Saturday, January 31, 2009

चन्द्रयान ( भाग ५) - पूर्वतयारी

मानवनिर्मित वस्तू अंतरिक्षात पाठवण्याच्या तयारीला दुस-या महायुध्दानंतर अकल्पित असा वेग
आला. रशिया आणि अमेरिका हे देश या बाबतीत अग्रगण्य होते. त्या दोन्ही देशांनी अवकाशात
जाऊन पोचणारी वेगवान आणि शक्तीशाली रॉकेट्स पाठवली, त्यानंतर स्पुटनिक, एक्स्प्लोअरर आदि
उपग्रह अंतरीक्षात सोडले आणि कांही वर्षांनी युरी गागारिन, अॅलन शेपर्ड वगैरे अंतराळवीर पृथ्वीच्या
वातावरणाच्या बाहेर दूरवर फेरफटका मारून परत आले. ही शर्यत चालतच राहिली आणि ब्रिटन, फ्रान्स, चीन, जपान यासारखे कांही इतर देश त्यात सामील झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यानेही विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला अग्रक्रम दिला आणि त्यात अंतरिक्षाच्या अभ्यासाला महत्वाचे स्थान दिले. अंतराळासंबंधीचे तंत्रज्ञान त्या काळात विकसित देशांमध्येसुध्दा ज्ञान व अज्ञान यांच्या सीमेवरचे असे (फ्राँटियर टेक्लॉलॉजी) मानले जात होते. अर्थातच ते गोपनीय स्वरूपाचे होते. आज गूगलच्या शोधयंत्रावरून आपल्याला या विषयावरील लाखो लेख किंवा शोधनिबंध सापडतील पण पूर्वी सगळी माहिती गुप्त असायची. अंतराळात पाठवण्यासाठी कशा प्रकारची उपकरणे किंवा यंत्रसामुग्री लागेल, ती कोणत्या धातूंपासून किंवा अधातूंपासून तयार करता येईल, जमीन, हवा, पाणी या महाभूतातून ते पदार्थ कसे उत्पन्न करता येतील, त्यासाठी कोणत्या प्रक्रियांचा उपयोग करावा लागेल आणि कोणत्या यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल हे सगळे गूढ असायचे.

साबूदाण्याची खिचडी किंवा कांद्याची भजी करण्यासाठी लागणारे साहित्य, उपकरणे आणि कृती पाकशास्त्रावरील छापील पुस्तकांत वाचायला मिळते. तरीसुध्दा त्याला चंव येण्यासाठी पाककौशल्य लागते. परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने स्कूटर्स, शिलाईयंत्रे वगैरे निर्माण करण्याचे कारखाने तेंव्हा भारतात निघाले होते. त्यातले अगदी खिळेमोळे आणि ते ठोकण्याचे हातोडे यासकट त्यासाठी लागणारे सगळे साहित्य आणि ते जुळवण्याची कृती त्यांच्या कोलॅबोरेटर्सकडून आयात होत असे. पण त्या काळात अणुभट्ट्या, अग्निबाण आणि उपग्रह वगैरे खास गोष्टी मात्र अशा पध्दतीने मिळत नसत. त्यातली थोडी मोघम माहिती हाताला लागली तरी त्या वस्तू कशा मिळवायच्या, त्या कोठे उपलब्ध असतील हा प्रश्न असायचाच. जगभरातल्या बाजारपेठांमध्ये त्याचा तपास केला जात असे. मोटारी, कापड, औषधे वगैरे ग्राहकांच्या उपयोगाच्या असंख्य वस्तू तयार करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आणि साहित्य लागत असे ते तरी निदान परदेशी बाजारपेठेत मिळायचे. त्यांचाच वेगळ्या प्रकाराने उपयोग करून घेऊन आपल्याला हवा तो परिणाम साधता येईल कां याचा विचार केला जात असे. याच्या उलट अवकाशातल्या उपयोगासाठी आधी मुद्दाम बनवून घेतलेले कांही खास पदार्थ आणि उपकरणे सर्वसामान्य ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीसाठी कालांतराने सर्वांना उपलब्ध होत असत. त्यांचा चांगल्या प्रकाराने वापर करून घेता येत असे. पण आपल्याला हव्या असलेल्या सगळ्या वस्तू राजकीय कारणांमुळे आयात करता येत नाहीत. त्यांचा पर्याय देशातच शोधावा लागतो. मूलभूत संशोधन, पुस्तकी ज्ञान आणि प्रसिध्द झालेली माहिती यावरून कांही तर्क बांधायचे, एकमेकांशी चर्चा, विचारविनिमय करून अंदाजाने कांही प्रयोग करून पहायचे आणि त्या आधारावर पुढे जायचे अशा पध्दतीने हे संशोधन चालायचे. अशा रीतीने नवनवे प्रयोग करीत आणि अडचणीतून मार्ग काढीत भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी या तंत्रज्ञानाचा विकास करून वेगवेगळ्या प्रकारची रॉकेट्स तयार केली. या काळात आपल्या देशातल्या यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली तिचा ही फायदा मिळाला.

सर्वसामान्य यंत्रसामुग्री आणि अवकाशात पाठवायचे अग्निबाण किंवा उपग्रह बनवणे यातील दोन महत्वाचे फरक पुढे दिलेल्या सोप्या उदाहरणाने स्पष्ट होतील. स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर तयार करायचा असेल तर त्यात किती अन्न शिजवायचे यावरून त्याचा आकार ठरतो, गॅसच्या ज्वालेचे तपमान आणि वाफेचा दाब लक्षात घेऊन त्याचे भांडे कोणत्या धातूचे बनवायचे ते ठरते. एक सोपे गणित मांडून त्याची जाडी ठरवता येते. पण यातल्या अनेक बाबी अनिश्चित असतात. गॅसच्या शेगडीतल्या ज्वालेचे जास्तीत जास्त तपमान नक्की किती अंश असू शकेल ते माहीत नसते आणि वाफेचा दाब मर्यादित ठेवण्यासाठी शिट्टी, व्हॉल्व्ह वगैरे असले तरी तो उडेपर्यंत आतल्या वाफेचा दाब नक्की किती पास्कलपर्यंत वाढत जाईल हे सांगता येत नाही. कुकरच्या खाली खूप ऊष्ण ज्वाला आणि आंत थंडगार पाणी या परिस्थितीमुळे त्याच्या तपमानात जो असमतोल असतो त्याचा विपरीत परिणाम होतो, वापर करतांना त्याची झीज होते, घासतांना त्यावर चरे पडतात, आपटल्याने त्याला पोचे येतात वगैरे कारणांनी त्याची सहनशक्ती कमी होते. अखेर तो अगदी फुटला जरी नाही, नुसता थोडा वाकडा तिकडा झाला तरी त्याचे झांकण लागत नाही, त्यामुळे तो निकामी होतो. अशा कल्पना करता येण्यासारख्या तसेच तिच्या पलीकडच्या अनेक गोष्टींचा विचार करून तो बनवतांना त्याची जाडी सरळ पाच ते दहा पटीने वाढवली जाते. याला 'फॅक्टर ऑफ सेफ्टी' असे नांव आहे. आत शिजवण्याच्या पदार्थांच्यासह त्या कुकरचे वजन सामान्य माणसाला सहजपणे उचलता येते त्यामुळे त्याला फारसा फरक पडत नाही. पण विमान किंवा उपग्रहाचे वजन कमीत कमी ठेवणे अत्यावश्यक असल्यामुळे असा सढळपणा त्यांत चालत नाही. त्या साधनांचा उपयोग कोणत्या परिस्थितीत करायचा आहे हे नेमके ठरलेले असल्यामुळे त्यातल्या प्रत्येक बाबीची कसून चौकशी करून आणि अनेक प्रयोगाद्वारे अथपासून इतीपर्यंत समग्र माहिती मिळवली जाते व तिचे संपूर्ण विश्लेषण केले जाते. जितक्या प्रमाणात त्यातील अनिश्चितता कमी होते तितकी कमी फॅक्टर ऑफ सेफ्टी वापरता येते. वजनाने हलके पण पुरेसे कणखर वा लवचीक असे खास मिश्रधातू निर्माण करून त्यांचा उपयोग आवश्यक किंवा शक्य असेल त्या भागांसाठी केला जातो. त्या भागांची एकच सरधोपट जाडी न ठेवता आवश्यक तिथे जास्त आणि गरज नसेल तिथे ती कमी ठेवली जाते. जे भरीव भाग जास्तच वजनदार असतात ते तितक्याच क्षमतेचे पण वजनाने हलके करण्यासाठी सळीऐवजी नळीपासून तयार करतात. अशा अनेक उपायांनी त्यांचे वजन कमी केले जाते.

दुसरा मुद्दा याच्या बरोबर उलट प्रकारचा आहे. मोटारगाडीतला एकादा नटबोल्ट ढिला झाला तर त्याचा खडखडाट ऐकून निदान भारतात तरी मोटारीचा ड्रायव्हर लगेच गाडी थांबवू शकेल, ती रस्त्याच्या बाजूला उभी करून इंजिन उघडून पाहील आणि त्याला जमलेच नाही तर मोटार गॅरेजमध्ये नेऊन दुरुस्त करून आणेल. विमान आकाशात उडल्यानंतर यातले कांही करता येत नाही, यामुळे ते उडण्यापूर्वीच सर्व दक्षता घेतली जाते. तरीसुध्दा त्यात कांही किरकोळ बिघाड झालाच तर कुशल पायलट ते विमान सुरक्षितपणे जवळ असलेल्या विमानतळावर उतरवतो आणि त्यातले तज्ञ दुरुस्तीचे काम करतात. अग्निबाण आणि उपग्रह यांच्या बाबतीत मात्र उड्डाणानंतर कांहीसुध्दा करणे कोणालाही शक्य नसते. त्यामुळे त्यातील प्रत्येक गोष्ट नेमकी आणि अचूकच असावी लागते. एकादा बोल्ट कच्चा किंवा ढिला राहिला तरी काम भागावे म्हणून चाराऐवजी ते सहा करता येत नाहीत किंवा त्यांची जाडी वा लांबी वाढवता येत नाही आणि चारातला एक बोल्ट जरी निघाला तरी त्या यंत्राचा कारभार आटोपलाच. अशा प्रकारे चूक होण्याचे मार्जिन दोन्ही बाजूंनी नसते.

या कारणामुळे दुस-या कोणत्याही व्यवसायात आढळणार नाही इतकी गुणवत्तेची काळजी या क्षेत्रात घ्यावी लागते. एक साधे उदाहरण द्यायचे झाल्यास हवेच्या तपमानातील बदलामुळे कोठल्याही पदार्थाचे जेवढे प्रसरण किंवा आकुंचन होते व त्यामुळे त्याच्या आकारमानात जो अत्यंत सूक्ष्म फरक पडतो तो सुध्दा पडू नये यासाठी कोणताही भाग बनवण्याचा अखेरचा टप्पा वातानुकूलित दालनात पूर्ण करतात. त्या दालनातल्या हवेतल्या धूलीकणांचे प्रमाण सतत मोजले जात असते. ते कमीत कमी ठेवण्यासाठी तिथली हवा सतत अनेक फिल्टर्समधून गाळली जात असते. एवढेच नव्हे, तिथल्या कामगारांना हॉस्पिटलातल्या सर्जनप्रमाणे हातात स्वच्छ मोजे घालून नाकातोंडावर पट्टी बांधावी लागते आणि ते सारखे बदलावे लागतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील. या कामासाठी लागणारे अगणित भाग स्वतःच्या किंवा कोठल्याही एकाच यंत्रशाळेत तयार करणे जगात कोणालाच शक्य नसते. ते काम निनिराळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विविध संस्थांकडूनच करून घ्यावे लागते. त्यासाठी सर्वेक्षण करून त्यांची निवड करण्यात येते. गुणवत्तेचे महत्व त्या ठिकाणच्या कामगारांच्या मनावर बिंबवावे लागते, तसेच पदोपदी अनेक किचकट चाचण्या घेऊन ती टिकवून ठेवावी लागते. "चलता है " आणि "जाने दो यार" असे म्हणण्याची संवय असलेल्या भारतातल्या कामगारांकडून ही गुणवत्ता सांभाळून घेण्यासाठी जास्तच कसून प्रयत्न करावे लागतात.
डॉ.विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्षसंशोधनाचा श्रीगणेशा झाला. वर दिलेली
ही सर्व अवधाने सांभाळून आपल्या तंत्रज्ञांनी आपल्या देशातल्या कारखान्यांमध्ये रॉकेट्स बनवून घेतली, ती अधिकाधिक शक्तीशाली बनवत नेऊन रोहिणीसारख्या सक्षम अग्निबाणांची निर्मिती केली. ते उडवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तळ बांधले. त्यांच्याबरोबर कोणती उपकरणे अवकाशात पाठवायची ते ठरवून ती मिळवली. उडवलेल्या रॉकेट्समधून मिळणारे संदेश ग्रहण करणे आणि त्यांचा सुसंगत अर्थ लावून व त्याचे विश्लेषण करून त्या माहितीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणे यासाठी सुसज्ज अशी यंत्रणा उभी केली. आर्यभटापासून सुरुवात करून अनेक उपग्रह निर्माण केले आणि त्यांना अवकाशात स्थानापन्न केले. त्यांचे नियंत्रण करण्यासाठी व त्यांच्या संदेशवहनासाठी सक्षम अशी यंत्रणा विकसित केली. या प्रगतीला आतापर्यंत पांच दशकाइतका वेळ लागला असला तरी हे काम करता आले हीच गोष्ट स्पृहणीय आहे आणि यात सारखी भर पडत आहे. पृथ्वीवरील वातावरणाचे निरीक्षण आणि दूरसंचार व्यवस्थेसाठी संदेशवहन अशी कामे यशस्वी झाल्यानंतर आता चंद्रयान पाठवून आपण पुढली पायरी गाठली आहे.
. . . . . . . . (क्रमशः)

Friday, January 30, 2009

चन्द्रयान ( भाग ४) - उपग्रह


शेकडो वर्षांपासून रॉकेट्सचा उपयोग लढायांमध्ये करण्यात येत असला, त्यांच्या मा-याचा पल्ला दूरवर आणि जास्त भेदक असला तरीही त्यात अचूकपणा नसल्यामुळे त्यांचा उपयोग मर्यादित प्रमाणातच केला जायचा. दिवाळीतला आकाशबाण उडल्यानंतर तो नेमका कोणत्या दिशेने आणि किती उंच जाईल ते सांगता येत नाही, किंबहुना ते पाहण्यातच त्यातली मजा असते. त्याचप्रमाणे शत्रूसैन्याच्या दिशेने रॉकेट सोडले की ते त्याच्या आसपास कोठे तरी जाऊन कोसळायचे आणि जिथे पडेल तिथे भयानक विध्वंस
व्हायचा. त्यामुळे शत्रूसैन्याचा नाश व्हायचा, त्यांचे हत्ती, घोडे, उंट वगैरे प्राणी उधळून इतस्ततः पळायचे, आसमानातून अकस्मातपणे अंगावर कोसळणा-या या संकटाला तोंड देणे अशक्य असल्यामुळे गांगरून जाऊन सैनिकांचे मनोधैर्य खच्ची व्हायचे. अशा प्रकाराने तिथे अनागोंदी माजल्यानंतर पारंपरिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेले सैनिक शत्रूवर हल्ला करायचे. दुस-या महायुध्दानंतर मात्र विज्ञान व तंत्रज्ञानात, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्समध्ये विलक्षण वेगाने प्रगती झाली आणि रॉकेट्सची निर्मिती आणि त्यांचे नियंत्रण या क्षेत्रात कल्पनातीत घोडदौड झाली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून रॉकेटला अवकाशात सोडणे आणि त्याच्या सोबत पाठवलेल्या उपकरणांनी अवकाशातून पाठवलेले संदेश पृथ्वीवर ग्रहण करणे शक्य झाल्यानंतर ते किती उंच गेले हे समजणे शक्य झाले. तसेच पृथ्वीकडे दुरून पाहण्याची एक नवी दृष्टी मानवाला प्राप्त झाली.
अंतराळात राहून आणि या दृष्टीचा उपयोग करून घेऊन पृथ्वीवरील माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दुस-या महायुध्दानंतरच्या काळात अमेरिका आणि रशिया या महासत्तांमध्ये जागतिक वर्चस्वासाठी चुरस लागली होती. १९५७ साली रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला मनुष्यनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. त्याच्या पाठोपाठ स्पुटनिक -२ या उपग्रहासोबत लायका नामक कुत्रीला अंतरिक्षात पाठवून दिले. तिची बिचारीची ती अखेरचीच यात्रा होती. अमेरिकेनेही थोड्याच दिवसांनी म्हणजे १९५८ साली एक्स्प्लोअरर -१ आणि व्हँगार्ड-१ हे उपग्रह एका पाठोपाठ सोडले. त्यानंतर इतर देशांनी आपापले उपग्रह सोडणे सुरू केले आणि ते वाढतच चालले आहे. आज सुमारे चाळीस देशांनी पाठवलेले तीन हजारावर कृत्रिम उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमधून पृथ्वीची प्रदक्षिणा करीत आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात सरकारी प्रयोगशाळांनी केली होती आणि त्यांनी पाठवलेल्या उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग मुख्यतः संरक्षण, हवामान, भूसर्वेक्षण आदि सरकारी विभागांनाच होत असे. संदेशवहनाचा उपयोग दूरचित्रवाणी, दूरध्वनी, आंतर्जाल वगैरे माध्यमातून आम जनतेसाठी होऊ लागल्यानंतर त्या कामासाठी अनेक निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातल्या संस्था पुढे आल्या किंवा निर्माण झाल्या. त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारांचे उपग्रह तयार करणे आणि त्यांना अंतराळात नेऊन सोडणे हे काम व्यावसायिक तत्वावर होऊ लागले. त्यामुळे आज चाळीस देशांचे उपग्रह अवकाशात असले तरी त्यांची संरचना, आरेखन, निर्माण, उड्डाण वगैरे करण्यात स्वयंपूर्ण असलेले देश कमीच आहेत. त्यांत भारताचा समावेश होतो ही अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल कोणाच्या मनात शंका असलीच तर चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाने ती दूर केली आहे. "रोजचाच चंद्र आज वाटतो नवा नवा " असे प्रेमिकांना वाटत असले आणि रोज दिसणारा चंद्र खरोखरच अल्पशा फरकाने नवा असला तरी तो एकासारखा एकच आहे. हे सर्व कृत्रिम उपग्रह मात्र एकमेकाहून वेगळे असतात. त्यांच्या उद्दिष्टानुसार त्यांची निरनिराळ्या प्रकारांनी वर्गवारी करण्यात आली आहे. बहुतांश उपग्रह मनुष्यविरहित असतात. त्यात उपकरणे आणि यंत्रे मांडून ठेवण्यासाठी पॅनेल्स आणि त्यांना धरून ठेवणारा एक सांगाडा एवढ्या गोष्टी पुरेशा असतात. त्यात फक्त स्वयंचलित सामुग्री ठेवता येते.
मानवचलित उपग्रहांमध्ये बसलेले अंतराळवीर त्यातल्या कांही उपकरणांचा वापर करून अधिक माहिती मिळवू शकतात, तिचे संकलन करू शकतात. अशा उपग्रहामध्ये त्यांच्यासाठी केबिन असावी लागते त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी खास प्रकारची खाद्ये व पेये न्यावी लागतात. त्यांना एक अगदी वेगळ्या प्रकारचा सूट अंगावर धारण करावा लागतो आणि तो एकदा अंगावर चढवला की पृथ्वीवर परत येऊन सुखरूप पोहोचेपर्यंत अंगातून काढतासुध्दा येत नाही.
हे उपग्रह वेगवेगळ्या आकारांच्या कक्षांमधून पृथ्वीभोवती घिरट्या घालतात. कांही वर्तुळाकार असतात, कांही थोड्या लंबगोलाकार असतात, तर कांही खूप मोठ्या अंड्याच्या आकारात असतात. कांही उपग्रह पृथ्वीपासून २५० किलोमीटर इतकेच दूर राहून फिरतात, तर कांही तीस बत्तीस हजार कि.मी.पेक्षा दूर जातात. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि उपग्रहाचा वेग यांमध्ये समतोल राखून हे अंतर राखले जाते. यातील पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अबाधित असते, पण उपग्रहाचा वेग कांही कारणांमुळे कमी होऊ शकतो. अत्यंत विरळ हवेतले कांही तुरळक अणु परमाणु त्याला धडकत असतात, तसेच सूर्याचे प्रकाशकिरण सुध्दा त्याने शोषले जातांना किंवा त्याच्यावरून परावर्तित होतांना त्याला अत्यल्प असा धक्का देतात हे आपल्याला खरेसुध्दा वाटणार नाही. अशा कारणाने त्याची गति किंचित जरी मंदावली तरी तो पृथ्वीकडे ओढला जातो, पृथ्वीच्या जवळ येताच वातावरणाशी घर्षण होऊन तो तापत जातो आणि नष्ट होतो.
उपग्रहाला पृथ्वीपासून दूर असलेल्या कक्षेत पाठवण्यासाठी अधिक शक्तीशाली अग्निबाणांची आवश्यकता असते आणि लहान कक्षेत पाठवणे तुलनेने सोपे असते. पृथ्वीपासून दूर असलेले उपग्रह जवळच्या उपग्रहाच्या मानाने कमी अंशात्मक वेगाने तिच्याभोवती फिरतात. एकाद्या मोठ्या गोलाच्या जवळ जाऊन पाहिल्यास त्याचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा दूर जाऊन पाहिल्यास त्याचा जास्त भाग दिसतो. त्याचप्रमाणे पृथ्वीपीसून दूर असलेल्या कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या मोठ्या भूभागाशी संपर्क करू शकतात. अशा सर्व बाजूने विचार करून उपग्रहाला कोणत्या कक्षेत ठेवायचे हे ठरवले जाते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यावर लगेच तो बरोबर आपल्या ठरलेल्या कक्षेत जाऊन स्थिरावू शकत नाही.
त्याला आपल्या कक्षेत राहण्यासाठी नेमक्या आवश्यक तितक्याच वेगाने भ्रमण करणे गरजेचे असते. यासाठी लागणारी वेगातली थोडीसी दुरुस्ती करण्यासाठी उपग्रहाबरोबर थ्रस्टर रॉकेट जोडलेले असतात.
बाहेरच्या विश्वाचे निरीक्षण करण्यासाठी हबल टेलिस्कोप ही महाकाय दुर्बिण अशीच पृथ्वीच्या जवळ म्हणजे सुमारे ६०० कि.मी. अंतरावर ठेवली आहे. ती आपली पृथ्वीप्रदक्षिणा ९७ मिनिटात पूर्ण करते. संदेशवहनासाठी उपयोगात येणारे उपग्रह विषुववृत्ताच्या बरोबर वर सुमारे छत्तीस हजार कि.मी. अंतरावरून पृथ्वीच्या अक्षासभोवती पृथ्वीइतक्याच वेगाने फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीवरून पाहता ते एकाच जागी स्थिर असल्यासारखे दिसतात. ते कधीही उगवत नाहीत की मावळत नाहीत. त्यामुळे एका जागी स्थिर असलेल्या पृथ्वीवरील अँटेनावरून त्या उपग्रहांबरोबर संदेशांची सतत देवाण घेवाण करता येते. या उपग्रहांनी दिवसातून एकच प्रदक्षिणा करणे आवश्यक असल्यामुळे यासाठी असे उपग्रह सर्वात दूर ठेवावे लागतात. जवळ आणि दूर यांच्या मध्यावर सुमारे वीस हजार कि.मी. अंतरावरील कक्षांमध्ये फिरणारे उपग्रह दर बारा तासात एक प्रदक्षिणा घालतात. अशा उपग्रहांचा उपयोग नेव्हिगेशनसाठी प्रामुख्याने होतो. याशिवाय सनसिन्क्रॉनस नांवाचा एक चौथा प्रकार आहे. हे उपग्रह उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतात. ते पृथ्वीच्या जवळून इतक्या वेगाने फिरतात की विषुववृत्तावरून निघून एक प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा विषुववृत्तावर येतील तेंव्हा त्या जागी स्थानिक वेळेनुसार नेमके तेवढेच वाजलेले असतात. हे उपग्रह उत्तरदक्षिण फिरतात तेंव्हाच पृथ्वी पूर्वपश्चिम फिरत असते त्यामुळे पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग त्यांच्या नजरेखालून जात असतो. वातावरणाच्या अभ्यासासाठी अशा उपग्रहांचा वापर केला जातो. याशिवाय इतर उपग्रहांचेच निरीक्षण करण्याचे काम कांही उपग्रह करतात तर कांही
उपग्रह राष्ट्रीय संरक्षणासाठी लागणारी माहिती गोळा करतात. असे उपग्रह सर्वच प्रकारच्या कक्षांमध्ये असतात.

Thursday, January 29, 2009

चन्द्रयान (भाग३) अंतरिक्षात भ्रमण


सर आयझॅक न्यूटन यांनी ज्या काळात गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला तेंव्हा आगगाडीचे इंजिनसुध्दा अस्तित्वात आलेले नव्हते. जमीनीवर चालणारे कोठलेही स्वयंप्रेरित वाहन उपलब्ध नसतांना आभाळात उडणारे वाहन कोठून येणार ? त्यामुळे एस्केप व्हेलॉसिटीसाठी गणित मांडतांना त्या वस्तूला आकाशात गेल्यानंतर कोठलीही बाह्य प्रेरणा मिळणार नाही हे गृहीत धरले होते. त्याचप्रमाणे त्याला वाटेत होणा-या कसल्याही अडथळ्याचा विचार केलेला नव्हता. ही सगळीच बौध्दिक कसरत असल्यामुळे त्यासाठी त्यांची
एवढी गरज नव्हती. जमीनीवरून एकाद्या वस्तूला एक जोराचा फटका देऊन दर सेकंदाला ११२०१ मीटर इतक्या वेगाने आभाळात उडवून दिले की तो कायमचा तिकडचा झाला. तो कांही पृथ्वीवर परत येण्याची शक्यता नव्हती. एवढाच निष्कर्ष त्यातून काढला गेला होता. तात्विक चर्चा करीत असतांना कांही गोष्टी आपल्याला ठाऊक असतात तशा कांही नसतात, कांही काल्पनिक गोष्टी गृहीत धरल्या जातात, तर कांही अस्तित्वात असलेल्या अनिश्चित बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. तरीही या विश्लेषणातून कांही चांगले नवे
उद्दे निघतात. यातूनच प्रगती होत असते. पण प्रत्यक्ष प्रयोग करायच्या वेळेस अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा मुळीसुध्दा आधार मिळत नाही, तसेच त्यातल्या अडचणीवर मात केल्याखेरीज तो प्रयोग सफल होत नाही. त्यामुळे प्रत्येक संबंधित गोष्टीचा सखोल विचार करावाच लागतो. यामुळेच विज्ञानाच्या अभ्यासात प्रत्यक्ष प्रयोगांना अनन्यसाधारण महत्व दिले जाते.

गेल्या शतकात जेंव्हा विमाने आकाशात उडू लागली आणि त्यापलीकडे पोचणारी रॉकेट्स उडवण्याचे प्रयोग सुरू झाले तेंव्हा त्या संदर्भातल्या इतर बाबी लक्षात घेणे आवश्यकच होते. यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हवेचा विरोध. साधा वाळ्याचा पंखा जरी आपण खूप जोराने फिरवावा असे म्हंटले तरी त्यासाठी मनगटाने जोर लावावा लागतो. डोळ्यांना जरी हवा दिसत नसली तरी तिचे अस्तित्व यावेळी आपल्याला जाणवते. दर तासाला वीस पंचवीस किलोमीटर या वेगाने वारा आला तर आपले कपडे फडफडायला लागतात, डोक्यावरची टोपी उडते, एका जागी ताठ उभे राहणे आपल्याला कठीण होते. ताशी शंभर दीडशे किलोमीटर वेगाच्या वादळात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात. सेकंदाला अकरा कि.मी. म्हणजे तासाला चाळीस हजार कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने एकादी वस्तू हवेतून जायला लागली तर त्याला हवेकडून केवढा विरोध होईल याची कल्पना यावरून येईल. या विरोधामुळे त्या वस्तूची गती कमी होणारच. या विरोधाचे परिणाम गुरुत्वाकर्षणाच्या परिणामापेक्षा वेगळ्या प्रकारचे असतात. ती गतीमान वस्तू खालीवर , पूर्वपश्चिम, उत्तर दक्षिण अशा कोठल्याही दिशेने जात असली तरी पृथ्वी तिला फक्त खालच्या दिशेनेच ओढते. त्यामुळे वर जाणा-या वस्तूचा वेग कमी होत होत शून्यापर्यंत पोचतो आणि खाली पडतांना तो वाढत जातो. हवेचा विरोध मात्र त्याच्या गतीला असतो, त्याची जी कांही गती असेल ती या विरोधामुळे नेहमी कमीच होत जाते.

दुसरी गोष्ट अशी आहे की गती कमी झाली तर विरोधही कमी होतो, त्यामुळे ती वस्तू पूर्णपणे न थांबता पुढे जातच राहते. हवेच्या या प्रकारच्या घर्षणामुळे सुध्दा त्यातून ऊष्णता निर्माण होते आणि त्या वस्तूचे तापमान वाढत जाते. तापवल्यानंतर लोखंडसुध्दा मऊ होते, वितळते आणि जळून त्याचे भस्म होऊ शकते. अतिशय वेगाने पृथ्वीवर पडणा-या बहुतेक उल्का याच कारणाने हवेतच जळून नष्ट होतात आणि जमीनीपर्यंत पोचतच नाहीत. त्याचप्रमाणे अतीशय वेगवान अग्निबाण वातावरणातून बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट होण्याचा धोका असतो.

कोठलीही स्थिर वस्तू गतिमान होण्यासाठी थोडा वेळ लागतो. मोटार स्टार्ट केली की लगेच टॉप स्पीड पकडत नाही किंवा पंख्याचे बटन दाबताच लगेच तो फुल स्पीड घेत नाही. त्याचप्रमाणे रॉकेट जमीनीवरून हवेत उडाल्यानंतर पूर्ण वेग घेण्यासाठी कमीत कमी कांही क्षण जातीलच. त्या अवधीत गुरुत्वाकर्षण आणि हवेच्या अवरोधाने त्याची गती कमी होणार. ती घट भरून काढणे आवश्यक आहे.

एस्केप व्हेलॉसिटीएवढ्या वेगाने निघालेले रॉकेट पृथ्वीवर परत येणार नाही हे खरे असले तरी अंतराळात त्याची गती कमी कमी होतच असते. त्यामुळे चंद्रापर्यंत पोहोचायला त्याला खूप वेळ लागेल आणि आपल्याला तर त्याने शक्य तितक्या लवकर पोहोचायला हवे असते. शिवाय चंद्राजवळ पोहोचेपर्यंत त्याची गती अगदी कमी झाली असेल तर ते चंद्राकडे खेचले जाऊन धाडदिशी त्यावर आदळेल. त्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या तावडीत न सापडता ते चंद्राभोवती फिरत राहील अशी योजना करतात. त्यासाठी आधीपासूनच त्या रॉकेटने पुरेसे वेगवान असणे आवश्यक आहे. तो मिळवण्याच्या दृष्टीने त्याला पृथ्वीवरून निघतांना एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त वेग देणे आवश्यक ठरते.

याशिवाय आपली पृथ्वी स्वतःभोवती प्रचंड वेगाने फिरत असते त्याबरोबर ते रॉकेटसुध्दा उडण्यापूर्वीही तितक्याच वेगाने पृथ्वीच्या मध्यबिंदूच्या भोवती फिरत असतेच. ज्या दिशेने ते आकाशात उडणार असेल त्यानुसार या वेगाचा परिणाम त्याच्या अवकाशातल्या प्रवासावर होतो. त्याहूनही अधिक वेगाने पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते याचे कारण सूर्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीला त्याच्यापासून दूर जाऊ देत नाही. चंद्रसुध्दा पृथ्वीच्या बरोबर सूर्याभोंवती फिरतच असतो. त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कचाट्यातून बाहेर पडल्यानंतर सुध्दा ते रॉकेट पृथ्वीबरोबर तसेच चंद्राच्या बरोबर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतच राहते. चंद्रसुध्दा समान वेगाने फिरत असल्यामुळे रॉकेटला चंद्रापर्यंत जाण्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, पण मंगळाकडे जायचे असल्यास सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर मात करून पुढे जावे लागते. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती भ्रमण हे वेगवेगळ्या पातळ्यां(प्लेन्स)मध्ये होत असल्याकारणाने या दोन्ही गतींचा एक संयुक्त परिणाम रॉकेटच्या गती आणि दिशेवर होत असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यानुसार उपाययोजना करावी लागते. अशा प्रकारचे यान बनवणे अत्यंत कठीण तसेच खर्चिक असते आणि त्यापासून दृष्य असा कोणताच फायदा लगेच मिळत नाही. म्हणूनच सारे देश त्या भानगडीत पडत नाहीत.

वर दिलेल्या अनेक कारणांमुळे चंद्राकडे पाठवायच्या रॉकेटचा वेग एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा बराच जास्त असावा लागतो. हवेच्या प्रखर विरोधामुळे निदान आज तरी ते अशक्य आहे. ही अडचण दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हवेचा विरोध कमी करण्यासाठी रॉकेटला त्याचा विशिष्ट आकार दिला जातो. पाण्यात पोहणा-या माशांना आणि हवेत उडणा-या पक्षांना निसर्गाने जो आकार दिला आहे, तशाच प्रकाराने फक्त समोर टोकदार आणि त्याच्या मागे गोलाकार असा हा आकार असतो. घर्षण कमी करण्यासाठी रॉकेटचा पृष्ठभाग शक्य तितका गुळगुळीत केला जातो. त्याला कोठेही कडा नसतात. उच्च तापमानावरसुध्दा कणखर राहतील अशा खास मिश्रधातूंचे कवच या अग्निबाणांना सर्व बाजूंनी दिलेले असते. कोठलेही टोकदार भाग या कवचाच्या बाहेर आलेले दिसत नाहीत.

अशी शक्य असेल तितकी सर्व खबरदारी घेतल्यानंतर देखील पृथ्वीवरून उड्डाण घेऊन ते रॉकेट थेट तिच्या कक्षेच्या बाहेर जात नाही. अशा रॉकेटमध्ये दोन किंवा अधिक टप्पे (स्टेजेस) असतात. त्याचप्रमाणे पुढील कामे करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे ठेवलेले एक यान असते, तसेच अनेक छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने त्याला जोडलेली असतात. जमीनीवरून उडतांना त्यातल्या पहिल्या स्टेजमधलासुध्दा सगळा जोर क्षणार्धात न लावता तो कांही कालावधीमध्ये सतत लावला जातो. त्यातून बाहेर पडणारा ऊष्ण वायूचा झोत त्याची गती वाढवत नेत त्याला पृथ्वीपासून दोनशे ते हजार कि.मी. इतक्या उंचीवर नेतो. तोपर्यंत पहिल्या आणि सर्वात मोठ्या स्टेजचा भाग गळून पडतो. त्यामुळे त्या रॉकेटचे वजन खूप कमी होते, तसेच हवा अत्यंत विरळ झालेली असल्यामुळे तिचा विरोध जवळ जवळ मावळलेला असतो. या उंचीवर हे रॉकेट पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करीत राहते. त्याने धारण केलेली ही उपग्रहाची अवस्था चांगली स्थिरस्थावर होईपर्यंत वाट पाहून योग्य त्या क्षणी त्याची दुसरी स्टेज कार्यान्वित केली जाते. त्यानंतर तिसरी, चौथी अशा टप्प्यांमधून मिळालेल्या ऊर्जेने ते एस्केप व्हेलॉसिटीहून अधिक वेगाने पृथ्वीपासून दूर जात राहते. चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर त्याला योग्य दिशा देऊन चंद्राभोवती फिरू दिले जाते आणि हळू हळू चंद्रापासून विशिष्ट उंचीवरील कक्षेत राहून विशिष्ट वेगाने त्याचे भ्रमण सुरू राहते. यानाचे हे भ्रमण स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यातून राष्ट्रध्वज, दुसरे एकादे प्रतीक, वैज्ञानिक उपकरणे, यासारख्या हव्या त्या वस्तू ठेवून एक छोटे यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाते. हे सारे नियंत्रण छोटी छोटी रॉकेट्स व रॉकेट इंजिने यांच्या सहाय्याने केले जाते.

