Sunday, December 21, 2008

यॉर्क मिन्स्टर


यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला रेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.


मिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्यातील शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदैव गर्दी असते.


रोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट खुद्द इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.


सध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केला असेल! क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमारतीएवढा उंच आहे. अशा अवाढव्या आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.


ही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.


जागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किंवा त्याहून मोठे भव्य पुतळे ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृती आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक्या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते? त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली?


यॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वातावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.


यॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.

No comments: