Thursday, December 19, 2019

आनंदीबाई कर्वे आणि पार्वतीबाई आठवले



दीडशे वर्षांपूर्वी कोकणातल्या देवरुख या गावात एक सज्जन सद्गृहस्थ रहात होते, त्यांचे नाव होते  बाळकृष्ण केशव जोशी. त्यांना एकंदर अकरा अपत्ये झाली त्यात गोदा आणि कृष्णा नावाच्या दोन मुली होत्या. ही दोन्ही महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या दोन मुख्य नद्यांची नावे आहेत. या नद्या सह्याद्री पर्वतातल्या लहानशा झऱ्यांमधून उगम पावतात आणि बंगालच्या उपसागराला मिळतात तेंव्हा त्यांचा प्रचंड विस्तार झालेला असतो.  त्याचप्रमाणे कोकणातल्या लहानशा गावातल्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या या दोन मुलींनी पुढे जाऊन आपल्या कर्तृत्वाने मोठी कीर्ती मिळवली. या मुलींचे आईवडील जुन्या परंपरांच्या वातावरणात वाढलेले होते आणि साधी राहणी, करारीपणा, काटकपणा, दीर्घायुष्य इत्यादी त्यांचे गुण आनुवंशिकतेने त्या मुलींनाही प्राप्त झाले होते. त्या दोघींना आयुष्यात मिळालेल्या संधींचा उपयोग करून घेऊन त्यांनी बरेच भरीव काम करून दाखवले.

गोदा फक्त आठ वर्षाची असतांना म्हणजे लग्न म्हणजे काय हेच माहीत नसण्याच्या वयात त्या काळातल्या रुढीनुसार तिचे लग्न झाले आणि त्यानंतर तीनच महिन्यात वैधव्य म्हणजे काय याची काहीच कल्पनाही नसतांना ती विधवा झाली. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या काळात दुर्दैवी विधवांची परिस्थिती फारच वाईट असायची. त्यांचे मुंडन करून त्यांना विद्रूप केले जायचे, त्यांनी कपाळाला कुंकू लावायचे नाही आणि हातात बांगड्या भरायच्या नाहीतच, अंगावर कुठलाही अलंकार घालायचा नाही, चांगले कपडे घालणे तर दूरच, सदासर्वदा  एकच एक बिना काठापदराचे जाडेभरडे आणि लालभडक लुगडे नेसायचे, गादीवर झोपायचे नाही, गोडधोड किंवा मसालेदार रुचकर पदार्थ खायचे नाहीत वगैरे वगैरे अनेक प्रकारांनी त्यांचे जिणे दुष्कर केले जायचे. मात्र त्यांनी घरातली सगळी कामे मात्र न कुरकुरता केली पाहिजेतच असा दंडक असायचा. त्या बाईने किंवा मुलीने मागच्या जन्मात काही फार मोठे पाप केले असणार म्हणून तिला या जन्मी वैधव्य प्राप्त झाले असे म्हणून तिच्या नवऱ्याच्या मृत्यूसाठी सुद्धा तिलाच जबाबदार धरले जात असे आणि या जन्मात हालअपेष्टांच्या यातना सहन करूनच तिच्या पापाची निष्कृती होणार आहे असे तिला सांगितले जात असे.

अजाण गोदाला या त्रासामधून निदान काही काळासाठी दूर ठेवावे म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला माहेरीच ठेऊन घेतले होते, पण ती अकरा वर्षांची झाली तेंव्हा तिच्या सासूने खूप आग्रह केला आणि तिला चांगल्या प्रकारे सांभाळायचे आश्वासन दिले तेंव्हा त्यांनी तिला सासरी पाठवले. यामुळे गरीब आईवडिलांच्या घरातले एक खाणारे तोंड तरी कमी होईल म्हणून गोदाही सासरी जायला तयार झाली. तिची सासू खरोखरच खूप प्रेमळ होती. तिने गोदाचा कसलाही छळ केला नाही, तिचे केसही राहू दिले, पण त्या काळातल्या समाजाला हे मान्य नव्हते. एकाद्या विधवेने सामान्य स्त्रीसारखे जगावे हेच त्यांना खपत नव्हते. त्यामुळे त्यांनी गोदाला एक प्रकारे वाळीत टाकले. आपल्या मुलीसुनांवर तिची सावली पडली तरी तिच्यामुळे त्या बिघडतील अशी भीती घातली जात होती. तिला कसल्याही प्रकारच्या समारंभात किंवा पूजेमध्येही घेतले जात नव्हते की तिच्याशी कुणी नीटपणे बोलायला तयार होत नव्हते. गोदाने दहा वर्षे हे दडपण सहन केले, पण तिला आधार देणाऱ्या तिच्या सासूची तब्येतही ढासळायला लागली तेंव्हा एकवीसाव्या वर्षी गोदाही नाइलाजाने केशवपन करून घ्यायला तयार झाली. तरीही लहान गावातल्या विधवेचे जिणे हे कठीण होतेच.

गोदा एकदा माहेरी आलेली असतांना तिच्या मुंबईत स्थाईक झालेल्या भावाने तिला आपल्याबरोबर मुंबईला चलायला सांगितले आणि ती सासरी परत न जाता परस्पर मुंबईला गेली. तिच्या भावाच्या शेजारीच धोंडो केशव कर्वे आपल्या पत्नीसह रहात होते. तिथे त्यांचा चांगला परिचय झाला. कर्व्यांच्या पत्नीला गोदा स्वयंपाकातही मदत करायला लागली. खेड्याच्या मानाने शहरात कमी त्रास होत असला तरी तिथल्या लोकांची कुजबूज चाललेली असायचीच. अशिक्षित गोदाला शालेय शिक्षण मिळावे म्हणून तिच्या भावाने तिला शारदासदन या संस्थेत घातले. पंडिता रमाबाईंनी चालवलेल्या त्या संस्थेतच तिची रहाण्याचीही सोय करून दिली आणि आपल्या मुलीला सांभाळण्याचे काम तिला दिले.  पुढे शारदासदन संस्थेनेच आपला मुक्काम पुण्याला हलवला आणि गोदा पुण्याला गेली.

दरम्यानच्या काळात कर्वे यांना पुण्याला फर्ग्यूसन कॉलेजमध्ये नोकरी मिळाली म्हणून तेही पुण्याला गेले. तिथे त्यांच्या पहिल्या पत्नीचे अकाली निधन झाले. कधी दुसरे लग्न केले तर ते कोणा  बालविधवेशीच करायचे असे त्यांनी ठरवले होते. समाजाचा कडवा विरोध न जुमानता त्यांच्याशी गोदाचा पुनर्विवाह झाला आणि तिचे नाव आनंदीबाई ठेवले गेले. 'बाया' या टोपणनावानेही त्या ओळखल्या जात असत. त्या काळामध्ये विधवेने थोडीशी मौजमजा करणेसुद्धा पाप समजले जात होते, बायाने चक्क दुसरे लग्न करणे हे तर अक्षम्य पाप होते. हे नवे दांपत्य कर्व्यांच्या कोकणातल्या मुरुड इथल्या घरी गेले तेंव्हा तर त्यांना घराचा उंबरठासुद्धा ओलांडू दिला गेला नाही. पुण्यातल्या त्यांच्या घराच्या शेजारपाजारचे लोकही त्यांच्याशी कुठलेही सहकार्य करत नव्हतेच, उलट ते त्यांचा अनेक प्रकारांनी छळच करत होते. कर्व्यांच्या समाजकार्यासाठी पुण्यातल्या एका सज्जनांनी त्यांना शहरापासून दूर हिंगण्याला जागा दिली तेंव्हा ते जोडपे तिथे झोपडी बांधून रहायला गेले.

धोंडो केशव कर्वे  यांनी तर आपले सर्व जीवनच समाजकार्याला वाहून घेतले होते. त्यांचे महान कार्य पाहून त्यांना पुढे जाऊन महर्षी ही उपाधी मिळाली. त्यांना हिंदू समाजातल्या निराधार विधवांची दयनीय परिस्थिती बघवत नव्हती. अशा पीडित महिलांना आश्रय देण्यासाठी त्यांनी हिंगण्याला एक आश्रम सुरू केला. स्त्रियांना सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे हे ओळखून कर्व्यांनी फक्त मुली आणि महिला यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणसंस्था सुरू केल्या. त्यांचा व्याप वाढत वाढत गेला आणि त्यातून एसएनडीटी हे खास महिलांचे वेगळे विद्यापीठ उभे राहिले. महर्षी कर्वे यांच्या महान सामाजिक कार्याविषयी मी शाळेत असतांनापासून वाचत आणि ऐकत आलो होतो, पण त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल मला विशेष माहिती नव्हती.  महान लोकांनाही एक कुटुंब असते याचा मी कधी विचारच केला नव्हता. 

चाळीस वर्षांपूर्वी मी 'हिमालयाची सावली' हे त्यांच्या जीवनावर आधारलेले नाटक पाहिले तेंव्हा मला त्याची थोडी कल्पना आली. आपल्या महान नवऱ्याच्या कामावर खूप श्रद्धा ठेवणारी, पण वेळीप्रसंगी त्यालाही दोन चार सडेतोड शब्द सुनावण्याचे धैर्य दाखवणारी, अपरिमित कष्ट करून आपले कुटुंब समर्थपणे सांभाळणारी अशी एक तेजस्वी स्त्री अशी तिची प्रतिमा या नाटकात दाखवली आहे. महर्षी कर्वे या हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तीची सावली म्हणजे आनंदीबाईसुद्धा तशीच थोर होती. कर्व्यांना प्राध्यापक म्हणून जेवढा पगार मिळत असे त्यांतून कुटुंबासाठी अगदी न्यूनतम अत्यावश्यक तेवढाच खर्च करून उरलेले पै न पै ते आपल्या समाजकार्याला देत असतच. त्याचप्रमाणे दिवसभरातला सगळा वेळही ते त्याच कामात मग्न असत. घरात देण्यासाठी त्यांच्याकडे ना वेळ होता ना पैसा होता. आनंदीबाईंनी हे सतीचे अवघड वाण सुखाने पत्करले आणि अपार काबाडकष्ट करून ते चांगले सांभाळले. त्यासाठी त्यांनी सुईण होण्याचे प्रशिक्षण घेतले आणि ते काम करून जास्तीचे चार पैसे मिळवले. तसेच काही मुलांना घरात आश्रय देऊन त्यांच्या खाण्यापिण्यासाठी स्वयंपाक केला त्यातून थोडीफार कमाई केली. अशा प्रकारे त्यांनी स्वतः नाना प्रकारचे कष्ट करून कसेबसे आपल्या मुलांच्या तोंडात सुखाचे दोन घास भरवण्याचे सर्व प्रयत्न केले.

लग्नाच्या वेळी कर्व्यांची कृश मूर्ती आणि त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती पाहून पंडिता रमाबाईंना गोदाच्या भविष्याची काळजी वाटली. तिला पुन्हा एकदा आधाराची गरज पडली तर निदान किमान आर्थिक आधार मिळावा म्हणून त्यांनी कर्व्यांना विमा उतरायला लावला होता. पुढे ते शंभरावर वर्षे जगले, पण जेंव्हा विम्याची मुदत संपली तेंव्हा त्याची एक चांगली घसघशीत रक्कम त्यांच्या हातात आली होती.  तिचा उपयोग आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणावर करावा असे आनंदीबाईंना वाटत होते, पण कर्व्यांनी मात्र तसे करू दिले नाही. "मला काही झाले असते तर तुला आधार मिळावा म्हणून मी विमा काढला होता, पण तुझी काळजी घ्यायला मी तर अजून जीवंत आहे." असे म्हणत त्यांनी ते सगळे पैसे आपल्या शिक्षण संस्थेला दिले. आनंदीबाईंनीसुद्धा संस्थेसाठी वर्गणी जमा करण्यासाठी धडपड केली. त्या काही काळ त्यांच्या मुलाकडे आफ्रिकेत रहायला गेल्या असतांना तिथल्या लोकांकडूनसुद्धा मदत घेऊन त्यांनी संस्थेसाठी फंड गोळा केला.

आनंदीबाईंना समाजकार्यातही जास्त प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घ्यायची इच्छा होती, पण कर्व्यांनी असे पाहिले की महिलांना शिक्षण देण्याला असलेला समाजाचा विरोध हळूहळू कमी होत होता, पण विधवांच्या विवाहाला मात्र सर्वांचा जास्तच प्रखर विरोध होता. त्याची खूप झळ त्यांना स्वतःला लागत होतीच. गावातले लोक पुनर्विवाह केलेल्या आनंदीबाईंशी फटकूनच वागत होते. आनंदीबाईंचा स्वभावही थोडा फटकळ वाटण्याइतका निर्भीड होता.  त्या काळात आनंदीबाईंनी शाळेच्या कामात जास्त सहभाग घेतला तर कदाचित 'विधवाविवाहाचा प्रचार' असा त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल आणि शाळेत येणाऱ्या मुलींच्या संख्येवर तसेच समाजाकडून संस्थेला मिळणाऱ्या सहाय्यावर त्याचा परिणाम होईल. असा विचार करून त्यांनी आपले सर्व लक्ष स्त्रीशिक्षणावर केंद्रित केले आणि विधवाविवाह हा विषय फक्त घरापुरता मर्यादित ठेवला. शिवाय कर्वे स्वतः घरात उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी आनंदीबाईंनी घराकडे जास्त लक्ष पुरवणेही आवश्यक होतेच.

कर्वे यांना शिक्षणसंस्थेच्या कामात मदत करायला दुसरी एक विधवा महिला पुढे आली ती म्हणजे पार्वतीबाई आठवले. गोदाची लहान बहीण असलेल्या कृष्णाचे लग्न त्या काळातल्या रीतीनुसार  वेळेवर होऊ शकले नाही त्यामुळे ती अकरा वर्षांची घोडनवरी झाली होती. तेंव्हा एका आश्रित आणि जरा अपंगत्व असलेल्या मुलाबरोबर तिचे लग्न लावून दिले गेले आणि ती 'कृष्णा जोशी'ची  'पार्वतीबाई आठवले' झाली. तिने दहा वर्षे संसारही केला, पण त्यानंतर तिचा नवरा वारला आणि ती विधवा झाली. तिच्या सासरची कोणी माणसेच नसल्यामुळे ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी देवरुखला परत आली. गोदासारख्या बालविधवेचे लग्नसुद्धा त्या काळातल्या लोकांना अजीबात मान्य नसले तरी ते एक वेळ निदान क्षम्य तरी मानले गेले, पण मूल असलेल्या विधवेचे लग्न होणे सर्वथा अशक्य होते. त्यासाठी कुणी इच्छुक नवराही मिळाला नसताच. त्यामुळे त्या वेळी कुणीही तसा विचारही मनात आणू शकला नाही.

मोठ्या बहिणीला मदत करण्यासाठी किंवा तिची मदत घेण्यासाठी पार्वतीबाई पुण्याला कर्वे कुटुंबाकडे रहायला आल्या. तिथे आल्यानंतर वयाच्या २६व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, पण त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला पंख मिळाले आणि त्यांनी समाजकार्यात गरुडभरारी घेतली. त्यांनी कर्व्यांच्या स्त्रीशिक्षण संस्थेचे काम करायला आणि ते वाढवायला धडाडीने सुरुवात केली. त्यासाठी सतत वीस वर्षे पुण्यातच नव्हे तर अख्ख्या देशभरात ठिकठिकाणचे दौरे काढून अनेक सभांमध्ये भाषणे व व्याख्याने दिली आणि त्या महान सामाजिक काऱ्याबद्दल जनजागृती निर्माण केली, त्यासाठी निधी जमवून दिला. केवळ निष्कांचन स्थितीत त्या स्वावलंबनाच्या बळावर तीन वर्षे अमेरिकेत जाऊन तिथल्या निरनिराळ्या शहरांमध्ये राहिल्या आणि त्यांनी तिथूनही आपल्या संस्थेसाठी अनेकांची मदत मिळवली. या गोष्टीवरून त्यांचा धाडसी स्वभाव व कोणत्याही संकटांना न डगमगता तोंड देण्याची तयारी हे गुण दिसून येतात. कोकणातल्या लहान गावात जन्माला आलेली आणि साधे मराठी भाषेचेसुद्धा प्राथमिक शिक्षण धडपणे न मिळालेली एक अडाणी बाई धडाडीने इंग्रजीत बोलून परदेशांमध्ये जाऊन कार्य करते अशी गोष्टही शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडली असेल यावर विश्वासही बसत नाही, पण तसे घडले होते ते तिच्यातला आत्मविश्वास, करारी वृत्ती आणि कर्तबगारी यामुळे! 

पार्वतीबाईंच्या वागण्यात त्यांनी हाती घेतलेल्या कामाबद्दल तीव्र कळकळ दिसून येत असे व त्यासाठी त्या जिवापाड मेहनत घेत असत त्यामुळे त्यांना मदत करण्याची तयारी जुन्या विचारांच्या लोकांनीही दाखवली. कोणतीही गोष्ट आपल्या मनाला पटली म्हणजे लोकनिंदेला न जुमानता ती गोष्ट व्यवहारात आणण्यासाठी बराच आत्मविश्वास अंगात असावा लागतो आणि त्याला शीलाची व दृढनिश्चयाची जोड मिळाली तर तो परिणामकारक होऊ शकतो हे पार्वतीबाईंच्या उदाहरणावरून प्रत्ययाला येण्यासारखे आहे. जुन्यातील चांगले कायम ठेऊन नव्यातील गुणांची जोड त्यांना देणे हे अतिकठीण काम ज्यांनी साध्य केले अशा व्यक्तींत पार्वतीबाईंची गणना केली पाहिजे. त्यांना जुन्या परंपरेचा जसा अभिमान होता तशी त्यांना त्यांचेमधील दोषांची जाणीवही होती आणि ते नजरेस आणून देण्याचे काम त्या आपल्या व्याख्यानांमधून करीत असत. नव्याजुन्याच्या गोड मिलाफामुळे त्यांचे वजन दोन्ही पंथांच्या लोकांवर पडले आणि वर्गणी जमवण्याचे कठीण काम त्यांच्याकडून चांगल्या रीतीने झाले. त्या जेथे जात तेथे दुसऱ्यांचे मन आपल्याकडे ओढून घेत आणि ज्या स्त्रियांची सुधारणा करायची आहे त्यांच्यात मिळून मिसळून वागून आपुलकी उत्पन्न करीत असत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पार्वतीबाईंच्या आत्मचरित्राला लिहिलेल्या प्रस्तावनेत वरील अर्थाचे मुद्दे लिहिले आहेत.

दीडशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या विधवांची परिस्थिती दारुण होती. धर्मविस्तारासाठी भारतात आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांच्यासाठी धर्मांतराचा एक पर्याय ठेवला, पण धर्मांतर म्हणजे आपले कुटुंब, नातेवाईक आणि समाज या सर्वांचा त्याग करून परक्यांच्या समूहात जाण्यासारखे होते. पंडिता रमाबाई यांनी सुरू केलेल्या शारदा सदनसारख्या संस्थांमध्ये शिक्षणासोबत ख्रिस्ती धर्माची शिकवणही दिली जात होती. त्यासाठी त्यांना इंग्लंडअमेरिकेतून आर्थिक सहाय्य मिळत असले तरी आपल्या लेकीसुनांना त्या संस्थांमध्ये पाठवायला महाराष्ट्रातले पालक धजत नसत. आनंदीबाईंनी मात्र काही वर्षे त्या संस्थेत राहूनही धर्मांतर केले नाही, पण तरीही ख्रिश्चनांच्यातल्या रिवाजाप्रमाणे पुनर्विवाह केला. त्यामुळे सनातनी विचाराच्या लोकांनी त्यांना धर्मभ्रष्टच ठरवले. आनंदीबाईंनी आपल्या वागण्यातून विधवांपुढे आणखी एक पर्याय ठेवला होताच, शिवाय डॉ.आनंदीबाई जोशी व डॉ.रखमाबाई राऊत यांच्याप्रमाणे रुग्णांची सेवा करण्याचा मार्गही दाखवला होता. पार्वतीबाईंनी स्वतः शिक्षण घेऊन, मुलींना शिकवून आणि शिक्षणसंस्था चालवून दुसरा एक मोठा आणि चांगला पर्याय दाखवून दिला. स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्यात  मुलींसाठी पहिली शाळा उघडणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणेच पार्वतीबाईंचाही मोठा वाटा आहे. आनंदीबाई कर्वे आणि पार्वतीबाई आठवले या दोघींनीही आत्मचरित्रे लिहिली आणि त्यात आपले बरेवाईटअनुभव सांगितले त्याचप्रमाणे आपले विचारही मांडले. त्यांच्या या आत्मचरित्रांमधून अनेक महिलांना प्रेरणा मिळाली असेल, त्यांचे मार्गदर्शन झाले असेल. त्यानंतर पुढल्या पिढ्यांमधल्या लक्षावधी महिलांनी रुग्णांची सेवा आणि मुलांचे शिक्षण यांच्याकडे वळून कालावधीने ही दोन्ही क्षेत्रे काबीज केली. त्यातही अनेक विधवांनी या मार्गाने स्वतःचा उद्धार करून घेऊन आपले आयुष्य मार्गी लावले. त्यातल्या काहींना मी जवळून पाहिले आहे.

मी सात आठ वर्षांपूर्वी कर्वेनगरमधल्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षणसंस्थेला भेट दिली होती तेंव्हा त्या परिसरातले स्मारकस्थळ पाहिले होते. तिथे महर्षी कर्व्यांच्या समाधीच्या शेजारीच आनंदीबाई आणि पार्वतीबाई यांचीसुद्धा स्मारके दिसली. तेंव्हापासून माझ्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव निर्माण झाला होता, पण मला त्यांची फारशी माहिती नव्हती. ती मिळवून मी आज आपला आदरभाव या लेखात व्यक्त करू शकलो. त्या दोघींच्या स्मृतीला माझा सादर साष्टांग प्रणाम.
   

Monday, December 09, 2019

आगगाडीच्या इंजिनाचा शोध



 गेल्या तीनचारशे वर्षांपासून युरोपातल्या खाणींमधून काढलेली खनिजे वाहून नेण्यासाठीचाके लावलेल्या गाड्यांचा उपयोग केला जात होता.  त्यांना ओढून नेण्यासाठी लाकडाचे ओंडके, लोखंडाच्या पट्ट्या वगैरे जमीनीवर अंथरून एक ट्रॅक केला जात असे. त्यावरून गाडे ओढतांना कमी श्रम पडत असत. अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत काही खाणींमध्ये अशा प्रकारच्या रुळांवरून मालगाड्या नेणे सुरू झाले होते. त्या गाड्यांना ओढून नेण्याचे काम मजूर करीत किंवा त्यांना घोडे जुंपले जात.

अठराव्या शतकात जेम्स वॉटने  तयार केलेल्या वाफेच्या इंजिनांमुळे कारखान्यांमधली यंत्रे चालवण्याचे हुकुमी साधन मिळाले आणि पिठाच्या चक्क्या, कापडाच्या गिरण्या, वर्कशॉप्स वगैरेंमध्ये त्यांचा वापर व्हायला लागला. पण ही बोजड आकारांची इंजिने एका जागेवरच भक्कमपणे बसवलेली असत. त्यांना चालवण्यासाठी वाफ निर्माण करणारे बॉयलर आणि वाफेला थंड करणारे कन्डेन्सर यांचीही गरज होतीच. कंडेन्सरमुळे इंजिनाची कार्यक्षमता बरीच वाढत असे. त्यामुळेच वॉटचे इंजिन यशस्वी झाले होते. पण आकाराने जंगी असलेले कंडेन्सर आणि त्याला आवश्यक असलेला थंड पाण्याचा पुरवठा  चाकांवर बसवून इकडून तिकडे जाऊ शकणाऱ्या अशा फिरत्या इंजिनाला करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे ते इंजिन चालवून पुरशी शक्ती मिळण्यासाठी इंजिनामधील वाफेचा दाब खूप वाढवणे आवश्यक होते. पण त्यामुळे इंजिन, बॉइलर, व्हॉल्व्हज, पाइप्स वगैरे सर्वांनाच वाफेचा जास्त दाब आणि तापमान सहन करावे लागणार. अशा प्रकारे फिरते इंजिन तयार करून चालवण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या.  त्या अडचणीआणि त्यातील धोके पाहता वॉटने त्या दिशेने जास्त प्रयत्न केले नाहीत. त्याच्या स्थिर इंजिनांनाच मोठी मागणी होती आणि ती पुरवण्याचेच काम खूप मोठे होते. त्यातच तो मग्न झाला होता.

त्या काळात धातूविज्ञान आणि कारखान्यांमधल्या यंत्रांच्या बांधणीमध्ये प्रगति होतच होती. त्यामुळे काही काळातच वाफेचा अधिक दाब सहन करण्यासाठी अधिक शक्तीशाली भाग तयार करणे शक्य झाले. सन १८०४ मध्ये रिचर्ड ट्रेव्हेथिक या ब्रिटिश इंजिनियरने वाफेवर चालणारे आगगाडीचे पहिले इंजिन तयार केले आणि त्याला जोडून वेल्समधल्या एका कारखान्यातल्या ट्रॅकवर पहिली गाडी चालवून दाखवली.  त्यानंतर त्याने लंडनमध्ये एक वर्तुळाकार रेल्वे लाइन मांडून आपल्या इंजिनाचे प्रदर्शनही केले. त्याच्या या प्रयोगाचे एक नवलाई म्हणून कौतुक झाले, पण ते इंजिन फक्त प्रायोगिकच राहिले, प्रत्यक्ष आगगाडी ओढून वाहतूक करण्याच्या कामात ते विशेष चालले नाही. ते इंजिन आकाराने जास्तच बोजड होते आणि ट्रेव्हेथिकने वापरलेले ओतीव लोखंडाचे रूळ त्या वजनामुळे सारखे तडकत असत यामुळेही ते इंजिन यशस्वी झाले नसेल.

त्यानंतर सन १८१२ मध्ये मॅथ्यू मरे याने इंग्लंडमधील लीड्स इथे पहिले व्यावसायिक रेल्वे इंजिन तयार केले. या इंजिनाच्या चाकांबरोबर गीअरसारखे दाते असलेले एक चाक होते आणि ते रुळाच्या एका बाजूला पाडलेल्या दात्यांशी एंगेज होत होते. यामुळे ते चाक फिरतांना आपोआपच पुढे जात होते. ही जगातली पहिली रॅक रेल्वे होती.  त्याच्या पाठोपाठ सन १८१३ मध्ये ख्रिस्तोफर ब्लॅकेट आणि विलियम हेडली यांनी चाकांच्या रुळाबरोबर होणाऱ्या घर्षणातून पुढे जाणारे पहिले इंजिन तयार केले आणि ते एका कोळशाच्या खाणीमधल्या मालगाड्या चालवण्यासाठी दिले.

जॉर्ज स्टीफनसन या ब्रिटिश इंजिनियरचा जन्म सन १७८१ मध्ये एका निरक्षर कुटुंबात झाला आणि त्यालाही लहानपणी शाळेत जायची संधी मिळाली नाही. वयाच्या अठराव्या वर्षी तो कोळशाच्या खाणीत मजूर म्हणून नोकरीला लागला. त्यानंतर त्याने रात्रीच्या शाळेत जाऊन लिहिण्या वाचण्याचे शिक्षण घेतले, तसेच स्वतःच्या हुषारीने खाणींमधील सर्व यंत्रे कशी चालतात हे उत्तमरीत्या समजून घेऊन तो त्यांची दुरुस्ती करण्यात प्रवीण झाला आणि मालकांच्या मर्जीतला झाला. त्यामुळे त्याला नवीन निर्मिती करण्याची कामे करण्याची संधी मिळाली. त्या काळात नव्याने निघालेल्या इतर वाफेच्या इंजिनांवरून प्रेरणा घेऊन त्याने सन १८१४ मध्ये प्रथम एका कोळशाच्या खाणीसाठी एक इंजिन तयार केले. त्यानंतर त्याने त्या इंजिनाच्या रचनेत अनेक सुधारणा करून एकाहून एक वरचढ अशी नवनवी इंजिने तयार केली.  सन १८२५ मध्ये त्याने तयार केलेल्या लोकोमोशन नावाच्या इंजिनावर चालणारी जगातली पहिली सार्वजनिक रेल्वे सेवा सुरू झाली. त्यावेळी पहिल्यांदा पॅसेंजर्सना घेऊन जाणारी आगिनगाडी चालू झाली. त्यानंतर त्याने सन १८३० मध्ये रॉकेट नावाचे इंजिन तयार केले, स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेल्वे इंजिने पुरवायला तसेच रेल्वे लाइनी बांधायला सुरुवात केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि लवकरच इंग्लंडशिवाय युरोप आणि अमेरिकेतसुद्धा स्टीफनसनची इंजिने आणि आगगाड्या धावायला लागल्या. भारतातसुद्धा फार लवकर म्हणजे दहाबारा वर्षांमध्येच पहिले रेल्वे इंजिन आणले गेले आणि वीस पंचवीस वर्षांमध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वेने प्रवासी वाहतूकही सुरू झाली.  त्या काळातली संपर्क आणि वाहतूक व्यवस्था पाहता हा शोध भारतात खूपच लवकर येऊन पोचला. 

यावरून असे दिसते की एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले अनेक इंजिनियर वाफेवर चालणारे फिरते इंजिन तयार करण्याचा प्रयत्न करीत होते. रुळावरून चालणाऱ्या पण घोडे जुंपलेल्या गाड्या त्याच्याही आधीच सुरू झाल्या होत्या, पण त्या मुख्य करून खाणींमध्ये किंवा कारखान्यांमधले जड सामान वहाणाऱ्या मालगाड्या होत्या. घोड्यांच्या जागी वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन लावले तर ते जास्त शक्तीशाली असेल, अधिक काम करेल आणि फायद्याचे ठरेल या विचाराने हे सगळे प्रयत्न चालले होते आणि त्यांना थोडे थोडे यश येतही होते.  जॉर्ज स्टीफनसन याने या इंजिनांमध्ये चांगले क्रांतिकारक बदल घडवून आणले. ती इंजिने आकाराने सुटसुटीत झाली, ती सुरळीत, सुरक्षित आणि खात्रीपूर्वक काम करायला लागली. त्यामुळे प्रवाशांना घेऊन जाणारी सार्वजनिक रेल्वे वाहतूक सुरू करणे शक्य झाले. पहिल्या अशा सेवेचे यश पाहून इंग्लंडमध्ये देशभर रेल्वे कंपन्या निघाल्या आणि पुढे लवकरच रेल्वेचे जाळे जगभर पसरले.  यामुळे जॉर्ज स्टीफनसन इतक्या मोठ्या प्रकाशझोतात आला की त्यानेच रेल्वे इंजिनाचा शोध लावला असे म्हणून त्याचेच नाव घेतले जाऊ लागले आणि आजही त्यालाच रेल्वेचा जनक मानले जाते.

Tuesday, December 03, 2019

अमेरिकेतला हार्वेस्ट फेस्टिव्हल



शेतकरी लोक जमीनीच्या मशागतीवर घाम गाळून खूप काबाडकष्ट करतात. ते शेते नांगरतात, त्या नांगरलेल्या शेतात बीबियाणे पेरतात, ती पाखरांनी खाऊ नयेत म्हणून त्यांच्यार माती पसरवतात, उगवलेल्या रोपांना वेळोवेळी खत पाणी देतात,  त्यात उगवलेले अगांतुक तण उपटून काढून टाकतात, उभ्या राहिलेल्या  पिकांची राखण करतात, त्या  पिकात दाणे भरून  ते तयार झाले की कापणी, मळणी वगैरे करून ते धान्य घरी आणतात तेंव्हा त्यांनी केलेल्या अपार कष्टांचे फळ त्यांच्या हातात पडते. त्याचा त्यांना परम आनंद होतो आणि तो उत्साहाने साजरा करण्यासाठी ते मोठा जल्लोष करतात. हे जवळपास जगभर चालत असते. निरनिराळ्या देशांमधले हवामान वेगवेगळे असल्यामुळे सगळ्यांचे सुगीचे हंगाम आणि त्या निमित्याने साजरे होत असलेले सण एकाच वेळी येत नाहीत. भारतातसुद्धा त्यात विविधता आहे. दक्षिण भारतात पोंगल, ओणम, वायव्य भारतात बैसाखी तर ईशान्य भारतात बिहूसारखे सण सामूहिक रीत्या साजरे केले जातात. महाराष्ट्रातल्या दसरा किंवा संक्रांतीला नवी पिके हाती येण्यात असतात.

शेतकऱ्यांनी कितीही मेहनत घेतली असली तरी ती फलद्रुप होण्यासाठी पावसाने वेळेवर आणि हवे तेवढेच पडणे अत्यंत गरजेचे असते. अवर्षण पडले तर पिके उगवणारच नाहीत, कमी पाऊस झाला तर त्यांची वाढ समाधानकारक होत नाही आणि अतीवृष्टी झाली तर हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल झालेले पहावे लागते. यामुळे देवाची किंवा दैवाची साथ मिळणेही आवश्यक असते याची जाणीव शेतकऱ्यांना असते. म्हणूनच अशा सणांमध्ये निरनिराळ्या देवतांच्या आराधनेचाही भाग असतोच.

मदर इंडिया या सिनेमातल्या "दुखभरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रे, रंग जीवन में नया लायो रे" या गाण्यात शेतकऱ्यांच्या जीवनातली मेहनत आणि त्यांचा उल्हास या सगळ्या गोष्टी अचूक टिपल्या आहेत.  हार्वेस्ट फेस्टिव्हल किंवा सुगीचा सण म्हंटल्यावर माझ्या डोळ्यासमोर हेच गाणे उभे राहते. आपला भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे जवळ जवळ संपूर्ण गावाचे जीवनच सर्वस्वी शेतांमधल्या पीकपाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सगळी ग्रामीण जनता या  सणांमध्ये उत्साहाने सहभागी होत असते. मुंबईपुण्यासारख्या शहरांचे मात्र आता खेड्यांशी जवळचे संबंध राहिले नसल्याने तिथले उत्सव आजकाल शेतीशी तितकेसे जोडलेले नसतात.

पश्चिमेकडील देशांमध्ये आता सगळी यांत्रिक शेती झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रमाणच अल्प झाले आहे. जे थोडे आहेत तेही विखुरले गेले असल्यामुळे ते एकत्र येऊन कसले सामूहिक सण साजरे करणार? पण एका काळी अमेरिकेतले ग्रामीण लोक त्यांच्या सुगीच्या दिवसांत 'थँक्सगिव्हिंग डे' साजरा करत असत. ‘देवाने आपल्याला जे विपुल धान्य दिले, आपण दुष्काळावर मात केली, त्याबद्दल सर्वानी देवाचे आभार मानू’ या भावनेने हा सण दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाला होता. आता ही भावना शिल्लक राहिली नसली तरी या निमित्याने सगळ्यांनी चार दिवस धमालमस्ती करायची हे मात्र आम जनतेच्या मनात चांगले रुजले आहे. खरे तर प्रत्येक माणसाच्या मनात आनंद दाखवायची एक प्रकारची ऊर्मी असते आणि तिला व्यक्त करण्याची वाट मिळायला कुठले तरी निमित्य लागते किंवा पुरते. मग तो धार्मिक उत्सव असो, सामाजिक उत्सव असो किंवा एकादा लग्नसमारंभ असो. याच सुमाराला अमेरिकेच्या काही भागात हॅलोविनचा सण साजरा होत असतो. काही लोक त्या सुमाराला हार्वेस्ट फेस्टिव्हल साजरा करतात.


मी सध्या कॅलिफोर्नियामधल्या टॉरेन्स नावाच्या ज्या गावी आलो आहे तिथल्या एका शाळेच्या पटांगणात तीन दिवसांचा हार्वेस्ट फेस्टिव्हल आयोजित केला होता. त्याची जाहिरात आधीपासून झाली होती. फेस्टिव्हल म्हणजे ते या वेळी नक्की काय करणार आहेत याचे मलाही कुतूहल होते. तो फेस्टिव्हल सुरू होण्याच्या आदले दिवशी मी पाहिले की अचानक त्या ठिकाणी अनेक मोठमोठे ट्रेलर ट्रक येऊन उभे राहिले आणि त्यांनी पहाता पाहता तिथे जायंट व्हीलसारखी काही भली मोठी यंत्रे आणून उभी केली. यापूर्वी मी अशी यंत्रे एस्सेल वर्ल्डसारख्या अॅम्यूजमेंट पार्कमध्ये पाहिली होती, पण जत्रेतले पाळणे, झोपाळे वगैरे उभारावेत तितक्या सहजपणे त्यांनी ती सगळी अवजड यंत्रे त्या शाळेच्या आवारात उभी केली. बाजूला अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खेळण्याची दुकाने वगैरे थाटली गेली. ठरल्याप्रमाणे तो उरूस सुरू झाला आणि तीन दिवस चालला. त्यात सामील होणाऱ्यांमध्ये मुलांची तर गर्दी होतीच, त्यांच्या जोडीला पालक मंडळीही मोठ्या संख्येने आलेली दिसत होती. सगळ्या राईड्स व्यवस्थित चालत होत्या आणि त्यांची मजा घेण्यासाठी लोक रांगा लावत होते. एकंदरीत या जत्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. एक स्टेज उभे करून त्यावर थोडे नाचगाण्यांचे कार्यक्रम, काही लिलाव, लॉटरीच्या सोडती वगैरे करून त्यात अधिक रंगत आणली होती. 


फेस्टिव्हल संपल्यावर दुसरे दिवशी पाहिले तर तिथे काही घडून गेल्याचा मागमूसही शिल्लक नव्हता.  तिथून सगळी यंत्रे तर हलवली होतीच, पण त्यांना आधी उभी करण्यासाठी कुठेही जमीन खोदलेली नव्हती. त्या शाळेच्या सिमेंट काँक्रीटने मढवलेल्या पार्किंग लॉटमध्ये ती फक्त उभी केली होती आणि त्यांच्या खडखडाटाने तिथल्या जमीनीला काही धक्का बसला नव्हता हे पाहून मला थोडे आश्चर्य आणि त्यांच्या इंजिनियरिंगचे कौतुक वाटले. त्या पार्किंग लॉटचे डिझाईनच एकाद्या हॅलीपॅड किंवा रॉकेट लाँचिंग पॅडसारखे मजबूत केलेले असावे. फूड स्टॉल्स आणि काही लहान खेळांचे तंबू लॉनमध्ये उभे केले होते. त्यासाठी काही खुंट्या ठोकाव्या लागल्या असतीलही, पण ती सगळी जागा साफसूफ करून खड्डे बुजवून त्यावर नवे गवत लावून ते पहिल्यासारखे केलेले दिसत होते.     

Friday, November 29, 2019

सॅनफ्रॅन्सिस्कोची सफर



आजकालच्या लहान मुलांना यूएसएबद्दल इत्थंभूत माहिती असते, पण मी शाळेत शिकत असतांना आम्हाला कुठल्या तरी इयत्तेतल्या  भूगोलामध्ये 'अमेरिकेची संयुक्त संस्थाने' या नावाचा एक धडा असायचा.  त्यात जेवढे लिहिलेले असे तेवढेच मला माहीत होते. न्यूयॉर्क हे त्या काळातले जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर होते, तिथे एंपायर स्टेटसारख्या जगातील सर्वात जास्त उंच इमारती होत्या, जगातील सर्वात उंच असा स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा होता, संयुक्त राष्ट्रांचे (यूनोचे) ऑफीस तिथे होते वगैरे कारणांमुळे न्यूयॉर्क हे नंबर वन शहर होते. असे असले तरी त्या देशाची राजधानी मात्र वॉशिंग्टन इथे होती. शिकागो इथे स्वामी विवेकानंदांनी एक मस्त भाषण करून सर्वांची मने जिंकली होती एवढ्या कारणासाठी ते शहर लक्षात राहिले होते. त्याशिवाय अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पॅसिफिक महासागराच्या किनारी सॅनफ्रँसिस्को नावाचे मोठे बंदर होते आणि तिथे जगातला सर्वात मोठा पूल होता. आणखी कुठे तरी हॉलीवुड नावाच्या ठिकाणी सगळे इंग्रजी सिनेमे काढले जात असत. त्या काळातल्या परीक्षेत भूगालाच्या पेपरातल्या एकाद्या प्रश्नाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी एवढी माहिती पुरेशी होती.  शाळा सोडल्यानंतर तिचाही काही उपयोग होणार असेल असे मला तेंव्हा वाटत नव्हते. त्यामुळे मला तरी तेंव्हा अमेरिकेच्या बाबतीत याच्या पलीकडे काही इंटरेस्ट नव्हता.

पण मोठेपणी माझा अनेक प्रकारांनी अमेरिकेशी संबंध येत गेला आणि माझे सामान्यज्ञान वाढत गेले. अकरा वर्षांपूर्वी मी अमेरिकेला पहिली भेट दिली त्या वेळी नायगाराचा धबधबा, न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन वगैरेकडचा भाग पाहिला होता. या वर्षी मी लॉसएंजेलिसजवळ असलेल्या टॉरेन्सला आल्यावर थोडेसे हॉलीवुड पाहिले होते. सॅनफ्रॅन्सिस्को या शहराबद्दल मात्र मला लहानपणापासून उत्सुकता होती आणि लॉसएंजेलिसप्रमाणे ते शहरही कॅलिफोर्नियामध्येच असल्यामुळे माझ्या या वेळी पहायच्या यादीत होते.

सॅनफ्रॅन्सिस्को इथे भारताची वकीलात आहे. माझ्या मुलाचे तिथे काही काम निघाले आणि त्या निमित्याने आम्ही सर्वांनीच सॅनफ्रॅन्सिस्कोला जाऊन यायचे ठरले. लॉसएंजेलिसपासून सॅनफ्रॅन्सिस्को सुमारे चारशे मैल दूर आहे, म्हणजे मुंबईहून अहमदाबाद, हैद्राबाद किंवा पणजीपेक्षा थोडेसेच जास्त अंतरावर आहे. मुंबईहून या तीन्ही शहरांना जाण्यासाठी रेल्वे आणि बसेसची सुरेख व्यवस्था आहे. रात्रीचा प्रवास करून सकाळी तिथे पोचायचीही सोय आहे. पण इथे अमेरिकेत त्यातले जे काही आहे ते फारसे सोयिस्कर नसावे. इथे सर्वांकडे स्वतःच्या मोटारी असतातच आणि बहुतेक लोक विमानाने किंवा स्वतः गाडी चालवूनच प्रवास करतात असे समजले.  ज्यांना यातले एकही शक्य नसेल असे लोकच रेल्वे किंवा बसचा विचार करतात.  आम्ही पाच जण होतो. इतक्या सगळ्यांनी विमानाने जाणे महाग पडले असते. त्यामुळे आमचे कारने जायचे ठरले.

एका शनिवारी दुपारी आम्ही रहात असलेल्या टॉरेन्स या गावातून निघालो. आमच्या घरापासून तीन चार मैलांच्या अंतरावरूनच उत्तरेकडे जाणारा महामार्ग जातो. पण आमच्या जीपीएसच्या मनात काय आले कोण जाणे त्याने आम्हाला लॉसएंजेलिसच्या शहरी भागातूनच तासभर फिरवले आणि वीस पंचवीस मैल इकडे तिकडे भटकल्यानंतर आम्ही महामार्गाला लागलो.  कॅलिफोर्नियाच्या या भागात खूप डोंगर आहेत. इथून फक्त वीसपंचवीस मैलांवर घनदाट झाडी आहे. तिथे बऱ्याच वेळा वणवे पेटलेले असतात आणि ते विझवण्यासाठी सरकारला खास मोहिमा उघडाव्या लागतात. तरीही ते आटोक्यात येत नाहीत त्यामुळे रहिवाशांना सुरक्षित जागांवर हलवावे लागते अशा बातम्या नेहमी येत असतात. पण आम्हाला दिसलेले डोंगर मात्र उघडे बोडकेच होते. त्यावर लहान लहान झुडुपे आणि अगदी तुरळक काही मोठी झाडे होती. त्यामुळे वन्य प्राणी दिसण्याची शक्यताच नव्हती. एक बऱ्यापैकी वळणावळणांचा घाट पार केल्यानंतर मात्र सपाट जमीन लागली त्यावर दोन्ही बाजूंना नजर पोचेल तिथपर्यंत शेते पसरली होती. त्या शेतांमध्ये कुठली पिके घेतली जात होती ते काही मला ओळखता आले नाही, पण यांत्रिक शेती असल्यामुळे क्षितिजापर्यंत एकच एक सलग गालिचा पसरल्याचा भास होत होता. बैलजोडी घेऊन शेतात काम करणारा शेतकरी दिसण्याची काही शक्यता तर नव्हतीच, पण एक दोन ठिकाणी मेंढ्या आणि गुरांचे कळप दिसले. त्या दिवशी कुठले यंत्रही तिथे काही हालचाल करतांना दिसले नाही. पाच वाजेपर्यंत सूर्य मावळून काळोख पसरला आणि आम्ही आमच्या गाडीच्या दिव्यांनीच उजळलेले रस्त्यांमधले रिफ्लेक्टर्स पहात मार्गक्रमण सुरू ठेवले.

रात्री दहाच्या सुमाराला आम्ही सॅनफ्रॅन्सिस्कोच्या अलीकडे असलेल्या मिलब्रा नावाच्या गावी जाऊन पोचलो. इंटरनेटवरूनच आम्ही आमची रहाण्याची व्यवस्था तिथल्या एका बी अँड बी घरात केली होती. त्या घराचा पत्ता आणि दरवाजा उघडण्याचे कोडवर्ड्स आम्हाला ई मेलने कळवले गेले होते. घर नंबर शोधत शोधत आम्ही तिथे जाऊन पोचलो. "तिळा तिळा दार उघड" म्हणत ते उघडले तर समोर फक्त खाली उतरण्याच्या पायऱ्या होत्या. चांगल्या पन्नास पायऱ्या उतरून गेल्यावर आणखी एक दरवाजा दिसला, तो उघडून आम्ही आत प्रवेश केला. आम्ही इतक्या खाली उतरून गेलो असलो तरी ते तळघर नव्हते. ते दार्जिलिंगसारख्या डोंगराळ ठिकाणी असतात तसे डोंगराच्या उतारावर बांधलेले घर होते. बाहेरच्या खोलीत एक टेबल आणि पाचसहा खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या टेबलावर दूध, साखर, पॉवडर वगैरे चहा कॉफी तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ ठेवले होते. एका बाजूला स्वयंपाकाचा ओटा होता आणि खणात आवश्यक अशी भांडी ठेवली होती, तसेच त्यांचा उपयोग करून झाल्यावर ती स्वच्छ घासूनपुसून परत ठेवावीत अशा सूचना देणारे फलक होते. आम्हाला इथे कसलीही सेवा मिळणार नव्हती पण आपल्या आपण काही तयार करून खायची सोय होती.

इकडल्या महामार्गांवर रोडसाइड ढाबे नसतात. तीनचारशे मैलांच्या रस्त्यात फक्त एक दोन जागी विश्रांतीस्थाने दिसली आणि तिथे कॉफी किंवा इतर पेये आणि त्यांबरोबर खाण्यासाठी पिझा, बर्गर, रॅप्स, टॉर्टिला यासारखी खाद्ये मिळत होती. आम्ही खाण्यापिण्याचे भरपूर पदार्थ सोबत आणले होतेच, थोडे त्या ठिकाणी घेऊन भूक भागवली होती. बी अँड बीला पोचल्यावर गरमागरम कॉफीबरोबर बिस्किटे, टोस्ट वगैरे खाऊन झोपायची तयारी केली. आतल्या खोलीत पाच लोकांसाठी पुरेशी झोपायची व्यवस्था होती.  दुसऱ्या दिवशी काय काय पहायचे यावर अंथरुणावर पडल्यापडल्या थोडे संशोधन आणि विचार विनिमय केला. मोठ्या शहरांमध्ये 'हॉप ऑन हॉप ऑफ' बसेस असतात, तशीच एक बस घ्यावी असे तेंव्हा वाटले.

रविवारी सकाळी उठून सगळ्यांनी खाऊन पिऊन तयार होण्यात जरा वेळ गेला. आम्ही सॅनफ्रॅन्सिस्कोच्या बाहेर मिलब्रा इथे रहात असल्यामुळे ती पर्यटकांची बस पकडण्यासाठी आधी त्या बसच्या एकाद्या स्टॉपपर्यंत जाणे आवश्यक होते. जिथे गाडी उभी करून बसने पुढे जाता येईल अशी ठिकाणे पाहता 'गोल्डन गेट पार्क' हे एक नाव दिसले. आम्ही जीपीएसच्या आधाराने तिथपर्यंत जाऊन पोचलो. हे पार्क म्हणजे नुसताच प्रचंड विस्तार असलेली बाग आहे आणि त्यात शेकडोंनी मोठमोठाले वृक्ष उभे आहेत. आम्ही गेलो त्या वेळी तिथे अनेक लोक जॉगिंग करत होते. असे धावत किंवा फिरत फिरत तास दीड तास वेळ घालवण्यासाठी ही चांगली जागा होती. आम्ही त्या बागेच्या आतूनच कारमध्ये बसून एक फेरफटका मारला पण आम्हाला मुद्दाम 'पाहण्यासारखे' असे काहीच तिथे आढळले नाही. तिथे आमची गाडी उभी करायला भरपूर जागा असली तरी त्या 'बिगबस'चे नामोनिशाणही दिसले नाही. माणशी पन्नास डॉलर्स घेऊन ते बसवाले असली पंधरा वीस ठिकाणे दाखवत असतील तर एवढी दगदग करण्यापेक्षा आपणच मिळतील तेवढी प्रेक्षणीय ठिकाणे पहायचे ठरवले.


मी लहानपणापासून 'गोल्डन गेट ब्रिज'चे नाव ऐकलेले होते आणि हा पूल त्याच नावाच्या पार्कच्या जवळच असणे अपेक्षित होते म्हणून आम्ही आधी तो पूल पहायचे ठरवून तिकडे आपला मोर्चा वळवला. जीपीएसवर 'गोल्डन गेट ब्रिज' शोधता शोधता आमची गाडी सरळ त्या पुलावरच गेली.  हावडा ब्रिजसारखा हाही एक पोलादी बांधणीचा सस्पेन्शन ब्रिज आहे.  सॅनफ्रॅन्सिस्कोचे आखात (Bay) आणि प्रशांत महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीच्या (Strait) मुखाला गोल्डन गेट असे म्हणतात. पॅसिफिक महासागरातून येणाऱ्या बोटी या  मैलभर रुंद अशा अरुंद खाडीतून प्रवेश करतात म्हणून हे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरचे प्रवेशद्वार आहे असे म्हणता येईल. त्या खाडीवर हा पूल बांधला आहे. त्याच्या दक्षिणेच्या बाजूला सॅनफ्रॅन्सिस्को शहर आणि उत्तरेच्या बाजूला मॅरीन कौंटीमधला डोंगर आहे. सुमारे ९००० फूट (पावणेदोन मैल) लांब, ९० फूट रुंद आणि साडेसातशे फूट उंच असा हा पूल १९३७ मध्ये बांधून पूर्ण झाला. त्या वेळी तो जगातील सर्वात लांब केबल सस्पेन्शन ब्रिज होता आणि त्याचे मनोरे जगातील सर्व पुलांमध्ये सर्वात उंच होते. अशा प्रकारे तो सर्वच दृष्टींनी जगातला सर्वात मोठा पूल होता आणि पुढील जवळजवळ पन्नास वर्षे राहिला. ऐंशी वर्षे जुना असलेल्या या पुलावरून आजही रोज एक लाखांहून अधिक वाहने येजा करत असतात. जहाजांना बेमध्ये जाण्यायेण्यासाठी खाडीमधील पाण्यापासून पुलाखाली चार हजार फूट रुंद आणि दोनशे फूट उंच इतकी जागा ठेवली आहे. त्यातून बोटींची ये जा सुरू असते.
 
गोल्डन गेट ब्रिज पार करून पलीकडे गेल्यानंतर व्हिस्टा पॉइंट नावाची जागा आहे. तिथे एका प्रशस्त मोकळ्या जागेत कठडे बांधून पर्यटकांना हिंडण्या फिरण्यासाठी चांगली व्यवस्था केली आहे. जहाजांसाठी खूप उंच खांब बांधून त्यावर हा पूल बांधला असल्यामुळे ही जागासुद्धा चांगल्या उंचीवर आहे. तिथून हा पूल तर दिसतोच शिवाय दूरवर नजर टाकून  सॅनफ्रॅन्सिस्को शहरासह पाचदहा मैलांपर्यंतचा परिसर दिसतो.  इथे रोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. इथे 'The Lone Sailor memorial' या नावाचे एक नाविकांचे स्मारक आहे त्यात एका अमेरिकन सेलरचे प्रतीकात्मक शिल्प आहे. गोल्डन गेटमधून पॅसिफिक महासागरात स्वदेशासाठी गेलेल्या सर्व  दर्यावर्द्यांची प्रतीके दाखवणारी म्यूरल्स या ठिकाणी आहेत. त्यात नौदलाच्या शाखा (the Navy, the Marine Corps, the Coast Guard) तसेच व्यापारी जहाजांवरील नाविक (The Merchant Marine) यांचा समावेश होतो.

व्हिस्टा पॉइंटला तासभर वेळ घालवून फोटोबिटो काढून झाल्यावर आम्ही फिशरमॅन्स व्हार्फला जायचे ठरवले. खरे तर ही जागा खाडीच्या पलीकडल्या बाजूला थोडी समोरच्या बाजूलाच होती आणि आम्ही गोल्डन गेट ब्रिजवरूनच परतून पुन्हा पलीकडे गेलो असतो तर तिथे लवकर पोचलो असतो. पण आमच्या गाडीमधल्या जी पी एसने आम्हाला उलट दिशेने जायला लावले आणि आम्ही तिथल्या डोंगरांमधले सृष्टीसौंदर्य पहात वळसा घालून गेलो. त्या मार्गावर रिचमंड ब्रिज आणि ओकलँड बे ब्रिज हे  सॅनफ्रॅन्सिस्कोच्या आखातावरले आणखी दोन मोठे आणि नवे पूल पहायला मिळाले. तसेच  सॅनफ्रॅन्सिस्को डाऊन टाऊनचे सगळ्या बाजूंनी दर्शन घडले. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन किंवा आपल्या मुंबईतल्या नरीमन पॉइंटप्रमाणे सॅनफ्रॅन्सिस्कोच्या या भागात अनेक गगनचुंबी इमारती दाटीवाटीने उभ्या आहेत. त्यांच्या आकारांमध्ये जरा जास्त विविधता असल्यामुळे त्या दुरून पहायला छान वाटतात.


फिशरमॅन्स व्हार्फ हे पूर्वीच्या काळातले मच्छीमारांचे बंदर असणार. आज ते पर्यटकांचे सर्वात आवडते ठिकाण झाले आहे. तिथे समुद्रकिनाऱ्यावर असंख्य लहान लहान दुकानांची एक प्रचंड बाजारपेठ आहे किंबहुना नेहमीच एक कायम स्वरूपाची जत्रा भरलेली असते. त्यात अनेक रेस्तराँ, फूड स्टॉल्स, शोभेच्या किंवा आठवण म्हणून घेऊन जायच्या छोट्यामोठ्या वस्तूंची दुकाने, खेळण्यांची दुकाने वगैरेंची भाऊगर्दी आहे. तसेच रस्त्यावर कसरतीचे किंवा हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारे, विदूषकी चाळे करणारे, हातापायाने आणि तोंडाने एकाच वेळा अनेक वाद्ये वाजवून दाखवणारे, तीनचार जण मिळून लोकप्रिय इंग्लिश गाणी गाणारे, त्यावर ठेका धरून नाचणारे, झटपट फोटो काढून देणारे, हुबेहूब रेखाचित्र किंवा व्यंगचित्र (कॅरीकेचर) काढून देणारे असे अनेक कलाकार रस्त्यातच आपली कला सादर करत असतात आणि हजारोंच्या संख्येने जगभरातून आलेले पर्यटक  एका हातात काही तरी धरून ते खात पीत आणि या सगळ्यांचा आनंद घेत गप्पाटप्पा करत निवांत भटकत फिरत असतात. त्यांचे चित्रविचित्र पोशाख, चेहऱ्यावरील रंगरंगोटी आणि हातवारे वगैरे पाहणेसुद्धा खूप मनोरंजक होते. आम्हीही त्या गर्दीत सामील झालो आणि इतरांच्या मौजेचे कारण बनलो.

कॅलिफोर्नियामध्ये खेकडे हा खूप लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यांवरील खाऊगल्ल्यांमध्ये क्रॅबचे अनेक प्रकार खायला मिळतात. आपल्याकडे वडापावचे स्टॉल असावेत तसे क्रॅब फूड पुरवणारे रेस्तराँ जिकडे तिकडे दिसत होते. त्यातले जे सर्वात मोठे आणि पॉश दिसणारे होते त्यात आम्ही शिरलो. प्लेट किंवा थाळीच्या आकाराचे मोठमोठे खेकडे असतात हे मी प्रथमच तिथे ऐकले. असा एक खेकडासुद्धा कदाचित जरा जास्तच झाला असता म्हणून आम्ही अर्धाच घेतला आणि त्याच्या जोडीला इतर काही सर्वसामान्य खाद्यपदार्थ घेतले. भरपूर तेलात तिकडच्या खास मसाल्यांसह खरपूस भाजलेला खेकडा समोर आला तेंव्हा त्याला कसे खायचे हे आधी समजत नव्हते, पण आजूबाजूचे लोक काय करतात हे पाहून आम्ही शिकून घेतले.

सॅनफ्रॅन्सिस्कोच्या आखातात अल्काट्राझ (Alcatraz) नावाचे एक लहानसे बेट आहे. त्या बेटावर एक खूप जुना दीपस्तंभ आहे. तिथे मिलिटरीचे ठाणे होते आणि अतिसुरक्षित असा तुरुंग होता. तिथून कुणीही निसटून जाऊ शकत नाही अशी त्याची ख्याती होती. अत्यंत खतरनाक अशा गुन्हेगारांना तेथे डांबून ठेवले जात असे. आता तेसुद्धा एक पर्यटनस्थळ झाले आहे. हे बेट फिशरमॅन्स व्हार्फ किनाऱ्यावरून समोरच दिसते.  गेट वे ऑफ इंडियापासून एलेफंटा बेटावर जाऊन येण्यासाठी असतात तशा या बेटावर जाऊन येण्यासाठी किनाऱ्यावरून मोटर लाँचेसची सोय आहे. त्याचप्रमाणे इथेही लाँचमध्ये बसवून अर्धापाऊण तास आखातामधून फिरवूनही आणतात. त्या बेटावर जाऊन फिरून येण्याइतका वेळ आमच्याकडे शिल्लक नव्हता म्हणून आम्ही एका लहानशा लाँचमध्ये बसून एक लहानसा फेरफटका मारून आलो.

त्या नौकेत आमच्यासकट जेमतेम दहाबारा प्रवासी होते. तिचा चालक खूपच बोलका आणि मस्तमिजाज होता. त्याने ती नाव चालवत असतांना आजूबाजूला दिसणाऱ्या आगबोटी, पाणबुडी, पूल, बेट, मासे, खेकडे वगैरेंवर खुमासदार भाष्य करत आमचे चांगले मनोरंजन केले. नावेतल्या प्रवाशांना आळीपाळीने बोलावून त्यांच्या हातात नावेचे चाक दिले आणि डोक्यावर कॅप्टनची कॅप घालून फोटो काढू दिले.  एका ठिकाणी एका खडकावर पन्नाससाठ सीलायन्सचा थवा होता. त्यातले बरेचसे निवांतपणे पहुडले होते, पण काहीजणांची खूप दंगामस्ती आणि कर्कश आरडाओरड चालली होती. हे प्राणी दिसायला मुळीच गोंडस नसतात, पण भारतात आपल्याला कधी पहायला मिळत नाहीत म्हणून त्यांचे कौतुक.  या लाँचमधल्या फेरीत आम्हाला गोल्डन गेट ब्रिज आणि अल्काट्राझ आयलंडही जवळून आणि थोडे लक्षपूर्वक पहायला मिळाले.

नौकानयन करून झाल्यावर आम्ही आणखी काही वेळ तिथल्या गर्दीतून फिरत राहिलो. तिथे काही प्रेक्षणीय अशी म्यूजियम्सही होती. ऐतिहासिक काळातल्या आगबोटी आणि एक पाणबुडी किनाऱ्यालगत उभी करून ठेवली होती. हे सगळे नीट पहाण्यासाठी तीन चार दिवस लागले असते. पण इतका वेळ कुणाकडे असतो? आम्हीसुद्धा काही जागा वर वर पाहिल्या तोपर्यंत दिवस मावळायला आला होता आणि पाय दुखायला लागले होते.

दुसरे दिवशी आम्हाला भारतीय वकीलातीत जाऊन आमचे मुख्य काम करायचे होते. तिथे माझ्या अपेक्षेच्या मानाने खूपच चांगली व्यवस्था होती. यापूर्वी मी बर्मिंगहॅमच्य भारतीय वकीलातीचे ऑफीस पाहिले होते तिथे गर्दीचा महापूर होता. आम्हाला त्या इमारतीत शिरणेसुद्धा कठीण झाले होते. सॅनफ्रॅन्सिस्कोच्या कॉन्सुलेटमध्ये मुख्य म्हणजे गर्दी नव्हती, सर्वांना बसायला जागा होती आणि सिक्यूरिटीचा बाऊ नव्हता. आता सरकारी काम म्हणजे काही फॉर्म भरणे आले. त्यावर फोटो चिकटवायचे होते आणि आम्ही ते आणलेले नव्हते. ते लोक फीचे पैसे रोख किंवा क्रेडिट कार्डाने घेत नव्हते. ते मनीऑर्डरसारख्या प्रकाराने ट्रान्स्फर करून त्याची पावती फॉर्मला जोडायची होती. पण गंमत म्हणजे तिथे जवळच सीव्हीएस फार्मसी नावाच्या दुकानाची शाखा होती. तिथे ही सगळी कामे करून झाली. फीचे पैसे पाठवले, पावती घेतली, फोटो काढून त्याच्या प्रिंट्स काढून घेतल्या आणि आम्ही पुन्हा वकीलातीत जाऊन ते फॉर्म दिले.  आता आम्हाला पाहिजे असलेली कागदपत्रे नंतर मिळणार होती.


मधल्या काळात आम्ही पुन्हा सागरकिनाऱ्याजवळ जाऊन तिथे असलेल्या गिरार्डेलीच्या आइस्क्रीमफॅक्टरीमध्ये गेलो. तीसुद्धा एक प्रेक्षणीय जागा आहे. एका मोठ्या हॉलमध्ये एका बाजूला आइस्क्रीम तयार करण्याच्या प्रक्रियेत लागणारी यंत्रसामुग्री व्यवस्थितपणे मांडून ठेवली आहे आणि तिथे बसून खाण्यासाठी किंवा पॅक करून नेण्यासाठी दिसायला आकर्षक आणि खायला चविष्ट असे आयस्क्रीम्सचे अनेक प्रकार अनेक प्रकारच्या काँबिनेशन्समध्ये  उपलब्ध आहेत. ते सगळेच इतके चांगले वाटतात की काय काय घ्यावे ते कळत नाही, पण एकेक डिशसुद्धा इतकी मोठी असते की ती संपवता संपत नाही. आइस्क्रीम खाऊन आम्ही वकीलातीत परत आलो तोवर ती जेवणाच्या सुटीसाठी बंद झाली होती. मग आम्हीपण जेवण करून यायचे ठरवले.

जेवण करण्यासाठी आम्ही तिथल्या चायनाटाऊनमध्ये गेलो. तिथे गेल्यावर मात्र आपण खरेच चीनमध्ये गेल्यासारखे वाटावे इतके सबकुछ चिनी वातावरण होते. दुकानांवरल्या पाट्या आणि आतले बोर्ड चित्रमय चिनी लिपीत होते, तिथले विक्रेते आणि गिऱ्हाइके सगळेच मंगोल वंशाचे चिनी लोक होते आणि ते चँगचिंगमिंगफँग असले काही तरी अगम्य पण खूप बोलत होते. कॅलिफोर्निया हा भाग अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे आणि पॅसिफिक महासागराच्या पलीकडल्या बाजूला असलेल्या चीनमधून खूप मोठ्या संख्येने चिनी लोक तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत. बहुतेक शहरांमध्ये त्यांनी स्वतःच्या वेगळ्या वस्त्या वसवल्या आहेत आणि त्यात न राहणारे चिनी लोकसुद्धा बाजारहाट करण्यासाठी त्यांच्या चायनाटाऊनला जात असतात. तिथे खास चिनी अन्न पदार्थ विकणारी अनेक दुकाने तर आहेतच, त्यांच्या किराणा मालाची, भाज्यांची आणि फळांची दुकानेसुद्धा होती.

आम्ही एक बऱ्यापैकी दिसणारे हॉटेल निवडले. तिथे इंग्रजी समजणारी वेटर होती तिच्या मदतीने आम्हाला रुचतील आणि पचतील असे चिनी खाद्यपदार्थ मागवले. आम्हाला तिथे पोचायला थोडा उशीर झाला होता आणि त्यांच्या खानसाम्यांनाही भुका लागल्या होत्या त्यामुळे आमचे जेवण लगेच समोर आले. थोड्या वेळाने त्यांचे बल्लवाचार्यसुद्धा बाहेर येऊन दुसऱ्या टेबलावर जेवायला बसले.

त्या दिवशी आम्ही सकाळीच आमच्या बी अँड बीमधून चेक औट करून आमचे सामान कारच्या डिकीत ठेवले होते. चायनाटाऊन पाहून आम्ही तडक वकीलातीत गेलो, आमची कागदपत्रे तयार होतीच, ती गोळा केली, परतीच्या वाटेत खाण्यापिण्यासाठी काही तयार खाद्यपदार्थ विकत घेतले, कारची टाकी फुल करून घेतली आणि सॅनफ्रॅन्सिस्कोला टा टा बाय बाय करून परतीच्या प्रवासासाठी प्रयाण केले. 

सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये विशेष जाणवण्यासारखी एक गोष्ट दिसली ती म्हणजे तिथला उंचसखल भूप्रदेश (Uneven terrain). या ठिकाणी पॅसिफिक महासागराचा काही भाग जमीनीत घुसून एक आखात तयार झाले आहे तसेच ते सगळ्या बाजूने वेढले जात असतांना समुद्रात घुसलेल्या एका डोंगरावर हे शहर वसवले आहे.  (नकाशा पहा.)  तिथली जमीन कमालीच्या खाचखळग्यांनी भरलेली आहे. आम्हाला तरी कुठेही सलग अशी मोठी सपाट जमीन दिसलीच नाही. बहुतेक रस्त्यांवर इतके कमालीचे चढउतार होते की समोरच्या चौकातले ट्रॅफिक सिग्नल दिसत होते, पण त्याच्या पलीकडे असलेला रस्ता किंवा त्यावरची वाहने दिसत नव्हती, ते सगळे खोल दरीत गडप झाल्यासारखे वाटायचे. चायना टाऊनमधल्या एका गल्लीतल्या इमारतीचा तळमजला शेजारच्या गल्लीतल्या इमारतीच्या गच्चीच्या लेव्हलला होता. शिवाय नो एन्ट्री, नो लेफ्ट, नो राइट वगैरेंचे सिग्नल जिकडे तिकडे लावलेले. त्यामुळे सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये गाडी चालवण्यात चालकाच्या कौशल्याचा कस लागतो तसेच कारचे ब्रेक आणि अॅक्सलरेटरही चांगले शक्तीशाली असावे लागतात. कुठल्याही गल्लीत शिरल्यानंतर त्यातून बाहेर पडायच्या वेळी समोर कोणते दृष्य असेल याचा थोडा सस्पेन्सच असायचा. आपले पुणे आणि बंगळूर ही शहरेसुद्धा अनेक टेकड्यांवर वसलेली असली तरी तिथे मी इतके भयानक चढउतार पाहिले नाहीत. शिवाय सॅनफ्रॅन्सिस्कोमधले बहुतेक डोंगर गर्द वनराईने झाकलेले होते आणि पहावे तिकडे हिरवे गार दिसत होते. मी तरी अशा प्रकारचे दुसरे कोणते शहर पाहिले नाही. त्यामुळे हाही एक वेगळा अनुभव मिळाला.
------------------------------

Tuesday, November 19, 2019

परमहंस योगानंद यांचा आश्रम



परमहंस योगानंद या नावाचे एक प्रख्यात जगद्गुरू होऊन गेले, पण मी मात्र हे नाव कधी ऐकलेच नव्हते. सात आठ महिन्यांपूर्वी माझ्या एका वॉट्सअॅप ग्रुपवर रोज स्वामी योगानंदांचे सुविचार यायला लागले. "परमात्मा सगळीकडे भरला आहे तसा तो तुमच्यातही आहे. त्याची ओळख पटवून घेणे हे तुमचे कर्तव्य तर आहेच, एकदा ती पटवून घेतलीत तर तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे याची जाणीव तुम्हाला होईल." सर्वसाधारणपणे अशा अर्थाचे हे संदेश मी दोन तीन वेळा वाचल्यानंतर ते वाचणे सोडून दिले होते. असे काही तरी अगम्य पण गोड गोड बोलून भक्तांना भुलवणारा आणखी एकादा बाबा अवतीर्ण झाला असावा असे मला त्यावेळी वाटले होते. मला त्याची जास्त चौकशी करण्यातही रस वाटला नाही.

इथे अमेरिकेत आल्यानंतर दिवाळीच्या निमित्याने ठेवलेल्या एका पार्टीमध्ये भेटलेल्या इथल्या एका माणसाने माझी चौकशी करता करता मी इथे आल्यापासून काय काय पाहिले ते सहज विचारले.
"अमके तमके बीच, गेटी म्यूजियम" वगैरे काही नावे मी सांगितली.
मग त्याने विचारले, "परमहंस योगानंदांचा आश्रम पाहिलात की नाही?"
"हे कोण योगानंद ?" मी प्रतिप्रश्न केला.
"तुम्हाला परमहंस योगानंद माहीत नाहीत ?"  त्याला थोडे आश्चर्यच वाटले. कारण अमेरिकेत एवढा प्रसिद्ध झालेला हा भारतीय गुरु भारतात तर सगळ्यांनाच ठाऊक असणे त्याला अपेक्षित होते. पण मला आध्यात्मात गोडी नसल्यामुळे मला अशा साधूबाबांची फारशी माहिती असत नाही.

काही दिवसांनी मी माझ्या कॉलेजमधल्या एका जुन्या मित्राला भेटायला गेलो. तो गेली चाळीस वर्षे अमेरिकेत राहून इथलाच नागरिक झालेला आहे. त्याच्या घराच्या हॉलमध्ये समोरच परमहंस योगानंदांची मोठी तसबीर लावून त्याला भरघोस पुष्पहार घातला होता. त्यांच्याबद्दल तो अत्यंत श्रद्धेने बोलत होता. अर्थातच तो त्यांचा भक्त झाला होता.
"तुझे हे गुरु कुठे राहतात?" मी त्याला विचारले.
"अरे त्यांनी तर सन १९५२ मध्येच समाधी घेतली. पण त्यांनी सुरू करून दिलेल्या संस्थांचे जगभर शेकडो ठिकाणी आश्रम आहेत आणि त्यांची हजारो वचने, भजने, प्रवचने वगैरे उपलब्ध आहेत." माझ्या मित्राने माहिती दिली.


हे परमहंस योगानंद गोरखपूर इथे घोष आडनावाच्या एका बंगाली कुटुंबात सन १८९३मध्ये जन्माला आले. त्यांना लहानपणापासूनच धार्मिक ओढा होता. त्यांना  श्रीयुक्तेश्वर गिरी नावाचे गुरु भेटले आणि ते आध्यात्माकडे वळले. गुरूच्या माध्यमातून त्यांना ईश्वराचाच असा आदेश आला की त्यांनी भारताबाहेरील जगाला उद्धाराचा मार्ग दाखवावा. म्हणून ते सन १९२० मध्ये अमेरिकेत गेले आणि तिथेच राहिले. त्यांनी अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये दौरे करून ठिकठिकाणी व्याख्याने दिली आणि मार्गदर्शन करणारी  पुस्तके लिहिली. त्यामधील एका योग्याचे आत्मचरित्र ( अॅन ऑटोबायॉग्राफी ऑफ ए योगी) या पुस्तकाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि त्यांच्या चाळीस लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यामधून जगातील लक्षावधी लोकांचे जीवन बदलले आहे, ते सन्मार्गाला लागले आहेत असा दावा आहे.

आंतरराष्ट्रीय ख्याति प्राप्त झालेल्या या योग्याचा भारत सरकारनेही सन्मान करून त्याच्या स्मरणार्थ पोस्टाची दोन तिकीटे काढली आहेत. त्यांच्या जन्माला १२५ वर्षे झाली या निमित्याने गेल्या महिन्यातच त्यांच्या स्मरणार्थ १२५ रुपयांचे नाणे काढले आहे. त्याचे उद्घाटन अर्थमंत्री श्रीमती सीतारामय्या यांनी केले.

 इथे लॉस एंजेलिसलाच दोन तीन ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्या मित्राच्या घरापासून त्यातल्या त्यात जवळ म्हणजे तीन चार मैलांवर असलेल्या आश्रमात तो जवळ जवळ रोज जाऊन प्रवचने ऐकतो आणि ध्यान धारणा समाधी वगैरे उपासना करत असतो.  लेक श्राइन नावाचा योगानंदांचा आश्रम अतीशय रम्य आणि पाहण्यासारखा आहे, तो तरी मी पाहावाच असे माझ्या मित्राने आग्रहाने सांगितले.

काल रविवारचा दिवस होता तेंव्हा आपण हा आश्रम पाहूनच यावा असे मलाही वाटले. तो आमच्या घरापासून सुमारे पंचवीस मैलांवर अंतरावर असल्याने सुमारे पाऊण तासाचा ड्राइव्ह होता. मुलाने गाडी काढली आणि आम्ही तेवढ्या वेळात तिथे जाऊन पोचलो. लॉस एंजेलिसच्या जवळच असलेल्या पॅसिफिक पॅलिसेड्स नावाच्या गावात हा लेक श्राइन नावाचा आश्रम आहे. परमहंस योगानंद यांनी स्थापन केलेल्या सेल्फ रिअलायजेशन फेलोशिप या मुख्य संस्थेने त्यांच्या हयातीतच हा आश्रम बांधला आहे. इथे समुद्रकिनाऱ्याला लागूनच एक मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या उतारावर सनसेट बुलेवार्ड नावाच्या वळणावळणाच्या घाटासारख्या रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत हे श्राइन बांधले आहे.


इथून समुद्रकिनारा दिसत नाही, पण या परिसरातच एक सुंदर लहानसे नैसर्गिक तळे आहे. एका चिमुकल्या धबधब्यामधून त्यात सतत पाणी पडत असते. बहुधा ते पंप करून पुन्हा टेकडीवर नेत असतील किंवा तो खराच झरा असला तर ते पाणी कुठल्याशा प्रवाहात सोडत असतील. त्या तळ्यात सुंदर बदकांचे थवे पोहत होते, दोन सुरेख राजहंसही विहार करत होते. माणसांना न घाबरता ते सगळे पक्षी किनाऱ्यावर अगदी हाताच्या अंतरावर जवळ येत होते. तसेच त्या तळ्याच्या पाण्यात मोठमोठे चांगले हात हातभर लांब असे अनेक रंगीबेरंगी मासेही मस्त सुळसुळत होते. त्यांना पाहून मला पुण्याच्या पु ल देशपांडे जपानी उद्यानाची आठवण झाली.

तळ्याच्या सगळ्या बाजूंनी भरगच्च झाडे लावली आहेत.  काही मोठी झाडे, त्यावर चढत गेलेल्या वेली आणि त्यांच्या पायाशी झुडुपांची गर्दी यामुळे आपण एकाद्या गर्द रानात गेल्यासारखे वाटते. ही सगळी हिरवी गार झुडुपे निरनिराळ्या आकर्षक फुलांनी डंवरून गेलेली आहेतच, ती पाने आणि फुले यांचा एक मधुर सुगंध सगळीकडे दरवळत असतो.  या झाडीमधून वाट काढत जाणाऱ्या एका वळणावळणाच्या रस्त्याने तळ्याची परिक्रमा करण्याची व्यवस्था आहे. वाटल्यास मध्येच थांबून आडोशाला बसून शांतपणे ध्यान करण्याची सोयही जागोजागी केलेली आहे. तिथे काही साधक डोळे मिटून ध्यान करत बसलेले दिसले.

बागेत शिरतांना सुरुवातीला एक सुवर्णकमलकमान (गोल्डन लोटस आर्च) आहे. ते परमात्म्याची ओळख पटण्यासाठी आत्म्याला झालेल्या जागृतीचे प्रतीक आहे म्हणे.  पुढे एक गांधी जागतिक शांती स्मारक आहे. तिथे ठेवलेल्या पेटीत महात्मा गांधीची थोडी राख ठेवली आहे. परमहंस योगानंद भारतात गेले असतांना त्यांनी महात्माजींना त्यांच्या वर्धा येथील आश्रमात भेटून क्रिया योगाची शिकवण दिली असे त्यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. या स्मारकाच्या दोन्ही बाजूंना क्वान यिन नावाच्या दयाळू चिनी देवतेच्या मूर्ती ठेऊन त्याला जागतिक स्वरूप दिले आहे. धर्मांचा दरबार (कोर्ट ऑफ रिलीजन्स) नावाच्या जागी ॐ, क्रॉस, स्टार, चक्र आणि चंद्रकोर ही हिंदू, ख्रिश्चन, ज्यू, बौद्ध आणि इस्लाम या पाच प्रमुख धर्मांची प्रतीके ठेवली आहेत. भगवान श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध, महावीर, मॅडोना वगैरेंच्या मूर्तीही मधून मधून ठेवल्या आहेत. विंडमिल चॅपेल नावाच्या छोट्याशा इमारतीत शांतपणे बसून प्रार्थना करण्यासाठी बाके मांडून ठेवली आहेत पण समोर क्रॉसच्या जागी परमहंस योगानंद आणि आणखी काही महात्म्यांच्या तसबिरी आहेत. त्या हॉलच्या वरच्या बाजूला एक जुनी पवनचक्की आहे.  या सगळ्या गोष्टी बागेच्या वेगवेगळ्या भागांमध्ये तळ्याच्या काठी बांधलेल्या आहेत आणि बागेतील पानेफुले पहात फिरत फिरत त्या  पहायच्या आहेत.

फिरत फिरत पुढे गेल्यावर अखेर एका खोलीत परमहंस योगानंद यांचे अनेक फोटो, जुन्या काळातल्या त्यांच्या वापरातलेल्या वस्तू आणि त्यांनी जगभरातून गोळा करून आणलेल्या किंवा त्यांच्या भक्तांनी त्यांना भेट दिलेल्या अनेक कलाकुसरीच्या वस्तू तसेच रंगीबेरंगी स्फटिक वगैरेंचे एक सुंदर प्रदर्शन आहे. त्यातील प्रत्येक वस्तूची माहिती देणारे फलकही त्या वस्तूंच्या जवळ मांडून ठेवले आहेत. प्रदर्शनाला लागूनच गिफ्ट शॉप आहे. अमेरिकेतल्या कुठल्याही सौंदर्यस्थळातून बाहेर जाण्याची वाट अखेर गिफ्ट शॉपमधूनच जाते, तसेच इथेही आहे. त्या ठिकाणाला दिलेल्या भेटीची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू पर्यटक घेऊन जातील अशी आशा किंवा अपेक्षा असते. इथल्या दुकानात वस्तू, मूर्ती, चित्रे वगैरे आहेतच, शिवाय परमहंस योगानंदांनी लिहिलेली किंवा त्याच्याबद्दल माहिती देणारी पुस्तकेही ठेवली आहेत.

बागेला लागूनच एका उंचवट्यावर इथले प्रार्थनामंदिर आहे. या अष्टकोनी इमारतीच्या बांधणीत पूर्व आणि पश्चिमेकडील निरनिराळ्या वास्तुशिल्पकलांचा संगम झालेला आहे. वर पारंपरिक घुमटाकार शिखर आहेच, त्यावर सुवर्णकमळ आहे. तिथे एका वेळी चारशे साधक समाधीसाधना करू शकतील एवढी व्यवस्था आहे. मंदिराशेजारी असलेल्या इमारतीत राहण्याची व्यवस्था आहे. जगभरातून आलेले भक्त इथे राहून साधना करू शकतात. प्रवचने, सांघिक उपासना वगैरेंसाठी एक सभागृह आहे.

परमहंस योगानंद यांनी अमेरिकेत लॉस एंजेलिसजवळ बांधलेल्या या आश्रमात सर्वधर्मसमभाव आहे. त्यांची शिकवण जगातील सर्व धर्मीयांच्या कल्याणासाठी आहे असे इथल्या मार्गदर्शिकेने आवर्जून सांगितले.
------------
Yogananda Quotes
Let my soul smile through my heart and my heart smile through my eyes, that I may scatter rich smiles in sad hearts. Paramahansa Yogananda

There is a magnet in your heart that will attract true friends. That magnet is unselfishness, thinking of others first; when you learn to live for others, they will live for you. Paramahansa Yogananda

Only the wise know just where predestination ends and free will begins. Meanwhile, you must keep on doing your best, according to your own clearest understanding. you must long for freedom as the drowning man longs for air. Without sincere longing, you will never find God. Paramahansa Yogananda

The happiness of one's own heart alone cannot satisfy the soul; one must try to include, as necessary to one's own happiness, the happiness of others. Paramahansa Yogananda

The Creator, in taking infinite pains to shroud with mystery His presence in every atom of creation, could have had but one motive - a sensitive desire that men seek Him only through free will. Paramahansa Yogananda

Read more at https://www.brainyquote.com/authors/paramahansa-yogananda-quotes

Wednesday, November 13, 2019

अणुरेणुशास्त्रज्ञ अॅव्होगाड्रो



सर्व जग सूक्ष्म कणांपासून तयार झाले आहे असा काहीसा एक सिद्धांत महर्षी कणाद यांनी पुराणकाळातच मांडला होता असे सांगतात, पण या एका वाक्यापलीकडे त्याविषयीची सविस्तर आणि सुसंगत अशी माहिती मला तरी मिळाली नाही. जे धार्मिक आणि तात्विक ज्ञान परंपरागत पद्धतीने आपल्यापर्यंत येऊन पोचले आहे त्यात वसिष्ठ, विश्वामित्र, व्यास, वाल्मिकी इत्यादि अनेक ऋषींची नावे येतात, पण त्यात कुठेही कणाद ऋषींचा उल्लेख येत नाही. बहुधा अन्य विद्वानांनी त्यांचे तत्वज्ञान मान्य केले नसावे आणि ते काळाच्या ओघात नाहीसे झाले असावे.

जॉन डाल्टन या इंग्रज शास्त्रज्ञाने सन १८०८ मध्ये जो अणुसिद्धांत मांडला होता त्यातही या विश्वामधले सर्व पदार्थ अत्यंत सूक्ष्म अशा अदृष्य अणूंचे बनलेले असतात असे त्याने सांगितले होते आणि त्या सिद्धांतात त्याने त्या कणांचे काही गुणधर्मही सांगितले होते. पण आपल्या सभोवती असलेले दगडमाती, हवा, पाणी इतकेच नव्हे तर माणसे, पशू, पक्षी, झाडे, चंद्रसूर्यतारे वगैरे सगळी निर्जीव किंवा सजीव सृष्टी सूक्ष्म कणांपासून बनलेली असते अशी क्रांतिकारक कल्पना त्या काळातल्या युरोपमधील सर्वसामान्य लोकांनाही समजणे किंवा पटणे कठीणच होते. त्यामुळे तिलाही लगेच फारसा पाठिंबा मिळालाच नाही.

आपल्या डोळ्यांना हवा दिसत नाही, पण तरीही तिचे असणे आपल्याला जाणवते. टॉरिसेली, ओटो व्हॉन गेरिक, रॉबर्ट बॉइल यासारख्या शास्त्रज्ञांनी या अदृष्य पण बाटलीत किंवा फुग्यात कोंडता येणाऱ्या हवेवर विविध प्रयोग करून तिच्या अनेक गुणधर्मांचे शोध लावले. पुढील शतकातल्या शील, प्रेस्टली, लेवोजियर,  गे ल्युसॅक,  कॅव्हेंडिश वगैरे शास्त्रज्ञांनी प्राणवायू, नायट्रोजन आणि हैड्रोजन यासारख्या निरनिराळ्या वायूंचे शोध लावले. तेंव्हा त्यांना तेही हवेचेच वेगवेगळे प्रकार वाटले होते. त्यांनी तशी नावेही ठेवली होती. पुढे त्या वायूंना स्वतःची ओळख आणि नवी नावे मिळाली. वायूंवरील संशोधन हा अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातल्या संशोधकांसाठी महत्वाचा विषय होता. डाल्टननेसुद्धा यात मोठी भर घातली होती. त्या काळातल्या काही संशोधकांना डाल्टनचा नवा अणुसिद्धांत पटला आणि त्यांनी त्यावर अधिक संशोधन केले. इटालियन शास्त्रज्ञ अॅमिलियो अॅव्होगाड्रो हा त्यातला एक प्रमुख शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने डाल्टनच्या सिद्धांतात भर टाकून त्याच्या सिद्धांताला पुढे नेले.

अॅमिलियो अॅव्होगाड्रो याचा जन्म सन १७७६ मध्ये सध्याच्या इटलीमधील तुरीन या गावातल्या  एका स्थानिक राजघराण्यात झाला. त्याने आधी वकीलीचा अभ्यास करून वकीली सुरू करून दिली होती, पण पुढे त्याच्या मनात गणित आणि विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि तो त्या विषयांच्या अभ्यासाकडे आणि त्यातल्या संशोधनाकडे वळला. त्याने विद्यापीठांमध्ये या विषयांचे अध्यापनही केले तसेच आपले शोधनिबंध पुस्तकांमधून प्रसिद्ध केले.

वायुरूप पदार्थांना आकार नसतो. त्यांचे आकारमान ते ज्या पात्रात ठेवलेले असतात त्याच्या आकारानुसार ठरते.  वायूंचे तापमान आणि दाब यानुसार ते सतत बदलत असते. ते तापमानाबरोबर वाढते आणि दाबाच्या व्यस्त प्रमाणात कमी होते. म्हणून वायूरूप पदार्थांचे आकारमान सांगतांना या दोन्हींचा उल्लेख करणे आवश्यक असते. अॅव्होगाड्रोने सन १८११ मध्ये प्रसिद्ध केलेल्या लेखात असे सांगितले की प्रमाणभूत तापमान आणि दाब (Standard Tempearature and Pressure) असतांना समान आकारमानातील कुठल्याही वायूच्या रेणूंची संख्या तेवढीच असते. अर्थातच सर्व वायुरूप पदार्थ सूक्ष्म अशा रेणूंपासून बनतात हे त्याने आधी मान्य केले होते. ही गोष्ट प्रयोग करून दाखवून देणे शक्य नसल्यामुळे त्याने हे गृहीतक (hypothesis) म्हणूनच मांडले होते. पुढील काळात त्याला अॅव्होगाड्रोचा नियम (Avogadro's law) असे नाव दिले गेले. सन १८१४ मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ अँपियर याने सुद्धा अशाच प्रकारचे गृहीतक स्वतंत्रपणे मांडले होते आणि त्या काळातल्या शास्त्रज्ञांमध्ये तो जास्त प्रसिद्ध असल्यामुळे काही काळ ते गृहीतक त्याच्या नावाने ओळखले जात असे. 

अठराव्या शतकाच्या अखेरीला लेवोजियरने मूलद्रव्यांची नवी संकल्पना मांडली आणि जगामधील सर्व पदार्थांची मूलद्रव्ये (Elements), संयुगे (Compounds) आणि मिश्रणे (Mixtures) या तीन प्रकारांमध्ये विभागणी केली. पण डाल्टनने अणुसिद्धांत मांडला होता त्या काळापर्यंत अणू (Atom) आणि रेणू (Molecule) यांच्या स्पष्ट व्याख्या झाल्या नव्हत्या. हे दोन्ही शब्द सूक्ष्म कण म्हणूनच ओळखले जात होते. अणू किंवा रेणूएवढा सूक्ष्म कण डोळ्यांनी पाहणे आजही शक्य नाही आणि भविष्यातही शक्य होणार नाही, तेंव्हा पूर्वीच्या काळातसुद्धा कुठलेही अणू रेणू वेगळे काढून प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे किंवा दाखवणे अशक्यच होते. डाल्टनने त्याच्या तर्कशुद्ध विचारामधून अशा कणांची कल्पना केली होती आणि अॅव्होगाड्रोनेही तशाच प्रकारे रेणूंचा नियम सांगितला होता, पण ते विचार इतर लोकांच्या आकलनशक्तीच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडे होते. त्यात इंग्लंडमधला डाल्टन, इटलीमधला अॅव्होगाड्रो आणि फ्रान्समधला अँपियर यांनी त्यांच्या देशात प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांमधल्या कल्पना सर्व देशांमधल्या तत्कालिन विद्वानांच्या वाचनात येऊन, त्यावर साधकबाधक चर्चा आणि विचारविनिमय होऊन त्या सर्वांना पटायला मध्ये कित्येक वर्षांचा काळ जावा लागला.

मूलद्रव्यांचे सर्वात लहान कण म्हणजे अणू आणि संयुगांचे सर्वात लहान कण म्हणजे रेणू अशी एक ढोबळ कल्पना बऱ्याच काळानंतर रूढ झाली, तशी ती अजूनही रूढ आहे. पण वायूंचे आकारमान, वस्तुमान, तापमान वगैरेवरील प्रयोगातून अणूरेणूंचे गुणधर्म शोधण्याच्या प्रयत्नात काही विसंगति दिसून येत होत्या. त्याची कारणे कळत नव्हती किंवा त्यामुळे अणुसिद्धांतावरच प्रश्नचिन्ह लागत होते. पण प्राणवायू, हैड्रोजन आदि मूलद्रव्यांचे दोन दोन अणू एकत्र येऊन त्यांचे रेणू तयार होतात असे अॅव्होगाड्रोने सुचवल्यानंतर या विसंगतींचा उलगडा झाला. अशा मूलद्रव्यांचा निसर्गात असलेला सर्वात लहान कण हा दोन अणूंचा रेणू असतो, पण रासायनिक क्रियेमध्ये भाग घेतांना त्यातले अणू वेगळे होतात आणि इतर मूलद्रव्यांच्या अणूंशी त्यांचा संयोग होऊन नवा रेणू तयार होतो. उदाहरणार्थ हवेमधला प्राणवायू O2 या रूपात असतो आणि हैड्रोजन H2 असतो, पण पाण्यामध्ये ते H2O असे संयुग होऊन एकत्र नवा रेणू बनवतात.

अणू, रेणू वगैरेंच्या सिद्धांतांबद्दल दीर्घ काळापर्यंत लोकांच्या मनात शंका होत्या. त्यामुळे अॅव्होगाड्रोच्या नियमाकडेसुद्धा त्याच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी द्यावे तेवढे लक्ष दिले नव्हते. नंतरच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी यावर अधिक संशोधन केले.  सुमारे पन्नास वर्षांनंतर  सन १८६५मध्ये जोसेफ लॉश्मिट या जर्मन शास्त्रज्ञाने रेणूंच्या संख्येचा अंदाज बांधण्याचा  प्रयत्न केला आणि जवळजवळ १०० वर्षांनंतर सन १९०९ मध्ये जीन पेरिन या शास्त्रज्ञाने असे सिद्ध केले की प्रत्येक ग्रॅमरेणू एवढ्या वस्तुमानात त्या पदार्थाचे ६.०२२१४०८६ × १०^२३  ( १० गुणिले १० असे तेवीस वेळा किंवा १ या आकड्यापुढे २३ शून्ये) इतके अणू असतात. त्याने या प्रचंड आकड्यला 'अॅव्होगाड्रो नंबर' असे नाव सुचवले आणि सर्वानुमते ते नाव देण्यात आले.
----------

Tuesday, November 12, 2019

गेट्टी सेंटर म्यूजियम



सुमारे शंभर वर्षांपूर्वी जे.पॉल गेट्टी या अमेरिकन माणसाला तो अठरा वर्षांचा असतांना त्याच्या श्रीमंत वडिलांनी दहा हजार डॉलर्स दिले. त्याने ते धंद्यात गुंतवून एक पेट्रोलियमची विहीर खणून घेतली. नशीबाने त्यातून भरपूर तेल निघाले आणि त्याला पहिल्याच वर्षात दहा लक्ष डॉलर्सची कमाई झाली. पॉल हा श्रीमंत घराण्यातला असूनसुद्धा तो काटकसरी, कामसू आणि धोरणी असल्यामुळे त्याने कष्टाने आपला व्यवसाय वाढवत नेला, जागतिक मंदीची लाट आलेली असतांना इतर उद्योजकांच्या विहिरी आणि कारखाने विकत घेतले आणि पेट्रोलियमच्या व्यवसायात मोठे स्थान मिळवले. १९५७ मध्ये तो सर्वात श्रीमंत अमेरिकन झाला आणि १९६६ मध्ये तर संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्याची नोंद झाली. 

कलासक्त पॉलला पुराणकालीन वस्तूंची आवड होती आणि त्या जमवण्याचा छंद होता. त्याने युरोपमधील जुन्या काळातली पेंटिंग्ज, पुतळे आणि खास बनावटीचे फर्निचर वगैरे दुर्मिळ सामान खरेदी करून ते अमेरिकेला नेले. महायुद्धानंतर आलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीत डबघाईला आलेल्या युरोपमधील अनेक  वस्तूसंग्रहालयांमधून त्याने हजारो वस्तू विकत घेऊन आपला संग्रह वाढवत नेला. त्याने लॉस एंजेलिसमधील आपल्या बंगल्याजवळ एक मोठी जागा घेऊन तिथे या वस्तू साठवून ठेवल्या. तसेच या कामासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट तयार करून त्याला अब्जावधि डॉलर्सचा निधि प्रदान केला. जे.पॉल गेट्टी याचे सन १९७६ मध्ये निधन झाल्यानंतरही या ट्रस्टने आपले काम तर चालू ठेवलेच, पण  लॉस एंजेलिसजवळ असलेल्या ब्रेंटवुड नावाच्या टेकडीच्या माथ्यावर 'गेट्टी सेंटर' नावाचे भव्य म्यूजियम उभारले. शिवाय जुन्या इमारतीचेही पुनरुज्जीवन करून तिथे 'गेट्टी व्हिला' नावाचे दुसरे केंद्र उघडले. ग्रीक, रोमन वगैरे प्राचीन काळातील पुराणकालीन वस्तू आणि संशोधनकेंद्र या व्हिलामध्ये ठेवले आणि मध्ययुगापासूनची जुनी चित्रे, पुतळे आणि छायाचित्रे याना गेट्टी सेंटरमध्ये मांडून ठेवले. तसेच तिथे डोंगराच्या उतारावर एक सुंदर उद्यान उघडले.

लॉस एंजेलिसहून उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गालाच या सेंटरचे मुख्य प्रवेशद्वार आहे.  तिथून आत गेल्यावर एक विशाल पार्किंग लॉट आहे. तिथे आमची कार पार्क करून बाहेर आल्यावर आम्ही तिथे असलेल्या छोटेखानी स्टेशनात गेलो. तीन लहानसे डबे असलेली एक छोटीशी गाडी गडगडत खाली आली आणि प्लॅटफॉर्मवर उभी असलेली पन्नास साठ माणसे त्यात चढून बसली किंवा उभी राहिली. हिल स्टेशन्सवर असतात तसल्या या पिटुकल्या गाडीत बसून खाली पसरलेल्या शहराचे विहंगम दृष्य पहात पहात आम्ही ती टेकडी चढून वर गेलो. तिथल्या या गाडीची सारखी वरखाली ये जा चालली असते आणि रोजच हजारोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांना ती खाली किंवा वर नेत असते.

स्टेशनवरच आम्हाला एक चिटोरे दिले गेले होते, त्यात त्या दिवसभरात असलेल्या सहलींची (टूर्सची) यादी दिली होती. वेगवेगळी थीम्स घेऊन त्यांनी या सहली बनवल्या आहेत. चित्रे, छायाचित्रे, पुतळे, उद्याने, वास्तुकला अशा विशिष्ट कलाकृतींचा अभ्यास करण्यासाठी यातली आपल्याला हवी ती टूर निवडायची सोय आहे. आम्ही सेंटरमध्ये जाऊन पोचल्यानंतर निघणारी पहिलीच सहल सर्वसामान्यांसाठी होती, तीच आम्ही घेतली. त्या ग्रुपमध्ये वीस पंचवीस माणसे होती.

एक दोन मिनिटात थोडक्यात माहिती दिल्यानंतर आमच्या मार्गदर्शिकेने आम्हाला दुसऱ्या मजल्यावरील एका दालनात नेऊन एका भव्य पेंटिंगसमोर उभे केले.  ते एक अठराव्या शतकातले पेस्टल पोर्टेट होते. अठराव्या शतकातल्या कुठल्याशा मोठ्या फ्रेंच अधिकाऱ्याला एका कोरीव काम केलेल्या लाकडी खुर्चीत बसलेले त्यात दाखवले आहे आणि त्याच्या हातात एक जुने पुराणे मोठे जाडजूड रजिस्टर आहे. त्या माणसाचा पोशाख, त्याच्या चेहेऱ्यावरले भाव, त्याचे लांब केस, हाताची बोटे, जमीनीवरील सुंदर गालिचा, पाठीमागे असलेले सुबक पार्टिशन वगैरे असंख्य गोष्टी त्यांतल्या अनेक बारकाव्य़ांसकट हुबेहूब चितारल्या आहेत. पेस्टल या प्रकारात विशिष्ट पद्धतीच्या भुकटीचा किंवा खडूचा उपयोग करून ते चित्र तयार केले जाते. हे अत्यंत किचकट आणि चिकाटीचे तसेच कौशल्याचे काम असते. त्यात कसलीही बारीकशी चूक केलेली चालत नाही कारण ती दुरुस्त करणे जवळ जवळ अशक्य असते. वर्षानुवर्षे काळजीपूर्वक आणि कौशल्याने शेकडो निरनिराळ्या रंगांच्या छटांच्या भुकट्यांचे थरावर थर चढवून ही चित्रे तयार केली जात. आमच्यासमोर असलेले भव्य चित्रच सुमारे दोन मीटर उंच आणि दीड मीटर रुंद होते. त्या काळात हातानेच कागद तयार केला जात असल्याने  इतका मोठा कागदही मिळत नव्हता. यामुळे अनेक कागद एकमेकांना जोडून हे पेंटिंग बवले असले तरी कुठेही ते जोड दिसत नाहीत इतक्या बेमालूम रीतीने ते जोडले गेले आहेत. त्या चित्रापेक्षाही मोठ्या अशा लाकडी फ्रेमसकट ते जास्तच भव्य दिसत होते. फ्रेमसकट त्या चित्राचे वजन काही टन इतके होते. असे हे अवाढव्य पण अत्यंत नाजुक असे चित्र कशा प्रकाराने हाताळून आणि पॅक करून युरोपमधून अमेरिकेतल्या या डोंगरमाथ्यावर आणून ठेवले असेल याचेही कौतुक वाटले.  दोनअडीच शतके उलटून गेली असली तरी त्याचे चमकदार रंग टिकून आहेत. यासाठी अर्थातच खास प्रकारचे रंग वापरले गेले आहेत. शिवाय ते चित्र फ्रेममधल्या एका तितक्याच प्रचंड काचेमागे सुरक्षित ठेवले आहे. यातली इतकी मोठी सलग काचच त्या काळातली जगातली सर्वात मोठी काच होती आणि ती तयार करणे हेच एक मोठे आव्हान होते असे आमच्या गाईडने सांगितले.

