Friday, December 19, 2008

यॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)


यॉर्कच्या रेल्वे स्टेशनाला लागूनच खास रेल्वेचे संग्रहालय आहे. पण तिथे जाण्यासाठी स्टेशनाला बाहेरून वळसा घालून जावे लागते. हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे रेल्वेचे म्यूजियम आहे असा तेथील लोकांचा दावा आहे आणि तसे असेलही. बोरीबंदरएवढ्या विस्तीर्ण आकाराच्या शेडमध्ये सात आठ प्लॅटफॉर्मवर दीडदोनशे तरी वेगवेगळी इंजिने आणि डबे सजवून मांडून उभे करून ठेवलेले आहेत. ते पाहता पाहता आपण थकून जातो पण त्यांची रांग कांही संपत नाही. त्याशिवाय लांबच लांब हॉल्स आणि पॅसेजेसमध्ये हजारोंच्या संख्येने चित्रे, छायाचित्रे, रेखाचित्रे, स्थिर व चालणा-या प्रतिकृती कलात्मक रीतीने मांडल्या आहेत. वेगवेगळ्या कॉंम्प्यूटर स्क्रीन्सवर आणि साध्या पडद्यावर सारखी दाखवली जात असलेली चलचित्रे वेगळीच! लीड्स येथे असलेल्या आर्मरीज या शस्त्रागाराप्रमाणेच यॉर्कचे हे नॅशनल रेल्वे म्यूझियम आपल्याला एका आगळ्याच अनुभवविश्वात घेऊन जाते.


'आधी कोंबडी की आधी अंडे' याप्रमाणेच आधी रेल्वेचे इंजिन आले की आधी त्याचे डबे हा प्रश्न कधीपासून माझ्या मनात होता. यॉर्कच्या म्यूझियममध्ये सारा इतिहासच चित्ररूपाने डोळ्यासमोर उभा ठाकल्याने या प्रश्नाचे उत्तर त्यात सापडले. रेल्वेच्याच काय पण कोठल्याही प्रकारच्या स्वयंप्रेरित इंजिनाचा शोध लागण्याच्या कित्येक वर्षे पूर्वीच रुळावरून गडगडत चालणा-या वॅगन अस्तित्वात आल्या होत्या. यॉर्कशायरमधील कोळशाच्या आणि लोखंडाच्या खाणींमधून खनिजांचा ढिगारा जमीनीवर उचलून आणण्यासाठी एक उतार तयार करून त्यावर लोखंडाचे रूळ बसवले होते. त्यावरून गडगडणा-या एका ट्रॉलीत खोदलेली खनिजे भरून मजूरांच्या सहाय्याने किंवा घोडे जुंपून ती वर ओढून आणीत असत. जेम्स वॉटने पहिले वाफेवर चालणारे स्वयंचलित इंजिन तयार करून दाखवल्यानंतर तशा प्रकारच्या इंजिनाचा पहिला व्यावसायिक उपयोग लीड्स येथील खाणीत करण्यात आला. घोड्यांऐवजी एक इंजिन जुंपून त्यांच्याद्वारे जमीनीतून खनिज पदार्थ बाहेर आणणे सुरू झाले. दोन, चार किंवा आठ घोडे जेवढे वजन ओढू शकतील तेवढे काम हे एक इंजिन करू शकते म्हणून इंजिनाची शक्ती अश्वशक्तीच्या परिमाणात मोजू लागले. त्या काळात 'दर सेकंदाला अमूक इतके फूटपाउंड' अशासारखी परिमाणे लोकांना समजणे शक्यच नव्हते. अजूनही तांत्रिक ज्ञान नसलेल्या किती लोकांना त्याचा अर्थ उमजतो यात शंकाच आहे. विजेचा शोध लागला नसल्यामुळे किलोवॉट तर अजून अस्तित्वात आलेले नव्हते. अश्वशक्तीचा उपयोग मात्र आजतागायत सर्वसामान्य लोक करतात.


त्यानंतर वर्षा दोन वर्षातच उतारूंना घेऊन जाण्यासाठी इंजिनाचा उपयोग करण्याची कल्पना पुढे आली. त्या काळात इंग्लंडमध्ये घोडागाडी हेच श्रीमंत लोकांचे वाहन होते. गरीब लोक पायीच चालत असत किंवा घोड्यावर स्वार होऊन जात असत. त्यांना रेल्वेचा पर्याय देऊन तिकडे आकर्षित करणे हे काम सोपे नव्हते. वाफेच्या इंजिनाचा आकार व त्याबरोबर त्याहून मोठा बॉयलर आणि कोळशाने भरलेली वॅगन नेण्याची जरूरी लक्षात घेता एक दोन माणसांना वाहून नेणारी बग्गी तयार करण्यात कांहीच अर्थ नव्हता. त्यामुळे खूप लोक एकदम प्रवास करू शकतील असे डबे बनवून ते एका शक्तीशाली इंजिनाच्या सहाय्याने ओढणे हेच शहाणपणाचे होते. पण लोकांना असा प्रवास करण्याची संवय नव्हती. तसेच सुरुवातीला या प्रचंड आवाज करणा-या धूडाची त्यांना भीतीही वाटायची. रेल्वे चालवायची म्हंटल्यास त्यासाठी आधी रूळ टाकायला हवेत. ते करण्यासाठी लागणारा खर्च भरून निघायला हवा. यामुळे कोठल्याही अजब अशा नव्या कल्पनेला होतो तसाच या कल्पनेला भरपूर विरोध झाला. ती मांडणा-या लोकांना मूर्खात काढण्यात आले. पण कांही दूरदर्शी लोकांना ती कल्पना पटली आणि नाविन्याचे आकर्षण तर त्यात होतेच. त्यामुळे त्यांनी ती उचलून धरली. निदान मालवाहतूक करणे तरी त्यामुळे जलद आणि स्वस्तात होईल याची त्यांना खात्री होती. सर्वसामान्य लोकांना मात्र रेल्वे प्रत्यक्षात आल्यानंतर इतकी आवडली की हां हां म्हणता जगभर रेल्वेचे जाळे विणले गेले. सैनिक आणि शस्त्रास्त्रे यांची जलदगतीने वाहतूक करण्याच्या दृष्टीने राज्यकर्त्यांना ती फारच सोयीची असल्यामुळे भारतासारख्या दूरच्या देशात देखील कांही वर्षांतच रेल्वे सुरू करण्यात आली.


अगदी प्राथमिक स्वरूपाच्या इंजिनाच्या व गाडीच्या उपयोगापासून आतापर्यंत त्याचा कसा विकास होत गेला याचे सविस्तर चित्ररूप दर्शन घडणारी एक चित्रमालिकाच यॉर्कच्या संग्रहालयात एका विभागात मांडली आहे. तिच्या बरोबर त्या प्रत्येक काळात घडलेल्या महत्वाच्या राजकीय घडामोडीसुद्धा दिल्या आहेत. युरोपातील युद्धे, इंग्लंडचे राजे किंवा राण्यांचे राज्याभिषेक, भारतातील स्वातंत्र्यसंग्राम (इंग्रजांच्या मते शिपायांचे बंड), अमेरिकेतील प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षांची कारकीर्द, विजेच्या दिव्यांचा किंवा टेलीफोनचा शोध वगैरे गोष्टी कधी घडल्या ते रेल्वेच्या प्रगतीच्या सोबतीने पहावयास मिळते. दुस-या एका दृष्यात दोन तीन स्टेशने, त्यामधील रेल्वे ट्रॅक्स, बोगदे, पूल इत्यादीचे सुरेख देखावे मांडले आहेत. त्यात खेळण्यातल्या आगगाड्या सतत ये जा करीत असतात. त्यांचे सुरू होणे, वेग घेणे, स्टेशन जवळ येताच वेग मंदावत बरोबर प्लॅटफॉर्मवर उभे राहणे, सिग्नल पडणे व उठणे, रुळांचे सांधे बदलणे असे सर्व बारकावे या मॉडेलमध्ये दाखवले आहेत. कांचेला विशिष्ट प्रकारची गोलाई देऊन पलीकडची हिरवळ आभाळाला टेकल्याचा त्रिमिती भास निर्माण केला आहे. लहान मुलांना तर ते दृष्य टक लावून पहात बसावेसे वाटतेच, पण मोठ्यांनाही ते पहात राहण्याचा मोह होतो.


वाफेचे इंजिन, डिझेल इंजिन आणि विजेचे इंजिन यांचे सर्व अंतर्गत भाग दाखवणा-या पूर्णाकृती प्रतिकृती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. त्यासाठी त्यांचे विविध जागी छेद घेऊन आंतली रचना दाखवली आहे. तसेच प्रत्येक भागाचे कार्य विशद करणारे तक्ते बाजूला दिले आहेत. थोडे लक्ष देऊन पाहिल्यास सामान्य माणसालाही ते इंजिन कसे काम करते ते समजून घेता येते. इंग्लंडमधीलच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशात इतिहासकाळात वापरली गेलेली इंजिने जमा करून आणि दुरुस्त करून या प्रदर्शनात ठेवली आहेत. प्रवाशांसाठी बनलेल्या डब्यांच्या अंतर्भागात कसकसा बदल होत गेला हे दाखवण्यासाठी अनेक ऐतिहासिक डबे गोळा करून ठेवले आहेत. सर्व सामान्य लोकांचा थर्ड क्लास आणि उच्चभ्रू लोकांसाठी आरामशीर पहिला वर्ग तर आहेतच, पण राजघराण्यातील लोकांसाठी निर्माण केलेले खास सुसज्ज डबेसुद्धा आहेत. कधी कधी तर महाराजा किंवा महाराणीच्या फक्त एका वेळच्या प्रवासासाठी असा खास डबा तयार केला जायचा आणि तो प्रवास होऊन गेल्यानंतर तो डबा बाजूला ठेवला जात असे. अशा खास डब्यामधील जेवणाचे टेबल, त्यावरील प्लेट्स, काटे, चमचे, नोकरांचे पोशाख, खिडक्यांना लावलेले पडदे अशा सगळ्या गोष्टी सुव्यवस्थितपणे मांडून तो काळ निर्माण केला आहे. पर्यटकांना आंत जाऊन ते सारे पाहून घेण्याची अनुमती आहे तसेच त्यादृष्टीने रांगेने आंत जाऊन बाहेर पडण्याची व्यवस्था केलेली आहे.

No comments: