Saturday, July 11, 2020

कॅलिफोर्नियामधले टॉरेन्स - भाग ३मी मुंबईला रहात असतांना आमचे अणुशक्तीनगर ही एक कॉस्मोपॉलिटन वसाहत होती.  भारताच्या दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम या सगळ्या भागांमधून आलेले लोक आमच्या बिल्डिंगमध्ये अगदी गुण्यागोविंदाने रहात होते. टॉरेन्सला गेल्यावर मला तिथे जागतिक पातळीवरील  कॉस्मोपॉलिटन वस्ती पहायला मिळाली. तिथे युरोपियन वंशाच्या शुद्ध गोऱ्यापान लोकांची वस्ती फक्त सुमारे ४० टक्के इतकीच आहे. त्यातलेही इतर भाषिक वगळून मूळचे इंग्रज फक्त ३० टक्के इतकेच असतील. त्यानंतर मेक्सिकोमधले ब्राउन लॅटिन अमेरिकन जवळजवळ २५-३० टक्के इतके आहेत. तिथली साफसफाई, रिपेअर्स, मेंटेनन्स यासारखी सगळी कष्टाची कामे मुख्यतः हे लोक करतात.  उरलेले आशीयाई आणि आफ्रिकन वंशाचे लोक आहेत. एशीयन लोकांमध्ये जास्त करून चिनी, जपानी आणि कोरियन आहेत. भारतीय लोकांमध्ये पुन्हा अनेक भेद आहेतच. भारतातल्या निरनिराळ्या राज्यांमधले लोक तिथे रहायला आले आहेत. आमच्या कम्युनिटीमध्येच हे सगळे नमूने दिसायचे. रस्त्यातून फिरतांना, पार्कमध्ये, शाळांसमोर किंवा दुकानांमध्ये कुठेही गेल्यास तिथे एकादा भारतीय तरी हमखास दिसतोच, पण आता त्याचे नाविन्य वाटत नसल्यामुळे कोणीही लगेच पुढे होऊन ओळख करून घ्यायचा प्रयत्न करत नाही. माझ्यासारख्या चार दिवस फिरायला आलेल्या काही लोकांशी मी थोडे बोललो, त्यात मराठी, हिंदी, तामीळ आणि तेलुगू भाषी लोक होते. पुन्हा कधी भेट होण्याची शक्यताच नसल्यामुळे आम्ही जास्त जवळीक करून घेतली नाही. चिनी वंशाचे दिसणारे तीन चार वृद्ध रोज एकत्र येऊन गप्पा मारत त्या पार्कमध्ये फेऱ्या घालतांना दिसत. एकदा मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे इंग्रजी मला जरा कच्चेच वाटले. "तुम्ही चीनमधून आला आहात का?" असे विचारल्यावर "नो, नो, तैवान" एवढे नाखुषीने म्हणून ते चूप झाले. मग मीही त्यांच्याशी जास्त बोलायचा प्रयत्न केला नाही. 

इकडे मोठ्या संख्येने भारतीय लोक रहात असल्यामुळे त्यांनी आपल्या सांस्कृतिक संस्था स्थापन केल्या आहेत. टॉरेन्समध्येच भारतीय शास्त्रीय संगीत आणि कथ्थक व भरतनाट्यम या दोन प्रकारचे नृत्य शिकवणारे निरनिराळे क्लासेस आहेत. लॉस एंजेलिस परिसरातल्या अशा अनेक संस्था मिळून एकाद्या सभागृहात आपापल्या विद्यार्थ्यांच्या नृत्यगायनाचे जाहीर कार्यक्रम ठेवतात.  त्यात भारतातून आलेल्या एक दोन पाहुणे कलाकारांचे कार्यक्रमसुद्धा असतात. माझ्या मुक्कामात मी असे दोन कार्यक्रम पाहिले. त्यांचा दर्जा चांगला होता. हिंदू समाजाने लॉस एंजेलिसमध्ये काही ठिकाणी मंदिरे बांधली आहेत. त्यातले आमच्या घराहून सर्वात जवळ असलेले मंदिर पंचमुखी हनुमानाचे आहे. मारुतीचे हे रूप मी तरी प्रथमच पाहिले. इंग्लंड आणि अमेरिकेतल्या भारतीय मंदिरांमध्ये मुख्य देवतेशिवाय इतर काही देव आणि देवी यांच्या मूर्ती ठेऊन सगळ्या प्रकारच्या भाविकांची उपासनेची व्यवस्था केलेली असते. त्याप्रमाणे या देवळातसुद्धा हनुमानाशिवाय इतर मुख्य देवतांची स्थापना केली आहे. गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सवसुद्धा त्या मंदिरांमध्ये साजरे केले जातात.  हे दक्षिण भारतीय लोकांचे मंदिर असल्यामुळे साग्रसंगीत पूजा, अभिषेक आणि मंत्रपठण वगैरे विधीवत प्रकार तिथे नेहमी चाललेले असतात.मी सकाळी फिरायला जात असतांना मुद्दाम तिथल्या प्राथमिक शाळेवरून जात असे. जगभरातल्या निरनिराळ्या खंडांमधल्या विविध वंशांची लहान लहान निरागस मुले शाळा सुरू व्हायच्या आधी तिथल्या वाळूत एकमेकांशी मस्त खेळत बसलेली असत आणि घंटा वाजली की उठून शिस्तीने आपापल्या वर्गाकडे जायला निघत. त्यांना पहायला छान वाटत असल्यामुळे मी रोज सकाळी ही वेळ साधून तिकडे फिरायला जात असे. एकदा त्या शाळेसमोरचा रस्ता ओलांडण्यासाठी मी काही सेकंद थांबलो असतांना माझ्या बाजूला एक कृष्णवर्णी महिलाही उभी होती. रस्ता क्रॉस करून पुढे आम्ही एकाच दिशेने चालत जात होतो. माझ्याप्रमाणे तीसुद्धा व्हिक्टर पार्ककडेच आली. शंभर पावले चालत गेल्यावर तिलाच माझ्याशी काही तरी  बोलावेसे वाटले. मग आम्ही दोघांनी एकमेकांना हॅलो हाय करून आमची थोडी तोंडओळख झाली. माझ्याशी बोलणारी आफ्रिका खंडातली ती पहिलीच किंबहुना एकमेव व्यक्ती होती. ती मुळातली कांगो या देशातली होती आणि कामधंद्याच्या शोधात अमेरिकेत येऊन बहुधा तिच्या बहिणीबरोबर टॉरेन्सला रहात होती. पण त्यावेळी तरी तिच्याकडे नोकरी नव्हती आणि अमेरिकेतल्या वाढत्या बेकारीबद्दल ती वैतागाने बोलत होती. माझी कसलीच मदत होणे शक्य नव्हते हे तिलाही चांगले माहीत होते, तरी ती आपले मन मोकळे करून घेत असावी. तिचा स्वभावच जरा बोलघेवडा असल्यामळे पुढेही काही वेळा ती मला पार्कमध्ये किंवा पार्कच्या रस्त्यावर भेटली तेंव्हा प्रत्येक वेळी माझ्याशी चार शब्द बोलली. त्यावरून मला अमेरिकेतल्या सामान्य वर्गातल्या लोकांच्या राहणीची थोडी कल्पना आली, तसेच कांगोसारख्या आफ्रिकेतल्या अनोळखी देशाबद्दल माझ्या मनात जो अज्ञानाचा दाट अंधार होता तो जरा कमी झाला. माझी भारतात परत यायची वेळ झाल्यावर एकदा अशीच पार्कमध्ये तिची भेट झाली होती तेंव्हा सहज गंमत म्हणून तिने आपला एक सेल्फी काढून दिला. पण त्यानंतर मला ती पुन्हा कधी दिसली नाही. त्यामुळे तिचा औपचारिक असा निरोप काही घेता आला नाही.


