आमच्या लहान गांवात एकही ख्रिश्चन कुटुंब निदान माझ्या बालपणी तरी रहात नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष पहाण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या घरात होणाऱ्या बोलण्यात कधी ख्रिश्चनांचा उल्लेख आलाच तर "त्यांचे आचार विचार आणि त्यांच्यातल्या चालीरीती आपल्याहून वेगळ्या असतात." असा एक अलिप्तपणाचा सूर तेवढा असायचा. त्यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण होईल असे त्यांच्याविरुद्ध कोणी बोलत नसे. फार फार तर कोणी आपली रूढी मोडून वागायला लागला तर त्याला 'साहेब' म्हणून हिणवले जायचे. त्या काळात शहरात राहणाऱ्या आमच्या नातेवाईकांची मुले सुद्धा मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकत असत. कॉन्व्हेंट शाळांचे एवढे प्रस्थ वाढले नव्हते. त्यामुळे कधी तरी मुंबईहून आलेल्या पाहुण्यांच्या बोलण्यातून देखील माउंट मेरी किंवा पोर्तुगीज चर्च अशा नांवापलीकडे ख्रिश्चनांचा फारसा उल्लेख होत नसे. गांवात वैद्यकीय उपचारांची अद्ययावत व्यवस्था नसल्यामुळे रक्त तपासणी, एक्सरे फोटो अशा चांचण्यासाठी किंवा रोग विकोपाला गेला तर बहुतेक लोक मिरजेच्या वानलेस मिशन हॉस्पिटलात जात असत. तिथे जाऊन आलेल्या लोकांच्या तोंडून त्या इस्पितळातील सुव्यवस्थेची प्रशंसाच ऐकायला मिळत असे. त्यामुळे माझ्या मनात ख्रिश्चनांविषयी कधीही पूर्वग्रह निर्माण झाला नाही.
शालेय पाठ्यपुस्तकांमधले धडे, मासिके आणि अवांतर वाचनामधूनच येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याची शिकवण आणि ख्रिस्ती धर्म यासंबंधी माहिती मिळत गेली. त्यात आपला श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त यांच्या नांवातल्या साम्याखेरीज आढळलेली इतर साम्यस्थळे पाहून नवल वाटत असे. दोघांच्याही जन्मापूर्वी त्याची भविष्यवाणी झालेली होती. दोघांचेही जन्म काळोख्या मध्यरात्री आणि घरात न होता वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी झाले, कृष्णाचा जन्म कारागृहात तर येशू ख्रिस्ताचा गोठ्यात. दोघांनाही नष्ट करण्यासाठी त्यांचे शत्रू टपून बसले होते. त्यामुळे त्यांचे बालपण त्या संकटाच्या छायेत गेले. दोघांचे बालपणचे सवंगडी अगदी जनसामान्यातले होते. पुढे मात्र श्रीकृष्णाने राजसी वैभवाचा आस्वाद घेतला तर येशूने आपले जीवन दीनदुबळ्यांच्या सेवेत घालवले. तरीसुद्धा कृष्णाने योगेश्वर होऊन मानवजातीला अखंड मार्गदर्शन करीत राहील असा गीतोपदेश केला आणि येशूने आपले जीवन व प्रवचने यांतून जगाला दिव्य संदेश दिला. या दोघांचीही शिकवण अनंत काळापर्यंत टिकून राहण्यासारखी आहे.
या दोन्हीमध्ये कांही समान धागा असला पाहिजे. श्रीकृष्णाच्या भारतात ख्रिस्ताच्या शिकवणीने चांगले मूळ धरले आहे. ती शिकवण देणाऱ्या संस्था इथे उभ्या राहिल्या असून देशोदेशीचे धर्मसेवक इथे प्रशिक्षण घ्यायला येतात असे ऐकले आहे. इथून शिकून निघालेला कोणी धर्मगुरू उद्या पोपच्या जागेवर निवडला गेला तर मला त्यात आश्चर्य वाटणार नाही. याच्या उलट ख्रिश्चनांच्या पाश्चिमात्य देशात अगदी अल्प स्वरूपात कां होईना, पण हरेकृष्ण मूव्हमेंट सुरू झाली आणि येशूच्या पायाशी मनःशांती न मिळाल्यामुळे कांही लोकांनी मुंडण करून संन्यास घेतला आहे आणि स्वामी अमूकानंद किंवा माँ तमूकमाता अशी नांवे धारण केली आहेत. आणखी काही स्वामींचे आश्रम अमेरिकेत सुरू झाले आहेत.
मी कॉलेजात गेल्यानंतर दरवर्षी ख्रिसमसच्या सुटीत घरी पळत होतो. त्यामुळे शहरांमध्ये तो कसा साजरा केला जातो हे मी कधी पाहिलेच नाही. "आपली जशी दिवाळी असते ना, तसा त्यांचा ख्रिसमस!" असे नुसते मोघमात ऐकले होते. पण म्हणजे ते नक्की काय करतात? दिवे लावतात, कां फराळ करतात कां फटाके उडवतात? मी नोकरीसाठी मुंबईला स्थाईक झाल्यानंतर मला हळू हळू त्याची कल्पना येत गेली. मी जरी धोबीतलाव किंवा बांद्रा यासारख्या ख्रिश्चन वस्तीत रहात नसलो तरी जातांयेतांना तिथली रोषणाई, सजावट वगैरे माझ्या नजरेला येत असे. एकंदरीत रस्त्यावरून दिसणारा उल्हास पाहिला तर दिवाळी आणि ख्रिसमस यांत खरेच विशेष फरक वाटत नाही. तपशीलात फरक असेल पण सेलेब्रेशनचे मुख्य स्वरूप सारखेच वाटते.
इंग्रजी सिनेमात अनेक वेळा ख्रिसमसचे सीन असतात. 'होम अलोन' या चित्रपटाचे कथानकच ख्रिसमसच्या दिवशी घडते. मागे मी एक इंग्लिश चित्रपट पाहिला होता. त्याचे नांव आता आठवत नाही. "सँताक्लॉज खरोखर अस्तित्वात असतो कां?" हा वाद या सिनेमामध्ये चक्क कोर्टात नेला जातो. अनेक विनोदी साक्षीपुरावे आणि मजेदार उलटतपासण्या झाल्यानंतर अखेर ज्यूरींना त्यावर निर्णय द्यायचा असतो. "ज्याची श्रद्धा असते त्याच्यासाठी सँताक्लॉज अस्तित्वात असतो." असा निर्णय देणे त्यांना भाग पडते असा त्याचा कथाभाग आहे. दूरदर्शन सुरू झाल्यावर त्यावर नाताळच्या निमित्याने खास कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू झाले. ते आम्ही आवर्जून पहायला लागलो. टीव्हीवर इतर वाहिन्या आल्यावर प्रत्येकीने त्यात भर टाकली. त्यामुळे आता ख्रिसमसनिमित्य देशोदेशी होणारे सोहळे, सजावट, रोषणाई, कॅरॉल्स, पोपचे व्याख्यान वगैरे सगळे घरबसल्या पहायला मिळते.
इंग्रजी सिनेमात अनेक वेळा ख्रिसमसचे सीन असतात. 'होम अलोन' या चित्रपटाचे कथानकच ख्रिसमसच्या दिवशी घडते. मागे मी एक इंग्लिश चित्रपट पाहिला होता. त्याचे नांव आता आठवत नाही. "सँताक्लॉज खरोखर अस्तित्वात असतो कां?" हा वाद या सिनेमामध्ये चक्क कोर्टात नेला जातो. अनेक विनोदी साक्षीपुरावे आणि मजेदार उलटतपासण्या झाल्यानंतर अखेर ज्यूरींना त्यावर निर्णय द्यायचा असतो. "ज्याची श्रद्धा असते त्याच्यासाठी सँताक्लॉज अस्तित्वात असतो." असा निर्णय देणे त्यांना भाग पडते असा त्याचा कथाभाग आहे. दूरदर्शन सुरू झाल्यावर त्यावर नाताळच्या निमित्याने खास कार्यक्रमांचे प्रक्षेपण सुरू झाले. ते आम्ही आवर्जून पहायला लागलो. टीव्हीवर इतर वाहिन्या आल्यावर प्रत्येकीने त्यात भर टाकली. त्यामुळे आता ख्रिसमसनिमित्य देशोदेशी होणारे सोहळे, सजावट, रोषणाई, कॅरॉल्स, पोपचे व्याख्यान वगैरे सगळे घरबसल्या पहायला मिळते.
ख्रिसमसच्या दिवशी मॉँजिनीजच्या दुकानात ठेवलेले आकर्षक केक पाहून आम्हीही ते आणून खायला सुरुवात केली. कधी गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला गेल्यावर मी ताज केकशॉपमधल्या केकची चंव घेऊन पाहिली तर कधी ख्रिसमसचे खास पुडिंग चाखून पाहिले. मला नववर्षासाठी येणाऱ्या कांही सदीच्छापत्रांत "मेरी ख्रिसमस" चा संदेश देखील जोडलेला असतो. अशा प्रकारे आमच्या नकळतच आम्हीसुद्धा थोडेसे "जिंगल बेल जिंगल बेल" करू लागलो.
. . . . . . . . . . (क्रमशः)
. . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment