजले जाते. मग एकाद्याने १०० मीटर अंतर १० सेकंदात कापले तर १०० भागले १० करून त्याचा सरासरी वेग सेकंदाला दहा मीटर इतका होतो आणि कोणी एक किलोमीटर अंतर तीन मिनिटात कापले तर त्याचा वेग ६० भागले ३ म्हणजे ताशी २० किलोमीटर ठरतो. म्हणजेच अंतराला वेळेने भागून आपण वेग काढतो. मोटार आणि रेल्वे इंजिनांमध्ये लावलेले स्पीडोमीटर नांवाचे उपकरण त्यांचा वेग ताशी अमूक इतके किलोमीटर दाखवते, तो वेग फार तर तासाला शंभर किलोमीटरच्या आसपास असतो. धांवक, मोटार किंवा रेल्वेगाडी यांना आपण अनेक वेळा इकडून तिकडे जातांना पहात असतो आणि अनुभवावरून त्यांच्या वेगाचा थोडाफार अंदाज येतो, पण प्रकाशाचे किरण एका सेकंदात सुमारे तीन लाख किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने जात असल्यामुळे रंगीत प्रकाशाचे किरणसुद्धा आपल्या डोळ्यासमोरून जात असतांनाही आपल्याला दिसू शकत नाहीत.

दिवसा सूर्यकिरणांमधून आपल्याला उजेड मिळतो आणि काळोखात दिवा लावला की त्याचा उजेड सगळीकडे पसरतो. म्हणजेच प्रकाशाचे किरण सूर्य किंवा दिवा यामधून निघून सगळीकडे जातात. ही गोष्ट प्राचीन काळापासून माहीत होती, पण ते क्षणार्धात होते असेच तेंव्हा वाटत असणार. सूर्यनारायण आकाशात दूर आहे एवढे माहीत असले तरी तो आपल्या पृथ्वीपासून किती योजने, मैल किंवा किलोमीटर दूर आहे आणि तिथून निघालेले किरण पृथ्वीपर्यंत पोचायला किती वेळ लागत असेल असा विचार बहुधा कुणाच्या मनात आला नसेल. निदान तसा स्पष्ट उल्लेख कुठल्या प्राचीन साहित्यामध्ये मिळत नाही.  झंझावाती वाऱ्यासारखा वेगवान किंवा चमचमणाऱ्या विजेसारखी चपळ अशा उपमा जुन्या वाङ्मयामध्ये दिसतात, पण प्रकाशाइतका वेगवान असे उदाहरण मात्र आढळत नाही.

तीन लाख किलोमीटर हे अंतर इतके मोठे आहे की त्यात पृथ्वीभोंवती सात प्रदक्षिणा घालून होतील. त्यामुळे ते अंतर प्रत्यक्ष मोजणे तर शक्यच नाही. मग प्रकाशाचा वेग दर सेकंदाला इतका आहे असे कुठल्या शास्त्रज्ञाने आणि कसे ठरवले असेल ? अशी अंतरे आकाशामध्येच असू शकत असल्यामुळे त्याची कल्पना खगोलशास्त्रीच करू शकतात. त्यामुळे त्यांनीच या बाबतीत पुढाकार घेतला. प्राचीन भारतीयांनी सूर्य आणि चंद्र यांनासुद्धा मंगळ, गुरु, शनी आदिंप्रमाणे नवग्रहांमध्ये धरले होते. या सर्वांच्या आकाशामधील राशी आणि नक्षत्रांमधून होतांना दिसत असलेल्या भ्रमणाचा अभ्यास पुरातन काळापासून होत आला आहे. अरब आणि युरोपियन शास्त्रज्ञांनीसुद्धा शतकानुशतके त्यांचा अभ्यास केला आणि आपापली निरीक्षणे नोंदवून ठेवली होती. सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या कोपरनिकस या पोलिश शास्त्रज्ञाने त्याला उपलब्ध झालेल्या माहितीचा गणिताच्या आधाराने अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की सूर्य हा तारा असून तो केंद्रस्थानी असतो आणि मंगळ, गुरु, शनी वगैरे ग्रह त्याला निरनिराळ्या कक्षांमधून प्रदक्षिणा घालत असतात, त्याचप्रमाणे पृथ्वी हासुद्धा त्यांच्यासारखाच एक ग्रह असून तो सुद्धा सतत सूर्याभोंवती फिरत असतो.

त्यानंतरच्या ब्राहे, केपलर, गॅलीलिओ आदि संशोधकांनी कोपरनिकसच्या संशोधनामध्ये खूप भर घातली आणि या ग्रहांच्या भ्रमणाच्या कक्षा, त्यांच्या भ्रमणाचे वेग, त्यांचे सूर्यापासून असलेले अंतर वगैरे बद्दलचे अधिकाधिक चांगले अंदाज बांधले. दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर गुरु आणि शनि यांच्या उपग्रहांचे शोध लागत गेले आणि त्यांचे संशोधन करणे सुरु झाले. रोमर या मूळच्या डेन्मार्कमधल्या पण पॅरिसमधील प्रयोगशाळेत काम करत असलेल्या संशोधकाने गुरु ग्रहाच्या ऐओ किंवा आयो (Io) नावाच्या लहानशा उपग्रहावर लक्ष केंद्रित केले होते. हा उपग्रह गुरूभोंवती फक्त साडेएकेचाळीस तासात एक प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे त्याचे निरीक्षण करायला मदत होते. पृथ्वीवरून पाहिले असतांना तो कधी गुरूच्या समोरून जातांना आणि कधी बाजूला दिसू शकतो पण तो ज्या वेळी गुरुच्या आड असतो तेंव्हा दिसत नाही. दिवसा उजेडी कोणताच ग्रह आपल्याला दिसू शकत नाही. रात्री ते ग्रह जेवढा वेळ आकाशात असतात तेंव्हाच त्यांचे निरीक्षण करणे शक्य असते. त्यातही जेंव्हा तो उपग्रह गुरुच्या सावलीतून जातो तेंव्हाही त्याच्यावर सूर्याचा प्रकाश पडत नसल्यामुळे तो पृथ्वीवरून दिसत नाही.  ज्या वेळी तो दुर्बिणीमधून दिसत नाही तेंव्हा तो गुरुच्या सावलीत आहे किंवा गुरूच्या मागे लपला आहे या दोन्ही शक्यता असतात. हा उपग्रह रोज रात्री दिसलाच तरी थोडाच वेळ दिसतो. तेवढ्या वेळेत त्याला नेमके केंव्हा ग्रहण लागले आणि ते केंव्हा सुटले या दोन्ही गोष्टी एकाच वेळी केलेल्या निरीक्षणात कधीच समजत नाहीत.  त्याला गुरूच्या सांवलीमुळे ग्रहण लागण्याच्या वेळी तरी किंवा ते सुटण्याच्या वेळी तरी  पृथ्वीवर दिवस असतो. त्यामुळे या दोनपैकी एकच गोष्ट आपण एका  पाहू शकतो.

