Saturday, December 19, 2020

क्रिकेटचे कसोटी सामने

 अलीकडेच मी खूप दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना पाहिला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने फार चांगली कामगिरी केली नसली तरी अगदी वाईटही केली नव्हती. त्यामुळे मनात संमिश्र भाव होते. दुसरे दिवशी  त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला एका दिवसात गुंडाळून कमाल केली आणि मी खूपच आनंदात होतो, पण तिसरे दिवशी मात्र अगदी अनपेक्षितपणे त्यांची लाजिरवाणी घसरगुंडी होऊन नामुश्कीची हार झाली. त्यामुळे आता पुढील सामन्यात ते काय दिवे लावणार आहेत ते पहायचे आहे. पण याआधी झालेल्या एक दिवसांच्या सामन्यांमध्ये हारल्यानंतर त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे ते कसोटी सामनेही कदाचित जिंकण्याची आशाही आहे. या सामन्याच्या निमित्याने माझ्या साठसत्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना मात्र थोडा उजाळा मिळाला.

६०-७० वर्षांपूर्वी म्हणजे १९५० ते १९६० च्या दशकात मी आमच्या लहान गावातल्या शाळेत जात होतो. त्या काळात आम्ही मुले बहुतेक वेळ गोट्या, विटीदांडू, लगोरी, शिवाशिवी, लपंडाव असले गावठी खेळच खेळत होतो. शाळेचे मास्तर पीटीच्या वर्गात आम्हाला हुतूतू, खोखो यासारखे काही सांघिक खेळ खेळायला सांगत असत, पण यात क्रिकेटचा समावेश कधीच नसायचा. तसे कधीकधी आम्हीही एकादे फटकूर हातात धरून थोडे चेंडूशी चाळे करत असू, पण त्याला क्रिकेट म्हणता येणार नाही. आमच्या वर्गातल्या एका मुलाला त्याच्या काकाने की मामाने शहरातून नवा कोरा क्रिकेटचा सेट आणून दिला. तेंव्हा त्याने आपली नवी कोरी बॅट, लाल चुटुक चेंडू आणि गुळगुळीत चमकदार स्टंप्स वगैरे सगळ्यांना कौतुकाने दाखवले आणि त्यांना उगीच माती लागून ते मळू नयेत म्हणून कापडात गुंडाळून जपून ठेवले.   

त्या काळात आमच्या दृष्टीने विमानाचा प्रवास ही एक दुर्मिळ गोष्ट होती. माझ्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या आमच्या गावातल्या कुणीही कधीही विमानाने प्रवास केला नव्हता. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावल्यापासून ते मी मॅट्रिक परीक्षा पास होईपर्यंतच्या पन्नास वर्षांच्या काळात आमच्या गावातला एकच माणूस परदेशी जाऊन आला होता आणि तोसुद्धा पुण्याला जाऊन तिथे स्थाईक झाल्यानंतर. आम्ही मुले त्याचे अमाप कौतुक ऐकतच लहानाचे मोठे होत होतो. त्यामुळे हे जे क्रिकेटचे खेळाडू कधी इंग्लंड तर कधी ऑस्ट्र्लेलियाला फिरून येत असत त्यांचा आम्हाला भयंकर हेवा वाटत असे. 

पण या लोकांनासुद्धा ३-४ वर्षात एक परदेशवारी करायला मिळत असे. उरलेल्या वर्षांमध्ये कुठला ना कुठला परदेशी संघ भारताच्या दौऱ्यावर येत असे. बहुतेक वर्षी ते लोक पाच पाच दिवसांचे पाच कसोटी सामने आणि त्यांच्या मध्ये तीन तीन दिवसांचे इतर सामने खेळत, तसेच काही प्रेक्षणीय स्थळे पाहून घेत असत. या कसोटी सामन्यांना वर्तमानपत्रांमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळत असेच, रेडिओवरून त्यांचे धावते समालोचनही (रनिंग कॉमेंटरी) प्रसारित केली जात असे.

त्या काळात आमच्या घरी रेडिओसुद्धा नव्हता, तसेच माझ्या कोणा जवळच्या मित्राच्या घरीही नव्हता. ज्या मित्रांच्या घरी होता त्यांना त्या रेडिओला हात लावू दिला जात नव्हता, पण घरातल्या मोठ्या माणसांनाच जर क्रिकेटची आवड असली तर ते कॉमेंटरी लावत असत आणि ती आमच्या त्या मित्रांच्या कानावर पडत असे. त्यामधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर ते भाव खाऊन घेत असत.  आमच्या ज्या मित्राला क्रिकेटचा सेट भेट मिळाला होता तोही त्यांच्यातलाच एक होता. आता मात्र आजूबाजूचे सगळे वातावरणच क्रिकेटमय झाल्यामुळे त्यालाही उत्सााह आला. त्याने आपले बॅट, बॉल आणि स्टंप्स बाहेर काढले आणि आम्हा मित्रांना बोलावून घेऊन खेळायला सुरुवात केली.  अर्थातच तोच आमचा तज्ज्ञ असल्यामुळे त्यानेच आम्हाला क्रिकेटचे नियमही सांगितले. पाचसात मुलांमध्ये दोन संघ करणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे सगळेच जण आळीपाळीने बॅट्समन किंवा बोलर होत आणि बाकीचे फील्डिंग करत. त्यासाठी आम्हीच आमचे वेगळे नियम ठरवीत असू आणि ते पाळत असू.

गावातले काही रिकामटेकडे दुकानदार त्यांच्या दुकानात एक मोठा व्हॉल्ह्वसेटचा रेडिओ शोभेसाठी ठेवत असत आणि त्यावर बातम्या किंवा रेडिओ सिलोनवरील हिंदी सिनेमातली गाणी ऐकत बसलेले असत.  क्रिकेटचा कसोटी सामना चालला असला तर ते त्यावर कॉमेंटरी लावून ठेवत आणि गावातली रिकामटेकडी पोरे दुकानाच्या बाहेर उभी राहून ती ऐकायला गर्दी करत असत. तिथे काय चाललंय ते पाहण्यासाठी मीही कधी कधी त्या घोळक्यात उभा रहात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या त्या देशभक्तीच्या काळात इंग्रजांबरोबर इंग्रजीलाही हद्दपार करण्याचा सगळ्यांनी चंग बांधला असल्यामुळे आम्हाला आठवी इयत्तेत एबीसीडी शिकवली गेली. त्यामुळे त्या भाषेचे ज्ञान तर नव्हतेच, त्या काळातल्या दिव्य रेडिओ प्रसारणातल्या रेडिओ विद्युत लहरी आमच्या त्या  आडगावापर्यंत जेमतेमच पोचत असाव्यात. त्यामुळे येत असलेल्या प्रचंड खरखरीमधून एकाद दुसरा शब्द ऐकू आलाच तर त्याचा अर्थ माहीत नसायचा आणि क्रिकेटच्या परिभाषेमधला त्याचा संदर्भ तर कुणालाच लागायचा नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी अर्थ काढून तारे तोडत असे.

अनेक वेळा हे समालोचन ऐकल्यानंतर निदान कोणता संघ बॅटिंग करत आहे, कोणाकडे बोलिंग आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा किती स्कोअर झाला आहे एवढे तरी बऱ्याच लोकांना समजायला लागले होते. त्यामुळे भारताची बॅटिंग चालली असताांना  रेडिओवर एकदम गलका झाला की आधी लोक कुणीतरी बाउंडरी मारली म्हणून टाळ्या पिटत आणि थोड्या वेळाने दुसऱ्याच बॅट्समनचे नाव कानावर पडल्यावर त्यांच्या लक्षात येई की तो तर आउट होऊन गेला आहे आणि मग त्याला शिव्या घालत. याउलट प्रतिपक्षाची बॅटिंग चालली असतांना त्यांचा खेळाडू आउट झालल्याचे समजताच ते आनंदाने उड्या मारत. अशा मजा मजा चालत असत.

१९५०-६०च्या त्या कालखंडात भारताची टीम कुठलाच कसोटी सामना कधी जिंकतच नव्हती. त्यामुळे तो सामना अनिर्णित ठेवणे हाच मोठा पराक्रम समजला जायचा. अंगावर आलेला चेंडू टकक् टुकुक् करत कसाबसा पुढे ढकलायचा, डोक्यावरून जाणाऱ्या बंपरपासून कसे तरी आपले शिर सलामत ठेवायचे, बाजूने जाणाऱ्या चेंडूला सरळ सोडून द्यायचे आणि बाद न होता पिचवर टिकून रहायचे हा फलंदाजांचा सर्वात मोठा गुण होता अशी समजूत होती. कंटाळा आला तर मध्येच एकादा चेंडू ते जमेल तसा टोलवतही असत. अशा रीतीने संथपणे खेळूनही काही बॅट्समन सेंच्युऱ्या वगैरे काढत असत. त्यांना असे वैयक्तिक उच्चांक करायला संधी मिळावी एवढ्याच उद्देशाने हे सामने खेळले जात असावेत अशी समजूत होती. 

मी कॉलेजला गेल्यानंतरच्या काळात परिस्थिती हळू हळू बदलत गेली आणि आपली भारतीय टीम एकाददुसरा सामना जिंकायला लागली. मी नोकरीला लागल्यानंतरच्या काळात तर ती चक्क मालिकांवर मालिका जिंकायला लागली. मुंबईपुण्याला रेडिओवरील कॉमेंटरी स्पष्ट ऐकायला यायला लागली आणि मलाही इंग्रजी संभाषणाची सवय झाल्याने ती समजायला लागली. प्रत्यक्षात मी कधी मैदानावर उतरलोही नाही, तरीसुद्धा क्रिकेटच्या बाबतीतले माझे सामान्य ज्ञान वाढत गेले आणि बोलिंगमधले गुगली, बाउन्सर किंवा यॉर्कर, बॅटिंगमधले कव्हर ड्राइव्ह, पुल् किंवा स्वीप आणि फील्डिंगमधले मिडऑन, स्लिप किंवा फॉरवर्ड शॉर्ट लेग यासारख्या तांत्रिक शब्दांची त्यात भर पडली. टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष सामने पहातांना ते सगळे इतके चांगले समजायला लागले की कॉमेंटरीचीसुद्धा फारशी गरज पडायची नाही. कॉमेंटरीतही खूप सुधारणा होत गेल्या आणि त्याही बहुभाषिक बनल्या. या सगळ्यांमुळे माझाही क्रिकेटच्या सामन्यांमधला इंटरेस्ट वाढत गेला आणि इतरांप्रमाणे मीसुद्धा क्रिकेट मॅचेसच्या कॉमेंटरी ऐकण्याचा शौकीन होऊन गेलो. चार लोकांमध्ये बोलतांना क्रिकेट हा विषय नेहमी निघायचाच आणि आपण त्यात अगदीच अनभिज्ञ आहोत असे दिसायला नको असेल तर त्याची माहिती ठेवणे आवश्यक असायचे. 

नंतरच्या काळात आधी ५०-५० षटकांचे आणि नंतर तर फक्त २०-२० षटकांचे सामने खेळायला सुरुवात झाली. त्यात खूप आकर्षक अशी फटकेबाजी आणि कमालीचे क्षेत्ररक्षण कौशल्य पहायला मिळते, तसेच ते कमी वेळात संपून त्यात निकालही लागतात, यामुळे ते लगेच लोकप्रिय झाले आणि पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने कंटाळवाणे वाटायला लागले. पण या इतर सामन्यांची संख्या बेसुमार वाढत गेली. आय पी एल सुरू झाल्यावर कोणत्याही संघात जगभरातले निरनिराळ्या देशातले खेळाडू असल्यामुळे मला तरी कुठलाच संघ आपला वाटायचा नाही. आणि 'आपला' विरुद्ध 'विरोधी' असे दोन पक्ष नसले आणि त्यातले कोण जिंकणार याची उत्सुकताच नसली तर मग तटस्थपणे हे सामने पहायला फारशी मजा येत नाही. शिवाय मॅचफिक्सिंगचे प्रकार सुरू झाल्याने त्या पहाण्यात स्वारस्य उरले नाही.

गेल्या दहा पंधरा वर्षात क्रिकेटचा अतिरेकच नव्हे तर अजीर्ण व्हायला लागले होते. पन्नास साठ वर्षांपूर्वी पॉली उम्रीगरसारख्या एकाद्या फलंदाजाने आयुष्यभरात दोन हजार धावा काढल्या तर तो मोठा विक्रम समजला जायचा, आता एकेका वर्षांत हजारावर धावा काढणेही सामान्य होऊन गेले आहे, कारण हे लोक बाराही महिने खेळतच असतात आणि पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात काढाव्यात तशा भरपूर धावा हे एक दिवसाच्या सामन्यातसुद्धा दणादण काढत राहतात. अतिपरिचयात अवज्ञा या नियमाप्रमाणे मी आजकाल त्या सामन्यांची दखल घेणे सोडूनच दिले होते. कोविडमुळे मध्ये बराच काळ खंड पडल्यानंतर आता पुन्हा त्यात थोडा रस घ्यायला सुरुवात केली आणि बऱ्याच काळानंतर एक कसोटी सामना पाहिला.

. . . . . 

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जात असलेल्या या मालिकेतला पहिला सामना पाहिल्यानंतर मी हा लेख लिहिला होता. त्या सामन्यात भारतीय संघ चारी मुंड्या चीत झाला असला तरी तो पुन्हा आपले डोके वर काढेल अशीआशा मी बाळगली होती. त्याप्रमाणे दुसऱ्याच सामन्यात नवा कप्तान झालेल्या अजिंक्य रहाणे याने दमदार फलंदाजी करून शतक झळकावले, इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली आणि गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोनदा बाद करून भारताला विजय मिळवून दिला आणि साखळीत बरोबरी गाठली.

 तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला होता आणि भारताची सुरुवातही बरी झाली नव्हती, पण नंतर आलेल्या खेळाडूंनी घसरगुंडी होऊ न देता जरा सन्माननीय अशी धावसंख्या काढली तरी ती ऑस्ट्रेलियाच्या मानाने खूप कमीच होती. मग ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आणखी धावा काढून त्यांचा डाव घोषित केला. आपले गोलंदाज त्यांच्या पूर्ण संघाला बाद करू शकले नाहीत. अशा प्रकारे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मुठीतच होता. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी बरी झाली नाहीच. हा सामना जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हती, शक्य तितका वेळ मैदानावर टिकून राहणे एवढ्याच उद्देशाने खेळणे चालले होते, तरीही सर्व मुख्य फलंदाज बाद होऊन गोलंदाज शिल्लक उरले होते आणि त्यांना गुंडाळायला ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला फार वेळ लागणार नाही अशी लक्षणे दिसत होती. त्यावेळी क्रीजवर असलेला हनुमाविहारी याला मुद्दाम कसोटी सामन्यासाठी पाठवले असले तरी तो आतापर्यंत फेल गेला होता आणि या सामन्यातही जायबंदी झाला होता.  तो लंगडत लंगडत कसाबसा चालत होता. त्याच्या जोडीला असलेला अश्विन हा खरे तर गोलंदाज म्हणून संघात आलेला पण फलंदाजीत प्रवीण झालेला होता.  ऑस्ट्रेलियाच्या जलदगति गोलंदाजांनी तुफान भेदक मारा चालवला होता, त्यांचे उसळते चेंडू फलंदाजांची अंगे सुजवून काढत होते. तरीही या दोघांनी कमालीच्या धैर्याने आणि जिद्दीने तो मार सहन करत डोके शांत ठेऊन दीड दोन तास खिंड लढवली आणि ते अखेरपर्यंत नाबाद राहिले. हा सामना अनिर्णित राहिलेला पाहूनच केवढा आनंद झाला. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळाची आठवण झाली.

चौथा कसोटी सामना सुरू झाला तेंव्हा संघातले चारपाच खेळाडू जखमी होते. बूमरा आणि शमी हे आपले दोन्ही आघाडीचे जलदगति गोलंदाज खेळू शकणार नव्हते, तसेच तिसऱ्या सामन्यातला हीरो विहारीही नव्हता. मुख्य फलंदाज कप्तान विराट कोहली तर आधीच भारतात परत आला होता, आघाडीचा फलंदाज धवनही नव्हता. त्यामुळे राखीव म्हणून नेलेल्या तरुण होतकरू खेळाडूंना घेऊन आपला संघ मैदानावर उतरला होता. या संघाकडून कुणीही फार अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. अजून जास्त लाज न घालवता हा दौरा कसाबसा पूर्ण करायला हवा म्हणून ते बचावाचा खेळ खेळतील असे वाटले होते आणि खेळाची सुरुवातही तशीच झाली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. आपल्या आघाडीच्या फलंदाजांनी हळू हळू धावा जमवत फॉलो ऑनची नामुष्की टाळली तेंव्हा पहिला सुस्कारा सोडला. तरी तोवर अर्धा संघ गारद झाला होताच. पण त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूर आणि सुंदर यासारख्या नवख्या खेळाडूंनी भलत्याच चिकाटीने खेळून तीनशेचा टप्पा पार केला आणि पहिल्या डावातील धावसंख्यांमधला फरक अगदी मामूली ठेवला. तरीही ऑस्ट्रेलियाच पुढे राहिली होती आणि चांगल्या परिस्थितीत होती. दुसऱ्या डावात मात्र आपल्या नव्या गोलंदाजांनी जीव ओतून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाला आळा घातला आणि त्यांचे सर्व खेळाडू बाद केले. आताही सामना जिंकण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात तीनशेवर धावा करण्याचे मोठे आव्हान होते. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये भारताने तेवढी मजल मारली नव्हती. ब्रिस्बेनचे हे मैदान ऑस्ट्रेलियाला नेहमी यशस्वी करत आले होते आणि तिथे त्यांचाच विजय अपेक्षित होता.  त्यात आपला भरोशाचा रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या पुजाराने कमालीचा बचाव केला. तो स्टंप्सवर येणारे सगळे चेंडू फक्त अडवत आणि न येणारे चेंडू सोडून देत राहिला, फटके मारून रन्स काढण्याचा प्रयत्नच करत नव्हता. दुसऱ्या बाजूने शुभमन गिल बऱ्यापैकी चांगला खेळून स्कोअर वाढवत होता, पण नव्वदीत आल्यावर तो बाद झाला. नंतर आलेल्या फलंदाजांनीही संथ धोरणच चालू ठेवले होते. तिसऱ्या कसोटीप्रमाणेच हा सामनाही अनिर्णित ठेवण्यात यश मिळेल असा विश्वास वाटयला लागला होता. 

महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संघात आलेला ऋषभ पंत खेळायला आला आणि त्याने धुवाँधार फलंदाजी करून सगळे चित्र बदलून टाकले. वीस षटकांच्या सामन्यातले फटके मारून चौकार षटकांची आतिशबाजी सुरू केली. विजय नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर तो मिळवण्यासाठी सुरू केलेल्या घाईत समोरचे दोन तीन फलंदाज बाद झाले, तरी ऋषभने वेळ संपायच्या आत आवश्यक तेवढ्या दावा काढून विजयश्री खेचून आणली तेंव्हा सगळे हक्केबक्के होऊन गेले. सामन्याच्या अगदी शेवटच्या तासात मिळालेल्या या अनपेक्षित विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या क्षेत्रात नवा इतिहास घडला असे म्हणता येईल. या निमित्याने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमी लोकांचे लक्ष कसोटी सामन्यांकडे वळले.       

 

Wednesday, December 02, 2020

तेथे कर माझे जुळती -२० : डॉ.अनिल काकोडकर

 

 "माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या मालिकेत मी दोन शब्द लिहायचे ठरवले आहे. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल काही ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि माझा तसा उद्देशही नाही. "माझी या थोरांबरोबर ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. मी फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे." असे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेच्या पहिल्याच भागात स्पष्ट केले होते. आज मी अशाच एका महान आणि प्रसिद्ध अशा व्यक्तीबद्दलच्या माझ्या वैयक्तिक आठवणी या लेखात लिहिणार आहे. त्यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेतच, त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे माझ्या कुवतीबाहेर आहे. 

मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास होताच माझी अणुशक्तीखात्यात निवड झाली आणि मी त्यांच्या ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो. हे वर्षभराचे प्रशिक्षण पोस्टग्रॅज्युएशन करण्यासारखे होते. तेंव्हा आम्हाला  क्लासरूममध्ये निरनिराळे अनेक विषय शिकवले गेले.  मात्र ते शिकवणारे बहुतेक सर्वजण अणुशक्तीखात्यात आधीच काम करत असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ होते. आमच्या बॅचमध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांमधून आलेले निरनिराळ्या भाषा बोलणारे ट्रेनीज होते आणि अशा सर्वांबरोबर राहून एकमेकांना समजून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आम्हाला शिकवायला येणाऱ्यांमध्येही तामीळ, तेलुगु, बंगाली, पंजाबी वगैरे वेगवेगळ्या भाषा बोलणारे तज्ज्ञ होते, त्यात एकादा मराठी गुरु भेटला तर आम्हा मराठी मुलांना मोठा आनंद होत असे.

काही आठवडे गेल्यावर एके दिवशी एक साधारणपणे आमच्याच वयोगटातले तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव "अनिल काकोडकर" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना.  ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते.  'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र  भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी ऐकले नव्हते. बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले.  बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल.   

आमचे क्लासरूममधले शिक्षण संपत आल्यावर आम्हाला दोन तीन आठवडे बीएआरसीमध्ये प्रात्यक्षिकांसाठी पाठवले गेले. त्यात आम्हा पाचसहा जणांच्या ग्रुपला रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले.  अनिल काकोडकर तिथेच कार्यरत होते आणि सगळ्या इतर सीनियर अधिकाऱ्यांच्या तुलनेत ते नवीन असले तरी त्यांच्याकडे खूप महत्वाची स्वतंत्र कामगिरी दिलेली होती. पण त्यांनी त्यातून वेळ काढून आम्हाला त्या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामांची माहिती समजाऊन सांगितली. तो कारखाना नसल्यामुळे तिथे सतत चातत राहणारी अशी रूटीन प्रकारची कामे नव्हतीच आणि  चार दिवसांसाठी आलेली आम्ही नवखी मुले संशोधनाच्या गुंतागुंतीच्या कामात फारसा काही हातभार लावू शकणार नव्हतो. त्यामुळे एकदा सगळी प्रयोगशाळा पाहून झाल्यानंतर आम्ही लायब्ररीत बसून पुस्तके वाचणे आणि गप्पाटप्पांमध्ये आपला बराचसा वेळ घालवत होतो.   

एकदा आम्ही तीनचार मराठी मित्र चहापान करत असतांना अनिल काकोडकरही तिथे आले आणि मोकळेपणे आमच्या वार्तालापात सामील झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल कुतूहल तर होतेच. आमच्यातल्या एका आगाऊ मुलाने विचारले, "का हो, ते चंद्रकांत काकोडकर तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?" त्या काळात त्यांच्या पॉकेटबुकमधल्या सवंग कादंबऱ्या खूप खपत असत. काकोडकरांनी हसत हसत म्हंटले, "नाही, ते फक्त आडनावबंधू आहेत." मग दुसऱ्या कुणीतरी म्हणाले, "आणखी एक काकोडकर प्रसिद्ध आहेत, पुरुषोत्तम काकोडकर." त्यांचा गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा सहभाग होता आणि ते तिथले एक प्रमुख राजकीय पुढारी असल्यामुळे त्यांचे नाव वर्तमानपत्रात नेहमी येत असे. अनिल काकोडकरांनी अत्यंत शांतपणे सांगितले, "ते माझे वडील आहेत." हे उत्तर ऐकल्यावर तर आम्ही सगळे हादरलोच, कारण आमच्यातल्या कुणाचाच कुठल्याही राजकीय पु़ढाऱ्याशी दुरूनही कधीच संबंध आला नव्हता. त्यानंतर त्यांना आणखी काही खोदून विचारायची हिंमत कुणालाच झाली नाही आणि त्यांनीही आम्हाला आपल्या प्रसिद्ध वडिलांबद्दल एक अक्षरही जास्त काही सांगितले नाही.

ट्रेनिंग संपल्यावर मी वेगळ्या ऑफीसात कामावर रुजू झालो, अनिल काको़डकर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याचे माझ्या कानावर आले. ते परत आल्यानंतर त्यांच्या प्रगतिविषयीच्या बातम्या अधून मधून येत होत्या, पण आमचा थेट संपर्क नव्हता. अनेक वर्षांनंतर मला अणुशक्तीनगरमध्ये रहायला जागा मिळाली आणि अनिल काकोडकरही आमच्या भागातल्या दुसऱ्या इमारतीत रहायला आले. आमचे काही समाईक मित्रही झाले आणि त्यांच्यामार्फत आमची पुन्हा नव्याने ओळख झाली. कधी कधी आम्ही बाजारात, दुकानांमध्ये किंवा रस्त्यावरून हिंडत असतांना ते समोर दिसायचे आणि  नमस्कार, हॅलो करत करत आमची ओळख हळूहळू वाढत गेली.  पीपीईडीमधल्या माझ्या ऑफीसमध्ये मी फ्यूएल हँडलिंग सेक्शनमध्ये काम करत होतो आणि  बीएआरसीमध्ये या विषयावरही  संशोधन होत असते.  त्यामुळे माझे त्यानिमित्य तिथे जाणेयेणे होत होते. बीएआरसीमधला संबंधित विभाग कालांतराने काकोडकरांच्या हाताखाली आला आणि कामानिमित्य  माझीही कधी कधी त्यांच्याशी भेट व्हायला लागली. बीएआरसीमध्ये होत असलेल्या सेमिनार्स, सिंपोजियम्स वगैरे कार्यक्रमांमध्ये अनिल काकोडकरांचा महत्वाचा सहभाग असायचा आणि त्यात ते प्रामुख्याने दिसायचे, तसेच त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकायची संधी मला मिळत असे. अशा अनेक प्रकारे ते नेहमीच डोळ्यासमोर असायचे.

अणुशक्तीखात्यामधील शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांना बढती मिळण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्यांनी केलेले काम आणि मिळवलेले ज्ञान तसेच अनुभव वगैरे गोष्टींची यात जरा कसून तपासणी करून योग्य व्यक्तींची पारख केली जाते. अनिल काकोडकर असे इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका कमिटीचे वर्षानुवर्षे अध्यक्ष होते.  त्या काळात काही वेळा मलाही त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तेंव्हा ते प्रत्येक कँडिडेटला जशा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यावरून मला दिसले की इंजिनियरिंगच्या सगळ्या ब्रँचेसमधल्या सगळ्या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होतेच, तसेच अणुशक्तीखात्याच्या भारतात अनेक ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काय काय काम चालत होते, कोणत्या बाबतीत नेत्रदीपक प्रगति होत होती, कुठे कोणत्या अडचणी येत होत्या वगैरेंची खडान खडा माहिती त्यांना होती.  त्यांच्या आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीला सीमा नव्हती.  पुढे जाऊन या खात्याचे प्रमुख व्हायची तयारी त्यांनी खूप वर्षे आधीपासून केली होती.

एकदा मी पीपीईडी आणि बीएआरसीमधल्या काही सहकाऱ्यांबरोबर एका सेमिनारसाठी रावतभाट्याला गेलो होतो. रात्रीची जेवणे झाल्यानंतर माझे वरिष्ठ (बॉस) आणि एक कनिष्ठ सहकारी यांच्याबरोबर मी तिथल्या वर्कशॉपमध्ये गेलो. अनिल काकोडकरही वेगळ्या जीपमधून तिथे आले. तिथे एक नवीन उपकरण तयार करण्याचे काम चालले होते. ते पाहून परत येतांना काकोडकरांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घेतले. या उपकरणाच्या बाबतीत त्यांचे माझ्या बॉसशी काही मतभेद आहेत हे मला माहीत नव्हते आणि माझा त्या उपकरणाशी काहीच प्रत्यक्ष संबंध नव्हता हे काकोडकरांना माहीत नसावे. मी त्यांना निव्वळ ऐकीव माहितीवरून काही तरी थातुरमातुर सांगत होतो ते त्यांना पटत नव्हते किंवा मी काही लपवाछपवी करतोय असा त्यांचा ग्रह झाला असावा. त्यामुळे मी ही गोंधळून गेलो होतो आणि तो संवाद सुरळीत होत नव्हता. माझ्या बोलण्यात अनवधानाने काही चूक झाली म्हणा किंवा त्याचा जो अर्थ त्यांनी घेतला तो मला अभिप्रेत नव्हता असे काहीतरी झाले आणि ते माझ्यावर नाराज झाले हे मला जाणवले. दुसऱ्याच्या मनातले ओळखून त्याला रुचेल असे पण आपल्या लाभाचे कसे बोलावे ही कला ज्यांना अवगत असते ते लोक नेहमी यशस्वी होतात, पण माझ्याकडे ती कला नाही म्हणून मी माझ्या ऑफिसातल्या वरिष्ठांशीसुद्धा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. इथे काकोडकर तर परके होते आणि त्या वेळी ते अजून खूप उच्च पदावर पोचले नव्हते. पण त्यांच्या गुडबुक्समध्ये जाण्याची एक आयती मिळालेली संधी मी वाया घालवली याची रुखरुख मात्र माझ्या मनात राहिली.

