Thursday, February 27, 2014

रुद्रास आवाहन - डमडमत डमरु ये - स्व.भा.रा. तांबे

आज महाशिवरात्र आहे तसेच मराठी भाषादिवससुद्धा आहे. कवीवर्य कुसुमाग्रज उर्फ स्व.वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस पाळला जातो. मराठी भाषेतल्या काव्याला अनेक शतकांची परंपरा आहे.  ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, रामदास आदि संतश्रेष्ठ आणि वामनपंडित, मोरोपंत यांच्यासारख्या संतकवींनी अभंग, ओव्या, श्लोक, भारुडे, गौळणी, जोगवा वगैरे अनेक पद्धतीच्या उत्कृष्ट रचना करून ठेवलेल्या आहेत. या बहुतेक सर्व काव्याचा धार्मिकतेशी संबंध असायचा, काहीमध्ये देवाची स्तुती, विनवणी आणि प्रार्थना असते, काही रचनांमध्ये पौराणिक कथांचा भाग किंवा संदर्भ असतो, निदान चांगले वर्तन ठेवण्याचा उपदेश तरी असतोच.

प्रेम, मीलन, विरह, निसर्ग किंवा सामाजिक परिस्थिती यासारख्या विषयांवर मराठी भाषेत काव्य रचणे गेल्या शंभर दीडशे वर्षांमध्ये सुरू झाले असावे. कदाचित उर्दू आणि इंग्रजी भाषांमधील साहित्याचा प्रभाव पडल्यानंतर त्याची सुरुवात झाली असावी. स्व.भास्कर रामचंद्र तांबे (भा. रा. तांबे) हे या अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकांमधील एक मोठे नाव आहे. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत अप्रतिम काव्यरचना केली. 'डोळे हे जुल्मि गडे', 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' यासारखी प्रेमगीते,  'कळा ज्या लागल्या जीवा' यासारखे सामाजिक भान असलेले गीत, 'जन पळभर म्हणतील हाय हाय', 'मावळत्या दिनकरा' यासारखी तत्वज्ञान मांडणारी गाणी, तसेच पण आशा दायक असे 'घन तमीं शुक्र बघ राज्य करी' हे गीत, 'नववधू प्रिया मी बावरतें', 'निजल्या तान्ह्यावरी माउली' यासारखी कौटुंबिक जीवनावरली गीते, 'पिवळे तांबुस ऊन कोवळे' यासारखे निसर्गगीत अशी एकाहून एक वरचढ गीते त्यांनी लिहिली. 'मधु मागशी माझ्या सख्यापरी' हे त्यांचे एक प्रकारचे निरोप घेणारे लाजवाब गाणे चटका लावणारे आहे.

स्व.भा.रा. तांबे यांनी काही भक्तीगीतेसुद्धा लिहिली आहेत. उदाहरणार्थ 'चरणी तुझिया मज देई वास हरी'. त्यांनी रुद्राला केलेले आवाहन या गीताला भक्तीगीत म्हणावे की क्रांतीकारक म्हणावे हे सांगता येणार नाही. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातल्या परिस्थितीने ते इतके क्षुब्ध झाले होते की हे सगळे तोडून, मोडून, जाळून टाकणारे प्रलयंकारी तांडव शंकराने पुन्हा एकदा करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. तरीसुद्धा 'पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं, ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती' असे ते लिहितात. या गाण्यातले कडक शब्द आणि त्यांना उठाव देऊन गाता येईल असा छंद या गाण्यासाठी त्यांनी निवडला. हे गीत नुसते मनातल्या मनात वाचायचे नाही, त्याचा उच्चार केल्यावर आपोआप स्फुरण चढावे अशा प्रकारचे हे गीत त्यांनी लिहिले आहे. अगदी संहार केला नाही तरी चालेल पण क्रांतीकारक (चांगला) बदल करण्यासाठी महादेवाने अवतरावे असे हे गीत वाचून कुणालाही वाटेल. शब्द आणि नाद या दोन्हीचा एकत्र परिणाम या गीतात दिसून येतो. स्व.भा.रा. तांबे यांचे या दोन्हीवरील प्रभुत्व अद्वितीय होते.

 रुद्रास आवाहन
  
डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।

जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।

--------------------------------
मूळ लेखात दिलेल्या कवितेत दोन दुरुस्त्या केल्या आहेत.
"शंख फुंकत ये" ऐवजी "शंख फुंकीत ये "  
आणि  "जळ तडाग सडे"च्या ऐवजी "जळ तडागी सडे" असे लिहिले आहे.
५ जून २०१७. 

Saturday, February 22, 2014

मारुती 800 (उत्तरार्ध)


पुराणकाळातल्या रथी महारथींकडे सारथी असत, नंतरच्या काळातही गाडीवानदादा, टांगेवाला, नावाडी वगैरे लोकांनी चालवलेल्या वाहनात बसूनच इतर लोक प्रवास करत आले आहेत. मध्यमवर्गीयांनी मोटारी घ्यायला सुरुवात केल्यानंतर बहुतेक मालक लोक स्वतःच गाडी चालवायला लागले. पण अजूनही खानदानी बडे लोक मात्र त्या कामासाठी वेगळा ड्रायव्हर किंवा शोफर ठेवतात. काही श्रीमंत लोकांना, विशेषतः युवकांना कार ड्राइव्हिंगचा शौक असतो. त्यातला आनंद किवा थरार अनुभवण्यासाठी ते मोटारीचे स्टीअरिंग व्हील हातात घेतात.

इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची मुलेही प्रकाशझोतात आली. त्यातला धाकटा मुलगा संजय याला चांगल्या चांगल्या मोटारगाड्या चालवण्याची विशेष आवड आहे इथपासून ते ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रातला तो मोठा तज्ज्ञ आहे इथपर्यंत त्याची प्रतिमा तयार होत गेली. त्याने स्वतः एक मोटारकार तयार केली होती असेही सांगितले जात होते. इलस्ट्रेटेड वीकली या त्या काळातल्या प्रतिष्ठित साप्ताहिकाचे संपादक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्येष्ठ लेखक खुशवंत सिंह यांनी त्या खास मोटारगाडीवर लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला असल्याचे आठवते. ही संजयनिर्मित नवी कार आंतरराष्ट्रीय उच्च दर्जाची असल्याचे प्रमाणपत्र त्यांनी या लेखात दिले होते. सर्वसामान्य (म्हणजे मध्यमवर्गीय) लोकांना परवडू शकेल इतक्या स्वस्त आणि भारतातल्या तत्कालीन इतर गाड्यांच्या मानाने मस्त अशा या स्वदेशी मोटारगाड्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी संजय गांधी यांच्याच आधिपत्याखाली एका खाजगी कंपनीची स्थापना करण्यात आली.  

संजय गांधींच्या त्या गाडीचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव 'मारुती' असे ठेवण्यात आल्याचे वाचले तेंव्हा माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. संजय गांधी हे त्यांचे आजोबा पं.जवाहरलाल नेहरू आणि आई श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सान्निध्यात लहानाचे मोठे झाले होते. या दोन्ही महान व्यक्ती संपूर्ण देशाच्या, किंबहुना सा-या जगाच्या राजकारणाचा व्याप सांभाळण्यात गुंतलेल्या असतांना त्यांना आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला कितपत वेळ मिळत असेल हा एक प्रश्न होताच, त्यातून या दोघांचीही धार्मिकपणाबद्दल कधीच ख्याती नव्हती. त्यांच्यावर असलेला पाश्चात्य जगातल्या आधुनिक विचारांचाच प्रभाव त्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येत होता. संजय गांधींचे पिता फिरोज गांधी तर पारशी होते आणि संजय यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातल्या पब्लिक स्कूल्समध्ये व परदेशात झाले होते. त्यांनी अशा वातावरणात केलेल्या या सगळ्या प्रवासात त्यांना हिंदू धर्मातल्या पौराणिक कथांमधल्या पात्रांबद्दल आस्था वाटावी किंवा हिंदू देवतांबद्दल त्याच्या मनात भक्तीभाव उत्पन्न व्हावा अशी अपेक्षा नव्हती. त्यातही मारुती हे नावही जरा वेगळे आहे. या देवाने राम, कृष्ण, महादेव वगैरे देवतांसारखे सुंदर, मनोहर आणि आकर्षक असे मानवरूप धारण केलेले नाही. उत्तर भारतात हनुमानजींची मंदिरे आहेत, हनुमंतसिंग, हनुमानप्रसाद अशा नावाच्या प्रसिद्ध व्यक्ती मिळतात, पण मी तरी एकादा मारुतीप्रसाद किंवा मारोतकुमार अजूनपर्यंत पाहिलेला नाही. दक्षिणेमध्ये आंजनेयस्वामींची देवळे पाहिली आहेत आणि एक आंजनेयुलू पण भेटला होता. मारुती माने, मारुती कांबळे, मारोतराव वगैरे मराठी नावे मात्र कानावर येत असतात. यामुळे मारुती हे बहुधा मराठी नाव संजय गांधींनी मोटारकारसाठी का निवडले हे मला आजतागायत समजलेले नाही. मारुती या नावाखेरीज हनुमानाचे चित्र किंवा त्याचा कसलाही उल्लेखसुद्धा मारुती कारच्या संदर्भातल्या कोणत्याही पँफ्लेट किंवा जाहिरातीमध्ये कधी आढळला नाही.

ज्या काळात संजय गांधींच्या खास मारुती कारची थोडीफार जाहीर चर्चा होत होती त्याच काळात राजकारणाच्या क्षेत्रात मात्र त्यांची तुफानी घोडदौड चालली होती. त्यांचे महत्व आणि दरारा दिवसेदिवस वाढतच होता आणि आणीबाणीच्या काळात तो शिगेला पोचला होता. पण त्यानंतर आलेल्या जनतापक्षाच्या सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधीं यांच्या यांचेविरुद्ध आघाडी उघडली आणि त्या अनुषंगाने मारुती कंपनी वादाच्या भोव-यात सापडली, ती बंद पडली आणि तिच्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. पण जनता पक्षाचे सरकार जास्त काळ टिकले नाही. अंतर्गत दुफळीमधूनच त्या पक्षाचे विघटन झाले आणि श्रीमती इंदिरा गांधी पुन्हा सत्तारूढ झाल्यानंतर या चौकशा थांबल्या. यावेळी संजय गांधीही राजकारणात त्यांच्या मातोश्रींच्याबरोबर आघाडीवरच होते. व्यक्तीगत आयुष्यात मोटारगाडी चालवणे हा त्यांचा आधीचा छंद होता, पण राजकारणामध्ये ते उंच भरारी घेत असतांना त्यांना खरे खुरे विमान आकाशात उंच उडवण्याची आवड निर्माण झाली, पण त्यांच्या विमानाला भीषण अपघात होऊन त्यांचे अकाली निधन झाले.

मारुती कंपनी बंद झालेली होती आणि संकल्पित मारुती कारचा मुख्य निर्माता किंवा सूत्रधारच अकस्मात असा काळाआड गेल्यावर हे सगळे विस्मरणात गेले असते, पण भारत सरकारने पुढाकार घेऊन तो प्रकल्प तडीला न्यायचे ठरवले. सरकारच्या बळावर मारुती कंपनीचे पुनरुज्जीवन केले आणि निरनिराळ्या परदेशी कंपन्यांशी वाटाघाटी करून अखेर सुझुकी या जपानी कंपनीबरोबर कोलॅबोरेशन केले गेले. मारुती कंपनीचे नाव मारुतीसुझुकी असे झाले आणि त्याची अंशतः मालकी जपानी कंपनीकडे गेली. त्यानंतर लवकरच या कंपनीने आपली नवी गाडी बाजारात आणली. फियाट आणि अँबॅसेडरपेक्षा कमी किंमतीत आणि त्याच्यापेक्षा खूप चांगले माइलेज देणारी जपानी बनावटीची नवी गाडी मिळणे म्हणजे ग्राहकांना पर्वणीच होती. त्या काळात भारतीय बनावटीच्या चलतीका नाम गाडी म्हणता येण्यासारख्या गाड्याच प्रामुख्याने रस्त्यावर दिसायच्या. काही मोठे उद्योगपती, नावाजलेले नटनट्या आणि प्रसिद्ध पुढारी इंपाला किंवा मर्सिडीज यांच्यासारख्या इम्पोर्टेड मोटारगाड्या वापरत असत. एकाद्या भागात अशी आलीशान गाडी आली तर तिच्यातून कोणती अतिमहत्वपूर्ण व्यक्ती (व्हीआयपी) उतरते हे पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी जमत असे आणि त्या गाडीकडे व व्यक्तीकडे आळीपाळीने पहात उभी रहात असे. या पार्श्वभूमीवर पाहता स्वस्त आणि मस्त जपानी गाडी विकत मिळते आहे हे पाहताच ज्याला ज्याला शक्य असेल ते सगळे लोक ही संधी साधायला सरसावले. जितक्या गाड्यांचे बुकिंग जाहीर केले होते तेवढे सगळे पहिल्याच दिवशी झाले असावे. माझ्या काही मित्रांनीसुद्धा कर्ज काढून आणि ऑफीसातून रजा घेऊन त्या दिवशी अर्जदारांच्या रांगेत नंबर लावला होता. नंतरच्या काळात हे बुकिंग अधूनमधून केले जाऊ लागले आणि तिकडे लक्ष ठेवून इच्छुक लोक ते करू लागले.

काही दिवसांनी मारुती कारचे अॅलॉटमेंट सुरू झाले. सोडत काढून निवडलेल्या पहिल्या ग्रहकाला मारुती गाडी सुपूर्द करण्यासाठी खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. पुढेही अॅलॉटमेंटमध्ये ज्याचा ज्याचा नंबर येत असे त्याला लॉटरी लागल्यासारखा आनंद होत असे. तो सेलिब्रेट केला जात असे. पहिल्या लॉटमधल्या कित्येक हजार मारुती मोटरगाड्या तर पूर्णपणे आयात करून विकण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्यांना त्या मिळाल्या ते लोक तर जास्तच खूष झाले होते. नंतर हळूहळू काही भाग भारतातल्या कारखान्यामध्ये तयार होऊ लागले, पण गुणवत्तेच्या बाबतीत ते सुद्धा तोडीस तोड असल्यामुळे सगळ्या गाड्या तांत्रिक दृष्ट्या एक सारख्याच होत्या असे म्हणायला हरकत नव्हती.  

मारुती 800 ही मुख्यतः शहरात चालवण्याच्या उपयोगासाठी तयार केलेली मोटार आहे. अर्थातच शहरात रस्ते चांगले असतात अशी अपेक्षा असते, शहराच्या अंतर्गत भागात घाटासारखे खूप चढउतार नसतात. भारतातल्या शहरात तर इतकी जास्त रहदारी असते आणि जागोजागी ट्रॅफिक सिग्नल्स असतात की जास्त वेगाने गाडी चालवणे शक्यही नसते. यामुळे इंजिनाला फार जास्त अतिरिक्त शक्तीची आवश्यकता नसते. मारुती 800या मोटारीच्या इंजिनाच्या सिलिंडर्सचा अंतर्गत आकार (स्वेप्ट व्हॉल्यूम) सुमारे ८०० घनसेंटिमीटर इतका आहे म्हणून या मॉडेलचे नाव मारुती 800 असे पडले. सुरुवातीला फक्त हीच गाडी होती आणि ती खूप लोकप्रिय झाली यामुळे फक्त मारुती गाडी एवढेच म्हंटले तर सहसा मारुती 800 असाच त्याचा अर्थ घेतला जातो. नंतरच्या काळात व्हॅन, आल्टो, झेन, एस्टीम, वॅगनार, स्विफ्ट, ओम्नी, डिझायर वगैरे इतर अनेक प्रकारच्या मोटारी मारुती सुझुकी कंपनीने बाजारात आणल्या .त्या गाड्या मात्र त्या त्या विशिष्ट मॉडेलच्या नावाने ओळखल्या जातात.

मारुती 800 गाडी आकाराने लहानच असते. पुढच्या बाजूला चालकाची आणि दुसरी एक वेगळी सीट असते, त्यावर दोन माणसेच बसू शकतात. मागची सीट दोन व्यक्तींना व्यवस्थितपणे पुरेशी असते. दाटीवाटी करून आणखी एकादा मुलगा, मुलगी किंवा सडपातळ व्यक्ती सामावून घेता येईल. 'हम दो हमारे दो' हा नियम पाळणा-या चौकोनी कुटुंबासाठी ही गाडी उत्तम आहे. शहरातल्या रहदारीमधून वाट काढण्यासाठी किंवा रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यासाठी हिचा लहान आकार सोयिस्कर आहे. या गाडीचे इंजिन लहान असले तरी कार्यक्षम असते, त्यामुळे गाडी लवकर वेग घेते आणि मोकळा हमरस्ता मिळाला तर ताशी सव्वाशे किलोमीटरपर्यंत वेग घेऊ शकते.

अशी ही सद्गुणी मोटर कार बाजारात आल्या आल्या लगेच लोकांच्या पसंतीला उतरली आणि जवळ जवळ वीस वर्षे भारतात सर्वाधिक खपाच्या अग्रक्रमावर टिकून राहिली होती. शहरात राहणा-या नोकरदार वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यावर जेंव्हा त्यांचा मोटार घेण्याचा विचार होई तेंव्हा बहुतेकांचे पाय मारुतीच्या शोरूमकडेच वळत असत. त्यासाठी ऑफिसकडून कर्जही सुलभपणे मिळायला लागले आणि त्याच्या परतफेडीचा हप्ता परवडण्याइतपत असायचा. माझे बहुतेक सहकारी आणि शेजारी त्याच वाटेने गेले आणि दहा बारा वर्षांमध्ये त्यातल्या बहुतेकांनी मारुती 800 घरी आणली.

माझ्या प्रायॉरिटीज थोड्या वेगळ्या असल्यामुळे मी मोटारगा़डी विकत घेण्याची घाई केली नाही. मला स्वतःला चालायला आवडते, चालत जातांना रमतगमत, वाटल्यास वाटेत थांबून कोणाशी चार शब्द बोलून, पुढे जाता येते.  बसमधले आसन उंचावर असते, खिडकीमधून बाहेरचे दृष्य पाहता येते यामुळे मला बसचा प्रवासही आवडतो. कारच्या खिडक्यांमधून मला तरी मुख्यतः रस्ता आणि त्यावरून चालणा-या चालणा-या लोकांचे पायच दिसतात,   माणसाचा चेहरा आणि इमारतीचा तळमजला जेमतेम दिसला तर दिसला, त्याच्यावर कितीही उंच आणि भव्य इमारत असली तरी ते समजत नाही. गाडी चालवणा-याला समोरचे बरेचसे दिसत असले तरी रस्ता, इतर वाहने आणि ट्रॅफिक सिग्नल्स यांच्यावरच आपले लक्ष केंद्रित करावे लागते. बरेच वेळा सोय म्हणून आणि कधी नाइलाज म्हणून मी कारमधून प्रवास करत असे पण ती माझी पहिली पसंती नसायची.

माझ्या पातळीवर असलेल्या सगळ्यांकडे मोटारी आल्या होत्या, पण मी घेतली नव्हती हे माझ्यापेक्षा इतरांनाच खटकायला लागले होते. माझ्याही इतर सगळ्या जीवनावश्यक वस्तू घेऊन झाल्या, सगळ्या कौटुंबिक जबाबदा-या पार पाडून झाल्या, त्यानंतर मग मलाही मोटर कार घेणे भागच होते किंवा ती न घेण्यासाठी कारण सांगता येईनासे झाले. तोपर्यंत मारुती 800 बाजारात येऊन पंधरा वर्षे होऊन गेली असली तरी अजून ती टॉपवर होती आणि अजूनही ती मिळण्यासाठी थोडे दिवस थांबावे लागत असे. मीही आपला नंबर लावला आणि दीडदोन महिन्यात माझ्या आणि आमच्या कुटुंबाच्या पसंतीच्या लाल रंगाची मारुती आमच्या बिल्डिंगच्या तळघरातल्या पार्किंग लॉटमध्ये येऊन पोचली.

आता मात्र मारुती 800 हे मॉडेल कायमचे बंद केल्याचे जाहीर केले गेले आहे. मागच्या महिन्यात या मॉडेलची शेवटची कार कारखान्यामधून बाहेर पडली तिला समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. ही बातमी वाचून मागचा सगळा इतिहास आठवला.

Wednesday, February 19, 2014

मारुती 800 (पूर्वार्ध)


आमच्या गावातल्या मारुतीच्या देवळातली म्हणजे अर्थातच हनुमंताची भव्य मूर्ती गावातल्या इतर कोणत्याही देवळातल्या कोणत्याही मूर्तीच्या मानाने खूप मोठ्या अगडबंब आकाराची होती. भीमरूपी, महारुद्र, महाबळी, बजरंगबली वगैरे विशेषणे भूषवणारा हा देव जबरदस्त सामर्थ्यवान आणि महाकाय असावा अशीच त्याची प्रतिमा मनात तयार झाली होती. गावातल्या एकाद्या आडदांड आणि हुम्म माणसालासुद्धा "तो तर बजरंगबलीचा अवतार आहे." असे म्हणत असत. मारुती आणि हनुमंत किंवा हणमंत ही नावे पूर्वीच्या काळात खूप प्रचलित होती. गावातल्या दर पंधरावीस माणसांमध्ये एकादा तरी मारत्या किंवा हणम्या भेटायचाच. त्यामुळे या नावाचे काही लोक मोटारड्रायव्हर होते. त्या काळात मारुती आणि मोटारगाडी यांचा संबंध आला तर तेवढ्यापुरताच यायचा. 'माझी मारुती (गाडी)' असे कधी तरी कोणी तरी म्हणेल अशी कल्पनाही त्या वेळी करवत नव्हती.

पन्नास साठ वर्षांपूर्वीच्या त्या काळात 'बंगलागाडी' किंवा 'गाडीबंगला' असे जोडशब्दच बहुधा कानावर पडत. या दोन्ही गोष्टी आमच्या म्हणजे त्या काळातल्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. प्रत्येक बंगलेवाल्याकडे मोटारगाडी असणारच किंवा असलीच पाहिजे आणि बहुतेक गाडीवाले बहुधा बंगल्यांमध्ये रहाणारे असतात असे समजले जात असे. आमच्या सारख्यांना कधीतरी एकाद वेळेस चुकून माकून कुणाच्या मोटाकारमध्ये बसायला मिळाले तर त्याचे मोठे अप्रूप वाटत असे. स्वतःच्या मालकीची मोटार कार बाळगणे हे श्रीमंत लोकांचे शौक, चोचले किंवा चैन असे समजले जायचे. तेंव्हाच्या पं.नेहरूप्रणीत समाजवादी समाजरचनेच्या कल्पनेशी ते सुसंगत नव्हते. आपल्या देशाचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी आखलेल्या सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये मोटारींचे उत्पादन करण्याला प्राधान्य देण्याचा प्रश्नच नव्हता. "लोखंड, वीज, मनुष्यबळ वगैरे देशाच्या दुर्मिळ संसाधनांचा (रिसोर्सेसचा) उपयोग चिमूटभर श्रीमंत लोकांच्या चैनीसाठी करणे कितपत योग्य आहे?" असा प्रश्न विचारून ते कसे चुकीचे आहे असे प्रतिपादन त्या काळातले 'विचारवंत' करत असत. डावी विचारसरणी मांडणारेच तेवढे खरे 'विचारवंत', बाकीचे सारे 'भांडवलधा-यांचे धार्जिणे' असे त्या काळातल्या तथाकथित 'विचारवंतां'नी आपापसात मिळून ठरवले होते आणि समाजवाद हे सरकारचे अधिकृत धोरण असल्यामुळे या 'समर्थाचिया घरच्या' मंडळींना इतर सगळे लोक मान देत असत. अशा प्रकारे त्या काळातले भारतातले औद्योगिक वातावरण मोटारगाड्यांच्या उत्पादनाला फारसे पोषक नव्हते.

पण मोटारगाड्यांची वाढती उपयुक्तता वादातीत होती. सामान्य लोकांनासुद्धा प्रवासाला जाण्यासाठी सामानसुमान घेऊन रेल्वे स्टेशन किंवा एस्टीस्टँडवर पोचण्यासाठी वाहनाची गरज पडत असे. आजारी माणसांना दवाखान्यात नेण्यासाठी वाहन हवेच. डॉक्टर, व्यापारी, कारखानदार, कंत्राटदार वगैरे लोकांनाही त्यांच्या व्यवसायानिमित्य रोज भ्रमंती करावी लागे आणि सर्वात मुख्य म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवक, उच्च स्तरावरील सरकारी अधिकारी वगैरे जनसेवकांनासुद्धा त्यांचे 'समाजकार्य' करण्यासाठी नेहमीच वाहनाची नितांत गरज पडत असे. या कामासाठी बैलगाडी, टांगा वगैरे परंपरागत वाहनांपेक्षा मोटारगाडी सगळ्या दृष्टीने अनेकपटीने जास्त सोयीची होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरात तर मोटारीला दुसरा सोयिस्कर पर्याय नव्हता. अशा सगळ्या कारणांमुळे मोटारगाड्यांची गरज आणि त्यांना असलेली मागणी वेगाने वाढतच होती. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली वगैरे देशांमधल्या मोटार उद्योगाचा प्रचंड वेगाने विकास होत होता आणि जागतिक बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्यात चुरस होती. त्यांच्यासाठी भारत हीसुद्धा एक चांगली बाजारपेठ होती. पण त्या काळात आयातीवर कडक नियंत्रण होते आणि सर्व बाबतीत स्वावलंबी बनणे हे सरकारचे एक स्तुत्य धोरण होते. या सगळ्या मुद्यांचा विचार करता काही खाजगी कंपन्यांना भारतात मोटार गाड्यांची निर्मिती करण्याचे परवाने दिले गेले होते. त्यांचे कारखाने परदेशी कंपन्यांच्या सहकार्याने (कोलॅबोरेशनने) उभे राहिले होते आणि चालवले जात होते. पण त्यांनी वर्षामध्ये किती गाड्या बनवाव्यात आणि ग्राहकांना त्या केवढ्य़ा किंमतीला विकाव्यात हे सरकीर ठरवीत असे.

मला मोटारींबद्दल समजायला लागले त्या वेळी भारतात फक्त तीनच प्रकारच्या मोटारकारचे उत्पादन होत असे. मुंबईतल्या प्रीमियर ऑटोमोबाइल्सची इटालियन बनावटीची फियाट गाडी आटोपशीर तसेच किफायतशीर असल्यामुळे मुंबईत तरी सर्वाधिक लोकप्रिय होती. पन्नास साठ वर्षापूर्वी मुंबईतल्या रस्त्यांवर धावणा-या निम्म्याहून जास्त मोटारी फियाट असायच्या. त्याच्या खालोखाल कोलकात्याच्या हिंदुस्थान मोटर्सच्या अँबॅसॅडर दिसायच्या. ही मोटारगाडी प्रशस्त असायची पण जास्त पेट्रोल खात असल्यामुळे कमी मायलेज देत असे.  पूर्व आणि उत्तर भारतात ती अधिक चालत असेच, तिला सरकारचे पाठबळ असल्यामुळे सरकारी कामासाठी याच गाड्या घेतल्या जात असत. यामुळे पूर्ण भारतात कदाचित अँबॅसे़डरचाच पहिला नंबर लागत असावा. चेन्नै (मद्रास) इथे स्टँडर्ड नावाची कार तयार होत असे. या गाडीला फक्त दोनच दरवाजे असायचे. त्यामधून समोरच्या सीट्सवर बसता येत असे. मागल्या सीटवर बसायचे झाल्यास पुढच्या सीटला आडवे पाडून तिला ओलांडून जाण्याची कसरत करावी लागत असे. ही गाडी मुंबईत तरी फार कमी दिसत असे. फियाट आणि अँबेसेडर गाड्यांचे जेवढे उत्पादन करण्याचा परवाना दिलेला होता त्यांच्या मानाने या गाड्यांना खूप जास्त मागणी असल्यामुळे त्यांचे अॅडव्हान्स बुकिंग करावे लागत असे आणि काही वर्षानंतर नंबर लागल्यावर ती गाडी मिळत असे.

त्या काळात भारतात जेवढ्या मोटार गाड्या तयार केल्या जात त्या सगळ्या हातोहात विकल्या जात असल्यामुळे त्यांच्यात सुधारणा करून किंवा नवनवी मॉडेल्स काढून बाजारात आणण्यात कोणाला फारसा इंटरेस्ट नसावा. प्रीमियर ऑटोमोबाइल्स आणि फियाट यांचे अॅग्रीमेंट संपल्यानंतर त्या गाडीचे नाव पद्मिनी असे ठेवले गेले, अँबॅसॅडर मार्क २ आली आणि स्टँडर्डचे चार दरवाजेवाले (फोर डोअर) मॉडेल आले एवढा बदल झाला असला तरी तो फारसा लक्षणीय़ वाटत नव्हता. या गाड्यांच्या बाबतीत वीस पंचवीस वर्षे बहुधा जैसे थे अशीच परिस्थिती दिसत होती.

या कालावधीत भारताच्या राजकारणात काही स्थित्यंतरे घडली. पं.जवाहरलाल नेहरूंचे निधन झाले. त्यांच्यानंतर आलेल्या पं.लालबहादूर शास्त्री यांची कारकीर्द अल्पावधीत संपली आणि श्रीमती इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्यांनी संस्थानिकांचे तनखे बंद केले, मोठ्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, अशा प्रकारचे निर्णय घेऊन डावीकडे झुकणारी (लेफ्ट ऑफ द सेंटर) धोरणे अंमलात आणली. त्यातून मोटारगाड्यांच्या निर्मितीला चालना मिळेल असे वाटत नव्हते, पण इंदिरा गांधींच्या सत्तेवर येण्याबरोबरच त्यांचे धाकटे चिरंजीव संजय गांधी यांचाही राजकारणाच्या क्षेत्रात उदय झाला आणि त्याने मात्र चित्र पालटले. 

 . . . . . .  . . . . (क्रमशः)

Wednesday, February 05, 2014

पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - भाग ४

पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या चित्रांमध्ये त्यांच्या हातात एक कमंडलू दाखवतात. केंव्हाही तहान लागताच लगेच पिण्यासाठी त्यात पाणी भरून घेतलेले असेल असे वाटत नाही, कारण अशा पौराणिक चित्रांमध्ये इतर कोणत्याच पात्राच्या हातात पाण्याने भरलेला एकादा तांब्या किंवा लोटा दाखवलेला दिसत नाही. या मुनीवर्यांच्या कमंडलूमधले पाणी सुद्धा सहसा साधेसुधे नसायचे. मंत्रोच्चाराने भारलेल्या त्या पाण्यामध्ये अद्भुत सामर्थ्य दडलेले असे. त्यातले दोन चार थेंब शिंपडताच माणसाचा दगड, भस्म किंवा साप होऊन गेला किंवा याच्या उलट झाले अशा कथा पुराणांमध्ये आहेत. अल्लाउद्दीनच्या दिव्यामधला राक्षस (जिन्न), परीकथांमधल्या प-या आणि चेटकिणीसुद्धा क्षणार्धात होत्याचे नव्हते किंवा नव्हत्याचे होते करून टाकत असत. मी अगदी लहान असतांना मला या सगळ्याच सुरस गोष्टी ख-या वाटायच्या. आपल्यालाही एकादी जादूची अंगठी किंवा छडी मिळाली तर आपण कशी आणि कोणकोणती धमाल आणि गम्माडीगंमत करू हे तेंव्हा स्वप्नात दिसत असे. थोडे मोठे झाल्यानंतर काही गोष्टी कळायला लागल्या, त्यात अरेबियन नाइट्समधल्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथा आणि फेअरीटेल्स वगैरे सगळे काल्पनिक असते, प्रत्यक्षात असल्या जादूच्या कांड्या वगैरे कुठेही मिळत नाहीत हे समजले, पण ऋषीमुनींचे तपोबल आणि मंत्रांमधली शक्ती याविरुद्ध मात्र कोणीही काही बोलायला तयार नव्हते, त्यामुळे मंतरलेले पाणी कदाचित खरे असू शकेल असे आणखी काही काळ वाटायचे. आपणही ते मंत्र शिकून घ्यावेत आणि आपल्याला निष्कारण त्रास देणाच्या मुलांच्या किंवा मास्तरांच्या अंगावर मंतरलेल्या पाण्याचे थेंब उडवून त्यांना बेडूक किंवा पोपट बनवून टाकावे असे दुष्ट विचार त्या काळात मनात यायचे.

पण त्यात काही शंकासुद्धा येत. पुराणकालातल्या ऋषीमुनींच्या मंतरलेल्या पाण्यात जर इतके सामर्थ्य असायचे तर ते स्वतःचे रक्षण का करू शकत नव्हते? अरण्यातल्या त्यांच्या आश्रमांवर असुर, दैत्य, दानव वगैरे दुष्ट लोक वारंवार हल्ले करून मारामारी आणि नासधूस करत असत, त्यांच्या तपश्चर्येत आणि यज्ञकार्यात बाधा आणत असत, यामुळे त्रस्त होऊन ते सगळे एकाद्या देवाची किंवा देवीची आराधना करत. मग ते देव किंवा देवी अवतार धारण करून त्या राक्षसांचा संहार करत अशा स्वरूपाच्या अनेक पौराणिक कथा आहेत. रामायणातसुद्धा राक्षसांच्या त्रासामुळे त्रस्त झालेले मुनीवर्य दशरथ राजाकडे जाऊन आपले गा-हाणे त्याला सांगतात, "ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा। यज्ञरक्षणात तोच श्रेष्ठ सर्वथा।।" असे सांगून धनुर्धारी राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन जातात. ते दोघे धनुष्यबाणांनेच दैत्यांचा संहार करून ऋषीमुनींना भयमुक्त करतात अशी कथा आहे. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य या आचार्यांनीसुद्धा महाभारतातल्या युद्धात परंपरागत शस्त्रास्त्रांच्या सहाय्यानेच लढाई केली. त्यातली विशिष्ट अशी संहारक अस्त्रे, अमोघ शक्ती वगैरेंनाही बाणासारखे धनुष्याच्या दोरीला लावूनच सोडले जायचे, पण त्यावेळी तोंडाने एकादा मंत्र पुटपुटला जायचा असे सिनेमा आणि मालिकांमध्ये दाखवतात. कदाचित हे दिग्दर्शकांच्या कल्पनेमधून येत असेल. कुठल्याही युद्धात मंतरलेल्या पाण्याचा शस्त्रासारखा उपयोग केलेला मात्र मी कधी पाहिला किंवा ऐकला नाही.

पौराणिक कथा, ऋषी, मुनी वगैरेंचा संबंध हिंदू धर्मशास्त्रांशी जोडलेला असल्यामुळे मनात आलेल्या अशा शंका विचारायची परवानगी आमच्या लहानपणी नसायची, त्यातूनही कोणी धीर करून त्या विचारल्याच तर असे उत्तर मिळायचे की मंत्रशक्तीचा असा उपयोग करतांना कठोर तपश्चर्येमधून कमावून ठेवलेल्या पुण्याचा क्षय होतो आणि तो भरून काढण्यासाठी पुन्हा तशीच तपश्चर्या करावी लागते, ती करावी लागू नये म्हणून मंत्रशक्तीचा तसा उपयोग अपवादास्पद परिस्थितींमध्येच केला जात असावा. मला तरी हे कधी समर्थनीय वाटले नाही, पण ते महत्वाचे नाही. मंतरलेले पाणी कसलाही चमत्कार घडवू शकते आणि प्राचीन काळातल्या त्या संबंधातल्या गोष्टी काल्पनिक नसून सत्यकथा आहेत यावर त्या काळातल्या अनेक लोकांचा गाढ विश्वास असायचा. असा विश्वास बाळगणारे आणि त्यावरून वाद घालणारे लोक आजसुद्धा भेटतात. गंमत म्हणजे ते लोक आता साउंड एनर्जी, व्हायब्रेशन्स, फ्रिक्वेन्सी, रेझॉनन्स, सिनर्जी असले इंग्रजी शब्द फेकून त्यांचे सांगणे किती शास्त्रीय आहे असे सिद्ध करू पाहतात.

बहुतेक सगळ्या धार्मिक विधींच्या सुरुवातीला पूजेची तयारी करतांना कलश आणि दीप यांची यथासांग पूजा केली जाते. नंतर मुख्य दैवताची पूजा चालली असतांना आयत्या वेळी त्या वस्तू न मिळाल्याने गोंधळ होऊन नये म्हणून कदाचित अशी व्यवस्था करून ठेवली असावी. कलश आणि दिव्याची पूजा करण्यासाठी आधीच त्यांना घासून पुसून चकचकीत केलेले असतेच. त्यांना गंधपुष्प वगैरे वाहून नमस्कार करतात. त्यानंतर मंत्रोच्चाराबरोबर दीपप्रज्वलन केले जाते आणि कलशामध्ये पाणी भरले जाते. त्यावेळचे मंत्र म्हंटल्यावर उत्तरेमधील गंगा, यमुना, सिंधू या नद्यांपासून दक्षिणेतल्या कृष्णाकावेरीपर्यंत भारतातल्या सगळ्या पवित्र नद्यांचे पाणी त्या कलशात आले आहे असे समजले जाऊन त्या पाण्याला एक वेगळे स्टेटस प्राप्त होते. त्यानंतर ते पाणी साधे रहात नाही, ते पिण्यासाठी किंवा हात धुण्यासाठी घेतले जात नाही. त्या पवित्र पाण्याने इतर सगळ्या पूजासामुग्रीवर प्रौक्षण करून त्यांनाही पवित्र किंवा शुद्ध करतात तसेच स्वतः आणि तो विधी पहायला बसलेल्या लोकांच्या अंगावर या पवित्र पाण्याचे एक दोन थेंब पडले की सगळ्यांचे शुद्धीकरण होते. पूजाविधी संपल्यानंतरसुद्धा ते मंतरलेले पाणी मोरीत किंवा बेसिनमध्ये ओतले जात नाही. ते एकाद्या झाडाला, शक्य झाल्यास तुळशीला वाहतात.

प्रत्येक पूजाविधी झाल्यानंतर त्याचे थोडे पुण्य इतरांनाही मिळावे यासाठी तीर्थ आणि प्रसाद वाटला जातो. यातला प्रसाद हा चांगला चविष्ट आणि मधुर असा खाद्यपदार्थच असतो. सर्वांच्या आधी तो देवाला अर्पण करण्यासाठी देवाला त्याचा नैवेद्य दाखवतात. प्रत्यक्षातले देव त्यातला कणभरसुद्धा खात नाहीतच, पण त्याला दिलेला नैवेद्य त्यानेच प्रसाद म्हणून आपल्याला बहाल केला आहे अशी सोयिस्कर समजूत करून घेऊन त्या प्रसादाचे भक्षण केले जाते. पूजाविधीतला हा भाग सर्वांना मनापासून आवडतो. पूजेच्या सुरुवातीला देवाच्या मूर्तीला ताम्हनात ठेवून त्याला पाण्याने न्हाऊ घालतात, दूध, दही, तूप, मध आणि शर्करा यांचे पंचामृत त्या मूर्तीवर वाहून, सुगंधित पाणी ऊष्ण पाणी वगैरेंनी तिला स्नान घालतात, त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात, तिला ताम्हनात ठेवलेले असतांनाच तुळशी, बेलाची पाने, दुर्वा, फुले वगैरेही वाहतात. या सगळ्यांनी युक्त असलेले ताम्हनामधले पाणी पूजा संपल्यानंतर तीर्थ बनते. ते प्राशन करतांना खालील श्लोक म्हंटला जातो.
अकालमृत्यूहरणम् सर्वव्याधीविनाशकम् । ... पादोदकम् तीर्थम् जठरे धारयाम्यहम्।।
ज्या देवतेची पूजा केली असेल तिचे नाव ... या जागी घेतात. शरीरातल्या सर्व व्याधींचा नाश व्हावा आणि अकालमृत्यू टळावा यासाठी त्या देवतेचा पदस्पर्श झालेले हे पाणी मी पोटात घालत आहे असा या श्लोकाचा अर्थ होतो. हा अर्थ समजला असो किंवा नसो, तो पटला असो किंवा नसो, बहुतेक सगळे हिंदू लोक पळीभर तीर्थ पिऊन घेतात. त्यामुळे पुण्य लागेल अशी एक अंधुक कल्पना कदाचित त्यामागे असते. अकालमृत्यू आला होता हेच माहीत नसते, तीर्थप्राशनामुळे तो टळला तरी ते कसे समजणार आणि नसला तर तसे का झाले याचे स्पष्टीकरण द्यायला इतर अनेक कारणे असतातच. अमक्या तमक्या देवाच्या पूजेचे तीर्थ प्यायल्यामुळे असाध्य रोग झालेला एकादा रोगी खडखडीत बरा झाला असे प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला दिसत नाही पण तसे सांगणारे भाविक भेटतात. जे विकार आपल्या आपणच किंवा इतर औषधोपचाराने ठीक होण्यासारखे असतात त्यांच्या बाबतीतसुद्धा रुग्णाच्या मनोधैर्याचा अनेक वेळा चांगला उपयोग होतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. किंबहुना त्यासाठी आंतरिक शक्तीची आवश्यकता असते. निराशाग्रस्त झालेला एकादा रोगी "हे तीर्थ घेतलेस ना? आता कसली काळजी करू नकोस." एवढ्या बोलण्यानेच बरा होण्याला सुरुवात होते. कशाने का होईना, पण त्याला बरे वाटणे महत्वाचे असते ना!  
 
भारतातल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांमध्ये एक परदेशातले ख्रिश्चन कुटुंब होते. सुरुवातीला धार्मिक पूजा हा त्या कार्यक्रमाचाच भाग होता. पूजा आरती वगैरे संपल्यावर सर्वांना तीर्थप्रसाद वाटला गेला. त्या परदेशी मंडळींनी प्रसाद तर आवडीने घेऊन खाल्ला, पण तीर्थाकडे पाहून "हे काय आहे?" असे विचारले. ते काय आहे हे सांगितल्यानंतर ते 'पवित्र पाणी' पिण्यायोग्य आहे हे सुद्धा त्यांना पटवून देणे अवघड होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात जातीयतेचे महाभयंकर प्रस्थ असायचे. त्यात खाण्यापिण्यावर खूप कडक बंधने असायची. धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे वगैरे नैसर्गिक पदार्थ कोणाच्या शेतातून आले आहेत याचा विचार कोणी करत नसत, पण त्यांना पाण्यात शिजवून केलेला भात आणि आमटी, भाजी किंवा पाण्यात पीठ भिजवून केलेल्या भाक-या आणि पोळ्या मात्र कोणत्या जातीच्या माणसांच्या घरात केल्या आहेत हे पाहूनच त्या खाण्याबद्दल ठरवले जात असे. गावातल्या कोणत्या पाणवठ्यावर कुणी पाणी भरायचे यावर कडक बंधने असत. परधर्माच्या, परजातीच्या लोकांनी, विशेषतः तथाकथित अस्पृश्यांनी भरलेले पाणी इतर लोक पीत नसत. गोव्यामध्ये तर गावातल्या विहिरीत ख्रिश्चनांनी पाव टाकल्यामुळे ते सगळे पाणी अपवित्र झाले आणि ते पाणी पिऊन सगळे गाव बाटले अशा घटना घडल्या होत्या म्हणतात. निसर्गाने सर्वांसाठी दिलेल्या पाण्यावर माणसांनी स्वामित्व गाजवून त्याच्या वापरावरून कलह माजवला जात होता. आज शहरांमधली या बाबतीतली परिस्थिती बदलली असली तरी देशाच्या काही भागात अजूनही जुन्या चालीरीतींचे अवशेष शिल्लक राहिले आहेत.

मी शाळेत शिकत असतांनाची एक आठवण आहे. आम्ही ज्या मोठ्या गावात रहात होतो तिथून वीस किलोमीटर अंतरावर माझ्या आजोबांनी तयार केलेली शेती आणि बांधलेले घर होते. ते एका वेगळ्या जातीच्या स्थानिक कुटुंबाला भाड्याने दिले होते. वीस किलोमीटरच्या अंतरामध्ये एक नदी नावेतून पार करावी लागत असे आणि वाहतुकीची साधने चांगली नव्हती, त्यामुळे तिकडे जाऊन परत यायला दोन दिवस लागत. खेडेगावामध्ये हॉटेल नव्हतेच म्हणून दोन दिवस टिकतील आणि पुरतील असे खाद्यपदार्थ माझ्या आईने बांधून दिले होते. तिथे गेल्यानंतर मी आपला डबा उघडून खाऊ लागलो तेंव्हा आमच्या भाडेकरूने मला समानतेवर लेक्चर दिले आणि त्याच्या बायकोने केलेले गरम जेवण खायला बोलावले. माझ्या मनात भेदभाव नव्हताच, मी आनंदाने त्यांच्या पंगतीला जाऊन बसलो. थोड्या वेळाने आमच्या शेतावर काम करणारा शेतकरी मला भेटायला आला. आमच्या भाडेकरूने आल्या आल्या त्याची जात विचारली आणि त्याला दरवाजाबाहेरच बसायला सांगितले. त्याला खापराच्या मडक्यात पाणी प्यायला दिले, त्याला आपल्या घरातल्या भांड्यालासुद्धा स्पर्श करू दिला नाही. थोड्याच वेळापूर्वी मला दिलेले भाषण तो विसरून गेला होता किंवा कदाचित त्याचे इतर जातभाई काय म्हणतील याची त्याला काळजी वाटत असावी.    

थोडक्यात सांगायचे झाल्यास पाणी म्हणजे पाणी म्हणजे नुसतंच पाणी नसतं, ते तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं. त्यात खारट, गोड, कठीण, जड, हलके, शुद्ध, अशुद्ध वगैरे प्रकार असतातच, पवित्र, अपवित्र वगैरेही असतात. काही शास्त्रीय आधारांवर असतात, काही मानण्या, न मानण्यावर असतात.


.  . . . . . .  . . . . . . . . (समाप्त)

Tuesday, February 04, 2014

पाणी, जड पाणी आणि मंतरलेले पाणी - भाग ३

अप्सरा ही भारतातली पहिली अणुभट्टी सुरू झाली तेंव्हा मी शाळेत शिकत होतो. या रिसर्च रिअॅक्टरचे नामकरण खुद्द स्व.पं.जवाहरलाल नेहरू यांनी त्याच्या उद्घाटनाच्या वेळी केले होते. या घटनेला त्या काळात चांगली प्रसिद्धी मिळाली होती. ही एक आगळ्याच स्वरूपाची भट्टी आहे. यात मध्यम आकाराच्या जलतरणतलावासारख्या (स्विमिंग पूल) एका टाकीमध्ये अत्यंत स्वच्छ आणि शुद्ध पाणी भरून ठेवलेले आहे आणि त्या पाण्याच्या तळाशी ठेवलेल्या समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) या इंधनामधून ऊष्णता बाहेर पडते. जळत्या लाकडावर पाणी टाकले की ती आग विझते, पण इथे पाण्यात बुडवून ठेवलेले इंधन त्याच्या अस्तित्वामुळे तापते. आजूबाजूचे पाणी ती ऊष्णता आणि त्यासोबत निघालेले रेडिएशन शोषून घेते आणि त्यामुळे तलावाबाहेरची किंवा त्याच्या काठावरची जागा माणसांना काम करण्यासाठी सुरक्षित राहते. पाण्याच्या तळाशी भट्टी असणे हा प्रकार विसंगत वाटत असला तरी आश्चर्यकारक नाही. माझ्या लहानपणी घराच्या भिंतींना लावायचा चुना घरीच कालवत असत. चुनाभट्टीमधून भाजून आणलेली चुनखडी डब्यातल्या पाण्यात टाकताच त्यातून स्स्स्स असा आवाज येत असे आणि गरम वाफा निघत असत. बीकरमधल्या थंडगार पाण्यामध्ये सोडियम धातूचा लहानसा खडा टाकताच तो उकळत्या तेलात टाकलेल्या भज्यासारखा कसा तडफडतो हे शाळेतल्या प्रयोगशाळेत एकदा दाखवले होते. समुद्राच्या पोटात एक वडवानल नावाचा अग्नि असतो असे वाचले होते. यामुळे अग्नि आणि पाणी यांचे नेहमीच हाडवैर नसते याचा थोडा अंदाज होता.

भारतातली दुसरी प्रायोगिक अणुभट्टी (रिसर्च रिअॅक्टर) कॅनडाच्या सहकार्याने उभारली गेली. त्यात जड पाणी हे मंदलक (मॉडरेटर) आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांचे काँबिनेशन आहे. मी जेंव्हा या रिअॅक्टरची माहिती वर्तमानपत्रांमध्ये वाचली तेंव्हा मला या गोष्टीचे थोडेसे नवल वाटले होते. जड पाणी (हार्ड वॉटर) पचायला जड, त्यात डाळी शिजत नाहीत यामुळे ते स्वयंपाकासाठी बाद, त्यात साबणाचा फेसच होत नसल्यामुळे कपडे धुवून स्वच्छ निघत नाहीत, त्यात आंघोळ केली तर शरीराला खाज सुटायची शक्यता, झाडांना दिले तर त्यांचीही नीट वाढ होत नाही वगैरे त्याच्यासंबंधी फक्त तक्रारीच ऐकल्या आणि वाचल्या होत्या. असे हे सगळ्याच दृष्टीने दुर्गुणी आणि कुचकामाचे वाटणारे पाणी रिअॅक्टरसाठी कशामुळे उपयोगी पडत असेल हे समजत नव्हते. "परमेश्वराने निर्माण केलेली कुठलीही वस्तू पूर्णपणे निरुपयोगी नसते, प्रत्येक वस्तूचा किंवा जीवाचा काही ना काही उपयोग असतोच." असे तात्पर्य असलेल्या काही बोधकथा वाचल्या होत्या त्यांची आठवण झाली. भारतात उभारल्या गेलेल्या त्या रिअॅक्टरसाठी लागणारे जड पाणी त्या काळात कॅनडामधून आयात केले होते ही आणखी एक बुचकळ्यात टाकणारी बाब होती. एवढ्या मोठ्या भारत देशात दोन चार टँकर जड पाणी मिळाले नसते का? ते कॅनडामधून आणण्याची काय गरज होती? असे त्या वेळी वाटले होते.

पुढे अणुशक्तीखात्यात नोकरीला लागल्यानंतर 'जड पाणी' (हेवी वॉटर) या शब्दाचा खरा अर्थ समजला. हे जड पाणी कॅनडातल्या कुठल्याही विहिरीत किंवा तळ्यातदेखील मिळत नाही. जगात कुठेच जड पाण्याचा वेगळा साठा उपलब्ध नाही. पण हे खास पाणी साध्या पाण्यामध्येच सूक्ष्म प्रमाणात अस्तित्वात असते. हैड्रोजन या मूलद्रव्याचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून पाणी तयार होते. पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही समुद्र, नदी, तलाव किंवा विहिरीमधल्या पाण्य़ात हेच अणू आणि याच प्रमाणात असतात, त्यामुळे इथून तिथून सगळे पाणी एकसारखे असते. आता चंद्रावर किंवा मंगळावर सापडलेल्या पाण्याचे पृथक्करण केले तर त्यातही हेच दिसेल. किंबहुना त्या ठिकाणी हे अणू आढळले म्हणून ''तिथे पाणी सापडले'' असे सांगितले जाते. पहायला जाता कोठल्याही मूलद्रव्याचे सगळे अणू एकसारखेच असतात, त्या प्रमाणे हैड्रोजनचेसुद्धा असतात, पण दर ६४२० हैड्रोजन अणूंमधला एक अणू जाड्या असतो, त्याला 'ड्युटेरियम' म्हणतात. मूलद्रव्यांच्या अशा भिन्न रूपांना आयसोटोप म्हणतात. हैड्रोजनच्या इतर अणूंमध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्या या जुळ्या भावंडाकडे प्रोटॉनच्या सोबतीला एक न्यूट्रॉनसुद्धा असतो. यामुळे त्याचे वजन इतर अणूंच्या मानाने दुप्पट असते. अशा ड्युटेरियमचे दोन अणू आणि ऑक्सीजनचा एक अणू यांच्या संयोगातून जड पाणी तयार होते. ते सगळीकडे मिळणा-या साध्या पाण्यात सूक्ष्म प्रमाणात असते. आपल्या घरातल्या बादलीभर पाण्यातले काही थेंब जड पाण्याचे असतात, पण ते वेगळे नसतात, सगळीकडे पसरलेले असतात. बादलीतले एक थेंबभर पाणी काढून घेतले तर त्यातलासुद्धा सूक्ष्म भाग जड पाण्याचा असतो. 'जड पाण्या'चा हा अर्थ 'हार्ड वॉटर'पेक्षा खूप वेगळा आहे. हे जड पाणी साध्या पाण्यामधून महत्प्रयासाने बाहेर काढावे लागते, यामुळे मोठ्या कारखान्यामध्येच ते तयार होते. आता असे काही कारखाने भारतात उभारले आहेत आणि या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे.

जड पाणी आणि साधे (हलके) पाणी यांचे बहुतेक सगळे गुणधर्म अगदी एकसारखे आहेत आणि हे दोन्ही द्रव एकमेकांमध्ये अनिर्बंधपणे विरघळतात, त्यामुळे त्यांना वेगवेगळे करणे फार कठीण असते. सगळेच आयसोटोप्स रासायनिक क्रियांच्या बाबतीत अगदी एकच असतात. या दोन प्रकारच्या पाण्यांच्या कोणत्याही प्रकारच्या रासायनिक क्रियांमध्ये देखील काहीच फरक नसल्यामुळे त्यांचा उपयोग करून त्यांना वेगळे करणे अशक्य असते. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत सुमारे साडेदहा टक्के भारी किंवा जड असते, पण ते साध्या पाण्यात संपूर्णपणे विरघळलेले असल्यामुळे गुरुत्वाकर्षणाने तळाशी जाऊन बसत नाही. त्याचा उत्कलन बिंदू (बॉइलिंग पॉइंट) फक्त एका अंशाने जास्त असतो. या सूक्ष्म फरकाचा उपयोग करून त्यांचे पार्शल डिस्टिलेशन करतात. त्याच्या प्रत्येक स्टेजमध्ये जड पाण्याचे प्रमाण किंचित वाढते. याची अनेक वेळा पुनरावृत्ती करून ते वाढवत नेले जाते. ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया (कॉम्पेक्स प्रोसेस) आहे आणि ती खर्चिकही आहेच, शिवाय तिच्याबद्दल प्रचंड गुप्तता (कॉन्फिडेन्शियालिटी) बाळगली जाते.

जड पाण्याचा एकच गुणधर्म साध्या (हलक्या) पाण्यापेक्षा खूप वेगळा आहे. साधे पाणी न्यूट्रॉन्सना जास्त प्रमाणात नष्ट (कॅप्चर) करते, जड पाणी हे काम जवळ जवळ शून्याइतकेच करते. यामुळे रिअॅक्टरमधल्या न्यूक्लियर रिअॅक्सन्सची साखळी टिकवून ठेवण्यासाठी साध्या पाण्यापेक्षा जड पाणी अधिक उपयुक्त ठरते. इतर अनेक प्रयोग करून झाल्यानंतर आज जे रिअॅक्टर्स बांधले जात आहेत त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. जगातील बहुसंख्य अणूभट्ट्यांमध्ये समृद्ध युरेनियम (एन्रिच्ड युरेनियम) आणि हलके पाणी (लाइट वॉटर) वापरतात, तर भारत आणि कॅनडा या देशांमध्ये जड पाणी आणि नैसर्गिक युरेनियम इंधन यांचा उपयोग केला जातो. नैसर्गिक युरेनियम आणि नैसर्गिक पाणी यांच्या उपयोगामधून चेन रिअॅक्शन करता येत नाही. निसर्गात मिळणा-या युरेनियमचा त्या एन्रिच न करता उपयोग करायचा असल्यास जड पाणीच आवश्यक असते.

.  . . . . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)