Wednesday, August 04, 2021

महाभारतातला एक प्रसंग

 


माझी आई मला पुराणातल्या अनेक गोष्टी छान रंगवून सांगत असे. त्यातल्या काही गोष्टी मला अजून आठवतात. कधी कधी मीही त्या लक्ष देऊन ऐकत असावा. त्यातलीच ही एक गोष्ट, किंबहुना एक फक्त प्रसंग.  जेंव्हा कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणारच असे निश्चित झाले तेंव्हा दोन्ही पक्षांनी देशातल्या इतर राजांना त्या युद्धात  आपल्या बाजूने उतरण्याचे आवाहन करायला सुरुवात केली. द्वारकेचा राजा श्रीकृष्ण याला आपल्या बाजूला वळवण्यासाठी कौरवांचा राजा दुर्योधन आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन हे दोघेही एकाच दिवशी त्याच्या घरी जाऊन पोचले. त्यावेळी कृष्ण मंचकावर गाढ झोपला होता. तिथे दुर्योधन आधी जाऊन पोचला, पण कृष्णाला झोपेतून जागे केले तर कदाचित तो रागावेल आणि मग तो आपल्या बाजूला येणार नाही असा विचार करून तो कृष्णाच्या जागे होण्याची वाट पहात त्याच्या उशाशी बसून राहिला. थोड्या वेळाने अर्जुनही आला आणि तो मात्र कृष्णाच्या पायाजवळ बसला.

कृष्णाने डोळे उघडल्याबरोबर त्याला समोर बसलेला अर्जुन दिसला. त्याला पाहून उठून बसत कृष्णाने बोलायला सुरुवात केली, "अरे अर्जुना, तू केंव्हा आलास ?  घरी सगळे ठीक आहेत ना ?" वगैरे.
दुर्योधन एकदम उसळून बोलला, "हा तर आत्ता इथे आलाय्, मी केंव्हापासून इथे येऊन बसलो आहे. तुम्ही युद्धामध्ये आमच्या बाजूने लढावे अशी विनंति करायला मी आधी आलो आहे." 
अर्जुन म्हणाला, "मीसुद्धा त्याच कामासाठी इथे आलो आहे, तुम्ही आमच्याच बाजूला यावे अशी माझी विनंति आहे."
त्यावर कृष्ण म्हणाला, "तुम्ही दोघेही माझे अतिथि आहात, त्यामुळे मला तुम्हा दोघांचाही विचार करायला हवा. म्हणून मी असे करतो, मी एकाला माझी सर्व सेना देईन आणि दुसऱ्याकडे मी एकटा आणि तोही निःशस्त्र येईन. आता मी आधी अर्जुनाला पाहिले म्हणून यातले निवडायची पहिली संधी मी त्याला देतो."
दुर्योधनाने असा विचार केला की अर्जुनाने सेना मागितली तर कृष्णाकडचे सगळे रथ, हत्ती, घोडे, सैनिक आणि त्यांची सगळी शस्त्रास्त्रे त्याला मिळतील, मग मी या निःशस्त्र कृष्णाला घेऊन काय करू? पण अर्जुन म्हणाला, "हे कृष्णा, तू मला वेळोवेळी सहाय्य करून सगळ्या संकटांपासून वाचवले आहेस, तेंव्हा माझी अशी विनंति आहे की तू या युद्धाच्या प्रसंगीही माझ्यासोबतच रहावेस. पण तू निःशस्त्र असा युद्धभूमीवर येऊन काय करणार आहेस?"   
कृष्ण म्हणाला, "मी तुझा सारथी होऊन तिथे येईन आणि युद्धभूमीवर तुझा रथ चालवेन."
हे संभाषण ऐकून दुर्योधन खूष झाला. तो म्हणाला, "याचा अर्थ तुमची सगळी सेना माझ्या बाजूने युद्धात लढेल असेच ना?"
कृष्ण म्हणाला, "हो. मी तुला वचन देतो की माझी सगळी सेना तुझ्या गोटात येईल आणि तुझा सेनापति जी आज्ञा करेल ती मानेल."
कृष्णाने अशा प्रकारे अर्जुन आणि दुर्योधन या दोघांचेही समाधान केले.

अशी ही गोष्ट. यात दुर्योधन आणि अर्जुन तेंव्हा कुठेकुठे रहात होते ? आणि ते दोघे कुठल्या वाहनांमध्ये बसून कृष्णाकडे एका वेळीच कसे जाऊन पोचले असतील ?  त्यांना थेट कृष्णाच्या शयनकक्षात कसे जाऊ दिले असेल ? असले प्रश्न मला लहानपणी पडलेच नाहीत कारण आमचे घर, शाळा आणि आजूबाजूच्या तीन चार गल्ल्या एवढेच विश्व मी तोपर्यंत पाहिले होते. त्याप्रमाणे हे लोकसुद्धा असे जवळपासच रहात असणार आणि बेधडक कृष्णाच्या झोपायच्या खोलीपर्यंत जाऊन पोचले असणार ! मोठा झाल्यावर मला समजले की पुराणातल्या गोष्टींवर असले फालतू प्रश्न विचारायचेच नसतात.     

पण तरीही एक गोष्ट मला समजत नव्हती. दुर्योधन किती दुष्ट कपटी आहे हे कृष्णाला माहीत होतेच, मग त्याने त्याला सरळ सरळ नकार का दिला नसेल ? उलट त्याला युद्धात मदत का केली असेल ? "ही सगळी देवाची अगाध लीला आहे आणि त्याने ती तशी का केली हे आपल्या समजण्याच्या पलीकडले आहे." असे ठराविक उत्तर देऊन भक्त लोक तो विषय संपवून टाकतात. पण व्यासमहर्षींनीच महाभारताची कथा सांगत असतांना अनेक ठिकाणी काही ना काही कार्यकारणभाव दाखवला आहे, स्पष्टीकरण दिले आहे. 

महाभारतामध्ये या प्रसंगावरच एक असा श्लोक आहे. 
प्रवारणं तु बालानां पूर्वं कार्यमिति श्रुतिः।
तस्मात् प्रवारणं पूर्वमर्हः पार्थो धनंजयः ॥
याचा अर्थ असा आहे. लहानांचे समाधान आधी करावे असे सांगितले आणि ऐकले जाते. म्हणून मी आधी अर्जुनाला काय पाहिजे ते ऐकणार आहे. असे श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितले. या श्लोकात दिलेले हे कारण मी वर दिलेल्या कारणापेक्षा वेगळे आहे. अर्जुनाच्या आयुष्यात त्यापूर्वी येऊन गेलेल्या सगळ्या प्रसंगांची यादी आणि त्यांचा कालावधी पाहता त्याचे वय या वेळी ऐंशीच्या घरात असावे असे मी नुकतेच कुठे तरी वाचले. दुर्योधन त्याच्यापेक्षाही मोठा होता म्हणून अर्जुन या 'लहान' बाळाला कृष्णाने आधी मागायची संधी दिली. पण दुर्योधनाला कसलीही मदतच का केली? या बाबतीत व्यासांनी काय लिहिले आहे हे समजून घेण्याची मला अजूनही उत्सुकता आहे.

मी हा प्रश्न काही मित्रांना विचारला, त्यांनी निरनिराळी कारणे दिली. कुणाला वाटले की आपण पक्षपात करत नाही असे कृष्णाला दाखवायचे होते, कुणी म्हंटले की पांडवांचा पक्ष कमजोर असूनसुद्धा ते जिंकले तरच धर्माचा विजय होतो (यतो धर्मस्ततो जयः) असे सिद्ध होणार होते. पांडवांचीच बाजू बलवान असती तर तो "बळी तो कानपिळी"चा प्रकार झाला असता. कुणी म्हणाला 'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ' हे दाखवायचे होते म्हणून कृष्णाने "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तिच्या चार" असा पवित्रा घेतला. काही झाले तरी "यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र पार्थो धनंजयः। तत्र श्रीर्विजयो भूति धृवा नीतिर्मती मम।।" हे तर होणारच होते असे गीतेत सांगितले आहे. थोडक्यात म्हणजे कृष्णाने काही वावगे केले नाही असेच सर्वांचे विचार होते किंवा तसे सगळ्यांना सांगायचे होते. 

यावर 'कोरा'वर झालेली एक चर्चा वाचली. त्यात एकाने कौरव व पांडव यांच्या सेना तुल्यबळ व्हाव्यात म्हणून कृष्णाने असे केले असे उत्तर दिले, पण ते बरोबर नव्हते कारण पांडवांकडे फक्त सात अक्षौहिणी सेना होती तर कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सेना होती, यातली किती सेना कृष्णाची होती कोण जाणे. कुणी असे सांगितले की द्वापार युग संपायच्या आधी सगळ्या यादवांचा नाश तर व्हायचाच होता, तो या युद्धात अर्जुन करू शकेल असे कृष्णाला वाटले. आणखी कुणी असेही म्हणाला की कृष्णाच्या सेनेतले यादव फार माजले होते आणि त्यांना शिक्षा व्हायला हवी होती, एकाने तर असेही लिहिले की त्या सैनिकांनाही दुर्योधनच आवडत होता. 

महर्षी व्यासांनी महाभारताची इतकी प्रचंड गुंतागुंतीची कथा मांडतांना त्यात काही धक्कादायक प्रसंग आणि अगम्य प्रश्न ठेवले आहेत एवढे मात्र नक्की.