आढावा

दहा वर्षांपूर्वी माझे संगणकाविषयीचे ज्ञान यथातथाच होते. मला कळफलकावरील (कीबोर्डवरील) बटने चाळवून मॉनिटरवर मराठी भाषेतली अक्षरे उमटवता आली याचेच केवढे अप्रूप वाटले होते. आंतर्जालाची (इंटरनेटची) जेमतेम ओळख झाली होती. त्या काळातल्या अतिमंद वेगाने ई मेल पाठवणे आणि जरासे नेटसर्फिंग करणे मला नुकतेच जमायला लागलेले होते.  इतर लोकांनी अवकाशात विखरून ठेवलेले ज्ञान आणि मनोरंजक माहिती वाचता वाचता आपल्यालासुद्धा हे करता यायला हवे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण झाली. पण ते कसे करायचे याबद्दल कोणाला विचारायचे हेही मला माहीत नव्हते. पण इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे चवकशी करत करत माझ्या मुलाच्या सहाय्याने हा ब्लॉग तयार करून १ जानेवारी २००६ रोजी माझ्या ब्लॉगगिरीचा श्रीगणेशा केला.  त्या गोष्टीला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत. याच सुमारास मी माझ्या ब्लॉगवरील १००० वी पोस्ट कालच टाकली आहे.

सुरुवातीला मी या ब्लॉगवर लिहिलेला मजकूर वाचणाराच कोणी भेटत नव्हता. त्या काळात माझ्या जेवढ्या मित्रांकडे इंटरनेट होते त्यातल्या कोणाकडेही देवनागरी लिपी वाचण्याची सोय नव्हती, त्यांना फक्त ओळीने चौकोनी ठोकळे दिसायचे. त्यांना वाचता यावे म्हणून मी लिखित मजकूर (टेक्स्ट) चित्रमय (इमेज) रूपात द्यायला सुरुवात केली होती. हे काम जिकीरीचे असले तरी त्या वेळी आवश्यक होते. पुढे वर्षभर काही तांत्रिक स्वरूपाच्या कारणामुळे हा ब्लॉग निद्रिस्त झाला होता. २००८ साली मी त्याचे पुरुज्जीवन केले. त्यानंतर मात्र हा व्यवस्थितपणे चालत राहिला आहे.

पहिल्या काही वर्षांमध्ये मी उत्साहाने अनेक पोस्ट चढवत राहिलो. या दरम्यान माझ्या वाचकांची संख्या वेगाने वाढत गेली. त्यामुळे मला जास्तच प्रोत्साहन मिळत गेले. ही संख्या आता दोन लाखांच्या वर गेली आहे आणि वाढतच आहे. गेल्या एक दोन वर्षांमध्ये मात्र वैयक्तिक आणि आरोग्यविषयक कारणांमुळे मला नवे लेख लिहिणे शक्य होत नव्हते. तरीसुद्धा वाचकांनी मात्र या स्थळाला भेट देणे चालू ठेवले आहे. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

आता मी असे ठरवले आहे की यापुढे माझ्या पोस्ट्सची संख्या वाढवायची नाही. जुन्या आणि संदर्भहीन झालेल्या काही पोस्ट वगळायच्या, काहींचे एकमेकांमध्ये विलीनीकरण करायचे आणि त्यांच्या जागी नवी पोस्ट टाकून १००० चा आकडा कायम ठेवायचा. दहा वर्षे उलटल्यानंतर मी हे पहिले पान (पेज) उघडले आहे. या ब्लॉगवरील लेखांविषयीची माहिती या प्रकारच्या पानांवर देत राहीन.

सर्व प्रिय वाचकांचे आभार आणि त्यांना नववर्षासाठी शुभेच्छा.
२७ मार्च २०१७
-------------------------------------------------------------------------

थोडी माहिती
मे २०१० पासून आजपर्यंत वाचनसंख्या २७४, ७३३
सरासरी दर वर्षी सुमारे ४००००
                 लेखांची संख्या १००० वर मर्यादित,
                 सरासरी दर वर्षी १०० , अधिकाधिक २५१ (२००८)
लेखांना मिळालेल्या भेटी - सरासरी २७५
                                 अधिकाधिक ४६३०
मागोवा घेणारे (फॉलोअर्स) मित्र १४१
२७ मार्च २०१७
-------------------------------------------------------------------------
मे २०१० पासून आजपर्यंत वाचनसंख्या ३११७४६
लेखांना मिळालेल्या भेटी - सरासरी ३११, अधिकाधिक १२८२२
मागोवा घेणारे मित्र (फॉलोअर्स)  १४५
१२ जानेवारी २०१८
------------------------------------------------------------------------------

No comments: