Sunday, January 22, 2012

दिसणे आणि असणे

"दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं" अशी म्हण आहे. तिचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येत असतो. हे स्वतःचे वेगळे दिसणे कोणी मुद्दाम करत असला तर त्याच्याबद्दल "हत्तीचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे असतात" हे उदाहरण दिले जाते. 'चकाकणारे सगळेच सोने नसते', 'दुरून डोंगर साजिरे' वगैरे म्हणीसुध्दा आहेत. पण 'दिसते तसे नसणे' हे बहुधा अपवादच असतात. बहुतेक वेळा आपली नजर फसत नाही. काही गायी शिंगे मोडून वासरात शिरण्याचा प्रयत्न करतात आणि काही बुढ्ढ्या घोड्या लाल लगाम लावून मिरवतांना पाहून हंसू येते. याचे कारण त्या जशा आहेत त्यांपेक्षा कोणी वेगळे असल्याचा आव आणतात, पण त्यांचा तो प्रयत्न फसतो. त्यामुळे त्या जशा असतात तशाच पाहणा-याला दिसतात. एकंदरीत पाहता बहुतेक वेळा 'चक्षुर्वै सत्यम्' असाच अनुभव येतो.

कधीकधी दिसणे आणि असणे यात काही विसंगती नसली तरी ते व्यक्त करण्यातून फरक पडतो. दिसणे आणि असणे या दोनच क्रियापदांच्या उपयोगातून कशा वेगळ्या छटा निर्माण होतात याचा एक अनुभव सांगतो. एकदा आमचे घरकाम करणारी एक कामवाली बाई काम सोडून गेली. जातांना तिने तिच्या बदल्यात कोणाला आणूनही दिले नाही. त्यामुळे आमच्या गृहमंत्र्यांनी नवी बाई शोधायची मोहीम सुरू केली. किंबहुना ती मुद्दाम करावी लागली नाही. कामवाल्या बाईशिवाय आपले जीवन कसे असह्य होत चालले आहे हे रोजच्या फोनाफोनीमध्ये मैत्रिणींना सांगताक्षणीच सर्वांनी त्यातून मार्ग काढण्यासाठी हातभार लावला आणि त्यांच्या माहितीमधल्या निरनिराळ्या कामवाल्या बायांना त्या आमच्याकडे पाठवून द्यायल्या लागल्या.

या उमेदवारांचा एकंदर अवतार आणि त्यांच्या बोलण्यातून जे काही इम्प्रेशन पडेल त्यावरूनच नवी बाई ठरवायची होती. याबद्दलचे सर्वाधिकार सौ.कडेच होते, कारण तिलाच त्या बाईकडून रोज घरकाम करून घ्यायचे होते आणि त्याचा अनुभव होता. त्या बायका भेटायला आल्यावेळी मी घरी असलो तर माझ्या नजरेलाही त्या क्षणभर पडत असत. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार फक्त पत्नीचाच आहे असे असले आणि तिला हे माहीत असले तरी ती माझा सल्ला विचारायची. म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम आला तर मग माझ्यावर त्याची जबाबदारी ढकलणे तिला सोयीचे झाले असते. कोठल्याही बाईबद्दल माझे अगदीच वाईट मत झाले नसेल तर मी आपला गुळमुळीत उत्तर देत असे, "ही तशी बरी दिसते आहे, नाही का?" आपण उगाच तिच्यातले दोष कशाला काढायचे? मला तरी क्षणभरात ते कसे कळणार होते? आणि ते दिसले तरी मला त्याच्याशी काय देणे घेणे आहे? शिवाय दिसणे आणि असणे यात किती तरी फरक असू शकतो. तेंव्हा सावधपणे बोललेले बरे.

"अहो, असं काय करताय्?, तुम्ही हे पाहिलंत का?, ते पाहिलंत का?" किंवा "नुसती बरी दिसते आहे की चांगली वाटते आहे?" वगैरे प्रश्नांवर मी आपला नंदीबैलासारखी मान हलवीत असे. त्याचा तिला हवा तो अर्थ काढायचे तिला पूर्ण स्वातंत्र्य होते.

एकदा मात्र "ही बाई बरी दिसते आहे" म्हणण्याऐवजी चुकून मी "ही बाई दिसायला बरी आहे" असे म्हणून गेलो. पुढे काय झाले ते सांगायची गरज आहे का?

'दिसणे' आणि 'असणे' हे दोनच शब्द पण त्याचे अर्थ किती निराळे होतात? पहिल्या उदाहरणातले तिचे 'दिसणे' म्हणजे तिचे 'सभ्य किंवा असभ्य वागणे', 'सरळ किंवा तिरकस बोलणे', 'नीटनेटकेपणा किंवा वेंधळेपणा', 'स्वच्छता किंवा गलिच्छपणा', 'प्रामाणिकपणा' किंवा 'लबाडपणा', 'विनय किंवा ऊर्मटपणा', 'सालस किंवा चवचाल वृत्ती', 'विश्वसनीयता किंवा बिनभरोसा' वगैरे गुणांचा त्यात समावेश होतो. फक्त चेहरा पाहून आणि एकादे वाक्य ऐकून आपल्याला त्यात किती गोष्टी दिसतात? या गुणांमुळे ती आपले घरकाम कसे करेल हे ठरणार होते. त्याच्या पुढे आलेल्या 'आहे' या शब्दाला फक्त व्याकरणापुरताच अर्थ असतो. कदाचित ती जशी दिसते तशी नसण्याची शक्यता त्यात दडली असते.

दुस-या उदाहरणातले 'दिसणे' म्हणजे मात्र फक्त तिचे 'रूप' असाच अर्थ बहुधा काढला जातो. त्याचा घरकामाशी काही संबंध नाही. आणि 'आहे' याचा अर्थ निश्चितपणे 'सकारार्थी' असाच होतो, किंवा तसे माझे मत आहे असे त्यातून दिसते. एकाद्या परस्त्रीबद्दल मी असे उद्गार (पत्नीसमोर) काढणे म्हणजे ते अगदी ताळतंत्र सोडून देणे झाले. त्यातून नको ते अर्थ निघण्याची शक्यता होती.

तात्पर्य काय तर कोणत्याही भाषेमधल्या सुट्या शब्दांचा अर्थ माहीत असणे पुरेसे नसते, ते शब्द थोडे मागे पुढे झाले तरी कधी कधी संदर्भ बदलतात आणि अर्थाचे अनर्थ होतात.Sunday, January 15, 2012

मकरसंक्रमणआज मकरसंक्रांत आहे. म्हणजे काय आहे हे सांगणारे लेख बहुतेक वर्तमानपत्रात आले आहेतच. माझ्या लहानपणी आमच्या घरात टिळक पंचांगाचा उपयोग केला जात असे. हे पंचांग वापरणारे फारच थोडे लोक गावात रहात असल्यामुळे ते मुद्दाम पुण्याहून मागवले जात असे. त्या काळात टिळकपंचांगातली संक्रांत दरवर्षी १० जानेवारीला येत असे. वर्षभरातले बाकीचे सारे सण तिथीनुसार येतात आणि दरवर्षी ते वेगळ्या तारखांना येतात, पण ही संक्रांत तेवढी इंग्रजी तारखेनुसार कशी येते याचे आश्चर्य वाटायचेच, शिवाय इतर पंचांगात ती १४ तारखेला येत असतांना टिळक पंचांगात चार दिवस आधी का येते याचे एक वेगळे गूढ वाटत असे. कदाचित देशभक्त टिळकांवर इंग्रजांचा राग असल्यामुळे ते लोक संक्रांतीला त्यांच्याकडे आधीच पाठवत असावेत.संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून तिच्या फलाचे वाचन केले जात असे. घरातील सर्वांनी एकत्र बसून ते ऐकण्याची प्रथा होती. गणपतीचे वाहन उंदीर, शंकराचे नंदी याप्रमाणे सर्व देवदेवतांची वाहने ठरलेली आहेत, पण ही संक्रांत मात्र दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असे, शिवाय तिचे एक उपवाहन असे. ती कुठल्यातरी दिशेकडून येत असे आणि कुठल्यातरी दिशेला जात असे. शिवाय तिचे मुख तिसरीकडे असे आणि दृष्टी चौथ्या दिशेला. त्या सर्व दिशांना राहणा-या लोकांना त्यानुसार फळ मिळते अशी धारणा होती. या सर्व दिशा कोणत्या केंद्रबिंदूच्या सापेक्ष आहेत ते दिले नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावायला मोकळा होता. या सगळ्यातून काय अर्थ निघणे अपेक्षित आहे याचा मला आजपर्यंत पत्ता लागलेला नाही.
एकाद्यावर संक्रांत आली म्हणजे त्याचा आता विनाश किंवा निदान नुकसान तरी होणार असे समजले जाते. तिचा स्वभाव विध्वंसक आहे असे यात गृहीत धरले आहे. संक्रांतीची गणना दैत्य, राक्षस, असुर अशा वर्गात होत नाही तरीही असे का असावे कुणास ठाउक. तिला खूष करून आपला बचाव करून घेण्यासाठी तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो की स्वतः बलवान होऊन येऊ घातलेल्या संकटांना सामोरी होण्यासाठी तो खाल्ला जातो हे ही स्पष्ट होत नाही. तिळातली स्निग्धता आणि गुळातला गोडवा यांच्यामुळे तो चविष्ट असतोच, शिवाय त्यात अनेक प्रकारचे शक्तीवर्धक गुण असल्यामुळे तो खाणे हे माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने किती हितकारक आहे याचे वर्णन करणारे लेख आता नियतकालिकांमध्ये वाचायला मिळतील. पण असे असेल ते बाराही महिने खायला काय हरकत आहे? थंडीच्या दिवसात शरीराला जास्त ऊर्जेची आवश्यकता असते असे असले तरी निदान महिनाभर आधीपासून थंडी पडायला लागलेली असते तेंव्हापासून तरी खायला सुरू करावे. पुणे मुंबई दरम्यान प्रवास करणारे लोक मात्र वाटेत लोणावळ्याची चिक्की खाऊन वर्षभर संक्रांत साजरी करत असतात.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीमधून मकर राशीत प्रवेश करतो. आभाळात सर्वांना दिसणारा सूर्य एकच असतो आणि स्पष्टपणे न दिसणा-या राशीसुध्दा समानच असाव्यात. असे असतांना टिळक पंचांगवाल्यांचा सूर्य चार दिवस आधीच मकरसंक्रमण कसे करत असेल असा प्रश्न मला लहानपणी पडत असे. धनू आणि मकर राशींमधल्या सीमारेषा काही आभाळात कोणी आंखून ठेवलेल्या नाहीत. सूर्य या राशीमधून त्या राशीत गेला ही गोष्ट प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. काही निरीक्षणे आणि प्रचंड आकडेमोड करून गणिताच्या आधाराने ती ठरवली जाते. गणिताची पध्दत परंपरेनुसार ठरत गेली असल्यामुळे त्यात मतभेद असू शकतात. पूर्वीच्या काळात पंचांग तयार करणा-या ज्या विद्वानांबद्दल आदर वाटत असे किंवा त्यांच्या पध्दतीवर ज्यांचा विश्वास असे त्यानुसार लोक आपापली पंचांगे ठरवत असत. आजच्या राहणीमध्ये या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत.
मकरसंक्रांतीच्या दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते असे सांगितले जाते. हजार वर्षांपूर्वी कदाचित तसे होत असेल. मकरसंक्रांत माझ्या बालपणी इतर पंचांगांमध्ये १४ जानेवारीला येत असे, हल्ली १५ जानेवारीला येते. याचा अर्थ तिची तारीख हळू हळू पुढे जात आहे. मागे मागे गेल्यास कधी तरी ती २१ - २२ डिसेंबरला येत असावी. ग्रेगोरियन कँलेंडरमध्ये वेळोवेळी सुधारणा केली गेली असल्यामुळे वर्षातला सर्वात लहान दिवस (विंटर सोलस्टाइस) आजसुध्दा २१ किंवा २२ डिसेंबरलाच येतो. त्यानंतर दिवस मोठा होऊ लागतो आणि सूर्योदय व सूर्यास्ताला ज्या ठिकाणी सूर्याचे बिंब क्षितिजाला टेकतांना दिसते तो बिंदू उत्तरेच्या दिशेने सरकू लागतो. याचा अर्थ सूर्याचे उत्तरायण आधीच सुरू होऊन गेलेले आहे.

पृथ्वीचा आंस वाटतो तेवढा स्थिर नाही. अत्यंत सूक्ष्म गतीने त्याचा तिरकसपणा बदलत असतो यामुळे शेकडो वर्षांच्या कालावधीत क्षितिजामध्येही किंचित बदल येत असतो आणि त्याच्या सापेक्ष दिसणारे राशीचक्र किंचित बदलत असते. यामुळे हा फरक येतो. आपले पंचांग पूर्णपणे राशीचक्रामध्ये होत रहाणा-या ग्रहांच्या भ्रमणावर आधारलेले असल्यामुळे विंटर सोलस्टाइस आणि मकरसंक्रांत आता वेगळ्या दिवशी येतात.

मकरसंक्रांतीला एकमेकांना तिळगूळ देऊन आपले संबंध दृढ करायची प्रथा तर आहेच, शिवाय नवीन लग्न झालेली मुलगी, गरोदर स्त्री, नवजात बालक अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्यांचा संक्रांतसण साजरा केला जातो. त्या दिवशी हलव्याचे दागिने तयार करून ते त्यांना चढवले जातात. लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. मराठी माणसांनी या प्रथा आता साता समुद्रापार नेल्या आहेत. अमेरिकेत राहणारे मराठी लोकसुध्दा हे सण साजरे करतांना दिसतात. संक्रांतीचे हळदीकुंकू करून त्यात जमलेल्या सर्वजणींना एकादी क्षुल्लक अशी भेटवस्तू दिली जाते. पण याला लुटवणे असे म्हणायची पध्दत आहे.

Monday, January 09, 2012

माझ्या ब्लॉग्जचे वाचक

या ब्लॉगवर चार ओळी लिहायला सुरुवात केल्यापासूनच कोणी तरी त्या वाचाव्यात असे मला वाटत असे. अर्थातच किती लोक त्या वाचतात हे मला कळायला हवे हे ओघाने आलेच. सहा वर्षांपूर्वीच्या काळात फक्त याहू ३६० या स्थळावर ही सोय असल्यामुळे मी तिथे आपले खाते उघडून लिहायला लागलो. सुरुवातीला शंभर दोनशे पर्यंत पोचण्यासाठीसुध्दा खूप वेळ वाट पहावी लागायची. आपल्या ब्लॉगकडे कोणी फिरकत नाही म्हणून माझे मन विषण्ण होत असे, पण नेटाने तो प्रयत्न चालू ठेवल्यावर हळूहळू परिस्थिती बदलत गेली. वाचनांची संख्या शंभर, दोनशे वरून हजार, दोन हजार करीत वर्षाअखेर दहा हजारावर गेली तेंव्हा माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. त्यामुळे माझ्या अंगात हुरुप संचारला आणि दुस-या वर्षात खूप भाग लिहिले. वाचकांनीही अपेक्षेपेक्षा जास्त आधार दिला आणि वाचनसंख्या पांचपटीने वाढून अर्ध्या लाखावर गेली. यामुळे तिस-या वर्षाची (२००८ ची) सुरुवात अत्यंत उत्साहाने झाली होती, पण थोड्याच दिवसांनी याहू ३६० च्या क्षितिजावर अनिश्चिततेचे ढग जमू लागले. तरी ही पुढच्या काळात याहू ३६० ब्लॉग चालत राहिला. १६ ऑक्टोबर २००८ रोजी त्याच्या वाचनसंख्येने लाखाचा आकडा पार केला आणि १२ मे २००९ ला सव्वा लाखांचा टप्पा गाठला. त्यानंतर मात्र लवकरच तो कायमचा बंद झाला.
ब्लॉगस्पॉटवरील माझा हा प्रयत्न वर्ष दीड वर्ष कोमात गेला होता, २००८ च्या सुरुवातीला त्याच्या अंगात धुगधुगी आल्याचे लक्षात आल्यावर त्यात नवे चैतन्य आले. याच सुमारास कधी तरी गूगलने 'ब्लॉगस्पॉट'वर ताबा मिळवून त्याचे 'ब्लॉगर'मध्ये रूपांतर केले असावे. त्या काळात ब्लॉगस्पॉटवर वाचकांची संख्या समजण्याची सोय नव्हती. १ मे २००८ पासून मी एक बाहेरचा फ्री काउंटर लावून घेतला. त्यामुळे भेट देणा-यांची संख्या समजू लागली. सुरुवातीला ती संख्यासुध्दा हळूहळूच वाढत होती. दोन वर्षांनंतर म्हणजे २०१० च्या मध्यापर्यंत ती ३०००० चे वर गेली होती. पण त्यानंतर हा काउंटर अधून मधून बंदच पडू लागला असल्याचे लक्षात आले. तरीही २०१० अखेर ती संख्या ५०००० वर गेली होती. गेल्या महिन्यात सुध्दा तीन चार दिवस तो बंद पडला होता. पण इतर वेळी चालत असल्याने त्याची संख्या वाढत वाढत आता सत्याऐंशी हजारांवर गेली आहे. तो चालत राहिला तर आतापर्यंत मी कदाचित लक्षाधीश होण्याच्या बेतात आलो असतो असे दुस-या गणकावरून दिसते.
काही काळापूर्वी ब्लॉगरने स्वतःच व्हिजिटर्सची आकडेवारी द्यायला सुरुवात केली. १ डिसेंबर २०१० ला फ्री काउंटर वर ४७९६२ आणि ब्लॉगरवरील संख्या २०१२४ होती, म्हणजेच त्या वेळी दोन्हींमध्ये २७८३८ एवढा फरक होता. त्यानंतर फ्री काउंटर अधून मधून थांबत थांबत आणि ब्लॉगरचा गणक व्यवस्थितपणे चालत राहिला असावा असे समजायला हरकत नाही. आज फ्री काउंटरवर ८७२१४ आणि ब्लॉगरच्या हिशोबाने ७२९६१ इतक्या संख्या आहेत. म्हणजे दोन्हीमधील फरक १४२५३ इतकाच आहे. कदाचित काही दिवसांनी ब्लॉगरवरील आकडा पुढे जाईल. त्यानंतर फ्री काउंटरला अर्थच राहणार नाही.ब्लॉगरवरील आकडेवारीत बराच मजेदार तपशीलसुध्दा मिळतो. किती वाचकांनी या ब्लॉगला भेटी दिल्या एवढा एकच आाकडा फ्री काउंटरवर मिळतो. पण कोणत्या लेखावर किती टिचक्या पडल्या आणि कोणकोणत्या देशामधील वाचकांनी त्या मारल्या, तसेच किती लोकांना माझ्या ब्लॉगचा पत्ता कुठून मिळाला वगैरेची आकडेवारी इथे मिळते. ती माहितीसुध्दा गेला एक दिवस, एक आठवडा, एक महिना आणि आतापर्यंत अशा निरनिराळ्या कालावधीसाठी मिळते. २०११ साली या ब्लॉगला ४७८३१ भेटींची नोंद आहे, म्हणजे सरासरी दर महिन्याला सुमारे चार हजार झाले. कमीत कमी संख्या २६५५ आणि जास्तीत जास्त ४९९३ इतक्या आहेत. एकूण भेटींची संख्या पन्नास हजाराला आणि महिन्यातली संख्या पाच हजाराला थोडी कमी पडली.

ब्लॉगवरील माझ्या लेखांची संख्या आणि वाचकांची संख्या यात जवळचा संबंध दिसत नाही. २००८ मध्ये याचे पुनरुज्जीवन केल्यानंतर त्या वर्षी २५१ आणि २००९ साली २२६ भाग टाकले होते. दोन्ही मिळून ४७७ इतकी पोस्ट झाली होती. यातले बरेचसे भाग पूर्वी याहू ३६० वर प्रकाशित केलेले असल्यामुळे ते तयार होते. त्यानंतर पुढील वर्षी म्हणजे २०१०मध्ये आणि मागील वर्षी मुख्यतः नवे भाग लिहिले असल्यामुळे अर्थातच त्यांची संख्या १०० आणि ८८ अशी कमी भरली होती. वाचकांची संख्या मात्र या काळात २००८ आणि २००९ मिळून सुमारे २००००, सन २०१०मध्ये ३०००० आणि २०११मध्ये ४७००० अशी वाढत गेली आहे. याचा अर्थ जुने भाग कालांतराने वाचणा-यांची संख्या मोठी आहे. कोणता लेख कितीजणांनी वाचला याची आकडेवारी वर दिलेल्या कोष्टकात दिली आहे. त्यावरून हेच दिसते. पण या लेखांच्या वाचकांची एकत्र संख्या एकंदर वाचकांच्या १५-२० टक्के एवढीच भरते त्यामुळे इतर ८०-७५ टक्के लोक काय वाचत असतील ते कळायला मार्ग नाही. मनोगत, मिसळपाव आणि उपक्रम या संस्थळावर मी काही लेख पाठवले होते. त्या ठिकाणी मात्र पहिल्या दोन तीन दिवसात जितक्या वाचकांनी ते वाचले असतील तेवढेच. त्यानंतर वाचकांचा आकडा वाढलाच तर तो मुख्यतः प्रतिसादांमुळे असतो. मूळ लेख सहसा कोणी पुन्हा वाचत नसावा.
बहुधा २००९ च्या सुरुवातीला माझ्या ब्लॉगवर फॉलोअर्सची नावे दिसायला सुरुवात झाली. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे काही समजले नाही. यांच्यातले दोन चारजण मला मनोगताच्या कट्ट्यावर किंवा ब्लॉगर्सच्या मेळाव्यात भेटले होते तेवढेच. 'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. हे लोक नक्कीच माझे लिखाण वाचत असावेत आणि कदाचित त्याची शिफारस करीत असावेत. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता पंच्याण्णऊवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या शतकाप्रमाणेच या पाठीराख्यांचे शतकही २०११ मध्ये पुरे झाले नाही.माझे बहुतेक सारे वाचक भारतवासीच आहेत. ते मराठीभाषिकच असणार हे लिहिण्याची आवश्यकता नाही, पण ते कोणकोणत्या राज्यांमध्ये निवास करतात याची माहिती उपलब्ध नाही. मराठी भाषिकांची संख्या अमेरिकेत भरपूर झाली असल्यामुळे परदेशीय वाचकांमध्ये त्यांची संख्या सर्वात मोठी असणे हे अपेक्षित आहे. व्हिएटनाम किंवा दक्षिण कोरियासारख्या देशात मराठी वाचणारे लोक असतील आणि माझ्यासारखा एकजण (स्क्रीनच्या) पांढ-यावर काळे करत असल्याचा त्यांना पत्ता लागत असेल हे समजल्याने गंमत वाटली.

वाचकांना वाचेवे असे वाटेल असे लिहिण्याची माझी इच्छा आहे, पण मी जे लिहू शकतो त्यातले त्यांना काय वाचायला आवडते ते मला समजणे जरा कठीण आहे. त्यामुळे मला जे लिहायला आवडते तेच लिहित राहणे भाग आहे. वाचकांनी ते गोड मानून वाचावे आणि मला प्रोत्साहन देत रहावे अशी नम्र विनंती.

Saturday, January 07, 2012

सोनेरी (पिकली) पाने - २ (संयुक्त यादी)गेल्या वर्षाच्या अखेरीस सोनेरी (पिकली) पाने हा लेख लिहितांनी आठवणींच्या आधाराने एक यादी तयार केली होती. त्यात समाविष्ट नसलेल्या आणखी काही नावांची पुस्ती त्याला जोडली होती. तरीसुध्दा आणखी काही नावे राहून गेली होती.
गीतकार जगदीश खेबूडकर हे त्यातले सर्वात ठळक नाव. ग दि माडगूळकरांच्या काळात खेबूडकरांनी गीतरचनेला युरुवात केली होती आणि त्यांच्या पश्चात ते मराठी चित्रपटांचे प्रमुख गीतकार झाले होते. वि.आ.बुवांच्या नर्मविनोदी लेखकाने अनेक वर्षे मराठी वाचकांना खूप हसवले होते. बाबा आमटे यांच्या समाजकार्यात साधनाताईंनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. नवीन निश्चल यांचे अनेक चित्रपट गाजले होते. तसेच काळूबाळूंच्या तमाशाने लोककलेच्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले होते. नाट्यदिग्दर्शक बादल सरकार आणि नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार या दोन सरकारांनी कलाक्षेत्रावर राज्य केले होते. हरिश्चंद्र बिराजदारांनी हिंदकेसरी हा सन्मान मिळवला होता. पी.सी.अलेक्झँडर हे ज्येष्ठ प्रशासक होते आणि राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. महेंद्रसिंग टिकैट हा उत्तर भारतामधील शेतक-यांचे तर वसंत साठे विदर्भातीस जनतेचे पुढारी होते. पहिल्या भागातील आणि वरील सर्वांच्या नावांची एक संयुक्त यादी खाली दिली आहे.


गौतम राजाध्यक्ष - छायाचित्रकार १६-९-१९५० -- १३-९-२०११
सुलतानखान - सारंगी वादक, -- २७-११-२०११
जगजीतसिंग - गजल गायक - ८-२-१९४१ --१०-१०-२०११
श्रीनिवास खळे - संगीत दिग्दर्शक - ३०-४-१९२६ -- २-९-२०११
भूपेन हजारिका - संगीत दिग्दर्शक --- ५-११-२०११
अशोक रानडे - संगीतज्ञ --- ३०-७-२०११
इंदिरा गोस्वामी - साहित्यिक --- २९-११-२०११
माधव गुडी - गायक --- २२-४-२०११
भारतरत्न स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी - महान गायक --- २४ जानेवारी -२०११
श्रीकांत देशपांडे - गायक --- ३०-१-२०११
वंदना विटणकर - कवयित्री --- ३०-१२-२०११
प्रभाकर पणशीकर - नटश्रेष्ठ, निर्माते --- १३-१-२०११
शम्मीकपूर - अभिनेता --- १४-८-२०११
देवआनंद - सदाबहार नट --- ४-१२-२०११
सत्यदेव दुबे - नटश्रेष्ठ, निर्माते --- २५-१२-२०११
करुणा देव - आकाशवाणी कलाकार --- ५-६--२०११
पी.के.आयंगार - अणूशास्त्रज्ञ --- २९-६-१९३१ -- २१-१२-२०११
हरगोबिंद खुराणा - शास्त्रज्ञ - नोबेल विजेते -- ९-१-१९२२ --- ९-११-२०११
मणी कौल - चित्रपट निर्माते - २५-१२-१९४४ -- ६-७-२०११
पतौडीचे नवाब (टायगर) - क्रिकेटपटू --- २१-९-२०११
जहांगीर सबावाला - चित्रकार -- २३-८-१०२२ -- २-९-२०११
मारिओ मिरांडा - व्यंगचित्रकार -- २-५-१९२६ -- ११-१२-२०११
एम.एफ. हुसेन - चित्रकार - १७-९-१९१५ -- ९-६-२०११
सत्यसाईबाबा - धर्मगुरू --- २४-४-२०११

नवीन निश्चल - अभिनेता --- १९-३-२०११
वि.आ.बुवा - विनोदी लेखक --- १७-४-२०११
जगदीश खेबुडकर - गीतकार --- ३-५-२०११
बादल सरकार - नाट्यदिग्दर्शक --- १४-५-२०११
महेंद्रसिंह टिकैत - शेतकरी नेते --- १५-५-२०११
लहू खाडे (काळू) - तमाशा कलावंत --- ७-७-२०११
साधनाताई आमटे - समाजसेविका - ५-५-१९२७ - ९-७-२०११
पी.सी.अलेक्झँडर - ज्येष्ठ प्रशासक --- १०--२०११
अजीजुद्दीन खान (बाबा) - संगीतज्ञ --- २३-८-२०११
हरिश्चंद्र बिराजदार - कुस्तीगीर --- १२-९-२०११
वसंत साठे - राजकीय नेते --- २३-९-२०११
सुबल सरकार - नृत्यदिग्दर्शक --- १२-११-२०११

Wednesday, January 04, 2012

नव्या वर्षाची सुरुवात

नवे निश्चय, निर्धार, योजना वगैरेंनी नव्या वर्षाची सुरुवात करायची अशी जुनी प्रथा आहे. निदान तसा विचार तरी बहुतेकजण करतात. मीसुध्दा ते करीत आलो होतो. पण यंदा मात्र असे काही करायचे नाही, आपण पुढाकार न घेता काय काय घडते आहे ते नुसते पहायचे असेच मी ठरवले होते. या वर्षीचे वेगळेपण यातच होते. अमेरिकेतल्या इंका जमातीच्या नोस्ट्रॅडॅमस किंवा भृगु ऋषींनी तर २०१२ साल उजाडणारच नाही असे वर्तवले होते म्हणे. त्यामुळे त्यापूर्वीच जेवढी मजा करून घ्यायची तेवढी करून घेण्याचा सपाटा काही मंडळींनी लावला होता. आपल्याकडच्या गटारआमूशेची ही अमेरिकन आवृत्ती म्हणायची! चुकून माकून समजा अशी जगबुडी आलीच तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपण केलेली पूर्वतयारी उगाच वाया गेली असती!

आदले दिवशीच उदय, शिल्पा, ईशा आणि इरा पुण्याहून आलेले होते आणि घरामधले चैतन्य जागे झाले होते. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी आणि चांगले चुंगले खाणेपिणे, टीव्हीवरील खास कार्यक्रम पाहता पाहता त्यांच्यावर शेरेबाजी, टीकाटिप्पणी वगैरे करता करता रात्रीचे 'वाजले की बारा' आपोआप घडले. मागच्या वर्षी त्याची वाट पहाता पहाता मला अनावर झोप आली होती. नवी खरेदी, कपडे वगैरे दाखवणे, जुने फोटोंचे आल्बम पाहणे वगैरेंमध्ये कपाटांमधले बरेच सामान बाहेर निघाले होते आणि चिमुकल्या ईशाइरांची खेळणी माळ्यावरून खाली काढून दिली होती, शिवाय त्यांनी घरातल्या आणखीही थोड्या वस्तू काढून त्या सगळ्या घरभर पसरवून ठेवल्या होत्याच, पुण्याहून आणलेल्या बॅगांमधले सामानही उचकटवून त्यात मिसळले होते आणि त्यातच खेळता खेळता त्या स्वतःही आडव्या झाल्या होत्या. मध्यरात्रीनंतर ते सगळे आवरण्याचा मूड कोणालाही नव्हता. त्यामुळे मधला पसारा बाजूला सरकवून थोडी मोकळी जागा करून मोठी मंडळी त्यात झोपी गेली.

अचानक टेलीफोनची घंटा खणाणली. गाढ झोपेत असल्यामुळे ती कोणालाच ऐकू गेली नाही की कोणाचीही उठायची तयारी नव्हती कोण जाणे, पण ती खणाणत राहिली. दहाबारा सेकंदानंतर मीच उठून हॉलमध्ये गेलो. भारतामधले कोणीही रविवारी इतक्या पहाटे उठून फोन करेल असे वाटत नव्हते, तसेच झाले. अमेरिकेतून अजयचा फोन होता. या वेळी आमच्याशी बोलायला त्यांना फुरसत होती आणि सगळ्यांशी पोटभर गप्पा मारायच्या होत्या. पण इथे तर सारे ढाराढूर झोपलेले होते. मी एकट्यानेच त्यांच्याशी चारपाच मिनिटे बोलून घेतले आणि तिकडे ते लोक झोपायच्या तयारीला लागण्यापूर्वी पुन्हा फोन करायला त्याला सांगितले. तोपर्यंत इकडची बहुतेक मंडळी झोपेतून उठण्याची शक्यता होती.

माझी झोप मात्र आता पूर्णपणे उघडली होती. बाहेर झुंजूमुंजू उजाडलेही होते. कपडे बदलून मी रोजच्यासारखाच फिरायला बाहेर पडलो. आज पार्कमध्ये फारच कमी माणसे आली होती. य़ा वर्षी लोकांनी कोणते नवे निर्धार केले होते माहीत नाही, पण सकाळी लवकर उठून फिरायला जाणे हे त्यात नक्कीच नव्हते. उलट रोजच्यातल्या काही लोकांनी हवेमधला गारवा पाहून आज मॉर्निंग वॉकला फाटा द्यायचे ठरवले असावे असा विचार करत मी दूध घेऊन घरी परत आलो. दूधवाले, पेपरवाले वगैरे मंडळी मात्र आपल्या नेहमीच्या कामावर दिसत होती. त्यांच्यासाठी नववर्षदिवस काही वेगळा नव्हता. दूध तापेपर्यंत माझ्यापुरता एक कप चहा बनवला आणि कप घेऊन काँप्यूटरसमोर जाऊन बसलो.

इंटरनेटवरून आलेल्या शुभेच्छापत्रांचा भला मोठा ढीग टपालपेटीत जमा झाला होता. काही वर्षांपूर्वी मी सुध्दा दरवर्षी खास सचित्र शुभेच्छापत्र तयार करून ते सर्वांना पाठवत असे. त्यावेळी माझ्या ईमेलच्या पत्त्यांच्या यादीत पंधरावीसच नावे होती. ती वाढत गेली तसतसा माझा उत्साह कमी होत गेला. आता त्या अॅड्रेसबुकात दोनअडीचशे नावे झाली आहेत, त्यातल्या कोणाकोणाला ग्रीटिंग्ज पाठवायचे याची निवड करायलासुध्दा सहज दिवसभर लागला असता आणि तो मिळाला नव्हता. इराने काढलेल्या एका छानशा चित्रावर थोडा मजकूर घालून एक कार्ड झटपट बनवले आणि ब्लॉगवर तेवढे टाकले. लोकांना ते पाठवायचे राहूनच गेले. ज्यांच्याकडून मला छान सचित्र किंवा अर्थपूर्ण अशी कार्डे आली होती तेवढ्या लोकांना "तुम्हालासुध्दा (सेमटुयू)" एवढे उत्तर देण्यातच तास दोन तास गेले.

तोपर्यंत घराला जाग आली, पुन्हा चहाची आवर्तने झाली, मनपसंत नाश्ता झाला, अजयचा फोन आला आणि सगळ्यांचे आलटून पालटून त्यावर तासभर संभाषण चालले होते. इतर आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे फोनसुध्दा दुस-या यंत्रावर येत होतेच. त्यातला एक बार्शीच्या प्रसादचा होता. तो आजच कामासाठी वाशीला आला होता. त्याला आमच्या घराचे नेमके स्थान आणि आजूबाजूच्या खाणाखुणा सांगितल्या. त्यांच्या आधाराने अर्ध्या तासात तो स्वतःही येऊन पोचला. त्याच्याशी वार्तालाप होईपर्यंत जेवायची वेळ झाली होती, पण त्याला एका ठिकाणी जेवायला जायचे आधीपासून ठरले असल्यामुळे तो थांबला नाही.

नववर्षाचा पहिला दिवस बाहेर जेवून साजरा करण्याचा निर्णय एकमुखाने झाला. त्यासाठी एकाद्या आगळ्या ठिकाणी जाणे ओघाने आलेच. रघुलीलामधल्या द व्हिलेजला जाऊन थडकलो. तिथे आत तर गर्दी होतीच, प्रवेशद्वारातच दहा माणसे वाट पहात उभी होती. तिथला मॅनेजर आणखी कोणाला नंबरसुध्दा द्यायला तयार नव्हता. पंधरावीस मिनिटे टंगळमंगळ करून इतर पर्यांयांवर चर्चा केली आणि पुन्हा व्हिलेजमध्ये गेलो. आता काही लोक बाहेर पडू लागले होते. त्यामुळे चाटपाणीपुरी वगैरेंनी सुरुवात करेपर्यंत बसायला जागा मिळण्याची आशा निर्माण झाली होती.

मॉलमधल्या एका मोठ्या हॉलमध्ये डेरेदार वटवृक्षांचे चार पाच कृत्रिम बुंधे उभे करून आणि त्याला वर फांद्या पाने वगैरे अडकवून हे खेड्याचे दृष्य बनवले होते. त्यातच सगळ्या कडांनी झोपड्यांसारखे दिसणारे स्टॉल्स ठेवले होते, बसायला कुठे बाकडी, कुठे खुर्च्या तर कुठे खाटा ठेवल्या होत्या. राजस्थानमधील ग्रामीण वाटावेत असे कपडे आणि पगड्या धारण केलेले सेवक इकडे तिकडे हिंडत होते. एका कोप-यात कुंभाराचे चाक ठेवले होते आणि कोणालाही त्यावर ठेवलेल्या मातीच्या गोळ्याला आपल्या बोटांनी आकार देऊन त्यातून छोटेसे मडके साकारण्याची सोय केली होती. एका झाडाच्या बुंध्यापाशी पानवाला, ज्योतिषी आणि कासार बसले होते. एकंदरीत द व्हिलेजचे अँबियन्स आणले होते. त्या वातावरणाशी अगदी विसंगत असे पॉप म्यूजिक कानठळ्या बसवत होते आणि त्याच्या ठेक्यावर अनेक तरुण तरुणी आणि मुले मुली मधल्या मोकळ्या जागेत मुक्तपणे नाचत होते. त्यांचे आप्तेष्ट आणि चाहते त्यांचा नाच कॅमेरा किंवा सेलफोनवर रेकॉर्ड करत होते.

आम्हाला यायला आधीच खूप उशीर झालेला असल्यामुळे आम्ही सरळ खाण्याकडे मोर्चा वळवला. मुख्यतः राजस्थानी पदार्थांच्या जोडीला पंजाबी, गुजराथी, मराठी आणि चिनी खाद्यपदार्थसुध्दा निरनिराळ्या झोपड्यांमध्ये ठेवलेले होते, ते आपण स्वतःच पाहून वाढून घ्यायचे होते. कोणीही कितीही वेळा कुठेही जाऊन कोणताही पदार्थ घ्यायला मुभा होती आणि बहुतेक लोकांचे खाणे होऊन गेले असल्यामुळे त्यासाठी रांगा नव्हत्या. खूप विविधता असल्यामुळे कुठे काय ठेवले आहे हे शोधून इतरांना सांगणे आणि स्वतः तिथे जाऊन त्यातले हवे ते वाढून घेणे यात वेळ चांगला जात होता. शिवाय कानावर संगीत आणि पहायला धांगडधिंगा यानेही थोडे मनोरंजन होत होते. या अनुभवाने एकंदरीत सर्वांना मजा आली.

निरनिराळ्या पदार्थांची थोडी चंव चाखून पाहण्यामध्येच पोट गच्च भरून गेले आणि घरी आल्यावर सर्वांनी ताणून दिली. संध्याकाळी पुण्याच्या मंडळींना परत जायचे होते. वामकुक्षी घेऊन झाल्यानंतर त्यांनी आपले सामान बॅगांमध्ये भरले, कपडे बदलले आणि निघायच्या तयारीत असतांना फोनवरून एक महत्वाची बातमी समजली. लगेच टीव्हीवर चालत असलेला प्रोग्रॅम बदलून मराठी बातम्या लावल्या. नववर्षाच्या दिवशी मुंबई पुणे, मुंबई गोवा आणि पुणे कोल्हापूर हमरस्त्यांवर ठिकठिकाणी अपघात झाले होते. त्यातल्या पुणे महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहतूक बंद पडली होती आणि दोन्ही बाजूला रस्त्यांवर मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वगैरेचे वर्णन चालले होते. रात्रीच्या वेळी अशा निर्जन ठिकाणी जाऊन अडकून पडण्यात काही अर्थ नसल्यामुळे मंडळींचा मुंबईतला मुक्काम वाढला. अर्थातच आम्ही खूष झालो, पुन्हा एकदा गप्पागोष्टी आणि चर्चासत्रे सुरू झाली. पुण्याला गेल्यानंतर लगेच ईशाइरांच्या परीक्षा होत्या. त्यामुळे एका खोलीत त्यांच्या अभ्यासाची तयारी, दुस-या खोलीत काँप्यूटरवर इंटरनेट आणि दिवाणखान्यात टीव्हीवरील मनोरंजक कार्यक्रम अशी विभागणी झाली खरी, पण कोणीच एका खोलीत जास्त वेळ टिकत नव्हते.

दोन तारखेला सकाळी लवकर उठणे सर्वांना भागच होते. पुण्याची मंडळी तिकडे चालली गेली. अलकाला रक्ततपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये जायचे होते, ती त्यांच्याही आधी घरातून निघाली. मी इंटरनेट लावून बसलो. थोड्याच वेळात वीज चालली गेली. इंटरनेट, काँप्यूटर, टीव्ही, फ्रिज, मायक्रोवेव्ह, पाण्याचा फिल्टर, वॉशिंग मशीन, गीजर वगैरे सगळे काही बंद. सूर्यप्रकाशाच्या उजेडात वाचन करणे किंवा डोळे मिटून स्वस्थ पडून राहणे एवढेच शक्य होते. तासभर वीज आली नाही म्हणून चौकशी केली, तेंव्हा ट्रान्स्फॉर्मरवर काम चालले असल्याचे समजले. म्हणजे आता दिवसभर ती काही येणार नव्हती. काल गजबजलेले घर आता अगदी शांत झाले होते ते एका दृष्टीने चांगलेच झाले होते. या सगळ्या सुखसोयींना चटावलेल्यांचे तक्रार करणारे आवाज तरी नव्हते. थोडा वेळ वाचन, थोडी विश्रांती आणि थोडी बाहेरची कामे करून येणे यात दिवस घालवायचा असे ठरवले.

काही वेळाने अलकाशी तिच्या मोबाईलवर बोललो. ती एका मैत्रिणीकडे उपाहार करत बसली होती पण जाम वैतागलेली दिसत होती. दोन महिने आधीपासून ठरवलेली तिची रक्ततपासणी समजुतीच्या काही घोटाळ्यामुळे झालीच नव्हती. आता त्या बाजूची आणखीही इतर काही कामे उरकून संध्याकाळी परत यायचा तिचा विचार होता. इकडे परत यायची मुळीसुध्दा घाई करू नको असे तिला सांगितले. पुण्याला फोन लावला तर मुलींना घेऊन शिल्पा तातडीने शाळेत गेली आहे असे समजले. चार तारखेला परीक्षा सुरू होणार आहे असे ती समजत होती, पण ती दोनलाच सुरू असल्याचे तिला पुण्याला गेल्यानंतर कळले. सकाळी मुंबईहून निघून तिथे पोचेपर्यंत सकाळच्या शाळा केंव्हाच सुरू होऊन गेल्या होत्या. नव्या वर्षाच्या पहिल्या कामाच्या दिवसाची लक्षणे काही ठीक दिसत नव्हती. आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये तर सगळ्यांचीच भविष्ये मारे भन्नाट छान दिलेली होती याचीही आठवण झाली.
संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला. घरातली सगळी यंत्रे कामाला लागली आणि दोन दिवसांचा अनुशेष भरून काढणे चालू झाले. अलकाने तिच्या रक्ततपासणीबद्दल हॉस्पिटलमध्ये याला त्याला गाठून त्यांच्याशी बोलून घेतले होते आणि दुस-या दिवशीची अॅपॉइंटमेंट घेतली होती. शिल्पाशी बोलणे झाले. मुलींच्या लेखी परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे चार तारखेलाच होणार होत्या. दोन तारखेला त्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याचे अचानक ठरले होते. उशीरा पोचल्यामुळे मुलींची ती परीक्षा बुडली की काय असे आधी वाटले होते, पण तिने शिक्षकांना भेटून ती करवून घेतली होती. दिवसभरात आलेला त्याबद्दलचा थोडासा ताण नाहीसा झाला होता. नव्या वर्षाची सुरुवात थोडी अनपेक्षित अशी झाली असली तरी आता सगळे सुरळीत झाले होते.