Friday, January 21, 2022

भागवत पुराण

 

माझ्या लहानपणी घरातल्या मोठ्या लोकांचे जे बोलणे माझ्या कानावर पडले असेल त्यावरून माझी अशी समजूत झाली होती की भागवत हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा धर्मग्रंथ आहे. तसे पाहता वेद म्हणजे सगळ्या ज्ञानाचे भांडार, पण ते समुद्रासारखे महाविशाल असल्यामुळे पोथी किंवा पुस्तकांमध्ये मावणारे नव्हते असे मला सांगितले गेले होते. रामायण आणि महाभारत ही तर महाकाव्ये; रामलक्ष्मण आणि पांडवकौरव यांची चरित्रे त्यात दिली आहेत असे समजले. म्हणून भागवत जास्त महत्वाचे असे मला वाटत होते आणि ते अगदीच चुकीचे नसावे. "गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।" असे संतांचे वर्णन असलेला तुकाराम महाराजांचा अभंग मी ऐकला होता. त्यामुळे भागवतही गीतेसारखेच तत्वज्ञानाने भरलेले असावे असे मला वाटत होते.  ते एक पुराण आहे हेही मला ठाऊक नव्हते आणि खरे तर "पुराणातली वांगी" हा वाक्प्रचारच तेवढा मला माहीत होता. पुराणांमध्ये त्या वांग्यांशिवाय आणखी काय काय भरलेले असते ते पण मला माहीत नव्हते. भागवत हा वैष्णव संप्रदायाचा धर्मग्रंथ आहे एवढी आणखी जास्तीची माहिती मला नंतरच्या पन्नास वर्षांमध्ये मिळाली.

मी लहानपणीच भागवताचे नाव अनेक वेळा ऐकले होते, पण आमच्या घरी ती पोथी नव्हती. गावात कुणाकडे तरी ती होती आणि अधूनमधून तिची सार्वजनिक पारायणे केली जात असत. त्याला 'भागवताचा सप्ता' म्हणत असत. माझी आई भक्तीभावाने तिथे जाऊन त्या पोथीला आणि ती वाचणाऱ्याला नमस्कार करून आणि प्रसाद घेऊन येत असे, पण तिने मला कधी तिच्याबरोबर नेले नाही. तिथे गेल्यावर मी उनाडपणा करून काही विघ्न किंवा लाज आणेन असे कदाचित तिला वाटले असेल, त्यामुळे मला लहानपणी कधी त्या पोथीचे दर्शन झाले नाही किंवा भागवतातला एक शब्दही माझ्या कानावर पडला नाही.  

मोठा होत असतांना भागवत हे नाव अनेक वेळा माझ्या कानावर आले. आमच्या कॉलेजमध्ये भागवत आडनावाचा एक मुलगा होता आणि याच आडनावाचा दुसरा एक मुलगा आमच्या ऑफीसमध्ये नोकरीला लागला होता आणि रिटायर होईपर्यंत टिकून होता. भागवत हे पहिले नाव असलेला एक दक्षिण भारतीय मुलगाही मला माहीत होता. आमच्या वसाहतीत माझ्या ओळखीची भागवत नावाची तीन कुटुंबे रहात होती. याशिवाय भा.रा.भागवत, दुर्गा भागवत, वीणा भागवत, नीला भागवत, लीना भागवत, मोहन भागवत वगैरे अनेक व्यक्ती प्रसिद्ध आहेत. पण या सर्वांचा भागवत या ग्रंथाशी काही संबंध बहुधा नसावा.  पूर्वी भागवत हे नाव भगवंताची भक्ती करण्यावरून पडले असेल.

माझी फारशी धार्मिक किंवा आध्यात्मिक वृत्ती नाही. त्यामुळे मला भागवताबद्दल कुतूहल वाटत असले तरी तो ग्रंथ हातात घेऊन वाचण्याचा प्रयत्नही मी कधी केला नाही. अलीकडे यू ट्यूब नावाच्या क्रांतिकारक सोयीमुळे काहीही कष्ट न घेता हातातल्या मोबाईलवर वाटेल त्या विषयावरील व्याख्याने घरबसल्या आणि फुकट ऐकायची संधी उपलब्ध झाली आहे. तिचा लाभ घेऊन मी अधून मधून भागवतावरील व्याख्याने ऐकायचा प्रयत्न करायला लागलो आहे. माझ्या आईने सांगितलेली भागवताची सुरस कथा मात्र अजूनही माझ्या लक्षात राहिली आहे. पांडवांनी जेंव्हा संसारातून निवृत्त व्हायचे ठरवले तेंव्हा अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित हा त्यांच्या कुळातला एकमेव वारस होता. पांडवांनी त्याचा राज्याभिषेक करून आपल्या साम्राज्याचा सगळा राज्यकारभार त्याच्यावर सोपवला आणि ते पायी चालत  हिमालयात निघून गेले. परीक्षित हा पराक्रमी तसेच पुण्यशील राजा होता. त्याने आपल्या राज्याचा विस्तारही केला आणि सगळ्या प्रजेची आपल्या मुलासारखी चांगली काळजी घेतली. पण त्याच्या कारकीर्दीतच द्वापार युग संपून कलियुग सुरू झाले. कलीने गुप्तपणे त्याच्या राज्यात प्रवेश करून तो थेट राजाच्या मुकुटात जाऊन बसला.  एकदा राजा परीक्षित शिकार करायला गेलेला असतांना तहान लागली म्हणून रानातल्या एका ऋषीच्या आश्रमात गेला. त्यावेळी ते ऋषि ध्यानस्थ होऊन बसले होते, त्यामुळे त्यांना राजा तिथे आल्याचे समजलेही नाही आणि त्याने राजाकडे लक्ष दिले नाही. मुकुटातल्या कलीने ही संधी साधून राजाच्या बुद्धीवर परिणाम केला. त्यामुळे तो सारासार विवेक विसरला. त्या वेळी या ऋषीने आपला अपमान केला आहे असे वाटून राजा परीक्षित संतापला आणि त्याने रागाच्या भरात एक मेलेला साप त्या ऋषीच्या गळ्यात अडकवला. 

घरी येऊन डोक्यावरला मुकुट काढताच राजा भानावर आला आणि त्याने केलेल्या कर्माचा त्याला पश्चात्ताप झाला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. राजा गेल्यावर लगेच त्या ऋषीचा मुलगा असलेला दुसरा ऋषी घरी आला आणि आपल्या वडिलांच्या गळ्यातला मेलेला साप पाहून तो त्या राजानेच ठेवला आहे हे त्याला अंतर्ज्ञानाने समजले. त्यामुळे त्यालाही खूप राग आला आणि त्याने परीक्षिताला असा शाप दिला की सातव्या दिवशी सर्पांचा राजा तक्षक याच्या दंशाने परीक्षिताचा मृत्यू होईल. ही बातमीही लगेच परीक्षिताला समजली. त्या काळात कुणाचाही शाप खरा ठरणारच असे होते. त्यामुळे आपले उरलेले सात दिवस परमेश्वराच्या भक्तीत घालवायचे असे त्या राजाने ठरवले आणि तो तीर्थक्षेत्राला गेला. त्याच वेळी व्यासमहर्षींचे सुपुत्र शुकदेव तिथे प्रगट झाले आणि पुढील सात दिवस त्यांनी परीक्षिताला श्रीमद्भागवतपुराण  सांगितले अशी या ग्रंथाची जन्मकथा आहे.  

मी लहानपणी असेही ऐकले होते की तक्षकाला आपल्या राज्यात प्रवेशच करू द्यायचा नाही असा कडक बंदोबस्त राज्याच्या पहारेकऱ्यांनी केला होता. पण तक्षकाने सूक्ष्म अळीचे रूप घेतले आणि तो राजाकडे नेल्या जात असलेल्या फळांच्या टोपलीतल्या एका बोरात शिरून राजापाशी गेला आणि भागवताचे सुरस पारायण ऐकत बसला. ते संपल्यानंतर तो बोरातून बाहेर पडला आणि त्याने परीक्षिताला दंश केला. या गोष्टीमुळे मला किडक्या बोरांची खूप भीती वाटत होती.  

अठरा पुराणांमध्ये भागवत हे अव्वल क्रमांकाचे समजले जाते. प्रत्येकी अनेक अध्याय असलेल्या बारा स्कंधांमध्ये मिळून अठरा हजार श्लोक या ग्रंथात आहेत. शुकदेवांनी हे पुराण परीक्षित राजाला सात दिवस सांगितले होते. भागवताचे सप्तेही  सलग सात दिवस चालत असत. दोन निरनिराळ्या विद्वानांनी भागवतावर हिंदीत दिलेली पन्नास साठ प्रवचने यू ट्यूबवर उपलब्ध आहेत, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी मराठीत दिलेली प्रवचनेही आहेत. ही सगळी प्रवचने प्रत्येकी एक ते तीन तासांची असावीत. इतका वेळ सलगपणे लक्ष देऊन ती ऐकण्यासाठी मनात खरोखरच भक्तीभाव असणे गरजेचे आहे. माझ्या मनात तो उत्पन्न न झाल्यामुळे मला थोड्या वेळातच कंटाळा येतो किंवा झोप लागून जाते. त्यामुळे मी तुटक तुटक असे काही भाग पहात आहे. पण त्यावरून मला एक सर्वसाधारण अंदाज आला.

व्यासांनी रचलेले हे भागवतपुराण शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितले, पण तो तर मरून जाणार होता मग त्यानंतर ते लोकांना कसे कळणार ? म्हणून शुकदेवांनी त्याच्या आणखी काही शिष्यांनाही ऐकायला बसवले. त्यातल्या सूत मुनींनी ते पुढे शौनकादिक मुनींना सांगितले आणि त्यानंतरही अनेक जणांनी इतर अनेकजणांना सांगितले. त्यातला प्रत्येक अध्याय "अमुक उवाच" असे म्हणून तिसऱ्याच कुणीतरी आणखी कुणाला तरी सांगितलेला आहे.  हे संपूर्ण पुराण अमूक तमूक ऋषींनी अमूकतमूक मुनीला किंवा राजाला असे असे सांगितले, त्या श्रवण करणाऱ्याने अनेक प्रश्न विचारले आणि सांगणाऱ्याने त्यांची समर्पक उत्तरे दिली अशा संवादात्मक पद्धतीने रचलेले आहे.  त्यात अनेक कथानके आणि उपकथानके आहेत, अनेक लोकांनी भगवंताची केलेली अपरंपार स्तुति आणि प्रार्थना आहेत. आत्मा, परमात्मा,  कर्मसिद्धांत, पुनर्जन्म, इहलोक, परलोक यांच्याविषयीचे तत्वज्ञान आहे, भक्तीमार्गाची महती सांगितली आहे, माणसाने आपल्या सगळ्या इंद्रियांवर ताबा ठेवावा, अहंकार सोडून द्यावा आणि परमेश्वराला बिनशर्त शरण जावे वगैरे उपदेश आहे. तसेच या विश्वाची निर्मिती व रचना याबद्दल अनेक अचाट अशी विधाने आहेत, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवापासून त्याने निर्माण केलेले अनेक ऋषी आणि प्रजापती वगैरेंच्या वाढत गेलेल्या वंशांच्या लांबलचक वंशावळी दिल्या आहेत.

भागवतपुराण हे मुख्यत्वे भगवान विष्णूने घेतलेल्या दशावतारांच्या कथांसंबंधी आहे. त्यात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह वगैरे अवतारांच्या समग्र कथा तर आहेतच, सगळे रामायण आणि बरेचसे महाभारतही संक्षिप्त स्वरूपात येते. श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याचे गोकुळातले बालपण, रुक्मिणीस्वयंवर, अनेक असुरांचा नाश,  द्वारकेला प्रयाण, पांडवांना दिलेली साथ आणि अखेर यादवांचा नाश या सर्वांचे रसभरित वर्णन आहे.  त्याशिवाय प्राचीन भारतातल्या सूर्यवंश, चंद्रवंश आणि त्यांच्यामधून निघालेले कुरुवंश, यदुवंश यासारख्या प्रसिद्ध वंशांमध्ये होऊन गेलेल्या इतर कित्येक राजांच्या कथा त्यात येतात. ध्रुव, प्रह्लाद, दुष्यंत शकुंतला, ययाति देवयानी शर्मिष्ठा, सगर भगिरथ, हरिश्चंद्र तारामती यासारख्या मी ऐकलेल्या बहुतेक सगळ्याच पौराणिक कथा मुळात भागवतातून आल्या आहेत हे मला माहीत नव्हते. आपल्या माहितीत क्वचित एकादा शतायुषी माणूस असतो, पण पुराणकाळातली पात्रे अपार दीर्घायुषी होती. सगळे देव तर अमृत पिऊन अजरामर झालेले असतातच, पण भागवतातले बहुतेक ऋषी आणि अनेक दानवसुद्धा हजारो वर्षे तपश्चर्या करून अद्भुत असे वर मिळवतात आणि काही सम्राट हजारो वर्षे पूर्ण पृथ्वीवर राज्य करतात, शिवाय ते देवांच्या ताब्यातले स्वर्ग आणि असुरांकडले पाताळ हे प्रदेशही जिंकून घेतात.  सर्वात खाली सात पाताळे, मध्ये जमीन, वरती आकाशात सात स्वर्ग, चोवीस नरक, यक्ष आणि गंधर्वांचे लोक, शिवाय ब्रह्मा, विष्णू व शंकराची निरनिराळी निवासस्थाने असे हे भागवतात सांगितलेले विखुरलेले विश्व आहे. प्रत्येकी लक्षावधी वर्षे असलेली चार युगे एकानंतर एक अशी पुन्हापुन्हा अनेक वेळा येत असतात, त्यातून अनेक कल्प आणि मन्वंतरे होत असतात वगैरे वगैरे भागवतात लिहिले आहे. भाविक लोक तिला 'शास्त्रीय माहिती' मानतात. भागवतात सगळी सविस्तर माहिती दिलेली असतांना हे (मूर्ख) शास्त्रज्ञ लोक अब्जावधी डॉलर खर्च करून आकाशात दुर्बिणी कशाला पाठवतात ? असे एका भाविकाने मला विचारले होते.

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू म्हणजे माणसाचे सहा शत्रू आहेत असे मला लहानपणीच शिकवले गेले होते. त्यावेळी 'काम' या शब्दाचा अभिप्रेत अर्थ मला माहीत नसल्यामुळे सांगितलेले काम करायचे टाळण्यासाठी हे एक बरे कारण मिळाले होते. "विषय सर्वथा नावडो" या श्लोकाबद्दलही असाच गोंधळ होता. या षड्रिपूंबद्दल बहुतेक सुशिक्षित लोकांनाही लहानपणीच शिकवले गेले असेल. खरे तर या सगळ्या नैसर्गिक मानवी भावना आहेत आणि वेळोवेळी सगळ्यांच्याच मनात त्या उठत असतात, पण सुजाण लोक प्रयत्नाने आपले मन ताब्यात ठेवत असतात. जर या सहा शत्रूंच्या प्रभावाखाली माणसाचा संयम सुटला किंवा त्याचा तोल गेला तर त्याच्याकडून चुका किंवा वाईट कृत्ये घडू शकतात. हे आपण नेहमीच अनुभवतो. कधी त्याचे गंभीर परिणाम होतात, कुणाकुणाला त्यासाठी शिक्षाही मिळते, तर कधी ''माणूस आहे, तेंव्हा चुका होणारच'' असे म्हणून कुणाला सोडून दिले जाते.  हे सगळे दुर्गुण फक्त माणसांमध्येच असतात आणि तेही या कलियुगात आले आहेत असेही भाविकांचे सांगणे असते. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातली सगळी माणसे जणू काही पूर्णपणे सात्विक आणि सद्वर्तनीच होती !

भागवतातली अनेक पात्रे देव, यक्ष, गंधर्व किंवा ऋषीमुनी वगैरे उच्च श्रेणीतली मंडळी आहेत आणि ती निरनिराळ्या युगांमधली आहेत. पण त्यातल्या बहुतेक कथांमध्ये हे दुर्गुण त्यांच्यातही दिसतात. कुणाचा तरी क्रोध अनिवार होऊन तो सरळ दुसऱ्यावर शस्त्र चालवतो किंवा त्याला भयंकर असा शाप देतो अशीच गोष्ट बऱ्याचशा कथांमध्ये आहे. भगवान परशुराम आणि जमदग्नि, दुर्वास यासारखे ऋषी तर कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. याशिवाय कधी कुणाला लोभ सुटतो, मोह होतो, माज चढतो, असूया वाटते, कामवासना प्रबळ होते अशा गोष्टीही आहेत. देवांचा राजा इंद्र यालाच यातल्या सगळ्या बाधा होतात असे निरनिराळ्या कथांमध्ये दाखवले आहे. कामवासना हा विषय आपण अश्लील मानतो, त्याबद्दल उघडपणे बोलत नाही. पण हरेकृष्ण संप्रदायातल्या स्वामींनी हिंदीमध्ये दिलेल्या प्रवचनांमध्ये या विषयाशी संबंधित असलेल्या कथा इतक्या रंगवून सांगितल्या आहेत की त्यांना सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळावे. कदाचित म्हणूनच लहानपणी माझ्या आईने मला भागवत पुराण ऐकू दिले नसेल असेही वाटते. यामुळे मला असा प्रश्न पडतो की देवांना हे सगळे मानवी विकार कसे असतील? ऋषीमुनींना आपल्या क्रोधावर किंवा मनावर ताबा ठेवता येत नसेल का ? मग सामान्य माणूस आणि हे ऋषीमुनी किंवा देव यांच्यात काय फरक राहिला ? "देवदानवा नरे निर्मिले हे मत लोका कवळू द्या।"  हे केशवसुतांचे वचन आठवते.

प्रभू रामचंद्रांचा अपवाद वगळला तर पुराणकाळात एकपत्नीव्रत रूढ नसावे. भागवतातल्या बहुतेक सगळ्या राजांनाच नव्हे तर ऋषीमुनींनाही अनेक पत्नी असायच्या. शिवाय त्यांचा अप्सरांशी संबंध असायचा आणि दुसऱ्यांच्या बायकांवरही डोळा असायचा असे या पुराणातल्या काही गोष्टींमध्ये आहे. काही काही पात्रांनी तर घाऊकमध्ये वीसपंचवीसपासून शेदोनशे किंवा हजारो मुलींशी लग्ने केली आहेत आणि शेकडो किंवा हजारो मुलामुलींना जन्म दिले आहेत. सगर राजाला साठ हजार मुलगे होते आणि एका उग्र ऋषीच्या नुसत्या कटाक्षाने ते सगळे एकदम भस्मसात झाले. पुढे भगीरथाने आणलेल्या गंगेच्या ओघाने ते सगळे पुन्हा जीवंत झाले आणि स्वेच्छेने स्वर्गात गेले. कश्यप ऋषींनी निरनिराळ्या पत्नींपासून राक्षस, पशू, पक्षी, साप, कीटक वगैरे प्रजा निर्माण केली म्हणे. भागवतात अशा अनेक अद्भुत कथा आहेत. त्या सगळ्या रूपककथा आहेत असे मानले तरी एकेकाला अनेक पत्नी आणि ढीगभर संतती अशी पुरुषप्रधान विचारसरणी त्यातून दिसते. 

अलीकडे मी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांची काही प्रवचने ऐकली. त्यांनी मात्र कामुकतेच्या अश्लील कथा सांगितल्याच नाहीत. त्यांच्या प्रवचनांमध्ये भागवतपुराणातल्या कथानकांपेक्षा  प्रखर राष्ट्रभक्ती, महान प्राचीन संस्कृती, महान विचार, महान परंपरा, आजकाल त्यात येत असलेल्या विकृती, लोकांची बिघडत असलेली जीवनशैली, ढासळत असलेली नीतीमत्ता वगैरेंवरील उपदेशपूर्ण बौद्धिकांवरच जास्त भर होता. पण त्यांनी सौम्य करून सांगितलेल्या कथांमधल्या पात्रांमध्येही हे सहाही अवगुण दिसतातच.

निर्गुण, निराकार असा एकच परमेश्वर अणूरेणूंमध्ये भरलेला आहे असे अनेक विद्वान सांगतात आणि त्यासाठी उपनिषदांपासून आदि शंकराचार्यांपर्यंत अनेकांच्या वचनांचे दाखले देतात. पण सामान्य माणसांना उपासना करायला सोयीचे जावे म्हणून त्याने अनेक सगुण रूपे घेतली आहेत. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि शिव अशी त्रिमूर्ती करून कामांची वाटणी केली आहे वगैरेही सांगितले जाते. पण भागवतामधल्या कथांमध्ये हे तीघेही आपापल्या कामाशिवाय इतरांची कामेही करतांना दिसतात. ब्रह्मदेव आणि शंकर भगवान तपश्चर्या करणाऱ्या दानवांना वरदान देतात आणि भगवान विष्णू अवतार घेऊन त्यांचा संहार करतात. 

चंद्र, सूर्य, पृथ्वी, गुरु, शुक्र हे अवकाशात फिरणारे एकाच सूर्यमालिकेतले निर्जीव गोल आहेत हे आता विज्ञानामधून निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. ध्रुव, सप्तर्षी, रोहिणी नक्षत्र वगैरे अंतराळात खूप दूरवर असलेले तारे आहेत हेसुद्धा सर्वांना माहीत आहे. पण भागवतामधल्या कथांमध्ये ही सगळी माणसासारखी वागणारी पात्रे आहेत. ते बोलतात, रुसतात, रागावतात, भांडतात, कृती करतात. त्यांना स्वभाव आणि चरित्रे दिली आहेत.  हे ग्रह तारेच नव्हे तर समुद्र, वारा आणि पाऊस वगैरेसुद्धा मनुष्यरूपात वावरतात, लग्ने करतात आणि मुलांना जन्म देतात. अर्थातच या सगळ्या रूपककथा किंवा बोधकथा असणार. पण हे सगळे खरोखर अगदी असेच घडून गेले आहे. व्यासमहर्षी किंवा शुकदेवमुनी काल्पनिक खोटे कशाला सांगतील ? असा वाद घालणारे लोक आपल्यामध्ये आहेत.  

या अद्भुत कथा सोडल्या तर मला जसे लहानपणापासून वाटत आले होते त्याप्रमाणे भागवतामधला बराच मोठा भाग धर्मशास्त्रांवर आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता तशाच प्रकारचा उपदेश भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केला आहे. त्यात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग आहेत, चातुर्वण्यातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांची कर्तव्ये, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या चार आश्रमात माणसांनी काय करावे हे सांगितले आहे, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांबद्दल सांगितले आहे, सत्व, रज आणि तमोगुण यांचे विवेचन केले आहे. सर्व विश्व व्यापून राहिलेल्या परमेश्वराचे वर्णन आहे. याशिवाय अनेक ऋषिमुनी, राजेमहाराजे, देव, दानव, गंधर्व वगैरेंच्यामधल्या  निरनिराळ्या संवादांमधून हिंदू धर्माची सगळी मूलतत्वे पुन्हापुन्हा सांगितली गेली आहेत. म्हणून त्याला धार्मिक ग्रंथ म्हंटले जात असावे.  हजारो वर्षांपूर्वी कुणी कुणी कुणाकुणाला तोंडी सांगितलेले अठरा हजार श्लोक रचायला त्यांना किती काळ लागला असेल, ते कुणीकुणी आणि कशावर लिहून ठेवले, त्याच्या पुन्हा पुन्हा अचूक प्रती काढून त्या जपून ठेवल्या आणि काळाच्या ओघात तसेच विध्वंसक आक्रमकांपासून त्या इतकी वर्षे टिकून कशा राहिल्या असतील या सगळ्याचेच मला आश्चर्य वाटते.