त्यानंतर आम्ही सुप्रसिद्ध डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गौ याचे आयरिसेस (Irises) हे खास चित्र पाहिले. त्या चित्रकाराने त्याच्या जीवनाच्या अखेरच्या काळात काढलेले हे एक आगळे वेगळे आणि सुंदर असे निसर्गचित्र आहे. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकल्या आणि विकत घेतल्या गेलेल्या सर्वात जास्त किंमतीच्या दहा चित्रांमध्ये त्याचा समावेश होतो असे म्हणतात. आयरिस हे पश्चिमेकडील एक विशिष्ट प्रकारचे फूलझाड आहे. त्याला युरोपमधल्या वाङमयात एक वेगळे स्थान आहे, ते कसले तरी प्रतीक समजले जाते.  या पेटिंगमधल्या पानाफुलांचे आकार, रंग आणि त्यातून प्रगट होणारे भाव, चित्राचे काँपोझिशन, प्रकाशाचा खेळ, रंगसंगति वगैरेंबद्दल आमची गाईड भरभरून बोलली. त्यातले बरेचसे आमच्या डोक्यावरून गेले आणि जेवढे डोक्यात शिरले ते जास्त काळ टिकून राहिले नाही. हा काही आपला प्रांत नाही एवढेच यावरून सिद्ध झाले.

ही प्रसिद्ध चित्रे पहात असतांना तसेच या दालनातून त्या दालनात जातांना वाटेत एकापेक्षा एक अशी अनेक उत्कृष्ट चित्रे पहायला मिळाली. मायकेलँजेलो किंवा  व्हिन्सेंट व्हॅन गौ यांच्याखेरीजसुद्धा शेकडो उत्तम चित्रकार मधल्या शतकांमध्ये युरोपात होऊन गेले याचाच हा पुरावा होता. यापूर्वीही मी रोम आणि पॅरिसच्या वस्तूसंग्रहांमध्ये अशी असंख्य सुंदर चित्रे पाहिली होती.

अर्धापाऊण तास चित्रकलांचे नमूने पहात हिंडल्यानंतर आम्हाला शिल्पकलांच्या दालनात नेऊन एका खास पुतळ्यासमोर उभे केले गेले. हा एका जुन्या पोपचा पुतळा होता. संगमरमराच्या पांढऱ्या शुभ्र दगडामध्येसुद्धा इतर रंगांच्या छटा असतात आणि त्यांचा सुंदर उपयोग हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराने करून घेतला आहे. त्याचप्रमाणे त्वचेचे काँप्लेक्शन, कपड्यांवरील कलाकुसर आणि मुख्य म्हणजे चेहेऱ्यावरले आणि डोळ्यामधले भाव सारे काही इतके सुंदर जमले आहे की हा पुतळा अगदी जीवंत वाटतो. इतरही अनेक कलापूर्ण पुतळे या दालनात मांडून ठेवलेले आहेत.

यानंतर गाईडने आमचा निरोप घेतला आणि म्यूजियमचा उरलेला भाग स्वतःच पहायला आम्हाला सूट दिली. पुतळ्यांच्या दालनाशेजारीच जुन्या काळातल्या वास्तुसजावटींचे नमूने आहेत. यात सौंदर्य आणि उपयुक्तता यांची सुरेख सांगड घातलेली पहायला मिळाली.  युरोपमधल्या एकाद्या श्रीमंत माणसाचे कोरीव काम असलेले अवाढव्य आकारांचे पलंग, त्यावरील गाद्या गिरद्या, लोड आणि अंथरूण पांघरूणासह मांडून ठेऊन बेडरूमचे देखावे केले आहेत, तसेच सोफे, कपाटे आरसे वगैरेंमधून ड्रॉइंगरूम्स सजवून ठेवल्या आहेत. त्या काळातल्या कौशल्यपूर्ण सुतारकामात एकेका कपाटात अनेक कप्पे आणि चोरकप्पे करून त्यात मौल्यवान वस्तू कशा लपवून ठेवलेल्या असत आणि ते कप्पे उघडण्यासाठी किती गुप्त कळा बसवलेल्या असत याचेही दर्शन घडले. 

आणखी एका दालनात गेल्या दीडशे वर्षांमधली उत्तमोत्तम छायाचित्रे मांडून ठेवली आहेत. आम्ही एक फेरफटका मारला, पण आधीच खूप वेळ उभे राहून दमणूक झालेली असल्यामुळे एकेका फोटोपुढे रेंगाळत बसलो नाही. दुसऱ्या मजल्यावरील एका दालनामधून दुसऱ्यात जाण्यासाठी जाणारा मार्ग टेरेसमधून जातो. या इमारतीच टेकडीच्या माथ्यावर बांधलेल्या असल्यामुळे चहूबाजूंना दूरवर पसरलेल्या शहराचे विहंगम दृष्य पहायला मिळते आणि त्यात हे डाउनटाऊन, हा विमानतळ, इकडे आपण राहतो वगैरे ओळखीच्या जागा लोकेट करतांना मजा येते.

एकंदरीत पाहता गेट्टी सेंटर पहाण्यासाठी आम्ही खर्च केलेला वेळ सार्थकी लागला. आमचे पैसे वसूल झाले असे म्हणता येणार नाही कारण ते खर्च झालेच नाहीत. हे सगळे वस्तुसंग्रहालय तिथल्या गाइडेड टूर्ससकट अगदी निःशुल्क आहे. पार्किंग आणि कँटीनच्या सेवेसाठी थोडेसे डॉलर मोजावे लागतात तेवढेच. 

Monday, October 21, 2019

महान विद्युतशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे


महान विद्युतशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे याचा जन्म सन १७९१मध्ये इंग्लंडमधील एका गरीब कुटुंबात झाला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे शालेय शिक्षण धडपणे झाले नाही. चौदा वर्षांचा असतांना तो एका बुकबाइंडिंग आणि पुस्तकांची विक्री करणाऱ्याकडे नोकरीला लागला. पण ज्ञान संपादन करण्याची त्याच्या मनातली इच्छा इतकी तीव्र होती की तो बाइंडिंगसाठी आलेल्या आणि दुकानात ठेवलेल्या पुस्तकांची पाने वाचूनच त्यातून अनेक विषयातील ज्ञानाचे मिळतील तितके कण जमा करत राहिला आणि त्यामधून मिळालेली शिकवण अंमलात आणत राहिला. या अशा वाचनातूनच त्याच्या मनात विज्ञान आणि विशेषतः विद्युत् या विषयाबद्दल ओढ निर्माण झाली.

वीस वर्षांचा असतांना फॅरेडेने हम्फ्री डेव्ही या प्रख्यात शास्त्रज्ञाची व्याख्यानमाला लक्षपूर्वक ऐकली, त्याच्या नोट्स काढून त्यांचे बाइंडिंग करून एक पुस्तक तयार केले आणि अभिप्रायासाठी डेव्हीकडे पाठवले. त्याने केलेले ते काम डेव्हीला आवडले. पुढे सन १८१३मध्ये एका प्रयोगात झालेल्या अपघातात डेव्हीची दृष्टी अधू झाल्यामुळे त्याला प्रयोगशाळेत काम करण्यासाठी एका सहाय्यकाची गरज भासली तेंव्हा त्याने फॅरेडेला बोलावून घेतले. नंतरच्या काळात डेव्हीने त्याला आपल्यासोबत दोन वर्षांच्या दौऱ्यावर फ्रान्सलाही नेले. त्या वेळी फॅरेडे डेव्हीला प्रयोगशाळेत मदत करायचा तसेच त्याची इतर कामेही करायचा. डेव्हीच्या बायकोने तर त्याला गड्यासारखे वागवले. फॅरेडेने डेव्हीची मनोभावे सेवा केली त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक प्रयोगामध्ये समरस होऊन लक्षपूर्वक सहभाग घेतला. यातून त्याने प्रात्यक्षिक कामामध्ये विलक्षण नैपुण्य मिळवलेच, विज्ञान या विषयामध्येसुध्दा प्राविण्य मिळवले. पुढील काही वर्षांमध्ये डेव्हीने केलेल्या संशोधनामध्ये फॅरेडेचा महत्वाचा वाटा होता.

रसायनांवर प्रयोग करत असतांना झालेल्या एका स्फोटात डेव्ही आणि फॅरेडे हे दोघेही जखमी झाले होते, पण हिम्मत न सोडता ते आपले संशोधन करत राहिले. फॅरेडेने काही नवे वायू तयार केले. क्लोरिनसारख्या काही वायूंना थंड करून द्रवरूपात आणता येते हे दाखवले. बेंझीन या महत्वाच्या रसायनाचा शोध लावला. असे असले तरी फॅरेडेचे नाव त्याने विजेवर केलेल्या क्रांतिकारक संशोधनामुळेच प्रसिध्द झाले आणि त्या क्षेत्रामधील अग्रगण्य शास्त्रज्ञांमध्ये घेतले जाते.

फॅरेडेने स्वतःची व्होल्टाइक पाईल तयार करून त्यावर रसायनांच्या पृथःकरणाचे प्रयोग सुरू केले. इलेक्ट्रॉलिसिस या क्रियेमधील उपकरणांचे अॅनोड, कॅथोड, इतेक्ट्रोड ("anode", "cathode", "electrode") यासारखे शब्द त्याने प्रचारात आणले. त्याने सांगितलेले या विद्युतरासायनिक क्रियेचे नियम त्याच्या नावाने प्रसिध्द आहेत. रसायनामधून जात असलेल्या विजेच्या प्रवाहाच्या सम प्रमाणात रासायनिक क्रिया घडते. असा हा नियम आहे.

ऑर्स्टेडने विद्युतचुंबकीयत्वाचा (electromagnetism) शोध लावल्यानंतर डेव्ही आणि वोलॅस्टन या ब्रिटिश संशोधकांनी त्यावर संशोधन सुरू केले, पण त्यांना घवघवीत यश मिळत नव्हते. फॅरेडेने त्यावर अधिक प्रयोग करून जगातली पहिली इलेक्ट्रिक मोटर तयार केली. त्यासाठी त्याने एक लोहचुंबक पाऱ्यामध्ये ठेऊन त्याच्या बाजूला एक इलेक्ट्रोड टांगून ठेवला. त्यामधून विजेचा प्रवाह सोडल्यावर तो इलेक्ट्रोड हळूहळू फिरायला लागला. विजेपासून गति निर्माण करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता.
   
फॅरेडेने आपले हे संशोधन स्वतंत्रपणे प्रसिध्द केलेले डेव्हीला आवडले नाही. त्याने फॅरेडेचे कौतुक तर केले नाहीच, उलट त्याला फैलावर घेतले. यामुळे पुढील काही वर्षे फॅरेडेने विजेवर संशोधन न करता पारदर्शक काच बनवण्याच्या शास्त्रावर काम केले. त्यात त्याने जगातली पहिली पोलॅराइड काच बनवली तसेच प्रकाशकिरण व विद्युतचुंबकीयत्व यांच्यातल्या संबंधावर प्रकाश टाकला.

डेव्हीच्या मृत्यूनंतर फॅरेडे पुन्हा आपल्या आवडत्या कामाला लागला. विद्युतचुंबकीय प्रवर्तन (electromagnetic induction) हा सर्वात महत्वाचा शोध त्याने लावला. लोखंडाच्या कडीभोवती गुंडाळलेल्या तारांच्या दोन वेगवेगळ्या वेटोळ्यांपैकी एकीमध्ये विजेचा प्रवाह सोडला की इंडक्शनमुळे दुसरीमध्ये क्षणभर वीज चमकून जाते हे त्याने दाखवले. तारेच्या वेटोळ्यामधून जर लोहचुंबक नेला किंवा लोहचुंबकाच्या भोवती तारेचे वेटोळे वर खाली नेले तर एक विजेचा प्रवाह निर्माण होऊन त्या तारेतून जातो असेही त्याने दाखवून दिले. त्याने या तत्वावर चालणारा जगातला पहिला डायनॅमो किंवा जनरेटर तयार केला. आजसुध्दा जगातले बहुतेक सगळे जनरेटर, ट्रान्स्फॉर्मर आणि सगळ्या विजेच्या मोटारी फॅरेडेच्या या साध्या यंत्रांच्या मागे असलेल्या मूलभूत तत्वांवरच चालतात यावरून त्यांचे महत्व लक्षात येईल. मायकेल फॅरेडेच्या सन्मानार्थ धारिता (Capacitance) या विजेच्या गुणधर्माच्या एककाचे नाव फॅरड (farad) असे ठेवले गेले आहे.

तत्कालीन इंग्लंडमधील जनतेच्या अनेक अडचणींकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग सुचवण्याचे समाजकार्यही फॅरेडे याने केले. त्याने केलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्याला सरदारपद देऊ केले गेले होते, पण आपल्याला कोणी 'सर फॅरेडे' म्हंटल्यापेक्षा 'मि.फॅरेडे' असेच म्हंटलेले आवडेल असे सांगून त्याने ते नम्रपणे नाकारले.




Wednesday, October 09, 2019

वॉर्नर ब्रदर्सचा स्टूडिओ


मी शाळेत असेपर्यंत एकही इंग्रजी सिनेमा पाहिला नव्हता. आमच्या लहान गावातल्या थेटरात बहुधा ते कधी लागतही नसावेत. मी १९६१ साली कॉलेजला शिकायला शहरात आलो त्याच वर्षी गन्स ऑफ नेव्हेरॉन नावाचा धडाकेबाज युद्धपट आला होता. सगळ्यांनी त्याची इतकी भरभरून तारीफ केलेली मी ऐकली की आपण काहीही करून हा पिक्चर तर पहायलाच पाहिजे असे माझ्या मनाने घेतले. एका रात्री त्या काळातल्या ठाण्याच्या ओसाडवाण्या घोडबंदर रोडवरून निघून पार बाँबे व्हीटी पर्यंत गेलो आणि तिथल्या एका आधुनिक थेटरात हा चित्तथरारक सिनेमा पाहून अखेरच्या ट्रेनने ठाण्याला परत आलो तोपर्यंत शेवटची बस सुटून गेली होती.  मग रात्रभर स्टेशनातल्या एका बाकड्यावर मुटकुळे करून पडून राहिलो आणि सकाळी उठून वसतीगृहावर परतलो. ग्रामीण भागातून आलेल्या पंधरासोळा वर्षाच्या मुलासाठी एवढे धाडस करणेसुद्धा अँथनी क्विनने त्या सिनेमात दाखवलेल्या धाडसासारखेच होते.  एकदाचा तो सिनेमा बघून माझ्या जीवनाचे पुरेसे सार्थक झाले असे मला वाटले आणि मी पुन्हा कधी तसला वेडेपणा केला नाही.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधली निम्म्याहून अधिक मुले परदेशी जायची स्वप्ने पहात होती आणि त्याची पूर्वतयारी म्हणून धडाधड  इंग्रजी सिनेमे पहात होती. त्यांच्यासमोर आपण अगदीच गांवढळ दिसायला नको म्हणून मीसुद्धा अधून मधून त्यांच्याबरोबर वेस्टएंड किंवा अलका टॉकीजला जाऊन थोडे येस्स फॅस्स ऐकून येत होतो. सुरुवातीला त्यातले षष्पही डोक्यात शिरत नसले तरी एक फायदा एवढा झाला की इंग्रजीतल्या चार शिव्या समजल्या आणि दुसऱ्या कुणी मला तसली शिवी दिलीच तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यायची तयारी झाली.  पुढे मग हळूहळू थोडेफार इतर संभाषणही कळायला लागले.


मी पाहिलेल्या सगळ्या इंग्रजी सिनेमांची नावे लक्षात राहिली नसली तरी ते तयार करणाऱ्या ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स, एम जी एम आणि वॉर्नर ब्रदर्स यासारख्या काही प्रमुख कंपन्यांची नावे मात्र पक्की लक्षात राहिली. इतके भव्य दिव्य चित्रपट तयार करणाऱ्या त्या कंपन्यांबद्दल मला प्रचंड कौतुक आणि आदरही वाटत असे आणि तितकेच कुतूहलही. आपल्याला कधी तरी त्यांचा स्टूडिओ पहायला मिळेल असे मात्र मला तेंव्हा स्वप्नातही वाटले नव्हते.

मी मुलाकडे अमेरिकेत लॉस एंजेलिसला आलो तेंव्हा अर्थातच हॉलीवुडची आठवण प्रामुख्याने झाली आणि जमेल तेंव्हा ते पहायला जायचेच होते.  तसा मी जन्मभर मुंबईत राहिलो, पण मला तिथला कुठलाही फिल्म स्टूडिओ आतून पहायची संधी मात्र कधीच मिळाली नाही. तिथले दरवान तिथे काम असल्याशिवाय कुणालाही आत सोडतच नाहीत. आम्ही आर के स्टूडिओतला गणपती पहायला जात होतो तेंव्हा बाहेरूनच एकादी शेड दिसली असेल तेवढेच स्टूडिओचे दर्शन मला झाले होते. मी बँडस्टँडला रहात असतांना तिथे कित्येक वेळा औटडोअर शूटिंग पाहिले होते आणि ते किती कंटाळवाणे असते हे मला समजले होते त्यामुळे माझे त्यातले औत्सुक्य संपले होते. मी दूरदर्शन, झी आणि स्टार प्लस यांच्या एक दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिथले सेट्स आणि कॅमेरे पाहून मला स्टूडिओमधल्या शूटिंगच्या प्रक्रियेचाही थोडा फार अंदाज आला होता.

मी मागे अमेरिकेला आलो असतांना अॅटलांटा इथला सी एन एनचा स्टूडिओ आतून पाहिला होता आणि आता तर चक्क वॉर्नर ब्रदर्सचा स्टूडिओ पहायचे ठरले. कुठल्याही गोष्टीचे प्रदर्शन मांडण्यात अमेरिकन लोक खूप पटाइत आहेत हे मला मागच्या अमेरिकावारीतच दिसले होते. त्याचाच प्रत्यय वॉर्नर ब्रदर्सच्या भेटीतही आला. तिथे स्टूडिओच्या प्रदर्शनाचा एक सुनियोजित कार्यक्रमच तयार करून ठेवला आहे आणि त्यासाठी रोज शेकडो पर्यटक त्यांच्या स्टूडिओला भेट देऊन तो पाहून जातात.

तिथे जाऊन आयत्या वेळी नकार मिळायला नको म्हणून आम्ही इंटरनेटवरूनच तीन वाजताच्या वॉर्नर ब्रदर्सच्या व्हिजिटचे  रिझर्वेशन केले आणि तास दीड तास आधीच घरातून निघालो. पण रस्त्यात वाहतुकीची इतकी कोंडी झालेली होती की जेमतेम तीन वाजेपर्यंत गेटपाशी पोचलो. आता पुढे काय करायचे? व्हिजिटर्स पार्किंग पाचव्या पातळीवर असा बोर्ड दिसला. तो पाहून वळणावळणाच्या रस्त्याने लेव्हल फाय पर्यंत चढत गेलो, गाडी लावली आणि लिफ्टने पुन्हा खाली स्वागतकक्षात आलो. पण आम्हाला यायला उशीर झाला असे काही कुणी म्हंटले नाही. आम्ही व्हिजिटची तिकीटे काढली आणि एका रांगेत उभे राहिलो. माणशी पासष्ट डॉलरच्या तिकीटांमध्ये कसलेले कन्सेशन मिळून ती पन्नास पन्नास डॉलर्सना पडली. रांगेतून पुढे गेल्यावर एका हॉलमध्ये चार वेगवेगळ्या रांगा होत्या. त्याच्यातल्या एका रांगेत आम्हाला पाठवले गेले. थोड्या थोड्या वेळाने एक माणूस किंवा बाई येऊन एकेका रांगेतल्या लोकांना सोबत घेऊन जात असे. तसाच आमचा मार्गदर्शक आला आणि त्याने आम्हाला आधी एका लहानशा थिएटरमध्ये नेले.

त्या लहानशा हॉलमध्ये एका शॉर्ट फिल्ममधून वॉर्नर ब्रदर्सची थोडक्यात माहिती सांगितली गेली. त्या चार भावंडांपैकी कोणता भाऊ कधी लॉसएंजेलिसला आला आणि त्याने फिल्म्सचा उद्योग सुरू केला आणि त्यानंतर कोणकोणता भाऊ येऊन त्यात सामील होत गेला वगैरे माहितीमध्ये कुणालाच इंटरेस्ट नव्हता पण ती देणे हे बहुधा त्यांचे कर्तव्य असावे. जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी या स्टूडिओची स्थापना झाली आणि पुढे त्याची भरभराटच होत गेली एवढेच माझ्या लक्षात राहिले. एक दोन वाक्यात आमच्या व्हिजिटची रूपरेषाही सांगितली गेली आणि आम्हाला त्या थिएटरमधून बाहेर नेले.


१५-२० लोकांच्या प्रत्येक ग्रुपसाठी एक वाहन दिलेले होते. ती एक उघडी मिनिबस होती. एकाच वेळी अशी अनेक वाहने पर्यटकांना घेऊन तिथे इकडून तिकडे फिरत होती. स्टूडिओच्या दीडदोनशे एकर आवारात पसरलेल्या परिसरात पन्नासच्यावर मोठमोठ्या इमारती आहेत, त्यातल्या प्रत्येकाला ते 'स्टूडिओ' म्हणतात आणि त्यांना क्रमांक दिले आहेत. सुरुवातीला आम्हाला युरोप अमेरिकेतल्या जुन्या काळातल्या एकाद्या गावाचा देखावा वाटावा अशा एका भागात नेले. तिथे मधोमध एका वाहतूक बेटावर (ट्रॅफिक आयलँडवर) काही लहान मोठी झाडे, झुडुपे आणि गवताचे लॉन्स आहेत आणि त्याच्या चारी बाजूंनी सुरेख रस्ते बांधले आहेत. त्या रस्त्यांवर बंगला, चर्च, शाळा, दुकान, लायब्ररी असे काही तरी असावे असे बाहेरून वाटणाऱ्या दहा बारा छान छान इमारती बांधून ठेवल्या आहेत. त्यात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली वगैरे अनेक देशातल्या स्टाइल्सच्या इमारती आहेत. कुठे गोल कमानीचे दरवाजे आहेत, कुठे त्रिकोणी छप्पर आणि त्यातून डोकावणारी चौकोनी चिमनी आहे, एका इमारतीच्या दर्शनी भागात तर चक्क ग्रीक आर्किटेक्चरसारखे अनेक उंच आणि  गोल खांब बांधले आहेत.


सिनेमामध्ये जसे दृष्य दाखवायचे असेल त्याप्रमाणे त्यातल्या इमारतीची निवड करून वाटल्यास तिला वेगळा रंग देतात, खिडक्याचे पडदे किंवा काचाही बदलतात, वेगळी पाटी लावतात आणि तसा सीन उभा करतात. आमच्या गाईडने अशी चारपाच उदाहरणे सांगितली, पण मी ते सिनेमे पाहिलेच नसतील किंवा मला आता त्यातले सीन आठवत नसतील. त्यामुळे मला फारसा बोध झाला नाही, पण इतर काही लोकांनी होकारार्थी माना डोलावल्या.आम्ही दोन तीन इमारती आत जाऊनही पाहिल्या. त्या आतून रिकाम्याच होत्या आणि त्यात वरच्या बाजूला जाणारे निरनिराळ्या आकारांचे जिने होते. सिनेमाच्या गरजेप्रमाणे त्यातल्या इमारतीची निवड करतात. त्या इमारतीत हवी तशी पार्टिशन्स ठेऊन खोल्या बनवतात. निरनिराळ्या रंगांची किंवा वॉल पेपर्सने मढवलेली अशी शेकडो निरनिराळी पार्टिशन्ससुद्धा आधीपासून तयार करून ठेवलेली आहेत. तिथे शूटिंग झालेल्या अनेक चित्रपटांची नावे आमच्या गाइडने सांगितली. काही जाणकार लोकांनी त्याला दाद दिली, बाकींच्यांनी नुसतेच "हो का?" म्हणून कौतुक केले. यातून एवढे लक्षात आले की ते लोक प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक सीनसाठी भाराभर नवे सेट उभारत नाहीत. बांधून ठेवलेल्या इमारतींमधून आणि तयार पार्टीशन्समधून निवड करतात आणि आपल्याकडे नाटकांच्या रंगमंचावर नेपथ्य बदलतात तसे तिथले सेट्स फटाफट बदलतात.  अर्थातच या सर्वच इमारती सर्व तांत्रिक दृष्टीने सुसज्ज असतात आणि कॅमेरामन्सना व्यवस्थितपणे शूटिंग करता यावे यासाठी पुरेशी सोय ठेवलेली असते.  शिवाय कॅमेरामध्येही काही ट्रिक्स असतात त्या वापरून त्यांना वस्तूंचे आकार कसे लहान किंवा मोठे करून दाखवता येतात याचेही एक उदाहरण एका स्टूडिओत पाहिले. 

आमच्या गाईडने एक मजेदार गोष्ट सांगितली. एका सिनेमासाठी तिथल्या ग्रीक वास्तुशिल्प असलेल्या इमारतीत कोर्ट लावले होते आणि तिथे बरेचसे सीन शूट करायचे होते. पण त्या सिनेमाचा त्या काळातला सुपरस्टार हीरो अडून बसला की तो काही त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या सात आठ पायऱ्या चढून येणार नाही. मग त्यांनी त्याच्या डमीला आणले, त्याच्या अंगावर हीरोचे निरनिराळे कपडे चढवून त्याला त्या पायऱ्या अनेक वेळा चढायला आणि उतरायला लावल्या आणि त्याचे निरनिराळ्या अँगल्समधून भरपूर शॉट्स घेऊन ठेवले. हे सगळे काम एका दिवसात झाले आणि त्यांचे तुकडे सिनेमामध्ये जागोजागी  जोडले.

आम्ही एका डेरेदार झाडाखाली उभे असतांना आमचा गाईड आजूबाजूच्या इमारतींबद्दल माहिती देत होता. त्याने मध्येच एकदा आम्हाला मान वर करून पहायला सांगितले. आम्ही पाहिले आणि चाटच पडलो. ज्या घनदाट फांद्यांच्या दाट सावलीत आम्ही उभे होतो त्या चक्क झाडाच्या बुंध्यामध्ये केलेल्या खोबणींमध्ये खोचलेल्या होत्या आणि वरून साखळदंडांनी उचलून आणि तोलून धरलेल्या होत्या. त्याची पाने हिरवी गार दिसावीत म्हणून आणखी काही केले असेल म्हणजे ते अख्खे झाड कृत्रिम होते आणि अशी अनेक झाडे तिथे होती. शूटिंगच्या वेळी जशा प्रकारचे झाड हवे असेल तसे झाड ते तिथे उभे करू शकतात. त्यामधून त्यांना हवा तो ऋतूही कधीही दाखवता येतो. 


या प्रकारच्या सोयी मुख्यतः सर्वसाधारण सामाजिक चित्रपटांसाठी उपयोगाला येतात, पण बॅटमॅन, अॅक्वामॅन, हॅरी पॉटर वगैरे चित्रपटांसाठी वेगळे खास स्टूडिओज आहेत. अशा खास सिनेमांसाठी  लागणारी विशेष प्रॉपर्टी तिथे एकाद्या प्रदर्शनात ठेवल्यासारखी मांडून ठेवली आहे. सध्या अशा सिनेमाचे शूटिंग सुरू नसल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. बॅटमॅनच्या दालनात बॅटमॅनचा एक उंचापुरा पुतळा आणि बॅटमॅनच्या दुचाकी तसेच चार चाकांच्या खास बॅटमोबाइल्स ठेवल्या आहेत. या खास गाड्या मुद्दाम डिझाइन करून वर्कशॉप्समध्ये तयार करून घेतल्या आहेत आणि त्यांना विशेष शक्तीशाली इंजिने बसवली आहेत. प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी बॅटमॅन ती मोटार चालवतो असे वाटते, पण एका कोपऱ्यात लपवून बसवलेला वेगळा एक्स्पर्ट ड्रायव्हर ती चालवत असतो असे आमच्या मार्गदर्शकाने सांगितले. 


हॅरी पॉटरची पुस्तके आणि सिनेमे आजकालच्या मुलांची अत्यंत आवडती आहेत. त्या गोष्टीतल्या पात्रांचे युरोपमधल्या मध्ययुगातले चित्रविचित्र पोशाख आणि ते लोक वापरत असलेल्या पुराणकाळातल्या खास गोष्टी हॅरी पॉटरच्या स्टूडिओत पहायला मिळतात. तसेच त्याच्या काही सिनेमामधल्या खास दृष्यांचे फोटोही तिथे लावून ठेवले आहेत. हे दालन बाल प्रेक्षकांना खूप आवडते.


फ्रेंड्स ही मजेदार सीरियल अमेरिकेतल्या टीव्हींवर गेली पंचवीस वर्षे चालत आलेली आहे. त्यातली जो, मोनिका, रॉस वगैरे पात्रे इथल्या मुलांच्या तसेच युवकांच्या अगदी ओळखीची झाली आहेत. इतकी की त्यांच्या नावांची खास ड्रिंक्स इथल्या कॅफेमध्ये ठेवली आहेत.  सेंट्रल पर्क हे या मित्रांचे आवडते कॅफे आहे. सीरियलमधले बरेचसे प्लॅन इथे बसून केले जात असतात, तसेच फालतू टाइमपासही इथेच बसून केला जातो. या सेंट्रल पर्कच्या हुबेहूब प्रतिकृति दोन तीन ठिकाणी करून ठेवल्या आहेत. आपणही तिथे बसून कॉफी पिऊ शकतो, गप्पा मारू शकतो आणि आठवण म्हणून त्याचे फोटो किंवा व्हीडिओ घेऊन ठेऊ शकतो. इतकेच नव्हे तर या सीरियलमध्ये जो सोफा दाखवतात त्यावरही बसून त्याचे फोटो घेऊ शकतो. अशा गिमिक्सनी ही सहल मजेदार होते आणि पर्यटक खूष होतात.

निरनिराळ्या स्टूडिओजची गाइडेड टूर झाल्यानंतर अखेरीस आम्हाला एका सेंट्रल पर्कमध्ये ठेवलेल्या कॉफीशॉपमध्ये सोडून गाइडने आमचा निरोप घेतला. तिथे थोडा अल्पोपाहार घेऊन ताजेतवाने झाल्यावर त्याच स्टूडिओमध्ये असलेले वस्तुसंग्रहालय पाहिले. असंख्य फोटो आणि व्हीडिओंमधून इथे  वॉर्नर ब्रदर्सच्या सिनेमांचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास जतन करून ठेवला आहे. त्यातले काही इंटरअॅक्टिव्हही आहेत. एक कळ दाबली की टेबलावर ठेवलेल्या साध्या दिसणाऱ्या काचेमध्ये आपण निवडलेला सीन आपल्याला दिसायला लागतो. ज्या लोकांना वेस्टर्न सिनेमा या विषयात रस आणि गति आहे त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच आहे. गाइड टाटा बाय बाय करून गेलेला असल्यामुळे इथे आपल्याला हवा तितका वेळ थांबून हे प्रदर्शन सावकाशपणे पाहता येते. शिवाय इथल्या एका खास दालनामध्ये तर बॅटमॅनचा गाऊन घालून त्याच्यासारखा फोटो सुद्धा ते लोक काढून देतात. आधी फोटो काढून घ्या आणि तो आवडला तर नंतर त्याची प्रत विकत घ्या अशी पद्धत आहे. यामुळे बरेच हौशी लोक विशेषतः त्यांच्यासोबत आलेल्या मुलांचे असे फोटो काढून घेतात, त्यामुळे मुलांची बॅटमॅन व्हायची हौस भागते, पण फोटोंच्या कॉपीजची किंमत न परवडणारी असल्यामुळे त्यातले थोडेच लोक त्या विकत घेतात.



अमेरिकेतल्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळामधून बाहेर पडण्याची वाट त्यांच्या खास सजवलेल्या दुकानामधून असते तशीच इथेही आहे. या स्टोअरमध्ये वॉर्नर ब्रदर्सच्या सिनेमा आणि सीरियल्सशी संबंध असलेली चित्रे छापलेल्या पिशव्या, मग्ज, प्लेट्स, कार्पेट्स, बोर्ड्स वगैरे अनंत गोष्टी आकर्षक रीतीने सजवून ठेवलेल्या आहेत, पण त्यांच्या किंमतीही अवाच्या सवाच आहेत. तरीही आठवण म्हणून काही लोक त्यातले काही ना काही घरी घेऊन जातात. एकंदरीत पाहता आमची ही वॉर्नर ब्रदर्सच्या स्टूडिओ टूर छान झाली आणि लक्षात राहण्यासारखा असा काही तरी वेगळा अनुभव मिळाला.