Sunday, March 31, 2013

संत एकनाथांच्या रचना

संत बहिणाबाईंनी आपल्या प्रसिध्द अभंगात म्हटले आहे, संतकृपा जाली | इमारत फळा आली ।।
ज्ञानदेवें रचिला पाया | उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर | तेणे रचिले तें आवार ।।
जनार्दन एकनाथ | खांब दिधला भागवत ।। तुका जालासे कळस | भजन करा सावकाश ।।

ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम या संतश्रेष्ठांच्या समवेत संत बहिणाबाईंनी या यादीमध्ये संत एकनाथांचाही समावेश केला आहे. एकनाथ हे भागवत सांप्रदायाच्या किंवा वारकरी पंथाच्या इमारतीतले स्तंभ आहेत. 'ओवी ज्ञानेशाची' आणि 'अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची' हे पद्यांच्या त्या दोन वृत्तांमधले (गेल्या कित्येक शतकांमधले) सर्वश्रेष्ठ साहित्य म्हणून नावाजले गेले आहे. संत नामदेव विठ्ठलाचा अत्यंत लाडका भक्त होता. विठ्ठलावरील त्यांच्या प्रेमाचे दर्शन अनेक आख्यायिकांमधून होतेच, त्यांच्या अभंगामधून ते प्रतीत होते. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेबामध्ये नामदेवांच्या काही रचना दिल्या आहेत. या तीन संतश्रेष्ठांच्या मानाने संत एकनाथ किंचित कमी प्रसिध्द असतील, पण त्यांनी केलेल्या रचनासुध्दा आजही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या रचनांमधील विविधता हे त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

संस्कृत भाषेमध्ये असलेली भगवद्गीता लोकांना समजावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरीसुध्दा तात्विक दृष्ट्या फार उच्च पातळीवर आहे. संत तुकाराम आणि संत नामदेव महाराजांचे अभंग सर्वसामान्य लोकांच्या ओठावर सहज बसावेत असे सोपे आणि सुंदर आहेत. संत एकनाथ महाराजांनी ओवीबध्द ग्रंथरचना केली, भजनामध्ये गायिले जाणारे अभंग लिहिले, त्याशिवाय मनोरंजक अशी भारुडे, गवळणी वगैरे लिहिल्या. घरातल्या देव्हा-यासमोर बसून ज्ञानी पंडित लोकांनी वाचावे असे आध्यात्मिक वाङ्मय, ओसरीवर बसून श्रोत्यांना वाचून ऐकवण्यासाठी पोथ्या, देवळातल्या सभामंटपात भक्तजनांनी टाळमृदुंगाच्या साथीवर भजन करतांना म्हणावेत असे भक्तीपूर्ण आणि रसाळ अभंग आणि लोकगीतांच्या मंचावर शाहीरांनी डफ झांज आणि तुणतुण्याच्या साथीने गाव्यात अशी भारुडे, गवळणी वगैरे अशा विविध जागी संत एकनाथांच्या रचना ऐकायला मिळतात. त्याशिवाय गेल्या शतकातल्या मान्यवर संगीत दिग्दर्शकांनी संत एकनाथांच्या रचनांना सुमधुर चाली लावून त्या दृक्श्राव्य माध्यमांमधून घराघरात पोचवल्या आहेत. अशा काही अत्यंत लोकप्रिय रचना या लेखात दिल्या आहेत.

संतांच्या जीवनावरील चित्रपटांमध्ये त्यांच्या सोज्ज्वळ भूमिका साकारणा-या विष्णुपंत पागनीस या गायक नटाच्या आवाजातले हे गीत किती मनोरंजकसुध्दा आहे पहा. देवाबरोबर इतकी सलगी साधून बोलणारे एकनाथ लटक्या तक्रारीच्या सुरात सांगतात.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा । देव एका पायाने लंगडा ॥१॥
शिंकेचि तोडितो मडकेचि फोडितो । करी दही-दुधाचा रबडा ॥२॥
वाळवंटी जातो कीर्तन करितो । घेतो साधुसंतांसि झगडा ॥३॥
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥४॥

कवी जयदेव आणि सूरदास यांनी राधाकृष्णामधील मधुरा भक्तीवर केलेल्या अनेक गीतरचना लोकप्रिय आहेत. मराठी भाषेत याबद्दल काव्य करणारे संत एकनाथच लगेच डोळ्यासमोर येतात. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबध्द केलेली ही दोन गीते अजरामर झाली आहेत. पहिल्या गीतात ते राधेच्या भूमिकामधून अलगदपणे एकनाथांच्या भूमिकेत जातात.
कशि जांवू मी वृंदावना ।  मुरली वाजवी ग कान्हा ॥धॄ॥
पैलतिरीं हरि वाजवी मुरली । नदि भरलीं यमुना ॥१॥
कासे पीतांबर कस्तुरी टिळक । कुंडल शोभे काना ॥२॥
काय करू बाई कोणाला सांगूं । नामाची सांगड आणा ॥३॥
नंदाच्या हरिनें कौतुक केलें । जाणे अंतरिच्या खुणा ॥४॥
एका जनार्दनी मनी म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥

दुस-या गाण्यामध्ये राधा आणि कृष्ण या दोघांचेही देहभान हरपल्यामुळे ते कसे वेडेवाकडे चाळे करत आहेत असे सांगता सांगता एकनाथ महाराज स्वतःच देवाशी एकरूप होतात.
वारियाने कुंडल हाले, डोळे मोडित राधा चाले ।।
राधा पाहून भुलले हरी, बैल दुभवी नंदाघरी ।।
फणस जंबिर कर्दळी दाटा । हाति घेऊन नारंगी फाटा ।।
हरि पाहून भुलली चित्‍ता । राधा घुसळी डेरा रिता ।।
ऐसी आवडी मिनली दोघा । एकरूप झाले अंगा ।।
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ।।

आर. एन्‌. पराडकर या गायकाच्या प्रसिध्द भक्तीगीतांमधले संत एकनाथांचे हे गाणेसुध्दा राधाकृष्णाच्या प्रीतीबद्दलच आहे.
नको वाजवू श्रीहरी मुरली ।
तुझ्या मुरलीने तहान-भूक हरली रे ।।
खुंटला वायुचा वेग, वर्षती मेघ, जल स्थिरावली ।।
घागर घेऊन पाणियासी जाता, डोईवर घागर पाझरली ।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने, राधा गौळण घाबरली ।।

बाळकृष्णाने आपल्या बासरीमधल्या जादूने सर्व चराचराला कशी मोहिनी घातली होती याचे सुंदर वर्णन या गीतात आहे.
भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥
पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥
तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥
नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥

भारतरत्न स्व.पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या या अभंगाची संगीतरचना राम फाटक यांनी केली आहे.
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

किशोरी आमोणकर या शास्त्रीय संगीतामधील श्रेष्ठ गायिकेने थोडी सुगम संगीतातली गीते दिली आहेत यातले एक प्रसिध्द गीत संत एकनाथांच्या रचनांमधून घेतले आहे. पं. रघुनंदन पणशीकर यांनी या गीतात किशोरीताईंना आवाजाची साथ दिली आहे.
कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल । कानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥
कानडा विठ्ठल नामें बरवा । कानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥
कानडा विठ्ठल रूपे सावळां । कानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥
कानडा विठ्ठल चंद्रभागे तटी । कानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥
कानडा विठ्ठल कानडा बोले । कानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥
वेधियेलें मन कानड्यानें माझें । एका जनार्दनीं दुजें नाठवेचि ॥६॥


या दोन श्रेष्ट गायकांच्या नंतर आलेल्या पिढीमधील संगीतकार श्रीधर फडके आणि स्वराची देणगी लाभलेले आजचे आघाडीचे गायक सुरेश वाडकर यांनी तयार केलेल्या आल्बममध्ये त्यांनी संत एकनाथांचे अभंग घेतले आहेत.
गुरु परमात्मा परेशु । ऐसा ज्याचा दृढ विश्वासु ॥१॥
देव तयाचा अंकिला । स्वयें संचरा त्याचे घरा ॥२॥
एका जनार्दनी गरुदेव । येथें नाही बा संशय ॥३॥

माझ्या मना लागो छंद गोविंद, नित्य गोविंद ॥१॥
तेणो देह ब्रम्हरूप गोविंद, नित्य गोविंद ।
नि जसे रामरूप, नित्य गोविंद ॥२॥
तुटेल सकळ उपाधी, निरसेल आधी व्याधी ।
निरसेल गोविंद, नित्य गोविंद ॥३॥
गोविंद हा जनी-वनी ।
म्हणे एका जनार्दनी ॥४॥

येथोनी आनंदू रे आनंदू । कृपासागर तो गोविंदू रे ॥१॥
महाराजाचे राऊळी । वाजे ब्रम्हानंद टाळी ॥२॥
लक्ष्मी चतुर्भुज झाली । प्रसाद घेऊन बाहेर आली ॥३॥
एका जनार्दनी नाम । पाहता मिळे आत्माराम ॥४॥

रुपे सुंदर सावळा गे माये ।
वेणु वाजवी वृंदावना गोधने चारिता ॥१॥
रुणझुण वाजवी वेणु ।
वेधी वेधले आमुचे तनमनु ओ माये ॥२॥
गोधने चारी हती घेऊन काठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोपवेषे जगजेठी ।
वैकुंठीचा सुकुमार गोधने चारीताहे ॥३॥
एका जनार्दनी भुलवी गौळणी ।
करीती तनुमनाची वोवाळणी वो माये ॥४॥

ॐकार स्वरूपा, सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा, तुज नमो ।
तुज नमो, तुज नमो, तुज नमो ॥१॥
नमो मायबापा, गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना मायामोहा ।
मोहोजाळ माझे कोण नीरशील ।
तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥२॥
सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ।
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढे उदास चंद्र-रवी ।
रवी, शशी, अग्‍नि, नेणति ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥३॥
एका जनार्दनी गुरू परब्रम्ह ।
तयाचे पैनाम सदामुखी ॥४॥
ॐकार स्वरूपा या गाण्याने तर एका काळात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. आजही हे गाणे निरनिराळ्या कार्यक्रमांमधून, अगदी नृत्यामधूनसुध्दा सादर केले जातांना दिसते.

.  . . . . . . . .  . . (उत्तरार्ध पुढील भागात)

Tuesday, March 26, 2013

इंद्रदेवा.. रे देवा

या महिन्यात जागतिक महिला दिवस येऊन गेला. त्या वेळी पृथ्वीवर केली गेलेली वक्तव्ये स्वर्गामधल्या देवांचा राजा इन्द्र याच्या दरबारापर्यंत जाऊन पोचली आणि मग तिथे काय झाले? उद्या होळी आहे. या निमित्याने थोडे हलके फुलके वगनाट्य.

इंद्रमहाराज आपल्या प्रधानाची वाट पहात आहेत. धावत पळत आणि घाम पुसत प्रधानजी प्रवेश करतात.
इंद्रदेवः अहो प्रधानजी, मी केंव्हाची तुमची वाट पहातो आहे, इतका वेळ न सांगता कुठं गेला होतात?
प्रधानः महाराज, मी त्या आधारकार्डाच्या रांगेत उभा होतो तेंव्हा नारदमुनीचा अर्जंट टेक्स्ट मेसेज आला, त्यामुळे मला रांगेतला नंबर सोडून 'शाडा'कडे धावावं लागलं.
इंद्रदेवः कुठं?
प्रधानः अहो स्वर्गलोक हाउसिंग ...
इंद्रदेवः कशाला?
प्रधानः त्यांच्या फ्लॅट्सची उद्या सोडत आहे ना? तुमचं नाव त्यांच्या यादीत घुसवायचं होतं.
इंद्रदेवः का?
प्रधानः तुम्ही सांगा, इतकी वर्षं इंद्रपद सांभाळलंत, स्वतःचा एकादा तरी बंगला, फार्महाउस नाही तर पेंटहाउस बांधून ठेवलंय्त?
इंद्रदेवः नाही.
प्रधानः निदान बटाट्याच्या चाळीतली खोली?
इंद्रदेवः कुठली?
प्रधानः अरे हो, ती चाळ तर पाडून टाकलीय् नाही का, पण तिथं बांधलेल्या खिरानंदानी टॉवर्समध्ये फ्लॅट घेतलाय्त?
इंद्रदेवः अहो, त्यातले काही नाही. पण मी त्या शाडाच्या गळत्या छप्परांखाली रहायला जाणार आहे का?
प्रधानः मग कुठं जाणार आहात?
इंद्रदेवः का? आपला इतका मोठा इंद्रमहाल असतांना आणखी कुठे कशाला जायचं?
प्रधानः आज आहे, पण उद्या तो तुमचा असणार नाही.
इंद्रदेवः का?
प्रधानः महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आता इंद्रपदालाही लागू होणार आहे. हीच बातमी नारदमुनींनी मला तातडीने कळवली होती. उद्या तुमची सध्याची टर्म संपली की पुढची पाच युगे हे स्थान महिलांसाठी आरक्षित राहणार आहे.
इंद्रदेवः का रे, पृथ्वीवरच्या सगळ्या स्त्रीमुक्तीवाल्या एकदम स्वर्गवासी झाल्या का?
प्रधानः नाही, तिथे त्यांचा लढा चालूच आहे, पण त्यांच्या लाटण्यांचा खणखणाट आता गगनाला भेदून स्वर्गापर्यंत येऊन पोचला आहे.
इंद्रदेवः काय म्हणतोस?
प्रधानः अहो, पृथ्वीवरच्या प्रदूषणामुळे आकाशाला भोकं पडून त्याची नुसती चाळण झाली आहे. आपला स्वर्गलोक आता मुळीसुध्दा साउंडप्रूफ राहिलेला नाही.
इंद्रदेवः हो!
प्रधानः शिवाय ती रोहिणी आपल्या प्रत्येक उड्डाणात गुपचुपपणे स्वर्गामध्ये लाटणी पाठवत आली आहे. ती सुनीताबाई परवाच आपल्या यानात बसून इकडची पाहणी करून गेली आणि नव्या यानामधून तिनं आता अद्ययावत लाटण्यांचं मोठं कन्साइनमेंट इकडं पाठवलं आहे.
इंद्रदेवः बापरे!
प्रधानः अहो सगळ्या गोपिका आता दांडिया आणि गरबा नृत्याऐवजी लाटणीडान्स करायला लागल्या आहेत. राधा ही बावरी राहिली नाहीय्, तीच त्यांना कोरिओग्राफी करून देते आहे.
इंद्रदेवः हो! त्यांची समजूत घालायला आपल्या मेनका रंभांना सांगा.
प्रधानः अहो, तुमच्या मनोरंजनासाठी भरणारी इंद्रसभा आता यापुढे भरणार नाही, म्हणून मेनका, रंभा, ऊर्वशी वगैरे सर्व अप्सरा आता जुडो, कराटे, ताय्केवान्डो वगैरे मार्शल आर्ट्सची प्रॅक्टिस करताहेत. स्वर्गलोकातल्या महिलांना त्या सेल्फडिफेन्सचे ट्रेनिंग देणार आहेत.
इंद्रदेवः खरं सांगताहात?
प्रधानः आणखीही जय्यत तयारी चालली आहे, हेमा, रेखा, जया और सुषमा यांनी निरमाची पोतीच्या पोती स्वर्गात धाडली आहेत. उद्यापासून स्वर्गलोकात साचलेला सगळा मळ काढून त्याला स्वच्छ करायला सुरुवात होणार आहे.
इंद्रदेवः अरे, एवढी कशाला काळजी करतोय्स, महिलांना आरक्षण पाहिजे असेल तर आपल्या इंद्राणीला माझ्या सिंहासनावर बसवून देऊ. त्यात आहे काय आणि नाही काय?
प्रधानः ते चालणार नाही. आता अहिल्या, द्रौपदी, सीता यासारख्या शोषित महिलेलाच इंद्रपद मिळावे असे ठरवले जात आहे. त्यात अहिल्येला मिळाले तर तुमचं काही खरं नाही. मग तुम्हाला शाडातसुध्दा जागा मिळणार नाही, डायरेक्ट पर्णकुटी बांधून त्यात रहावे लागेल.
इंद्रदेवः इंद्राणीदेवींना पण?
प्रधानः त्यांनी जर तुमच्या बारा मुलांना जन्म दिला असता, तर तुमची गादी सांभाळण्यासाठी शोषित म्हणून कदाचित त्यांचाही विचार केला गेला असता, पण त्यांना तर नटून थटून सगळीकडे पुढे पुढे करायची हौस आहेना? कुणाला त्याची कणव वाटेल? 
इंद्रदेवः हे फारच गंभीर प्रकरण दिसते आहे. मला लगेच ब्रह्माविष्णूमहेशांची भेट घ्यायला हवी.
प्रधानः काही उपयोग नाही, यापुढे व्हीआरएस घेऊन आणि ध्यानमग्न होऊन काही युगे चिंतन करायचे त्या तीघांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः कसले?
प्रधानः ब्रह्मदेवांच्या चार वेदांना आता फारसे महत्व राहिले नाही, अनेक लोकांनी वैदिक वैदिक या नावाखाली इतक्या गोष्टींचं मार्केटिंग करून पाहिलं, पण त्यांच्या मालाला उठावच मिळत नाहीय्. त्यामुळे आता एकदम दहा नवे कोरे वेद लिहायचे त्यांनी ठरवले आहे. ते तर नेहमीच पद्मासन घालून बसलेले असतात. त्याच अवस्थेत ते आता ध्यानमग्न होणार आहेत.
इंद्रदेवः विष्णू भगवान?
प्रधानः त्यांनी तयार केलेली या विश्वाची ऑपरेटिंग सिस्टिम आता ऑब्सोलेट आणि करप्ट झाली आहे आणि त्यात इतके बग्ज निर्माण झाले आहेत की जागोजागी त्यात एरर दिसायला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना एक वेगळी व्हायरसप्रूफ ऑपरेटिंग सिस्टिम बनवायची आहे. तिचे व्ही अँड व्ही वगैरे करायला काही युगे तरी त्यांना हवी आहेत. तोवर ते आपल्या शेषनागाच्या स्पायरल गॅलेक्सीवरच अनअॅप्रेचेबल राहणार आहेत.
इंद्रदेवः आणि महेशांचा काय विचार आहे?
प्रधानः त्यांच्यासमोर तर खूप प्रश्न आहेत. नरकासूर, तारकासूर, भस्मासूर, रावण वगैरे सर्वांनी निरनिराळ्या रूपांमध्ये पृथ्वीवर अवतार घेऊन लोकांना छळायला सुरुवात केली आहे. हे सगळेजण तपश्चर्या करून आपल्याकडे वरदान मागायला आले तर त्यांना डिप्लोमॅटिकली कसा नकार द्यावा यावर मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकांचा त्यांना अभ्यास करायचा आहे. त्यांनी मदनाला जाळून टाकल्यावर त्या राखेमधून तो फिनिक्स पक्ष्यासारखा पुन्हा जीवंत झाला आणि आता तर त्याने माणसांमध्ये नुसता कहर माजवला आहे. त्याला पुन्हा भस्म करायसाठी आपल्या तिस-या डोळ्याची पॉवर कशी वाढवायची यावर त्यांना चिंतन करायचे आहे.
इंद्रदेवः आणखी?
प्रधानः त्या शिवमणीच्या तालवाद्यांवर प्रभुदेवाचा डान्स पाहून त्यातल्या कोणत्या स्टेप्स आपल्या पुढल्या डमरूवादन आणि तांडवनृत्यात घालाव्यात यावर ते विचार करताहेत.
इंद्रदेवः म्हणजे यातले सगळे बाजूला झाल्यानंतर मग हे जग कसे चालणार आहे?
प्रधानः का? आपल्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहेत ना! विश्वाचा सगळा कारभार त्यांच्याकडे सोपवायचे ब्रह्माविष्णूमहेशांनी ठरवले आहे.
इंद्रदेवः त्यांनाही आपले नारदमुनी तरी लागतीलच ना?
प्रधानः त्यांची काही गरज नाही. पृथ्वीवरच्या टेलीव्हिजनवरच्या सीरियल पाहिल्यात तर प्रत्येकींमध्ये एक दोन तरी कळलावी स्त्री पात्रं हमखास असतात. कुठेही, कोणीही आणि काहीही बोलत असलं तरी त्यावेळी त्याजागी या साळकाया माळकाया नेमक्या हजर असतात आणि ते बोलणं ऐकून इकडचं तिकडे करत असतात. टायमिंगच्या बाबतीतलं त्यांच्या इतकं परफेक्शन नारदमुनींनाही जमलं नसतं. त्यांनीही आता कुठल्या तरी अरण्यात जाऊन तपश्चर्या आणि चिंतन करायचे दिवस आले आहेत. 
इंद्रदेवः मग तुम्ही काय करायचं ठरवलंय?
प्रधानः ते पहायचंय्. महिलांच्या राज्यात माझे प्रधानपद तर राहणार नाही, मंत्रीणबाईंचा स्टेनो वगैरेची नोकरी मिळेल का ते पहायचंय्. टायपिंग, शॉर्टहँड, काँप्यूटर डेटाएन्ट्री, इंटरनेट वगैरे सगळ्यांचा एक कम्बाइंड क्रॅश कोर्स मी आजच जॉइन केला आहे.
इंद्रदेवः अरे देवाधिदेवा! 

Friday, March 22, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग ३)

आमच्या राजस्थानमधल्या पॉवर प्रॉजेक्टसाठी कॅनडाबरोबर टेक्निकल कोलॅबोरेशन होते आणि त्यांच्याकडून मोठे कर्जही मिळाले होते. पण त्याच्या पाठोपाठ तसाच दुसरा पॉवर प्रॉजेक्ट मद्रासजवळ कल्पकम इथे उभारला गेला तो पूर्णपणे स्वतःच्या प्रयत्नांमधून. त्यानंतर नरोरा इथे उभारलेल्या नव्या स्वरूपाच्या पॉवर प्रॉजेक्टच्या पायापासून शिखरापर्यंत पूर्ण डिझाइन आम्ही केले आणि त्यात सुधारणा करून काक्रापार, कैगा आणि पुन्हा कोटा या ठिकाणी वीजकेंद्रे उभारली. यातल्या प्रत्येक पायरीवर आमच्या कामाचे स्वरूप, व्याप आणि जबाबदारी यात भर पडत गेली. त्याचबरोबर अनेक नवे सहकारी आले आणि ऑफीसचा विस्तार होत गेला. नटराजन यांच्या समवयस्क अधिका-यांपैकी काही जणांची बदली झाली, काही जण नोकरी सोडून तर काही हे जगच सोडून गेले. दर वेळी त्यांच्याकडे असलेल्या कामाचा काही भाग नटराजन यांना सोपवण्यात आला आणि ऑफिसातले त्यांचे स्थान उंचावत गेले. आमच्या ऑफिसचे रिस्ट्रक्चरिंग किंवा रिऑर्गनायझेशनही होत होते. त्यात काही नवे ग्रुप किंवा सेक्शन बनले, काही जुन्या गटांचे विसर्जन किंवा विभाजन झाले. माझ्याकडे असलेल्या कामातही वाढ होत गेली, काही वेळा त्यातले काही काम काढून दुस-या ग्रुपकडेही दिले गेले. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जवळजवळ तीस वर्षे मी मात्र सलगपणे नटराजन यांनाच डायरेक्टली रिपोर्ट करत राहिलो. याला योगायोग म्हणायचा की आणखी काही हे मलाही समजले नाही. माझ्या बॅचमधील इतर सगळ्या मुलांनी कधी ग्रुप बदलले, तर कधी त्यांचे बॉस बदलले गेले, पण माझ्या बाबतीत तसे झालेच नाही. जेंव्हा नटराजन यांना बढती मिळून वरची जागा मिळाली तेंव्हा त्यांची जागा मला मिळत गेली. मी त्यांच्यारोबर काम करायला सुरुवात केली त्या वेळी आम्ही फक्त दोघेच होतो. ते रिटायर झाले तेंव्हा शंभराहून जास्त माणसे त्यांच्या हाताखाली काम करत होती, त्यातले पंधरा वीस जण माझ्याहून वयाने मोठे आणि ग्रेडने सीनियर होते, पण त्यातल्या कोणाला आमच्या दोघांच्या मध्ये आणले गेले नाही. अधिकारी आणि त्याचा सहाय्यक अशा कोणत्याही एका जोडीने सलगपणे इतकी वर्षे मिळून काम केल्याचे असे दुसरे उदाहरण आमच्या ऑफिसमध्ये झाले नाहीच, पण माझ्या माहितीतल्या इतर कोणत्याच संस्थेत असे घडले नाही. कदाचित हा एक प्रकारचा जागतिक विक्रम असण्याचीसुध्दा शक्यता आहे.

या दीर्घ सहवासामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांच्या व्यक्तीमत्वाचे निरनिराळे पैलू समजत गेले. नटराजन यांचे इंग्रजी भाषेवर एका निराळ्या प्रकारचे उत्तम प्रभुत्व होते. ते कधीही वाङ्मयीन किंवा काव्यात्मक भाषेत बोलत नसत. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यासारखे अलंकार, म्हणी, वाक्प्रचार, कोटेशन्स वगैरे कशाचाही त्यांच्या बोलण्यात समावेश होत नसे, ते कधीही द्व्यर्थी शब्द उच्चारत नसत, पण जे काही सांगत ते अत्यंत नेमकेपणाने, सोप्या भाषेत, लहान वाक्यांमध्ये आणि स्पष्टपणे सांगत. त्यांनी बोललेला एकादाही शब्द मला समजला नाही आणि त्याचा अर्थ विचारावा लागला असे कधीच झाले नाही. मोघम स्वरूपाची किंवा 'पण,' 'परंतु,' 'किंबहुना' अशी अव्यये जोडून गोंधळात टाकणारी परस्पर विरोधी विधाने त्यांच्या बोलण्यात येत नसत. सुरुवातीला मला त्यांच्याइतके अचूक बोलता येत नसे. तरीही जसे त्यांचे बोलणे मला व्यवस्थित समजत असे तसेच मला काय सांगायचे आहे ते त्यांना कळत असे. त्यांचे बोलणे ऐकून हळूहळू मी त्यातून शिकत गेलो. त्यांच्या बोलण्याचा एक मोठा गुण असा होता की त्यात चुकूनसुध्दा एकही अपशब्द येत नसे. अमेरिकेत राहूनसुध्दा तिथली स्लँग त्यांनी उचलली नव्हती. अत्यंत नाठाळ माणसाच्या हट्टीपणाला किंवा आडमुठेपणालासुध्दा "नरकात जा." (गो टू हेल) इतकी सौम्य रिअॅक्शन सुध्दा त्यांनी देतांना मी ऐकले नाही. मनुष्यस्वभावाप्रमाणे त्यांनाही राग येत असे, पण तोसुध्दा आरडाओरड, आदळ आपट, हातवारे यातले काहीही न करता ते सभ्य शब्दांमध्ये आणि ठामपणे व्यक्त करत असत. वेळप्रसंगी गरज पडल्यास ते आम्हाला चांगले फैलावर घेत असत, पण तरीही अपमानास्पद वागणूक देत नसत. त्यामुळे सर्वांना त्यांची जरब वाटत असे पण त्यांचा राग येत नसे.
  
जसे त्यांचे बोलणे मोजून मापून होते तसेच किबहुना त्याहूनही जास्त अचूकपणा त्यांच्या लिहिण्यात येत असे. आमच्या ऑफिसच्या प्रथेनुसार सुरुवातीच्या काळात आमच्या कामासंबंधी बाहेरच्या जगाशी होणारा सर्व पत्रव्यवहार त्यांच्या नावानेच होत असे. बाहेरून आलेली पत्रे त्यांच्याच नावाने येत आणि विषय पाहून त्या कामाशी निगडित असलेल्या सहाय्यकाकडे ते पाठवून देत. आलेल्या पत्राचा अभ्यास करून त्याच्या उत्तराचा मसूदा (ड्राफ्ट) घेऊनच मी त्यांच्याकडे जात असे. त्यातले अक्षरन् अक्षर वाचून त्यात व्याकरणातल्या चुका सापडल्या तर ते सुधारत असतच, शिवाय त्यातली शब्दरचना, वाक्यरचना यामधून नेमका अर्थ निघतो, त्याचा कोणी अनर्थ करू शकणार नाही याची काळजी घेत. त्यांनी वापरलेले शब्द आमच्या ओळखीचेच असले तरी ते जास्त योग्य असत. आम्हाला सुचलेल्या शब्दामधून वेगळ्या छटा निघण्याची शक्यता असे तशी त्यांनी केलेल्या दुरुस्तीमध्ये नसे. टेक्निकल स्पेसिफिकेशन्स लिहितांना अचूक शब्द वापरणे अत्यंत महत्वाचे असते. त्यात मोघमपणा आला तर गोंधळ उडण्याची शक्यता असल्यामुळे ते या बाबतीत खूप काळजी घेत असत. 

त्यांचे वागणेसुध्दा असेच काटेकोरपणाचे असायचे. ते ऑफीसमध्ये नेहमी वक्तशीरपणे येत आणि ऑफीसची वेळ संपल्यानंतर हातातले काम पूर्ण करून घरी जात असत, पण त्याचा देखावा करत नसत. ऑफीसमध्ये ते कधीही इतर विषयांवर बोलत नसत. कामाच्या वेळात चार मित्र किंवा सहका-यांना जमवून त्याच्यासोबत राजकारण, क्रीडा, सिनेमा, शेअर मार्केट अशा अवांतर विषयावर गप्पा मारणे त्यांना आवडत नव्हते. त्यांना ऑफिसचे काम सोडून कोणत्या विषयात रस होता हे मला इतक्या वर्षांच्या सहवासात कधीच कळले नाही. नाटक, सिनेमा, संगीत वगैरेंचा आस्वाद घेण्यासाठी ज्या ठिकाणी मी जात होतो त्यात कोठेही आमची कधीच गाठ पडली नाही. यात भाषेचा प्रश्नही होताच, कारण मी फक्त मराठी आणि हिंदी भाषेमधील कार्यक्रमांना हजर असत होतो आणि चाळीस वर्षे मुंबईत राहूनसुध्दा नटराजन यांना या दोन्ही भाषांमध्ये गोडी निर्माण झाली नव्हती. आमच्या ऑफिसचे काम इंग्रजीमधून चालत असले तरी सहका-यांबरोबर बोलणे बहुतेक वेळा हिंदीमध्येच होत असे. दक्षिण भारतीय आणि बंगाली भाषिक लोकसुध्दा त्यात सहभागी होत असत. पण ऩटराजन यांना मात्र इंग्लिश किंवा तामीळ सोडून इतर कोणत्याही भाषेत बोलतांना मी ऐकले नाही. बाजारात ते काय करत होते कोण जाणे.
   
त्यांना कसलेही व्यसन नव्हतेच, मद्य किंवा सिगरेटला ते मौज मजा म्हणूनदेखील कधीही स्पर्श करत नव्हते. चहा कॉफी वगैरेचे सेवनसुध्दा अगदी माफक आणि त्यांच्या केबिनमध्येच होत असे. ते कोणाबरोबर कँटीनमध्ये बसून टाइमपास करत आहेत असे दृष्य डोळ्यासमोर येतच नाही. त्यांची विचार करण्याची पातळी थोडी वेगळी होती. एरर, मिस्टेक आणि ब्लंडर (क्षुल्लक चूक, चूक आणि घोडचूक) या शब्दांच्या अर्थांमधल्या सीमारेषा पुसट आहेत, प्रत्येक माणूस आपापल्या परीने त्यांच्या व्याख्या ठरवत असतो असे असले तरी सर्वसाधारणपणे त्याचा एक सर्वमान्य अंदाज असतो. पण ज्या गोष्टी इतरांना साध्या ह्यूमन एरर वाटत त्यात नटराजन यांना कधीकधी बेजबाबदारपणा किंवा निष्काळजीपणा दिसत असे आणि जाणूनबुजून आळसामुळे किंवा दुष्टपणामुळे केलेल्या लहान सहान चुका त्यांच्या दृष्टीने गुन्हा असायचा. हा फरक माहीत नसलेल्या लोकांना ते तापट किंवा खडूस वाटत असत, पण त्यामुळे त्यांच्याविषयी पहिल्यांदा आढी निर्माण झाली तरी सहवासानंतर ती निघून जात असे. ते स्वतः कुणाबद्दलच मनात खुन्नस बाळगून त्याच्याशी सूडबुध्दीने वागत नव्हते.

नटराजन यांच्या बोलण्यात मला कधीच एकादे संस्कृत सुभाषित आलेले आठवत नाही, पण कर्मण्येवाधिकारस्तेमाफलेषुकदाचन ही गीतेमधील ओळ ते प्रत्यक्ष जगत होते. ऑफिसात वाट्याला आलेले काम एवढाच कर्म या शब्दाचा अर्थ घेतला तर ते पूर्ण करण्यासाठी जे काही शक्य असेल ते करायचे एवढेच त्यांना माहीत होते. दर महिन्याला मिळणारा पगार आणि इतर सुखसोयी एवढे फळ त्यांना पुरेसे वाटत होते. निदान असे ते आम्हाला सांगत असत. "कर्तव्य (ड्यूटी) आणि भावना (इमोशन्स) यात गल्लत करू नकोस." असे ते मला नेहमी बजावत असत आणि त्यांच्या वागण्यात ते दिसत असे. त्यामुळे कामात अडचणी आल्या तर ते विचलित होत नसत, त्या अचानक आल्या तर त्यांना धक्का बसत नसे, काम कसे पार पडेल याची चिंता करण्यात वेळ वाया घालवत नसत, अपयशाची भीती वाटत नसे, अपयश आले तर त्याचे जास्त वाईट वाटत नसे, त्यातून वैफल्य येत नसे आणि सगळे ठरवल्यासारखे झाले तर त्याचा खूप आनंदही होत नसे. तो सेलेब्रेट करावा असे वाटत नसे. एकादे लहानसे पण महत्वाचे काम पूर्ण केले किंवा त्यातला एक टप्पा पार केला म्हणून उत्साहाने त्यांना सांगायला गेलो तर त्याबद्दल पाठीवर शाबासकी मिळायच्या ऐवजी आणखी दोन नवी कामे गळ्यात पडण्याचीच शक्यता जास्त असे. माझे वडीलसुध्दा तोंडावर कधीच कौतुक करत नसत. त्यामुळे मला याची सवय होती. पण माझा स्वभाव वेगळा होता. मला माझ्या कामाबद्दल भावनिक एकात्मता (इमोशनल अटॅचमेंट) निर्माण झाल्याशिवाय रहात नसे. उत्साह, आतुरता, भय, चिंता, प्रेम, आपलेपणा, आशा, निराशा, आनंद, दुःख इत्यादी सर्व भावनांचा प्रत्यय मला माझ्या कामामधून मिळत होता. नटराजन एवढे स्थितप्रज्ञ कसे होऊ शकत हे मला अखेरपर्यंत गूढ राहिले.   

माझ्या मनावर लहानपणी आईवडिलांकडून जेवढे संस्कार झाले त्यानंतर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा पडला असेल तर तो नटराजन यांचाच. ते माझे सर्वार्थाने मेंटॉर होते. माझ्या कामामध्ये सुरुवातीच्या काळात ते सतत माझ्यासोबत होते. त्यांनी लावलेले वळण मला लागले आहे हे पाहून त्यांनी हळूहळू आपला हात हलकेच सोडवून घेतला. नटराजन यांच्यावर पडत गेलेल्या इतर जबाबदा-यांबरोबर ती कामे करणारे इतर सहकारीही त्यांच्या हाताखाली येत गेले, तसेच आमच्या मुळातल्या कामाचा व्यापही वाढत गेल्यामुळे त्यासाठी अनेक नवे सहकारी नेमले गेले. यामधील प्रत्येक सहका-याला भरपूर वेळ देणे नटराजन यांना अशक्य होत गेले. नव्या लोकांचे सांगणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावरील आपले म्हणणे त्यांना पटवून देणे यासाठी त्यांना जास्त वेळ द्यावा लागत असे, पण आमच्यातला सुसंवाद जमला असल्यामुळे माझे काम पटकन उरकत असे. त्यानंतर माझ्या कामात मला जेवढे स्वातंत्र्य मिळत गेले तेवढे इतरांना मिळत नसल्यामुळे त्यांना माझा हेवा वाटत असे.

ऑफिसमध्ये आमचे इतके चांगले सूत जमलेले असले तरी व्यक्तीगत आयुष्यात आमची कधीही जवळीक झालीच नाही. या बाबतीत ते जितके अलिप्तपणे वागायचे तसाच अलिप्तपणा त्यांच्याबाबतीत मीही दाखवत राहिलो. त्यांच्या शिस्तप्रिय वागण्यामुळे त्यांचे कोणतेही वैयक्तिक काम मला करायला त्यांनी कधीच सांगितले नाही. त्यानिमित्याने त्यांच्या घरी जाण्याची वेळ आली नाही. कधीही सहज भेटायला म्हणून त्यांनी आपल्या सहका-यांना घरी बोलावले नाही आणि मीही अगांतुकपणे कधी त्यांच्या घरी गेलो नाही. काही विशिष्ट कारणानिमित्यानेच शिष्टाचार पाळण्यासाठी एक दोन वेळा आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि एकदा ते सहकुटुंब आमच्या घरी आले होते. आम्ही एका उपनगरात रहात नसल्यामुळे रस्त्यात किंवा बाजारात भेट होण्याची शक्यताही फार कमी होती. ऑफिसमधील स्नेहसंमेलने, पिकनिक यासारख्या मेळाव्यांमध्ये ते सहभागी होत नसत. इतर काही ग्रुपमधले उत्साही लोक मुद्दाम असे मेळावे घडवून आणत, पण नटराजनसाहेबांनी अशा कल्पनेला कधी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे आमचे व्यक्तीगत संबंध घनिष्ठ झालेच नाहीत.

ते सेवानिवृत्त होऊन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर कसलाच संपर्क राहिला नाही. क्वचित कुठेतरी अचानक गाठ पडली आणि त्या वेळी "आपण मुद्दाम अमूक दिवशी अमूक ठिकाणी भेटू." असे ठरवायचा विचार मनात आला तरी तशी कृती मात्र झाली नाही. "त्यांनी पुढाकार घेतला नाही तरी मला ते करायला हवे होते, त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटायला हवे होते, आयुष्यात एकदा तरी त्यांच्याबरोबर निवांतपणे बसून बोलायचे होते." असे आता लाख वेळा वाटून काही उपयोग नाही. एक दिवस मी ऑफिसात असतांनाच अचानक एक फोन आला आणि "नटराजनसाहेब आपल्याला सोडून गेले." ही धक्कादायक आणि क्लेशकारक बातमी समजली. त्याच्या आधी काही दिवस ते आजारी असल्याचे जर मला कळले असते तर हातातली सगळी कामे बाजूला ठेऊन मी त्यांना भेटायला ते जिथे असतील तिथे गेलो असतो, मला तसे जायलाच हवे होते, पण ती संधीही मिळाली नाही. त्यांचे अखेरचे दर्शन घडले ते स्मशानातच.

Tuesday, March 19, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग २)

नटराजनसाहेबांच्या सोबत मी काम करायला सुरुवात केली त्या काळात यंत्रसामुग्रीच्या उत्पादनाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका या देशामधील परिस्थितींमध्ये जमीन अस्मानाएवढा फरक होता. मोटारी, पंखे, शिवणयंत्रे, रेफ्रिजरेटर यासारख्या ग्राहकांना उपयुक्त अशा वस्तू तयार करण्याचे कारखाने भारतात चालू झालेले होते. त्यातले बहुतेक सगळे फॉरेन कोलॅबोरेशनवर उभारलेले होते आणि परदेशी कोलॅबोरेटर्सच्या सहाय्याने ते चालवले जात होते. विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारी यंत्रसामुग्री आयात केलेली असे आणि फक्त त्या उत्पादनांसाठी ती कशी चालवायची हे ठरवून दिलेले असे. आपली स्वतः बुध्दी चालवून नव्याने किंवा निराळे काही निर्माण करण्याची गरजही पडत नसे आणि त्यासाठी फारसा वावही नसे. यंत्रांच्या ठराविक कामात काही अडचण आली किंवा गरज पडलीच तर सहाय्य करायला परदेशी तज्ज्ञ.हजर असत किंवा त्यांना बोलावले जात असे.

आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटची सारी यंत्रयामुग्री कॅनडामधूनच तयार होऊन आली होती आणि दुस-या युनिटसाठी डिट्टो तशीच यंत्रे आम्ही भारतात बनवून घेण्याची योजना होती. त्या यंत्रसामुग्रीची जी ड्रॉइंग्ज आम्हाला मिळाली होती ती कॅनडामधील कारखान्यांसाठी कदाचित पुरेशी असतील. तो देशसुध्दा तेंव्हा कारखानदारीमध्ये फार पुढारलेला नसला तरी त्याच्यापाशी अमेरिकेचे भक्कम पाठबळ होते. या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग 'अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेड'पासून बनवावा असे त्या ड्रॉइंगमधील 'बिल ऑफ मटीरियल'मध्ये लिहिले होते, काही बाबतीत तर 'अॅटलास सुपरइम्पॅक्टो' किंवा 'अल्टिमो' एवढे 'ट्रेड नेम'च लिहिले होते. एवढ्या वर्णनावरून तो नेमका कोणता मिश्रधातू आहे हेसुध्दा समजत नव्हते. अशा वर्णनाचा कच्चा माल भारतात निर्माण होत नव्हताच, त्या काळात इथल्या बाजारपेठेमध्येही तो उपलब्ध नव्हता. गीअर्स, मोटर, पंप, व्हॉल्व्ह, स्विचे वगैरे यंत्रे,  उपकरणे आणि नटबोल्ट, वॉशर्स, स्प्रिंग्ज, कपलिंग्ज यासारखे सुटे भाग सुध्दा 'अमूक कंपनीच्या कॅटलॉगमधले तमूक आयटम नंबर' अशा पध्दतीने ड्रॉइंगमध्ये दाखवले होते. त्यावरून काही बोध होत नसल्यामुळे त्या त्या कंपनीकडून किंवा तिच्या स्टॉकिस्टकडून ते विकत घेण्यावाचून गत्यंतर नव्हते. त्या काळात भारताची आयातनिर्यातविषयक नीती अत्यंत कडक होती. प्रत्येक परदेशी वस्तूसाठी इंपोर्ट लायसेन्स मिळवणे अत्यावश्यक असे. व्यापारी किंवा एजंट लोक अशा प्रकारचा माल इंपोर्ट करून त्याचा स्टॉक करून ठेवू शकत नसत. कॅनडामध्ये असे निर्बंध नसल्यामुळे या ड्रॉइंग्जनुसार जे काही आवश्यक असेल ते सारे तिथल्या कारखानदारांना स्थानिक बाजारातून सहजपणे मिळत असे, पण भारतातल्या कारखानदारांना ते फारच कठीण असल्यामुळे आम्हाला हवी असलेली यंत्रसामुग्री तयार करण्याचे काम हातात घ्यायला त्यातला कोणीच उत्सुक नव्हता. कोणत्याही वस्तूंच्या निर्मितीसाठी फॉरेन कोलॅबोरेशन असल्यास त्या कारखानदाराला त्या विशिष्ट उत्पादनांसाठी लागणारे परदेशी सामान मिळून जात असे, त्याचप्रमाणे या प्रॉजेक्टसाठी आवश्यक तेवढे सामान आम्ही कॅनडामधून आयात करू शकत होतो. हा सगळा विचार करून झाल्यावर आमच्या उपयोगासाठी सर्व कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने (प्रोप्रायटरी आयटम्स) आम्ही मागवून घ्यायची आणि येथील कारखानदारांना ती पुरवून त्यापासून आमच्या प्रॉजेक्टसाठी यंत्रसामुग्री तयार करवून घ्यायची असे ठरले.

ड्रॉइंग्जचा बारकाईने अभ्यास करून त्यातल्या प्रत्येक आयटमचा आकार शेवटी कसा असायला हवा ते समजते, पण तो कशापासून तयार करायचा हे त्यात दिलेले नसल्यास त्याबद्दल विचार करून ठरवावे लागते. उदाहरणार्थ बटाटेवड्याचा फोटो पाहून तो कसा तयार केलेला आहे, त्यासाठी कोणकोणत्या साहित्याची गरज आहे हे समजत नाही, तो चाखून पाहिल्यानंतर थोडा अनुभव आणि विचार यातून त्याचा अंदाज करता येतो. अशाच प्रकारे विश्लेषण, विचार, कल्पना आणि चर्चा करून आमच्या यंत्रसामुग्रीसाठी लागणारा कच्चा माल आणि विशिष्ट उत्पादने यांच्या याद्या नटराजन यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करायच्या कामाला मी लागलो आणि त्याच्या पुढल्या पायरीवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. त्यांच्याहून वरिष्ठ अधिका-यांच्या बरोबर ते निरनिराळ्या मोठमोठ्या कारखान्यांना भेट देत आणि तिथल्या संचालक मंडळींशी चर्चा करून येत. पण बहुतेक वेळी आपल्यासमोर केवढ्या मोठ्या अडचणी आणि आव्हाने आहेत याचीच उजळणी होत असे. पण यातून होणा-या मनस्तापाची किंवा नैराश्याची झळ त्यांनी आम्हाला लागू दिली नाही किंवा आम्हाला निरुत्साही होऊ दिले नाही.

या ड्रॉइंग्जमधील प्रत्येक भाग अमुक अमेरिकन स्टँडर्डच्या तमूक ग्रेडच्या पदार्थापासून बनवावा असे लिहिले होतेच. या शिवाय "तो बनवण्यासाठी करायच्या वेल्डिंग, हीट ट्रीटमेंट, मशीनिंग, फिनिशिंग यासारख्या उत्पादनामधील प्रत्येक कृती अमक्या कोड किंवा स्टँडर्डच्या तमक्या सेक्शनमधील ढमक्या कलमानुसार केली पाहिजे", "त्याचे निरीक्षण (इन्स्पेक्शन) आणखी कुठल्या सेक्शननुसार केंव्हा आणि कुणी केले पाहिजे." वगैरे अनंत नियम संबंधित टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये लिहिलेले होते आणि ते सारे आम्हाला बंधनकारक होते. अशा प्रकारच्या अमेरिकन कायद्यांचे राज्य भारतात चालत नव्हते. त्यामुळे त्या काळी इथल्या कोणालाही ते नियम माहीत नव्हते. अशा परिस्थितीत कारखानदार तरी ते नियम पाळण्याचे आश्वासन कशाच्या बळावर आम्हाला देणार? त्यामुळे या बाबतीतसुध्दा आम्हीच त्यांना मदत करणे आवश्यक होते. आम्ही ती सगळी कोड्स आणि स्टँडर्ड्स मागवून घेतली, त्यांचा अभ्यास करून त्यातली जी कलमे आमच्या कामासाठी उपयुक्त, महत्वाची किंवा आवश्यक होती ती नीटपणे समजून घेऊन त्यानुसार कारखान्यांमधल्या लोकांशी चर्चा करावी लागत असे. नटराजन यांचे उच्च शिक्षण अमेरिकेत झालेले होते आणि बीएआरसीमधील कॅनेडियन रिअॅक्टरवर त्यांनी काम केलेले होते. त्यामुळे अशा प्रकारची डॉक्य़ुमेंट्स त्यांना माहीत होती. "आपण असे असे करून त्यामधून मार्ग काढू शकतो" हे ते आत्मविश्वासाने सांगू शकत.  

असे असले तरीसुध्दा ही सगळी यंत्रसामुग्री तयार करण्याची जबाबदारी घेण्यासाठी सुसज्ज असे कारखानदार सुरुवातीच्या काळात भारतात मिळत नव्हते. रिअॅक्टर व्हेसल, स्टीम जनरेटर यासारखी काही महत्वाची पण स्थिर स्वरूपाची (स्टेशनरी) इक्विपमेंट तयार करण्याचे आव्हान लार्सन अँड टूब्रो, बीएचईएल, वालचंदनगर इंडस्ट्रीज यासारख्या मोठ्या कंपन्यांनी स्वीकारले, पण गतिमान यंत्रसामुग्री तयार करण्याएवढी त्यांची क्षमता नव्हती. काही यंत्रे आम्ही बीएआरसीच्या वर्कशॉपमध्ये तयार करायचे ठरवले, तरीही आणखी काही महत्वाची यंत्रे अजून शिल्लक होती. एचएमटी या सार्वजनिक क्षेत्रामधील कंपनीचे कारखाने भारतातील अनेक ठिकाणी होते, त्यातल्या हैद्राबाद येथील कारखान्यात ते 'स्पेशल पर्पज मशीन टूल्स' तयार करत असत. आमची यंत्रेसुध्दा 'स्पेशल' असल्यामुळे त्यातली काही यंत्रे त्यांच्याकडून बनवून घेण्याचा विचार केला. त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी नटराजनसाहेब, त्यांचे बॉस, आणखी एक सहकारी यांच्यासोबत मीसुध्दा हैदराबादला गेलो. पुन्हा एकदा आम्ही एकत्र प्रवास करत होतो. तिथे गेल्यानंतर काय बोलायचे याची स्ट्रॅटेजी ठरवण्यावरच या वेळच्या प्रवासात चर्चा झाली.

एचएमटीच्या कारखान्यात गेल्यानंतर प्रथेनुसार त्यांनी आम्हाला त्याच्या महत्वाच्या विभागांमधून फिरवून आणले. ते करतांना आम्ही तिथे असलेली यंत्रे आणि इतर फॅसिलिटी पाहून घेतल्या, तसेच त्यातली किती यंत्रे काम करत होती आणि किती थंड पडलेली होती तेही पाहिले. त्यानंतर महाचर्चेला सुरुवात झाली. आमच्या कामाचे स्ट्रॅटेजिक महत्व, देशाची अस्मिता आणि इभ्रत, पायाभूत तंत्रज्ञानाचा विकास, दूरदर्शी धोरण, महत्वाकांक्षी योजना, स्वावलंबन, परस्परांचे सहकार्य वगैरेंबद्दल मोठ्या साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले. केंद्र सरकारच्या उद्योग मंत्रालयामधून बहुधा यासंबंधीच्या सूचना एचएमटीलाही मिळालेल्या असाव्यात. त्यांनीही हो ला हो करीत सारे काही ऐकून घेतले. त्यानंतर "आमची कामे हातात घेण्यासाठी कोणकोणत्या फॅसिलिटीजची आवश्यकता आहे, त्यातल्या किती त्यांच्याकडे आधीपासून आहेत, त्यात कोणती भर टाकायची गरज कदाचित पडेल, त्यासाठी लागेल ती सर्व प्रकारची मदत आम्ही करूच." वगैरे गोष्टी नटराजन यांनी थोडक्यात पण नेमक्या शब्दांमध्ये सांगितल्या. शिवाय "सध्या बाजारपेठेत असलेल्या मंदीमुळे त्यांच्या कारखान्यात त्याच्या पूर्ण कार्यक्षमतेइतके काम चाललेले दिसत नाही. बरीचशी स्पेअर कपॅसिटी असल्यासारखे दिसते. यामुळे त्यांनी आमचे काम घेतले तर त्यापासून दोघांना फायदा होईल." वगैरे मुद्दे मांडले. ते त्यांना मान्य करावेच लागत होते, पण त्यांनी वेगळा मुद्दा पुढे केला. "अशा प्रकारचे काम इथे पहिल्यांदाच करायचे असल्यामुळे त्याला किती वेळ लागेल आणि त्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज आम्ही बांधू शकत नाही, मग त्याची किंमत आम्ही कशी ठरवणार?"

या प्रश्नाची अपेक्षा आम्हाला होतीच आणि त्यावर उपायही ठरवलेला होता. "तुमच्या कारखान्यातील प्रत्येक यंत्र रोज किती वेळ चालते याची नोंद ठेवली जात असणार, तसेच प्रत्येक कामगाराचेही टाईमकार्ड असणार. त्यांचेसाठी 'मॅनअवर' आणि 'मशीनअवर रेट्स'सुध्दा ठरलेले असणार. आमच्या कामावर ते किती खर्च होतात याचा वेगळा हिशोब ठेवावा आणि तेवढे बिल आमच्याकडे पाठवावे. आपल्या संस्था सार्वजनिक क्षेत्रामधल्या असल्यामुळे त्यांचे पेमेंट करणे म्हणजे केंद्र सरकारच्या एका खिशातले पैसे काढून ते दुस-या खिशात ठेवण्यासारखे आहे. त्यात काही अडचण येणार नाही. तुमचे आणि आमचे अकौंट डिपार्टमेंट मिळून ते पाहून घेतील." अशा प्रकारचा 'कॉस्टप्लस' फॉर्म्यूला पुढे केल्यावर त्यांनीही तो स्वीकारला आणि प्रयोगादाखल एक यंत्र तयार करणे मान्य केले. 

तापलेले लोखंड मऊ असतांना त्यावर कसा घणाचा घाव घालाया हे नटराजन यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी लगेच सांगायला सुरुवात केली, "सर्व रॉ मटेरियल्स आणि प्रोप्रायटरी आयटम्स आम्ही कॅनडाहून आय़ात करून तुम्हाला देणारच आहोत, पण त्यांना इकडे येण्यासाठी वेळ लागेल. त्याआधी करण्यासारखी बरीच कामे आहेत. वेल्डिंग आणि हीट ट्रीटमेंटसाठी कोड्सप्रमाणे प्रोसीजर्स लिहून ती अॅप्रूव्ह करून घ्यायची आहेत. त्यासाठी ट्रायल्स कराव्या लागतील. काही काँपोनंट्स खूप काँप्लेक्स आकाराचे आहेत आणि त्यांची अॅक्यूरसी अत्यंत महत्वाची आहे. ते आकार कसे तयार करायचे याचा विचार करून त्यासाठी जिग्ज आणि फिक्स्चर्स तयार करावी लागतील. अशा सगळ्या ट्रायल्स आपल्या स्टॉकमधल्या मटीरियलवर केल्या तर महागडे इंपोर्टेड मटीरियल वाया जाणार नाही. त्यातून अनुभव मिळेल आणि अडचणी समजतील. त्यामुळे आपले मटीरियल कॅनडामधून येईपर्यंत आपण सज्ज झालेले असू" वगैरे वगैरे सांगून झाल्यानंतर "या कामासाठी आधी एक टीम तयार करायला हवी. त्यांना आमच्या प्रॉजेक्ट साईटवर नेऊन या प्रकारचे कॅनडामधून आलेले मशीन दाखवता येईल, आमच्या वर्कशॉपमध्ये होत असलेले अशा प्रकारचे काम आणि त्याचे क्वालिटी अॅशुरन्स वगैरे दाखवता येईल." वगैरे मुद्दे मांडून एचएमटीमधल्या दोन तीन जणांची एक लहानशी टीम तयार करून घेतली. आम्ही सगळी ड्रॉइंग्ज सोबत नेलेली होतीच. पुढील दोन तीन दिवस या टीमला त्या ड्रॉइंग्जमधले महत्वाचे मुद्दे दाखवले. ते इंजिनियर खरोखरच हुषार, कामसू आणि उत्साही होते. त्यांनी आम्हाला चांगले सहकार्य दिले त्याचप्रमाणे त्यांच्या कारखान्यातले काम कसे चालते याची सविस्तर माहितीही दिली.

त्यांच्या डिझाइन ऑफिसमध्ये ड्रॉइंग्ज तयार झाल्यानंतर ती प्लॅनिंग सेक्शनमध्ये जातात. तिथे त्यांचे प्रोसेसशीट्स तयार होतात. कारखान्यातल्या शॉप फ्लोअरवरील ज्या विभागात जेवढे काम होत असेल त्याचीच माहिती देणारी ड्रॉइंग किंवा वेगळी स्केचेस त्यांना दिली जातात. त्यात काही अडचण आली तर ते ड्रॉइंग आणि प्रोसेस शीट रिवाइज केले जाते वगैरे शिस्त त्यांच्याकडे होती. आमच्याकडील कॅनेडियन ड्रॉइंग्जमध्ये सगळ्या प्रकारच्या माहितीची खिचडी होती आणि त्यातली डायमेन्शन्स इंच आणि फुटांमध्ये दिलेली होती. अशा प्रकारचे ड्रॉइंग त्या कारखान्यातला कोणताही कामगार हातातसुध्दा धरणार नाही. त्यांना कळू शकतील अशी त्यांच्या पध्दतीची ड्रॉइंग्ज तयार करणे सर्वात आधी आवश्यक होते. ती तयार करून ते आमच्याकडे पाठवू लागले. त्या ड्रॉइंग्जचे पहिले एक दोन गठ्ठे पाहून झाल्यावर त्यात काही उणीवा आणि चुका सापडल्या. त्या सुधारण्यासाठी आणि सुधारलेली आवृत्ती पुन्हा तपासण्यासाठी ड्रॉइंग्जचे गठ्ठेच्या गठ्ठे इकडून तिकडे पुन्हा पुन्हा पाठवावे लागणार होते. त्यात बराच वेळ वाया गेला असता. हे पाहून नटराजनसाहेबांनी एक निर्णय घेतला. मीच महिनाभर हैद्राबादला जाऊन रहावे आणि सर्व ड्रॉइंग्ज व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यानंतरच परत यावे असा आदेश मला दिला. आतापर्यंत त्यांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे ती ड्रॉइंग्ज अॅप्रूव्ह करण्याचा अधिकारही मला दिला.

ड्रॉइंग्जनंतर प्रोसेस शीट्स आणि प्रोसीजर्स तयार केली, काहींच्या ट्रायल्स घेतल्या, प्रयोग करून पाहिले, बरेचसे मटीरियलही त्यांना दिले. पण त्यांच्या उत्साहाला मात्र ओहोटी लागली होती. आमच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य देऊनदेखील हे काम प्रगती करत नव्हते. दर दोन तीन आठवड्यात मी त्यांच्याकडे जाऊन काय चालले आहे हे पाहून येत होतो आणि नटराजनही महिन्यामधून एकादी भेट देऊन येत होते. पण दर वेळी अडचणींची नवी यादी समोर येऊ लागली. एचएमटीच्या ज्या उच्च अधिका-यांनी हे काम स्वीकारले होते ते बदलून किंवा नोकरी सोडून गेले होते आणि त्यांच्या जागी आलेल्या अधिका-यांना या कामात इंटरेस्ट नव्हता. सुरुवातीला जमवलेली टीमही त्यांनी मोडून टाकली आणि कोणी वाली नसल्यामुळे ते काम जास्तच रेंगाळायला लागले. याबद्दल जनरल मॅनेजरशी थोडे खडसावून बोलण्यासाठी नटराजन त्यांच्याकडे गेले तर त्यांनी भेटही दिली नाही. इतकी मिन्नतवारी करून आणि महाप्रयत्नाने एचएमटीबरोबर केलेले हे काँट्रॅक्ट रद्द करण्याचा निर्धार करून यावेळी ते परत आले. आल्यानंतर सविस्तर आकडेवारीसह या कामाचा संपूर्ण अहवाल तयार केला आणि त्यांच्या बॉसपुढे तो ठेऊन त्याला आपले म्हणणे पटवून दिले आणि त्यांच्यामार्फत उच्चपदस्थ अधिका-यांची मंजूरी मिळवली. अर्धवट केलेले काम आणखी कोणाकडून पुरे करून घेणे अत्यंत अडचणीत आणणारे होते आणि ते करण्यासाठी एकही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्या कामाचे अनेक लहान लहान भाग केले आणि निरनिराळ्या कंपन्यांकडून किंवा आमच्या वर्कशॉपमधून ते करवून घेतले. या सर्वांची जुळणी साईटवरच एक वेगळी शेड उभारून त्यात केली. हे करतांना त्यांनी दाखवलेले धाडस, आत्मविश्वास, चिकाटी, कौशल्य वगैरे गुण अशा कसोटीच्या क्षणांमुळेच लोकांना समजले. त्या कालखंडात त्यांना कोणाकोणाकडून काय काय ऐकून घ्यावे लागले होते, किती मनस्ताप झाला होता, किती टेन्शन निर्माण झाले होते, त्यांच्यावर किती प्रेशर आले होते, तरीसुध्दा ते आपले काम शांतपणे करत होते आणि आम्हाला त्या ज्यूनियर मंडळींना थोडीसुध्दा झळ लागू दिली नव्हती.. . . . . . . . .  . . . . . . . . (क्रमशः)
----------------------------------------------------------------------------

Wednesday, March 13, 2013

तेथे कर माझे जुळती १३ - ए.नटराजन (भाग १)

अणुशक्तीखात्यात माझी निवड झाल्यानंतर मी तिथल्या प्रशालेचा अभ्यासक्रम पूर्ण करून वर्षभर रिअॅक्टर्स चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर माझी पॉवर प्रॉजेक्ट्स इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये बदली झाली. भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधल्या निवडक कर्मचा-यांना घेऊन काही महिन्यांपूर्वीच हे नवे ऑफीस सुरू केलेले होते. माझ्याबरोबरच माझा मित्र मानबेन्द्र दास याचीही बदली झाली होती. आम्ही दोघे मिळूनच भायखळ्याला असलेल्या त्या ऑफीसमध्ये गेलो आणि थेट तिथल्या सर्वोच्च अधिका-यांना जाऊन भेटलो. त्यांच्या लहानशा केबिनमध्ये त्यांच्या टेबलासमोर चार खुर्च्या मांडलेल्या होत्या, त्यातल्या मधल्या दोन खुर्च्यांवर आम्हाला बसायला त्यांनी सांगितले आणि पीएला बोलावून काही सूचना दिली. आमची नावे, शिक्षण, प्रशिक्षण वगैरेंबद्दल अत्यंत जुजबी स्वरूपाचा वार्तालाप चालला असतांना दोन वरिष्ठ अधिकारी त्यांच्या केबिनमध्ये आले. त्यातले गोरेगोमटे, उंचेपुरे आणि एकाद्या फिल्मी हीरोसारखे देखणे दिसणारे रस्तोगीसाहेब मानबेंद्र दासच्या पलीकडे बसले आणि काळेसावळे, थोडासा उग्र चेहरा असलेले आणि कोणासारखेच खास न दिसणारे नटराजनसाहेब माझ्या शेजारी येऊन बसले. त्या दोघांना उद्देशून मोठे साहेब म्हणाले, "तुम्हाला सहकारी पाहिजे आहेत ना? हे दोघे नवे इंजिनियर आजपासून आपल्याकडे आले आहेत." असे म्हणून हातानेच खूण करत ते म्हणाले, "तुम्ही याला घेऊन जा आणि तुम्ही याला घेऊन जा." अशा प्रकारे एका सेकंदात घेतल्या गेलेल्या त्या निर्णयाने आमच्या पुढल्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरून गेली. आमचा बायोडेटा, अॅप्टिट्यूड वगैरेची चर्चा झाली नाही किंवा काउन्सेलिंग वगैरेही काही झाले नाही. असे काही असते हे सुध्दा तेंव्हा आम्हालाही ठाऊकच नव्हते.

प्रशालेमध्ये असतांना दर आठवड्याला एक किंवा दोन विषयांची परिक्षा होत असे, त्या सगळ्या टेस्ट्समध्ये मला भरघोस मार्क मिळाले असल्यामुळे एकाद्या नव्या विषयाचा अभ्यास करून तो आत्मसात करण्याची माझी क्षमता त्यातून सिध्द झाली होती. रिअॅक्टिव्हिटी, रेडिएशन यासारखे फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्सशी संबंधित थिअरॉटिकल स्वरूपाचे काम रस्तोगी यांच्याकडे होते आणि प्रॉजेक्टसाठी लागणारी निरनिराळी यंत्रसामुग्री आणि इतर भाग तयार करवून घेण्याची जबाबदारी नटराजन यांच्याकडे होती. या नोकरीत निवड होण्यापूर्वी दासने एक वर्ष कलकत्याच्या एका मोठ्या कारखान्यात काम केले असल्यामुळे त्याला त्या कामाचा थोडा अनुभव होता. या गोष्टींचा कोणी वर वर जरी विचार केला असता तर त्याने नक्कीच वेगळा निर्णय घेतला असता. पण 'देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो' असे म्हणतात तसे कदाचित तेंव्हा झाले असेल. त्या वेळी आर्बिट्ररी प्रकाराने झालेल्या कामाच्या वाटणीमुळे नटराजनसाहेबांसोबत काम करायची संधी मला मिळाली आणि त्यांना माझ्यासारखा सहकारी मिळाला. अगदी योगायोगाने आमच्यात निर्माण झालेले हे नाते ते सेवानिवृत्त होईपर्यंत अखंड राहिले. त्या वेळी मला किंवा दासला या ऑफीसबद्दलच काहीही माहिती नव्हती आणि आम्हा दोघांनाही मिळेल ते काम सुरू करण्याची मनोमन तीव्र इच्छा होती. त्यामुळे कामाच्या स्वरूपाचा विचार आमच्या मनात आला नाही.

मला बरोबर घेऊन नटराजन त्याच्या केबिनपाशी आले. रेल्वेच्या लोकल गाडीच्या ड्रायव्हरकडे असते तशी ती पिटुकली केबिन होती. त्यात ठेवलेल्या टेबलाच्या समोरच्या आणि उजव्या बाजूच्या अशा दोन कडांना पुरुषभर उंचीचे पत्र्याचे पार्टिशन ठोकलेले होते आणि साहेबांच्या खुर्चीच्या मागे लगेच पलीकडच्या केबिनचे पार्टीशन होते. त्यांनी आपली खुर्ची पुढे सरकावून माझ्यासाठी वाट करून दिली आणि मला पलीकडे जायला सांगितले. टेबलाच्या त्या चौथ्या कडेजवळ एक बिनहाताची खुर्ची ठेवलेली होती, तिच्यावर मला बसायला सांगितले. मग त्यांनी आपली खुर्ची मागे ओढून ते स्थानापन्न झाले. आता माझा बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यांच्या टेबलावर काही पुस्तके, कागद, फाइली वगैरे पडलेल्या होत्या. त्यांना थोडेसे बाजूला सरकवून त्यांनी माझ्यासाठी टेबलावरच फूटभर रुंद जागाही रिकामी करून दिली.  माझे नाव, गाव, शिक्षण वगैरेंबद्दल अगदी त्रोटक माहिती विचारून झाल्यानंतर त्यांनी सरळ कामाबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यावेळी राजस्थानमधील कोटा या शहराजवळ आमचा अॅटॉमिक पॉवर प्रॉजेक्ट बांधला जात होता. त्या प्रकल्पाबद्दल थोडीशी माहिती देऊन त्यात आपल्याला काय करायचे आहे हे विस्ताराने पण मोजक्या आणि नेमक्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितले, तसेच त्यासाठी कुठून सुरुवात करायची याचीही स्पष्ट कल्पना दिली. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. घरून आणलेला डबा घेऊन ते त्यांच्या एका मित्राकडे गेले आणि मीही जेवून येण्यासाठी बाहेर आलो.

बाहेर एका हॉलमध्ये एका रांगेमध्ये पाचसहा टेबले मांडून ठेवलेली होती आणि त्यांच्याजवळच सातआठ जास्तीच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. त्या ठिकाणी दहाबाराजण बसलेले होते. त्यात मानबेंद्र दास होताच, शिवाय अजीत, संपत आणि सुभाष हे आमचे बॅचमेटही होते. उरलेली मुले आम्हाला एक दोन वर्षांनी सीनियर होती. बीएआरसीमधून त्यांची बदली झाली तेंव्हा ते आपापल्या टेबलखुर्च्यांसहित या नव्या ऑफीसमध्ये आलेले होते. नव्याने आलेले इंजिनियर त्यांची टेबले शेअर करत होते. आपोआपच मीदेखील त्यांच्यात सामील झालो. असे होणार हे नटराजनना नक्कीच ठाऊक होते, पण मला ऑफीसात आल्या आल्या आधी स्वतःसाठी स्वतःच जागा शोधायला सांगणे त्यांना बरे वाटत नव्हते म्हणून त्यांनी आपल्यातली एक चतुर्थांश जागा मला देऊ केली होती. शिवाय त्यांना पहिल्या दिवसापासून मला कामाला लावायचे होते आणि माझ्याकडे जागा नाही ही सबब त्यांना दाखवता येऊ नये अशा विचारही त्यांनी केला असेल.

माझ्या मित्रांनी मला त्या लहानशा ऑफिसाची माहिती सांगितली. एका जागी लायब्ररीच्या नावाने दोन तीन कपाटे होती, त्यात काही मॅन्युअल्स, रिपोर्ट्स वगैरे ठेवले होते. तीन चार फाइलिंग कॅबिनेट्समध्ये सारा पत्रव्यवहार फाईल करून ठेवला होता. ड्रॉइंग्ज रेकॉर्ड सेक्शनमध्ये चार पाच रॅक्समध्ये बरीचशी ड्रॉइंग्ज रचून ठेवली होती. आमचा तो प्रॉजेक्ट कॅनडाच्या सहाय्याने बनणार होता. त्या काळात भारतात उभारल्या जात असलेल्या मोठ्या पॉवर प्रॉजेक्ट्समध्ये त्याची गणना होत होती. त्याच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्री कॅनडामध्येच तयार होऊन भारतात येणार होती आणि दुस-या युनिटसाठी तशीच्या तशीच शक्य तितकी यंत्रसामुग्री भारतात तयार करवून घेण्याचा विचार होता. त्यासाठी तिकडून येत असलेली सगळी डॉक्युमेंट्स पाहून त्यावर आम्हाला अंमलबजावणी करायची होती. ही डॉक्युमेंट्स विमानाने किंवा आगबोटीने यायला नुकतीच सुरुवात झालेली होती. तसेच त्यावर काम करण्यासाठी आमच्या ऑफीसची यंत्रणा उभारली जात होती. एवढ्या मोठ्या प्रॉजेक्टसाठी शेकडो इंजिनियर लागणार होते. त्यांची जमवाजमव सुरू झालेली होती आणि त्यासाठी काही लोकांना ट्रेनिंगसाठी कॅनडाला पाठवले गेले होते, काहीजण बीएआरसीच्या आवारातच यावर काम करत होते. आम्हीही त्या यंत्रणेचा त्या वेळचा एक लहानसा भाग होतो. थोड्याच दिवसांनी आमचे ऑफीस गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेल्या मोठ्या जागेत गेले आणि पुढे त्याचा विस्तार होत गेला.

आमच्या प्रॉजेक्टच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे मुख्य भाग केले होते आणि त्यातली कामे निरनिराळ्या वरिष्ठ अधिका-यांना वाटून दिली होती. नटराजन यांच्याकडे प्रॉजेक्टच्या ज्या भागाचे काम सोपवले होते त्यासंबंधी कोणकोणती मॅन्युअल्स, स्पेसिफिकेशन्स, ड्रॉइंग्ज वगैरे कॅनडाहून आली आहेत आणि त्यासंबंधी झालेला पत्रव्यवहार वगैरे पाहणे हेच माझे पहिले काम होते. ते पाहता पाहता त्यांचा अर्थ समजून घ्यायचा होता. मी एक जाडजूड रफपॅड घेतले आणि कामाला लागलो. आमच्या कामाशी संबंधित कोणते दस्तऐवज लायब्ररीत किंवा रेकॉर्ड सेक्शनमध्ये आहेत हे पाहून त्यांची यादी बनवली आणि ते करता करता त्यांच्यावर नजर फिरवून काही नोट्स काढल्या. दिवसातून दोन तीन वेळा तरी नटराजनसाहेबांना त्या दाखवत होतो आणि माझ्या मनात आलेल्या शंका विचारून घेत होतो. त्या काळात कॅनडामधून आलेली ड्रॉइंग्ज अतीशय किचकट आणि दुर्बोध तर होतीच, त्यांची क्वालिटीही खराब होती. स्टेन्सिल्सचा उपयोग न करता सगळे हाताने लिहिलेले होते आणि काही ड्रॉइंग्जवर लिहिलेले नीट वाचताही येत नव्हते. एवीतेवी भारतीय लोकांना यातले काही कळणार नाही अशी गुर्मी त्याच्या मागे होती किंवा त्यांना काही समजू नये असा डाव होता कोण जाणे. वाचलेले समजून घेण्यासाठी मला नटराजन यांच्याकडे जावे लागत असे. ते सुध्दा किंचितही रोष न दाखवता मला त्यात मदतच करायचे आणि आळस न करता नीट समजावून सांगायचे. असली विचित्र ड्रॉइंग्ज ते ही पहिल्यांदाच पहात असले तरी त्यांना थोडा अनुभव होता आणि दोन वर्षे अमेरिकेत राहून आलेले असल्यामुळे तिकडे वापरात असलेले सिम्बॉल्स, शॉर्टफॉर्म्स वगैरे त्यांना लगेच समजत होते. आम्ही दोघे मिळून त्यांचा जमेल तेवढा अर्थ लावत होतो.

आमचे हे काम चालले असतांना अधून मधून ड्रॉइंग्जचे नवे नवे गठ्ठे येत होते. ते उघडून त्यांचे संदर्भ एकमेकांशी जुळवून पहातांना आम्हाला त्यांचा अर्थ जास्त चांगला कळत गेला. तरीसुध्दा कागदावर मारलेल्या लहान लहान आडव्याउभ्या रेखा पाहून त्यावरून अगडबंब आकाराच्या त्रिमिति वस्तूची कल्पना डोळ्यासमोर येण्याइतकी माझी नजर तयार होत नव्हती. फाइलींमधला पत्रव्यवहार वाचतांना असे लक्षात आले की आमच्या प्रॉजेक्टच्या पहिल्या युनिटसाठी लागणारी काही यंत्रसामुग्री भारतात येऊन साईटवर पोचली आहे आणि तिची उभारणी करण्यासाठी काही कॅनेडियन एक्स्पर्ट्सही आलेले आहेत. आम्ही दोघांनीही कोट्याला जाऊन ती प्रत्यक्ष पाहून येण्याचे ठरवले. त्यासाठी एक निमित्य मिळताच त्यांनी आम्हा दोघांसाठी वरिष्ठांकडून मंजूरी मिळवली आणि रेल्वेच्या तिकीटांची व्यवस्था केली. फ्राँटियर मेलमधून फर्स्टक्लासने केलेला हा माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रवास मी नटराजनसाहेबांसोबत केला. त्या वेळी साईटवर कसलीशी मीटिंग ठरलेली असल्यामुळे आमच्या ऑफिसमधले आणखी काही सहकारीही आमच्याबरोबरच होते. सगळे मिळून गप्पा मारत आणि पत्ते खेळत केलेल्या या प्रवासात ज्यूनियर्स आणि सीनियर्स यांच्यामध्ये असलेला बराचसा दुरावा कमी झाला आणि आमच्यात एक खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले. मुंबईतल्या माझ्या निवासस्थानापासून प्रॉजेक्टसाईटवरील गेस्टहाउसपर्यंत सरकारी वाहनांमधून झालेला अशा प्रकारचा माझा हा पहिलाच ऑफीशियल प्रवास असल्यामुळे मला त्यातले सगळेच नवे होते. ते अद्भुतही वाटत होते आणि थोडे बावचळायला वाटणारे होते. नटराजन यांनी त्या संपूर्ण प्रवासात एकाद्या वडीलधारी माणसाने लहान मुलाची घ्यावी तशी माझी काळजी घेतली.

नटराजन माझ्याहून दहा वर्षांनी मोठे असले तरी स्वतः ड्रॉइंग्ज आणि स्पेसिफिकेशन्स तयार करून किंवा ती डॉक्युमेंट्स समजून घेऊन त्यानुसार यंत्रसामुग्री तयार करून घेणे अशा स्वरूपाचे भरीव काम त्यांनीही यापूर्वी केलेले नव्हतेच. त्यांना वेगळ्या प्रकारचा अनुभव होता, त्यांनी अमेरिकेत शिकून एमएस ही पदवी मिळवली होती, त्यासाठी परदेशभ्रमण केले होते, जगातल्या इतर देशांमधली राहणी पाहिली होती, भारतातसुध्दा इतर संस्था आणि सरकारी ऑफीसांमधील उच्चपदावरील अधिका-यांना भेटून त्यांच्याशी बोलणी केली होती. एकंदरीतच त्यांची विचारपध्दती विस्तारलेली (ब्रॉडमाइंडेड) होती. ते बुध्दीमान होतेच, त्यांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती चांगली होती. त म्हणताच ताकभात हे ओळखू शकत होते. पण या कशाचाही त्यांना गर्व नव्हता, त्यातून त्यांना शिष्टपणा आला नव्हता. मोकळेपणाने चर्चा करायला ते तयार असत. याचा अर्थ ते आपला मुद्दा सोडायला तयार असत असा नाही, पण समोरच्या व्यक्तीला तो शांतपणे पटवून देण्याची त्यांची तयारी असे. याच्या उलट मी एका लहानशा गावामधून आलेला आणि स्वभावाने जरासा बुजरा आणि अल्लडच होतो, घरातले लोक आणि जवळचे मित्र यांना सोडून कोणाशी बोलत नव्हतो, एटीकेट्स कशाला म्हणतात याची कधीच पर्वा केली नव्हती. माझे एक्स्पोजर फारच कमी होते. पुस्तकी ज्ञान सोडले तर मी अगदी रॉ मटीरियल होतो. अशा अवस्थेतल्या मला घडवण्याचे बरेचसे काम नटराजनसाहेबांनी केले.
परदेशात आणि मुंबईत बराच काळ राहिल्यामुळे त्यांच्या बोलण्यातला तामीळ अॅक्सेंट कमी झाला होता आणि इतर भाषिकांबरोबर राहून माझे मिंग्लिश सुधारले होते तसेच अनेक तामीळ मित्रांबरोबर बोलणे झाल्यामुळे मलाही टॅम्लिश समजू लागले होते. यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये कधीच भाषेचा प्रॉब्लेम आला नाही. आमची फ्रिक्वेन्सी बरीच जुळत असल्यामुळे आमच्यात सहसा समजुतीचे घोटाळे होत नव्हते किंवा रिपीटीशन करावे लागत नव्हते. ते निर्विवादपणे सर्वच बाबतीत माझ्याहून मोठे असल्यामुळे आमच्यात संघर्ष होण्याची वेळ येत नव्हती. शिवाय मी माझ्या घरात सर्वात लहान असल्यामुळे मला ऐकून घेण्याची सवय होती. एकंदरीत पाहता आमचे बरे जमत गेले.

 . . . . . . . . .  . . . . . . . . (क्रमशः)


Saturday, March 09, 2013

शिवतांडवस्तोत्र

रामायणाचा खलनायक हीच रावणाची मुख्य ओळख आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा अंतर्गत दुष्मनांच्या, म्हणजे षड्रिपूंच्या प्रभावाखाली येऊन त्याने काही दुष्टपणाची कृत्ये केली. ही त्याची एक बाजू झाली. पण तो पराक्रमी आणि कर्तबगार राजा होता. त्याच्या अधिपत्याखाली त्याच्या राज्यात सुवर्णयुग नांदत होते. रावणाच्या लंकेतली घरे सोन्याच्या विटांनी बांधली होती, त्याला दहा तोंडे होती, तो आकाशमार्गे भ्रमण करत होता वगैरे समजुतींमध्ये अतीशयोक्ती असली किंवा हा सगळा वाङ्मयामधील अलंकारांचा भाग असला तरी त्याने लिहिलेल्या शिवतांडवस्तोत्रामधून त्याची विद्वत्ता, बुध्दीमत्ता आणि शंकराचे चरणी असलेला त्याचा भक्तीभाव व्यक्त होतो. रावणाने लिहिलेले असे एक स्तोत्र आज उपलब्ध आहे हे मी पहिल्यांदा ऐकले तेंव्हा मला आश्चर्यही वाटले आणि त्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. पण ते मिळवून वाचायचा प्रयत्न केला तेंव्हा त्यात एकापाठोपाठ येणा-या जोडाक्षरांचा संधीविग्रह करून त्यातून सुसंगत असा अर्थ काढणे मला शक्यच नव्हते. त्याचा सोप्या हिंदी भाषेत अर्थ एका ठिकाणी मिळाला. माझे एक स्नेही श्री.नरेंद्र गोळे यांनी तर मूळ स्तोत्र ज्या वृत्तात आहे त्याच चालीवर मराठी भाषेत त्याचा भावानुवाद केला आहे. निरनिराळ्या गायकांनी सुस्वरात गायिलेले हे स्तोत्र आता यू ट्यूबवर उपलब्ध आहे. अर्थ कळला नाही तरी त्यातील शब्दांचे माधुर्य आणि तालबध्दता मनाला मोहक वाटते. काव्यरचनेसाठी लागणारी प्रतिभा रावणाकडे होती, संस्कृत भाषेवर त्याचे प्रभुत्व होते आणि त्याला संगीतकलाही अवगत होती या तीन्ही गोष्टी त्यातून दिसतात.

आज शिवरात्रीच्या दिवशी हे मूळ स्तोत्र, त्याचा छंदबध्द मराठी अनुवाद आणि हिंदी भाषेत अर्थ मी या ठिकाणी सादर करीत आहे.

काही महत्वाचे दुवेही खाली दिले आहेत.

 श्री.नरेंद्र गोळे यांचा ब्लॉगः http://anuvad-ranjan.blogspot.in/

पं.जसराज यांनी गायिलेले शिवतांडवस्तोत्र
http://mp3ruler.com/mp3/shiv_tandav_stotram_pandit_jasraj.html

इतर गायकांच्या आवाजात
http://www.youtube.com/watch?v=PoSiBnnvMw0
http://www.youtube.com/watch?v=yZa0gble8EI
http://www.youtube.com/watch?v=9E_HG0fAYEM
 -----------------------------------------------------------------

॥ रावण विरचित शिव तांडव स्तोत्र ॥   
      मूळ संस्कृत श्लोक                          मराठी अनुवाद

जटाटवीगलज्जल प्रवाहपावितस्थले          जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो
गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌    धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो
डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं           डुमूड्डुमू करीत या, निनाद गाजवा शिवा
चकारचंडतांडवं तनोतुनः शिवः शिवम्‌॥१॥     करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा॥१॥
   
जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी        जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि        तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा
धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके          ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम॥२॥     किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे॥२॥
   
धराधरेंद्रनंदिनी विलास बंधुबंधुर-          नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे
स्फुरद्दिगंतसंतति प्रमोदमानमानसे          दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे
कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि           कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति मावळे
क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि॥३॥  कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे॥३॥
   
जटाभुजंगपिंगलस्फुरत्फणामणिप्रभा-    जटाभुजंग तद्मणी-प्रदीप्त कांति ह्या दिशा
कदंबकुंकुमद्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे        कदंब-पुष्प-पीत-दीप्त, शोभती झळाळत्या
मदांधसिंधुरस्फुरत्वगुत्तरीयमेदुरे       गजासुरोत्तरीय ज्या विभूषवी दिगंबरा
मनो विनोदद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि॥४॥  प्रती जडो मती, घडो मनोविनोद, तारका॥४॥

सहस्रलोचनप्रभृत्य शेषलेखशेखर-      सहस्रलोचनादि देव, पादस्पर्शता सदा
प्रसूनधूलिधोरणी विधूसरांघ्रिपीठभूः     तयांस भूषवित त्या, फुलांनि भूषती पदे
भुजंगराजमालया निबद्धजाटजूटकः      भुजंगराज हार हो नि बांधतो जटाहि तो
श्रियैचिरायजायतां चकोरबंधुशेखरः॥५॥ प्रसन्न भालचंद्र तो चिरायु संपदा करो॥५॥
   
ललाटचत्वरज्वलद्धनंजयस्फुलिंगभा-    कपाल-नेत्र-पावका क्षणात मोकलूनिया
निपीतपंचसायकं नमन्निलिंपनायकम्‌   वधी अनंग, हारवी सुरेंद्र आदि देवता
सुधामयुखलेखया विराजमानशेखरं     शिरास भूषवीतसे सुधांशुचंद्र ज्याचिया
महाकपालिसंपदे शिरोजटालमस्तु नः॥६॥ कपालिना, जटाधरा, दिगंत संपदा करा॥६॥

करालभालपट्टिका धगद्धगद्धगज्ज्वल-   अनंग ध्वंसिला जिने, त्रिनेत्रज्योत तीच ती
द्धनंजयाहुतीकृत प्रचंडपंचसायके       नगाधिराज-नंदिनी-स्तनाग्र भाग वेधती
धराधरेंद्रनंदिनी कुचाग्रचित्रपत्रक-      सुचित्र रेखते तिथे जयाचि दृष्टी योजुनी
प्रकल्पनैकशिल्पिनि त्रिलोचनेरतिर्मम॥७॥  त्रिलोचनाप्रती मना, जिवास वाढु दे रती॥७॥
   
नवीनमेघमंडली निरुद्धदुर्धरस्फुर-     नव्या घनांनि दाटली, निशावसेपरी जशी
त्कुहुनिशीथिनीतमः प्रबंधबद्धकंधरः    जटानिबद्धजान्हवीधरा प्रभा विभूषवी
निलिम्पनिर्झरिधरस्तनोतु कृत्ति सिंधुरः  गजेंद्र-चीर-शोभिता शशीकला प्रकाशवी
कलानिधानबंधुरः श्रियं जगद्धुरंधरः॥८॥ जगास धारका कृपा करून ’श्री’स वाढवी॥८॥
   
प्रफुल्लनीलपंकज प्रपंचकालिमप्रभा-    प्रफुल्ल नीलपंकजापरी प्रदीप्त कंठ ज्या
वलंबिकंठकंधरारुचि प्रबंधकंधरम्‌      जये त्रिपूर ध्वंसिला, तसाच कामदेव वा
स्मरच्छिदं पुरच्छिंद भवच्छिदं मखच्छिदं  भवास तारणार आणि याग ध्वंसत्या हरा
गजच्छिदांधकच्छिदं तमंतकच्छिदं भजे॥९॥ भजेन शंकरास मी, गजांतका यमांतका॥९॥
   
अखर्वसर्वमंगला कलाकदम्बमंजरी-     कलाबहारमाधुरीस भृंग जो शिवा असे
रसप्रवाहमाधुरी विजृंभणामधुव्रतम्‌      अनंगहंत आणि जो त्रिपूर, याग ध्वंसतो
स्मरांतकं पुरातकं भवांतकं मखांतकं    भवास तारका हरा, सदा शुभंकरा हरा
गजांतकांधकांतकं तमंतकांतकं भजे॥१०॥ भजेन त्या शिवास मी, गजांतका यमांतका॥१०॥
   
जयत्वदभ्रविभ्रम भ्रमद्भुजंगमश्वस-      गतीस्थ सर्पहार जे, विषाग्नि सोडती असे
द्विनिर्गमत्क्रमस्फुर त्करालभालहव्यवाट्-  फणा उभा करून ते, कपालि ओतती विषे
धिमिद्धिमिद्धिमि द्ध्वनन्मृदंगतुंगमंगल-   मृदंगनाद गाजतो, ध्वनी मनास मोहतो
ध्वनिक्रमप्रवर्तित प्रचण्डताण्डवःशिवः॥११॥ पवित्र तांडवी शिवा, विराजतो नि शोभतो॥११॥

दृषद्विचित्रतल्पयोर्भुजंग मौक्तिकस्रजो-  शिळा नि शेज, मोतियांचि माळ, साप वा असो
र्गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः      जवाहिरे नि मृत्तिका, विपक्ष, मित्र वा असो
तृणारविंदचक्षुषोः प्रजामहीमहेन्द्रयोः      तृणे नि कोमलाक्षि, नागरिक वा नरेंद्र वा
समप्रवृत्तीकः कदा सदाशिवं भजाम्यम्‌॥१२॥ करून भेद नाहिसे, कधी भजेन मी शिवा॥१२॥
   
कदा निलिंपनिर्झरी निकुंजकोटरे वसन्‌    कधी शिरी धरून हात, शंकरा स्तवेन मी
विमुक्तदुर्मतिः सदा शिरःस्थमंजलिं वहन्‌   वसेन जान्हवीतिरी विमुक्त होउनी मती
विलोललोललोचनो ललामभाललग्नकः     सुनेत्रचंचलेचिया कपालिचा ’शिवाय’ ही
शिवेतिमंत्रमुच्चरन्‌कदासुखीभवाम्यहम्‌॥१३॥ चिरायुसौख्यपावण्याकधी सदास्मरेनमी॥१३॥
   
निलिम्प नाथनागरी कदम्ब मौलमल्लिका-  पदी विनम्र देवतांशिरी कळ्या, कदंब जे
निगुम्फनिर्भक्षरन्मधूष्णिकामनोहरः        तये चितारली, मनोज्ञ रूप रेखली, पदे
तनोतु नो मनोमुदं विनोदिनींमहर्निशम्‌    विभूषति, सुशोभति, मनोहराकृतींमुळे
परिश्रय परं पदं तदंगजत्विषांचयः॥१४॥  प्रसन्न ती करो अम्हा सदाच सौरभामुळे॥१४॥
   
प्रचण्ड वाडवानल प्रभाशुभप्रचारणी    विशाल सागरातल्या शुभेच्छु पावकापरी
महाष्टसिद्धिकामिनी जनावहूत जल्पना   महाष्टसिद्धिकामना करीत सर्व सुंदरी
विमुक्त वामलोचनो विवाहकालिकध्वनिः  विवाहकालि शंकरा व पार्वतीस चिंतिती
शिवेतिमन्त्रभूषगोजगज्जयायजायताम्‌॥१५॥ जगासजिंकताठरोशिवायमंत्रताध्वनी॥१५॥
   
इमं हि नित्यमेव मुक्तमुक्तमोत्तमं स्तवं   सदा करून मोकळ्या स्वरात श्लोक पाठ हे
पठन्स्मरन्‌ब्रुवन्नरो विशुद्धिमेति संततम्‌   स्मरून वा श्रवून हे, विशुद्धता सदा मिळे
हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं   हरीप्रती, गुरूप्रती, रती, न वेगळी गती
विमोहनंहिदेहिनांसुशंकरस्यचिंतनम्‌॥१६॥ अशाजिवास मोहत्या शिवाप्रतीसदारुची॥१६॥
   
पूजाऽवसानसमये दशवक्त्रगीतं      पूजासमाप्तिस संध्येस म्हणेल जो हे
यः शम्भुपूजनपरं पठति प्रदोषे       लंकेशगीत शिवस्तोत्र अनन्य-भावे
तस्य स्थिरां रथगजेंद्रतुरंगयुक्तां      शंभू तया, रथ-गजेंद्र-तुरंग-स्थायी
लक्ष्मींसदैव सुमुखिं प्रददाति शम्भुः ॥१७॥  लक्ष्मी प्रसन्न-वदना, वर-दान देई ॥१७॥
   
॥ इति श्री. रावणकृतं                अशाप्रकारे, श्री. रावण विरचित
शिव-तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥          शिव-तांडव स्तोत्र संपूर्ण होत आहे.

मराठी अनुवाद श्री.नरेंद्र गोळे यांनी केला आहे.   
--------------------------------------------------------------------------
॥ रावण रचित शिव तांडव स्तोत्र ॥
  हिंदी भाषांतर


।।१।। सघन जटामंडल रूप वन से प्रवाहित होकर श्री गंगाजी की धाराएँ जिन शिवजी के पवित्र कंठ प्रदेश को प्रक्षालित (धोती) करती हैं, और जिनके गले में लंबे-लंबे बड़े-बड़े सर्पों की मालाएँ लटक रही हैं तथा जो शिवजी डमरू को डम-डम बजाकर प्रचंड तांडव नृत्य करते हैं, वे शिवजी हमारा कल्याण करें।

।।२।। अति अम्भीर कटाहरूप जटाओं में अतिवेग से विलासपूर्वक भ्रमण करती हुई देवनदी गंगाजी की चंचल लहरें जिन शिवजी के शीश पर लहरा रही हैं तथा जिनके मस्तक में अग्नि की प्रचंड ज्वालाएँ धधक कर प्रज्वलित हो रही हैं, ऐसे बाल चंद्रमा से विभूषित मस्तक वाले शिवजी में मेरा अनुराग (प्रेम) प्रतिक्षण बढ़ता रहे।

।।३।।पर्वतराजसुता के विलासमय रमणीय कटाक्षों से परम आनंदित चित्त वाले (माहेश्वर) तथा जिनकी कृपादृष्टि से भक्तों की बड़ी से बड़ी विपत्तियाँ दूर हो जाती हैं, ऐसे (दिशा ही हैं वस्त्र जिसके) दिगम्बर शिवजी की आराधना में मेरा चित्त कब आनंदित होगा।

।।४।। जटाओं में लिपटे सर्प के फण के मणियों के प्रकाशमान पीले प्रभा-समूह रूप केसर कांति से दिशा बंधुओं के मुखमंडल को चमकाने वाले, मतवाले, गजासुर के चर्मरूप उपरने से विभूषित, प्राणियों की रक्षा करने वाले शिवजी में मेरा मन विनोद को प्राप्त हो।

।।५।। इंद्रादि समस्त देवताओं के सिर से सुसज्जित पुष्पों की धूलिराशि से धूसरित पादपृष्ठ वाले सर्पराजों की मालाओं से विभूषित जटा वाले प्रभु हमें चिरकाल के लिए सम्पदा दें।

।।६।। इंद्रादि देवताओं का गर्व नाश करते हुए जिन शिवजी ने अपने विशाल मस्तक की अग्नि ज्वाला से कामदेव को भस्म कर दिया, वे अमृत किरणों वाले चंद्रमा की कांति तथा गंगाजी से सुशोभित जटा वाले, तेज रूप नर मुंडधारी शिवजीहमको अक्षय सम्पत्ति दें।

।।७।। जलती हुई अपने मस्तक की भयंकर ज्वाला से प्रचंड कामदेव को भस्म करने वाले तथा पर्वत राजसुता के स्तन के अग्रभाग पर विविध भांति की चित्रकारी करने में अति चतुर त्रिलोचन में मेरी प्रीति अटल हो।

।।८।। नवीन मेघों की घटाओं से परिपूर्ण अमावस्याओं की रात्रि के घने अंधकार की तरह अति गूढ़ कंठ वाले, देव नदी गंगा को धारण करने वाले, जगचर्म से सुशोभित, बालचंद्र की कलाओं के बोझ से विनम, जगत के बोझ को धारण करने वाले शिवजी हमको सब प्रकार की सम्पत्ति दें।

।।९।। फूले हुए नीलकमल की फैली हुई सुंदर श्याम प्रभा से विभूषित कंठ की शोभा से उद्भासित कंधे वाले, कामदेव तथा त्रिपुरासुर के विनाशक, संसार के दुखों के काटने वाले, दक्षयज्ञविध्वंसक, गजासुरहंता, अंधकारसुरनाशक और मृत्यु के नष्ट करने वाले श्री शिवजी का मैं भजन करता हूँ।

।।१०।। कल्याणमय, नाश न होने वाली समस्त कलाओं की कलियों से बहते हुए रस की मधुरता का आस्वादन करने में भ्रमररूप, कामदेव को भस्म करने वाले, त्रिपुरासुर, विनाशक, संसार दुःखहारी, दक्षयज्ञविध्वंसक, गजासुर तथा अंधकासुर को मारनेवाले और यमराज के भी यमराज श्री शिवजी का मैं भजन करता हूँ।

।।११।। अत्यंत शीघ्र वेगपूर्वक भ्रमण करते हुए सर्पों के फुफकार छोड़ने से क्रमशः ललाट में बढ़ी हुई प्रचंड अग्नि वाले मृदंग की धिम-धिम मंगलकारी उधा ध्वनि के क्रमारोह से चंड तांडव नृत्य में लीन होने वाले शिवजी सब भाँति से सुशोभित हो रहे हैं।

।।१२।। कड़े पत्थर और कोमल विचित्र शय्या में सर्प और मोतियों की मालाओं में मिट्टी के टुकड़ों और बहुमूल्य रत्नों में, शत्रु और मित्र में, तिनके और कमललोचननियों में, प्रजा और महाराजाधिकराजाओं के समान दृष्टि रखते हुए कब मैं शिवजी का भजन करूँगा।

।।१३।। कब मैं श्री गंगाजी के कछारकुंज में निवास करता हुआ, निष्कपटी होकर सिर पर अंजलि धारण किए हुए चंचल नेत्रों वाली ललनाओं में परम सुंदरी पार्वतीजी के मस्तक में अंकित शिव मंत्र उच्चारण करते हुए परम सुख को प्राप्त करूँगा।

।।१४।। देवांगनाओं के सिर में गूँथे पुष्पों की मालाओं के झड़ते हुए सुगंधमय पराग से मनोहर, परम शोभा के धाम महादेवजी के अंगों की सुंदरताएँ परमानंदयुक्त हमारेमन की प्रसन्नता को सर्वदा बढ़ाती रहें।

।।१५।। प्रचंड बड़वानल की भाँति पापों को भस्म करने में स्त्री स्वरूपिणी अणिमादिक अष्ट महासिद्धियों तथा चंचल नेत्रों वाली देवकन्याओं से शिव विवाह समय में गान की गई मंगलध्वनि सब मंत्रों में परमश्रेष्ठ शिव मंत्र से पूरित, सांसारिक दुःखों को नष्ट कर विजय पाएँ।

।।१६।। इस परम उत्तम शिवतांडव श्लोक को नित्य प्रति मुक्तकंठ सेपढ़ने से या श्रवण करने से संतति वगैरह से पूर्ण हरि और गुरु मेंभक्ति बनी रहती है। जिसकी दूसरी गति नहीं होती शिव की ही शरण में रहता है।

।।१७।। शिव पूजा के अंत में इस रावणकृत शिव तांडव स्तोत्र का प्रदोष समय में गान करने से या पढ़ने से लक्ष्मी स्थिर रहती है। रथ गज-घोड़े से सर्वदा युक्त रहता है।

॥ इति शिव तांडव स्तोत्रं संपूर्णम्‌ ॥
Thursday, March 07, 2013

कोण अससि तू न कळे मजला


स्त्रीत्वाची विविध रूपे पाहून थक्क झालेले आणि तिला काय म्हणावे या कोड्यात पडलेले नाटककार स्व.विद्याधर गोखले म्हणतात,
कोण अससि तू न कळे मजला ।
तू गंगेची अथांग शुचिता ?
की जननीची मायाममता ?
भाविकतेची मंगलगाथा ?
उदार चरिता अमर देवता ?
नवा जन्म तू मजला दिधला
काय वदू मी नकळे तुजला ?

त्याही आधी कवीवर्य स्व.ग. दि. माडगूळकर यांनी एका चित्रपटगीतात तिचे असे वर्णन केले आहे,
स्‍त्रीजन्मा ही तुझी कहाणी।
हृदयी अमृत नयनीं पाणी ।।

तुझिया पोटी अवतरती नर ।
अन्यायच ते करिती तुझ्यावर ।
दासी म्हणुनि नमविति चरणी ।।

कुशीत तुझिया पुरुष धुरंधर ।
अबला परि तू ठरिसि जगावर ।
दशा तुझी ही केविलवाणी ।।

सुंदरता तुज दिधली देवे ।
तुझी तुला ती परि न पेलवे ।
क्षणांत ठरली तूच पापिणी ।।
बाळा जो जो रे या चित्रपटात नायिकेला अतीशय हालअपेष्टा भोगाव्या लागतात. तिच्याबद्दल सहानुभूती मिळवून (स्त्री)प्रेक्षकांना हमखास रडवणारे असे हे गीत होते. त्या काळात टीयरजर्कर सिनेमे हमखास चालत असत.


गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या रचनेच्या ध्रुवपादात हृदयीं पान्हा नयनीं पाणी हे सांगितल्यानंतर कडव्यांमध्ये अनेक सकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत. ते गीत असे आहे,
बंदिनी स्‍त्री ही बंदिनी ।
हृदयीं पान्हा नयनीं पाणी ।
जन्मोजन्मींची कहाणी ।.

रूप बहिणीचे माया देई ।
वात्सल्य मूर्त आई होई ।
माहेरा सोडून येई ।
सासरी सर्वस्व देई ।।

कधी सीता कधी होई कुंती ।
सावित्रीची दिव्य शक्‍ति ।
शकुंतला तूच होसी ।
मीरा ही प्रीत दिवाणी ।।

युगेयुगे भावनांचे धागे ।
जपावया मन तुझे जागे ।
बंधनें ही रेशमाची ।
सांभाळी स्‍त्रीच मानिनी ।।

एकादी स्त्री स्वतःबद्दलच काय सांगते ते कवी भालचंद्र खांडेकर यांच्या या गाण्यात पहा,
मी निरांजनातील वात ।
माझ्या देवापाशी जळते, हासत देवघरात ।।

माझ्या प्रभूस माझी पारख ।
माझ्या देवाचे मज कौतुक ।
प्रभा प्रभूच्या सहवासाची, फुलली या हृदयात ।।

प्रशांत नीरव या एकांती ।
शुचिर्भूतता सारी भवती ।
पवित्र दर्शन सदा लोचना, लाभतसे दिन रात ।।

कणाकणातून प्रभा उधळिता ।
पटे जिण्याची मज सार्थकता ।
उषा फुलविता भयाण रात्री, भासे रवि तेजात ।।

आस एकली अंत:करणी ।
वास मिळावा नित तव चरणी ।
नको मना या अन्य विलोभन, गुंताया मोहात ।।

तुमची करण्यासाठी सेवा ।
प्राणाहुती ही माझी देवा ।
प्रकाशपूजन माझे घ्या हो, जे प्राणा प्राणांत ।।

वरील सगळी गीते पुरुषांनी लिहिलेली आहेत. स्त्रियांच्या नावावर काहीतरी लिहून ही समर्पणाची भावना त्यांच्यावर लादून दिली आहे असे जर कोणाला वाटत असेल तर स्व.शांताबाई शेळके या विख्यात कवयित्रीने लिहिलेले हे काव्य पहा.
माझी न मी राहिले ।
तुजला नाथा, सर्व वाहिले ।।

पहिली ती भेट होती ।
हसले मी गाली, ओठी ।
कळले ना मला वेडीला ।
वेड लावून गेली प्रीती ।
कशि फुलापरी उमलले ।।

चांदण्याचे सूर झाले ।
गाइली मी धुंद गाणी ।
धुंद होती रातराणी ।
धुंद होते जीव दोन्ही ।
रंग रंगांतुनी मिसळले ।।

सुख माझे ठेवु कोठे ?
मज माझा हेवा वाटे ।
नच काही उणे संसारी ।
किति आनंद हृदयी दाटे ।
जन्मजन्मी तुझी जाहले ।।

संत मीराबाईची मधुरा भक्ती सर्वांना ठाऊक आहे. एरी मै तो प्रेमदिवानी मेरा दरद न जाने कोय या तिच्या एका सुप्रसिध्द कवनाचा कवीवर्य स्व.ग. दि. माडगूळकर यांनी केलेला अनुवादच पहा.
मी तर प्रेम दिवाणी ।
माझे दु:ख न जाणे कोणी ।।

आर्ताची गत आर्ता ठावी ।
कळ ज्या अंत:करणी ।
स्थिती सतीची सतीच जाणे ।
जिती चढे जी सरणी ।।

स्त्रीला तिच्या स्वतःच्या अपत्याबद्दल वाटणा-यी मायेची थोरवी आपण मातृदिनाच्या दिवशी आठवतोच, पण परक्या घरातून आलेल्या सुनेला धीर देतांना ती काय म्हणते हे स्व. कवी पी.सावळाराम यांनी किती अचूकपणे टिपले आहे पहा,
लिंबलोण उतरता अशी का झालीस ग बावरी ।
मुली तू आलीस अपुल्या घरी ।।

हळदीचे तव पाउल पडता ।
घरची लक्ष्मी हरखुन आता ।
सोन्याहुनी ग झाली पिवळी ।।
मांडवाला कवळुन चढली चैत्रवेल ही वरी ।।

भयशंकित का अजुनी डोळे ?
नको लाजवू सारे कळले ।
लेकीची मी आहे आई ।
सासुरवाशिण होऊन मीही आले याच घरी ।।

याच घरावरी छाया धरुनी ।
लोभ दाविती माय पक्षिणी ।
हसते घर हे तुझ्या दर्शनी ।
सुखव मलाही आई म्हणुनी बिलगुनि माझ्या उरी ।।

पुरुषांना एकादी गोष्ट कमीपणा आणणारी असली तर लाज वाटते, पण स्त्रीसुलभ लज्जा हा तिचा अलंकार आहे. हे देणे फक्त त्यांनाच मिळाले आहे. ही आगळी वेगळी भावना व्यक्त करणारे हे गीत मात्र स्व.कवी मनमोहन नातू यांनी लिहिले आहे.
मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला ।।
नका विचारू स्वारी कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा ।।

नका विचारू गमतीजमती ।
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्‍न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ?

अर्थ उलगडे समरसतेचा ।
सुटे उखाणा संसाराचा ।
छंद लागला मजला त्यांचा ।
धुंद बने बुल्बूल जीवाचा ।
घरी यायची झाली वेळा ।।

पण स्त्रीत्व म्हणजे सगळेच काही सुंदर, मंजुळ, नाजुक वगैरे असायलाच पाहिजे असे नाही. या जगात काही वेळा विसंवाद होतो, समर्पणाचा काही उपयोग होत नाही हे पाहून एकादी स्त्री चवताळून उठते, तिच्या मनातही कोणाबद्दल आसक्ती वाटणे तिला नैसर्गिक वाटते आणि कवी ना.धों.महानोरा यांच्या गीतात ती बिनधास्तपणे सांगते,
मी रात टाकली, मी कात टाकली ।
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली ।।

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत,
चावंळ चावंळ चालती ।
भर ज्वानीतली नार,
अंग मोडीत चालती ।।

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती ।
मी मुक्‍त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती ।।

अंगात माझिया भिनलाय ढोलिया ।
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली ।
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली ।।

उत्तर कोकणातल्या ठाकर महिलेत जसा तिचा स्वाभिमान दिसतो, तसाच ठसका स्व.जगदीश खेबूडकर यांनी चितारलेल्या कोल्हापुरच्या या लवंगी मिरचीमध्ये आहे.
नाव-गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापुरची ।
मला हो म्हणतात लवंगि मिरची ।।

हा डौल झोक हा नटारंगीचा ढंग ।
वार्‍यावर लवते जशी चवळीची शेंग ।
हर घडीला नखरा नवा, डोळा हो डावा, झाकुनी फेकिन नजरेची बरची ।।

हा लाल डाळिंबी शालु पदर जरतारी ।
ही हिरवी-हिरवी चोळी तंग भरदारी ।
नका पाहू न्याहाळुन अशी, पडाल तुम्ही फशी, जणु मी नागीन झाडावरची ।।

या तिखटपणावर जाउ नका हुळहुळून ।
घायाळ शिकारी हरिणी जाइल पळुन ।
हिरव्या रानात दिसते उठून, नका घेउ खुडुन, अहो मी पाव्हणी बारा घरची ।।

वरील काही उदाहरणे विशिष्ट परिस्थितीत सापडलेल्या स्त्रियांची आहेत. ती प्रातिनिधिक नाहीत, पण हा कॅनव्हास किती पसरलेला आहे हे दाखवतात.
नारीचे रूप कसे बदलत आहे हे स्व.जगदीश खेबूडकर यांनीच लिहिलेल्या खालील गीतात दाखवले आहे.
नारी जातीची थोरवी या दुनियेने गाइली ।
अनेक रूपे ही तुझी या दुनियेने पाहिली ।
कोण होतीस तू, काय झालीस तू ।
अग वेडे कशी वाया गेलीस तू ।।

सुंदर रूप तुझे निर्मळ भारी ।
होतीस अशी तू पवित्र नारी ।
डोईवर पदर, पदरात चेहरा,
डोळ्यांच्या पापणीत लाजेचा पहारा ।
होती यशोदा तू, होतीस तारा तू,
होतीस राधा तू, होतीस मीरा तू ।।
पार्वती ती महान झाली ।
राज्य वैभव टाकून आली ।
काळ बदलला तूही बदलली ।
सा-यांना भुलवीत रस्त्याने चालली ।
पदराचं भान नाही, अब्रूची जाण नाही ।
सडक लैला अशी बदनाम झालीस तू ।।
तू अशी नारी होती, लाखात भारी होती ।
मर्दानी झाशीवाली हो‍उन लढलीस तू ।।

कोण होतीस तू, काय झालीस तू ।।

लाजवंती कालची तू चंचल छछोर होई ।
बेछुट तुझ्या वागण्याला घरबंध आज नाही ।
कोण होतीस तू, काय झालीस तू ।।
अग वेडे कशी वाया गेलीस तू ।।

आखुड केस हे आखुड कपडे ।
पाठ ही उघडी, पोट हे उघडे ।
कालची सीता आज डॅडींची रीटा झाली ।
साडी बिचारी खाली घसरली ।
नवा तुझा ढंग हा, बघण्याजोगा ।
पुढून मुलगी मागून मुलगा ।
लाखाचे तारुण्य उधळीत चाललीस तू ।।
तू अशी नारी होती लाखात भारी होती ।
मर्दानी झाशीवाली होऊन लढलीस तू ।.


तिच्यावर होत असलेल्या या टीकेला तीही चोख उत्तर देते,

पुरूष जातीची थोरवी या दुनियेने गाइली ।
अनेक रूपे तुझीही त्याच दुनियेने पाहिली ।।

कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

तेजस्वी रूप तुझे, करारी बाणा ।
होतास असा तू मर्दाचा राणा ।
सिंव्हाची छाती होती, उरात आग होती ।
वाघाची झेप होती, डोळ्यांत जाग होती ।
होतास राम तू, होतास बुद्ध तू ।
होतास कृष्ण तू, विवेकानंद तू ।।
भगतसिंग तो महान झाला ।
देशाच्या क्रांतीसाठी फासाला गेला ।
काळ बदलला, तूही बदलला ।
करीत इशारे तू रस्त्याने चालला ।
पोरींची छेडाछेडी, लोचट लाडीगोडी ।
सडक मजनू असा बदनाम झालास तू ।।
तू असा शूर होता, लाखात वीर होता ।
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू ।।

काल तुझ्या हाती तलवार होती ।
लढवय्याचा तू वारसा ।
आज तुझ्या हाती कंगवा ।
घडीघडी बघसी तू आरसा ।
कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

काय तुझी वेषभुषा आता कहर झाला ।
कालचा हिरो हा आज झिरो झाला ।
कमरेला बेलबॉटम अंगात पोलका ।
लांबलांब केस हे मिशिला चटका ।
तर्‍हा तुझी बायकी, बघण्याजोगी ।
पुढून मुलगा हा मागून मुलगी ।
मर्दपणाचा तुझ्या लिलाव केलास तू ।
तू असा शूर होता लाखात वीर होता ।
राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू ।।
कोण होतास तू काय झालास तू ।
अरे वेड्या कसा वाया गेलास तू ।।

आता कुणी कुणाला बोलायचे?

Tuesday, March 05, 2013

समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण

माझी आई समर्थ रामदासांची परमभक्त होती. तिचे शालेय शिक्षण अक्षरे ओळखण्याइतपतच झालेले असले तरी समर्थांनी लिहिलेले असंख्य श्लोक, ओव्या वगैरे नेहमीच तिच्या जिभेवर असत. तिच्या बोलण्यातून सज्जनगड, कल्याणस्वामी वगैरे उल्लेख येत असत. 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे' हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी "मला ते येत नाही", "मी ते शिकलो नाही", "मी ते यापूर्वी कधी केलेले नाही", "उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल" वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. "शिकला नसशील तर आता शिकून घे", "करायला घेतलेस की यायला लागेल", "प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर", "'असं'च्या ऐवजी 'तसं' होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही 'तसं' झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू." वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच लागत असे एवढेच नव्हे तर ते मनापासून आवडू लागे. या अनुभवाचा मला पुढील आयुष्यात खूप उपयोग झाला. सरकारी नोकरीत असतांना बहुतेक सहकारी 'लकीर के फकीर' मनोवृत्तीचे असायचे. प्रत्येक बाबतीत 'प्रिसिडंट' शोधत रहायचे. पण माझे कामच मुळी शून्यातून नवी निर्मिती करण्यासंबंधी होते. जी यंत्रसामुग्री भारतात यापूर्वी कधीच तयार झाली नव्हती ती तयार करवून घेण्याची जबाबदारी आमच्यावर होती. त्यामुळे वरिष्ठांची अनुमती मिळवून आणि कनिष्ठांना सोबत घेऊन नवीन कल्पनांचा पाठपुरावा करायचा असे. लहान सहान प्रयोग करून धडपडत पुढे जात जेंव्हा ते यंत्र तयार होऊन मनासारखे काम करू लागे तेंव्हा त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असे. 

सात वर्षांपूर्वी मराठी ब्लॉगविश्व फारसे आकाराला आले नव्हते. मी मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा ब्लॉग कसा तयार करायचा यासंबंधी मला कांहीच माहिती नव्हती. मी त्यापूर्वी ई मेल वगळता इंटरनेटवर कुठलेही काम केलेले नव्हते, कुठल्याही वेबसाईटवर काहीही अपलोड केलेले नव्हते. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हेसुध्दा कळत नव्हते. माझे बोट धरून मला चालवत घेऊन जाणारा कोणीही ओळखीचा माणूस नव्हता. पण 'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।' असे म्हणत कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा हा ब्लॉग तयार झाला आणि याहू ३६० वर दुसरा ब्लॉगही सुरू केला. आता ते स्थळ बंद झाले आहे. त्या ठिकाणी ब्लॉगच्या मथळ्याशेजारीच एक बोधवाक्य द्यायचे असे, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती. 'केल्याने होत आहे रे. आधी केलेच पाहिजे।' हे त्या काळात मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.  

दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. "आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?" अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसूलागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन "जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन " आपले बोधवाक्य बनवले. यांतील "शाहाणे करोन सोडावे" हा भाग नक्कीच माझ्या आंवाक्याबाहेरचा होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले. पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी "मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। " हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे टीका आणि कुचेष्टा यांनी विचलित न होता मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो.  

रामदासांचे आणखी एक वचन माझी आई आम्हाला नेहमी ऐकवत असे, ते होते, "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।।".  " उद्यमेन हि सिध्द्यंती कार्याणि न मनोरथै। न हि सुप्तेषु सिंहेषु प्रविशंति मुखे मृगाः।" या सुभाषितामधला भाव या वचनाच्या पहिल्या दोन ओळींमध्ये होता. तेवढा आम्हाला उद्देशून होता. त्याला भगवंताने पाठिंबा द्यायचा की नाही हे देवच जाणो, पण आपला उद्योग किंवा चळवळ विघातक असेल, त्यात दुष्टबुध्दी असेल, त्यातून कोणाचे नुकसान होणार असेल तर त्याला भगवंताचे अधिष्ठान मिळणार नाही आणि त्यमुळे त्याला सामर्थ्य मिळणार नाही हे ओघानेच आले. तेवढे करणे टाळले तरच 'प्रयत्नांती परमेश्वर' येतो.

रामदासांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांमधील काही ओळी आता म्हणी किंवा वाक्प्रचारांसारख्या झाल्या आहेत. निरनिराळ्या संदर्भांमध्ये त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. मानवी जीवनावर भाष्य करणा-या या ओळी अनेक जागी उध्दृत केल्या जातात. उदाहरणार्थ
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ।
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ।
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

कोणाला उपदेश करतांना किंवा सल्ला देतांना रामदासांच्या मनाच्या श्लोकांमधील खाली दिलेल्या ओळी नेहमी सांगितल्या जातात.
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ।।
सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥
विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥
मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥

अशा प्रकारे चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दिलेली शिकवण आमूलाग्र बदललेल्या आजच्या परिस्थितीमध्येसुध्दा मोलाची आहे. त्रिकालाबाधित  किंवा अजरामर असे यालाच म्हणतात.

Monday, March 04, 2013

समर्थ रामदास स्वामीशुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।
कवी वाल्मिकासारखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।
जयजय रघुवीर समर्थ ।।

हा श्लोक मी लहानपणी किती वेळा म्हंटला असेल त्याची गणती नाही. पण वैराग्य, ज्ञान आणि कवित्व या शब्दांचा अर्थच न समजण्याच्या वयात त्या सगळ्याचा अर्थ रामदासस्वामी हे एक महान सत्पुरुष होऊन गेले एवढाच तेंव्हा समजला असेल. सखोल अभ्यासामधून ज्ञान संपादन करता येते, कवीची प्रतिभा जन्मजात असते आणि हे दोन्ही गुण अंगात असलेल्या माणसाला अहंभाव असू नये, कसलीही आसक्ती असू नये असे वैराग्य प्राप्त करण्यासाठी स्वतःवर केवढे नियंत्रण मिळवावे लागले असेल! हे तीन गुण ज्या समर्थांच्या अंगी एकवटले होते ते अलौकिक व्यक्तीमत्वच असणार!

रामदासांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातली पहिली अशी की नारायण नावाचा बालक लग्नाच्या बोहल्यावर उभा असतांना त्याने मंगलाष्टकामधले "शुभमंगल सावधान" हे शब्द ऐकले आणि तो लगेच सावध झाला. आपला जन्म संसारात रमण्यासाठी झालेला नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने बोहल्यावरून जी धूम ठोकली ती पुन्हा मागे वळून न पाहण्यासाठी. तो रानोमाळ हिंडला, योग्य गुरू शोधून त्याने त्यांच्याकडून सर्व घर्मशास्त्रांचे शिक्षण घेतले, त्यावर चिंतन, मनन वगैरे करून आपण काही कार्य करायचे ठरवले आणि रामदास या नावाने ते हाती घेऊन आजन्म करत राहिले. या काळात त्यांनी अनेक ग्रंथरचना केल्या, तसेच गावोगावी हिंडून जनजागृती केली. अत्यंत सुबोध भाषेत तशाच तालबध्द आणि सुरेल अशा आरत्या त्यांनी रचल्या. गेली चारशे वर्षे त्या आरत्या घराघरातून गायिल्या जात आहेत. "करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी।" अशा सारखी शब्दरचना थक्क करते त्याचप्रमाणे ती गातांना जोश निर्माण करते. अत्यंत सोप्या भाषेतले आणि छंदबध्द असे मनाचे श्लोक नकळत किती चांगले मार्गदर्शन करून जातात! सर्वसामान्य लोक पाठ करू शकतील, त्यांच्या लक्षात राहू शकतील अशा छोट्या आरत्या आणि चार चार ओळींचे श्लोक समर्थ रामदासांनी लिहिले त्याचप्रमाणे अभ्यास करू इच्छिणा-यांसाठी दासबोध हा मोठा ग्रंथ लिहिला. त्यातून परमार्थ आणि नित्य जीवन या दोन्हीसंबंधी उत्कृष्ट असा उपदेश केला.

ते स्वतः श्रीरामाचे अनन्य भक्त होते, पण त्यांनी रामभक्त हनुमानाची देवळे ठिकठिकाणी स्थापन केली. एक बलदंड आणि निष्ठावान सेवक अशी मारुतीची प्रतिमा आदर्श म्हणून समाजासमोर ठेवणे हा उद्देश त्यामागे होता. प्रत्यक्ष देवाचे, विशेषतः श्रीरामासारख्या उदात्त चरित्रनायकाचे अनुकरण करणे सामान्य मानवाला शक्य नाही, तसा प्रयत्नही कोणी करणार नाही, पण हनुमानासारखी बलोपासना करणे प्रयत्नसाध्य आहे आणि त्याची समाजाला गरज आहे असा दूरदर्शी विचार त्यामागे असण्याची शक्यता आहे. आपले कार्य पसरत आणि वाढत जावे यासाठी समर्थांनी शिष्यवर्ग तयार केला, मठांची स्थापना केली, त्यातून एक संप्रदाय निर्माण झाला.

समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होतेच. त्यांचे परस्पराशी नेमके कसे संबंध होते यावर वाद घातले जातात. खाली दिलेल्या उदाहरणाने या संबंधात काही माहिती मिळते. स्वराज्याच्या उभारणीच्या सुरुवातीच्या काळात विजापूरच्या आदिलशाहीची सत्ताच महाराष्ट्रावर चालत असे. शिवाजी तेंव्हा छत्रपती झालेले नव्हते. सह्याद्री पर्वतावरील अनेक किल्ले आणि आजूबाजूचा प्रदेश त्यांच्या ताब्यात होता, पण सपाट भूभागावर आदिलशहाची हुकूमतच चालत असे. त्या काळात जेंव्हा शिवाजीचे पारिपत्य करण्याचा विडा उचलून अफजलखान विजापूराहून निघाला तेंव्हा ती बातमी रामदासांना कळताच त्यांनी ती खुबीने शिवाजीमहाराजांपर्यंत पोचवली. खाली दिलेल्या श्लोकांमध्ये परमेश्वराचे गुणगान केले आहे आणि साधा उपदेश केला आहे असे वाटते, पण प्रत्येक चरणाचे पहिले अक्षर घेतले तर "विजापूरचा सरदार निघाला आहे" ही सूचना देऊन त्याचा विचार करून योजना करावी असा संदेश त्यात दिलेला दिसतो. पुढे शिवाजी महाराजांनी अप्रतिम योजनाकौशल्याने अफझलखानाला आणि त्याच्या अचाट सैन्याला कशी धूळ चारली हा इतिहास सर्वश्रुत आहेच.

विवेके करावे कार्य साधन ।
जाणार नरतनू हे जाणोन ।
पूडील भविष्यार्थी मन ।
रहाटेचि नये ।
चालु नये असन्मार्गी ।
सत्यता बाणल्या अंगी ।
रघुवीरकृपा ते प्रसंगी ।
दासमहात्म्य वाढवी ।
रजनीनाथ आणि दिनकर ।
नित्य करिती संचार ।
घालिताती येरझार ।
लाविले भ्रमण जगदिशे ।
आदिमाया मूळभवानी ।
हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
येकान्ती विवेक करोनी ।
इष्ट योजना करावी ।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या कार्याची खूप प्रशंसा केली आहे. त्यांची दोन अप्रतिम गीते मी या ब्लॉगवर दिली आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/02/blog-post_19.html
पहिल्या गीतात ते शिवाजी महाराजांना "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ॥" आणि त्याबरोबरच "यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत, जाणता राजा ॥  असे म्हणतात. "आचारशील विचारशील, दानशील धर्मशील । सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठायीं ॥ धीर उदार गंभीर, शूर क्रियेसि तत्पर  ॥ " अशा या राजाबद्दल बोलतांना "या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे ॥ कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसि धाक सुटला । कित्येकांस आश्रयो जाहला, शिवकल्याणराजा॥" असे ते म्हणतात. या गीतामधला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि महाराजांचे नेमके गुण दर्शवणारा आहे.

छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये प्रत्यक्ष स्वर्ग कसा निर्माण झाला हे रामदास स्वामी "स्वर्गीची लोटली जेथे, रामगंगा महानदी । तीर्थासी तुळणा नाही। भक्तांसी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा । भक्तांसी दिधले सर्वे। बुडाली सर्व ही पापे, हिंदुस्थान बळावले । अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी ।। यासारख्या शब्दांमध्ये समर्थपणे व्यक्त करतात.