Tuesday, May 13, 2008

एक संदर्भमय किंचितकथा

(आगाऊ खुलासा : याहू किंवा गूगलच्या शोधयंत्रां (१)वर एखादे सर्वसामान्य नाम टाकले तर "अमूक लक्ष संदर्भ सापडले आहेत त्यांतील पहिले दहा खाली दिले आहेत" असा कांहीसा प्रतिसाद येतो परंतु आपल्याला पाहिजे असलेले पान यात नेमके नसते. हे काम आपल्याला लई भारी(२) पडत असल्यामुळे दर वाक्यागणिक फक्त एक संदर्भ व क्वचित एक उपसंदर्भ अशी मर्यादा स्वतःला घालून घेत आहे. संपूर्ण माहिती हांताशी नसल्यामुळे कांही जागी टिंबे (... अशी) दिली आहेत(३), आवश्यक वाटल्यास वाचकांनी गाळलेल्या जागा स्वतःच भरून घ्याव्यात.
१. अधिक माहितीसाठी मनोगत या संकेतस्थळावरील ... यांचे शोधयंत्रावरील लेख वाचावेत.
२. हे शब्द मराठी ग्रामीण कथाकादंब-यामध्ये पानोपानी वाचायला मिळतील. कुणाकुणाची नांवे सांगणार?)
३. एक पूर्वापारपासून चालत आलेली प्रथा.

रामराम मंडळी. (४)

४. दूरचित्रवाणीवरील 'आमची माती, आमची माणसे', 'कृषिदर्शन' किंवा तत्सम कार्यक्रम पहावा.

एक आटपाट नगर होते.(५)

५. पहा 'संपूर्ण चातुर्मास', आवृत्ती .. पृष्ठ .., हे पुस्तक न मिळाल्यास कोठलाही कहाणीसंग्रह वाचावा. धार्मिक पुस्तकविक्रेत्यांकडे श्रावण महिन्यात हमखास मिळेल.

त्या नगरांत (५) एक लहान मुलगी रहात होती.

६. 'नगर' म्हणजे 'अहमदनगर' या गांवाच्या नांवाचे लघु रूप असे कधीकधी समजले जाते. पण ते इथे लागू होत नाही. या ठिकाणी 'नगर' म्हणजे 'गांव'. या शब्दांच्या व्याख्या समाजशास्त्रावरील ... ग्रंथामध्ये मिळतील.

ती वयाने वाढत वाढत(६) मोठी होत होती.

६. 'वाढता वाढता वाढे' - समर्थ रामदास स्वामीकृत हनुमानाचे स्तोत्रामधील एक शब्दप्रयोग.

ती मुलगी अत्यंत सुंदर, मोहक, सद्गुणी, कामसू व हंसतमुख होती.(७)

७. सिंड्रेला किंवा स्नोव्हाईट यांच्या कथा वेगवेगळ्या किंवा एकत्र दिलेल्या कोठल्याही पुस्तकांमधील त्यांचे वर्णन. बालवाङ्मयाच्या सर्व दुकानांत असे पुस्तक मिळेल.

सोळावे वर्ष लागल्यावर ती अप्सरेसारखी(८) दिसू लागली.

८. 'प्राप्ते तु शोडषे वर्षे गर्दभी अप्सरायते।' - एक संस्कृत सुभाषित. यातील 'गर्दभी' शब्द वाटल्यास वगळावा.

तिच्या शेजारच्या घरी एक तरुण(९) मुलगा रहात असे.

९. 'माझ्या शेजारी तरुण राहतो। टकमक टकमक मला ग पाहतो।' - 'बुगडी माझी सांडली गं' या सुप्रसिद्ध लावणीतील एक ओळ. कवि... गायिका... चित्रपट...

एकदा त्यांची अचानक नजरानजर (१०) झाली.
१०.'नजरानजर होणे' या वाक्प्रचाराबद्दल अधिक माहिती मराठी भाषेच्या व्याकरणातील 'म्हणी व वाक्प्रचार' या संबंधीच्या धड्यात वाचायला मिळेल. इयत्ता .... च्या मराठी भाषा या विषयाच्या अभ्सासक्रमासाठी लावलेले पुस्तक मिळाल्यास पहावे.

तिचे गोड स्मितहास्य पाहून त्याच्या काळजाचा(११) ठोका चुकला.

११. 'ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला।'- '...' या मराठी संगीत नाटकांतील एक लोकप्रिय पद.

तिच्या हृदयातसुद्धा प्रेमाच्या लाटा उठल्या(१२).

१२. 'उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा।' - आणखीन एक लोकप्रिय पद. नाटक '...'

त्यानंतर जे व्हायचे होते ते घडू नये ते घडले (१३)

१३. 'शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले ..घडू नये ते घडले ' एक अजरामर मराठी गाणे. त्या ठिकाणी नेमके काय घडले असेल ते ज्याने त्याने आपापल्या कल्पनेतून समजून घ्यावे.

(तळटीप)
अ)प्रस्तुत लेखक (१४) अत्यल्पमति आहे.
१४. 'प्रस्तुत लेखक' हे लहानपणी कुठेतरी वाचलेले शब्द, बहुधा साहित्यसम्राट न.चिं.केळकरांसारख्या मोठ्या संपादकांच्या एखाद्या अग्रलेखातील एखादा छोटा उतारा कोठल्यातरी वृत्तपत्रांत वाचला असावा. त्यातले असतील. 'अत्यल्पमति' हा शब्द मात्र फक्त या किंचित गोष्टीच्या लेखकासाठीच वापरला आहे, त्यासंबंधी गैरसमज नसावा.
आ)त्यामुळे उपरिनिर्दिष्ट (१५) गोष्टीमध्ये लिहिलेला शब्दनशब्द त्याने नक्कीच पूर्वी कुठेतरी ऐकलेला किंवा वाचलेला आहे.
१५. अबब! केवढा मोठा शब्द? अर्थातच बालपणी वाचलेला. त्या काळच्या लेखकांची धन्य ते लेखनी कला!- संदर्भ -'धन्य ते गायनी कला' एका काळी तुफान लोकप्रिय झालेला सांगीतिक कार्यक्रम.
इ)वाचकांनी वाटल्यास ह.घ्या.(१६)
१६. आंतर्जालावरील लोकप्रिय संकेतस्थळांवर अनेक वेळा वाचलेली एक नम्र सूचना. या बाबतीत 'हलकेच घ्या' किंवा 'हसून घ्या' असे अर्थ अनर्थांचे पाठभेद असून इंग्रजी ई-मेल वर बोकाळलेल्या LOL वरून याची प्रेरणा मिळाली अशीही वदंता आहे.

Monday, May 12, 2008

धमाका

काल ११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा झाल्याचे छोटेसे वृत्त माझ्याकडे येत असलेल्या एका वर्तमानपत्रात दिले होते. दुस-या वर्तमानपत्रात त्याचा मागमूसही नव्हता. कदाचित उद्या परवाच्या अंकात त्याची शिळी बातमी एकाद्या कोप-यात येईल. राष्ट्रीय महत्वाच्या ज्या घटनांची ही 'वर्षगांठ' फारसा गाजावाजा न करता साजरी केली गेली त्यांच्याबद्दल तेंव्हा तर कमालीची गुप्तता पाळली
गेली होतीच, अजूनही कोणाला त्यांबद्दल फार कांही माहिती असेल असे वाटत नाही. '११ मे' म्हंटल्यावर कदाचित कोणाच्या स्मृती जाग्या होतील. हो, याच दिवशी १९७४ साली भारताने पहिला शांततामय आण्विक प्रयोग केला होता आणि १९९८ साली त्या प्रयोगाची दुसरी आवृत्ती झाली होती.

दुस-या महायुध्दाच्या अखेरच्या दिवसात जे लोक हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांच्या आसपास होते त्यातले फारच थोडे अजून जीवित असतील. त्यामुळे तिथला विनाश ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता असे अगदी मोजके लोक सोडले तर इतरांनी त्याबद्दल फक्त ऐकलेले किंवा वाचलेले आहे. पोखरण येथील प्रयोग तर जमीनीखाली खोलवर केले होते आणि भूपृष्ठावर त्याची नामोनिशाणी दिसणार नाही व पर्यावरणावर त्याचा तसुभरही परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली गेली होती. संरक्षणविषयक सर्वच गोष्टींबाबत जगभर नेहमीच प्रचंड गुप्तता पाळली जाते आणि जेवढी संहारक्षमता मोठी तेवढी ती अधिकाधिक कडक असते. यामुळे कांही पत्रकार अनमानधपक्याने त्याबद्दल थोडे फार लिहितात आणि सर्वसामान्य माणसे ते वाचून थक्क होतात किंवा भयभीत होतात. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास ज्या लोकांनी केला आहे त्यांनाही वर्तमानपत्रात व मासिकात जेवढे छापून येते त्याहून अधिक माहिती मिळण्याची शक्यता नसते.

पहायला गेलो तर साध्या दिवाळीला उडवण्याच्या फटाक्याबद्दल तरी कोणाला किती माहिती असते? वात पेटवून झटक्यात दूर व्हायचे कारण कोणत्याही क्षणी तो धडाडधुम् करेल आणि आपण जवळ असलो तर आपल्याला इजा होईल एवढेच सर्वांना माहीत असते. पण पणतीतली वात संथपणे तेवत राहते आणि फटाक्याचा स्फोट क्षणार्धात होतो असे कां होते याचा विचार कोण करतो?

पणतीत घातलेले तेल वातीतून वर चढत तिच्या टोकापर्यंत येते, ज्योतीमधील ऊष्णतेमुळे त्याचे बाष्पीभवन होते आणि त्या वाफेचा आजूबाजूच्या हवेमधील प्राणवायूशी संयोग होऊन तिचे ज्वलन होते. ही प्रक्रिया सावकाशपणे होत असल्याने पणतीमधील तेलाचा एकदम भडका उडत नाही. तिची ज्योत अखंडपणे तेवतांना दिसत असली तरी दर क्षणाला तेलाचे वेगवेगळे सूक्ष्म कण जळून नष्ट होत असतात
आणि वेगळे कण त्यांची जागा घेत असतात. पणतीतले तेल संपेपर्यंत हे सावकाशपणे चालत असते.

फटाक्यामध्ये ज्वालाग्राही पदार्थाची 'दारू' भरलेली असते. ज्वलनासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूचा पुरवठा करणारी रासायनिक द्रव्ये त्यातच मिसळलेली असतात. त्यासाठी हवेतील प्राणवायूची आवश्यकता नसते. त्यामुळे वातीच्या जळण्यातून पुरेशी ऊष्णता मिळताच ते ज्वालाग्राही पदार्थ बंदिस्त जागेतसुध्दा पेट घेतात. त्यातून निर्माण होणा-या ऊष्णतेने त्यातील आग लगेच पसरते आणि उपलब्ध असलेले सर्व द्रव्य जाळून टाकते. फटाक्यातली दारू बाहेर काढून त्यावर ठिणगी टाकली तर त्याचा भडका उडतांना दिसतो. यावेळी जाळ होतो पण फारसा आवाज होत नाही किंवा स्फोट होत नाही. असे कां होते?

स्फोट घडवून आणण्यासाठी फटाक्याची त्या दृष्टीने मुद्दाम रचना केलेली असते. त्यातील दारूला सर्व बाजूंनी कागदाच्या अनेक पापुद्र्यांचे घट्ट असे वेष्टण दिलेले असते. त्यामुळे आतल्या ज्वालाग्राही पदार्थांच्या ज्वलनातून निर्माण होणारे वायू बाहेर जाऊ शकत नाहीत आणि आत ते मावण्यासाठी जागा मिळत नाही, तसेच ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेने त्यांचे तापमान वाढत गेल्यामुळे त्यांचे आकारमान वाढत जाते व त्यांचा दाब अधिकच वेगाने वाढत जातो. त्याचबरोबर वेष्टनाचा कागद आंतल्या बाजूने जळून कमकुवत होत जातो. ज्या क्षणी तो दाब वेष्टणाच्या सहनशक्तीच्या मर्यादेपलीकडे जातो तेंव्हा ते कागदाचे वेष्टण टराटरा फाटून त्याच्या चिंधड्या उडतात आणि आत दबलेला अतिऊष्ण वायू जोरात बाहेर पडतो. यामुळे हवेत मोठ्या लहरी निर्माण होतात. त्या ध्वनिरूपाने कानांवर आदळतात. आंतील वायू अतीशय तप्त झालेले असल्यामुळे त्वचेच्या संपर्कात आल्यास तिला भाजून काढतात.

फटाक्याचा स्फोट आपल्याला हवा तेंव्हाच करता यावा यासाठी त्याला एक वात जोडलेली असते. ती एका ज्वालाग्राही पदार्थात भिजवलेली असते आणि त्या मानाने हळूहळू जळते यामुळे आपल्याला दूर पळायला अवधी मिळतो. ती जळत जळत फटाक्याच्या अंतर्भागात जाऊन ठिणगी टाकण्याचे काम करते.

पणतीच्या वातीच्या संथ ज्वलनातून निर्माण होणारी ऊर्जा उजेड आणि ऊष्णता यांच्या उत्सर्जनातून सर्व बाजूला पसरत असल्यामुळे त्यातली ज्योत तेवढी खूप गरम असते. त्यापासून थोड्या अंतरावर तिची धग जाणवत नाही. फटाक्यातली दारू बाहेर काढून भुरूभुरू जाळतांना त्यातून जास्त वेगाने ऊष्णता बाहेर पडते व तिच्यामुळे आजूबाजूची हवा कांही प्रमाणात तापते ते आपल्याला जाणवते. पण तिच्या पहिल्या कणाच्या ज्वलनापासून ही क्रिया सुरू होते आणि प्रकाश, ऊष्णता व गरम झालेली हवा या तीन माध्यमांतून ती आजूबाजूला पसरते. फटाक्यात निर्माण झालेली ऊर्जा मात्र वेष्टणाच्या आत साठत जाते आणि एकदम बाहेर येते. त्यालाच स्फोट म्हणतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास ज्वलनातून निर्माण झालेली ऊर्जा कांही मर्यादेपर्यंत साठवून एकदम तिचा बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून देणे हे विस्फोट घडवण्याचे मर्म असते. मग तो फटाका असो, सुरुंग असो किंवा बाँब असो.

जेंव्हा या ऊर्जेचा कांही विशिष्ट कामासाठी उपयोग करायचा असतो तेंव्हा या बाहेर पडण्याच्या मार्गाला एक दिशा दिली जाते. तोफा, बंदुका वगैरेमध्ये जाडजूड नलिकेमधून वायूंना बाहेर पडण्याचा एकच मार्ग असतो व त्या मार्गावर गोळा किंवा गोळी ठेवलेली असते. स्फोटानंतर बाहेर पडणारे वायू तिला जोराने बाहेर ढकलतात. सुरुवातीला नलिकेमुळे जी दिशा मिळते त्याच दिशेने ती वेगाने बाहेर प़डते.
रॉकेटमध्ये तप्त वायू खालच्या दिशेने बाहेर पडतात आणि या क्रियेच्या प्रतिक्रियेमुळे ते वरच्या दिशेने झेपावते. विमानांच्या जेट इंजिनातून वायू मागे फेकले जातात त्यामुळे ते पुढे जाते. रॉकेटमधील इंधन अतीशय वेगाने जळते आणि जेट इंजिनातले थोडेथोडे जळते एवढा फरक त्या दोघात असतो. कार किंवा स्कूटरच्या इंजिनात ठराविक कालांतराने थोडे थोडे इंधन आत टाकले जाते, त्याचा स्फोट होऊन
दट्ट्या (पिस्टन) पुढे ढकलला जातो. तो एका चाकाला जोडलेला असल्याने ते चाक फिरते आणि गिअर्सच्या माध्यमातून गाडीची चाके फिरवते. अशा प्रकारांनी विस्फोटांचा उपयोग विधायक कामासाठी केला जातो.

Sunday, May 11, 2008

सूर्याचे न चालता चालणे

खगोलशास्त्रामधील नवनव्या घडामोडींची माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख तज्ञ मंडळी लिहीत असतात. या शास्त्रामधील कांही महत्वाचे शोध आधी कोणी लावले यावर अनेक वेळा वादविवाद होत असतात. "सूर्याचे न चालता चालणे" हा ज्ञानेश्वरीमधील एका ओवीचा भाग या संदर्भात उद्धृत केला जातो. हे चालणे कसकशा प्रकारचे असते याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे.

रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृष्य होते. हे दृष्य आपल्या सहाराष्ट्रात, किंवा ऊष्ण कटिबंधात सर्वत्र वर्षभर दिसते. एकदा डिसेंबर अखेरीस मी इंग्लंडमध्ये होतो. तिथे मात्र आकाशाच्या दक्षिणेकडच्या छोट्याशा भागातच सकाळी तो डावीकडे उगवायचा, तिरका चालत भर दुपारी जेमतेम हातभर वर यायचा आणि संध्याकाळी उजवीकडच्या बाजूला अस्तंगत व्हायचा. हा सगळा प्रवास ७-८ तासात आटपायचा आणि घराच्या एका बाजूच्या खिडकीतूनच दिसायचा. दुसऱ्या बाजूच्या खिडकीवर त्या दिवसात सूर्यप्रकाश पडतच नसे. आणखी उत्तरेला ध्रुवाजवळ गेल्यावर सूर्याचे दर्शनसुध्दा झाले नसते तर दक्षिण ध्रुवाजवळ तो चोवीस तास क्षितिजाभोवती घिरट्या घालतांना दिसला असता. तिथे उदयही नाही आणि अस्तही नाही. सूर्याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे चालणे दररोज घडत असते.

पुढील माहितीसाठी आपण महाराष्ट्रात परत येऊ. रात्र झाल्यावर तगेच आकाशांत चांदण्या (ग्रह, तारे) दिसू लागतात, शुक्ल पक्षामध्ये सूर्य मावळताच चंद्र चमकतांना दिसतो. कृष्ण पक्षात तो सूर्यास्तानंतर उगवतो. त्या चांदण्यांकडे लक्ष देऊन पाहिल्यावर त्यांमधील फक्त एक ध्रुव तारा एका जागी स्थिर असून त्याच्या आजूबाजूच्या कांही चांदण्या त्याच्याभोवती फिरत आहेत असे दिसते. इतर सर्व चांदण्या इतक्या दूर असतात की आपण त्यांचा ध्रुवाबरोबर संबंध जोडू शकत नाही. सूर्यास्ताच्या वेळी त्या ज्या ठिकाणी असतील तेथून पश्चिमेकडे सरकत जात क्षितिजावरून मावळतांना दिसतात. तसेच पूर्वेच्या क्षितिजावरून नवनव्या तारका उगवून पश्चिम दिशेकडे जातांना दिसतात. याचाच अर्थ फक्त सूर्यच नव्हे तर चंद्र व इतर चांदण्यासुध्दा आकाशात सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना आपल्या डोळ्यांना दिसतात व चक्षुर्वैसत्यम् या न्यायाने त्या आकाशमार्गे तसा प्रवास करीत असणार असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. हे झाले पहिल्या प्रकारचे चालणे.

या चालण्यावर परंपरागत पध्दतीने विचार करतांना सर्व सामान्य बुध्दीला एक गोष्ट समजत नाही. ती म्हणजे पश्चिमेकडे मावळलेले सूर्य,चंद्र व चांदण्या पूर्वेला कसे उगवतात? ते इकडून तिकडे जमीनीखालील एखाद्या बोगद्यातून सरपटत जातात कां ? पण तसा बोगदा तर कुठेच दिसत नाही. जमीनीखालील दुसऱ्या एका आभाळातून ते वर्तुळाकार फिरतात कां? पण जमीनीखाली तर पाताळलोक आहे. तिथे आभाळ कसे असेल? असल्यास त्यातून जमीन खाली पडणार नाही कां? दररोज पूर्व दिशेला क्षितिजाखाली नवनवीन सूर्य चंद्र निर्माण होऊन ते पश्चिमेला क्षितिजाखाली नष्ट होत असतील कां ? पण ते तर चिरकाल राहणारे आहेत म्हणून यावत्चद्रदिवाकरौ असा वाक्प्रचार निर्माण झाला. सूर्यास्तानंतर आभाळभर एकदम दिसू लागणाऱ्या चांदण्या कोठे निर्माण होतात? प्राचीन कालापासून अशा अनंत प्रश्नांनी जगभरातील अनेक विचारवंतांना छळले असेल. पण किती लोकांना त्याचे सयुक्तिक उत्तर मिळाले ?

आकाशातील लक्षावधी चांदण्या कधीही इतस्ततः भरकटत नाहीत, त्या नेहमी एकमेकापासून ठराविक अंतर ठेऊन समान वेगाने चालतात व त्यांचे समूह बनवले तर त्या समूहाचा आकार कधीही बदलत नाही असे त्यांचे निरीक्षण करणाऱ्या विद्वानांना दिसले. त्यांनी आकाशाच्या संपूर्ण गोलाची संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या बारा भागात विभागणी करून प्रत्येक भागाला त्या भागात दिसणाऱ्या तारकांपासून बनू शकणाऱ्या आकारांची मेष, वृषभ इत्यादि नांवे दिली. बारा राशींचे हे नामकरण करणाऱ्या विद्वानांची कल्पनाशक्ती अचाट असणार. निदान मला तरी वृश्चिक राशीतील विंचवाची नांगी सोडली तर बकरा, बैल, सिंह वगैरे प्राण्यांचा भास कधी झाला नाही. पण असामान्य कल्पकतेने चांदण्यांच्या समूहांच्या अमूर्त आकारांना मूर्त रूपे देऊन त्याच्या आधाराने त्यांनी आकाशाचा एक नकाशा निर्माण केला व खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घेतला.

प्रामुख्याने चमकणारे शुक्र, गुरू, मंगळ वगैरे ग्रह मात्र तारकांच्या कुठल्याही समूहात सामील न होता सतत इतर चांदण्यांच्या जवळ किंवा त्यांच्यापासून दूर सरकत असतांना दिसतात. जरी अधून मधून मागे पुढे सरकतांना आढळले तरी ते मुख्यतः मेष, वृषभ, मिथुन या क्रमानेच बारा राशीमधून (आकाशाच्या विभागातून) भ्रमण करतात असे बारकाईने निरीक्षण केल्यास दिसते. मीन रास ओलांडल्यानंतर ते पुनः मेष राशीत प्रवेश करून नवे परिभ्रमण सुरू करतात. सूर्य आभाळात असेपर्यंत कोणतेच तारे दिसत नाहीत. पण सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरील तारे आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावरील तारे पाहिल्यावर त्या दोन्ही वेळी सूर्याच्या आगेमागे कोणत्या चांदण्या आहेत ते समजते व त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे याची कल्पना येते. ते पहात गेल्यास सूर्यसुध्दा आकाशाच्या मेष, वृषभ या विभागात त्या क्रमानेच पुढे पुढे सरकत असल्याचे समजते. कोठल्याही क्षणी कोणचा ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात आहे हे तो अमक्या तमक्या राशीमध्ये आहे अशा शब्दात सांगितले जाते. कुंडली हा एक प्रकारचा नकाशा असतो व त्यात बारा राशींची बारा घरे विशिष्ट क्रमाने मांडलेली असतात व हे ग्रह त्या क्षणी ज्या ठिकाणी असतील तेथील राशीच्या चौकटीत दाखवतात. हा सारा प्रवास संथ गतीने सुरू असतो. मुंबईहून दिल्लीला जाणारी आगगाडी जशी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश वगैरे राज्यांच्या सीमा पार करत जाते तसे ते एकामागून एक राशी ओलांडत जातात. कोणचाही ग्रह कधी टुणकन उडी मारून एका घरातून दुसऱ्या घरात जात नाही.

रात्रीच्या वेळी जेंव्हा आकाशात मेष रास पश्चिम क्षितिजावर टेकलेली दिसते तेंव्हा तिच्या मागून वृषभ, मिथुन, कर्क, सिंह व कन्या या राशी पूर्वेकडे क्रमवार पसरलेल्या दिसतात. जसजशा त्या एकामागून एक अस्त पावतात तसतशा तूळ, वृश्चिक वगैरे उरलेल्या राशी पूर्वेला उगवून वर चढतात. याचाच अर्थ त्या राशीचक्रामधून भ्रमण करणारे सूर्य, चंद्र व इतर ग्रह ही यात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने करतात. त्यांचे हे दुसऱ्या प्रकारचे विरुध्द दिशेने चालणे मात्र प्रत्यक्ष डोळ्याला कधीही दिसत नाही, पण राशीचक्राच्या आधाराने त्यांचा वेध घेणाऱ्या निरीक्षकांना निश्चितपणे जाणवते. सूर्योदयापासून अस्तापर्यंतचे त्याचे पहिल्या प्रकारचे चालणे साध्या डोळ्यांना दिसते यामुळे अनादि कालापासून सर्वसामान्य माणसांनीसुध्दा ते पाहिलेले आहे. दुसऱ्या प्रकारचे बारा राशीमधून त्याने केलेले भ्रमण सुध्दा निदान कांही हजार वर्षापासून विद्वानांना माहीत असावे असे पुरातन वाङ्मयातील उल्लेखावरून दिसते. हे दोन्ही प्रकारचे चालणे कशामुळे घडते याचा विचार करून जाणत्या लोकांनी आपापले तर्क व सिध्दांत वेळोवेळी मांडले असणार. तसेच आकाशाचे नेमके स्वरूप कसे आहे याबद्दल सुध्दा विचार झालाच असेल. आकाश, अवकाश, ग्रह, तारे वगैरेबद्दल मांडल्या गेलेल्या संकल्पनातून ज्या तत्कालिन किंवा मागून आलेल्या विद्वज्जनांनी मान्य केल्या त्यांचा पुढील पिढीच्या शिक्षणाच्या अभ्यासात समावेश झाला व या प्रकारे ते ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले.