आणखी एकदा मला शनिवारी का रविवारी फोर्टमध्ये काही कामासाठी जायचे होते म्हणून मी अणुशक्तीनगरच्या  बसस्टॉपवर गेलो. योगायोगाने तिथे अनिल काकोडकरही आले आणि आम्ही शेजारी बसून चर्चगेटपर्यत प्रवास केला आणि खूप गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःची कार घेतली नव्हती कारण कॉलनीमधले इतर अधिकारी रोज उठून जी 'कारसेवा' करतांना दिसायचे ते करणे त्यांना मंजूर नव्हते असे त्यांनीच मला सांगितले. खरे तर काकोडकरांच्या त्या वेळी असलेल्या हुद्द्याप्रमाणे त्यांच्याकडे ऑफिसची गाडी होती, पण ती ऑफिसच्या कामासाठीच वापरायची हा तत्वनिष्ठ दंडक ते पाळत होते. त्या दिवशी तेही कदाचित व्यक्तिगत कामासाठी बाहेर पडले होते, म्हणून त्यांनी बीईएसटी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्या सुविद्य पत्नींनासुद्धा मी बसने जातायेतांना पाहिले होते.  त्या दिवशी झालेल्या बोलण्यात त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भरपूर भर घातलीच, त्यांच्या भविष्यकाळातल्या काही योजना आणि स्वप्ने यांचीही थोडीशी चुणूक दाखवली. पुढे मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी अंमलात आणल्यासुद्धा. 

त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बीएआरसीमध्ये फास्टट्रॅकवर प्रमोशन्स मिळवली तसेच भराभर एक एक पायरी चढत ते बीएआरसीचे डायरेक्टर झाले.  त्यानंतर ते लवकरच अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर जाऊन पोचले आणि बरीच वर्षे त्या पदावर राहिले. पोखरण येथे झालेल्या पहिल्या परीक्षणामध्येही त्यांचा सहभाग होता असे नंतर कानावर आले होते, पण तेंव्हा त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. तिथल्या दुसऱ्या परीक्षणाच्या वेळी मात्र अब्दुलकलामांच्याबरोबर काकोडकरांचेही फोटो नियतकालिकांमध्ये छापून आले. त्यांना सरकारकडून सर्वोच्च पातळीचे सुरक्षाकवच देण्यात आले आणि ते अणुशक्तीनगर सोडून मलबार हिलवरील जास्त सुरक्षित जागेत रहायला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांचे पूर्वीप्रमाणे सहज जाता येता भेटणे बंद झाले.  मीही हळूहळू थोड्या वरच्या पदावर गेल्यामुळे ऑफीसच्या कामासाठी किंवा एकाद्या मीटिंगवगैरेसाठी माझे त्यांच्या ऑफिसात जाणे होत राहिले, पण ते भेटणे वेळेअभावी  बहुतेक वेळा फक्त औपचारिक स्वरूपाचेच असायचे. 

अनिल काकोडकर उच्च पदावर गेल्यानंतरही त्यांनी सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा परिपाठ कायम ठेवला होता. माझ्या मुलांच्या लग्नांच्या स्वागतसमारंभाला ते आवर्जून आले होते, तसेच त्यांच्या मुलीच्या विवाहसमारंभाला आम्ही भुलाभाई देसाई रोडवरील आवारात गेलो होतो. तेंव्हा आमच्यात चार शब्द बोलणेही झाले होते.  नंतर आम्हाला असे समजले की अनिल काकोडकर त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईबरोबर मध्यप्रदेशातील ज्या गावी रहात होते त्याच गावात माझ्या सुनेच्या आईचे लहानपण गेले होते आणि त्या काकोडकर कुटुंबाला अगदी जवळून ओळखत होत्या. यामुळे आमच्यातल्या स्नेहसंबंधाला आणखी एक धागा जोडला गेला.

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा माझ्या ऑफीसशी काहीच संबंध राहिला नाही. अनिल काकोडकर वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी त्यांना एक्स्टेन्शन्स मिळत जाऊन ते आणखी काही वर्षे आपल्या पदावर कार्यरत होते, पण आता त्यांना भेटण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यानंतर दोनदाच आमची भेट झाली ती दोन पुस्तकांच्या प्रकाशनांच्या निमित्याने. अनिल काकोडकरांच्या मातोश्री श्रीमती कमलाताई काकोडकर यांच्या समर्पित जीवनावर आधारलेला 'एक धागा सुताचा' या नावाचा आत्मचरित्राच्या रूपाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाचे आमंत्रण मला मिळाले आणि मी त्याला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांमधली अनेक मोठमोठी माणसे आली होती आणि स्वतःच्या आईचाच कार्यक्रम असल्यामुळे अनिल काकोडकर तर ठळकपणे उपस्थित होतेच. 

त्यानंतर आमच्या डॉक्टर अंजली कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य भगिनी डॉ. अनुराधा हरकरे यांनी मिळून 'फुलाला सुगंध मातीचा' या नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले.  यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. तिथेही माझी अनिल काकोडरांशी भेट झाली. या दोन्ही भेटी अर्थातच क्षणिक होत्या, पण तेवढ्यातही त्यांनी दाखवलेली ओळख आणि आपुलकी मला चांगली जाणवली.

अणुशक्ती आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा अनिल काकोडकर प्रकाशाच्या झोतातच राहिले आहेत. ते आता शिक्षण, संरक्षण, आरोग्य यासारख्या देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध विषयांशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांचे काम निरनिराळ्या पातळ्यांवरून पहात आहेत. त्यामुळे अचानक कधी तरी त्यांचे टी व्ही वर दर्शन घडते आणि हे महापुरुष आपल्या ओळखीचे आहेत या भावनेने माझा ऊर भरून येतो. त्यांना तर जगभरातले लक्षावधी लोक ओळखत असतील, पण ते मला ओळखतात याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि म्हणावेसे वाटते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."

Monday, September 14, 2020

तेथे कर माझे जुळती - भाग १९ - माझ्या आत्या


मला तीन सख्ख्या आत्या होत्या. सर्वात मोठ्या गंगूआत्या आमच्या जमखंडी गावातच रहात होत्या, मधल्या कृष्णाआत्या कल्याणला होत्या आणि धाकट्या सोनूआत्या आमच्यासोबतच रहायच्या. या वर्षातल्या पक्षपंधरवड्याच्या निमित्याने मी त्यांना ही शाब्दिक आदरांजलि वहात आहे.

गंगूआत्यांचे घर आमच्या घरापासून लहान गावाच्या मानाने थोडे दूर म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते, पण तो रस्ता बाजारपेठेमधून आरपार जाणारा एक हमरस्ता होता. त्यामुळे आम्हाला तो फार लांब वाटत नव्हता. मी नेहमी त्यांच्या घरी जात येत होतो आणि ती मंडळीही नेहमी आमच्याकडे येत असत. आमचे जवळजवळ एकत्र कुटुंब असल्यासारखेच होते. आमच्या गंगूआत्या मनाने फारच चांगल्या होत्या. त्या शांत, सोज्वळ, प्रेमळ, स्वाभिमानी आणि कमालीच्या सोशिक व समजुतदार अशा होत्या. जुन्या मराठी सिनेमांमधल्या एकाद्या सुस्वभावी आदर्श आईसाठी सुलोचनाबाईंच्या जशा भूमिका असायच्या तशा आमच्या या आत्या प्रत्यक्षात होत्या. त्यांना प्रभावी चेहेऱ्याबरोबरच गोड आवाजाची देणगीही मिळाली होती. त्यांनी संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते तरीही त्या भजने आणि जुनी गाणी अगदी तालासुरात गात असत आणि त्यांचे साधे गुणगुणणेसुद्धा मंजुळ वाटत असे .

आपले मोठे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि त्यासाठी पडतील तेवढे कष्ट करून आणि त्या ती जबाबदारी खंबीरपणे आणि शांतपणे पेलत होत्या. मी लहान असतांना मला त्याचे महत्व समजत नव्हते, पण मला जाण येऊ लागल्यानंतर त्यांचे मोठेपण समजत गेले.  माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबात माझ्या चुलत बहिणी होत्या आणि माझा एक मावसभाऊही आमच्याकडे रहायचा. त्यात गंगूआत्यांची मुले आल्यावर घराचे गोकुळ होत असे. त्या काळात सख्खी, चुलत, मावस, आत्ते, मामे अशी सगळी भावंडे सगळ्यांसाठी सारखीच असायची. घरातले तसेच घरी आलेले सगळे मुलगे आपले भाऊ आणि सगळ्या मुली आपल्या बहिणी असायच्या. घरातली मोठी माणसेसुद्धा आमच्यात भेदभाव करत नव्हती. आमच्यातली ही आपुलकी पुढेही टिकून राहिली याचे श्रेय माझी आई आणि गंगूआत्या या दोघींना आहेच. त्यातही कुणावर न चिडता, न रागावता मुलांची शांतपणे समजूत घालण्याची अवघड कला गंगूआत्यांना चांगली अवगत होती.  त्यामुळे त्यांचा मोठा वाटा आहे. 

आमच्या गंगूआत्या कामाला वाघ होत्या, त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा, कुणा पूर्वजांचे श्राद्धपक्ष असे काही कार्यक्रम असले, कोणी पाहुणे आले किंवा दिवाळीचा फराळ करायचा असला तर अशा वेळी  मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करावा लागत असे. त्या वेळी गंगूआत्या पुढाकार घेऊन आणि गरज असल्यास मुलामुलींना हाताशी घेऊन हसत खेळत त्या सगळ्या कामांचा फडशा पाडत असत. स्वयंपाकघरातल्या अशा प्रकारच्या सामुदायिक मोहिमांची दृष्ये अजून माझ्या डोळ्यासमोर येतात.   

गंगूआत्यांचा मोठा मुलगा विद्याधर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीता कामाला होता. त्यांच्या कंपनीला बीएआरसीतल्या एका मोठ्या बिल्डिंगचे काम मिळाले तेंव्हा विद्याधरची त्या कामावर नेमणूक झाली. त्यांच्यासाठी अणुशक्तीनगरमधल्या एका मोकळ्या जागेत लहानशी तात्पुरती वसाहत बांधली गेली आणि त्यात ते लोक रहायला आले. मी जमखंडी सोडल्यानंतर पंधरासोळा वर्षांनी पुन्हा एकदा गंगूआत्या आमच्या घराच्या जवळ रहायला आल्या आणि आमचे नेहमी एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. आता त्या प्रेमळ आजीच्या भूमिकेत आल्या होत्या आणि आमच्याबरोबर माझ्या मुलांनाही  त्यांची माया मिळाली. त्या काळात माझी आईही आमच्याकडे रहात होती. त्या दोघींचीही पुन्हा एकदा गट्टी जमली आणि जुन्या काळातल्या आठवणींची उजळणी होत राहिली. अशी तीन चार वर्षे मजेत गेल्यावर ते बीएआरसीमधले बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर गंगूआत्या आणि आपल्या कुटुंबासह विद्याधर डोंबिवलीला रहायला गेला, पण आम्हाला जमेल तसे आमचे एकमेकांकडे जाणे येणे होत राहिले.

माझ्या दुसऱ्या आत्या म्हणजे कृष्णाआत्यासुद्धा पूर्वीच्या काळी जमखंडीतच रहात होत्या असे मी ऐकले आहे, पण मला समजायला लागले तेंव्हापासून मात्र त्या मुंबईजवळील कल्याणला स्थाईक झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबाची कल्हळ्ळीच्या व्यंकटेशावर अपार श्रद्धा आहे. व्यंकोबाचे दर्शन घेण्यासाठी त्या मुलांसह अधून मधून जमखंडीला येत असत आणि त्यांचे आमच्याकडे काही दिवस माहेरपणही होत असे. प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांचे अगत्याने स्वागत होत असे आणि त्याही घरातल्याच होऊन जात. तेंव्हा त्या कल्याण मुंबईच्या वेगळ्या शहरी जीवनाच्या गंमती जंमती तेवढ्या आम्हाला सांगत असत. त्यासुद्धा खूप प्रेमळ, अगत्यशील आणि मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आमच्या लीलाताईचे म्हणजे माझ्या चुलत बहिणीचे लग्न दादरला करायचे ठरले तेंव्हा आम्ही सर्व मंडळी कल्याणला जाऊन कृष्णाआत्यांच्या घरातच उतरलो होतो आणि तिथले प्रत्यक्षातले शहरी जीवन पाहिले होते. पुढे मी शिक्षण आणि नोकरीसाठी मुंबईत आलो तेंव्हा कृष्णाआत्या आणि नाना माझे एक प्रकारचे स्थानिक पालक (लोकल गार्डियन) होते. वयपरत्वे त्यांना प्रवास करणे शक्य होत नव्हते, पण मी मात्र तीन चार महिन्यात अचानक कल्याणला एकादी चक्कर टाकून त्यांना भेटून येत होतो आणि हक्काने एकादा दिवस त्यांच्या घरी रहातही होतो. तेंव्हा माझेही अत्यंत प्रेमाने आणि अगत्याने स्वागत होत असे. पुढे मी संसाराला लागल्यावर त्याचे प्रमाण कमी कमी होत गेले.

माझ्या जन्माच्याही आधी आमच्या सोनूआत्यांना दुर्दैवाने वैधव्य येऊन त्या माहेरी परत आल्या होत्या आणि शिक्षण पूर्ण करून जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेचे काम करायला लागल्या होत्या. त्यांचे सासरचे आडनाव करंदीकर असले तरी गावात आणि शाळेतही त्यांना 'घारेबाई' याच नावाने ओळखले जात होते. त्या घरातली एक प्रमुख मोठी व्यक्ती म्हणून आमच्याबरोबर  रहात होत्याच, शिवाय त्यांची शाळा, तिथल्या इतर शिक्षिका आणि विद्यार्थिनी यांचे एक वेगळे विश्व होते. त्यांच्या त्या विश्वातली मुळगुंद सोनूताई आणि सुब्बाबाई ही नावे मला साठ वर्षांनंतर अजून आठवतात. सोनूआत्यांचा हा ग्रुप नेहमी भेटून काही ना काही प्लॅन करायचा. एकदा तर त्या मिळून भारताच्या सहलीवरसुद्धा गेल्या होत्या असे मला आठवते.

सोनूआत्यांकडे  विलक्षण  निरीक्षणशक्ती, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती होती. त्या किती तरी जुन्या घटनांचे अतीशय बारकाईने तपशीलवार वर्णन करून सांगायच्या. त्यांना भेटलेल्या किंवा त्यांच्या माहितीतल्या माणसांची संख्या अमाप होती. "ही शांता म्हणजे आपल्या गोदीच्या नणंदेच्या जावेच्या मावसबहिणीची शेजारीण" अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या साखळ्या त्या बोलता बोलता सहजपणे उलगडून दाखवत आणि त्या नेहमी अचूक असत. मी तर त्यांना 'नात्यांचा काँप्यूटर' असेच म्हणेन. जमखंडीच्या लहान विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी काय नाते होते, इतकेच नव्हे तर त्यांचे आपसातले संबंध कसे होते हे त्यांना पक्के माहीत असायचे. त्यांना माणसांची चांगली पारख होती. "कुणीही काही सांगितले तर त्यावर भोळसटपणे विश्वास ठेवायचा नसतो. त्यामागे त्याचा काय हेतू असू शकेल हे आपण त्याला कळू न देता पहायला पाहिजे". वगैरेसारखी मॅनेजमेंटची तत्वे त्यांना चांगली माहीत होती हे त्यांच्या बोलण्या आणि वागण्यामधून अप्रत्यक्षपणे व्यक्त होत असे. लहान मुलांनी मोठे होत असतांना दुनियादारीसुद्धा शिकून घेणे कसे गरजेचे आहे याचे काही धडे आम्हाला त्यांच्याकडून मिळत गेले.      

सोनूआत्या नेहमी घरातल्या सर्वांशी अगदी मिळून मिसळून छान मजेत गप्पागोष्टी करत असत, पण त्यांचे टेंपरामेंट जरा वेगळे होते. त्यांचा पारा जरासा लवकर चढत असे आणि उतरतही असे. कदाचित त्यांच्या लहानपणी त्या घरातल्या सर्वात लहान असल्यामुळे सगळ्यांकडून त्यांची खूप काळजी घेतली जात असणार यामुळे असेल, पण कळत नकळत त्या फटकन दुखावल्या जाऊन त्यांचा मूड जाऊ नये अशी काळजी सर्वांकडून घेतली जात असे.  त्यांच्याशी बोलतांना जरा जपून बोलावे लागत असे. कदाचित त्या माझ्यावर कधीच रागावल्या नसतीलही, पण तरीही मला त्याचाच थोडा धाक वाटायचा. त्यांना घरकामाची किंवा स्वयंपाकपाण्याची मनापासून फारशी आवड नव्हती आणि त्या बाबतीत त्या विशेष पुढाकार घेत नव्हत्या. कदाचित त्या वेळी मला असे वाटणे चुकीचेही असेल, पण माझी लहानपणची आठवण अशीच आहे. 

माझ्या आत्यांना जावई, सुना, नातवंडे वगैरे पहायला मिळाली. माझ्या मनात त्यांच्या कितीतरी खूप जुन्या आठवणी आहेत, त्या सांगाव्या तितक्या कमीच आहेत. माझ्या संस्कारक्षम वयात माझ्या मनाची जी जडणघडण होत गेली त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या आठवणी आल्यावर आज एवढेच म्हणावेसे वाटते, "तेथे कर माझे जुळती." 


Saturday, September 12, 2020

लास व्हेगासची सहल

 


पूर्वीच्या काळी संपर्काची आणि दळणवळणाची साधने फारच कमी होती. त्यामुळे अत्यावश्यक काम असले तरच लोक नाइलाजाने प्रवास करायचे. परगावी राहणाऱ्या लोकांची हालहवाल बहुतकरून फक्त टपालामधूनच कळायची. माझ्या लहानपणी तर आमचे घर, आमची शाळा, माझे मित्र आणि आमचे गाव एवढेच माझे अगदी पिटुकले जग होते. मला तरी त्याच्या पलीकडच्या जगाची अतीशय पुसट अशी कल्पना होती.  

त्या काळात क्वचित कधी तरी शाळेतला एकादा मुलगा काही कारणाने मुंबईला जाऊन यायचा. तिथे तो एकाद्या चाळीत राहणाऱ्या नातेवाइकाकडेच जायचा, पण तिथले लोक त्याला थोडी मुंबई दाखवायचे, म्हणजे राणीची बाग, हँगिंग गार्डन, राजाबाई टॉवर, गेटवे ऑफ इंडिया वगैरे आणि जातायेतांना बोरीबंदर आणि फ्लोरा फाउंटन अशी ठिकाणे दाखवायचे, एकादे वेळा त्याला चौपाटीवरची भेळ आणि वीरकर किंवा तांबे अशांच्या हॉटेलातला बटाटा वडा, साबूदाणा वडा खायला घालायचे, एकादा सिनेमा दाखवून आइस्क्रीम नाहीतर शीतपेय घेऊन द्यायचे, लोकल ट्रेन, ट्रॅम आणि बेस्टच्या  बसमधून फिरवायचे. हे इतके सगळे करणे म्हणजे आमच्या दृष्टीने चैनीची अगदी पराकाष्ठा होती आणि त्याला 'जिवाची मुंबई करणे' असे म्हणत असत. तो मुलगा परत आल्यावर या सगळ्या गंमती रंगवून सांगत रहायचा, यातले काहीच न अनुभवलेली बाकीची सगळी मुले ते वर्णन कान टवकारून आणि डोळे विस्फारून ऐकत आणि त्या मुलाचा हेवा करत असत.

आता लहान गावांकडली परिस्थितीसुद्धा पार बदलली आहे, सर्वांच्या घरात टीव्ही आणि खिशात स्मार्टफोन आले आहेत त्यावर त्यांना सगळे जग दिसते, गावातच सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात आणि तिथले लोकसुद्धा पर्यटन करण्यासाठी भरपूर इकडेतिकडे फिरायला लागले आहेत. त्यामुळे आता  'जिवाची मुंबई करणे'  हा मराठीतला वाक्प्रचारच नाहीसा झाला आहे.  

अमेरिका ही तर चंगळवादी राहणीमानाची जननी आहे. तिथे मौजमजा करण्यासाठी सगळ्या गावांमध्ये रेस्तराँ, पब्स, क्लब्स, पार्क्स,  रिसॉर्ट्स वगैरे तर असतातच, अनेक ठिकाणी खास प्रकारचे अॅम्यूजमेंट पार्क असतात. अमेरिकेतले लोक जरा मोकळा वेळ मिळाला की कुठे जाऊन कशी धमाल करायची याचा विचार करतात. त्यांनी तर फक्त मौजमजा करण्यासाठी 'लास व्हेगास' या नावाचे एक शहरच बांधले आणि गेल्या काही दशकांमध्ये त्या नगराची सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. अमेरिकेतलेच नव्हे तर जगभरातले शौकीन लोक पैसे उधळून मजा करण्यासाठी त्या गावाला भेट देत असतात. या मौजमजेत जुगार, दारू आणि  निशाजीवन यांना प्राधान्य असल्यामुळे या गावाला 'सिनसिटी' असे टोपणनाव पडले आहे.

परमेश्वराने या जगाची अशी रचना केली आहे की 'ब्रह्म आणि माया' या द्वयीतल्या परब्रह्माची ओढ फक्त काही महान संतमहात्म्यांनाच लागते आणि बाकी सगळ्या सर्वसाधारण लोकांवर मायाच भुरळ  घालते. त्यामुळे लासव्हेगासची कीर्ती ऐकल्यावर मलाही आपण एकदा ते शहर पहायला हवे असे वाटायला लागले होते. माझ्याकडे उधळण्यासाठी जास्तीचे पैसे नसले तरी पैसेवाले इतर लोक तिथे जाऊन कशा प्रकारची वेगळी मौज करतात याचे मला मोठे कुतूहल होते. 


मागच्या वर्षी मी अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसजवळील टॉरेन्स या गावात मुलाकडे गेलो होतो. तिथून हे लास व्हेगास शहर कारने फक्त चार तासांच्या अंतरावर होते आणि तिथे राहणाऱ्या सगळ्या लोकांचे ते आवडते सहलीचे ठिकाण होते. माझा मुलगासुद्धा तिथे एकदा सहकुटुंब फिरून आला होता, पण त्यावेळी काही अडचण आल्यामुळे त्यांची ती ट्रिप मनाजोगती झाली नव्हती. मी तिथे असतांना ते शहर मलाही दाखवावे म्हणून त्यांनी पुन्हा लास व्हेगासला जाऊन यायचा बेत आखला. डिसेंबरच्या २६ आणि २७ तारखांच्या रात्री तिथल्या एका चांगल्या हॉटेलात रहायचे रिशर्वेशन मिळाले. आधी हूव्हर डॅम पाहून संध्याकाळपर्यंत लास व्हेगासला जाऊन पोचायचे, ती संध्याकाळ, रात्र आणि दुसरा पूर्ण दिवस 'जिवाचे लास व्हेगास' करून घ्यायचे असा विचार होता. 

पण त्या दिवशी घरातून निघता निघता दुपार होऊन गेली म्हणून हूव्हर डॅमला न जाता सरळ व्हेगासला जायले ठरवले. कारमधल्या जीपीसच्या सांगण्याप्रमाणे ते अंतर सुमारे साडेतीनशे मैल आणि लागणारा वेळ चार तास असे दिसत होते. त्यानुसार आम्ही संध्याकाळी पाचच्या सुमाराला तिथे पोचू अशी अपेक्षा होती. टॉरेन्सहून उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाला लागल्यावर थोड्याच वेळात दूर क्षितिजावर हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. टॉरेन्सला बर्फ पडण्यासारखी थंडी कधीच पडली नव्हती त्यामुळे आम्हाला ती दूरची शिखरे पाहूनच आधी छान वाटले. तासाभरानंतर आम्ही त्या डोंगराळ भागातूनच जायला लागलो आणि वरून हिमवर्षाव सुरू झाला. बर्फाचे ते कण भुरभुरत पडतांना पाहून आधी तर सगळ्यांना जास्तच मजा वाटायला लागली. 

 त्या महामार्गावरून तास दीड तास पुढे गेल्यानंतर  आमची गाडी  जीपीएसच्या आज्ञेनुसार एका लहान रस्त्याला लागली. तिथे अधून मधून दिसणाऱ्या दिशादर्शक पाट्यांवर कधी न ऐकलेल्या भलत्याच गावांची नावे दिसत होती. हा सगळा भाग पूर्वी स्पॅनिश लोकांनी भरलेला असल्यामळे त्या गावांची लॅटिन नावेही विचित्र वाटत होती. आपले काही चुकले आहे का ? अशी शंका आल्यामुळे मुलाने इंटरनेट, गुगल मॅप्स आणि जीपीएसवर तपासून पाहिले तेंव्हा असे लक्षात आले की अत्याधिक हिमवर्षावामुळे लास व्हेगासला जाणारा नेहमीचा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे आम्हाला शंभर दीडशे मैलांचा वळसा घालून तिथे पोचायचे होते आणि अर्थातच त्यासाठी दोनअडीच तासांचा जास्तीचा वेळ लागणार होता. व्हेगासला पोचायला तेवढा उशीर होणार असला तरी काही हरकत नाही असे म्हणत आम्ही पुढे जात राहिलो.

  त्या रस्त्याने पुढे जात असतांना आधी रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिमकणांची चादर पसरलेली दिसायला लागली आणि नंतर तर रस्ताच त्यांनी भरून गेला. बर्फावरून गाडी चालवली तर ती घसरण्याची शक्यताच नव्हे तर खात्री होती, त्यामुळे पुढे गेलेल्या गाड्यांच्या चाकांनी जेवढा भाग स्वच्छ करून त्यावर दोन काळे पट्टे ओढले होते त्या चाकोरीमधूनच आमची कार चालवणे भाग होते. त्यामुळे तो रस्ता रुंद असला तरी आता फक्त एकाच लेनचा झाला होता आणि त्यावरून जपून गाडी चालवायची असल्यामुळे तिचा वेगही कमी झाला होता.

आपल्याकडल्या महामार्गांवरून जातांनासुद्धा रस्त्यापासून थोड्या अंतरावर घरे, इमारती वगैरे दिसत असतात आणि तासा तासांच्या अंतरामध्ये अनेक हॉटेले, फूडमॉल्स, ढाबे वगैरे मिळतात. कॅलिफोर्नियाचा हा भाग मात्र पूर्णपणे निर्मनुष्य होता. रस्त्यामध्ये समोर पुढे जाणारी वाहने आणि उलट दिशेने आपल्याकडे येणारी वाहने सोडून माणसांचा कुठेही मागमूस दिसत नव्हता. जिकडे पहावे तिकडे बर्फ किंवा काही ठिकाणी उघडे बोडके डोंगर आणि काही ठिकाणची झाडी हेच दिसत होते. वाटेत गावेच नाहीत तर हॉटेले तरी कुठून असणार? तिथे वाटेत खायलाप्यायला काही मिळणार नाही याची आधीच कल्पना असल्यामुळे आम्ही वीस पंचवीस खाद्यपदार्थांची पाकिटे आणि तितक्याच पाण्याच्या बाटल्या डिकीमध्ये भरून आणि काही हाताशी ठेऊन निघालो होतो आणि ते खातपीत पुढे चाललो होतो. 

चार तासांचा असा प्रवास झाल्यावर एक विसाव्यावे ठिकाण दिसले म्हणून आम्ही त्याच्या समोर गाडी उभी केली. बाहेर जोरात हिमवर्षाव होत होता. आम्ही सर्वांनी आपापले ओव्हरकोट घालून स्वतःला नखशिखांत झाकून घेतले, हळूच कारचे दरवाजे उघडून बाहेर पडलो आणि निसरड्या रस्त्यावरून शक्य तेवढ्या झपझप त्या हॉटेलचे दार गाठले.  तिथे आत एक उंचापुरा, धिप्पाड आणि राकट माणूस बसलेला होता. अशा निर्जन ठिकाणी एकट्याने रहायला अशाच लोकांची गरज असते किंवा तेच तेवढी हिम्मत करू शकतात असे मला वाटून गेले. कदाचित तो रस्ता नेहमीच्या वहिवाटीचा नसावा यामुळे तिथे खाण्यापिण्यासाठी फारसे काही ठेवलेले दिसले नाही, ज्या थोड्या वस्तू होत्या त्या गारठून बर्फ झालेल्या होत्या. त्यातलीच दोन चार पाकिटे त्याने मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करून आम्हाला खायला दिली आणि वाफाळणाऱ्या गरम गरम कॉफीचे मग भरून दिले. 

त्याने अंगात थोडी ऊब आली. "तुम्ही लोक कुठे, व्हेगासला निघाला आहेत का?" त्या माणसाने चौकशी केली. आम्ही होकार दिल्यावर तो म्हणाला, "गुड लक !" ते ऐकून मला जरासे विचित्रच वाटले. तो असे का म्हणतोय् म्हणून आम्ही त्याला "तिथे सगळे ठीक आहे ना?" असे विचारले. त्याने मोबाईलवरच व्हेगासचे हवामान दाखवले. तिथेही हिमवर्षाव चालला होता आणि सगळे थोडेसे विस्कळित झाल्यासारखे दिसत असले तरी तसे ठीकठाकही वाटत होते. आम्ही आधीच चार तास बर्फातून प्रवास करत घरापासून इतके दूर आलो होतो आणि परत जाण्यापेक्षा पुढे जाऊन दोन अडीच तासात मुक्कामाला पोचायची अपेक्षा दिसत होती. "आलीया भोगाशी असावे सादर" असे म्हणत पुन्हा गाडीत जाऊन बसलो.  

आम्हाला हॉटेलमध्ये पोचायला उशीर होणार होता हे सांगण्यासाठी फोन लावायचा प्रयत्न केला. अमेरिकेतसुद्धा सिग्नलच्या रेंजचा प्रॉब्लेम असतोच. निरनिराळ्या मोबाइल फोनवरून अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर तो एकदाचा लागला. तिथल्या बाईंनी सांगितले की ते लोक आमचे रिझर्व्हेशन मध्यरात्रीपर्यंत आणखी कुणाला देणार नाहीत. ते ऐकून हायसे वाटले कारण आम्ही त्याच्या आधीच तिथे पोचणार याची आम्हाला खात्री वाटत होती.

तोपर्यंत दिवसही मावळून गेला होता आणि रस्त्यावरील गाड्यांच्या दिव्यांशिवाय कुठलाही उजेड दिसत नव्हता. सगळे डोंगर आणि झाडे अंधारात गुडुप झाले होते. त्या लहान रस्त्याने पुढे गेल्यावर एक मोठा रस्ता लागला, पण त्यावरून थोडेच पुढे गेल्यावर आम्ही दुसऱ्या एका लहान रस्त्याला लागलो. या रस्त्यावरून खूप गाड्या जात होत्या हे पाहून आधी थोडे बरे वाटले, पण पुढे गेल्यावर नजर पोचेल तिथपर्यंत गाड्यांच्या दिव्याची रांग दिसायला लागली आणि त्या गाड्यांची गति मंद मंद होत होत ती अगदी गोगलगायीसारखी झाली. तासाभरामध्ये आम्ही पाच मैलसुद्धा पुढे सरकत नव्हतो. हा ट्रॅफिक जॅम संपायची काही लक्षणेच दिसत नव्हती आणि त्या आडरानात काही माहिती सांगणारेही कोणी नव्हते. काही गाड्या उलट दिशेने जातांना दिसत होत्या. त्यामुळे हा रस्ता सुरू तर आहे असे वाटत होते, पण नंतर असे लक्षात आले की आमच्या दिशेने जात असलेल्या काही गाड्याच परत फिरून जात होत्या आणि त्यांनी व्यापलेली जागा रिकामी होत असल्यामुळे आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो.

उलट दिशेने जात असलेल्या एका गाडीमधल्या सज्जनाने वेग कमी करून आणि ओरडून सांगितले की आमचा तो रस्ता पुढे बंद केला आहे आणि व्हेगासला जाणाऱ्यांनी परत फिरून अमक्या तमक्या मार्गाने जावे. त्यामुळे आम्हीही परत फिरायचे ठरवले, पण रस्त्यातल्या डिव्हायडर्समुळे मागे फिरणेही अशक्यच होते. हळूहळू पुढे सरकत एका ठिकाणी काही गाड्या वळून परत फिरतांना दिसल्या, त्यांच्या मागोमाग आम्हीही यू टर्न घेतला आणि जीपीएसला वेगळ्या मार्गाने जाण्याची सूचना दिली.  खरे तर आम्ही व्हेगासहून ऐंशी मैलावर पोचलो होतो, पण या तिसऱ्या रस्त्याने त्यात आणखी दीडशे मैलांची भर पडली.

आता आम्हाला दुसरी चिंता वाटायला लागली. आम्ही निघतांना गाडीच्या तेलाची टाकी फुल्ल भरून घेतली होती आणि ती व्हेगासपर्यंत सहज पुरेल असे वाटले होते, पण आता ती रिकामी होण्याच्या मार्गावर होती आणि पुन्हा भरून घेणे आवश्यक झाले होते. अमेरिकेतल्या जीपीएसमध्ये अशी सोय आहे की त्यात जवळची गॅस स्टेशन्स कुठे आहेत ते दाखवतात. आम्ही आता ती शोधायला सुरुवात केली. सुदैवाने पंचवीस तीस मैलांवर एक गाव लागले. त्या रस्त्यावरल्या सगळ्या प्रवाशांची आमच्यासारखीच परिस्थिती असल्यामुळे तिथल्या गॅस स्टेशनवर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पण ते गाव सोडून दुसरीकडे जायचे झाले तर आणखी कुठे डिझेल मिळाले असते कुणास ठाऊक ? त्यामुळे वाट पाहण्याशिवाय आमच्याकडे काही गत्यंतरच नव्हते. अर्धापाऊण तासानंतर आमचा नंबर लागला आणि सुदैवाने त्या पंपवाल्याकडे भरपूर साठा असल्यामुळे आम्हाला गाडीत इंधन भरायला मिळाले. तोपर्यंत मध्यरात्रही होऊन गेली होती. आम्ही आपापल्या पोटाच्या टाक्याही भरून घेतल्या आणि गरज पडली तर रस्त्यातल्याच एकाद्या मोटेलमध्ये रात्र काढावी का अशी चर्चा करत पुढे जात राहिलो.     

तासाभरानंतर आम्हाला लास व्हेगासकडे जात असलेला एक महामार्ग लागला आणि लास व्हेगास अमूक इतके मैल असे दाखवणाऱ्या पाट्याही दिसायला लागला. आता या रस्त्यावर गाड्याही वेगात जात होत्या. आम्ही अखेर एकदाचे ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडलो होतो. सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुलाला आणि सुनेला बारा तासाहून अधिक वेळ ड्राइव्ह करत राहण्याचा ताण झालेला असला तरी आता अंगात थोडा उत्साह आला. लास व्हेगास शहरात शिरल्यानंतर तिथल्या चित्रविचित्र पण आकर्षक अशा भव्य इमारती दिसायला लागल्या. त्यांच्यावर केलेल्या नेत्रदीपक रोशणाईने त्या झळाळत होत्या. त्यांना पाहून सगळ्यांना हुरुप वाटायला लागला. अखेर रात्री दोनच्या सुमाराला आम्ही आमच्या गंतव्य स्थानी जाऊन पोचलो.    

आम्ही ज्या लक्झर हॉटेलचे बुकिंग केले होते त्याचा आकार एका अवाढव्य पिरॅमिडसारखा आहे. तो दुरून दिसायला लागला होता. काही मिनिटांमध्येच आम्ही तिथे पोचलो आणि गाडी पार्क करण्यासाठी भूमीगत (अंडरग्राउंड) पार्किंग लॉटमध्ये शिरलो. त्या अवाढव्य जागेत हजारो गाड्या शिस्तीत लावलेल्या होत्या, पण सगळीकडे फिरूनही एकही रिकामा गाळा दिसला नाही. कंटाळून रिसेप्शनला फोन लावला. त्यावर आम्हाला जमीनीवरील उघड्या (ओपन एअर) पार्किंग लॉटमध्ये जाण्याची सूचना मिळाली. तिकडे जाण्याचा मार्ग शोधत बाहेर पडलो. तिथेही हजारो गाड्या उभ्या केलेल्या होत्याच. पण त्या मैदानात जायच्या आधी हॉटेलच्या इमारतीत शिरण्याचा एक मागचा दरवाजा दिसला. बाहेरील कडाक्याची थंडी पाहता आम्ही आपले सामान घेऊन कारच्या बाहेर पडलो आणि त्या दरवाजातून आत शिरलो आणि फक्त मुलगा एकटाच गाडी पार्किंग करायला पुढे घेऊन गेला. 


आम्ही त्या दारातून आत शिरून पाहिले तर समोर एक मोठा कॉरीडॉर होता. आधी तिथले प्रसाधनगृह (वॉशरूम) शोधून काढले. फ्रेश झाल्यावर तिथेच मुलाची वाट पहात उभे राहिलो. तो आल्यावर आता कुठे जायचे हा प्रश्न होताच. तिथे कुणाला विचारायला कुणी माणूस तर दिसायला हवा ना ! सामान घेऊन त्या कॉरीडॉरमधून इकडे तिकडे पहात हळू हळू पुढे जात जात अखेर एकदाचे चेक इन काउंटर सापडले. रात्री अडीच वाजतासुद्धा त्याच्यासमोर प्रवाशांची भली मोठी रांग होती. तसे पाहता त्या काउंटरवर फक्त एक नंबर दाखवला की पुढची सगळी क्रिया काँप्यूटरवरून होत होती, तरीही त्या कामाला एकादे मिनिट तरी लागणारच.  अर्धा पाऊण तासांनी आम्हाला आमच्या खोल्यांचे नंबर आणि किल्ल्या मिळाल्या.  साडेचाार हजार खोल्या असलेल्या त्या टोलेजंग हॉटेलमधली आपली खोली शोधून काढणे हे सुद्धा एक दिव्यच होते, पण त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या पाट्या आणि दिशा दाखवणारे बाण सगळीकडे लावलेले होते. ते पहात पहात आम्ही आमच्या खोल्यांपर्यंत पोचलो.

आत छान प्रशस्त पलंगांवर पसरलेल्या मऊ मऊ गाद्या आमची वाटच पहात होत्या. अंगावरचे ओले ओव्हरकोट काढले, भिजलेले कपडे बदलले आणि त्या गाद्यांवर अंग झोकून दिले. तोपर्यंत पहाटेचे साडेतीन वाजून गेले होते. आदले दिवशी प्रवासात दमून गेले असल्यामुळे सगळेजण सकाळी आरामात उठलो आणि सकाळची कामे आटोपली. त्या हॉटेलमध्ये रूमसर्व्हिसची व्यवस्था दिसली नाही आणि ती असली तरी त्यात वेळ आणि पैसे खर्च होतील म्हणून आम्हीसुद्धा तिचा विचार केला नाही. तयार झाल्यावर आमच्या शिदोरीमधूनच चार घास खाऊन घेतले आणि खाली उतरलो.


लास व्हेगासचे हे लक्झर हॉटेल इजिप्शियन संस्कृतीच्या थीमवर बांधले आहे. इथे एका प्रचंड आकाराच्या पिरॅमिडमध्ये अनंत गेमिंग मशीन्स, कॉसिनोज, बार्स, दुकाने, कॉफीशॉप्स वगैरे मांडले आहेत. बाहेरच्या बाजूला एका पुरातन इजिप्शियन बाईचा  प्रचंड आकाराचा पुतळाही आहे. आत ठिकठिकाणी जुन्या काळातल्या इजिप्शियन राजाराण्यांचे आणि त्यांच्या दासदासींचे पुतळे ठेवले आहेत आणि त्याला साजेशीच विशिष्ट प्रकारची सुरेख सजावट सगळीकडे केली आहे. त्यांची माहिती देणारे फलकही जागोजागी ठेवले आहेत. या हॉटेलचा तळमजला म्हणजे एक प्रकारचे प्रदर्शनच आहे.  ते पहात पहात आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो.

लास व्हेगासच्या गजबजलेल्या भागाला 'स्ट्रिप' असे नाव आहे.  आमचे हॉटेल या स्ट्रिपवरच होते. त्यामुळे बाहेरच्या रस्त्यावर येताच पर्यटकांचे थवे तिथे हिंडतांना दिसायला लागले. त्या दिवशी मात्र आमचे दैव चांगले होते. आदल्या दिवशी आमचा पिच्छा पुरवणारा हिमवर्षाव थांबला होता आणि थोडे ऊन पडले होते. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. त्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना एकाहून एक सुंदर अशा भव्य इमारती होत्या. त्या बहुतेक टोलेजंग हॉटेलांच्या होत्या. शिवाय कुठे मॅनहॅटनमधल्या इमारती आणि स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा यांच्या प्रतिकृति असलेला न्यूयॉर्कचा देखावा तर कुठे आयफेल टॉवरसकट पॅरिस नगरीचा देखावा उभा केला होता. सगळीकडे ख्रिसमससाठी भरपूर सजावट केलेली होतीच.  तिथे सगळ्या खंडांमधले निरनिराळ्या वंशाचे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक निरनिराळ्या चित्रविचित्र पोषाखांमध्ये दिसत होते. त्यात कोणी लालबुंद गोरे, कोणी काळे कुळकुळित, कोणी पीतवर्णीय, कोणी ताडमाड उंच तर कोणी अतीशय बुटके, कोणी गलेलठ्ठ, कोणी काटकुळे, कोणी म्हातारे, कोणी तरुण, कुणाबरोबर लहान लहान मुले अशा सगळ्यांचा त्यात समावेश होता, पण सगळ्यांच्या अंगातून पुरेपूर उत्साह आणि उत्सुकता ओसंडून वाहतांना दिसत होती. 


या बहुतेक सगळ्या इमारतींमध्ये खालच्या एक दोन मजल्यांवर तरी असंख्य प्रकारची दुकाने होती. आपल्या वस्तू अत्यंत आकर्षकपणे मांडून पहाणाऱ्याला त्या घ्यायच्या मोहात पाडण्यामध्ये तर अमेरिकन लोक वाकबगार आहेतच. म्हणजे हा सगळा भाग एक अवाढव्य असे प्रदर्शन आणि गजबजलेला बाजारच होता. त्यात इकडेतिकडे पहात पहात फिरणाऱ्यांची अर्थातच खूप गर्दी होती.  आम्हीसुद्धा कधी दुकाने आणि कधी माणसे यांच्याकडे पहात पहात आणि त्यांच्यावर कॉमेंट्स करत पुढे पुढे जात होतो. काही रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर ऐसपैस मोकळी जागा होती. तिथे गाणी म्हणणारे, वाद्ये वाजवणारे, नाच करणारे, जादूचा खेळ करणारे, हसवणारे विदूषक असे नाना प्रकारे मनोरंजन करणारे कलाकार आपापले खेळ दाखवत होते. त्यात काही तर उघडपणे सवंग देहप्रदर्शन करणाऱ्या बायासुद्धा होत्या.


यातल्या काही काही पॅव्हेलियन्सना खास थीम्स होत्या. त्यातल्या माझ्या विशेष लक्षात राहिलेल्या एका इमारतीत रोमच्या वेगवेगळ्या सीजर्सचे पुतळे निरनिराळ्या दालनांमध्ये उभे करून ठेवले होते आणि त्यांची माहिती दिली होती, तसेच रोमन प्रकारचे नक्षीकाम आणि साजेशी सजावट केली होती.  त्यातल्या प्रत्येक दालनाला त्या सम्राटाचे नाव दिले होते. बहुतेक ठिकाणी ख्रिसमस ट्री आणि रेनडीयर्सची गाडी वगैरेसारख्या गोष्टी होत्याच. एका ठिकाणी ख्रिसमससाठी एक खास देखावा उभा केला होता. त्यात पाश्चात्य लोकांच्या पुराणातले काही प्रसंग होते. तो हॉल मात्र अप्रतिम होता आणि तो पहाणाऱ्यांची गर्दीसुद्धा खूप होती. एका भागातल्या गोल छतावर संपूर्ण कृत्रिम आभाळ तयार केले होते. त्यात फिरणारे ढगसुद्धा हुबेहूब दाखवले होते. त्यामुळे बाहेर दिवस आहे की रात्र हेसुद्धा समजत नव्हते.

लास व्हेगास म्हणजे जुगाऱ्यांची पंढरी आहे. केवळ जुगाराच्या धुंदीचा अनुभव घेण्यासाठीच खूप लोक तिथे जातात. तिथे त्यांच्यासाठी जिकडेतिकडे जुगाराची यंत्रे म्हणजे स्लॉट मशीन्स, गेमिंग मशीन्स, रौलेट व्हील्स वगैरे पसरून ठेवलेली दिसतात. कल्पक लोकांनी असंख्य प्रकारची असली यंत्रे तयार केली आहेत. त्यातली काही एकेकट्याने स्वतंत्रपणे चालवायची असतात तर काहींमध्ये पाचदहा लोक सामूहिकपणे जुगार खेळतात. आपल्याकडे काही मॉल्समध्ये अलीकडे अशी यंत्रे ठेवतात. त्यात टोकन टाकून काही बटने दाबायची किंवा खुंट्या फिरवायच्या आणि आपला आकडा लागला तर लहान मोठे बक्षिस मिळते. पण ते क्वचितच होते, बहुतेक वेळा नंबर लागतच नाही आणि आपले पैसे वाया जातात. कधी कधी एकादे बक्षिस लागले की खेळणाऱ्याला हाव सुटते आणि तो जास्त जास्त पैसे टाकत जातो.  जुगार ही एक नशा असते आणि बहुतेक जुगारी लोक आपले पैसे त्यात गमावून बसतात. काही हुषार लोक त्यातही कमाई करतात, पण असे नशीबवान आणि योग्य वेळ येताच थांबणारे धोरणी लोक विरळाच दिसतात. 

माझ्या आधीच्या अमेरिकावारीत आम्ही ख्रिसमसला फ्लॉरिडामधील सेंट ऑगस्टीन नावाच्या गावी गेलो होतो. तिथेही थोडी मौजमस्ती धमाल होती, पण ती एकाद्या खेड्यातल्या जत्रेसारखी होती. तिथे छोट्या छोट्या किरकोळ वस्तू विकणाऱ्या लहान लहान दुकानांची, खाद्यपेयांच्या ढाब्यांची आणि त्यामधून फिरणाऱ्या सर्वसामान्य लोकांची गर्दी होती. त्याच्या तुलनेत लास व्हेगास म्हणजे एक मोठा जागतिक कुंभमेळा होता. इथला सगळा पसारा अवाढव्य आणि नेत्रदीपक होताच आणि ते पहायला जगभरातली पैसेवाली माणसे आली होती. त्यांना पहायला काही मध्यमवर्गीय लोक आलेले दिसत होते.  

हे सगळे पहात पहात आम्ही हॉटेलपासून चांगले चारपाच मैल तरी दूर गेलो होतो आणि दिवस मावळून रात्र पडली होती. आता मात्र पाय दुखायला लागले होते आणि मला दमल्यासारखे वाटत होते.  हॉटेलवर परत कसे जायचे याचीही काही कल्पना नव्हती. आमची कार तर आम्ही पार्किंगमध्येच उभी करून ठेवली होती आणि आम्ही पायी चालत निघालो होतो. अमेरिकेत रस्त्यावर उभी केलेली टॅक्सी, रिक्शा असली काही वाहने कुठे नसतातच. लास व्हेगासच्या या भाऊगर्दीत तर उबरसुद्धा मिळण्याची काही शक्यताही दिसत नव्हती. त्यामुळे मी आता आणखी पुढे न जाता परत कसे जायचे याचा विचार करायला सांगितले. 

स्ट्रिपवरून जाणारी एक इलेक्ट्रिक लोकल रेल्वे आहे असे ऐकले होते. गूगलवर त्याची माहिती काढली आणि आम्ही जिथे होतो तिथून जवळचे स्टेशन शोधून काढले.  ही लोकल डोक्यावरून जाणारी (ओव्हरहेड) होती. त्यामुळे ते स्टेशनही आकाशातच होते. तिथपर्यंत पोचल्यावर समजले की काही सुधारणा करण्यासाठी ते स्थानक तात्पुरते बंद ठेवले होते. मग तिथून चालत चालत पुढल्या स्टेशनपाशी गेलो आणि लिफ्टने वर जाऊन ते स्टेशन गाठले. तिथे एकच रेल्वेमार्ग होता. त्यामुळे जी पहिली गाडी आली तिच्यात चढलो. गाडी सुरू झाल्यानंतर समजले की ती विरुद्ध दिशेने जात होती. उंचावरून जात असल्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूला लास व्हेगासमधली झगमगणारी रोशणाई दिसत होतीच. ती पहात पहात दोन स्टेशने पुढे गेल्यावर ती गाडी मागे फिरली आणि चारपाच स्टेशने ओलांडल्यावर आमचे स्टेशन आले.

ते स्टेशन तिथल्या प्रसिद्ध एमजीएम हॉटेलच्या जवळ होते. आम्ही फिरतांना ते हॉटेल पाहिले होते आणि त्याच्या समोर असलेल्या भव्य सिंहाच्या पुतळ्यामुळे ते लक्षातही राहिले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यावर समोरच्या बोगद्याकडे जाणाऱ्या वाटेवर 'एमजीएम हॉटेलकडे' असे लिहिले होते आणि दुसरीकडे जाणाऱ्या वाटेकडे आणखी काही तरी अनोळखी शब्द लिहिले होते. म्हणून आम्ही एमजीएम हॉटेलकडे चालायला लागलो. बरेच पुढे जाऊन लिफ्टने खाली आल्यावर पाहिले की तिथे एका महाप्रचंड अशा एका मैदानासारख्या पण बंदिस्त जागेत हजारो गेमिंग मशीने मांडून ठेवली होती आणि हजारो जुगारी त्यांच्या समोर बसून आपापले नशीब आजमावत होते. अख्ख्या जगात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणावर जुगार चालत असेल असे मला कधी वाटले नव्हते. तिथून बाहेर पडायचा मार्गही सापडत नव्हता. मग थोडी चौकशी करत करत आम्ही बाहेर आलो. पहातो तो बहुधा आम्ही जिथून आत शिरलो होतो त्याच जागी फिरून परत आलो होतो.  

दुसऱ्या बोगद्यातून पुढे गेल्यावर लिफ्टने खाली आलो तेंव्हा त्या सिंहांच्या बाजूलाच रस्ता होता. तिथून आमचे हॉटेल आणखी मैलभर लांब होते, पण तिथून जाण्यासाठी एक ट्रॅमची सोय होती आणि ती हॉटेलनेच केली असल्यामुळे मोफत होती. तिचा लाभ घेऊन आम्ही हॉटेलमध्ये परत आलो आणि मी तरी रूममध्ये जाऊन विश्रांती घेतली. बाकीची मंडळी आणखी थोडे फिरून आणि खेळून आली.

दुसरे दिवशी आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. वाटेत लास व्हेगासहून पंधरा वीस मैलांवर लागलेल्या एका हॉटेलात जेवण घेतले. ते माझ्या या वेळच्या अमेरिकेच्या प्रवासातले सर्वात मस्त आणि रुचकर जेवण होते. परतीच्या प्रवासात त्या मानाने बराचसा सरळ रस्ता मिळाला. वाटेत कुठे कुठे हिमवर्षाव होत होता, बर्फ पडून रस्ता बंद झाल्यामुळे वळसा घ्यावा लागणे वगैरे प्रकार झालेच, पण या वेळी आम्हाला ते अपेक्षित झाले होते. अशाच एका वळशावर बर्फाचे मोठमोठे ढीग साठले होते आणि काही मुले तिथे मजेत खेळत होती. ती येतांनाच त्यासाठी सगळी तयारी करून आली होती. आमच्या लोकांनी पण थोडा वेळ बर्फात खेळून लास व्हेगासच्या ट्रिपमध्ये मिळालेल्या या बोनसचा आनंद घेतला. 'ऑल इज वेल् दॅट एंड्स वेल्' या उक्तीनुसार आम्ही छान मूडमध्ये आनंदात घरी परतलो.   



Tuesday, September 01, 2020

गणेशोत्सवाच्या आठवणी

 


मला समजायला लागल्यापासून मी दरवर्षी येणारा गणेशोत्सव उत्साहाने साजरा करत आणि इतरांनी तसा केलेला पहात आलो आहे. या काळात आजूबाजूचे वातावरणसुद्धा आनंदाने भारलेले असायचे. जिकडे पहावे तिकडे सजवलेले मांडव दिसायचे आणि कानावर ढोल, ताशा, आरत्या, भजने, गाणी वगैरेंचे ध्वनि पडत असायचे. गणेशचतुर्थी आणि अनंतचतुर्दशीला सगळे रस्ते भक्तांच्या गर्दीने भरलेले असायचे. या वर्षी गणेशाची इच्छा वेगळी दिसली. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक उत्सव फारसे साजरे झालेच नाहीत.  जे साधेपणाने आटोपून घेतले गेले ते सुद्धा मला पहायला मिळाले नाहीत,आमच्या  कारण घराबाहेर पडायलाच मनाई होती. या वर्षी मी फक्त आमच्या घरातल्या गणपतीचेच दर्शन घेऊ शकलो. आम्ही घरी आपला गणेशोत्सव दर वर्षीच्या इतक्याच उत्साहाने आणि त्याच परंपरागत रीतीने साजरा केला. पूजा, आरत्या, मोदकाचे नैवेद्य, अथर्वशीर्षाचे पठण वगैरे नेहमीसारखेच केले. मात्र गणपतीबाप्पाचे आगमन आणि विसर्जन साधेपणाने करावे लागले.

या दहा दिवसात मी रोज माझ्या जुन्या आठवणी काढून त्या शब्दबध्द करून फेसबुकवरील माझ्या फलकावर देत आलो. आज त्यांना एकत्र गुंफून या अनुदिनीवर देत आहे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - १

माझ्या लहानपणी आमच्या स्वैपाकघरातल्या एका उघड्या कपाटात एक छोटासा देव्हारा ठेवलेला होता आणि त्यात सगळे देव ठेवलेले होते. त्यात एक बाळकृष्णाची आणि एक अन्नपूर्णेची अशा दोन छोट्याशा मूर्ती होत्या आणि काळा शाळिग्राम तसेच नर्मदेतला शुभ्र गोटा असलेला महादेव होता. तो एका चांदीच्या नागाच्या वेटोळ्यात बसवलेला होता. त्या देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती नव्हती, गणपतीच्या नावाने एक लहानसा लाल रंगाचा चपटा आणि गुळगुळित असा सुबक खडा होता. या सर्वांची रोज भक्तीभावाने यथासांग पूजाअर्चा आरती वगैरे केली जात असे. याशिवाय इतर काही देवांची किंवा संतांची चित्रे होती, तसेच काही पोथ्या त्यांच्या बाजूला ठेवलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टी कडक सोवळ्यात असायच्या आणि त्यांना कुणीही ओवळ्याने स्पर्श करणे पूर्णपणे निषिद्ध होते.

दर वर्षी गणेशोत्सवासाठी मातीची गणपतीची मूर्ती आणली जात असे. ती तयार करायचे काम आमच्या जमखंडी गावातल्या दत्तोबा तांबटाकडे होते. पोस्टावरून जाणाऱ्या गावातल्या हमरस्त्यावरच त्याचे वर्कशॉप होते. त्यात समोरच्या बाजूलाच एक लहानशी भट्टी होती आणि "ऐरणीच्या देवा तुला" या गाण्यात दाखवला आहे तसला तिचा भाता दत्तोबाची बायको खालीवर करत असे. फुललेल्या निखाऱ्यांवर तांब्यापितळेची भांडी तापवून दत्तोबा त्यांच्यावर ठोकाठोकी करत असे.  हे मी अनेक वेळा पाहिले असल्यामुळे अजून लक्षात आहे. त्याशिवाय तो इतर उद्योगही करत असे त्यात गणपतीच्या मूर्ती करणे हे मुख्य होते. त्याच्याकडे लहानमोठ्या आकाराचे काही साचे होते. शाडू मातीला चाळून, भिजवून, चांगली घोटून आणि त्यात चिकटपणा आणण्यासाठी काही द्रव्ये मिसळून तयार झालेला मऊसूत लगदा त्या साच्यांमध्ये थापून तो मूर्ती बनवायचा, त्यांना साच्यामधून काढून सुकत ठेवायचा आणि सुकल्यानंतर त्यांना ब्रशने रंगवायचा. हे सगळे काम आम्हाला रस्त्याने जाता येता दिसत असे आणि आम्हीही मुद्दाम तिथे थांबून त्याचे हस्तकौशल्य कौतुकाने पहात असू.

