Friday, September 21, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ४ - सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार

माणसांच्या मनात विचार येतात, त्यांना कल्पना सुचतात, अनुभव आणि ज्ञान यांच्या कसोट्यांवर त्यांची पारख होते, विवेक व संयम यांच्या गाळणीतून गाळून घेतल्यानंतर त्यातले इतरांना सांगण्याजोगे असे विचार व्यक्त केले जातात, त्या कल्पना मांडल्या जातात. मनातले हे व्यवहार आपल्या नकळत चालले असतात. भाषेवर चांगले प्रभुत्व, आपले विचार सुसंगतपणे मांडण्याचे कौशल्य, छाप पाडणारे व्यक्तिमत्व आणि वाक्चातुर्य हे गुण अंगी असले तर मनातल्या कल्पना शब्दातून स्पष्टपणे व्यक्त करण्यासाठी त्या गुणांचा चांगला उपयोग होतो, मनात आलेले नवे विचार, नव्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या जाऊ शकतात. समाजामधील रूढ समजुतींना त्यातून धक्का बसण्याची शक्यता असली तर ते वेगळे विचार व्यक्त करण्याचे धैर्य लागते. लोकमान्य टिळकांसारख्या अलौकिक व्यक्तींमध्ये हे सगळे गुण एकवटले होते, तसेच त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट स्पष्ट होते आणि ते गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची त्यांची तयारी होती, टीका किंवा विरोधाने विचलित न होता आपल्या भूमिकेवर ठामपणे उभे राहण्यासाठी लागणारे मनोधैर्य ही त्यांच्या अंगी होते. यामुळे ते असे नवे विचार समाजापुढे मांडून सामाजिक परिवर्तन घडवून आणू शकले.

कोणत्याही नव्या कल्पनेवर ऐकणा-या लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. पहिली म्हणजे खूप लोकांकडून तिचे उत्साहाने स्वागत होते. त्यांच्यातल्या ज्यांना ती कल्पना पटलेली आणि आवडलेली असते, ते लोक तिचा पुढे पाठपुरावा करतात, तिला वास्तवात आणण्याच्या कामात सहभागी होतात, त्यात जमेल तेवढी आपली भर टाकतात. अशा लोकांचा नव्या कार्यात हातभार लागतो. पण त्यातल्या इतर अनेक जणांना नव्याची नवलाईच तेवढी प्रिय असते. ती संपली किंवा आणखी एकादी वेगळी कल्पना पुढे आली की त्यांचा उत्साह ओसरतो, ते लोक दुस-या नव्या कल्पनेच्या मागे धावतात. अशा लोकांचा पाठिंबा फसवा आणि तात्पुरता असतो. त्यामुळे अवसानघात होतो. त्यांच्यावर विसंबून राहिल्यास ते काम बिघडते किंवा खोळंबून राहते.

काही लोकांना टिंगल, टवाळी, चेष्टा, मस्करी यात खूप गोडी असते. प्रस्थापित गोष्टींच्या तुलनेने नव्या विचारांची टर उडवणे सोपे आणि सुरक्षित असते. असे लोक त्यातील कमकुवत दुवे, त्याबद्दलचे गैरसमज वगैरेंना यथेच्छ झोडून घेतात. त्यात त्यांना गंमत वाटतेच, इतरांनाही ते ऐकतांना मजा वाटते. त्यामुळे कार्यकर्ता नाउमेद झाला तर तो आपले काम सोडून देतो आणि त्याला प्रत्युत्तर देत बसला तर त्यातच त्याचा वेळ आणि श्रम खर्च होतात. त्यामुळेही कार्यातली प्रगती मंद होते.


काही लोकांना विरोध करण्याचीच आवड असते. विशेषतः रूढी प्रिय असणा-या लोकांना कोणताही बदल नको असतो. त्यांना बदलामधील अनिश्चिततेचे भय वाटते. ज्या लोकांचे हितसंबंध आधीच्या व्यवस्थेत गुंतलेले असतात त्यांचे त्यातील बदलामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. असे लोक सरळ सरळ विरोधात उभे राहतात किंवा प्रच्छन्नपणे अडथळे आणतात. ते बलिष्ठ असल्यास नव्या विचारानुसार काम होऊ देत नाहीत किंवा चालू झालेले काम बंद पाडू शकतात. अशा वेळी शक्ती किंवा युक्तीचा वापर करून त्यांच्यावर मात करावी लागते.

अशा प्रकारे बहुतेक सगळ्या नव्या कल्पनांना उत्साह, उपहास, विरोध आणि त्यानंतर स्वीकृती या अवस्थांमधून जावे लागते. त्यात काही दिवस, महिने किंवा कदाचित काही वर्षे जातात. पण ती कल्पना मुळात चांगली आणि उपयुक्त असेल तर ती पहिल्या तीन अवस्थांमध्ये तग धरून राहते आणि अखेर स्वीकारली जाते. त्यानंतर ती खूप फैलावते आणि दीर्घ काळ टिकून राहते. नवी वैद्यकीय उपचारपध्दती, शिक्षणाची नवी पध्दत, विज्ञानातले नवे सिध्दांत किंवा नवे तंत्रज्ञान अशा निरनिराळ्या प्रयोगांमध्ये असेच अनुभव येतात, पंधरा वीस वर्षांपूर्वी संगणकाचे आगमन झाले तेंव्हाचा इतिहास आपण पाहिला आहेच. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातसुध्दा असे अनुभव येतात. एवढेच काय, घरात आणलेल्या एकाद्या नव्या वस्तूचेसुध्दा कोणाकडून उत्साहाने स्वागत होते, तर कोणी त्याला नावे ठेवतात, कोणी त्यातल्या उणीवा शोधतात, तर कोणाला त्यात धोके दिसतात. पण ते उपकरण खरोखर चांगले असले तर अखेर सगळे त्याचा उपयोग करू लागतात आणि तसे नसले तर ते अडगळीच्या खोलीत जाऊन धूळ खात पडते.

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जो उपक्रम लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सुरू केला त्याच्या संदर्भातसुध्दा आपल्याला या चार प्रतिक्रिया दिसतात. त्या वेळी बाळ गंगाधर टिळक अजून 'लोकमान्य' झाले नव्हते. झुंजार वृत्तपत्रकार अशी त्यांची ख्याती झालेली होती आणि पुण्यामधील शिक्षणसंस्था, सभा, संमेलने वगैरेंशी त्यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यांची खास प्रतिमा तयार झाली होती. त्यांचा चाहता वर्ग तयार झाला होता. त्या लोकांनी गणेशोत्सवाचा उत्साहाने पुरस्कार केला. पण अनेकांनी त्याचा उपहास आणि विरोधही केला. कर्मठ धर्मनिष्ठांनी त्याला 'धर्मबुडवा' म्हंटले तर कुचाळकी करणा-यांनी त्याला जातीयतेचा रंग दिला, कोणी त्याला परधर्मीयांचे अनुकरण ठरवले तर कोणी परकीयांचे. मेळ्यामधील कार्यक्रमात कोणाला काही आक्षेपार्ह वाटले तर कोणाला सजावट आणि आणखी कोणाला विसर्जनाची मिरवणूक पसंत पडली नाही. या निंदेमुळे टिळक विचलित झाले नाहीत की त्यांनी निंदकांना अवास्तव महत्व दिले नाही. आपल्या ध्येयाच्या दिशेने ते शांतपणे आणि खंबीरपणे मार्गक्रमण करत राहिले आणि गणेशोत्सवामुळे समाजाला होणारे फायदे दाखवत राहिले. टिळकांच्या आवाजाचा एक नमूना शतकानंतर अलीकडे आपल्याला ऐकायला मिळाला. त्यावरून असे दिसते की गणेशोत्सवात आलेल्या श्रोत्यांना शास्त्रीय संगीत ऐकायची संधी मिळावी अशी योजना टिळकांनी केली तसेच हे दिव्य संगीत त्यांनी गोंधळ गडबड न करता शांतपणे ऐकून घ्यावे अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली.


टिळकांचे सांगणे लोकांनाही पटत गेले आणि अल्पावधीतच गणेशोत्सवाची लोकप्रियता वाढत गेली. टिळकांनी दाखवलेल्या उदाहरणाचे असंख्य लोकांनी अनपकरण केले. वर्षभरानंतर पुण्यातच शेकडो ठिकाणी हा उत्सव साजरा केला गेला आणि त्याच्या पुठल्या वर्षी तो गावोगावी साजरा होऊ लागला. पंढरपूरसारखी यात्रा आणि सार्वजनिक गणेशोत्सव यातला हाच मोठा फरक होता आणि टिळकांनी तो नेमका हेरला होता असे त्यांच्या लिखाणावरून दिसते. देवस्थानामध्ये जमणारी यात्रा ही फक्त त्या एकाच ठिकाणी भरते पण टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव गावोगावीच नव्हे तर प्रांताप्रांतांमध्ये पसरवायला कसलीच मर्यादा नव्हती. त्या निमित्याने ठिकठिकाणी अनेक लोक एकत्र येतील आणि त्यांना देशाभिमान व देशप्रेमाची प्रेरणा मिळू शकेल अशी दूरदर्शी व्यवस्था त्यात होती. टिळकांचा हा होरा अचूक ठरला आणि पाहता पाहता गणेशोत्सवाचा प्रकार सर्व दिशांना झाला. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा फक्त एकच विशाल वृक्ष झाला नाही, त्यातून असंख्य वृक्ष निर्माण झाले.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

------------------------------------------------------------------------------------------------------------

Thursday, September 20, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग ३ - सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात

कुंभमेळा, पंढरपूरची यात्रा, इतर अनेक ठिकाणच्या जत्रा, उरूस वगैरे धार्मिक स्वरूपाचे मेळावे कित्येक शतकांपासून चालत आले आहेत. विशिष्ट तिथीला विशिष्ट दैवतांचे दर्शन घेण्याने महान पुण्य मिळते, पापाचा क्षय होतो, या जन्मात सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा अंत होतो, तसेच मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळते, मनुष्य योनीमध्ये पुनर्जन्म मिळतो किंवा जन्म मरणाच्या चक्रामधून मुक्ती मिळून मोक्षप्राप्ती होते वगैरे आमिषे त्यात काही भाविकांना दिसतात. पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरा त्यात खंड न पाडता चालवत राहून पुढील पिढीकडे सोपवणे हे आपले परमकर्तव्य आहे आणि काहीही करून ते पार पाडणे अत्यावश्यक आहे अशा निष्ठेने काही लोक या यात्रांना जातात. त्याशिवाय एक वेगळा अनुभव, गंमत, हौस म्हणून जाणा-यांची संख्यासुध्दा मोठी असते. या निमित्याने इतकी माणसे एकत्र येतात, त्यांची सेवा करण्याची संधी, किंवा त्यांच्याकडून काही ना काही अर्थप्राप्ती करून घेण्याचा मोह, अशा विविध कारणांमुळे अनेक लोक या यात्रांमध्ये सामील होतात. हे सगळे कित्येक शतकांपासून आजतागायत चालत आले आहे आणि जसजशा वाहतुकीच्या सोयी वाढत गेल्या तशी त्या यात्रेकरूंची संख्या कैकपटीने वाढत आहे.हे बहुतेक उत्सव एकाद्या पुरातन आणि जागृत समजल्या जाणा-या देवस्थानाच्या ठिकाणी साजरे होत असतात. त्या यात्रांमध्ये काळ आणि स्थानमहात्म्याला फार मोठे महत्व असते. एकाद्या परमभक्ताला यात्रेच्या काळात त्या ठिकाणी जाऊन पोहोचणे काही कारणामुळे शक्य झाले नव्हते, तेंव्हा देवाने प्रत्यक्ष किंवा त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले अशी हकीकत अनेक देवस्थानांच्या बाबतीत सांगितली जाते. त्यातून नव्या श्रध्दास्थानाचा उगम होतो, नवी सुरस कथा बनते आणि नवी परंपरा सुरू होते. अशा प्रकारे त्यात भर पडत जाते.

लोकमान्य टिळकांच्या मनात देवभक्तीपेक्षा देशभक्तीची भावना जास्त प्रखर होती. जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांच्या मनात देशप्रेम आणि देशाभिमान रुजवावे, त्यांना देशकार्यासाठी उद्युक्त करावे हा लोकमान्य टिळकांचा अंतस्थ हेतू होता, पण देशभक्तीवर केलेली भाषणे लोकांना रुक्ष वाटली असती आणि मुळात ती ऐकण्यासाठी फारसे लोक जमलेच नसते. शिवाय तत्कालीन इंग्रज सरकारने त्यावर लगेच अंकुश लावला असता. त्यामुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी वेगळी युक्ती योजणे आवश्यक होते. धार्मिक स्वरूपाच्या उत्सवांच्या निमित्याने खूप माणसे एकत्र जमतात हे लोकमान्य टिळकांनी पाहिले आणि त्यातून आपल्याला हवी असलेली जनजागृती करता येईल हे त्यांनी ओळखले, पण त्यांचे अनुयायी बनण्यासाठी लोकांनी त्यांना महंत, स्वामी, बाबा अशा प्रकारचा धर्मगुरू म्हणून मखरात बसवावे हा त्यांचा उद्देश नव्हता. स्वतः एकाद्या देवाचे लाडके परमभक्त असल्याचे न भासवता पण ईशभक्तीचे निमित्य पुढे करून लोकांना कसे आकर्षित करावे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. सार्वजनिक गणेशोत्सव हा त्यावर एक नामी उपाय त्यांनी शोधून काढला आणि अंमलात आणला.

हे काम वाटते तेवढे सोपे नव्हतेच. ते यशस्वी करण्यासाठी लोकमान्यांना भरपूर परिश्रम करावे लागले, अनेकांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. एरवी साधा वाडा असलेल्या वास्तूमध्ये काही दिवसांसाठी गणपतीची तात्पुरती प्रतिष्ठापना करणे आणि उत्सव संपल्यानंतर त्याची बोळवण करून त्या जागेत पुन्हा पूर्ववत परिस्थिती निर्माण करणे हे भाविक लोकांना पटणे कठीण होते. गणपती या देवाची पूजा अर्चा ही व्यक्तीगत बाब आहे, ती विधीवत (सोवळे वगैरे नेसून) प्रकारे करायला हवी, त्यातले विशिष्ट पूजाविधी, मंत्रोच्चार वगैरेमध्ये कसलीही उणीव येता कामा नये असे समजणारे आणि सांगणारे लोक शंभरावर वर्षे उलटून गेली तरी आजही आपल्याला भेटतात. लोकमान्य टिळकांच्या काळामधल्या कर्मठ लोकांनी तर यात कसलीही हयगय होणे मान्य केलेच नसते. देवघरातल्या देवाला सार्वजनिक जागी आणून ठेवले आणि कोणीही उठून त्याची पूजा करू लागला. यामुळे पावित्र्याचा भंग झाल्याने गणपतीमहाराज रुष्ट झाले आणि त्या पातकाचे शासन म्हणून त्यांनी प्लेगाच्या साथीला पाठवून दिले असे अकलेचे तारेसुध्दा काही मंडळींनी त्या काळात तोडले होते.

हा विरोध इतर काही वेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. यात पूजेच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते,तर दुस-या बाजूला हा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा टिळकांचा एक कुटील डाव आहे असा दुष्ट आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले. लोकमान्यांनी या गोष्टी कशा प्रकारे लोकांच्या गळी उतरवल्या, त्यासाठी कोणकोणते युक्तीवाद केले हे त्या काळामधील लोकच जाणोत.

अठराव्या शतकातल्या पेशवाईच्या काळातच गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झालेली होती. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे इतर सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. पुण्यामध्येच कसबा पेठेतील सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात सन १७६५ साली हा उत्सव सुरू झाला आणि गेली २४८ वर्षे तो चालत आला आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू करण्यापूर्वीपासूनच अशा प्रकारे कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. पण तो मुख्यतः धार्मिक स्वरूपाचा होता किंवा तो साजरा करणा-या श्रीमंत मंडळींच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन त्य़ात केले जात असे. लोकमान्यांनी त्याला लोकाभिमुख आणि मनोरंजक तसेच उद्बोधक असे वेगळे रूप दिले, त्याला देशभक्तीची जोड दिली आणि तो इतका लोकप्रिय केला की सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनकत्व एकमताने त्यांना दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. या वेळी टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखात या गणेशोत्सवाचे समग्र वर्णन केले आहेच, त्याला विरोध किंवा त्याची टिंगल करणा-या लोकांवर चांगले आसूड ओढले आहेत. त्यातील कांही मुद्द्यांचा सारांश खाली दिला आहे.

सर्व पुणे शहर गणपतीच्या भजनाने गजबजून गेले होते. निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांनी घेतलेली मेहनत केवळ अपूर्व आहे.

अनेक ठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती प्रेक्षणीय होत्याच, मेळ्यांचा सरंजाम पाहून मती गुंग झाली. त्यात अश्रुतपूर्व असा चमत्कार दृष्टीस पडला.

यंदा नवीन गोष्ट झाली ती म्हणजे गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात झाली. सर्व जातीच्या लोकांनी जातीमत्सर सोडला आणि एका दिलाने आणि धर्माभिमानाने ते मिसळले.

मेळ्यात भाग घेणा-या सुमारे तीन हजार माणसांनी रात्री पाच पाच तास मेहनत घेऊन गाणी बसवली व हजारो स्त्रीपुरुषांनी ती ऐकली.


सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्याने निदान कांही दिवस तरी ते घडतांना दिसले याचे त्यांना समाधान वाटले. सर्व लोकांनी आपापल्या कामात भरभराट केल्यावर हिंदुस्थानची कीर्तीसुध्दा जगभरात पसरेल. इंग्लंड व हिंदुस्थान हे दोन्ही देश प्रलयकाळापर्यंत जगाचे पुढारीपण करतील अशी आशा लोकमान्यांनी या लेखात व्यक्त करून त्यासाठी सर्वांना बुध्दी देण्याची प्रार्थना केली आहे. हा अग्रलेख १८९३ सालचा आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी तोंवर केलेली नव्हती. सनदशीर मार्गाने देशाची प्रगती करणे हे त्या काळात त्यांचे ध्येय होते.


 . . . .  .. . . . . . . . . . . .  . . . . .  (क्रमशः)
------------------------------------------------------

Tuesday, September 18, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग २ - गणेश आणि लेखनकला


आजच्या काळातली लेखनसामुग्री मुबलक प्रमाणात सर्वत्र उपलब्ध असते आणि ज्याला कोणाला काही लिहायची इच्छा असेल तो ते लिहू शकतो. जगातील प्रत्येक माणसाने साक्षर व्हावे या दृष्टीने प्रयत्न चालले आहेत. माझ्या लहानपणी म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीसुद्धा कागद आणि शाई सहज मिळत होती तरी ग्रामीण भागातली साक्षरता वीस टक्क्याहून कमी होती. ज्या काळात कागदच अस्तित्वात आला नव्हता तेंव्हा तर ती अगदीच नगण्य प्रमाणात असणार. काही महान सम्राट आणि बादशहासुध्दा निरक्षर होते असे म्हणतात. असे असले तरी अगदी प्राचीन काळापासून लेखन व वाचन चालत आले आहे. भाषांच्या विकासाबरोबरच किंवा पाठोपाठ त्या लिपीबध्द केल्या गेल्या. काही विद्वान मंडळी निरनिराळ्या भाषांमध्ये आणि निरनिराळ्या लिपींमध्ये लेखनाचे कार्य करीत असत. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे वगैरे साधनांवरून अशा लेखनांचे पुरावे मिळतात. अशा लेखनामधून प्राचीन काळातले काही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे.

आजच्या काळातले बहुतेच लोक व्यक्तीगत स्वरूपाचे लेखन स्वतःच करतात, पण पत्रव्यवहार, रिपोर्ट्स किंवा रेकॉर्ड्स यासारख्या व्यावसायिक लेखनासाठी अनेक ठिकाणी खास प्रशिक्षण घेतलेले लिपिक (स्टेनोटायपिस्ट) नेमलेले असतात. इतिहासकाळातसुध्दा मुनीम, चिटणिस वगैरेंकडून लेखनाचे काम करून घेतले जात असे. लिहिलेला मजकूर वाचणा-याला नीट समजावा या दृष्टीने तो सुवाच्य अक्षरात लिहिलेला असणे आणि व्याकरणदृष्ट्या निर्दोष असणे आवश्यक असते. तशा पध्दतीने तो लिहिण्यासाठी भाषेवर प्रभुत्व मिळवावे लागते तसेच सुलेखनकला अवगत असावी लागते. विद्या आणि कला या दोन्हीमध्ये प्राविण्य मिळवावे लागते.

बरेचसे वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे, ते कोणा माणसाने लिहिले नसून साक्षात ब्रह्मदेवापासून ते ज्ञान काही निवडक ऋषींना मिळाले आणि पुढे त्याचा प्रसार गुरूशिष्यपरंपरेनुसार मौखिक रीतीने होत गेला अशी काही लोकांची श्रध्दा असते. गुरूने सांगायचे आणि शिष्याने त्याचा वारंवार उच्चार करून ते तोंडपाठ करायचे अशी ज्ञानदानाची पध्दत प्राचीन काळात होती. अनेक सूक्ते, श्लोक, स्तोत्रे वगैरे अमक्या तमक्या ऋषीने विरचित केली असा उल्लेख त्यात केला जातो. सर्वाधिक प्रसिध्द आणि प्रचंड आकाराचे असे महाभारत हे महाकाव्य व्यासमहर्षींनी रचले आणि प्रत्यक्ष गणेशाने ते लिहिले असे समजले जाते. त्याचा विस्तार पाहता हे काव्य तोंडपाठ करणे जवळ जवळ अशक्यप्रायच वाटते. ते चिरकाळ टिकून रहावे यासाठी ग्रंथरूपाने लिहून ठेवणे आवश्यक होते. ते लिहून काढणे हे सुध्दा सोपे काम नव्हते. ते कोण करू शकेल याचा विचार करता केवळ श्रीगणेशच हे करू शकेल असे दिसले.

त्यासाठी व्यासमहर्षींनी गणेशाची आराधना केली. त्याने प्रसन्न होऊन वरदान मागितले तेंव्हा महाभारताचे लेखनकार्य त्याने करावे असा वर व्यासांनी मागितला. हे काम करण्यासाठी गणेशाने एक अट घातली. ती म्हणजे व्यासांच्या सांगण्यात खंड पडला तर लगेच हे काम तिथेच थांबवून गणेशजी अंतर्धान होतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. व्यासांनी ती अट मान्य केली आणि एका बैठकीत हजारो श्लोक रचून सांगितले आणि गणेशाने ते तत्परतेने लिहून हा ग्रंथ पूर्ण केला. अशी कथा मी ऐकली होती. काल वाचनात आलेल्या एका लेखात असे लिहिले आहे की गणेशाने अशी अट घातली की व्यासांच्या लांगण्यात खंड पडला तर गणपती आपल्या मनाने काही तरी लिहीत जाईल. अशा प्रकारे त्याने लिहिलेला मजकूर इतका गूढ आहे की त्याचा अर्थ कोणालाच कधी नीटपणे समजला नाही.

सर्वात पहिला कुशल लेखनपटु गणेशच होता याबद्दल एकमत दिसते. कोणत्याही लेखनाच्या सुरुवातीला गणेशाला वंदन, त्याची स्तुती करून ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे संपूर्ण होऊ द्यावे असा आशिर्वाद गणपतीकडे मागण्याचा प्रथा पडली आणि शतकानुशतके चालत राहिली. आधुनिक काळातील काही इतिहासकारांना असे वाटते की महाभारत हा ग्रंथ शतकानुशतके लिहिला जात होता. तसे असल्यास ते रचणारे विद्वान व्यास म्हणवले जात असतील आणि लिहिणारे विद्वान गणेशाचे अंश.
संस्कृत या देववाणीची देवनागरी ही लिपी गणेशानेच तयार केली असेही या लेखात लिहिले आहे. या लिपीची रचना करतांना त्यात अशी खुबी केली आहे की ग, ण आणि श ही तीन अक्षरे इतर व्यंजनाहून वेगळी आहेत. फक्त या तीन व्यंजनांनाच एक स्वतंत्र अशी उभी रेघ आहे. ही तीन अक्षरेसुध्दा गणेश या नावात ज्या क्रमाने येतात त्याच क्रमाने देवनागरी लिपीच्या मुळाक्षरांमध्ये येतात.

. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

-----------------------------------------------------------------------------------------------------------

Sunday, September 16, 2012

गणपती बाप्पा वर्तमानपत्रांमधला - भाग १ - गणपती आणि गणित


हा माझ्या ब्लॉगचा आठशेवा भाग आहे. ही मजल गाठतांना श्रीगजाननाचे स्मरण करून या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी ही लेखमाला सुरू करत आहे. येत्या काही दिवसात वर्तमानपत्रांमध्ये छापून येणा-या किंवा पूर्वी येऊन गेलेल्या लेखांमधली मला नवीन असलेली वैशिष्ट्यपूर्ण किंवा मनोरंजक माहिती त्यात देण्याच्या प्रयत्नाची ही सुरुवात आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------


'गणपती', 'गणेश', 'गणाधीश', 'गणाधिप' वगैरे गजाननाची नावे आणि 'गणित' हे शब्द 'गण' या मूळ शब्दांपासून उद्भव पावलेले आहेत. तेंव्हा त्यांच्यात घनिष्ठ संबंध असणारच. भगवान विष्णूने दहा अवतार घेतले, त्यातल्या रामावतारात एकपत्नीव्रत पाळले तर कृष्णावतारात सोळा हजार एकशे आठ स्त्रियांशी विवाह केला, शंकराची बारा ज्योतिर्लिंगे, चार शक्तीपीठे, नवदुर्गा आदि इतर काही अंक सुध्दा देवाधिकांशी संबंधित असले तरी एकट्या गणपतीचा संबंध अनेक अंकांबरोबर जोडला जातो. 'एकदंत' हे त्याचे एक नाव आहे, तर ऋध्दी आणि सिध्दी या त्याच्या दोन पत्नी त्याच्या अंकावर (मांडीवर) बसल्या असल्याची चित्रे पहायला मिळतात. 'अकार', 'उकार' आणि 'मकार' हे तीन स्वर मिळून 'ओंकार' हे गणपतीचे आद्य रूप बनते. गणपतीचा जन्म माघी चतुर्थीला झाला आणि त्याच्या नावाचा उत्सव भाद्रपद चतुर्थीला धूमधडाक्याने साजरा केला जातो, शिवाय प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात संकष्टी चतुर्थीला गणपतीची आराधना केली जाते. त्याच्या बहुतेक प्रतिमा चतुर्भुज ( चार हातांच्या) असतात. काही कलाकार त्याला दोन किंवा आठ हात काढतात, तर पाच मुखे आणि दहा हात असलेल्या दशभुजा मूर्तीही असतात. पश्चिम महाराष्ट्रामधील मोरेश्वर, बल्लाळेश्वर, गिरिजात्मज, वरदविनायक, विघ्नेश्वर, चिंतामणी, महागणपती आणि सिध्दीविनायक या अष्टविनायकांचा महिमा अपरंपार आहे. नारद विरचित संकटनाशन गणेशस्त्रोत्रातील त्याची बारा नावे आहेत

१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष, ४ गजवक्त्र, ५. लंबोदर, ६. विकट. ७.विघ्नराजेंद्र, ८.धूम्रवर्ण, ९. भालचंद्र, १०.विनायक, ११. गणपती आणि १२. गजानन

तर गणेशद्वादशनामस्तोत्रातील बारा नावे आहेत.

१.सुमुख, २.एकदंत, ३.कपिल, ४.गजकर्णक, ५.लंबोदर, ६.विकट, ७. विघ्ननाश, ८. विनायक, ९.धूम्रकेतू, १०.गणाध्यक्ष, ११.भालचंद्र १२.गजानन

दहापर्यंतचे आकडे हातांच्या बोटावर मोजता येतात. थोडेसे त्याच्यापुढे जाऊन बारापर्यंत मोजता येईल, पण 'एकवीस' हा अंक समजण्यासाठी दोन्ही हात आणि दोन्ही पायांची बोटे मिळूनसुध्दा पुरी पडत नाहीत. क्वचित एकाद्या माणसाच्या हाताला किंवा पायाला सहावे बोट असले तर त्याला एकवीस बोटे असतात. असा माणूस गणपतीचा प्रिय असणार. एकवीस हा आकडा त्याचा फारच आवडता समजला जातो. एकवीस दुर्वांची जुडी करून त्याला वाहतात. काही लोक अशा एकवीस जुड्या गणपतीला वाहतात. त्याच्या अत्यंत प्रिय अशा एकवीस मोदकांचा नैवेद्य त्याला दाखवतात, गणपतीअथर्वशीर्षाची एकवीस आवर्तने करतात. एकवीस या आकड्याचा अर्थ समजण्यासाठी मात्र गणिताची तोंडओळख असणे आवश्यक असते.
पुराणकालीन भूगोलानुसार सप्तस्वर्ग, सात मृत्यूलोक आणि सात पाताल मिळून या विश्वाची रचना झालेली आहे. या सर्व म्हणजे एकवीस लोकांमध्ये गणेश उपस्थित असल्यामुळे किंवा त्या सर्व लोकांचा तो स्वामी असल्यामुळे २१ या आकड्याला महत्व आहे.पुढे दिलेले २१ महाविनायक (ते बहुधा पुण्यामधले असावेत.) नवसाला पावतात अशी त्यांच्या भक्तजनांची श्रध्दा आहे. १.श्रीदशभुजलक्ष्मीगणेश, २.सुवर्णगणेश, ३.चिमण गणपती,  ४.श्रीराम सिध्दीविनायक, ५.आंग्रेकालीन, ६.श्रीधुंडीविनायक. ७.एकवीस गणपती, ८.देवदैवज्ञ गणपती, ९.विघ्नहर्ता, १०.आपट्यांचा बाळ, ११.मराठेंचा गणपती, १२.पार्वतीनंदन, १३.ग्रामदैवत, १४.श्री पुष्टीपती,  १५.सिध्दीरूपी श्री, १६.पंचमुखी श्री, १७.शिलाहारकालीन, १८.गणपती घाट, १९.दाते गणपती, २०.गणेश पंचायतन आणि २१.शमी विघ्नेश


विष्णूप्रमाणे गणपतीची सुध्दा एकशे आठ नावे आहेत, त्यांची यादी मी मागे दिली होती. गणेशसहस्रनामेसुध्दा असतील. सगळे देव एकच आहेत असे धरले तर त्यातली बहुतेक नावे समाईक असतील. गणेशाच्या इतक्या नावांचा जप करणा-या लोकांची संख्या कमी कमी होत चालली आहे. त्यांना वेगळे विशिष्ट असे नाव नसल्यामुळे ते 'नामशेष' झाले असेही म्हणता येणार नाही. ते 'एक्स्टिंक्ट' होत चालले आहेत असेच म्हणावे लागेल.

गणपतीची बत्तीस निरनिराळी रूपे आहेत आणि प्रत्येकाची खास वैशिष्ट्ये आहेत असे कालच्या वर्तमानपत्रात वाचले. ही रूपे आहेत,

१.बाल गणपती, २.तरुण गणपती, ३.भक्ती गणपती, ४.वीर गणपती, ५.शक्ती गणपती, ६.द्विज गणपती, ७.सिध्दी (दाता) गणपती, ८.उच्छिष्ट गणपती, ९.विघ्न (हर्ता) किंवा विघ्नेश्वर गणपती, १०. क्षिप्र गणपती, ११.हेरंब गणपती, १२.लक्ष्मी गणपती, १३.महा गणपती, १४.विजय गणपती, १५.नृत्य गणपती, १६.ऊर्ध्व गणपती, १७.एकाक्षर गणपती, १८.वरद गणपती, १९.त्रयाक्षर गणपती, २०.क्षिप्राप्रसाद गणपती, २१.हरिद्र गणपती, २२.एकदंत गणपती, २३.सृष्टी गणपती, २४.उद्दंड गणपती, २५.ऋणमोचन गणपती, २६.धुंडी गणपती, २७.द्विमुख गणपती, २८.त्रिमुख गणपती, २९.सिंह गणपती, ३०.योग गणपती, ३१.दर्गा गणपती आणि ३२.संकटहार गणपती.

यातली सुखकर्ता आणि दुखहर्ता अशी 'सिध्दीदाता' व 'विघ्नहर्ता' ही रूपे जास्त लोकप्रिय आहेत. 'बाल' रूप सुपीकता दर्शवतो, 'क्षिप्र' गणपती इच्छा पूर्ण करणा-या कल्पवृक्षाची फांदी हातात घेऊन बसलेला असतो आणि 'लक्ष्मी' गणपती समृध्दी प्रदान करतो.. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, September 15, 2012

या ब्लॉगवरील गणपतीविषयक लेखआनंदघन या ब्लॉगचा श्रीगणेशा २००६ सालाच्या सुरुवातीला केला. त्याचे नांव 'श्रीगणेशा' असे दिले असले तरी त्यात गणेश या देवाचा उल्लेखही केला नव्हता. तेंव्हाच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये असतांना आलेल्या एका वेगळ्या अनुभवाची हकीकत त्यात दिली होती. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि इतर कामे तर करू शकत नव्हतोच, हा ब्लॉगही कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या निराशाग्रस्त मनस्थितीत असतांना त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घराबाहेर पडणे कठीण होत असले तरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहणे आणि आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करणे शक्य होते आणि तेच करायचे ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो. घरबसल्या आठवणीतून आणि टेलीव्हिजन, इंटरनेट वगैरे दृष्य माध्यमामधून मला गणपतीची जी निरनिराळी रूपे दिसत गेली त्यावर थोडेसे भाष्य करून ती सचित्र लेखांमध्ये मी देत राहिलो. अशा प्रकारे 'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या काळात माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. या ब्लॉगवरील लेखनात इतके सातत्य त्यापूर्वी कधी आले नव्हते आणि नंतरही ते क्वचितच घडले असेल.

त्यानंतरच्या काळातसुध्दा या ब्लॉगवर मी गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले. गणेशोत्सवात होणारी सजावट आणि गणेशमूर्तींचे विसर्जन यांचा पर्यावरणावर किती परिणाम होतो, तो कसा आणि किती कमी करता येईल याबरोबरच यात किती सत्य आणि तथ्य आहे, किती विपर्यास किंवा अतीशयोक्ती आहे, हे परिणाम टाळण्यासाठी जे पर्यायी मार्ग सुचवले जातात त्यांचे कोणते चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात, ज्या वस्तूंच्या गणेशोत्सवामध्ये होत असलेल्या वापरावर आक्षेप घेतले जातात त्याच वस्तूंचा इतर कोणत्या प्रकारे किती प्रमाणात वापर होत असतो, मुळात समाजाला उत्सवांचीच किती गरज असते किंवा उपयोग होतो वगैरे सर्व बाजूने विचार करणारे लेख या मालिकेत दिले होते.

गणेशोत्सवाचे ऐतिहासिक महत्व सांगून झाल्यावर त्याच्याशी तुलना करून आज त्याला आलेले रूप हा एक टीका करणा-यांचा आवडता विषय आहे. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवणही या वेळी केली जाते. मलाही याबद्दल लिहिण्याचा मोह झाला. इतका जुना भूतकाळ मी काही प्रत्यक्ष पाहिलेला नाही. त्याबद्दल फक्त वाचले आहे. गेल्या दोन तीन दशकात म्हणजे तुलनेने आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणेशोत्सवातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या, कोणत्या खटकल्या आणि कोणत्या गोष्टींची उणीव भासली याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मागच्या वर्षी मी गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले होते. या निमित्याने काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या होत्या. या वर्षीचा गणेशोत्सव लवकरच सुरू होतो आहे. यावेळी कोणते सूत्र घ्यावे हे अजून ठरवले नसले तरी येत्या १० -१२ दिवसात गणपती आणि गणेशोत्सव यावरच भर देणार आहे हे नक्की. यापूर्वी जे लिहिले होते त्यापेक्षा वेगळे काय आता माझ्या दृष्टीपथात येणार आहे किंवा मला सुचणार आहे हे आता बाप्पाच ठरवेल!

Wednesday, September 12, 2012

स्मृती ठेवुनी जाती -६- दादासाहेब आणि ताईतो १९७५ सालचा सुमार असेल. माझ्या एका जवळच्या आप्ताच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही मध्यप्रदेशातल्या एका लहानशा गावी गेलो होतो. त्या गावात त्यांचा वाडवडिलोपार्जित जुना वाडा आहे. त्या विशाल वाड्याच्या सगळ्या बाजूंना मोकळी जमीन आणि या सर्वांभोवती भक्कम तटबंदी वगैरेंनी परिपूर्ण अशी ती गढी आहे. लग्नसमारंभासाठी वाड्यासमोर मोठा मांडव घातला होता. त्या विवाह समारंभातच दादासाहेब आणि ताई यांना मी पहिल्यांदा पाहिले. (ही नावे मी या लेखापुरती त्या दोघांना दिली आहेत.) वरपक्षाकडून जी पाहुण्यांची 'बारात' आली होती त्यात वरपिता आणि वरमाई म्हणून त्यांना सर्वोच्च मान होता.

दादासाहेब भारतीय लष्करात मोठ्या हुद्द्यावर होते, तेंव्हा ते बहुधा कर्नल असावेत. त्यापूर्वी मी कोणत्याच फौजी अधिका-याला जवळून प्रत्यक्ष पाहिले नव्हते. हिंदी सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे कर्नलसाहेब म्हणजे मिशांचे मोठेमोठे कल्ले आणि चेहे-यावर मग्रूर भाव धारण करणारे आडदांड आणि फटकळ गृहस्थ असतील अशी प्रतिमा माझ्या मनात होती. पण दादासाहेबांचे व्यक्तीमत्व त्यापेक्षा फारच वेगळे होते. ते तर सौम्य प्रकृतीचे अतीशय शांत व प्रेमळ सद्गृहस्थ, अगदी परफेक्ट जंटलमन म्हणता येईल इतके सालस आणि आदबशीर दिसत होते. त्यांना पाहून ते वरपक्षाचे सरसेनानी वाटावेत असा त्यांच्याबद्दल दरारा उत्पन्न होत नव्हता. ताईंचे व्यक्तीमत्व मात्र प्रभावी होते. वरमाईची ऐट त्यांना शोभून दिसत होती आणि मांडवातल्या स्त्रियांच्या घोळक्यात त्या उठून दिसत होत्या.


वरपक्ष विरुध्द वधूपक्ष असे वातावरण पूर्वीच्या काळच्या लग्नसमारंभात कधी कधी असायचे. बारीक सारीक बाबतीत देखील प्राधान्य, मान-अपमान, रीत-भात वगैरेंचे अवास्तव स्तोम माजवून त्यावरून वादावादी, रुसणेफुगणे, अडवणूक वगैरे प्रकार चालत असत. वरपक्षामध्ये दादासाहेबांशिवाय त्यांच्या परिवारातले इतरही काही सैन्याधिकारी होते. ते कसे असतील, वागतील, त्यातल्या कोणाची मर्जी कुठे बिघडणार तर नाही अशी थोडीशी धाकधूक मनातून वाटत होती. पण या लग्नात तसे काहीही झाले नाही. सुरुवातीपासून अखेरपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये संपूर्ण सामंजस्य राहिले आणि खेळीमेळीच्या व सौहार्दपूर्ण वातावरणात सारा सोहळा पार पडला. त्याचे श्रेय अर्थातच दादासाहेब व ताईंच्याकडे जाते.

सेवानिवृत्तीनंतर दादासाहेब व ताई जबलपूर इथे त्यांच्या बंगल्यात रहायला गेले. माझा मोठा भाऊसुध्दा काही काल जबलपूरवासी होता. एकदा आम्ही त्याच्याकडे गेलो असतांना त्याच गावात राहणा-या दादासाहेबांना भेटायला जाणे सामाजिक चालीरीतीनुसार आवश्यक होते. ते माझ्या आधीच्या पिढीतले आणि माझ्याहून वीस पंचवीस वर्षांनी मोठे होते. शिवाय त्यांचे जीवन सैन्यातल्या म्हणजे माझ्यापेक्षा खूप वेगळ्या वातावरणात व्यतीत झालेले असल्यामुळे त्या वेळी आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी काही समान असे विषय मला दिसत नव्हते. भेटीची औपचारिकता पार पाडण्यासाठी एकदा त्यांना आपले तोंड दाखवून यावे, त्यांच्या तब्येतीची थोडी विचारपूस करावी, हवापाणी, महागाई वगैरेसारख्या विषयावर दोन चार वाक्ये बोलावीत एवढ्या तयारीने आम्ही त्यांना भेटायला गेलो. पण त्यांनी आमचे फारच अगत्यपूर्वक स्वागत केले, आपुलकीने आमची विचारपूस केली, अत्यंत टापटिपीने व्यवस्थित सजवून ठेवलेला त्यांचा बंगला आणि सुंदर बगीचा दाखवला, त्यांनी जमवलेल्या वस्तू दाखवतांना त्यांच्या संबंधातल्या मजेदार आठवणी सांगितल्या. हे करता करता संध्याकाळ होऊन गेल्यावर रात्रीच्या भोजनासाठी थांबवूनच घेतले. त्यांचा आग्रह मोडणे आम्हाला शक्यच नव्हते.

जेवणाची वेळ होताच दादासाहेबांनी आपला बार उघडला. यापूर्वी मी कोणा नातेवाईकाच्या घरी मद्यपान केले नव्हते. मला त्याची मनापासून फारशी आवड नाहीच. पण मित्रांच्या सोबतीत कधी दोन चार घोट घेतले होते आणि अर्धवट भरलेला ग्लास हातात घेऊन ओल्या पार्ट्यांमध्ये फिरलो होतो, ते आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत असे दर्शवू नये आणि त्या नंतर त्या विषयावर कोणाचे व्याख्यान ऐकावे लागू नये एवढ्यासाठीच. त्यातही वडीलधारी मंडळी आसपास असतील तर "आज त्यांच्यासमोर नको" म्हणून ते टाळले होते. पण वडीलधारी आणि आदरणीय अशा माणसानेच हातात मधुप्याला दिल्यावर त्यांना नको कसे म्हणणार? मिलिटरीमध्ये पिणे हा शिष्टाचाराचा भाग असतो असे ऐकलेले होते. आपणही त्याला धरून चालणेच योग्य होते. आमची मैफल चाललेली असतांना महिलावर्गासाठी वाईनच्या बाटल्या निघाल्या आणि त्यात जास्त रंग भरला.


त्यानंतर जेवणामध्ये कोंबडीचे प्रकार होतेच. आम्ही भेटायला येणार असल्याची सूचना त्या मंडळींना दिल्यानंतर त्यांनी ही तयारी करूनच ठेवली होती. आम्हाला अभक्ष्यभक्षण वर्ज्य नाही, किंबहुना त्याचा शौक आहे ही माहिती त्यांना आधीपासून होती की त्यांनी ती मुद्दाम शोधून काढली होती हे तेच जाणोत. शिवाय मी कधी कल्पनाही केली नव्हती असा एक पदार्थ चवीपुरता ठेवला होता. सुप्रसिध्द क्रिकेटपटु कर्नल सी.के नायडू हे सुध्दा जबलपूरला स्थायिक झालेले होते आणि दादासाहेबांशी त्यांचा घनिष्ठ परिचय होता. निवृत्तीनंतरसुध्दा नायडूसाहेब रानावनात शिकार करायला जात असत. त्या काळात वन्य प्राण्यांच्या शिकारीवर अजून बंदी आलेली नसावी. शिकारीवरून परत आल्यानंतर शिकार केलेल्या प्राण्याच्या मांसाचा एक तुकडा त्यांनी दादासाहेबांकडे पाठवला होता, त्यापासून तो खाद्यपदार्थ बनवला होता. मी तो चाखून पाहिला, पण मला तो विशेष आवडला नाही. रानात स्वैरपणे हिंडणा-या प्राण्याला ठार मारून तो पदार्थ तयार केला आहे या विचारानेच मनात कसेसे होत होते. पहायला गेल्यास मटण किंवा चिकन यासाठीसुध्दा हिंसा केली जातेच, पण शेळ्या व कोंबड्यांचे संगोपन याच कारणाने मुद्दाम केले जाते, तसे नसते तर त्या कदाचित जन्मालाही आल्या नसत्या, यामुळे त्यांच्या हत्येचा विचार तितका कष्टदायी वाटत नाही आणि त्या बाबतीत मन निर्ढावलेले असते.


काही वर्षांनंतर आम्ही दक्षिण भारताच्या दो-यावर बंगलोरला गेलेलो असतांना दादासाहेब आणि ताई त्यांच्या मुलाकडे तिथे आले होते. त्यांना तिथे भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वर दिलेले छायाचित्र त्यावेळचेच आहे. त्यानंतर दादासाहेबांची भेट होण्याचा योग आला नाही. ते निवर्तल्याची बातमीच समजली. ताई मात्र त्यानंतर अनेक वर्षे स्वतःच्या बळावर आपल्या मनाप्रमाणे व्यवस्थित रहात होत्या. एकटीने प्रवास करून इकडे तिकडे जात होत्या. त्या सोशल तर होत्याच, उमेदीच्या वयात त्या थोडे समाजकार्यही करायच्या. त्यांना वाचनाची आवड होती. माझ्या आधीच्या पिढीमधील आणि इंग्रजी पुस्तके वाचणारी दुसरी स्त्री मला भेटली असल्याचे आठवत नाही. त्या काळात एकाद्या समारंभात त्यांची भेट होत होती. तेंव्हा त्या प्रेमाने आमच्याक़ल्या सर्वांची विचारपूस करत होत्या, कोणी कसले यश मिळवले असेल तर त्याचे तोंडभर कौतुक करत होत्या.

पुढे वयोमानाप्रमाणे ताईंची गात्रे क्षीण होत गेल्यामुळे त्यांना मुलांच्या आधाराने रहावे लागले, त्यांना दूरचा प्रवास करून इकडे तिकडे जाणे कठीण होत होत अशक्य झाले. नव्वदीमध्ये आल्यानंतरसुध्दा त्यांना मधुमेह किंवा रक्तदाब यासारखा वृध्दत्वाचा विकार जडला नव्हता, पण त्यांच्या हातापायामधले त्राण कमी होत गेले. स्मृतीभ्रंश होऊ लागला. पूर्वीच्या आठवणी गायब झाल्यात जमा झाल्या असल्या तरी त्यातली एकादी अचानक उफाळून यायची. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यातला फरक समजेनासा झाल्यामुळे त्या भूतकाळात जाऊ पहायच्या किंवा त्या काळातल्या गोष्टी त्यांना आता पहाव्याशा वाटायच्या. हे सगळे सोसणे खूप कठीण होते, पण ते त्या दाखवून देत नव्हत्या. अखेरीस अंथरुणावरून उठणेसुध्दा त्यांना अशक्य होऊन बसले. भेटायला आलेल्या माणसाला त्या ओळखतील की नाही याची शाश्वती राहिली नाही. त्यांचे बोलणे ही जवळ जवळ बंद झाले होते. त्यामुळे कधी कधी मनात येऊनसुध्दा त्याचा काही उपयोग नाही या विचाराने आम्ही त्यांना भेटायला गेलो नाही. काही दिवसांपूर्वी एका संध्याकाळी त्या अत्यवस्थ झाल्याचे कळले आणि रात्रीच त्या हे जग सोडून गेल्याचे वृत्तही आले. त्यांचे त़डफदार, हुषार, चतुरस्र आणि मनमिळाऊ रूप पाहिल्यानंतर त्यांची केविलवाणी झालेली अवस्था दयनीय वाटत होती. त्यातून त्यांची मुक्तता झाली असे सर्वांना वाटले असणार.

Sunday, September 09, 2012

ईदका चाँद आणि ब्ल्यू मून


या दोन्ही प्रकारच्या चंद्राचे उदाहरण साधारणपणे 'दुर्मिळ' या एकाच अर्थाने दिले जाते. एकादा माणूस सहसा भेटेनासा झाला तर त्याला उद्देशून "तुम तो भाई अब ईदका चाँद हो गये हो!" असे म्हंटले जाते आणि क्वचित कधी तरी घडणा-या घटनेला 'वन्स इन ए ब्ल्यू मून' असे म्हणतात. या दोन्ही प्रकारचे चंद्रदर्शन थोडे दुर्लभ असले तरी त्या अगदी वेगळ्या आणि परस्पराविरुध्द प्रकारच्या घटना असतात. ईदचा चंद्र दिसलाच तर तो अत्यंत फिकट रेघेसारखा दिसतो तर ब्ल्यू मून हा पौर्णिमेचा चंद्रमा चांगला गरगरीत आणि पूर्ण वर्तुळाकृतीच्या रूपात असतो. ईदका चाँद जेमतेम दिसला न दिसला एवढ्यात मावळून अस्ताला जातो तर ब्ल्यू मून रात्रभर पिठूर चांदण्याचा वर्षाव करत असतो.

प्रत्येक अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही. त्याचा अर्धा भाग सूर्याकडे असतो आणि सूर्यकिरणांनी उजळत असतो, पण पाठीमागचा आपल्याला पृथ्वीवरून दिसणारा भाग अंधारात असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही असे कारण दिले जाते आणि ते बव्हंशी खरे आहे. पण खग्रास चंद्रग्रहणातसुध्दा काही मिनिटांसाठी पृथ्वीच्या छायेमधून चंद्र सरकत असतांना सूर्याची किरणे चंद्रावर पडू शकत नाहीत, तरीही पृथ्वीच्या वातावरणामधून परावर्तित झालेले सूर्यकिरण चंद्रावर पडतात आणि पृथ्वीच्या प्रकाशात तांबूस रंगाचा चंद्राचा आकार आपल्याला दिसतो. चांदण्या रात्री जसे चंद्राच्या प्रकाशात आपल्याला पृथ्वीवरले आजूबाजूचे दिसते, तसेच पृथ्वीच्या प्रकाशात चंद्रावरचेही दिसते. पण अमावास्येला हे सुध्दा घडत नाही. याचे मुख्य कारण असे आहे की अमावास्येच्या रात्री चंद्र आकाशात मुळी हजरच नसतो. त्या दिवशी तो सकाळी साधारणपणे सूर्याबरोबरच पण त्याच्या थोडासा बाजूला पूर्वेलाच उगवतो, दिवसभर सूर्याच्या जवळच राहून आभाळात भ्रमण करतो आणि त्याच्याबरोबरच सायंकाळी पश्चिमेला आपल्या अस्ताच्या जागी मावळून जातो. रात्रीच्या संपूर्ण काळात तो क्षितिजाच्या खालीच असतो.

साधारणपणे असे असले तरी सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशमार्गे जाण्याच्या गतींमध्ये थोडा फरक असतो. सूर्याच्या मानाने चंद्र किंचित सावकाशपणे चालतो आणि जास्त वेळ आकाशात असतो. त्यामुळे अमावास्येच्या नंतर आलेल्या शुक्ल प्रतीपदेच्या दिवशी सूर्याच्याबरोबर किंवा थोड्या वेळानंतर चंद्र उगवतो, पण त्याची कला अत्यंत निस्तेज आणि आकार एकाद्या बारीक रेघेसारखा असल्यामुळे सूर्याच्या प्रखर प्रकाशात आपल्याला चंद्र दिसू शकत नाही. सूर्यास्तानंतर काही काळ हा क्षीण चंद्र मावळतीजवळच्या आकाशात असतो. पण सूर्य मावळून गेल्यानंतरसुध्दा बराच वेळ त्याचा उजेड आकाशात पसरलेला असल्यामुळे त्यात चंद्र ओळखून येत नाही. अनेक वेळा आकाशातले धूलिकण किंवा हलकेसे पांढरे ढग सुध्दा त्याला झाकून टाकतात. यामुळे प्रतिपदेचा चंद्र पहाणे थोडे कठीण असते. इस्लामी पध्दतीनुसार अमावास्येनंतर चंद्र दिसल्यानंतरच पुढील महिना सुरू होतो. रमजानच्या महिन्यात महिनाभर दिवसाचा उपास केलेला असल्यामुळे त्याची सांगता ईदच्या सणात उत्साहाने केली जाते. यामुळे या ईदच्या चाँदला जास्त महत्व असते. पण सर्वसामान्य लोकांना तो सहसा सहजपणे दिसत नाही. कोणाला तो दिसेल आणि कोणाला दिसणार नाही. यावरून मतभेद आणि वाद होतील. ते टाळण्यासाठी नव्या महिन्याची सुरुवात करणारा चंद्र कोणी पहावा आणि ते जाहीर करावे याचे अधिकार विशिष्ट धर्मगुरूंना दिले आहेत. त्यामुळे अमक्या शहरात चंद्र दिसला आणि ईद साजरी झाली, दुस-या शहरात तो दिसला नाही. अशा प्रकारच्या बातम्या वाचनात येतात. द्वितीयेच्या चंद्रकोरीने जरासे बाळसे धरलेले असते आणि ती कोर सूर्यास्तानंतर तास दीड तास आकाशात असते आणि सहजपणे दिसते. त्यामुळे ठरल्याप्रमाणे आज ईद साजरी झाली नाही तर उद्या ती नक्कीच होते.

ब्ल्यू मून हा मुळीसुध्दा निळा नसतो. इतर कोणत्याही पौर्णिमेप्रमाणे तो सुध्दा शुभ्र धवलकांती किंवा किंचित केशरी छटा असलेला ऑफव्हाईट असतो. याचे नवल एवढ्याचसाठी असते की एकाच इंग्रजी महिन्यांतला तो दुसरा पूर्णचंद्र असतो. फेब्रूवारीचा अपवाद वगळता इतर इंग्रजी महिन्यांमध्ये तीस किंवा एकतीस दिवस असतात आणि एका पौर्णिमेपासून दुस-या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी सुमारे एकोणतीस ते तीस दिवस एवढा असतो. त्यामुळे बहुतेक वेळा एका महिन्यात एकच पौर्णिमा येते. पण एकादे वेळेस महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १ तारखेला पौर्णिमा आली तर पुढील पौर्णिमा त्या महिन्याच्या अखेरीस येते. त्याला ब्ल्यू मून (डे किंवा नाईट) असे म्हणतात. भारतीय पंचांगात एका अमावास्येला सूर्याने एका राशीतून पुढील राशीत संक्रमण केले आणि पुढील अमावास्येपर्यंत तो त्याच राशीत राहिला तर अधिक महिना येतो. तसाच हा प्रकार आहे. यामुळेच तीस बत्तीस महिन्यांनंतर अधिक महिना येतो त्या प्रमाणे तीस बत्तीस महिन्यांनंतर ब्ल्यू मून येतो. दर एकोणीस वर्षात सुमारे सात वेळा हा योग येतो.

ब्ल्यू मूनच्या बाबतीत आणखी एक गंमत आहे. एकादे वर्षी १ जानेवारीला पौर्णिमा असली तर ३१ तारखेला पुढली (दुसरी) पौर्णिमा म्हणजे ब्ल्यू मून येईल, पण पुढे २८ दिवसांचा फेब्रूवारी महिना उलटून गेला तरी त्याच्या पुढची पौर्णिमा येतच नाही. ती तिसरी पौर्णिमा मार्चच्या १ तारखेला आली तर त्यानंतरची चौथी पौर्णिमा पुन्हा मार्चमध्येच ३१ तारखेला येईल. अशा रीतीने तीन महिन्यातच दोन ब्ल्यू मून येतील. हा योगायोग पुन्हा पुन्हा येण्यासाठी मात्र मध्ये अनेक वर्षे जावी लागतील.

या वर्षी ऑगस्ट महिन्यात ब्ल्यू मूनही आला, रमझान ईदही आली आणि अधिक महिनाही सुरू झाला. तो आणखी थोडे दिवस राहणार आहे. असा योगायोग पुन्हा किती वर्षांनंतर येणार आहे कोण जाणे. त्याचे गणित आहे आणि तज्ज्ञ मंडळी ते नेमकेपणे सांगू शकतील, पण माझी धाव तिथपर्यंत जात नाही.

Saturday, September 08, 2012

सप्टेंबर
हाताची पाचही बोटे सारखी नसतात, त्याच प्रमाणे वर्षातले सारे महिनेही एकसारखे नसतात. प्रत्येक महिन्याची काही वैशिष्ट्ये असतात किंवा त्याला संलग्न अशा घटनांच्या आठवणी असतात. काही महिन्यांच्या बाबतीत या गोष्टी ठळकपणे जाणवतात, तर काहींच्या बाबतीत त्या मुद्दाम आठवाव्या लागतात. माझ्या लहानपणी सप्टेंबर महिना तशातला होता. तो गुपचुपपणे सुरू होत असे आणि काही गाजावाजा न करता संपून जात असे. पुढे येणारा ऑक्टोबर महिना दसरा दिवाळीसारखे सण आणि मुख्य म्हणजे त्यानिमित्य शाळेला मिळत असलेली लांब सुटी यामुळे हवाहवासा वाटायचा आणि त्याची प्रतीक्षा करण्यातच सप्टेंबर जायचा.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांना 'कम सप्टेंबर' हा हॉलीवुडचा सिनेमा आला आणि त्याने लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. रॉक हडसन आणि जिना लोलोब्रिजिडा ही जोडी आणि हा मनोरंजक सिनेमा त्या काळातील युवकांच्या गळ्यातले ताईत बनले. जिनाच्या मादक सौंदर्यावर सारे युवक फिदा झालेले होते आणि तिच्या लोलोब्रिगिडा अशा लांबलचक आणि चमत्कारिक नावाचा उच्चार एका दमात करू शकत होते. या सिनेमातले संगीत वाद्यसंगीतांवर वाजवले गेले नाही आणि त्याच्या तालावर मुले नाचली नाहीत असा एकही गॅदरिंगचा कार्यक्रम त्या काळातील कॉलेजांमध्ये होत नसेल. गन्स ऑफ नेव्हेरॉनसारखे युध्दपट आणि जेम्सबाँडचे रहस्यपट यासारख्या हाणामारीच्या चित्रपटांचीच चलती त्या काळच्या हॉलीवुडच्या सिनेमांमध्ये प्रामुख्याने होती. पण त्या सर्वांहून वेगळा असा कम सप्टेंबर हा हलका फुलका सिनेमा त्या सर्वांवर मात करून गेला. परगावी किंवा परदेशात रहात असलेल्या धनाढ्य व खडूस मालकाचा एकाद्या निसर्गरम्य स्थळी असलेला आलीशान बंगला नेहमी त्याच्या नोकराच्या ताब्यात असतो. मालकाच्या गैरहजेरीत तो नोकर त्या बंगल्याचे हॉटेल बनवून पर्यटकांना भाड्याने देऊन पैसे कमवत असतो. एकदा अचानकपणे हा माणूसघाणा मालक आणि पाहुण्यांचे टोळके यांची अमोरासमोर गाठ पडते. अशा प्रकारचा कथाभाग त्यानंतर अनेक हिंदी सिनेमांमुळे येऊन गेल्यामुळे आता जुना झाला आहे. पण पन्नास वर्षांपूर्वी तो खूप मजेदार वाटत असे. सप्टेंबर या महिन्यालाही या चित्रपटामुळे एक महत्व प्राप्त झाले.

त्याच काळात भारतात एक नवा पायंडा सुरू झाला. दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षकदिन म्हणून पाळावा असे १९६२ साली ठरले आणि शाळांमधून तो साजरा करणे सुरू झाले. या दिवशी शाळेतली मुले शिक्षकांना हारतुरे देऊन त्यांचा मानसन्मान करतात, काही शाळांमध्ये मुलेच शिक्षक बनून खालच्या वर्गांचे अध्यापन करतात वगैरे ऐकले. पण मी त्याआधीच शाळेतून बाहेर पडलेलो असल्यामुळे मला काही हा दिवस साजरा करायला मिळाला नाही आणि त्या निमित्याने कोणाला शिकवायलाही मिळाले नाही. या दिवशी काही निवडक शिक्षकांचा सरकारतर्फे सन्मान केला जातो. प्रत्येक राष्ट्रांमध्ये निरनिराळ्या दिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो. ५ सप्टेंबर हा आपले दुसरे राष्ट्रपती स्व.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस आहे. ते एक अत्यंत विद्वान गृहस्थ होते आणि त्यांना शिक्षणाबद्दल खूप आस्था होती म्हणून या दिवसाची निवड शिक्षकदिनासाठी केली गेली. ती प्रथा पुढे चालत राहिली आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरूपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची भारतीय परंपरा आहे. पण गुरू हा शब्द शिक्षक या शब्दाहून खूप व्यापक आहे. गुरुशिष्यपरंपरेनुसार गुरुचरणी लीन होऊन त्याच्याकडून मिळेव तेवढे ज्ञान, कला, विद्या घेणारे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवणीने या दिवशी गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्याकडे जातात. वेळापत्रकाप्रमाणे रोज थोडा वेळ वर्गात येऊन शालेय पाठ्यक्रमातील विषय शिकवून जाणा-या शिक्षकांसाठी साजरा केला जाणारा ५ सप्टेंबरचा शिक्षकदिवस गुरूपौर्णिमेची भावनात्मक जागा कदाचित घेऊ शकणार नाही.

अकरा वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्याच्या ११ तारखेला एक अतीशय अनपेक्षित अशी भयानक घटना घडली. सीएनएन, बीबीसी आदि परदेशी वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण  भारतात घरबसल्या टेलीव्हिजनवर पहाण्याची त्या काळात नुकतीच सुरुवात झाली होती.  त्या दिवशी आपल्याकडल्या संध्याकाळी मी सहज म्हणून सीएनएन चॅनल लावले आणि पडद्यावर दिसत असलेले दृष्य पाहून हतबुध्द झालो. न्यूयॉर्कमधल्या पहिल्या वर्ल़्ड ट्रेड सेंटर टॉवरवर काही मिनिटांपूर्वीच हल्ला होऊन त्याची पडझड झाली होती. त्या ठिकाणी उडालेली तारांबळ, धुळीचे लोट आणि गोंधळ याचे प्रत्यक्ष दर्शन चाललेले असतांनाच अचानक एक विमान आले आणि आमच्या डोळ्यादेखत दुस-या टॉवरला धडकले. पाहतापाहता ती इमारतसुध्दा पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली कोसळली. प्रत्यक्ष घडत असलेल्या घटना आपण बातम्यांमध्ये पहात आहोत की हॉलीवुडचा एकादा भयपट पहात आहोत असा संभ्रम पडावा असे चालले होते. इतक्या भयानक घटनेचे असे प्रत्यक्ष चित्रीकरण (लाइव्ह शूटिंग) त्यापूर्वी कधीही मी पाहिले नव्हते आणि नंतरही नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशातल्या चार विमानतळांवरून उडालेल्या प्रवाशांची वाहतूक करणा-या चार विमानांचे एकाच वेळी अपहरण होते आणि वैमानिकांच्या खुर्चीवर बसलेले खुद्द अतिरेकीच त्या विमानांना ठराविक मार्गाने नेऊन अत्यंत महत्वाच्या इमारतींना सरळ ठोकर मारतात. असे घडू शकेल असे कोणी सांगितले असते तर त्याला इतरांनी बहुधा वेड्यात काढले असते. पण अकल्पनीय असे काहीसे त्याक्षणी घडलेच त्यानंतर सप्टेंबर महिना किंवा ९-११ हा शब्दप्रयोग दहशतीचा पर्यायवाचक ठरला आहे.

नेमक्या त्याच दिवशी आमच्या नात्यातली एक नवविवाहित मुलगी गौरी एकटीने भारतातून अमेरिकेला गेली होती. ती कुठल्या विमानाने कुठे जाणार होती याचा तपशील आम्हाला ठाऊक नव्हता. त्या दिवशी अमेरिकेतील विमान वाहतूक व्यवस्था कोलमडून पडलेली होती आणि मोबाईल्सचे नेटवर्कही जॅम झाले होते. तिचे विमानसुध्दा नियोजित जागी न उतरता दुसरीकडे वळवण्यात आले होते, याचाही कोणाला पत्ता लागत नव्हता. संध्याकाळपासून मध्यरात्र उलटेपर्यंत आम्ही सतत सीएनएन आणि बीबीसी लावून अमेरिकेतल्या बातम्या पहात बसलेलो होतोच. अधूनमधून भारतीय चॅनेल्सही पहात होतो. या घटनेमध्ये हताहत झालेल्यांची नावे स्क्रीनवर स्क्रोल होत होती. काही वेळ उलटून गेल्यानंतर अमेरिकेत सुखरूप असलेल्या भारतीयांची नावेही दिसायला लागली. कोणी तरी त्यात गौरीचे नाव वाचले आणि टेलीफोनने इतर नातेवाईकांना कळवले. ते ऐकून आमचा जीव भांड्यात पडला. या सगळ्यामुळे त्या दिवसाची आठवण कधीच विसरली जाणे शक्य नाही.
चार वर्षांपूर्वी आम्ही अमेरिकेच्या सहलीवर तिकडे जाऊन पोचलो तेंव्हा सप्टेंबरची अखेर आली होती. सर्व वनराईवर लाल, पिवळा, सोनेरी, केशरी, जांभळा अशा विविध रंगांची उधळण झाली होती. हे दृष्य फारच मनोरम होते आणि मी पहिल्यांदाच पहात होतो. त्या वेळी तिकडे फॉल सीझन सुरू झाला होता आणि याला फॉलकलर्स असे म्हणतात हे नंतर समजले.
तर असा हा सप्टेंबर महिना. या महिन्यालाही आता काही खास वैशिष्टे आणि आठवणी चिकटल्या आहेत.


Tuesday, September 04, 2012

अनाग्रही सभ्य भूमिकालोकसत्ता या वर्तमानपत्राच्या 'वाचावे नेटके' या सदरात माझ्या या ब्लॉगची ओळख करून देतांना त्या लेखाचा मथळा 'अनाग्रही सभ्य भूमिका' असा दिला आहे. श्री.अभिनवगुप्त यांनी माझ्या लेखनामागील भूमिका इतक्या नेमक्या शब्दात पकडलेली पाहून मला त्याची थोडी गंमत आणि कौतुक वाटले. 'अनाग्रह' आणि 'सभ्यपणा' हा माझ्या नेहमीच्या वागण्यातला भाग असल्यामुळे माझ्या लेखनात तो आपोआप उतरला असावा आणि त्यातला स्थायी भाव झाला असावा. मला ते कधी वेगळे जाणवले नाही की ब्लॉग लिहीत असतांना मी मुद्दाम ठरवून ही भूमिका घेतलेली नाही. ती ठळकपणे उठून दिसेल एवढी महत्वाचीही वाटली नव्हती. त्यामुळे हा मथळा वाचतांना मला किंचित नवल वाटले. अर्थातच या अभिप्रायाशी मी सहमत आहे. ज्येष्ठ नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर कौतुक करण्याचा अधिकार मला मिळाला आहे असे मला वाटते.

"जे जे आपणासी ठावे ते सर्वाशी सांगावे" आणि "मनात येईल ते लिहून मोकळे व्हावे" या दोन खांबांच्या मुख्य आधारावर माझे ब्लॉगवरील लिखाण होत असते. त्याची वाचनीयता वाढवण्याच्या दृष्टीने रंजकता, खुसखुशीतपणा वगैरेंचे टेकू मी त्याला देत असतो. आपल्याकडे असलेली माहिती इतरांना सांगत असतांना त्यांना ती समजणे महत्वाचे असते. माझे ब्लॉग वाचणारे वाचक भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये निरनिराळ्या स्तरावर वावरणारे असतील, किंवा तसे असावेत असे गृहीत धरून सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना कळावे इतपत सोप्या शब्दात ती माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो. ती माहिती शक्य तेवढी अचूक आणि परिपूर्ण असणे महत्वाचे असल्यामुळे ती पडताळून पाहतो. याला मर्यादा असल्यामुळे माझेकडून काही चुका होतात, उणीवा राहतात. सुजाण वाचकांनी त्या दाखवून दिल्या तर मी त्यांचे आभार मानून आपल्या लेखात दुरुस्ती करणेच योग्य असते. एकाद्या गृहस्थाचे नाव 'पाटील' आहे असे कोणाकडून कळले म्हणून मी त्याला त्या नावाने संबोधले आणि तो 'पटेल' निघाला तरीसुध्दा तो 'पाटील'च आहे असे आग्रह धरणे हास्यास्पद ठरेल. अशा वेळी जे बरोबर वाटते त्याचा आग्रह मी धरतो. माझेच सांगणे बरोबर होते असा हट्ट धरत नाही.

'मनात येईल ते' लिहितांना त्यात माझे विचार आणि मते येतात. माझ्यावर झालेले संस्कार, माझे शिक्षण, वाचन, श्रवण, मनन. चिंतन अनुभव वगैरेंच्या मिश्रणातून ते उद्भवतात. या गोष्टी प्रत्येक माणसाच्या बाबतीत निराळ्या असल्याकारणाने प्रत्येकाचे विचार आणि मते वेगळी असू शकतात. आपली मते दुस-याला पटली तर चांगलेच आहे, पण पटली नाहीत तरी त्याच्या मतांचा आदर ठेवला पाहिजे असे मी समजतो. यालाच लोकसत्तेच्या स्तंभलेखकाने 'अनाग्रह' म्हंटले असावे. आपल्याला न पटलेल्या निराळ्या मतांची टर उडवणे किंवा त्यांना तुच्छ लेखणे असे प्रकार माझ्या लेखनात नसतात. याला बहुधा 'सभ्य भूमिका' असे म्हंटले असावे. कोणाचेही विचार आणि मते ही इतर अनेक गोष्टींवर आधारलेली असल्यामुळे ती जन्मभर एकसारखीच रहावीत असे असणार नाही. आजूबाजूची परिस्थिती, माणसाचे ज्ञान आणि अनुभव यात रोज नवनवी भर पडत असते आणि विचारसरणीवर त्याचा प्रभाव पडणे आणि त्या विषयावरील मत बदलणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. त्यामुळे मी मांडलेली मते त्या वेळच्या परिस्थितीत तशी असतात आणि मी ती ठामपणे मांडतो. त्यात गुळमुळीतपणा नसतो हे लेखकाने नमूद केले आहे. ती मते त्या क्षणापर्यंतच्या अनुभवावर आधारलेली असल्यामुळे एकाद्या अनुभवाने ती पार उलटी होणार नाहीत. अनुभवांची गोळाबेरीज बदलायला वेळ लागतो. ही प्रक्रिया संथ असते. त्यामुळे त्यात ब-यापैकी सातत्य असते. माझ्या बालपणी मी कोणत्या वातावरणात रहात होतो आणि त्या कळात माझ्या समजुती व विचार कसे होते आणि त्यात कसा आणि किती बदल होत गेला हे सांगणे हा माझा आवडता छंद आहे याची प्रचीती या ब्लॉगवरील अनेक लेखांमध्ये दिसेल.

आणखी एक गोष्ट अशी आहे की कोठल्याही गोष्टीमागे असलेला कार्यकारणभाव आपण एका मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकतो. त्या पलीकडे जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ तिखट व मसालेदार खाद्यपदार्थ किंवा उत्तेजक द्रवांच्या सेवनामुळे जठरामध्ये जास्त प्रमाणात आम्ल जमते आणि त्यामुळे जळजळ (हायपर अॅसिडिटी) होते हे डॉक्टरांकडून समजते, कोणती काळजी घेतली किंवा औषध घेतले तर कमी प्रमाणात आम्ल तयार होईल, तसेच कोणत्या औषधाने त्या आम्लाचे शमन होईल हे समजण्यापर्यंत आपण मजल मारू शकतो, शरीरशास्त्राचा अभ्यास केल्यास कोणत्या ग्रंथी हे काम करतात हे समजेल, पण मुळात या ग्रंथींची अंतर्गत रचना कशी असते आणि कोणत्या अन्नपदार्थामधून हे आम्ल तयार करण्याचे काम कोणत्या रासायनिक क्रियेने आणि का होते, ते कमी जास्त प्रमाणात कसे होते हे सांगणारा माणूस मला तरी अद्याप भेटलेला नाही. शरीर ठणठणीत आणि मन स्वस्थ असतांना आपली बुध्दी ज्या मर्यादेपर्यंत काम करते तिथपर्यंतसुध्दा काही वेळा आपण पोचू शकत नाही. त्या वेळी काही शारीरिक किंवा मानसिक कारणामुळे आपली बुध्दी व विचारशक्ती क्षीण झालेली असल्यामुळे वेगळे विचार मनात येतात. असे अनुभव सुध्दा येतात आणि ते मान्य करून त्यापासून बोध घेणे शहाणपणाचे असते.

श्री.अनुभव गुप्त यांनी लिहिलेल्या लेखाच्या सुरुवातीलाच माझे एक वाक्य दिले आहे. हे वाक्य मी कोणत्य संदर्भात लिहिले होते हे समजून घेणे थोडे महत्वाचे आहे. माझ्यावर येऊन गेलेल्या एका कठीण प्रसंगाबद्दल मी एक सविस्तर लेख लिहिला होता. त्याचा शेवट खाली दिलेल्या वाक्याने केला होता.

"परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!"


हा लेख मी उपक्रम या संस्थळावरसुध्दा प्रकाशित केला होता. त्यावर अनेक उलटसुलट प्रतिसाद आले. त्यातल्या एका मित्राने चांगले विश्लेषण करून झाल्यानंतर अखेर असे वाक्य लिहिले होते, "तुमच्या मनात डोकावणार्‍या विचाराने रंजन होत असेल, तर जरूर डोकावू द्यावा. विचाराने त्रास होत असेल, तर त्या विचाराला थारा देऊ नका."

त्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती, "मला विचारांचा त्रास वगैरे काही होत नाही . एकाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वतः विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेऊन घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे आणि ते जन्मभर चालतच असते. अशा एका घटनेमुळे माझे वागणे बदलणार नाही."

एका संभाषणात सहजपणे आलेले हे वाक्य लेखकाला मार्गप्रदर्शक वाटले आणि त्या वाक्याला त्याने आपल्या लेखाच्या अग्रस्थानी जागा दिली यात त्याची गुणग्राहकता दिसून येते. पुन्हा एकदा त्याचे आभार.

Monday, September 03, 2012

वाचावे नेटके

'वाचावे नेटके' या मथळ्याखाली दर सोमवारच्या लोकसत्तेमध्ये मराठी ब्लॉग्सची ओळख करून दिली जाते. आजच्या अंकात माझ्या या ब्लॉगबद्दल छापून आले आहे. अशा प्रकारे एका आघाडीच्या वृत्तपत्रात या स्थळाबद्दल लिहून आलेले वाचून अंगावर मूठभर मांस चढले हे सांगायला संकोच कशाला? या लेखाचे लेखक अभिनवगुप्त यांचा मी अत्यंत आभारी आहे. या लेखाचा दुवा असा आहे.

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247889:2012-09-02-17-56-59&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408

कदाचित हे पान उघडण्यात तांत्रिक अडचण येऊ शकेल म्हणून किंवा ते काम वाचवण्याच्या दृष्टीने प्रिय वाचकांच्या सोयीसाठी हा लेखच मी खाली उद्धृत केला आहे.

----------------------------------------

सोमवार, ३ सप्टेंबर २०१२


वाचावे नेट-के : अनाग्रही, सभ्य भूमिका‘मला विचारांचा त्रास वगैरे होत नाही. एखाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वत: विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे..’

वरवर पाहता साधे वाटणारे हे वाक्य, आनंद घारे यांनी ‘उपक्रम’ या चर्चास्थळावर २०११च्या नोव्हेंबरात लिहिले होते. ‘आनंदघन’ या ब्लॉगवर घारे यांचे भरपूर लिखाण चालू असते. मात्र अशी काही वाक्ये, घारे यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लिखाणामागचे हेतू स्पष्ट होण्यास उपयोगी ठरतील.

वर दिलेले विधान उपयोगी कसे, ते पुढे पाहू. आधी आपल्या वाचनीयतेच्या शोधाबद्दल या ब्लॉगसंदर्भात काही स्पष्टीकरणे गरजेची आहेत.

घारे यांच्या ब्लॉगवरील ‘वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेखमालिका’ हा सर्वाधिक वाचनीय भाग. मात्र, अन्य प्रकारच्या नोंदी ‘सामान्य’ ठरवून पुढे जाता येणार नाही, इतपत वेगळेपण या ब्लॉगमध्ये आहे.

आत्मचरित्र उलगडेल, अशा प्रकारे लिहिलेल्या जवळपास ४० टक्के नोंदी घारे यांच्या ब्लॉगवर आहेत. जमखंडी येथे जन्म व शिक्षण, कॉलेज शिक्षणासाठी गाव सोडणे, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अणुऊर्जा क्षेत्रात नोकरी, त्यादरम्यान ‘कॉलनी’त वास्तव्य आणि उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुले, प्रवासाची आवड भरपूर प्रमाणात भागवता येईल इतका सुखवस्तू निवृत्तिकाळ अशा अगदी व्यक्तिगत गोष्टी वाचकाला कळतात, पण त्या एकरेषीय पद्धतीने नव्हे. स्वत:च्या काकांबद्दल लिहिताना उच्चशिक्षणाचा उल्लेख घारे करतात, तर होळीबद्दल लिहिताना कॉलनीचा. तारापूरच्या अणुऊर्जा केंद्रात महत्त्वाची जबाबदारी घारे पार पाडत होते, हे वाचकाला कळते ते ‘अणुऊर्जा’ या विषयावर त्यांनी जी माहितीपर मालिका लिहिली आहे, त्यातून! असा- म्हणजे आत्मचरित्राच्या उपबोधाचा- परिणाम साधणारे लिखाण कित्येक मराठी ब्लॉगलेखकांनी आजवर केले आहे.

याखेरीज ‘स्व-समाजवर्णन’ हा शक्यतो खुसखुशीत शैलीत लिहिण्याचा प्रकारही घारे यांनी हाताळला आहे. या दोन्ही प्रकारच्या लिखाणांतून माणूस स्पष्ट होत जातो- म्हणजे अमुक एका समाजातली त्याने स्वत:कडे घेतलेली भूमिका काय आहे आणि ती कितपत खरी आहे, हे कळते. अशा लिखाणाला ब्लॉगवर स्थान देणारे ब्लॉगलेखक वा लेखिका जेव्हा काही मतप्रदर्शन करतात, तेव्हा त्यांनी (त्याआधी/ वारंवार) ब्लॉगवरच रेखलेले आत्मचित्र वाचकासमोर असतेच. हे अनेकदा लेखकांनाही माहीत असते आणि ‘आपण बुवा असे’ असे गृहीतक त्यांच्या लिखाणामागे असल्याचे वाचकही समजून घेतात. यातून पुढे ‘नायकत्वा’ची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. ‘होय, मी तेव्हाही म्हटले होते आणि आजही म्हणणारच’ आदी सूर अशा नायकत्ववादी ब्लॉगलेखकांच्या लिखाणातून उघड होऊ लागतात. हे असे सूर अंतिमत: कर्कशच ठरणार, याचे भान पाळले गेले नाही, तर ब्लॉगच्या वाचनीयतेवर परिणाम होतो. हे झाले इतरांबद्दल. हा धोका घारे यांच्या लिखाणाला नाही, याचे कारण त्यांचे लिखाण मूलत: अनाग्रही आहे.

अनाग्रहीपणा म्हणजे गुळमुळीतपणा, असा अर्थाचा गोंधळ घारे यांच्या ब्लॉगबाबत होऊ नये. आग्रह हे पसंती आणि नापसंती यांच्याशी संबंधित असतात. गुळमुळीतपणामध्ये पसंती कशाला आणि नापसंती कशाबद्दल हे अस्पष्टच ठेवण्याची सोय असते. पसंती-नापसंतीची स्पष्टता असली की त्यापुढे जाऊन नापसंतीला झोडपणे वा पसंतीला सर्वोच्च मानणे ही ‘आग्रहा’ची पुढली पायरी सहज गाठता येते.. ती पायरी टाळणारे, ते अनाग्रही. घारे अनाग्रही कसे, याचे एक उदाहरण त्यांनी ‘उपक्रम’वरील चर्चेला उत्तर देताना आपसूकच समोर ठेवले आहे.

‘पटेल तेवढे ठेवून घेणे आणि बाकीचे सोडून देणे’ हा घारे यांच्या ‘शिकण्याचा भाग’ असतो, असे ते म्हणतात. ‘पटेल’ आणि ‘बाकीचे’, यात पसंती-नापसंती आलीच, पण हा पसंती-निर्णय अंतिम नाही, तो ‘शिकण्याचा भाग’ आहे.

ब्लॉगलिखाणाची घारे यांची प्रक्रिया २००६ पासून बदलत गेलेली दिसेल. गेल्या तीन-चार वर्षांत, हा ‘शिकण्याचा भाग’ त्यांच्या लेखनप्रक्रियेतही आलेला आहे. घारे लिहितात तो मजकूर एखाद्या चर्चास्थळावरही चर्चेला खुला ठेवतात. चर्चेची सभ्यता पाळतात आणि क्वचित, ‘पटेल तेवढे घ्यावे’ या शिरस्त्याने ब्लॉगवरच्या लिखाणात बदलही करतात. एखाद्या लेखाच्या शीर्षकातच ‘सुधारित’ असा उल्लेख या ब्लॉगवर दिसतो, तोही याचमुळे. बँकेच्या एटीएम मशीनने कार्ड ‘खाऊन टाकल्या’वरचा अनुभव, यावरची घारे यांची नोंद केवळ आत्मरत न होता माहितीपर झाली आहे, तीही चर्चास्थळावर घडलेल्या संवादामुळे.

घारे यांनी कायकाय लिहिले, हे त्यांच्या ब्लॉगवर जाऊन पाहाता येते. (‘वाचावे नेट-के’चा परीघ ‘ब्लॉगचा परिचय आणि प्रसिद्धी’ एवढाच नसल्याने-) इथे वैपुल्य आणि सातत्य याबद्दलच्या एका मुद्दय़ाची चर्चा प्रस्तुत ठरावी. ‘मी लिहिलेली इतकी पुस्तके छापली गेलीत’ अशी संख्या सांगणाऱ्यांकडे जरा संशयाने पाहण्याचा जो दृष्टिकोन मराठी वाचकांपैकी सुजाण समाजाने काळानुरूप विकसित केला आहे, तो ब्लॉगलिखाणाची चर्चा करताना जरा बाजूला ठेवण्यास हरकत नाही, अशी एक विधायक शक्यता घारे यांचा ब्लॉग दाखवतो. घारे यांचे ब्लॉगलिखाण अभ्यासूपणे पाहणे त्यामुळे महत्त्वाचे ठरते.

उत्कृष्ट वैज्ञानिकाचा पुरस्कार स्वत:ला मिळाल्याचे घारे यांनी ब्लॉगच्या परिचय-समासातच, कुठल्याही पानावर दिसेल अशा ठिकाणी नमूद केले आहे. अशा व्यक्तीने ‘ईश्वरी कृपा, पूर्वपुण्याई, सुदैव..’ आदी संकल्पनांबद्दल सकारात्मक सूर लावावा, हे अनेकांना पटणे-पचणे अशक्य होते. तसेच एका चर्चेत झाले. परगावी गेले असता रेल्वे स्थानकात शुद्ध हरपण्याइतका उलटय़ा-जुलाबांचा त्रास होणे आणि त्यापुढे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जावे लागून खडखडीत बरे होणे, अशा अनुभवानंतर हा सकारात्मक सूर घारे यांनी लावला. त्या सुराची होणारी चर्चा मान्य केली, पण ‘सोडून देणे’ हा पर्याय इथे बलवत्तर ठरला. ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलची तात्त्विक किंवा आधुनिक तत्त्वज्ञानाधारित चर्चा घारे यांनी इथे केलेली नाही. त्यांना ती करायची आहेच, असेही नव्हे.


माणसाला हा अनुभव या विचारांकडे नेऊ शकतो, एवढेच त्यांना म्हणायचे आहे. इथे पुन्हा, त्यांच्या अनाग्रही भूमिकेचा पैलू दिसतो. अनुभव आणि त्यांचे परिणाम, अशा अनुभवसिद्ध जगण्यात पुन्हा नव्याने येणारे अनुभव आणि त्या नव्या अनुभवांचे परिणाम कोणते होऊ शकतात, याचा वेध घेण्यासाठी इतरांनाही आवाहन, हे घारे यांच्या एकंदर ब्लॉगलिखाणातील महत्त्वाचे संवादसूत्र आहे. त्यांचा ब्लॉग वैज्ञानिक माहिती देणाऱ्या लेख-मालिकांसाठी शिफारसपात्र ठरतोच ठरतो, परंतु ब्लॉगलेखक म्हणून जो सभ्यपणा घारे पाळतात आणि वादांच्या प्रसंगांमध्येही टिकवून ठेवतात, तो त्यांचा विशेष अन्य ब्लॉगलेखकांना अनुकरणीय वाटावा, असा आहे.

तात्पर्य हे की, ब्लॉगलिखाणात अनुस्यूतच- अपेक्षितच- असलेले सातत्य विचारात घेता आपण कोणत्या विषयांवर लिहितो आणि किती शैलीदार लिहितो याखेरीज आपण कोणत्या भूमिकेतून लिहितो याचाही विचार सर्वच ब्लॉगलेखकांनी केल्यास मराठी ब्लॉगांची वाचनीयता वाढेल.

अभिनवगुप्त

उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता:

http://anandghan.blogspot.in

तुम्हाला वाचनीय वाटणाऱ्या ब्लॉगची सकारण शिफारस किंवा प्रतिक्रिया, सूचना पाठवण्यासाठी :

wachawe.netake@expressindia.com

लोकसत्ता वृत्तपत्राच्या सौजन्याने