Wednesday, January 20, 2021

भगवद्गीता आणि मी

हा मथळाच चुकीचा आहे असे काही लोकांना वाटत असेल, कारण कुणालाही आधी 'मी'पणा सोडल्याशिवाय भगवद्गीतेविषयी काही बोलण्याचा अधिकारच नाही असे समजले जाते. पण माणसाचा हा मीपणा इतका हट्टी आहे की तो सोडायचा असे म्हणून सुटतच नाही असे मी मी म्हणणाऱ्या मोठ्या लोकांचेही होते, मग तिथे माझा पामराचा काय पाड लागणार आहे? त्यामुळे माझ्यातल्या त्या 'मला'च आलेले अनुभव आणि त्यातून जे काही वाटले ते लिहून काढायचा हा एक प्रयत्न. 

माझ्या लहानपणी मी रोज शाळेत जाऊन तिथे काय शिकून येत होतो ते घरातले कोणी विचारतच नसत आणि आजच्या मानाने पहाता त्याकाळी तिथे फारसे काही शिकवतही नसत. पुस्तकातले धडे तर मी घरीसुद्धा वाचून काढत असे आणि वाचलेले समजण्याइतकी अक्कल मला होती. मोठ्या माणसांच्या दृष्टीने लहान मुलांसाठी घरातले शिक्षणच पुढील आयुष्यासाठी जास्त महत्वाचे आणि उपयोगाचे होते. त्या काळात गृहपाठ हा शब्दच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मित्रांबरोबर खेळून झाल्यावर घरातले शिक्षण घेण्यासाठी मला भरपूर वेळही मिळत असे.  पाठांतर हा त्यातला एक महत्वाचा भाग होता. पाठांतर केल्याने बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती वाढते, वाचा शुद्ध होते वगैरे अनेक फायदे सांगितले जात असत. पाठ केलेले श्लोक घडाघडा म्हणून दाखवल्यावर शाबासकी मिळत असे, कौतुक केले जात असे. त्यामुळे सांगितलेले पाठांतर चढाओढीने केले जात असे. त्या काळात श्लोकपठणाच्या स्पर्धासुध्दा असायच्या. आमच्या शाळेतल्या एका मुलीने तर अठरा अध्याय गीता तोंडपाठ केली होती आणि गावात आलेल्या कुठल्याशा स्वामीसमोर ती म्हणून दाखवली होती म्हणून तिचा सत्कार झाला होता.  

मी शाळेत असेपर्यंत कितीतरी स्तोत्रे, आरत्या, श्लोक, अभंग वगैरे पाठ केले होते. त्यात भगवद्गीतेचे बारावा आणि पंधरावा हे दोन अध्यायही होते. मला हेच अध्याय पाठ करायला का सांगितले होते कोण जाणे, पण बहुधा ते सर्वात लहान होते म्हणून असेल. त्या दोन अध्यायांमधल्या चाळीस श्लोकांपैकी एकाही श्लोकाचा अर्थ मात्र मला तेंव्हा मुळीसुद्धा समजला नव्हता आणि तशी अपेक्षाही नव्हती. "आता पाठ करून ठेव, तू मोठा झाल्यावर तुला त्यांचा अर्थ समजेल." असे कदाचित त्या काळात मला सांगितले गेले असेल, पण तसे काही झाले नाही आणि कालांतराने मी पाठ केलेले ते अध्याय विसरूनही गेलो.

माझ्या अवांतर वाचनात आणि मोठ्या लोकांशी बोलण्यात गीतेचा उल्लेख नेहमी येत असायचा. संस्कृत भाषेतले हे काव्य समजायला कठीणच आहे. त्यातली शिकवण समाजापर्यंत पोचावी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ती ज्ञानेश्वरीमध्ये विस्ताराने सांगितली.  लोकमान्य टिळकांनीही गीतारहस्य नावाचा मोठा ग्रंथ लिहिला, पण हे ग्रंथसुद्धा वाचून समजणे सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेर आहे म्हणून गेल्या शतकातल्या सोनोपंत दांडेकरांसारख्या विद्वानांनी ज्ञानेश्वरीचा अर्थ सोप्या भाषेत लिहिला, विनोबा भावे यांनी सुलभ अशी गीताई लिहिली, तसेच स्वामी चिन्मयानंद, कृष्णमूर्ती यांच्यासारख्या अनेक पंडितांनी गीतेवर मोठमोठाले इंग्रजी ग्रंथ लिहिले, प्रवचनांमार्फत गीताज्ञानयज्ञ चालवले वगैरे खूप माहिती मला मिळाली, त्याबरोबर "भगवद्गीता समजून घेण्यासाठी एक जन्मही पुरेसा नाही" अशा प्रकारची धास्ती वाढवणारी वाक्येही समोर आली.  नोकरी आणि संसारामधल्या नित्याच्या संघर्षातच मी इतका बुडून गेलो होतो की त्यातले काहीही वाचायचा किंवा त्यासाठी मुद्दाम कुठे जाऊन ते निरूपण ऐकायचा प्रयत्नही मी कधी केला नाही.  

नेहमीच्या जीवनातच अनेक गोष्टी कानावर किंवा नजरेसमोर येत होत्या आणि माझ्या सामान्यज्ञानात भर टाकत होत्या. गीतेमधली अनेक वचने नेहमी उद्धृत केली जात असल्यामुळे ती वाचून वाचूनच पाठ झाली. गीतेमध्ये भगवंतांनी कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग असे साधनेचे तीन मार्ग दाखवले आहेत, त्यातला ज्याला जो आवडेल किंवा झेपेल तो त्याने धरला तरी त्याचा उद्धार होईल. लोकमान्य टिळकांनी कर्ममार्गाचा प्रसार केला. माणसाने कसलीही अपेक्षा न धरता आपले काम मन लावून चोख करावे (निष्काम कर्म). त्याला चांगल्या कामाचे चांगले फळ मिळेलच, वाईट कामाची फळेसुद्धा केंव्हा ना केंव्हा तरी भोगावी लागतीलच असे तत्वज्ञान आहे. पण या जगात नेहमीच तसे होतांना दिसत नाही. चांगल्या लोकांना त्रास होतांना आणि दुष्ट लोकांचा विजय होतांना दिसतो. माणसाचे कर्म त्याच्यासोबत जन्मोजन्मी रहाते त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मात मिळेल किंवा त्याला या जन्मात भोगावे लागलेले भोग ही त्याच्या मागच्या जन्मातल्या कर्माची फळे आहेत, असे त्यावर सांगितले जाते.  सर्व संतमंडळींनी भक्तीमार्गाचा भरपूर प्रसार केला. माणसाने देवाला शरण जाऊन आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर सोपवाव्या, तो आपल्या भक्तांची पूर्ण काळजी घेईल असे सांगितले जाते आणि भक्त प्रह्लादापासून ते अलीकडच्या काही लोकांपर्यंत अनेक दाखलेही दिले जातात. मला तरी ज्ञानमार्ग फारसा समजला नाही, पण ज्ञान या शब्दाचा अर्थ आपण नॉलेज असा समजतो त्यापेक्षा आध्यात्मात तो काहीतरी वेगळा असावा इतके जाणवले.  

या तीन्ही मार्गांवरून जाण्यासाठी काही गोष्टी गृहीत धरणे आवश्यक असते. कर्मसिद्धांतासाठी अनेक पुनर्जन्मांची साखळी असणे आवश्यक आहे. प्रत्येक जन्मात वेगवेगळे शरीर धारण करणारा पण आपले स्वतःचे वेगळेपण असणारा आत्मा म्हणजे आपण हे मनात पक्के ठसायला हवे. भक्तीमार्गावर चालणे तर बिकटच असते, आलेल्या संकटांचा सामना करतांना मनातला देवावरचा विश्वास न डगमगू देता "आलीया भोगासी असावे सादर, देवावरी भार ठेवोनिया" हे सांगणे सोपे वाटले तरी तसे वागणे कठीणच असते.  ज्ञानमार्गावर चालण्यासाठी आधी एक योग्य असा गुरु भेटायला हवा आणि तो पूर्वसंचित असलेल्यांनाच भेटतो असे म्हणतात. त्याची दीक्षा घेतल्यावर तो जे सांगेल त्यावर डोळे मिटून पूर्ण विश्वास ठेवायला पाहिजे. हे सगळे आपण लहानपणापासून ऐकत आल्यामुळे आपल्या ओळखीचे असले तरी ते दुसऱ्याला समजाऊन सांगणे किंवा कुणाच्या चिकित्सक बुद्धीला पटणे कठीण आहे.

यामुळे भगवद्गीतेत असे असे सांगितले आहे असे ऐकले किंवा वाचले असले तरी ते समजून घेणे मला जरा दुरापास्त वाटायचे. पण 'भगवद्गीतेतली शिकवण दहाबारा वाक्यात' किंवा 'अठरा अध्यायांचे सार अठरा श्लोकात', 'जीवनातील सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेमध्ये' अशा प्रकारच्या मथळ्यांचे सुलभ संदेश वाचून माझी उत्सुकता वाढत गेली. मी निरनिराळ्या भाषांमध्ये आलेल्या अशा काही संदेशांचा संग्रह केला आहे आणि अधून मधून ते वाचतो. पण हे सार कुणी काढले आणि ते काढणाऱ्याला भगवद्गीता किती समजली होती हा प्रश्न आहेच. त्यापेक्षा मी मूळ भगवद्गीता वाचायलाच हवी असे मला अधिकाधिक वाटत गेले.

लहानपणी मी अक्षरही समजून न घेता गीतेतले दोन अध्याय पाठ केले होते आणि ते पोपटासारखे घडाघडा म्हणून दाखवत होतो, पण समज आल्यानंतर मला तसे करायचे नव्हते. भगवद्गीतेची एक पॉकेट बुकाच्या रूपातली प्रत मात्र मी पूर्वीपासून माझ्याजवळ बाळगली आहे. तिचे लक्षपूर्वक पठण करायची स्फूर्ती मला काही वेळा आली, पण ती जेमतेम ३-४ दिवसच टिकली आणि काही ना काही कारणाने विरून गेली.  त्यामुळे माझ्या वाचनाची गाडी २-३ अध्यायांच्या पुढे गेली नव्हती.  या वर्षी मात्र गीताजयंतीच्या निमित्याने मी संपूर्ण गीता वाचायचीच असे ठरवले. एका बैठकीत संपूर्ण गीतेचा पाठ करणारे भक्त आहेत, पण मला एक एक श्लोक सावकाशपणे वाचायचा असल्याने मी हळूहळू रोज एक अध्याय वाचत माझे वाचन अठरा दिवसात पूर्ण केले.

गेली दोन वर्षे मी सुभाषितांमधून संस्कृत शिकण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  त्यामुळे मला आता संस्कृत भाषेतला संधीविग्रह करणे थोडे कळायला लागले आहे आणि काही संस्कृत शब्दही ओळखीचे झाले आहेत. या वेळी गीता वाचतांना मला त्यांचा उपयोग झाला. संधीविग्रह करून शब्द वेगळे केल्यावर आणि साधारणपणे विषय आणि सार माहीत असल्यामुळे त्या शब्दांच्या अर्थाचा थोडा अंदाज करता आला. त्यामुळे मला यावेळी अगदीच अंधारात चाचपडल्यासारखे वाटले नाही. पण शब्दांचा थोडासा उघड अर्थ समजला तरी त्यामागचा गर्भित अर्थ किती तरी गहन असू शकतो याची मला कल्पना आहे.  भगवद्गीतेत इतके ज्ञान ठासून भरलेले आहे की ती वाचत असतांना दर वेळी काही नवे नवे अर्थ समजतात असे सांगितले जाते. मी तर आताशी फक्त एक वाचन केले आहे. त्यामुळे त्या प्रयत्नात मला त्किती अल्प बोध झाला असेल याची कल्पना येईल.

कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर गेल्यानंतर अर्जुनाला समोर भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे पूजनीय आणि प्रिय असे अनेक लोक दिसले आणि त्यांच्याशी युद्ध करणे म्हणजे त्यांच्यावर शस्त्र चालवणे सर्वस्वी गैर  किंवा अधार्मिक आहे असे वाटल्याने त्याने हातातले धनुष्य टाकून दिले इथून गीतेची सुरुवात होते हे सर्वश्रुत आहे.  त्याच्या मनातला संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जीवन आणि मृत्यू याविषयीचे रहस्य त्याला सांगितले, त्यात "या सर्वांचे आत्मे अमर आहेत, त्यांना तू शस्त्रांनी मारूच शकत नाहीस" यापासून ते "सर्व चराचराचा उगम आणि अंत केवळ माझ्याचकडून (परमेश्वराकडून) होतो, तू फक्त निमित्तमात्र ठरणार आहेस" वगैरे सांगून "तुझ्या क्षत्रियधर्माचे पालन करणे तुला आवश्यक आहे. यात तुझा मृत्यू झाला तर तू थेट स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीचा उपभोग घेशील (इथे राज्य करशील) असा तुझा दोन्ही बाजूंनी फायदाच आहे" असे आमिषही दाखवले. कदाचित एवढी कारणेही पुरेशी असतांना त्याशिवाय या विश्वातील सत्व, रज, तम तत्वे, विश्वातील चराचर वस्तूंची उत्पत्ती, स्थिति आणि लय, संन्यस्त व स्थितप्रज्ञ वृत्तीच्या मानवांचे गुणधर्म वगैरेंसह ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग अशासारख्या अनेक बाबतीतले गुह्य असे ज्ञान श्रीकृष्णांनी दिले.  त्यावरून बोध घेऊन अर्जुन (निष्काम कर्म करण्याच्या हेतूने) युद्धाला तयार झाला असे गीतेच्या अखेरीस सांगितले आहे.  अर्जुनाला युद्ध करण्यासाठी उद्युक्त करणे एवढा मर्यादित उद्देश त्यात नव्हता असे दिसते. 

व्यासमहर्षींनी महाभारतातल्या या युद्धप्रसंगाचे वर्णन करत असतांना भगवद्गीतेमधले हे सगळे ज्ञान सविस्तरपणे सांगितले आहे, तेही संजयाने दिव्यदृष्टीने जे पाहिले आणि ऐकले ते जसेच्या तसे धृतराष्ट्राला सांगितले अशा पद्धतीने मांडले आहे. युद्धभूमीवर इतके सगळे प्रदीर्घ संवाद चालले असतांना युद्ध करण्यासाठी सज्ज असलेल्या दोन्ही बाजूच्या अठरा अक्षौहिणी सेनांमधले इतर योद्धे आणि सैनिक काय करत असतील? असा विचार करणे अप्रस्तुत आहे कारण गीतेमधले ज्ञान फक्त श्रद्धायुक्त माणसाच्या अंतःकरणालाच समजेल असेही त्यात सांगितले आहे आणि त्याबद्दल शंका घेण्याला जागा ठेवलेली नाही.  पण  कुठल्याही विधानाबद्दल एकाद्याच्या मनात शंका आल्यामुळेच काही प्रश्न उपस्थित होतात, त्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना त्यातून आणखी अनेक प्रश्न निघतात आणि त्यांची उत्तरे शोधली जातात, यातून अधिकाधिक नवनवी माहिती मिळत जाते अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास होत गेला आहे असा जगाचा इतिहास आहे. इथेच विज्ञान आणि आध्यात्म यामधला विसंवाद आहे. विज्ञानाला प्रश्नांची उत्तरे हवी असतात, तर निदान भारतातल्या आध्यात्मात तरी प्रश्न विचारायलाच परवानगी नसते.

सध्या सामाजिक माध्यमांवर एक लेख भिरभिरत फिरत आहे. त्यात असे लिहिले आहे की पांडव, कौरव, कर्ण आणि श्रीकृष्ण हे सगळे मानवाच्या अंतर्मनातले निरनिराळे भाव आहेत आणि महाभारतातले युद्ध म्हणजे त्यांच्यातले अंतर्द्वंद्व आहे.  हे अर्थातच कुणी तरी  तर्क करून लावलेले शोध आहेत, पण वरकरणी तरी विचार करण्यासारखे वाटावेत अशा रीतीने ते मांडले आहेत. 

भगवद्गीतेतील अनेक प्रकारच्या सदुपदेशामधून व्यक्तीगत जीवनाचे उत्तम मार्गदर्शन केले आहेच. भविष्यकाळातल्या  पुढील जन्मांमध्ये त्याचे लाभ मिळून अखेर मोक्षप्राप्ती मिळणे एवढाच त्याचा उद्देश असावा असे नाही. या जन्मातले जीवनसुद्धा व्यवस्थितपणे जगता यावे यासाठी करण्यासारख्या अनेक गोष्टी गीतेत सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ कुठल्या गोष्टीचा हव्यास धरू नये, कशातही फार गुंतून पडू नये, मनावर ताबा ठेवावा, क्रोध आणि क्षोभ आवरावा, मनातही कसला भेदभाव करू नये वगैरे वगैरे. या जगात सगळीकडे सात्विक, राजसी आणि तामसी तत्वे आहेतच, ती ओळखून शक्यतो सात्विक विचार आणि वर्तन ठेवावे आणि तामसीपणापासून दूर रहावे, राजसी वृत्ती स्वाभाविकपणेच येते, तिच्यावर नियंत्रण असावे. हा माणसाने सुखीसमाधानी रहाण्याचा मूलमंत्र आहे आणि तो स्थलकालातीत आहे असे म्हणता येईल. एवढे जरी समजले तरी खूप झाले असे मला वाटते.   

----

भगवद्गीतेचे सार सांगणारे हे लेखसमूह अवश्य वाचावेत

गीताअध्यायसार

https://anandghare.wordpress.com/2020/04/10/%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0/

 भगवद्गीतासार

https://anandghare.wordpress.com/2019/02/13/%e0%a4%ad%e0%a4%97%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%a8/