आम्ही दरवर्षी घेत असलेल्या गणपतीचा आकार ठरलेला होता. त्याबद्दल दत्तोबाला सांगायची गरजच नव्हती, उलट "हा बघा मी तुमचा गणपती करतोय्" असे तोच आम्हाला सांगून दाखवायचा.     


गणेशोत्सवाच्या आठवणी - २

आमच्या वाड्याच्या मोठ्या दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूला बैठकीची खोली होती आणि डाव्या बाजूला न्हाणीघर, पाण्याचा हौद आणि लाकडे, कोळसे वगैरे ठेवायच्या जागा होत्या. त्यांना पार करून गेल्यावर समोर एक पायरी चढून वर पाच खणी सोपा होता. त्याच्या समोरच्या भितीवर मधोमध जागी कंबरेएवढ्या उंचीवर बराचसा खोल असा आमचा 'गणपतीचा कोनाडा' होता. एरवी त्याचा उपयोग आलेली पत्रे, बिले, पावत्या, सामानाच्या याद्या, औषधाची बाटली अशासारख्या गोष्टी लगेच मिळाव्यात म्हणून तात्पुरत्या ठेवण्यासाठी होत असे. गणपतीचे दिवस जवळ आले की तो कोनाडा स्वच्छ करून आणि चुन्याचा एक हात फिरवून गणपतीच्या आगमनासाठी सज्ज केला जात असे. आम्ही दरवर्षी आमच्या गणपतीबाप्पाची स्थापना त्या कोनाड्यातच करत असू.  गणपतीच्या एका बाजूला नारळ आणि दुसऱ्या बाजूला दिवा ठेवायला जागा सोडून उरलेल्या जागेत बसेल एवढ्याच आकाराची गणपतीची मूर्ती आणणे आवश्यक होते. म्हणून आम्ही साधारणपणे वीतभर रुंद आणि त्याहून थोडा उंच असा मूर्तीचा एक आकार ठरवून ठेवला होता आणि दत्तोबा तांबट दरवर्षी तेवढ्या आकाराची मूर्ती आमच्यासाठी तयार करून देत असे.



कोनाड्याच्या आत सजावट करायला फारशी जागा नव्हती आणि ती बाहेरून दिसलीही नसती म्हणून आम्ही एक सुंदर मखर तयार करून ते बाहेरच्या भिंतीवर टांगून ठेवत असू. त्यात मध्यभागी कमान आणि आजूबाजूला नक्षीकाम करून सुंदर सुंदर चित्रे चिकटवत असू. हे सगळे काम आम्हा मुलांचेच होते. त्या काळात 'आत्मनिर्भरता' असला बोजड शब्द कोणी वापरत नव्हते, पण आम्ही ही सगळी सजावट स्वतःच करत होतो. त्यासाठी सोनेरी कागद सोडून इतर काहीही बाजारातून न आणता घरातल्याच वस्तू वापरून ही सजावट केली जात होती.  पुढच्या वर्षीच्या मखरात लावण्यासाठी म्हणून आम्ही वर्षभर चित्रे गोळा करून ठेवत होतो आणि त्यातली चित्रे निवडून ती चिकटवणे, कमान, कमळे आणि नक्षी वगैरे काढणे, सुबक अक्षरात 'श्रीगणेशायनमः' लिहिणे वगैरे कामे गणेशचतुर्थी जवळ आल्यावर करत होतो.

 

गणेशोत्सवाच्या आठवणी - ३

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडायच्या आधीच पहाटे उठून आम्ही कामाला लागत होतो. पाण्याच्या हंड्याखालचे चुलखंड पेटवून पाणी तापायला ठेवायचे, दारासमोर सडा घालून सुबक रांगोळी काढायची, आंब्याच्या पानांचे तोरण तयार करून ते दाराला बांधायचे, गच्चीवरच्या बागेतली फुले तोडून आणायची, एकवीस एकवीस दुर्वांच्या जुड्या बनवायच्या वगैरे वगैरे किती कामे असायची. आंघोळी करून झाल्यावर ठेवणीतले त्यातल्या त्यात बरे कपडे आणि डोक्यावर टोपी घालून आणि कपाळावर कुंकवाचा उभा पट्टा लावून सगळे तयार झाले की टाळ, झांजा, चिपळ्या वगैरे जे मिळेल ते वाद्य आणि एक मोठे ताट घेऊन दत्तोबाकडे जायचे आणि आमच्या नावाने ठेवलेली गणपतीबाप्पाची मूर्ती त्याचा जयजकार करत आणि वाजत गाजत घरी आणून ठेवायची.   

मग एकजण मुकटा नेसून पूजा करण्यासाठी तयार होऊन बसायचा. पळी, फुलपात्र, ताम्हन, समई,  फुलांचे हार, पूजेचे तबक वगैरे सगळी तयारी करून आणि पाट मांडून नारायणभटजींची वाट पहात बसायचे. ते आले की एकही क्षण गप्पा मारण्यात न दवडता पूजाविधी सुरू करायचे. त्या दिवशी त्यांना अनेक घरी जायचे असल्यामुळे वाया घालवायला मोकळा वेळच नसायचा. मंत्रोच्चारासहित गणपतीबाप्पांची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करून आरत्या, मंत्रपुष्पांजली वगैरे म्हणून झाले की मग दुपारच्या जेवणातल्या उकडीच्या मोदकांची आतुरतेने वाट पहायची.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ४


घरातल्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली की आम्ही आमच्या हायस्कूलकडे पळत होतो. हे परशुरामभाऊ हायस्कूल जमखंडीच्या संस्थानिकांनी जनतेच्या कल्याणासाठी बांधून शिक्षणाची उत्कृष्ट सोय केली होती. आम्हा विद्यार्थ्यांना सर्वथा अभिमान वाटावा अशीच ही शाळा होती. पूर्वी त्याचे व्यवस्थापनही संस्थानचे सरकारच करत असे. जमखंडीचे संस्थानिक पटवर्धन हे गणपतीचे भक्त असल्यामुळे त्यांच्या काळात तिथला गणेशोत्सव चांगला दणक्यात साजरा होत असेल. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर संस्थान त्यात विलीन झाले आणि आमचे हायस्कूल राज्य सरकारची शाळा झाली. तरी आमचे मुख्याध्यापक आणि वरिष्ठ शिक्षक हे 'संस्थानिकोंके जमानेके' असल्यामुळे त्यांनी जमतील तेवढ्या प्रमाणात जुन्या प्रथा सुरू ठेवल्या होत्या.    



आमच्या या शाळेच्या सुंदर इमारतीच्या मधोमध एक मोठा सेंट्रल हॉल आहे. त्या काळात त्या हॉलमध्ये आणि त्याच्या बाजूच्या प्रशस्त कॉरीडॉरमध्ये शाळेतली सगळी मुले दाटीवाटी करून उभी राहू शकायची. त्या हॉलमध्येच एका बाजूला स्टेजवर गणपतीबाप्पाची स्थापना व्हायची. समोरच्या सुंदर बागेतल्या कण्हेरी, जास्वंदी, सोनचाफा वगैरेसारख्या फुलांनी त्याला सजवले जायचे. पूजा, आरती, काही मुलांची गाणी, शिक्षकांची भाषणे वगैरे व्हायची. त्या हॉलमध्ये आवाज खूप घुमत असल्यामुळे आणि मुलांच्या गलक्यात त्यातले थोडेच समजत असेल. अखेर प्रसादाचा पेढा घेऊन तो खात खात आम्ही घरी यायचो.  

आमचा हा उत्सव अर्ध्याच दिवसाचा, किंबहुना फक्त काही तासांचाच असायचा. सगळ्या मुलांच्या आणि मास्तरांच्या घरी गणपती बसवले जात असल्यामुळे ते काम पूर्ण करून त्यांना शाळेत पोचायला साडेदहा अकरा वाजून गेले असायचे आणि संध्याकाळी सूर्य मावळायच्या वेळी शाळेच्या पटांगणाच्या कडेलाच असलेल्या 'अप्पासाहेबांच्या' विहिरीत त्या मूर्तीचे साग्रसंगीत विसर्जनही केले जात असे.  पायऱ्या आणि कमान असलेली ही विहीर चांगली  मोठ्या आकाराची होती. त्या वेळी गावातले पट्टीचे पोहणारे दोन तीन युवक मिळून पोहत पोहत त्या मूर्तीला विहिरीच्या मध्यभागी नेऊन पाण्यात डुबकी मारायचे आणि तिला अलगद तळाशी ठेऊन वर यायचे. आम्ही हे दृष्य काठावर उभे राहून आणि डोळे विस्फारून पाहून घेत होतो.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ५

काही लोक गणेशचतुर्थीच्या दिवशी एकवीस गणपतींचे दर्शन घेण्याचा संकल्प करतात. लहानपणी संकल्प वगैरे शब्दच माहीत नसतात. आम्ही तर पहाटे उठल्यापासून आधी घरातला गणपती आणि नंतर शाळेतला गणपती बसवण्याच्या कामात गुंतलेले असायचे. दुपारी मोदकाचे जेवण केल्यावर थोडी सुस्तीही यायची. संध्याकाळी पुन्हा शाळेतल्या गणपतीचे विसर्जन आणि रात्री घरातल्या आरतीसाठी लवकर घरी पोचायचे असे. त्यामुळे गावभर फिरायला वेळच कुठे होता? शिवाय जिथे जाऊ तिथल्या काकू हातावर मोदक ठेवणार. एका दिवसात खाऊन खाऊन असे किती मोदक खायचे? तरीही जे जवळचे नातेवाईक होते आणि त्यांच्या घरी आमचे नेहमी जाणेयेणे होत असे अशा काकामामांकडे जाऊन त्यांच्याकडल्या गणपतींचे दर्शन घेऊन येत होतो. पुढच्या दोन तीन दिवसात गावातले सगळे सार्वजनिक गणपती पाहून आणि सगळ्या मित्रांच्या घरी जाऊन एकवीसचा कोटा सहज पूर्ण होत असे.  तसेच ठिकठिकाणी केलेली सजावटही पहायला मिळत असे. माझ्या आठवणीत तरी त्या वेळी करमणुकीचे जाहीर कार्यक्रम आमच्या गावात होत नसत किंवा कदाचित रात्रीच्या वेळी ते पहायला जायची परवानगी मुलांना मिळत नसेल म्हणून त्यातले काहीच आठवत नाही.

आमच्या घरी रोजच संध्याकाळी मुलांनी शुभंकरोति, परवचे आणि रामरक्षा म्हणून झाल्यावर धुपारती करायची प्रथा होती. त्यात सुखकर्त दुखहर्ता आणि दुर्गे दुर्घट भारी या आरत्या रोज म्हणायच्या आणि सोमवारी शंकराची, गुरुवारी दत्ताची आणि शनिवारी हनुमंताची अशा आरत्या म्हंटल्या जात. त्यामुळे त्या तोंडपाठ झाल्या होत्या. गणेशोत्सवात रोज सर्वांनी मिळून या सगळ्या आरत्या तर म्हणायच्याच, शिवाय पुस्तकात पाहून आणखी काही नवनव्या आरत्या चढाओढीने म्हणायचा कार्यक्रम अर्धापाऊण तास चालत असे.  


गणेशोत्सवाच्या आठवणी - ६


मी तीन वर्षे पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतांना शिवाजीनगर स्टेशनच्या जवळ असलेल्या त्या कॉलेजच्या वसतीगृहात रहात होतो. तिथून जंगली महाराज रोडने चालत चालत डेक्कन जिमखान्यापर्यंत जायचा आमचा नेहमीचाच छंद होता. गणेशोत्सवाच्या काळात आम्हा मित्रांचे टोळके त्या रस्त्याच्या आजूबाजूला असलेले सगळे गणपती तर पाहून घेत होतोच, कधीकधी शिवाजीनगर स्टेशनपासून ते नव्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावरल्या मांडवातल्या देखाव्यांचे दर्शन घेत होतो. पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा पुण्याचा गणेशोत्सव मुख्यतः आकर्षक आणि  मनमोहक अशा देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता आणि हे सगळे अद्भुत  देखावे लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड या परिसरातच मांडलेले असत. एकादा सोयीचा आणि कोरडा दिवस पाहून त्या संध्याकाळी आम्ही त्या भागातही तीन चार तास फिरून येत होतो. पुण्यात जितके विविध प्रकारचे  कल्पक असे देखावे एकाच परिसरात पहायला मिळतात तसे मला तरी आणखी कुठेच दिसले नाहीत, मुंबईला तर नाहीच नाही.  तिथे एकाच मांडवातल्या गणपतीचे दर्शन मिळायला लांबच लांब रांगेत उभे रहावे लागायचे आणि त्यात दमछाक होत असे. मात्र मुंबईला जितक्या अगडबंब आकाराच्या भव्य मूर्ती पहायला मिळायच्या तशा पुण्याला नसायच्या. 

मी पुण्याला शिकत असतांना एका वर्षी गणेत्सवाच्या काळातच हिंसक दंगली झाल्या. त्यामुळे शहरभर कर्फ्यू लावला गेला होता. त्यावर्षी आम्हाला तिथला उत्सव पहायला मिळाला नाही. त्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा या वर्षी मी हा उत्सव पहायला कुठे बाहेर पडू शकत नाही आणि यंदा टी व्ही वर ही तो फारसा पहायला मिळत नाही असे झाले आहे.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ७

मी नोकरीला लागल्यावर पहिली तीन चार वर्षे माझ्या मित्रांबरोबर दादरला रहात होतो. त्या काळातल्या सज्जन, सुविद्य, सुसंस्कृत, रसिक अशा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचे आगर म्हणजे दादर अशी त्या भागाची ओळख होती. दादर, माहीम, शिवाजी पार्क या भागात अनेक कलाकार, साहित्यिक वगैरे मंडळींचे वास्तव्य होते.  अशा भागात रहायला मिळणे हीच कौतुकाची गोष्ट होती.  गणेशोत्सवाच्या काळात तर तिथे धमाल येत असे. ठिकठिकाणी मोकळ्या जागांमध्ये किंवा रस्त्यातच मांडव घालून श्रींची स्थापना केली जात असे आणि त्याची सुंदर आरास केली जात असे. ती पहायची मजा तर होतीच, पण माझ्या विशेष लक्षात राहिले आहेत ते काही ठिकाणी होणारे करमणुकीचे कार्यक्रम. हमरस्त्यांवर होणाऱ्या गोंगाटामुळे तिथे काही कार्यक्रम ठेवण्यात अर्थ नसायचा, पण जरा आतल्या बाजूला निवांतपणा मिळत असे. डी.एल.रोडवर अशी एक जागा होती. तिथे रात्री सगळी रहदारी बंद करून रस्त्यातच ठिय्या मारून खूप लोक बसत आणि तितकेच किंवा त्याहून जास्त लोक शांतपणे मागे उभे राहून कार्यक्रमांचा आनंद घेत असत. हिंदू कॉलनीतला सार्वजनिक गणेशात्सव एका मोकळ्या मांडव घालून जागेत होत असे, पण त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम रुइया कॉलेजजवळच्या एका लहानशा सभागृहात तिकीट लावून ठेवत असत. जितेंद्र अभिषेकी यांच्यासारखे गायक, मंगेश पाडगावकरांसारखे कवि आणि रमेश मंत्री यांच्यासारखे विनोदी लेखक अशा अनेक प्रसिद्ध लोकांना जवळून पहायची संधी मला दरवर्षी होणाऱ्या या जाहीर कार्यक्रमांमध्ये मिळाली. 

एकदा तर एका ठिकाणी चक्क माननीय बाळासाहेब ठाकरेच सन्मान्य पाहुणे म्हणून आले होते. तेंव्हा अजून शिवसेनेचा उदय झालेला नव्हता पण एक कुशल व्यंगचित्रकार आणि तडफदार लेखक -संपादक बाळ ठाकरे म्हणूनच ते लोकप्रिय झाले होते. आपल्या कुंचल्याच्या आणि लेखणीच्या जोरावर त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाला अल्पावधीत यशाच्या शिखरावर नेले होते. आपल्या लहानशा पण प्रभावी भाषणाने आणि प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना चातुर्याने खणखणीत उत्तरे देऊन त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली होती. 


गणेशोत्सवाच्या आठवणी - ८


मी लग्न करून चेंबूरला घर थाटल्यानंतर गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला.  वन रूम किचनच्या  त्या इवल्याशा सदनिकेत टेबलावरच एक छोटासा पाट ठेऊन त्यावर गणपतीबाप्पांना विराजमान केले आणि आजूबाजूला थोडी फुले आणि दिवे यांची सजावट केली. तेंव्हा चेंबूर स्टेशनला लागूनच पाटील स्टोअर्समध्ये सर्व पूजासाहित्य मिळत असे.  त्याच दुकानात गणेशोत्सवामध्ये गणपतीच्या सुबक मूर्ती मिळत असत. तिथे पेणच्या खास मूर्तीसुद्धा येत असत. आयत्या वेळी आपल्याला हवी तशी मनाजोगती मूर्ती मिळेल न मिळेल म्हणून आम्ही आधीच जाऊन मूर्ती घेऊन येत असू. काही वर्षांनी त्यांनी अग्रिम आरक्षणाची सोय केली. मग आम्ही ते कधी सुरू होते याची वाट पाहून शक्य तितक्या आधी जाऊन गर्दी नसतांना निवांतपणे गणपतीच्या मूर्ती पाहून त्यातली निवड करून तिला रिझर्व करून ठेवायला लागलो. आम्ही अणुशक्तीनगरला रहायला गेलो तरी पुढील तीस वर्षेसुद्धा आम्ही दरवर्षी चेंबूरच्या पाटील स्टोअर्समधूनच गणपती आणत असू. सजावटीची व्याप्ती आणि आकारमान मात्र कालानुसार बदलत आणि वाढत गेले. आधी साध्या पुठ्ठ्याच्या कमानीचे मखर, त्यानंतर चौकोनी देऊळ, त्यावर कळस, झोपाळा, रथ, देखावा अशी प्रगती होत गेली. मधली काही वर्षे पुठ्ठ्याच्या जागी सर्रास थर्मोकोल आले आणि पर्यावरणाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्याचा वापर बंद केला गेला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - ९

आम्ही लहानपणी बैलपोळ्याच्या दिवशी चिकणमातीचे छोटे छोटे बैल तयार करत होतो.  ते करतांना त्याच मळलेल्या चिकणमातीतून गणपतीचे आकारही बनवत होतो. आता "करायला गेला गणपती आणि झाला मारुती" असेही होत असे, निदान दुसऱ्या मुलांनी केलेल्या आकारांना तसे चिडवले जात असे. पण हे गणपती कधीच सुकवून घरात ठेवले मात्र जात नसत कारण ते सुकेपर्यंत त्यांना तडे जायचीच शक्यता असायची. त्यामुळे ते तात्पुरते आकार संध्याकाळपर्यंत पुन्हा बागेतल्या कुंड्यांमधल्या मातीत विलीन होऊन जात असत. दत्तोबा तांबट मात्र शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करायच्या. ही खास प्रकारची माती तो कुठून आणत होता असा प्रश्न त्या काळात मला कधी विचारावासा वाटला नाही. पण त्या मातीचा गुणधर्म असेल किंवा त्याने त्यात मिसळलेल्या रसायनांचा असेल, ते गणपती मात्र अभंग रहात असत. बाजारातून आणलेले पेणचे गणपतीही असेच टिकाऊ असायचे.


आमच्या लहानपणी मी 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस' हा शब्दसुद्धा ऐकला नव्हता किंवा हा पदार्थ डोळ्याने पाहिला नव्हता. ही एक पांढऱ्या रंगाची भुकटी असते हा शोध मला मुंबईला आल्यानंतर लागला. आधी जेंव्हा त्याचे निरनिराळे उपयोग पाहिले तेंव्हा तर तो एक अद्भुत पदार्थ वाटायचा. कदाचित त्या पदार्थाचे गणपतीसुद्धा मी अनेक वेळा कळत नकळत आणलेही असतील. पण काही वर्षांपूर्वी पर्यावरणस्नेह्यांनी पीओपीच्या विरुद्ध प्रचाराची मोठी मोहीम सुरू केली. त्यानंतर मी सखोल चौकशी करून मृत्तिकेच्या मूर्ती आणायला लागलो. या वर्षी तर कुठेही बाजारात जायची सोयही नव्हती. आमच्या बिल्डिंगमध्येच असलेल्या दुकानात थोडे तांबड्या मातीचे गणपती ठेवले होते. ते पूर्णपणे पाण्यात विरघळण्याच्या गॅरंटी होती इतकेच नव्हे तर त्यासाठी एक रिकामी कुंडी, तुळशीच्या बिया आणि जास्तीची माती देऊन त्या कुंडीत  तुळशीची रोपे लावण्याची व्यवस्था करून दिली होती. असा सगळा विचार करणे हेच धन्य आहे. ते करणाऱ्याचे कौतुक करायला हवे म्हणून आम्ही या वर्षी त्या प्रकारचा गणपती आणला.


गणेशोत्सवाच्या आठवणी - १०


माझ्या लहानपासूनच्या गणेशोत्सवाच्या आठवणी सांगता सांगता आज अनंतचतुर्दशीचा म्हणजे या उत्सवाचा शेवटचा दिवसही आला. मी दादरला रहात असतांना तिथेच समुद्रकिनाऱ्यावर अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन होत असे. आम्ही दर वर्षी शक्य तितका वेळ किनाऱ्याच्या आसपास हिंडून निरनिराळ्या मिरवणुका आणि गणपतीच्या सजवलेल्या मूर्ती पाहून घेत होतो. पण मुंबईतल्या लालबागच्या राजासह अनेक मोठमोठे राजे महाराजे असलेल्या सगळ्या महत्वाच्या गणपतीबाप्पांचे विसर्जन गिरगाव चौपाटीवरच केले जात आले आहे. आमच्या चेंबूरचे आरकेस्टूडिओ आणि ड्यूक्स यांचे प्रसिद्ध गणपतीसुद्धा विसर्जनासाठी चौपाटीलाच नेत असत.  तिथे होणारी तुफान गर्दी पाहता आणि परत घरी कसे यायचे या विवंचनेमुळे मी चौपाटीला मात्र प्रत्यक्षात कधी गेलो नाही. नंतरच्या काळात  तिथली दृष्ये रसभरीत धावत्या वृत्तांतासह  टेलिव्हिजनवर पहायला मिळायला लागली. त्यामुळे आपण फारसे काही चुकवले असेही वाटले नाही. 

 पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी मीटिंग किंवा व्हिजिटसाठी बाहेर कुठेही जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातही त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची प्रचंड कोंडी वगैरेंचा विचार करून आम्हाला ऑफीसातून दोन तीन तास आधीच सुटी मिळत असे. लग्न व्हायच्या आधी आम्ही तीनचार मित्र मिळून इकडे तिकडे हिंडत असू आणि ठिकठिकाणाहून चौपाटीकडे जायला निघालेल्या मिरवणुका पहात असू. संसार थाटल्यानंतर आधी सरळ घरी येऊन सहकुटुंब  एकादी लहानशी चक्कर मारून यायला लागलो.  लहानमोठे असंख्य गणपती आणि त्यांचे देखावे वगैरेंमधून बाप्पाची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. 

आमचा योजना प्रतिष्ठानशी संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा मनापासून सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्यांच्यावरताण आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते उच्चरवातले गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि आम्हाला उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.   त्यासाठी आम्ही मुद्दाम डबलडेकर बस घेऊन वरच्या मजल्यावर चढून बसत होतो.

आज या वर्षीच्या गणेशोत्सवाबरोबर या लघुलेखमालिकेची सांगता होत आहे. गणपतीबाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया । 



Monday, August 31, 2020

श्री गणपती अथर्वशीर्ष - मराठी भाषांतर

 श्री गणपती अथर्वशीर्ष हे गणेशाचे स्तोत्र आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. अनेक लोक त्याची नियमित पारायणे करतात. गणेशदास या आजच्या काळातल्या पंडिताने या स्तोत्रावर एक विस्तृत असे ओवीबद्ध भाषांतर लिहिले आहे. ते मी जसेच्या तसे खाली दिले आहे.

श्रीविनायकाची उपासना आणि गणेशपुराणावरील लेख व मराठी रूपांतर या पानावर पहा.

https://anandghan.blogspot.com/2021/07/blog-post_15.html


********************************

गणपति अथर्व शीर्ष  (संस्कृत)


शान्ति पाठ: :  (अथर्ववेदीय)

ॐ भद्रम् कर्णेभि: शृणुयाम देवा:|

ॐ भद्रम् पश्येम अक्षिभि: यजत्रा : |

स्थिरै: अंगै: तुष्टुवांस: तनूभि: व्यशेम देवहितं यदायु :

ॐ स्वस्तिन इन्द्रो वृद्धश्रवा: | स्वस्तिन: पूषा विश्व वेदा: 

स्वस्तिन: तार्क्ष्यो अरिष्टनेमि:| स्वस्तिन: बृहस्पति: दधातु | 

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: |


शान्ति पाठ:  (कृष्ण यजुर्वेदीय)

ॐ सहना ववतु | सह नौ भुनक्तु |

सह वीर्यम् करवावहै | तेजस्विनौ अधीतम् अस्तु |

मा विद्विषावहै | 

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: |

***************


१) नमन प्रार्थना : 

ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि |

त्वमेवकेवलम् कर्ताऽसि | त्वमेवकेवलम् धर्ताऽसि | त्वमेवकेवलम् हर्ताऽसि | 

त्वमेवसर्वम् खलु इदं ब्रह्मासि | त्वम् साक्षात् आत्माऽसि नित्यम् |


२) रक्षा कवच प्रदानार्थ प्रार्थना :

ऋतं वच्मि | सत्यम् वच्मि | अव त्वम् माम् | अववक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् | अव धातारम् |  अव अनूचानम् अवशिष्यम् |

अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् | अव उत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव च ऊर्ध्वात्तात् | अव अधरात्तात् |

सर्व तो माम् पाहि पाहि समंतात् |


३) सूक्ष्म रूप दर्शनम् :  

त्वम् वाङ्मय: | त्वम्चिन्मय: | त्वम् आनन्दमय: | त्वम् ब्रह्ममय: |

त्वम्सत्-चित्-आनन्द अद्वितीयोऽसि | 

त्वम्प्रत्यक्षम् ब्रह्मासि | त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि |


४) स्थूल विश्व रूप दर्शन : 

सर्वम् जगदिदम् त्वत्तो जायते | सर्वम् जगदिदम् त्वत्तः तिष्ठति | सर्वम् जगदिदम् त्वयि लयम् एष्यति | सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति |

त्वम् भूमि: आपोऽनलोऽनिलोनभ: |


५) सूक्ष्म विश्व रूप दर्शनम् :  

त्वम् चत्वारि वाक् पदानि |

त्वम् गुणत्रयातीत:| त्वम् देहत्रयातीत:| त्वम् कालत्रयातीत:|

त्वम् मूलाधार: स्थितोऽसि नित्यम् |

त्वम् शक्तित्रयात्मक :| 


६) सूक्ष्म ध्यान धारणा तथा एकाक्षर जपमन्त्र स्वरूपा :

त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् |

त्वम् ब्रह्माः, त्वम् विष्णु:, त्वम् रुद्र:, त्वम् इन्द्र:, त्वम् अग्नि:, त्वम् वायु:, त्वम्सूर्य:, त्वम् चन्द्रमा, त्वम्भु: भुव: स्व: ॐ  

गणादिम् पूर्वम् उच्चार्य वर्णादिम् तद नंतरं | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दु लसितम् तारेण ऋद्धम् | एतत् तव मनु स्वरूपम् |

'ग'कार: पूर्व रूपम् | अकारो मध्यम रूपम् | अनुस्वार: च अन्त्य रूपम् | बिन्दु: उत्तर रूपम् | 

नाद: संधानम् | संहिता संधि: |


७) गणेश विद्या ऋषि छन्द देवता नमनम्  

स एषा गणेश विद्या | गणकऋषि: | निचृद्गायत्री छन्द: | गणपति: देवता |


८) अनेकाक्षर जप मन्त्र स्वरूपा :

ॐ गं गणपतये नम: | 

ॐ एकदन्ताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दन्ती प्रचोदयात् |


९) स्थूल ध्यान धारणा मन्त्रा:  

