Thursday, October 30, 2008

आली दिवाळी - भाग ४

दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा म्हणजे 'बडा खाना', 'ग्रँड फीस्ट' किंवा 'मेजवानी'चा दिवस। त्या काळात प्रचलित असलेल्या पक्वानांचे वर्गीकरण केले तर श्रीखंड आणि बासुंदी हे सर्वोत्कृष्ट श्रेणीतले पदार्थ, साखरभात, पुरणपोळी, बेसनाचे लाडू वगैरे उत्कृष्ट श्रेणीत आणि लग्नाच्या जेवणात हमखास असणारे जिलबी आणि बुंदीचे लाडू ही लोकमान्य पक्वान्ने असत. पुरणाचे 'कडबू' आणि 'हुग्गी' या नांवाची गव्हाची खीर हे आमच्या भागातले कानडी पध्दतीचे प्रकार याच श्रेणीत मोडत. शेवयाची खीर, शिरा यासारखे पदार्थ बनवण्यासाठी सणासुदीची वाट पहायची गरज नसायची. सहज केंव्हाही मनात आले की ते पटकन केले जात असत. ते लोकमान्य असले तरी ते मेजवानीत असलेच तर दुय्यम स्थानावर असत. त्याशिवाय खास उपवासाचे, फराळाचे, बाळंतिणीला किंवा लहान मुलांना पौष्टिक म्हणून देण्याचे असे निरनिराळे असंख्य गोडाधोडाचे पदार्त असले तरी ते मोठ्या मेजवानीत सहसा केले जात नसत. पेढे, बर्फी वगैरे मिठाया जेवणात वाढल्या जात नसत. फ्रूट सॅलड, कस्टर्ड, आइस्क्रीम वगैरे नाविन्यपूर्ण पदार्थ हौस म्हणून कधी तरी केले जात. बंगाली चमचम, सोंदेश किंवा उत्तर भारतातल्या हलवायांच्या विविध मिठाया अजून घरी तयार केल्या जात नव्हत्या आणि त्या गांवातल्या बाजारातही मिळत नव्हत्या.

पाडव्याच्या मेजवानीत श्रीखंडपुरीचा बेत हे जवळ जवळ ठरूनच गेले होते। इतक्या माणसांसाठी पोटभर श्रीखंड बनवणे हेसुध्दा एक आव्हानच असे. त्या काळात चितळे, वारणा किंवा अमूलचे श्रीखंडाचे डबे आणून ते फ्रीजमध्ये ठेवायची सोय नव्हती. जितके श्रीखंड करायचे असेल त्याच्या तीन चारपट दूध आदल्या दिवशी आणून ते तापवायचे, त्याला चिनी मातीच्या बरणीत किंवा मातीच्या मडक्यात विरजण लावून ठेवायचे, दही जमताच त्याला पंच्यात बांधून खुंटीला टांगून ठेवायचे आणि अखेर ते पंच्यातले चक्क्याचे गोळे एकत्र करून त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, केशर वगैरे चांगले मिसळायचे, जायफळ उगाळून त्याची पेस्ट त्याला लावायची, त्यावर चारोळ्यांचे दाणे पसरायचे वगैरे सारे सोपस्कार केल्यानंतर ते श्रीखंड बनायचे. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातली कोणतीही कृती वेळेवर केली नाही तर घोटाळा होण्याची शक्यता असते. सगळी अवधाने सांभाळून अखेर ज्या वेळी ते पानात वाढले जाईल त्या वेळी त्या श्रीखंडाला नेमका हवा तितकाच आंबटपणा आणि गोडवा आला म्हणजे मिळवली.

कोठल्याही सणासुदीला नैवेद्यासाठी शेवयाची खीर आणि पुरण असायलाच हवे अशी प्रथा त्या काळी होती। श्रीखंड हे मुख्य पक्वान्न झाले. नैवेद्याच्या ताटात एकादा लाडू, मोदक किंवा शि-याची मूद ठेऊन 'पंच'पक्वान्नाचा आंकडा साधला जात असे. जेवणावळीसाठी केळीची पाने आणून, त्यांना बरोबर सारख्या आकारात कापून ती मांडली जात. शक्यतो प्रत्येक पानाभोवती कमानीची रांगोळी काढली जाई. यात आपापली कला दाखवण्याची चुरस असे. अगदीच वेळ कमी पडला तर उरलेल्या पानांभोवती रांगोळी घालण्याच्या यंत्राने पट्टे ओढत. त्यात फुले आणि वेलबुट्ट्यांची नक्षी निघत असे.

पानांत कोणते अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने आणि कोणत्या जागेवर वाढायचे याचे नियम ठरलेले होते। केळीच्या पानाच्या डाव्या भागात सर्वात वर मीठ आणि लिंबाची फोड ठेवायची. त्यानंतर अनुक्रमाने कुटलेली सुकी चटणी, वाटलेली ओली चटणी, कोशिंबीर, भरीत, चटका वगैरे दुय्यम तोंडी लावणी असत. अखेरीस तळलेले सांडगे, पापड्या, कुरडया, भजी वगैरे कुरकुरीत पदार्थाने डावी बाजू सजत असे. उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आमटीचा द्रोण ठेवलेला असे. भोपळा किंवा वांग्याच्या भाजीतल्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी करून कांही लोक या नावडत्या भाज्या खाणे टाळत. बटाट्याची सुकी भाजी हवीच, जोडीला फ्लॉवरचा रस्सा किंवा एकादी सैलशी पालेभाजीही असे. आग्नेय बाजूला भाताची पांढरी शुभ्र मूद अलगद हाताने ठेवून तिच्यावर पिवळ्या धम्मक वरणाने 'आइसिंग'सारखी सजावट करीत. त्यावर पळीभर तूप वाढले की पहिले वाढणे संपले.

'वदनी कवळ घेता .....' श्रीहरीचे नांव घेऊन 'यन्तुनदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाओषधयो भवन्तु। .......' अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे। त्यातसुध्दा पहिल्या घासात खीर संपवायची, त्यानंतर लिंबाची फोड वरणभातावर पिळायची, त्यावर द्रोणातली आमटी ओतून भात कालवून घ्यायचा हा जेवण सुरू करण्याचा अलिखित क्रम ठरलेला असायचा. त्यानंतर हवा तो पदार्थ खायला मोकळीक होत असे. तोंपर्यंत भात वरण आणि तूप वाढायला येत असे. पुढे श्रीखंडपुरी येणार हे ठाऊक असल्यामुळे सहसा कोणी तो घेत नसे. 'पांढ-या' भाताच्या पाठोपाठ 'काळा' किंवा मसालेभात येई तो मात्र आवडीने घेऊन खाल्ला जात असे. बटाटा, वांगी, तोंडली वगैरेंच्या फोडी घातलेला मराठी मसालेभात व्यवस्थित रीतीने केला तर फ्राइड राईस, पुलाव किंवा बिर्याणीपेक्षाही अधिक चविष्ट लागतो असे माझे मत आहे.

भातप्रकरण शक्यतों झटपट आवरून गाडी श्रीखंडपुरीच्या मुख्य रुळांवर येत असे। त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन "अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव। " असा आशीर्वाद देऊन पानावरून उठत.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, October 29, 2008

आली दिवाळी - भाग ३

नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळी आणि सकाळचा फराळ हे मुख्य भाग झाल्यानंतर दिवसभर कांही काम नसायचे. पहाटे लवकर उठल्यामुळे अर्धवट झालेली झोप पूर्ण करण्यासाठी दुपारी ताणून द्यायची. दिवेलागणी व्हायच्या सुमाराला पणत्यांच्या रांगा आणि आकाशदिवा लावायचा. एक उंच काठी उभी करून त्यावर तो लावण्यासाठी माडीवर खास व्यवस्था करून ठेवलेली होती. काठीच्या वरच्या टोकाशी झेंड्यासारखा आमचा आकाशकंदील अडकवलेला असे. त्याला बांधलेली एक दोरी सैल सोडून तो अलगदपणे खाली उतरवून घ्यायचा, त्यात पेटलेली पणती जपून ठेवायची आणि हलक्या हाताने ती दोरी ओढून हळूहळू तो दिवा वर चढवायचा हे कौशल्याचे काम होते, पण आजूबाजूच्या घरातल्या आकाशदिव्यापेक्षा आमचा दिवा जास्त उंच आहे आणि त्यामुळे दूरवरूनसुध्दा तो दिसतो याचा केवढा अभिमान त्यावेळी वाटायचा. आमचा मुख्य मोठा आकाशकंदील परंपरागत पध्दतीचाच असायचा, पण हौसेसाठी कधीकधी तारा, विमान यासारख्या आधुनिक आकारांचे दुसरे आकाशकंदील तयार करून ते दुसरीकडे लावत असू. हे सगळे कलाकौशल्याचे काम घरातच चालायचे आणि मुलेच ते करायची.
दिवाळीच्या दुसरे दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे. घरातल्या सगळ्या लोकांनी, विशेषतः स्त्रीवर्गाने नटून थटून, सजून धजून तयार होऊन बसायचे. या वेळी कोणी कोणता पोशाख आणि दागिने घालायचे हे ठरवण्याची चर्चा आधीपासून चालत असे आणि नंतर बरेच दिवस त्याचे कौतुक रंगत असे. लक्ष्मीचे चित्र असलेला चांदीचा खास शिक्का चिंचेने आणि रांगोळीने घासून चमकवून तयार ठेवलेला असे. एका पाटावर लक्ष्मीपूजनाची मांडणी होत असे. पाठीमागे कमळातल्या लक्ष्मीचे फ्रेम केलेले चित्र उभे करून ठेवायचे. चांदीच्या तबकात तो शिक्का आणि अंबाबाईची मूर्ती ठेवायची, बाजूला एक दोन दागिने मांडून ठेवायचे. समोर विड्याची पाने, त्यावर चांदीचा बंदा रुपया, सुपारी, खारीक, बदाम, नारळ वगैरेंची कलात्मक रीतीने मांडणी करायची. मुख्यतः झेंडूच्या फुलांनी सजावट करायची, त्यात अधून मधून शोभेसाठी लाल, पिवळ्या, पांढ-या शुभ्र अशा वेगळ्या रंगाची फुले घालायची. सगळे कांही व्यवस्थित असायला पाहिजे तसेच आकर्षक दिसायलाही पाहिजे. बाजूला एक घासून घासून चमकवलेली पितळेची उंच सुबक अशी समई तिच्यात अनेक वाती लावून ठेवायची. एका मोठ्या चांदीच्या ताटात पूजेची सर्व सामग्री मांडून ठेवायची. त्यात फुले, तुळस, दुर्वा, गंध, पंचामृत, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, बुक्का, अष्टगंध, निरांजन, उदबत्त्या, कापराच्या वड्या वगैरे सगळे सगळे अगदी हाताशी पाहिजे. पूजा सुरू झाल्यानंतर "हे नाही"," ते आणा" असे होता कामा नये आणि तसे कधीच होतही नसे. लक्ष्मीपूजनाच्या नैवेद्यासाठी त्या मोसमात बाजारात जेवढी फळे मिळत असतील ती सारी हवीतच, तसेच एरवी कधी खाण्यात नसलेल्या भाताच्या लाह्या आणि बत्तासे असायलाच पाहिजेत. त्याशिवाय लाडू, गुलाबजाम यासारखी एक दोन पक्वान्ने ठेवीत.
पंचांगात दिलेला मुहूर्त पाहून वेळेवर लक्ष्मीची षोडशोपचार पूजा होत असे. घरातली बाकीची सारी कामे आधी आटोपून किंवा तशीच सोडून देऊन पूजेच्या वेळी सर्वांनी समोर उपस्थित असायलाच पाहिजे असा दंडक होता आणि सगळेजण तो हौसेने पाळत असत. यथासांग पूजा, आरत्या वगैरे झाल्यानंतर थोडा प्रसाद खाऊन फटाके उडवायचा कार्यक्रम असे. आजकाल मिळणारे आकर्षक चिनी फायरवर्क त्यावेळेस नव्हते. फुलबाज्या, चंद्रज्योती, भुईचक्रे, कारंजे , बाण, फटाकड्यांच्या लड्या आणि लहान मोठ्या आकाराचे फटाके किंवा बाँब एवढेच प्रकार असायचे. अगदी लहान मुलांसाठी केपांच्या बंदुकी, साप वगैरे असत. वयोमानानुसार आणि आपापल्या आवडीनुसार ज्याने त्याने मनसोक्त आतिषबाजी करून घ्यायची.
मुलांचे फटाके उडवणे सुरू करून दिल्यावर त्याची थोडी मजा पाहून मोठी माणसे बाहेर पडायची. फटाके उडवणे झाल्यानंतर आम्ही त्यांना गाठत असू. बाजारात केलेली दिव्यांची सुंदर आरास पहात पहात ती डोळ्यांत साठवून घेत असू. बाजारपेठेतल्या दुकानदारांच्या पेढ्यांवर थाटांत लक्ष्मीपूजन झालेले असे. आमचा कसला व्यापार धंदा नसल्यामुळे घरातल्या पूजेत त्याच्या हिशोबाच्या चोपड्या वगैरे नसत. दुकानदारांच्या पूजेत त्यांना महत्वाचे स्थान असायचे. दुसरे दिवशी व्यापारउद्योगांचे नवे वर्ष सुरू होत असे. त्याआधी नव्या वह्यांची पूजा करून नवे वर्ष भरभराटीचे जावो, सगळ्या उलाढालीत नफाच नफा होवो अशी लक्ष्मीमातेकडे प्रार्थना करत. ओळखीचे दुकानदार आग्रहाने बोलावून आपल्या शेजारी गादीवर बसवून घेत आणि पानसुपारी व प्रसाद देत. नवीन कपडे यथेच्छ चुरगळून आणि मळवून पण अद्भुत वाटणारा अनुभव घेऊन आम्ही परतत असू.
. . . . . . .. . . (क्रमशः)

Tuesday, October 28, 2008

आली दिवाळी - भाग २

परगांवाहून येणा-या घरातल्याच आणि पाहुणे मंडळींच्या आगमनापासून आनंदोत्सवाची सुरुवात झालेली असली आणि वसुबारस, धनतेरस वगैरे दिवस थोडेसे वॉर्म अप करून गेलेले असले तरी दिवाळीची अधिकृत सुरुवात नरकचतुर्दशीपासून होते. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नांवाच्या राक्षसाचा वध केला अशी कथा सांगतात, पण त्याचा आमच्या पहाटे उठून आंघोळ करण्याशी काय संबंध आहे हे कोडे मला लहानपणी पडायचे आणि त्याचे समर्पक उत्तर कधीच मिळाले नाही. देवदेवतांनी अवतार घेऊन अशा कित्येक असुरांचा नाश केल्याची उदाहरणे पुराणात आहेत, मग फक्त या नरकासुराच्या नांवाने आपण आंघोळ कशाला करायची? नरकासुराचा बादरायण संबंध नरकाशी म्हणजेच घाणीशी जोडला तर त्यात तथ्य दिसायला लागते. दिवाळीच्या आधी घरादाराची साफसफाई, रंगरंगोटी करण्याची प्रथा होती. त्यामुळे जुनाट अस्ताव्यस्त घरातले नेहमी उपयोगात न येणारे काने कोपरे, कपाटे, कोनाडे वगैरे सगळे या वेळी झाडले जात. त्यात सांचलेला कचरा काढून टाकला जाई. परिसराचीसुध्दा सफाई केली जाई, पावसाळ्यात उगवलेले गवत उपटून टाकून आणि उंदीर घुशींनी केलेली बिळे लिंपून सगळे आवार स्वच्छ केलेले असे. हे सगळे दिवाळीच्या आंत करायचे असल्यामुळे टाळाटाळ न करता ते वेळेवर पूर्ण करणे आवश्यक असायचे. ते होईपर्यंत दिवाळीचा दिवस उजाडायचाच. त्याची सुरुवात शरीराच्या स्वच्छतेने करणे सुसंगतच म्हणावे लागेल.
नरक चतुर्दशीच्या दिवशी झाडून सगळे जण भल्या पहाटे उठून बसत. त्या दिवशी अभ्यंगस्नान करण्यापूर्वी सर्वांगाला खोब-याचे सुगंधी तेल लावून चांगले मालिश करायची पध्दत होती. त्या काळात व्हॅनिशिंग क्रीम, कोल्ड क्रीम, मॉइश्चराइजर यासारखे शब्द ऐकूनसुध्दा माहीत नव्हते. या तेल लावण्यामुळे त्वचेला जो स्निग्धपणा मिळतो तो चांगला परिणामकारक असला पाहिजे. त्यामुळे थंडीची सुरुवात होतांना झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे त्वचेला जो रुक्षपणा येऊ शकतो तो टाळण्यासाठी वेगळे उपाय करायची गरज पडत नसावी. अंगाला तेल चोपडून घेतल्यानंतर उटणे लावून गरम पाण्याने स्नान करायचे. त्यासाठी बंब होताच, त्याशिवाय पाण्याचे मोठे हंडे तापवून ठेवलेले असायचे. हे स्नान सूर्योदय होण्यापूर्वी करण्यासाठी घाई असायची. जो कोणी आळशीपणान किंवा चेंगटपणा करेल तो नरकात जाील अशी भीतीही दाखवली जायची. आंघोळ झाल्यानंतरसुध्दा उटण्याचा मंद सुवास येत रहायचा आणि मन प्रसन्न होत असे. त्यानंतर मोजकेच फटाकडे, फुलबाज्या वगैरे उडवायचे. कोणी अंगणात रांगोळ्या घालायला लागत. पण सर्वांचे सगळे लक्ष फराळाचे बोलावणे येण्याकडे लागलेले असे.
देवाची पूजा आणि नैवेद्य दाखवून झाला की फराळाला सुरुवात होत असे. यातले सारेच पदार्थ आधी तयार करून ठेवले असलेले असले तरी नैवेद्य दाखवून झाल्याखेरीज ते चाखून पहाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्याची चंव पाहण्याची उत्कंठा सर्वांनाच असायची. लाडू, करंज्या, चिरोटे व अनरसे हे गोड पदार्थ आणि शेव, चिवडा, चकल्या व कडबोळी हे तिखटमिठाचे पदार्थ असायचेच. शंकरपाळ्यांच्या गोड आणि तिखटामिठाच्या अशा दोन्ही प्रकारच्या आवृत्या असत. लाडूमध्ये रवा, बेसन, संमिश्र असे प्रकार असत आणि त्यात पुन्हा पाकातले कडक आणि पिठीसाखर मिळवून केलेले ठिसूळ असे उपप्रकार असत. त्यातला एकादा प्रकार फराळात, दुसरा जेवणात,तिसरा बांधून देण्यसाठी वगैरे विभागणी होत असे. इतर पदार्थांमध्येसुध्दा अशीच विविधता असे.
खाण्याचे इतके प्रकार आणि पदार्थ असतांना मुलांना आणखी काय पाहिजे? "हरहर महादेव" करून त्यावर तुटून पडायचे. फराळ खातांखातांनाच मधून मधून "कडबोळी या वेळी छान खुसखुशीत झाली आहेत. ", "म्हणजे काय? माझी नेहमीच होतात. ", "चांगलं भरपूर मोहन घातलं तर कां नाही होणार?", "पण शेव थोडी कडकडीत राहिल्यासारखी वाटते. ", "तशी नसली तर तिचा चुरा होणार नाही का? मग तो भुगा कोण खाईल? ", "अनरसे थोडे चिवट वाटतात ना?", "अगं बाई, डब्याचं झाकण चुकून उघडंच राहिलं वाटतं. ", "ही हवा तर अशी आहे! सर्दावायला जरासुध्दा वेळ लागत नाही", "ते जाऊ दे, पण चंवीला किती मस्त झाले आहेत?", "ही करंजी दिसायला एवढी मोठी, पण फोडली की नुसती पोकळ! ", "तुला काय पुरणानं गच्च भरून पाहिजे?", "कडबोळी काय मस्त झाली आहेत?", "त्यात थोडा ओवा परतून घातला आहे. त्याने वेगळी चंवही येते आणि पचनालाही मदत होते " अशा प्रकारे फराळातल्या प्रत्येक पदार्थाचे रसग्रहण होत फराळाचा कार्यक्रम सावकाशपणे चांगला रंगायचा.
. . . . . . . . . . . . . . . . . .. (क्रमशः)

Sunday, October 26, 2008

आली दिवाळी - भाग १


दरवर्षी दिवाळी आली की मी त्या वेळी शरीराने कोठेही असलो तरी मनाने थोडा वेळ तरी थेट बालपणाच्या काळात जाऊन पोचतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्या काळात एकाद्या स्वप्नात असल्यासारखे भासणारे दिवाळीचे चार दिवस जीवनातल्या इतर सामान्य दिवसांपेक्षा फारच वेगळे असायचे. कॉलेजच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीमुळे बाहेरगांवी राहणारी आमच्या एकत्र कुटुंबातली सगळी मुले दिवाळीला नक्की घरी येत. सासरी गेलेल्या कांही मुली तरी या वेळी आपापल्या मुलाबाळांसह माहेरपणाला येत. शहरात राहणारे भाचे, पुतणे वगैरे मुलांनासुध्दा ग्रामीण भागाचा अनुभव घेण्यासाठी एकादे वर्षी त्या आपल्याबरोबर घेऊन येत. आपले इथे अगत्याने आणि आपुलकीने स्वागत होणारच याची खात्री असल्यामुळे कोणी ना कोणी चुलत, मावस, आत्ते, मामे नातेवाईक अचानक येऊन धडकत. त्यामुळे दिवाळीला आमचा प्रशस्त वाडा एकाद्या लग्नघरासारखा माणसांनी गजबजून जात असे. त्यातली निम्मी तरी वेगवेगळ्या वयाची मुले असत. यामुळे आमची चंगळ होत असे.

बाजारातून तयार वस्तू आणण्याची किंवा कंत्राटाने कामे देण्याची पध्दत आमच्या त्या आडगांवात त्या काळात नव्हती. त्यामुळे येणा-या पाहुण्यांची सारी व्यवस्था करण्याचे कामाला आधीपासून सुरुवात होत असे. अडगळीच्या खोलीमधून मोठमोठे हंडे, पातेली, घागरी, पिपे वगैरे काढून ती घासून पुसून पाण्याने भरून ठेवणे, वापरात नसलेल्या सतरंज्या, जाजमे, चटया वगैरेंना दोन चार दिवस ऊन्हात टाकणे, चादरी, पलंगपोस वगैरे स्वच्छ धुवून, घड्या घालून ठेवणे यासारखी अनेक कामे असत आणि मुलांनाही त्यात सामील करून घेतले जात असे. त्याखेरीज ठेवणीतले कपडे काढून ते सणासुदीत घालण्यासाठी तयार ठेवणे, नवे कपडे शिवून घेण्यासाठी शिंप्याकडे टाकणे, त्याला तगादा लावण्यासाठी चकरा मारणे, घराची डागडूज, सफाई, रंगरंगोटी करणे, किल्ला आणि आकाशकंदील तयार करणे वगैरे कामांची धामधूम चाललेली असे. स्वयंपाकघरातून येणा-या फराळाच्या वस्तूंच्या फोडण्या आणि तळण्याच्या वासांचा घमघमाट घरभर दरवळत असे.

त्याकाळात मोबाईल फोन नव्हतेच, साधे टेलीफोनसुध्दा आमच्या गांवात नव्हते. रेल्वे किंवा बसच्या रिझर्वेशनची सोय नव्हती. त्यामुळे परगांवाहून कोण कोण कधी कधी येणार आहेत हे आधीपासून ठाऊक नसायचे. दिवाळी जवळ आली की एकापाठोपाठ एक करून सारी मंडळी येत जायची. आमच्या शाळांना सुटी लागलेली असायची आणि गृहपाठ वगैरेचा बोजा नसल्यामुळे सारा वेळ दंगामस्ती करण्यासाठी मोकळा असायचा. तेंव्हा पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुलांना आळीपाळीने एस.टी. स्टँडवर पिटाळीत असत. आम्हीही हे काम करायला आनंदाने तयारच असायचे. स्टँडवर आमच्यासारखेच तिथे आलेले गांवातले मित्र भेटायचे, त्यांच्याबरोबर गप्पा-टप्पा, कुटाळक्या करीत दोन चार घटका घालवत येणा-या बसेसमधून कोण कोण येत आहेत ते पहायचे. त्या काळात आताच्यासारख्या एकापाठोपाठ बसेस यायच्या नाहीत. तासाभरात एकादी बस कुठून तरी येई , चांगली पंधरा वीस मिनिटे थांबून राही आणि ड्राइवरदादांचे चहा, चिवडा, भजी, बिडी, सिगरेट वगैरे आरामात झाल्यानंतर पुढच्या ठिकाणाकडे जायला निघे. आपल्या घरातली मंडळी त्यातून आलेली असली तर त्यांचे सामान उचलून किंवा त्यांना टांग्यात बसवून घरी घेऊन जायचे. कोणीतरी एकजण धावत पळत त्यांच्याआधी घरी जाऊन त्यांच्या आगमनाची बातमी द्यायचा. हे करतांना खूप मजा वाटायची.

परगांवाहून आलेल्यांनी हात, पाय, तोंड धुवून घेतल्यावर ते घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडत आणि घरातली मुले त्यांच्या. त्यातली जी मुले समवयस्क असत त्यांच्यात कोणी कोणाच्या पाया पडायचे यावर प्रेमळ वाद होत. पाया आणि गळ्यात पडून झाल्यानंतर त्यांच्या बॅगा उघडल्या जात. त्यांनी आणलेल्या घरातल्या उपयोगाच्या आणि शोभेच्या नव्या वस्तू कुतूहलाने पाहिल्या जायच्या आणि त्याचे कौतुक व्हायचे. त्यावर "माझ्या नणंदेच्या जावेकडे असाच सेट आहे" किंवा "माझ्या जावेच्या बहिणीने सुध्दा आणला होता, पण आता नुसताच पडून राहिला आहे" अशासारखे कॉमेंट्स होत. लाडू, चिवडा वगैरे आणले असतील तर त्याचे डबे स्वैपाकघरात जात आणि त्यातले जिन्नस फराळाबरोबर येत. केक, बिस्किटे, सुका मेवा वगैरे अपूर्वाईचा खाऊ आणला असला तर मात्र तो तेंव्हाच फस्त होत असे. नवे खेळ आणले असले तर लगेच त्यांचे पट मांडून खेळायला सुरू होत असे आणि दिवाळी अंक आधी कोणी वाचायचे यांवर झोंबाझोंबी सुरू होई.

परगांवाहून आणि विशेषतः मुंबईपुण्याहून आलेल्या पाहुण्यांकडे बातम्या, माहिती आणि अनुभवाचे भांडार असायचे. टेलीफोन नव्हतेच आणि कारणांव्यतिरिक्त पत्रव्यवहार नसे यांमुळे बोलायच्या गोष्टींचा वर्षभरातला साठा जमा झालेला असे. त्यातली निवडक रत्ने एकेककरून बाहेर येत. विशेषतः कुणाची कशी फजीती झाली याचे मजेदार किस्से संबंधित व्यक्तींचे हावभाव, लकबी आणि बोलण्याच्या नक्कलेसह रंगवून सांगितले जायचे आणि दुसरी मुले त्यांची नक्कल करून त्याच्या सुधारलेल्या आवृत्या ते इतरांना सांगत. या ध्वनिप्रतिध्वनीतून पिकणारी खसखस आणि उडणारे हास्याचे फवारे याने वातावरण भरून जात असे.

. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, October 25, 2008

आठवणीतील दिवाळीच्या तयारीचे दिवस

दरवर्षी दिवाळीचा सण आला की साझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे जात जात थेट आमच्या गांवातल्या वाड्यापर्यंत जाऊन तिथे स्थिरावते. माझ्या लहानपणीच्या काळात सुद्धा त्या गांवाला खेडे म्हणत नसत कारण तिथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण देणारी शाळा होती, सरकारी इस्पितळ, मामलेदार कचेरी, तीन चार पोलिस चौक्या आणि एक तुरुंगसुद्धा होता. गांवापासून थोड्या अंतरावर तेथील माजी संस्थानिकांचा एक अत्यंत प्रेक्षणीय पण निर्जन झालेला संगमरवरी राजवाडा होता. त्याच्या आजूबाजूला एके काळी सुंदर बगीचा केलेला असावा असे दर्शवणारी बाग होती. त्यात जागोजागी युरोपियन कारागिरीचा नमूना दाखवणारे नग्न स्त्रियांचे पुतळे उभे होते. टेनिस कोर्ट, बिलियर्ड टेबल वगैरेनी युक्त असा क्लब, विस्तीर्ण पोलो ग्राउंड, प्रशस्त सार्वजनिक वाचनालय, देखणा टाउन हॉल वगैरे अनेक शहरी सुबत्तेच्या खुणा त्या काळात सुद्धा तिथे होत्या.

तरीसुद्धा तेथील लोकांचे राहणीमान व आचार विचार मात्र अगदी खेडवळ होते. पंचवीस तीस दुकाने असलेला बाजार फारसा मोठा नव्हताच आणि ऊठसूठ बाजारात जाऊन सामान खरेदी करण्याची पद्धतही नव्हती. बहुतेक लोकांच्या शेतातून सर्व प्रकारचे धान्यधून्य घरी यायचे, अगदी भुईमुगाच्या शेंगा आणि गूळसुद्धा. कांही गोष्टींची शेजारपाजारी व नातेवाईकांच्याबरोबर देवाण घेवाण व्हायची. त्या भागात न पिकणा-या तांदुळासारख्या धान्यांची वर्षभराची खरेदी एकदमच व्हायची. बहुतेक सर्व खाद्य पदार्थांचा कच्चा माल नैसर्गिक स्वरूपातच घरी असायचा. हॉटेलात जाऊन खाणेच काय पण बाहेरून तयार खाद्यपदार्थ घरी आणून खाणेसुद्धा निदान आमच्या घरी निषिद्ध होते. पापड, लोणची, सांडगे वगैरे तर घरी बनतच पण त्यात घालायचा मसाला सुद्धा घरीच तयार होई. त्यासाठी बरेच तळणे, कुटणे, कांडणे, दळण होत असे. त्याला लागणा-या लवंग, दालचिनी, धणे, जिरे, मीठ, मिरची, मोहरी यासारख्या वस्तु पुड्या बांधून मिळत. चहा, कॉफी सोडल्यास कुठलाही पॅकबंद खाद्यपदार्थ घरी आलेला मला आठवत नाही. आधुनिक जगाचा थोडासा वारा लागत असल्यामुळे ऐकून माहीत झालेले इडली, दोसे, सामोसे वगैरेपासून केक, खारी व बिस्किटापर्यंत कांही नवे पदार्थ सुद्धा घरी बनवण्याचे त-हेत-हेचे प्रयोग केले जात.

त्या वर्षाछायेतील प्रदेशात पडणारा माफक पाऊस कमी झाला की नवरात्राच्या सुमारास दिवाळीचे वेध लागायचे. माळ्यावर पडलेली कुदळ, फावडी, रंधा, करवत वगैरे अवजारे बाहेर काढून साफसूफ करून त्यांची हातोडा, पक्कड, कात्री वगैरे घरातील इतर सर्व आयुधासोबत दस-याला पूजा व्हायची व त्यानंतर लगेच घराची डागडुजी सुरू व्हायची. त्या काळांत त्या भागात सगळी दगडामातीची धाब्याचीच घरे असायची. खाली शेणाने सारवलेली मातीचीच जमीन, दगड मातीच्या जाड भिंती आणि माथ्यावर तुळया, जंते व चिवाट्यावर आधारलेले मातीचेच माळवद. दरवर्षी पावसाने त्यात कुठे कुठे थोडी पडझड व्हायचीच. उंदीर घुशी जमीनीखालून पोखरून बिळे करायच्या. या आयत्या बिळांत नागोबा येतील अशी भीती असायची. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला की घराचे अंतर्बाह्य निरीक्षण करून दुरुस्तीच्या कामाला लागायचे. संपूर्ण घराच्या रिनोव्हेशनचे कॉंट्रॅक्ट द्यायची पद्धत त्या काळी नव्हती. दरवर्षी ते परवडलेही नसते. त्यामुळे एकदोन मजूरांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी जमीनीतील बिळे खणून काढून बुजवणे, नवीन माती घालून व धुम्मसाने ठोकून ती सपाट करून घेणे, गच्चीवर उगवलेले गवत मुळापासून उपटून काढणे, पडलेला भाग मातीने लिंपून काढणे अशी कामे करून त्यावर आवश्यक तेवढीच रंगरंगोटी केली जाई. घरी एखादे लग्नकार्य निघालेच तर संपूर्ण वाड्याला नवा रंग दिला जाई. एरवी दर्शनी भाग साफसूफ करून त्याच्यावर रंगाचा एक हात फिरवायचा आणि दरवाजे व खिडक्यांच्या चौकटींच्या सभोवती थोडीशी वेलबुट्टी काढायची एवढी सजावट दिवाळीसाठी पुरेशी व्हायची.

नवरात्रापासूनच दिवाळीच्या फराळाच्या दृष्टीने हालचाली सुरू व्हायच्या. धान्याचा एक एक डबा शेल्फमधून काढून त्यातील धान्य कडक उन्हांत वाळवून घेणे व त्याचे चाळणे, पाखडणे, निवडणे सुरू होई. तसे हे काम वर्षभर चालतच असे, पण दिवाळीच्या काळात त्याला विशेष जोर चढे कारण कॉलेज शिक्षण व नोकरी यासाठी बाहेरगांवी गेलेली मुले व सासरी गेलेल्या मुली या वेळी हमखास घरी येणार असायच्या. हे लोकही आल्यावर या कामात सहभागी व्हायचे. भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातील दाणे काढण्याचा कार्यक्रम फावल्या वेळांत केला जाई. छोटेसे महिलामंडळ एकत्र जमून सांडगे, पापड, कुरडया, शेवया वगैरेचे सामुदायिक उत्पादन करी आणि ते उन्हात वाळवतांना कावळ्यापासून त्यांचे संरक्षण करावयाच्या कामगिरीवर आम्हा मुलांना तैनात करीत. चणे, मूग, उडीद वगैरे कडधान्ये भरडून त्यांच्या डाळी बनवणे, त्या भाजून व दळून त्याचे चकल्या व कडबोळ्याचे पीठ बनवणे हा मोठा सोपस्कार असे. या पदार्थांचे तयार पीठ मिळणे त्या गांवात ऐकिवातसुद्धा नव्हते आणि मिक्सर व मिनिचक्क्यासारखी उपकरणे आली नव्हती त्यामुळे जाते, पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, खलबत्ता यांचाच वापर घरोघरी होत असे.

दिवाळीला चार पांच दिवस उरले की स्वयंपाकघराचा भटारखाना कार्यान्वित होई. दिवसभर सतत कांही भाजणे, परतणे, तळणे सुरू राही. गॅसची सोय नसल्याने सारे काम लाकूड व कोळसा या इंधनावर होत असे. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी खास मोठ्या चुली व शेगड्या बनवल्या जात तसेच मोठमोठी पातेली, पराती व कढया अडगळीतून बाहेर निघत. स्वयंपाकघरातील प्रक्रियांचा सुगंध घऱभर दरवळत असे. कधी कढलेल्या तुपाचा स्निग्ध सुवास तर कधी मिरच्यांचा ठसका आणणारा खाट. बेसनाच्या भाजणीचा घमघमाट बाहेरच्या खोलीपर्यंत दरवळला की कुणीतरी मुलांनी स्वयंपाकघरात जाऊन त्याची वर्दी द्यायची. मग भाजणे थांबवून पुढील प्रक्रिया सुरू होई. तळणीचा घाणा सुरू झाला की मुले सुद्धा स्वयंपाकघरात घोटाळत व मोठ्या उत्साहाने त्या कामाला हातभार लावत. कडबोळ्यांची वेटोळी बनवणे, करंजीत सारण भरून अर्धवर्तुळाकार कापणे, शंकरपाळ्यासाठी आडव्या उभ्या रेघा ओढणे असली कामे त्यांना मिळत. पोळपाटावर पु-या लाटणे व उकळत्या तेला तुपात तळणी करणे ही कौशल्याची कामे अर्थातच अनुभवी स्त्रिया करीत.