टॉरेन्समधल्या आमच्या घरापासून अँझा अॅव्हेन्यूवरून उत्तरेच्या बाजूला सुमारे तीनशे मीटर्स चालत गेल्यावर एक चौक येतो. त्या चौकात 'सेव्हन एलेव्हन' नावाचे एक अमेरिकेतल्या दृष्टीने लहानसे आणि आपल्याकडच्या मध्यम आकाराच्या दुकानाएवढे दुकान आहे, त्यांच्या जगभरात पसरलेल्या एका खूप मोठ्या साखळीतली ती एक छोटीशी शाखा आहे. या साखळीची टॉरेन्समध्येच दहाबारा तरी तसली दुकाने आहेत, त्यातले हे एक आमच्या घरापासून सर्वात जवळ असलेले. तिथे काय काय मिळते हे पहावे म्हणून मी पहिल्याच दिवशी त्या दुकानात शिरलो. तिथल्या वीस पंचवीस रॅक्समध्ये प्रत्येकी शेदोनशे चौकोनी बॉक्सेस किंवा पॅकेट्स, कॅन्स, बाटल्या वगैरे छान मांडून ठेवले होते. पण बाहेरून पाहून त्या पॅकेजेसमध्ये नेमके काय काय भरून ठेवले असेल ते मला नक्की समजत नव्हते. समजा बस्तरच्या अरण्यातल्या एकाद्या निरक्षर आदिवासी माणसाच्या समोर सर्फ आणि केलॉगचे बॉक्स ठेवले तर त्याला काय कळेल ? कपडे धुवायची पॉवडर किंवा दुधात भिजवून खायचे कॉर्नफ्लेक्स जर त्याने आधी पाहिलेच नसतील तर त्याला त्या डब्यात काय आहे याचा बोध कसा होणार ? मी अगदी तितका निरक्षर नसलो तरी मला अमेरिकेतल्या कंपन्यांची आणि त्यांच्या प्रॉडक्ट्सची नावे माहीत नव्हती आणि एकेक डबा हातात घेऊन त्यावर काय लिहिले आहे हे वाचून पहाणे जरा अडाणीपणा झाला असता. म्हणून मी असेच वरवर पाहून ते काय असेल याबद्दल तर्क करत फिरलो.  खाद्य पदार्थांच्या पॅकेट्सवर त्यातले इन्ग्रेडियंट्स आणि कॅलरीज लिहिणे अमेरिकेत बंधनकारक आहे. त्यावरून त्या दुकानातले बहुतेक पदार्थ हे खाद्य पदार्थ असणार असे दिसत होते. पण आधी निदान नावे तरी ओळखीची असतील तर मग हे तपशील पहाण्यात काही अर्थ होता. त्यातले बरेचसे पदार्थ मांसाहारी होते आणि काहींमध्ये तर चक्क मद्यार्क होता, बऱ्याच पदार्थांमध्ये भरमसाट प्रमाणात स्निग्धांश किंवा साखर असल्यामुळे माझ्यासाठी त्यातले बहुतेक सगळे वर्ज्य होते.

माझ्या अमेरिकेच्या या प्रवासातल्या पहिल्याच दुकानात नुसतेच फिरून रिकाम्या हाताने बाहेर पडायला मला थोडा संकोच वाटत होता आणि अमेरिकेतल्या फुटकळ खर्चासाठी मी इथून नेलेल्या ट्रॅव्हल कार्डची बोहणीही मला करायची होती, ते कार्ड एकदा चालवून पहायचे होते म्हणून मी त्यातल्या त्यात सौम्य वाटणारे दोन पुडे उचलले. कदाचित सकाळची वेळ असल्यामुळे असेल, त्यावेळी मी तिथला एकमेव ग्राहक होतो. दुकानाची व्यवस्था पाहणारासुद्धा एकटाच माणूस होता. तो दोन्ही कानात ईअरफोन लावून हातातल्या मोबाईलशी चाळे करत त्याच्या जागेवर निवांत बसला होता. मी हातातले पुडे काउंटरवर ठेवले, त्याने ते स्कॅन केल्यावर समोरच्या यंत्रातल्या फलकावर तीन चार डॉलर आणि काही सेंट्सचा आकडा उमटला. मी माझे कार्ड त्याला दाखवले, त्याने माझ्याकडे एक प्रश्नार्थी कटाक्ष टाकला.  या वेळी मी नक्की काय करायचे असते ते मलाही अजून शिकून घ्यायचे होते. मग मी ते कार्ड त्याच्या हातात दिले. त्याने ते त्याच्या यंत्रामधल्या कुठल्याशा स्लॉटमधून फिरवले आणि मला परत दिले. तिथे माझे कार्ड चालत आहे हे पाहून मला हायसे वाटले. मी ते पुडे घेऊन बाहेर पडलो. घरी आल्यावर फोडून बघितल्यावर एकामध्ये अपेक्षेप्रमाणे कमी साखरेची, पण जरा जास्तच बेचव अशी बिस्किटे होती. दुसऱ्या पुड्यात वेफरसारख्या चकत्या होत्या, पण त्या फारच कडकडीत होत्या, त्यांचा दाताने तुकडाही पडत नव्हता. त्यांना तळून किंवा शिजवून दुसऱ्या कशात तरी मिसळून खायचे होते असे समजले. या पहिल्या अनुभवानंतर मला त्या दुकानात पुन्हा पुन्हा जाण्याची विशेष इच्छाही झाली नाही आणि तशी गरजही पडली नाही. ते दुकान घरापासून सर्वात जवळचे असले तरी माझ्या तिथल्या चार महिन्यांच्या वास्तव्यात मी तीन चार वेळाच तिथे गेलो असेन. 
अँझा अॅव्हेन्यूवरूनच उलट बाजूला सुमारे सहाशे मीटर चालून गेल्यावर येणाऱ्या चौकात तिथला बाजार होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला वेगवेगळ्या लहान लहान इमारतींमध्ये केएफसी, थाईरामा, कुठलासा ज्यूनियर वगैरे नावांची खाद्यंतीची ठिकाणे होती. तिथे मिळणारे बहुतेक खाद्यपदार्थ सामिश होते हे काचेमधून दिसत होते. काही जागी आतमध्ये बसून खाण्याची व्यवस्था होती तसेच घरी घेऊन जाण्यासाठी 'टेक अवे'सुद्धा होते. उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला एक प्रशस्त पार्किंग लॉट होता आणि त्याच्या मागे 'एल शेप'मध्ये मांडलेली दहा बारा दुकाने होती. पण तिथल्या दुकानांची रचना आणि मांडणी मात्र आपल्याकडल्यापेक्षा फारच वेगळी असते. आपल्याकडच्या बाजारातल्या दुकानांचे शटर उघडलेले असले तर आपण सरळ आत शिरतो, कोणीतरी दारातच आपल्याला काय पाहिजे ते विचारतो, आपल्याला हव्या असलेल्या वस्तू कोणीतरी बाहेर काढून दाखवतो, आपण थोडी चौकशी करून काय घ्यायचे ते ठरवतो. तिकडे हा सगळा प्रकारच नसतो. दुकानाचा जाडजूड काचेचा दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर कोणीच आपली कसली चौकशी करत नाही. सगळ्या वस्तू प्रदर्शनात ठेवल्यासारख्या मांडून आणि किंमतीची लेबले लावून  ठेवलेल्या असतात. ते बघून आपणच काय हवे ते उचलून बास्केटमध्ये टाकायचे आणि काउंटरवर नेऊन ठेवायचे. तिथला माणूस किंवा बाई त्या वस्तू स्कॅन करते, आपण कॅश किंवा कार्डने पैसे द्यायचे आणि सामान घेऊन बाहेर पडायचे. एक शब्दसुद्धा बोलायची गरजही न पडता सगळे काम आटोपते.


दुकानावर देखरेख ठेवणारी माणसे नसली तरी सगळीकडे कॅमेरे लावलेले असतात आणि उचलेगिरी करण्याविरुद्ध कडक कायदे आहेत असे ऐकले होते. पण  दुसऱ्या दुकानामधून विकत घेतलेली किंवा आधीपासूनच आपल्या खिशात असलेली एकादी वस्तू एकाद्या सिक्यूरिटी गार्डने पकडली आणि आपल्यावर उचलेगिरीचा आळ घेतला तर काय करा ? अशी  त्यामुळे मला  थोडी भीती वाटायची. त्यामुळे सुरुवातीला मी तिथल्या दुकानांचे दार उघडून आतमध्ये शिरायला बिचकत होतो आणि शिरलो तरी शक्यतो तिथल्या कशालाही हात न लावता ते पाठीशी बांधून वावरत होतो.

त्या चौकातल्या बाजारातले पहिले भले मोठे दुकान सीव्हीएस फार्मसी या नावाचे होते. माझी सगळी औषधे मी भारतातूनच नेलेली असल्यामुळे मला तिथल्या औषधांच्या दुकानात जायची गरज नव्हती म्हणून मी ते दुकान ओलांडून सरळ पुढे जात होतो. नंतर कधीतरी मी एकदा आत जाऊन पाहिले तर तिथे औषधे मिळत होतीच, पण त्याशिवाय इतर अनेक प्रकारच्या वस्तू जिकडे तिकडे मांडून ठेवलेल्या होत्या. इतकेच नव्हे तर तिथे फास्ट फूडही मिळत होते आणि घाऊक प्रमाणात पिण्याचे पाणी विकले जात होते. अमेरिकेतल्या आमच्या त्या घरात पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर बसवलेला नव्हता आणि तिथल्या नळाचे पाणी पिण्यायोग्य समजले जात नव्हते. त्यामुळे आमचे सगळे पेयजल या सीव्हीएस फार्मसीमधून आणले जात होते. 

त्या दुकानानंतर कोणी अॅडव्होकेट, टॅक्स कन्सल्टंट वगैरेंची ऑफीसेस होती आणि पुढे एक 'टोज अँड नेल्स'चे भव्य दुकान होते. काचेच्या तावदानातूनच आतल्या दहा बारा केबिन्स दिसत होत्या. त्यातल्या आरामशीर खुर्च्यांवर बसून तिथल्या महिला आपापल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या नखांची कौशल्यपूर्ण सजावट करायचे काम करवून घेत होत्या. आजकाल भारतातल्या शहरांमध्ये जागोजागी सौंदर्यप्रसाधनकेंद्रे दिसतात, पण फक्त नखांची निगा राखण्यासाठी एवढे मोठे खास केंद्र असू शकेल असे मात्र मला कधी वाटले नव्हते. आणखी काही इतर दुकाने सोडून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या टोकाला व्हॉन्स नावाचे एक बऱ्यापैकी मोठे ग्रोसरी स्टोअर होते. ते सेव्हन एलेव्हनच्या अनेकपटींनी मोठे होते आणि असंख्य उत्तमोत्तम पदार्थांनी खच्चून भरलेले होते. खाण्यापिण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या बहुत सगळ्या गोष्टी तिथे उपलब्ध असत. संध्याकाळच्या वेळी या दुकानात थोडी गर्दीही असायची. ग्राहकाने घेतलेल्या सामानाच्या स्कॅनिंगसाठी चारपाच काउंटर होते तरी प्रत्येक काउंटरवर नेहमी तीन चार तरी गिऱ्हाइके सामानाची ट्रॉली धरून रांगेत उभी असलेली दिसायची. मी सुद्धा तिथे मात्र अनेक वेळा जात होतो आणि फळे, सुका मेवा, केक, बिस्किटे वगैरे गोष्टी घेऊन येत होतो.