ज्या यानामधून माणूस पाठवला जातो त्या यानाला परत आणून सुरक्षितपणे पृथ्वीवर पोचवण्याची व्यवस्था करावी लागते. तसेच त्याला जगण्यासाठी लागणारे अन्न, पाणी, हवा वगैरेचा पुरवठा बरोबर न्यावा लागतो. त्या यानाचे अंतर्गत तपमान, हवेचा दाब वगैरे गोष्टी त्या मानवाच्या शरीराला मानवतील इतपत राखाव्या लागतात. हे जास्तीचे काम अधिकच गुंतागुंतीचे असते. मनुष्यहीन यानाचे सर्व नियंत्रण तर इथे राहून करायचे असतेच, सोबत अंतराळवीर गेलेला असला तरी तो कांही मोटार किंवा रेल्वेत असतो तसला इंजिन ड्रायव्हर नसतो, त्या यानाचेसुध्दा जवळ जवळ सर्व नियंत्रण दूरसंचार यंत्रणेने पृथ्वीवरील नियंत्रणकेंद्रातूनच करावे लागते. यासाठी जगाच्या पाठीवर निरनिराळ्या ठिकाणी निरीक्षण केंद्रे आणि संदेशवहनाची केंद्रे स्थापन करावी लागतात. त्याशिवाय त्या अंतराळवीराला सुरक्षितपणे त्यात राहण्याची सर्व तरतूद करावी लागते. इतके हे काम कठीण, गुंतागुंतीचे आणि खर्चिक असते.
. . . . . . .. .. . . . . . . (क्रमशः)

चन्द्रयान (भाग२) - विमान आणि अग्निबाण


पक्षी आणि फुलपाखरे यांना उडतांना पाहून आकाशात विहार करण्याची ऊर्मी माणसाच्या मनात खूप पूर्वीपासून उठत आली आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले होते. त्यात यश येऊन अनेक प्रकारची विमाने आणि अग्निबाण यांच्या सहाय्याने तो आकाशातच नव्हे तर अंतराळात देखील भ्रमण करू लागला आहे. विमाने आणि अग्निबाण ही दोन्ही साधने जमीनीवरून आकाशात झेप घेतांना दिसतात, पण विमानातून चंद्रावर जाता येईल कां? किंवा अग्निबाणाच्या सहाय्याने मुंबईहून दिल्लीला जाता येईल कां? या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थी येतील. त्याची कारणे मात्र निरनिराळी आहेत. विमाने वातावरणाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत त्यामुळे ती चंद्राची यात्रा कधीच करू शकणार नाहीत. एकदा उडवलेला अग्निबाण लगेच नष्ट होऊन जातो त्यामुळे तो जमीनीवर उतरण्याचा प्रश्नच नसतो. तरीही त्याबरोबर अवकाशात पाठवलेले यान मात्र सुरक्षितपणे परत आणून पृथ्वीतलावर उतरवण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. हे खरे असले तरी आकाशात उडणारे विमान जसे बरोबर विमानतळावरच्या धांवपट्टीवर खाली उतरवतां येते तसे अंतराळातून परतणारे यान नेमक्या जागेवर उतरवण्याची तयारी अद्याप झालेली नाही. त्यामुळे गांवोगांवी जसे विमानतळ बांधले गेले आहेत त्यासारखे अग्निबाणतळ झालेले नाहीत. अग्निबाणासोबत उडवलेले क्षेपणास्त्र नेमके शत्रूपक्षाच्या गोटावर टाकून त्याचा विध्वंस करण्यापर्यंत यात प्रगती झाली आहे, पण मुंबईहून दिल्लीला जाऊन तिथे सुरक्षितपणे उतरण्याइतपत त्याचा विकास अजून व्हायचा आहे.


विमान आणि अग्निबाण यातला मुख्य फरक आता थोडक्यात पाहू. पक्षी ज्याप्रमाणे आपल्या पंखांची फडफड करून हवेला खाली आणि मागे लोटतात आणि स्वतः पुढे जातात, तसेच समोरच्या हवेला मागे ढकलून विमान पुढे जाते. सुरुवातीच्या काळात हे काम त्याला जोडलेल्या प्रोपेलर नावाच्या अजस्त्र पंख्यांद्वारे होत असे, आजकाल बहुतेक विमाने जेट इंजिनावर चालतात (उडतात). हॅलिकॉप्टर मात्र अजूनही पंख्यांच्याच तत्वावर उडतात. कागदी बाण किंवा फ्रिसबीची डिस्क यासारखी एकादी गोष्ट हवेतून वेगाने भिरकावली की हवाच तिला उचलून धरते हे आपण पाहतोच. अशाच प्रकारे अतिशय वेगाने पुढे जाणा-या विमानाचे हवेद्वारा उध्दरण होते. आतापर्यंत मुख्यतः तीन प्रकारच्या इंजिनांचा उपयोग विमान उडवण्यासाठी केला गेला आहे.
१. प्रोपेलर - यात इंधनतेलाच्या ज्वलनावर चालणा-या इंजिनाला जोडलेली मोठमोठी पाती पंख्याप्रमाणे वेगाने फिरत हवेला मागे ढकलून विमानाला पुढे जाण्यासाठी गती देतात. इंजिनामध्ये इंधनाचे ज्वलन होण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणातून प्राणवायू घेतला जातो.
२. जेट - यातसुध्दा इंजिनात होण्यार्‍या इंधनाच्या ज्वलनासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेतला जातो. इंजिनाला जोडलेल्या कॉम्प्रेसरने हवेचा दाब आधीच वाढवला जातो. इंजिनाच्या ज्वलनातून निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे तो दाब आणखी वाढतो. या तप्त व प्रचंड दाब असलेल्या हवेला अरुंद वाटेने (नॉझल्समधून) मागच्या दिशेने बाहेर सोडले जाते. त्यातून अतीशय वेगवान असा झोत (जेट) निर्माण होतो. त्याच्या प्रतिक्रियेने विमान वेगाने पुढे जाते.
३. रॉकेट इंजिन - यातसुध्दा ज्वलनातून उत्पन्न झालेल्या ऊष्ण वायूंच्या झोतानेच विमान पुढे जाते. मात्र यात खास प्रकारचे इंधन वापरतात. त्याच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू किंवा तो पुरवणारी रासायनिक द्रव्ये यांचा साठा विमानाबरोबर नेला जातो. त्यासाठी आजूबाजूच्या हवेतून प्राणवायू घेण्यात येत नाही. वजनाच्या तुलनेत या प्रकारची इंजिने सर्वात अधिक सशक्त असतात. अतीवेगवान अशा लढाऊ विमानांत अशा प्रकारच्या इंजिनांचा उपयोग करतात.
वरील तीन्ही प्रकारात विमानांच्या उध्दरणासाठी वातावरणाची आवश्यकता असतेच असते. त्यामुळे ती अवकाशातल्या निर्वात पोकळीत उडू शकत नाहीत. विमानाला उचलून धरण्यासाठी पुरेसा इतका हवेचा दाट थर पृथ्वीसभोवती फारसा दूरवर नाही. त्यामुळे विमान जेवढे उंच जाऊन उडू शकते तेवढ्या अंतरामध्ये तिच्या गुरुत्वाकर्षणात विशेष फरक पडत नाही.


रॉकेट म्हणजेच अग्निबाण यांचा इतिहास विमानांपेक्षा खूपच जुना आहे. कित्येक शतकांपासून ती बनवली जात आहेत. चिनी लोकांनी सर्वात आधी स्फोटकांचा शोध लावला आणि त्यांचा उपयोग रॉकेट्स मध्ये केला असे मानले जाते. अलीकडच्या इतिहासात अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुध्दात त्यांचा वापर केला गेला आणि आपल्या भारतात टिपू सुलतानाने त्याचे तंत्र विकलित केले असल्याची नोंद आहे. दिवाळीतल्या फटाक्यातले बाण हे रॉकेटचेच छोटे रूप असते. त्यात भरलेल्या दारूमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि प्राणवायूचा पुरवठा करणारी रसायने यांचे मिश्रण असते. बाणाची वात पेटवल्या नंतर वातीमधून ती आग या मिश्रणापर्यंत जाते आणि त्याचे क्षणार्धात ज्वलन होऊन त्यातून खूपसे वायुरूप पदार्थ तयार होतात. बाणाच्या छोट्याशा पण भक्कम नळकांडीमध्ये ते कोंडले गेल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो. जळलेल्या वातीतून निर्माण झालेल्या वाटेने या वायूंचा झोत वेगाने बाहेर पडतो आणि त्याची प्रतिक्रिया त्या बाणाला विरुध्द दिशेने म्हणजेच वर फेकण्यात होते. बाणाला जोडलेल्या काडीमुळे त्याला एक दिशा मिळते आणि त्या दिशेने तो वर उडतो आणि हवेत झेपावतो. साध्या फटाक्यामध्ये या वायूला बाहेर पडायला वाट न मिळाल्यामुळे त्याचा दाब वाढत जातो आणि कवचाच्या चिंध्या उडवून तो बाहेर पडतो. त्याचा मोठा धमाका होतो. आजकाल मिळणा-या बाणांची रचना विशिष्ट प्रकाराने केलेली असते. त्यात अनेक कप्पे असतात. सर्वात खाली ठेवलेला बाण उंच उडतो. आकाशात गेल्यानंतर इतर कप्प्यातील स्फोटकांचा स्फोट होतो आणि त्यात ठेवलेली रंगीत भुकटी पेट घेऊन सगळ्या बाजूंना पसरते. यामुळे आकाशातून रंगीत ठिणग्यांची फुले पडत असल्याचे मनोहर दृष्य आपल्यला दिसते.


याच तत्वावर तयार करण्यात आलेल्या प्रचंड शक्तीशाली अग्निबाणांचा उपयोग क्षेपणास्त्रांच्या रूपाने युध्दात करण्यात येतो. तोफेच्या पल्ल्याच्या पलीकडे असलेल्या लक्ष्यावर तोफेपेक्षा जास्त अचूक आणि तोफेच्या गोळ्याच्या अनेकपट विध्वंसक असा मारा या अस्त्राद्वारे करता येत असल्यामुळे त्यांचा कल्पनातीत इतका विकास गेल्या शतकात झाला आहे. पण हा एक स्वतंत्र विषय आहे.


बिनतारी संदेशवहनावर प्रभुत्व मिळवल्यानंतर वातावरणाच्या अभ्यासासाठी या नव्या संदेशवहनाचा अधिकाधिक उपयोग करायला सुरुवात झाली. विमानांच्या उड्डाणाचा वातावरणाबरोबर प्रत्यक्ष संबंध येत असल्यामुळे त्याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी अद्ययावत उपकरणे विमानात ठेवली जातच, त्याशिवाय हलक्या वायूने भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने कांही उपकरणे विरळ होत जाणा-या वातावरणाच्या वरच्या भागात पाठवली जाऊ लागली. अग्निबाणांचा उपयोग करून त्याहून अधिक उंची गाठता येते हे पाहून त्या दिशेने प्रयोग सुरू झाले. त्यातून अधिकाधिक उंच जाण्याचीच स्पर्धा सुरू झाली. या रॉकेट्सचे अवशेष खाली येऊन पडतात, पण जेंव्हा एस्केप व्हेलॉसिटी इतक्या वेगाने त्याचे प्रक्षेपण झाले तेंव्हा जो अग्निबाण उडाला तो पृथ्वीवर परत आलाच नाही.
. . . . . . . . . . . .. . . . . . . .(क्रमशः)

Wednesday, January 28, 2009

चन्द्रयान (भाग१) - गुरुत्वाकर्षण


भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या वाचल्यानंतर त्यातून जेवढे आकलन झाले असेल त्यापेक्षा जास्त कुतूहल अनेक लोकांच्या मनात निर्माण झाले असावे असा माझा अंदाज आहे. आपला अनुभव, आपले ज्ञान आणि विचारशक्ती यांच्या संदर्भातच आपण कोठल्याही गोष्टीचा अर्थ लावत असतो. मी लहान असतांना आमच्या खेडेगांवातल्या लोकांनी कधीही जवळून विमान पाहिलेले नव्हते. आभाळात ढगांच्याही पलीकडे विमानाचा एक हलणारा ठिपका तेवढा दिसत असे. चिमण्या जशा आपले पंख फडफडावत उडतात तसेच हे विमान आपल्या अजस्त्र यांत्रिक पंखांचा उपयोग करून उडत असावे अशी माझी समजूत होती. त्याच काळात मुंबईत राहणा-या सर्वसामान्य लोकांनी विमानतळावरून विमाने उडतांना आणि खाली उतरतांना पाहिली होती, त्यामुळे त्यांचे पंख नेहमी पसरलेलेच असतात हे त्यांच्या लक्षात आले असणार. मात्र बसमधल्या ड्रायव्हरप्रमाणेच विमान चालवणारा पायलट त्याच्या अगदी समोरच्या भागात बसलेला असतो, त्याच्या पायापाशीच त्या विमानाचे इंजिन असेल असे अनेकांना वाटायचे. विमानाची इंजिने त्याच्या पंखाखाली असतात ही गोष्ट फक्त विमानातून प्रवास करणारे, विज्ञान व तंत्रज्ञानात रुची असलेले आणि विलक्षण निरीक्षणशक्ती असलेले एवढ्या लोकांनाच बहुधा माहीत असायची. विमान उड्डाणाच्या वेळी जमीनीवरून धांवता धांवता थोडे तिरपे होऊन आकाशात उडते त्याऐवजी चंद्रावर जाणारे रॉकेट जमीनीवरून सरळ वरच्या दिशेने आभाळात उडतांना दिसते आणि ते सरळ पुढे पुढे जात थेट चंद्रावर जाऊन उतरत असेल असे कोणाला वाटले तर त्यात आश्चर्य नाही. पण अमेरिका आणि रशिया यांनी जी गोष्ट चाळीस वर्षांपूर्वी केली होती ती करायला आपल्याला इतकी वर्षे कां लागली आणि इतक्या उशीराने करून देखील पूर्ण जगात आपला पांचवा नंबर लागला आहे याचा अर्थ इतर विकसित देशांनासुध्दा ते अजून कां जमलेले नाही हे प्रश्न सुध्दा मनात येत असतील. त्यांची सोप्या भाषेत उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न आहे.


हा विषय समजण्यासाठी आपल्या भौतिक शास्त्राच्या मूलभूत ज्ञानाची थोडी उजळणी करून घेऊ. सर्व प्रकारच्या प्रवासांचा वेगवेगळ्या प्रकाराने गुरुत्वाकर्षणाशी अत्यंत निकटचा संबंध असतो. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्याला वजन प्राप्त होते, भुईला भारभूत झाल्यामुळे आपण जमीनीवर उभे राहतो आणि पायाने तिला मागे रेटा देऊन पाऊल पुढे टाकतो, चालतो किंवा धांवतो. पाय घसरून किंवा ठेच लागून खाली आपटतो ते सुध्दा गुरुत्वाकर्षणामुळेच. चढ चढतांना आपली दमछाक होते आणि उतारावरून आपण सहजपणे उतरू शकतो याचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हेच आहे. सर्वसामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रीय सिध्दांत माहीत नसला तरी त्याचे हे परिणाम त्याच्या ओळखीचे असतात. जेंव्हा एका इंजिनियरला प्रवासाच्या साधनांचा अभ्यास करायचा असतो तेंव्हा मात्र गुरुत्वाकर्षणाच्या नियमांकडे त्याला सर्वात प्रथम लक्ष द्यावे लागते. सायकल, मोटार किंवा बैलगाडीची चाके गुरुत्वाकर्षणामुळेच रस्त्याला टेकलेली असतात व त्यांच्या जमीनीला चिकटून फिरण्यामुळे ते वाहन पुढे जाते. कोणत्या वाहनातून किती भार आणि किती वेगाने वाहून न्यायचा आहे याचा विचार करून त्या वाहनाची रचना केली जाते व त्यानुसार रस्ते बांधले जातात. त्यात गफलत झाल्यामुळे रस्ता खचला किंवा पूल कोसळला तर ती घटना गुरुत्वाकर्षणामुळेच घडते. आगगाडीच्या इंजिनाची चाके रुळावरून गडगडण्याऐवजी घसरू नयेत यासाठी मुद्दाम त्याचे वजन वाढवावे लागते. पाण्यावर जहाजाचे तरंगणे किंवा त्याचे त्यात बुडणे या दोन्ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच घडतात. गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर मात करून विमानाला हवेत उडावे लागते, तसेच त्याला विरोध करीत सतत हवेत तरंगत राहण्यासाठी आवश्यक इतका हवेचा दाब यंत्राद्वारे निर्माण करावा लागतो. पृथ्वीवरून चंद्रावर जायचे असल्यास पृथ्वीच्याच नव्हे तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचासुध्दा विचार करावा लागतो. यामुळे लेखाच्या या भागात आपण गुरुत्वाकर्षणाचे मूलभूत स्वरूप पाहणार आहोत.


झाडावरून सुटलेले फळ खाली पडते, तसेच त्याला जमीनीवरून मारलेला दगडदेखील खाली पडतो, ढगात निर्माण झालेले पाण्याचे थेंब पाऊस पडतांना खाली येतात, त्याहून उंच आकाशात उडत असलेल्या विमानातून उडी मारल्यानंतर पॅराट्रूपर खाली येत जातो या सगळ्यांचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे आहे. त्यांच्याही पलीकडे असलेला चंद्र मात्र त्याच गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीला फक्त प्रदक्षिणाच कां घालत राहतो? तो जमीनीवर येऊन पडत कां नाही? या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे? याचा विचार करावा
लागेल.


झाडावरून सुटलेले फळ, ढगातले पाण्याचे थेंब आणि पॅराट्रूपर यांना वर उचलून नेणारा वेग नसतो. पण त्यांना पृथ्वी आपल्याकडे ओढत असल्यामुळे ते सरळ तिच्या जवळ येत येत जमीनीवर येऊन पडतात. पण वरच्या दिशेने फेकलेल्या दगडाला आपण एक वेग दिलेला असतो. त्यामुळे तो आधी वरच्या दिशेने जातो, गुरुत्वाकर्षणामुळे वर जाण्याचा त्याचा वेग कमी होत जातो, तरीही त्याचा वेग शून्यावर येईपर्यंत तो दगड वरच जात राहतो. जेंव्हा त्याचा वेग शून्य होतो तेंव्हा त्या दगडाने एक उंची गाठलेली असते. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्या प्रवासाची दिशा बदलून त्यानंतर तो खाली पडायला लागतो आणि तो जसजसा खाली येत राहील तसतसा त्याचा खाली पडण्याचा वेग वाढत जातो.


आपण एकादा दगड सहसा सरळ उभ्या रेषेत वर फेकत नाही. तो तिरक्या रेषेत फेकला तर फक्त त्याचा वर जाण्याचा वेगच तेवढा गुरुत्वाकर्षणामुळे कमी होतो. पण वर जातांना तसेच कांही उंची गांठल्यानंतर खाली पडून जमीनीवर येईपर्यंत तो समोर जातच असतो. आपण त्याला जास्त वेगाने फेकला तर तो जास्त उंची गाठतो तसेच जास्त दूर जातो असा अनुभव आपल्याला येतो. अशा वस्तूंच्या गमनाचे मार्ग वर दिलेल्या चित्रातील आकृती १ मधील क्रमांक ४, ५ व ६ या वक्ररेषांनी दाखवले आहेत. त्याचप्रमाणे जमीनीला समांतर रेषेमध्ये एक दगड फेकला तर तो समोर जातांजातांच गुरुत्वाकर्षणामुळे खाली येत जातो आणि वर दिलेल्या चित्रातील क्रमांक १, २ व ३ या वक्ररेषांनी दाखवलेल्या मार्गाने जात कांही अंतरावर जमीनीवर पडतो. १,२ व ३ आणि ४,५ व ६ या उदाहरणांत वस्तूच्या फेकण्याचा वेग वाढत गेला आहे, तसेच त्या जमीनीवर पडण्याचे अंतर वाढलेले दिसते.


खालील जमीन वक्राकार असेल तर सपाट जमीनीच्या मानाने ती वस्तू अधिक दूरवर जाते हे आकृती क्र. २ वरून स्पष्ट होते. यावरून सर आयझॅक न्यूटन यांना एक कल्पना सुचली. पृथ्वीवरील एकाद्या खूप उंच, म्हणजे हिमालयाच्याही दहा वीसपट इतक्या उंच पर्वताच्या शिखरावर एक तोफ ठेऊन त्यातून प्रचंड वेगाने गोळे सोडले तर ते कुठपर्यंत जातील याची गणिते त्यांनी मांडली. त्यांनी त्यासाठी कदाचित शेकडो वेगवेगळी उदाहरणे घेतली असतील, नमून्यादाखल मी आठ उदाहरणे आकृती क्र.३ मध्ये दाखवली आहेत. त्यातील १,२,३ व ४ चे गोळे वळत वळत जात पृथ्वीवर दूर दूर जाऊन पडतील. क्र.५ हा गोळा इतका वळत जाईल की एका वर्तुळाकार कक्षेमध्ये पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा करून सोडल्या जागी तो परत येईल आणि पृथ्वीभोवती फिरत राहील. गोळ्याचा वेग आणखी वाढवला तर क्र.६ व ७ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते एकाहून एक मोठ्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतील. एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर मात्र क्र.८ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते पृथ्वीपासून दूर दूर जात अनंत अवकाशात चालले जातील.


न्यूटनच्या काल्पनिक तोफेने उडवलेल्या गोळ्याप्रमाणेच आकाशातून विशिष्ट वेगाने जाणारी कोणतीही खरीखुरी वस्तूसुध्दा पृथ्वीच्या जवळून सरळ रेषेतल्या मार्गाने जात असेल तर गुरुत्वाकर्षणामुळे ती पृथ्वीकडे ओढली जाण्याने तिचा मार्ग वक्राकार होतो आणि ती पृथ्वीच्याभोवती फिरत राहते. चंद्राचे भ्रमण अशाच प्रकारे होत असते हे आकृती ४ मध्ये दाखवले आहे. गेल्या पाच दशकात मानवाने आभाळात सोडलेले हजारो उपग्रह असेच वेगवेगळ्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती फिरत आहेत.


उडवलेल्या वस्तूचा वेग कमी करण्याचे किंवा खाली येण्याचा वेग वाढवण्याचे प्रमाणाला 'त्वरण' असे म्हणतात. सुरुवातीला त्या वस्तूचा वेग दर संकंदाला १००० मीटर इतका असला तर निघाल्यानंतर पहिल्या सेकंदानंतर तो सेकंदाला सुमारे १० मीटरने कमी होऊन ९९० मीटर इतका राहील, तर दोन सेकंदानंतर सुमारे ९८० मीटर इतकाच राहील. गुरुत्वाकर्षणामुळे हे त्वरण निर्माण होते. मात्र पृथ्वीपासून दूर जातांजातां ते कमी कमी होत जाते. त्यामुळे एकादी वस्तू अतिशय वेगाने दूर फेकली तर ती जसजशी दूर दूर जात जाईल तसतसे तिचा वेग कमी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. कांही अंतर पार केल्यानंतर तो सेकंदाला ९ किंवा ८ मीटरनेच कमी होईल. असे करता करता कुठेतरी त्या वस्तूचा वेग कमी करण्याचे प्रमाण शून्याजवळ पोचेल. पण ती वेळ येईपर्यंत ती अधिकाधिक दूर जात राहील आणि त्या क्षणी तिचा जितका वेग असेल तितक्या वेगाने ती अनंतकाळापर्यंत पुढे जातच राहील. जर एकादी वस्तू दर सेकंदाला ११.२ किलोमीटर (एस्केप व्हेलॉसिटी) एवढ्या वेगाने आपल्या समुद्रसपाटीवरून आकाशात फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा वेग कमी होत होत कधीच शून्य होणार नाही आणि ती अनंत योजने दूर गेली असेल, याचा अर्थ ती खाली येणारच नाही, अवकाशातच भरकटत राहील. पण त्यानंतर तिचा पुढे जाण्याचा वेगसुध्दा शून्याजवळ पोचला असेल, त्यामुळे ती त्याच जागी स्थिर राहील किंवा अत्यंत धीम्या गतीने पुढे जात राहील, असे एक सोपे गणित करून सिध्द करता येते. आपण पृथ्वीपासून दूर जाऊन तिथून ही वस्तू आभाळात फेकली तर ही 'एस्केप व्हेलॉसिटी'ची
मर्यादा यापेक्षा कमी होईल.
अंतराळात यान पाठवण्यासाठी तयार करण्यात येणा-या योजनांच्या तपशीलासाठी अशा प्रकारच्या अनेक नियमांचा अभ्यास करावा लागतो. चंद्रयान हे या प्रकारचे एक अत्यंत विकसित असे वाहन आहे. त्याबद्दल आणखी थोडे पुढील भागात पाहू.
. . . . . . . . .. . . . . . . (क्रमशः)

Tuesday, January 27, 2009

स्वामीनारायण मंदिर


पूर्वीच्या काळी 'यात्रा' या शब्दाचा अर्थ बहुतेक वेळा 'तीर्थयात्रा' असाच व्हायचा. इतर कारणांसाठी त्या मानाने कमीच प्रवास होत असे. दळणवळणाची नवनवी साधने उपलब्ध झाल्यावर प्रवास सुलभ झाला. त्यानंतर यात्रेकरूंची संख्यासुध्दा शतपटीने वाढली आहे. पूर्वेला जगन्नाथपुरी, पश्चिमेला द्वारका , उत्तरेला बद्रीनाथ - केदारनाथ, वायव्येला अमरनाथ, ईशान्येला कामाख्यादेवी आणि दक्षिणेला रामेश्वर आणि कन्याकुमारी इथपर्यंत भारताच्या कान्याकोप-यातल्या विविध देवदेवतांचे दर्शन घेऊन आलेले कित्येक लोक अगदी आपल्या रोजच्या पाहण्यात असतात. भाविक लोक तुळजापूर किंवा पंढरपूरला मुद्दाम देवदर्शनासाठी जातात, पण सहज म्हणून सोलापूरला गेले तरी तिथल्या सिध्देश्वराच्या आणि बार्शीला गेले तर भगवंताच्या पाया पडून येतात. माझे सामान्यज्ञान एवढे चांगले नसेल, पण त्रिवेंद्रम शहरातच शेषशायी विष्णू भगवानाचे आणि विशाखापट्टणजवळ सिंहाचलम इथे नृसिंहाचे भव्य मंदिर आहे हे मी त्या गांवांत जाऊन पोचेपर्यंत मला ठाऊक नव्हते. पण तिथे गेल्यानंतर वेळ काढून त्यांच्या दर्शनाचा
लाभ घेऊनच परत आलो. घराजवळ असलेल्या कोठल्याही देवळात माझी हजेरी फारशी लागत नसली तरी काशी रामेश्वरासह बरीचशी तीर्थयात्रा मला कारणा कारणाने घडत गेली. इंग्लंडमधल्या लीड्स शहरात असतांना तितल्या एकमेव 'हिंदू टेंपल' ला मी जात असेच, शिवाय बर्मिंगहॅम इथे बांधल्या जात असलेल्या प्रति तिरुपती व्यंकटेशाचे दर्शनसुध्दा घडले. माझी गणना 'भाविकां'त होऊ शकत नसली तरी सुंदर मंदिरातले पवित्र आणि प्रसन्न वातावरण मला मोहित करते.
अल्फारेटाला आल्यानंतर अॅटलांटादर्शनाची सुरुवातच मी स्वामीनारायण मंदिरापासून केली. स्वामी नांवाची निदान दहा माणसे मला भेटली आहेत, नारायण नांवाची तर पंधरा वीस तरी असतील, एक नारायणस्वामी सुध्दा ओळखीचे आहेत, पण स्वामीनारायण हे नांव कोणाचे असलेले माझ्या ऐकण्यात आलेले नाही. नारायण म्हणजे विष्णूच्या राम आणि कृष्ण या अवतारांची तसेच विठ्ठल, व्यंकटेश किंवा बालाजी या रूपांची अनेक मंदिरे गांवोगांवी आहेत. वराह, नृसिंह आणि परशुराम या अवतारांची मंदिरे मी पाहिली आहेत, दिल्लीचे लक्ष्मीनारायण मंदिर बिर्लांच्याच नांवाने जास्त प्रसिध्द झाले आहे. स्वामीनारायणाची सुध्दा पन्नासावर मंदिरे भारतात आहेत, त्यातले एक सुंदर मंदिर दादरच्या मध्य रेल्वेच्या स्टेशनाच्या अगदी समोर आहे, पण कां कुणास ठाऊक, ते आम जनतेसाठी खुले नाही अशी माझी कदाचित चुकीची समजूत झाल्यामुळे मी त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न कधी केला नव्हता.
स्वामीनारायण मंदिराला जाण्यासाठी अल्फारेटाहून जॉर्जिया ४०० हायवेने निघून दक्षिणेकडे बरेच अंतर गेल्यानंतर अॅटलांटा शहराचा टोल नाका येण्यापूर्वीच आम्ही एक वेगळा रस्ता धरला आणि लिलबर्न गांव गांठले. कांही जुन्या पध्दतीचे बंगले आणि कांही नव्या इमारती यांचे मिश्रण या ठिकाणी आहे. अमेरिकेतल्या गांवातली सगळी घरे एकमेकांपासून दूर दूर विखुरलेली असलेली पाहण्याची आता संवय झाली आहे. त्यामुळे त्याचे आश्चर्य वाटत नाही. त्या परिसरातच एका विस्तीर्ण प्लॉटवर स्वामीनारायण
मंदिराचे भव्य बांधकाम केले आहे. हे मंदिर हल्लीच बांधले गेले असल्यामुळे आधुनिक नगररचना आणि वास्तुशिल्पशास्त्राचा चांगला उपयोग त्यात केलेला आहे. कार पार्किंगसाठी आजूबाजूला खूप मोठी मोकळी जागा सोडली आहे. त्याचा आणखी विस्तार चालला होता. वाहनांना जाण्यायेण्यासाठी रुंद रस्ते ठेवले आहेत. समोर एक पाण्याचा तलाव आहे. त्याच्या चारी बाजूने फिरायला पदपथ आणि बसायला आसने बनवून ठेवली आहेत. उरलेल्या सगळ्या जागेवर हिरवळ आहे, सांवली देणारे कांही वृक्ष आहेत आणि अनेक सुंदर फुलझाडांनी सारा परिसर सुशोभित केला आहे. एकंदरीन मनाला प्रफुल्लित करणारे वातावरण या जागी तयार केले आहे.
सभामंडप आणि गर्भगृहे वगैरेने युक्त असलेली मंदिराची मुख्य वास्तू बरेच उंचावर आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी सुंदर पाय-या चढून जावे लागते. पण पाय-यांच्या दोन्ही बाजूला खालच्या बाजूला अनेक खोल्या दिसतात. त्यामुळे मुख्य देऊळ दुस-या मजल्यावर आहे असे वाटते. पाय-या चढण्याच्या आधी बाहेरून मंदिराची छायाचित्रे घेण्याला परवानगी आहे, पण प्रवेश केल्यानंतर फोटो किंवा व्हीडिओ शूटिंगला सक्त मनाई आहे. आंतल्या सुंदर मूर्तींची चित्रे स्वामीनारायणाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
मंदिराची इमारत छायाचित्रात बाहेरून जितकी सुबक दिसते त्याहूनही अधिक सुरेख ती आंतून दिसते. प्रत्येक खांबावर आणि छपरावर सुबक आणि रेखीव शिल्पकृती कोरल्या आहेत. त्यावर कलात्मक पध्दतीने टाकलेले प्रकाशाचे झोत रंग बदलत असतात. त्याने त्या शिल्पकृतींना अधिकच उठाव येतो. आंत ओळीने अनेक गाभारे आहेत. त्यातल्या तीन गाभा-यात राधाकृष्ण, शिव- पार्वती, गणेश, श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती आहेत आणि इतर ठिकाणी भगवान स्वामीनारायण यांच्या संप्रदायातील अक्षर पुरुषोत्तम महाराज, घनश्याम महाराज, हरिकृष्ण महाराज, ब्रम्हस्वरूप भगतजी महाराज, ब्रम्हस्वरूप शास्त्रीजी महाराज, ब्रम्हस्वरूप योगीजी महाराज आणि प्रगत ब्रम्हस्वरूप प्रमुख स्वामी महाराज यांच्या प्रतिमा आहेत. यातील पहिल्या तीन मूर्तींना सुंदर वस्त्राप्रावरणांनी विभूषवले आहे तर बाकीचे ब्रम्हस्वरूप स्वामी संन्यासाच्या वेषात दिसतात. पण एकंदरीत पाहता या मंदिरात पारंपरिक हिंदू देवतांपेक्षा स्वामीनारायण संप्रदायातील गुरूंना अधिक महत्व दिलेले दिसते.

या संप्रदायाची स्थापना दोनशे वर्षांपूर्वी झाली होती. सन १७८१ मध्ये रामनवमीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील छपैया या गांवी जन्मलेले घनश्याम पांडे यांनी लहानपणी वयाच्या अकराव्या वर्षीच घर सोडून दिले आणि नीलकंठ वर्णी हे नांव धारण करून सात वर्षे देशभ्रमण केले आणि योगसाधना केली. त्यानंतर ते गुजराथमध्ये स्थायिक झाले. रामानंद स्वामी यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांना सहजानंद स्वामी असे नामाभिधान मिळाले. त्यांच्या गुरूंच्या पश्चात ते उध्दव संप्रदायाचे प्रमुख झाले आणि आपल्या शिष्यवर्गाला स्वामीनारायण मंत्र सागितला. त्यानंतर तो संप्रदायच स्वामीनारायण संप्रदाय या नांवाने ओळखला जाऊ लागला तसेच सहजानंद स्वामीच स्वामीनारायण झाले. त्यांनी वेदांतातील वैष्मवधर्मात सांगितलेल्या तत्वांचा जनतेत प्रसार केला. अनेक ग्रंथ लिहिले, देवालये बांधली आणि मोठी शिष्यपरंपरा निर्माण केली. सन १८३० मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. ज्या कालखंडात महाराष्ट्रातली पेशवाई लयाला चालली होती त्या काळात ते गुजराथेतील जनसमाजाला परमार्थाचे मार्गदर्शन करीत होते.
गेल्या शतकातल्या त्यांच्या संप्रदायातल्या महाराजांनी त्याचा विस्तार जगभर केला आहे. अनेक देशात ते समाजोपयोगी कामे करताहेत आणि त्यासाठी निरनिराळ्या संस्था उभ्या केल्या आहेत. त्यांचे सर्वात दृष्य स्वरूपाचे काम म्हणजे त्यांनी या काळातली अप्रतिम अशी अनेक मंदिरे उभी केली आहेत. गांधीनगर आणि नवी दिल्ली येथील अक्षरधाम मंदिरे त्यांच्या सौंदर्याने आणि भव्यतेने नांवाजली गेली आहेत. अमेरिकेतसुध्दा त्यांनी सुंदर मंदिरे बांधली आहेत. त्यातलेच एक अॅटलांटाच्या जवळ आहे. या मंदिरात रोजची पूजा अर्चा वगैरे नित्यनेमाने होतच असते, शिवाय रविवारी मुले, स्त्रिया, पुरुष वगैरेंच्या प्रबोधनासाठी वर्ग चालतात. सर्व हिंदू सण सार्वजनिक रीत्या साजरे करतात त्यात येथील भाविक लोक उत्साहाने सहभाग घेतात. आजकालच्या प्रसिध्दी आणि संपर्कतंत्राचा चांगला उपयोग या कामात केला जातो. स्वामीनारायण मंदिराला भेट देऊन एक वेगळाच अनुभव आला.
या मंदिराबद्दल सचित्र माहिती खाली दिलेल्या संकेतस्थळावर दिली आहे.http://www.swaminarayan.org/globalnetwork/america/atlanta.htm
' ' " " ? ! :

Sunday, January 25, 2009

२६ जानेवारी


दर वर्षी या तारखेला आपण सगळेजण 'प्रजासत्ताक दिवस' साजरा करतो. पण खरेच करतो कां? आमच्या लहानपणी आम्ही या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असूं. त्या दिवशी पहाटे लवकर उठून अगदी सचैल अभ्यंगस्नान करून, स्वच्छ धुतलेले, शक्यतो नवे कपडे घालून, केसांचा कोंबडा काढून, हातात पाटीपुस्तके न घेता शाळेत जात असू. तिथले झेंडावंदन झाले की आमची प्रभातफेरी निघायची. प्रत्येक ओळीत चार चार मुलांच्या रांगेने ढोल, बिगुल व ड्रम्सच्या तालावर चिमुकली पावले टाकीत आमची वरात गांवातील प्रमुख रस्त्यावरून निघे. वाटेत ज्या मुलांची घरे लागत त्यांच्या घरातील सगळे तसेच इतरही लोक दाराशी किंवा गॅलरीत उभे राहून कौतुकाने आमच्याकडे पाहून हात हलवीत. आम्हीही ओळखीच्या लोकांना हात हलवून प्रत्युत्तर देत पुढे जात असूं. गांवातील सगळ्या शाळांच्या प्रभातफे-या शेवटी मामलेदार कचेरीच्या विस्तीर्ण प्रांगणांत जाऊन थांबत. तिथे पोलिसांची परेड होई व त्यानंतर कांही अधिका-यांची व स्थानिक पुढा-यांची भाषणे होत. त्यातील क्वचितच एखाद दुसरा शब्द ऐकू येई आणि अवाक्षरसुद्धा समजत नसे. उन्हातान्हात उभे राहून पोटात भूक लागलेली असायची. एकदाची भाषणे संपली की पेढा, बत्तासा, लिमलेट असा जो खाऊ हातात पडे तो तोंडात कोंबून घरी धूम ठोकायची. 'प्रजासत्ताक' किंवा 'गणतंत्र' या शब्दांचे अर्थ समजण्याचे ते वय नव्हते. त्यामुळे '२६ जानेवारी' हेच त्या तारखेला येणा-या दिवसाचे नांव ठरून गेले. जसा 'दसरा', 'गुढी पाडवा' तशीच '२६ जानेवारी' असायची.


नोकरीसाठी मुंबईला आल्यावर इथल्या दीपोत्सवाची माहिती ऐकली. इथे सुद्धा 'प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येच्या रात्रीची रोषणाई' असे कोणीसुद्धा म्हणत नसे. सगळेजण '२६ जानेवारीचे लाइटिंग' असेच म्हणत. ते लाइटिंग बघण्यासाठी एकाद दुस-या मित्रासोबत रात्री उशीरापर्यंत फोर्ट विभागातल्या रस्तोरस्ती फिरत असूं. सगळीकडे बघ्यांची भाऊगर्दी उसळलेली असायची. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या तर तुडुंब भरभरून यायच्याच, बसेस, विशेषतः दुमजली बसेस गच्च भरलेल्या दिसायच्या. दूरच्या उपनगरात राहणारे हजारो लोक मुलाबाळासह इकडे येऊन, फिरत्या उघड्या ट्रकमधून उभे राहून या रोषणाईची मजा लुटतांना दिसायचे. 'बॉंबे व्ही.टी.' (आताचे 'मुंबई सी.एस्.टी.') व 'चर्चगेट' रेल्वे स्टेशने, गेटवे ऑफ इंडिया, सचिवालय (आताचे मंत्रालय), महापालिका आदि सरकारी मालकीच्या इमारती तसेच ताजमहाल हॉटेल व अनेक खाजगी कंपन्यांची ऑफीसे दिव्याच्या दैदिप्यमान माळांनी उजळून निघायची. या रोषणाईची दरवर्षी एक स्पर्धा असते व आकर्षक रोषणाईला बक्षिस मिळते असेही म्हणत. त्या काळातील 'स्टॅनव्हॅक' ही परदेशी कंपनी उत्कृष्ट रोषणाईसाठी विशेष गाजली होती. जागतिक पातळीवरील हस्तांतरणानंतर तिचे नांव बदलून 'एस्सो' झाले आणि राष्ट्रीयीकरणानंतर 'हिंदुस्थान पेट्रोलियम' झाले. अजूनही ही प्रथा आणि चढाओढ सुरू असेल, कदाचित जास्तच प्रेक्षणीय झाली असेल, पण मुंबईत राहूनसुद्धा गेल्या दोन तीन दशकांमध्ये मी मात्र २६ जानेवारीला रात्रीच्या वेळी कधी तिकडे फिरकलो नाही यामुळे आता भूतकालातील आठवणी सांगत आहे. शासकीय वसाहतीत रहायला गेल्यावर तिथे २६ जानेवारीला झेंडावंदनाचा सार्वजनिक कार्यक्रम व्हायचा. तो पूर्णपणे ऐच्छिक असला तरी दरवर्षी नेमाने मी तेथे जात असे. ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर इतर हौशी कलाकार गाणी म्हणत. यानिमित्ताने अनेक मित्र व सहकारी एका ठिकाणी भेटत. त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा करून सावकाशीने घरी परतत असूं. दूरदर्शनवर राष्ट्रीय प्रसारण सुरू झाल्यावर २६ जानेवारीला दिल्लीला राजपथावर होणारी भव्य 'गणतंत्रदिन शोभायात्रा' व त्या वरील 'राष्ट्रपतींचे अभिभाषण' अत्यंत उत्सुकतेने पहायला सुरुवात केली. त्यामधील सजवलेले चित्ररथ, विविध राज्यामधील लोकनृत्ये करीत नाचणा-या कलाकारांचे तांडे वगैरे पहायला खूप मजा वाटायची. हळू हळू त्यांची संवय झाली. अजूनसुद्धा ते आवर्जून पहातो पण अनेक वाहिन्या सुरू झालेल्या असल्यामुळे हातातील रिमोटद्वारा त्यावर भ्रमण केल्याशिवाय करमत नाही.


आज आपला प्रजासत्ताक दिवस आहे, आज या देशात प्रजेचे राज्य सुरू झाले, त्यामुळे आपल्या हातात सत्ता आली आहे याचा आनंद, या देशाचे व स्वतःचे भवितव्य घडवणे आता आपल्या हाती आहे यामुळे आता सगळे मनासारखे आलबेल होणार आहे असा आशावाद या सगळ्यामध्ये कुठे दिसतो ? अजूनही आपण '२६ जानेवारी' च एका सणासारखी साजरी करत आहो असे कुठेतरी वाटत राहते.

Saturday, January 24, 2009

अल्फारेट्टा (भाग३)


माझ्यातला बारकासा संशोधकाचा जीन मला स्वस्थ बसू देत नव्हता. हिंडता फिरतांना मी अल्फारेट्टाचा सिटी हॉल शोधून काढला. त्याच्या जवळच एक वेलकम सेंटर आहे. तिथे एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या
खापरपणजीबाई बसल्या होत्या. मी भारतातून आलो आहे आणि मला अल्फारेट्टासंबंधी माहिती हवी आहे असे सांगताच त्यांनी माझे हंसून स्वागत केले आणि एका भिंतीकडे बोट दाखवून तिथे पहायला सांगितले.
अल्फारेट्टा, अॅटलांटा, जॉर्जिया, त्याच्या शेजारील इतर राज्ये अशा चढत्या भाजणीने अनेक स्थळांविषयीची त-हेत-हेची पत्रके त्या भिंतीवर टांगून ठेवली होती. त्यातली हवी तेवढी पाहून आणि वाटल्यास घेऊन जायला तिने मला सांगितले. भारतातली माणसे फारच हावरट असतात असे तिला वाटू नये म्हणून त्यातली अल्फारेट्टा व अॅटलांटाची माहिती असलेली चार पांच पत्रके वेचून काढून घेतली आणि त्या बाईंचे आभार मानून तिचा निरोप घेतला.
अल्फारेट्टाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे सगळ्यासंबंधी मला जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षाही
जास्त माहिती माझ्या पदरात पडली होती. आपल्या भारताला खूप प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. आपली संस्कृती अब्जावधी, कदाचित खर्व, निखर्व वगैरे वर्षे प्राचीन आहे असा 'वेदिक' शब्दावर जोर देणा-या लोकांचा गाढ विश्वास आहे. रूढ इतिहासानुसार सुध्दा ती कांही हजार वर्षे जुनी तर आहेच. त्या मानाने अमेरिकेचा इतिहास अलीकडच्या तीन चारशे वर्षांचाच आहे. अल्फारेट्टाची सध्याची वाढ तर फक्त गेल्या वीस पंचवीस वर्षात झालेली आहे. पण या शहराला दीडशे वर्षांचा इतिहास आहे याचा इथल्या मूळ रहिवाशांना मोठा अभिमान आहे. त्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे झाल्याबद्दल गेले वर्षभर इथे कांही कार्यक्रम होत आहेत. इथल्या कांही इमारतींना सुध्दा शंभर दीडशे वर्षांचा इतिहास आहे. त्या इमारती तितक्या जुन्या नसल्या तरी त्या जागेवर पूर्वी काय होते ते कोणीतरी नमूद करून ठेवलेले आहे.
या शहरातल्या जुन्या भागातल्या मैदानावर पूर्वी एक 'कँप ग्राउंड' होते. आजूबाजूचे शेतकरी आणि व्यापारी वेळीप्रसंगी त्या जागी जमून राहुट्या बांधून त्यात असावेत. ११ डिसेंबर १८५८ रोजी या शहराचे 'अल्फारेट्टा' असे नामकरण करण्यात आले आणि ते 'मिल्टन' कौंटीचे मुख्य ठाणे बनले. ग्रीक भाषेत 'अल्फा' हे पहिले मुळाक्षर आहे आणि 'रेट्टा' याचा अर्थ गांव असा होतो. म्हणजे हे इकडचे 'आदिग्राम' झाले. अमेरिकेतल्या या भागात राहणा-या रेड इंडियन आदिवासींच्या एका लोकगीतांमध्ये 'अल्फाराता' नांवाच्या एका मुलीचा उल्लेख आहे अशी या नांवाची दुसरी उपपत्तीही सांगितली जाते. त्यानंतर झालेल्या भयानक यादवी युध्दात अॅटलांटा हे मोठे शहरसुध्दा बेचिराख होऊन गेले होते तिथे या नव्या लहान गांवाचा काय पाड लागणार होता? इथल्या दुर्दैवी लोकांना लढाईच्या पाठोपाठ प्लेगच्या साथीने पछाडले. त्यातून झालेल्या हलकल्लोळातून सावरून गांवाने पुन्हा हळूहळू प्रगती केली. पण या भागात रेल्वेमार्ग नसल्यामुळे मोठी कारखानदारी वगैरे कांही फारशा जोमाने वाढली नाही. १९३० मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत मिल्टन कौंटीचे दिवाळे वाजायची पाळी आली होती. त्यावेळी बाजूच्या इतर कांही कौंटीजबरोबर तिलासुध्दा फुलटन कौंटीमध्ये विलीन करण्यात आले. अॅटलांटा हे मोठे शहर या कौंटीत असल्यामुळे अल्फारेट्टाचे महत्व संपले. पण अॅटलांटामध्ये जमा होणा-या संपत्तीतला कांही भाग त्याच्या विकासासाठी कामाला आला आणि त्यातून रस्तेबांधणीसारखी विकासाची कामे करण्यात आली.
इसवी सन १९८१ पर्यंत अल्फारेट्टा हे एक नगण्य असे आडगांव होते. त्यात हजारभर घरे होती आणि तेथील लोकसंख्या फक्त ३००० एवढीच होती. पण जुलै २००७ पर्यंत त्यातील घरांची संख्या वीसपटीने वाढून वीस हजारावर आणि अधिकृत लोकसंख्या ५० हजारावर गेली. ज्या गतीने याची वाढ चालली आहे ती पाहता आता ती साठ हजारांच्या घरात पोचलीसुध्दा असेल. या भागातली घरे, ऑफीसे, कारखाने, दुकाने, हॉटेले, शाळा, कॉलेजे वगैरे धरून दिवसा इथे सव्वा लाखावर माणसे असतात असा अंदाज आहे. ही बाकीची माणसे आजूबाजूच्या गांवातून रोज नोकरी, उद्योग, व्यापार वगैरेसाठी इकडे येतात की त्यातली कांही तात्पुरती इथे येऊन राहतात कोण जाणे. आज अल्फारेट्टा शहराचा विस्तार जवळ जवळ दहा किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद एवढ्या परिसरात पसरला आहे. जितकी मोठमोठी आणि अद्ययावत दुकाने इथे उघडली आहेत ती पाहता हे एक मोठे शहर असावे असेच वाटते. खेडे, नगर, शहर, महानगर वगैरे नांवांची इथे काय व्याख्या आहे ते समजत नाही. कारण अल्फारेट्टा शहराच्या सीमेतच वेगवेगळ्या नांवांची अनेक 'व्हिलेजेस' आहेत. त्यातले 'हेंडरसन' नांवाचे व्हिलेज आमच्या भागातच आहे, पण त्यात नुसते एकाहून एक सुरेख बंगलेच बंगले आहेत. दुकाने, चर्च, शाळा, चावडी, कट्टा, दवाखाना वगैरे कांहीसुध्दा नाही. त्याला 'खेडे' म्हणायचे तरी कसे? कदाचित 'व्हिलेज' हे नांव त्या कॉलनीला दिले असावे. पन्नास हजार वस्तीला इथे 'सिटी' म्हणतात आणि कशालाही 'टाउन'! अॅटलांटा महानगर, इतर कांही 'सिटीज', कांही 'टाउन्स' आणि घनदाट जंगल वगैरे सगळ्यांचा समावेश फुलटन कौंटीमध्ये होतो आणि या सर्वांशिवाय इतर कौंटी मिळून अॅटलांटा मेट्रोपोलिटन रीजन बनते. प्रशासनाच्या वेगवेगळ्या स्तरांच्या सीमा ठरवण्यासाठी हे सारे होत असणार.
संगणक आणि दूरसंचार प्रणालीच्या तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने सुरू झाल्यानंतर या भागाला अपूर्व असे महत्व प्राप्त झाले. मुबलक मोकळी जागा, शुध्द हवा व पाण्याची उपलब्धता, मोठा हमरस्ता वगैरेमुळे ह्यूलेट पॅकार्ड, एटीअँडटी यासारख्या अनेक कंपन्यांनी आपला विस्तार करण्यासाठी ही जागा निवडली. त्याबरोबर अनेक तरुण तंत्रज्ञ, कामगार वगैरे जगभरातून इथे आले आहेत. या शहरातील लोकांचे सरासरी वयोमान फक्त तिशीच्या घरात असल्यामुळे इथे उत्साही वातावरण आहे. इथल्या बाजारात हिंडतांना नाना वंशांचे लोक दिसतात, त्यात बरेच भारतीय सुध्दा असतात. रस्त्यातून जातायेतांना समोरून येणारा माणूस कोणत्याही वर्णाचा असला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करून हॅलो, हाय करूनच पुढे जातो, कोणीही थांबत मात्र नाही. पण तेवढ्यानेही बरे वाटते. एकंदरीत ही जागा आवडण्यासारखी आहे.

अल्फारेट्टा - भाग २इथली बरीच मंडळी हवामान पाहून आपल्या लहान बाळांना बाबागाडीत ठेवून फिरवून आणायला बाहेर पडतात. बाबागाडीला अमेरिकेत 'प्राम' न म्हणता 'स्ट्रोलर' म्हणतात. 'स्ट्रोलर' मधून फिरण्याच्या वयोगटातून प्रगतीपथावर गेलेली मुले रस्त्यातून दुडूदुडू पळत असतात. इथली काळी बदके (गूज पक्षी) रस्ता ही आपलीच मालमत्ता असल्यागत त्यावरून आरामात हिंडत असतात. अर्थातच सारे मोटार चालक धीम्या गतीने सावधगिरीने गाडी चालवतात. त्यांना याची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावर जागोजागी गतीरोधक बसवलेले आहेत. त्यामुळे संकुलाच्या अंतर्गत रस्त्यावरून पायी चालायला कसलीही अडचण किंवा भय वाटत नाही. पण गेटवर आल्याबरोबर समोर वीस पंचवीस मीटर रुंद रस्त्यावर दोन्ही दिशांनी सुसाट धांवणारी वाहने पाहून नवखा माणूस थोडा बिचकतोच.
अल्फारेट्टा शहराच्या मधून आरपार जाणारा जॉर्जियामधला मुख्य द्रुतगती महामार्ग सोडला तर इतर रामुख रस्त्यांच्या कडेला फूटपाथ बांधलेले आहेत आणि त्यावर तुरळक कां होईना, पण पायी चालणारे इन्वा क्वचित धांवणारे (जॉगिंग करणारे) लोक दिसतात. जवळ जवळ प्रत्येक लहान वा मोठ्या अस्त्यान्च्या जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नल आहेत. त्यातल्या प्रत्येक कोप-यावर एका छोट्याशा खांबावर आदचा-यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करणारी बटने असतात. तसेच त्यासंबंधींच्या सूचना थोडक्यात दिलेल्या असतात. ज्या दिशेने आपल्याला जायचे असते त्या दिशेकडे निर्देश करणारा बाण पाहून त्याखालचे बटन दाबायचे आणि रस्त्यापलीकडच्या दिव्याकडे पहात वाट पहात उभे रहायचे. एरवी या दिव्यावर केशरी रंगातला "थांबा" असे सांगणारा पंजा दिसतो, तो पांढरा झाला की लगेच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करायची. त्या दिव्याचा रंग पाच सात सेकंदात बदलून पुन्हा केशरी होतो. इतक्या कमी वेळात इथला कोणताही रुंद रस्ता क्रॉस करणे शक्यच नसते, पण काळजी करायचे कारण नाही. त्या दिव्यावर वीस, एकोणीस, अठरा . . . असे कमी होत जाणारे आंकडे दिसायला लागतात. तेवढ्या सेकंदात उरलेला रस्ता क्रॉस करून आपण पलीकडे सहज पोचतो. एकादा अपंग किंवा वृध्द जरी पोचू शकला नाही तरी सिग्नलवर उभी असलेली गाडी स्टार्ट करून त्याच्या अंगावर घालण्याएवढे कोणी दुष्ट नसतात.
इथल्या रहदारीचा आणि त्याच्या नियमांचा अंदाज आल्यानंतर मी निर्धास्तपणे दूरवर पायी फिरत जाऊ लागलो. हायवेवरील एक्झिटला जोडलेल्या मोठ्या रस्त्यांवर एटीअँडटी, एचपी यासारख्या मोठ्या कंपनींची विशाल कार्यालये, हिल्टन, हॉलिडे इन, मॅरियट वगैरेंच्या साखळीतली हॉटेले, वॉल मार्ट, कॉस्टको या सारखी
अस्ताव्यस्त पसरलेली दुकाने आणि इतर अनेक प्रकारची लहानमोठी ऑफीसे, दुकाने, गोदामे वगैरे आहेत.
मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग वगैरे अमेरिकन पद्धतीची हॉटेले आहेतच, मेक्सिकन, इटालियन, चिनी, जपानी, थाई आणि हो, भारतीय पध्दतीचेसुध्दा खाणेपिणे देणारी भोजनालये आहेत. या सगळ्याच व्यावसायिक संस्थांच्या इमारती आपल्याकडल्या तत्सम इमारतींपेक्षा खूप मोठ्या असतात. त्याशिवाय त्यांच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट किंवा चौपट जागा त्यांच्या आजूबाजूला कार पार्किंगसाठी राखून ठेवलेली असते. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमइतकी जागा फक्त इथल्या वॉल मार्टने व्यापून ठेवलेली आहे. यावरून त्याच्या आकारमानाची कल्पना येईल. या मोठ्या रस्त्यांच्या कडेला रहिवासी वस्ती कांही दिसत नाही. ज्या जागा अजून मोकळ्या आहेत तिथेसुध्दा बहुतेक करून नवी दुकाने आणि ऑफीसेस येणार असे दिसते.
या मुख्य रस्त्यांना येऊन मिळणारे जे लहान रस्ते आहेत, त्यांना पुढे जाऊन आणखी फाटे फुटतात आणि त्यांच्या बाजूला सुंदर एक दोन मजली बंगल्यांच्या रांगा किंवा अनेक फ्लॅट्स असलेल्या दोन किंवा तीन
मजल्यांच्या इमारती आहेत. त्यातही या भागात बंगल्यांची संख्याच जास्त दिसते. कांही ऑफीसांच्या आणि इमारतींना पाच सहा मजले असतील. याहून उंच अशी गगनचुंबी इमारत अद्याप अल्फारेट्टाच्या
परिसरात कोठे बांधलेली दिसत नाही. इकडच्या उंच झाडांना जागोजागी फुटलेल्या फांद्या एकमेकीपासून दूर जातांना दिसतात तशाप्रमाणे इथल्या लहान रस्त्यांना फुटलेले फाटे आणि त्यांच्या उपशाखा विस्तारतच जातात. त्यांना एकमेकांना जोडणारे रस्ते इथे अस्तित्वातच नाहीत. आमच्या संकुलातल्या मुख्य रस्त्यालासुध्दा चार जागी चार फाटे फुटलेले आहेत आणि ते पांचही रस्ते वळत वळत जाऊन वेगवेगळ्या इमारतींपाशी संपतात. अगदी टोकाच्या इमारतीपासून पलीकडल्या कॉलनीतले घर एका हांकेच्या अंतरावर आहे, पण दोन्हींच्या मध्ये उंच कुंपणे आणि घनदाट झाडी असल्यामुळे इकडून तिकडे जायचे झाल्यास सात आठ वळणे असलेला दोन तीन किलोमीटर लांब वळसा घालून आणि तीन चार ट्रॅफिक सिग्नल पार करून जावे लागेल. सरळ रस्त्याने किंवा पायवाटेने जिथे माणूस दहा सेकंदात पोचेल तिथे मोटारीने जायला निदान पांच मिनिटे लागतील. एवढे दूर अंतर चालत जायचा विचारच इथे कोणी करत नाही. अल्फारेट्टाच्या नव्याने बांधल्या गेलेल्या भागात असलेली ही अशा पध्दतीची नगररचना मी तरी यापूर्वी कोठेही पाहिली नव्हती. अॅटलांटा शहराच्या मुख्य भागातदेखील जगातल्या इतर शहरांसारखेच रस्त्यांचे जाळे विणलेले आहे.
अल्फारेट्टाच्या भूभागाचे आकाशातून सर्वेक्षण केले आणि जमीनीचा वापर कशा प्रकारे केला गेला आहे हे पाहिले तर जवळ जवळ ७५ टक्के भागावर जंगलच दिसेल. इकडचा सगळा डोंगराळ भाग असल्यामुळे इथे शेतीभाती किंवा बागबगीचेसुध्दा दिसत नाहीत, नुसतेच ताडमाड वाढलेले वृक्ष आणि कोठे कोठे जमीनीलगत पसरलेली हिरवळ किंवा झुडुपे, वेली वगैरे दिसतात. निदान पांच टक्के भागावर प्रशस्त रस्ते बांधून ठेवले आहेत, दहा टक्के जागांवर कारखाने, कार्यालये, दुकाने आणि त्यांचे पार्किंग लॉट्स असतील आणि उरलेल्या दहा टक्के जमीनीवर घरकुले, बंगले आणि हाउसिंग ब्लॉक्स वगैरे बांधले असतील. त्यातल्याही बहुतेक इमारती एक किंवा दोन मजल्याच्या असल्याकारणाने उंच झाडांच्या आड दडलेल्याच असतात. आता पानगळीमुळे झाडांचे रिकामे सांगाडे झाले आहेत, त्यामुळे रस्त्यावरून आता त्या दिसू लागल्या आहेत. इतकी विरळ वस्ती असलेला पण अद्ययावत सुखसोयी असलेला भाग मुंबईहून आलेल्या माणसाला अजबच वाटणार. या भागाला शहरी भाग म्हणावा की ग्रामीण तेच मला कळत नाही.
. . . . .. . . . . . . .. . . . . . .. . (क्रमशः)

Friday, January 23, 2009

अल्फारेट्टा - भाग १


मुंबईहून प्रत्यक्षात वानवडी किंवा हिंगणे बुद्रुक अशा ठिकाणी जायला निघालेला माणूस बहुधा "पुण्याला चाललो आहोत" असेच सांगतो आणि मेहरौली किंवा नोइडाला जाणारा गृहस्थ "दिल्लीला जायला निघालो आहे" असेच म्हणतो. त्याचप्रमाणे "आम्ही अॅटलांटाला जाणार आहोत" असेच मी भारतातल्या सर्वांना सांगितले होते. 'अल्फारेट्टा' या शब्दाचा उल्लेख केल्याने त्यातल्या कोणाला कांही बोध होण्याची शक्यता कमीच होती. या नांवाचे गांव कदाचित ग्रीस किंवा मॅसिडोनिया असल्या कोणा देशात असावे असेही कोणाला वाटण्याची शक्यता होती.
इतरांचे सोडा, मला स्वतःलासुध्दा 'अल्फारेट्टा' या नांवापलीकडे त्या जागेची यत्किंचित माहिती नव्हती.
अॅटलांटा या महानगराचे ते मुंबईच्या भांडुप किंवा विक्रोळीसारखे आणि तेवढ्याच आकाराचे एक उपनगर असावे अशी माझी कल्पना होती. त्यात अॅटलांटा सुध्दा एक मुंबईसारखे महानगर असेल ही उपकल्पना समाविष्ट होती. पण तिथल्या विमानतळावर उतरल्यापासून जे दिसले ते सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे आणि अनपेक्षित असे होते. असा अनुभव मला यापूर्वी इंग्लंड किंवा युरोपातसुध्दा आला नव्हता. कोठल्याही मोठ्या शहराचा आधुनिक विमानतळ त्याच्या मुख्य वस्तीपासून दूरच असतो. मुंबईचा विमानतळ बांधल्यापासून साठसत्तर वर्षे त्याच जागी असल्यामुळे वाढत्या वस्तीने त्याला वेढा घातला आहे. यामुळे नवा विमानतळ दूर पनवेलला बांधायचा विचार चालला आहे. अॅटलांटाचा अत्याधुनिक आणि भव्य विमानतळ सुध्दा अपेक्षेनुसार उजाड अशा जागीच होता.
तिथून निघाल्यावर दोन तीन वळणे घेऊन आमची गाडी एका महामार्गाला लागली. थोड्या वेळाने शहरातल्या गगनचुंबी इमारतींची शिखरे क्षितिजावर दिसू लागताच आपण आता त्या शहरात प्रवेश करणार असल्याचे वाटले. पण त्या उत्तुंग इमारतींना कधी बाजूला ठेऊन तर कधी त्यांच्या खाली असलेल्या भुयारातून वाट काढीत आमची गाडी वाटेत कोठेही न थांबता फुल स्पीडने चालत राहिली. थोड्याच वेळात दोन्ही बाजूंना उंच झाडे असलेल्या रुंद रस्त्यावरून आमची वाटचाल चालू झाली. अधून मधून आजूबाजूला कांही अंतरावर थोड्या इमारती दिसत होत्या, पण शहरात असते तशी दाटीवाटीची वस्ती अशी कांही कोठे दृष्टीला पडली नाही. थोड्या वेळाने महामार्ग अधिकच प्रशस्त झाला आणि बाजूची वनराई तेवढी घनदाट होत गेली.
हा आठ पदरी महामार्ग आहे. त्यातल्या चार लेन एका दिशेला जाण्यासाठी आणि चार लेन विरुध्द दिशेने
जाण्यासाठी आहेत. हे परस्परविरुध्द दिशांना जाणारे मार्ग कधी एकमेकांच्या जवळ येतात तर कधी
एकमेकांपासून खूप दूर जातात, पण कुठेही एकमेकांना मिळत नाहीत. दोन तीन किलोमीटर अंतरावर उजव्या बाजूला एकादे एक्झिट यायचे, ते येण्यापूर्वीच आपली लेन बदलून रस्त्याच्या कडेच्या सर्वात बाहेरच्या लेनमध्ये आपली गाडी आणायला हवी. उत्तरेकडे जाणा-या वाहनचालकाचा विचार बदलला आणि त्याला मागे वळावे असे वाटले तर आधी गाडी बाजूला घेऊन पुढील एक्झिटमधून बाहेर पडून निदान एक दोन किलोमीटरचा वळसा घालून एकाद्या पुलावरून तो महामार्ग क्रॉस करून उलट दिशेने जाणारा परतीचा रस्ता त्याला धरावा लागेल. पूर्वीच्या काळातल्याप्रमाणे चौकाचौकात थांबून, रस्ता विचारून पुढे जाण्याचे दिवस आता अमेरिकेत राहिलेले नाहीत.

जॉर्जियामधल्या हॉस्पिटॅलिटी हायवेवरून बराच वेळ मार्गक्रमण केल्यानंतर आम्ही एक्झिट क्रमांक १० घेऊन थोड्या लहान म्हणजे चौपदरी रस्त्याला लागलो. थोडे दूर गेल्यानंतर पहिल्यांदा रस्त्याच्या बाजूला मेडिकल सेंटरची उंच इमारत दिसली. तिच्यातल्या वरच्या मजल्यांवर कदाचित राहण्याच्या जागाही असतील. त्यानंतर थोड्या थोड्या अंतराने कांही इमारती दिसत राहिल्या, पण त्यांच्या आजूबाजूला किंवा रस्त्यावर चालणारा एकही माणूस कांही दृष्टीला पडला नाही. रस्त्यावर शेकडोंनी वाहने जात होती, ती चालवणारी अर्थातच माणसेच होती.
दोन तीन मिनिटांनी आम्ही त्याहून लहान म्हणजे दुपदरी रस्त्यावर आलो. रस्त्याच्या एका बाजूला 'एटीअँडटी' नांवाच्या कंपनीची मोठी इमारत होती. ती पाचसहा मजले उंच असली तरी तिची लांबी आणि रुंदी त्याहून जास्त असल्याकारणाने ती आडव्या ठेवलेल्या एका कांचेच्या प्रचंड ठोकळ्यासारखी दिसते. तिच्या सर्व बाजूंने शेकडो, कदाचित हजारावर मोटारींचा गराडा पडलेला दिसत होता. पुढे गेल्यावर एका बाजूला शाळेची इमारत दिसत होती आणि दुस-या बाजूला एका लहानशा इमारतीत रेस्टॉरेंट आणि लाँड्री होती. म्हणजे मनुष्यवस्ती सुरू झाली होती. पुढे जाताच लगेच कांही बंगले दिसले आणि आमच्या वसाहतीची पाटी दिसली.
या वसाहतीच्या आंत शिरण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठीसुध्दा दोन वेगवेगळे रस्ते आहेत आणि त्यांच्या मधल्या जागेत फुलझाडांचे सुंदर ताटवे लावले आहेत. आंत गेल्यानंतर दोन्ही बाजूंना तीन मजली इमारती आहेत. प्रत्येक मजल्यावर पांचसहा सदनिका असलेल्या अशा पंधरावीस इमारतींच्या या संकुलात सुमारे तीन साडेतीनशे घरे असतील आणि घरटी सरासरी तीन माणसे धरली तर हजारापर्यंत मनुष्यवस्ती असेल. अशा प्रकारच्या संकुलांना इकडे 'कम्युनिटी' म्हणतात.
राहत्या घरांशिवाय इथे एक सुसज्ज असे जिम्नॅशियम आहे. त्यात जागच्या जागी उभे राहून चालण्याची किंवा वजन उचलण्याची आणि बसून पॅडल मारण्याची वेगवेगळी यंत्रे आहेत. 'व्यायामशाळा' म्हंटल्यावर मला कोल्हापूरकडच्या तालिमींची आठवण येते. तिथे असतात तसे मुदगल किंवा कुस्ती खेळण्यासाठी मातीचे हौदे इथे नाहीत आणि कोणीही इथे दंड बैठका काढत नाहीत.
जिमच्या बाजूला एक पोहण्याचा उथळ तलाव आहे. त्यात उडी किंवा सूर मारणे शक्य नाहीच आणि कोणी ठरवले तरी तेवढ्या पाण्यात बुडू शकणार नाही. अगदी लहान मुलांना डुंबण्यासाठी त्याहून उथळ असा वेगळा तलाव आहे. हिंवाळ्याच्या दिवसात मात्र ते बंद असतात.
एका ठिकाणी बीच व्हॉलीबॉल खेळण्याची सोय आहे. एका जाळीबंद मैदानात दोन मोठी टेनिस कोर्टे आहेत. क्वचित कधी शनिवारी किंवा रविवारी कांही लोक त्यावर टेनिस खेळतांना दिसले. इतर दिवशी कधी कधी तिथे कोणत्याही आकाराचा चेंडू घेऊन लहान मुले त्याच्या मागे धांवतांना दिसली. लहान मुलांना खेळण्यासाठी सुरेख घसरगुंड्या, बोगदे, झोपाळे वगैरे ठेवलेली खास प्ले एरिया आहेच.
आमच्या घराच्या पत्यामध्ये 'लेक युनियन हिल वे' असे रस्त्याचे नांव लिहिले होते. त्यामुळे एका बाजूला हिरवीगार टेकडी, दुस-या बाजूला एक विशाल सरोवर आणि त्याच्या कांठाकांठाने जाणा-या रस्त्यावर घरे
बांधलेली असतील असे एक चित्र माझ्या मनात तयार झाले होते. पण प्रत्यक्षात पाहता हा लहानसा रस्ता आमच्या कम्युनिटीच्या आत सुरू होतो आणि वळणे वळणे घेत जेमतेम अर्धा किलोमीटर जाऊन कम्युनिटीच्या आतच त्याचा डेड एंड होतो. त्याच्या नांवाची ठळक अक्षरात लिहिलेली पाटीसुध्दा नाही. एक छोटीशी पाटी कोठे तरी लावलेली असेल.
तिथे जवळपास कुठेही वेगळी टेकडी नव्हतीच. अल्फारेट्टा शहरच उंचसखल जागेवर वसलेले आहे, त्यामुळे रस्त्याला सारखे चढ उतार लागतात. इमारतींच्या मागच्या बाजूला एक वाकड्या तिकड्या आकाराचा लांबटसा खूप मोठा खळगा आहे. बहुधा तिथली दगडमाती खणून काढून घरे बांधण्याच्या जागी त्याची भर घातली असावी. अशा प्रकारे तयार झालेल्या 'तलावा'त पावसाचे पाणी भरते, त्यालाच 'लेक' म्हणायचे. अशी तळी इकडल्या बहुतेक सगळ्याच कम्युनिटीजमध्ये असतात.
उन्हाळ्याच्या दिवसात या तळ्यात कमळेसुध्दा फुलतात याची साक्ष देणारी सुकलेली झाडे दिसली. त्यात मधोमध एक कारंजा ठेवला आहे, तळ्यात सांचलेल्या पाण्याचे अभिसरण त्यातून चालत राहते. रात्रीच्या वेळी त्या कारंज्यावर प्रकाशाचे झोत सोडल्यामुळे ते मनोरम दिसते. वीस बावीस गूज पक्ष्यांचा थवा या तलावात विहरण करत असतो. त्यांना पाहतांना मजा वाटते. केंव्हा केंव्हा हे पक्षी रस्त्यावरसुध्दा येतात आणि ते जाईपर्यंत मोटारवाले त्यांना पहात स्वस्थ उभे राहतात. त्यांना पळवून लावण्यासाठी कोणीही कारचा हॉर्नसुध्दा वाजवत नाही.
कम्युनिटीमध्ये अनेक प्रकारची फुलझाडे तसेच मोठमोठे वृक्ष लावलेले आहेत. बहुतेक मोकळ्या जागेवर कृत्रिम हिरवळ लावली आहे. त्या सर्वांची निगा राखण्यासाठी वनस्पतीतज्ञांचे टोळके फिरतांना नेहमी दिसते. नवी झाडे लावणे, झाडांना खतपाणी घालणे, त्यांच्या फांद्यांची काटछाट करणे, लॉनला समतल करणे वगैरे कामे ते करतांना दिसतात. उन्हाळ्यानंतर इथल्या बहुतेक मोठ्या झाडांची पाने झडत असतात, म्हणून त्याला 'फॉल सीझन' असेच नांव आहे. रस्त्यावर जिकडे तिकडे पानांचा नुसता खच पडत असतो. सुकून गळलेली ही सगळी पाने बाजूला सारून गोळा करणे हे एक मोठे काम सगळीकडेच चाललेले असते. या सगळ्या कामासाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरलेली पहायला मिळाली.
कम्युनिटीमध्ये सारे कांही शांत शांत असते. इथे मात्र रस्त्यावरून चालणारी बरीच माणसे दिसतात. त्यात जगातल्या वेगवेगळ्या खंडातून आलेले सर्व वर्णांचे, सर्व वंशांचे लोक आहेत. पण ते आपापल्या लोकांचे घोळके करून त्यांच्यातच रमतात. वेगवेगळ्या लोकांनी एकत्र आलेले मी अजून तरी कधी पाहिले नाही. कदाचित ख्रिसमसमध्ये ती संधी मिळेल. इतकी माणसे इथे राहतात, पण कम्युनिटीच्या आवारात एकही दुकान नाही,
दूधवाले, पेपरवाले वगैरे रतीब घालणारे नाहीत की सामान घेऊन दारोदार फिरणारे विक्रेते नाहीत.
आपल्याकडल्यासारखी लहान लहान दुकाने मला इंग्लंडमध्ये दिसायची. त्यांना 'कॉर्नर शॉप' असे म्हणत.
दूध, चहा, ब्रेड, बिस्किटे, चॉकलेटे यासारख्या रोजच्या उपयोगाच्या वस्तू त्यात मिळायच्या. इथे मात्र
कोठलीही लहानसहान गोष्ट विकत घ्यायची असली तरी त्यासाठी मोटार काढून एकाद्या मोठ्या मॉलवर आवे लागते, किंवा इथले लोक जेंव्हा तिथे जातात तेंव्हा दिसतील तेवढ्या गरजेच्या वस्तू घरी आणून ठेवतात. 'किरकोळ व्यापारी' हा वर्ग निदान अमेरिकेच्या या भागातून नामशेष झाला आहे असे दिसते.
. . . . . . . . . .. . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, January 15, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ६


राणीच्या गांवाला आल्यानंतर राणीचा राजवाडा पहावा असे वाटणारच. इंग्लंडच्या राणीचे ऑफीशियल रेसिडन्स असलेल्या बकिंगहॅम पॅलेससमोर त्यामुळे नेहमीच प्रेक्षकांची झुम्मड उडालेली असते. त्या राजवाड्याच्या सुबक गेटामधून आतली भव्य वास्तू आणि तिच्या अंवतीभंवतीचा नीटस बगीचा दिसतो, पण राणीच्या नखाचेसुद्धा दर्शन घडत नाही. ते कसे घडणार? एकाद्या चाळीतल्या त्यांच्या वयाच्या राधाबाई दिवसातून केंव्हा तरी मिरच्या कोथिंबिर आणण्यासाठी नाहीतर मुरलीधराच्या देवळात चाललेले कीर्तन ऐकण्यासाठी बाहेर पडतांना गेटवर दिसतील. तशी इंग्लंडची राणी थोडीच पावलोणी आणायला नाही तर पाद्रीबाबांचे प्रवचन ऐकायला राजवाड्याच्या बाहेर पडणार आहे? पूर्वीच्या काळात राणीसरकारांच्या पुढे त्यांच्या आगमनाची वर्दी देऊन रस्ता मोकळा करून देणारे भालदार चोपदार आणि मागे त्यांच्या लांबलचक झग्याचा सोगा उचलून धरणा-या दासी असत. आता बुलेटप्रूफ गाड्यांच्या काफिला तिच्या गाडीच्या आगेमागे असतो.


बकिंगहॅम पॅलेसांत तब्बल सात आठशे खोल्या आहेत. त्यातल्या अत्यंत सुरक्षित आणि निवांत भागात राजपरिवाराचे वास्तव्य असते. त्यांना हवे ते तत्क्षणी आणून देण्यासाठी सेवकांचा ताफा सज्ज असतो. राजवाड्याच्या इतर भागांत वेगवेगळी कार्यालये आणि दिवाणखाने आहेत, तसेच पाहुण्यांची आणि नोकर चाकरांची व्यवस्था होते. निरनिराळ्या प्रसंगानुसार तिथे होणा-या मेजवान्यांमध्ये दर वर्षी पन्नास हजाराहून अधिक लोक सहभागी होतात. त्यातल्या अगदी खास प्रसंगी बोलावल्या गेलेल्या मोजक्या लोकांनाच प्रत्यक्ष राणीला पहायला मिळत असेल.


बकिंगहॅम पॅलेसच्या एका गेटासमोर पुरातन वेषातले रखवालदार घोड्यावर स्वार होऊन बसलेले असतात. हे रॉयल गार्डस या ठिकाणी शोभेसाठी असले तरी ते खरोखरचे सैनिक असतात. नियमितपणे कवाईत करून त्यांनी उत्कृष्ट शरीरसंपदा कमावलेली आणि राखलेली असते. पण ते इतके निश्चल असतात की त्यांच्या डोळ्य़ाची पापणी देखील हलत नाही. अशा प्रकारची समाधी लावल्याने काय साध्य होत असेल? तिकडे मादाम तुसाद म्यूजियममध्ये सजीव माणसासारखे भासणारे मेणाचे पुतळे ठेवले आहेत आणि इथे तडफदार जीवंत सैनिक पुतळ्यासारखे स्तब्ध असतात. या साहेब लोकांचे आपल्याला तर कांही कळतच नाही! या गार्डांची पाळी ठरलेली असते. ठराविक वेळेस ते बदलले जातात. त्याचाही साग्रसंगीत समारंभ असतो. त्यात या सैनिकांची परेड पहायला मिळते. ती पाहण्यासाठी इथे खूप मोठी गर्दी जमते.


याशिवायही लंडनमध्ये पर्यटकांना पाहण्यासारख्या खूप जागा आहेत. टॉवर ब्रिज, वेस्टमिन्स्टर, बिग बेन, पिकॅडेली सर्कस, डाउनिंग स्ट्रीटवरचे पंतप्रधानांचे निवासस्थान, ट्रॅफल्गार स्क्वेअर, सेंट जॉल्स कॅथेड्रल, हाइड पार्क, व्हिक्टोरिया आणि आल्बर्ट म्यूजियम, मार्बल आर्च इत्यादी जागा जास्तच लोकप्रिय आहेत. लंडन आय नांवाच्या प्रचंड चक्रात बसून लंडन शहराचे विहंगम दृष्य पाहता येते. चाळीस मजली गगनचुंबी इमारतींपेक्षासुद्धा उंचवर झोका घेणारे हे चक्र हळू हळू फिरत अर्ध्या तासात एक आवर्तन पूर्ण करते. सायकलच्या चाकाच्या आकाराचे हे चक्र बनवण्यासाठी सतराशे टन एवढे लोखंड वापरले गेले आहे. त्याला बत्तीस कॅपसूल्स जोडली आहेत आणि प्रत्येक कॅपसूलमध्ये पंचवीस प्रवासी बसू शकतात. अशा प्रकारे एका वेळेस चारशे पर्यटकांना घेऊन हे चक्र फिरत असते. चक्र हळूहळू फिरत असल्यामुळे ते चालू असतांना प्रवाशांना कॅपसूलमध्ये उठून हिंडतफिरत हवे ते दृष्य पाहता येते आणि त्याचे फोटो काढता येतात.


टॉवर ऑफ लंडनपासून जवळच थेम्स नदीवर टॉवर ब्रिज आहे. त्याचा मधला भाग पाहिजे तेंव्हा फिरवून तिरकस उभा करता यावा आणि नदीतून जहाजांना प्रवास करता यावा अशा रीतीने याची रचना केली आहे. यासाठी दोन उंच टॉवर बांधलेले आहेत. या पुलावरून प्रचंड वाहतूक होत असल्यामुळे बहुतेक वेळा ती सुरू असते. पण आवश्यकता पडल्यास त्याचा मधला भाग फिरवून जलवाहतूकीचा मार्ग मोकळा करता येतो. ते करण्याची यंत्रसामुग्री शाबूत ठेवलेली आहे.


ट्रॅफल्गार स्क्वेअर हा एक छानसा चौक आहे. अनेक कारंजे आणि पुतळे यांनी सजवलेल्या याचौकात एक दीडशे फूट उंच खांब असून तच्याच्या माथ्यावर अठरा फूट उंच असा नौसेनानी नेलसन याचा पुतळा आहे. ट्रॅफल्गारच्या युद्धात इंग्लंडने मिळलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा विजयस्तंभ उभा केलेला आहे. या चौकात शेकडो कबूतरे पहायला मिळतात हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

Wednesday, January 14, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ५


राजाबाई टॉवर, आयफेल टॉवर वगैरे नांवावरून टॉवर म्हणजे एक उंचच उंच इमारत असणार असे वाटते. हल्ली बांधलेल्या कांही गगनचुंबी इमारती 'मित्तल टॉवर', रहेजा टॉवर' यासारख्या नांवांने ओळखल्या जातात. पण टॉवर ऑफ लंडनच्या गेटपाशी आल्यानंतर देखील जवळपास कुठेच कोणताही मनोरा दिसत नाही. मुंबईच्या फोर्ट भागात आता कुठे किल्ला दिसतो? पण दोनतीनशे वर्षांपूर्वी कधीतरी ब्रिटिशांनी त्या भागात किल्ला बांधला होता असा इतिहास आहे. टॉवर ऑफ लंडनमध्ये आपल्या अपेक्षेतला टॉवर नसला तरी त्या जागी एक अतीशय जुना किल्ला आहे आणि आजसुद्धा त्याचे बुरुज, तटबंदी वगैरे तिथे दिसतात. या किल्ल्यात असलेल्या सगळ्याच वीस पंचवीस इमारती 'अमका तमका टॉवर' या नांवाने ओळखल्या जातात. आजच्या काळात त्या फारशा उंच वाटणार नाहीत, पण पूर्वीच्या काळातल्या सामान्य इमारतींच्या मानाने त्या उंचच असणार. इथून जवळच 'टॉवर हिल' या नावाचे रेल्वे स्टेशन आहे ते तर चक्क जमीनीच्या खाली आहे आणि आसपास कोठे लहानशी टेकडीसुद्धा नाही. हा आणखी एक विनोद!


या किल्ल्याच्या आंत मध्यभागी व्हाईट टॉवर नांवाची चार मजली भव्य इमारत आहे. अकराव्या शतकातल्या विलियम दि कॉँकरर या राजाने ती बांधली. आज नऊशे वर्षानंतरदेखील ती सुस्थितीत ठेवलेली आहे. इंग्लंडच्या राजांच्या कित्येक पिढ्या या महालात राहिल्या. इतर महालात देखील कोणी कोणी राहून गेले किंवा अनेक ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या. कोणा राजपुत्राला कोठे बंदीवासात ठेवले होते तर कोणा राणीचा कोठे शिरच्छेद करण्यात आला. कोठे खजिना ठेवलेला असे तर कोठे शस्त्रागार होते. यातील कांही टॉवर्सचा उपयोग निरीक्षणासाठी केला जात असे तर कांहींचा संरक्षणासाठी. त्या किल्ल्यात फिरतांना तिथले मार्गदर्शक याबद्दल अनेक सुरस कथा सांगतात, पण मुळात इंग्लंडचा इतिहासच माहीत नसेल आणि त्यात कांही स्वारस्य नसेल तर त्यातले किती समजणार आणि किती लक्षात राहणार? हे मार्गदर्शकदेखील इतिहासकाळातला पोशाख घालून येतात. ते पाहतांनाच गंमत वाटते.


वेगवेगळ्या इमारतींमध्ये त-हेत-हेची संग्रहालये आहेत. कुठे बाराव्या तेराव्या शतकातले संपूर्ण वातावरण तयार केले आहे, कुठे पोशाख, तलवारी, बंदुका, चित्रे, हस्तलिखिते वगैरे वगैरे मांडून ठेवलेले आहेत. यातील सर्वातच महत्वाचे संग्रहालय तेथल्या रत्नखचित मुकुटांचे आहे. 'दि क्राउन ज्युवेल्स' या नांवाने प्रसिद्ध असलेल्या या प्रदर्शनात इंग्लंडच्या सर्व आजी व माजी राजाराण्यांनी वेळोवेळी धारण केलेले मुकुट अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवले आहेत. यातल्या एका मुकुटात जगप्रसिद्ध कोहिनूर हा हिरा बसवलेला आहे. मुकुटमणी असलेल्या या हि-याखेरीज दोन हजार अन्य हिरे, माणके, पांचू आदि रत्नांनी हा मुकुट सजवलेला आहे. असे अनेक मुकुट या ठिकाणी आहेत, पण या मुकुटाची सर अन्य कोणाला नाही. हे प्रदर्शन पहाण्यासाठी खूपच गर्दी असते आणि जेंव्हा पहावे तेंव्हा त्या इमारतीसमोर लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. भारतातून आलेले पर्यटक हा मुकुट आवर्जून आणि निरखून पाहतात आणि इंग्रजांच्या नांवाने खडे फोडतात.

Tuesday, January 13, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ४


मादाम तुसाद यांचे संग्रहालय हे लंडन शहराचे एक प्रमुख आकर्षण आहे. 'अनुपम', 'अद्वितीय' यासारखी विशेषणेसुद्धा त्याचे वर्णन करायला अपुरी पडतात. दोनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या मादाम तुसाद यांचे पूर्वीचे नांव मेरी ग्रोशोल्ज असे होते. मेणाचे मुखवटे आणि पुतळे तयार करण्याची कला त्यांनी डॉ.फिलिप कर्टियस यांच्याकडून शिकून घेतली. त्यांचे स्वतःचे कौशल्य आणि कल्पकता यांच्या जोरावर या कलेत त्या पारंगत झाल्या. अनेक तत्कालीन थोर व्यक्तींचे हुबेहूब मेणाचे पुतळे त्या दोघांनी मिळून बनवले आणि त्यांचे प्रदर्शन मांडले. त्या काळात सिनेमा व टेलिव्हिजन नसल्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचे चेहेरे पाहण्याचे साधन नव्हते. ते कसे दिसतात याचे कुतुहल सर्वसाधारण लोकांच्या मनात असायचे, पण थोरामोठ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकत नसे. यामुळे या मेणाच्या पुतळ्याच्या संग्रहाला भेट देऊन ते आपली औत्सुक्याची तहान भागवून घेत असत. मेरीच्या कौशल्याची कीर्ती फ्रान्सच्या राजवाड्यापर्यंत पोचली आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा तयार करण्याचे काम तिला मिळाले.


त्याच काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्यात ज्यांचा शिरच्छेद झाला होता अशा व्यक्तींच्या चेहे-यांचे मुखवटे बनवण्याचे काम तिला देण्यात आले. त्यासाठी मुडद्यांचे ढीग उपसून त्यातून ओळखीचे चेहेरे शोधून काढण्याचे भयानक काम तिला करावे लागले. राज्यक्रांतीनंतर सुरू झलेल्या अराजकाच्या काळात या दिव्यातून जात असतांना तिलाच अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. मेरीचाही गिलोटीनवर शिरच्छेद होणार होता. पण कोणा दयाळू माणसाच्या कृपेने ती कशीबशी तिथून निसटली. तुसाद नांवाच्या गृहस्थाबरोबर विवाह करून तिने संसार थाटला. त्यानंतरही तिच्या अंतरीची कलेची ओढ तिला नवनव्या कलाकृती बनवण्याला उद्युक्त करत होती आणि डॉ.कर्टिस यांच्या निधनानंतर त्यांचे सारे भांडार तिच्या ताब्यात आले होते.


फ्रान्समधील अस्थिर वातावरणापासून दूर ब्रिटनमध्ये जाऊन आपल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन करायचे तिने ठरवले. त्यासाठी ती तिथे गांवोगांव हिंडत होती. एवढ्यात फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात युद्ध जुंपल्यामुळे तिचा परतीचा मार्ग बंद झाला. अखेरीस ती लंडनमध्येच स्थाईक झाली आणि तिथे तिने कायम स्वरूपाचे प्रदर्शन भरवले. हे प्रदर्शन इतके लोकप्रिय झाले की मादाम तुसादच्या निधनानंतरदेखील नवे कलाकार तिथे येत राहिले, मेणाच्या बाहुल्या बनवण्याचे तंत्र शिकून त्या प्रदर्शनात भर घालत राहिले. मादाम तुसाद हयात असतांनाच एकदा त्यांच्या कलाकृतीसकट त्यांची बोट बुडाली होती. नंतरच्या काळात एकदा त्यातले अनेक पुतळे आगीत जळून खाक झाले होते आणि दुस-या महायुद्धात झालेल्या बॉंबहल्यात या प्रदर्शनाची इमारत उध्वस्त झाली होती. अशा प्रकारच्या संकटातून हे प्रदर्शन पुन्हा पुन्हा सावरले. नष्ट होऊन गेलेल्या पुतळ्यांच्या जागी त्यांच्या प्रतिकृती तयार करून उभ्या केल्या गेल्या आणि त्यांत नवी भर पडत राहिली.


या प्रदर्शनातले बहुतेक सर्व पुतळे मानवी आहेत आणि पूर्णाकृती आहेत. रस्त्यांमधल्य़ा चौकात उभे केले जाणारे पुतळे आकाराने जास्तच भव्य असतात तर घरात ठेवल्या जाणा-या प्रतिमा लहान असतात. या प्रदर्शनातले पुतळे मात्र अत्यंत प्रमाणबद्ध आणि बरोबर आकाराचे आहेत. त्यामुळे ती खरोखरची माणसेच वाटतात. दगड किंवा धातूंना आकार देण्यासाठी जितके परिश्रम करावे लागतात त्या मानाने मऊ मेणाला हवा तसा आकार देणे सोपे असेल, पण त्यावर हुबेहूब माणसाच्या त्वचेसारख्या रंगछटा चढवणे, चेहे-यावर भाव आणणे वगैरे गोष्टी करतांना सगळे कौशल्य कसाला लागत असेल. ते करणा-या कारागीरांना विशेष प्रसिद्धीसुद्धा मिळत नाही. या प्रदर्शनात ठेवले गेलेले पुतळे फक्त त्या माणसाचे दर्शन घडवीत नाहीत. त्याची वेषभूषा, केशभूषा, त्याच्या अंगावरले अलंकार इत्यादी प्रत्येक गोष्ट अगदी सूक्ष्म बारकाव्यांसह सादर केलेली असते. ते पुतळे असले तरी नुसतेच 'अटेन्शन'च्या पोजमध्ये 'स्टॅच्यू' झालेले नसतात. रोजच्या जीवनातल्या सहजसुंदर असा वेगवेगळ्या मुद्रांमध्ये ते उभे केले आहेत.


प्रदर्शनात अनेक दालने आहेत. कोठे ऐतिहासिक व्यक्ती आहेत. आठव्या हेन्रीसारखे जुन्या काळातील राजे आहेत तर चर्चिल व हिटलरसारख्या मागल्या शतकातील प्रसिद्ध लोक आहेत. आजच्या राणीसाहेबा त्यांचे पतिदेव व मुलेबाळे, लेकीसुनांसह या जागी उपस्थित आहेत. कुठे जगप्रसिद्ध नटनट्या आहेत तर कुठे खेळातल्या छानशा पोजमध्ये खेळाडू उभे आहेत. मादाम तुसादच्या संग्रहालयात पुतळा असणे हाच आजकाल प्रसिद्धीचा मानदंड झाला आहे. या सर्व दालनांत फोटो काढायला पूर्ण मुभा आहे. आपल्याला हव्या त्या महान व्यक्तीसोबत आपण आपला स्वतःचा फोटो काढून घेऊ शकता. कांही लोक इंग्लंडच्या राणीच्या खांद्यावर किंवा कंबरेभोवती हात ठेऊन आपली छबी काढून घेत होते ते मात्र मला रुचले नाही. अभिरुची म्हणून कांही हवी की नको?


या प्रदर्शनात जशा प्रसिद्ध व्यक्ती आहेत तसेच सर्वसामान्य लोकांचे पुतळेसुद्धा मोठ्या संख्येने या पुतळ्यांच्या गर्दीत दिसतात. ते पुतळे इतक्या खुबीने ठेवले असतात आणि सारखे इकडून तिकडे हलवले जात असतात की ते पुतळे आहेत की ती खरीच माणसे आहेत असा संभ्रम निर्माण होतो. एखाद्या बाकड्यावर कोणी म्हातारा पेपर वाचत बसला आहे, हांतात कॅमेरा धरून कोणी फोटो काढत उभा आहे अशा प्रकारचे हे पुतळे आहेत.


कांही खास दालनांमध्ये विविध प्रकारची दृष्ये उभी केली आहेत. त्यात चांगलीही आहेत आणि बीभत्स देखील आहेत. भयप्रद तसेच फक्त प्रौढासाठी राखीव विभाग आहेत. प्रसिद्ध घनघोर युद्धप्रसंग, भयानक दरोडेखोराचा हल्ला, तुरुंगात कैद्यांना दिल्या जाणा-या शारीरिक यमयातना वगैरेंची भीतीदायक चित्रे आपण अंधारातून पुढे जात असतांना अचानक दत्त म्हणून समोर उभी राहतात आणि आपली गाळण उडवतात. त्यासोबत कानठळ्या बसवणारे संगीताचे सूर असतातच. ते वातावरण अधिकच भयाण बनवतात.


मी हे म्यूजियम पहायला गेलो तेंव्हा अखेरीस एक टाईमट्रॅव्हलचा प्रयोग होता. वळणावळणाने जाणा-या एका गाडीच्या अगदी पिटुकल्या डब्यात प्रत्येकी दोन दोन प्रेक्षकांना बसवले. ती गाडी एका अंधा-या गुहेतून थेट व्हिक्टोरिया राणीच्या काळातल्या लंडनमध्ये घेऊन गेली. दहा पंधरा मिनिटे त्या काळातले रस्ते, दुकाने, माणसे, त्यांचे पेहराव, त्यांचे रोजमर्राचे जीवन यांचे दर्शन घडवून ती गाडी पुन्हा आजच्या युगात घेऊन आली. समोरच्या भिंतीवर या राईडमध्ये आमच्या नकळत काढलेले फोटो दाखवले जात होते. त्यातला आपल्याला हवा तो फोटो ताबडतोब छापून हांतात देण्याची सोय होती.


मादाम तुसादच्या म्यूजियमच्या शाखा इतर देशातही निघाल्या आहेत असे म्ङणतात. त्या किती प्रगत आहेत ते माहीत नाही. पण हे दोनशे वर्षे जुने संग्रहालयसुद्धा सतत बदलत असते, त्यात भर पडत असते. अशा प्रकारे ते अगदी अद्ययावत ठेवले गेले आहे.

Monday, January 12, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ३


हीथ्रो एअऱपोर्टहून मी ट्यूबने लंडनच्या मुख्य स्टेशनवर गेलो. बाहेरगांवी जाणा-या गाड्या तिथून सुटतात. माझ्या पुढच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि माझ्याकडचे सामान तिथल्या लॉकरमध्ये ठेऊन दिले. त्या जागेला तिथे लेफ्ट लगेज असे म्हणतात. त्या काळात टेररिस्टांची भीती नसल्यामुळे सामान ठेवण्याची अशी व्यवस्था होती. आता असेल की नाही ते सांगता येणार नाही. अत्यावश्यक असे सामान खांद्याला
लोंबकळणा-या बॅगेत घेऊन मी पुन्हा ट्यूबने दुसरे एक स्टेशन गाठले. लंडन दर्शन घडवणारी बस तिथून घ्यायची होती.
लंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात
जागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने हे दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या जागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो. मी नेमके हेच केले.
या बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. मला तरी नेहमी निवेदिकाच भेटल्या. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती त्या अगदी हंसत खेळत देत होत्या. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, "या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे." ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि
हत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. अशा प्रकारच्या बसमधून मी अजून मुंबई दर्शन घेतले नाही. त्यामुळे इथे कशा प्रकारचे निवेदन करतात याची मला कल्पना नाही. पण लंडनची निवेदिका इथे आली तर आपल्या अगदी ओळखीचा असा हुतात्मा चौक पाहून सुध्दा आपण धन्य झालो असे ती आपल्याला वाटायला लावेल ! ही कॉमेंटरी आजूबाजूला दृष्टीला पडत असलेल्या जागांबद्दलच असल्यामुळे आपण एका जागी बसमधून खाली उतरलो आणि थोड्या वेळाने मागून येणा-या बसमध्ये बसलो तर निवेदिका बदलली तरी कॉमेंटरीमधील दुवा तुटत नाही.
लंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या बिग बसने प्रवास करून पहावा असे वाटते.

Sunday, January 11, 2009

राणीचे शहर लंडन - भाग २


माझ्या पहिल्याच परदेशाच्या वारीमध्ये लंडनला जाण्याचा योग जुळून आल्याने मला कांकणभर जास्तच आनंद झाला. जे लोक त्यापूर्वी लंडनला जाऊन आलेले होते त्यांना निघण्यापूर्वी जाऊन भेटलो. त्यांच्याकडून त्या शहराचा नकाशा, महत्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांची नांवे आणि भरपूर सूचना घेतल्या. त्या काळी इंटरनेट नसल्यामुळे अशा गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी बरीच शोधाशोध आणि मेहनत करावी लागत असे. अशी तयारी करून गेल्यानंतरसुद्धा प्रत्यक्षात हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर आता कुठून सुरुवात करावी आणि त्यासाठी नेमके काय करायला पाहिजे ते समजत नव्हते. त्या वेळेस माझा कोणी मार्गदर्शक माझ्यासोबत नव्हता. अखेर सरकारी मदतकेंद्राचीच मदत घ्यायचे ठरवले.
त्या काउंटरवर बसलेल्या उत्साही तरुणाने मला परम आश्चर्याचा धक्काच दिला. एक दोन मिनिटांत त्याने माझी गरज नेमकी जाणून घेतली, भराभर मला वेगवेगळे नकाशे काढून दिलेच, त्यांवर जागांच्या खुणा सुद्धा करून दिल्या एवढेच नव्हे तर रेल्वे आणि बसची तिकीटे देखील माझ्या हातात ठेवली आणि कसेकसे जायचे ते थोडक्यात समजावून पण सांगितले. या सगळ्या गोष्टी आणि पुरेपूर आत्मविश्वास घेऊन मी विमानतळाच्या तळघरातल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो.
मुंबईहून निघण्यापूर्वी मी लंडनच्या भुयारी रेल्वेची कीर्ती ऐकली होती. आता तिथल्या स्थानिक प्रवासाची सुरुवात त्या गाडीनेच केली होती. पण विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडतांनाती अजून जमीनीवरच होती. आसमंतातली हिरवळ सकाळच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन ताजी तवानी दिसत होती. अधून मधून घरे, कारखाने, गोदामे वगैरे दिसत होती. कांही काळ जमीनीवरून प्रवास केल्यानंतर जेंव्हा शहरातली दाट वस्ती सुरू झाली तेंव्हा मात्र आमची गाडी भुयारात घुसली.
लंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत 'ट्यूब' ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डशनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे प्रत्यक्षात त्या एकमेकींना कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो.
लंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात प्रवाशाला इच्छित स्थळी पोचता येते. बटन दाबल्यावर तिकीट छापून देणारी यंत्रे मुंबईच्या तिकीटांच्या खिडकीत पाहिली होती. लंडनला ती स्वयंचलित आहेत. त्यात मोठे नाणे टाकले तर उरलेले सुटे पैसे बाहेर येतात. आता बहुतेक लोक इंटरनेट व क्रेडिट कार्डाचाच वापर करत असल्याने पाहिजे ती तिकीटे इंटरनेटवर बुक करून क्रेडिट कार्ड वापरून त्याचा प्रिंटआउट घेता येतो. शहराच्या मध्यभागातले आंतले वर्तुळ किंवा बाह्य वर्तुळ यात सर्वत्र दिवसभर किंवा आठवडाभर चालू शकणारे पास काढायची सोय आहे.
लंडनच्या मेट्रोमध्ये पाहिलेल्या एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. धडधाकट माणसे तर त्यातून प्रवास करतातच, पण अपंग लोकसुद्धा व्हीलचेअरवर बसून या गाडीत चढू उतरू शकतात. महत्वाच्या स्टेशनांवर त्यांच्यासाठी खास लिफ्ट आहेत. त्यातून ते भूमीगत प्लॅटफॉर्मवर येजा करू शकतात. त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा पडत असल्या तरी चाकांच्या खुर्चीत बसून ते रोजच्या जीवनातील जवळजवळ सर्व गोष्टी करू शकतात, अगदी रेल्वेप्रवाससुद्धा!

Saturday, January 10, 2009

राणीचे शहर लंडन - भाग १


"पुसी कॅट पुसी कॅट व्हेअर हॅड यू बीन? आय हॅड बीन टु लंडन टु लुकॅट द क्वीन." आणि "लंडन ब्रिज ईज फॉलिंग डाऊन" अशासारख्या नर्सरी -हाइम्समधून मुलांची लहानपणीच लंडनशी ओळख होते आणि त्यांच्या मनात त्या मायानगरीबद्धल कुतूहल निर्माण होते. भारतातली सगळी संस्थाने त्यात विलीन होऊन गेल्यानंतर आता इथे कोणी राणीसाहेब उरलेल्या नाहीत. इंग्लंडमध्ये मात्र अजून एक नामधारी सम्राज्ञी राजसिंहासनावर बसलेली आहे. यू.के.चा सारा राज्यकारभार तिच्याच नांवाने हांकला जातो. तिथल्या नाण्यांवर आणि नोटांवर तिचे चित्र असते.

एका काळी ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. त्या काळी सर्व जगातील राजकीय आणि आर्थिक घडामोडीचे नियंत्रण लंडनहून होत असे. युद्धात जिंकलेली लूट, मांडलिक राजांच्याकडून घेतलेली खंडणी आणि व्यापारातला नफा अशा अनेक मार्गाने जगभरातल्या संपत्तीचा ओघ लंडनच्या दिशेने वहात होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेतला कांही भाग त्या नगरीच्या बांधणीमध्ये खर्च झाला आणि त्यातून तिथले विशाल प्रासाद आणि कलात्मक टोलेगंज इमारती उभ्या राहिल्या असतील. राजधानीचे शहर म्हणून तर लंडनचा दिमाख होताच. जागतिक व्यापाराचे केंद्र असल्यामुळे जगभरातील व्यापारी त्या शहराला भेट देत होते, त्यांनी आपल्या कंपन्यांची ऑफिसे तिथे थाटली. उच्च शिक्षणासाठी जगभरातले विद्यार्थी तिथे येऊन रहात होते. मोठमोठे विचारवंत, साहित्यिक, शास्त्रज्ञ, कलाकार वगैरेंनी लंडन ही आपली कर्मभूमी बनवली आणि तिचे सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. शंभर वर्षांहून अधिक काळ लंडन ही जगातल्या सा-या महानगरींची महाराणी होती असे म्हणता येईल.

लंडनचा इतिहास देखील रोमइतकाच जुनापुराणा आहे. पण प्राचीन काळात त्या शहराला विशेष महत्व नव्हते. रोम या शहराचे नांव कसे पडले याबद्दल दुमत नाही, पण लंडन शहराच्या नांवाची व्युत्पत्ती नेमकी कशी झाली याबद्दल दहा संशोधकांची दहा निरनिराळी मते दिसतात. जगभरात सगळीकडे प्राचीन कालापासून नद्यांच्या कांठावर वस्ती करून माणसे रहात आली आहेत. त्यांच्या आपसातील लढाया, लुटारूंचे हल्ले, रोगराई, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे त्यांच्या वस्त्या उजाड झाल्या आणि नव्या वस्त्या वसवल्या गेल्या. थेम्स नदीच्या कांठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळात मानवांनी वस्त्या निर्माण केल्या होत्या. आज लंडन शहर जेवढ्या विस्तृत भागात पसरले आहे त्यातल्या कित्येक जागी अशा प्रकारच्या पुरातन वस्त्यांचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ही प्रक्रिया शतकानुशतके चालू होती. त्याप्रमाणे अनेक खेडी या भागात वसवली गेली होती. लीड्स या छोट्या शहरातच पन्नासाहून अधिक
जुन्या काळातली खेडी सामावलेली आहेत तर लंडन या महानगरात मध्ये ती किती असतील?

रोमन साम्राज्याने इंग्लंडचा भागसुद्धा जिंकून घेतला होता आणि लंडनच्या भागात आपली छावणी बांधली होती. दळणवळणाची आणि संपर्काची साधने अत्यंत तुटपुंजी असलेल्या त्या काळात राजधानीपासून दूरवरच्या प्रदेशात जाऊन आणि सतत चालू असलेल्या लढायांमध्ये टिकाव धरून राहणे कठीणच असते. तेंव्हा रोमसारख्या मोठ्या इमारती त्या ठिकाणी बांधणे त्यांना कसे शक्य होणार? रोमन साम्राज्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर व्हायकिंग, नॉर्मन आदि लोकांनी ब्रिटनवर आक्रमणे केली आणि सॅक्सन लोकांबरोबर त्यांच्या लढाया होत राहिल्या. त्यात विजयी झालेल्या जेत्यांनी आपापल्या जहागिरी, परगणे आणि राज्ये जागोजागी स्थापन केली होती. कांही शतकांचा काळ गेल्यावर या सर्वांचे एकत्रीकरण झाले आणि ब्रिटनवर एकछत्री अंमल सुरू झाला.

मध्ययुगाच्या काळात युरोपखंडातल्या सगळ्याच देशांचा झपाट्याने विकास झाला आणि या क्रांतिकारक प्रगतीमध्ये ब्रिटन आघाडीवर राहिला. त्या देशाने युरोपमधला कोठलाही दुसरा भाग जिंकून घेतला नाही, पण आशिया, आफ्रिका, अमेरिका व ऑस्ट्रेलिया खंडांतले प्रचंड भूभाग आपल्या आधिपत्याखाली आणले. या सर्व कालखंडात ब्रिटनची राजधानी लंडन येथे असल्यामुळे ते जगातील अव्वल क्रमांकाचे शहर झाले.
. . . . . . . . .. . . (क्रमशः)

Friday, January 09, 2009

घोषणा

शहरातल्या रस्त्यावरून जोराजोरात घोषणा देत एक मोर्चा चालला होता.
xxx जिंदाबाद !
xxx मुर्दाबाद !
xxx की जय !
xxx आगे बढो, हम तुम्हारे साथ है !
हमारी माँगे पूरी करो, नही तो कुर्सी छोड दो!
हमसे जो टकरायेगा, मिट्टीमें मिल जायेगा !
नही चलेगी नही चलेगी, xxx नही चलेगी !
एक धक्का और दो, xxx को फेक दो!
xxx जिंदाबाद !
. . . . . .
. . . . . .
दुर्गम भागातील खेड्यातून नुकतेच आलेल्या एका अनभिज्ञ माणसाने विचारले, "हे सगळं
कशापायी चाललंया राव ?"
मोर्चातला माणूस उत्तरला, "एवढं माहीत नाही? आम्ही xxx ला विरोध करतो आहोत.
आमच्या मायभाषेवरील आक्रमण आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्हाला आपल्या
भाषेचा अभिमान असेल तर तुम्ही पण आमच्यात सामील व्हा."
"पन ह्ये समदं कंच्या भासेत वराडतायत ?" खेडुताने विचारले.

Thursday, January 08, 2009

पुणेरी सभागृहातील आचारसंहिता


पुण्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. "लग्न मंगल कार्यालयात होणार आहे" असेच सगळे लोक बोलतांना म्हणत होते. पण त्या जागेचे नांव 'मंगल कार्यालय' असे न ठेवता 'सभागृह' असे ठेवले आहे असे तेथे गेल्यावर कळले. म्हणजे त्यात चाललेले कार्य खरोखरच मंगल आहे की नाही हे कोणी विचारायला नको की एकादे अमंगल कार्य करण्याचा विचार कोणाच्या मनात आला तर त्याला उगाच आडकाठी नको. आंत गेल्यावर मात्र 'वधूपक्ष', 'वरपक्ष' वगैरे पाट्या खोल्यांवर लावलेल्या होत्या. गरज नसेल तेंव्हा ते त्या काढून ठेवत असतील. सभागृहात प्रवेश करतांनाच दरवाजापाशी ठळक अक्षरात एक आचारसंहिता लिहिलेली होती. त्यातील नियम खालीलप्रमाणे होते.
१. संध्याकाळी ५ वाजता कोणत्याही परिस्थितीत सभागृह १०० टक्के रिकामे करून दिलेच पाहिजे. ही गोष्ट सभागृहाचे बुकिंग करतांनाच लक्षात घ्यावी.
(संध्याकाळी ५ वाजता कोणी तेथे आढळल्यास त्याला बाहेर काढले जाईल आणि तेथे असलेले सामान जप्त केले जाईल कां? ज्याने बुकिंग केले असेल त्याला त्या वेळेस या नियमाची जाणीव करून देणे इष्ट आहे, पण बाकीच्या पाहुणे लोकांचे काय? बहुधा त्यांनी आपण होऊन शक्य तो लवकर आपला गाशा गुंडाळावा यासाठी ही जाहीर सूचना दिली असावी किंवा त्यांच्यापैकी कोणाला हे सभागृह भाड्याने घ्यायचे असल्यास त्याने या नियमाची नोंद आधीच घ्यावी म्हणून असेल.)
२. दुपारी ३ वाजतानंतर सीमांतपूजन, वाङ्निश्चय यासारखा कोणताही कार्यक्रम करू नये.
(संपूर्ण समारंभाचे वेळापत्रक तयार करून त्यावर संचालकांची आगाऊ संमती घेणे अधिक श्रेयस्कर!)
३. रात्री १०.३० नंतर गाणी, नाच, भेंड्या वगैरे कसलाही गोंगाट करू नये.
(सर्व पाहुणे मंडळींनी अळीमिळी गुप्पचिळी धरावी किंवा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून जावे!) आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो तिथे सकाळी उठूनच सभागृहात गेलो होतो त्यामुळे हा नियम आम्हाला लागू नव्हता.
४. सभागृहाच्या आवारात ताशे वाजंत्री किंवा बँड वाजवणे, तसेच फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. (लग्नाच्या अक्षता टाकल्यानंतर टाळ्या वाजवायला तरी परवानगी आहे की ज्याने त्याने आपापल्या हातरुमालाला हात पुसावेत?)
आम्ही सकाळी जरा लवकरच पोचल्यामुळे आम्हाला सकाळचा (उपवासाचा)अल्पोपाहार मिळाला. तो घेण्याची सोय वरच्या मजल्यावर केली होती. तिथल्या हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या ठिकाणी पाळावयाची वेगळी आचारसंहिता वाचली. त्यात लिहिले होते.
१. पंगतीमधील सर्व ताटे, वाट्या इत्यादी मांडून झाल्याशिवाय कोणीही खुर्चीवर बसू नये. (अर्थातच बसलेल्या माणसाच्या मागे येऊन कोणी उभेही राहू नये.)
२. कोणी आधीच येऊन बसल्यास त्याने स्वच्छता करण्याच्या कामात अडथळा आणू नये.
३. एक पंगत उठून गेल्यानंतर दुसरी पंगत बसण्यास १५ मिनिटे कालावधी लागेल.
४. आपण घाई केल्याने वेळ वाचत नाही.
५. सभागृहात जेवणासाठी बसण्याची कपॅसिटी वाढवता येणार नाही.
६. पंगतीत बसतांना कोणीही रिकामे पान सोडून बसू नये.
७. पंगतीमधील सर्व पाने भरल्याखेरीज सर्व्हिस सुरू होणार नाही. (आमच्या सुदैवाने हा नियम नाश्त्याच्या वेळेस लागू नसावा. त्यामुळे पंगत भरल्याशिवाय आम्हाला (सेल्फ) सर्व्हिस मिळाली.


यातली कोठलीच सूचना गैर म्हणता येणार नाही. पण ती लेखी स्वरूपात देण्याची गरज आहे कां ? पुण्याच्या लोकांना एवढा समजूतदारपणा नाही म्हणायचे की त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही? शिवाय एखादी गोष्ट लिहून ठेवली तर ती पाळली जातेच असे आहे कां?


लग्नाचा मुहूर्त चांगलाच उशीराचा होता. लग्न लावण्याचा हॉल त्या वेळेस माणसांनी गच्च भरला होता. प्रेशर कुकरची शिट्टी वाजताच त्यातून वाफ बाहेर पडावी तसे मंगलाक्षता पडताच अनेक लोक हॉलमधून बाहेर पडले. त्यातले बरेचसे लोक वरच्या मजल्यावर जेवणासाठी गेले असावेत. रिकाम्या झालेल्या दोन तीन खुर्च्या घेऊन आम्ही त्यांवर बसलो. जेवणाचा हॉल आकाराने खालच्या हॉलच्या एवढाच असल्यामुळे हॉलमधील सर्व लोकांनी पंगतीत बसायचे म्हंटले तर निदान चार आवर्तने झाली असती. पहिली पंगत आधीच भरलेली असणार. ती उठण्याची वाट पहात हॉलच्या बाहेर जिन्यात ताटकळत उभे राहण्याची आमच्यापैकी कोणाची तयारी नव्हती. आमच्या लहानपणी पंगती मांडल्यानंतर कोणीही आपण होऊन तिकडे जात नसे. एकेका माणसाला अदबीने बोलावून नेऊन पानावर बसवले जायचे. त्यातही प्रोटोकॉल कटाक्षाने पाळला जात असे. आता तो प्रघात शिल्लक उरला नसला तरी कोणीतरी "चला" म्हंटल्याशिवाय जागचे हलावेसे वाटत नाही. नाश्त्याच्या वेळेस वाचलेली पंगतीची आचारसंहिता पाहता जेवणासाठी आमचा नंबर लागेपर्यंत सभागृह १०० टक्के रिकामे करण्याची वेळ येईल असे दिसत होते. शिवाय लहान मुलांना हे नियम कसे समजावून सांगायचे हा प्रश्न होता. त्यापेक्षा आपण गुपचुप बाहेर जाऊनच थोडी क्षुधाशांती करून यावी असा विचार मनात आला. तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या जागीच हालचाल सुरू झाली. दोन सेवक मोठी घमेली घेऊन आले आणि दोघांनी ताटे वाट्यांच्या चळती आणल्या. ज्यांना पंगतीचा लाभ घेता येत नसेल त्यांच्यासाठी खालीच स्वरुचीभोग घेण्याची व्यवस्था केली जात असावी असे वाटले. चौकशी करता तिथे उपवासाचे पदार्थ मिळणार असल्याचे समजले. "अर्धम् त्यजति पंडितः" या उक्तीप्रमाणे "संपूर्ण उपाशी राहण्यापेक्षा साबूदाण्याची खिचडी खायला काय हरकत आहे?" असा विचार करीत असतांनाच एका मुलाने बातमी आणली की वरच्या मजल्यार बूफे लंच चालू आहे आणि दहा पंधरा मिनिटांनी तिथली गर्दी थोडी कमी झाली की आम्हाला जायला हरकत नाही.


दहा पंधरा मिनिटांनी आम्हीच एकमेकांना "चलता का?" असे विचारत वरचा मजला गाठला. पंगतीच्या आचारसंहितेचे प्रयोजन उरले नव्हते. रांगेत उभे असतांना बूफेसाठी नवी संहिता कशी लिहावी यावर एकमेकात चर्चा केली.
१. सर्वांनी शिस्तीने रांगेत उभे राहून आपला नंबर लागण्याची शांतपणे वाट पहावी. रांगेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये.
२. एका माणसाने एका वेळेस फक्त एकच ताट वाढून घ्यावे. दुस-या कोणासाठी न्यायचे असल्यास त्यासाठी वेगळा नंबर लावावा.
३. एका ताटात एकाच माणसाने जेवावे.
४. आपल्याला जेवढे अन्न खायचे असेल तेवढेच वाढून घ्यावे. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. त्याची नासाडी करू नये.
५. सगळे अन्नपदार्थ एकदमच ताटात वाढून घ्यावेत. ताटातला एक पदार्थ संपल्यानंतर दुसरा घ्यायचा असे करू नये.
६. हातात भरलेले ताट धरून रांगेत घुसतांना आपल्या किंवा इतरांच्या कपड्यांना डाग पडण्याचा संभव असतो हे लक्षात घेऊन एकादा पदार्थ दुस-यांदा घेण्यासाठी पुन्हा रांगेत यावे.


समस्त पुणेकर मंडळी या आचारसंहितेचा सम्यक दृष्टीकोनातून सखोल विचार करून लवकरच तिच्या पाट्या रंगवतील अशी आशा आहे.