"दिसते तसे नसते म्हणून जग फसते" या उक्तीप्रमाणे सूर्याचे हे दोन्ही प्रकारचे चालणे हा निव्वळ दृष्टीभ्रम आहे असे कोपरनिकसने ठामपणे सांगितले. पृथ्वीच्या स्वतःभोवती गिरकी घेण्यामुळे सूर्याचे पहिल्या प्रकारचे चालणे होत असल्याचा भास निर्माण होतो व त्याचेबरोबर चंद्र, ग्रह व तारे सुध्दा आपल्याभोवती फिरतांना दिसतात हे त्याने सिध्द केले. तसेच सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरत आहे हेसुध्दा गणिताच्या आधाराने दाखवून दिले. प्रत्यक्षात पृथ्वीला फिरतांना पाहण्यासाठी आपल्याला सूर्यमालिकेपासून दूर अंतराळात जावे लागेल आणि ते आजही शक्य नाही.

गुरू, मंगळ वगैरे ग्रह सूर्याभोवती फिरतात तसेच पृथ्वीसुध्दा सूर्याभोवती फिरते. यामध्ये मंगळ, गुरू व शनि हे बाह्य ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वीप्रदक्षिणा सुध्दा करतात तर पृथ्वी सूर्याभोवती फिरतांना बुध व शुक्र यांच्याही सभोवती फिरते. या सर्वांच्या कक्षा व गति वेगवेगळ्या असल्यामुळे कांही ग्रह कधी कधी वक्री होतात असा भास होतो हे त्याने किचकट गणिताद्वारे दाखवून दिले व पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या भ्रमणामुळेच सूर्याच्या दुसऱ्या प्रकारच्या चालण्याचा भास निर्माण होतो असे त्याने सांगितले. चंद्र मात्र खरोखरीच पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचे दुसऱ्या प्रकारचे चालणे हा भास नसून ते सत्य आहे. मात्र तो जेवढ्या वेगाने पृथ्वीभोंवती फिरतो त्याच्या अनेकपट वेगाने तोसुध्दा सूर्याभोंवती फिरत असतो हे सत्य मात्र आपल्याला मुळीसुध्दा जाणवत नाही.

या सगळ्या गोष्टींचा निरीक्षण व विश्लेषण या द्वारे सखोल अभ्यास करून त्याने आपले सिध्दांत मांडले होते. तरीसुध्दा तत्कालिन इतर विद्वानांना ते मान्य नव्हते याची कल्पना असल्याने त्याने ते प्रसिध्द न करता फक्त लिहून ठेवले. तो मरणासन्न अवस्थेत असतांना त्याच्या कांही चाहत्यांनी ते छापून प्रसिध्द केले. पण त्याच्या मृत्युनंतर त्यावर मोठे वादळ उठले. त्यानंतर आलेल्या केपलर या शास्त्रज्ञाने मात्र त्याचे विचार उचलून धरले एवढेच नव्हे तर त्यात महत्वाच्या सुधारणा करून त्यामधील कांही तृटी दूर केल्या. तसेच ग्रहांच्या कक्षा व फिरण्याचा वेग यांची समीकरणे मांडली. गॅलीलिओने दुर्बिणीतून सूक्ष्म निरीक्षणे करून त्याला दुजोरा दिला व त्यानंतर आलेल्या सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढले व या सिध्दांतांना भरभक्कम शास्त्रीय आधार दिला. त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रात ते सर्वमान्य झाले व सामान्यज्ञानात त्याचा समावेश झाला. हे सर्व घडायला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लागला.

सूर्याच्या चालण्याचे याशिवायही कांही प्रकार आहेत. कधी तो ढगाआड लपतो किंवा ढगामागून बाहेर येतो असे आपण म्हणतो पण हा प्रकार मुख्यतः ढगांच्या हालचालीमुळे होतो हो आपल्यालाही ठाऊक असते. साहित्यिक क्षेत्रात तो पायी चालतच नाही, सात घोडे जुंपलेल्या रथांत बसून विहार करतो. संपूर्ण विश्व प्रसरण पावत असून सूर्यासह सारे तारे आपापल्या ग्रहमालिकांना बरोबर घेऊन विश्वाच्या केन्द्रापासून दूर दूर जात आहेत असे म्हणतात. पण कांही विद्वानांना ते मान्य नाही. कदाचित ही प्रत्यक्ष घडत असलेली सूर्याची सफर आपल्याला जाणवत सुध्दा नाही. त्याला कदाचित सूर्याचे "चालता न चालणे" म्हणावे लागेल.

Saturday, May 10, 2008

भक्ती आणि शक्ती


आजच्या जमान्यातले प्रसिध्द शिल्पकार श्री. मदन गर्गे यांचे मागील महिन्यात अत्यंत दुर्दैवी अपघाती निधन झाले. त्यापूर्वीच घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचे प्रक्षेपण काल आणि आज ईटीव्हीच्या संवाद या कार्यक्रमात दाखवण्यात आले. एक असामान्य कलाकार सामान्य माणसापेक्षा किती वेगळ्या प्रकाराने विचार करत असतो याचे प्रत्यंतर या मुलाखतीतील वाक्यावाक्यात येत होते. कै.गर्गे यांनी मुंबईच्या
जे.जे. कला महाविद्यालयामध्ये शिल्पकलेचे रीतसर शिक्षण प्राप्त करून त्यात सुवर्णपदक मिळवले होते. पाश्चात्य व भारतीय अशा दोन्ही प्रकारच्या विविध परंपरागत शैलींचा तसेच आधुनिक शिल्पकलेचा अभ्यास त्यांनी केला होताच, ब्राँझ, दगड व सिमेंट या टिकाऊ माध्यमांचा कुशलतेने वापर करण्यात प्राविण्य मिळवले होते. त्यांनी घडवलेली अनेक शिल्पे गांवोगांवी उभी आहेत. आपल्या शिल्पांना
'पुतळा' म्हणणे त्यांना पसंत नव्हते. संपूर्ण मुलाखतीत ते त्यांचा उल्लेख शिल्प किंवा शिल्पकृती असाच करत होते. त्यांनी दोनशेवर सुरेख शिल्पे घडवली असून ती देशातच नव्हे तर परदेशातही नांवाजली गेली आहेत. पॅरिसमधील महात्मा गांधी यांचे पंधरा फूट उंचीचे शिल्प आणि पुण्याजवळ निगडी येथे उभे केलेले छत्रपती शिवाजी आणि संतसिरोमणी तुकाराम यांची भेट दाखवणारे पस्तीस फूट उंचीचे शिल्प ही शिल्पे त्यांच्या कलाविष्कारांची सर्वोच्च शिखरे दाखवतात.


या कलाकृतीबद्दल बोलतांना त्यांनी जी माहिती सांगितली त्यातून त्यांचे विलक्षण वेगळेपण दिसत होते. आपले शिल्प कशा प्रकारचे असावे याबद्दल ते कल्पनातीत खोलवर विचार करतात. त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी आणि संत तुकाराम हे समकालीन होते हे तर नक्कीच, पण त्यांची भेट नेमकी कधी आणि कुठे झाली याबद्दलचा ऐतिहासिक दस्तऐवज सापडला नाही. या दोन्ही महान व्यक्तींबद्दल
सर्वसामान्य सुशिक्षित मराठी माणसाला जसा मनापासून आदर वाटतो आणि बरीचशी माहिती असते तशी त्यांना होतीच. त्यातही सामान्य माणसाला जेवढे डोळ्यासमोर असते तेवढे दिसते पण कलाकार नेहमी त्याच्या पलीकडे जाऊन पहाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कै. गर्गे यांच्या मनात या दोन्ही विभूतींच्या रेखीव प्रतिमा जास्तच खोलवर कोरलेल्या होत्या. तरीसुध्दा प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी
त्यांनी इतिहासाच्या पानांची पुन्हा उजळणी केली, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या आणि त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ते तिथली 'व्हायब्रेशन्स' घेऊन आले. शिल्पाचा विषय अशा प्रकारे स्वतःच्या रोमरोमात भरून घेतला आणि त्या कामात स्वतःला झोकून दिले.


संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग कै. शांतारामबापूंनी तयार केलेल्या चित्रपटात मोठ्या नाट्यमय पध्दतीने रंगवला आहे. महाराजांचे हितशत्रू ही खबर त्यांच्या वै-याला देतात आणि कोठलासा खान त्यांना पकडण्यासाठी त्या जागेवर अचानक सशस्त्र हल्ला करतो. त्यावेळी विठ्ठलाच्या मायेने त्याला सगळेच श्रोते हुबेहूब शिवाजीसारखे दिसू लागतात आणि त्यामुळे चक्रावून तो माघारी जातो असा चमत्कार त्या सिनेमात दाखवला आहे. कै. गर्गे यांनी असे कांही दाखवण्याचा विचारही मनात आणला नसता. बहुतेक चित्रकारांनी या प्रसंगात शिवाजी महाराजांनी आपले मस्तक संत तुकारामांच्या चरणावर ठेवल्याचे दाखवले आहे. ज्या लोकांनी हे शिल्प उभे करायचे ठरवले होते त्यांचाही असाच मानस होता, पण कै.गर्गे यांच्या मनात वेगळी कल्पना होती ती त्यांनी त्या लोकांना पटवून दिली.


या शिल्पातून फक्त संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महान व्यक्तीच न दाखवता त्यातून भक्ती आणि शक्ती यांचा सुरेख संगम दाखवावा अशी संकल्पना त्यांनी मांडली. वयाने संत तुकाराम शिवाजी महाराजांपेक्षा वीसबावीस वर्षांनी मोठे होते हा फरक त्यात दिसायला हवा. शिवाजी महाराजांनी तुकारामांच्या पायावर डोके ठेवले असलेल्या प्रसंगात त्यांच्या अंगातील शक्तीचे प्रदर्शन
करता आले नसते. त्यामुळे ते एका वीराच्या पवित्र्यात ताठ उभे आहेत आणि फक्त त्यांनी आपली नजर खाली वळवली आहे, तसेच तुकारामांनी एक हात त्यांच्या खांद्यावर ठेऊन त्यांना शाबासकी तसेच आशिर्वाद देत दुसरा हात वर उंचावला आहे असे गर्गे यांनी दाखवले आहे. शक्ती आणि भक्ती या दोन भावना अशा प्रकारे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होतात. दोघांच्याही भव्य प्रतिमांमधून कलाकाराचे अद्भुत
कौशल्य तर दिसतेच. आजूबाजूला मांडलेल्या इतर कलाकृतीसुध्दा अतीशय देखण्या आणि चैतन्यपूर्ण आहेत.


या दोन भव्य प्रतिमांच्या बाजूला त्यांच्या अनुनायांच्या छोट्या छोट्या सुबक प्रतिमा आहेत. त्यात हातात भगवा ध्वज घेतलेले, तलवार पाजळून लढाईच्या मोहिमेवर निघालेले मावळे पुण्याच्या दिशेने एका रांगेत दाखवले आहेत तर टाळ, मृदुंग, वीणा धारण करून भजनात दंग असलेले वारकरी देहूच्या दिशेला आहेत. पराक्रम करून युध्द जिंकायला निघालेले मावळे बहिर्गामी वर्तुळाच्या (कॉन्व्हेक्स) चंद्रकोरेच्या
आकारात दाखवले आहेत तर अंतर्मुख होऊन परमार्थसाधना करणारे वारकरी अंतर्गामी (कॉन्केव्ह) वक्ररेषेत उभे आहेत. इतका सूक्ष्म विचार कै. गर्गे यांच्यासारखा संवेदनशील आणि व्यासंगी कलाकारच करू जाणे. सामान्य माणूस तितका विचार करेल किंवा करणार नाही पण याचा प्रभाव त्याच्या मनावर पडतोच.


असे हे अद्भुत शिल्प समस्त पुणेकरांनी पाहिले असेलच, मुंबईहून पुण्याला जाणा-या लोकांनीही कधी तरी जुन्या पुणे मुंबई मार्गाने चिंचवड, निगडी, देहू रोड या वाटेने जातांना ते पाहिले असेल आणि क्षणभर थांबून डोळ्यात सांठवून घेतले असेल. नसेल तर पुढच्या ट्रिपमध्ये तसे जरूर करावे.

Friday, May 09, 2008

वानवडीचा मुक्काम- महादजी शिंदे यांची छत्री


पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोप-यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.
त्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला 'वानोरी' इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि जुनी आठवण एकदम जागी झाली. केंद्रीय विद्यालयात शिकतांना वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती त्याला कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही.

दिवाळीनिमित्त त्याच्याकडे रहायला आल्यावर शोधाशोध सुरू केली. पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला गिळंकृत केले असल्याने आता ते 'पुण्याजवळ' राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. 'विंडसर','ऑक्सफर्ड', 'रहेजा', 'गंगा' 'सेक्रेड हार्ट' अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.

अशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या वंशजांनी सन १९१३ मध्ये हे स्मारक बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. नक्शीदार खांब व शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. त्याची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने चांगल्या सुस्थितीत आहे. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे.

येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.
संस्कृत लेखावर श्रीनाथ असे लिहिलेले पाहून ते एखादे स्तोत्र असावे असे वाटले. पण खालील मजकूर वाचल्यावर ते महादजी शिन्दे यांनी रचलेले नसून त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या छत्रीबद्दल असल्याचे समजते. शिन्देकुलरत्न महादजी हे संवत १८५० माघ शुद्ध १३ बुधवारी वैकुंठवसी झाले. त्यांचे प्रप्रपौत्र महाराज माधवराव शिन्दे यांनी संवत १९८१ ज्येष्ठ शुद्ध ५ शनिवारी या छत्रीची प्रतिष्ठापना केली असे त्यात लिहिले आहे.

या आवारात छत्रीची एक छोटीशी चौकोनी इमारत असून त्यावर एक घुमट आहे. ही इमारत बंदच ठेवलेली दिसली. तिच्या खिडकीमधून आतील समाधीचे दर्शन होते. तेथे त्यांचा मुखवटा ठेवला असून एक घोड्याची मूर्ती आहे. महादजींनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात मराठी राज्याचे सेनापतीपद भूषवले होते व वडगांवच्या लढाईत इंग्रजांचा पराभव केला होता. ग्वाल्हेर येथे त्यांची राजधानी असली तरी पुण्याच्या राजकारणात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते व तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ ही छत्री बांधण्यात आली.

त्याशिवाय एका दुमजली सुंदर इमारतीत महादेवाचे मंदिर असून त्याच्या गाभा-यात शिवलिंग आहे. चुनागच्चीच्या सुबक कोरीव काम केलेल्या भिंतीवर स्टेन ग्लासच्या खिडक्या आहेत. आंत गेल्यावर मधोमध उंच सीलिंग असलेला दिवाणखाना असून बाजूने सज्जे आहेत. त्याच्या कडेने शिन्देकुलातील महारथींच्या तसबिरी मांडून ठेवल्या आहेत. गाभा-याची वेगळी इमारत आहे त्यावर अत्यंत सुन्दर रेखीव काम केलेला उंच घुमट आहे. छत्री व देवळाच्या इमारतींच्या भोवताली एखाद्या तुरुंगासारखी पुरुषभराहून उंच भिंत आहे. आत जाण्यासाठी एक कमान व प्रवेशद्वार आहे. त्याच्या समोर एक मोठा जुना वृक्ष आहे.
हे एक ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारे प्रेक्षणीय ठिकाण आहे. एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.

Thursday, May 08, 2008

आर्किमिडीजने काय केले ?

एका ठिकाणी सत्यनारायणाची कथा सुरू होती. धनसंपत्तीऐवजी लतापल्लवाने भरल्यामुळे आपली नौका पाण्यातून वर आलेली साधुवाण्याने पाहिली हे ऐकल्यावर मला आर्किमिडीजच्या सिध्दांताची आठवण झाली. आरती, तीर्थ प्रसाद ग्रहण वगैरे झाल्यावर गप्पा मारतांना सहज ते माझ्या बोलण्यात आलं.
"म्हणजे काय? आपल्या पूर्वजांना सगळं कांही माहीत होतंच मुळी." कोणीतरी म्हणालं.
"अहो, या इंग्रजांनी आमचं ज्ञान पळवून नेलं आणि आपल्या नांवानं खपवलं." कुणीतरी री ओढली. "आर्किमिडीजनं म्हणे उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणजे काय तर पाण्यावर लाकूड तरंगतं असं सांगितलं कां?"
"अरे रस्त्यातून नागडा पळणारा येडा तो."
"आपल्या वानरसेनेनं बघा, रामनामाच्या जोरानं पाण्यावर दगड तरंगवले."
"अहो नासानं सुध्दा लंकेचा पूल मान्य केलाय्. त्याचे दुर्बिणीतून फोटो सुध्दा काढलेत."
मग आर्यभट, भास्कराचार्य, ज्ञानेश्वर वगैरेंच्या श्लोक, ओव्या वगैरे मधील वैज्ञानिक शोधांचे उल्लेख सांगून झाले, आर्किमिडीज पासून कोपर्निकस, पास्कल, न्यूटनपर्यंत सगळ्या थोर शास्त्रज्ञांचं महत्व मोडीत निघालं आणि माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना मेकालेची अवलाद म्हणून हिणवणं झालं. तशी ही सारी मंडळी चांगली पदवीधर होती, निदान कॉलेजात शिकत होती. त्यांना अडाणी म्हणून सोडून देता येत नव्हते.
मग मी त्यांच्याच कलानं घ्यायचं ठरवलं. विचारलं, "तुम्हाला पोहायला येतच असेल, निदान कधी तरी गळ्यापर्यंत पाण्यात उभं राहिलाच असाल. तेंव्हा हलकं हलकं वाटलं की नाही?"
"अहो हीच तर पाण्याची उध्दरणशक्ती, ते आपल्याला वर उचलत असतं."
मी म्हंटलं, "ज्यानं कधी उध्दरणशक्तीचं नांव सुध्दा ऐकलेलं नाही अशा एखाद्या अशिक्षित खेडुताला सुध्दा हलकं वाटतच असेल ना?"
"वाटणारच. हा तर निसर्गाचा नियम आहे." उत्तर आलं.
"पाण्यात शिरल्यावर हलकं वाटणं, कांठावरील झाडांची पाण्यात पडलेली पानं, फांद्या तरंगतांना दिसणं हे तर सर्वसामान्य बुध्दी असलेल्या कुठल्याही प्राण्याला समजतं. आर्किमिडीजच्या काळातील माणसांना ते माहीत नसेल कां?" मी विचारलं.
"मग त्या आर्किमिडीजनं काय केलं?"
" सांगतो. पण त्याआधी आणखी एक गोष्ट. लोखंड, तांबे, पितळ, सोने, चांदी वगैरे धातूसुध्दा हजारो वर्षापासून माणसाच्या वापरात आहेत. त्याचा गोळा किंवा पत्रा पाण्यात पडला तर बुडतो हे त्यांनी पाहिले असेल. तसेच रिकामा तांब्या किंवा घागर अलगद पाण्यावर सोडली तर तरंगते हेही पाहिलं असेल."
"या तर रोजच्या अनुभवाच्या गोष्टी झाल्या. त्यात आर्किमिडीजनं वेगळं काय सांगितलं?"
"त्यानं या रोजच्या अनुभवाच्या गोष्टींचा सखोल अभ्यास केला. हलकं वाटतं म्हणजे खरोखरच त्या वस्तूचं वजन कमी होतं कां हे त्यानं तराजूवर मोजून पाहिलं. एखाद्या वस्तूचं पाण्याबाहेर असतांना नेमकं किती वजन असतं आणि पाण्यात कितपत बुडवल्यावर ते किती कमी होतं याचा हिशोब ठेवला. आधी एक पात्र पाण्याने शिगोशीग भरून घेतलं. त्या पाण्यात ती वस्तू बुडवल्यावर बाहेर सांडणारं पाणी गोळा करून त्याचं वजन केलं. या वजनांची तुलना केली. दोन्ही वजनं सारखी भरली. दगड, लाकूड, लोखंड वगैरेचे वेगवेगळ्या आकाराचे तुकडे घेऊन त्यावर हाच प्रयोग करून पाहिला. त्या प्रयोगातील निरीक्षणांचा अभ्यास केला आणि पूर्ण खात्री पटल्यानंतर एका समीकरणाच्या रूपांत आपला सिध्दांत मांडला. हा समीकरणरूपातील सिध्दांत म्हणजे उध्दरणशक्तीचा शोध. "
"पण त्या रस्त्यातून नागड्यानं धांवत सुटण्याचं काय?"
"ती एक मजेदार गोष्ट आहे. ग्रीसच्या राजानं एक सोन्याचा मुकुट बनवून घेतला होता. पण सोनारानं लबाडी करून त्यात भेसळ केली असावी असा संशय त्याला आला. हे खरं की खोटं हे शोधून काढायचं कठीण काम त्यानं आर्किमिडीजला दिलं. त्या काळच्या तंत्रज्ञानानुसार सोन्याचा खरेपणा शोधायचे दोनच रूढ मार्ग होते, एकतर भट्टीत टाकून तापवून नाहीतर तीव्र आम्लामध्ये बुडवून पहाणं. दोन्हीमध्ये तो सुंदर नक्षीदार मुकुट खराब होणार. निदान तशी शक्यता होतीच. तसे न करता त्यातील सोन्याचा कस कसा पहायचा हे एक फक्त आर्किमिडीजलाच नव्हे तर दरबारातील विद्वत्तेपुढे आव्हान होते. त्यासाठी सोन्याच्या तिस-याच कुठल्यातरी गुणधर्माचा उपयोग करता येईल कां असा विचार आर्किमिडीज करीत होता. पाण्याच्या टबात उतरल्याबरोबर त्याला पाण्याच्या उध्दरणशक्तीची जाणीव झाली व त्याचा उपयोग सोन्याची घनता मोजण्यासाठी करता येईल ही नामी कल्पना सुचली. मनावरील एक मोठे दडपण उतरल्यामुळे त्याला इतका आनंद झाला की अंगावर कपडे चढवण्याचं सुध्दा भान राहिलं नाही. कुठल्याही कारणाने अत्यंत भावनावेग झाला की माणसाचं देहभानसुध्दा हरपतं."
"म्हणजे आर्किमिडीजनेच उध्दरणशक्तीचा शोध लावला म्हणायचं? "
"उध्दरणशक्तीची व्यवहारातील अनेक उदाहरणे आपल्याला साहित्यामध्ये मिळतील. पण समीकरणाच्या ज्या स्वरूपात आर्किमिडीजने निसर्गाचा हा नियम मांडला आणि उदाहरणाने दाखवून दिला तशा अर्थाचा दुसरा संदर्भ आपल्याला मिळत नाही तोपर्यंत तरी तसेच म्हणावे लागेल."

गांधर्व महाविद्यालय (भाग २)


आज झिम्बाब्वे किंवा ग्वाटेमालासारख्या देशात काय चालले आहे ते आपण घरबसल्या टीव्हीवर पाहू शकतो. शंभर वर्षांपूर्वी कसलीच दृक्श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणे किंवा वाचन, श्रवण एवढीच माहिती मिळवण्याची साधने असायची. त्यामुळे स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आधी स्वतः देशभर भ्रमण करायचे ठरवले. त्या कामासाठी आपल्या गुरूजींचा आशिर्वाद आणि निरोप घेऊन त्यांनी मिरज सोडले आणि ते प्रथम बडोद्याला गेले. त्या काळातले बडोद्याचे महाराज त्यांच्या कलासक्तीसाठी प्रसिध्द होते. गायन, वादन, चित्रकला. शिल्पकला आदी सर्व कलांना ते सढळ हाताने मदत करून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे बडोदा हे शहर पूर्वी अनेक कलाकारांना आकर्षित करीत असे.

असे असले तरी स्व.पलुस्कर थेट बडोद्याच्या महाराजांच्या चरणी मस्तक ठेवायला गेले नाहीत. त्यांनी तिथल्या एका देवळात आपल्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम ठेवला. देवदर्शनाला येणारी भक्तमंडळी व आजूबाजूला राहणारे लोक यांना तोंडी सांगणे, कांही हँडबिले वाटणे, जाहीर फलक लावणे अशा साधनाने प्रसिध्दी करण्यात आली. अशा प्रकारचे संगीत ऐकणे लोकांना नवीनच होते, पण त्यांना ते खूप
आवडले व त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी होऊ लागली. याची बातमी महाराजांना लागली आणि त्यांनी सन्मानाने स्व.पलुस्करांना बोलावणे पाठवले. त्यांचे गायन ऐकून त्यांना राजगायकाचे पद देऊ केले.

त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती. ते पद स्वीकारल्यावर राहण्याजेवण्याची उत्तम सोय होणार होती आणि आयुष्याची ददात मिटणार होती. महाराजांची मर्जी राखून ठेवण्यापुरते त्यांच्या दरबारात गायन केल्यानंतर उरलेला सारा वेळ संगीताची साधना करण्यात घालवता आला असता. पण पलुस्करांना मनापासून जे कार्य करायचे होते ते असे नोकरीत अडकून पडल्यावर करता आले नसते. त्यामुळे त्यांनी
विनम्रपणे नकार दिला आणि आपला मुक्काम हलवला. पुढील तीन चार वर्षे ते भारतभर फिरत राहिले. जागोजागी आपले कार्यक्रम करून दाखवून श्रोत्यांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी मिर्माण करायची तसेच इतर कलाकारांचे गायन ऐकून त्यातल्या बंदिशी, चिजा, गाण्याच्या पध्दती वगैरेंचा अभ्यास करायचा आणि त्यातून आपले ज्ञान व कौशल्य समृध्द करायचे असा दुहेरी कार्यक्रम त्यांनी सुरू ठेवला.

दि.५ मे १९०१ रोजी लाहोरला असतांना त्यांनी गांधर्व महाविद्यालय ही संस्था स्थापन केली आणि तिच्यामार्फत संगीताचे रीतसर शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्या काळी ही कल्पना नवीनच होती. परंपरागत गुरू शिष्य परंपरेने शिकवणारे बुवा किंवा उस्ताद आपापल्या मर्जीप्रमाणे किंवा कल्पनेप्रमाणे आणि शिष्याची कुवत व ग्रहणशक्ती पाहून त्यानुसार त्यांना संगीत शिकवत असत. शाळेय शिक्षणासारखा पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, परीक्षा पध्दती वगैरे कांहीसुध्दा या क्षेत्रासाठी त्या काळात अस्तित्वात नव्हते, कदाचित इतर कोणी त्याची कल्पनाही केली नसेल. पलुस्करांनी मात्र हे सगळे योजून ठेवले होते.

त्यांनी संगीताच्या शिक्षणातील प्रगती मोजण्याच्या पाय-या निर्माण केल्या. या कल्पनेचा विकास होऊन प्रारंभिक, प्रवेशिका (प्रथम व पूर्ण), मध्यमा (प्रथम व पूर्ण), विशारद (प्रथम व पूर्ण), अलंकार (प्रथम व पूर्ण) अशा श्रेणी निर्माण झाल्या. सुरुवातीला लहान मुलांच्या लक्षात राहतील अशी गाणी त्यांना चालीवर शिकवायची. यासाठी त्या काळातल्या बंदिशी न घेता पलुस्करांनी सोपी भजने निवडून त्यांना
रागदारीवर आधारलेल्या चाली लावल्या आणि ती शिकवायला सुरुवात केली. चाली लक्षात राहिल्यावर त्यांच्या आधाराने थोडे आलाप, ताना घ्यायला शिकवायच्या असे करत मुलांना गोडी वाटेल अशी हळू हळू प्रगती करीत त्यांना रागदारीचे ज्ञान ते देत जात असत. गोविंदराव पलुस्करांनी याची कांही उदाहरणे गाऊन दाखवली. अशा गाण्यांच्या छोट्या पुस्तिका स्व.विष्णू दिगंबरांनी खास तयार करवून घेतल्या होत्या.

स्व.विष्णू दिगंबर पलुस्करांनी विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली होती आणि ते त्यांना वेगवेगळ्या स्तरावर शिक्षण देत असत. सर्वसाधारण विद्यार्थ्यांना वर सांगितलेल्या पध्दतीने शिकवीत असत, तर कांही निवडक विद्यार्थ्यांना ते पुढे जाऊन संगीतशिक्षक बनावेत अशा हेतूने वेगळ्या पध्दतीने शिकवत असत. स्वतः उत्तम गाता येणे आणि शास्त्रशुध्द गायन समजून ते शिकवता येणे या वेगळ्या गोष्टी
आहेत हे त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे ज्यांनी शिक्षक बनावे असे त्यांना वाटले त्यांना ते स्वर, ताल, लय यांचेविषयीचे मूलभूत ज्ञान विस्तारपूर्वक देत, रागदारीमधील बारकावे समजावून सांगत, स्वरलिपीमध्ये प्राविण्य मिळवायला शिकवीत अशा अनेक प्रकाराने त्यांची उत्तम तयारी करवून घेत असत. कांही लोकांना दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे जमतात अशीही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. मात्र
परंपरागत पध्दतीत स्वतः अधिकाधिक नैपुण्य मिळवण्यावर भर असे, तर पलुस्करांनी द्रष्टेपणाने संगीतशिक्षकांची पिढी तयार केली आणि संगीताच्या प्रसारकार्यासाठी त्यांना लखनऊ, काशी वगैरे ठिकाणी पाठवून दिले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कार्य करून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला अशी कांही उदाहरणे गोविंदरावांनी सांगितली.

शास्त्रीय संगीताला आता उच्चभ्रू वर्गात सन्मानाचे स्थान मिळाले आहे. आकर्षक वाटणा-या पाश्चात्य संगीताच्या कोलाहलातसुध्दा अभिजात हिंदुस्थानी संगीत आपली लोकप्रियता टिकवून आहे. हे सगळे होण्यामागे स्व. विष्णू दिगंबर पलुस्करांनी केलेल्या तपश्चर्येचा मोठा वाटा आहे असे म्हणावेच लागेल. त्यांनी सुरू केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेने शंभर वर्षाहून अधिक काळ हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित ठेवला आहे. येणा-या काळात हे काम पुढे नेण्यासाठी कांही नव्या योजना विचाराधीन आहेत असे सूतोवाच संस्थेच्या पदाधिका-यांनी केले. ठराविक कालावधीने या संस्थेच्या निवडणुका होतात आणि नवी मंडळी तिच्या कार्याची धुरा खांद्यावर घेऊन मोठ्या उत्साहाने आणि समर्थपणे ती वाहून नेतात हे गेली पंचवीस तीस वर्षे मी दुरूनच कां होईना, पण पहात आहे. त्यामुळे ती यापुढेही अशीच चैतन्याने भारलेली राहील अशी मला खात्री वाटते.

Wednesday, May 07, 2008

गांधर्व महाविद्यालय (भाग १)


मुंबईचे सी.एस.टी. (पूर्वीचे व्हीटी) स्टेशन, राजाबाई टॉवर, हायकोर्ट वगैरे जुन्या इमारतींनी आपली जन्मशताब्दी साजरी केली असेल. ज्या कारणासाठी त्या बांधल्या गेल्या होत्या त्या रेल्वे, युनिव्हर्सिटी, न्यायालये आदि ब्रिटीशांच्या कालखंडात सुरू झालेल्या संस्था तर नक्कीच शंभर वर्षापेक्षा जुन्या आहेत आणि आजही कार्यरत आहेत. उद्योग व्यवसायक्षेत्रातील कांही घराणीसुध्दा गेल्या शंभर वर्षांपासून
चालत आलेली असतील. शंभर वर्षांपूर्वीच्या म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळात अनेक देशभक्तांनी समाजाला उपयुक्त पडतील अशा संस्था विविध क्षेत्रात सुरू केल्या होत्या. त्यातल्या कांही संस्थांची त्या वेळी ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण झाली, कालांतराने बदललेल्या परिस्थितीत त्यांचे महत्व कमी झाले, मूळ संस्थापकानंतर त्याच तळमळीने कार्य करणारे कार्यकर्ते उपलब्ध झाले नाहीत अशा वेगवेगळ्या कारणांमुळे त्यातल्या कांही संस्था अस्तंगत झाल्या, तर कांही संस्थांनी नवनवी कामे हाती घेऊन कार्याचा आवाका वाढवत नेला. आज त्यांचे मोठे वटवृक्ष फोफावले आहेत.

गांधर्व महाविद्यालय ही एक संस्था गेली शंभराहून अधिक वर्षे मुख्यतः मूळ उद्देशाला चिकटून उभी आहे आणि त्याचबरोबर काळानुसार आवश्यक तेवढे बदल घडवून आणून तंत्रज्ञानातल्या प्रगतीचा लाभ घेत आली आहे. इसवी सन १९०१ साली सुरू झालेल्या या संस्थेचा वर्धापन दिन परवा ५ मे रोजी वाशी येथील गांधर्वनिकेतनाच्या प्रांगणात साजरा झाला. हा एक साधेपणाने पण जिव्हाळ्याने घडवून आणलेला आटोपशीर असा समारंभ होता. सुरुवातीला सध्याच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित मान्यवरांचे तसेच श्रोत्यांचे स्वागत केले. जास्त लांबण न लावता मोजक्याच पण अर्थपूर्ण शब्दात हा औपचारिक कार्यक्रम आटोपल्यावर पं.गोविंदराव पलुस्कर यांनी आपल्या मुख्य भाषणात श्रोत्यांना थेट शंभर वर्षांपूर्वीच्या काळात नेले.

गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक स्व.विष्णू दिगंबर पलुस्कर हे एक ऋषितुल्य व्यक्तीमत्व होऊन गेले. सन १८८६-८७ च्या सुमारास त्यांनी मिरजेचे स्व.पं.बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले. संगीताचे शिक्षण घेताघेता ते तत्कालीन भारतीय समाजातील परिस्थितीकडे डोळसपणे पहात होते. ( खरे तर त्यांची दृष्टी अधू होती. ती तशी असली तरी मनःचक्षू समर्थ होते).
त्या काळात शास्त्रीय संगीताला समाजात प्रतिष्ठेचे स्थान नव्हते. एका बाजूला भजन, कीर्तन, भारुडे इत्यादी भक्तीसंगीत आणि दुस-या बाजूला शाहिरी पोवाडे, लावण्या वगैरे गाणी अशा पध्दतीने लोकसंगीत जनमानसाच्या रोमारोमात भिनले असले तरी शास्त्रशुध्द संगीत मात्र लोकांच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. त्या काळात रेडिओ, टीव्ही सारखी प्रसारमाध्यमे नव्हती, रेकॉर्डसुध्दा नव्हत्या. मोठमोठे उस्ताद, खाँसाहेब, पंडित, बुवा वगैरे शास्त्रीय संगीतातले बहुतेक गुणीजन त्या काळातल्या राजेरजवाडे, संस्थानिक, नवाब किंवा किमानपक्षी जहागिरदार, सधन व्यापारी अशा धनाड्य लोकांच्या आश्रयाने रहात असत. त्यांच्या मनोरंजनासाठी त्यांचे राजवाडे, महाल, हवेल्या वगैरे जागी त्याच्या मैफली होत आणि त्यात मालकांच्या मर्जीतील निवडक मंडळींनाच प्रवेश मिळत असे. यामुळे सामान्य जनतेला अभिजात संगीताचा आनंद मिळत नसे. त्या काळातील या कलाकारांतले कांही महाशय जास्तच लहरी असत, कांही शीघ्रकोपी म्हणून तर कांही चंगीभंगीपणासाठी ओळखले जात. इतर कांही लोकांबद्दल विनाकारण अशा वावड्या उठवल्या जात. एकंदरीत संगीत आणि संगीतकार यांबद्दल सर्वसामान्य सभ्य लोकांचे मत फारसे चांगले नसल्यामुळे ते त्यांच्याशी फटकून वागत असत. संगीत रंगभूमीने शास्त्रीय संगीताची थोडीशी झलक लोकांपर्यंत पोचवायला नुकतीच सुरुवात केली होती. पण नाटकवाल्यांपासूनही लोक थोडे दूरच रहात असत.

स्व.पलुस्करांना याचे फार वाईट वाटत असे. ही परिस्थिती बदलायला पाहिजे, सर्वसामान्य लोकांना दैवी शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेता आला पाहिजे, संगीतज्ञांची प्रतिमा उजळली पाहिजे, त्यांचा जनसंपर्क सुधारला पाहिजे, संगीत आणि संगीतज्ञ यांना प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे असे त्यांना सारखे वाटत असे. यावर गंभीरपणे विचार करून त्यांनी स्वतःला या कार्याला वाहून घ्यायचे ठरवले. नुसतेच ठरवले
नाही तर त्या कार्याची दिशा निश्चित केली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिले.
. . . . . . . . (क्रमशः)

Monday, May 05, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ५)

मला ईमेलवरून आलेल्या एका लेखाबद्दल सांगता सांगता त्याचे चार भाग झाले तरी त्या लेखात एवढे काय लिहिले होते ते कांही मी सांगितलेले नाही. याचे कारण असे आहे की त्यातील माहिती त्रोटक स्वरूपाची होती, जगप्रसिध्द पाश्चात्य शास्त्रज्ञांचे श्रेय काढून घेऊन ते आपल्या पूर्वजांना देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यात केला होता आणि त्यात दिलेली कांही माहिती मला इतर विश्वसनीय अशा श्रोतांमधून मिळालेल्या माहितीशी जुळत नव्हती. उदाहरणार्थ वराहमिहिराचा सूर्यसिध्दांत या लेखात भास्कराचार्यांना जोडला होता आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध दिला आहे असे लिहिले होते. "हिणकस धातूंचे रूपांतर सोन्यात करणे किंवा एका विश्वातून दुस-या विश्वात जाणारे यान तयार करणे अशा आजच्या शास्त्रज्ञांना अजूनही न जमलेल्या करामती आमच्या या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणल्या होत्या." हे विधान वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने त्या लेखातील मजकुराची विश्वासार्हता संपली. त्यात अतिशय सुंदर अशी चित्रे दिलेली आहेत, पण कलाकाराचे स्वातंत्र्य लक्षात घेऊनसुध्दा विज्ञानविषयाच्या चित्रात दाखवलेले अशास्त्रीय वाटणारे बारीकसारीक तपशील मला खटकले. मी माझ्या इनबॉक्सचे दार उघडून हा चित्रमय लेख दाखवू शकत नाही, पण ते लेख मला आंतर्जालावर खालील पत्यांवर सापडले. वाचकांनी स्वतः भेट देऊन ते पहावेत.
http://www.agni.nl/cms/index.php?id=40,116,0,0,1,0
http://www.yoga-in-daily-life.org/download/Great_Indians.pdf

हा ब्लॉग लिहिता लिहिता मी आंतर्जालावर जे उत्खनन केले त्यात भरपूर चांगली माहिती मिळाली, माझे कांही पूर्वग्रह दूर झाले तर कांही अधिक बळकट झाले, पण एकंदरीत माझ्या मनात असलेला प्राचीन शास्त्रज्ञांविषयीचा आदर द्विगुणित झाला. इसवी सन ५०० ते १२०० या भारतीय खगोलशास्त्राच्या व गणितशास्त्राच्या सुवर्णकाळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी अगदीच एकेकट्यांनी आपले संशोधनकार्य केले नव्हते. त्यांच्या ग्रंथांवर एकमेकांनी तसेच इतरांनी भाष्य किंवा टीका लिहिल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशात गेले होते. हस्ते परहस्ते त्यातल्या कांही संकल्पना कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन आदींपर्यंत पोचल्या असतील सुध्दा. अर्थात त्या लोकांनी त्यावर सखोल संशोधन करून ते ज्ञान पूर्णत्वाला नेल्याचे महत्व कमी होत नाही.

अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणिताच्या शाखांमध्ये तर आपले शास्त्रज्ञ अतिशय प्रवीण होते असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट होते. हे प्राविण्य संपादन करतांना त्यांनी त्यांच्या काळापर्यंत पूर्वापार चालत आलेल्या गणितशास्त्रावर प्रभुत्व मिळवले होते की त्यातले नवनवीन प्रकार शोधून काढले होते हे समजणे अवघड आहे. शकुंतलादेवींचे प्राविण्य आपण पाहिले आहे. त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचा, अचाट स्मरणशक्तीचा आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा हा चमत्कार आहे असे आपण म्हणू, पण त्यांनी गणितशास्त्रात नवे शोध लावले असे म्हणणार नाही कारण जी गणिते त्या चुटकीसरशी सोडवू शकतात ती जास्त वेळ लावून सोडवण्याच्या पध्दती अस्तित्वात आहेत. दशमानपध्दत, ' पाय ' चे अचूक मूल्य आदी कित्येक गोष्टी सर्वात आधी आपल्या शास्त्रज्ञांच्या ग्रंथात सापडतात म्हणून त्यांचे श्रेय त्यांना कदाचित देता येईल. त्यातही त्यांची दशमानपध्दत पूर्णांकातच मर्यादित असावी. ' . ' देऊन पुढे दशांश, शतांश, सहश्रांश वगैरे लिहिल्याची उदाहरणे सापडत नाहीत. अपूर्णांक हे अपूर्णांकातच लिहिले गेले आहेत.

या भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ग्रंथरचना काव्यबध्द केली आहे. त्यामुळे ते पाठ करून लक्षात ठेवायला सोपे जात असले तरी शास्त्रीय माहिती छंदात किंवा वृत्तात बसवून यमक साधण्यात तिचा नेमकेपणा रहात नाही आणि समजायला कठीण होते. काव्य जुळवतांना एकादा जादा शब्द घातला जातो किंवा वगळला जाते. रसनिष्पत्तीसाठी उपमा, उत्प्रेक्षा आदी अलंकारांचा सढळ उपयोग होतो. त्यांच्या काळात कुठल्याही विधानाचा शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत नसावी. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ' फॉर्म्युले' मिळतात पण त्यांचे ' डेरिव्हेशन' मिळत नाही. बहुतेक लोक फॉर्म्युला मिळाला, आपले काम झाले म्हणून खूष होतात, पण माझ्यासारख्या चिकीत्सकाचे तेवढ्यावर समाधान होत नाही.

बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर या शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे ग्रंथ उजेडात आले. याबद्दल पाश्चिमात्य देशांमधील विद्वानांनी काय काय म्हंटले आहे याचे इतके संदर्भ दिसतात की अलीकडच्या काळात कदाचित त्यांनीच आपली ओळख आपल्या या पूर्वजांबरोबर करून दिली कां असा संभ्रम मनात येतो.
माझ्या ब्लॉगवर दिलेल्या प्रतिसादात आदरणीय श्री.फडणीस यांनी "वराहमिहिर याच्या नावाने सूर्यसिद्धांत ओळखला जातो. त्याने काय सिद्धांत मांडला होता ते मला माहीत नाही. हा एक अपवादच म्हणावा लागेल. " असा तिरकस टोला मारला आहे. शक्य तेवढे मराठी शब्द वापरण्याच्या नादात मी "थिअरी" या अर्थाने "सिध्दांत" हा शब्द वापरला होता. त्यामुळे कदाचित गोंधळ झाला असावा. "थिअरी" म्हंटले की त्याची पूर्वपीठिका, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण, सूत्रे, समीकरणे, उदाहरणे वगैरे त्याच्या अनेक अंगांनी केलेला अभ्यास डोळ्यासमोर येतो. तशा रीतीने भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले कार्य मला पहायला मिळाले नाही असे मला म्हणायचे आहे.

यासाठी पुन्हा एकदा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण पाहू. झाडावरून फळ खाली पडले इथून सुरुवात झाली असे धरले तरी न्यूटनच्याच ''लॉज ऑफ मोशनप्रमाणे पाहता 'फोर्स' लावल्याशिवाय कोणतीही स्थिर वस्तू जागची हलत नाही आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते. इथे तर झाडावरून निसटलेले फळ खाली येतांना त्याचा वेगही वाढत जातांना दिसतो. या अर्थी कोणता तरी फोर्स त्याला सारखा खाली ओढत असणार. याला त्याने 'गुरुत्वाकर्षण' असे नांव दिले. लहानशी गोटी बोटाने टिचकी मारून उडवता येते पण तोफेचा गोळा दोन्ही हातांनी ढकलावा लागतो, म्हणजेच गति मिळवण्यासाठी लागणारा फोर्स वजनाच्या प्रमाणात वाढतो. गॅलिलिओने पिसाच्या मनो-यावरून लहान मोठ्या आकाराचे दगड खाली टाकून ते एकाच वेळी खाली पडतात हे दाखवलेच होते. जर त्यांना एकच वेग मिळत असेल तर हा 'गुरुत्वाकर्षणाचा फोर्स' वस्तुमानाच्या प्रमाणात वाढतो म्हणायचा. जमीनीला समांतर दिशेने फेकलेली वस्तू सरळ रेषेत पुढे न जाता वक्र मार्गाने खाली येत जाते आणि कांही अंतरावर जमीनीवर पडते. धनुष्याने सोडलेला बाण अधिक दूर जातो आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्याहून दूर जाऊन जमीनीवर पडते. एकादी वस्तू खूप उंचावरून सरळ रेषेत समोर फेकली आणि तिला फेकण्याचा वेग वाढवत गेलात तर केंव्हा तरी ती वस्तू खाली पडण्यामुळे तिच्या मार्गाला येणारी वक्रता पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर एवढी होईल आणि त्यानंतर ती वस्तू पृथ्वीभोवती गोल फिरू लागेल असे त्याला वाटले. झाडावरील फळ खाली पडते पण झाडामागील चंद्र खाली न पडता पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा कां घालतो याचे कोडे त्याला उलगडले.

त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि पृथ्वीच्या मध्यापासून तिच्या पृष्ठभागाचे अंतर, कोणत्याही क्षणी चंद्राची सरळ रेषेतील गति आणि त्याच्या मार्गाला वक्रता आणण्यासाठी काटकोनात वळण्याची गति वगैरे सर्व गणिते मांडल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे झाडावरून पडणा-या फळाला जे त्वरण प्राप्त होते ते चंद्राच्या त्वरणाच्या ३६०० पट असते आणि पृथ्यीपासून चंद्राचे अंतर पृथ्वीच्या मध्यापासून झाडाच्या फांदीपर्यंत जेवढे अंतर आहे त्याच्या ६० पट आहे. ६० चा वर्ग ३६०० झाला. अशा प्रकारे त्याने आपले सुप्रसिध्द समीकरण मांडले. त्याचा उपयोग करून पाण्यावर लाकूड कां तरंगते आणि लंबक आपल्याआप मागे पुढे कां होत राहतो यापासून ते ग्रह सूर्याभोवती का आणि किती वेगाने फिरतात इथपर्यंत अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण करता आले. हे सगळे थिअरीमध्ये येते.

"सिध्दांत" हा शब्द भारतात वेगळ्या अर्थाने वापरला जात होता. "थिअरी" मध्ये जितक्या गोष्टी अपेक्षित असतात तितक्या त्यात येण्याची गरज नसते. यामुळे प्राचीन भारतातील विद्वानांनी अनेक विषयांवर असंख्य सिध्दांत सांगितलेले आहेत. वराहमिहिरानेच पंचसिध्दांत सांगितले आहेत. सूर्यसिध्दांत हा त्यातला एक महत्वाचा "सिध्दांत" आहे. त्याचे उदाहरण घेऊ. त्यावरील लेख वाचून मला जेवढे समजले त्याचा सारांश खाली दिला आहे.

अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने।समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः।।

असे इशस्तवन करून या काव्याची सुरुवात होते. यात सुमारे पाचशे श्लोक आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातले विषय आहेतच, ज्या कोज्या आधि त्रिकोणमितीतील संज्ञा आहेत, सांवलीवरून दिवसाचा काल, सूर्याचे आकाशातील स्थान, त्या जागेचे पृथ्वीवरील स्थान वगैरे ठरवण्याची पध्दत आहे. त्याशिवाय मनुष्यांचे आणि देवदानवांचे दिवस, वर्ष, युगे, कल्प, मनु वगैरे लक्षावधी वर्षांच्या कालखथंडाचा हिशोब सांगितला आहे. पाताल, मेरू पर्वत वगैरे पौराणिक संकल्पनांचे उल्लेख आहेत, पापनाशन आणि पुण्यसंपादन याबद्दलसुध्दा लिहिले आहे. अशा त-हेने अनेक विषयांना स्पर्श करणा-या या काव्यातले कांही श्लोक घेऊन तेवढेच वराहमिहिरांनी सांगितले असे म्हणता येणार नाही. सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातल्या गोष्टी केंव्हा घडतात हे त्यांनी सांगितले आहे. त्या काढण्याची रीतही दिलेली आहे, पंचांग बनवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पण त्यामागची थिअरी दिसत नाही. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून त्यांना अंतरिक्षातील गणिते सोडवण्याची रीत माहीत असावी असे गृहीत धरावे लागेल. ज्या गोष्टी आज पटत नाहीत त्या सोडून द्याव्या लागतील.

साराशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे. ती डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे. ते न करता फक्त आमचे म्हणून चांगले असे ठरवण्याने व सांगण्याने कांही साध्य होणार नाही.

Saturday, May 03, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ४)

महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतर भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. प्रत्येक पिढीत त्याचा रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत.

आर्यभट, भास्कराचार्यादींचे ज्ञान त्यांच्या शिष्यांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत पोचले असे दिसत नाही. गांवागांवात जसे शास्त्री, पंडित, वैद्य असायचे तसे खगोलशास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात नाही. ज्योतिष सांगणारे विद्वान नवग्रहांच्या कुंडलीमधील भ्रमणावरून आपले जातक सांगत आले आहेत. सूर्यमालेची रचना, तारे, ग्रह आणि उपग्रह वगैरेंची माहिती आपल्याला या ज्योतिषांकडून मिळालेली नाही. ती माहिती
पाश्चात्य देशात झालेल्या संशोधनावरून आपण शिकलो आहोत. आर्यभट, भास्कराचार्यादी शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ वेगळ्याने प्रकाशात आले. भाषा किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणा-या विद्वानांनी ते वाचले असावेत. खगोलशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यातले ज्ञान आल्यासारखे दिसत नाही. त्यात नेमके काय काय लिहिले आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेले नाही. त्यावर तज्ञ खगोलशास्त्रज्ञांनी साधक बाधक चर्चा घडवून आणली, कोणी त्यांचे समर्थन केले, कोणी विरोध केला, कोणी शंका व्यक्त केल्या, कोणी त्यांचे निरसन केले वगैरे घडल्याचे निदान माझ्या ऐकिवात नाही. पश्चिमेकडून आलेले खगोलशास्त्र आज इतके पुढे गेले आहे की हजार वर्षांपूर्वी इतर कोणी काय लिहिले आणि त्यातले किती बरोबर आणि किती चुकीचे आहे वगैरे पहाण्यात आता कोणाला रस असणार नाही, कारण त्या शास्त्राच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने या ग्रंथांची उपयुक्तता राहिलेली नाही.

कोपर्निकस, गॅलीलिओ वगैरेंची गोष्ट त्याहून वेगळी आहे. या लोकांनी जे संशोधनकार्य केले त्याला त्यांच्या हयातीत विरोधच झाला होता. पण कांही उत्साही वैज्ञानिकांना त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळले. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यात ज्या त्रुटी आढळल्या त्या भरून काढल्या, ज्या चुका दिसल्या त्या सुधारल्या आणि त्या ज्ञानात आपली मोलाची भर टाकली. अशा प्रकारे आधुनिक खगोलशास्त्राचा विकास होत गेला. त्यात एक सातत्य असल्यामुळे जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले बरेचसे कार्य मूळ स्वरूपात जगाला उपलब्ध होत गेले. तसेच त्यावर भरपूर चर्चा झाली, त्याची छाननी, विश्लेषण वगैरे होऊन ते सुसंगत स्वरूपात मांडले गेले आणि सुलभपणे मिळू शकते. त्यामुळे त्याबद्दल जेवढी सखोल आणि सलग माहिती मिळते त्या मानाने प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल कमी आणि तुटक स्वरूपाची माहिती असते. त्या दोघांची तुलना करून जे एकाने सांगितले तेच दुस-याने सांगितले होते की कांही वेगळे मांडले होते ते समजत नाही. तशी तुलना न करणेच माझ्या मते इष्ट आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अंधारात कां राहिले याच्या मागे एक वेगळेच कारण असावे असा माझा अंदाज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे. त्याप्रमाणे जगातील सर्व ज्ञानाचा उगम ब्रह्म्यापासून झाला. त्याने ते ज्ञान आपल्या पुत्रांना दिले आणि त्यांच्या शिष्यवर्गामार्फत त्याचा प्रसार होत गेला. अशा प्रकारे सर्व ज्ञान अपौरुषेय स्वरूपाचे आहे. त्यात फेरफार करण्याचा अधिकार मर्त्य
मानवाला नाही. त्याला गुरूकडून जे ज्ञान प्राप्त होईल त्याचा त्याने उपयोग आणि प्रसार करावा. त्यात बदल किंवा वाढ करण्याच्या भरास पडू नये. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादन व संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणी नवा विचार मांडला तर तो स्वीकारला जाणे दुरापास्त होते कारण कोठल्याही गोष्टीवर निर्णय घेतांना जुना शास्त्राधार पाहिला जात असे. त्यामुळे आर्यभट व भास्कराचार्यासारख्यांनी त्या काळातल्या
समजुतींच्या विपरीत कांही सांगितले असले तरी इतरांनी ते मान्य केले जाण्याची शक्यता कमीच होती. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या ग्रंथातच पडून राहिले असावेत. गुरूशिष्य किंवा वंशपरंपरेनुसार प्रसारित होणा-या ज्ञानभांडारात ते समाविष्ट झाले नसावेत असा आपला माझा तर्क आहे.

वेगवेगळी स्तोत्रे, पुराणे वगैरेंची रचना करणा-या ऋषींची व आचार्यांची नांवे त्यांच्या रचनांना ....कृत किंवा ...विरचित म्हणून जोडलेली आहेत. पाश्चिमात्य देशात गणित व विज्ञानातील प्रमेये, नियम, समीकरण, सूत्र वगैरेशी त्या त्या संशोधकांची नांवे जोडलेली आहेत. 'पायथॅगोरस थीरम', 'आर्किमिडीज प्रिन्सिपल', 'न्यूटन्स लॉज' वगैरे शेकड्यांनी उदाहरणे देता येतील. गेल्या शतकात ज्या भारतीय
वैज्ञानिकांनी बहुमूल्य संशोधन केले त्यांनासुध्दा 'रामन इफेक्ट', 'चंद्रशेखर नंबर' वगैरे नामकरणातून अमरत्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतात अशी प्रथा नसावी कारण "मी अमूक शोध लावला अशी प्रौढी कोणी मारत नसे" किंवा "त्याने हे सर्वात आधी सांगितले" असे श्रेय त्याला दिले जात नसेल. त्यामुळे विनयामुळे किंवा आकसामुळे पूर्वीच्या शास्त्रज्ञांची नांवे त्यांनी केलेल्या योगदानासह कुठल्या
ताम्रपटावर किंवा शिलालेखावर खोदून ठेवली गेली नसावीत. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Friday, May 02, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३)

ज्या दहा प्राचीन शास्त्रज्ञांचा समावेश या यादीत केलेला होता, त्यापैकी महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची नांवे वैद्यक क्षेत्रात सर्वश्रुत आहेत. चरकसंहितेवर आधारलेल्या आयुर्वेदातील नियमानुसार चालणारी चिकित्सापध्दती गुणकारी आहे आणि त्यामुळे लोकप्रियही आहे. सुश्रुताची शल्यचिकित्सा पध्दत अनुसरून आज तितक्याशा शस्त्रक्रिया केल्या जात नसतील, पण पंचकर्म आदि क्रिया करणारे वैद्य आहेत आणि ब-याच रुग्णांना त्यामुळे गुण येत आहे. पतंजलीने सांगितलेला योगाभ्यास तर फारच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. आधुनिक काळातील ताण तणावाच्या जीवनात तो खूपच उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या तीन महान शास्त्रज्ञांच्या कर्तृत्वाबद्दल आदर आणि अभिमान वाटतोच वाटतो. ते तीघेही त्यांच्या स्वतःच्या कार्यानेच प्रख्यात आहेत. त्यांची तुलना कोठल्या पाश्चात्य शास्त्रज्ञाबरोबर करून त्यांचे कार्य मोठे आहे असे सांगण्याचा प्रश्नच उठत नाही.
इतर सात शास्त्रज्ञांची नांवे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबद्दल घेतली जातात. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आपल्या ग्रंथात मांडलेले विचार थक्क करायला लावणारे आहेत. त्यांनी प्रतिपादन केलेले सिध्दांत त्या काळातील सर्वमान्य समजुतींना धक्का देणारे आहेत. पण ज्या प्रकाराने चरक, सुश्रुत आणि पतंजली यांचे सांगणे परंपरागत पध्दतीने
आपल्या पिढीपर्यंत पोचले आहे तसे या इतर शास्त्रज्ञांचे कथन आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. मलासुध्दा या थोर शास्त्रज्ञांविषयी आदरभावना आहे, पण न्यूटन, कोपर्निकस, डाल्टन इत्यादी गेल्या कांही शतकातल्या शास्त्रज्ञांबरोबर त्यांची तुलना करून त्यांना मोठेपण देण्याचा प्रयत्न करणे मला प्रशस्त वाटत नाही.
आता मला मिळालेल्या पत्रातील मुद्याकडे वळू.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
. . . . . होता ना! युध्दात विजयी झालेल्या आक्रमक सैनिकांची मनस्थिती विचारात घेतली तर त्यातला विजयाचा उन्माद, शत्रूबद्दल द्वेष व सूडभावना, निःशस्त्र नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी दहशत बसवणे वगैरे कारणांमुळे ते विध्वंसक वृत्तीचे बनतात असे जगभर घडलेले आहे. फक्त मुसलमान आणि इंग्रजांनी फक्त हिंदू समाजावर अत्याचार केले होते अशातला भाग नाही. जर्मन, रशियन, जपानी आणि चिनी लोकांनी असेच वर्तन केल्याचे आपण गेल्या शतकात पाहिले आहे. परकीय आक्रमकांखेरीज स्थानिक असंतुष्ट लोकांनी रागापोटी केलेली जाळपोळ आणि कांही लोकांच्या स्वार्थापोटी घडत असलेला हिंसाचार याच्या बातम्या रोजच कुठून ना कुठून ऐकू येत असतात. त्याशिवाय नैसर्गिक कारणाने लागलेल्या आगी, पाऊस, महापूर, वाळवी, उंदीर वगैरे अनेक कारणांनी जुने ग्रंथ नष्ट होत असतात. गौतमबुध्द, महावीर किंवा पायथॅगोरस, प्लूटो आधी लोकांच्या काळातली हस्तलिखिते आता क्वचितच सापडतील, पण त्यांचे विचार इतर अनेक मार्गाने पसरले आहेत. महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची उदाहरणे आहेतच. तेंव्हा जे ज्ञान लोकांना पचते, रुचते, त्यांच्या मनाचा ठाव घेते ते त्याची पुस्तके जाळण्याने नाहीसे होत नाही असेच दिसते. शास्त्रीय संशोधनाविषयी जी माहिती आज आपणास मिळत नाही, जिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे, ती सगळी क्रूरकर्म्या आक्रमकांनी मुद्दाम नष्ट केली असे ठामपणे म्हणणे बरोबर नाही. जे संशोधन हजार पाचशे वर्षांनंतर पाश्चात्य शास्त्रज्ञ करून जगापुढे मांडणार होते नेमके त्यांच विषयांचे कागद निवडून पूर्वीच्या काळातल्या दुष्टांनी नाहीसे केले असे सांगणे कितपत तर्काला धरून आहे यावर विचार व्हायला हवा.

२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
. . . . हे शक्य नसेल त्यावर अवास्तव बोलण्याची काय गरज आहे?

३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील गोष्टींचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. (म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
. . . .. . ललित वाङ्मय मुख्यतः कल्पनाविलासावरच आधारलेले असते. त्यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यकथाच असली पाहिजे असा आग्रह धरून चालणार नाही. तसे असते तर शेक्सपीअरपासून आजपर्यंतच्या एकूण एक कथाकादंबरीकारांना आपण "खोटारडे" म्हणायला हवे.त्याचप्रमाणे वाङ्मयात उल्लेख आलेल्या गोष्टी सत्यात उतरलेल्या असतातच असे नाही. अरेबियन नाइट्समधले उडते गालिचे, लिलिपुटांचा देश किंवा इसापनीतीमधली बोलणारी जनावरे प्रत्यक्षात होती काय? आपण यांच्या गोष्टी किंवा परीकथा लहान मुलांना सांगतो तेंव्हा खोटे बोलणे हा आपला उद्देश असतो का? अशा प्रकारचे भारतीय संदर्भ मी मुद्दाम दिले नाहीत कारण कांही लोक त्यातले अक्षर न अक्षर काळ्या दगडावरली रेघ आहे असे मानतात.

४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे कांही सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
. . . .. . . हे वाक्य सरळ सरळ वर्णभेदाचे समर्थन करणारे आहे. आज आपण दाखवत असलेल्या कौशल्याचा संबंध आपल्या पूर्वजांच्या रक्ताशी जोडण्याचा हा प्रयत्न मला मान्य नाही.

५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि अचाट प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि
संपन्न स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वजही तसे असतीलच!
अ) एकाद्या भुसभुशीत वाळू असलेल्या जमीनीकडे बोट दाखवून इथे "आमच्या पूर्वजांची टोलेजंग इमारत होती ती भूकंपात नष्ट झाली" असे कोणी म्हणत असेल तर त्याला मी बहुधा "थापाड्या" म्हणेन कारण अशा प्रकारच्या जमीनीवर मोठी इमारत बांधता येईल याची मला खात्री वाटत नाही. तसेच कुठलीही इमारत भूकंपात एकदम अदृष्य होत नाही, तिचे भग्नावशेष, निदान पाया तरी शिल्लक राहतो
एवढे मला माहीत आहे.
आ) पण तो माणूस एवढ्यावर थांबत नाही. चाळीस पन्नास वर्षांपूर्वी उपलब्ध असलेले साहित्य वापरून इतर लोकांनी बांधलेल्या आणि सर्व लोकांना ज्याची चांगली माहिती आहे अशा आधुनिक पध्दतीच्या इमारतींकडे बोट दाखवून "त्यातले खांब, कमानी, दरवाजे वगैरे सगळे कांही माझ्या पूर्वजांनी बनवले होते. ते आपण तयार केले असल्याचे हे लोक खोटेच सांगत आहेत. या जुन्या काळातल्या कागदावर हे सगळे लिहिलेले आहे. तेंव्हा ते खरे असणारच." असे सांगू लागला तर मी त्याला कोण म्हणायचे? त्याच्या आजकालच्या कर्तृत्वाचे कौतुक करून त्याच्या दुराग्रहाचे समर्थन करायचे कां?

६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.
.. . . .. . कुठलीही गोष्ट 'आहे' किंवा 'होती' हे कांही पुराव्यावरून सिध्द करता येते. ती 'नाही' किंवा ' नव्हती' असे सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. पण पुरेसा आधार नसतांनासुध्दा 'ती होती' असे म्हणणे मला मान्य नाही.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग २)

माझ्या विचारावर खालीलप्रमाणे एक प्रतिक्रिया आली.
१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती. आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील सिध्दांतांचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. ( म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)
४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे काय सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे.
५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि संपन्न
स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,......... की
आ ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वज तसे असतीलच!
६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.

वर वर पाहता यातला युक्तीवाद कोणाला बिनतोड वाटेल. अशा प्रकारचा प्रचार अनेक माध्यमातून विशेषतः सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांमध्ये सतत चाललेला असतो आणि बरेच लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे त्यावर योग्य दिशेने विचार करणे गरजेचे आहे.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, May 01, 2008

थोर भारतीय शास्त्रज्ञ (भाग १)

परवा मला एका मित्राच्या ईमेलबरोबर एक देखणा लेख आला. त्यात दहा थोर भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची कार्यक्षेत्रे यांचे दर्शन घडवणारी सुरेख चित्रे देऊन त्याखाली थोडक्यात त्यांचा परिचय खालील क्रमाने दिला होता. या इंग्रजीतील लेखात दिलेल्या मथळ्यांचा मी जमेल तसा अनुवाद केला आहे. ज्या शब्दांना योग्य प्रतिशब्द आठवले नाहीत ते इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत.
१. आर्यभट (इ.स. ४७६) महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
२. भास्कराचार्य द्वितीय (इ.स. १११४-११८३) बीजगणितातले ' जीनियस'
३. आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते
४. नागार्जुन (इ.स. १००) रसायनशास्त्रातले जादूगार
५. आचार्य चरक (इ.स.पूर्व ६००) वैद्यकीय शास्त्राचे जनक
६. आचार्य शुश्रुत (इ.स.पूर्व ६००) शल्यचिकित्सेचे जनक
७.वराहमिहिर (इ.स.४९९-५८७) खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी
८. आचार्य पतंजली (इ.स.पूर्व २००) योगशास्त्राचे जनक
९. आचार्य भारद्वाज (इ.स.पूर्व ८००) उड्डयनशास्त्राचे ' पायोनियर'
१०. आचार्य कपिल (इ.स.पूर्व ३०००) ' कॉस्मॉलॉजी' चे जनक
हा परिचय अगदी त्रोटक होता. यातील प्रत्येक शास्त्रज्ञाने अमूक तमूक कार्य केले आणि अमके अमके शोध लावले असे सांगून हे काम त्यांनी कोपर्निकस, न्यूटन, डाल्टन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या हजार(रो) वर्षे आधीच केले होते असे लिहिले होते. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून
दाखवले यात शंका नाही. हा परिचय वाचल्यानंतर कोणाही सर्वसामान्य भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे वर्णन यात दिले होते.

पण विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आयुष्य घालवले असल्यामुळे हल्लीच्या युगात संशोधन कार्य कशा प्रकारे चालते ते मला थोडेसे जवळून पहायला मिळाले आहे. आभाळात विजा चमकाव्यात तशा कांही कल्पना मेंदूला सुचत असतात. त्यांवर सारासार विचार, सखोल अभ्यास, विचार विनिमय, प्रयोग, परीक्षण, निरीक्षण, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण, त्यातून निघणारी तात्पर्ये, त्यांचा इतर माहितीशी जुळत असलेला संदर्भ किंवा त्यांमधील विसंगती आणि त्यांचे स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टींचे सादरीकरण, त्यावर साधक बाधक चर्चा, तज्ञांचे अभिप्राय इत्यादी अनंत पाय-या चढून गेल्यानंतर कुठे त्यातून सर्वमान्य असा कांही निष्कर्ष काढला जातो. विविध उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा, चांगली वाचनालये आणि भरपूर साधनसामुग्री यांचे पाठबळ असतांनासुध्दा हा प्रवास किती अवघड व खडतर असतो हे मी जवळून पाहिले आहे. इतक्या लोकांना कमालीच्या चिकाटीने आणि निष्ठेने जीव तोडून रात्रंदिवस काम करतांना पाहूनसुध्दा माझ्या माहितीतल्या एकाद्या प्रयोगशाळेत एकादा जगप्रसिध्द शोध लागलेला पाहण्याचे भाग्य कांही मला कधी लाभले नाही.

चारपांचशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये शास्त्रीय संशोधन करणा-या शास्त्रज्ञांकडे फारशी साधनसामुग्री नसायची. जनतेचा पाठिंबा तर त्यांना मिळतच नव्हता, उलट अनेक वेळा विरोधच होत असे. त्यात कित्येकांच्या जिवावरदेखिल बेतले होते. अपमान, उपेक्षा, प्रसंगी छळ सहन करून आणि कळ काढून त्या लोकांनी जगाला थक्क करून सोडणारे शोध कसे लावले याच्या गौरवगाथा वाचायला मिळतात. त्या वेळी आपल्या देशात पूर्वीच्या काळात काय घडत असेल हा विचार ही मनात येतो. आपल्या सहिष्णु समाजाने कोणा शास्त्रज्ञाचा छळ केला नसेल, त्या विद्वानांना साजेसे आदराचे स्थानसुध्दा समाजात मिळत असेल. अशा चांगल्या वातावरणात त्यांना आपले संशोधनकार्य करायला अधिक वाव मिळावा अशी अपेक्षा आहे.
यामुळे त्या शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा वाटते. त्यांनी नेमके काय कार्य केले, म्हणजे कशाकशाचे निरीक्षण केले, त्यात कोणती माहिती त्यांना मिळाली, त्यांनी तिचे कसे विश्लेषण केले, त्यावरून कोणते निष्कर्ष काढले, त्यांनी प्रतिपादन केलेल्या सिध्दांतावरून कोणत्या इतर गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते, तिथून पुढे कशी प्रगती झाली असे अनंत प्रश्न मनात उठतात. त्याबद्दल
कुतूहल निर्माण होते. बहुतेक सर्व पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या बाबतीत अशा प्रकारची माहिती सुलभपणे उपलब्ध आहे. दुर्दैवाने प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांबद्दल मात्र ती सहजासहजी मिळत नाही. सगळीकडे नुसती वर्णनात्मक विधाने सापडतात, त्यातली कांही बुध्दीला पटतात, कांही तितकीशी पटत नाहीत, असे मागे एकदा मी माझ्या लिखाणात नमूद केले होते. त्यावर "तुम्ही अशी शंकाच कशी घेता? गरज असेल तर अमक्या तमक्या पुस्तकसंग्रहालयात जाऊन जुने पुराणे संस्कृत ग्रंथ वाचून पहा." अशा प्रकारचे प्रतिसाद आले. अर्थातच मला हे दिव्य करण्याची तेवढी गरज नव्हती आणि सामर्थ्यही नव्हते. मी आपला क्षमा मागून मोकळा झालो.

सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत फक्त झाडावरून सुटलेले फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीमुळे खाली पडते एवढेच सांगण्यापुरता मर्यादित नाही. गुरुत्वाकर्षणाची ही शक्ती नेमकी किती असते, ती कशाकशावर अवलंबलेली असते, त्यामुळे होणारे त्वरण, म्हणजे वाढत जाणारा वेग किती असतो, स्थिर असलेल्या, सरळ रेषेत जाणा-या किंवा घिरटी घालत असलेल्या गतिमान वस्तूंवर त्याचे काय परिणाम होतात वगैरे अनेक गोष्टी समीकरणामध्ये सूत्रबध्द करून मांडलेला तो अत्यंत महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत आहे. पृथ्वीवरील जड वस्तू आणि आकाशातील ग्रह, तारे या सर्वांना समान त-हेने लागू पडणारा तो बहुधा पहिला शास्त्रीय सिध्दांत होता. निसर्गात असे कांही नियम असतील अशी कल्पना त्यापूर्वी कोणी करू शकत नव्हते. हा सिध्दांत मांडण्यापूर्वी न्यूटनने काय काय केले, कोणकोणती माहिती गोळा केली, त्यांची सांगड कशी घातली वगैरेबद्दल मी पूर्वी विस्ताराने लिहिले आहे. यातल्या इतर कोणत्याच गोष्टींचा थांगपत्ता नसतांना हा शोध आमच्या आचार्यांनी हजार वर्षांपूर्वी लावला होता असे विधान करण्यात कांही अर्थ नाही असे मला वाटते.

"पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे ओढून घेते " अशा प्रकारचा विचार मनात येणे हे सुध्दा खरे तर कौतुकास्पद आहे. "पृथ्वी आणि वस्तू या दोघांमध्ये कोणतेही दृष्य बंधन नसतांना, त्यांना जोडणा-या कोठल्याही दोराशिवाय पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे कसे ओढत असेल?" असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. पण असामान्य बुध्दीमत्ता असलेला शास्त्रज्ञ अशी कल्पना करू शकतो. त्या विचाराला पोषक अशी
उदाहरणे त्याला मिळाली असतील. त्यामुळे त्याला विचारांती आपल्या कल्पनेची खात्री पटली असेल व त्याने असे प्रतिपादन करायला सुरुवात केली असेल. त्यामुळे अशा प्रकारचा संदर्भ जुन्या ग्रंथात सापडत असेल. पण याचा अर्थ न्यूटनने केले सर्व विवेचन त्या विद्वानाने केले होते असा होत नाही. निव्वळ विचार किंवा कल्पना आणि परिपक्व संशोधन यात खूप मोठे अंतर असते. त्यातले निष्कर्ष इतर विद्वानांनी मान्य करून ते इतरांना सांगायला लागल्यानंतरच मूळ संशोधकाला त्याचे श्रेय मिळते असा विज्ञानाच्या जगातला पायंडा आहे. हे एक उदाहरण माझ्या माहितीतले आहे त्यामुळे सहज माझ्या लक्षात आले. इतर शास्त्रज्ञांबद्दल केलेली विधानेसुध्दा अशीच अवास्तव वाटतात.
. . . . . . . . . . . . . .. . . . . . (क्रमशः)