रोमरने ही सगळी तंत्रे सांभाळून वर्षानुवर्षे शेकडो निरीक्षणे केल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की आयो(Io)ची ग्रहणे अपेक्षेइतक्या ठरलेल्या अचूक वेळी दिसत नाहीत. गुरु आणि पृथ्वी यांच्यामधले अंतर जेंव्हा कमी असते (आकृतीमधील GC आणि LD) आणि जेंव्हा जास्त असते (FC आणि KD) या दोन स्थितींमधल्या निरीक्षणांमध्ये कांही मिनिटांची तफावत दिसते आणि हे दरवर्षी घडते. यावरून त्याच्या मनात असा विचार आला की गुरुपासून निघालेल्या प्रकाशकिरणांना पृथ्वीपर्यंत येऊन पोचायला कमी किंवा जास्त वेळ लागत असल्याकारणाने ही गोष्ट घडत असणार. रोमरने १६७६ मध्ये आपल्या संशोधनाची तपशीलवार नोंद करून ठेवली आणि आपल्या तर्कासह ती फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सासन्सेसच्या सुपूर्द केली. एका वार्ताहराने त्यावर लिहिलेला एक रिपोर्ट छापून दिला एवढीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर रोमर आपल्या देशात म्हणजे डेन्मार्कमध्ये परतला आणि त्याने उर्वरित आयुष्य तिथे अध्यापन, संशोधन, प्रशासन वगैरेंमध्ये व्यतीत केले.

त्या काळात सूर्य, पृथ्वी, गुरु वगैरेंमधली आपापसातली अंतरे किती मैल किंवा किलोमीटर असतात यावर एकमत झालेले नव्हते. पृथ्वी आणि सूर्य यांचेमधील सरासरी अंतराला अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट (ए.यू) असे धरून त्या तुलनेत अंतरिक्षामधली इतर अंतरे मांडली जात असत. रोमरने केलेल्या संशोधनानुसार हिशोब केला तर प्रकाशकिरणांना एक ए.यु. इतके अंतर जाण्यासाठी ११ मिनिटे लागत होती. तो वेग दर सेकंदाला सुमारे २२२,००० किलोमीटर इतका होतो.

आकाशातला सूर्य आणि गुरु हे दोघेही एकाच वेळी डोळ्यांना दिसत नसल्यामुळे एकाच क्षणी ते क्षितिजावरून किती अंशावर आहेत हे प्रत्यक्ष मोजता येत नाही. सूर्य, पृथ्वी आणि गुरु यांच्या त्रिकोणातला हा कोन दिवसा आणि रात्रीच्या वेगवेगळ्या वेळी केलेल्या निरीक्षणांचा मेळ घालून काढावा लागतो. रोमरने गणिते मांडतांना असे अनेक त्रिकोण काढले होते, पृथ्वी आणि गुरु यांच्या कक्षा सोयीसाठी वर्तुळाकार धरल्या होत्या, त्यांचे सापेक्ष आकार आणि भ्रमणाचे वेग वगैरे गोष्टी त्याला मिळालेल्या माहितीनुसार गृहीत धरून आपले निष्कर्ष काढले होते. सन १६७० च्या काळात वेळ मोजण्याची अचूक साधने उपलब्ध नव्हती. या सगळ्या गोष्टींमुळे रोमरचा अंदाज पाव हिश्श्याने चुकला होता. आपण प्रकाशाच्या वेगाचा शोध लावला असा त्याने दावा केला नव्हता किंवा स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्नही केला नव्हता. तरीही प्रकाशाचा वेग मोजण्याचा पहिला पद्धतशीर आणि यशस्वी प्रयोग त्याने केला म्हणून प्रकाशाच्या वेगाच्या शोधाचा जनक हा मान त्याला दिला गेला.

रोमरच्याच्या आधीच्या कांही शास्त्रज्ञांनीसुद्धा या दिशेने संशोधन केले होते. तसे पाहता प्रकाश म्हणजे काय आणि तो सू्र्य, चंद्र आणि तारकांपासून आपल्यापर्यंत कसा येत असेल यावर हजारो वर्षांपूर्वीपासून अनेक विद्वानांनी विचार करून तर्कांवर आधारलेली मते मांडली होती. सतराव्या शतकातल्या आयझॅक बीकमन नावाच्या शास्त्रज्ञाने तोफ उडवून त्यातून निघालेला धूर दूरवर ठिकठिकाणी ठेवलेल्या आरशांमधून पहावा अशी कल्पना मांडली होती. त्याच काळातला थोर शास्त्रज्ञ गॅलीलिओ याने दिव्यांचा उपयोग करून प्रकाशाला दूरवर जायला किती वेळ लागतो हे पहाण्याचे प्रयोग केले होते. प्रकाशाचा वेग खूपच जास्त असल्यामुळे हे प्रयोग यशस्वी होणे शक्यच नव्हते. त्यामुळे प्रकाशाचा वेग न मोजता येण्याइतका प्रचंड (अमित) आहे असा निष्कर्ष गॅलीलिओने काढला होता.

रोमर या डॅनिश संशोधकाने आयो या गुरुच्या उपग्रहावर जे संशोधन केले होते ते कॅसिनि नांवाच्या मुख्य शास्त्रज्ञाचा सहाय्यक म्हणून केले होते. ते काम करण्यामागे कॅसिनीचा उद्देश वेगळाच होता. अॅटलांटिक महासागरामधून जात असलेल्या जहाजांना आपण नेमके कुठे आहोत हे समजण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होईल असे त्याला वाटत होते, पण अशी निरीक्षणे करण्यातल्या अडचणी पाहता त्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळा आणि तज्ज्ञ शास्त्रज्ञांची किती आवश्यकता आहे ते समजले. समुद्रातल्या जहाजांवरील खलाशांना हे संशोधन करणे शक्य नसल्यामुळे तो विचार बारगळला. रोमरच्या त्या संशोधनामधून प्रकाशाच्या वेगाचा शोध लागला असला तरी त्याचे ते म्हणणे कॅसिनीला पटले नाही. त्यामुळे त्या महत्वाच्या शोधाला मिळायला हवी होती तेवढी प्रसिद्धी दिली गेली नाही. पण त्या काळातला दुसरा प्रमुख शास्त्रज्ञ ह्यूजेन याला मात्र रोमरचे स्पष्टीकरण बरोबर वाटले आणि त्याने त्यावर स्वतः विचार आणि काम करून प्रकाशाचा वेग दर सेकंदाला अमूक इतके किलोमीटर अशा प्रकारे सर्वसामान्य वापरातल्या एकांकांमध्ये (युनिट्समध्ये) सांगितले. त्यामुळे कांही लोक या शोधाचे श्रेय ह्यूजेन्सलाही देतात. त्या काळातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनीसुद्धा रोमरच्या विचारांना पाठिंबा दिला, त्यात स्वतःच्या संशोधनाची भर घातली आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांना पृथ्वीपर्यंत पोचण्यासाठी सात ते आठ मिनिटे लागतात असा अंदाज सन १७०४ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात व्यक्त केला.

गॅलीलिओ आणि ह्यूजेन्स यांनीही यावर काम केले असले तरी प्रकाशाला एक ठराविक वेग असतो हे सांगणेच इतर शास्त्रज्ञांना बरीच वर्षे मान्य होत नव्हते. सर आयझॅक न्यूटन यांनी रोमरची कल्पना सन १७०४ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात मान्य केली पण त्यांच्या हिशोबाने सूर्याचे किरण पृथ्वीपर्यंत येऊन पोचायला ७-८ मिनिटे लागत होती.  जेम्स ब्रॅडली या ब्रिटिश संशोधकाने सन १७२७मध्ये स्टेलर अॅबरेशन नांवाच्या दुसऱ्या एका पद्धतीने ही वेळ ८ मिनिटे आणि १३ सेकंड एवढी असल्याचे सिद्ध करून दाखवले तेंव्हा प्रकाशाच्या ठराविक वेगाची कल्पना सर्वमान्य झाली.  त्यानंतरच्या शास्त्रज्ञांनी जास्त अचूक हिशोब करून ती वेळ ८ मिनिटे १९ सेकंद एवढी निश्चित केली.इंग्लंडमधल्याच जेम्स ब्रॅडली नावाच्या कुशाग्र बुद्धीच्या संशोधकाने खगोलशास्त्राचा अभ्यास करतांना अॅबरेशन (aberration of light) या प्रकाशकिरणांच्या विशिष्ट गुणधर्माचा शोध लावला. पृथ्वी स्वतःच सूर्याभोंवती वेगाने फिरत असल्यामुळे दूरच्या ताऱ्यांपासून पृथ्वीवर येऊन पोचणारे किरण चित्रात दाखवल्याप्रमाणे किंचित वेगळ्या दिशेने आल्यासारखे वाटतात. त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे 'क' या ठिकाणी असलेला तारा 'ख' या जराशा वेगळ्या ठिकाणी दिसतो, म्हणजे तो तारा तिथे आहे असा भास होतो. पृथ्वी सूर्याभोंवती गोल गोल फिरत असल्यामुळे तिची सरळ रेषेत पुढे जाण्याची दिशा दर क्षणी बदलत असते. ती आज ज्या दिशेने जात आहे त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेने आणखी सहा महिन्यांनी जात असेल. त्यामुळे सहा महिन्यांनी तोच तारा दुसऱ्या दिशेने किंचित सरकून 'ग' या जागी गेलेला दिसेल. प्रकाशकिरणांचे हे अॅबरेशन त्यांचा वेग पृथ्वीच्या वेगाच्या तुलनेत किती आहे यावर अवलंबून असते. ब्रॅडलीने वर्षभर अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे करून एका ताऱ्याचे अशा प्रकारे किंचित जागेवरून हलणे मोजले. ते एक अंशाचा सुमारे १८० वा भाग इतके सूक्ष्म होते. ब्रॅडलीने त्याचे गणित मांडून प्रकाशकिरणांचा वेग पृथ्वीच्या वेगाच्या १०२१० पट असल्याचे सिद्ध केले आणि त्यावरून गणित करून सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत येऊन पोचण्यासाठी ८ मिनिटे १२ सेकंद इतका वेळ लागतो असे इसवी सन १७२९ मध्ये सांगितले.  कदाचित खरे वाटणार नाही, पण आपली पृथ्वी दर सेकंदाला सुमारे ३० किलोमीटर इतक्या मोठ्या वेगाने आपल्या कक्षेतून फिरत असते. ब्रॅडलीच्या संशोधनानुसार प्रकाशाचा वेग सेकंदाला १८३,००० मैल किंवा २९५,००० किलोमीटर इतका येतो.

पण दर सेकंदाला दोन तीन लाख किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने कुठलाही कण, मग तो प्रकाशाचा कां असेना, प्रवास करू शकेल यावर त्या काळातले लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्या काळात प्रकाशाच्या वेगाचा कुठल्याच गणितात उपयोग होत नसल्यामुळे त्याला आताइतके महत्वही मिळालेले नव्हते. तरीही कांही संशोधक त्यावर काम करत राहिले. हिप्पोलिट फिझू (Hippolyte Fizeau) आणि लिआँ फोकॉल्ट (Léon Foucault) या फ्रेंच शास्त्रज्ञांनी प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी एक खास यंत्र तयार केले आणि त्याच्या सहाय्याने प्रयोग करून तो दर सेकंदाला ३१५,००० किलोमीटर इतका असल्याचे सन १८४९ मध्ये दाखवले.

जेम्स क्लार्क मॅक्सवेल या स्कॉटिश शास्त्रज्ञाने सन १८६५ मध्ये एक क्रांतिकारक असा शोध लावला. विद्युत (electric), चुंबकीय (magnetic) आणि प्रकाश या सर्वांच्या एकसारख्या लहरी असतात आणि त्या निर्वात पोकळीमधून सारख्याच वेगाने जातात असे त्याने तर्कांच्या सहाय्याने सिद्ध केले. नंतर त्याने विजेच्या वहनावर प्रयोग केले आणि त्यावरून विजेचा म्हणजेच प्रकाशाचा वेग दर सेकंदाला ३१०,७४०,००० मीटर्स  इतका असतो असे सांगितले. त्यानंतर मात्र प्रकाश किरण आणि विद्युत लहरींच्या वेगाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश (Visible spectrum) हा गॅमा किरणां(रेज)पासून ते रेडिओ लहरींपर्यंतच्या अनेक प्रकारच्या किरणांमधला एक लहानसा भाग आहे. निरनिराळ्या संशोधकांनी हे इतर प्रकारचे अदृष्य किरण नंतरच्या काळात शोधून काढले. या सर्वांना आता विद्युतचुंबकीय विकिरण (Electromagnetic radiation) या एकाच नांवाने ओळखले जाते.

आल्बर्ट मायकेलसन या अमेरिकन शास्त्रज्ञाने लांबच लांब सरळ नळ्या जोडून आणि ठिकठिकाणी भिंगे बसवून एक विशाल आकाराचे खास उपकरण तयार केले. चित्रावरून त्याची कल्पना येऊ शकेल. तो त्यात वेळोवेळी सुधारणा करून प्रयोग करत राहिला. त्याने १८७९ मध्ये प्रकाशाचा वेग दर सेकंदाला २९९,९४४ ± ५१ किलोमीटर इतका तर १९२६ मध्ये तो २९९,७९६ ±४  किलोमीटर इतका अचूक असल्याचे  सांगितले. त्यानंतरही निरनिराळ्या पद्धतींनी हा वेग मोजण्याचे प्रयत्न होत राहिले. निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग दर सेकंदाला २९९,७९२,४५८ मीटर इतका असतो असे १९७५ साली जगातल्या सर्व शास्त्रज्ञांनी मिळून ठरवले आहे. हाच आकडा आजपर्यंत अचूक समजला जातो.
---------------------------------------------------------------

Friday, September 21, 2018

ओझोन आणि हीलियम वायू
आपल्या पृथ्वीवरील वातावरणात ओझोन आणि हीलियम या नांवांचे हे दोन दुर्मिळ वायू अगदी सूक्ष्म प्रमाणात असतात. शाळाकॉलेजात शिकत असतांना गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या जुळवा अशा १-२ मार्कांच्या प्रश्नासाठी केलेला त्यांचा जुजबी अभ्यास सोडला तर सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात ही नांवे त्यांच्या कांनांवर सहसा पडत नसतील. या दोन वायूंचे रासायनिक गुणधर्म एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. ओझोन हा अत्यंत जहाल वायू त्याच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही पदार्थाची लगेच राखरांगोळी करतो तर हीलियम हा अत्यंत निरुपद्रवी (इनर्ट) वायू कुठल्याही प्रकारच्या रासायनिक क्रियेमध्ये भागच घेत नाही. तो कशाबरोबरही संयुग (कम्पाउंड) तयार करत नाही, त्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखणेसुद्धा कठीण असते.

या दोन वायूंशी संबंधित दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्यामुळे त्यांची नांवे बातम्यामध्ये आली होती. १६ सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो आणि १८ सप्टेंबर २०१८ ला त्याचा शोध लागून १५० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्याने मी संकलित केलेली त्यांची थोडी माहिती खाली दिली आहे.
आपल्याला माहीत नसले तरी ओझोन हा वायू आपल्या नकळतच सूर्याच्या कांही प्रखर अशा अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांपासून आपले रक्षण करत असतो. तो आकाशामध्ये आपल्या जागी असतो म्हणून आपण आज पृथ्वीवर सुखाने रहात आहोत एवढे त्याचे महत्व आहे. आपल्या मूर्खपणापोटी आपण मात्र त्याला हानी पोहोचवत आहोत.
हीलियम या वायूचा उपयोग कांही अणूभट्ट्यांमध्ये केला जातो, तसेच अत्यंत सूक्ष्म अशी गळती शोधण्यासाठी (लीक डिटेक्शनसाठी) तयार केलेल्या खास प्रकारच्या अतिसंवेदनशील (सुपर सेन्सिटिव्ह) अशा उपकरणांमध्ये या वायूचा उपयोग होतो. एरवी तोही आपल्या वाटेला जात नाही किंवा आपण त्याला उपसर्ग पोचवत नाही
-----------------------
१. ओझोन दिवस

ओझोन म्हणजे आपल्या प्राणवायू किंवा ऑक्सीजनचाच एक विशिष्ट प्रकार आहे. तो वायू सामान्य प्राणवायूच्या दीडपट मोठा पण अनेकपटीने जहाल असतो. प्राणवायूचा अणु (Atom) निसर्गात एकटा रहात नाही. दोन अणूंची जोडी एकत्र येऊन त्यांचा एक रेणू (Molecule) होतो. आपल्या हवेतला सुमारे एक पंचमांश भाग प्राणवायूच्या या द्विदल (O2) रूपात असतो.  सूर्यापासून येणारे किरण जेंव्हा पृथ्वीवरील वातावरणाच्या स्ट्रॅटोस्फिअर (Stratosphere) नांवाच्या बाहेरच्या भागात प्रवेश करतात तेंव्हा त्यातल्या शक्तीशाली अतिनील (Ultraviolet) किरणांमुळे यातल्या कांही जोड्या दुभंगतात आणि सुटे झालेले प्राणवायूचे अणू  वेगवेगळ्या रेणूंशी गट्टी करून त्रिकुटे (O3) बनवतात. त्यालाच ओझोन असे नांव दिले आहे.  जमीनीवरील वातावरणातील हवेतल्या प्राणवायूमध्ये ओझोनचे प्रमाण सुमारे ३० लाखांमध्ये एक भाग  इतके अत्यल्प असते तर ते वातावरणाच्या वरच्या भागात वाढून सुमारे एक ते पाच लाखांमध्ये एक भाग इतके होते.  हे ओझोनचे रेणू आणखी कांही अतिनील किरणांना शोषून घेतात आणि त्यामुळे त्यांचे पुन्हा प्राणवायूच्या द्विदल रूपात रूपांतर होत असते. असे चक्र पृथ्वीच्या निर्मितीपासून चालत राहिले आहे. त्या ओझोनयुक्त वातावरणाला ओझोनचा थर (Ozone layer) किंवा ओझोनचे कवच ( ozone shield) असे म्हणतात. हा थर जमीनीपासून सुमारे वीस ते चाळीस किलोमीटर्स इतक्या उंचीपर्यंत पसरलेला असतो.

सूर्यापासून निघणाऱ्या किरणांमध्ये आपल्याला दिसणारा प्रकाश असतो त्याचबरोबर अतिनील किरण सुद्धा असतात. त्यांचे अ (UV-A), ब(UV-B), आणि क(UV-C) असे तीन गट केले आहेत. यातले अ प्रकारचे किरण तितकेसे घातक नसतात, क प्रकारचे किरण अगदी सुरुवातीलाच पूर्णपणे वातावरणात शोषले जातात, पण ब प्रकारच्या किरणांना थांबवण्यासाठी मात्र ओझोनची अत्यंत आवश्यकता असते. स्ट्रॅटोस्फिअरमधली हवा अत्यंत विरळ असते आणि त्यातल्या ओझोन किरणांचे प्रमाणसुद्धा फार जास्त नसते तरी या थराची जाडी १०-२० किलोमीटर इतकी असते. त्यात जवळ जवळ ९० -९५ टक्के ब प्रकारचे अतिनील किरण नष्ट होऊन उरलेले कांही किरण पृथ्वीपर्यंत जाऊन पोचतात आणि ते त्वचेखाली व्हिटॅमिन डी हे जीवनसत्व तयार करण्यासाठी उपयुक्त असतात. 

हवेमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आणि त्यामुळे हवेमधील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढत चाललेच, त्याशिवाय नायट्रस व नायट्रिक ऑक्साइड. क्‍लोरोफ्लुरोकार्बन्स, आणि हायड्रो-क्‍लोरोफ्लुरोकार्बन्स यांच्यासारखे पूर्वीच्या काळात नसलेले अनेक विषारी वायू हवेत मिसळायला लागले. हे वायू ओझोनच्या थरांपर्यंत जाऊन पोचले तर त्याच्याशी रासायनिक प्रक्रिया करतात. त्यामुळे ओझोन वायूमध्ये घट होऊ लागली. ओझोन कवच विरळ होऊ लागले. हा प्रकार पृथ्वीवर सर्व जागी समान न होता कांही ठिकाणी जास्त झालेला दिसायला लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या कवचाला भगदाड पडले असल्याच्या बातम्या यायला लागल्या. त्यामुळे अतिनील किरण खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीपर्यंत पोचतील आणि त्यांच्यामुळे कँसरसारखे घातक रोग पसरतील इतकेच नव्हे तर इथले वातावरणच बदलून जाऊन त्यात पशुपक्षी, वनस्पती वगैरे सर्वच जीवांचा नाश होईल अशी भीती निर्माण झाली.

हवेला भोक पडणे ही कल्पना विचित्र वाटत असली तरी ते वर्णन परिणामकारक ठरले आणि जगातल्या सर्वच देशांनी त्यातून निर्माण होऊ पाहणाऱ्या धोक्याची नोंद घेऊन १६ सप्टेंबर १९८५ ला कॅनडामधील माँट्रियल इथे त्यावर जागतिक करार केला गेला. तो  माँट्रियल प्रोटोकॉल या नांवाने प्रसिद्ध आहे. त्यानिमित्य हा ओझोन दिवस साजरा केला जातो. औद्योगिक जगामध्ये काय काय करावे किंवा करू नये यावर या दिवशी सर्वांचे प्रबोधन केले जाते.

आता यातला मुख्य मुद्दा म्हणजे हा धोका टाळण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे ? पहिली गोष्ट म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसीन, गॅस वगैरे जाळणे कमीत कमी करावे, लहान अंतर चालत किंवा सायकलवरून जावे, अन्नाची किंवा कुठल्याही प्रकारची नासाडी करणे टाळावे, अत्यावश्यक नसेल तर वातानुकूलित यंत्रणा (एअर कंडीशनर) वापरू नये. पाणी किंवा वीज वाया घालवू नये. जितक्या प्रमाणात ऊर्जेची बचत करता येईल तितकी केली तरच प्रदूषण आटोक्यात येईल आणि ओझोनचे कवच आपले रक्षण करीत राहील.
माझा हा लेख शिक्षण विवेक या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
 http://shikshanvivek.com//Encyc/2018/9/16/Ozoncha-Divas.aspx

----------------------------------
हीलियम
आज १८ ऑगस्ट हा दिवस वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
हीलियम हे मूलद्रव्य विश्वामध्ये प्रचंड प्रमाणात भरलेले आहे, त्यात सर्वाधिक असलेल्या हायड्रोजनच्या खालोखाल हीलियमचा दुसरा क्रमांक लागतो, पण ते पृथ्वीवर मात्र अत्यंत दुर्मिळ आहे. त्याच्या सूर्यावर असलेल्या अस्तित्वाचा शोध १८ ऑगस्ट १८६८ रोजी भारतातील गुंटूर येथून सूर्यग्रहणाचा अभ्यास करत असलेल्या जूल्स जानसन या फ्रेंच शास्त्रज्ञाला लागला होता आणि त्यानंतर नॉर्मन लॉकयर या ब्रिटीश शास्त्रज्ञाने विजयदुर्ग या किल्ल्यावरून लावला होता, पण या दोघांनाही आपण नेमका कशाचा शोध लावला हे माहीत नव्हते. त्यानंतर १८८५ साली सर विल्यम रॅमसे या स्कॉटिश शास्त्रज्ञाने पृथ्वीवरील हीलियम या वायूचा पहिल्यांदाच शोध लावला, म्हणजे त्याला एका खनिजामधून निघणारा एक विशिष्ट प्रकारचा वायू सापडला तो म्हणजे सूर्यावर असलेला हीलियमच आहे हे त्याने प्रयोगांमधून सिद्ध करून दाखवले.

सूर्यग्रहणाच्या वेळी येणाऱ्या प्रकाशकिरणांच्या अभ्यासावरून सूर्यावर एक वेगळेच मूलद्रव्य उपलब्ध असल्याचे दोन युरोपियन शास्त्रज्ञांना समजले. त्या वेळेपर्यंत ते पृथ्वीवर कुठेही मिळाले नव्हते. लॉकयर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोन शास्त्रज्ञांनी मिळून हेलिओस म्हणजे ग्रीक भाषेमधील सूर्यदेवतेच्या नांवावरून या मूलद्रव्याचे हीलियम असे नामकरण केले.

दीडशे वर्षांपूर्वी जेंव्हा दोन युरोपियन खगोलशास्त्रज्ञ इतक्या दूर भारतात आकाशाचे निरीक्षणे करायला आले होते तेंव्हा इथले ज्योतिषी, शास्त्री, पंडित, विद्वान वगैरे लोक काय करत होते? माझ्या कल्पनेप्रमाणे ते बहुधा दिवसभर उपास करून आणि ग्रहण लागायच्या आधी आंघोळ करून त्यांच्या देवांना ताम्हनात ठेऊन त्यांचेवर अभिषेक करत बसले होते आणि सूर्यदेवाची राहूकेतूंच्या तावडीमधून मुक्तता करण्यासाठी त्यांना सांकडे घालत होते. आजकालचे कित्येक लोकसुद्धा राहूकेतूच सूर्यचंद्रांना गिळतात असेच मानतात. बदनाम झालेल्या मेकॉलेने भारतातल्या शाळांमध्ये नवी शिक्षणपद्धति सुरू केली नसती तर बहुधा मीसुद्धा आजही तसेच समजत बसलो असतो आणि हीलियम वायूचे नांवसुद्धा कदाचित माझ्या कानांवर पडले नसते.
-------------------------------
माझ्या या स्फुटावर दोन प्रतिक्रिया आल्या.
१. घड्याळाचे काटे उलटे फिरविण्याचे काही प्रयत्न सध्या सुद्धा सुरू आहेत आणि धार्मिक म्हणवणाऱ्या TV वाहिन्या त्याला हातभार लावत आहेत.
  शुभ मुहूर्त, फल ज्योतिष, हस्त सामुद्रिक इ. गोष्टी पूर्वापार चालत आल्या आहेत आणि "म्हणून" त्यांच्यात काही तरी तथ्य असलेच पाहिजे असे मानणारा एक मोठा वर्ग सुशिक्षित मंडळीत अजून सुद्धा आहे ही दुःखद वस्तुस्थिती आहे.
२. इतक्या टोकाची भूमिका घेउन आपल्या पुर्वजांना तुच्छ लेखु नका. सर्व गोष्टींचे श्रेय पाश्चात्यांना देण्यात आपलाही अपमान होतो आहे हे पण लक्षात घ्या. मी हे भावनिक होउन लिहीत नाही .

यावरील माझी प्रतिक्रिया अशी होती: या लेखात मी फक्त हीलियम या मूलद्रव्याच्या शोधाचे श्रेय युरोपियन शास्त्रज्ञांना दिले आहे आणि त्या काळात तो शोध लावण्याची कुवत तत्कालिन भारतातल्या विद्वानांमध्ये नव्हतीच. प्रकाशकिरणांचे पृथक्करण, निरनिराळ्या रंगांच्या वेव्हलेंग्थ्स वगैरे कांहीच त्यांना माहीत नव्हते हे सत्य आहे. त्यात मी कुणाला तुच्छ लेखायचा प्रश्नच येत नाही. आर्यभट्ट, भास्कराचार्य आदि प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांची प्रशंसा करणारे लेख मी माझ्या ब्लॉगवर आणि इतरत्र लिहिले आहेत. पण दीडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडापर्यंत ती वैज्ञानिक परंपरा खंडित होऊन पार लयाला गेली होती. ज्या काळात युरोपियन शास्त्रज्ञ सूर्य चंद्र वगैरेंच्या रचनेबद्दल किंवा त्यांच्या स्वरूपावर संशोधन करत होते, तेंव्हा आपले ज्योतिषी त्यांच्या कुंडलीतल्या स्थानाबद्दल आणि त्यातून निघणाऱ्या शुभअशुभ फलांचाच विचार करत होते, सूर्य हा एक निर्जीव पदार्थांचा महाप्रचंड आकाराचा गोळा असेल असा विचारसुद्धा ते करूच शकत नव्हते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात अजून फरक पडलेला नाही.

आम्ही जे कांही विज्ञान शिकलो ते इंग्रजांनी सुरू केलेल्या शालेय अभ्यासक्रमामधून आपल्यापर्यंत पोचले याबद्दल मला तरी शंका नाही. प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी लावलेले शोध मधल्या काळातल्या भारतीयांनीच हरवून टाकलेले होते. ते भारतीय गुरुशिष्यपरंपरेमधून आपल्यापर्यंत येणे शक्यच नव्हते. सर्वात मोठी विडंबना ही आहे की प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या पुस्तकांचे शोधसुद्धा आधी परकीय संशोधकांनी लावल्यानंतर ते आपल्याला समजले. ज्या प्रकारे धार्मिक वाङमय, कर्मकांडे, आयुर्वेद किंवा योगविद्या यासारख्या गोष्टी परंपरागत शिक्षणामधून आपल्यापर्यंत येऊन पोचल्या त्या प्रकारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र कां पोचले नाही याचे उत्तर कुणाकडेही नाही. यात मधल्या काळातल्या लोकांच्या कर्तबगारीचा अपमान होत असला तर त्याला इलाज नाही. आपण ते मान्य करायला हवे.

 आज मी एका वेगळ्या संदर्भात असे वाचले की युरोपमध्ये सुद्धा विज्ञानाच्या दृष्टीने अंधारयुग होते (डार्क एज). त्यामुळे अॅरिस्टॉटल, टोलेमी वगैरे ग्रीसमधील विद्वानांचे मौलिक संशोधन गडप झाले होते. ख्रिश्चन धर्मगुरूंच्या हट्टाग्रहामुळे ते झाले होते असे म्हणतात. जवळ जवळ हजार वर्षांनंतर कोपरनिकस, गॅलीलिओ, ब्राहे वगैरेंनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यागामधून नवा प्रकाश पडायला सुरुवात झाली. युरोपमधून नाहीसे झालेले कांही साहित्य अलबेरुनीसारख्या अरब विद्वानाने भाषांतर करून ठेवलेले होते त्यात नंतरच्या काळात मिळाले. मुख्य म्हणजे हे सत्य ते लोक प्रांजलपणे कबूल करतात. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अशाच प्रकारे हिंदू आणि मुसलमान धर्मगुरूंच्या दडपणाखाली भारतातही बाबावाक्यम् प्रमाणम् म्हणणे सुरू झाले असेल आणि दुर्दैवाने त्याचा अंत अजूनही दिसत नाही. जे कोणी त्याला किंचितही विरोध करतील त्याला परदेशी विचारसरणीचे गुलाम असे हिणवण्याचे सत्र जास्तच जोरात सुरू झाले आहे, आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान असावा आणि मलाही वाटतो, पण चुकीच्या गोष्टी सुद्धा बरोबरच होत्या असा त्याचा अर्थ होत नाही.

*****************************************************************
 जागतिक ओझोन दिवस
INTERNATIONAL OZONE DAY, 16 SEPTEMBER 2018 : THEME AND TAGLINE IN THE SIX UN OFFICIAL LANGUAGES
 ابقى هادئا وواصل
بروتوكول مونتريال Arabic
l住,继续前行
蒙特利尔议定书.... Chinese
Keep cool and carry on
The Montreal Protocol ...... English
Gardons la tête froide et poursuivons nos efforts
Le Protocole de Montréal ..... French
Дари прохладу не сбавляя темпа!
Монреальский протокол ...... Russian
Consérvate cool y continua
El Protocolo de Montreal  ...... Spanish

वसुंधरेला शीत ठेवून मॉंट्रियल शिष्टाचाराचे पालन करा ..... मराठी
http://drustage.unep.org/ozonaction/international-day-preservation-ozone-layer-2018

Thursday, September 13, 2018

मोरया मोरया, गणपती बाप्पा मोरयागणेशोत्सवाशी या ब्लॉगचे जवळचे नाते आहे. पहिल्याच वर्षी आलेल्या गणेशोत्सवात मी गणपतीची कोटी कोटी रूपे पाहून त्यांच्यावर एक लेखमाला लिहिली होती. त्यानंतर बहुतेक दरवर्षी मी या उत्सवाच्या काळात गणपतीसंबंधी चार शब्द लिहीत होतो. या ब्लॉगवरील लेखांची संख्या मला हजाराच्या आंतच ठेवायची आहे म्हणून या वर्षी मी एकाच लेखात रोज थोडी भर घालून तो पूर्ण करणार आहे.

सूर निरागस हो


गणपती या देवाचे सर्वांनाच इतके आकर्षण आहे की कट्यार काळजात घुसली या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करतांना त्यात नव्याने भर घातली ती सूर निरागस हो, गणपती या गाण्याची. या गाण्यामध्ये मधून मधून मोरया मोरया,  गणपती बाप्पा मोरया. या नांवांचा गजर केला आहे. हे गाणे खाली दिले आहे.

सूर निरागस हो. गणपती,   
सूर निरागस हो.
सूर निरागस हो.  गणपती , 
सूर निरागस हो.

शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.
शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.

ॐकार गणपती.   ॐकार गणपती.
 अधिपती. सुखपती. छंदपती  गंधपती
 लीन निरंतर हो.    लीन निरंतर हो,
सूर निरागस हो.
सूर निरागस हो.  गणपती सूर निरागस हो.

मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
    मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.

गजवदना तु सुखकर्ता.   गजवदना तु दु:खहर्ता.
  गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.

गजवदना तु सुखकर्ता.   गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो. गणपती सूर निरागस हो.

सूरसुमनानी भरली ओंजळ 
नित्य रिती व्हावी चरणावर.
तान्हे बालक सुमधुर हासे
भाव तसे वाहो सूरातुन.
ॐकार गणपती. अधिपती. सुखपती  छंदपती. गंधपती.
अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती. सूरपती.

लीन निरंतर हो.    लीन निरंतर हो.
सूर निरागस हो.
सूर निरागस हो. गणपती 
सूर निरागस हो.

मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.

गजवदना तु सुखकर्ता.  गजवदना तु दु:खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.
मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.

गजवदना तु सुखकर्ता.  गजवदना तु दु: खहर्ता.
गजवदना मोरया. मोरया…
सूर निरागस हो.  सूर निरागस हो.

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरेश्वर किंवा मोरोपंत ही नांवे पूर्वीच्या काळात प्रचलित होती. मोरोपंत या अठराव्या शतकांतल्या पंतकवींनी आर्या या वृत्तामध्ये अनेक इतक्या सुंदर काव्यरचना केल्या होत्या की महान संतकवि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउली आणि पंतकवि वामन पंडित यांच्याबरोबर त्यांची गणना केली जाते. "सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंताची।" असे समजले जाते. छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळात मोरोपंत पिंगळे मुख्य प्रधान होते.  मोरोबा विजयकर या लेखकाने घाशीराम कोतवाल ही मूळ कादंबरी लिहिली होती.

मोरेश्वर, मोरोपंत, मोरोबा किंवा मोरू, मोऱ्या वगैरे नावे असलेली पात्रे साठ सत्तर वर्षांपूर्वीच्या कथाकादंबऱ्या, सिनेमे नाटके यांचेमध्ये सर्रास आढळत असत. त्यातला मोरेश्वर शास्त्री म्हणजे एक वेदशास्त्रसंपन्न विद्वान, पण परंपरावादी, हटवादी आणि उग्र तिरसिंगराव असावा, मोरोपंत हा हुषार, धूर्त पण सहृदय असा सद्गृहस्थ असावा, मोरोबा म्हणजे साधासुधा, परोपकारी, लोकांना सढळ हाताने मदत करणारा भलामाणूस असावा आणि मोरू म्हणजे जरा जास्तच सरळमार्गी, भोळसट आणि बावळट असावा, त्याला कुणीही आणि केंव्हाही मोरू करावे असा संकेत होता. त्या अर्थाचे बुद्दू बनवणे, पोपट करणे किंवा वडा होणे वगैरे वाक्प्रचार नंतर आले. आचार्य प्र.के.अत्रे यांनी लिहिलेले मोरूची मावशी हे नाटक त्या काळात गाजले होतेच, पण त्यांच्या निधनानंतर कित्येक वर्षांनी ते पुन्हा रंगमंचावर आले आणि विजय चव्हाणांनी टांग टिंग टिंगा कि टांग टिंग टिंगा म्हणत त्या नाटकाला आणि स्वतःच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर नेले. ज्या कोण्या महाभागाने  बुद्धी आणि विद्येचे दैवत असलेल्या गणेशाच्या नावाचा असा मोरू केला होता त्याची शिक्षा म्हणून पुढील अनेक जन्म त्याचा पोपट किंवा वडा होत राहील यात शंका नाही.

आपले गणपतीबाप्पा उत्तर भारतात गणेशजी आणि दक्षिणेकडे विनायक या नांवांनी जास्त ओळखले जातात. तशी त्याची शेकडो नांवे आहेत. गणपती, तुझी नांवे किती? या नांवाने मी लिहिलेल्या ब्लॉगची सर्वाधिक वाचने झाली आहेत आणि अजूनही होत आहेत. नारदमुनींनी लिहिलेल्या संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील आणि गणेशद्वादशनामस्तोत्रातील प्रत्येकी बारा नांवांमध्ये मोरेश्वराचा समावेश मात्र होत नाही आणि मला आंतर्जालावर मिळालेल्या ११० नांवांमध्येसुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांमध्ये मात्र मोरगांवच्या मोरेश्वराचा पहिला नंबर लागतो. मोरेश्वर हा शब्द जरी संस्कृत असला तरी संस्कृत किंवा हिंदी भाषांमध्ये लिहिलेल्या कुठल्याही स्तोत्रांमध्ये हा शब्द आल्याचे मला वाचल्याचे स्मरत नाही. 

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरगांवचा मयूरेश्वर

ज्यांना धड बोलताही येत नाही अशी लहान बालकेसुद्धा "गम्पतीबप्पा" म्हंटले की "मोय्या" असे किंचाळतात इतकी या शब्दांची जोडी आपल्या मनात घट्ट बसली आहे. कुठेही गणपतीबाप्पा ऐकले की मोरया हा शब्द आपोआप ओठावर येतो, इतकेच नव्हे तर तो कुणीही जोरात उच्चारला नाही तरी आपल्या कानावर आल्याचा भास होतो. 'मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी।।' हा श्लोक लहान मुलांना शिकवतात. मोरया म्हणजे गणपती हे सगळ्यांना माहीत असले तरी ते कशासाठी? हे बहुतेक लोकांना माहीत नसते, मलासुद्धा नव्हते.
यावर थोडा शोध घेतल्यानंतर असे समजले की पुणे जिल्ह्यात मोरगांव नावाचे एक गांव आहे. पूर्वीच्या काळी तिथे खूप मोरांची वस्ती असायची म्हणून ते नांव पडले होते. पुराणकाळात सिंधुरासुर नांवाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी घेतलेला गणपतीचा एक अवतार तिथे झाला होता अशी कथा आहे. त्या अवतारात ते मोर या वाहनावर स्वार होऊन आले होते म्हणून त्याला मयूरेश्वर असे म्हणतात. पुढे मयूरश्वरचे मोरेश्वर झाले. मोरगांव येथे गणपतीचे मोठे देऊळ आहे. अष्टविनायकांमध्ये त्याची गणना होते. चौदाव्या शतकात चिंचवड येथे मोरया गोसावी नावाचे एक साधू रहात असत. ते गणपतीचे भक्त होते आणि नेहमी चिंचवडहून मोरगांवला चालत जाऊन गणेशाचे दर्शन घेत असत. एकदा त्यांना प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते शक्य झाले नाही. पण त्यांच्या असीम भक्तीभावावर गणपती प्रसन्न झाले आणि स्वतःच चिंचवडला येऊन त्यांना दर्शन दिले, तसेच "माझ्या नावापुढे  मोरया हे तुझे नांव घेतले जाईल" असा आशीर्वाद त्यांना दिला अशी आख्यायिका आहे.   तेंव्हापासून "गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया" असे म्हणण्याची रूढी महाराष्ट्रात पडली.

छायाचित्र विकीपीडियावरून मूळ छायाचित्रकाराच्या सौजन्याने
Redtigerxyz - स्वतःचे काम,CC BY-SA 3.0,https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=8913180 द्वारे.


ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे या  श्री.प्रल्हाद शिंदे यांनी गायिलेल्या धडाकेबाज चालीवरील गाण्याने एका काळात खूप धमाल उडवली होती. गणेशोत्सवांमध्ये  या गाण्याची ध्वनिफीत जिकडे तिकडे  ध्वनिवर्धकावरून  (लाउडस्पीकर) वाजवली जात असे. कित्येकांना हे गाणे ऐकून ऐकून तोंडपाठ झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=shw04gHOUl0

हलाखीच्या परिस्थितीमधल्या कुटुंबात गणेशोत्सव साजरा करतांनासुद्धा किती कष्ट पडतात, पण ते समजून घेऊन बाप्पाने त्यांच्यावर कृपा करून जरा बरे दिवस आणावेत अशी विनवणी या हृदयद्रावक गाण्यामध्ये केली आहे. या गाण्याचे शब्द असे आहेत.

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ति मोरया

तूच सुखकर्ता तूच दुखहरता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे,   बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा || ध्रु ||

पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षान एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या  वर्षाची साऱ्या दुखाची
वाचावी कशी मी गाथा || १ ||

बाप्पा मोरया रे,   बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

नाव काढू नको तान्दुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घराचे
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशिर्वाद आता || २ ||

बाप्पा मोरया रे,  बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

आली कशी पहा आज वेळ
कसा बसावा खर्चाचा मेळ
प्रसादाला दूध आणी केळ
साऱ्या प्रसादाची केली भेळ
गुण गाईन आणि राहीन
द्यावा आशिर्वाद बाप्पा || ३ ||

बाप्पा मोरया रे,  बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

गायक : प्रल्हाद शिंदे
संगीत : मधुकर पाठक, हरेन्द्र जाधव
अल्बम : गणपती आरती

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

अष्टविनायक या गाजलेल्या मराठी चित्रपटात आठही विनायकांच्या देवळांची सुरेख वर्णन करणारे अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणे स्व.जगदीश खेबूडकरांनी लिहिले होते. त्या गाण्याच्या अखेरीलासुद्धा मोरया मोरयाचा गजर आहे.

मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया।
 मोरया मोरया मयुरेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया चिंतामणी मोरया ।
 मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया ।।
मोरया मोरया महागणपती मोरया ।
 मोरया मोरया विघ्नेश्वरा मोरया ।।
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया ।
 मोरया मोरया वरदविनायक मोरया ।।
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया।
 मोरया मोरया अष्टविनायक मोरया ।।

सातआठ वर्षांपूर्वी आलेल्या उलाढाल या चित्रपटातल्या ढोलताशांच्या आवाजाबरोबर होणाऱ्या मोरया मोरयाच्या गजराने त्या काळातल्या सगळ्या गणेशोत्सवाचे मांडव दणाणून गेले होते. अजय अतुल या संगीतकार जोडगोळीने गाजवलेले हे गाणे आजही लोकप्रिय आहेच. या क्षणी टीव्हीवर चालू असलेल्या सूर नवा ध्यास नवा या मालिकेत मी हे दणकेदार गाणे ऐकत आहे.  याचे शब्द असे आहेत.

हे देवा तुझ्या दारी आलो गुनगान गाया
तुझ्याइना मानसाचा जन्म जायी वाया
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया

मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

ॐकाराचं रुप तुझं चराचरामंदी
झाड, येली, पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली
माझी भक्ती तुझी शक्ती एकरुप झाली
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

आदि अंत तूच खरा, तूच बुध्दीदाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
हे देवा दिली हाक उध्दार कराया…
आभाळाची छाया तुझी समींदराची माया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..

गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
मोरया…..मोरया…..मोरया…..मोरया…..
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करु काय जाणे

https://www.youtube.com/watch?v=oRDmUYblLq8

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मोरया या नांवाचा एक चित्रपट सात वर्षांपूर्वी येऊन गेला. संगीतकार गायक आणि गीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी लिहिलेले त्यातले शीर्षक गीत अर्थातच बाप्पा मोरयावर आहे. गणपती बाप्पा मोरयाने पुन्हा अवतार घेऊन चुकलेल्या लोकांना योग्य वाट दाखवावी अशी विनंती या गाण्यात केली आहे.
मोरया सिनेमा टायटल साँग
https://www.youtube.com/watch?reload=9&v=aZwIwU_k6SM
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
तूच माझी आई देवा, तूच माझा बाप ।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
गोड मानुनी घे सेवा, पोटी घाल पाप।
चुकलेल्या कोकराया, वाट दाखवाया
घ्यावा पुन्हा अवतार, बाप्पा मोरया ।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय,
काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय,
माझा श्वास हि तुझिच माया तुझे हात पाय।
कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य,
का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य
तारू माझे पैलतीरी ताल कराया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच,
कधी होशी सखा कधी वैरी होशी तूच।
देवा तुला देवपण देती भक्तगण,
दानवांना पाप कर्म शिकवितो कोण
निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया।

गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।
गणाधिशा, भालचंद्रा, गजवक्रा, गणराया,
वक्रतुंडा, धूम्रवर्णा, गणपती बाप्पा मोरया।

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ


पं.हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या भावाबहिणीच्या जोडीने अवीट गोडी असलेल्या अनेक गीतांची भर मराठी सुगम संगीतामध्ये घालून त्याला अत्यंत समृद्ध केले आहे. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांनी त्यांच्यासाठी लिहून दिलेले गजानना, श्री गणराया हे मोरयाला वंदन करणारे भक्तीगीत अजरामर झाले आहेच.
https://www.youtube.com/watch?v=fV8WIzEHD-E

गजानना, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया
मंगलमुर्ती, श्री गणराया
आधी वंदू तुज मोरया

सिंदुरचर्चित धवळे अंग
चंदन उटी खुलवी रंग
बघता मानस होते दंग
जीव जडला चरणी तुझिया
आधी वंदू तुज मोरया

गौरीतनया भालचंद्रा
देवा कृपेच्या तू समुद्रा
वरदविनायक करुणागारा
अवघी विघ्ने नेसी विलया
आधी वंदू तुज मोरया

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

मागच्या वर्षी आलेल्या व्हेंटिलेटर या एका वेगळ्याच विषयावरल्या चित्रपटामध्येसुद्धा गणेशोत्सवावर एक गाणे आहे. गीतकार मनोज यादव व शांताराम मापुसकर या जोडीने लिहिलेले या रे या सारे या हे गीत रोहन रोहन या संगीत दिग्दर्शकांनी बांधलेल्या चालीवर गायक रोहन प्रधान यांनी गायिले आहे. त्यातले समूहगान म्हणजे कोरस तर खूपच बहारदार आहे.
https://youtu.be/HzGE_WaSqE4 

 या रे या सारे या
गजाननाला आळवूया
नाम प्रभूचे गाऊया
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया

गुणगान तुझे ओठांवर राहू दे
चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे
नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू
भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया
या रे या सारे या ....

उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता
आधार तुझा तू तारण करता
तू माता, तूच पिता
तू बंधू, तूच सखा
आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया
या रे या सारे या ......

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

आपल्या समाजामध्येच कुठल्याही निमित्याने मोठमोठ्याने कर्ण्यावर (लाऊडस्पीकरवर) गाणी वाजवत राहणे आणि कार्यक्रमांमध्ये त्याचप्रमाणे मिरवणुकींमध्ये डी जे वर गाणी लावून त्यावर नाच करणे यालाच आता खूप जोर आल्यामुळे त्यासाठी कर्कश आवाज आणि उडत्या चालींच्या गाण्यांनाही उधाण आले आहे. यात सिनेमातली गाणी, आल्बम्स, लोकगीते वगैरे सर्वांचाच समावेश होतो. गणेशोत्सवांमध्येसुद्धा ते लोण आल्याशिवाय कसे राहील?  तिथे देवाशी कसलाही संबंध नसलेली पॉप्युलर गाणी तर वाजवली जातातच, मुद्दाम गणपती बाप्पाचा उल्लेख असलेली अनेक गाणीसुद्धा गणेशोत्सवाच्या सुमाराला बाजारात यायला लागली. गेल्या तीन वर्षांमधल्या अशा गाण्यांचे दुवे खाली दिले आहेत.

 २०१६ मोरया गाणी
https://www.youtube.com/watch?v=z7W9gEtIXbU

२०१७ मोरया गाणी 
https://www.youtube.com/watch?v=OHUy2KJlINk

२०१८ ढोल ढोल ढोल घुमू लागला
https://www.youtube.com/watch?v=esBHy_ky-PQ

आता मोरयासंबंधीचे थोडेसे अवांतर

मोरया हा शब्द शार्दूलविक्रीडित या वृत्तातल्या ओळींच्या शेवटी चपखल बसत असल्यामुळे बहुतेक मंगलाष्टकांमध्ये तो येतोच. उदाहरणार्थ
प्रारंभी नमुया महेशतनया, विघ्नांतका मोरया ।
ब्रह्मा विष्णु शिवा, उमा, कमलजा, त्रैमूर्ति दत्तात्रया ।।

मोरया मधील मोर च्या ऐवजी More हा शब्द घालून   Moreया, Moreघ्या. Moreन्या, Moreद्या असे शब्दप्रयोग केलेल्या जाहिराती या दिवसात पहायला मिळतात.

आपला गणपती बाप्पा आपल्या भक्तांना तुम्ही मागे राहू नका म्होरं या, म्हणजे पुढे या असा आदेश देत असतो म्हणून त्याला मोरया म्हणतात असा अजब शोधसुद्धा कोणा डोकेबाज माणसाने लावला आहे.

आज अनंतचतुर्दशीला सर्व ठिकाणचे उत्सव संपून विसर्जनाच्या जंगी मिरवणुकी निघतील आणि गणपतीबाप्पा मोरयाला पुढच्या वर्षी लवकर या असे सांगून रात्री उशीरापर्यंत किंवा कदाचित उद्या सकाळपर्यंत त्या चालत राहतील. मी या वर्षीच्या गणेशोत्सवात लिहिलेला मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया हा लेख रोज थोडी भर घालून पुढे नेला होता. त्या बाप्पाला मनोमन वंदन करून आज तो पूर्ण करीत आहे.ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