दगडामातीचा किल्ला बनवणे हे खास मुलांचे कार्यक्षेत्र. त्यासाठी त्या काळी एक पैशाचे सुद्धा रोख अनुदान मिळत नसे. पण घरातच किंवा आजूबाजूला कच्चा माल मात्र मुबलक प्रमाणांत पडलेला असे. शाळांना सुटी लागली की दस-याला साफसूफ करून ठेवलेली छोटी हत्यारे घेऊन मुले किल्ल्याच्या कामाला लागत. आधी दगड विटांचे ढिगारे रचायचे. माती खणून काढून पाण्यात कालवून त्यावर थापून डोंगरांचे वेगवेगळे आकार तयार करायचे. विटांचे तुकडे करून त्यांचे तीन चार वर्तुळाकार बुरुज बनवायचे. मधोमध मोठा दिंडी दरवाजा लावायचा. त्या कामासाठी कुठल्यातरी खोक्याचा पुठ्ठा जपून ठेवलेला असायचा. पायथ्यापासून त्या दरवाजापर्यंत जाणा-या पाय-या मातीत कोरायच्या किंवा लाकडाच्या चपट्या पट्ट्या मिळाल्या तर त्याचे तुकडे कापून लावायचे.
मुबलक जागा उपलब्ध असल्यामुळे डोंगराच्या खाली सुद्धा ऐसपैस पसरलेले गांव, शेती, जंगल, तळी वगैरे असायची. किल्ल्याच्या माथ्यावर एक छोटासा राजवाडा बांधून त्यावर थोडे नक्षीकाम करायचे पण गांवातील घरांत मात्र गवताच्या झोपड्यापासून टोलेजंग इमारतीपर्यंत सगळ्या त-हा असायच्या. त्या काळांत त्या भागात आर.सी.सी.बिल्डिंग्ज बनत नव्हत्या. त्यामुळे विटा रचून बांघलेली तीन मजली इमारत म्हणजे उंचीची अगदी हद्द झाली. जुन्या वह्यांची कव्हरे किंवा खोक्यांचे ज्या आकाराचे पुठ्ठे हाती लागत त्या प्रमाणे घरे, शाळा, स्टेशन वगैरे बनत. पुठ्ठे संपल्यावर जुने ड्रॉइंग पेपर त्यावरील रंगीबेरंगी चित्रांसकट इमारतींचे रूप घेत. अशी रंगीत घरे क्वचितच पहायला मिळतील. किल्ल्याचा मुख्य आकार आला की त्याची सजावट करायची. लाकडाच्या भुश्याला हिरवा रंग देऊन पसरला की हिरवळ झाली. जुन्या आरशाची फुटकी कांच ठेऊन सर्व बाजूने मातीचा बंधारा घातला की तळे झाले. त्यात मधोमध लाल कागदाचे कमळ कापून ठेवायचे व हिंगाच्या डबीवरून किंवा फटाक्याच्या वेष्टनावरून लक्ष्मीचे चित्र अलगद काढून कशाला तरी चिकटवून त्यावर उभे करायचे. अशाच प्रकाराने वेगवेगळी माणसे, वाहने व प्राणी तयार व्हायचे. घरातील सारी खेळणी व शोभेच्या वस्तू यासाठी उपयोगी पडायच्या.

काळ आणि अंतर यांच्या सापेक्षतेबद्दल आल्बर्ट आईनस्टाईनने कांहीबाही सांगितले आहे. पण आमच्या किल्ल्यांच्या जगांत स्थळकाळाचे कसलेही बंधन नसायचे. त्यामुळे किल्ल्यावरील राजवाड्यापेक्षा मोठ्या आकाराचे छत्रपति शिवाजी महाराज, डोंगरातील बोगद्यातून डोकावणा-या आगगाडीच्या इंजिनापेक्षा मोठी रस्त्यावर धांवणारी मोटरकार आणि त्यांहीपेक्षा मोठी रस्त्यातील माणसे सर्रास असायची. कमळातली लक्ष्मी, अश्वारूढ शिवाजी महाराज, बंदूकधारी सैनिक आणि हॅट व झगा घातलेल्या मडमा हे सगळे सुखेनैव आपापल्या जागी विराजमान व्हायचे. एवढेच नव्हे तर वाघ, सिंह, हत्ती आदि वन्य पशु कुत्री, मांजरे व गायी म्हशींच्या समवेत गुण्यागोविंदाने रहायचे. कल्पकतेचे बेलगाम घोडे अशा त-हेने चौखूर उधळायचे.

किल्ला बांधतांना मध्येच रुचिपालट म्हणून आकाशकंदिलाकडे मोर्चा वळवायचा. अत्यंत सुबक व आकर्षक आकाशदिव्यांचे झुबके आजकाल रस्तोरस्ती विकण्यासाठी टांगून ठेवलेले दिसतात. तशी परिस्थिती त्या काळांत नव्हती. थर्मोकोल, जिलेटिन पेपर यासारखी साधनसामुग्रीही नव्हती. चिवाट्याच्या बारीप काड्या चिरून दो-याने घट्ट बांधायच्या आणि त्यातून फुगीर गोल किंवा षट्कोनी असला पारंपरिक आकार निर्माण करायचा. त्यावर पतंगाचे कागद चिकटवून आकाशकंदील तयार व्हायचा. विजेचा दिवा टांगायची सोय नसल्यामुळे आंतल्या बाजूला एक काड्यांची आडवी चौकट बनवून ठेवायची व आयत्या वेळी पेटती मेणबत्ती किंवा पणती त्यांत अलगदपणे ठेवावी लागायची.

आजकाल आपण रोजच्या व्यवहारातच सगळ्या वस्तु रेडीमेड विकत घेतो आणि वर्षभर मनसोक्त खादाडी सुरू असते. डॉक्टरांना त्यावर अंकुश लावावा लागतो. त्यामुळे फटाके सोडले तर दिवाळीची अशी खास मजा वाटत नाही. आजच्या काळातील, विशेषतः शहरात वाढलेल्या मुलांना माझ्या बालपणीच्या काळातील हे सगळे वर्णन ऐकून कदाचित खरे सुद्धा वाटणार नाही. पण कदाचित म्हणूनच ते माझ्या स्मृतिपटलावर खोलवर कोरले गेले आहे व दरवर्षी दिवाळी आली की त्या आठवणींची उजळणी होत राहते.

Friday, October 24, 2008

आजीचे घड्याळ - भाग १२ घड्याळ


"पंचांग जसं अजूनपर्यंत थोडं तरी आपल्या वापरात आहे तसं घटिकापात्र मात्र राहिलेलं नाही. ते कधीच नामशेष झालं. असं कां झालं असेल?" माझ्या मित्राने विचारले.
मी म्हंटले,"ते तर आता पुराणवस्तुसंग्रहालयातसुद्धा शोधावे लागेल. घड्याळाच्या मुकाबल्यात त्याचा टिकाव लागण्याची शक्यताच नव्हती. भारतातच नव्हे तर जगभर पुरातनकालातली वेळ मोजण्याची साधने आता कालबाह्य झाली आहेत."
"असं कशामुळे झालं?"
"पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेहमी 'किती वाजले' ते घड्याळात पाहतो. घटिकापात्रात ते पाहण्याची सोय नाही. ते पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने भरून बुडले म्हणजे 'एक घटिका झाली' असे समजायचे. त्याआधी किती वेळ झाला ते कळणार नाही आणि घटिकापात्र बुडून गेल्याला किती वेळ झाला ते तर नाहीच नाही. यामुळे ते वेळ 'दाखवणारे' साधन नव्हते. त्या काळात तशा साधनाची गरजही नव्हती. आज आपण अमूक गोष्ट इतक्या वाजता झाली किंवा होणार आहे असे म्हणतो. पौराणिक किंवा ऐतिहासिक वाङ्मयात तसे उल्लेख दिसत नाहीत. तासाप्रमाणे घटिका 'वाजत' नव्हत्या. सूर्योदयानंतर इतक्या घटिकांनी अमका ग्रह तमक्या राशीत जाईल असे सांगण्यासाठी तिचा उपयोग होत असे. एक छोटासा ठराविक कालावधी मोजण्याएवढाच तिचा उपयोग होता. 'हरिनामाचा गजर करणे' किंवा 'औषधी पाण्यात उकळत ठेवणे' अशी कामे करण्यात लागणारा वेळ त्याने मोजता येत असेल. फार तर मरणासन्न माणसाच्या शेवटच्या घटका मोजून ठेवत असतील. अर्थातच ज्योतिषी लोक आपली निरीक्षणे करण्यासाठी सूर्योदय झाल्याबरोबर घटिका पात्र पाण्यात ठेऊन कालमापन करीत असतील आणि त्याकडे लक्ष ठेऊन दरवेळी घटिका संपताच ते पुन्हा पुन्हा रिकामे करून ठेवत असतील आणि किती घटिका सरल्या ते मोजत असतील. पण हे काम थोडे किचकटच होते आणि विशिष्ट कामासाठी विशेषज्ञ लोकच त्याचा उपयोग करू शकत असणार. सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे वेळ मोजण्याची गरज पडत नसेल."
"त्या काळांत इतर देशात कोणती परिस्थिती होती?"
"त्या काळात जगभर साधारणपणे हीच परिस्थिती होती. घटिकापात्राप्रमाणेच थोडा वेळ मोजणारी साधनेच सगळीकडे उपयोगात असायची. त्यात कुठे मेणबत्तीच्या जळण्यावरून वेळ ठरवीत तर कुठे उदबत्तीच्या संपण्यावरून. थेंब थेंब टपकणा-या पाण्याचासुद्धा त्यासाठी वापर केला गेला. कांच तयार करून त्याला आकार देण्याच्या तंत्राचा विकास झाल्यानंतर सुप्रसिद्ध 'अवरग्लास' आले. ही वाळूची घड्याळेसुद्धा घटिकापात्राप्रमाणेच ठराविक कालावधी मोजण्यासाठी उपयोगी पडत. सामुदायिक प्रार्थना आणि प्रवचने वगैरेमध्ये किती वेळ गेला हे त्यावरून ते पहात असत आणि वाटल्यास ते आटपते घेत असत. सनडायल्सवरून मात्र सूर्य माध्यान्हीवर येण्याची वेळ तेवढी नेमकी कळत होती. अजून माध्यान्ह व्हायला किती वेळ आहे किंवा तो होऊन किती वेळ झाला हे इतर वेळी सांवलीच्या लांबीवरून समजायचे. पण ते पाहण्यासाठी स्वच्छ ऊन तर पडायला पाहिजे!"
"आपल्या घटिकापात्राचा आणखी कशा प्रकाराने उपयोग करता आला असता कां?"
"इतर घड्याळांची रचना पाहिल्यावर असे वाटते की घटिकापात्रातही कांही सुधारणा करता आल्या असत्या. दोन, चार किंवा दहा घटिका पाण्यावर तरंगणारी वेगवेगळी पात्रे बनवता आली असती किंवा त्या पात्रांवर बाहेरून आडव्या रेघा कोरून ते पाण्यात कुठपर्यंत बुडले ते पाहून त्यावरून वेळ ठरवता आली असती. ते पात्र हळू हळू पाण्यात खाली जात असतांना होणारी त्याची हालचाल टिपता आली असती. त्याठी एक दोरा बांधून त्याच्या दुस-या टोकाला सरकणारा किंवा फिरणारा कांटा जोडता आला असता. अशा कांही कल्पना सांगता येतील. त्यातल्या कांहींचा उपयोग करून घेतला गेलासुद्धा असेल. किंवा मुळात कुणाला त्याची गरजच वाटली नसेल. आता त्याबद्दल विशेष माहिती नाही."
"तास मिनिटाची वेळ काट्याने दाखवणारी घड्याळे कशी अस्तित्वात आली?"
"फिरणा-या चाकाचा शोध लागल्यानंतर गाडी, जाते, रहाट, चरखा अशा प्रकारच्या अनेक यंत्रांत त्याचा उपयोग होता होता त्याचा अधिकाधिक विकास होतच होता. दांते असलेली चक्रे (गियर) एकमेकांना जोडून त्यांना वेगवेगळ्या वेगाने फिरवणा-या यंत्रांचा विकास झाल्यानंतर त्यांच्या योगाने फिरणारे तास व मिनिटे दाखवणारे कांटे बनवण्याची कल्पना कोणाला तरी सुचली. अशा प्रकारचे पहिले घड्याळ सुमारे सातशे वर्षांपूर्वी बनवले गेले. ते कांटे फिरवण्यासाठी एका दोरीला टांगलेल्या वजनाचा उपयोग होत होता. पण अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाने खाली पडणारी वस्तू एका वेगाने खाली पडत नाही. तिचा वेग सतत वाढत जातो. त्यावर उपाय म्हणून त्याचे खाली पडणे थांबवणारे दुसरे एक छोटे चाक त्यालाच जोडले. हे 'नियंत्रक चाक' ठराविक कालावधीने मुख्य चाकाला आळीपाळीने खीळ घालत असे आणि ढील देत असे. या प्रत्येक वेळी उडणा-या खटक्यामुळे घड्याळाची 'टिकटिक' सुरू झाली. या टिकटिक करणा-या कांट्यांच्या घड्याळांना एक नाविण्यपूर्ण शोभेची वस्तू म्हणून अमीर उमरावांमध्ये मान्यता मिळाली आणि ती प्रतिष्ठितांचे दिवाणखाने सजवू लागली. त्यामुळे आपोआपच त्यावर कलाकुसर केली जाऊ लागली. आकर्षकता वाढवण्यासाठी दर अर्ध्यातासाला टोले वाजवणारी घंटा कोणीतरी जोडली. एका डोकेबाज संशोधकाने टोल्यांऐवजी कुकू अशी शीळ घालणा-या शिट्या त्याला जोडून दिल्या. जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट विभागात अशी कुकू क्लॉक तयार करण्याचा ग्रामोद्योगच सुरू होऊन भरभराटीला आला."
"पुढे काय झालं?"
"गॅलीलिओ या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने लंबकाची हलण्याची गती स्थिर असते हा शोध लावल्यावर त्याच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करकण्यासाठी केला जाऊ लागला आणि अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. या सुमारास औद्योगिक क्रांतीला वेग आल्याने कारखाने सुरू झाले व एका नव्या संस्कृतीची सुरुवात झाल्यामुळे वेळेचे महत्व अचाट वाढले. सर्वसामान्य लोकांना वेळ कळावी यासाठी गांवोगांवी क्लॉकटॉवर्स बांधण्यात आले. त्याची उंच इमारत गांवात कोठूनही दिसत असे व त्याच्या माथ्यावर बसवलेल्या घड्याळाचे कांटे पाहता येत असत. दर अर्ध्या तासानंतर वाजणारे त्याच्या घंटेचे टोल किती वाजले याची जाणीव करून देत असत. अशा त-हेने घड्याळे 'वाजू' लागली. याच्याच घरात ठेवण्याजोग्या छोट्या आवृत्या निघाल्या आणि घरोघर पोचल्या. सुरुवातीला ही घड्याळेसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या जोराने खाली पडणा-या वजनांवरच चालत. कांही काळाने त्याऐवजी स्प्रिंगचा उपयोर करता येऊ लागला."
"आता तर त्याचीसुद्धा गरज नसते. घड्याळे ऑटोमॅटिक झाली आहेत."
"आकाराने छोट्या पण शक्तीशाली बॅटरीसेल्सचा शोध लागल्यानंतर किल्ली फिरवण्याचीही गरज उरली नाही. इलेक्ट्रॉनिक्समधील विकासानंतर फिरणारी चांकेसुद्धा कालबाह्य झाली. त्यामुळे घड्याळांच्या रचनेत आता खूपच सुटसुटीतपणा आला आहे. त्यातही आता असंख्य मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजीच्या घड्याळाची कोणाला आठवण राहिलेली नाही. पण त्याचे महत्व मात्र कधीही संपणार नाही. ज्या घड्याळाला प्रत्यक्ष सूर्य ऊर्जा पुरवतो, ज्याचे नियंत्रण पृथ्वी करते आणि चंद्र, मंगळ, गुरू वगैरे ज्याचे कांटे तारकांच्या पडद्यावर फिरत असतात, ते निसर्गाचे घड्याळ यावत्चंद्रदिवाकरौ चालतच राहणार आहे. "
"आम्हालाही या निमित्ताने खूप माहिती मिळाली." मित्राने कबूली दिली.

. . . . . . . . . . . . . . .(समाप्त)

Thursday, October 23, 2008

आजीचे घड्याळ - भाग ११ पंचांग की कॅलेंडर ?

"आपलं इतकं सर्वगुणसंपन्न असं पंचांग सोडून देऊन आपल्या लोकांनी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार कां केला?" मिस्टरांनी विचारले.
मी उत्तर दिले,"मला तर भारतीय संस्कृतीचं प्रेम नाही, आपल्या पूर्वजांबद्दल आदर नाही, मी परकीयांचा धार्जिणा आहे असं तुम्ही राष्ट्रनिष्ठ लोक मला म्हणता. तेंव्हा खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला हवं."
ते निरुत्तर होऊन एकमेकांकडे पहायला लागले. मग मीच विचारले, "आपण भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयानंतर पंचवीस घटकांनी पुण्याला जाणा-या गाडीने जाऊ असं तुम्ही बोलता का?"
"तसं बोललं तर ते कुणाला समजणार?"
"बरं, पंचवीस सप्टेंबरला दुपारी चारच्या बसने पुण्याला जाऊ असं म्हणता ना?"
"हो."
"अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाची मिरवणूक पहायला पुण्याला जाऊ असंही म्हणत असाल. म्हणजे तुम्ही पंचांग सोडलेले नाही."
"हो. कारण त्यातली अनंत चतुर्दशी सगळ्यांना माहीत असते."
मी म्हंटले,"अगदी बरोबर! आपलं बोलणं ऐकणा-याला कळावं हा बोलणा-याचा मुख्य उद्देश असतो. आपलं पंचांग बनवतांना ते अधिकाधिक परिपूर्ण व्हावं यासाठी त्यात भरपूर माहिती घातली गेली. सामान्य माणसाला तिचा रोजच्या जीवनात उपयोग होईल अशी अपेक्षाही नव्हती आणि त्याला ती रोजच्यारोज वापरण्याची गरजही नव्हती. पंचांगाचं हे मूळ स्वरूप आजसुद्धा तसेच राहिले आहे. संस्कृतऐवजी मराठी भाषा आली, इंग्रजी तारखांचा त्यात समावेश झाला आणि सूर्योदय व चंद्रोदयाची वेळ कलाक मिनिटांमध्य़े देतात एवढे बदल झाले असले तरी एकूण स्वरूप पूर्वीसारखेच राहिले. तिथी व नक्षत्रांच्या वेळा कलाक मिनिटांत दिल्या तरी तिथींमधले क्षय वृद्धी वगैरे टाळता येणार नाहीत. सूर्योदयाची वेळ गांवोगांवी वेगळी राहणार. त्यातही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांची मते वेगळी असतात. उत्तर भारतात विक्रम संवत पाळतात तर दक्षिणेत शालीवाहन शक, उत्तरेतला महिना पौर्णिमेनंतर सुरू होतो तर दक्षिणेतला अमावास्येनंतर, उत्तरेमध्ये नववर्ष कार्तिकापासून सुरू होतं तर दक्षिणेमध्ये चैत्रमासापासून. एका तिथीचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो. असे असंख्य फरक असल्यामुळे पंचांग वापरणे आता सोयिस्कर राहिलेले नाही. "
"पण म्हणून परकीयांच्या कॅलेंडरला त्याची जागा द्यायची कां?"
" इंग्रजांच्या राज्यापाठोपाठ तिकडल्या औद्योगिक क्रांतीचे वारे भारतात आले. त्यामुळे वेळेनुसार काम करणारी ऑफिसे, कारखाने, शाळा, कॉलेजे सुरू झाली. कामाचे आणि सुटीचे दिवस आणि वार ठरले, हक्काची व किरकोळ रजा यांचे नियम झाले. वेळापत्रकानुसार धांवणा-या आगगाड्या सुरू झाल्या. या नव्या वातावरणात तारीख आणि वेळ यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. फक्त वार आणि तारीख या दोनच गोष्टी आठवड्याच्या कोष्टकात दाखवणारी कॅलेंडरे फारच सुटसुटीत होती. खिशात ठेवता येण्याजोगी छोटी, टेबलावर ठेवण्यासाठी थोडी मोठी आणि भिंतीवर टांगण्यासाठी मोठ्या अक्षरातली अशा त्याच्या विविध आवृत्या निघाल्या. त्यांच्याबरोबर रंगीबेरंगी चित्रे येऊ लागली. त्यात देवदेवतांची सुंदर चित्रे असतात तशाच नटनट्यांच्या मोहक हंस-या छब्या असतात. निसर्गरम्य ठिकाणांची छायाचित्रे असतात तशाच प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती असतात. अशा प्रकारे कळायला अत्यंत सोपे आणि दिसायला आकर्षक असे कॅलेंडर लोकप्रिय झाले नाही तरच नवल!

पण "पंचांगाची जागा कॅलेंडरने घेतली" असे म्हणता येणार नाही. नव्या जीवनशैलीमुळे रोजच्या जीवनात तारखेचा उल्लेख येऊ लागला होता. त्यामुळे ती सुलभपणे समजणा-या साधनाची आवश्यकता निर्माण झाली होती. ती जागा कॅलेंडरने काबीज केली. कॅलेंडरमधील महिना व तारखेबरोबरच त्या दिवसाची तिथी, नक्षत्र, संकष्टीच्या रात्री चंद्रोदयाची वेळ वगैरे माहिती देणारी नव्या प्रकारची कॅलेंडरे अलीकडच्या काळात बाजारात आली आणि त्यांनी प्रकाशनाचे जागतिक उच्चांक प्रस्थापित केले. एका अर्थाने पाहता कॅलेंडरला पंचांग जोडल्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले असे म्हणता येईल."
"किंवा पंचांग एका नव्या स्वरूपात पुन्हा लोकांच्या समोर आले आहे असेही म्हणता येईल."
"हो. कारण आपले सणवार बहुतकरून निसर्गाबरोबर जोडलेले आहेत आणि त्यामधील अनेक उत्सवात चंद्राला महत्व आहे. कोजागिरीला शरदाचे चांदणे हवे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती यायलाच हवी. हे सण इतर दिवशी येऊन चालणार नाही. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी शुक्लपक्षातील चांदण्या रात्री हव्यात, तर दिव्याची अमावास्या किंवा दीपावलीचा दीपोत्सव साजरा करण्यासाठी अमावास्येचा अंधार हवा. महात्मा गांधींचा 'बर्थ डे' आपण तारखेने पाळू शकतो. पण राम, कृष्ण, हनुमान, दत्त, गौतमबुद्ध, महावीर, गुरु नानक यांच्या 'जयंत्या' कोणत्या तारखेला साज-या करणार? या सगळ्या उत्सवांचे आपल्या जीवनात इतके महत्व आहे की त्यांच्याविना आपण राहूच शकत नाही.

याच कारणामुळे मुसलमान शासकांनी आणलेले हिजरी कॅलेंडर इथे लोकप्रिय होऊ शकले नाही. त्यांची कालगणनेची पद्धत संपूर्णपणे चंद्राच्या दर्शनावर आधारलेली असल्यामुळे त्यांच्या बारा महिन्यांचे वर्ष आपल्यासारखेच ३५४ दिवसात संपते. पण अधिक महिन्याची पद्धत नसल्यामुळे दर सहा वर्षात ऋतु बदलत जातो. ते आपल्या सणांना चालणार नाही. चैत्रगौर ऑगस्ट महिन्यात आली तर आंब्याची डाळ आणि पन्ह्यासाठी कैरी कशी मिळणार? त्याशिवाय आपल्या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये पिकांची पेरणी, कापणी वगैरे गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात. त्यासाठी महिने आणि ऋतु यांत ताळमेळ असायला पाहिजे. त्यामुळे रोजच्या व्यवहारासाठी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार केला असला तरी पंचांगावर आधारलेली पद्धतीसुद्धा प्रचारात राहिली आहे आणि राहणार आहे.


. . . . . . . . .. .. . . . . . . . . (क्रमशः)

आजीचे घड्याळ - भाग १० पंचांगाची उपयुक्तता

"निसर्गातल्या, विशेषतः आकाशात घडणा-या घटनांचा उपयोग करून वेळ मोजण्याचं एवढं किचकट शास्त्र विद्वान लोकांनी बनवलं खरं. पण ज्योतिषांना सोडून इतर सामान्य माणसांना त्याचा काय उपयोग झाला?" मिस्टरांनी विचारलं.
मी म्हंटले,"माझ्या मते भाषा आणि गणित यांच्यानंतर कालगणना हा माणसाच्या विज्ञानसाधनेतला एक सर्वात महत्वाचा पायाभूत भाग म्हणता येईल. वस्तुमान, अंतर आणि काल या तीन मूलभूत तत्वांच्या परिमाणांच्या गुणाकार, भागाकारातून विज्ञानातील बाकीची सर्व असंख्य सूत्रे बनली आहेत. या तीन तत्वांच्या सखोल अभ्यासामधून आजचा विज्ञान व तंत्रज्ञानाचा डोलारा उभा राहिला आहे. विज्ञान हे सुद्धा विशेषज्ञांचे क्षेत्र झाले असे कदाचित तुम्ही म्हणाल.
आपण तुमचीच गोष्ट घेऊ. तुमची आणि तुमच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची जन्म तारीख, लग्नाची तारीख, नववर्षदिन, भारताचा स्वातंत्र्यदिवस अशा कितीतरी तारखा तुमच्या दृष्टीने महत्वाच्या असतील. आजकाल दसरा, दिवाळी, पाडवा यासारखे आपले सणसुद्धा कॅलेंडरवर लाल रंगात दाखवलेले असतात तेच आपण पाहतो. पण जर हे कॅलेंडरच अस्तित्वात नसते तर केवढा गोंधळ झाला असता? तुम्हाला घरातल्या लोकांची वये किती आहेत हे देखील समजले नसते. तुमचं शिक्षण कधी आणि किती काळ झालं? नोकरी वा व्यवसाय केंव्हा सुरू केला? त्यात पदोन्नतीसारख्या महत्वाच्या घटना कधी घडल्या? तुमच्यावर कोणती संकटे कधी येऊन गेली? आनंदाचे क्षण देणा-या गोष्टी कधी घडल्या? यातले कांहीसुद्धा समजले नसते. हांतावर पोट असणा-या लोकांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यामुळे कदाचित फार फरक पडणार नाही. पण त्या जाणीवांमुळे जीवनाला एक उंची प्राप्त होते. आपण भूतकाळातील घटनांवर
सविस्तर विचार करून त्यातून धडे घेऊ शकतो. भविष्यकाळात करण्यासाटी कांही नियोजन करू शकतो. त्यासाठी आवश्यक असलेले इंग्रजी कॅलेंडर आपल्याकडे घरोघरी फार तर शंभर वर्षापूर्वी आले. त्यापूर्वी पंचांगच होते. छापखाने नसल्यामुळे तेही घरोघरी नसेल, पण आभाळात दिसणारे ग्रहता-यांचे पंचांग आणि घड्याळ तर सर्वांना सहज उपलब्ध होते. आपापल्या कुवतीप्रमाणे त्याचा उपयोग ते करून घेत होते.

घडून गेलेल्या गोष्टी स्मरणामध्ये सुट्या सुट्या राहतात. त्या कधी आणि कोणत्या क्रमाने घडल्या हे समजले तर त्यांची सांखळी बनवून त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढता येतात. ब-याच गोष्टींची
पुनरावृत्ती होत असते. पूर्वीचा इतिहास माहीत असेल तर पुढे काय होऊ शकते याची कल्पना येते. पेरणी केल्यानंतर कधी पीक येईल, कुठल्या झाडांना कुठल्या मोसमात फळे लागतील, वयाप्रमाणे मुलांची वाढ कशी होईल अशासारख्या अनंत गोष्टी वेळेनुसार घडत असतात. यामुळे कालगणनेचं महत्व माणसाला आपोआप समजतं. त्याची एक पद्धत निर्माण झाल्यावर त्याचा उपयोग करून जन्म मृत्यू यासारख्या महत्वाच्या गोष्टींची नोंद करण्याची वहिवाट सुरू झाली. पंचांग, कॅलेंडर असे कांहीच नसेल तर त्यात किती मर्यादा येतात ते मी सांगितलेच आहे.
व्यक्तीगत आयुष्य असो वा सर्व समाजावर परिणाम करणा-या घटना असोत, नैसर्गिक असोत वा मानवनिर्मित असोत, त्या घटना कधी घडल्या किंवा घडणार आहेत हे समजणे अत्यंत महत्वाचे आहे हे बहुतेक शहाण्या लोकांना पटले आणि अनेक प्रकारांनी तशा नोंदी ठेवल्या गेल्या."

"पण आपली ही तिथी नक्षत्र वगैरेची जटिल पद्धती सामान्य लोकांना कशी समजली?" त्यांनी रास्त शंका काढली.

मी उत्तर दिले,"एकादी गोष्ट पुन्हा पुन्हा कानावर पडली तर पूर्णपणे नाही तरी थोडी थोडी समजायला लागते. यासाठी एक छान युक्ती काढली होती. आपल्या प्रत्येक पूजेच्या धार्मिक विधीमध्ये सुरुवातीलाच ... नाम संवत्सरे, ..ऋतौ, .. मासे, ..पक्षे, ..शुभपुण्यतिथौ असे म्हणत त्या दिवसाची पूर्ण माहिती देऊन पुढे चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे, सूर्य, गुरु, शनी वगैरे ग्रह कोणत्या राशीमध्ये आहेत या सगळ्यांचा उच्चार करायची प्रथा पाडली गेली. त्यामुळे ती सांगणा-या पुरोहिताला तर एवढी अद्ययावत माहिती ठेवणे भाग पडत असे आणि निदान तेवढा अभ्यास करणारा एक वर्ग निर्माण झाला. तो पूजाविधी पाहणा-या लोकांनाही ती माहिती आपोआप कळत असे. अशा प्रकाराने त्या माहितीचे प्रसरण होत होते. मोटार कशी बनवायची हे
ज्ञान ऑटोमोबाईल इंजिनियरला असलं तरी ती कशी चालवायची एवढं सर्वसामान्य माणूस शिकून घेतो. त्याचप्रमाणे महिना तिथी ऋतु एवढ्या गोष्टी कशा निर्माण झाल्या हे माहीत नसलं तरी त्यांची जुजबी माहिती सर्वसामान्य लोकांना मिळत होती.

ती माहिती आणखी पक्की व्हावी यासाठी अनेक उत्सवांचे दिवस तिथीनुसार ठरवले गेले. 'सहा ऋतूंचे सहा सोहळे' त्या त्या कालावधीत कधीही साजरे करता आले असते. पण यात सर्व समाजाचा एकाच वेळी सहभाग होण्यासाठी विशिष्ट दिवशी सणाद्वारे ते साजरे करण्याची प्रथा रूढ झाली. यातील प्रत्येक सणाच्या दिवसाच्या निमित्ताने त्या काळामधल्या महिना व तिथी यांची उजळणी होत राहिली. अशा प्रकाराने आपल्या पूर्वजांनी फक्त कालगणनेची पद्धती निर्माण केली एवढेच नव्हे तर आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी 'लॉँच' केलेल्या या 'प्रॉडक्ट'चे यशस्वीरीत्या 'मार्केटिंग' केले."

. . . . . . . . . .. . . . . . .(क्रमशः)

Wednesday, October 22, 2008

आजीचे घड्याळ - भाग ९ घटिकापात्र


"खरंच, दिवस व महिना ठरवण्याची खूप चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी तयार केली होती." अमोल म्हणाला.
मी सांगितले,"यातले एक वैशिष्ट्य असं आहे की आज कोणती तिथी आहे हे समजण्यासाठी कागदावर छापलेल्या कुठल्याही कॅलेंडरची जरूरी नाही. निरभ्र आभाळ असेल तर चंद्राची कला आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे एवढे पाहणे हे महिना आणि तिथी ठरवायला पुरेसे आहे."
"पण वर्ष कसं ओळखायचं?"
"गुरु आणि शनी यांच्या स्थानावरून त्याचा अंदाज कसा लावायचा हे मी दाखवलंच होतं. प्राचीन काळातल्या आपल्या विद्वानांनी असं पाहिलं की गुरु आणि शनी आज ज्या राशीत आहेत त्यामधून त्यातला कोणताही ग्रह एकदा पुढे गेला की पुन्हा ते दोघेही एकाच वेळी आज असलेल्या आपापल्या स्थानांवर यायला साठ वर्षे लागतील. गुरु पांच सूर्यप्रदक्षिणा घालून आणि शनी दोन चकरा पूर्ण करून तेंव्हा पुन्हा आजच्या जागांवर परत येतील. अशा रीतीने हे चक्र फिरत राहील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साठ वर्षांचे काळ भरपूर मोठे असतात. या साठ वर्षांना त्यांनी वेगवेगळी नांवे दिली. त्यांना संवत्सर असे म्हणतात. त्यांची यादी माहीत असेल तर नांवावरून ते संवत्सर किती वर्षापूर्वी येऊन गेले आणि किती वर्षानंतर पुन्हा येणार आहे ते समजते. इसवी सन, विक्रम संवत आणि शालिवाहन शक या आजपर्यंत चालत आलेल्या गणना सुमारे दोन हजार वर्षे जुन्या आहेत. त्यापूर्वीच्या सम्राटांनी किंवा यामधल्या काळातील इतर राजांनी अशाच प्रकारच्या किती सनावल्या सुरू केल्या, त्यातल्या किती लोकप्रिय झाल्या आणि त्या किती काळ टिकल्या हे ठाऊक नाही. पण संवत्सरांच्या पद्धतीने कोणत्याही काळात निदान एका माणसाच्या आयुष्यामधल्या घटनांची नोंद क्रमवार करता येणे शक्य झाले हे कांही कमी नाही."
"तिथी, महिना, वर्ष यांच्या गणना ठरल्या, पण दिवसातली वेळ कशी मोजायची याचीसुद्धा कांही पद्धत त्यांनी तयार केली होती कां?"
"त्या काळात यांत्रिक घड्याळे नव्हती. आमच्या आजीच्या काळापर्यंत ती परिस्थिती होती. म्हणून 'आजीच्या जवळी' असलेल्या 'चमत्कारिक' घड्याळाचं एवढं कौतुक वाटायचं. पूर्वी वेळेची गणना निसर्गातल्या घटनांवरूनच करायची होती. ते फारच महत्वाचं काम होतं. आज आपण सूर्योदय अमूक वाजून तमूक मिनिटांनी झाला असे म्हणतो. पण ते दाखवणारे घड्याळच नसेल तर काय करणार? भारतातल्या पद्धतीप्रमाणे सूर्योदयापासूनच दिवसाला सुरुवात होत असे. युरोपातली परिस्थिती बरीच वेगळी आहे. अगदी उत्तरेला गेलात तर उन्हाळ्यात मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो आणि थंडीच्या दिवसात भर दुपारी सुद्धा अंधार असतो. सूर्योदय जर झालाच नाही तर त्यावरून वेळ तरी कशी काढणार? इंग्लंडमध्ये सुद्धा दिवस आणि रात्र यांचा कालावधी कमीत कमी पाच सहा तास ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस तासाइतका असतो. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेत प्रचंड फरक पडतो, म्हणून त्यांनी नाइलाजाने मध्यरात्रीची वेळ ही नव्या दिवसाच्या सुरुवातीची वेळ ठरवली असणार. भारतीय पंचांगाप्रमाणे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यच आकाशात असतांना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे किती सरकला ते
ढळढळीत दिसतच होते. सूर्याकडे पाहून डोळे दिपत असले म्हणून थेट त्याच्याकडे टक लावून पहायचे टाळले तरी जमीनीवर पडणा-या सांवल्यांची लांबी तर मोजतासुद्धा येत असे. सावलीवरून वेळ दाखवणारी सनडायल्स प्राचीन काळात अनेक ठिकाणी होती. दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरमध्ये अशा अजस्त्र आकाराच्या सनडायल्स आहेत. आमच्या घराच्या एका पूर्वपश्चिम दिशेने बांधलेल्या भिंतीवर एक मोठा खिळा ठोकून मी घड्याळात पाहून त्यावर किती वाजता खिळ्याची सांवली कुठे पडते याच्या खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून मला ब-यापैकी अचूकपणे वेळ कळत असे. रात्र पडल्यावर ता-यांच्या सहाय्याने वेळेचे निदान करता येत असे.
पूर्वीच्या काळातले जीवन आजच्यासारखे यंत्रवत झालेले नव्हते. वेळेनुसार चालणारी ऑफिसे नव्हती की पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने नव्हते. वेळापत्रकावर धांवणा-या आगगाड्या आणि बस नव्हत्या. कोणाची अँपॉइंटमेंट ठरलेली नसे की टीव्हीवरची मालिका पहायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या जीवनात अगदी काटेकोरपणाने वेळ समजण्याची गरज नव्हती. तेंव्हा वीज तर नव्हतीच पण रॉकेलचे कंदीलसुद्धा नव्हते. देवापाशी लावलेल्या समई किंवा निरांजनातल्या ज्योतीचा मिणमिणीत उजेड सोडल्यास घरातसुद्धा सगळीकडे काळोखच असायचा. अशा काळात भल्या पहाटे लवकर उठून तरी समईच्या मिणमिणत्या उजेडात कसली कामे करणार? फार तर देवासमोर बसून कांही स्तोत्रं म्हणता येतील. झुंजूमुंजू सकाळ झाली की उठायचं, स्नान, न्याहारी वगैरे करून कामाला लागायचं, दुपार झाली की जेवण करून थोडा आराम करायचा. पुन्हा वाटल्यास कांही वेळ काम करून दिवेलागणी व्हायच्या आंत घरी परत यायचं आणि संध्याकाळची जेवणं करून झोपी जायचं असा दिनक्रम होता. सांवल्यांवरून आणि कवडशावरून येणारा वेळेचा अंदाज त्याठी पुरेसा होता.
"आता आपण तास, मिनिटे, सेकंद यामध्ये वेळ मोजतो. तसे कांही मोजमाप तेंव्हा होते कां?"
"अभ्यासू विद्वानांनी आपल्या चिकित्सक वृत्तीने अगदी सूक्ष्म कालावधींच्या व्याख्या केल्या होत्या. आपल्या शास्त्राभ्यासासाठी ते त्याचा उपयोग मुख्यतः करीत असत. दिवस मोठा झाला की रात्र लहान होते आणि रात्र मोठी झाली की दिवस लहान हे चक्र चालू असतांना या दोघांची बेरीज फारशी बदलत नाही हे त्यांनी पाहिले आणि तिचे साठ भाग करून त्याला घटिका असे नांव दिले. ही आजच्या चोवीस मिनिटांएवढी असते. प्रत्येक घटिकेचे साठ भाग आणि त्यातील प्रत्येकाचे पुन्हा साठ भाग करून त्यांना पळ व विपळ अशी नांवे दिली. एक विपळ हा एका सेकंदाच्या पाव हिश्याहून थोडा लहान इतका सूक्ष्म असतो. सूर्य चंद्रांच्या निरीक्षणातून आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे रोजच सूर्य जितका वेळ आभाळात दिसतो त्यापेक्षा चंद्र सुमारे घटकाभर अधिक वेळ आभाळात रेंगाळतो. कदाचित त्यावरून त्यांना घटिका हे परिमाण सुचले असावे."

"खरंच, दिवस व महिना ठरवण्याची खूप चांगली पद्धत आपल्या पूर्वजांनी तयार केली होती." अमोल म्हणाला.
मी सांगितले,"यातले एक वैशिष्ट्य असं आहे की आज कोणती तिथी आहे हे समजण्यासाठी कागदावर छापलेल्या कुठल्याही कॅलेंडरची जरूरी नाही. निरभ्र आभाळ असेल तर चंद्राची कला आणि तो कोणत्या नक्षत्रात आहे एवढे पाहणे हे महिना आणि तिथी ठरवायला पुरेसे आहे."
"पण वर्ष कसं ओळखायचं?"
"गुरु आणि शनी यांच्या स्थानावरून त्याचा अंदाज कसा लावायचा हे मी दाखवलंच होतं. प्राचीन काळातल्या आपल्या विद्वानांनी असं पाहिलं की गुरु आणि शनी आज ज्या राशीत आहेत त्यामधून त्यातला कोणताही ग्रह एकदा पुढे गेला की पुन्हा ते दोघेही एकाच वेळी आज असलेल्या आपापल्या स्थानांवर यायला साठ वर्षे लागतील. गुरु पांच सूर्यप्रदक्षिणा घालून आणि शनी दोन चकरा पूर्ण करून तेंव्हा पुन्हा आजच्या जागांवर परत येतील. अशा रीतीने हे चक्र फिरत राहील. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात साठ वर्षांचे काळ भरपूर मोठे असतात. या साठ वर्षांना त्यांनी वेगवेगळी नांवे दिली. त्यांना संवत्सर असे म्हणतात. त्यांची यादी माहीत असेल तर नांवावरून ते संवत्सर किती वर्षापूर्वी येऊन गेले आणि किती वर्षानंतर पुन्हा येणार आहे ते समजते. इसवी सन, विक्रम संवत आणि शालिवाहन शक या आजपर्यंत चालत आलेल्या गणना सुमारे दोन हजार वर्षे जुन्या आहेत. त्यापूर्वीच्या सम्राटांनी किंवा यामधल्या काळातील इतर राजांनी अशाच प्रकारच्या किती सनावल्या सुरू केल्या, त्यातल्या किती लोकप्रिय झाल्या आणि त्या किती काळ टिकल्या हे ठाऊक नाही. पण संवत्सरांच्या पद्धतीने कोणत्याही काळात निदान एका माणसाच्या आयुष्यामधल्या घटनांची नोंद क्रमवार करता येणे शक्य झाले हे कांही कमी नाही."
"तिथी, महिना, वर्ष यांच्या गणना ठरल्या, पण दिवसातली वेळ कशी मोजायची याचीसुद्धा कांही पद्धत त्यांनी तयार केली होती कां?"
"त्या काळात यांत्रिक घड्याळे नव्हती. आमच्या आजीच्या काळापर्यंत ती परिस्थिती होती. म्हणून 'आजीच्या जवळी' असलेल्या 'चमत्कारिक' घड्याळाचं एवढं कौतुक वाटायचं. पूर्वी वेळेची गणना निसर्गातल्या घटनांवरूनच करायची होती. ते फारच महत्वाचं काम होतं. आज आपण सूर्योदय अमूक वाजून तमूक मिनिटांनी झाला असे म्हणतो. पण ते दाखवणारे घड्याळच नसेल तर काय करणार? भारतातल्या पद्धतीप्रमाणे सूर्योदयापासूनच दिवसाला सुरुवात होत असे. युरोपातली परिस्थिती बरीच वेगळी आहे. अगदी उत्तरेला गेलात तर उन्हाळ्यात मध्यरात्रीसुद्धा सूर्य दिसतो आणि थंडीच्या दिवसात भर दुपारी सुद्धा अंधार असतो. सूर्योदय जर झालाच नाही तर त्यावरून वेळ तरी कशी काढणार? इंग्लंडमध्ये सुद्धा दिवस आणि रात्र यांचा कालावधी कमीत कमी पाच सहा तास ते जास्तीत जास्त अठरा एकोणीस तासाइतका असतो. त्यामुळे सूर्योदयाच्या वेळेत प्रचंड फरक पडतो, म्हणून त्यांनी नाइलाजाने मध्यरात्रीची वेळ ही नव्या दिवसाच्या सुरुवातीची वेळ ठरवली असणार. भारतीय पंचांगाप्रमाणे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने होते. त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यच आकाशात असतांना तो पूर्वेकडून पश्चिमेकडे किती सरकला ते
ढळढळीत.सूर्याकडे पाहून डोळे दिपतात म्हणून थेट त्याच्याकडे टक लावून पहायचे टाळले तरी जमीनीवर पडणा-या सांवल्यांची लांबी तर मोजतासुद्धा येते. सावलीवरून वेळ दाखवणारी सनडायल्स प्राचीन काळात अनेक ठिकाणी होती. दिल्ली आणि जयपूर येथील जंतरमंतरमध्ये अशा अजस्त्र आकाराच्या सनडायल्स आहेत. आमच्या घराच्या एका पूर्वपश्चिम दिशेने बांधलेल्या भिंतीवर एक मोठा खिळा ठोकून मी घड्याळात पाहून त्यावर किती वाजता खिळ्याची सांवली कुठे पडते याच्या खुणा करून ठेवल्या होत्या. त्यावरून मला ब-यापैकी अचूकपणे वेळ कळत असे. रात्र पडल्यावर ता-यांच्या सहाय्याने वेळेचे निदान करता येत असे.
पूर्वीच्या काळातले जीवन आजच्यासारखे यंत्रवत झालेले नव्हते. वेळेनुसार चालणारी ऑफिसे नव्हती की पाळ्यांमध्ये चालणारे कारखाने नव्हते. वेळापत्रकावर धांवणा-या आगगाड्या आणि बस नव्हत्या. कोणाची अँपॉइंटमेंट ठरलेली नसे की टीव्हीवरची मालिका पहायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या जीवनात अगदी काटेकोरपणाने वेळ समजण्याची गरज नव्हती. तेंव्हा वीज तर नव्हतीच पण रॉकेलचे कंदीलसुद्धा नव्हते. देवापाशी लावलेल्या समई किंवा निरांजनातल्या ज्योतीचा मिणमिणीत उजेड सोडल्यास घरातसुद्धा सगळीकडे काळोखच असायचा. अशा काळात भल्या पहाटे लवकर उठून तरी समईच्या मिणमिणत्या उजेडात कसली कामे करणार? फार तर देवासमोर बसून कांही स्तोत्रं म्हणता येतील. झुंजूमुंजू सकाळ झाली की उठायचं, स्नान, न्याहारी वगैरे करून कामाला लागायचं, दुपार झाली की जेवण करून थोडा आराम करायचा. पुन्हा वाटल्यास कांही वेळ काम करून दिवेलागणी व्हायच्या आंत घरी परत यायचं आणि संध्याकाळची जेवणं करून झोपी जायचं असा दिनक्रम होता. सांवल्यांवरून आणि कवडशावरून येणारा वेळेचा अंदाज त्याठी पुरेसा होता.
"आता आपण तास, मिनिटे, सेकंद यामध्ये वेळ मोजतो. तसे कांही मोजमाप तेंव्हा होते कां?"
"अभ्यासू विद्वानांनी आपल्या चिकित्सक वृत्तीने अगदी सूक्ष्म कालावधींच्या व्याख्या केल्या होत्या. आपल्या शास्त्राभ्यासासाठी ते त्याचा उपयोग मुख्यतः करीत असत. दिवस मोठा झाला की रात्र लहान होते आणि रात्र मोठी झाली की दिवस लहान हे चक्र चालू असतांना या दोघांची बेरीज फारशी बदलत नाही हे त्यांनी पाहिले आणि तिचे साठ भाग करून त्याला घटिका असे नांव दिले. ही आजच्या चोवीस मिनिटांएवढी असते. प्रत्येक घटिकेचे साठ भाग आणि त्यातील प्रत्येकाचे पुन्हा साठ भाग करून त्यांना पळ व विपळ अशी नांवे दिली. एक विपळ हा एका सेकंदाच्या पाव हिश्याहून थोडा लहान इतका सूक्ष्म असतो. सूर्य चंद्रांच्या निरीक्षणातून आणखी एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे रोजच सूर्य जितका वेळ आभाळात दिसतो त्यापेक्षा चंद्र सुमारे घटकाभर अधिक वेळ आभाळात रेंगाळतो. कदाचित त्यावरून त्यांना घटिका हे परिमाण सुचले असावे."

"या परिमाणांचा उपयोग त्यांना कसल्या अभ्यासात होत असेल?"
"कुठलीही गोष्ट विशेषज्ञांच्या ताब्यात गेली की ते त्यात परफेक्शन आणण्यासाठी खूप काँप्लिकेशन्स करतात हे आपल्याला ठाऊक आहे. ज्योतिषशास्त्रातल्या तज्ञ मंडळींनी सगळ्या ग्रहांच्या भ्रमणाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. समजा एक ग्रह सतरा दिवसात तेवीस अंशाने पुढे सरकला तर तेवीस भागले सतरा इतके अंश, कला , विकला एवढे अंतर तो सरासरी रोज पुढे सरकला अशी त्याची सरासरी गती झाली. तसेच सतरा भागले तेवीस दिवस एवढ्या वेळात जितक्या घटिका, पळे, विपळे येतील तेवढ्या वेळात तो एक अंश पुढे गेला असे गणित मांडता येते. अशा प्रकारची असंख्य निरीक्षणे करून व गणिते मांडून त्यांनी ग्रहांच्या भ्रमणासंबंधीची सूत्रे निर्माण केली. एवढेच नव्हे तर तिथीसाठी एक शास्त्रशुद्ध परिमाण ठरवले. सूर्याच्या तुलनेने चंद्र बारा अंशाने पुढे जाईल तेंव्हा तिथी बदलायची असे ठरवले. त्यामुळे रोजचा दिवस सूर्योदयापासून सुरू झाला तरी तिथी दिवसा किंवा रात्री केंव्हाही बदलते. त्याची वेळ तसेच चंद्राने एका नक्षत्रातून पुढच्या नक्षत्रात प्रवेश करण्याची वेळ घटका पळे या परिमाणात हिशोब करून निश्चित करतात आणि पंचांगात दाखवतात. याखेरीज योग, करण वगैरे संकल्पना निर्माण करून त्याला अधिकाधिक सूक्ष्मता आणली."
"पण ही इतकी सूक्ष्म वेळ मोजण्याची कोणती व्यवस्था होती?"
"पळे आणि विपळे मोजण्याची सोय होती की नाही ते मलाही माहित नाही. कदाचित त्या गणितातल्या संकल्पना असतील. घटिका मोजण्यासाठी मात्र एक विशिष्ट प्रकारचे पात्र असायचे. अभिषेक करण्यासाठी वापरतात तसे खाली छिद्र असलेले हे भांडे एका मोठ्या पात्रात पाणी भरून त्यात ठेवायचे. रिकामे भांडे पाण्यावर तरंगते. पण छिद्रातून हळू हळू पाणी आत शिरल्यावर ते जड होऊन हळू हळू खाली खाली जाते. पूर्ण भरत आले की पुरेसे जड झाल्याने एकदम भरून बुडून जाते. म्हणूनच 'घटका भरली' असा शब्दप्रयोग केला जातो. पात्राचा आकार तसेच छिद्राचा आकार नियंत्रित करून ते बरोबर एक घटकेमध्ये बुडावे याची खात्री करून घेत असतील. मुहूर्ताची वेळ यासारख्या महत्वाच्या वेळा दाखवण्यासाठी या घटिकापात्राचा उपयोग करीत असत."

. . .. . . . . . . . . . .. . (क्रमशः)

Tuesday, October 21, 2008

आजीचे घड्याळ - भाग ८ कालगणना


"आपल्या थोर पूर्वजांनी एवढं मोठं ज्योतिषशास्त्र कशासाठी निर्माण करून ठेवलं आहे?" हा एक बिनतोड सवाल अमोलच्या बाबांनी केला होता. त्या शास्त्राची प्रचंड व्याप्ती पाहता ती कांही सहजासहजी गंमत म्हणून करता येण्याजोगी गोष्ट नाही हे स्पष्ट आहे. परंपरागत भारतीय ज्योतिषशास्त्र 'खगोल' आणि 'होरा' या दोन्ही अंगांना धरून विकसित झालेले असल्यामुळे त्याचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. ग्रहांच्या भ्रमणाची गति प्रत्यक्षात सुपरसॉनिक विमानापेक्षासुद्धा जास्त असली तरी ते ग्रह आपल्यापासून फार दूर असल्यामुळे आभाळात ती अत्यंत धीमी दिसते. साध्या डोळ्यांना ती जाणवू शकत नाही. त्यांच्या सूक्ष्म हालचाली वर्षानुवर्षे टिपून त्यांची कोष्टके व सूत्रे बनवणे हे अत्यंत जिकीरीचे काम आहे. ते करण्यासाठी असामान्य बुद्धीमत्ता आणि कमालीची चिकाटी या दोन्ही गुणांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. ते एकट्या दुकट्याचे काम नाही. अनेक विद्वानांनी त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या निरीक्षणांचे
विश्लेषण करून त्यात स्वतःच्या कार्याची भर घालीत ते शास्त्र नांवारूपाला आणलेले आहे. हा सगळा खटाटोप कोणत्या उद्देशाने केला असेल आणि त्यातून काय साध्य झाले असेल हा प्रश्न साहजीकच उपस्थित होतो.


ते समजून घेण्यासाठी क्षणभर आपण प्राचीन काळात जाऊ. त्या वेळी छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांगे, कॅलेंडरे किंवा दैनंदिनी नसत. कांट्यांची घड्याळेसुद्धा नव्हती. पण तेंव्हासुद्धा माणसांना आजच्याइतकीच तीक्ष्ण स्मरणशक्ती होती. होऊन गेलेल्या किरकोळ गोष्टी थोडे दिवस, तर महत्वाच्या गोष्टी जन्मभर त्यांच्या लक्षात रहात. पण त्या कधी आणि केंव्हा घडल्या हे कशाच्या संदर्भात स्मरणात ठेवायचे किंवा त्या गोष्टी कशा दुस-याला सांगायच्या हा एक प्रश्न होता. त्यासाठी त्याच काळात घडलेल्या दुस-या एकाद्या घटनेचा आधार घ्यावा लागत असे.
"आपल्या काळ्या मांजरीला पिल्लं झाली होती ना, त्याच दिवशी महाद्या आपल्याकडे आला होता." अशा प्रकाराने तो कधी आला होता ते सांगायचे. मोठा कालावधी असेल तर "गांवातल्या नदीला महापूर येऊन शंकराच्या देवळांतल्या पिंडीपर्यंत पाणी आलं होतं तेंव्हा आमचा गणप्या रांगायला लागला होता." असे सांगून त्यावरून त्याचे वय ठरायचे. माझ्या लहानपणी खेड्यातल्या अशिक्षित लोकांचे अशा प्रकारचे संवाद मी ऐकलेले आहेत. त्या काळातल्या अशिक्षित लोकांना जानेवारी, फेब्रूवारी किंवा आश्विन, कार्तिक या शब्दामधून काळाचा पूर्ण अंदाज लागत नसे कारण ते त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगात येणारे शब्द नव्हते। मग ज्या काळात हे शब्दसुद्धा अस्तित्वात नव्हते तेंव्हा लोक काय करीत असतील?


प्राचीन काळातील लोक अशाच प्रकारच्या समकालीन घटनांचा आधार घेत असतील. पण अशा घटना किती लोकांना ठाऊक असतील? आणि किती काळ त्यांच्या लक्षात राहतील? 'काळ्या मांजरीला पिले झाली' ही गोष्ट त्या घरातल्या आणि जवळच्या शेजा-यांना तेवढी माहीत असणार आणि फार फार तर ती पिले मोठी होईपर्यंत दीड दोन महिने ती त्यांच्या स्मरणात राहील. इतर लोकांना त्या गोष्टीचा पत्तादेखील लागणार नाही. नदीला कधीतरी आलेला महापूर त्या गांवात त्या काळात रहात असलेल्या लोकांना कळला असणार आणि कदाचित तो त्यांच्या जन्मभर लक्षात राहील, पण बाहेरच्या लोकांना त्यातून कोणता बोध होणार? यामुळे अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भाचा उपयोग खूप मर्यादित असतो.


घरात व गांवात घडणा-या घटना थोड्या लोकांच्या लक्षात रहातील. पण निसर्गात होणारे मोठे बदल त्यापेक्षा अधिक विस्तृत भागातील सर्वच लोकांच्या लक्षात येतात. दिवस किंवा रात्र, सकाळ- दुपार- संध्याकाळ या सगळ्यांना समजणा-या घटना आहेत. एकादी गोष्ट केंव्हा झाली हे सांगण्याचा तो उत्तम मार्ग आजसुद्धा आपल्या बोलण्यात वारंवार येतो. नेहमीच घड्याळाकडे पाहून "इतक्या वाजता अमकी गोष्ट झाली" असे कांही आपण बोलत नाही. "तेंव्हा नुकतंच उजाडलं होतं " किंवा "भर दुपारी असं असं झालं बघा." असेही सांगतो. त्याचप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि थंडी हे ढोबळ ऋतु तेंव्हा घडणा-या वातावरणातील बदलांमुळे लगेच लक्षात येतात आणि राहतात. त्यांचाही उपयोग काळाच्या संदर्भासाठी सर्रास होतो. पण या गोष्टी पुनःपुन्हा होत असतात. सकाळ, दुपार वगैरे रोज होतात आणि उन्हाळा पावसाळा तीन चार महिन्यांच्या अंतराने दरवर्षी येतात. त्यांच्या मधल्या आणि पलीकडच्या कालखंडांचा संदर्भ कसा द्यायचा?


आपल्या वातावरणात, निसर्गात होत असलेले बदल जसे सर्वांच्या लक्षात सहजपणे येत होते तसेच आकाशात दिसणारे बदलसुद्धा समजत होते. जमीनीवर दिसणा-या बदलांपेक्षा हे बदल जास्त वक्तशीर आणि भरोशाचे आहेत हे त्यातल्या जाणकारांच्या लक्षात आले असणार. दिवस आणि ऋतु यांना जोडणारा एक दुवा हवा होता. चंद्राच्या कलांच्या रूपात हा दुवा निसर्गात सापडला. चंद्राचा आकार रोज बदलत असतो. अमावास्येच्या दिवशी तो दिसतच नाही, त्यानंतर कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला पूर्ण गोलाकार होतो, मग पुन्हा कलेकलेने घटत जाऊन अमावास्येला अदृष्य होतो. हे चक्र फिरत राहते. याच्या आधारावर महिना ठरला.


पण एक महिना दुस-या महिन्यापासून वेगळा कसा ओळखायचा? त्यासाठी चंद्राच्या आजूबाजूला असलेल्या ता-यांचे सहाय्य झाले. रोज चंद्र आदल्या दिवसाच्या मानाने उशीराने उगवतो हे तर लक्षात आलेच, त्याशिवाय त्याच्या आजूबाजूला असणारे तारे रोज वेगळे असतात हेही कळले. यावरून या ता-यांची सत्तावीस भागात विभागणी करून सत्तावीस नक्षत्रे निर्माण केली आणि रोज चंद्र एका नक्षत्रातून दुस-या नक्षत्रात जातो अशी कल्पना केली. अशा प्रकारे सत्तावीस दिवसानंतर तो पुन्हा पहिल्या नक्षत्रात आलेला असतो पण प्रत्येक २९-३० दिवसांनी येणा-या अमावास्येपर्यंत दोन किंवा तीन घरे पुढे जातो. त्यामुळे पुढला महिना तो वेगळ्या नक्षत्रापासून सुरू करतो. अशा प्रकाराने तिथी व नक्षत्र हे दोन्ही एकत्र पाहिल्यास प्रत्येक महिन्यात वेगळा संच दिसतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याचे नाव त्या महिन्याला दिले. 'अश्विनी'पासून 'आश्विन',' कृत्तिके'पासून 'कार्तिक' वगैरे महिन्यांची नांवे अशी ठरली.


विद्वानांचे जसे चंद्राकडे लक्षपूर्वक पाहणे चालले होते तसेच सूर्याचे निरीक्षणसुद्धा होत होते. रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देण्यासाठी त्याचे दर्शन ते करीतच असत. त्यामुळे सूर्योदयापूर्वी मंद होत मावळणा-या आणि सूर्यास्तानंतर प्रकाशमान होत उगवणा-या चांदण्यांना पाहून कोणत्या राशीमधून व नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण चालले आहे याचा अंदाज त्यांना येत असे. निसर्गात होणारे बदल हे त्याच्याबरोबर निगडित आहेत. मृग नक्षत्रात सूर्य गेल्यावर पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रातून बाहेर पडल्यानंतर सर्वसाधारणपणे पाऊस संपतो. मकर राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहानाचा मोठा होऊ लागतो. मेष, ऋषभ, मिथुन राशीत दिवसाचा काळ मोठा असल्यामुळे उकाडा होतो. कर्क राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहान व रात्र मोठी होत जाते आणि वृश्चिक व धनु राशीत ती जास्त मोठी होऊन कडाक्याची थंडी पडते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. पण अमावास्या पौर्णिमा यांच्यावर आधारलेले बारा महिने होऊन गेले तरी सूर्य अजून सुरुवातीच्या जागेपर्यंत पोचत नाही. त्यासाठी आणखी १०-११ दिवस लागतात, तोपर्यंत चंद्र आपल्या तेराव्या महिन्यात पुढे गेलेला असतो. यामुळे सूर्याचा
भ्रमणकाळ हा चंद्राच्या भ्रमणकाळाच्या पटीत नाही हे त्यांनी पाहिले.चंद्राच्या कलांमधील दैनंदिन बदलावर आधारलेला महिना आणि सूर्याच्या राशींमधील भ्रमणावर आधारभूत वर्ष या दोन्ही गोष्टींची अफलातून सांगड प्राचीन काळातील विद्वानांनी घातली. दरवर्षी होणारा १०-११ दिवसांचा फरक तीन वर्षात अधिक महिना आणून त्यांनी भरून काढला. 'अश्विनी'पासून 'आश्विन',' कृत्तिके'पासून 'कार्तिक' अशी महिन्यांची नांवे ठरतात. मग या अधिक महिन्याचे नांव कसे ठरवायचे? 'अधिक' नांवाचे नक्षत्र तर नसते ना? त्यासाठी त्यांनी अशी कल्पना काढली की ज्या महिन्यापूर्वी अधिक महिना येईल त्याचेच नांव त्या महिन्याला द्यायचे आणि त्याला अधिक हे विशेषण जोडायचे. हा महिना कधी येणार हे कसे ठरवायचे? सूर्य आणि चंद्र यांची सांगड घालायची ते दर अमावास्येला एकत्र येतात, पण वेगवेगळ्या राशीत. मात्र जर सूर्य एका राशीत अमावास्येलाच येऊन पोचला असेल तर चंद्र त्यानंतर बारा राशीत फिरून आला तरी सूर्य अजून त्याच राशीत असतो. यानंतर येणारा महिना अधिक ठरवतात.
"सूर्यचंद्रांच्या राशींमधून होणा-या भ्रमणावर आधारलेली एक सुंदर व परिपूर्ण अशी कालगणनेची पद्धत आपल्या पूर्वजांनी विकसित केली. आणि तिच्या आधाराने इतर ग्रहांच्या भ्रमणाचा अभ्यास करण्याची सोय करून घेतली हा या शास्त्राचा मुख्य उद्देश होता." असे मी थोडक्यात सांगितले.

. . . . . . . . . .. . . (क्रमशः)

Monday, October 20, 2008

आजीचे घड्याळ - भाग ७ ग्रहदशा


बराच वेळ आमचे बोलणे ऐकत असलेले अमोलचे बाबा म्हणाले,"तुमच्या कुंडलीत भरपूर चांगले उच्चीचे ग्रह असणार, त्यामुळे तुमचं सगळं आयुष्य सुतासारखं सरळ गेलं, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत गेल्या, पाहिजे ते आपसूक मिळत गेलं, कुठल्या ग्रहांच्या कोपाचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव अजून आलाच नसेल, म्हणून तुम्ही असे बोलताहात. अहो ज्याचं जळतं ना, त्यालाच ते कळतं."
"एकदा साडेसातीचा चांगला फटका बसला म्हणजे घाबरून त्यांची कशी भंबेरी उडते बघा!" झणझणीत फोडणी पडली.
मी म्हंटले,"मी फार सुखात आहे अशी तुमची कल्पना झाली असणे शक्य आहे, कारण मी आपली रडगाणी सहसा कोणापुढे गात नाही. पण 'सुख थोडे दुःख भारी दुनिया ही भलीबुरी।' या सत्य़ाचा कटु अनुभव मला आल्याशिवाय राहील कां? निराशा, अपमान, फसवणूक, द्वेष, मत्सर, निंदा, कागाळ्या, विरोध या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर त्रास इतरांसारखा माझ्या वाटणीला देखील येणारच. त्यांचं प्रमाण कदाचित कमीअधिक असेलही. कुठलंही चांगलं काम हांतात घेतल्यावर मलासुद्धा त्यात अनंत अडचणी
येतात. संकटांच्या परंपरांना तर एकामागोमाग एक यायची जणु संवयच असते. 'याला जीवन ऐसे नांव' आहे. पण या सगळ्या कटकटी आपल्या जगातल्या परिस्थितीमधून, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या वागण्यातून निर्माण होतात, अधिकांश वेळा त्यात कुठे ना कुठे आपली चूक असते. त्यावर सगळ्या बाजूंनी नीट विचार केला, प्रामाणिकपणे विश्लेषण करून मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावर उपाय सापडतो. आपली चूक सुधारता येते, निदान तिची पुनरावृत्ती टाळता येते. जी गोष्ट अपेक्षेनुसार घडणे शक्यच नसेल तिचा नाद वेळीच सोडून देता येतो. आपल्या समस्यांचे ओझे आकाशांतल्या ग्रहांच्या खांद्यावर टाकण्याचा सोपा मार्ग माझ्याकडे नसल्यामुळे कदाचित मी असे प्रयत्न जास्त वेळा केले असतील. त्यामुळे माझा पुढला मार्ग थोडा सुकर झाला किंवा कांही संभाव्य संकटांची चाहूल मला आधी लागून ती टाळता आली असण्याची किंवा त्यापासून होणा-या त्रासाची तीव्रता कमी करता आल्याची शक्यता आहे. त्यामळे माझ्या आयुष्यातले कांही गुंते सुटून ते तुम्हाला वाटते तसे थोडे सरळ झालेही असेल. "जे मिळालं ते मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलं आणि जे गमावलं ते मात्र दुर्दैवामुळे." असा अहंकार मी बाळगत नाही आणि "मला जे कांही मिळालं ते सगळं केवळ कुणा ना कुणाच्या कृपेमुळे" असा खोटा विनयसुद्धा दाखवत नाही. कारण जे कांही थोडे फार प्रयत्न मी केले असतील त्याचं श्रेय त्यांनासुद्धा कुठेतरी मिळायला पाहिजेच ना! "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असे म्हणत स्वस्थ बसलो असतो तर तेवढेसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. पण या सगळ्यांचा आकाशातल्या ग्रहांबरोबर कांही संबंध आहे असे मला तरी कुठे दिसलेले नाही."
"म्हणजे आपला व त्यांचा कांही एक संबंध नाही असं तुम्हाला वाटतं का ?" एक वेगळी तात्विक चर्चा सुरू झाली.
मी म्हंटले,"संबंध कसा नसेल? सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, त्यावर वनस्पती वाढतात आणि त्यातून अन्न मिळतं, तो समुद्रातलं पाणी उचलून ढगांमार्फत ते आपल्यापर्यंत पोचवतो. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. माणसाच्या जीवनाचा कोणताही पैलू पाहिला तर त्यावर सूर्यनारायणाचा ठसा कुठे ना कुठे दिसतो. चंद्राकडे नुसतं पाहून मन उल्हसित होतं, रात्रीच्या अंधारात तो थोडा उजेड देतो, समुद्रात लाटा निर्माण करतो अशा कितीतरी चांगल्या गोष्टी सांगता येतील. गुरु, शुक्र वगैरे ग्रहसुद्धा पहातांना मनाला आनंद वाटतो, रात्रीच्या काळोखात ते दिशा आणि वेळ या दोन बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण तर या ग्रहांना कांहीही देऊ शकत नाही. अशी निरपेक्ष मदत करणारे आपले हे मित्र आपल्याला विनाकारण पीडा देतील असे मला वाटत नाही. ज्यांच्यापासून आपल्याला धोका असतो त्याच गोष्टींची भीती वाटते. कुठलाही ग्रह आपल्याला त्रास देईल हे मला पटतच नाही. राग, द्वेष, सूडबुद्धी असल्या नकारात्मक क्षुद्र मानवी भावना मी त्या विशालकाय गोलकांना चिकटवू शकत नाही. त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे मला कांही कारण दिसत नाही."
"म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं हे एवढं मोठं ज्योतिषशास्त्र सगळं खोटं आहे कां?" त्यांनी विचारले.
"या लोकांना कुठे आपल्या पूर्वजांचा अभिमान आहे?" सौ.नी आपले नेहमीचे ठेवणीतले शस्त्र पाजळले.
मी म्हंटले, "आधी मी यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. मला माझ्या पूर्वजांबद्दल मनापासून असीम आदरभाव व डोळस अभिमान वाटतो. पण यासंबंधी एक गोष्ट आठवते.
एकदा एक मित्र दुस-या मित्राला म्हणाला,"माझे आजोबा अत्यंत प्रसिद्ध प्रकांड पंडित होते. त्यांना जगातल्या सगळ्या विषयांचं प्रचंड ज्ञान होतं."
तो मित्र म्हणाला,"पण तुला तर कशातलं कांहीच माहीत नाही. हे असं कसं झालं?"
"काय करणार? माझ्या बाबांनी मला कांहीच शिकवलं नाही."
"म्हणजे तुझी त्यात कांहीच चूक नाही?"
"कांहीच नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलंच नाही तर मला ते कसं येणार?"
"याचा अर्थ तुझे वडील मूर्ख होते."
"तोंड सांभाळून बोल. तू माझ्या वडिलांबद्दल बोलतो आहेस."
"मग त्यांनी तुला कांहीच कां शिकवलं नाही?"
"कदाचित त्यांच्या वडिलांनी त्यांना कांही शिकवलं नसेल."
"याचा अर्थ तुझे आजोबा महामूर्ख होते. स्वतः पंडित असून आपल्या मुलाला कसलेही ज्ञान दिले नाही! असले कसले ते पंडित?"
"मग कदाचित ते मोठे पंडित नसतील."
"तसंही नाही. खरोखरच ते मोठे गाढ विद्वान असतील. पण जाणकार लोकांनी ते सांगावं यात खरी मजा आहे. आज तू हे सांगणं मला शहाणपणाचं वाटत नाही."
आपल्या देशात असंच घडत आहे. आपण आपल्या प्राचीन पूर्वजांच्या महानपणाचे ढोल जितक्या जोरात बडवू, आपल्याच मधल्या पिढींतल्या पूर्वजांच्या नाकर्तेपणाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी त्यातून निघेल. तेंव्हा नुसताच महान पूर्वजांचा पोकळ जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी केलेलं कार्य स्वतः समजून घेतल्यानंतर त्या माणसानं त्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. मला ते जितकं समजलं आहे, त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो."
"आतां तुमचा प्रश्न, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत असे म्हणायचे का? कुठलीही गोष्ट व्यवस्थितपणे समजून न घेता मी त्यावर माझे मत देत नाही. त्या लोकांनी खरोखर नेमकं काय सांगितलं, ते कुठल्या संदर्भात, कोणत्या हेतूने आणि कशाच्या आधारावर सांगितलं असेल हे मला स्वतःला समजल्याशिवाय मी त्यावर बोलणे योग्य नाही. मला ते कधी समजेल असे वाटत नाही. कारण आपण कांही आपल्या पूर्वजांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही की त्यांच्या हस्ताक्षरातले लिखाण वाचू शकत नाही.
आजकालच्या लोकांपैकीच एकानं "त्यांनी असं म्हंटलं होतं." असं सांगितलं आणि "त्यांनी तसं म्हंटलं होतं" असं दुस-यानं सांगितलं तर ती त्यांची मते झाली. त्यातलं आपल्या बुद्धीला काय पटतं तेच पहावं लागेल आणि कांहीही सांगितलं तरी तो त्या लोकांच्या म्हणण्यावर अभिप्राय होईल. शिवाय फक्त 'खरं' किंवा 'खोटं' एवढाच निकष धरला तर जगातील सर्व साहित्यिकांना 'खोटारडे' म्हणता येईल कारण त्यांनी लिहिलेल्या एकूण एक कादंब-या व नाटके यातले प्रसंग, संवाद वगैरे गोष्टी काल्पनिकच असतात. पण आपण त्यांच्या कल्पनाविलासाचं कौतुक करतो. त्यांना ज्ञानपीठ किंवा नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा आदर करतो. त्यांचे लेखन अक्षरशः खरे की खोटे यावर वाद घालत नाही. तेंव्हा हा पूर्वजांच्या नांवाने भावनांना स्पर्श करण्याचा खेळ आपण करू नये यातच शहाणपण आहे."
"पण त्यांनी एवढं मोठं शास्त्र निर्माण करून ठेवलं आहे हे तर तुम्हाला मान्य आहे."
"हो. ते आपल्यासमोर आलेले आहे. मला त्या लोकांच्या या महत्कार्याचं खरोखर नवल वाटतं आणि अभिमानसुद्धा वाटतो."
"मग त्यांनी हे एवढं मोठं काम कशासाठी केलं असेल?"
"हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी वर्षानुवर्षं विचार केला आहे. त्या विचारमंथनातून मला जेवढं उमगलं ते सांगतो."
. . . . . . . . . . . (क्रमशः)

Sunday, October 19, 2008

आजीचे घड्याळ - भाग ६ रात्रीची पाठशाळा


मला अशा हल्ल्याची अपेक्षा होतीच. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिले,"मला क्षमा करा. पहिली गोष्ट, मी कांही कोणी शोध लावणारा शास्त्रज्ञ नाही. विज्ञानाचा साधा विद्यार्थी आहे. दुसरी म्हणजे मघाशी तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं तसं आपल्या महान पूर्वजांनी निर्माण केलेल्या खगोलशास्त्रातलं गमभन मी अमोलला सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगतो आहे. त्यात कांहीच नवीन नाही. आपली सूर्यमालिका आणि त्यातल्या ग्रहांच्या कक्षा वगैरे गोष्टी या मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात असतात. मी सुद्धा त्याच्या वयाचा असतांनाच त्या शिकलो आहे. शाळेत शिकत असतांना कदाचित तुमच्या कानांवर पण पडल्या असतील।"
बाई मनातून किंचित वरमल्या होत्या, पण फणका-याने म्हणाल्या," छे! छे! हे असले तारे बीरे शिकायला मी कांही नाईटस्कूलला नव्हते गेले!"
"हे मात्र तुम्ही बरोबर सांगितलं हं! मी या गोष्टी खरं तर रात्रीच्या शाळेतच व्यवस्थितपणे शिकलो. आमची ही शाळा एखाद्या कोंदट खोलीत न भरता विशाल आकाशाच्या छपराखाली भरत असे. अत्रि, कपिल वगैरे सात महर्षी तिथे आचार्यपदावर आहेत. देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्यदेखील रोज थोडा तरी वेळ एक फेरी मारून जातात."
माझे हे अलंकारिक बोलणे बाईंच्या डोक्यावरून जात होते. ते समजण्याएवढी प्रगल्भता त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी आश्चर्याने विचारलं,"खरंच! अशी शाळा कुठे होती?"
"अहो, मानवजात निर्माण होण्यापूर्वीपासून ती शाळा चालू आहे आणि अजूनसुद्धा ती रोज रात्री भरते. तिच्या शाखा जगभर सगळीकडे पसरल्या आहेत." मी त्यांना अधिकच बुचकळ्यात पाडले.
पण अधिक ताणून न धरता सांगायला सुरुवात केली,"अहो, आकाशातले ग्रह आणि तारे पहात पहातच मला खूप शिकायला मिळालं. आधी एक मजेदार गोष्ट सांगतो."
"सांगा काका." असे म्हणत अमोल सरसावून बसला.
मी सुरुवात केली,"माझ्या लहानपणी आम्ही सगळे एकत्र कुटुंबात रहात होतो. आमचा मोठा वाडा होता, त्याच्या माळवदावर सिमेंटची गच्ची केलेली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोज रात्री गच्चीवर पथा-या पसरून मोकळ्या हवेत झोपत असू. बहुतेक वर्षी घरोघरच्या माहेरवाशिणी आपल्या मुलांना घेऊन सुटीत आलेल्या असत. त्यामुळे खूप मुले जमत असू. रात्री अंथरुणावर बसून नाहीतर पडल्यापडल्या गाण्याच्या भेंड्या, नकला, कोडी, जोक्स, इकडल्या तिकडल्या भागाची माहिती, मजेदार अनुभव वगैरे सांगणं, चिडवाचिडवी वगैरे होई. त्यातून मनोरंजन आणि माहिती या दोन्हींचा लाभ देणारी ही 'मस्तीकी पाठशाला' छान चालत असे. एकदा अशी हाहाहीही करता करता त्यात किती वेळ गेला ते कुणाला कळलंच नाही.
माझ्या वडिलांनी सांगितलं,"मुलांनो झोपा आता. रात्रीचे बारा वाजले आहेत."
एक मुलगा कांही तरी निमित्य काढून खाली जाऊन घड्याळ पाहून आला. खरंच रात्रीचे बारा वाजलेले होते. त्याने दुस-या मुलाच्या कानात सांगितलं, त्यानं तिस-याच्या, अशी खुसपुस सुरू झाली. अखेर एका मुलानं धीर करून विचारलं, "इथं कुणाच्या मनगटावर घड्याळ नाही, उशाशी गजराचं घड्याळ नाही, भिंतीवरच्या घड्याळाचा तर प्रश्नच येत नाही. मग रात्रीचे बारा वाजले ते तुम्हाला कसं कळलं
माझ्या वडिलांनी विचारलं, "तुम्हाला ती 'आजीचे घड्याळ' कविता माहीत आहे?"
"मला येते, मला येते." असे करीत सगळ्या मुलांनी कोरसमध्ये गायला सुरुवात केली,
"आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक
देई ठेवुन ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक ।। .......

"कविता संपल्यावर माझे वडील म्हणाले, "तुमची आजी आपलं घड्याळ मला देऊन गेली आहे."
ते ऐकल्यावर सगळी मुलं खडबडून उठली आणि "कुठं आहे? आम्हाला दाखवा ना!" असे म्हणत मागे लागली.
थोडा भाव खाऊन झाल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली," ते आपल्या डोक्यावर अनुराधा नक्षत्र दिसतं आहे ना, ते सूर्यास्ताच्या वेळी उगवलं, आता मध्यानरात्रीला डोक्यावर आलं आणि पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी अस्ताला जाईल. त्याच्यावरून मला वेळ कळली."
"म्हणजे या चांदण्या रात्रभर एका जागी नसतात कां?" कुणीतरी विचारले.
"अरे हा हाताचा पंजा आपण झोपायला आलो तेंव्हा खाली दिसत होता. आता बघ किती वर आला आहे." हस्त नक्षत्राकडे बोट दाखवीत दुस-याने उत्तर दिले.
"ही अनुराधा अशी रोज रात्री बारा वाजता आभाळाच्या डोक्यावर चढून बसते कां?" आणखी कोणी आपले डोके लढवीत विचारले.
माझ्या वडिलांनी सांगितले,"नाही. तिला घाई असते म्हणून ती रोज चार चार मिनिटे लवकर येते. एक दोन दिवसातला हा फरक आपल्याला जाणवणार नाही, पण ती आठवड्यानंतर पाहिलंस तर ती अर्धा तास आधी माथ्यावर आलेली दिसेल, महिन्याभराने दोन तास आधी आणि तीन महिन्यांनी ती उगवतांनाच आकाशाच्या माथ्यावर चमकू लागेल. बाकीचे सारे तारेसुद्धा असेच करतील."
" म्हणजे हे तारे पण घड्याळ पाहून आकाशात चालतात की काय?" कोणी शंका काढली.
"अरे आपली घड्याळं कधी पुढे जातील, कधी मागे पडतील, किल्ली संपल्यावर ती बंदसुद्धा पडतील, पण हे एकूण एक सगळे तारे युगानुयुगे अगदी वक्तशीरपणे आपल्या ठरलेल्या वेळा पाळतात आणि एकाच संथ गतीने चालत आले आहेत. त्यात कधी कुणी खाडा केला नाही, दांडी मारली नाही, आळस केला नाही की आगाऊपणा करून पुढे जायचा प्रयत्न केला नाही."
"त्यात हे जे मंगळ, गुरु वगैरे ग्रह आहेत तेसुद्धा असेच वेळापत्रक पाळतात का?"
"ते सुद्धा रोज आपल्या आजूबाजूच्या तारकांबरोबर चार मिनिटे आधी आकाशात येतात, पण त्यांची गति किंचित धीमी असते. त्यामुळे ते अगदी हळूहळू मागे पडत जातात. त्यामळेच ते एका राशीतून पुढच्या राशीत जात असतात. पण चंद्र मात्र जरा वेगाने चालतो. तो पठ्ठा रोज नक्षत्र बदलतो. आता खूप रात्र झाली आहे. सगळेजण झोपा." असे सांगून त्यांनी चर्चेचा समारोप केला.

दुसरे दिवशी पंचांगात चंद्राचे नक्षत्र कसे पहायचे इतर ग्रहांची स्थाने कशी पहायची वगैरे गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकून घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळी आकाशातल्या तारकांचे निरीक्षण करायचा नादच मला लागला. जसजशी त्यांची अधिकाधिक ओळख होत गेलीतसतशी मनातली भीती पार निघून गेली. त्यामुळे पुढे आयुष्यभरात मला कधीही कोठल्या ग्रहाची भीती वाटली नाही।"

. . . . . . . . .(क्रमशः)


Saturday, October 18, 2008

आजीचे घड्याळ - भाग ५ ग्रहांचे भ्रमण


"माणसाच्या जन्माच्या वेळी आकाशातले ग्रह ज्या राशीत दिसत असतील त्यावरून त्याची रास ठरवतात." असे मी सांगितल्यावर अमोलने उत्सुकतेने विचारले, "ती कशी?"
मी सांगायला सुरुवात केली,"त्याचे वेगवेगळे प्रकार माझ्या पहाण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वात अधिक प्रचलित असा पहिला प्रकार आहे तो म्हणजे जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असेल तीच त्या माणसाची रास. प्रत्येक पंचांगात तारखेसमोरच ती दिलेली असते. ज्या काळात छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांग, कॅलेंडर वगैरे नसायची, तेंव्हा त्या रात्री चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे हे पाहून त्या बाळाची रास ठरवता येत असे. भारताच्या कांही भागात सौर कालगणनेवर आधारलेले पंचांग उपयोगात आणले जाते. १४-१५ एप्रिलच्या सुमारास जेंव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो त्या दिवशी त्या लोकांचे नवे वर्ष सुरू होते. त्यानंतर जसा सूर्याचा पुढच्या राशीत प्रवेश होईल तसा महिना बदलत जातो. त्यांच्या प्रथेप्रमाणे जन्माच्या वेळेस सूर्य ज्या राशीत असेल ती जन्मरास मानली जाते. आंतरराष्ट्रीय किंवा पाश्चिमात्य पद्धतीतसुद्धा सौर कॅलेंडरमधील तारखेनुसार रास ठरते, पण त्यांच्या तारखा आपल्या पंचांगातील
तारखांबरोबर जुळत नाहीत. उदाहरणार्थ आपली मकर संक्रांत १४-१५ जानेवारीला येते. त्या दिवसापासून महिनाभर सूर्य मकर राशीत राहतो, पण कॅप्रिकॉर्न ही सनसाईन २३ डिसेंबर ते २० जानेवारीपर्यंत असते. हा फरक कशामुळे येतो कोणास ठाऊक! सर्व इंग्रजी मासिकात या पद्धतीप्रमाणे रास ठरवून भविष्य वर्तविले जाते. याशिवाय कांही विद्वान लग्नरास महत्वाची मानतात. म्हणजे मुलाचा जन्म झाला त्या वेळी पू्र्व क्षितिजावर ज्या राशीचा उदय होत असेल, ती त्या मुलाची रास मानली जाते."
"यातली कुठली पद्धत खरी धरायची?" अमोलने विचारले
"राशीचा उपयोग लोक कशासाठी करतात? त्यानुसार सांगण्यात येणारी भाकिते, मुहूर्त पाहणे वगैरे गोष्टींसाठी ना? हा तर्काच्या पलीकडला श्रद्धेचा, विश्वासाचा प्रश्न आहे. तो माझा प्रांत नाही. वाटल्यास मी माझे मत नंतर सांगेन, पण आता आपण ग्रहांच्या अवकाशामधील भ्रमणाबद्दल बोलत आहोत. माझ्या दृष्टीने हा मनोवेधक असा विषय आहे. तेंव्हा त्या संदर्भात आपण राशीचक्राबद्दल बोलू." खगोलविज्ञान आणि ज्योतिष यांत फरक करायचा प्रयत्न करीत मी म्हंटले.
"एका राशीत दोन तीन ग्रहांची युती झाली असं आपण नेहमी ऐकतो. ती कशामुळे होते?"अमोलने शंका काढली.
मी म्हंटले,"खरंच हा चांगला प्रश्न आहे. आपल्या सूर्यमालिकेतल्या नऊ ग्रहांची नांवं तुला माहीत असतीलच."
"हो. बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लूटो." अमोलने धडाधडा म्हणून दाखवली .
"सर्वात दूर असलेल्या प्लूटोचं नांव त्यामधून काढून टाकावं असा ठराव शास्त्रज्ञांच्या एका मेळाव्यात केला आहे. युरेनस आणि नेपच्यून देखील अतिशय मंद गतीने चालतात आणि आपली सूर्यप्रदक्षिणा अनुक्रमे तब्बल ८४ आणि १६५ वर्षात पुरी करतात. ते साध्या डोळ्याने दिसत नाहीत आणि दिसले तरी एकेका राशीमधून सरपटत जायला त्यांना सात व चौदा वर्षे लागतील. तेंव्हा आपण इतर ग्रहांबद्दल बोलू." "सांगा."
"हे सर्व ग्रह सूर्यापासून निरनिराळ्या अंतरावर आहेत. त्यामुळे हे सगळे ग्रह हातात हात घालून फेर धरून सूर्याभोवती रिंगण घालत नाहीत. ते वेगवेगळ्या कक्षांमधून वेगवेगळ्या गतीने फिरतात. जितके अंतर जास्त असेल तितकी त्या ग्रहाच्या भ्रमणाची कक्षा मोठी असणार आणि त्यामुळे एक फेरी मारायला त्याला जास्त वेळ लागणार. तसेच तो पृथ्वीपासून जितका दूर असेल तितका तो हळू चालतो आहे असे आपल्याला वाटणार. एका रस्त्यावरून पायी चालणारे वाटसरू, सायकलस्वार, मोटारी, स्कूटर्स वगैरे जात असतील तर साहजीकपणेच त्यातले वेगवान प्रवासी सावकाशपणे जाणा-यांच्या मागून येऊन पुढे जाणार. आकाशातील ग्रहांचा जो प्रवास आपण पाहतो त्यात हेच घडतांना दिसते. पण त्यात एक फरक आहे. पृथ्वी स्वतःभोवती चोवीस तासात फिरत असल्यामुळे संपूर्ण राशीचक्र एका दिवसात आपल्याभोवती फिरतांना दिसते, पण ग्रहांना आपल्या प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी कित्येक महिने किंवा वर्षे लागतात. दुसरी गंमत अशी आहे की त्यांचा हा प्रवास बरोबर उलट दिशेने चालतो. राशींची रांग मेष, वृषभ, मिथुन अशी लावली तर पहिली मेष रास इंजिनाच्या जागी असेल आणि बुध, शुक्र वगैरे ग्रह मेषमधून वृषभ राशीत, तिथून मिथुन राशीत असे गार्डाच्या डब्याकडे जातांना दिसतील. प्लॅटफॉर्मवर उभे राहून पाहणा-या माणसाला जसे ट्रेनमधले सगळे लोक पुढे जातांना दिसतात तसेच आपल्याला सगळे ग्रह रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे वाटचाल करतांना दिसतात, पण आतला टीसी इंजिनाकडून गार्डाच्या डब्याच्या दिशेला गेला तर तो बसलेल्या प्रवाशांच्या तुलनेत विरुद्ध दिशेला जात असतो. तसेच राशींच्या संदर्भात ग्रहांचे भ्रमण उलट्या दिशेने होते.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह सर्वात जवळचा. तो आपली एक परिक्रमा फक्त सत्तावीस दिवसात पूर्ण करतो. सत्तावीस दिवसात तो सर्व बाराच्या बारा राशींमधून फिरून येतो. अर्थातच तो ज्या राशीतून फिरत असेल त्यांमधून आधीच जात असलेले इतर ग्रह आपल्याला आभाळात त्याच्या जवळपास दिसणार. एका राशीच्या म्हणजे तीस अंशाच्या कोनात दोन किंवा अधिक ग्रह आले तर त्याला युती म्हणतात. या प्रकारे दर महिन्याला चंद्राची प्रत्येक ग्रहाबरोबर युती होते. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आपली परिक्रमा फक्त तीन महिन्यात संपवतो. आपल्या एका वर्षातून तो चार वेळा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. त्यामुळे तो नेहमीच सूर्याच्या अंवती भोवती दिसतो. खरं तर तो इतका त्याच्याजवळ असतो की आपल्याला सहसा दिसतच नाही. वर्षातील अनेक महिने त्याची सूर्याबरोबर युती चालू असते. शुक्र हा ग्रह सूर्यापासून थोडा दूर आहे, पण पृथ्वीच्या मानाने त्याच्या जवळ असल्यामुळे तो सुद्धा नेहमी सूर्य ज्या राशीत असेल तिच्या एक दोन घरे मागे पुढे दिसतो. हा सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह सूर्याच्या पुढे असला तर फक्त सूर्योदयापूर्वी कांही काळ आणि मागे असला तर सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात दिसतो. तो माथ्यावर आलेला कधीच पहायला मिळत नाही. सूर्याबरोबर त्याची अनेक वेळा युती होते. अर्थातच आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. फक्त कुंडलीत पाहू शकतो.
आपली पृथ्वी सूर्याभोवती वर्षात एकदा प्रदक्षिणा घालते. किंबहुना ती घालायला पृथ्वीला जितका वेळ लागतो त्यालाच एक वर्ष असे म्हणतात. सूर्याचा उजेड अत्यंत प्रखर असल्यामुळे आपल्याला तो प्रत्यक्ष कोठल्या राशीमधील ता-यांच्या सोबतीने कधीच दिसत नाही. त्याचा उदय होण्यापूर्वी आणि अस्त झाल्यानंतर ज्या राशी आकाशात क्षितिजांवर दिसतात त्यांवरूनच सूर्य कोणत्या राशीत आहे हे ठरवावे लागते. मंगळ, गुरू व शनी यांना परिभ्रमणासाठी अनुक्रमे सुमारे दोन, बारा व तीस वर्षे लागतात. त्या काळात इतर ग्रह त्यांच्या मागून येऊन पुढे जात असतात. त्यांच्याबरोबर या ग्रहांच्या युत्या होतात. गुरू आणि शनी मात्र एकदा एका राशीत आले की वर्ष दोन वर्षे बरोबर राहतात आणि एकदा दूर गेले की वीस वर्षे भेटत नाहीत
"खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे." अमोल उद्गारला
"यात एक गोष्ट नीट समजून घेणं फार महत्वाचं आहे." मी सांगितले. "आपल्याला जरी आभाळात दोन, तीन, चार ग्रह जवळ जवळ दिसले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांपासून नेहमीसारखेच दूर असतात. चंद्र, शुक्र व शनी यांची सिंह राशीत युती झाली तर आकाशात हे सगळे आपल्याला एकमेकांच्या जवळ दिसतील, पण चंद्र आपल्यापासून जितका दूर आहे त्याच्या दोनशेपटीने शुक्र दूर असतो आणि सात हजार पटीने शनी. सिंह राशीतील तारे तर अब्जावधी पटीने आपल्यापासून दूर असतात. आपली पृथ्वीजवळची जागा सोडून शनी किंवा गुरूला भेटायला चंद्र त्यांच्याकडे जात नाही. तीन चार मुलं एका जागी गोळा होऊन गप्पा मारतात, खातात, पितात, खेळतात, कधी भांडतात तसे हे ग्रह कधीसुद्धा एकमेकाजवळ जात नाहीत. कुंडलीमध्ये राशीला घर म्हणायची पद्धत असली आणि एका राशीत असलेल्या ग्रहांची नांवे चिकटून लिहीत असले तरी आकाशात तसली समाईक जागा नसते आणि प्रत्यक्षात ग्रह तिथे जात नाहीत. ते
आपापल्या कक्षांमधून मार्गक्रमण करीत असतात."
आतापर्यंत माझे सांगणे ऐकतांना अस्वस्थ होत असलेल्या अमोलच्या आई थरथर कांपत म्हणाल्या,"अहो शास्त्रज्ञ, तुमचे ते शोधबीद तुमच्यापाशीच ठेवा. आमच्या मुलाच्या मनात असलं भलतं सलतं कांही भरवू नका हं! सांगून ठेवते. उगाच कुठल्या ग्रहाचा कोप झाला तर?" .
. . . . . .. . . (क्रमशः)

Friday, October 17, 2008

आजीचे घड्याळ - भाग ४ राशीचक्र


त्या पतिपत्नींच्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांचे कोरडे ठणठणीत घडे जन्मभरासाठी पालथे घालून ठेवलेले होते. ते कांही दहा मिनिटांच्या चर्चेने सरळ होणार नव्हते. तेंव्हा त्यावर आणखी पाणी ओतण्यात कांही अर्थ नव्हता. मग मी ही नसती उठाठेव कशाला करायची? पण छोट्या अमोलच्या डोळ्यात मला जिज्ञासेची चमक दिसत होती. हा एक आशेचा किरण होता। त्याच्याकडे पहात मी म्हंटले, "ते राहूकेतू कोणाच्या राशीला कां, कसे आणि कधी लागतील ते समजण्यासाठी आधी रास म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं ना!"
अमोल म्हणाला, "खरंच काका, कुणाची रास सिंह आहे कां मकर आहे हे कोण ठरवतं ?"
"अरे, तुला एवढंसुद्धा माहीत नाही कां? कुंडली मांडणारे ज्योतिषीच ते सगळं ठरवतात" आईने पोराला अज्ञानाचा घोट पाजला.
"तुमचे ज्योतिषी त्यांच्या मनाला येईल तशी वाटेल ती रास सांगतात कां? ते मुलाच्या जन्माची तारीख वेळ वगैरे कांही विचारत नाहीत?" मी खंवचटपणाने विचारलं.
"फक्त तेवढी थोडीशी माहिती त्यांना लागते, पण मग रासबीस तेच ठरवतात."
"म्हणजे तुमच्याच हातातले घड्याळ पाहून तुम्हाला त्यातली वेळ सांगण्याचा प्रकार झाला हा! खरं तर मुलाचा जन्म ज्या क्षणी होतो तो क्षण त्याची रास ठरवतो. म्हणजे त्या क्षणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते त्यावरून ती ठरते. ज्योतिषाने ठरवण्यासारखं त्याच्या हातात कांही नसतं."
"पण रास म्हणजे काय? ती आपल्या आप कशी ठरते?" अमोलने मुळात हात घातला.
मी म्हंटले, "रास हा आकाशाचा एक भाग असतो असं मघाशी मी सांगितलं . आपल्या पृथ्वीच्या नकाशात अक्षांश रेखांश दाखवलेले असतात. प्रत्यक्षात जमीनीवर किंवा समुद्रावर अशा रेघा मारलेल्या नसतात, पण नकाशात त्यांच्या आधाराने कोणतीही नेमकी जागा शोधायला त्यांचा चांगला उपयोग होतो. तू पाहिले असतील ना ?"
"हो. अक्षांशाच्या आडव्या सरळ रेखा असतात आणि रेखांशाच्या उभ्या वक्र रेषा असतात." अमोल म्हणाला. छोकरा हुषार होता.
"आकाशातील जागा ठरवण्यासाठीसुद्धा त्याचे असेच काल्पनिक भाग पाडले आहेत. बारकाईने अभ्यास करणारे लोक त्याचे अंश, कला, विकलापर्यंत सूक्ष्म निरीक्षण करून किचकट गणिते मांडतात। पण सर्वसाधारण माणसांसाठी आकाशाची विभागणी फक्त बारा राशीमध्ये केली आहे. त्यातील प्रत्येक रास तीस अंशाएवढी असते. राशींच्या सीमा रेखांशासारख्या वक्र असतात. त्यातलासुद्धा उत्तर आणि दक्षिणेकडला बराचसा भाग सोडून देऊन फक्त मधला कांही भाग महत्वाचा आहे."
"पण सगळं आभाळ एकसारखं दिसतं. ते भाग ओळखायचे कसे?" अमोलने रास्त प्रश्न विचारला.
मी म्हंटले,"तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. तेजस्वी सूर्यापुढे आपल्याला दिवसा कोणतेही तारे दिसत नाहीत. त्यामुळे सर्व आकाश एकसारखं दिसतं, पण रात्री मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चांदण्या दिसतात. या ता-यांच्या समूहातूनच वेगवेगळ्या आकारांचा भास होतो. प्रत्येक राशीचे नांव त्या भागात दिसणा-या तारकापुंजाच्या अशा आकारावरून दिले गेले आहे. हे सारे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर कधी तसूभरसुद्धा बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या पुंजांचे आकार अगदी जसेच्या तसे दिसतात. मीन रास पू्र्वेच्या क्षितिजावर असो किंवा पश्चिमेच्या किंवा माथ्यावर असो ती तशीच दिसणार. त्यामुळे थोडी संवय झाली की रात्रीच्या वेळी मात्र राशी ओळखायला येतात."
"पण त्या अशा फिरत कां असतात?"
"खरं म्हंटलं तर त्या राशींमध्ये दिसणारे सर्व तारे आपापल्या जागेवर स्थिर आहेत, आपल्या सूर्यासारखे. दिवसासुद्धा ते आपापल्या जागेवर असतात, पण सूर्याच्या प्रकाशाने आपल्या वातावरणात इतका उजेड असतो की ता-यांचा मंद प्रकाश आपल्या डोळ्यांना जाणवत नाही. आपली पृथ्वीच स्वतःभोवती दिवसातून एक गिरकी घेते. आपल्या आजूबाजूची जमीन, घरे, डोंगर वगैरे सारे कांही तितक्याच वेगाने फिरत असल्यामुळे आपल्याला ते स्थिर वाटतात आणि आकाशातले सूर्य, चंद्र, ग्रह, तारे पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जात आहेत असे वाटते. त्यात पुन्हा आपल्याला एका वेळेस फक्त जमीनीच्या वरील अर्धेच आकाश दिसू शकते. उरलेला अर्धा भाग जमीनीच्या मागे दडलेला असतो. जसजशी पृथ्वी फिरते तसतसा पूर्वेकडील भाग दिसू लागतो आणि पश्चिमेकडील भाग दिसेनासा होत जातो."
"त्यात राशी कशा प्रकारे दिसतात?"
"प्रत्येक राशीची रुंदी तीस अंश इतकी असते. पृथ्वीला तीस अंश फिरायला दोन तास लागतात. त्यामुळे एका राशीचा उदय सुरू झाल्यानंतर ती पूर्णपणे वर यायला दोन तास लागतात. त्याच काळात पश्चिमेकडील क्षितिजावरील राशीचा अस्त होत असतो. म्हणजे सहा राशींएवढा आकाशाचा भाग कोणत्याही वेळी दिसत असला तरी त्यात मधल्या पांच राशी पूर्णपणे दिसतात आणि पूर्व व पश्चिम क्षितिजांवरील दोन राशी अंशतः दिसतात. आपण जर सूर्यास्तापासून दुसरे दिवशीच्या सूर्योदयापर्यंत रात्रभर सतत आकाश पहात राहिलो तर सूर्याच्या आजूबाजूचा थोडा भाग सोडून इतर सर्व राशी पाहू शकतो."
"या राशींमध्ये ग्रह कसे जातात?"
"राशींचा आकार ज्या ता-यांमुळे ओळखला जातो ते तर पृथ्वीपासून खूप खूप दूर आहेत. आज आपल्याला दिसणारे त्यांचे प्रकाशकिरण कित्येक वर्षांपूर्वी, कदाचित आपण जन्मण्यापूर्वी तिथून निघाले असतील. आभाळामध्ये या सर्व ता-यांची एक पार्श्वभूमी बनली आहे. आपल्या सूर्यमालिकेमधील ग्रह आपल्याला या पार्श्वभूमीवर दिसतात. या खोलीच्या भिंतींवर लावलेली चित्रे, टांगलेले कॅलेंडर, दरवाजे, खिडक्या, हा टेलीव्हिजन, ही शोकेस या सगळ्यांच्या बॅकग्राउंडवर आपण एकमेकांना दिसत आहोत. समज मी आपलं एक बोट असं नाकासमोर धरलं आणि त्याच्याकडे पाहिलं तर मला माझं बोट दिसेल तसेच मागच्या भिंतीवरील कॅलेंडरसुद्धा दिसेल. मी ते थोडंसं फिरवलं तर मला बोटाच्या पलीकडे या खोलीतला टेलीव्हिजन सेट दिसेल. आणखी वळवलं तर बोटापलीकडे खिडकी आणि खिडकीतून दिसणारी समोरची बिल्डिंग दिसेल. माझं बोट माझ्याजवळच असेल पण मला ते केंव्हा कॅलेंडरबरोबर, टीव्हीबरोबर नाहीतर
खिडकीसोबत दिसेल. त्याचप्रमाणे मी या खोलीत मधोमध ठेवलेल्या टीपॉयवरच्या फ्लॉवरपॉटकडे पाहिले तर त्याच्या मागच्या भिंतीवरचे कॅलेंडर, किंवा टीव्ही किंवा खिडकी असे जे असेल ते दिसेल. त्याच्याकडे पहात मी त्याच्याभोवती फिरलो तर मला वेगवेगळ्या कोनातून पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे दिसतील. म्हणजे माझे बोट माझ्याभोवती फिरले काय किंवा मी फ्लॉवरपॉटच्या भोवती फिरलो काय दोन्ही वेळा मला वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर ते दिसतील. ग्रहांकडे पाहतांना अगदी असंच होतं. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतांना बुध आणि शुक्र या सूर्याच्या जवळ असलेल्या ग्रहांना सुद्धा प्रदक्षिणा घालते आणि मंगळ, गुरु आणि शनी हे पृथ्वीच्या पलीकडे असलेले ग्रह सूर्याभोवती फिरतांना पृथ्वीला सुद्धा प्रदक्षिणा घालीत असतात. चंद्र तर खास पृथ्वीभोवती फिरत असतो. यामुळे आपल्याला हे सर्व ग्रह नेहमी कुठल्या ना कुठल्या राशींचा भाग असलेल्या ता-यांच्या सोबतीत दिसतात. ते ज्या तारकासमूहाबरोबर दिसतात त्या राशीत ते आहेत असे आपल्याला वाटते. ते सर्व ग्रह, उपग्रह आणि स्वतः पृथ्वी सतत गतिमान असल्यामुळे ते राशींमधून भ्रमाण करतांना दिसतात. हे करतांना एका राशीमधून निघून दुस-या राशीत प्रवेश करतात, तिच्या एका टोकांपासून दुस-या टोकापर्यंत प्रवास करतांना त्या राशीत त्यांचे वास्तव्य असते, त्यानंतर ते दुस-या राशीतून तिस-या राशीत जातात. हे भ्रमण सतत चाललेले असते. कोणत्याही माणसाच्या जन्माच्या वेळेस ग्रहांच्या जागांची जी परिस्थिती असते त्यावरून त्याची रास ठरवतात.


. . . . .. . . . . . . . . . .. (क्रमशः)

आजीचे घड्याळ - भाग ३ कुंडलीचा अर्थ


मी दिलेल्या या उदाहरणाने त्या सद्गृहस्थांचे समाधान झाले नाही। त्यावर ते म्हणाले, "असली सोपी उदाहरणे राहू देत। तुम्ही या कुंडलीवरून पंचवीस वर्षापूर्वीची जन्मवेळ इतक्या पटकन कशी काढली तेच आम्हाला सांगा।"

मी सांगू लागलो,"ठीक आहे. तेही सांगणे फारसे अवघड नाही. पण त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत। कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत आणि त्या बारा भागांची एक सलग साखळी बनवलेली असते, कारण बाराव्या मीन राशीला लागून पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. हेच भाग एका आयताकृती आकृतीमध्ये विशिष्ट त-हेने बसवतात. त्यातील प्रत्येक जागी कोणती रास आहे ती इथे अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत देतात. त्याच क्रमाने ग्रहांचे या राशीमधून भ्रमण सुरू असते. त्याशिवाय पूर्ण राशीचक्र आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्यांच्याबरोबरच आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील मुंबई, कोलकाता वगैरे गांवे मात्र आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवतो. पण कुंडलीमधल्या राशीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुस-या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही गतिमान असून ती फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते.


आता ही कुंडली पहा। या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो। याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणा-या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडे पहिल्याच घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुस-या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून चार पाच तास अवकाश होता. मात्र प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यानंतर दररोज पन्नास मिनिटे मागे पडत जाऊन आता चंद्र सूर्याच्या पाच सहा तास मागे होता. याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून महिना, तिथी आणि वेळ लगेच समजली."

"पण तुम्हाला वर्ष कसं समजलं?"

"त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह त्या दिवसाच्या मानाने एक घर मागे होता। त्या अर्थी तो १ , १३ आणि २५ वर्षापूर्वी त्या जागी होता. शनी तेंव्हाच्या मानाने १० घरे मागे होता. त्याला तर एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी २५ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर २५ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला?"

"पहा, शास्त्रज्ञ लोकसुद्धा राशी आणि ग्रहांना मानतात!" बाईंनी अजब निष्कर्ष काढला।(क्रमशः)

Thursday, October 16, 2008

आजीचे घड्याळ - भाग २ भूतकालनिवेदन

त्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली। "रात्रीचा पहिला प्रहर आहे। सगळीकडे अंधार पसरला आहे"
" अहो काका, तो बघा बाहेर अजून उजेड दिसतो आहे." अमोल उद्गारला.
"मी या जन्मकुंडलीमध्ये पाहून त्या मुलाच्या जन्मकाळातली स्थिती सांगतो आहे. मध्ये बोलून माझी एकाग्रता भंग करू नकोस. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. अधून मधून विजा चमकून एकादी पावसाची सर येते आहे. ढगांच्या गडगडाटाशिवाय दुसरेही कांही आवाज ऐकू येत आहेत. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना?"

दोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो,"उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था 'तोंड बांधून बुक्याचा मार' अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही."
जसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, ते पांढरे पडत चाललेले दिसत होते. त्यांना पाहून अमोलही कावराबावरा होत होता. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, "हा मुलगा आता पंचविशीला आला असला तरी अजून मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते."
आता त्यांच्या डोळ्याची बुबुळे बाहेर येतील का काय असे मला वाटायला लागले। बाईंनी तोंडाने "राम राम राम राम" असे पुटपुटत दोन्ही हांतांनी कान पकडायला आणि दोन्ही गालांवर हलक्याशा थपडा मारून घ्यायला सुरुवात केली. नवससायास किंवा उपासतापास न करणा-या, सोवळेओवळे न पाळणा-या आणि कसलेही खाणे किंवा पिणे वर्ज्य न मानणा-या माझ्यासारख्या सोम्यागोम्याला दैवी शक्ती प्राप्त होणे तर निव्वळ अशक्य! "कुठल्याशा भूतपिशाच्चाने माझ्यात संचार केला की काय!" अशी शंका त्यांना येऊ लागली असणार. मी पुन्हा डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेऊन जागेवरून उठलो. त्या सद्गृहस्थाच्या खांद्यावर थोपटून त्याला म्हंटले, "रिलॅक्स. माझ्यात कसला संचार वगैरे झालेला नाही. मी फक्त थोडासा अभिनय करीत होतो. "
" पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली?" त्यांनी मला आश्चर्याने विचारले.
" अहो या कुंडलीमधून!"
"म्हणजे तुम्ही विज्ञानवादी लोकसुद्धा कुंडलीत सगळं असतं हे मानताच ना! गुरूमहाराजांनीसुद्धा कुंडली पाहून त्यावेळी असं असं झालं असणार म्हणून बरोबर सांगितलं होतं."
" त्याबरोबर अमक्या स्थानी राहू होता आणि तमक्या ग्रहाची महादशा चालू होती म्हणून तसं घडलं हेसुद्धा त्यांनी सांगितले असणार."
" म्हणजे काय, ते एक शास्त्रच आहे ना? तसं होणारच . "
" अहो, पृथ्वीवर राहणा-या माणसांनी केलेल्या कृत्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण आकाशातल्या ग्रहांना उगाच कशाला दोष द्यायचा?"
" त्यांनी नाही केलं तर मग ते आणखी कशामुळे होणार?"
"जगांत घडणा-या प्रत्येक गोष्टीमागे नुसतं एकच कारण नसतं, तर कारणपरंपरा असते. त्यातली कांही कारणे आपल्याला समजतात, कांही कधीच समजत नाहीत। आपण आपला त्यांचा शोध घेत रहायचं ?"
" ते जाऊ दे। पण तुम्हाला सुद्धा कुंडलीमधले ग्रह पाहूनच ही माहिती मिळाली ना? मग त्यांचा तिच्याशी काय संबंध आहे ते आता तुम्हीच आम्हाला सांगा."
"कांहीसुद्धा संबंध नाही। तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ तेवढी मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं माझ्या सामान्यज्ञानावरून ओघानं आलं. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच!"
"पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली?"
"ते मात्र सरळ सरळ विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुस-या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो."
"तो कसा?" अजून त्यांना माझे सांगणे समजले नव्हते.
मी म्हंटले,"मी दुसरे एक उदाहरण देतो. समजा मी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'चार दिवस सासूचे' ही मालिका पहात पहात जेवण केलं असं सांगितलं तर त्याचाच अर्थ मी पंधरा ऑगस्टला रात्री आठनंतर जेवायला बसलो असा होतो ना? कारण पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो आणि रात्री आठ वाजता ई टीव्हीवर 'चार दिवस सासूचे' ही मालिका सुरू होते. त्याचप्रमाणे कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या राशीमध्ये असायला हवा हे त्यांचा अभ्यास करणा-यांना ठाऊक असते. ते कुठे आहेत हे पाहून त्यांना ती वेळ गणिताने काढता येते."
. . . . . . . . . . . . (क्रमशः)