Saturday, December 19, 2020

क्रिकेटचे कसोटी सामने

 अलीकडेच मी खूप दिवसांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला कसोटी सामना पाहिला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने फार चांगली कामगिरी केली नसली तरी अगदी वाईटही केली नव्हती. त्यामुळे मनात संमिश्र भाव होते. दुसरे दिवशी  त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला एका दिवसात गुंडाळून कमाल केली आणि मी खूपच आनंदात होतो, पण तिसरे दिवशी मात्र अगदी अनपेक्षितपणे त्यांची लाजिरवाणी घसरगुंडी होऊन नामुश्कीची हार झाली. त्यामुळे आता पुढील सामन्यात ते काय दिवे लावणार आहेत ते पहायचे आहे. पण याआधी झालेल्या एक दिवसांच्या सामन्यांमध्ये हारल्यानंतर त्यांनी ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे ते कसोटी सामनेही कदाचित जिंकण्याची आशाही आहे. या सामन्याच्या निमित्याने माझ्या साठसत्तर वर्षांपूर्वीच्या आठवणींना मात्र थोडा उजाळा मिळाला.

६०-७० वर्षांपूर्वी म्हणजे १९५० ते १९६० च्या दशकात मी आमच्या लहान गावातल्या शाळेत जात होतो. त्या काळात आम्ही मुले बहुतेक वेळ गोट्या, विटीदांडू, लगोरी, शिवाशिवी, लपंडाव असले गावठी खेळच खेळत होतो. शाळेचे मास्तर पीटीच्या वर्गात आम्हाला हुतूतू, खोखो यासारखे काही सांघिक खेळ खेळायला सांगत असत, पण यात क्रिकेटचा समावेश कधीच नसायचा. तसे कधीकधी आम्हीही एकादे फटकूर हातात धरून थोडे चेंडूशी चाळे करत असू, पण त्याला क्रिकेट म्हणता येणार नाही. आमच्या वर्गातल्या एका मुलाला त्याच्या काकाने की मामाने शहरातून नवा कोरा क्रिकेटचा सेट आणून दिला. तेंव्हा त्याने आपली नवी कोरी बॅट, लाल चुटुक चेंडू आणि गुळगुळीत चमकदार स्टंप्स वगैरे सगळ्यांना कौतुकाने दाखवले आणि त्यांना उगीच माती लागून ते मळू नयेत म्हणून कापडात गुंडाळून जपून ठेवले.   

त्या काळात आमच्या दृष्टीने विमानाचा प्रवास ही एक दुर्मिळ गोष्ट होती. माझ्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या आमच्या गावातल्या कुणीही कधीही विमानाने प्रवास केला नव्हता. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावल्यापासून ते मी मॅट्रिक परीक्षा पास होईपर्यंतच्या पन्नास वर्षांच्या काळात आमच्या गावातला एकच माणूस परदेशी जाऊन आला होता आणि तोसुद्धा पुण्याला जाऊन तिथे स्थाईक झाल्यानंतर. आम्ही मुले त्याचे अमाप कौतुक ऐकतच लहानाचे मोठे होत होतो. त्यामुळे हे जे क्रिकेटचे खेळाडू कधी इंग्लंड तर कधी ऑस्ट्र्लेलियाला फिरून येत असत त्यांचा आम्हाला भयंकर हेवा वाटत असे. 

पण या लोकांनासुद्धा ३-४ वर्षात एक परदेशवारी करायला मिळत असे. उरलेल्या वर्षांमध्ये कुठला ना कुठला परदेशी संघ भारताच्या दौऱ्यावर येत असे. बहुतेक वर्षी ते लोक पाच पाच दिवसांचे पाच कसोटी सामने आणि त्यांच्या मध्ये तीन तीन दिवसांचे इतर सामने खेळत, तसेच काही प्रेक्षणीय स्थळे पाहून घेत असत. या कसोटी सामन्यांना वर्तमानपत्रांमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळत असेच, रेडिओवरून त्यांचे धावते समालोचनही (रनिंग कॉमेंटरी) प्रसारित केली जात असे.

त्या काळात आमच्या घरी रेडिओसुद्धा नव्हता, तसेच माझ्या कोणा जवळच्या मित्राच्या घरीही नव्हता. ज्या मित्रांच्या घरी होता त्यांना त्या रेडिओला हात लावू दिला जात नव्हता, पण घरातल्या मोठ्या माणसांनाच जर क्रिकेटची आवड असली तर ते कॉमेंटरी लावत असत आणि ती आमच्या त्या मित्रांच्या कानावर पडत असे. त्यामधून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर ते भाव खाऊन घेत असत.  आमच्या ज्या मित्राला क्रिकेटचा सेट भेट मिळाला होता तोही त्यांच्यातलाच एक होता. आता मात्र आजूबाजूचे सगळे वातावरणच क्रिकेटमय झाल्यामुळे त्यालाही उत्सााह आला. त्याने आपले बॅट, बॉल आणि स्टंप्स बाहेर काढले आणि आम्हा मित्रांना बोलावून घेऊन खेळायला सुरुवात केली.  अर्थातच तोच आमचा तज्ज्ञ असल्यामुळे त्यानेच आम्हाला क्रिकेटचे नियमही सांगितले. पाचसात मुलांमध्ये दोन संघ करणे तर शक्यच नव्हते. त्यामुळे सगळेच जण आळीपाळीने बॅट्समन किंवा बोलर होत आणि बाकीचे फील्डिंग करत. त्यासाठी आम्हीच आमचे वेगळे नियम ठरवीत असू आणि ते पाळत असू.

गावातले काही रिकामटेकडे दुकानदार त्यांच्या दुकानात एक मोठा व्हॉल्ह्वसेटचा रेडिओ शोभेसाठी ठेवत असत आणि त्यावर बातम्या किंवा रेडिओ सिलोनवरील हिंदी सिनेमातली गाणी ऐकत बसलेले असत.  क्रिकेटचा कसोटी सामना चालला असला तर ते त्यावर कॉमेंटरी लावून ठेवत आणि गावातली रिकामटेकडी पोरे दुकानाच्या बाहेर उभी राहून ती ऐकायला गर्दी करत असत. तिथे काय चाललंय ते पाहण्यासाठी मीही कधी कधी त्या घोळक्यात उभा रहात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या त्या देशभक्तीच्या काळात इंग्रजांबरोबर इंग्रजीलाही हद्दपार करण्याचा सगळ्यांनी चंग बांधला असल्यामुळे आम्हाला आठवी इयत्तेत एबीसीडी शिकवली गेली. त्यामुळे त्या भाषेचे ज्ञान तर नव्हतेच, त्या काळातल्या दिव्य रेडिओ प्रसारणातल्या रेडिओ विद्युत लहरी आमच्या त्या  आडगावापर्यंत जेमतेमच पोचत असाव्यात. त्यामुळे येत असलेल्या प्रचंड खरखरीमधून एकाद दुसरा शब्द ऐकू आलाच तर त्याचा अर्थ माहीत नसायचा आणि क्रिकेटच्या परिभाषेमधला त्याचा संदर्भ तर कुणालाच लागायचा नाही. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी अर्थ काढून तारे तोडत असे.

अनेक वेळा हे समालोचन ऐकल्यानंतर निदान कोणता संघ बॅटिंग करत आहे, कोणाकडे बोलिंग आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा किती स्कोअर झाला आहे एवढे तरी बऱ्याच लोकांना समजायला लागले होते. त्यामुळे भारताची बॅटिंग चालली असताांना  रेडिओवर एकदम गलका झाला की आधी लोक कुणीतरी बाउंडरी मारली म्हणून टाळ्या पिटत आणि थोड्या वेळाने दुसऱ्याच बॅट्समनचे नाव कानावर पडल्यावर त्यांच्या लक्षात येई की तो तर आउट होऊन गेला आहे आणि मग त्याला शिव्या घालत. याउलट प्रतिपक्षाची बॅटिंग चालली असतांना त्यांचा खेळाडू आउट झालल्याचे समजताच ते आनंदाने उड्या मारत. अशा मजा मजा चालत असत.

१९५०-६०च्या त्या कालखंडात भारताची टीम कुठलाच कसोटी सामना कधी जिंकतच नव्हती. त्यामुळे तो सामना अनिर्णित ठेवणे हाच मोठा पराक्रम समजला जायचा. अंगावर आलेला चेंडू टकक् टुकुक् करत कसाबसा पुढे ढकलायचा, डोक्यावरून जाणाऱ्या बंपरपासून कसे तरी आपले शिर सलामत ठेवायचे, बाजूने जाणाऱ्या चेंडूला सरळ सोडून द्यायचे आणि बाद न होता पिचवर टिकून रहायचे हा फलंदाजांचा सर्वात मोठा गुण होता अशी समजूत होती. कंटाळा आला तर मध्येच एकादा चेंडू ते जमेल तसा टोलवतही असत. अशा रीतीने संथपणे खेळूनही काही बॅट्समन सेंच्युऱ्या वगैरे काढत असत. त्यांना असे वैयक्तिक उच्चांक करायला संधी मिळावी एवढ्याच उद्देशाने हे सामने खेळले जात असावेत अशी समजूत होती. 

मी कॉलेजला गेल्यानंतरच्या काळात परिस्थिती हळू हळू बदलत गेली आणि आपली भारतीय टीम एकाददुसरा सामना जिंकायला लागली. मी नोकरीला लागल्यानंतरच्या काळात तर ती चक्क मालिकांवर मालिका जिंकायला लागली. मुंबईपुण्याला रेडिओवरील कॉमेंटरी स्पष्ट ऐकायला यायला लागली आणि मलाही इंग्रजी संभाषणाची सवय झाल्याने ती समजायला लागली. प्रत्यक्षात मी कधी मैदानावर उतरलोही नाही, तरीसुद्धा क्रिकेटच्या बाबतीतले माझे सामान्य ज्ञान वाढत गेले आणि बोलिंगमधले गुगली, बाउन्सर किंवा यॉर्कर, बॅटिंगमधले कव्हर ड्राइव्ह, पुल् किंवा स्वीप आणि फील्डिंगमधले मिडऑन, स्लिप किंवा फॉरवर्ड शॉर्ट लेग यासारख्या तांत्रिक शब्दांची त्यात भर पडली. टेलिव्हिजनवर प्रत्यक्ष सामने पहातांना ते सगळे इतके चांगले समजायला लागले की कॉमेंटरीचीसुद्धा फारशी गरज पडायची नाही. कॉमेंटरीतही खूप सुधारणा होत गेल्या आणि त्याही बहुभाषिक बनल्या. या सगळ्यांमुळे माझाही क्रिकेटच्या सामन्यांमधला इंटरेस्ट वाढत गेला आणि इतरांप्रमाणे मीसुद्धा क्रिकेट मॅचेसच्या कॉमेंटरी ऐकण्याचा शौकीन होऊन गेलो. चार लोकांमध्ये बोलतांना क्रिकेट हा विषय नेहमी निघायचाच आणि आपण त्यात अगदीच अनभिज्ञ आहोत असे दिसायला नको असेल तर त्याची माहिती ठेवणे आवश्यक असायचे. 

नंतरच्या काळात आधी ५०-५० षटकांचे आणि नंतर तर फक्त २०-२० षटकांचे सामने खेळायला सुरुवात झाली. त्यात खूप आकर्षक अशी फटकेबाजी आणि कमालीचे क्षेत्ररक्षण कौशल्य पहायला मिळते, तसेच ते कमी वेळात संपून त्यात निकालही लागतात, यामुळे ते लगेच लोकप्रिय झाले आणि पाच पाच दिवस रेंगाळणारे कसोटी सामने कंटाळवाणे वाटायला लागले. पण या इतर सामन्यांची संख्या बेसुमार वाढत गेली. आय पी एल सुरू झाल्यावर कोणत्याही संघात जगभरातले निरनिराळ्या देशातले खेळाडू असल्यामुळे मला तरी कुठलाच संघ आपला वाटायचा नाही. आणि 'आपला' विरुद्ध 'विरोधी' असे दोन पक्ष नसले आणि त्यातले कोण जिंकणार याची उत्सुकताच नसली तर मग तटस्थपणे हे सामने पहायला फारशी मजा येत नाही. शिवाय मॅचफिक्सिंगचे प्रकार सुरू झाल्याने त्या पहाण्यात स्वारस्य उरले नाही.

गेल्या दहा पंधरा वर्षात क्रिकेटचा अतिरेकच नव्हे तर अजीर्ण व्हायला लागले होते. पन्नास साठ वर्षांपूर्वी पॉली उम्रीगरसारख्या एकाद्या फलंदाजाने आयुष्यभरात दोन हजार धावा काढल्या तर तो मोठा विक्रम समजला जायचा, आता एकेका वर्षांत हजारावर धावा काढणेही सामान्य होऊन गेले आहे, कारण हे लोक बाराही महिने खेळतच असतात आणि पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात काढाव्यात तशा भरपूर धावा हे एक दिवसाच्या सामन्यातसुद्धा दणादण काढत राहतात. अतिपरिचयात अवज्ञा या नियमाप्रमाणे मी आजकाल त्या सामन्यांची दखल घेणे सोडूनच दिले होते. कोविडमुळे मध्ये बराच काळ खंड पडल्यानंतर आता पुन्हा त्यात थोडा रस घ्यायला सुरुवात केली आणि बऱ्याच काळानंतर एक कसोटी सामना पाहिला.

. . . . . 

ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जात असलेल्या या मालिकेतला पहिला सामना पाहिल्यानंतर मी हा लेख लिहिला होता. त्या सामन्यात भारतीय संघ चारी मुंड्या चीत झाला असला तरी तो पुन्हा आपले डोके वर काढेल अशीआशा मी बाळगली होती. त्याप्रमाणे दुसऱ्याच सामन्यात नवा कप्तान झालेल्या अजिंक्य रहाणे याने दमदार फलंदाजी करून शतक झळकावले, इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली आणि गोलंदाजांनीही ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोनदा बाद करून भारताला विजय मिळवून दिला आणि साखळीत बरोबरी गाठली.

 तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर रचला होता आणि भारताची सुरुवातही बरी झाली नव्हती, पण नंतर आलेल्या खेळाडूंनी घसरगुंडी होऊ न देता जरा सन्माननीय अशी धावसंख्या काढली तरी ती ऑस्ट्रेलियाच्या मानाने खूप कमीच होती. मग ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात आणखी धावा काढून त्यांचा डाव घोषित केला. आपले गोलंदाज त्यांच्या पूर्ण संघाला बाद करू शकले नाहीत. अशा प्रकारे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या मुठीतच होता. भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी बरी झाली नाहीच. हा सामना जिंकण्याची सुतराम शक्यता नव्हती, शक्य तितका वेळ मैदानावर टिकून राहणे एवढ्याच उद्देशाने खेळणे चालले होते, तरीही सर्व मुख्य फलंदाज बाद होऊन गोलंदाज शिल्लक उरले होते आणि त्यांना गुंडाळायला ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला फार वेळ लागणार नाही अशी लक्षणे दिसत होती. त्यावेळी क्रीजवर असलेला हनुमाविहारी याला मुद्दाम कसोटी सामन्यासाठी पाठवले असले तरी तो आतापर्यंत फेल गेला होता आणि या सामन्यातही जायबंदी झाला होता.  तो लंगडत लंगडत कसाबसा चालत होता. त्याच्या जोडीला असलेला अश्विन हा खरे तर गोलंदाज म्हणून संघात आलेला पण फलंदाजीत प्रवीण झालेला होता.  ऑस्ट्रेलियाच्या जलदगति गोलंदाजांनी तुफान भेदक मारा चालवला होता, त्यांचे उसळते चेंडू फलंदाजांची अंगे सुजवून काढत होते. तरीही या दोघांनी कमालीच्या धैर्याने आणि जिद्दीने तो मार सहन करत डोके शांत ठेऊन दीड दोन तास खिंड लढवली आणि ते अखेरपर्यंत नाबाद राहिले. हा सामना अनिर्णित राहिलेला पाहूनच केवढा आनंद झाला. पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या काळाची आठवण झाली.

चौथा कसोटी सामना सुरू झाला तेंव्हा संघातले चारपाच खेळाडू जखमी होते. बूमरा आणि शमी हे आपले दोन्ही आघाडीचे जलदगति गोलंदाज खेळू शकणार नव्हते, तसेच तिसऱ्या सामन्यातला हीरो विहारीही नव्हता. मुख्य फलंदाज कप्तान विराट कोहली तर आधीच भारतात परत आला होता, आघाडीचा फलंदाज धवनही नव्हता. त्यामुळे राखीव म्हणून नेलेल्या तरुण होतकरू खेळाडूंना घेऊन आपला संघ मैदानावर उतरला होता. या संघाकडून कुणीही फार अपेक्षा ठेवल्याच नव्हत्या. अजून जास्त लाज न घालवता हा दौरा कसाबसा पूर्ण करायला हवा म्हणून ते बचावाचा खेळ खेळतील असे वाटले होते आणि खेळाची सुरुवातही तशीच झाली. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या संघाने धावांचा डोंगर उभा केला. आपल्या आघाडीच्या फलंदाजांनी हळू हळू धावा जमवत फॉलो ऑनची नामुष्की टाळली तेंव्हा पहिला सुस्कारा सोडला. तरी तोवर अर्धा संघ गारद झाला होताच. पण त्यानंतर आलेल्या शार्दूल ठाकूर आणि सुंदर यासारख्या नवख्या खेळाडूंनी भलत्याच चिकाटीने खेळून तीनशेचा टप्पा पार केला आणि पहिल्या डावातील धावसंख्यांमधला फरक अगदी मामूली ठेवला. तरीही ऑस्ट्रेलियाच पुढे राहिली होती आणि चांगल्या परिस्थितीत होती. दुसऱ्या डावात मात्र आपल्या नव्या गोलंदाजांनी जीव ओतून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या खेळाला आळा घातला आणि त्यांचे सर्व खेळाडू बाद केले. आताही सामना जिंकण्यासाठी भारताला दुसऱ्या डावात तीनशेवर धावा करण्याचे मोठे आव्हान होते. यापूर्वीच्या सामन्यांमध्ये भारताने तेवढी मजल मारली नव्हती. ब्रिस्बेनचे हे मैदान ऑस्ट्रेलियाला नेहमी यशस्वी करत आले होते आणि तिथे त्यांचाच विजय अपेक्षित होता.  त्यात आपला भरोशाचा रोहित शर्मा लवकर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या पुजाराने कमालीचा बचाव केला. तो स्टंप्सवर येणारे सगळे चेंडू फक्त अडवत आणि न येणारे चेंडू सोडून देत राहिला, फटके मारून रन्स काढण्याचा प्रयत्नच करत नव्हता. दुसऱ्या बाजूने शुभमन गिल बऱ्यापैकी चांगला खेळून स्कोअर वाढवत होता, पण नव्वदीत आल्यावर तो बाद झाला. नंतर आलेल्या फलंदाजांनीही संथ धोरणच चालू ठेवले होते. तिसऱ्या कसोटीप्रमाणेच हा सामनाही अनिर्णित ठेवण्यात यश मिळेल असा विश्वास वाटयला लागला होता. 

महेंद्रसिंग धोनी निवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी यष्टीरक्षक म्हणून संघात आलेला ऋषभ पंत खेळायला आला आणि त्याने धुवाँधार फलंदाजी करून सगळे चित्र बदलून टाकले. वीस षटकांच्या सामन्यातले फटके मारून चौकार षटकांची आतिशबाजी सुरू केली. विजय नजरेच्या टप्प्यात आल्यानंतर तो मिळवण्यासाठी सुरू केलेल्या घाईत समोरचे दोन तीन फलंदाज बाद झाले, तरी ऋषभने वेळ संपायच्या आत आवश्यक तेवढ्या दावा काढून विजयश्री खेचून आणली तेंव्हा सगळे हक्केबक्के होऊन गेले. सामन्याच्या अगदी शेवटच्या तासात मिळालेल्या या अनपेक्षित विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या क्षेत्रात नवा इतिहास घडला असे म्हणता येईल. या निमित्याने पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमी लोकांचे लक्ष कसोटी सामन्यांकडे वळले.       

 

Wednesday, December 02, 2020

तेथे कर माझे जुळती -२० : डॉ.अनिल काकोडकर

 

 "माझ्या आयुष्यात मला भेटलेल्या ज्या मोठ्या लोकांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या मालिकेत मी दोन शब्द लिहायचे ठरवले आहे. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल काही ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही आणि माझा तसा उद्देशही नाही. "माझी या थोरांबरोबर ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. मी फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी या निमित्याने मांडणार आहे." असे मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेच्या पहिल्याच भागात स्पष्ट केले होते. आज मी अशाच एका महान आणि प्रसिद्ध अशा व्यक्तीबद्दलच्या माझ्या वैयक्तिक आठवणी या लेखात लिहिणार आहे. त्यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेतच, त्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल मी आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे माझ्या कुवतीबाहेर आहे. 

मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून पास होताच माझी अणुशक्तीखात्यात निवड झाली आणि मी त्यांच्या ट्रेनिंगस्कूलमध्ये दाखल झालो. हे वर्षभराचे प्रशिक्षण पोस्टग्रॅज्युएशन करण्यासारखे होते. तेंव्हा आम्हाला  क्लासरूममध्ये निरनिराळे अनेक विषय शिकवले गेले.  मात्र ते शिकवणारे बहुतेक सर्वजण अणुशक्तीखात्यात आधीच काम करत असलेले वरिष्ठ शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ होते. आमच्या बॅचमध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांमधून आलेले निरनिराळ्या भाषा बोलणारे ट्रेनीज होते आणि अशा सर्वांबरोबर राहून एकमेकांना समजून घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. आम्हाला शिकवायला येणाऱ्यांमध्येही तामीळ, तेलुगु, बंगाली, पंजाबी वगैरे वेगवेगळ्या भाषा बोलणारे तज्ज्ञ होते, त्यात एकादा मराठी गुरु भेटला तर आम्हा मराठी मुलांना मोठा आनंद होत असे.

काही आठवडे गेल्यावर एके दिवशी एक साधारणपणे आमच्याच वयोगटातले तरुण प्राध्यापक आम्हाला लेक्चर द्यायला आले. त्यांना पाहून वर्गातल्या मुलांना आधी जरासे आश्चर्य वाटले, पण कुशाग्र बुद्धीमत्ता, अपार ज्ञान आणि दांडगा आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी आपल्या पहिल्याच व्याख्यानात सर्वांवर गडद छाप पाडली आणि सर्वांची मने जिंकून घेतली. या उमद्या सरांचे नाव "अनिल काकोडकर" आहे असे समजल्यावर तर आमचा आनंद गगनात मावेना.  ते व्हीजेटीआय या त्या काळातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियरिंग कॉलेजचे टॉपर होतेच, बीएआरसी ट्रेनिंगस्कूलच्या त्यांच्या बॅचचेही टॉपर होते.  'अणुशक्तीकेंद्रांमधली यंत्रसामुग्री' हा त्यांचा विषय नाविन्यपूर्ण होता आणि त्यांनी तो अत्यंत मनोरंजक पद्धतीने चांगला समजाऊन सांगितला. त्यांनी दिलेल्या नोट्स पाहून तर आम्ही चकीतच झालो. १९६६ सालच्या त्या काळात फोटोकॉपीइंगचे तंत्र  भारतातल्या बाजारात अजून आलेही नव्हते. तोपर्यंत मी तरी झेरॉक्स केलेला एक कागदसुद्धा पाहिला नव्हता किंवा असे काही तंत्रज्ञान अस्तित्वात आहे हेदेखील मी ऐकले नव्हते. बाकीचे सगळे लेक्चरर सायक्लोस्टाईल केलेले करड्या रंगाचे खरखरीत कागद वाटत होते. त्यामुळे काकोडकरांनी दिलेल्या पांढऱ्याशुभ्र आणि गुळगुळीत कागदांवर सुबक अक्षरांमध्ये छापलेल्या सचित्र नोट्स पाहून सर्वांनाच त्याचे मोठे अप्रूप वाटले.  बीएआरसीसारख्या उच्च दर्जाच्या संशोधन संस्थेत झेरॉक्सचे एकादे यंत्र आणले गेले असेल आणि तिथेही अगदी निवडक लोकांनाच ते उपलब्ध होत असेल.   

आमचे क्लासरूममधले शिक्षण संपत आल्यावर आम्हाला दोन तीन आठवडे बीएआरसीमध्ये प्रात्यक्षिकांसाठी पाठवले गेले. त्यात आम्हा पाचसहा जणांच्या ग्रुपला रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये पाठवले.  अनिल काकोडकर तिथेच कार्यरत होते आणि सगळ्या इतर सीनियर अधिकाऱ्यांच्या तुलनेत ते नवीन असले तरी त्यांच्याकडे खूप महत्वाची स्वतंत्र कामगिरी दिलेली होती. पण त्यांनी त्यातून वेळ काढून आम्हाला त्या प्रयोगशाळेत होत असलेल्या कामांची माहिती समजाऊन सांगितली. तो कारखाना नसल्यामुळे तिथे सतत चातत राहणारी अशी रूटीन प्रकारची कामे नव्हतीच आणि  चार दिवसांसाठी आलेली आम्ही नवखी मुले संशोधनाच्या गुंतागुंतीच्या कामात फारसा काही हातभार लावू शकणार नव्हतो. त्यामुळे एकदा सगळी प्रयोगशाळा पाहून झाल्यानंतर आम्ही लायब्ररीत बसून पुस्तके वाचणे आणि गप्पाटप्पांमध्ये आपला बराचसा वेळ घालवत होतो.   

एकदा आम्ही तीनचार मराठी मित्र चहापान करत असतांना अनिल काकोडकरही तिथे आले आणि मोकळेपणे आमच्या वार्तालापात सामील झाले. आम्हाला त्यांच्याबद्दल कुतूहल तर होतेच. आमच्यातल्या एका आगाऊ मुलाने विचारले, "का हो, ते चंद्रकांत काकोडकर तुमचे कोणी नातेवाईक आहेत का?" त्या काळात त्यांच्या पॉकेटबुकमधल्या सवंग कादंबऱ्या खूप खपत असत. काकोडकरांनी हसत हसत म्हंटले, "नाही, ते फक्त आडनावबंधू आहेत." मग दुसऱ्या कुणीतरी म्हणाले, "आणखी एक काकोडकर प्रसिद्ध आहेत, पुरुषोत्तम काकोडकर." त्यांचा गोव्याच्या मुक्तीसंग्रामात मोठा सहभाग होता आणि ते तिथले एक प्रमुख राजकीय पुढारी असल्यामुळे त्यांचे नाव वर्तमानपत्रात नेहमी येत असे. अनिल काकोडकरांनी अत्यंत शांतपणे सांगितले, "ते माझे वडील आहेत." हे उत्तर ऐकल्यावर तर आम्ही सगळे हादरलोच, कारण आमच्यातल्या कुणाचाच कुठल्याही राजकीय पु़ढाऱ्याशी दुरूनही कधीच संबंध आला नव्हता. त्यानंतर त्यांना आणखी काही खोदून विचारायची हिंमत कुणालाच झाली नाही आणि त्यांनीही आम्हाला आपल्या प्रसिद्ध वडिलांबद्दल एक अक्षरही जास्त काही सांगितले नाही.

ट्रेनिंग संपल्यावर मी वेगळ्या ऑफीसात कामावर रुजू झालो, अनिल काको़डकर उच्च शिक्षणासाठी परदेशी गेल्याचे माझ्या कानावर आले. ते परत आल्यानंतर त्यांच्या प्रगतिविषयीच्या बातम्या अधून मधून येत होत्या, पण आमचा थेट संपर्क नव्हता. अनेक वर्षांनंतर मला अणुशक्तीनगरमध्ये रहायला जागा मिळाली आणि अनिल काकोडकरही आमच्या भागातल्या दुसऱ्या इमारतीत रहायला आले. आमचे काही समाईक मित्रही झाले आणि त्यांच्यामार्फत आमची पुन्हा नव्याने ओळख झाली. कधी कधी आम्ही बाजारात, दुकानांमध्ये किंवा रस्त्यावरून हिंडत असतांना ते समोर दिसायचे आणि  नमस्कार, हॅलो करत करत आमची ओळख हळूहळू वाढत गेली.  पीपीईडीमधल्या माझ्या ऑफीसमध्ये मी फ्यूएल हँडलिंग सेक्शनमध्ये काम करत होतो आणि  बीएआरसीमध्ये या विषयावरही  संशोधन होत असते.  त्यामुळे माझे त्यानिमित्य तिथे जाणेयेणे होत होते. बीएआरसीमधला संबंधित विभाग कालांतराने काकोडकरांच्या हाताखाली आला आणि कामानिमित्य  माझीही कधी कधी त्यांच्याशी भेट व्हायला लागली. बीएआरसीमध्ये होत असलेल्या सेमिनार्स, सिंपोजियम्स वगैरे कार्यक्रमांमध्ये अनिल काकोडकरांचा महत्वाचा सहभाग असायचा आणि त्यात ते प्रामुख्याने दिसायचे, तसेच त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे ऐकायची संधी मला मिळत असे. अशा अनेक प्रकारे ते नेहमीच डोळ्यासमोर असायचे.

अणुशक्तीखात्यामधील शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स यांना बढती मिळण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावे लागतात. त्यांनी केलेले काम आणि मिळवलेले ज्ञान तसेच अनुभव वगैरे गोष्टींची यात जरा कसून तपासणी करून योग्य व्यक्तींची पारख केली जाते. अनिल काकोडकर असे इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका कमिटीचे वर्षानुवर्षे अध्यक्ष होते.  त्या काळात काही वेळा मलाही त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. तेंव्हा ते प्रत्येक कँडिडेटला जशा प्रकारचे प्रश्न विचारायचे त्यावरून मला दिसले की इंजिनियरिंगच्या सगळ्या ब्रँचेसमधल्या सगळ्या विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होतेच, तसेच अणुशक्तीखात्याच्या भारतात अनेक ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काय काय काम चालत होते, कोणत्या बाबतीत नेत्रदीपक प्रगति होत होती, कुठे कोणत्या अडचणी येत होत्या वगैरेंची खडान खडा माहिती त्यांना होती.  त्यांच्या आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीला सीमा नव्हती.  पुढे जाऊन या खात्याचे प्रमुख व्हायची तयारी त्यांनी खूप वर्षे आधीपासून केली होती.

एकदा मी पीपीईडी आणि बीएआरसीमधल्या काही सहकाऱ्यांबरोबर एका सेमिनारसाठी रावतभाट्याला गेलो होतो. रात्रीची जेवणे झाल्यानंतर माझे वरिष्ठ (बॉस) आणि एक कनिष्ठ सहकारी यांच्याबरोबर मी तिथल्या वर्कशॉपमध्ये गेलो. अनिल काकोडकरही वेगळ्या जीपमधून तिथे आले. तिथे एक नवीन उपकरण तयार करण्याचे काम चालले होते. ते पाहून परत येतांना काकोडकरांनी मला त्यांच्या गाडीत बसवून घेतले. या उपकरणाच्या बाबतीत त्यांचे माझ्या बॉसशी काही मतभेद आहेत हे मला माहीत नव्हते आणि माझा त्या उपकरणाशी काहीच प्रत्यक्ष संबंध नव्हता हे काकोडकरांना माहीत नसावे. मी त्यांना निव्वळ ऐकीव माहितीवरून काही तरी थातुरमातुर सांगत होतो ते त्यांना पटत नव्हते किंवा मी काही लपवाछपवी करतोय असा त्यांचा ग्रह झाला असावा. त्यामुळे मी ही गोंधळून गेलो होतो आणि तो संवाद सुरळीत होत नव्हता. माझ्या बोलण्यात अनवधानाने काही चूक झाली म्हणा किंवा त्याचा जो अर्थ त्यांनी घेतला तो मला अभिप्रेत नव्हता असे काहीतरी झाले आणि ते माझ्यावर नाराज झाले हे मला जाणवले. दुसऱ्याच्या मनातले ओळखून त्याला रुचेल असे पण आपल्या लाभाचे कसे बोलावे ही कला ज्यांना अवगत असते ते लोक नेहमी यशस्वी होतात, पण माझ्याकडे ती कला नाही म्हणून मी माझ्या ऑफिसातल्या वरिष्ठांशीसुद्धा जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता. इथे काकोडकर तर परके होते आणि त्या वेळी ते अजून खूप उच्च पदावर पोचले नव्हते. पण त्यांच्या गुडबुक्समध्ये जाण्याची एक आयती मिळालेली संधी मी वाया घालवली याची रुखरुख मात्र माझ्या मनात राहिली.

आणखी एकदा मला शनिवारी का रविवारी फोर्टमध्ये काही कामासाठी जायचे होते म्हणून मी अणुशक्तीनगरच्या  बसस्टॉपवर गेलो. योगायोगाने तिथे अनिल काकोडकरही आले आणि आम्ही शेजारी बसून चर्चगेटपर्यत प्रवास केला आणि खूप गप्पा मारल्या. त्यांनी स्वतःची कार घेतली नव्हती कारण कॉलनीमधले इतर अधिकारी रोज उठून जी 'कारसेवा' करतांना दिसायचे ते करणे त्यांना मंजूर नव्हते असे त्यांनीच मला सांगितले. खरे तर काकोडकरांच्या त्या वेळी असलेल्या हुद्द्याप्रमाणे त्यांच्याकडे ऑफिसची गाडी होती, पण ती ऑफिसच्या कामासाठीच वापरायची हा तत्वनिष्ठ दंडक ते पाळत होते. त्या दिवशी तेही कदाचित व्यक्तिगत कामासाठी बाहेर पडले होते, म्हणून त्यांनी बीईएसटी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्या सुविद्य पत्नींनासुद्धा मी बसने जातायेतांना पाहिले होते.  त्या दिवशी झालेल्या बोलण्यात त्यांनी माझ्या ज्ञानामध्ये भरपूर भर घातलीच, त्यांच्या भविष्यकाळातल्या काही योजना आणि स्वप्ने यांचीही थोडीशी चुणूक दाखवली. पुढे मोठ्या पदावर गेल्यानंतर त्यांनी त्यातल्या काही गोष्टी अंमलात आणल्यासुद्धा. 

त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर बीएआरसीमध्ये फास्टट्रॅकवर प्रमोशन्स मिळवली तसेच भराभर एक एक पायरी चढत ते बीएआरसीचे डायरेक्टर झाले.  त्यानंतर ते लवकरच अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष या सर्वोच्च पदावर जाऊन पोचले आणि बरीच वर्षे त्या पदावर राहिले. पोखरण येथे झालेल्या पहिल्या परीक्षणामध्येही त्यांचा सहभाग होता असे नंतर कानावर आले होते, पण तेंव्हा त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. तिथल्या दुसऱ्या परीक्षणाच्या वेळी मात्र अब्दुलकलामांच्याबरोबर काकोडकरांचेही फोटो नियतकालिकांमध्ये छापून आले. त्यांना सरकारकडून सर्वोच्च पातळीचे सुरक्षाकवच देण्यात आले आणि ते अणुशक्तीनगर सोडून मलबार हिलवरील जास्त सुरक्षित जागेत रहायला गेले. त्यामुळे आम्हाला त्यांचे पूर्वीप्रमाणे सहज जाता येता भेटणे बंद झाले.  मीही हळूहळू थोड्या वरच्या पदावर गेल्यामुळे ऑफीसच्या कामासाठी किंवा एकाद्या मीटिंगवगैरेसाठी माझे त्यांच्या ऑफिसात जाणे होत राहिले, पण ते भेटणे वेळेअभावी  बहुतेक वेळा फक्त औपचारिक स्वरूपाचेच असायचे. 

अनिल काकोडकर उच्च पदावर गेल्यानंतरही त्यांनी सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा परिपाठ कायम ठेवला होता. माझ्या मुलांच्या लग्नांच्या स्वागतसमारंभाला ते आवर्जून आले होते, तसेच त्यांच्या मुलीच्या विवाहसमारंभाला आम्ही भुलाभाई देसाई रोडवरील आवारात गेलो होतो. तेंव्हा आमच्यात चार शब्द बोलणेही झाले होते.  नंतर आम्हाला असे समजले की अनिल काकोडकर त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईबरोबर मध्यप्रदेशातील ज्या गावी रहात होते त्याच गावात माझ्या सुनेच्या आईचे लहानपण गेले होते आणि त्या काकोडकर कुटुंबाला अगदी जवळून ओळखत होत्या. यामुळे आमच्यातल्या स्नेहसंबंधाला आणखी एक धागा जोडला गेला.

मी सेवानिवृत्त झाल्यानंतर माझा माझ्या ऑफीसशी काहीच संबंध राहिला नाही. अनिल काकोडकर वयाने माझ्यापेक्षा मोठे असले तरी त्यांना एक्स्टेन्शन्स मिळत जाऊन ते आणखी काही वर्षे आपल्या पदावर कार्यरत होते, पण आता त्यांना भेटण्याची संधी मला मिळत नव्हती. त्यानंतर दोनदाच आमची भेट झाली ती दोन पुस्तकांच्या प्रकाशनांच्या निमित्याने. अनिल काकोडकरांच्या मातोश्री श्रीमती कमलाताई काकोडकर यांच्या समर्पित जीवनावर आधारलेला 'एक धागा सुताचा' या नावाचा आत्मचरित्राच्या रूपाचा ग्रंथ प्रकाशित झाला. त्या कार्यक्रमाचे आमंत्रण मला मिळाले आणि मी त्याला हजेरी लावली. त्यावेळी उपस्थित असलेल्या मंडळींमध्ये निरनिराळ्या क्षेत्रांमधली अनेक मोठमोठी माणसे आली होती आणि स्वतःच्या आईचाच कार्यक्रम असल्यामुळे अनिल काकोडकर तर ठळकपणे उपस्थित होतेच. 

त्यानंतर आमच्या डॉक्टर अंजली कुलकर्णी आणि त्यांच्या सुविद्य भगिनी डॉ. अनुराधा हरकरे यांनी मिळून 'फुलाला सुगंध मातीचा' या नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले.  यात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये शिखरावर जाऊन पोचलेल्या पाच प्रसिध्द व्यक्तींच्या जडणघडणीवर त्यांच्या मातापित्यांचा, विशेषतः त्यांच्या आईचा किती प्रभाव पडला होता हे या पुस्तकात त्यांनी दाखवून दिले आहे. यासाठी त्यांनी या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि या मुलाखतींमधून त्यांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्व दिसून येते. या पुस्तकातला पहिलाच लेख स्व.कमलाताई आणि डॉ.अनिल काकोडकर यांच्यावर आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनसोहळ्यालाही मी उपस्थित राहिलो होतो. तिथेही माझी अनिल काकोडरांशी भेट झाली. या दोन्ही भेटी अर्थातच क्षणिक होत्या, पण तेवढ्यातही त्यांनी दाखवलेली ओळख आणि आपुलकी मला चांगली जाणवली.

अणुशक्ती आयोगाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरसुद्धा अनिल काकोडकर प्रकाशाच्या झोतातच राहिले आहेत. ते आता शिक्षण, संरक्षण, आरोग्य यासारख्या देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विविध विषयांशी संबंधित असलेल्या अनेक संस्थांचे काम निरनिराळ्या पातळ्यांवरून पहात आहेत. त्यामुळे अचानक कधी तरी त्यांचे टी व्ही वर दर्शन घडते आणि हे महापुरुष आपल्या ओळखीचे आहेत या भावनेने माझा ऊर भरून येतो. त्यांना तर जगभरातले लक्षावधी लोक ओळखत असतील, पण ते मला ओळखतात याचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि म्हणावेसे वाटते, "दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती."