Thursday, July 26, 2012

दारासिंग, मृणाल गोरे, राजेश खन्ना आणि अमावास्यायांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे पहिल्या तीघांचा मृत्यू मागच्या महिन्यातल्या अमावास्येच्या सुमाराला झाला. अमावास्या म्हणजे अशुभ दिवस असे समीकरण ठरून गेले आहे. त्या दिवशी काही चांगले घडणारच नाही, व्हायचे ते वाईटच होईल अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे काही भोळसट लोक त्या दिवशी कोणतेही काम करायला कचरतात, अगदी दाढीसुध्दा करत नाहीत. असल्या आचरट समजुतींना माझ्या मनात थारा नसल्यामुळे मला तरी वर्षातले अमावास्येसकट सगळे दिवस सारखेच वाटतात आणि दर महिन्याला येणारी अमावास्या कधी येऊन गेली ते मला सहसा समजतसुध्दा नाही. पण या वेळेला येऊन गेलेली अमावास्या मात्र वेगळी होती. ती दिव्याची अंवस आहे तसेच पुढे श्रावण महिना येत असल्यामुळे तो दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा केला जात आहे वगैरेंच्या बातम्या आधीच येऊन पोचल्या होत्या. त्याच दिवशी गुरुपुष्यामृत योग येणार असल्यामळे त्या दिवशी सोने खरेदी करण्याची हौस बाळगणा-यांना मात्र तो दिवस कदाचित तितकासा अशुभ वाटला नसावा. त्या दिवशीची वर्तमानपत्रे सराफांच्या मोठमोठ्या जाहिरातींनी भरली होती. त्या वाचून ग्राहकांनी त्यांच्या दुकानात गर्दी केली होती असेही ऐकण्यात आले. यामुळे हा गुरुपुष्यामृतयोग अमावास्येपेक्षा जास्त शक्तीशाली असावा असे वाटून गेले. पण काळापुढे या अमृताचेही काही चालले नाही आणि एकापाठोपाठ तीन महत्वाच्या व्यक्तींना काळाने ओढून गेले.
यातल्या दारासिंग यांचा जन्म पंजाबातल्या एका गरीब कुटुंबात झाला होता आणि लहान वयातच त्यांना पोटासाठी वणवण करीत परदेशी जावे लागले होते. तिकडेच त्यांना मल्ल व्हावेसे वाटले आणि त्यांनी त्या विद्येत प्राविण्य मिळवले. त्या क्षेत्रात त्यांनी इतकी प्रगती केली की विश्वविजेत्या किंगकाँगलाही चारी मुंड्या चीत केले. दारासिंग यांनी पाचशे मोठ्या कुस्त्या केल्या आणि त्यात एकदाही त्यांचा पराजय झाला नाही. ही फार पूर्वीची गोष्ट झाली. पण कुस्तीगीर म्हणून मिळालेला नावलौकिक आणि कमावलेली शरीरयष्टी यांचा उपयोग करून ते सिनेमातील अभिनयाच्या क्षेत्रात आले आणि अनेक देमार चित्रपटांचे नायक बनले. त्यांच्या शरीरसौष्ठवामुळे त्यांना रामायण या अतीशय गाजलेल्या मालिकेमध्ये महाबली हनुमानाची भूमिका मिळाली आणि त्यातून ते घराघरात पोचले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काही चांगल्या भूमिका वठवल्या. काही वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या जब वुई मेट या चित्रपटातली किंचित विनोदी झालर असलेली एका प्रेमळ सरदारजीची त्यांची भूमिका लक्षात राहण्यासारखी होती.

मी मुंबईला आलो त्या काळात मृणाल गोरे या नावाचा खूप मोठा दबदबा होता. गोरेगावच्या नागरिकांचा पाण्याचा ज्वलंत प्रश्न धशाशी लावून त्यांनी यशस्वी रीत्या सोडवल्यानंतर तिथे त्या 'पाणीवाली बाई' झाल्या होत्या आणि त्यानंतर निदान मुंबईत तरी जिथे कुठे समाजावर अन्याय होत असतांना दिसेल तिथे त्याविरुध्द आवाज उठवण्यासाठी लोकांना संघटित करण्यासाठी त्यांना पाचारण केले जाऊ लागले किंवा त्या स्वतः तिथे पोचून जात होत्या. त्यांच्यात सारे नेतृत्वगुण होतेच, शिवाय स्वच्छ प्रतिमा, निर्भय आणि तेजस्वी व्यक्तीमत्व, कष्टाळू व अभ्यासू वृत्ती यामुळे सर्वांनाच, अगदी त्यांच्या विरोधकांनासुध्दा त्यांच्याविषयी आदरभाव वाटत होता. मी त्यांना टेलीव्हिजनवर पहात होतो आणि त्यांची वक्तव्ये व त्यांच्यावर आलेले लेख वर्तमानपत्रात वाचत होतो त्यावरून मला त्यांच्याबद्दल खूप आदर वाटत असे. त्यांनी चालवलेल्या कोठल्याही आंदोलनात सामील होणे मला शक्य नव्हतेच, त्यांच्या एकाद्या सभेला जाऊन त्यांचे ओजस्वी भाषण प्रत्यक्ष ऐकण्याची संधीसुध्दा मला कधी मिळाली नाही. फक्त एकदा विमानात त्यांच्याच रांगेत शेजारच्या सीटवर मला बसायला जागा मिळाल्यामुळे त्यांना जवळून पहायला मिळाले. प्रवासात त्या कसल्या तरी वाचनात मग्न होत्या आणि कोणाशी बोलायचा त्यांचा मूड दिसला नाही. उतरायच्या वेळी त्यांची बॅग डोक्यावरील रॅकवरून काढून देऊन मी थोडासा आदरभाव व्यक्त केला आणि त्यांनी त्याबद्दल माझे औपचारिक आभार मानले. त्यांच्याशी साधलेला एवढासाच संपर्क मात्र आयुष्यभर लक्षात राहिला. पुढे आणीबाणीनंतर जनता पक्षाची स्थापना झाली तेंव्हा त्यांचा प्रजासमाजवादी पक्ष त्यात विलीन झाला. काही काळानंतर या दोन्ही पक्षांचे मुंबईतून पार उच्चाटन झाले आणि मृणालताईंना राजकीय मंच असा उरला नाही. कदाचित वयोमानानुसार त्यांच्या व्यक्तीमत्वामधली धग थंड होऊन गेली असावी. गेल्या दहा पंधरा वर्षात तरी मी त्यांचे नाव वाचले किंवा ऐकले नव्हते.
राजेश खन्ना तसा संपन्न घरामधून आला होता. मुंबईतच त्याचे शिक्षण झाले. सिनेमासृष्टीमधील सर्वांनी मिळून घेतलेल्या एका टॅलंट सर्चमध्ये तो सर्वप्रथम आला. त्याला कदाचित सर्व निर्मात्यांनी मिळून वर्षभरासाठी करारबध्द केले गेले असावे. कारण पहिले वर्षभर तरी तो असंख्य चित्रपटांमध्ये लहानसहान भूमिकांमध्ये दिसायचा आणि त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे लक्षात रहायचा. त्यानंतर त्याच्या एकापाठोपाठ एकाहून एक यशस्वी सिनेमांची लाट आली आणि लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होऊन तो महानायक बनला. चार पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ती लाट ओसरत चालली. राजेश खन्ना याने तो स्वतःच नायक असलेल्या अवतार सारख्या चित्रपटात वृध्द गृहस्थाच्या भूमिका केल्या होत्या, पण इतर कोणा नायकाच्या सहाय्यक भूमिकेत मी तरी त्याला कधी पाहिले नाही. त्यामुळे अनेक वर्षे तो नजरेआडच झाला होता. त्याला जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले तेंव्हा कित्येक वर्षांनंतर तो छोट्या पडद्यावर दिसला होता तेंव्हा किती वेगळा वाटला होता.

या तीन्ही व्यक्ती त्यांच्या मरणापूर्वीच प्रसिध्दीपासून दूर गेल्या होत्या. त्यांची आठवणसुध्दा येत नव्हती आणि त्याशिवाय रोजचे सगळे व्यवहार सुरळीतपमे चालले होते. त्यांच्या जीवंत असण्याने जसा काहीच फरक पडत नव्हता, तसा त्यांच्या जाण्यानेही पडला नाही. तरीही काही काळ तरी मन विषण्ण झालेच. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Sunday, July 22, 2012

नागपंचमी गाणी


खानदेशातल्या शंभर वर्षांपूर्वीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी तिकडच्या अहिराणी बोलीत अप्रतिम काव्यरचना केली आहे. "माझी माय सरसोती, माले शिकयते बोली।" असे त्यांनीच स्वतःबद्दल लिहिले आहे. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त होता. शालेय शिक्षण घेतले नसले तरी त्यांना सणवार आणि देवदेवतांची खूप माहिती होती. त्यांच्या आयुष्यात घडून गेलेल्या एका नाजुक प्रसंगाचे सुरेख चित्रण त्यांनी खाली दिलेल्या ओव्यांमध्ये केले आहे. बहिणाबाई शेतात काम करायला जात असत. तान्ह्या सोपानदेवांना आंब्याच्या झाडाखाली एका टोपलीत निजवून त्या उसाच्या मळ्यात कामाला लागल्या असतांना एक नाग त्या मुलाच्या जवळ आला. ते पाहून लोकांनी ओरडा केला. बहिणाबाई येऊन पाहते तर लहानगा सोपान टोपलीच्या बाहेर येऊन त्या नागाबरोबर खेळत होता. तिने नागोबाला दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि शंकराची शपथ घालून सोपानदेवाला दंश न करण्याची विनंती केली शिवाय कृष्णाचा धांवा करून सांगितले की आपली बांसुरी वाजवून नागोबाची समजूत घाल. तेवढ्यात गुराख्यांनी वाजवलेले पाव्याचे सूर ऐकून नाग तिकडे निघून गेला. बहिणाबाईने नागोबाचे आभार मानून त्याला नागपंचमीच्या दिवशी दुधाची वाटी देईन असे आश्वासन दिले. ते तिने नक्कीच पाळले असणार.


उचलला हारा, हारखलं मन भारी ।
निजला हार्‍यात, तान्हा माझा शिरीहारी ।।

डोईवर हारा, वाट मयाची धरली ।
भंवयाचा मया, आंब्याखाले उतरली ।।

उतारला हारा, हालकलं माझं मन ।
निजला हार्‍यात, माझा तानका 'सोपान' ।।

लागली कामाले, उसामधी धरे बारे ।
उसाच्या पानाचे, हातीपायी लागे चरे ।।

ऐकूं ये आरायी, धांवा धांवा घात झाला ।
अरे, धांवा लव्हकरी, आंब्याखाले नाग आला ।।

तठे धांवत धांवत, आली उभी धांववर ।
काय घडे आवगत, कायजांत चरचर ।।

फना उभारत नाग, व्हता त्याच्यामधीं दंग ।
हारा उपडा पाडूनी, तान्हं खेये नागासंगं ।।

हात जोडते नागोबा, माझं वांचव रे तान्हं ।
अरे, नको देऊं डंख, तुले शंकराची आन ।।

आतां वाजव वाजव, बालकिस्ना तुझा पोवा ।
सांग सांग नागोबाले, माझा आयकरे धांवा ।।

तेवढ्यांत नाल्याकडे, ढोरक्याचा पोवा वाजे ।
त्याच्या सूराच्या रोखानं, नाग गेला वजेवजे ।।

तव्हां आली आंब्याखाले, उचललं तानक्याले ।
फुकीसनी दोन्हीं कान, मुके कितीक घेतले ।।

देव माझा रे नागोबा, नही तान्ह्याले चावला ।
सोता व्हयीसनी तान्हा, माझ्या तान्ह्याशीं खेयला ।।

कधीं भेटशीन तव्हां, व्हतील रे भेटी गांठी ।
येत्या नागपंचमीले, आणीन दुधाची वाटी ।।


ग्रामीण भागातल्या बायका नागपंचमीचा सण वटपौर्णिमेप्रमाणे सार्वजनिक रीत्या साजरा करतात. कोणत्याही मुलीला एकटीने रानात जाऊन नागोबाच्या वारुळापाशी जायला भीती वाटणारच. त्यामुळे सगळ्या सख्या मिळून नागोबाची पूजा करायला जात असतील. कवीवर्य स्व.ग.दि,माडगूळकरांनी या प्रसंगावर एक छान चित्रपटगीत लिहिले आहे. त्यात शेषशायी विष्णूभगवानाच्या शेषाचा उल्लेख आहे. त्याचेच पृथ्वीवरील रूप असलेल्या नागोबाची पूजा करून या मुली त्याच्याकडे मागण्या करतात. कुमारिकांना चांगला नवरा मिळावा, त्यांनी राजाची राणी बनावे आणि सौभाग्यवतींच्या कुंकवाच्या धन्यांना दीर्घायुष्य मिळावे अशा प्रार्थना त्या करतात.


चल ग सखे वारुळाला, वारुळाला, वारुळाला ग ।
नागोबाला पूजायाला, पूजायाला, पूजायाला ग ।।

नागोबाचे अंथरूण निजले वरी नारायण ।
साती फडा ऊभारून धरती धरा सावरून ।

दूध लाह्या वाहू त्याला, वाहू त्याला, नागोबाला ।।
बारा घरच्या बाराजणी, बाराजणी, बाराजणी ।

रूपवंती कुवारिणी, कुवारिणी, कुवारिणी ।
नागोबाची पुजू फणी, कुंकवाचा मागू धनी ।

राजपद मागू त्याला, मागू त्याला, नागोबाला ।।
बाळपण त्याला वाहू, त्याला वाहू, त्याला वाहू ग ।

नागिणीचा रंग घेऊ. रंग घेऊ, रंग घेऊ ग ।
नागोबाला फुलं वाहू, लालमणी माथी लेवू ग ।
औक्ष मागू कुंकवाला, कुंकवाला, बाई कुंकवाला ।।स्व. ग. दि. माडगूळकर यांनीच लिहिलेले दुसरे एक सुंदर गीत स्व.गजानन वाटवे यांनी अजरामर केले आहे. एका मुलाखतीमध्ये वाटवे यांनी सांगितले होते की त्यांच्या काळात चांगल्या स्त्रीगायिका होत्या तरीसुध्दा त्यांनीच स्त्रियांची गाणी म्हणावीत आणि पुरुष गायकांनी फक्त पुरुषांचीच गाणी म्हणावी असा लोकांचा आग्रह नव्हता. कवितेमधल्या भावना लोकांपर्यंत पोचवणे एवढे काम स्व. गजानन वाटवे करत होते. मग त्या भावना स्त्रीमनातील असतील तर त्यानुसार त्या कवितेला चाल लावून आणि आवाजात मार्दव आणून ती कविता पुरुषाने सादर केली तरी श्रोते त्या गाण्याला डोक्यावर घेत असत. नागपंचमीच्या सणानिमित्याने जमलेल्या सगळ्या मुली झाडांच्या फांद्यांना झोपाळे बांधून खेळत आहेत, श्रावणमासातल्या आनंदी वातावरणाने सगळे जग उल्हसित झाले आहे, पशूपक्षी, वनस्पती, नदीनाले सगळे सगळे आनंदात आहेत, नायिका तिच्या पतीची आतुरतेने वाट पाहते आहे, पण तो घरी आला नाही म्हणून तिला प्रियाविना उदासवाणे वाटते आहे, तिच्या मनात कुशंकेची पाल चुकचुकते आहे. अशा अर्थाचे हे एक सुंदर विरहगीत आहे.


फांद्यांवरी बांधिले ग मुलिंनि हिंदोळे ।
पंचमिचा सण आला डोळे माझे ओले ।।

श्रावणाच्या शिरव्यांनी, आनंदली धराराणी ।
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले ।।

जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी ।
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले ।।

पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात ।
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले ।।

आरशात माझी मला, पाहू बाई किती वेळा ।
वळ्‌चणीची पाल काही भलेबुरे बोले ।।

Saturday, July 21, 2012

नागपंचमी

जीवशास्त्राच्या (बायॉलॉजीच्या) अभ्यासातून असे दिसते की नाग हा एक थंड रक्ताचा आणि सरपटणारा प्राणी आहे. त्याला हात, पाय, सोंड, शिंगे वगैरे बाह्य अवयव नसतात. दोन दात असले तरी त्यांचा उपयोग अन्नाच्या चर्वणासाठी होत नाही. उंदीर, बेडूक यासारखे लहान प्राणी आणि पक्षी, त्यांची अंडी वगैरे तो न चावताच गिळतो. अजगराचा अपवाद सोडल्यास कोणताच साप माणसाला गिळू शकत नसल्यामुळे माणूस हे नागाचे भक्ष्य असत नाही आणि काहीही खाऊ शकणारे चिनी सोडल्यास इतर माणसेही, विशेषतः भारतीय लोक नागाला खायचा विचारही करत नाहीत. त्यामुळे नाग आणि मनुष्य हे एकमेकांचे नैसर्गिक शत्रू नाहीत. नाग कधीही आपण होऊन माणसाच्या वाटेला जात नाहीत. पण स्वसंरक्षणासाठी नागाकडे अत्यंत जालिम असे विष असते. त्याच्यावर कोणी हल्ला करीत आहे असे त्याला वाटल्यास नाग त्या प्राण्याला दंश करतो आणि बहुधा तो प्राणी मरून जातो. या कारणामुळे माणसे त्याला घाबरून असतात आणि नागाला पाहताच शक्य असल्यास त्याला मारून टाकायचा प्रयत्न करतात. माणसाला नागापासून प्रत्यक्ष कोणताही लाभही मिळत नाही. उपद्रवकारी उंदरांना खाऊन त्यांची संख्या कमी करण्याची मदत तो अप्रत्यक्षरीत्या करत असतो. स्वतः जमीन खणण्याचे कसलेही साधन नागाकडे नसते, पण मुंग्या, उंदीर किंवा खेकड्यांनी केलेली वारुळे आणि बिळे त्याला लपून बसायला सोयीची असल्यामुळे तो त्यात जाऊन राहतो. यावरूनच 'आयत्या बिळात नागोबा' ही म्हण पडली आहे.
हिंदू धर्मशास्त्रांमध्ये नागाला फार मोठे स्थान मिळाले आहे. श्रीविष्णू नेहमी शेषनागावर शयन करत असतात, तसेच त्यांच्या अवतारांमध्ये शेषनागसुध्दा अवतार घेऊन त्यांच्यासोबत असतात. अमृतमंथनामधून निघालेले हालाहल विष शंकराने प्राशन केले आणि त्याची बाधा होऊ नये म्हणून ते गळ्यातच साठवून ठेवले. त्या विषामुळे गळ्याचा रंग निळा झाला म्हणून शंकराला नीळकंठ असे नाव पडले. हालाहलामुळे गळ्याचा अतीशय दाह होत होता तो कमी करण्यासाठी शंकराने गळ्याभोवती एक थंडगार नाग गुंडाळून घेतला. शंकराच्या चित्रात हा नाग दाखवलेला असतो. अशा प्रकारे शैव आणि वैष्णव या दोन्ही पंथांमध्ये नागाला खूप महत्व आहे. अर्जुनाने वनवासात असतांना एका नागकन्येशी विवाह केला होता असाही उल्लेख आहे. या पुराणातल्या रूपककथांमधून निरनिराळे अर्थ शोधण्याचे काम विद्वान लोक करत असतात. सर्वसामान्य माणसे नागाच्या प्रतिमेची देव मानून पूजा करतात आणि प्रत्यक्षात तो समोर आला तर भीतीने त्यांची घाबरगुंडी उडते.

नागाबद्दल अनेक अपसमज प्रचारात आहेत. पुराणातल्या काही गोष्टींमध्ये दाखवल्याप्रमाणे काही इच्छाधारी नाग त्यांना पाहिजे असेल तेंव्हा मनुष्यरूप धारण करतात आणि त्यांचे काम झाल्यावर पुन्हा साप बनतात. नाग आणि नागीण यांची जोडी असते आणि त्यातल्या एकाला कोणी मारले तर दुसरा किंवा दुसरी चवताळून डूख धरून राहते, त्या कृत्याचा बदला घेते. जमीनीत पुरून ठेवलेल्या द्रव्याचे रक्षण एकादा नाग करत असतो वगैरे गोष्टी आजच्या संदर्भातसुध्दा रंगवून सांगितल्या जातात. वस्तुतः नागाला पैशांचा किंवा दागदागीने, सोने चांदी वगैरेंचा काहीही उपयोग नसतो. पण अशा प्रकारच्या अफवांमुळे चोरी करायचा उद्देश मनात बाळगणा-या लोकांवर कदाचित थोडा वचक बसत असेल.

नागांपासून माणसांना वाटणारी भीती थोडी कमी व्हावी, त्याच्याबद्दल द्वेष न वाटता आपलेपणा, आदर वाटावा या उद्देशाने कदाचित नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करण्याचा रिवाज निर्माण केला असावा. पण नाग या वन्य प्राण्याला माणसांच्या पूजाविधीचा अर्थ कळत असेल आणि नागाची पूजा करण्याच्या निमित्याने लोकांनी रानातले एकादे वारूळ गाठले तरी त्यातला नागोबा बाहेर येऊन आपली पूजा करवून घेईल असे मला तरी वाटत नाही. पण लोकांना तर नागपंचमीला जीवंत नागाची पूजा करायची असते. त्यामुळे काही निर्भय गारुडी लोक नागांना पकडून आणून त्यांना घरोघर फिरवतात आणि पूजेसाठी लोकांनी देऊ केलेले दूध, नैवेद्य आणि दक्षिणा घेऊन जातात. वन्यजीवांचे रक्षण आणि भूतदया यांचा विचार करता आता सरकारने यावर बंदी घातली आहे असे ऐकले आहे. ती अंमलात आणली गेली तर बिचा-या नागांचे होणारे हाल थांबतील.


नागपंचमीच्यासुध्दा दोन कहाण्या प्रचलित आहेत.

पहिल्या कहाणीमध्ये एका ब्राह्मणाला पांच सुना होत्या. पण नागपंचमीच्या दिवशी कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना बाहेर गेल्या असतात. धाकट्या सुनेला माहेरचे कोणीच नव्हते. ब्राह्मणाचा वेष घेऊन एक नाग त्या मुलीला नेण्याकरितां आला आणि तिला आपल्या वारुळांत घेऊन गेला. एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां तिने त्या मुलीला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढे तिची पिले वळवळ करूं लागली. त्यांना पाहून ही मुलगी भिऊन गेली. तिच्या हातांतला दिवा खालीं पडल्यामुळे पोरांची शेपटे भाजलीं. मनुष्यदेह धारण करून नागाने तिला सासरीं पोचती केली. नागाचीं पोरे मोठीं झाल्यानंतर त्याचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरीं गेले. तो सुध्दा नागपंचमीचा दिवस होता. पाटावर व भिंतीवर नागांची चित्रे काढून ती मुलगी त्यांची पूजा करत होती. हा सर्व प्रकार पाहून पिलांच्या मनांतला सर्व राग गेला. एक नवरत्नांचा हार तिथे ठेवून ते निघून गेले.

दुस-या कहाणीत शेत नांगरत असतांना एका शेतक-याकडून चुकून एक नागाचे बीळ उध्वस्त केले जाते, त्यात नागाची पिले मरतात. त्याचा बदला घेण्यासाठी नागीण त्या माणसाच्या घरी जाऊन सगळ्यांना दंश करून मारून टाकते. त्याच्या बहिणीला मारण्यासाठी नागीण तिच्या घरी जाते. तिथे ती बहीण नागांची चित्रे काढून त्यांची भक्तीभावाने पूजा करत असतांना पाहून तिचा राग मावळतो, ती त्या मुलीला अमृत आणून देते, ते प्राशन करून तिचे सगळे आप्त जीवंत होतात.
नागपंचमीला नागाची पूजा करण्यामुळे नागांचे गैरसमज दूर होतात आणि नंतर सगळे सुखाने राहू लागतात अशा कथा या दोन्ही कहाण्यांमध्ये आहेत. त्या कहाणीमधले नाग मनुष्यवेष धारण करून हिंडत असतात, त्यांची पूजा करणा-यांना मदत करत असतात, त्यांच्याकडे अमृत, नवरत्नांचे हार वगैरे असतात अशा  अद्भुत कल्पनांमुळे या कहाण्या सुरस वाटतात.

-----------------------------------------------------
यानिमित्य खाली दिलेली पौराणिक माहिती डॉ.धनमजय घारे यांनी पाठवली आहे.
परीक्षित राजाला तक्षक नाग चावल्याने त्याचा मृत्यू झाला या घटनेने कोपाविष्ट होऊन जन्मेजयाने सर्प यज्ञ केला व लाखो कोट्यावधी सर्पांची हत्या केली ही (सांकेतिक पौराणिक ) गोष्ट अर्धवटपणे खूप प्रसिद्ध झाली आहे. पण

अ)"अशी सर्प हत्या हॊऊन अनेक सापांच्या जाती नष्ट होऊ देत" असा शाप प्रत्यक्ष त्या जातीच्या मूळ आईनेच ( कश्यप पत्नी कद्रूनेच ) त्यांना दिलेला होता व

आ)शेवटी तो जन्मेजयाने सुरू केलेला सर्पयज्ञ तक्षकाची हत्या न करताच थांबवला गेला वगैरे अनेक संबंधित माहिती मात्र आजच्या पिढीला दिली जात नाही हे योग्य नाही.

प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून नव नागांना दैवत मानले जाते. वैकुण्ठात विष्णु शेषावर झोपून असतात व कैलासात शंकर शेषांचे भूषण अंगा-खांद्यावर मिरवतात. गणेश लोकात गजानन सर्पाला पोटावर मौंजीबंधन बांधून मिरवतात. पृथ्वीला अंतरीक्षात शेष नागाच्या फ़ण्याचाच (सांकेतिक) आधार व आसरा आहे. कालिया नागाला श्रीकृष्णाने मारले नाही फ़क्त स्थलांतरित केले. वसुदेव जेंव्हा बाल वासुदेवाला शिरावर धारण करून जोरदार पावसातून यमुना पार करण्याला निघाला तेंव्हा शेषानेच आपल्या फ़ण्याने त्याच्या डोक्यावर छत्री धरून त्याचे संरक्षण केले. सोमवार व्रत कथेतील सुप्रसिद्ध सीमंतिनीचा नवरा (सुप्रसिद्ध 'नल' राजाचा नातू ) चन्द्रांगद जेंव्हा यमुनेत बुडाला तेंव्हा त्याला नाग कन्यांनीच वाचवले व नागांच्या राजानेच त्याला त्याचे गमावलेले राज्य परत मिळवून दिले, इत्यादिक सर्पांच्या बाबतीतील शेकडो पौराणिक कथाही त्यांच्याबद्दल "आदर" व "पूज्य" भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने व पद्धतीने मुलांना सांगायला हव्यात.

सर्व जुन्या (विशेषत: प्राचीन प्रसिद्ध ) देवालयांमधून मुख्य दैवताचे पंचायतन व नव नाग व नव ग्रहांची छोटी देवळे असतात. याशिवाय शहरातूनच नव्हे तर अनंत खेड्या पाड्यातून अनेक वडांच्या व पिंपळांच्या पारावरून नव नागांची छॊटी छॊटी मंदिरे (किंवा नुसत्याच मुर्त्या बसवलेल्या सांपडतात ).

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील नाग चतुर्थी व नागपंचमीचे दोन दिवस नाग या प्राण्याबद्दल "आदर" व "पूज्य" भावना समाजात रुजवण्यासाठी वार्षिक सण म्हणून पाळले जाण्याची परंपरा आहे. तिचा लाभ घेऊन समाजातील (विशेषत: पुढील पिढीच्या मुला बाळांच्या ) मनांतील सर्प जातीबद्दलची गैर समजूत दूर करून त्यांना आपल्या योग्य परंपरांचे योग्य प्रकारे शिक्षण दिले जायला हवे.

नव नाग स्तोत्र :

अनंतं वासुकी शेषं पद्मनाभं च कम्बलं
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा ।।१।।


एतानि नव नामानी नागानां च महात्मनां
सायंकाले पठेत् नित्यं प्रात:काले विशेषत:
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् ।।२।।

नाग पंचमीला वरील स्तोत्र पठण करून पुरणाची दिण्डी बनवून त्यांचा नैवेद्य नाग दैवताला समर्पण करण्याची प्रथा आहे.Friday, July 20, 2012

श्रावण शुक्रवार


आज श्रावण महिना सुरू होत आहे. घरोघरी देवघरात जिवतीच्या पटाची स्थापना करून पुढील महिनाभर त्यांची पूजा केली जाईल. या पटात इतर काही देवांची चित्रे असली तरी जिवतीला सर्वात जास्त महत्व असते, जिवतीच्या नावानेच हा पट ओळखला जातो. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी अशी तिची प्रतिमा आहे. श्रावण महिन्यामधील दर शुक्रवारी तिची पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आणि घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा असे.


श्रावण महिन्यात दररोज त्या वाराची कहाणी वाचली जात असे. त्या कहाणीमध्ये त्या वाराच्या दैवतेची कृपा कोणा भक्तावर झाल्यामुळे त्याला कशाची प्राप्ती झाली याची सुरस गोष्ट असे. शुक्रवारसाठी दोन कहाण्या आहेत. एका कहाणीमध्ये एका गरीब स्त्रीला फसवून तिची दायीच तिचे मूल चोरते आणि त्या गावच्या निपुत्रिक राणीला ते नेऊन देते. गरीब बाईच्या पोटी वरवंटाच जन्माला आला असे ती दुष्ट सुईण तिला सांगते. या थापेवर तिचा विश्वास बसत नाही, पण ती काहीच करू शकत नसल्यामुळे नियमितपणे जिवतीची पूजा करत राहते आणि माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे तो सुखात आणि सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करते. तिचा मुलगा राजपुत्र म्हणून थाटात वाढतो. त्याच्यावर आलेल्या संकटामधून जिवतीच्या कृपेने तो सहीसलामत वाचतो आणि अखेर त्याच्या जन्मदात्या आईला भेटतो.
दुस-या कहाणीमधील बाई दारिद्र्यात रहात असतांना तिचा भाऊ तिचा अपमान करतो. त्याने घातलेल्या गावजेवणासाठी ती आली असतांना तिला पानावरून उठवून माघारी पाठवतो. ती सुध्दा जिवतीची भक्त असते. जिवतीच्या कृपेने त्या कुटुंबाचे वाईट दिवस जाऊन त्यांना समृध्दी प्राप्त होते. त्यानंतर तोच भाऊ त्या बहिणीला सन्मानाने आपल्या घरी जेवायला बोलावतो आणि तिला पाटावर बसवून पंचपक्वांनांनी भरलेले जेवणाचे ताट तिच्यापुढे मांडतो. ती स्वाभिमानी बहीण आपले एक एक अलंकार काढून पाटावर ठेवते आणि ताटामधील पक्वांनांचा एक एक घास त्यांना देते. "हे जेवण तू यांच्यासाठीच मला दिले आहेस, माझे जेवण मी अन्नछत्रात जेवले." अशी कानउघाडणी केल्यानंतर त्या मतलबी भावाचे डोळे उघडतात.

या दोन्ही कहाण्या मला खूप आवडतात, विशेषतः दुसरी कहाणी. या बहीण भावांच्या गोष्टीत दिव्याच्या अंवसेच्या कहाणीसारख्या इतर कहाण्यांप्रमाणे कसले चमत्कार नाहीत, बोलणारे पशूपक्षी किंवा निर्जीव पदार्थ यात नाहीत. सगळ्या घटना वास्तवात घडू शकण्यासारख्या आहेत. "आईबापबंधूभगिनी, दारिद्र्यात नसते कोणी।", त्या वेळी "कुणी कुणाचे नाही।" किंवा "कठीण समय येता कोण कामास येतो।" वगैरे अन्य ऊक्तींमध्ये सांगितलेले जीवनातले कटू सत्य या कहाणीत दाखवले आहे. पहिल्या कहाणीमधलासुध्दा मोठ्या झालेल्या मुलाला पाहता क्षणी त्याची ओळखदेख नसतांनासुध्दा त्याच्या आईला पान्हा फुटतो एवढा अवास्तव भाग सोडला तर चांगल्या आणि वाईट मानवस्वभावांचेच दर्शन त्यात घडते. अर्थातच माणसाने काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन या कहाण्यांच्या तात्पर्यामध्ये मिळते.

Wednesday, July 18, 2012

दिव्याची अंवस की गटार अमूशा ?

आपल्याला मदत करणारी माणसे, पशूपक्षी, वनस्पती इतकेच नव्हे तर निर्जीव वस्तूंबद्दल आपल्याला आत्मीयता किंवा आदर वाटावा आणि तो व्यक्त करावा अशा प्रथा आपल्या सणवारांमधून पाडल्या गेल्या आहेत. दिवा ही एक अशीच अत्यंत उपयुक्त वस्तू आहे. प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये दीपप्रज्वलन करावे लागतेच, त्या आधी त्या दिव्याची पूजाही केली जाते. दिव्याची अंवस हा सण तर खास दिव्यांसाठी साजरा केला जात असे. त्या दिवशी घरातील सर्व समया, निरांजने, लामणदिवे वगैरे घासून पुसून चकाचक करून त्यांची पूजा केली जाते, तसेच कणकेच्या वाट्या तयार करून त्यामध्ये तेल वात घालून दिवा लावतात. हे पिठाचे दिवे उकडून प्रसाद म्हणून तूप आणि गुळासोबत खाल्लेही जातात. दिव्याच्याच पूजेमध्ये दिव्यानेच दिव्याची आरती आणि दिव्याला दिव्यांचाच नैवेद्य ! काय गंमत आहे ना?


पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील सगळे प्राणी माणसांसारखे बोलतात आणि वागतात. आपल्या कहाण्यांमध्येही असेच घडते. दिव्याच्या अंवसेच्या कहाणीतले उंदीर आणि दिवेसुध्दा माणसांसारखे बोलतात. यातली गोष्ट थोडक्यात अशी आहे.

एका राजाच्या सुनेने एकदा दिवशी घरांतला एक अन्नपदार्थ स्वतः खाल्ला, आणि त्याचा आळ उंदरांवर घातला. (राजाच्या सुनेला हे करायची काय गरज होती, तिला हवा तो पदार्थ मिळायला काय हरकत होती?) उंदरांना ते समजले. (कसे?) तिचा सूड घ्यावा म्हणून त्यांनी रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशी सासूदिरांनी तिला संशयावरून घरांतून हाकलून दिले. ती सून दिव्यांची चांगली काळजी घेत असे, दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवत असे. पण ती घरांतून निघाल्यावर ते बंद पडले. पुढे दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत असतांना एका झाडाखाली थांबला. तिथे त्याला दिसले की गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून (मग राजाला ते दिसले कसे?) त्या झाडावर बसून एकमेकांशी गप्पागोष्टी करीत आहेत. राजाच्या घरच्या दिव्याने त्यांना सून आणि उंदरांची गोष्ट सांगितली. दर वर्षी मनोभावे पूजा करणारी सून या वेळी राजवाड्यात नसल्यामुळे तो दिवा दुःखी झाला होता. हा सर्व प्रकार ऐकून आपल्या सुनेच्या चारित्र्याबद्दल राजाची खात्री झाली. त्याने आणखी चौकशी केली आणि सुनेला सन्मानाने घरी परत आणले.

कहाणीतल्या काळात फक्त तेलातुपाचेच दिवे असत. इंग्रजांच्या राजवटीत केरोसीनचे कंदील, चिमण्या वगैरे आल्यानंतर दिव्यांच्या अमावास्येला त्यांचीही पूजा व्हायला लागली. विजेच्या दिव्यांमुळे दिव्याखाली अंधार ही म्हणच रद्दबातल करून टाकली. हे दिवे भिंतीवर उंचावर बसवलेले असल्यामुळे आणि शॉक लागण्याच्या भीतीपोटी त्यांना घासण्यापुसण्यात कोणाला रस नव्हता. विजेची खात्रीलायक उपलब्धता वाढत जात असतांन दिव्याच्या अंवसेचे महत्व कमी कमी होत गेले.

मी मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकदा रात्रीचा सिनेमाचा शो पहायला गेलो होतो. बसमध्ये एक विचित्र प्रकारचा उग्र दर्प पसरला होता. थिएटरमध्येसुध्दा तोच घाण वास घमघमत होता. अगदी असह्य झाल्याने मी शेजारच्या सभ्य वाटणा-या माणसाला विचारले. त्याने आश्चर्याने मलाच विचारले, "आज गटारअमूशा आहे हे तुम्हाला ठाऊक नाही?" त्यानंतर मला कळले की हा गावठी दारूचा दुर्गंध होता आणि पुढे श्रावणमहिना येणार असल्यामुळे सगळे बेवडे तर्र होऊन फिरताहेत. पक्के दारुडेसुध्दा या बाबतीत खरेच धर्मनिष्ठ असतात की त्यांना पोटात दारू रिचवायला हे आणखी एक निमित्य मिळते तेच जाणोत. परवा आलेल्या रविवारी पुण्यातली सर्व मांसाहारी रेस्तराँ खचाखच गर्दीने भरली होती आणि या दिवसात अमूकशे की हजार टन चिकन, मटण, मासे वगैरेंचा खप झाला अशा बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या.  दीप आमावस्या अशा अशा प्रकारे साजरी केली हे मात्र कोठे वाचले नाही.आता बदलत्या परिस्थितीनुसार सणसुध्दा बदलले आहेत.

Monday, July 16, 2012

दीप अमावास्या (दिव्याची अवस) व श्रावण मासकाल

माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांनी अमेरिकेतून पत्रामधून पाठवलेला हा संदेश खाली दिला आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------
दीप अमावास्या (दिव्याची अवस) व श्रावण मासकाल शुभ चिंतन

रोजच संध्याकाळी दिवा लावणीच्या वेळी "दिवा दिवा दीपत्कार
कानी कुण्डले मोतीहार
दिव्याला देखुन नमस्कार।। ” असे म्हणून 'दिव्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे ' रोज देवाची पूजा करताना नीरांजन रूपी दिव्याचा उपयोग केला जातो. देव पूजेच्या प्रारंभी देवासमोर समयी लावून

“भो दीप ब्रह्म रूप: त्वं ज्योतिषां प्रभु: अव्यय:
आरोग्यं देहि पुत्रांश्र्च सर्वार्थान् च प्रयच्छ मे
दिवे दिवे सदृशीरन्यमर्धम् कृष्णा असेधदपसद्मनोजा:
अहं दा सा वृषभोवन्मयन्तो दव्रजे वर्तिनं शम्बरं च ”

असे श्लोक म्हणून दिव्यालाही (शंख-घण्टा पुजना प्रमाणेच ).गंध, अक्षता फ़ुले वाहण्याची पण पद्धत विहीत आहे.

असे असले तरी १) दीप अमावास्या व २) दीपावली हे दोन वार्षिक सण "दीप" या दैवताला खास समर्पित आहेत.

ज्याप्रमाणे शंकराला पाच (सांकेतिक) तोंडे व दत्तात्रेयाला तीन (सांकेतिक) तोंडे आहेत असे वैदिक सांगणे आहे, त्याच प्रमाणे "अग्नी" या वेदिक दैवताला दोन (सांकेतिक) तोंडे आहेत असे त्याचे वर्णन मिळते. उष्णता (Thermal Energy) व प्रकाश (Radiant Energy) हीच ती दोन तोंडे आहेत असे दिसते. मानवी डोळ्यांना दिसणारा प्रकाश फ़ारच कमी असला तरी शास्त्रीय दृष्टीने (प्रकाश किरणांचे अनंत प्रकार आहेत व ) प्रत्येक घन, द्रव वा वायुरूप पदार्थातून त्या पदार्थाच्या तापमानानुकूल प्रकाश त्यातून बाहेर फ़ेकला जातो. तापमान ६०० डिग्री सेन्टीग्रेड पेक्षा जास्त झाल्यावरच तो मानवी चक्षुंना दृष्य होऊ लागतॊ. अशाप्रकारे कोणत्याही पदार्थाची उष्णता व त्यांतून फ़ेकला जाणारा प्रकाश ही दोऩ्ही त्या पदार्थाची अविभाज्य रूपे आहेत. अग्नि देवतेच्या या
दोन तोंडांना अलग करता येणे अशक्य आहे. असो.

आषाढी अमावास्या "दीप अमावास्या" म्हणुन पाळली जाते. या दिवशी घरातील सर्व दिव्यांना (नीराजन, पणती, समयी पासून कंदील, इलेक्ट्रिक दिव्यापर्यन्त सर्वांना ) घासून पुसून स्वच्छ करून ते पेटवले जातात. त्यांची पूजा केली जाते.

या वर्षी चन्द्राला आषाढी अमावास्या तिथी भारतात बुधवार दिनांक १८ जुलैला सकाळी ९=०८ वाजता सुरू होते व गुरुवारी सकाळी ९=५४ वाजता संपते. म्हणून दीप अमावास्या बुधवारी सन्ध्याकाळी - रात्री पाळायला हवी. अमेरिकेत ही अमावास्या तिथी मंगळवारी रात्री ९ नंतर सुरू होत असली तरी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी ती बुधवारीच असत असल्यामुळे, अमेरिकेतही ती बुधवारीच पाळायला हरकत नाही.

श्रावण शुक्ल प्रतिपदा भारतात गुरुवारी (दिनांक १९ जुलै २०१२ ला) सकाळी ९=५४ ला सुरू होते व शुक्रवारी सकाळी १०=०८ पर्यन्त आहे. म्हणून भारतात श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार (दिनांक २० जुलै २०१२ च्या सूर्यॊदया) पासून मानली जाईल. परन्तू अमेरिकेत श्रावण शुक्ल प्रतिपदा बुधवारी रात्री १० ते १२ च्या सुमारास सुरू होतेय (अमेरिकेत रोजच्या दिवसाच्या प्रारम्भाच्या ३ – ४ वेळा आहेत उदा. : पूर्व_न्यूयार्क, मध्य_शिकागो, मध्य_पश्र्चिम_डेनवर, पश्र्चिम_सीएटल इत्यादी). म्हणून अमेरिकेत श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार (दिनांक १९ जुलै २०१२) पासून मानायला हवी.

श्रावण महिन्यात येणारे अनेक सण आहेत. त्यात नाग चतुर्थी व नाग पंचमी (श्रावणी), सीतला वा शिळा_सप्तमी, वरमहालक्ष्मी, राखी-नारळी पोर्णिमा (श्रावणी), श्रीकृष्ण जन्माष्टमी, पिठॊरी अमावास्या हे प्रमुख सण आहेत. याशिवाय श्रावणी सोमवार, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, वगैरे अनेक उत्सव मानले जातात. अनेक लोक श्रावणी पोर्णिमेला (वा श्रावण महिन्यातील कोणत्याही सोयीच्या दिवशी ) वार्षिक "सत्य_नारायण" व्रत करतात.

या वर्षीही हा श्रावण मासकालावधी सर्वांना (विशेषत: मुलाबाळांना ) आनंदाचा गोडधोड खाण्याचा जावो अशा शुभेच्छा.

धनंजय
------------------------------
हे पत्र माझ्या भावाने पाठवले होते. या विषयावरील माझे लेख पुढील भागांमध्ये आहेत. त्यात  श्रावण महिन्यासंबंधी अधिक माहिती दिली आहे.
दिव्याची अंवस की गटार अमूशा ?
http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_18.html

श्रावण शुक्रवार  http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_20.html

नागपंचमी  http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_21.html

नागपंचमी गाणी  http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_22.html

श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलराम
http://anandghan.blogspot.in/2012/08/blog-post.html

Saturday, July 14, 2012

चातुर्मास

चातुर्मास म्हणजे चार महिने. पण चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ किंवा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा कुठल्याही चार महन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हणत नाहीत. आषाढी शुध्द एकादशीपासून ते कार्तिकी शुध्द एकादशीपर्यंत महाराष्ट्रातला चातुर्मास असतो. त्यात आषाढातले वीस दिवस, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्यातले अकरा दिवस येतात. अशा प्रकारे तो पाच महिन्यांत पसरलेला असतो. उत्तर भारतातला चातुर्मास आषाढातील गुरु पौर्णिमेपासून कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत असतो. तिकडच्या पंचांगांतले महिने कृष्ण प्रतीपदेपासून सुरू होऊन पौर्णिमेपर्यंत असतात. त्यामुळे त्यांच्या चातुर्मासात आषाढ महिना येत नाही, श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चारच महिन्यांचा त्यांचा चातुर्मास असतो.


माझ्या लहानपणी आमच्या घरात चातुर्मासाचे मोठे प्रस्थ होते. त्या काळात लग्नमुंजी वगैरेंचे मुहूर्त येत नसल्यामुळे हे समारंभ त्यापूर्वी उरकून घेतले जात किंवा लांबणीवर टाकले जात असत. याचा आम्हा मुलांना काही उपसर्ग नव्हता. आमच्या दृष्टीने महत्वाचा एवढाच भाग होता की चार महिने कांदा व लसूण हे पदार्थ घरात आणायलादेखील बंदी असे. एकादशीच्या दिवशी तोंडालासुध्दा त्यांचा वास येऊ नये किंवा त्याची ढेकरही येऊ नये अशा विचाराने ही बंदी एक दिवस आधीपासून अंमलात आणली जात असे. त्याच्याही आदल्या दिवशीची कांदेनवमी उत्साहाने साजरी केली जात असे आणि कांद्याची थालीपीठे, झुणका, भजी वगैरे करून घरातला कांद्याचा सगळा स्टॉक संपवला जात असे.

घरातली मोठी माणसे, विशेषतः स्त्रीवर्ग चातुर्मासासाठी एकादा 'नेम' धरत असे. चार महिने एकादा अन्नपदार्थ खायचा नाही, एका वेळीच जेवण करायचे, रोज एकादे स्तोत्र म्हणायचे, एकाद्या देवळात दर्शनाला जायचे, तिथे जाऊन दिव्यात चमचाभर तेल घालायचे, सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचे अशा असंख्य प्रकारचे नेमधर्म असत. चार महिने मौनव्रत धरणे हे सर्वात कठीण व्रत होते. पुरुषवर्गामध्ये एकच नेम काही लोकांना करतांना मी पाहिला. तो म्हणजे चार महिने दाढीमिशा वाढवणे. चातुर्मासात असले नेम करण्यामुळे त्यापासून मिळणारे पुण्य अनेक पटीने वाढते असे समजले जात असे. "असे का?" या प्रश्नाला "आपल्या आ़जोबा, पणजोबांपासून हे चालत आले आहे, ते लोक मूर्ख होते का?" अशा प्रतिप्रश्नातूनच उत्तर मिळत असे आणि चुकून कोणी "कदाचित असतील." असे प्रत्युत्तर दिले तर त्याची धडगत नसे. असा नेम पाळण्यापासून जेवढे पुण्य मिळेल त्यापेक्षाही जास्त पाप हा नेम मोडल्यामुळे मिळेल अशा भीतीमुळे हे नेम जरा घाबरत घाबरतच धरले जात आणि भक्तीभावापेक्षा भीतीपोटीच त्यांचे पालन होत असे. लहान मुलांना मात्र कांदालसूण न खाण्याव्यतिरिक्त कसले नेम करायला लावत नव्हते.

शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडल्यानंतर माझा चातुर्मासाशी दूरान्वयेही कसलाच संबंध राहिला नव्हता. या वर्षी एकादशीच्या दिवशी आलेल्या एका ढकलपत्राने चातुर्मास सुरू झाल्याची वर्दी दिली. आता निवांत वेळ मिळाल्यावर त्याबद्दल आंतर्जालावर थोडी विचारपूस केली. त्यातून असे समजले की आषाढ शुध्द एकादशीला ‘देवशयनी‘ असे नाव आहे. क्षीरसागरात शेषनागाने वेटोळे घालून बनवलेल्या शय्येवर त्या दिवशी श्रीविष्णूभगवान निद्रिस्त होतात आणि चार महिने झोपून झाल्यानंतर कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीला ते जागे होतात. माणसांचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असतो आणि चातुर्मास म्हणजे त्यांचे रात्रीतले आठ तास होतात. तेवढी निद्रा घेऊन ते भल्या पहाटे उठून कामाला लागतात. "देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते." अशी माहिती सनातन संस्था या स्थळावर दिली आहे. "मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्‍या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे." असे सांगून त्यांनी आपल्या कथनाला आधुनिक विज्ञानाची कुबडी देण्याचा दुबळा प्रयत्नही केला आहे. आपल्या पृथ्वीतलाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरच सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते हे मी पन्नास वर्षांपूर्वी एका खेडेगावात शिकत असतांना भूगोलाच्या पुस्तकातून शिकलो होतो. पण उत्तर ध्रुवाजवळील आर्ट्रिक प्रदेशात एस्किमो नावाची माणसे आणि दक्षिण ध्रुवाजवळील अँटार्क्टिक प्रदेशात पेन्ग्विन नावाचे पक्षी राहतात असेही शिकलो होतो. तेंव्हा माणूस पृथ्वीच्या कक्षेबाहेरसुध्दा गेला नव्हता.

"चातुर्मासात सण आणि व्रते अधिक प्रमाणात असण्याचे कारण : श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक या चार मासांत (चातुर्मासात) पृथ्वीवर येणार्‍या लहरींत तमोगुण अधिक असलेल्या यमलहरींचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावे; म्हणून सात्त्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्त्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीतजास्त सण आणि व्रते आहेत. शिकागो मेडिकल स्कूलचे स्त्रीरोगतज्ञ प्रोफेसर डॉ. डब्ल्यु. एस्. कोगर यांनी केलेल्या संशोधनात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार मासांत विशेष करून भारतामध्ये, स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळले." असे चातुर्मासामधील व्रतांसाठी एक 'शास्त्रीय' वाटणारे कारणसुध्दा दिले आहे. असल्या मिथ्याविज्ञानापासून (सुडोसायन्सपासून) परमेश्वराने या देशाला वाचवावे अशी प्रार्थना नास्तिकांनासुध्दा करावी वाटेल.

वैद्य बालाजी तांबे आजकाल प्रसिध्दीच्या प्रखर झोतात दिसतात. चातुर्मासात पावसाळा असतो आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्‍ती, वीर्यशक्‍ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते. यावर उपाय म्हणून लंघन, मौन वगैरेंचे पालन करावे आणि तुळस, पिंपळ आदि वनस्पतींच्या औषधी उपयुकिततेचा लाभ घ्यावा यासाठी चातुर्मासात व्रतवैकल्ये सांगितली आहेत, असे ते म्हणतात. शिवाय सामाजिक आरोग्यासाठीही...
- आरोग्यरक्षणाबरोबर व्रतवैकल्यांच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ शकतात, त्यातून सामाजिक आरोग्य सुधारते.
- दैनंदिन व्यवहारापेक्षा काही तरी वेगळे करण्याची संधी मिळाल्याने मनाला विरंगुळा मिळतो.
- एकंदरच उत्सवाचे वातावरण अनुभवता येते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे हलक्‍या फुलक्‍या तऱ्हेने मनावर निर्बंध घालण्याचा, शिस्त लागण्याचा सराव होऊ शकतो.
वगैरे लाभ त्यांनी सांगितले आहेत. अर्थातच हे सगळे लाभ वर्षाच्या बाराही महिन्यात आपण घेऊ शकत असल्यास त्यासाठी चातुर्मासच कशाला हवा?

प्रत्यक्षात चातुर्मासात इतके सण येतात आणि त्या निमित्याने गोडधोड खाणे चालले असते की लंघनाऐवजी अतिभोजनच होते. तसेच या काळात जास्तच जनसंपर्क होत असल्यामुळे मौनाच्या ऐवजी जास्तच बोलणे होते.Thursday, July 12, 2012

पावसाची गाणी - अनुक्रमणिका

पाऊस या विषयाशी संबंधित खूप गाणी आहेत, कविता तर असंख्य असतील. त्यातली माझ्या ओळखीतली प्रसिध्द अशी गीते गेले काही दिवस मी आठवून आठवून आणि आंतर्जालावर शोधून काढून ती माझ्या अभिप्रायांसह या ब्लॉगवर देत होतो. या सर्व गाण्यांची यादी संकलित करून या भागात दिली आहे. अर्थातच ही सर्व गाणी फक्त मराठी भाषेतली आहेत.


भाग १ -

१. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा ।

२. नाच रे मोरा, अंब्याच्या वनात

३. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे


भाग २ -

४, झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात

५. नभ मेघांनीं आक्रमिले

६. तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ।।

७. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।

८. ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।


भाग ३ -

९. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।

१०. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।

११. आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।

१२. नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।

१३. वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।

१४. ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।

१५. पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।


भाग ४ -

१६. भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।

१७. श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।

१८. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

१९. ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।

२०. मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।


भाग ५ -

२१. जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।

२२. नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।

२३. राया मला, पावसात नेऊ नका ।

२४. वर ढगाला लागली कळ । पाणी थेंब थेंब गळं ।


भाग ६ -

२५. आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।

२६. केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर

२७. ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।

२८. टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।

२९. ए आई मला पावसात जाउ दे ।

३०. अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ । ढगाला उन्हाची केवढी झळ ।

पावसाची गाणी - भाग ६

पूर्वीचे भागः-भाग १ http://anandghan.blogspot.in/2012/06/blog-post_28.html
भाग २ http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post.html
भाग ३ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_08.html
भाग ४ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_10.html
भाग ५ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_11.htmlपूर्वीच्या काळी मुलामुलींची लग्ने खूप लहान वयात होत असत. श्रावण महिन्यात मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन वगैरे सण येतात, सासरी गेलेल्या नव-या मुली त्या निमित्याने पावसाळा सुरू होण्याच्या आधीच माहेरपणाला येत असत आणि माहेरपणाचे सुख उपभोगून झाल्यावर झाल्यावर सासरी परत जात असत. त्यांच्यासाठी खाऊचे डबे, पापड, लोणची, मुरंबे, परकर-पोलकी किंवा साडी-चोळी वगैरेची गाठोडी बांधून त्यांची रीतसर पाठवणी केली जात असे. या पार्श्वभूमीवर कवी सुधीर मोघे यांनी 'हा खेळ सावल्यांचा' या चित्रपटासाठी लिहिलेल्या या गीतात भाताच्या रोपांना नव्या नवरीची उपमा दिली आहे. कोकणात भातशेती करतांना आधी एका लहान जागेत भाताचे खूप दाणे फेकले जातात आणि त्यातून अगदी जवळ जवळ रोपे उगवतात. ती थोडी वर आली की उपटून आणि दोन रोपात पुरेसे अंतर सोडून ओळीत लावली जातात. नव्या जागेवर त्यांची व्यवस्थित वाढ होते, त्यांना बहर येतो, त्यातून भाताचे पीक येऊन समृध्दी येते. भाताच्या रोपांची लावणी म्हणजे त्यांनी माहेरी लहानपण काढून पुढील आयुष्यात सासरी जाण्यासारखेच झाले. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या अप्रतिम चालीवर आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि
साथीदारांनी गायिलेले हे समूहगीत सर्वच दृष्टीने फारच छान आहे.

आला आला वारा संगे पावसाच्या धारा ।
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा ।।

नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप ।
माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ।
ओठी हसू पापणीत आसवांचा झरा ।।

आजवरी यांना किती जपलं जपलं ।
काळजाचं पानी किती शिपलं शिपलं ।
चेतवून प्राण यांना दिला ग उबारा ।।

येगळी माती आता ग येगळी दुनिया ।
आभाळाची माया बाई करील किमया ।
फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा ।।

आकाशात आलेल्या मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात ही एक सर्वमान्य संकल्पना आहेच, केवड्याच्या बागेत एका मोराला नाचतांना पाहून मेघांना गहिवरून आले आणि त्याने वर्षाव केला अशी कल्पना कवी श्री.अशोकजी परांजपे यांनी एका कवितेत मांडली आहे. पुढे मनामधील भावनाविश्वातील तरंगांचे वर्णन आहे. अलीकडच्या काळातील उत्कृष्ट संगीत दिग्दर्शकांमध्ये श्री.अशोक पत्की यांची प्रामुख्याने गणना होते. त्यांनी केलेल्या संगीतरचनेवर सुमन कल्याणपूर यांनी हे अत्यंत गोड गीत गायिले आहे.

केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर ।।
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर ।।
पापणीत साचले, अंतरात रंगले ।
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले ।
ओठांवरी भिजला ग आसावला सूर ।।

भावफूल रात्रिच्या अंतरंगि डोलले ।
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले ।
डोळियांत पाहिले, कौमुदीत नाचले ।
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरांत थांबले ।
झाडावरी दिसला ग भारला चकोर ।।
वरील गाणे खूप वर्षांपूर्वीचे आहे. थोड्याच वर्षांपूर्वी आलेल्या आईशप्पथ या सिनेमासाठी कवी सौमित्र यांनी लिहिलेल्या एका वर्षागीतालाही अशोक पत्की यांनी नव्या प्रकारची छान संगीतरचना केली आहे. त्यांनी दिलेल्या चालीवर साधना सरगम या हिंदी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात नावाजलेल्या मराठी गायिकेने हे मधुर गाणे गायिले आहे.
ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात ।
ऋतु पावसाळी सोळा, थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची । सर येते माझ्यात ।।
माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद ।
तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध ।
मुळे हरखूनि जातात, झाडे पाऊस होतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची ......

सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।
झिलरी झिलरी आम्ही तुम्ही, सुंबरान गाऊ या ।
सुंबरान गाऊ या रं, सुंबरान गाऊ या ।।


जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख ।
साऱ्या आभाळाला देतो एक ओलसर रंग ।
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात ।
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात ।।
झिम्मड पाण्याची .......


'येरे येरे पावसा' या काही पिढ्यांपासून चालत आलेली पावसावरील बालगीतांची परंपरा चालतच राहिली आहे. 'पाऊस आला वारा आला' हे श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेले एक गाणे आधीच्या भागात येऊन गेले आहे. त्यांनीच संगीत दिलेले आणि आशा भोसले यांनी गायिलेले श्रीनिवास खारकर यांचे एक गीत असेच अजरामर झाले आहे. अलीकडे सारेगमपच्या स्पर्धेमध्ये बालकराकारांनी हे गाणे सादर केले तेंव्हा ''हे गाणे आमच्या लहानपणी आम्ही गात होतो'' असे उद्गार परीक्षकांनी काढले होते.

टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू ।
चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ ।।
भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !
गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ ।।

आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?
गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू ।।

ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा ।
पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ ।।

फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू ।
"ये पावसा, घे पैसा", गीत गोड गाऊ ।।
पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू ।
चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?
लतादीदी, आशाताई, उषाताई आणि हृदयनाथ ही चार मंगेशकर भावंडे संगीताच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊन पोचली आणि दीर्घकाळ त्यांनी त्या क्षेत्रावर राज्य केले आहे. त्यांनाच मीना खडीकर नावाची एक सख्खी बहीण आहे आणि ती देखील त्यांच्यासारखीच संगीतात प्रवीण आहे या गोष्टीला मात्र तेवढी प्रसिध्दी मिळालेली नसल्यामुळे काही लोकांना ते माहीत नसण्याची शक्यता आहे. या मीनाताईंनी सुप्रसिध्द कवयित्री वंदना विटणकर यांच्या गीताला लावलेल्या चालीवरील खाली दिलेले गाणे गाजले होते. सारेगमपच्या बालकलाकारांच्या स्पर्धेमधून ते पुन्हा
ऐकायला मिळाले. ते ऐकतांना मला जगजितसिंगांच्या 'वो कागजकी कश्ती, वो बारिशका पानी' या सुप्रसिध्द गाण्याची आठवण आली.
ए आई मला पावसात जाउ दे ।
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ।।

मेघ कसे बघ गडगड करिती ।
विजा नभांतुन मला खुणविती ।
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे ।।

खिडकीखाली तळे साचले ।
गुडघ्याइतके पाणी भरले ।
तऱ्हेतऱ्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावु दे ।।
बदकांचा बघ थवा नाचतो ।
बेडुक दादा हाक मारतो ।।
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे ।।

धारेखाली उभा राहुनी ।
पायाने मी उडविन पाणी ।
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे ।।

आताची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकतात, इंजिनियर, डॉक्टर, एमबीए, सीए वगैरे होऊन पैसे कमावण्याच्या मागे लागतात. त्यामुळे मराठी भाषा, त्यातले साहित्य, विशेषतः काव्य वगैरे लयाला चालले आहे अशी भीती काही जुन्या लोकांना वाटते. अशा या वर्तमानकाळात फक्त कवितांचे वाचन आणि गायन यांचा कार्यक्रम करायचे साहस कोणी करेल आणि त्याला भरपूर श्रोते मिळतील अशी कल्पनासुध्दा कुणाच्या मनात आली नसेल. पण कवी संदीप खरे आणि गायक व संगीतकार सलील कुळकर्णी या जोडगोळीने 'आयुष्यावर बोलू काही' या नावाने असा एक अफलातून कार्यक्रम रंगमंचावर आणला आणि मोठमोठ्या सभागृहांमध्ये त्याचे हाऊसफुल प्रयोग करून दाखवले. त्यातल्याच एका पावसावरील बालगीताने या लेखमालेची सांगता करतो. 'येरे येरे पावसा' पासून 'अग्गोबाई ढग्गोबाई' पर्यंतचा हा प्रवास वाचकांना पसंत पडावा अशी त्या इंद्रदेवालाच मनोमन प्रार्थना करतो.अग्गोबाई ढग्गोबाई, लागली कळ ।
ढगाला उन्हाची केवढी झळ ।
थोडी न्‌ थोडकी लागली फार ।
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ।।

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌ ।
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम ।
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी ।
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ।।

खोलखोल जमिनीचे उघडून दार ।
बुडबुड बेडकाची बडबड फार ।
डुंबायला डबक्याचा करूया तलाव ।
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ।।. . . . . . . . . . . .. . . . . . . . (समाप्त)

Wednesday, July 11, 2012

पावसाची गाणी - भाग ५

पूर्वीचे भागः-


भाग १ http://anandghan.blogspot.in/2012/06/blog-post_28.html

भाग २ http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post.html

भाग ३ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_08.html

भाग ४ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_10.html
निसर्गाचा परिणाम मनावर होतोच, पण कधी कधी मनातल्या भावनांमुळे निसर्गाचे रूप वेगळे भासते. आज तसाच पडत असलेला पाऊस कालच्या पावसाहून वेगळा वाटायला लागतो. संगीता जोशी यांनी लिहिलेल्या आणि श्रीधर फडके यांनी गायिलेल्या या गीताला सुप्रसिध्द संगीतकार श्री.यशवंत देव यांनी अत्यंत भावपूर्ण चाल लावली आहे. श्री यशवंत देव यांनी 'शब्दप्रधान गायकी' या विषयावर पुस्तक लिहिले आहे आणि ते यावर प्रात्यक्षिकासह कार्यक्रम करतात. अर्थातच त्यांच्या गाण्यांमधले सर्व शब्द स्पष्ट ऐकू येतात आणि चांगले समजतात.

जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता ।
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता ।।
ओलेत्या चिंब क्षणीही रक्तात निखारे होते ।
ती जुनीच होती सलगी, पण स्पर्श कोवळा होता ।।
वेचली फुले थेंबांची ओठही फुलांचे होते ।
डोळ्यांत पावसामधला निथळता जिव्हाळा होता ।।

पाऊस असा आला की अद्याप थांबला नाही ।
ह्या अशा पावसासाठी सोसला उन्हाळा होता ।।
जीवनदायी पाऊस कधी कधी रौद्ररूप धारण करतो आणि विध्वंस करतो. अशा धिंगाणा घालू पाहणा-या पावसाला उद्देशून सुप्रसिध्द कवयित्री इंदिरा संत चार गोष्टी एका सुंदर कवितेत सांगतात.  "माझे चंद्रमौळी घरकूल, दारातला नाजुक सायलीचा वेल वगैरेंना धक्का लावू नको, छप्पराला गळवू नको, माझे कपडे भिजवू नकोस वगैरे सांगून झाल्यानंतर माझ्या सख्याला सुखरूप आणि लवकर घरी परतून आण, त्यानंतर वाटेल तेवढा धुमाकूळ घाल, मी तुला बोल लावणार नाही, तुझी पूजाच करीन." श्री.यशवंत देव यांनी लावलेल्या अत्यंत भावपूर्ण चालीवर गायिका पुष्पा
पागघरे यांनी हे गाणे गायिले आहे.

नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी ।
घर माझे चंद्रमौळी, आणि दारात सायली ।।

नको नाचू तडातडा, अस्सा कौलारावरून ।
तांबे सतेली पातेली, आणू भांडी मी कोठून ।।

नको करू झोंबाझोंबी, माझी नाजूक वेलण ।
नको टाकू फूलमाळ, अशी मातीत लोटून ।।

आडदांडा नको येऊ, झेपावत दारांतून ।
माझं नेसूचं जुनेर, नको टाकू भिजवून ।।

किती सोसले मी तुझे, माझे एवढे ऐकना ।.
वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आणा ना ।।

वेशीपुढे आठ कोस, जा रे आडवा धावत ।
विजेबाई कडाकडून मागे फिरव पांथस्थ ।।

आणि पावसा, राजसा, नीट आणि सांभाळून ।
घाल कितीही धिंगाणा, मग मुळी न बोलेन ।।

पितळेची लोटीवाटी, तुझ्यासाठी मी मांडीन ।
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ।।

आपल्याला हव्या असलेल्या खुबीने सांगण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये उपजत असते. सोंगाड्या या चित्रपटातल्या या लावणीत कवी वसंत सबनीसांनी ही गोष्ट किती खुमासदार पध्दतीने दाखवली आहे पहा. तमाशाप्रधान चित्रपटांना संगीत देण्यात हातखंडा असलेल्या राम कदमांनी लावलेल्या चालीवर हे गाणेसुध्दा पुष्पा पागघरे यांनीच गायिले आहे.

नाही कधी का तुम्हास म्हटलं, दोष ना द्यावा फुका ।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

लई गार हा झोंबे वारा ।
अंगावरती पडती धारा ।
वाटेत कुठेही नाही निवारा ।
भिजली साडी भिजली चोळी, भंवतील ओल्या चुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।
खबूतरागत हसत बसू या ।
उबदारसं गोड बोलू या ।
खुळ्या मिठीतच खुळे होऊ या ।
लावून घेऊ खिडक्या दारं, पाऊस होईल मुका ।।
अन्‌ राया मला, पावसात नेऊ नका ।।

ग्रामीण चित्रपटांना स्व.दादा कोंडके यांनी एक वेगळेच वळण लावले आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठून चमत्कार करून दाखवले. त्यांच्या सगळ्याच गाण्यांनी भरपूर खळबळ माजवली होता, त्यातल्या एका गाण्याने तर काही काळ अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यातला मुखडा सोडला तर कुठेच पावसाचा उल्लेख येत नाही आणि मुखडा पण थोडा विचित्रच वाटतो. कसा ते पहाच.

जसा जीवात जीव घुटमळं ।
तसा पिरतीचा लागतयं बळ ।
तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळं ।
ह्ये बघून दुष्मन जळं ।
वर ढगाला लागली कळ ।
पाणी थेंब थेंब गळं ।।

चल गं राणी, गाऊ या गाणी, फिरूया पाखरासंग ।
रामाच्या पार्‍यात, घरघर वार्‍यात, अंगाला भिडू दे अंग ।
जेव्हा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा, कुठे हा घेऊन जावा ।
काय बाई अप्रित, झालया विपरीत, सश्याला भितुया छावा ।
माझ्या पदरात पडाळंय खुळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

जमीन आपली, उन्हानं तापली, लाल लाल झालिया माती ।
करूया काम आणि गाळूया घाम, चला पिकवू माणिकमोती ।
एका वर्षात होईल तिळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

शिवार फुलतय, तोर्‍यात डुलतय, झोक्यात नाचतोय धोतरा ।
तुरीच्या शेंगा दावतात ठेंगा, लपलाय भूईमूग भित्रा ।
मधे वाटाणा बघ वळवळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

बामनाच्या मळ्यात, कमळाच्या तळ्यात, येशील का संध्याकाळी ।
जाऊ दुसरीकडं, नको बाबा तिकडं, बसलाय संतू माळी ।
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

झाडावर बुलबुल, बोलत्यात गुलगुल, वराडतिया कोकिळा ।
चिमणी झुरते उगीच राघू मैनेवरती खुळा ।
मोर लांडोरीसंगं खेळं, पाणी थेंब थेंब गळं ।।

थुईथुई नाचते, खुशीत हासते, मनात फुलपाखरु ।
सोडा की राया, नाजूक काया, नका गुदगुल्या करु ।
तू दमयंती मी नळ, पाणी थेंब थेंब गळं ।।

आलोया फारमात, पडलोय पिरमात, सांग मी दिसतोय कसा ।
अडाणी ठोकळा, मनाचा मोकळा, पांडू हवालदार जसा ।
तुझ्या वाचून जीव तळमळं, पाणी थेंब थेंब गळं ।।. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग

Tuesday, July 10, 2012

पावसाची गाणी - भाग ४

पूर्वीचे भागः
भाग १ http://anandghan.blogspot.in/2012/06/blog-post_28.html


भाग २ http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post.html

भाग ३ - http://anandghan.blogspot.in/2012/07/blog-post_08.html"जे न देखे रवि ते देखे कवी" असे म्हणतात. पावसाळ्याच्या दिवसात ढगाआड झाकून गेल्यामुळे सूर्यालाही कदाचित पृथ्वीवरचे स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेले सुध्दा पाहण्याची दिव्यदृष्टी कवींकडे असते. तरीही ते स्वतः मात्र सहसा फारसे नजरेला पडत नाहीत. बालकवी ठोंबरे ज्या काळात होऊन गेले तेंव्हा दृकश्राव्य माध्यमे नव्हतीच, पण टेलिव्हिजन आल्यानंतरच्या काळातसुध्दा सुप्रसिध्द कवींचेही दर्शन तसे दुर्मिळच असते. स्व.ग.दि.माडगूळकरांना त्यांनी काम केलेल्या चित्रपटांमधील भूमिकांमध्ये मी पाहिले. त्यांच्या सुंदर कविता त्यांच्याकडून ऐकायची संधी कधी मिळाल्याचे आठवत नाही. सुरेश भट, आरती प्रभू, पी.सावळाराम वगैरे नावे हजारो वेळा ऐकली असली तरी त्यांना क्वचितच पाहिले असेल. यशवंत देव यांना अनेक वेळा जवळून पहायची संधी मिळाली, पण एक संगीतकार, गायक, विद्वान, विचारवंत, फर्डा वक्ता वगैरे म्हणून. प्रवीण दवणे यांना निवेदन करतांना पाहिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या त्रिमूर्तींनी काव्यवाचन या प्रकाराला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यातील वसंत बापट यांना एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतांना आणि विंदा करंदीकर यांना सत्कारमूर्ती म्हणून मी पाहिले. मंगेश पाडगावकर हे मात्र मला त्यांच्या कविता कळू आणि आवडू लागल्यापासून नेहमी नजरेसमोर येत राहिले आहेत. त्यांचे कार्यक्रम काही वेळा प्रत्यक्ष आणि अनेक वेळा टीव्हीवर पाहिले असल्यामुळे ते जवळचे वाटतात. माझ्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची एक दृष्टी दिली. बहुधा प्रथम मराठी आकाशवाणीवर आलेले आणि तुफान प्रसिध्दी पावलेले, अरुण दाते यांनी गायिलेले आणि पाडगावकर यांनी लिहिलेले पावसाच्या संदर्भातले एक अत्यंत भावपूर्ण प्रेमगीत पहा.


भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची ।
धुंद वादळाची होती रात्र पावसाची ।।
कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा ।
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा ।
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची ।।
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती ।
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती ।
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची ।।
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली ।
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली ।
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची ।।

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास ।
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास ।
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची ।।
अचाट कल्पकता आणि अद्भुत भाषासौंदर्य याचे सुरेख मिश्रण मला त्यांच्या कवितांमध्ये दिसते. मुख्य म्हणजे त्यांची अलंकारिक भाषा आणि त्यातील रूपके प्रतिमा वगैरे माझ्या पार डोक्यावरून जात नाहीत. वर्षा ऋतूमधील सृष्टीचे रंग आणि गंध आपल्यासमोर साक्षात उभे करणारे पाडगावकरांनी लिहिलेले आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबध्द केलेले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे हे गाणे पहा.
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा ।
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा ।।

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी ।
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ।
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा ।।

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी ।
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी ।
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ।।

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले ।
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले ।
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा ।।

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा ।
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा ।
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा ।।

संगीतकाराने दिलेल्या तालासुरावर शब्द गुंफून गीतरचना करणे मंगेश पाडगावकर यांना पसंत नव्हते. तसे त्यांनी कधीच केले नाही, त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांना अंतःप्रेरणेने स्फुरतात असे ते आपल्या कार्यक्रमांमध्ये सांगतात. त्यामुळे त्यांच्या नावावर चित्रपटगीते दिसणार नाहीत. पण कवितेचे गाणे व्हायचे असल्यास तिची रचना एकाद्या वृत्तानुसार किंवा ठेक्यावर केलेली असणे आवश्यक असते. संगीताची उत्तम जाण पाडगावकरांना असणार आणि त्यामुळेच तालावर व्वस्थित बसणारे नादमय शब्द गुंफून त्यांनी रचना केली आहे हे त्यांची गोड गीते ऐकतांना लक्षात येते. त्यांनी मुख्यतः भावगीते लिहिली असली तरी अगदी विडंबनासकट इतर प्रकारची गाणीसुध्दा लिहिली आहेत. त्यांनी पावसावर लिहिलेले एक मजेदार गाणे ज्यांना लहानपणी अत्यंत आवडले होते असे सांगणारे लोक आता वयस्क झाले आहेत, प्रश्न ऐकून मुंडी हलवणा-या नंदीबैलाला घेऊन रस्त्यावर हिंडणारे लोक दिसेनासे झाले आहेत, त्यामुळे आजच्या काळातल्या मुलांना त्यांचा संदर्भ लागणे कठीण झाले आहे, असे असले तरी या गाण्याचे शब्द आणि चाल यामुळे हे गाणे मात्र अजून लहान मुलांना आकर्षक वाटते.

सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय ?

आरती, पूजा, अक्षता यासारखी नावे मुलींना ठेवणे अजून सुरू झाले नव्हते त्या काळात प्रसिध्दीला आलेले आरती प्रभू हे नाव ऐकून ते एका कोवळ्या कॉलेजकुमारीचे नाव असेल असेच त्या काळात कोणालाही वाटले असते, पण चिं.त्र्यं,खानोलकर असे भारदस्त नाव असलेल्या एका प्रौढ माणसाने हे टोपणनाव धारण केले आहे असे समजल्यानंतर आपण कसे फसलो याचा विचार करून त्याला त्याचेच हंसूही आले असेल. त्यांनी लिहिलेल्या एका कवितेवर एक लेख वाचला होता. त्यात असे लिहिले होते की खाली दिलेल्या कवितेचे ध्रुपद आणि पहिले कडवे खानोलकरांनी खूप पूर्वी लिहिले होते आणि ती अर्धवटच सोडून दिली होती. कदाचित त्या वेळी त्यांना ती तेवढीच पुरेशी वाटलीही असेल. पुढे अनेक वर्षांनंतर त्यांच्या काही गीतांना पं.हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत देऊन त्यांच्या ध्वनिमुद्रिका काढल्या आणि त्यांचे सोने झाले. त्या वेळी ही कविता बाळासाहेबांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी बोलता बोलता त्याला चाल लावून ती गुणगुणून पाहिली. यातून एक मस्त गीत तयार होईल असे दोघांनाही वाटले आणि ते करायचे त्यांनी ठरवले. पण यासाठी एवढे लहानसे गाणे पुरेसे न वाटल्यामुळे आरती प्रभूंनी आणखी दोन कडवी लिहून दिली. या गाण्याचा अर्धा भाग एका वयात असतांना अंतःप्रेरणेने स्फुरला असेल आणि उरलेला भाग वेगळ्याच वयात आल्यानंतर मार्केटसाठी विचार करून रचला असेल असे हे गाणे ऐकतांना कधीच जाणवले नाही.

ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना ।।

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू ।
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना ।।

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार ।
नको नको म्हणताना, मनमोर भर राना ।।

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू ।
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना ।।


ना.धों.महानोर यांची आता आजकालचे निसर्गकवी अशी ओळख तयार झाली आहे. ग्रामीण भागाचे दर्शन त्यांच्या कवितांमध्ये होत असल्यामुळे त्यात निसर्गाला मोठे स्थान असतेच. पावसाच्या आठवणीतूनच मनाला चिंब भिजवणारे त्यांचे हे सुप्रसिध्द गीत नव्या पिढीमधील संगीतकार कौशल इनामदार यांनी स्वरबध्द केले आहे.

मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ।।

पाऊस पाखरांच्या पंखांत थेंब थेंबी ।
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी ।।
मन चिंब पावसाळी .......

घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा ।
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ।
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ।।
मन चिंब पावसाळी .......

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ।
केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना ।
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे ।।
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी …. . . . . . .. . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग

Sunday, July 08, 2012

पावसाची गाणी - भाग ३

आधीचे भाग
पावसाची गाणी १
पावसाची गाणी २

'आषाढस्य प्रथमदिवसे' आभाळात 'मेघमाला' दिसायला लागतात आणि पाहता पाहता त्याला झाकोळून टाकतात, टप टप, रिमझिम करता करता मुसळधार पाऊस पडायला लागतो, नदी नाले पाण्याने दुथडी भरून वाहू लागतात. आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत त्याचा जोर जरा ओसरू लागलेला असतो, पण त्याने निसर्गात घडवलेली जादू बहराला आलेली असते. निसर्गकवी म्हणून प्रख्यात झालेले बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी या श्रावणमासाचा महिमा एका सुंदर कवितेत सांगितला आहे. याची परंपरागत चालीमध्ये ध्वनिफीतपण निघाली आहे.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ।।
    वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे ।
    मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा ! तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
    उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
    सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा ।।
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।
   फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
   सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।
   सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
   पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।
एके काळी मराठी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात स्व.ग.दि.माडगूळकरांचे एकछत्र साम्राज्य होते आणि त्याच काळात गीतरामायणाची रचना करून आधुनिक वाल्मिकी अशी ख्यातीही त्यांना प्राप्त झाली होती. अशा शब्दप्रभू गदिमांनी वरदक्षिणा या चित्रपटासाठी लिहिलेले हे पर्जन्यराजाचे गाणे इतके गाजले की पावसाळा म्हंटले की या गाण्याचेच शब्द चटकन ओठावर येतात. संगीतकार वसंत पवार यांनी वर्षाकालाला अनुरूप अशा मेघमल्हार रागात याची सुरावट बांधली होती आणि हिंदी चित्रपटसंगीतीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीते गाण्यात हातखंडा असलेल्या मन्ना डे यांच्याकडून ते गाऊन घेतले होते.


घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा ।
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा ॥धृ.।।
   कालिंदीच्या तटी श्रीहरी ।
    तशात घुमवी धुंद बासरी ।
     एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा ॥१॥
             कोसळती धारा ।।
वर्षाकालिन सायंकाली ।
  लुकलुक करिती दिवे गोकुळी ।
    उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा ॥२॥
          कोसळती धारा ।।
कृष्णविरहिणी कोणी गवळण ।
   तिला अडविते कवाड, अंगण ।
     अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा ॥३॥
        कोसळती धारा ।।
पुराणकालीन श्रीकृष्ण, राधा, गोपी, यमुनातट वगैरेंचा संबंध हिंदी किंवा मराठी गीतांमध्ये अनेक वेळा येत असतो, तसाच या गाण्यातसुध्दा गदिमांनी दाखवला आहे. पण आजच्या काळातल्या गोष्टीवर आधारित मुंबईचा जावई या सिनेमासाठी गदिमांनीच लिहिलेल्या एक गाण्यातसुध्दा पावसाचा उल्लेख येतो आणि स्व.सुधीर फडके यांनी मल्हार रागावर याची संगीतरचना करून वर्षाकालाचे वातावरण निर्माण केले आहे. यौवनात पदार्पण केलेल्या मुलीच्या मनात वयानुसार निसर्गाने निर्माण केलेल्या नाजुक भावना यात व्यक्त होतात. आशा भोसले यांनी त्या भावनांना छान उठाव दिला आहे.
आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे ।।
    जशी अचानक या धरणीवर ।
      गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे ।।
विचारल्याविण हेतू कळावा ।
     त्याचा माझा स्नेह जुळवा, हाती हात धरावे ।।
सोडुनिया घर, नाती-गोती ।
      निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे ।।

जेंव्हा स्व.ग.दि.माडगूळकरांचे नाव चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात गाजत होते त्याच काळात सुप्रसिध्द कवयित्री शांताबाई शेळके यांनी काही चित्रपटांसाठी उत्कृष्ट गीतरचना केली आहे. जैत रे जैत या आदीवासींच्या जीनवावरील एका वेगळ्या प्रकारच्या चित्रपटासाठी त्यांनी ग्रामीण भाषेत हे गीत लिहिले होते किंवा त्यांनी लिहिलेल्या या सुरेख कवितेचा उपयोग केला गेला होता. पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेल्या आगळ्या प्रकारच्या चालींमुळे या सिनेमातली सारीच गाणी तुफान गाजली होती. आशा भोसले यांच्याच स्वरातले हे गाणे सुध्दा सुगमसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये आजही ऐकायला मिळते.
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ।।
     अशा वलंस राती, गळा शपथा येती ।
       साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात ।।
वल्या पान्यात पारा, एक गगन धरा ।
    तसा तुझा उबारा, सोडून रीतभात ।।
नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू ।
    गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा ।।


पं. हृदयनाथ मंगेशकर आणि स्वरसम्राज्ञी लतादीदी यांनी एकत्र येऊन आणि स्व.हेमंतकुमारांनाही साथीला घेऊन तीन कोळीगीतांची एक अप्रतिम ध्वनिमुद्रिका काढली होती. त्या गीतांची रचनासुध्दा शांता शेळके यांनीच केली होती. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागतो, खवळलेला समुद्र आपले रौद्ररूप सोडून शांत होऊ लागतो. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीचे काम पुनः सुरू करतात. पण कधी कधी निसर्ग अवचितपणे वेगळे रूप दाखवतो आणि त्याला न जुमानता निधड्या छातीचे वीर आपली नौका पाण्यात घेऊन जातात. अशा वेळी घरी राहिलेल्या त्याच्या सजणीचे मन कसे धास्तावते तसेच त्याच्यावर तिचा भरंवसाही असतो याचे सुंदर वर्णन शांताबाईंनी या कवितेत केले आहे.

वादलवारं सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो ।
भिरभिर वाऱ्यात, पावसाच्या माऱ्यात,
सजनानं होडीला पान्यात लोटलंय् ।।
वादलवारं सुटलं गो !

     गडगड ढगांत बिजली करी ।
       फडफड शिडात धडधड उरी ।
         एकली मी आज घरी बाय ।
          संगतीला माझ्या कुनी नाय ।
           सळसळ माडांत, खोपीच्या कुडात,
           जागनाऱ्या डोल्यांत सपान मिटलं ।।
             वादलवारं सुटलं गो !

सरसर चालली होडीची नाळ ।
  दूरवर उठली फेसाची माळ ।
    कमरेत जरा वाकूनिया ।
      पान्यामंदी जालं फेकूनिया ।
       नाखवा माजा, दर्याचा राजा,
        लाखाचं धन त्यानं जाल्यात लुटलं ।।
            वादलवारं सुटलं गो !


शांताबाईंनी लिहिलेल्या कित्येक कवितांना बाबूजींनी म्हणजे स्व.सुधीर फडके यांनी चाली लावलेल्या आहेतच, पण त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनी नव्या को-या पध्दतीच्या संगीतरचना करून गाणी बसवली, त्यांच्यासाठी देखील शांताबाईंनी गीते रचली. श्रावणाचा महिमा सांगणारे हे आणखी एक गाणे. यालाही आशाताईंनीच स्वर दिला आहे.


ऋतु हिरवा, ऋतु बरवा, पाचूचा वनि रुजवा ।
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा ।। ऋतु हिरवा ।।

भिजुनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती ।
    नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा ।।
 मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण ।
      भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण ।।
         थरथरत्या अधरांवर प्रणयी संकेत नवा ।।
नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू ।
    गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा ।।
शांता शेळके यांनी पावसावर प्रेमगीते लिहिली, कोळीगीते लिहिली, तशीच बालगीतेही लिहिली. असेच एक गोड गाणे त्या काळातील बालगायिका सुषमा श्रेष्ट हिच्या आवाजात संगीतकार स्व.श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केले होते.

पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू ।
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू ।।

गरगर गिरकी घेते झाड, धडधड वाजे दार कवाड ।
अंगणातही बघता बघता, पाणी लागे साचू ।।

अंगे झाली ओलीचिंब, झुलू लागला दारी लिंब ।
ओली नक्षी, पाऊसपक्षी, कुणी पाहतो वाचू ।।

ओसरुनी सर गेली रे, उन्हे ढगांतुन आली रे ।
इंद्रधनुष्यामध्ये झळकती, हिरे माणके पाचू !. . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)


पुढील भाग
पावसाची गाणी - भाग ४

Saturday, July 07, 2012

पावसाची गाणी - भाग २

पूर्वीचा भाग
पावसाची गाणी - भाग १

निसर्गामधील बदलांचे परिणाम माणसांच्या मनावरसुध्दा होत असतात. पर्जन्य आणि प्रणयभावना यात तर एक जवळचा संबंध आहे. रिमझिम पाऊस पडू लागल्यावर कृष्णाला भेटण्याची अतीव ओढ राधेला लागली आणि ओली चिंब होऊनसुध्दा ती यमुनेच्या किनारी जाऊन त्याला शोधत राहिली हे वर दिलेल्या गाण्यात आपण पाहिलेच. आषाढाच्या पहिल्या दिवशी मेघांनी आकाश झाकून टाकलेले पाहता मेघदूतामधील यक्षाला त्याच्या प्रियतमेची अत्यंत तीव्रतेने आठवण येते. विरहाचा आवेग असह्य होतो. अशा वेळी प्रियकराशी मीलन झाले तर होणारा आनंदसुध्दा अपूर्व असतो. या भावना व्यक्त करणारे पूर्वीच्या काळातले एक लोकप्रिय गाणे होते.
झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम ।
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता ।
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी ।
वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात ।।
प्रियाविण उदास वाटे रात ।।

अत्यंत भावपूर्ण असे हे गाणे रचतांना कवी मधुकर जोशी यांनी 'रिमझिम' या नेहमीच्या विशेषणाऐवजी 'झिमझिम' हा वेगळा शब्द योजून कदाचित 'झिमझिम झरती' असा अनुप्रास साधला असावा. पण अनेक लोक हे गाणे 'रिमझिम झरती ....' आहे असेच समजतात. एकदा टेलीव्हिजनवरील गाण्यांच्या भेंड्यांच्या एका प्रसिध्द कार्यक्रमात यावर वाद झाला होता, तसेच एका प्रमुख दैनिकाच्या वाचकांच्या पत्रव्यवहारावरसुध्दा यावर चर्चा झाली होती असे मला आठवते. भावपूर्ण शब्दरचना, स्व.दशरथ पूजारी यांनी दिलेली अत्यंत सुरेल जाल आणि सुमन कल्याणपूर यांचा मधुर आवाज यांचा सुरेख त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे. हे गाणे अनेकांच्या आवडत्या 'टॉप टेन' मध्ये असेल.

पर्जन्य आणि विरहामधून येणारी व्याकुळता यांचा संबंध प्राचीन कालापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्याचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी लिहिलेल्या संगीत सौभद्र या नाटकामधील प्रसिध्द पदात देखील त्यांनी याचा उल्लेख केला आहे.

नभ मेघांनीं आक्रमिलें ।
तारांगण सर्वहि झांकुनि गेले ॥

कड कड कड कड शब्द करोनी ।
लखलखतां सौदामिनी ।
जातातचि हे नेत्र दिपोनी ।
अति विरही जन ते व्याकुळ झाले ॥
प्रजन्यराजा जसा विरहाची व्यथा वाढवतो तसाच मीलनाची गोडीसुद्धा जास्त मधुर करतो. दुसरे आद्य नाट्याचार्य कै.गोविंद बल्लाळ देवल यांनी 'संगीत मृच्छकटिक' या शंभरी ओलांडलेल्या अजरामर नाटकामधील एका पदात ही गोष्ट काहीशा सोप्या भाषेत थेट सांगितली आहे.

तेचि पुरुष दैवाचे । धन्य धन्य जगिं साचे ॥
अंगें भिजली जलधारांनीं । ऐशा ललना स्वयें येउनी ।
देती आलिंगन ज्यां धांवुनि । थोर भाग्य त्यांचें ॥

नवकवितेच्या आधुनिक काळामधील कवी ग्रेस यांचे काव्य जरासे दुर्बोध किंवा अस्पष्ट असते. वाचकाने किंवा श्रोत्याने त्यातून आपापल्या परीने अर्थ काढून घ्यायचा असतो. त्यांनी लिहिलेल्या एका प्रसिध्द कवितेच्या ओळी अशा आहेत.

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ।
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद सुराने ।।

डोळ्यांत उतरते पाणी, पाण्यावर डोळे फिरती ।
दु:खाचा उडला पारा, या नितळ उतरणीवरती ।।
       पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ?
       ताऱ्यांच्या प्रहरापाशी, पाऊस असा कोसळला ।।

संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा ।
माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ।।

कवी ग्रेस यांच्या पुढे दिलेल्या कवितेत त्यांनी आपल्या वेदना जास्त स्पष्ट केल्या आहेत. कदाचित या दुःखदायी आठवणींमुळेच त्यांना पाऊस कष्टदायी वाटत असावा.


ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ।
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ।।

ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो ।
त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता ।।

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे ।
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता ।।

. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

पुढील भाग