एकदन्तम् चतु: हस्तम्पाशम् अंकुश धारिणम् |

रदम् च वरदम् हस्तै: बिभ्राणम् मूषक ध्वजम् ||

रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्त वाससम् |

रक्त गन्धानुलिप्ताङ्गम् रक्त पुष्पै: सुपूजितम् ||

भक्त अनुकम्पिनम् देवम् जगत् कारणम् अच्युतम् |

आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृते: पुरुषात् परम् ||

एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वर: |


१०) अंतिम स्मरण वन्दनम्

नमो व्रातपतये, नमो गणपतये, नम: प्रमथपतये, नम: ते अस्तु |

लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरद मूर्तये नम: || 


११) सदुपयोग प्रयोजनम्   

एतद् अथर्वशीर्षम् य: अधीते | स ब्रह्मभूयाय कल्पते | 

स सर्व विघ्नै: न बाध्यते | स सर्वत: सुखमेधते |

स पञ्च महापापात् प्रमुच्यते | 

सायम् अधीयान: दिवस कृतम् पापम् नाशयति |

प्रात: अधीयान: रात्री कृतम् पापम् नाशयति | 

सायम् प्रात: प्रयुञ्जान: अपापो भवति |

सर्वत्र अधीयान: अपविघ्न: भवति | धर्म अर्थ काम मोक्षम् च विन्दति |

इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् |

यो यदि मोहात् दास्यति | स पापीयान् भवति | 


१२) फलश्रुती तथा प्रार्थना :

सहस्त्रावर्तनात् यम् यम् कामम् अधीते तम् तम् अनेन साधयेत् |

अनेन गणपतिम् अभिषिञ्चति | स वाग्मीभवति |

चतुर्थ्याम् अनश्नन् जपति स विद्यावान् भवति |

इति अथर्वण वाक्यम् | 

ब्रह्मादि आवरणम् विद्यात् | न बिभेति कदाचन इति |

यो दुर्वाङ्कुरै: यजति | स वैश्रवणोपमो भवति |

यो लाजै: यजति | स यशोवान् भवति | स मेधावान् भवति | 

यो मोदक सहस्रेण यजति स वाञ्छित फलम् अवाप्नोति |

य: साज्य समिद्भि: यजति | स सर्वम् लभते | स सर्वम् लभते |

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्य वर्चस्वी भवति | 

सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति |

महा विघ्नात् प्रमुच्यते | महा पापात् प्रमुच्यते | महा दोषात् प्रमुच्यते | 

स सर्वविद् भवति | स सर्वविद् भवति | 

य एवम् वेद | इति उपनिषत् | 

----------------------- =============== ------------------------


गणपति अथर्व शीर्ष (ओवीबद्ध मराठीत अनुवादित भावार्थ )

ॐ श्री गणेशाय नम: |

एकदा गणेश चतुर्थी समयी | भक्त मण्डळी गोळा झाली | "या वर्षीच्या उत्सव समयी" | नव नव्या कार्यक्रम विवंचनेला (१)

दर वर्षी गणेश मुर्ती पूजुनी | सामूहिक आरती स्तोत्रे गाउनी | प्रसाद भक्षण, नाच, गाणी | कार्यक्रम हा तर ठरलेलाच (२)

यंदा "गणपति अथर्व शीर्ष" | जाणून घेऊ अर्थ यथार्थ | शब्दार्थ, भावार्थ, गुह्यार्थ | समजून घेउया नीट सारा (३)

शान्ति पाठा सहित सारा | अर्थ मराठीत सांगणारा | 'वक्ता' एक उभा केला | श्रोते भक्त जमा झाले (४)

वक्ता विनवी श्रोतयासी | बोलविता 'गणेश', जिव्हा माझी | 'अगम्य अग्राह्य' वाटल्या क्षणी | 'प्रश्न' उपस्थित करा सारे (५)

उत्तर यथार्थ ऐकोनिया | चित्ती 'समाधान' पावोनिया | नंतरच पुढे पुढे जाउ या | येणेचया सत्कार्यास 'सिद्धी' (६)

"शिव भक्तांना म्हणती 'शैव' | अथवा 'स्मार्त' वा वीरशैव | हरि भक्तांना म्हणती 'वैष्णव' | शक्ती उपासक 'शाक्त' जाणावे (७)

तैसेच गणेश भक्त 'गाणेश' | ऋषीत भृगू, मुद्गल मुख्य | च्यवन, भृशुण्डी हे पौराणिक | ऐतिहासिक मोरया गोसावी जी (८)

पेशवे थोरले माधवराव | चिमाजीअप्पादिक गण्यवर | फडके, रास्ते आदि सरदार | हे सर्व 'गाणेश' इतिहासि जमा (९)

यान्च्याच मुळे 'पुण्य' नगरी जवळची | 'अष्टविनायक' मन्दिरे सगळी | दुरुस्त झाली, सजविली गेली | प्रसिद्धी पावली जगभरात (१०)

ऐशा सर्व गाणेशास स्मरुनी | वन्दन अर्पुनी त्यान्च्या चरणी | त्यान्चा शुभ आशिर्वाद घेउनी | प्रारम्भ करु या" म्हणे वक्ता (११)

"प्रत्येक उपनिषद् पठणारम्भी | तसेच पठणा नंतर शेवटी ही | एक 'शान्तिपाठ' प्रार्थना म्हणावी | ऐशी रूढी वा परिपाठ आहे (१२)

ज्या वेदात जे उपनिषद | त्या वेदाचा जो 'शान्तिपाठ' | जी त्यावेदाची 'खूण' वा 'ओळख' | म्हणताच सूचक 'लाभार्थादिका' (१३)

'गणपति अथर्व शीर्ष' पठणारम्भी | 'शान्तिपाठ' ॐ भद्रम् कर्णेभि: | याअथर्ववेदीय पाठा सोबती | कृष्ण यजुर्वेदीय पाठही म्हणती " (१४)


शान्ति पाठ: (अथर्ववेदीय ): 

ॐ भद्रम् कर्णेभि: शृणुयाम देवा:|

ॐ भद्रम् पश्येम अक्षभि: यजत्रा : |

स्थिरै: अंगै: तुष्टुवांस: तनूभि: व्यशेम देवहितं यदायु :


हे ॐ स्वरूपी परमेश्वरा | आमच्या कर्णी शुभच येउ द्या | डोळ्यांनाही शुभच दाखवा | अशुभ अमंगळ न घडो कांहिही (१) 

या आमच्या शरीरातील | धष्ट पुष्ट होवोत सर्व अंगांग | सुस्थिर सक्षम आरोग्यवंत | मन, बुद्धी, अंत:करणादिकही (२)

आमुचे नेत्र, कर्णादिक | रसना, घ्राण , त्वचादिक | पञ्चही ज्ञानेन्द्रिये भद्र | आरॊग्य पूर्ण असावी (३)

हस्त द्वय , पाद द्वय | वाक्, श्वसनेन्द्रिय, पचनेन्द्रिय | हृद्-रक्ताभिसरणादिक | सर्वही 'भद्र' रहावी (४) 

ऐशिया स्वस्थ सुभद्र तनूंनी | आम्ही दैवी कार्ये करावी | आयुष्ये त्यास्तवच झिजवावी | अंतिम श्वासा पर्यन्त (५)


ॐ स्वस्तिन इन्द्रो वृद्धश्रवा: | स्वस्तिन: पूषा विश्व वेदा: |

स्वस्तिन: तार्क्ष्य: अरिष्टनेमि:| स्वस्तिन: बृहस्पति: दधातु | 

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: |


हे इन्द्र वृद्धश्रवादिक देवता | पूषा तार्क्ष्य कश्यपादिका | विश्व ज्ञात्या ऋषि मुनि जनादिका | विनंती तुम्हा सकलिकासी (६)

हे अरिष्टनेमि, बृहस्पति | तुमच्या सर्वान्च्या आशिर्वादांनी | तीनही जगतात शान्ती नांदावी | सौख्य, स्वास्थ्यसंवर्धावे (७)

नैसर्गिक घटना सुरांत घडाव्या | बेसूर, बेताल, दुर्घटना टळाव्या | एवढ्या मागण्या पुरवाव्या | विनंती तुम्हा सकलिकासी (८)


श्रोते म्हणती "इन्द्र बृहस्पती | दैवते आम्हास माहीत हो ही | 'तार्क्ष्य', पूषा, वृद्धश्रवा ही | देवता मंडळी कोण सांगा" (९) 

जे का वैदिक 'तार्क्ष्य' दैवत | पुराणे म्हणती त्यासच 'कश्यप' | द्वादश आदित्यांचा बाप | दैत्य, सर्प, दानवही त्याचीच प्रजा (१०)

पूषा, वृद्धश्रवा तसेच | अरिष्टनेमि प्रार्थिला येथ | लोकप्रियपौराणिक कथांत | नांवे त्यांची अन्य असती (११)

कर्षणे आकर्षितो तो 'कृष्ण' | 'विष्णु' जो अणु रेणूत प्रविष्ट | 'शं' वा 'शुभ'करीतो शिव शंकर | नामे ऐसी कार्यानुरूप (१२ )

म्हणूनच विष्णु, शिव, ललितादिक | सहस्र नामे असती प्रसिद्ध | तैशीच वैदिक दैवतास | लोकप्रिय नांवे असती नाना (१३)

'पूषा' देवता 'पुष्टि' कर्ता | विष्णुचाच अंश सूर्य जैसा | सर्व जगताचा पोषक जो का | "खाल्लेले अंगी लावितो" तोही (१४)

'अरिष्ट' म्हणजे इष्ट-अरि | अथवा अरि जो 'इष्ट' कर्मे करी | विघ्नासमच पण 'दुष्ट' नाही | 'अडथळा' वाटे मनास जो (१५)

'अरिष्ट' नामे नाना औषधी | आयुर्वेदी ग्रथित असती | रोग्यास प्यावयास 'अरि' समच भासती | परि इष्टत्वे करिती रोग निवारण (१६)

अष्टशतोऽरिष्ट, पुनर्नवाद्यारिष्ट | फलत्रिकाद्यारिष्ट, गण्डीराद्यारिष्ट | 'अरिष्ट' औषधी ऐशी अनेक | वैद्य अति कष्टे बनवीत होते (१७)

मीठ, मिरची, सुंठ, लसूण | हळद, हिन्ग, साजूक तूप | योग्य प्रमाणांत आरोग्य दायक | 'अति' तरी विषे वा 'अरिष्टे' (१८)

'अरिष्टनेमि' करि 'अरिष्ट' नियमन | जैसा का 'विघ्नराज' गजानन | अथवा 'वैद्यराजा'समानसमजून | 'अरिष्टनेमि'स प्रार्थावे (१९)

'वृद्धश्रवा' जो संवर्धन कारक | जन्मल्या पासून वार्धक्या पर्यन्त | वसुनी प्रत्येक सजीव देहांत | 'आयु' योग्य बदल घडवीत राही (२०)

म्हणुनि पुन: इन्द्रालाच | 'वृद्धश्रवा' ही मारिली हांक | अथवा इन्द्राचाच अंश | अवतार 'वृद्धश्रवा' जाणावा (२१)

कर्णेद्रिय ज्याचे सुवर्धित | ऐकू शके अति सूक्ष्म आवाज | अथवा वार्धक्यामुळे बधिर | किम्वडा विठ्ठल कर्नाटकी (२२) 

शब्द व्युत्पत्तिन्च्या विधीतुनी | ऐसेअर्थ वा 'अनर्थ'ही निघती | जाणोनि संदर्भादि संयुक्तिक संगती | योग्य तेवढेच निवडावे (२३) 


शान्ति पाठ: ( कृष्ण यजुर्वेदीय ): 

ॐ सह नौअवतु | सह नौ भुनक्तु |

सह वीर्यम् करवावहै | तेजस्वि नौ अधीतम् अस्तु |

मा विद्विषावहै | 

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: | 


हे ॐ स्वरूपी परमेश्वरा | आम्ही मानावे 'सहकार्य' तत्वा | जोडी जोडीने वसावे सर्वदा | संरक्षावे एकमेकासी (२४)

जोडी जोडीने खावे, प्यावे | अभ्यासावे, खेळ खेळावे | नाचावे, गावे कपडे ल्यावे | ध्येय गांठावे आनंदाने (२५)

कार्ये करावी सर्वान्नी मिळून | सर्वान्नी मिळवावे 'तेजस्वि' पण | सकाली उगवत्या सूर्या समान | योग्य समयी अदाहकपणे (२६)

'माझे, माझ्यांचे' नीट व्हावे | इतर परक्यांचे नष्ट व्हावे | ऐशी वृत्ती व अविचार सारे | न स्पर्शावे आमच्या मनास त्यांनी (२७)

'सहकार्य', 'सहजीवन' | 'सहभाग', 'सहभोजन' | 'सहक्रीडा' 'सहगायन' | 'सहमनोरंजन' सर्व काळी (२८)

देही, मनी, जनी, वनी | देशी, परदेशी, जली, स्थली | सर्वत्र नांदावी सुख शान्ती | एवढे मागणे पुरव देवा (२९)

ऐशा या शान्ती पाठा मधील | मागण्या, विनंत्या पूर्ण होतील | ऐसे या ज्ञानयज्ञाने घडेल | गजानना तव कृपेने (३०) 

तूच गणांचा 'गण'नायक | नैसर्गिक गणितांचा तूच 'कारक' | 'सिद्धी' 'बुद्धी'न्चाप्रदायक | कार्यारंभी नमन तुजला (३१)

मोददायक ज्ञानांचे 'मोदक' | तव 'प्रसाद' दे मम हस्तांत | 'अतर्क्य' ते तर्क्य 'परशु'ने उकलित | सहाय्यक व्हावे वक्त्यासि त्वा (३२)

घुसावया 'गुह्यांच्या' गुहेत | वक्त्यासबनवुनी वाहन मूषक | कुरतडोनि खावेत 'सुज्ञान' मोदक | गुहेत वावरोनि देवराया (३३)

श्रोत्यासि सुचवुनी 'प्रश्नांची' विघ्ने | वक्त्याससुचवुनी योग्य उत्तरे | नेतृत्वकरावे 'विघ्नराजत्वे' | ऐशी विनंती तुजलागी (३४)

नमुनि विनंती सरस्वतीसी | मोजून मापून शब्दांस बोलवी | ग्राह्य भावार्थ स्पष्ट करवी | अग्राह्य, पसारा टाळोनिया (३५)

'सत्य'च रुचकर प्रियसे बोलवी | 'पथ्य' ते हितकर मधांत घोळवी | 'तथ्य' ते मोजक्याचशब्दांत गुंफवी | मम निमित्ये वाग्देवते (३६)

विनंती ब्रह्मा, विष्णु, महेशा | गुरुदेवा श्रीदत्तात्रेया | इच्छा, ज्ञान, क्रिया शक्तिन्ना | कार्य सिद्धीच्या आशिषास्तव (३७)

ऋक्, यजु:, साम, अथर्व | वेदाचे ऐसे चार विभाग | महर्षी व्यासांनी केले थोर | द्वापर युगांती, अवतरोनी (३८)

त्यातील अथर्व वेदा मधील | एक सूक्त "गणपति अथर्व शीर्ष" | शिव, देवी, नारायण, सूर्य | ऐसीही "अथर्व शीर्ष" सूक्ते (३९)

'सूक्त' म्हणजे जे जे सुउक्त | छान, मोजक्याच शब्दात व्यक्त | 'मार्गदर्शक' अभ्यासावयास | निवडलेल्या 'विषया' विषयी (४०)

गणानाम् पति तो 'गणपति ' | या 'विषया'ची उत्तम माहिती | ज्या सूक्तात असे वर्णिली | तेच "गणपति अथर्व शीर्ष" (४१)

'शीर्ष' म्हणजे डोके वा 'शिर'| हजारो शीर्षे परमेश्वरास | पुरुषसुक्ती हा उल्लेख | 'अथर्वा'स वाङ्मयी शीर्षे नाना (४२)

त्यातील "गणपति" नांवाचे 'शिर'| तेच "गणपति अथर्व शीर्ष" | खूप जनास तोण्डपाठ | अभ्यास करिती फारच थोडे (४३)

"गणपति" पूजेत महाभिषेक | स्नान घालण्यास हे उपयुक्त | २१ वेळा २१ ब्राह्मण | पठविती विनायकी-संकष्टीला (४४)

उपनिषदे 'गणेश' विषया वरती | त्यांतही याची होते गणती | म्हणुन 'वेदान्त' सूक्त म्हणुनही | अभ्यासावे जिज्ञासुंनी (४५)

आणखी तीन मुख्य मुख्यशी | उपनिषदे 'गणेश' विषया वरती | गणेश 'पूर्व' व 'उत्तर' तापिनी | 'हेरम्ब' तिसरे जाणावे (४६) 

----------------- ============= --------------- 


ॐ श्री गणेशाय नम: | ॐ गं गणपतये नम: | ॐ अष्ट सिद्धिपतये नम: | गणनायका तुज नमन माझे (०.१)

"अहं ब्रह्मास्मि", "तत् त्वम् असि" | "अयम् आत्मा ब्रह्म" स्वरूपी | "प्रज्ञानम् ब्रह्म" ऐसी | चार महा वाक्ये चार वेदी (०.२)

"अहम् ब्रह्मास्मि" वा 'मी ब्रह्मांशच'| "तत् त्वम् असि " वा 'तूहीब्रह्मांशच'| "अयम् आत्मा ब्रह्म " वा 'हा ही ब्रह्मांशच'| वा 'तो ती ते हे सर्व ब्रह्म' (०.३)

"प्रज्ञानम् ब्रह्म" वा 'प्रज्ञान ही ब्रह्मांशच'| ऐशी चार वेदान्ची ही थोर चारच | "महावाक्ये" जे गर्जतात साच | त्यां 'ब्रह्म' रूपासि नमन माझे (०.४)

"तत् त्वम् असि" या महावाक्यी | जोवर्णिला त्यातील 'प्रत्यक्ष' विभाग | तोच 'गणपति अथर्वशीर्षात' | विशेषेण नमिला असे (०.५) 

आता 'अथ' पासूनि 'इति' पर्यन्त | तव 'अथर्वशीर्षा' चा सांगण्यास अर्थ | सुलभ मोजक्याच गोड शब्दांत | ऋद्धिबुद्धिपती मज 'मति' द्यावी (०.६)

'वरेण्या'स कथिलीस 'गणेशगीता' | मुद्गलास शिकविली तू 'योग गीता' | या दोनहीन्च्या मार्गदर्शक तत्वा | उपयोग करीन यथा मती मी (०.७)

'उपनिषद्' रूपी या गोमाता | एकशे आठ ज्या प्रमुख त्यांतल्या | त्यांचा आधार सांपडेल जितका | तितकेच बोलीन गणराया (०.८)

ज्ञानेश्वरी वा दासबोधादिक | मराठीसंत वाङ्मय ग्रन्थ | यांतीलही काही भावार्थ | उपयोगीनयथा मती मी (०.९)

ऐसे प्रार्थोनि गणेश्वराला | 'विघ्न'राज विनायकाला | वक्त्याने मग प्रारम्भ केला | 'स्वानंदी' गणेशही ऐकतसे (०.१०)

---------------- ============= --------------- 


( आद्यवंदन ) १) नमन प्रार्थना : 

ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि |

त्वमेवकेवलम् कर्ताऽसि | त्वमेवकेवलम् धर्ताऽसि | त्वमेवकेवलम् हर्ताऽसि |  

त्वमेवसर्वम् खलु इदं ब्रह्मासि | त्वम् साक्षात् आत्माऽसि नित्यम् | (१)


नमन तुजलाहे गणपति | तुच परब्रह्म तत्त्व अससी | विश्वात्मक स्वरूपे तू प्रत्यक्ष दिसशी | तूच कर्ता धर्ता हर्ता (१.१ ) 

जे जे मम नयनांना दिसे | आघ्राणिता नासिकेस भासे | कानांतअस्तित्व सांगतसे | त्यातून तूच मज प्रत्यक्ष व्यक्त (१.२)

रंग-रूप, रस, गंध | शब्द, स्पर्श असे पञ्च 'अक्ष' | ज्ञानेन्द्रियांच्या द्वारे या पञ्च | तूच प्रति-अक्ष मज 'प्रत्यक्ष' होसी (१.३)

बृंहते, रमते, हीयते | जन्मा येते, जगते, मरते | हेच 'ब्रह्म' समजले जाते | याहून 'पर' तेच 'परब्रह्म' (१.४)

अणू, रेणू, जीव जन्तू | पृथ्वी, नवग्रह, तारे समस्तु | ब्रह्माण्डी वसती त्या त्या वस्तू | सर्वही तव 'ब्रह्म' स्वरूप (१.५)

या सर्वही नाशिवन्ता मधून | 'अविनाशी' उर्जा उर्जातुन | नित्य तूच 'परब्रह्म' | 'अव्यक्त' व्यक्त बुद्धीस होसी (१.६)

तेच तुझे 'आत्मा' स्वरूप | सजीवी 'जीवात्मा' तू 'अव्यक्त' | अनित्य शरीर रूपे व्यक्त | व्यक्त अव्यक्त दोऩ्ही तूच तू (१.७)

नाना अणुंच्या समूहातून | सजीव पेशी होती निर्माण | नाना पेशीन्च्या समूहां मधून | एकेक शरीर जन्मा येई (१.८)

'जीवात्मा' घेई ज्याचा ताबा | ते शरीर 'शिव' सजीव वा | त्यावीण अशिव 'शव' त्यांतल्या | पेशीत, अणूत, रेणूत तूच तू (१.९)

सजीवांचे 'जीवात्मा' स्वरूप | निर्जीवांचेही 'आत्म' स्वरूप | ऐसे तुझे 'परमात्मा' स्वरूप | नित्य, शाश्वत, जाणे बुद्धी (१.१०)

श्रोता एक पुसे वक्त्यास येथे | प्रेतातही मंगल परमात्मा वसे | हे मम बुद्धीस रुचे पटे | ऐसा पुरावा द्यावा मज (१.११)

वक्ता म्हणे "भली" ही तव शंका | गणेश कृपेने निवारीन आता | सर्वा ठायी परिपूर्णत्वता | परमात्म्याची 'व्याख्या'च ऐशी (१.१२)

मृत्यु केंव्हा, कोठे, कधी ? | कसादिक गणितांची उत्तरे सर्वही | गणेश प्रेतांंतही लिहवीत राही | लेखक ब्रह्मा, विष्णु, शिवादिक (१.१३)

हा लेख वाचून वैद्य लिहिती | 'शव विच्छेदन' लेखी माहिती | न्यायाधीश ते लेख वाचिती | 'निर्णय' करण्यास न्याय्य ऐसे (१.१४)

प्रेतांचे घडवुनी विघटन | पंच महाभूती विलयी करण | या नैसर्गिक प्रक्रियेस्तव मिळून | प्रकृती पुरुषादिक कार्यी रत (१.१५) 

आता सजीवांचे 'जीवात्मा' स्वरूप | जैसे विशद ब्रह्मोपशदांत | तेही आध्यात्मिक ज्ञान येथ | थोडक्यात व्यक्त करी वक्ता (१.१६) 

जागृतीस भोक्ता आत्माराम | त्यास म्हणती 'ब्रह्मदेव' | स्वप्नांचा भोक्ता वैकुण्ठराव | सुषुप्ती 'हर' भोगीतसे (१.१७) 

जागृती, स्वप्न आणिक सुषुप्ती | यांस म्हणती 'अवस्था' त्रयी | चतुर्थ समाधिस्थ 'तुर्या' जाणावी | तिचा भोक्ता 'आत्मा' सदाशिव (१.१८)

ऐसे 'साक्षात्' येती अनुभवा | 'जीवात्म्याच्या'च या चार 'गुण'कला | त्यातील 'नित्य' सातत्यता | तूच 'गुणेशा' गणपति (१.१९)

जागृतीत जी जाणीव पूर्वक | कार्य करविते उत्साह पूर्वक | सावित्री ती नमावी नित्य | गायत्री सरस्वती तिची अन्य स्वरुपे (१.२०)

जागृतीत वा 'स्वप्न' स्थितीत | 'स्वप्ने' पाहणे वा रमण्याची ताकत | ती 'रमा'देवी नमावी नित्य | 'लक्ष' वेधक 'लक्ष्मी' जाणोनि घ्यावी (१.२१)

'गाढ' निद्रा दात्री काली | स्नायू स्नायूतील 'शीण' असुरास गिळी | भोक्ता 'शं'कर 'शं' स्थिती करवी | सती पार्वती तिचीच रूपे (१.२२)

'आध्यात्मिक' म्हणजे 'स्वदेही' वा 'पिण्डी' | 'पारमार्थिक' ते जे 'ब्रह्माण्डी'ही | दोनही सत्ये जाणू शके बुद्धी | सद्बुद्धि दात्या गणेश कृपेने (१.२३) 

----------------------- =============== ------------------------


(गणेश रक्षा वा कवच )

२) रक्षा कवच प्रदानार्थ प्रार्थना :

ऋतं वच्मि | सत्यम्वच्मि | अव त्वम् माम् | अववक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् | अव धातारम् |  अव अनूचानम् अवशिष्यम् |

अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् | अव उत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव च ऊर्ध्वात्तात् | अव अधरात्तात् |

सर्व तो माम् पाहि पाहि समंतात् |(२)

हितकरसर्वास तेच वदतो | खरे सत्यच मी सांगतॊ | तूच मम वाचेस वदवितॊ | वक्ता श्रोता दोऩ्ही तूच (२.१)

मम संरक्षण तूच करणे | मम वक्तृत्व शक्तीस रक्षणे | मम श्रोतृत्व शक्तीस रक्षणे | पंचही ज्ञानेन्द्रियास रक्षी माझ्या (२.२) 

तूच दाता, तूच धर्ता | प्रलयान्त्तीहि तुज अवशिष्टत्वता | अनंत कोटी ब्रह्माण्ड स्वरूपा | जीवात्मा विश्वात्मा सर्व तूच (२.३)

मज जे दाता दातृत्व करिती | त्यांना ती प्रेरणा तूच देशी | दातृत्व शक्ती त्यांची संरक्षिसी | म्हणुनि ते सर्वही तूच देवा (२.४)

तूच मज प्रेरून 'दातृत्व' करविशी | तेंव्हा 'धाता' बनून आशीर्वचशी | ऐशा धात्यांची 'धातृत्व' शक्ती | संरक्षी देवा गजानना (२.५) 

'अनूचान' म्हणजे बोलताचि न ये | जे बोलण्याला शब्द अपुरे | तरीही मज थोडक्यांमधे | बोबडे चार शब्द बोलू दे (२.६)

अथवा जे मुके बोलू न शकती | शब्दा अभावी मौन पत्करिती | ऐशा मुक्यांच्या नाना जाती | सर्वास संरक्षी उमापुत्रा (२.७)

तूच 'गुरु', तूच 'शिष्य' | या 'गुरु-शिष्य' परंपरेस | संरक्षिता तूच एक | रक्षण करी हे दयासिन्धो (२.८)

'शिष्य' म्हणजे शिल्लक राहणे | पुरे पुरे म्हणुनी न पळणे | आणखी आणखी शिकवा म्हणणे | 'शिष्यत्व' ऐसे 'शिष्यांत' रक्षी (२.९)

'गुरु'चे अर्थ 'गुरु'गीतेत | नाना व्युत्पत्त्या सहित विशद | ज्ञानदाता, सुज्ञानी श्रेष्ठ | 'गुरुंचे' 'गुरुत्व' संरक्षावे (२.१०)

माता, पिता, आजी, आजोबा | काका, मामा, मावशी, आत्या | जो जिथे भेटे ज्ञानदाता | त्या सर्व गुरूंना संरक्षावे (२.११)

अवधूत गीतेत चोवीस प्रकार | गुरूंचे वर्णिले नमून्या खातर | पृथिवी, वायू, आकाश, आप | अग्नि, चन्द्र, सूर्य, सिन्धू (२.१२)

कपोत, अजगर, मधुमक्षिका | पतङ्ग, गज, हरिण, मधुहा | मीन, अर्भक, वेश्या पिङ्गला | कुमारी, भुन्गा घोन्घावणारा (२.१३) 

'कुरर' पक्षी, कोळी कीटक | सर्प, कार्यमग्न लोहार कार्मिक | ऐशियास पाहुनी लक्षपूर्वक | शिक्षण सत्शिष्य घेत राहती (२.१४)

ज्ञानार्जनाच्या स्वशक्तीने | एकलव्य सम सत्शिष्य शिकले | तैशीच सद्बुद्धी क्षमता तू दे | सर्व जिज्ञासू विद्यार्थ्यान्ना (२.१५)

तूच जे जे माझ्या मागे | तूचजे जे माझ्या पुढे | उजवी कडे, डावी कडे | वरती खालती चहूकडे तू (२.१६)

ऐसे सभोवती तव अस्तित्व | म्हणोनि द्यावे मज 'संरक्षण' | सर्वही प्रकारे अलगद | भक्त रक्षका लंबोदरा (२.१७) 

पूर्व, पश्चिम, दक्षिणोत्तरी | आग्नेय,नैऋत्य, वायव्य, ईशान्यी | अध, ऊर्ध्व दिशांत दाही | भरून उरलास 'दशांगुले' तु (२.१८)

दाही दिशांचे दश दिक्पालक | 'वास्तु' शास्त्राचे आधार द्योतक | 'नगर' वा 'मंदिर' रचना सहाय्यक | त्यांमधुनि व्यक्त तूच देवा (२.१९) 

अंत:, बहि: आंत-बाहेर | आदि, अंती, मध्ये मधील | सर्वही काळी 'काल' रूपात | भरून उरलास अवशिष्टत्वे (२.२०)

सर्व दिशांनी, सर्व काळी | सातत्याने संरक्षण करी | माझे, जगाचे, सर्वान्चेही | हित रक्षण करी अविरतपणे (२.२१) 

भु:, भुव:, स्व:, मह: | जन :, तप :, सत्यम् अशा | सप्त स्वर्ग लोकात सा-या |भरून उरलास अवशिष्टत्वे (२.२२)

तल, अतल, वितल, सुतल | तलातल, रसातल वपाताल | अशा सप्तही पातालांत | भरून उरलास अवशिष्टत्वे (२.२३)

इन्द्र लोक , चन्द्र लोक | सूर्य लोक, गंधर्व लोक | वैकुण्ठ, कैलास, ब्रह्म लोकांत | भरून उरलास अवशिष्टत्वे (२.२४)

स्वर्ग, मृत्यू, पाताल त्रैलोक्यी | यम लोकी वा नरक लोकांतही | वरुण लोकी सप्त सागरी | भरून उरलास अवशिष्टत्वे (२.२५) 

ऐशा सर्वा ठायी मधून | पाहसी मजकडे लक्ष देऊन | रक्षणदे मज संरक्षून | ऐशी विनंती तुज पायी (२.२६)

अनेक 'रक्षा', 'कवच' स्तोत्रे | संरक्षणास्तव प्रार्थिती दैवते | श्रद्धानुकूल धरुनी रूपे | संरक्षावे तू गजानना (२.२७)

----------------------- =============== ------------------------ 

३) सूक्ष्म रूप दर्शनम् वर्णनम् च :  

त्वम् वाङ्मयस्त्वम् चिन्मय:| त्वम् आनन्दमय: त्वम् ब्रह्ममय:|

त्वम्सत्-चित्-आनन्द अद्वितीयोऽसि |  

त्वम्प्रत्यक्षम् ब्रह्मासि | त्वम्ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि | (३) 


तूच शब्द ब्रह्म आगळे | गद्य, पद्य, संगीतातले | वाचून, ऐकून, गाऊनिया जे | 'मोद' देते चित्तासी (३.१)

परा पश्यन्ति मध्यमा वैखरी | ऐशा पायऱ्या चढोनि चारी | जिह्वेतुनी उच्चारित जे होई | ते तव 'नाद'-'शब्द' ऊर्जा स्वरूप (३.२) 

सजीवातील 'चैतन्य' शक्ती | देहात निवसोनि आनंद घेई | मनासारखी कार्ये घडवी | दशेन्द्रियासी राबवी नित्य (३.३)

मन, बुद्धि, अहंकार, चित्त | यास म्हणती अंत:करण चातुष्ट्य | चित्तांत क्षिप्त, विक्षिप्त, मूढ | निरुद्ध, एकाग्र पंच प्रामुख्ये (३.४)

पंचही प्रकारे तूच निवससी | पंच भूमि भूमिका चालक तूचि | मूर्ख, पढतमूर्ख, उत्तमादिलक्षणी | दासबोधी किन्चित् वर्णिलेल्या (३.५) 

चित्त रमते, हसते, गाते | चित्त क्षुब्ध, प्रक्षुब्ध होते | या चित्त वृत्तिन्च्या निरोधनाते | 'योग' म्हणती पतञ्जली (३.६)

चित्तास जोडी अहंकाराची | "मी करीनच" या जिद्दीची | तशीच ओढ दिशा 'श्रद्धा'त्रयीन्ची | 'यो यत् श्रद्ध:, स एव स:' (३.७)

चित्त भ्रमते, दिङ्मूढ होते | शोक करते, व्याकूळ होते | चित्त शांत समाधिस्थ होते | अवस्था चातुष्ट्य भोक्ता 'चित्त'(३.८)

'मन' संकल्प विकल्प कर्ता | बुद्धीच्या सहाय्ये ठरवी सर्वथा | 'मन' प्रफुल्लितता वा उदासीनता | पोर्णिमा अमावास्येच्या चन्द्रा समान (३.९)

चित्त 'मन' 'बुद्धी'न्च्या पलीकडे | जीवात्म्यांच्या 'आत्म' स्थितीचे | आरशातील 'प्रतिबिम्बा'सारखे | जाणून घ्यावे जिज्ञासुंनी (३.१०)

म्हणोनी गणेश स्वरूप 'चिन्मय' | स्वानंद लोकी रमते तन्मय | राहू शके खंबीर स्थीर | शांत, गंभीर, समाधानी (३.११)

अन्नमय, प्राणमय, मनोमय | ज्ञानमय, आनंदमय पंच कोषांतर्गत | "स्वानंद" लोकी तुझे निजस्थान | ते सर्वही भरून उरशी तू (३.१२)

स्थूल, सूक्ष्म, कारण शरीरी | सजीव, निर्जीवअशरीरी, शरीरी | सगुणी, निर्गुणी, क्षरी , अक्षरी | भरूनही उरशी अवशिष्टत्वे (३.१३) 

प्रगट-अप्रगट, दृश्य अदृश्य | व्यक्त-अव्यक्त, गम्य-अगम्य | पर, परात्पर ब्रह्मादिकांतुन | भरूनही उरशी दशांगुले तू (३.१४) 

ऐशिया गण्य, अगण्यस्वरूपी | प्रति ज्ञानेन्दिय-अक्ष 'प्रत्यक्ष' होसी | "प्रज्ञानम् ब्रह्म" वाक्यासरशी | ज्ञान, विज्ञानादिक तुझीच स्वरूपे (३.१५)

नेत्रांस साक्षात्कार 'विश्व' स्वरूपी | बुद्धीस निराकार स्वरूपातही | ज्ञाने विज्ञाने ज्ञात होसी | "प्रज्ञान" तव 'विश्वचालक' स्वरूप (३.१६) 

प्रत्येक घटना या विश्वातली | 'विधि' नियमानुसारच घडे ती | अणू रेणू वा आकाश गंगेतही | "नियम_पालन" अती कांटेकोर (३.१७)

कोठे ? कधी? काय ? घडावे | या गणितान्ची सर्व उत्तरे | विश्वव्यापी तव गणनयन्त्रे | देत राहती आपोआप (३.१८)

ही स्वयंचालित गणन यान्त्रिकी | तुझीच दैवी किमया शक्ती | "प्रज्ञानम् ब्रह्म" या महावाक्यातुनी | वेदोपनिषदी वर्णिली दिसे (३.१९)

अद्वितीय असे तव सातत्य | अद्वितीयतव 'चैतन्य' स्वरूप | अद्वितीय तव 'आनन्द' स्वरूप | ब्रह्मानन्द वल्लीत वर्णिले थोडे (३.२०)

हजारो अक्ष तव विश्वरूपा | मोजकेच लाभले मानवी देहा | त्यांतून 'प्रत्यक्ष' मानवी बुद्धिला | होसी गणेश्वरा तू कृपेने (३.२१)

----------------------- =============== ------------------------


४) स्थूल विश्व रूप दर्शनम् वर्णनम् च :  

सर्वम् जगदिदम् त्वत्तो जायते | सर्वम् जगदिदम् त्वत्तो तिष्ठति | सर्वम् जगदिदम् त्वयि लयम् एष्यति | सर्वम् जगदिदम् त्वयि प्रत्येति |

त्वम् भूमि: आपोऽनलोऽनिलोनभ: | (४)


'अंत' चे मुख्यत: अर्थ दोन | एक 'आंत' दुसरा 'अंतिम' | 'आंत' राहून करिती काम | ती 'अंत:करण' करणे चार (४.१)

पंच ज्ञानेन्द्रिये, पंचकर्मेन्द्रिये | ही इन्द्रियांची 'स्थूल' स्वरूपे | श्वसन, पचनादिक कर्मेन्द्रिये | 'आंत' राहूनही 'स्थूल' असती (४.२)

'स्थूल' म्हणजे फक्त 'मोठे' नाही | लहान ते सर्व 'सूक्ष्म' नाही | सूक्ष्मांचे स्वरूपही विश्वव्यापी | हे प्रथम जाणले पाहिजे (४.३)

'अंत:करण' व पंच कोषांतर्गत | जाणिले गाणेश 'ब्रह्म' स्वरूप | 'पिण्ड' वा प्रत्येक सजीव देहांत | आता विश्वात्मक 'स्थूल' पाहू (४.४)

अणू, रेणू, परमाणू पासुनी | ग्रह, तारे, नक्षत्र, आकाशगंगांतुनी | जाहलेय जे 'व्यक्त' 'अव्यक्ता'मधुनी | त्यांस एक 'स्थूल' 'ब्रह्माण्ड' म्हणती (४.५)

एका या 'ब्रह्माण्ड' उत्पत्तीच्या क्षणी | एका 'बिन्दू' तून 'महास्फोट' घडुनी | बाहेर पडली प्रचण्ड 'शक्ति' ही | ऐसे मानिती शास्त्रज्ञ आजचे (४.६)

हेच दुसऱ्या शब्दांमध्ये | वेदोपनिषदी पुराणी लिहले | 'बिन्दू'स विष्णुची 'नाभी' म्हंटल्रे | 'कारण' म्हंटले "दैवी इच्छा" (४.७)

कमल पुष्पाच्या पाकळ्यांप्रमाणे | दाही दिशांना ब्रह्माण्ड उमलले | प्रगटत प्रसरण होतच चालले | ऐसे दिसे भासे या क्षणी (४.८)

वेदोपनिषदी ही सद्य स्थिती | प्रसरणाचीच मानिली निश्चिती | परी या सद्य 'कल्पा'च्या अंती | 'आकुन्चन' क्रिया जन्मेल (४.९)

त्रेचाळिस लाख वीस हजार संवत्सर | एका चतुर्युगाचा कालमान | ऐशिया एक सहस्रान्ती तत्क्षण | 'कल्पान्त' प्रलय घडेल पुढे (४.१०)

ऐसे केलेले असे 'भाकित' | त्याचा आधार नसेल माहीत | तरीही त्यान्चे असे जे गणित | समजून उमजून पुढे जाणे (४.११) 

असो एक 'कल्प' वर्षे 'प्रसरण' | नंतर एक 'कल्प' वर्षे 'आकुन्चन' | 'जगदोत्पत्तिस्थितिलय' कारण | गणित हे सर्वथा गणेशा तुझे (४.१२) 

या 'ब्रह्माण्ड' वा ब्रह्मदेवाचा | कल्पान्ती एक 'ब्रह्मदिन' कल्पिला | तीनशे साठ 'ब्रह्मदिन' काला | एक 'ब्रह्मवर्ष' ही व्याख्या केली (४.१३)

ऐशिया शंभर ब्रह्मवर्षान्चे | सरासरी आयुष्य ब्रह्मदेवाचे | त्यानंतर या 'ब्रह्माण्डा' घडे | 'मृत्यु'सम विनाश कल्पिला असे (४.१४)

'विश्वास' ठेवा अथवान ठेवा | प्रथम 'म्हणणे' तरी समजून घ्या | म्हणजेच हा या अथर्वशीर्षातला | भाग उमजेल जिज्ञासूंना (४.१५)

या आपुल्या 'ब्रह्माण्डा'ला | पन्नास 'ब्रह्मवर्ष' आयुष्याला | झालीय पूर्तता ऐशिया तर्का | वेदोपनिषदी मांडले असे (४.१६)

म्हणुनी आजवर हजारो वेळा | या 'आकुन्चन' 'प्रसरण' क्रिया | जाहलेल्या आहेत पुऱ्या | ऐसे म्हणती वैदिक ऋषी (४.१७)

असो हे आयुष्य मानवान्चे | सरासरी शंभरच वर्षे | परंतु तारे ग्रह गोलकान्चे | अनेक अब्ज कोटी वर्षे (४.१८)

विस्फोटातुनी 'ब्रह्माण्ड' जन्मले | अंडाकृती गोलक भासते जे | त्यास उदराकार कल्पिले | चित्र काढोनिया पहावे जी (४.१९)

आता 'उत्पत्ति', 'स्थिति', 'विलय' | या त्रिगुणान्चा तीन रेषात्मक | चित्रांत जोडिले एक 'शिर' | चित्रांतकाढोनि पहावे जी (४.२०)

आता या विश्वांत जे जे घडते | ते सर्व नियमानुबद्धच असते | या नियमान्च्या 'बन्धन' परत्वे | 'शिर' जोडावे 'उदरा'ला (४.२१)

हा 'बन्ध' शुण्डाकार मानिता | 'गजाननाकार' चित्रास आला | उभा 'ॐ'कार स्वरूप दिसला | विश्व चालक 'गण'पति (४.२२)

त्रिगुण ब्रह्मा, विष्णु, महेश | 'उत्पत्ति', 'स्थिति', 'विलय' कारक | गणेश नियमांच्या गणितांस कारक | 'गुणेश' रूपे बुद्धीस दिसे (४.२३)

हा 'बुद्धी'चा 'साक्षात्कार' | चित्रांत नेत्रास होई गोचर | 'वक्रतुण्ड', 'लम्बोदर' | 'प्रत्यक्ष' अक्षांस दृष्टीच्या (४.२४)

या 'ढेरीचा' 'घेर' अवघा | 'काल' गणनेच्या सर्पाने बांधला | नाग मौन्जीबन्धन कटीला | बांधोनि नाचे हो हा 'गण'पति (४.२५)

'ज्ञान' जिज्ञासा स्वरूपी मूषक | 'वाहन' याचे कल्पिले खास | गणित मन्त्रान्चा 'पाश' हस्तांत | बन्धन कारक विश्वास साऱ्या (४.२६)

'होय/नाही', 'चूक/बरोबर' | हा तर्काचा 'परशू' घेउन | 'अज्ञान' असुरांचे करित दमन | विघ्नांचे शमनही करीतसे (४.२७)

ऐसे हे तुझे "स्थूल विश्व रूप दर्शन" | घेता होतसे किन्चित् 'आकलन' | जगदुत्पत्तिस्थितिलय सर्व | ठरवितात गणिते तुझी देवा (४.२८)

'शून्या'तून काहीही कधीही न जन्मते | म्हणोनि विस्फोटा आधीही होते | शून्याकार बिन्दूत 'अव्यक्त' रूपे | विस्फोटामधून जे प्रगट झाले (४.२९)

कालानुसार 'व्यक्त', 'अव्यक्त' | दोऩ्ही रूपाने तव सातत्य | अमृतत्व तथा विश्व व्यापकत्व | जाणण्या योग्य असे देवा (४.३०)

देवा तव दैवी गणन यान्त्रिकी | विश्वव्यापी जसजसे सुचवी | तैशीच घडते विश्वोत्पत्ती | अखिल अनंत ब्रह्माण्डांमध्ये (४.३१)

सर्वाठायी अन्तर्यामी | बसुनि सुचविसी कार्ये सर्व जी | तैशीच घडते उत्पत्ती स्थिती | विलयादिक जागोजागी ही (४.३२ )

उष्णतेचे तापमान | हवेचा दाब इत्यादि मोजुन | तू सांगसी तरी 'घन'रूप जन्मुन | विलय द्रवादिक स्वरूपास होई (४.३३ )

वायु स्वरूपांतही किती अणूंनी | किती वेगांत धांव धांवुनी | तिष्ठत राहणे 'स्थिती' साधुनी | हे सर्व सांगे तव दिव्य गणित (४.३४ )

ऐसा तू उत्पत्ती, स्थिति, लय कारक | प्रत्येक क्षणी कोण? कोणत्या स्थितीत ? | तिष्ठत राहिलाय कोणत्या जागेत? | याचा 'प्रत्यय' तव गणितेच देती (४.३५)

पृथिवी, आप, तेज, वायु | आकाश या पंच महाभूतांतही | रूपी, अरूपी, सर्व स्वरूपी | भरूनही उरशी अवशिष्टत्वे (4.३६)

जे जेपृथक् पृथक् भासे | तेच 'पृथ्वी' स्वरूप तुझे | 'आप्नोति' करण्यास गुंडाळे, घुसे | त्या 'आप' तत्वी प्रगट तूच (४.३७ )

जांपानिहिपीनातां या | सप्त रंगी दृश्य किरणांतल्या | अथवा अदृश्य 'क्ष' आदिकांतल्या | तेज स्वरूपा तुज नमन (४.३८)

शीत, उष्ण तापमानांत | तूच वससी 'अग्नी' स्वरूप | जे जे "वाहते" ते 'वायु' स्वरूप | सर्वान्तर्यामी तुज नमन (४.३९)

प्राण, अपान, व्यान, उदान | समान नांवे पंच प्रकारे प्राण | सर्वही सजीव देहांमधून | कार्ये नाना विधा करिती (४.४० )

नाग, कूर्म आणि कर्कश | देवदत्त, धनंजय | ऐसे आणखी पाच प्रकार | उपनिषदांत सापडती (४.४१) 

'प्राण' आंत खेचून नेई | प्राशितान्नाचा ग्रास जसा की | अथवा 'पूरक' श्वसन क्रियाही | अंत:कर्षण नानाविधा (४.४२)

'अपान' वायू उछ्वास, शिन्का | मूत्रमलोत्सर्जन घाम अश्रूदिका | बाहेर टाकण्याच्या या क्रियांना | 'वहनशक्ती' जी तोच वायू (४.४३)

'व्यान' व्योम शरीरी व्यापवी | पचविल्या अन्नांतील पोषक तत्वांसी | अथवा 'टोचून' ज्या घुसविल्या औषधी | सर्वत्र शरीरी पोचवितो जो (४.४४)

'उदान' वायू उलटी वा उचकी | अति रक्त चापे आणवी 'घेरी' | गाठावी उच्च पदे वा पदवी | मानसिक उदान वायू सांगे (४.४५)

'समान' जैसे का रक्ताभिसरण | सर्व शरीरी आक्सीजन | द्रव्ये पोषक वा औषधीक | पुरवठा त्यांचा करीत राही (४.४६)

'वायू' फक्त 'हवा' मुळीच नाही | हे जाणावे जिज्ञासूंनी | चलन वलन दोषे होती व्याधी | धनुर्वात, संधिवात, अर्धान्ग वायू (४.४७)

इलेक्ट्रिकच्या तारा दिसती | स्तब्ध बांधल्या खांबांवरती | पर्ंतू आंत वीज प्रवाह गती | तेही काम वायूचेच (४.४८)

संन्ध्या समयी कपभर दुधांत | घालिता साखर चमचा भर | सकाळी सम प्रमाणात | गोडी कपभरी व्याप्त झाली (४.४९)

देवापुढे लाविली उदबत्ती | सुगन्ध दरवळे संपूर्ण गृही | ऐशा या पंच वायुन्च्या कृती | 'कृती' योग्य ऐशी नामाभिधाने (४.५०)

लांबी, रुन्दी, उन्ची क्षेत्रफळ | गच्च भरलेले वा पोकळ | 'व्याप्ती' व्यापून राहे ते 'स्थल' | 'आकाश' तत्वी प्रगट तूच (४.५१) 

मधुर संगीत सुरांमधून | बेसुर, असुर, कर्कशांतुन | 'अल्ट्रा' आदिक अश्रुण्यांतुन | 'शब्द' स्वरूपी 'उर्जा' तूच (४.५२)

असो पंचही महाभूत रूपे | गणेशा तुझीच दिव्य स्वरूपे | ऐशिया तव स्थूल विश्वरूप दर्शने | धन्य मुनि जन होताती (४.५३)

----------------------- =============== ------------------------


५) सूक्ष्म विश्व रूप दर्शनम् वर्णनम् च :  

त्वम् चत्वारि वाक् पदानि |

त्वम् गुणत्रयातीत:| त्वम् देहत्रयातीत:| त्वम् कालत्रयातीत:|

त्वम् मूलाधार: स्थितोऽसि नित्यम् |

त्वम् शक्तित्रयात्मक: | (५)


तूच "चत्वारि वाक्" स्वरूपी | परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी | 'परा' जी मूळ उत्स्फूर्तशी प्रगटली | 'पश्यन्ती' बुद्धीस दिसलेले रूप (५.१)

'मध्यमा' जी बुद्धीने शब्दांत गोविली | शब्दान्च्या सरांनी वाक्यांत जडवली | 'वैखरी' शेवटी वाचा जे वदली | श्रीगणेशातव कृपेने (५.२)

त्वम् चत्वारि वाक् पदानि | चार महावाक्ये चारी वेदातली | वर्णिती तुजलाच हे 'ब्रह्मणस्पती' | वेद गर्भित 'गुह्य' परब्रह्म रूपा (५.३)

"अहं ब्रह्मास्मि", "तत् त्वम् असि" | "अयम् आत्मा ब्रह्म" स्वरूपी | "प्रज्ञानम् ब्रह्म" स्वरूप ऐसी | चार महा वाक्ये चार वेदी (५.४)

 विवरून बोलून थकल्यावर मुनी | ऐशा चारच 'महावाक्यां'तुनी | वर्णिती, घालण्यासतुज गवसणी | तेच मी मराठीत सांगू पाहे (५.५)

'मी'हि, 'तू'हि, आम्ही, तुम्ही | 'तो'हि, 'हा'हि, 'ही'हि, 'ती'हि | 'हे'हि, 'ते' हि, , 'हे''ते' सर्वहि | भरून उरलास तू 'प्रज्ञान' रूपे (५.६)

'ज्ञान' ते जे 'ज्ञात' होते | 'विज्ञान' विशिष्ट विषयांमधले | अथवा "वैशिष्ट्यपूर्ण" ऐसे | 'प्रज्ञान' प्रखर संपूर्ण पणे (५.७)

"संपूर्ण ज्ञान" तुझे स्वरूप | अनंत प्रकारच्या ब्रह्माण्डी सतत | जे घडते ते कारणासहित | जाणसी फक्त तू 'प्रज्ञान' स्वरूपा (५.८)

स्थूल त्रिगुण "उत्पत्ती, स्थिति, लय" | सूक्ष्मत्रिगुण "सत्व, रज, तम" मय | दोऩ्हीन्चाही घेतो जो अनुभव | तो 'जीवात्मा' गणेशा तूच (५.९)

स्थूल, सूक्ष्मदोऩ्हीही त्रिगुणांच्या पलिकडे | 'स्थूल', 'सूक्ष्म' 'कारण' त्रिदेहांच्या पलिकडे | भूत, भविष्य, वर्तमान त्रिकालांच्या पलिकडे | सातत्ये स्थित तू नित्य अविनाशी (५.१० )

सजीवीदेहांचे तीन प्रकार | 'स्थूल', 'सूक्ष्म' आणखी 'कारण' | 'स्थूल' देह जो अन्न-प्राणमय कोष | पंच महाभूत जनित देह 'स्थूल' (५.११)

'सूक्ष्म' देह दशेन्द्रियांचा चालक | पित्त कफ रक्तादिक स्रवोत्पत्तिकारक | स्वत: 'सूक्ष्म' पण 'स्थूलदेह ' नियन्त्रक | आयुर्लिन्ग अनुरूपी कार्ये करवी (५.१२)

रक्तदाब अथवा रक्तपेशीन्ची | 'गणना' नि 'कार्ये'हि नियन्त्रित करी | देहाग्निचे तापमान सुयोग्य राखी | 'सूक्ष्म-देह' सजीवी 'इन्द्र'सम जाणा (५.१३)

'कारण' कांहीही असो वा नसो | अविरत कार्ये इन्द्रियास करवितो | श्वसन, पचन, रक्ताभिसरण हो | घडविता 'सूक्ष्म' देह जाणून घ्यावा (५.१४)

जीवात्मा जागृत असो वा सुषुप्त | मूर्छित, बेसावध, बेशुद्धीत | स्थूल इन्द्रियान्चा राजा हा सतत | 'सूक्ष्म' देही स्थित कार्ये करवी (५.१५)

बाल्यी दगड, वाळू, माती | शंख, शिम्पले जमवोनि खेळवी | तारुण्यी स्त्री गृहादिकासाठी | युद्धेही घडवी 'कारण' देह (५.१६ )

द्रव्यार्जन, आरोग्यार्जन | नाना सुखांच्या लाभा कारण | नाना लोभांच्या बळी पडून | कार्ये करवी 'कारण' देह (५.१७)

पंचकोषी हा तृतीय देह धारक | देहकार्यान्ना 'कारणे' पुरवीत | मन, बुद्धी, अहंकारी स्थित | 'कारण' देह ही जाणून घ्यावा (५.१८)

त्रिदेहात निवसुनी अतीतही राही | त्यास 'महाकारण' शिवांश म्हणती | सत्-चित्-आनंद-ज्ञानघन स्वरूपी | तो 'जीवात्मा' गणेशा तवांशच (५.१९)

जैसा माझिया मानवी देही | तैसाच विश्वातल्या पशु, पक्ष्यादिकी | मुंगी, डास, झुरळांमधेही | विश्वात्मा तूच नित्य वससी (५.२०)

चरांचेच कोट्यावधी प्रकार | खेचर, भूचर, वनचर, जलचर | वृक्ष, लता, गवत 'अचर' स्थीर | पसरती काण्डात्-काण्डात् दुर्वा (५.२१)

हे सर्व जन्मले आपोआपच | मेन्दू शिवाय, बुद्धीशिवायच | वृक्ष वृद्धीचे ज्ञान 'बीजांत' | बीजे वृक्षाविनाच जन्मली कैसी ? (५.२२)

अंड्याविना पक्ष्यान्ची जोडपी | नर-मादी जन्मली कैसी ? | सोडवावया ही सर्व कोडी | "प्रज्ञानम् ब्रह्म"च उत्तर दिसे (५.२३)

विश्वांत विश्व व्यापक "प्रज्ञान" | तुडुम्ब भरले आधारावीण | 'मूलाधार' त्याचाच घेतल्यावीण | वैश्विक चक्रे न चालती (५.२४)

'भूत' काळी पूर्वी जगून गेले | इतिहासांत आज ते जमा झाले | आज वा उद्या नसतील खात्रिने | ऐशी 'काल' सीमा तुजसी नाही (५.२५)

आजही आहेस, काल होतास तू | उद्याही असशीलच अविनाशी स्वरूप तू | म्हणुनी त्रिकालांच्याही 'अतीत' तू | विश्व व्यापका प्रज्ञाना गणेशा (५.२६ )

जे जे जन्मते, ते ते मरते | काही कालावधीत 'स्थित' राहते | 'सजीव' असो वा 'निर्जीव' असो ते | सर्वास नियम हा प्रकृतीचा (५.२७)

परन्तू जन्मास येत्या पदार्था | 'मूलस्रोत' काही असायलाच हवा | तसेच जे जे जाते विलया | त्याचीही "नवी दशा" असणारच (५.२८)

पंच महाभूते ऊर्जांन्ची स्वरूपे | ऊर्जा कधीही नष्ट न होते | फक्त तिचे स्वरूप बदलत राहते | हाही नियम प्रकृतीचाच (५.२९)

देह तीनही 'प्रकृती' जनित | वयोमाना प्रमाणे वर्धत | 'पुरुष' त्यांतून सुखदु:ख भोगत | मूलाधार शाश्वत त्यास जो, तो तू (५.३०)

देहात निवसे 'क्रिया'शक्ती | पण 'क्रिया' करविते 'इच्छा'शक्ती | कधी ? का? कैसी? 'क्रिया' करावी | 'ज्ञान'शक्तीहे 'ज्ञान' पुरवी (५.३१)

ऐशा या तीन शक्तीन्च्या सहाय्ये | सजीव जन्मभर करिती स्वकार्ये | वस्तुत: या शक्तित्रयात्मके | तूच सन्निध उभा पाठिराखा (५.३२)

----------------------- =============== ------------------------ 

६) ध्यान धारणा तथा एकाक्षर जप मंत्र स्वरूपा: :

त्वाम् योगिनो ध्यायन्ति नित्यम् |

त्वम् ब्रह्मा, त्वम् विष्णु:, त्वम् रुद्र:, त्वम् इन्द्र:, त्वम् अग्नि:, त्वम् वायु:, त्वम्सूर्य:, त्वम् चन्द्रमा:, त्वम् ब्रह्म, भु: भुव: स्व: ॐ |

गणादिम् पूर्वम् उच्चार्य वर्णादिम् तद नंतरं | अनुस्वार: परतर: | अर्धेन्दु लसितम् तारेण ऋद्धम् | एतत् तव मनु स्वरूपम् |

'ग्'कार: पूर्व रूपम् | 'अ'कारो मध्यम रूपम् | अनुस्वार: च अन्त्य रूपम् | बिन्दु: उत्तर रूपम् |  

नाद: संधानम् | संहिता संधि: | (६)


गणेशा तुझ्या विश्वव्यापी | ब्रह्म, परब्रह्म, परमेश्वरी | स्थूल, सूक्ष्मादिक प्रकारांतली | स्वरूपे यथा मति जाणोनिया (६.१)

विश्व नि ईश्वराचे स्वरूप ज्ञान | जाणून घेणे "ज्ञान योग" | अथवा म्हणती "सांख्य योग" | "बुद्धि योग"ही म्हणती त्यासी (६.२)

जे जे कर्म स्वत: केले | ते ते ईश्वरास समर्पित केले | कर्तेपणातील 'मी'पण हरविले | ते कर्म निष्काम कर्मयोग्यान्चे (६.३)

सत्य स्वरूप परमेश्वराचे | आपआपुल्या आवडी प्रमाणे | समजलेत्याचेच गुणगान ऐकिले | वर्णिले, पूजिले 'भक्ति'योगियान्नी (६.४)

ऐसे नाना योगान्चे प्रकार | त्यातीलच एक मुख्य 'राज योग'| अथवा "आत्मसंयमन" नांव | वा "अष्टांग योग" पतञ्जलीन्चा (६.५)

ऐसे योगोपासक नित्य | यम, नियमांचे पाळोनि दंडक | योगासन प्राणायाम क्रिया युक्त | प्रत्याहार भुन्जती योग्य ऐसा (६.६)

नंतर धारणा, ध्यान, समाधी | ऐशिया आठ पायऱ्या चढोनी | गणेशा तव 'स्वानंद' भुवनी | रमती तुझ्या सान्निध्यांत (६.७)

अहिंसा, सत्य, अस्तेय | ब्रह्मचर्य, अपरिग्रह | हे 'यम' पायरीचेदंडक | अष्टांग आत्मसंयमनाचे (६.८)

शौच, संतोष, तप, स्वाध्याय | ईश्वर प्रणिधान पाचवा नियम | या यम नियमांना पाळिता चोख | "सात्विकाचरणी" 'संत'प्रवृत्ती (६.९)

'आसन' सुखी स्थैर्य सहित | शारीरिक स्थिती बैठी वा तिष्ठत | उत्ताणे वा पालथे निजत | ताण विरहित 'सहज' ढिलीशी (६.१०)

सूर्य, चन्द्र वा गुरु नमस्कार | करिता नाना आसने सहजच | घडुनी सर्वान्ग होई चपळ | सर्व सांधे निरोगी होती (६.११)

प्राणायामान्च्या प्रकारात | श्वासोच्छ्वासान्चे नियमनच मुख्य | पूरक, अंतर्बाह्य कुम्भक | रेचक, भ्रामरी इत्यादिकांनी (६.१२)

'प्रत्याहार' म्हणजे 'आहार' नियमन | आरोग्यास जो संरक्षक वर्धक | अनारोग्यास मारक निवारक | युक्त प्रमाणात, योग्य वेळी (६.१३)

'धारणा' म्हणजे धरून ठेवणे | चंचल मनाला स्वेच्छा शक्तीने | दृश्य अथवा श्रुत संधानाने | 'लक्षवेधक' उपाय काहीही (६.१४)

नीराञ्जन, मेणबत्ती वा एलीडी | स्व जपित मन्त्र वा मुद्रित ध्वनी | कोणतेही साधन योजुनी | चित्त एकाग्रता साधावी (६.१५)

दृश्य उपाय योजिले तरी | नेत्र उघडे स्थिर राखोनी | पापण्या न मिटण्यांच्या श्रमांनी | नेत्री येती अश्रु धारा (६.१६)

डोळे मिटून मन्त्र 'जप' करणे | अथवा त्यान्ची मुद्रिका ऐकणे | एकाग्रता चित्ताची गाठणे | हा उपाय 'लोकप्रिय' व सोपा (६.१७)

यातही 'निद्रा', डुलकी, स्वप्ने | बाधा या करिती 'धारणेस' विघ्ने | चिकाटीने प्रयत्न चालूच ठेवणे | कार्यसिद्धी गणेश कृपेने अन्ती (६.१८)

आता 'ध्यान' ही पुढची पायरी | त्यास 'उपाय' 'ध्यानमन्त्रादिकी' | चित्त एकाग्र करूनि भोगिती | स्वानंद ईश्वरी दर्शनान्चा (६.१९ )

'ध्यानमन्त्रात' जैसे वर्णिले | तैसेच मानसिक चित्र रेखाटले | एकाग्र चित्ते पहात बसले | योगी ते रमले 'स्वानंद' लोकी (६.२०)

'ध्यानमुर्तीन्चे' नाना प्रकार | गणेशाचे प्रसिद्ध अष्ट अवतार | वा हरि हरांचे नाना अवतार | आवडीने ध्याती "ध्यानयोगी" (६.२१)

ज्या योग्यास ज्या रूपाची आवडी | त्याच रूपाने त्यास 'ध्यान' घडवी | 'प्रचीती' सर्वासही ही येई | आपापुल्या श्रद्धा-भक्तीनुसारे (६.२२)

गणेशा तूच कुणास 'ब्रह्मा' | कुणास 'विष्णू' तर 'रुद्र' कुणा | कुणास देवेन्द्र 'इन्द्र' तर कुणा | 'अग्नी' रूपे दर्शन देशी (६.२३)

कुणास 'वायू' स्वरूप आवडे | कुणास 'सूर्य' वा 'चन्द्रमा' आवडे | कोणी निराकार परब्रह्म निवडे | तद्रूपच भाससी प्रत्येकाला (६.२४)

कुणास 'भूदेवी' वा 'गोमाता' | कुणास 'पैतृक' पितर गणनाथ हा | कल्प वृक्षा तळी नाना कल्पना | 'ध्यानमुर्ती' रूपे नटसीगणेशा (६.२५)

कुणास स्वर्गातिल नाना दैवते | ज्यांत अष्ट दिक्पालक प्रामुख्ये | कुणास 'ॐ'कार, गजानन रूपे | 'ध्यानमुर्ती' रूपे प्रत्यया येसी (६.२६)

'ध्यानमन्त्रा'न्चेहीनाना प्रकार | निर्गुण साधकास प्रमुख 'ॐ'कार | 'गं' ऱ्हीम् आदिक मन्त्र एकाक्षर | जपती योगी नित्य सातत्ये (६.२७)

माण्डी घालूनि, डोळे मिटुनी | मन्त्र ध्याती सामान्य मुनि मनी | जीवन्मुक्तादिक पदांचे धनी | त्यासहे 'बंधन' काही नाही (६.२८)

उठता, बसता, चालता, खेळता | खाता, पीता, कार्ये करिता | श्वासोच्छ्वासा समच मानसा | मन्त्रॊच्चारण घडोघडी घडे (६.२९)

एकशे आठ वा दशसहस्र | लक्ष, कोटी, अब्जादि मोजित | ही सर्व गणना दुर्लक्षित | मन्त्र जप अंग वळणी त्यान्च्या (६.३०) 

मन्त्रॊच्चाराचा 'नाद' लागता | हृदय स्पन्दने धरला ठेका | पुण्यकाल, मुहुर्त आदिक चिन्ता | विलयास गेली त्यान्च्या हृदयी (६.३१)

ऐसे संपूर्णपणे 'हित'कर | संधानाने आवळून बांधिला दोर | 'सम' बुद्धि 'धी'च्या होऊन आधीन | 'समाधिस्थ' योगी 'मग्न' होती (६.३२)

'सन्धि:' म्हणजे 'बेरीज' झाली | पूर्णात पूर्णाची भर पडली | जीवात्म्याने परमात्म्याशी | मिठी मारली ब्रह्मानन्दे (६.३३)

शैवांनी मारली मिठी शिवाला | वैष्णवांनी विष्णू हरीला | गाणेशांनी विनायकाला | गणेशेच धरिली रूपे सारी (६.३४) 

बौद्धास भेटे 'बुद्ध' होउनी | जैनास 'जिन्', मुमुक्षूस 'मुक्ती' | ज्यांनी जसजशी भावना केली | तैसाच नटतो परमेश्वर (६.३५)

----------------------- =============== ------------------------

गणेश विद्या ऋषि छन्द देवता नमनम् :

स एषा गणेश विद्या गणक ऋषि: | निचृद् गायत्री छन्द: | गणपतिदेवता


अशा प्रकारेवर वर्णिलेल्या ज्ञानाचे नाम "गणेश विद्या" | 'गणकनामक ऋषिन्ना 

जिचा झाला साक्षात्कार गणेश कृपेने (.)

या विद्येचा 'विषयवा 'देवता' | आद्य वन्द्य 'गणपति'तत्वत: | अथर्व वेदात या विद्येच्या 

ऋचा | 'शीर्षा'समान मानलेल्या (.)

मुख्यत्वे दोनच छ्न्दात ही विद्या गुन्फित जाहली असे पठणाला 

'निचृद्आणखी 'गायत्रीनाम्ना सुरांत गायना पुनपुन: (.)

हिच्या एकवीस आवर्तनांनी गणेशास 'महा अभिषेकघालुनी पूजा करिती जे जे कोणी ते 

भक्त प्रिय गणेशाला (.)


'गण्क्रियापदे 'गणनाकरणे | 'गणितकरण्याचे मन्त्र जाणणे 

'गणितकरुनी 'उत्तरमिळवणे या क्रियान्चा स्वामी 'गणपति' (.)

प्रत्येक मानवी देहांत वसते वयोमानाने विकसित होते अशी ही बौद्धिक शक्तीच 

करविते 'गणितेमनोप्सिते साधावयाला (.)

जणू का बुद्धीचा पति जो 'गणपति' | सूक्ष्मत्वे प्रत्येक देहांत निवसुनी गणिते करितो दैवी वा 

मानवी ऐशी श्रद्धा गाणेशान्ची (.)

नैसर्गिक गणनान्ची देवता ही | 'ब्रह्माण्डसृजना पूर्वीच प्रगटुनी 

'ब्रह्माण्डविश्वोत्पत्तिस्थितिलयी अणु रेणुन्चीही गणिते करिते (.)

प्रत्येक 'ब्रह्माण्डीही देवता | 'ब्रह्माण्डविश्वव्यापक रूपा अनंत 'ब्रह्माण्डीअनंत 

आकाशा व्यापूनही उरते अवशिष्टत्वे (.)

म्हणून कोणत्याही नव्या क्षणी नवे 'ब्रह्माण्डजर जन्मेल कधी तर त्या विस्फोटाच्याहि 

आधी प्रगटेल 'गणपतित्या घटनेस योग्यसा (.१०)

अथवा अस्तित्वातले कोणतेही | 'ब्रह्माण्डजाईल विलयास जर कधी तर त्या 'विलुप्ती'च्या 

क्षणा सहितची | 'अव्यक्तहोईल 'गणपतितेथला (.११)

'अव्यक्तस्वरूपातील ही अवशिष्टत्वता कायमच राहते कधीही न 

संपता बुद्धीच्याही 'परही गुह्यता अनाकलनीय वन्द्य दैवी (.१२)

'गणसर्वनामॆ सूचित 'समूह' | त्याचा प्रमुख वा जो कोणी 'नायक' | त्यासही 'गणपतिपदवी 

विभूषण | 'नायकत्वमिळताच प्राप्त होई (.१३)

म्हणुनि सत्य लोकीचा 'गणपतिब्रह्मा विष्णू 'गणपतित्या 

वैकुण्ठपुरीचा रुद्र 'गणपतिकैलासी शिवगणां स्वर्गीचा 'गणपतिइन्द्र देव (.१४)

यागास 'गणपतिअग्नि देवता वाहकांत 'गणपतिवायु देवता सूर्य 'गणपतिसौर 

मण्डलाचा नक्षत्रांचा 'गणपतिचन्द्रमा जाणा (.१५)

ब्रह्मान्चा 'गणपतिपरात्पर 'ब्रह्म' | भू मण्डळी 'गणपतिराष्ट्राध्यक्षादिक भुव 

लोकी 'गणपतिअर्यमा देव त्रैलोक्याचा 'गणपति' ''कार (.१६)

यमदूतांचा 'गणपतियमराज यक्षान्चा 'गणपतिवैश्रवण 

कुबेर बृहस्पती 'गणपतिपुरोहितास | 'चित्ररथ' 'गणपतिगन्धर्वान्चा (.१७)

अशा प्रकारे 'गणपतिही पदवी समूहान्च्या नायकांनाही नायकत्वाची जबाबदारी 

'कर्तुत्वदाता श्रीगणेश (.१८)

ऐसा हा देवांचा देव 'गणपति' | कार्यारम्भी देवही स्मरती त्याच्या गणितान्च्या 

सल्ल्यान्च्या 'पाशी' | वैश्विक घटना घडती साऱ्या (.१९)

----------------------- =============== ------------------------


अनेकाक्षर 'जप मन्त्रस्वरूपा :

ॐ गं गणपतये नम: |

ॐ एकदन्ताय विद्महेवक्रतुण्डाय धीमहितन्नो दन्ती प्रचोदयात् |

'गणपति'स सुप्रसन्न करण्यासाठी सहस्रो नावांनी हाका मारुनी | 'प्रथम, 'नम:' अंती 

जोडुनी | 'मन्त्रबनती लक्षावधी (.)

'ॐ श्री गणेशाय नम:' | 'ॐ लम्बोदराय नम:' | 'ॐ विघ्नराजाय नम:' | ऐशी उदाहरणे या 

मन्त्रान्ची (.)

'ॐ नमो भगवते वक्रतुण्डाय' | 'ॐ नमो भगवते एकदन्ताय' | 'ॐ नमो भगवते 

कृष्णपिन्गाक्षाय' | ऐसेही हजारो मन्त्र बनती (.)

मन्त्रोच्चारांनी शरीरा मध्ये निर्माण होतात जी कम्पने त्यांनी आधिव्याधिन्ची निरसने काही 

प्रमाणात होत जाती (.)

श्वासोच्छ्वासा गणिक मन्त्रोच्चारणा जोडल्यास घडतात 'प्राणायामक्रिया | 'आधीप्रकारच्या 

रोगान्चा निचरा होत जाई यान्च्या मुळे (.)

जागे राहूनि कार्ये करिता सर्वान्गी 'शीणसांठतच जाता विश्रान्ती सुषुप्तीत त्यान्ची 

स्वच्छता हा अनुभव नित्य सर्वास होई (.)

वेद मन्त्रान्च्या उच्चारणांनीही ही 'शीणपापे जातात धुवुनी मानसिक 'ताण'ही क्षीण 

होउनी आरोग्य संरक्षण घडत राही (.)

आधुनिक मानसोपचार शास्त्रज्ञांनीही | 'ध्यानहा 'उपचारमान्य करोनी मानसिक 

खिन्नताग्लानी साठी लोकप्रिय हा 'उपचारकेला (.)

गाणेश मन्त्रान्च्या यादी मध्ये जे जास्त 'शक्ति'युत मानले गेले त्यांची दोनच 

उदाहरणे अथर्वशीर्षात नमूद केली (.)

"ॐ गं गणपतये नम:" | हा नवाक्षरी मन्त्र 'गणपति'चा वदेल अहोरात्र ज्यान्ची वाचा ते 

भक्त गणेशास प्रिय होती (.१०)

"ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् हा गायत्री 

छन्दातिल मन्त्र राज (.११)

हा गणेश गायत्री मन्त्र उच्चस्वरे वा मनांतल्या मनांत वदती सातत्याने नित्य तेही गणेशास 

प्रिय होती (.१२)

या गणेश गायत्री मन्त्राचा अर्थ मराठीत जाणून घ्यावा अर्थानुरूप 'भावचिन्तीत 

जाता अधिकाधिक 'पुण्यप्राप्ती होई (.१३)

'एकदन्तनावाने मी ज्यास जाणतॊ जो 'वक्रतुण्डमम बुद्धीस प्रिय तो | 'दन्तीदेव तो 

मज 'प्रेरकअसो क्षणोक्षणी प्रचीती पूर्वक (.१४)

ऐसा अर्थ मन्त्रा मन्त्रान्चा जाणून ठेवीत तैशीच भावना सार्थ भावोत्कट मन्त्र जप 

करिता सुप्रसन्न आराध्य दैवते होती (.१५)

परन्तु मन्त्रोच्चारणान्च्या मध्ये जो 'कालावधीशान्त नी प्रिय गमे | त्यांत ढवळा ढवळ करू 

नये सन्ख्याधिक्यादिक संमोहनाने (.१६)

उलट या शान्तीचा 'कालावधी' | लुटावा काल्पनिक 'ब्रह्मानन्दी' | धारणेत धरलेले 'चित्रजे 

ध्यानी ते दृश्य राहता वा 'गुप्तहोता (.१७)

या शान्तीच्या 'कालावधी'त चिन्तन वा विचार होतील 'कुण्ठित' | तरीही त्याची न 

मानता 'खन्त'| चित्ती 'समाधानबाळगावे (.१८)

पद्मासन वा वज्रासनादिक काही आसने जप करण्यास उत्तम ऐसे असले जरी शास्त्र 

वचन तरी त्याची भीती वा धास्ती नसावी (.१९)

आपापल्या वय आरोग्यानुसार जे का बैठेउभे वा निजून सुलभ साध्य स्थिर वापरुन 

आसन साधकान्नी जप जपत जावा (.२०)

बसायला जमीनीवर चादर घडी सतरन्जीगादी आरामशीरशी अथवा 

खुर्चीआरामखुर्ची सोफापलन्ग जे उपलब्ध सहज (.२१)

धृव उभा राहिला एका पायावर म्हणून न करा डोके फोड कटीवर हात ठेवून व्हा 'विठ्ठल

भिन्तीस टेकून जप करावा (.२२)

पालथे वा उत्ताणे पडून | 'शवासना'सम 'शैथिल्यसाधुन जप करावा डोळे मिटून झोप 

लागली तर लागू द्यावी (.२३)

'जागआल्यावर आठवणीने मन्त्र जप क्रिया चालू ठेवणे पुऩ: 'डुलकीलागल्यास झोपणे 

'जागयेताच 'जपपुऩपुन: (.२४)

थोडा वेळ बैठाथोडा उभ्याने थोडा वेळ पडून निश्चिन्तपणे आपापल्या स्वास्थ्यप्रकृती 

प्रमाणे | 'धारणा', 'ध्यानकरीत जावे (.२५)

----------------------- =============== ------------------------


स्थूल ध्यान धारणा मन्त्रा:

एकदन्तम् चतुहस्तम् पाशम् अंकुश धारिणम् |

रदम् च वरदम् हस्तैबिभ्राणम् मूषक ध्वजम् ||

रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्त वाससम् |

रक्त गन्धानुलिप्ताङ्गम् रक्त पुष्पैसुपूजितम् ||

भक्त अनुकम्पिनम् देवम् जगत् कारणम् अच्युतम् |

आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृतेपुरुषात् परम् ||

एवम् ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वर: |

मानसिक 'चित्ररेखाटण्याला उपयुक्त 'धारणाध्यानादिकाला ऐसे 

वर्णन 'गणपतिस्वरूपा अथर्वशीर्षात नमूदले असे (.)

हे एकदन्ता चतुर्हस्ता हाती पाशरदअंकुश धर्ता वरद हस्त मुद्रेने अभय 

सूचका भक्तांवरी कृपा तव असॊ द्यावी (.)

मूषक ध्वजा मूषक वाहना ब्रह्माण्डोदरालम्बोदरा शूर्पकर्णकारक्त वस्र 

धारका स्वीकारावे कृपया नमन माझे (.३ )

रक्त चन्दनाची उटी सर्वान्गी रक्त पुष्पांची माला परिधानुनी भक्तांवरी अनुकंपा 

धरोनी रक्षण सर्वदा सर्वथा करावे (.४ )

या जगत् विश्वातल्या सर्व कार्यान्ना अच्युत अखण्ड आधार पुरविण्या प्रकृती-पुरुष 

युगुलाच्या जन्मण्या आधीच आविर्भूत तू सदा होसी (.)

तव अव्यक्त निर्गुण स्वरूपी सृष्टी सृजनाच्या प्रारम्भा आधी तू स्वेच्छया प्रगट 

होऊनी सगुण व्यक्त 'मायाही प्रगटविलीस (.)

कोणी हजारो वर्षा पूर्वी कोणी लाखो वर्षा पूर्वी कोणी कोट्यावधी वर्षा पूर्वी तारका समूह 

कसे होते? (.)

ते दृश्य मजला आज या क्षणी | "दिसतेय तसेतेच सत्य मानोनी मायावी भास 

हा 'प्रत्यक्षनयनी पण बुद्धीस 'मिथ्याप्रचीतीने (.)

आठ दहा मिनिटा पूर्वीच उगवला तो सूर्य दिसतो मला उगवताना मायावी हे भास मम 

नयना नित्य क्षणोक्षणी घडविसी देवा (.)

आज या क्षणी जे जसे आहे तैसे ते समजून घ्यायची बुद्धि दे प्राकृतिक घटनान्च्या गणितान्चे 

मन्त्र दे हे ज्ञानदात्या श्रीगणेशा (.१०)

दगड धोण्डे हे अणून्चे समूह अणून्चे वजन अणुनाभीन्च्या बिन्दूत सभोवती एलेक्ट्रोन 

वायुलहरी सम स्पर्शता काठिण्यता दगडात मायावी (.११)

अणून्चेच काही समूह 'गोड' | दुसरे कोणी 'क्षारवा 'तिखट' | इलेक्ट्रानान्च्या ढगान्च्या 

ढिगातुन भास हे मम जिव्हेस का व कैसे ? (.१२)

ऐसे तुझे विश्व व्यापी स्वरूप मम बुद्धीला दिसावे नीट त्यांतच रमावे माझे चित्त हाच 

आशीर्वाद दे रे देवा (.१३)

ऐशा प्रकारे जे जे योगी नित्य तुजला ध्यानी ध्याती त्यांना श्रेष्ठ 'योगिवरऐशी मान्यता तव 

अथर्वशीर्षी ग्रथित (.१४)

----------------------- =============== ------------------------

१०अंतिम स्मरणम् वन्दनम् च

नमो व्रातपतयेनमो गणपतयेनमप्रमथपतयेनमते अस्तु |

लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरद मूर्तये नम: ||


हे 'व्रातपतितुजला नमन हे 'गणपतितुजला नमन हे 'प्रमथपतितुजला नमन तुज 

लम्बोदरा नमन माझे (१०.)

हे 'एकदन्तातुजला नमन हे 'विघ्ननाशिनेतुजला नमन हे 'शिवसुतातुजला 

नमन हे 'श्रीवरद मूर्तिनमन तुजला (१०.)

'व्रतआचरणारे जे धार्मिकादिक | 'व्रती'न्च्या समूहांस 'पतिगणनायक अति काटेकोर 

गणिती गणेश हे 'व्रातपतितुज नमन माझे (१०.)

नाना गणान्चॆ 'पतिते 'गणपति' | हरिहरब्रह्मादिक देवाधिपती नायकान्चे गुणकर्तुत्व 

शक्ती दैवी 'पति' 'पदवी'धरास नमन माझे (१०.)

मथनात 'प्रमथन' "बौद्धिक चिन्तन" | 'चिन्तामणि:' त्वम् अससी गजानन असंख्य दैवी 

गणितान्चे 'प्रमथन' | कर्त्या 'प्रमथपति'स नमन माझे (१०.)

'ब्रह्माण्डगोलच ज्याचे उदर | 'काल'सर्पाचे 'मौन्जी'बन्धन ऐसे तव सगुण स्वरूपाचे 'ध्यान' | 

'लम्बोदरातुज नमन माझे (१०.)

'दन्ता'सम चूप टोक वा शिखर टोचोनि विघ्नान्चा करितोस चूर दात्यांमध्ये तू श्रेष्ठात श्रेष्ठ 

'एकदन्तातुज नमन माझे (१०.)

सत्कार्यान्ना आड येती त्या विघ्नांचा विनाश करिसी आद्य वन्द्यत्व तुज कार्यारम्भी 

'विघ्ननाशिनेतुज नमन माझे (१०.)

'कार्यकोणते कशासाठी ?| कुणी करावे कैसे कधी कधी ? | कोणत्या स्थळी कोणत्या 

काळी ? | कोण कोण अतिथी बोलवावे ? (१०.)

'खर्चहोईल किती व कधी कधी ? | व्यवस्था त्याची कशी करावी ? | परवानग्यान्ची पत्रॆ 

कशी ? | मेळवावी इत्यादिक (१०.१०)

कोण कोण येतील सहाय्याला ? | कोण कोण टाळ्या वाजवायला ?| कोण कोण करतील 

विरोघ याला ? | नैसर्गिक विघ्ने कोण कोणती (१०.११)

तव 'चिन्तामणिस्वरूपास स्मरुनी करतील जे ही पूर्वतयारी त्यान्च्या कार्यान्ना मिळे 'सिद्धी

तव कृपेनेच हे विघ्नहर्त्या (१०.१२)

तुझे सुप्रसिद्ध 'अष्टअवतार त्यातील 'उमासुतसर्वात थोर अति लोकप्रिय हा अवतार 

'शिवसुतातुज नमन माझे (१०.१३)

'गणेशउमा-शिवसुत 'गजानन' | बहुसन्ख्यान्ना एवढेच माहित उमेस तो तव वरदाने 

सम्प्राप्त हे ज्ञान बहुसन्ख्याकास नाही (१०.१४)

तू श्रीसद्बुद्धिसन्मती दायक भक्तास तू सर्व सद्गुण दायक गुणान्चागणान्चा गणनान्चा 

नायक श्रीवरद मूर्तये नमन तुजला (१०.१५)


गणेशे 'अष्टमुख्य अवतार धरले | "शुक्ल चतुर्थी"न्नाच बहुतेक 

जन्मले श्रद्धेने "जन्मदिनत्यान्चे साजरे व्रतोत्सव रूपे 'गाणेशकरिती (१०.१५)

त्या 'अष्टअवतारान्ची नावे वक्रतुण्ड पहिलेएकदन्त दुसरे महोदर तिसरेगजानन 

चौथे पाचवे लम्बोदरसहावे विकट (१०.१६)

सातवा अवतार विघ्नराज आठवा जाणावा धूम्रवर्ण नाना दैत्यान्चा संहार करून लीला तू 

गणेशा स्तुत्य केल्या (१०.१७)

सिन्धूसिन्दूरनरान्तकदेवान्तक इत्यादिक दैत्य दानव असुर माजून माण्डिता त्यांनी 

आकान्त लीला अवतार धारण केले (१०.१८)

"शुक्ल चतुर्थी"स म्हणती 'विनायकी' | संपूर्ण दिन-रात्र 'उपवासकरुनी गणेश पूजास्तोत्र 

पठण करुनी जपती गाणेश मन्त्रही नाना (१०.१९)

दुसऱ्या दिवशी 'पञ्चमीतिथीला लाडू नि मोदक नैवेद्याला पारणे उत्सव करिती 

साजरा प्रसाद वाटुनी खाऊन मोदे (१०.२०)

ओल्या वा कोरड्या खोबऱ्याचे करन्ज्यामोदक तुपात तळले अथवा वाफेवरती 

शिजवले नैवद्यासी गणपतीच्या (१०.२१)

अथवा डाळीन्च्या पुरणान्च्या मोदककडबून्ना वाफाडोनिया अथवा तुपात वा तेलात 

तळुनिया अर्पिती नैवेद्य गणपतीला (१०.२२)

गणपतीस लाडू पञ्च खाद्यान्चे खारीकखोबरेखडीसाखरेमधे खवाखसखस खमंग 

भाजून मिसळले लाडू वळले नैवेद्यार्पणाला (१०.२३)

गणपतीस आवड 'दुर्वापत्रीन्ची त्रिदले खुडोनी बांधती जुडी एकवीस एकवीस संख्या 

दुर्वान्ची अर्पिती या जुड्या गणपतीला (१०.२४)

गणपतीस आवड 'शमीपत्रान्ची तशीच 'मन्दारवृक्षान्च्या फुलान्ची ती ही जोडोनिया 

पूजेसी अर्पण करिती गणपतीला (१०.२५)

गणपतीस आवड 'रक्तपुष्पान्ची गुलाबगुलबाक्षीकण्हेरीकर्दळी जास्वन्दीसदाफुली 

लाल मालती मेळवोनि अर्पिती गणपतीला (१०.२६)


"धर्मअर्थकाममोक्ष" | यांना म्हणती चार 'पुरुषार्थ' | हे चारही 'साध्यकरावयास 

'प्रार्थनाकरिती गणेशा तुझी (१०.२७)

गणेशास देउळी महाभिषेक करवितीपाहती मूर्ती अभिषिक्त प्रदक्षिणासाष्टान्ग नमने 

करीत | 'विनायकीव्रत करिती कोणी (१०.२८)

'गणेशगीता', 'योगगीता' | करुनि वा करवुनी पठण या 

ग्रन्था अथवा 'गणेशवा 'मुद्गलपुराणा पठण करिती कोणी भक्त (१०.२९)

'गणेश पूर्व तापिनी उपनिषद्' | 'गणेश उत्तर तापिनी उपनिषद्' | 'हेरम्ब उपनिषद्', 'गणपति 

उपनिषद्' | पठण करिती वा करविती कोणी (१०.३०)


वार्षिक भाद्रपद विनायकीला सार्वजनिक अशा गणेशोत्सवाला लोकमान्य टिळके प्रारम्भ 

केला आज तो जगभर लोकप्रियोत्सव (१०.३१)

मोठ मोठ्या पार्थिव गणेश मूर्ती स्थापुनी पूजितीसमारम्भ करिती नृत्यगायननाटके 

वाद्यादिकी मनोरञ्जन 'मोदकसेविती भक्त (१०.३२)

लोकसंग्रहजनजागृतीचा उपाय जगभर लोकप्रिय हा आध्यात्मिक ज्ञान 

संरक्षणाला उपयोगी पडो श्री गणेश देवा (१०.३३)

गणेशमुद्गलस्कन्द पुराणी लिन्गशिवपद्ममार्कण्डेयी ही सात्विक सांकेतिक ज्ञानमय 

गोष्टी त्यान्चा आधार घेऊनिया (१०.३४)

नव्या एकान्किकाकथानृत्य नाटिका रचोनि सादर त्यांना कराव्या वार्षिक गणेशोत्सव 

कार्यक्रमान्ना ऐशी प्रेरणा दे भाविकासी (१०.३५)


कृष्ण वा वद्य चतुर्थी तिथीला म्हणती 'संकष्टीवा 'संकष्टहरा' | या दिनी उपवास करोनि 

दिवसा रात्री चन्द्रोदयी भोजन करिती (१०.३६)

'संकष्टहराव्रत करिता गणपती भक्त गणान्ची संकटे 

निवारी जन्ममृत्यूवार्धक्यव्याधी ही चार मुख्य गणली त्यांत (१०.३७)

ऐशी दोनही चतुर्थी तिथि व्रते करिता चारही 'पुरुषार्थसाधे निवारण होऊनि चारही 

संकष्टे जीवन सुखी सुलभ भक्तांस होई (१०.३८)

या गाणेशी श्रद्धेनुसार करोत जगभर वार्षिक महोत्सव सर्वास लाभॊ 

आरोग्यसौख्यादिक शान्तीसमाधान श्रीगणेशा (१०.३९)

-----------------------------=====================================

११) 'फलश्रुतीव त्याचा सदुपयोग :

एतद् अथर्वशीर्षम् यअधीते स ब्रह्मभूयाय कल्पते |

स सर्व विघ्नैन बाध्यते स सर्वतसुखमेधते |


"गणपति अथर्वशीर्षस्तोत्र सूक्ती अन्ती कथिली असे 'फलश्रुती' | अध्ययनपठण करिता कोणती | 'फलप्राप्तीसांगण्यास्तव (१११)

अव्यापारेषु हा व्यापार माण्डलेल्या दुकानी करिती जे व्यवहार त्यान्च्या पदरी निराशा ही घोर वाट्यास येईल अनुभवान्च्या (११.)

तरीही हा 'मानसोपचार' | गणकअथर्वण ऋषी थोर थोर लिहिती का याचा 'अभिप्रायकाय जाणोनि व्यापार हा करावा जी (११.)

ज्याने बनवोनि ही सर्व सृष्टी त्यातील अणू अणून्च्या हृदयी जो निवसोनी अवशिष्टही राही त्यास मी 'लाचही देणार कैसी ? (११.)

पत्रेपुष्पेफुलेइत्यादिक रूपान्नी जो मम नेत्रास 'प्रत्यक्ष' | त्यास ती अर्पोनिया बदल्यात | 'काम्य'पूर्ती मागणे धूर्तता की मूर्खता ? (११.)

पित्याने दिले पैसे खर्चायला | 'बसरेल्वेतिकिटखाण्या पिण्याला त्यातूनच बाळ जणु घेऊन परतला | 'आइस्क्रीमपित्याच्या 'खुषी'साठी (११.)

'आइस्क्रीमखाऊन पिता सन्तोषला म्हणे "तुज काही हवेय का बाळा ?" | तत्समच सारा हा फलश्रुतीन्चा खेळ जाणावा भाविकान्नी (११.)

देवाने जी दिली 'दातृत्व'शक्ती त्यामुळेच मज घडे 'दानधर्मकाही तरी त्याच्या मोबदल्यात काही हक्काने मागणे सर्वथा अयोग्य (११.)

'कुबेरज्याचा हिशोबनीस अवघे हे विश्वच ज्याचे 'उदर' | त्यास मी देऊन देणार तरि काय ? | हा विवेक मन्मनी सदा वसो देवा (११.)

प्रत्येक मानव वा पशू पक्षी ज्यास पौत्र वा कन्या समची त्यास करावी 'प्रार्थना', 'विनवणी' | 'व्यापारी वृत्तीसाण्डोनि सर्वथा (११.१०)

असोअसे हे 'अथर्वशीर्ष' | अथर्व वेदांतील 'गणपतिनाम 'शिर' | जो जो कोणी अध्ययन करील तो 'ब्रह्मविषयी होईल ज्ञाता (११.११)

'मीतूतोते' 'हाहीसारे | 'ब्रह्मतत्त्वाचेच 'अंशहे सारे या ज्ञान जाणिवेने अनेक 'विघ्ने' | 'बाधा'ही गणेश कृपेने टळती (११.१२)

जे हे 'गणेशकवच धारण करिती त्यास मिळेल शान्ति सुखकारी जाणीव होउनी दैवी 'सुरक्षिततेची' | सुख समाधान चित्ती नांदेल (११.१३)

स पञ्च महापापात् प्रमुच्यते |

सायम् अधीयानदिवस कृतम् पापम् नाशयति |

प्रातअधीयानरात्री कृतम् पापम् नाशयति |

सायम् प्रातप्रयुञ्जानअपापो भवति |

सर्वत्र अधीयानअपविघ्नभवति धर्म अर्थ काम मोक्षम् च विन्दति |

पापे अनेक प्रकारची असती कांही छोटी तर काही मोठ्ठी न कळताच कांही घडून जाती न करावी उद्देश पूर्वक स्वार्थे (११.१४)

असत्यअनृतबोचरे बोलणे घालून पाडून अनुचित वदणे खोटे दिमाख अहंकार मिरवणे अनावश्य स्पर्धाअसूयाहिंसा (११.१५)

दुराचारदुष्टताअति घाबरटपणा अपथ्यकुपथ्य आहारनिन्दा अत्याचारीघातक अभद्र वर्तना टाळावे सदैव सज्जनांनी (११.१६)

अयुक्त अनारोग्य कारक सवयी अयुक्त विचरण वेळी अवेळी अयुक्त चेष्टा मस्करी सगळी पातके समजुनी टाळावीत (११.१७)

कामक्रोधमदमत्सर दंभलोभ हे षड् रिपू मनांत लपून घडविती पातके अवचित जाणीव होताच धुवावे त्यांना (११.१८)

ब्रह्महत्यासुरापान खूनदरोडासुवर्ण स्तेय गुरूपत्नीशी कामभोग ही चार असती महा पातके (११.१९)

पाचवे महापातक संगतीचे या चौघां पातक्यांना मदत करण्याचे या पांच पापातुन सुटका होते उचितशा प्रायश्चित्त आचरणांनी (११.२०)

न्यायालयी मिळे 'राजदंड' | नरकी यमदूत छळतील उदंड या भये करिती दानधर्मादिक मन्त्र जपादिक पुरश्चरणे (११.२१)

तीर्थ यात्रागंगादिक स्नाने देवपूजातपाचरणे पश्चात्ताप पूर्वक आचरण्याने पापसंचय क्षयऐशी श्रद्धा (११.२२)

दैहिक पापाने दैहिक रोग मानसिक पापाने मानसिक ताप बौद्धिक पापाने बौद्धिक छळवाद ऐशी दैवी वा नैसर्गिक प्रक्रिया (११.२३)

गणपति अथर्वशीर्ष अध्ययनाने श्रवणपठणअध्यापनाने | 'प्रायश्चित्त'पूर्वक पुरश्चरणाने महापातक संचयही क्षीण होई (११.२४)

दिवसभरांत जे जे घडेल पातक सायम् पठनाने त्यान्चा विनाश रात्री अपरात्री जे घडेल पातक त्यान्चा नाश प्रातपठणे (११.२५)

सायम् प्रातदोऩ्ही वेळा नित्य पठण प्रकारे ऐशिया न घडेल 'संचय'च पातकान्चा अपाप वा निष्पाप स्थिती राहेल (११.२६)

सतत सर्वत्र जे म्हणतच राहती मानसिक बौद्धिक चिन्तनांत रमती त्यान्ची कार्ये निर्विघ्न साधती पुरुषार्थ चारी लाभती त्यासी (११.२७)


इदम् अथर्वशीर्षम् अशिष्याय न देयम् |

यो यदि मोहात् दास्यति स पापीयान् भवति |

ऐसा या सूक्ताचा सदुपयॊग सात्विक वृत्तीनेकरतील धार्मिक त्यांनाच करावा याचा उपदेश इतरा अशिष्य्यास न करावा (११.२८)*

ऐशी सोपी पाप धुणी होतेय तर मग पापे करोनी स्वार्थ साधण्यास प्रवृत्त होउनी दुरुपयोग दुर्जन करतील (११.२९)

ऐशिया दुर्जन पातक्यान्ची देवासही 'मुर्खसमजणाऱ्यान्ची अघ पापान्ची न होईल कधी क्षीणता या उपायाने (११.३०)

जे जे कोणी ऐशिया मोहे उद्दिष्ट पूर्वकच करतील पापे अथवा करवीतील फसव्या युक्तिवादाने ते सर्व 'पापीन होतील 'पुनीत' (११.३१)

रस्त्यावरती चालता चालता चिखलांत पाय चुकून पडला तरी पायबूट् अथवा 

चपला साबणाने स्वच्छ धूणेच यॊग्य (११.३२)

धार्मिक वाङ्मयात्मक ही सौम्य साबणे चुकून घडलेली धूतात पातके परन्तू खिशातच 

साबण आहे म्हणून निष्काळजी न व्हावे कोणी (११.३३)

अशा प्रकारचे धार्मिक उपाय जणू का "क्षमा याचनाअर्ज परमेश्वर भावना मन जाणून न फसता स्वीकरी वा फेटाळी (११.३४)

न्यायालयातील न्यायाधिशाला लष्करी जवान वा अधिकाऱ्यान्ना आपापुले कर्तव्य बजावताना घडती जी पातके ती जळतील (११.३५)

अशा प्रकारे जे जे कोणी निष्कपटनिर्व्याज भावनांनी | 'क्षमायाचना करण्यासाठी पठतील त्यांनाच होईल कृपा (११.३६)

दैवतास प्रसन्न करण्यासाठी किमान 'कोपन होवो म्हणूनि बहुसन्ख्य जन पुण्य कार्ये करिती बहुतेक सर्व जी समाजोद्धारक (११.३७)

दानधर्मपशुवृक्ष पूजा देउळेतळीविहिरीआरोग्यालया विद्यार्थ्यान्च्या शैक्षणिक गरजा पुरविणेही मान्य 'पुण्य'कर्मे (११.३८)

'देवालयहे एक सार्वजनिक धार्मिक 'पुण्य'कर्मे करण्याचे स्थळ आध्यात्मिक शिक्षणाचे विद्यालय राखावे गणेश कृपा अर्जनास्तव (११.३९)

तेथे जे करतील पापाचरणे भोळ्या धार्मिकास फसवून लुटणे त्यान्ना गणेशाच्या अवकृपेने घडेल शिक्षा उचित समयी (११.४०)

'श्रद्धासात्विकराजसिकतामसी | 'श्रद्धा'न्च्या या त्रिकोणी क्षेत्रफळी प्रत्येक आपापल्या औपचारी | 'बिन्दू' 'बिन्दू'तुनी करिती प्रवास (११.४१)

या त्रिकोणातील ही तीर्थयात्रा करविते 'आत्मोद्धारदैवी उन्नतीला अथवा दुर्दैवी 'आत्मपतनाला' | जन्मभर हा प्रवास चालतच राहतो (११.४२)

अथवा 'आध्यात्मिकआकाशी राजसिक 'श्रद्धाक्ष अक्ष परी तामसिक 'श्रद्धाय अक्ष परी झ वा ज्ञ अक्ष सात्विक श्रद्धेचा (११.४३)

कायिकबौद्धिकमानसिकवैचारिक कर्मे आपापल्या श्रद्धान्च्या परी करविती प्रवास या आकाशी उन्नती अवनती घडत राही (११.४४)

'ज्ञअक्षाच्या अति उच्च स्थळी निवसतो 'गणेशऐसे समजुनी त्या बिन्दूची साधावी जवळकी आत्मोद्धारास्तव साधकान्नी (१२.४५)

वैष्णवान्नी मानावे हे विष्णु स्थल शैवान्नी शिवाचे कैलास शिखर सौर शाक्तान्नी सूर्य वा शक्तीस्थल आपापुल्या श्रद्धा भक्तीनुरूप (११.४६)

सत्शिष्यास ही विद्या शिकविता तो उपयोगील स्वात्मोन्नतीला तसेच निस्वार्थ समाजोन्नतीला सरासरी सामाजिक सौख्याची वाढे (११.४७)

दुर्जन अशिष्यास विद्या शिकविता दुरुपयोग करतील स्वार्था करिता पापाचरणासच 'निर्भयत्ववाढता सरासरी सामाजिक सौख्याची घटेल (११.४८)

जे गुरु शिष्याची प्रवृत्ती न जाणता भये वा मोहे पढवतील दुर्जना त्यान्ची वाढेल पापान्ची गणना सरासरी सामाजिक सौख्याची घटेल (११.४९)

----------------------- =============== ------------------------

१२फलश्रुती व प्रार्थना :

सहस्त्रावर्तनात् यम् यम् कामम् अधीते तम् तम् अनेन साधयेत् |

अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मी भवति |

अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने जे जे करतील योग्य भावनेने त्यान्ची अडलेली खुन्टलेली कामे सावरण्यास होईल दैवी मदत (१२.)

'सहस्रम्हणजे एक हजार तसेच 'सह'-स्र वा स्रावासह न थांबता वाहत्या स्रोतासम अखण्ड पठणमननचिन्तनादिक (१२.)

अशा प्रकारे सातत्याने ज्याने अध्ययनात स्वत:स जुम्पले त्याचे मनोरथ पुरतील सगळे गणेश कृपेने सर्व साध्य (१२.)

पाप प्रक्षालनपुण्य संपादन यास्तवच करिती 'धर्माचरण' | 'काम्यप्राप्तीस्तव 'कर्माचरण' | बहुसंख्य जनतेस हीच रूढी (१२.)

याचे पठण करता जे करिती गणेश मूर्तीस 'अभिषेकासी' | त्यास प्राप्त होईल "वाङ्मयी शक्ती" | ते लेखककवीवक्ता होतील (१२.)

चतुर्थ्याम् अनश्नन् जपति स विद्यावान् भवति |

इति अथर्वण वाक्यम् |

ब्रह्मादि आवरणम् विद्यात् न बिभेति कदाचन इति |

नाना व्रतेउपवासपूजा यज्ञयागतीर्थयात्रा सांसारिक काम्य पूर्तीन्च्या आगळ्या चेष्टा बहुजनान्च्या हृदयी ठसल्या (१२.)

म्हणूनि 'फलश्रुतीस्तोत्रांत गुन्फिली व्रतोपवासान्च्या कथांत कथिली | 'लाभप्रलोभने देखूनि तरि ही बहुजनांत सत्प्रवृत्ती जागवावया (१२.)

व्रतार्थ 'लंघनवा उपवास परमौषधी जी आयुर्वेदात परन्तु नन्तर 'पारणेकृतीत षड्रस मिष्टान्न नैवेद्य योजिले (१२.)

ऐशिया नैवेद्यान्चे भोजन पाक्षिकमासिकवार्षिक बन्धन पाळूनि करिता आरोग्य संवर्धन आपोआप स्वेच्छया बहुजनांसी (१२.)

शुक्ल चतुर्थीस 'विनायकीव्रत कृष्ण चतुर्थीस 'संकष्टीव्रत दोऩ्ही चतुर्थ्यास व्रतोपवास |अन्-अश्नन् मन्त्रसूक्त जपत जावा (१२.१०)

"गणपति अथर्वशीर्षअशा प्रकारे व्रतोपवास युक्त पठण करणारे त्याचे चिन्तन युक्त अध्ययन करणारे होतील विद्वान् विद्यावन्त (१२.११)

दोऩ्ही चतुर्थीस 'व्रतपाळोनी जो "अथर्वशीर्षजपेल त्यासी | 'चतुर्दश विद्यांचीहोईल प्राप्ती अनश्नन् व्रत-जप पुण्याईने (१२.१२)

गणितभौतिक आणि रसायन जैविकवैद्यकीय आयुर्विज्ञान मांत्रिकतान्त्रिकतन्त्र ज्ञान सर्व विद्यांचा स्वामी गणेशची (१२.१३)

न्यायनीतितर्क सगती यमनियमनैसर्गिकमानवी क्रीडा शारीरिकमानसिकबौद्धिकी सर्व विद्यांचा स्वामी गणेशची (१२.१४)

भाषागद्यपद्यकाव्य शाब्दिकसखोलगुह्य ज्ञान अर्थअस्त्रशस्त्रनैपुण्य सर्व विद्यांचा स्वामी गणेशची (१२.१५)

संगीतनृत्यनाट्य आदिक चौसष्ट कलान्चा ज्ञाता गणेश भक्त इच्छा वय लिन्गानुरूप विद्या वरदमूर्तीच देई (१२.१६)

ऐसे वाक्य असे 'अथर्वणऋषीचे गणेश देव स्वभक्ताभिमाने ऐसेच करील या श्रद्धेने साधकान्नी लाभ मेळवावा (१२.१७)

ब्रह्मपरब्रह्मपरात्पर ब्रह्म क्षरअक्षरउत्तम पुरुष क्षेत्रक्षेत्रज्ञपरमात्म तत्त्व जाणत्यास 'निर्भयत्वप्राप्ती घडेल (१२.१८)

आत्म्याचे अमरत्व ज्याने जाणले मी 'ब्रह्मांशचहे ज्यास उमगले त्यास मृत्यूचे भयही नुरले तो सदा निर्भय वागेल जगती (१२.१९)

सत्कर्माचरणी जे सत्प्रवृत्त त्यान्नाच लाभावे हे निर्भयत्व इतरास दैवी कोपाचे भय दुष्प्रवृत्तीस आळा घालावयासी (१२.२०)

यो दुर्वाङ्कुरैयजति स वैश्रवणोपमो भवति |

यो लाजैयजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति |

यो मोदक सहस्रेण यजति स वाञ्छित फलम् अवाप्नोति |

साज्य समिद्भियजति स सर्वम् लभते स सर्वम् लभते |

एकेका आवर्तनाच्या बरोबर अर्पीत राहती जे दुर्वान्कुर त्यास 'वैश्रवणकुबेरासमान सन्मानधनैश्वर्य प्राप्ती घडे (१२.२१)

लाह्या फुटोनी होतात मोठ्या चविष्टपचण्यास अगदी हलक्या तैसेच आपुल्या 'कोषआवरणादिका फोडोनिया साधक 'ज्ञाताहोई (१२.२२)

आवर्तना गणिक लाह्या अर्पुनी उपासना करतील त्यान्च्या मतीनी त्यांस मेधायश प्राप्ती घडोनी गणेश कृपा प्राप्ती घडे (१२.२३)

जे आवर्तना गणिक 'मोदक'| गणेशास अर्पण करतील 'सहस्र' | त्यान्च्या कामना मनोवान्छित पूर्ण होतील गणेश कृपेने (१२.२४)

'सहस्रमोदकान्चा नैवेद्य गाणेश भक्तांस प्रीतिने वाटुनं खावा सह कुटुम्ब परिवारा समेत अन्नदान पुण्य प्राप्ती घडे (१२.२५)

'आज्यतूप समिधान्च्या आहुती | "अथर्वशीर्षऋचांन्च्या संगती | 'गणेशयाग करिती करविती सर्व 'पुरुषार्थप्राप्ती त्यास (१२.२६)

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्य वर्चस्वी भवति |

सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमा सन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति |

महा विघ्नात् प्रमुच्यते महा पापात् प्रमुच्यते महा दोषात् प्रमुच्यते |

स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति |

य एवम् वेद इति उपनिषत् |

स्वकृत कर्मान्नी आत्मोद्धार उन्नती स्वगृही वा कुठल्याही एकान्त स्थळी यास मन्त्रसूक्तस्तोत्रादिक जपतपी उपाय योजिती भाविक भक्त (१२.२७)

सार्वजनिक स्थळीसार्वजनिक रीतिने करिता करविता ही 'पुण्य'कर्मे सार्वजनिक समाजासह उद्धरणे अधिक 'श्रेष्ठमानले शास्त्री (१२.२८)

आठ मेधावी सत्शिष्यांना | 'ब्रह्मजिज्ञासू ब्राह्मण सज्जना | 'सम्यक्सुयोग्य प्रकारे त्यांना | 'गाणेशविद्या ही शिकवावी (१२.२९)

ऐसे विद्यादान घडेल ज्यासी तो सूर्यासम होईल तेजस्वी | 'वर्चस्वगाजवुनि वाढवील कीर्ती गणेश भक्तीची भूमण्डळांत (१२.३०)

सूर्य ग्रहणादिकान्च्या काली वा महा नद्यान्च्या तीरांवरती संगम स्थळीतीर्थ क्षेत्री गणेश प्रतिमा स्थापोनिया (१२.३१)

अशा प्रतिमान्च्या वा मूर्तीन्च्या सन्निध करतील 'जपयज्ञाला त्यान्च्या "अथर्वशीर्षमन्त्रावर्तना | 'सिद्धीदेईल श्रीगणेश (१२.३२)

जेथे गणेशाची तीर्थ स्थळे तेथे करता पुरश्चरणे अधिक पुण्यप्राप्ती घडे ऐशी श्रद्धा भाविकान्ची (१२.३३)

गणेशाची भव्य मन्दिरे पौराणिक तथा ऐतिहासिक स्थले आजही लोकप्रिय तीर्थयात्रा स्थळे यान्ची यादी फारच मोट्ठी १२.३४)

त्यातील पुणे शहरा नजीकची पेशवे कालीनतसुप्रसिद्ध ऐशी आठ मन्दिरे अष्टविनायकान्ची झालीत जगभर मान्य आज (१२.३५)

मोरगावी 'मयूरेश्वर' | थेऊर येथे 'चिन्तामणिमन्दिर सिद्धटेकला 'सिद्धीविनायक' | 'महागणपतिरान्जणगांवी (१२.३६)

ओझर गावी 'विघ्नेश्वर' | लेण्याद्रीला 'गिरिजात्मज' | महाडला 'वरद विनायक' | 'बल्लाळेश्वरपाली नगरी (१२.३७)

ऐशी अष्ट विनायक यात्रा पायी चालता बहु पुण्यदा वयआरोग्य साम्भाळुनीया योग्य वाहनाने करावी (१२.३८)

विनायकी वा सन्कष्टी समयी अधिक 'पुण्यप्राप्ती होई अंगारकीला मगळवारी सर्वाधिक पुण्यअशी श्रद्धा (१२.३९)

'गणनावा गण नेतृत्वासाठी | 'बुद्धी'च ताकत वा मुख्य 'शक्ती' | तिचेही प्रसन्नत्व मिळवण्यासाठी स्थापिती तिज गणेश मुर्ती शेजारी (१२.४०)

धीऋद्धीबुद्धीअबुद्धी सबुद्धीसुबुद्धीविवेकबुद्धी सद्बुद्धीदुर्बुद्धीभ्रान्तीइत्यादि नाना स्वरूपे या बुद्धीचीच (१२.४१)

कार्यास सिद्धी मिळवून द्यावया उपयोगी ऐशा बौद्धिक युक्त्या त्यांतील प्रमुख प्रबलवान् आठ ज्या त्यान्ची यादी अष्ट सिद्धीत (१२.४२)

अणिमा पूर्वेसमहिमा आग्न्येयी गरिमा दक्षिणेसलघिमा नैऋत्यी प्राप्तिपश्चिमेसप्राकाम्य वायव्यी ईशिता उत्तरेसवशिता ईशान्यी पूजितात (१२.४३)

सिद्धीचे नांव व दिशा दर्शनान्चे ज्ञान मिळवून योग्य प्रकारे योग्य युक्ती योजिती त्यान्चे कार्य साधेल गणेश कृपेने (१२.४४)

महा विघ्नान्च्या निवारणास्तव महा दोषान्च्या निवारणास्तव महा पापान्च्या निवारणास्तव सदुपयोग या विद्येचा करावा (१२.४५)

जे जे जाणतील ही सद्विद्या तेच जाणते ज्ञाते सर्वथा तयांवर होईल गणपतीची कृपा ऐसे सान्गती वेदोपनिषदे (१२.४६)

असो ऐसे हे 'अथपासोनी | 'इतिपर्यन्त अंती येउनी | "गणपति अथर्वशीर्षसमजावोनी वक्ता सांगोनि स्तब्ध झाला (१२.४७)

श्रोते गणांनी 'ध्यान'पूर्वक | 'श्रवणकेले 'भक्ती'सहित म्हणोनि गणेश कृपेस पात्र वक्ता श्रोता सर्वही झाले (१२.४८)

वार्षिक 'गणेश चतुर्थीउत्सव | "गणपति अथर्वशीर्षपारायणासह अर्थ जाणोनि झाले कृतार्थ चिन्तने 'चिन्तामणीप्रसन्न झाला (१२.४९)

मानवी आयुष्य शभर वर्षे झोपेत त्यातील गेले अर्धे | 'बाल'पण दशांश खेळण्यात संपले चतुर्थांन्शी वार्धक्यी अंधबधिरत्व (१२.५०)

युवावस्थेत मी मदे मदांध | "माझ्या सारखा मीच फक्त" | ऐशा दिमाखे मिरवण्यांतच | 'कालमी व्यर्थ घालवीला (१२.५१)

पोक्तवयी मानवी 'अल्पबुद्धी' | त्यांत मज कुतर्क चिन्तनांची व्याधी या सर्वातुन गाळून घेउनही पटले तेवढेच वदलो येथे (१२.५२)

आदि शंकराचार्यज्ञानेश्वर रामदासान्चे मी धरिले बोट पाठीशी उभा श्रीगणेश प्रेरणा दायक सर्वसाक्षी (१२.५३)

एकोणीसशे बेचाळीस ऐसा शालिवाहनाचा शक भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीस लेखन पूर्तता गणेश कृपेने (१२.५४)

  संवत्सराचे नाम 'शार्वरी' | वर्षा ऋतु, दक्षिणायनी | 'गणेश चतुर्थी' महोत्सव मुहुर्ती | गणेश कृपेने पूर्तता झाली (१२.५५)

ख्रिस्त शके द्विसहस्त्र वीस दिनांक बावीस वार शनिवार | 'अभिगिरीक्षेत्री देश भारत या स्थळी गणेश कृपेने सिद्धी (१२.५६)

नमो वक्रतुण्डा एकदंता कृष्णपिन्गाक्षा गजवक्त्रा लम्बोदरविकट विघ्नराजेन्द्रा धूम्रवर्णा भालचन्द्रा (१२.५७)

नमो विनायका गणपति गजानना मम प्रार्थना पुरवी | "अखिल ब्रह्माण्डी सदा सुख शान्ती समृद्धी आरोग्य समाधान निवसो" (१२.५८)

----------------------- =============== ----------------------------------------------- =============== ------------------------