मराठी भाषेत या शब्दांचा प्रयोग कुणी आणि कधी सुरू केला हे मला माहीत नाही. पण लहानपणी आमच्या लहान गावात हे शब्द ऐकल्याचे मला आठवत नाही. पुण्यामुंबईला आल्यावर मात्र 'मध्यमवर्गीय' हा शिक्का माझ्या कपाळावर बसला आणि तो अजूनही कायम आहे अशी माझी समजूत आहे. पण आता एका माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय मित्राने फेसबुकवर असे विधान केले आहे की हा वर्ग मोडीत निघाला आहे. मी गूगलवर शोधत असता मला एक ब्लॉग वाचायला मिळाला. त्यात त्या लेखकानेही असेच काहीसे सूतोवाच केले आहे.
पन्नाससाठ वर्षांपूर्वी मराठीतल्या कथा, कादंबऱ्या आणि सामजिक चित्रपटांमधले जे वातावरण दाखवले जात असे ते बहुधा मध्यमवर्गाचे असे. ते लोक एकदोन खोल्यांच्या लहान घरात रहायचे, कुठल्यातरी ऑफीसात (किंवा शाळेत) नोकरी करायचे, मुंबईत असले तर लोकलने आणि पुण्यात असले तर सायकलने नोकरीवर जायचे. त्यांना दोन वेळा पोटभर जेवण मिळत असे, पण ते जास्त चैन करू शकत नसत. खिशात पैसेच खुळखुळत नसल्यामुळे त्यांना साधेपणे राहणे क्रमप्राप्त होते. पण 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' यावर त्यांचा भर असायचा. त्यांना वाचनाचा दांडगा व्यासंग असायचा आणि सगळे जुने लेखक, कवी वगैरे माहीत असायचे. या वर्गाची काही परंपरागत मूल्ये होती, त्यांचे आदर्श होते. त्यात सर्वात महत्वाची गोष्ट काटकसर. कुठलीही वस्तू वाया घालवायची नाहीच. तिचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा. काही झाले तरी कर्ज काढायचे नाही हे दुसरे तत्व. 'ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत' हे चार्वाकाचे सांगणे त्यांना मान्य नव्हते. आधी काटकसरीने वागून थोडी बचत करायची. थोडी रक्कम जमा झाल्यानंतर त्यातली थोडीच खर्च करून नवी वस्तू विकत आणायची अशा रीतीने ते लोक काडीकाडीने संसार उभा करत असत. या वर्गातले लोक प्रामाणिक आणि सरळमार्गी असायचे. बहुतेक लोकांची विचारसरणी मात्र थोडी पुरोगामी होती. ते आपल्याला समाजाचे काँन्शन्सकीपर समजत असत. त्यांच्याबद्दल समाजाला आदर वाटत असे.
प्राचीन काळातल्या भारतातली समाजरचना चातुर्वर्णावर आधारलेली असावी असे सांगितले जाते. पुढे त्याचे रूपांतर जातीभेदांमध्ये झाले. खेड्यांमध्ये एकेका जातीचे लोक शक्यतो एका भागात आणि एकमेकांसोबत रहात असत. युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर मोठा कामगारवर्ग तयार झाला. मजूरांचे शोषण करून मालकवर्ग अधिकाधिक श्रीमंत झाला आणि मजूर गरीबच राहिले. जे लोक मालकांसारखे खूप श्रीमंत नाहीत आणि कामगारांसारखे गरीबही नाहीत अशा लोकांना मिड्ल् क्लास म्हंटले गेले. मजूरांचे हातावर पोट असल्यामुळे त्यांना रिकामा वेळच नसे आणि श्रीमंत लोक ऐशोआराम करण्यात सगळा वेळ घालवत. त्यामुळे बहुतेक विचारवंत, साहित्यिक, कलाकार वगैरे लोक मध्यम वर्गात तयार झाले आणि त्यांनी समाजाचे मार्गदर्शन केले.
इंग्रजांच्या राज्यात भारतातसुद्धा सरकारी काम, रेल्वे, पोस्ट, बँका आणि खाजगी कंपन्या वगैरेमध्ये काम करणारा एक पगारी नोकरवर्ग तयार झाला, तो मुख्यतः शहरांमध्ये रहात होता. तिथे उत्पन्नावर आधारलेली नवी समाजरचना होत गेली. गिरणीत आणि कारखान्यांमध्ये कष्टाचे काम करणारे कामगार हा गरीब वर्ग आणि मालक किंवा व्यापारी, सावकार वगैरे श्रीमंत लोक सोडून उरलेल्या लोकांचा समावेश मध्यमवर्गात होत गेला. यातले बहुतेक लोक खेड्यातल्या एकत्र कुटुंबातून बाहेर पडून नोकरीच्या जागी वेगळे रहायला लागले आणि तिथे देशाच्या निरनिराळ्या भागातून आणि बँकग्राउंडमधून आलेले लोक एकमेकांच्या शेजारी रहायला लागल्यामुळे त्यांचा दृष्टीकोन रुंदावत गेला. इंग्रजी भाषेतल्या साहित्याच्या वाचनाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. यातून इथला बहुतांश मध्यमवर्ग जरासा पुरोगामी विचारांचा झाला, पण त्यांनी लहानपणी झालेले संस्कारही जपून ठेवले. मी पन्नाससाठ वर्षांपूर्वी जेंव्हा शहरात रहायला आलो तेंव्हा मला अशी परिस्थिति दिसली. पुढे त्यात बदल होत गेले.
संघटित कामगारांनी एकजूट करून मालक आणि सरकारांवर दबाव आणला आणि ते आपल्या उत्पन्नांमध्ये वाढ करून घेत गेले. शिक्षणाचे प्रमाण वाढून त्यांच्या मुलांना अधिक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत गेल्या. कुटुंबनियोजनावर भर दिला जाऊ लागला. मोठ्या प्रमाणात महिलावर्ग नोकरी करायला लागला. या सगळ्यांमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या उत्पन्नात भर पडत गेली. आधीच्या काळात एका माणसाच्या तुटपुंज्या पगारावर घरातली आठदहा माणसे अवलंबून असत, त्याऐवजी घरात दोघे कमावणारे आणि खाणारी फक्त तीनचार तोंडे असे झाल्यानंतर त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होत गेली.
वाढत्या महागाईमुळे खर्चाचा ताणही वाढत गेला असला तरीही या मध्यमवर्गीयांचे राहणीमान सुधारतच गेले. सायकलवरून जाणाऱ्यांच्या मुलांनी स्कूटर किंवा मोटारसायकली घेतल्या आणि स्कूटरवाल्यांनी चारचाकी मोटारगाड्या घेतल्या. चाळीत राहणारे लोक हाउसिंग सोसायट्यांमधल्या फ्लॅटमध्ये रहायला गेले, एक दोन खोल्यांमध्ये रहाणारे काही लोक तीनचार खोल्यांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये रहायला लागले. पण असे झाले तरी ते सगळे लोक मध्यमवर्गीयच राहिले कारण श्रीमंत उद्योगपतींची श्रीमंती जास्तच वेगाने वाढत गेली. शहरांची वाढ होत असतांना आजूबाजूच्या गावांमधील जमीनमालकांना अव्वाच्या सव्वा भाव मिळाला आणि त्यामधून नवश्रीमंतांचा एक नवा वर्ग उदयाला आला. सिनेकलाकार, खेळाडू, राजकारणी वगैरे वर्गामधलेही अनेक लोक एकदम श्रीमंत झाले. सरळमार्गी मध्यमवर्गाची सुबत्ता आटोक्यात राहिली.
लोकसंख्येत झालेली भरमसाट वाढ आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे खेड्यापाड्यांमधून शहरात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली. शालेय आणि कॉलेजचे शिक्षण घेतलेल्या मुलांना शेतातली किंवा रानावनातली कष्टाची कामे करायची नव्हती. शेतीचेही यांत्रिकीकरण होत गेल्यामुळे शेतमजूरांना वर्षभर पुरेसे काम उरले नाही. त्यामुळे ती मुले ऑफिसमध्ये काम करण्यासाठी मोठ्या गावांमध्ये किंवा शहरात आली. त्यातल्या बऱ्याचशा लोकांची भर मध्यमवर्गामध्ये पडत गेली. वर लिहिल्याप्रमाणे शहरांमधल्या काही गरीब लोकांची आर्थिक परिस्थिति सुधारली आणि त्यांचीही भर मध्यमवर्गामध्ये पडली, पण ज्यांना ते जमले नाही, त्यांची परिस्थिती मात्र अधिकच वाईट झाली. चाळीतही जागा न मिळाल्यामुळे कित्येक लोक रस्त्यावर आले, झोपडपट्ट्यांची अमर्याद वाढ झाली. थोडक्यात सांगायचे झाल्यास अतिश्रीमंत आणि अत्यंत गरीब यांच्यामधील विषमतेची दरी वाढत गेली. देशाची एकंदर लोकसंख्याच वाढत जाऊन तिप्पटचौपट झाली. पण त्यातले मध्यमवर्गीयांचे प्रमाण अधिक वेगाने वाढत गेले.
माझ्या पहाण्यात म्हणजे गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये देशातल्या सगळ्याच समाजांमध्ये खूप बदल झाले. त्यात मध्यमवर्गीयांमधले बदल जरा जास्तच प्रमाणात झाले असावेत. अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा म्हंटल्या तर या तीनही बाबतीत माझ्या लहानपणी मी जसे जेवण करत होतो, जसे कपडे घालत होतो आणि जशा घरात रहात होतो त्यातले काहीच आज मी तशा पद्धतीने करत नाही, तरीही मी मध्यमवर्गीयच आहे कारण इतर माझ्या संपर्कातल्या सगळ्या इतर लोकांचीही राहणी तशीच बदलली आहे.
या काळात तंत्रज्ञानात झालेला बदल लक्षणीय आहे. आम्ही शेणाने जमीन सारवलेल्या मातीच्या घरात रहात होतो आणि जमीनीवरच फतकल मारून बसत होतो. फक्त जेवायच्या वेळी बसायला पाट घेत होतो आणि कोणी पाहुणा आला तर त्याला बसायला चटई किंवा जाजम अंथरत होतो. घरातला सगळा स्वयंपाक चुलीवर होत असे आणि त्यात लाकडे जाळून अग्नि पेटवला जात असे. स्वयंपाकघरात एकही यंत्र नव्हते आणि ते चालवण्यासाठी घरात वीजही नव्हती. आता हे सगळे चित्र पार बदलले आहे. घरांच्या भिंती सिमेंटकाँक्रीटच्या आणि जमीनीवर गुळगुळित लाद्या असतात, घरोघरी बसायला खुर्च्या, सोफा किंवा पलंग असतात आणि स्वयंपाकघरात गॅसची शेगडी आणि विजेवर चालणारे मिक्सर, फूड प्रोसेसर, ओव्हन वगैरे अनेक साधने असतात. त्यावर केले जाणारे खाद्यपदार्थही बदलले आहेत. आता परंपरागत मराठी खाद्य प्रकार कमी झाले आहेत आणि गुजराथी, पंजाबी, मद्रासी, चिनी, इटालियन, मेक्सिकन वगैरेंची भर पडली आहे. पू्वी फक्त धान्ये, भाज्या, फळे वगैरे शेतात पिकणारा कच्चा माल तेवढाच बाहेरून घरी येत असे. आता निरनिराळ्या प्रकारचे सरळ तोंडात टाकायचे तयार पदार्थ किंवा पटकन तयार करता येण्याजोगे सेमिकुक्ड पदार्थ आकर्षक आवरणातून आणले जात असतात आणि त्यांचा अन्नात समावेश होतो.
संगणक क्रांतीमुळे गेल्या वीस पंचवीस वर्षात प्रचंड ढवळाढवळ झाली आहे. पूर्वी अस्तित्वातच नसलेल्या असंख्य नव्या नोकऱ्या तयार झाल्या आणि त्यात काम करण्यासाठी वेगळ्या प्रकारची कौशल्ये शिकून घ्यावी लागली. मध्यम वर्गातल्या पुढल्या पिढ्यांमधल्या मुलामुलींनी हे आव्हान यशस्वी रीतीने पेलले. या लोकांतल्या बहुतेक जणांना कामानिमित्याने परदेशी जावे लागत होते. या काळात विमानवाहतूक स्वस्त आणि सोयिस्कर होत गेली. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या खूप वाढली. माझ्या संपूर्ण शालेय जीवनात माझ्या गावातून एकही माणूस परदेशी गेला नव्हता. वीस पंचवीस वर्षांपूर्वी परदेशी जाऊन आलेल्या आणि नंतर पुण्यात स्थायिक झालेल्या एका माणसाचे केवढे कौतुक होत होते. आता माझ्या पिढीतले बहुतेक सगळे लोक ते गाव सोडून शहरांमध्ये गेले आहेत, पण त्यातल्या निम्म्याहून जास्त लोकांची मुले परदेशभ्रमण करून परत आली आहेत किंवा तिकडेच रहात आहेत. पाश्चिमात्य जगाशी होत असलेल्या या वाढत्या संपर्कातून होणाऱ्या देवाणघेवाणीमुळेही आमची जीवनशैली पार बदलली आहे.
आधीच्या पिढीमध्ये देवधर्म, पूजापाठ, व्रतेवैकल्ये, नवससायास, भजन कीर्तन, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरेंना खूप जास्त महत्व असायचे. त्यांचे जीवनच एका प्रकारे त्याभोवती गुंफलेले असायचे. आमच्या पिढीपासून त्यांचे महत्व कमी होत गेले. आता वाहतुकीच्या साधनांमध्ये भरपूर सुधारणा झाल्यामुळे तीर्थयात्रा करणे सुलभ झाले आहे आणि ते तुलनेने कदाचित वाढलेही असेल, पण मनातला भक्तीभाव कमी आणि पर्यटनाची हौस जास्त असे त्याचे स्वरूप झाले आहे.
संगणकक्रांति आणि तिच्या पाठोपाठ आलेली मोबाईल क्रांति यांच्यामुळे आता मध्यमवर्गातल्या मुलांचे पुस्तकांचे वाचन मात्र फार कमी झाले आहे. कुठलीही माहिती क्षणार्धात बसल्या जागी मिळायची सोय झाल्यामुळे व्यासंग नावाची वृत्तीच नामशेष झाली असावी असे वाटते. काही पूर्वीच्या व्यासंगी लोकांना आम्ही पाहिले आहे किंवा त्यांच्याबद्दल ऐकले तरी आहे. पुढच्या पिढ्यामधल्या लोकांना ते साांगितले तरी त्यांना ते समजतही नाही किंवा त्याचे फारसे महत्व वाटत नाही.
आर्थिक दृष्ट्या जे फार गडगंज श्रीमंतही नाहीत आणि अगदी भुकेकंगालही नाहीत अशा मध्यमवर्गाची संख्या आता अमाप फुगली आहे आणि त्यांच्यातल्याच कमी किंवा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांमधली दरीही खूप वाढली आहे. पण एक ठराविक पारंपारिक संस्कृति जगणाऱ्या आणि जपणाऱ्या जुन्या काळातल्या मध्यमवर्गाची मात्र झपाट्याने पीछेहाट झाली आहे किंवा तो लयाला गेला आहे असेही म्हणता येईल.
. . .
नवी भर दि. ०७-०३-२०२२
गेल्या काही दशकांमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या काही पटींने वाढली आहे आणि या वर्गातच निरनिराळे स्तर निर्माण झाले असून त्यांच्यातली विषमता वाढली आहे असे मी या पानावर काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्याचे एक उदाहरण आता पुढे आले आहे. युक्रेन या देशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परत मायदेशी आणणे चालले आहे. ही बहुतेक सगळी मुले सधन मध्यमवर्गीयातली असावीत असे दिसते. अतीश्रीमंत मुलांना शिक्षणाची गरज नसते आणि ते हौसेसाठी जगातल्या कुठल्याही प्रगत देशात जाऊन त्यांना हवे ते शिक्षण घेत असतात. श्रीमंत वर्गातल्या मुलांना डॉक्टर व्हायचे असेल तर ते देशातल्या महागड्या खाजगी मेडिकल कॉलेजांची फी भरू शकतात. युक्रेनसारख्या देशात जाऊन ४०-५० लाख रुपये खर्च करणे गरीबांना परवडण्यासारखे नसतेच. त्यामुळे सधन मध्यम वर्गातले लोकच असा प्रयत्न करू शकत असणार. युद्धपरिस्थिती जिवावरच बेतल्यामुळे ती मुले आपला जीव वाचवून कशीबशी घरी परतत असली तरी पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर दीर्घकाळ रहाणार आहे.
सध्या कित्येक लाख भारतीय विद्यार्थी जगातल्या निरनिराळ्या देशांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातले बहुतेक जण या सधन मध्यमवर्गातलेच असणार. त्यांच्या मनातही चलबिचल चालली असेल, असुरक्षिततेची भावना असेल, पण ते इकडे परत येऊन तरी काय करणार?