Saturday, December 06, 2008

अमेरिकेकडे प्रयाण


आम्हाला व्हिसा मिळाल्यानंतर आमची अमेरिकेला जाण्याची तयारी सुरू झाली. अमेरिका खंडाच्या चारी बाजूला महासागरांनी त्याला विळखा घातलेला असल्यामुळे रस्ता किंवा रेल्वेने ते इतर जगाशी जोडलेलेच नाही. कोलंबस आणि वास्कोडिगामा वगैरे साहसी दर्यावर्दींच्याप्रमाणे जहाजातून प्रवास करायचा झाला तर त्याला दीड दोन महिने तरी लागतील. आजकाल कुणाकडेही तेवढा वेळ नसतो. त्यामुळे अशी सागरी सफर करण्याची संधी आता फक्त नौसैनिकांना आणि आगबोटीवर काम करणा-या खलाशी लोकांनाच तेवढी उपलब्ध राहिली आहे. आजच्या काळात कोणी अमेरिकेला जायचे म्हणजे ते हवाईमार्गानेच हे ठरलेलेच असते.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातले भारत व अमेरिका हे देश एकमेकांच्या विरुध्द बाजूला असल्यामुळे कुठल्याही बाजूने तिथे जाण्यासाठी जवळ जवळ अर्धी पृथ्वीप्रदक्षिणा करावी लागते. गेल्या शतकाच्या अखेरीपर्यंत भारतातून अमेरिकेला जाण्याचा प्रवास निदान दोन टप्प्यात करावा लागत असे. अमेरिकेच्या पूर्व भागात असलेल्या न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन डी.सी.ला जायचे असल्यास आधी भारताच्या पश्चिमेकडील लंडन किंवा फ्रँकफूर्टसारख्या युरोपातल्या एकाद्या शहरात उतरून तिथून पुढे जावे लागत असे आणि अमेरिकेच्या पश्चिम भागातल्या सॅन फ्रॅन्सिस्को किंवा लॉस एंजेलिसला जाणारे लोक अतिपूर्वेकडील चीन वा जपानमार्गे जात. कांही वर्षांपूर्वी भारतातून थेट अमेरिकेपर्यंत उत्तरेकडून जाणारी विमानसेवा सुरू झाली आहे. आता तर मुंबईहून थेट अॅटलांटाला जाण्याची सोय देखील सुरू होण्यातच आहे, कदाचित आतापर्यंत ती सुरू झालीसुध्दा असेल, पण आम्ही प्रवासाला निघालो तेंव्हा मात्र ती मुंबईपासून न्यूयॉर्कसारख्या महानगरापर्यंतच होती. अमेरिकेत गेल्यानंतर पुढे इतरत्र जाण्यासाठी विमान बदलावेच लागायचे. मुंबईहून अमेरिकेपर्यंत सुमारे सोळासतरा तास सलग प्रवास केल्यानंतर पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी दोन अडीच तासांचा वेगळा छोटा प्रवास करायचा किंवा प्रत्येकी आठ दहा तासांची दोन सलग उड्डाणे लागोपाठ करून युरोपातल्या एकाद्या शहरामार्गे अॅटलांटाला जायचे असे दोन पर्याय आमच्यापुढे होते. त्यातल्या पहिल्या पर्यायात एकंदरीत कमी वेळ लागत होता तसेच त्याचा खर्चही कमी होता म्हणून आम्ही तोच मार्ग स्वीकारला.

हवाई मार्गांची चौकशी करतांना 'नेवार्क' हे एक यापूर्वी कधी न ऐकलेले नांव समोर आले. पहिल्यांदा वाचनात आले तेंव्हा ती मुद्राराक्षसाची गफलत असेल असे समजून ते नांव मी 'न्यूयॉर्क' असेच वाचले. तसेच पहिल्यांदा ऐकले तेंव्हा तो 'न्यूयॉर्क' चा अपभ्रंश वाटला. बंगाली बाबू 'व्हॅक्यूम' ला 'भाकूम' म्हणतात किंवा गुजराथी भाई 'हॉल' चा उच्चार 'होल' असा करतात तशातला हा प्रकार वाटला. त्यानंतर 'नेवार्क' हे 'न्यूयॉर्क'च्या विमानतळाचे नांव आहे असे कोणीतरी सांगितले. मग न्यूयॉर्क येथेच 'जेएफके' आणि 'नेवार्क' अशा नांवांची दोन विमानतळे आहेत अशी माहिती मिळाली. जॉन एफ केनेडींसारखाच कोणी 'बिल' किंवा 'टेड नेवार्क' नांवाचा मोठा माणूस अमेरिकेत होऊन गेला असेल आणि त्याचे नांव या दुस-या विमानतळाला दिले असेल असे मला वाटले. पुढे 'नेवार्क' हा विमानतळ न्यूजर्सीमध्ये आहे आणि न्यूयॉर्क व न्यूजर्सी हे मुंबई व ठाण्यासारखे एकमेकांना लागून आहेत असे ऐकले. अशा प्रकारे माझ्या अज्ञानावर अर्धवट माहितीची पुटावर पुटे चढत होती.


मुंबईहून नेवार्क किंवा न्यूयॉर्क यातल्या एका जागी विमान बदलून आम्हाला पुढे अॅटलांटाला जायचे होते. त्या विमानतळावर आम्हाला फक्त एका विमानातून उतरून दुस-यात जाऊन बसायचेच असल्यामुळे नेवार्क ही जागा नेमकी कुठे आहे हे समजून घेण्याची तशी कांहीसुध्दा गरज नव्हती. आमच्या विमानाच्या पायलटला ते माहित असणे आमच्या दृष्टीने पुरेसे होते. त्यातून त्याने चूक केलीच तर जिथे कोठे आम्ही उतरू तिथून पुढे आम्हाला अॅटलांटाला नेण्याची जबाबदारी विमान कंपनीची होती. यामुळे त्या बाबतीत मी निर्धास्त होतो. मात्र तिकीट काढतांना एका प्रवासात नेवार्क आणि दुस-यात न्यूयॉर्क असे झाले तर इकडून तिकडे कसे जायचे हा प्रश्न पडला असता. त्यामुळे तेवढी काळजी घेतली आणि अखेर नेवार्कमार्गे अॅटलांटाला जाण्याचे ई तिकीट निघाले.


तिकीट काढल्यानंतर सामानाची बांधाबांध करणे आले. यापूर्वी युरोपला जातांना माणशी फक्त वीस किलो एवढेच सामान नेण्याची परवानगी मिळाली होती. गरम कपडे आणि रोज लागणा-या आवश्यक वस्तू एवढ्यांचेच वजन इतके भरत असल्यामुळे त्याशिवाय आणखी काय काय न्यावे असा प्रश्न आतापर्यंत कधी पडला नव्हता. अमेरिकेचे सगळेच काम प्रशस्त किंवा अवाढव्य असल्यामुळे तिकडे जातांना भरपूर सामान सोबत नेता येते असा (गैर)समज ऐकिवात होता. तसा तो समज थोडा खराही आहे. अमेरिकेत जातांना आपल्या सर्व बॅगा एकावर एक ठेवायच्या आणि त्या ढीगाची लांबी, रुंदी व उंची मोजल्यावर त्याची बेरीज सत्तर कां पंच्याहत्तर इंच एवढ्यात असली की झाले असे माझ्या एका मित्राने पूर्वी सांगितले होते. आकारमान एवढ्यात बसले की त्या बॅगांमध्ये कापूस भरलेला असो वा लोखंड असो ! अर्थातच हे सामान प्रवाशाच्या वैयक्तिक उपयोगाचेच असले पाहिजे असा नियम असल्यामुळे फार फार तर थोडा कापूस बरोबर नेता येईल, पण लोखंड कशाला हवे? हा प्रश्न उठेल. तसेच यातला कसलाही माल विक्रीकरता नेता येणार नाही असाही नियम आहे. मागे माझ्या एका आप्ताला निरोप द्यायला विमानतळावर गेलो होतो तेंव्हा त्याने नियमानुसार बत्तीस बत्तीस किलो वजनाच्या दोन बॅगा नेलेल्या पाहिल्या होत्या. पण आम्ही विमानाचे तिकीट काढले तोंपर्यंत ही मर्यादा पन्नास पौंड म्हणजे बावीस तेवीस किलोच्या दोन बॅगापर्यंत कमी झाली होती.

एकाद्या गोष्टीची परवानगी असली याचा अर्थ ती केलीच पाहिजे असा कधी कधी घेतला जातो. विशेषतः विमानात नेण्यात येणा-या सामानाच्या बाबतीत तरी तसे होतेच. विमानाचे एवढे महागडे तिकीट काढल्यावर ते पैसे पुरे पुरे वसूल व्हायला पाहिजेत ना! त्यामुळे किलोंची संपूर्ण भरपाई करण्यासाठी लोक कसकसले सामान बॅगांमध्ये भरतात ! कांही लोक भाराभर वह्या, पुस्तके आणि मासिके नेतात, कोणी तवे, पराती, कढया, पातेली, डबे वगैरे इकडून तिकडे घेऊन जातात, तर तिकडे मिळत नाही म्हणून व-याचे तांदूळ, करवंदाचे लोणचे, थालिपिठाची भाजणी आणि कुळिथाचे पीठसुध्दा त्यात भरून घेऊन जातात. मी मात्र मला जेवढे उचलून नेता येईल यापेक्षा जास्त सामान न्यायचे नाही असे ठरवले आणि तसे आधीच जाहीर करून टाकले. घरातून बाहेर पडल्यानंतर जिन्याच्या पाय-या उतरून खाली रस्त्यापर्यंत तर ते सामान आपणच न्यायला हवे ना. उगाच भरमसाट वजन करून घेतले आणि ते उचलतांना दारातच कंबरेत उसण भरली तर मग पुढे कसला प्रवास आणि कसली अमेरिका? सरळ दवाखान्याची वाट धरावी लागायची. स्वतः जरी सामान कमी ठेवायचे ठरवले तरी "अमेरिकेतल्या आपल्या पोरांसाठी कृपया थोडा ( म्हणजे निदान किलो दोन किलो) खाऊ घेऊन जाल कां ?" असे विचारणारे सुहृद भेटतातच. "हल्ली सुरक्षा नियम कडक झाल्यामुळे असले कांही न्यायला बंदी घातली आहे." असे बेधडक सांगायला सुरुवात केली.

नाही नाही म्हंटले तरी रोजच्या उपयोगासाठी साधे कपडे, समारंभात घालण्याजोगे बरे कपडे, हवेत ऊष्मा असतांना अंगात घालायचे हलके कपडे, थंडीत घालण्यासाठी गरम कपडे, तिथल्या आप्तांना भेट देण्याचे कपडे असे करता करता प्रवासात जेवढे वजन नेण्याची परवानगी होती जवळ जवळ तेवढे वजन अखेरीस झालेच. "कोठलेही काम करण्यासाठी जेवढा अवधी उपलब्ध असतो तेवढे ते काम वाढत व रेंगाळत जाते" असा पार्किन्सन का कोणा तत्ववेत्त्याचा नियम आहे. त्याचप्रमाणे "बॅगेत जेवढी जागा असेल तेवढे त्यात भरायचे कपडे वाढत जाऊन अखेर थोडे शिल्लक उरतातच" असे म्हणता येईल.

परदेशात गेल्यानंतर तिथे कशा प्रकारची वैद्यकीय व्यवस्था असेल हा एक मोठा प्रश्न असतो. भारतातल्या शहरात जशा गल्लोगल्ली डॉक्टरांच्या नांवाच्या पाट्या दिसतात तशा तिकडे नसतात. गरज पडल्य़ास डॉक्टर शोधावा लागतो. औषधांच्या दुकानात प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध मिळत नाही एवढेच नव्हे तर औषध देतांना तो प्रिस्क्रिप्शनचा कागद केमिस्ट आपल्याकडे ठेऊन घेतो. एकदा औषध घेऊन झाल्यावर पुन्हा तोच कागद दाखवून तेच औषध दुस-यांदा घेता येत नाही. भारतातल्या डॉक्टरांनी दिलेला प्रिस्क्रिप्शनचा कागद तिकडचे केमिस्ट मानत नाहीत, त्यांना तिथल्या डॉक्टरांवरच भरवसा वाटतो. वगैरे बरेच कांही ऐकले होते तसेच पूर्वी अनुभवले होते. त्याशिवाय अमेरिकेत मेडिकल इन्शुअरन्स घेणे अत्यावश्यक आहे. यामुळे त्याची व्यवस्था करावी लागलीच, त्याशिवाय आपल्याला नेहमी लागणारी किंवा लागू पडणारी एलोपाथिक, आयुर्वेदिक, होमिओपाथिक, घरगुती वगैरे झाडून सगळ्या औषधांची यादी बनवली आणि ती थोडी थोडी आणून बांधून घेतली.

अशी सगळी तयारी करता करता प्रयाणाचा दिवस उजाडला, घरातली उरलेली निरवानिरव केली, सामान उचलून विमानतळावर पोचलो. चेक इन, इमिग्रेशन, सिक्यूरिटी चेक वगैरे सारे सोपस्कार पार पडल्यानंतर आता या वेळी आपण नक्की अमेरिकेला जाणार अशी संपूर्ण खात्री झाली. नियोजित वेळी आमच्या जंबोजेटने उत्तरेच्या दिशेने आभाळात झेप घेतली.

No comments: