वाटचाल

या ब्लॉगवरील लेखांची संख्या हजाराच्या पुढे गेल्यानंतर मी तिला हजाराच्या आतच ठेवावे असा निर्णय घेतला. त्यामुळे काही जुने भाग डिलीट केले आणि काही भाग एकत्र आणले. हे काम चाललेले आहे. त्यानंतर मी सुमारे शंभर नवे लेख लिहिले असले तरी एकूण संख्या हजाराच्या आत ठेवली आहे. वाचकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक आहेच. आजपर्यंत वाचनसंख्या ३,९६,००० च्या वर गेली आहे. वाचकांचे आभार. 
दि.२७- ०९-२०१९
वाचनसंख्या ५,२४,००० च्या वर . . दि.२२-१-२०२२

-----------------------------------------------------
पुढील वाटचाल. (२९-०४-२०१७)

ऑगस्ट २०१२ नंतर मी माझ्या ब्लॉगवर माझ्याच ब्लॉगबद्दल कधीच लेखन केले नाही. कांही वैयक्तिक अडचणी किंवा संकटांना तोंड द्यावे लागल्यामुळे आणि मला इतर गोष्टींसाठी बराचसा वेळ द्यावा लागत असल्यामुळे माझ्या लेखनाचा वेगही मंदावला. तरीही माझी गाडी मंदगतीने का होईना पण पुढे सरकत होती. माझ्याने तितकेसे नवे लेखन झाले नसले तरी वाचकांनी मात्र माझे जुने लिखाण वाचणे सुरू ठेवले असल्यामुळे माझ्या ब्लॉगला मिळत असलेल्या भेटींचा ओघ तसाच सुरू राहिला. 

ऑगस्ट २०१२ मध्ये ७८८ वर असलेली लेखांची संख्या आता १०२१ वर गेली आहे, म्हणजे गेल्या साडेचार वर्षांमध्ये त्यात २३३ नव्या लेखांची भर पडली. काही जुने लेख काढून टाकून किंवा त्यांचे एकत्रीकरण करून लेखांची एकंदर संख्या यापुढे मात्र एक हजाराचे आत ठेवायची असे मी ठरवले आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये एक लक्षावर गेलेला वाचनसंख्यांचा आकडा आता पावणेतीन लाखांपर्यंत पोचला आहे. म्हणजे त्यात पावणेदोन लाखांची भर पडली आहे. पटीच्या हिशोबात सांगायचे झाल्यास लेखांचा आकडा सव्वापट झाला तर भेटींचा आकडा पावणेतीनपट झाला आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने पाहता माझ्या सुरुवातीच्या त्रोटक लेखांच्या मानाने आताचे लेख जास्त विस्तारपूर्ण आणि आशयघन असतात असे माझे मलाच वाटते.

आंतर्जालावरील बहुतेक ब्लॉगलेखन दैनंदिनीच्या स्वरूपात असते. ब्लॉग या शब्दामधील लॉग या शब्दाचा अर्थच नोंद असा होतो. म्हणूनच त्याला अनुदिनी असा प्रतिशब्द सुचवला गेला. सुरुवातीला मी सुध्दा अनेक वेळा प्रासंगिक महत्वाच्या घटनांवर लिहित असे, पण अशा तात्कालिक लिखाणापेक्षा टिकाऊ असे जास्त भाग लिहायचे ठरवल्यानंतर प्रासंगिक प्रकारच्या लेखांची संख्याही कमी होत गेली. माझे लेखन अजूनही पूर्वीप्रमाणेच चौफेर विषयांवर चाललेले असते. त्यासाठी मला नेहमी अमर्यादित विषयही मिळत असतात. त्यात काही व्यक्तीचित्रे, थोडे विज्ञानतंत्रज्ञान, काही गीते, काही विचार, काही आठवणी वगैरे सगळ्यांचा समावेश असतो. ज्या काळात मला जे सुचेल त्यावर विचार करायचा, थोडी माहिती जमवायची आणि ती सादर करायची असे माझे सूत्र गेली दहा वर्षे चालत आले आहे.

माझ्या या स्थळाला भेट देत रहावे आणि आपले अभिप्राय कळवावेत अशी नम्र विनंती आहे.


दि. २९ एप्रिल २०१७


.........................................................................
1.  Tuesday, January 03, 2006

Shreeganesha श्रीगणेशा


Hi,
So I have also created a blog. Wow ! It was so easy.I have also managed to put my expressions in Marathi in the first attempt
Good beginning for year 2006.I will try to improve further.
----------------------------------------------------------------------------------------

२. Sunday, January 20, 2008

New Beginning

अरे वा! हा ब्लॉग अजूनपर्यंत जीवंत आहे म्हणायचा. मध्यंतरी गूगलने ब्लॉगस्पॉट घेतल्यानंतर तो उघडतच नव्हता. त्यामुळे त्याचा नाद सोडाना लागत होता. आता नव्याने सुरुवात करता येईल.

आनंदघन
 जानेवारी २००६ मध्ये हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मी मराठी ब्लॉगविश्वाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होतो. त्या वेळी ते तसेही अजून बाल्यावस्थेतच होते. त्यांची संख्या शंभराच्या आतच होती. अमेरिकानिवासी नंदनसारख्या अनेक लोकांनी मराठी भाषेत सुंदर ब्लॉग्ज लिहायला सुरू केले होते हे सुद्धा मला त्या वेळी माहीत नव्हते. त्याआधी मी आंतरजालावर एकंदरीतच जेमतेम दहा बारा ब्लॉग्ज वाचले होते, ते सगळे इंग्रजीमध्ये होते. त्यामधील एकादा दुसरा अपवाद सोडल्यास बहुतेक सर्व ब्लॉग्जची शीर्षके निरर्थक तरी होती किंवा अनाकलनीय ! त्यामुळे मी तरी त्या नावांकडे एकेक खुणेचे दगड याहून अधिक लक्ष  दिलेच नाही. 

माझ्या ब्लॉगची नोंदणी करायला घेतल्यावर सुरुवातीला मी आपले नाव टाइप करायला लागलो Anand Gh इतके टाइप केल्यावर माझ्या लक्षात आले की त्यांना  ब्लॉगचे नांव आणि माझे नांव अशी दोन नांवे द्यायची होती. त्या क्षणी मला आनंदघन हा शब्द सुचला आणि Anandghan असे नांव मी या ब्लॉगला देऊन टाकले. आधी सगळे सोपस्कार तर होऊन जाऊ देत, ब्लॉगची सुरुवात तर होऊ दे, नंतर कधी तरी वाटल्यास नांव बदलून घेऊ असा विचार त्या क्षणी माझ्या मनात होता. पण नंतर मला कधी तसे करावेसे वाटलेच नाही कारण आनंदघन हेच नांव चांगले वाटायला लागले होते. 

आनंदघन या शब्दाचा अर्थ काय असेल? माझ्या कल्पनेप्रमाणे घनदाट आनंद, आनंद बरसणारा मेघ असा कांही तरी तो असणार. गणित विषयात ज्यांना गोडी वाटते ते त्याचा अर्थ आनंद गुणिले आनंद गुणिले आनंद अशी बीजगणितातील व्याख्या किंवा भूमितीमधील आनंदाचे त्रिमिति रूप असा काढू शकतील. आनंदघन म्हणजे आनंदाचा अर्क किंवा निर्भेळ आनंद असे परमेश्वराचे वर्णन आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये केले आहे. उदाहरणार्थ समर्थ रामदासांच्या दासबोधातील दोन ओव्या खाली दिल्या आहेत.
जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥
सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥

भारतरत्न लता मंगेशकर यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी स्व.भालजी पेंढारकरांच्या कांही मराठी चित्रपटांना अत्यंत मधुर असे संगीत देतांना संगीत दिग्दर्शक म्हणून आनंदघन हे नांव घारण केले होते. त्या सिनेमातील लोकप्रिय गाण्यांसोबत हे नांवसुद्धा ज्याच्या त्याच्या तोंडावर झाले होते. अशा या नांवाचा उपयोग मी करू शकतो कां व ते कितपत योग्य आहे असे प्रश्न मनात येत होते. त्यावर मला असे वाटले होते की लता, आशा, मीना व उषा ही मंगेशकर भगिनींची नांवे धारण करणाऱ्या लक्षावधी स्त्रिया महाराष्ट्रात दिसतील. प्रसिद्ध व्यक्तींचे नांव आपल्या मुलाला ठेवण्याची आपल्याकडे पद्धतच आहे. तर मग मी आपल्या नवजात ब्लॉग बाळाला आनंदघन हे नांव ठेवणे तसे रूढीला धरूनच नाही का ? दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काळांत पूजनीय लतादीदी आनंदघन या नांवाने चित्रपटसंगीत देत होत्या, तेंव्हासुद्धा एक आघाडीची गायिका व एक लोकप्रिय व्यक्ती म्हणून त्या लता मंगेशकर या मूळच्या नांवानेच प्रसिद्ध होत्या. गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांनी आनंदघन या नांवाने कांही कार्य केले असल्याचे मी तरी ऐकले नव्हते. त्यामुळे त्यांच्या टोपणनांवाचा उपयोग करून मला कांही फायदा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, किंवा त्यांच्या नांवावर मी आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत आहे असेही कुणाला वाटायला नको. या सगळ्या कारणांनी मी आनंदघन हेच नांव चालू ठेवले. 

------------------------------------------------------------------------------------------

३.माझ्या ब्लॉगचे शतक (याहू ३६०वरील)

माझा आनंदघन हा ब्लॉग मी आधी १ जानेवारी २००६ रोजी ब्लॉगस्पॉटवर सुरू केला पण काही कारणांमुळे महिनाभरानंतर याहू ३६० या स्थळावर याच नावाने दुसरा ब्लॉग सुरू केला. नऊ दहा महिन्यांमध्येच त्या ब्लॉगने शंभर भाग पूर्ण केले. याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. 

दि.१५-११-२००६
माझ्या ब्लॉगचे शतक (पूर्वार्ध) 

आज मी याहू ३६० वर १०० वा ब्लॉग सादर करीत आहे. तसे पहायला गेले तर मी शंभराहून अधिक वेळां या ठिकाणी कांही ना कांही लिहायचे काम केले आहे. पण शुभेच्छा, क्षमायाचना यासारखे तात्कालिक महत्व असलेले भाग नंतर काढून टाकले, कांही मोठे लेख त्यांची विभागणी न करतां दोन किंवा जास्त दिवशी टप्प्या टप्प्याने थोडे थोडे लिहिले, त्यांचा हिशोब ठेवला नाही. आजमितीला ९९ वेगवेगळे ब्लॉग आपल्या जागी हजर आहेत. त्यामुळे आजचा ब्लॉग शंभरावा म्हणता येईल. याहू ३६० वर उलटी मोजणी असल्यामुळे ते या भागाला १०० मधील पहिला म्हणतील. या निमित्ताने मागे वळून पाहतांना मुळांत या ब्लॉगची सुरुवात कशी झाली याची हकीकत या भागांत सांगून आतापर्यंतचा प्रवास कसा झाला हे मी उत्तरार्धात सांगणार आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी मी हा ब्लॉग सुरू केला. त्यापूर्वीच्या महिना दोन महिन्यात माझ्या दृष्टीने महत्वाच्या अशा अनेक घटना घडून गेल्या. सेवेमधून निवृत्त झाल्यामुळे नोकरीमधली बऱ्यापैकी अवजड जबाबदारी व ती पेलण्यासाठी वेळीअवेळी अंगावर पडत असलेल्या कामांचा बोजा या दोन्हीचा भार डोक्यावरून उतरला. प्रशस्त निवासस्थान, चालकासहित वाहन, घरातील आणि खिशातील दूरध्वनी वगैरे त्या निमित्त्याने होत असलेले सगळे फाजील लाड थांबले. आपल्या छोट्याशा सदनिकेमध्ये मावेल तेवढे सामान कोंबून नवा डाव सुरू केला. आता मिळणार असलेला भरपूर फावला वेळ अंतर्जालावर स्वैरपणे भटकण्यांत सत्कारणी लावण्यासाठी नव्या घरी ब्रॉडबॅंड नेटवर्कचे कनेक्शन घेतले. याची कुणकुण बहुधा कुणाला तरी लगेच लागली कां कोण जाणे, कारण एका अनोळखी मित्राकडून त्याचा याहू ग्रुप जॉईन करण्यासंबंधी आमंत्रण ई-मेलने आले. यापूर्वी यासंबंधी मी कांही सुद्धा ऐकलेले नव्हते. (केवढा मागासलेपणा?) त्यामुळे त्याला उत्तर द्यायच्या आधी तिकडून बाहेर पडण्याची वाट पाहून ठेवली म्हणजे उद्या त्याने वर्गणीचे पैसे बैसे मागितलेच तर हळूच बाहेर सटकायला बरे पडले असते. त्या समूहात शिरल्यानंतर मला ई-मेलवर रोज निदान दहा पंधरा पत्रे यायला सुरुवात झाली. त्यातली सत्तर पंच्याहत्तर टक्के पत्रे मुलींच्या नांवाने लिहिलेली. ती इतका रस घेऊन मी वाचतो आहे म्हंटल्यावर घरी त्यावरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली. 

या सगळ्यात रमण्यापूर्वीच श्रमपरिहार आणि हवापालट वगैरेसाठी थोडे दिवस मुलाकडे इंग्लंडला जाऊन रहायची टूम निघाली आणि आम्ही अलगदपणे लीड्सला जाऊन पोचलो. तिथल्या थंडगार वातावरणात थोडेसे रुळल्यावर एक फारसा वापरात नसलेला "मांडीवरचा" आपल्या ताब्यात घेऊन त्याच्या सहाय्याने अंतर्जालाशी पुन्हा संपर्क साधला. माझ्या मांडीचा ताबा आता नातवंडांनी घेतलेला असल्यामुळे या मांडीवरच्याला टेबलावर ठेऊन गोंजारायला सुरुवात केली. संगणकासारख्या नाजुक गोष्टीला हाताळणे म्हणणे जरा कसेतरीच वाटते, त्यापेक्षा गोंजारणे हा थोडा बरा शब्द वाटतो. बाणाला पडद्यावर इकडून तिकडे पळवणारा उंदीर इथे हांताशी नव्हता, त्यामुळे त्यावरील चिमुकल्या पॅडला एका बोटाने खाजवून ते काम करावे लागायचे. हे तंत्र शिकण्यात कांही वेळ गेला. याच खटपटीत असतांना याहू ग्रुपमधल्याच कोणीतरी लिहिलेल्या पत्रांत अधिक माहिती वाचण्यासाठी आपल्या ब्लॉगचा दुवा दिला आणि अशा प्रकारे ब्लॉग या संकल्पनेशी माझी पहिली ओळख लीड्सला असतांना झाली.

त्यानंतर एकावरून दुसरा, त्यावरून तिसरा अशा टणाटणा उड्या मारीत दहा पंधरा ब्लॉग्ज पाहिले आणि ही कल्पना मला अतिशय आवडली. लवकरच येऊ घातलेल्या नववर्षाची सुरुवात आपण आपला स्वतःचा ब्लॉग सुरू करूनच करायची असा दृढनिश्चय करून टाकला. केला तर खरा, पण तो पूर्ण कसा करायचा यासंबंधी कांहीच ज्ञान नव्हते. अंतर्जालावर भटकतांना "तुम्हीही आपला ब्लॉग निर्माण करू शकता.", "ते अगदी सोपे आहे.", "फक्त आमच्या आज्ञावलीनुसार पावले टाकीत चला", "कधी सुरुवात करीत आहात?" अशा प्रकारच्या गळेपडू जाहिराती पाहिल्यामुळे बराच धीर आला होता. पण रोज उठून त्या ब्लॉगवर लिहायचे तरी काय ? हा ही एक प्रश्नच होता. आपल्या कामासंबंधीच्या विविध दस्तावेजांचे इंग्रजी भाषेत वाचन लेखन करण्यात अवघा जन्म घालवला होता. अवांतर वाचन करायला फारसा वेळच मिळाला नव्हता आणि जे कांही वाचण्यात आले त्यातील बहुतेक लेख तांत्रिक विषयांवरचे होते. इंग्रजी भाषेमधील साहित्यिक वाङ्मय वगैरेचे फारसे वाचन झाले नसल्यामुळे मनात त्या भाषेची तितकीशी ओढ निर्माण झाली नव्हती. यापूर्वी रोजनिशी लिहीत होतो पण त्यात सुद्धा त्या दिवशी (कामाच्या बाबतीत) काय घडले, कोणत्या समस्या उद्भवल्या, त्यावर कोणते उपाय निघाले, कोणते नवे मार्ग सांपडले , कोणते महत्वाचे निर्णय घेतले अशा प्रकारच्या नोंदी असायच्या. मराठीमध्ये कांहीतरी लिखाण करण्याची सुप्त इच्छा मात्र मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात वर्षानुवर्षे दडून बसलेली होती. नुकतेच तिला नव्याने अंकुर फुटायला लागले होते. त्यामुळे आपला ब्लॉग मराठीमध्येच लिहायचा असे ठरवले. मराठीमधील कोणताही ब्लॉग तोपर्यंत माझ्या वाचनात आलेला नसल्यामुळे त्यात नवलाईचाही थोडा भाग होता. 

संगणकावर मराठीमध्ये कसे लिहायचे हा दुसरा प्रश्न आता समोर आला. माझा बहुभाषिक संगणक मुंबईलाच राहिला होता आणि या साहेबी मांडीवरल्याला मराठीचा गंध नव्हता. भारतात असतांना देवनागरी लिपी कुठे मिळेल याची अडचण मला कधी भासली नव्हती, पण या परमुलुखात ते सोपे नव्हते. चार मराठी लोकांशी ओळख झाली होती, त्यातील एका विदुषीने लिहिलेले मराठी लेख मी इकडे येण्यापूर्वीच मासिकांमध्ये वाचले होते, त्यामुळे तिच्याकडे नक्की मिळेल या आशेने तिला जाऊन भेटलो. पण तिने सांगितले की ती आपले लिखाण सुवाच्य अक्षरांत हांताने लिहिते आणि स्कॅन करून ई मेलने भारतात पाठवून देते. हा मार्ग माझ्या कांही कामाचा नव्हता. एक तर मला माझाच मसुदा वारंवार बदलावयाची संवय लागलेली होती. दर वाचनांत कांही वेगळ्या चुका आढळायच्या, कांही नवे प्रतिशब्द सुचायचे, वरील वाक्य खाली आणि खालचे वाक्य वर लिहिले तर बरे दिसेल असे वाटायचे. थोडक्यात काय तर खाडाखोड न करता एक संपूर्ण सुसंगत लेख हाताने लिहिणे मला अशक्यच नव्हे तर अकल्पनीय वाटत होते. आणि सुवाच्य अक्षर काढण्याबद्दल तर विचारायलाच नको. शाळेत असतांना सुद्धा आमच्या वर्गाच्या हस्तलिखितांमधील माझे लेख मी दुसऱ्या एखाद्या मित्राकडून लिहवून घेत असे. अशी परिस्थिती असतांना माझ्या ब्लॉगवर येऊन माझे दुर्बोध लिखाण कोण वाचेल? शिवाय तो तर फारच मागासलेपणा दिसला असता. शेवटी अंतर्जालावरच शोधाशोध केल्यावर युनिकोडची माहिती सापडली आणि पदोपदी अनेक चुका करीत व त्या दुरुस्त करीत, धडपडत कां होईना, पण आपल्या संगणकावर देवनागरी लिपीची प्रतिष्ठापना करून मराठी लिहिण्यासाठी सोय एकदाची केली. तोपर्यंत नववर्ष उजाडलेले होते, पण ठरवल्याप्रमाणे माझा ब्लॉग सुरू तर होऊन गेला. हे ही नसे थोडके. 

आता कोणीतरी तो ब्लॉग वाचेल याची व्यवस्था करणे क्रमप्राप्त होते. तो अंतर्जालावर अमूक जागेवर आहे हेच मुळी लोकांना समजले नाही तोंवर तो वाचला कसा जाणार? त्यासाठी आपल्या ई-मेलच्या पत्त्यांच्या यादीत जेवढी म्हणून मराठी आडनांवे दिसली त्या सर्वांना संदेश पाठवून आपल्या ब्लॉगचा पत्ता दिला. पण चार पांच दिवल लोटले तरी कोणाच्या प्रतिसादाचा पत्ताच नाही! मग अगदी जवळच्या चार पांच लोकांना आठवण करून देऊन मी किती आतुरतेने त्यांच्या उत्तराची वाट पहात आहे तेही कळवले. अपेक्षेप्रमाणे त्यांची उत्तरे तर आली, पण त्यांतील कांही लोकांच्या संगणकाला ते स्थळ सांपडणेच दुरापास्त झाले होते तर उरलेल्या लोकांना त्यांवरील देवनागरी लिपीतील मजकूर न दिसतां त्या जागी चौकोनी ठोकळ्यांच्या रांगा दिसल्या होत्या. थोडक्यात मी लिहिलेले एक अक्षरसुद्धा माझ्या ओळखीच्या कोणालाही अजूनपावेतो वाचता आले नव्हते.

त्या कालखंडात या लोकांच्या घरात ज्या प्रकारचे कॉंप्यूटर, त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स व ब्राउजर उपलब्ध होते त्यांच्या मर्यादा याला कारणीभूत होत्या हे माझ्या लक्षांत आले, पण त्या लोकांना त्यांना उपलब्ध असलेल्या तंत्राचा उपयोग करूनच वाचता येईल असेच कांहीतरी त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवणे आवश्यक होते कारण अत्याधुनिक तंत्रज्ञानापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञान जास्त महत्वाचे असते हे मी अनुभवावरून शिकलो होतो. त्या दृष्टीने विचार करून माझ्या ब्लॉगवरील लेखांच्या परिच्छेदांचे इमेजेसमध्ये रूपांतर करून ते चित्ररूपाने ब्लॉगवर चढवले. "आता ते दिसू लागले आहेत पण अक्षर फार बारीक असल्यामुळे नीट वाचता येत नाहीत" असे शेरे आले. कारण ब्लॉगवर चढवतांना त्यांचा आकार बदलला जात होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणखी कांही प्रयोग केल्यावर प्रत्येक चित्राचा मूळ आकार तसेच त्यावर लिहिण्याच्या अक्षरांचा आकार निश्चित केला. 

हे सगळे मार्गी लागेपर्यंत आमच्या मांडीवरच्याने कुरकुरायला सुरुवात केली होती. त्याची मूळ बॅटरी कधीच संपून गेली होती व पुनःपुन्हा चार्ज होण्याची क्षमताही संपुष्टांत आली होती. एलिमिनेटर चार्जरचा प्लग ढिला झाला होता. त्यामुळे उजव्या हांताने त्याला धरून ठेऊन डाव्या बोटांनी की बोर्डची बटने दाबण्याची व बाणाला नाचवण्याची कलाही शिकून आत्मसात केली. पण माझी ही कसरत पहावली न गेल्याने माझा मुलगा एक नवीन शक्तीमान असा चार्जर घेऊन आला. त्यामुळे संगणकाच्या अंगांत एकदम उत्साहाचे वारे शिरल्यासारखा तो जोरांत धाऊ लागला. पण त्याचा हा आवेग फार काळ टिकला नाही कारण एके दिवशी त्याने एकदम मानच टाकली. कांही केल्या तो सुरूच होईना. 

घरीच किंवा छोट्या टपरीत बसून किरकोळ दुरुस्त्या करणारे कुशल कारागीर जसे भारतात मिळतात तसे तिकडे इंग्लंडमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे जिथून तो संगणक पूर्वी आणला होता त्या मोठ्या दुकानांत त्याला नेले. त्याच्या गॅरंटी वॉरंटीचा काळ संपून गेलेला असल्याने तेथील दुकानदारावर त्याची कसली जबाबदारी नव्हती. आता तो दुरुस्त करायचा असेल तर आधी साठ पौंड देऊन तज्ञाकरवी त्याची तपासणी करायची व त्यात जर तो दुरुस्त करण्याजोगा निघाला तर त्याचे एस्टिमेट मिळेल व तेवढा खर्च करावा लागेल, तरीसुद्धा तो आणखी किती काळ काम करेल याची खात्री देता येणार नाही वगैरे तेथील काउंटरवरल्या माणसाने सांगितले. "त्यापेक्षा तुम्ही नवा संगणकच घेतलात तर आता किती तरी नवी मॉडेल्स आली आहेत, त्यांत किती नव्या फॅसिलिटीज आहेत. अगदी तुम्ही स्वप्नांत कल्पना केली असेल तसा संच प्रत्यक्षांत तुम्हाला मिळेल. त्यावर इतका डिस्काउंट मिळेल, त्याबरोबर तमूक गोष्ट फुकट मिळेल" वगैरे सांगून झाले. तोपर्यंत आमची भारतात परतण्याची तारीख ठरलेली असल्यामुळे तो नाद सोडून दिला व थोड्या दिवसासाठी अंतर्जालावरूनच सुटी घेतली. 

माझ्या ओळखीच्या लोकांबद्दल बाळगलेल्या आशा तांत्रिक कारणामुळे पूर्ण झाल्या नसल्या तरी अगदी अनोळखी मित्रांनी शुभसंदेश पाठवून माझे मराठी ब्लॉगच्या विश्वांत स्वागत केले. ही कल्पना माझ्या डोक्यांत जरी स्वतंत्रपणे आली असली तरी, त्याच्या बरेच आधी कांही लोकांनी ते सुरू करून त्यांत मोलाची भर घातलेली होती. इतकेच नव्हे तर त्या विषयाला वाहिलेले संकेतस्थळ सुरू करून तेथून नवख्या लोकांना मार्गदर्शन केले जात होते. अगदी पहिला वहिला नसलो तरी निदान पहिल्या शंभरात आपण आहेत याचेच मोठे समाधान होते. "महाजनो येन गतः स पंथः।" या उक्तीप्रमाणे पुढे गेलेल्या महाभागांच्या वहिवाटेने रुळलेली पायवाट सांपडली होती. ती धरून पुढे जाणे सोपे झाले होते. 

भारतांत परतल्यावर पुन्हा पूर्वीचे धागे धरून पुढे सरकायला सुरुवात केली होतीच, तेवढ्यात याहू ग्रुपवरील एका मैत्रिणीने याहू ३६० वर इंग्रजीमधून ब्लॉग सुरू केला आणि त्यावरील आपल्या मित्रपरिवारात सामील होण्यासाठी मला आमंत्रण दिले. ते स्वीकारण्यासाठी स्वतः याहू ३६० चा सदस्य बनणे आवश्यक होते व ते सोपेही होते. अशा तऱ्हेने एके दिवशी ध्यानी मनी मसतांना माझा याहू ३६० वर प्रवेश झाला. तेथे गेल्यानंतर तेथे काय दिवे लावले ते उत्तरार्धांत पाहू. 
( क्रमशः)
_________________________________________________________

माझ्या ब्लॉगचे शतक (उत्तरार्ध) 
Nov 18 2006
कांही लोकांनी ब्लॉगला अनुदिनी, वासरी अशी नांवे दिलेली वाचली आहेत. पण त्यांचा दैनंदिनी वा रोजनिशी असा अर्थ घेतला तर दररोज त्या दिवशी घडलेल्या प्रसंगाबद्दल त्यांत लिहायला पाहिजे असे ध्वनित होते. मला तसली बंधने नकोत म्हणून मी मराठीत वेगळे नांव न देता ब्लॉग असेच म्हणायचे ठरवले आहे. पहिले कांही दिवस नेमाने दररोज कांहीतरी लिहून नंतर सारे सोडून देण्याचा आरंभशूरपणा मला करायचा नव्हता आणि वेळेची डेडलाईन गांठण्यासाठी कसेतरी कांहीतरी लिहिण्याची घिसाडघाई करण्यापेक्षा एखाद्या विषयावर दोन चार दिवस विचार करून, योग्य शब्द जुळवून, वाचायला निदान बरे तरी दिसेल असे लिखाण प्रस्तुत करणे मला पसंत होते. माझ्या ब्लॉगस्पॉटवरील चित्रमय ब्लॉगमध्ये आपल्या लिखाणाचीच चित्रे बनून जात. त्याशिवाय दुसरी चित्रे त्यावर घालणे त्यामुळे कठीण जात असे. तो ब्लॉग बनवून प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया बरीच वेळखाऊ असल्यामुळे मंदगतीने काम चाले. याहू ३६० या संकेतस्थळावर ब्लॉग सुरू करतांना ते काम खूपच सोपे वाटले. शिवाय आपली आवडती चित्रे ठेवण्यासाठी येथे वेगळी मोकळी जागा दिलेली होती. असा थोडा विचार करून या ब्लॉगवर अगदी रोज नाही तरी जमेल तितक्या नियमितपणे लिखाण करायचे आणि अधून मधून त्याचे चित्रीकरण करून दुसऱ्या जागी ते चढवायचे असा निर्णय मी घेतला. अशा प्रकारे एक आधुनिक ढंगाचा आकर्षक दिसणारा असा हा ब्लॉग आणि उपलब्ध तंत्रज्ञानातील कमतरतेमुळे तो न पाहू शकणाऱ्या मित्रांसाठी दुसरा चित्रमय ब्लॉग अशा माझा दुहेरी प्रवास सुरू झाला. 

या ब्लॉगची अनुक्रमणिका पाहिल्यावर त्याचा प्रवास कसा झाला याची थोडी कल्पना येते. माझ्या हांताशी तयार असलेले साहित्य त्यावर चढवून प्रथम सुरुवात करून दिली. ज्या त्या दिवशी वाचलेली बातमी वाचून मनांत उठलेल्या लहरी पुढील दोन तीन भागांत नोंदवल्या. त्यानंतर मात्र असे इकडे तिकडे न भरकटतां एकच विषय घेऊन त्या दिशेने सुसूत्र असे लेखन सलगपणे निदान कांही दिवस करावयाचे  ठरवले. एका वद्य त्रयोदशीच्या पहाटे दिसलेल्या नाजुक व रेखीव चंद्रकोरीवरून आपल्या ब्लॉगसाठी तोच विषय घ्यावा असे मला चटकन सुचले. आमच्या मित्रांना गंमत म्हणून दाखवण्यासाठी जमवलेल्या चंद्रविषयक चित्रांचा एक छोटासा संग्रह माझ्याकडे होताच. त्यांना शब्दरूप तेवढे द्यायचे होते. ते काम करता करता त्याचा विस्तार होत गेला आणि त्यासाठी नवी माहिती मिळवीत व देत गेलो. 'तोच चन्द्रमा नभात' या मालिकेचा शेवट होईपर्यंत तिचे तेहतीस भाग झाले. चंद्राच्या भ्रमणाविषयी बऱ्यापैकी तपशीलवार शास्त्रीय माहिती, भारतीय तसेच पाश्चिमात्य पौराणिक वाङ्मयात आढळणारे त्याचे उल्लेख व त्याचेसंबंधी ऐकलेल्या दंतकथा, पदार्थविज्ञानशास्त्राच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चंद्राच्या अभ्यासावरून कसा निष्पन्न झाला याची सर्वसामान्य लोकांना ठाऊक नसलेली माहिती, चंद्राशी संबंधित सण, उत्सव व व्रतवैकल्ये, चंद्राचा उल्लेख असलेली लोकप्रिय हिंदी व मराठी गाणी अशा अनेक अंगांनी चंद्राकडे पाहून त्याचे दर्शन वाचकांना घडवण्याचा एक प्रयत्न या मालिकेतून केला. 

लीड्सला जाऊन आल्यानंतर तेथील वास्तव्यात पाहिलेल्या खास जागा व वाचनांत आलेल्या मजेदार गोष्टी यांच्या आठवणींना उजाळा देत 'लीड्सच्या चिप्स' ही मालिका सुरू केली. तिकडे जाण्यायेण्याचा विमान प्रवास, तेथील स्थानिक जागांना दिलेल्या भेटी, तेथील स्थानिक महत्वाचा इतिहास, तिकडील जनतेबरोबर आलेल्या संपर्कातून कळलेल्या गोष्टी, तेथील सुप्रसिद्ध तशाच कुप्रसिद्ध व्यक्ती आणि वल्ली, तिकडील समाजसुधारक संस्था असे अनेक पैलू या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र यापुढे सतत एकाच विषयात गुंतून पडायचे नाही असे ठरवून या नव्या मालिकेतील प्रत्येक भाग एक स्वतंत्र लेख वाटावा असे त्याचे स्वरूप ठेवले. अशा प्रकारे मधून मधून दुसरे लेख देत ही मालिका पुढे नेण्याची सोय केली.

सगळं कांही सुरळीत चालले आहे या भ्रमात असतांना १ जून रोजी अचानक मेंदूमधील एका गुंतागुंतीच्या विकाराने मला गांठून अगदी चारी मुंड्या चीत करून टाकले. ब्लॉग लिहिणे सोडा, साधे वर्तमानपत्र हातात धरून वाचणे अशक्यप्राय होऊन बसले. दोन आठवडे इस्पितळांत आणि आणखी  दोन आठवडे घरी विश्रांती घेतल्यावर अंगात थोडी तरतरी आली व गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुन्हा हळू हळू सुरुवात करण्याचे ठरवले. पण दरम्यानचे काळांत माझा संगणक रुसून बसला होता, त्याची समजून काढण्यात कांही दिवस गेले. या काळांत मेंदूला व शरीराला जास्त ताण न देता थोडे हलके फुलके लिहायला लागलो. यातूनच 'वाचावे ते नवलच' ही मालिका तयार झाली. 

तोपर्यंत गणेशोत्सव आला. शारीरिक असमर्थतेमुळे मला प्रत्यक्षात इकडे तिकडे जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे वर्तमानपत्रातील बातम्या, दूरचित्रवाणीपरून प्रसारित होणारे कार्यक्रम व अंतर्जालावर येणारे सचित्र वृत्तांत यामधूनच गणरायाच्या 'कोटी कोटी रूपांचे'  दर्शन घेतले व वाचकांना ते घडवण्याचा प्रयत्न केला. पूर्वी एकदा नवरात्राच्या सुमारास एका नातेवाईकांकडे गेलो असतांना त्यांनी सामुहिक रीत्या म्हंटलेले देवीचे एक स्तोत्र ऐकले होते. जगद्गुरु शंकराचार्यांनी रचिलेले ते अत्यंत रसाळ व भावपूर्ण स्तोत्र मला त्याच वेळी खूप आवडले होते. या नवरात्राचे निमित्ताने मी ते स्तोत्र अर्थासह मिळवले, समजून घेण्याचा प्रयत्न केला व त्याचे मराठीत भाषांतर करून वाचकांना सादर केले. लीड्सवरील मालिका सुरूच होती. इंटरनेटवरील एका ठिकाणी नवरात्रानिमित्त नऊ महान भारतीय महिलांबद्दल लिहिलेला मजकूर भावला. त्या लेखिकेचे आभार मानून तिच्या अनुमतीने त्या लेखाचे मराठी रूपांतर केले. अधून मधून इतर विषयांवरील अवांतर लेखन चाललेच होते. अशा तऱ्हेने शंभराचा आकडा जवळ आला. तेंव्हा तोच विषय घेऊन लिहायचे ठरवले आणि दोन भागात लिहून काढले.

सुरुवातीचे काळात आपला ब्लॉग कोणीच वाचत नाही असे वाटून मन खिन्न व्हायचे. त्या वैषम्याचे प्रतिबिंब माझ्या लिखाणातसुद्धा पडू लागले होते. आपण हा उद्योग नेमका कशासाठी करत आहो असा प्रश्न बरेच वेळा स्वतःलाच सतावायचा. या काळात माझ्या कांही हितचिंतकांनी मात्र मला पत्रे पाठवून खूप प्रोत्साहन दिले. कुणी 'धीर धरी रे धीरापोटी, फळे रसाळ गोमटी' या उक्तीची आठवण करून दिली तर कुणी 'कर्मण्ये वाधिकारस्ते ना फलेषु कदाचन' याची.  आता हे कर्म मी स्वतःच स्वतःच्या अंगावर ओढवून घेतले आहे हे कुणाला सांगणार?  पण या सगळ्या सदुपदेशांचा चांगला परिणाम झाला आणि मी हा नसता उद्योग चिकाटीने सुरू ठेवला. हळू हळू तो लोकांच्या नजरेला पडू लागला. पहिले दोन तीन महिने जेमतेम शंभर दोनशेच्या घरात घुटमळत असलेल्या वाचनसंख्येने पांचव्या महिन्यापर्यंत हजाराचा आंकडा पार केला. त्यानंतर दर दीड दोन महिन्यात हजाराने वाढत आता तो चार हजाराच्या जवळ जाऊन पोचला आहे. वाचकांची संख्या सुद्धा दोन तीन महिने दोन आंकड्यामध्ये रेंगाळत राहिल्यावर हळूच तीन आंकड्यात गेली आणि आता आठशेचा टप्पा पार करून पुढे सरकत आहे. वाचकांनी दाखवलेल्या या आपुलकीबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. या टप्प्यावर त्यांना मनःपूर्वक अभिवादन करून पुढील वाटचाल करायचा मनोदय आहे. वर्षभरापूर्वी मी लिहिण्याच्या बाबतीत अगदीच नवखा होतो.  आता अनुभवातून थोडेफार शिकायला मिळाले. तसेच अनेक नवनवीन विषय डोळ्यापुढे उभे राहिले आहेत. माझ्या प्रिय वाचकांकडून असाच भरभरून आशीर्वाद मिळत रहावा अशी नम्र विनंती करून हा भाग संपवितो. 
-----------------------
याहू ३६० वरील प्रगति अशी  झपाट्याने झाली होती. पण याहूनेच ही सेवा बंद केल्यामुळे पुढे हा ब्लॉग बंद करावा लागला आणि तिकडले बरेचसे ब्लॉग्ज या स्थळी आणले.
1 st Part on February 6, 2006 
100th part on Nov 15, 2006
200th part on April 14, 2007
300th part on September 19, 2007 
400th part on April 13, 2008


----------------------------------------------------------------

४.  शंभरावा भाग  - दि. 17 एप्रिल 2008

आज मी या ब्लॉगवर शंभरावा भाग लिहीत आहे. तो लिहीत असतांना सुरुवातीपासूनच्या आठवणी मनात येणे साहजीक आहे. सन २००५च्या अखेरपर्यंत मला इंटरनेटबद्दलच फारशी माहिती नव्हती. ई-मेल आणि गरजेपुरती शोधाशोध यापलीकडे मी त्यावर कांहीसुध्दा काम केलेले नव्हते. माझ्या कल्पकतेची किंवा निर्मितीक्षमतेची धांव ग्रीटिंग कार्ड बनवून पाठवण्यापलीकडे कधी गेली नव्हती. तोपर्यंत इंग्रजी ब्लॉगविश्वाचा परिचय देखील झालेला नव्हता. आपल्याला सुध्दा जर नेटवर स्वतःची छोटीशी जागा मिळाली तर किती छान होईल, विविध प्रकारचा मजकूर, चित्रे आणि ध्वनी यांच्या सहाय्याने आपण ती मनासारखी सजवू असे विचार इंटरनेटवरील सुंदर वेबसाईट्स पहातांना मनात येत असत, पण अशी जागा विकत मिळते की भाड्याने मिळते आणि ती कुणाकडे मिळते याबद्दल अवाक्षरही माहिती नव्हती. ते भयंकर महागडे प्रकरण असणार, आपल्या आंवाक्यातले काम नाही, अशीच माझी समजूत होती.

डिसेंबर २००५ च्या अखेरीस मी लीड्स इथे माझ्या मुलाकडे गेलो होतो. कडाक्याची थंडी आणि लवकर मावळणारा दिवस यामुळे घराबाहेर जास्त फिरायची सोय नव्हती. घरात चोवीस तास इंटरनेट उपलब्ध असायचे, त्यावरच भ्रमंती सुरू केली. असाच भटकत असतांना कुठे तरी कोणाचा तरी एक ब्लॉग नजरेला पडला आणि तो धागा धरून वीस पंचवीस इतर ब्लॉग पाहिले. त्यात इंग्रजीखेरीज फ्रेंच, स्पॅनिश वगैरे होते तसेच चिनी, जपानीसुध्दा होते. त्या वेळेस मराठी ब्लॉग कांही आपणहून किंवा चुकून माझ्या डोळ्यांसमोर आला नाही. ब्लॉगस्पॉटतर्फे केलेले नवा ब्लॉग सुरू करण्याचे जाहीर आवाहन वाचल्यानंतर आपल्याला सुध्दा अगदी फुकटात एक जागा मिळू शकते याचा अत्यानंद झाला. आणि लवकरात लवकर आपला ब्लॉग तयार करायचे ठरवले.

ब्लॉग तयार केला पण त्यावर काय लिहायचे हा प्रश्न अनुत्तरित होता. इतरांचे जेवढे ब्लॉग मी पाहिले आणि मला समजले त्यात बहुधा डायरीत लिहिल्यासारखा मजकूर होता. कांही लोकांनी त्यावर विनोद, कविता, अनुभव वगैरे लिहिले होते. बहुतेकांनी चित्रे चिकटवली होती. त्या वेळेला ब्लॉगवर व्हीडीओ घालणे शक्य नव्हते. चिनी जपान्यांची तर फक्त चित्रेच पाहणे शक्य होते. त्यातल्या मजकुराची लिपीच अगम्य होती. पण ते ब्लॉग पाहून मीसुध्दा मराठीमध्येच लिहायचे ठरवले. मुंबईला लिपी आणि आकृती या सॉफ्टवेअरचा वापर करून मराठी किंवा हिंदी मजकूर लिहिणे आणि त्याचा प्रिंटआउट काढणे एवढे मी शिकलो होतो, पण त्याची ब्लॉगबरोबर कशी सांगड घालायची ते माहीत नव्हते. शिवाय इंग्लंडमध्ये माझ्याकडे मराठी फॉंट्ससुध्दा नव्हते.

मराठी लेखिका सौ.पल्लवी शेटे गाडगीळ यांचे वास्तव्य त्या काळात लीड्सला आमच्या शेजारीच होते. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांना भेटलो. "आपण तर हांताने सुवाच्य अक्षरात लेख लिहून त्याची स्कॅन केलेली प्रत ईमेलमधून संपादकांकडे पाठवून देतो. छपाईसाठी लागणारी पुढची अक्षरजुळणी भारतातच होते." असे त्यांनी सांगितले. हा मार्ग मला ब्लॉगसाठी चालण्यासारखा नव्हता. मला निदान मराठी फॉन्ट्स जरी मिळाले तरी प्रिंटस्क्रीनचा उपयोग करून एकादा लेख चित्ररूपाने ब्लॉगवर टाकता येईल असा विचार केला. त्या दृष्टीने शोध घेतल्यानंतर युनिकोड सांपडला. तो इन्स्टॉल करून जेंव्हा मराठीमधली मुळाक्षरे पडद्यावर शळकली तेंव्हा मला ब्रम्हानंद झाला. तोंपर्यंत २००६ चे नववर्ष उजाडून पहिला दिवस संपायला आला होता. लगेच मुहूर्ताचे चार शब्द लिहून टाकले. लेख पूर्ण करून आणि ब्लॉगस्पॉटवर खाते उघडून तो प्रसिध्द करेपर्यंत जानेवारी महिन्याची तीन तारीख लागली होती.

युनिकोडमध्ये लिहिलेला मजकूर थेट ब्लॉगवर चढवता येतो हे समजल्याने चित्ररूपाचे सव्यापसव्य करण्याची गरज नव्हती. तीनचार भाग लिहून काढल्यानंतर नव्याची नवलाई संपली. आपण कोणतीही गोष्ट करू शकतो एवढे एकदा सिध्द झाल्यानंतर ती पुनःपुन्हा करत राहण्यासाठी सबळ कारण लागते. त्यामुळे आपण लिहिलेले कोणी तरी वाचू शकतो कां ते पहायला सुरुवात केली. ओळखीतल्या दहा बारा लोकांना मेल पाठवून माझा ब्लॉग वाचून पहाण्याची विनंती केली. त्यातील दोघातीघांची नकारार्थी उत्तरे आली. इतरांची आलीच नाहीत. कदाचित युनिकोड वाचण्याचा प्रॉब्लेम असेल म्हणून मी ते सारे ब्लॉग चित्ररूपाने चिकटवले आणि पुन्हा सर्वांना पत्रे लिहिली. कोणी ते वाचता येते असे लिहिले तर दिसते पण वाचायला त्रास होतो असे कोणी कळवले. एका मित्राने तर "रोज रोज तू काय लिहितो आहेस ते मी पाहून माझा अभिप्राय द्यायला पाहिजेच काय? ( मला दुसरा उद्योग नाही की काय?)" असे घुश्श्यात विचारले. पण निदान एक दोघांना तरी माझे ब्लॉगलेखन दिसत होते म्हणजे तांत्रिक दृष्ट्या हा प्रयोग य़शस्वी झाला होता. आता अक्षरांचा आकार वाढवणे वगैरे सुधारणा करून ते लिखाण वाचणे सोपे करायचे होते. त्यानंतर ते वाचकांना आवडण्याचा वा न आवडण्याचा प्रश्न होता.

माझ्या परिचयाच्या सगळ्या लोकांना जरी तांत्रिक कारणांमुळे माझा ब्लॉग वाचणे शक्य होत नसले तरी कांही अनोळखी मित्रांची पत्रे आली. त्या वर्षीचा 'सर्वोत्कृष्ट ब्लॉग' म्हणून ज्याची निवड झाली होती त्या नंदनने माझे ब्लॉगविश्वात अगत्याने स्वागत केले. त्याशिवाय पल्लवी, अमित, गौरी, अनूप, अग्वनदीपक आणि अनामिक यांनी कौतुकाचे दोन शब्द लिहून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे हे काम पुढे करत राहण्याचा उत्साह आला. त्या दरम्यान मृदुलाकडून मला याहू ३६० वर येण्याचे आमंत्रण मिळाले आणि 'आनंदघन' याच नांवाने तिथे दुसरा ब्लॉग सुरू केला. तिथल्या सुविधांचा विचार करता तो युनिकोडमध्ये ठेवला आणि ब्लॉगस्पॉटवरील हा ब्लॉग चित्ररूपाने पुढेही सुरू ठेवला. याहू ३६०वरील माझ्या लेखनाला अनेक प्रतिसाद मिळत होते आणि वाचकांची तसेच वाचनांची संख्याही रोजच्या रोज तिथे दिसत होती. नोटपॅडवर लेख लिहून ते थेट अपलोड करणे सोपे होते. त्यात दुरुस्ती करायला वाव होता. अशा ब-याच कारणांमुळे त्याला अग्रक्रम मिळत गेला. ब्लॉगस्पॉटवर अनेक वेळा चित्रे डकवतांना त्यात अडचण येत असे. त्यामुळेही तो मागे पडत गेला. अखेर गूगलने ब्लॉगस्पॉटला ताब्यात घेतल्यानंतर काय झाले कोणास ठाऊक, मला माझाच ब्लॉग उघडताही येईना. त्यासाठी कोणाकडे गा-हाणे मांडायचे तेही ठाऊक नव्हते. फुकट मिळत असलेल्या सेवेसाठी तक्रार तरी कशी करणार? मलाही आता चित्ररूपाने लेख प्रसिद्ध करण्याची गरज उरलेली दिसत नव्हती. आपला हा ब्लॉग आंता 'मृत' म्हणून घोषित होणार असे मी धरून चाललो होतो. त्यामुळे त्याचे शतक साजरे करण्याची संधी तरी कुठे उरली होती?

या वर्षी म्हणजे २००८ साली पुन्हा चित्र बदलले. मध्यंतरीच्या काळात माझ्या संगणकाची हार्डडिस्क बदलून तिचा नवा जन्म झाला होता. सहज प्रयत्न करून पाहता माझे ब्लॉगस्पॉटवरील खाते अचानक उघडले. एवढेच नव्हे तर त्यावर चार शब्द लिहून पाहिले तर ते लगेच उमटले देखील! दुस-या बाजूला याहूबद्दल त-हेत-हेच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्यामुळे त्याच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे मी आता या ब्लॉगचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला. कांही काळ मी नवे लेख दोन्ही ठिकाणी घालीन तसेच या ब्लॉगवर पूर्वी न दिलेले कांही निवडक जुने लेख इथे देणार आहे. त्यामुळे पहिले शतक पूर्ण करायला सव्वादोन वर्षाचा काळ लागला असला तरी दुसरे शतक लवकर संपवायचा विचार आहे. वाचकांचा अंदाज इथे येत नाही ही अडचण अजून शिल्लकआहे. अधून मधून प्रतिसाद येत राहिले तर मला प्रोत्साहन मिळेल.

या शतकपूर्तीनिमित्य वाचकांना अभिवादन करून त्यांचा आधार मिळत रहावा अशी नम्र विनंती करत आहे.
------------------------------------------------------------------------

5. Friday, April 25, 2008

याहू ३६० वरील ब्लॉगचे

अवघे पाऊणशे हजार (पाऊण लक्ष) यापूर्वी कधीही न केलेले, कांहीतरी अगदी वेगळ्या प्रकारचे असे काम करावयाच्या हौसेपोटी दोन वर्षांपूर्वी मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली त्यावेळी समोर कसलेच उद्दिष्ट नव्हते. थोडे दिवस इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर एक विषय घेऊन त्याबद्दल लिहावे असे वाटले पण नक्की काय लिहायचे ते ठरत नव्हते. पहाटेच्या सुमारास सूर्योदयापूर्वी थोडा वेळ तेजाने तळपून सूर्योदय होताच अंधुक होऊन जाणाच्या त्रयोदशीच्या रेखीव चंद्रकोरीचे त्या काळात योगायोगाने दर्शन घडले. द्वितीयेच्या चंद्रकोरीचे सगळ्यांनाच कौतुक असते पण आकाराने हुबेहूब तशीच दिसणारी त्रयोदशीची चंद्रकोर इतकी उपेक्षित का? असा प्रश्न विचारून तिच्याबद्दल लिहिले आणि मला माझा विषय सापडला. चंद्राबद्दल 'सबकुछ' मी लिहीत राहिलो. त्याचे ३३ भाग होऊन गेले. त्या मालिकेने ब्लॉगलेखनाच्या या प्रयत्नाला स्थैर्य दिले. त्यानंतर कधी स्फुट तर कधी मालिका असे लिहीत गेलो.
त्या वेळी भारतातल्या माझ्या ओळखीच्या बहुतेक लोकांकडे आधुनिक संगणक नसल्यामुळे त्यांना युनिकोडवर लिहिलेला मजकूर दिसत नव्हता. त्यांच्या सोयीसाठी मी सुरुवातीला ब्लॉगस्पॉटवर चित्रमय ब्लॉग सुरू केला. त्या काळात मी याहू ३६० साठी युनिकोडमध्ये जे लिहीत होतो.त्याची चित्रप्रत काढून ती ब्लॉगस्पॉटवर लावत होतो. याहू ३६० वर वाचकांची आणि वाचनांची संख्या रोजच्या रोज दाखवण्याची सोय होती. दिवसेदिवस ती वाचनसंख्या वाढत गेली. पहिले हजार होण्यासाठी जवळ जवळ पाच सहा महिने लागले होते, पण वर्ष संपेपर्यंत दहा हजारांचा पल्ला गाठला तेंव्हा धन्य वाटले होते. हा टप्पा गांठल्याबद्दल अभिनंदन करतांना नंदनने मला लक्षाचा आंकडा गांठण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि मी त्याच्या तोंडात साखर पडू दे असे म्हंटले होते.
दुस-या वर्षात हा वेग कायम राहिला आणि वाचनसंख्येतील सहस्रांचे रौप्यमहोत्सव आणि सुवर्णमहोत्सव साजरे होत वर्षअखेरपर्यंत साठ हजारांचा पल्ला गाठला. हे असेच चालत राहिले तर खरोखरच हे वर्ष संपण्यापूर्वी आपल्याला लक्षाधीश होण्याचा योग आहे असे दिसायला लागले होते. अजून मी त्याची आशा सोडलेली नाही. पण गेल्या महिनाभरात वेगळेच वारे वाहू लागले असल्याचे जाणवत आहे. त्याआधीच एका ब्लॉगमित्राने याहू ३६० आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिले होते, पण मी ते सीरियसली घेतले नाही. त्यानंतर एका ब्लॉगमैत्रिणीने आपला मुक्काम दुसरीकडे हलवला असल्याचे सांगितले आणि दुसरी जागा पाहिली सुध्दा. पण ती दोन्हीकडे आपली प्रतिभा दाखवू शकते हे लक्षात आल्यानंतर तिने याहू सोडला नाही.
आता मलासुध्दा बदलत्या परिस्थितीचे चटके बसायला लागले आहेत. सॉफ्टवेअरला कशा प्रकारच्या मेंटेनन्सची गरज असते हे मला माहीत नाही. पण त्यात त्रुटी निर्माण झाल्या आहेत असे दिसते. गेल्या कांही दिवसांपासून याहूवर नवी नोंद करतांना खूप अडचणी येऊ लागल्या आहेत. आज लिहिलेला हा भाग कधी प्रसिध्द होणार आहे हे मला माहीत नाही. प्रसिध्द झालेला ताजा भाग हा ब्लॉग उघडतांना बरेच वेळा दिसतच नाही. त्याऐवजी कुठला तरी जुना भाग अचानक प्रकट होतो. गेल्या दोन दिवसात माझा मलाच हा भाग याहू ३६० वर दिसू शकलेला नाही. त्यामुळे निदान कांही वाचकांपर्यंत तो पोचवण्यासाठी या जागी टाकला आहे.
पंच्याहत्तर हजारांची संख्या वाचनांने ओलांडल्याचे सुखद वृत्त आज मला दिसले. त्याबद्दल वाचकवृंदाचे मनःपूर्वक आभार. पण माझ्या या भावना त्यांच्यापर्यंत पोचतील की नाही अशी शंका येण्यासारखी परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे माझी मनोकामना असली आणि वाचकांचा आधार असला तरी लक्षापर्यंत पोचण्याचे लक्ष्य गांठण्यापर्यंत तिथला हा ब्लॉग टिकून रहावा अशी प्रार्थना करण्यापलीकडे काय करता येण्यासारखे आहे? वाचकांपर्यंत पोचण्यासाठी मी ब्लॉगस्पॉटवरील ब्लॉगचे पुनरुज्जीवन केले आहेच. पण किती जणांपर्यंत पोचत आहे हे समजायला सध्या मार्ग नाही. तोसुध्दा निघेल अशी आशा आहे.

No comments: