Wednesday, August 31, 2022

पौराणिक गणपती

 



आज गणेशचतुर्थी आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा मी या गणेशोत्सवाच्या काळात श्रीगणेशाला वंदन करून त्याच्या कोटी कोटी रूपांमधल्या मला समजलेल्या काही रूपांविषयी दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.नऊ वर्षांपूर्वी मी पुराणातल्या गणपतींबद्दल एक लेख लिहिला होता तो खाली दिला आहे. त्यानंतरच्या काळात मला श्रीगणपतीअथर्वशीर्ष आणि गणेशपुराण याविषयी बरीच माहिती माझे बंधू डॉ.धनंजय घारे यांच्याकडून मिळाली. त्याच्या आधारे हा लेख लिहायचे ठरवले आहे. त्यात रोज थोडी भर घालणार आहे.

दर वर्षी गणेशचतुर्थीला आपण हत्तीचे तोंड (गजानन) आणि विशाल पोट (लंबोदर) असलेल्या गणपतीची स्थापना करून त्याचा उत्सव करतो. गणपतीचे हे रूपच जास्त प्रचलित आहे आणि जगभरातल्या असंख्य मंदिरांमध्ये त्याच्या मूर्ती दिसतात. तो शंकरपार्वतींचा धाकटा मुलगा अशी त्याची एक मर्यादित ओळख आहे. पण अथर्वशीर्षाच्या सुरुवातीलाच असे म्हंटले आहे की तूच (या विश्वाचा) एकमेव कर्ता, धर्ता आणि हर्ता आहेस. म्हणजे गणपतीच या जगातले सर्व काही निर्माण करतो, चालवतो आणि नष्ट करतो. पुढील भागात “सर्वं जगदिदं त्वत्तो जायते । सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।” असे म्हणून ही गोष्ट अधिक स्पष्ट केली आहे. या वाक्यांचा अर्थ सारे जग तुझ्यातूनच जन्म घेते, तुझ्यामुळेच उभे राहते (चालते) आणि अखेर तुझ्यातच विलीन होते असा होतो. पुढे जाऊन तर त्याला तूच ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, अग्नि, वायू, सूर्य, चंद्र आहेस असेही म्हंटले आहे. जगामधील सर्व गोष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यात विलीन होतात हे आपण पाहतोच. पण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते म्हणजे स्वतः गणपतीच आहे असे “त्वं भूमिरापोऽनलोऽनिलोनभः ।” या वाक्यात म्हंटले आहे. म्हणजे निर्माण करणाराही तूच आहेस आणि तू जे निर्माण केले आहेस तेसुद्धा तूच आहेस. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात त्या सर्वांमध्ये गणेश आहे. आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या जागी तर तो आहेच, त्याच्याही पलीकडील अज्ञात अशा प्रदेशातसुध्दा तो आहे असे  “त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः । या ओळींमध्ये म्हंटले आहे. तो सत्व, रज, तमोगुणांच्या पार आहे, तसेच भूत भविष्य वर्तनमानकाळांच्या पलीकडे अनादी अनंत असा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर त्याची व्याप्ती आपल्या कल्पनाशक्तीच्या खूप पलीकडेपर्यंत पसरलेली आहे.  परमेश्वराबद्दल असलेल्या सगळ्या कल्पना म्हणजे गणपतीच आहे. गणेशपुराणात तर असे स्पष्टच सांगितले आहे की गणेशाने अनेक अवतार घेतले,  शिवपुत्र, पार्वतीनंदन, गजानन, लंबोदर असा आपल्या ओळखीतला गणपती हा त्यातला एक अवतार आहे.   




या विश्वातल्या चराचरामधील अणुरेणूमध्ये परमेश्वर भरून राहिला आहे अशी एक सर्वमान्य व्याख्या आजकाल रूढ होत आहे. पण अशा अनादि अनंत आणि निर्गुण निराकार रूपाची पूजा करता येत नाही म्हणून तेवढ्यासाठी निरनिराळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोहक अशा रूपांच्या मूर्ती केल्या जातात असेही सांगितले जाते. पण पुराणांमधल्या गोष्टींमध्ये त्या त्या देवांचेच महत्व सांगितले जाते. वैष्णव लोक ज्याला सर्वोच्च धार्मिक ग्रंथ मानतात त्या भागवत पुराणानुसार श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू हाच अनादि असा देव आहे. जेंव्हा काहीही नव्हते तेंव्हाही तो होता आणि त्याच्या इच्छेने त्याने आधी ब्रह्मदेव आणि माया निर्माण केली. त्या मायेमधून पृथ्वी, आप (जल), तेज, वायू आणि आकाश (पोकळी) ही पंचमहाभूते तयार झाली तयार झाली आणि या कच्च्या मालामधून ब्रह्मदेवाने हे सगळे ब्रह्मांड निर्माण केले अशी या विश्वाची उत्पत्ती सांगितली जाते. त्यात गणेशाचा उल्लेख येत नाही. पण गणेशपुराणात या सगळ्या विश्वाची निर्मिती श्रीगणेशानेच केली आहे आणि ब्रह्मा, विष्णू, शिव ही गणेशाची रूपे आहेत असे सांगितले आहे.   आपल्या डोळ्यांना दिसते, कानांनी ऐकायला येते, किंबहुना पाच ज्ञानेंद्रियांमधून जेवढे समजते ते सगळे बह्म आहे आणि त्याच्या पलीकडे असलेले जे ज्ञानी लोकांच्या बुद्धीला किंवा मनाला समजते ते आत्मा, परमात्मा वगैरे परब्रह्म असे सांगितले जाते. पण या गोष्टी सामान्य लोकांना समजत नाहीत, फक्त ऋषिमुनी आणि  'ज्ञानी' संत महात्म्यांना त्यांची ओळख पटते असे म्हणतात.

गणेशपुराणाची कथा अशी आहे की व्यासमहर्षींनी अठरा पुराणे आणि महाभारत लिहिल्यानंतरही त्यांचे मन अस्वस्थ होते. आता काय करावे हे विचारण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितले की हे सगळे मी केले असे समजण्यामुळे तुला अहंकार आला आहे. गणेशाला शरण जाऊन त्याने हे सगळे तुझ्याकडून करवून घेतले असे मान्य कर म्हणजे तुला शांति मिळेल. व्यासांचे मन शांत झाल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना गणेशपुराण सांगितले. त्यात अनेक कथा आहेत.

पहिल्या कथेत असे सांगितले आहे की मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य ब्रह्मदेवाला त्याचे काम करू देत नव्हते आणि मारायला आले म्हणून तो मदतीसाठी भगवान विष्णूकडे गेला, पण हे दैत्य त्या दोघांनाही आवरत नव्हते. मग त्यांनी श्रीगणेशाची प्रार्थना केली. त्यावर प्रसन्न होऊन गणेशाने त्यांना एक युक्ती सांगितली. श्रीविष्णूने त्या दैत्यांची खूप स्तुति करून त्यांना खूष केले आणि मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुम्हाला हवे ते वरदान मागा असे सांगितले. त्या उन्मत्त राक्षसांनी सांगितले की तू काय आम्हाला वर देणार आहेस, आम्हीच तुला वर देऊ, तुला काय पाहिजे ते माग. त्यावर विष्णूने हळूच असा वर मागितला की तुमचा मृत्यू माझ्या हातून होऊ दे. त्या मूर्ख दैत्यांनी तो देऊन टाकला आणि ते विष्णूच्या सुदर्शन चक्राने मारले गेले. भगवान विष्णूने या प्रसंगी सिद्धटेक येथे गणपतीचे मंदिर बांधले असे म्हणतात.  दुसऱ्या एका पुराणात असे सांगितले आहे की त्या वेळी आदिशक्तीने विष्णूला मदत केली .

जसे ध्रुव आणि प्रल्हाद हे विष्णूचे परमभक्त होते तसाच बल्लाळ नावाचा एक मुलगा गणेशाचा परमभक्त होता. तो रोज आपल्या मित्रांना घेऊन गावाबाहेर रानात जात असे आणि एका झाडाखाली दगडधोंडे गोळा करून त्यातून गणपतीची पूजा करत असे. त्यांना घरी परतायला उशीर होत असल्यामुळे त्या मित्रांच्या वडिलांनी बल्लाळाच्या बाबांकडे म्हणजे कल्याणाकडे तक्रार केली. कल्याण रागारागात रानात आला, त्याने सगळे दगडधोंडे विस्कटून टाकले, मुलाला झाडाला बांधून चांगला चोप दिला. बल्लाळाने आपल्या बापाला शाप दिला त्यामुळे तो आंधळा, लुळापांगळा होऊन गेला. सगळी मुले घाबरून पळून गेली आणि बल्लाळ रानात एकटाच राहिला होता. त्याने गणपतीचा आर्त मनाने धावा केला. मग गणपती एका ब्राह्मणाच्या रूपाने तिथे आला आणि त्यांना बल्लाळाला सोडवले. त्याने नंतर त्या ठिकाणी बांधलेल्या देवळातल्या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात.

गृत्समद नावाच्या ऋषीला आलेल्या शिंकेमधून एक बालक जन्माला आले. त्या ऋषीने त्या बालकाला गणपतीची आराधना करायला शिकवले. मग त्याने अरण्यात जाऊन खूप वर्षे तपश्चर्या केल्यावर त्याला गणेश प्रसन्न झाला आणि त्याने अनेक वरदान केले. त्याचे मरणे जवळजवळ अशक्यप्राय झाले. त्यामधून तो जवळजवळ अमर झाला. त्याला गणेशाने तीन सुंदर शहरे दिली होती ती सारखी आभाळात फिरत असत. त्यांचा अधिपति म्हणून त्याचे नाव त्रिपुरासुर असे पडले. फारच शक्तीशाली झाल्यामुळे त्याला खूप माज आला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ असे त्रैलोक्य जिंकून घेतले. सगळे देव  स्वर्ग सोडून पळून भगवान शंकराकडे कैलासावर गेले आणि यातून सोडवण्याची विनंति करायला लागले, पण तो स्वतच भयभीत होऊन अरण्यात लपून आणि गणेशाचे चिंतन करत बसला. त्यामुळे पार्वती आपल्या माहेरी हिमालयाकडे गेली. मग हिमालयाने तिला विनायकाचे व्रत आणि शोडशोपचार पूजाविधि सांगितला. त्याप्रमाणे तिने भक्तीभावपूर्ण व्रताचे आचरण केल्यानंतर विनायक तिला प्रसन्न झाला आणि त्याने शंकराला सहाय्य करायचे आश्वासन दिले. गणेश या गणिताच्या तज्ञाने शंकराला एक असा मुहूर्त काढून दिला ज्या वेळी त्रिपुरासुराच्या तीन्ही नगरी एका सरळ रेषेत येतील. नेमक्या त्या वेळी शंकराने आपल्या महान शिवधनुष्याला एक दिव्य बाण लावला आणि तो सोडून एका बाणात तीन्ही नगरे जाळून भस्म करून टाकली. त्याबरोबर त्रिपुरासुराचाही अंत झाला. गणपतीने केलेल्या या मदतीसाठी शंकराने रांजणगाव इथे महागणपतीचे देऊळ बांधले.

कृतयुगामध्ये देवांतक आणि नरांतक नावाचे भाऊभाऊ  असलेले दोन भयानक राक्षस जन्माला आले. त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून त्याच्याकडून असे वरदान मागून घेतले की त्यांना कुठल्याही शस्त्राने मृत्यू येणार नाही. त्यामुळे ते खूपच बलिष्ठ झाले आणि त्यांनी तीन्ही लोक जिंकून घेतले. त्यांना मारण्यासाठी गणेशाने कश्यप ऋषी आणि त्याची पत्नी अदिति यांचा मुलगा  महोत्कट या नावाने अवतार घेतला. सिंह या वाहनावर बसून तो त्या दैत्यांवर चालून गेला. महाप्रचंड आकाराचे रूप घेतले आणि नरांतकाला अंगठ्याखाली चिरडून मारून टाकले. देवांतकाबरोबर झालेल्या झटापटीत देवांतकाने गजाननाचा एक दात तोडला. तेव्हा त्या दातानेच प्रहार करून त्याने देवांतकाला छिन्नभिन्न करून मारून टाकले. त्यानंतर गजाननाला एकदंत हे नाव मिळाले.

त्रेतायुगामध्ये राजा चक्रपाणीच्या राणीला सूर्याच्या कृपेने त्याच्यासारखा तेजस्वी मुलगा झाला, त्याचे लहानपणी त्याला समुद्राने सांभाळले म्हणून त्याचे नाव सिंधू असे पडले. सूर्याने त्याच्या पोटात एक अमृताची कुपी लपवून ठेवली होती. त्यामुळे त्याला कुणीही मारले तरी तो लगेच जीवंत होत होता. त्यानेही तीन्ही लोक जिंकून घेतले आणि आपला राक्षसीपणा सुरू केला. तेंव्हा गणेशाने गजानन अवतार घेतला आणि मोर या वाहनावर बसून सिंधू राक्षसावर हल्ला केला. हातातल्या परशूने आधी त्याच्या पोटातली अमृताची कुपी फोडून टाकली आणि नंतर त्याला ठार मारले. पुण्याजवळ मोरगाव येथे मयूरेश्वर या नावाने त्याचे मंदिर आहे.

द्वापार युगात ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईमधून सिंधूर नावाचा लालभडक रंगाचा मुलगा निर्माण झाला, पण तो राक्षसी वृत्तीचा निघाला. तो ज्याला मिठी मारेल त्याला करकचून आवळून मारून टाकेल असे वरदान त्याला मिळाले होते, त्याचा उपयोग करून तोही सर्वांना त्रास द्यायला लागला. इकडे वरेण्य नावाचा राजा आणि त्याची राणी पुष्पावती यांनी गणेशाची आराधना करून त्याला आपला पुत्र होऊ दे असा वर मागितला होता. शंकर आणि पार्वती यांना झालेला वक्रतुंड, गजानन आणि लंबोदर असा विचित्र वाटणारा मुलगा खुद्द विनायकाच्याच सांगण्यावरून त्यांनी नंदीकडून त्या राणीच्या जवळ नेऊन सोडला. तीही त्याला पाहून घाबरली आणि असले 'अपशकुनी' बाळ नको म्हणून तिने त्याला रानात नेऊन सोडले. मग पराशर मुनींनी त्याचा सांभाळ करून त्याला वाढवले. उंदीर होण्याचा शाप मिळालेला एक गंधर्व त्या ऋषीच्या आश्रमात येऊन लुडबुड करत होता. गजाननाचे त्याला वठणीवर आणून आपले वाहन बनवले आणि त्यावर आरूढ होऊन तो सिंधुरासुरावर चालून गेला. त्याने आपला आकार इतका विराट वाढवला की सिंधुरासुर त्याला मिठीच मारू शकत नव्हता. मग गजाननानेच त्याला चिरडून टाकले. 

अशा प्रकारच्या अनेक सुरस कथा गणेशपुराणात आहेत. त्या सगळ्या रूपककथा असून त्यात काही गहन अर्थ असावा, पण तो सामान्य लोकांना उलगडणे कठीण आहे.





पुराणातला गणपती


ॐ गणानाम् त्वाम् गणपतीम् हवामहे कवीम् कवीनाम् उपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजो ब्राह्मणाः ब्रह्मणस्पदआनश्रृण्वन्नीतीभीःसीदसादनम्।  साधारणपणे असा एक मंत्र गणपतीच्या आरतीनंतर (मंत्रपुष्पात) म्हणतात. ऋग्वेदामधील या मंत्रात गणपतीची आराधना केली आहे. गणपतीअथर्वशीर्ष हे एक उपनिषद मानले जाते. अनेक पुराणांमध्ये गणपतीसंबंधीची आख्याने आहेत तसेच त्याची स्तोत्रे आहेत. मत्स्य, वायु, भागवत, विष्णू, गरुड, ब्रह्म, नारद, वामन, कुर्म, पद्म, स्कंद, मार्कंडय, शिव, अग्नी, वराह, ब्रम्हांड. ब्रह्मावैवस्वत आणि भविष्य ही अठरा मुख्य पुराणे मानली जातात. त्यामधील मत्स्यपुराण, स्कन्दपुराण, शिवपुराण, वराहपुराण, वामनपुराण, पद्मपुराण या प्रमुख पुराणग्रंथांमध्ये तसेच बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, लिंगपुराण, ब्रह्मांड पुराण, देवीपुराण या गौण पुराणांत आणि महाभारतात गणेशाचे उल्लेख आहेत, शिवाय एक स्वतंत्र गणेश पुराणसुध्दा आहे.

शिवपुराण, स्कंदपुराण, बृहद्धर्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, पद्मपुराण, लिंगपुराण, वराहपुराण, देवीपुराण, मत्स्यपुराण आणि वामनपुराण या पुराणांमध्ये गणेशजन्माची निरनिराळी आख्याने आहेत. त्यातील बहुतेक कथांमध्ये साधारणपणे एकच गोष्ट आहे. त्यानुसार पार्वतीने शंकराच्या अनुपस्थितीत गणपतीची निर्मिती केली, शंकराला ते ठाऊक नव्हते. तो परत आल्यावर गणपतीने त्याला अडवले. त्यामुळे क्रोधित होऊन शंकराने त्या (उध्दट वाटणाऱ्या) मुलाचे शिर उडवले, ते पाहून पार्वतीने हाहाःकार केला. त्यानंतर शंकराने त्याच्या शरीराला हत्तीचे मुख जोडून जीवंत केले आणि त्याला आपल्या गणांचा प्रमुख बनवले. प्रत्येक पुराणांमधील साधारणपणे अशा अर्थाच्या कथात त्यातील तपशीलात थोडा थोडा फरक फरक आहे. काही पुराणांमध्ये मात्र निराळ्याच गोष्टी आहेत. एकामध्ये गणपतीला जन्मतः मस्तक नव्हते म्हणून त्याला हत्तीचे तोंड लावून दिले अशी कथा आहे, आणखी एकात शंकर आणि पार्वती या दोघांच्या संयोगातून गणपतीचा जन्म झाला आणि एका कथेत तर एकट्या शंकरानेच गणपतीची उत्पत्ती केली असे आहे. ब्रह्मवैवर्त पुराण आणि शिवपुराणात गणपतीच्यासंबंधीच्या इतर काही कथा आहेत. यातली कोणतीच पुराणे मी वाचलेली नाहीत आणि संस्कृतमध्ये असल्यामुळे मला ती वाचून समजणारही नाहीत. वरील माहिती मी विकीपीडियावरून घेतली आहे.

महर्षी व्यासांनी महाभारताची रचना केली तेंव्हा त्यांच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले असे मी लहानपणीच ऐकले होते. महर्षी व्यासांनी एक एक ओळ किंवा श्लोक सांगायचा आणि गणपतीने ते तत्परतेने लिहून घ्यायचे असे त्यांचे आपसात ठरले. पण हे प्रचंड खंडकाव्य रचता रचता सांगतांना व्यासांनी मध्येच कुठेही थांबायचे नाही अशी अट गणेशाने घातली होती. व्यासमहर्षी थांबले आणि गणेशांनी लेखणी खाली ठेवली की आपले काम तिथेच थांबवून ते लगेच अंतर्धान होणार होते. पण हजारो श्लोक रचून ते सांगतांना व्यासमहर्षींनी कोठेही पळभर विश्रांती घेतली नाही किेवा ते अडखळले नाहीत आणि गणपती ते श्लोक लिहीत राहिले. अशा रीतीने संपूर्ण महाभारताचे एकटाकी लेखन झाले. अशी आख्यायिका आहे. (पण महाभारत हा ग्रंथ निरनिराळ्या काळात होऊन गेलेल्या आणि व्यास हे टोपणनाव धारण केलेल्या अनेक विद्वानांच्या लेखनातून निर्माण झाला असावा असे काही इतिहाससंशोधकांचे सांगणे आहे. शिवाय त्या काळात कुठल्या कागदावर किंवा भूर्जपत्रांवर हे लेखन कसल्या शाईने लिहिले जात होते आणि त्यांचा अखंड पुरवठा कुठून होत होता? अशासारखे प्रश्न पुराणांच्या बाबतीत विचारायचे नसतात.)

नारदमुनींनी रचलेले संकट नाशन गणेश स्तोत्र नारद पुराणात आहे. श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र, योगशांतिप्रद स्तोत्र, सिद्धिविनायक स्तोत्र, परब्रह्म रूप कर स्तोत्र आणि श्रीगणेश गीतासार स्तोत्र ही स्तोत्रे मुद्गल पुराणात आहेत. ढुंढि स्वरूप वर्णन नावाचे स्तोत्र गणेश पुराणात आहे. ही स्तोत्रेसुध्दा माझ्या आप्तांकडून मला मिळाली. संकटनाशन स्तोत्र आणि द्वादशनामस्तोत्रांमध्ये गणेशाची बारा नावे देऊन ती नावे रोज वाचली किंवा ऐकली तर सर्व विघ्ने दूर होतील आणि मनातल्या इच्छांची पूर्ती होईल असे आश्वासन दिले आहे. या दोन श्लोकात दिलेल्या प्रत्येकी बारा नावांमधील साम्यस्थळे आणि त्यांच्यामधील फरकांबद्दल मी आधी एका लेखात लिहिले आहे. योगशांतिप्रद स्तोत्रात आधी इतर देवांनी गणेशाचे वर्णन आणि स्तुती केली आहे आणि अखेरच्या श्लोकात श्रीगणेशाने प्रसन्न होऊन हे स्तोत्र वाचणाऱ्या सर्वांना वरदान दिले आहे, श्री सिद्धिविनायक स्तोत्रात विघ्नविनाशक विनायकाची प्रार्थना केली आहे. परब्रह्म रूप गणेशस्तोत्रातील श्लोकांच्या पहिल्या तीन चरणांमध्ये गणेशाच्या विराट विश्वरूपाचे वर्णन करून चौथ्या ओळीत परब्रह्म रूपं गणेशं भजेम असे म्हंटले आहे. हे वाचतांना जगद्गुरू शंकराचार्यांच्या चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ची आठवण येते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती हे सर्वांना माहीत आहे. गणेशगीतासार स्तोत्रात प्रत्यक्ष शंकर भगवानांनी गणेशाकडे उपदेश मागितला आणि गणपतीने त्यांना गीतेचा सारांश सांगितला अशा संवादात्मक पध्दतीने हे स्तोत्र लिहिलेले आहे. मूळ गीतेप्रमाणेच यातदेखील बरेच ब्रह्मज्ञान आहे. गणेशपुराणामधील ढुंढिरूपवर्णन स्तोत्रात गण, गज, ऋध्दी, सिध्दी वगैरे शब्दांचे आध्यात्मिक अर्थ देऊन गणपतीचे एक आध्यात्मिक दर्शन घडवले आहे.

पुराणामध्ये अशा त-हेने गणपती या देवतेचे विविध अंगांनी दर्शन घडवले आहे. त्यात सुरस कथा आहेत, गजाननाचे रूप आणि त्याने केलेला साजश्रुंगार, ल्यायलेले दागदागिने वगैरेंची रसभरीत वर्णने आहेत आणि अगम्य असे अध्यात्मही आहे.


Tuesday, August 30, 2022

मी कोण आहे ? - भाग ३

 


 'मी कोण आहे ?' या विषयावर मी फेसबुकवर लिहीत असलेल्या स्फुटलेखमालेतले पहिले ५० लेख एकत्र करून "मी आहे तरी कोण ??? - भाग १  आणि भाग २" मध्ये प्रकाशित केले होते. ते इथे वाचावेत. 

भाग १ : https://anandghan.blogspot.com/2021/04/blog-post.html

भाग २ : https://anandghan.blogspot.com/2021/12/blog-post.html


मी कोण आहे?

भाग ५१

१ ऑगस्ट १९६७. त्या दिवशीपासून आमची प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी (क्लास वन गॅझेटेड ऑफिसर) म्हणून नेमणूक झाली. याचा अर्थ काय हे तेंव्हा आम्हाला माहीत नव्हते. पण काही तरी 'लई भारी' असणार असे मात्र वाटले होते. भारत सरकारतर्फे वेळोवेळा गॅझेट नावाचे कसले तरी पत्रक प्रकाशित जाते, त्यात माझे नाव छापून येणार होते असा त्याचा अर्थ होता. प्रत्यक्षात मला ते गॅझेट कधी वाचायला मिळालेच नाही आणि त्यात नेमके काय छापले होते तेही समजलेच नाही.

त्या दिवशी सकाळी आमच्या ट्रेनिंग स्कूलमधल्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना बहुधा आमच्या वर्गांमध्येच जाऊन बसायला सांगितले. त्या दिवशी आमचे व्याख्याते न येता अणुशक्ती खात्याच्या प्रशासकीय सेवेतले काही सज्जन आले आणि त्यांनी सर्वांना सायक्लोस्टाइल केलेले काही कागद वाटले. आम्हाला ते कसकसले फॉर्म्स डुप्लिकेट की ट्रिप्लिकेटमध्ये सह्या करून द्यायचे होते. या वेळीही ते पूर्ण वाचून पहायला वेळ नव्हताच. थोडे वरवर चाळून आम्ही खाली सह्या ठोकून दिल्या. आता मात्र माझी हीच सही जन्मभर माझ्याबरोबर राहणार आहे याची जाणीव असल्यामुळे मी नक्कल करायला थोडी कठीण पण वाचता येण्याजोगी अशी एक सही ठरवून आणि घोटवून ठेवली होती.

त्यानंतर आमच्या गोपनीयतेच्या शपथविधीचा सार्वजनिक कार्यक्रम झाला. तिथे आलेल्या अधिकाऱ्याने एक एक ओळ वाचून दाखवली आणि आम्ही सर्वांनी एक हात वर करून त्याच्यापाठोपाठ ती मोठ्याने म्हंटली.  आता आम्ही मनोभावे भारत सरकारची सेवा करण्याठी वचनबद्ध झालो होतो.


मी कोण आहे?      भाग ५२

माझी नेमणूक बीएआरसीच्या रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिडन (आरईडी) या विभागात झाली होती. यावर मी बेहद्द खूष होतो. वर्षभर अभ्यास करून आणि परीक्षा देऊन मी कंटाळलो होतो. आता मला माझ्या आवडीचे मशीन डिझाइनचे काम करायला मिळणार असे वाटले होते. आमच्या बॅचमधले आणखी १०-१२जणही माझ्याबरोबर तिथेच नेमले गेले होते. आम्ही सगळेजण ट्राँबेला त्या ऑफीसात जाऊन पोचलो. थोड्याच दिवसांपूर्वी मी तिथे काही दिवस प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेत असतांना पाहिले होते की तिथले इंजिनियर्स आधीच दाटीवाटीने बसत होते. त्यात आणखी दहाबाराजण कसे सामावणार होतो याचेच मला थोडे गूढ वाटत होते. तिथे जाऊन पाहता आमच्या आगमनाची काहीच तयारी केलेली दिसली नाही. पण आम्ही येणार असल्याचे तिथल्या ऑफिसमधल्या लोकांना ठाऊक होते. त्यांनी आम्हाला एका लहानशा कॉन्फरन्सरूममध्ये बसायला सांगितले. 

थोड्या वेळाने त्या विभागाचे प्रमुख (हेड आर ई डी) श्री.विनय मेकोनी यांचे आगमन झाले. अत्यंत मृदुभाषी मेकोनी यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले, आपुलकीने आमची थोडी विचारपूस केली आणि नजिकच्या भविष्यकाळात साकार होणार असलेल्या योजनांची माहिती देऊन आमचे भविष्य अत्यंत उज्ज्वल असणार आहे अशी ग्वाही दिली. पण त्यांनी पुढे असे सांगितले की आम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये रिअॅक्टर इंजिनियरिंग हा विषय क्लासरूममध्ये शिकलो असलो तरी रिअॅक्टर्सवर प्रत्यक्ष काम करून त्यांच्या सगळ्या यंत्रणांची चांगली जवळून ओळख करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आम्हाला वर्षभर रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये फॅमिलियरायझेशन ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. इतके सांगून त्यांनी आम्हाला तिकडे पाठवून दिले. म्हणूनच त्या वेळी आम्हाला बसायला टेबलखुर्च्यांची व्यवस्था केली गेली नव्हती. 


मी कोण आहे?     भाग ५३

मी परमाणु ऊर्जा विभागाच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये दाखल झाल्यापासून तिथले जे जे लोक भेटले ते सगळे डॉ.होमी जहाँगीर भाभा यांचे परमभक्त होते. बहुतेकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाभांच्या हाताखाली काम केले होते आणि त्यांचे बोलणे, वागणे आणि कामाचा झपाटा यांनी ते भारावून गेलेले दिसत होते. जुन्या काळातल्या एकत्र कुटुंबांमध्ये तिथल्या कुटुंबप्रमुखाने उच्चारलेले प्रत्येक वाक्य घरातल्या सर्वांना शिरोधार्य असायचे, इथेही सगळा कारभार "भाभावाक्यम् प्रमाणम्" असे धरून चालत असे. "असे भाभांनी ठरवलंय् किंवा सांगून ठेवलंय्" हे वाक्य मी कितीतरी वेळा ऐकत होतो. 

होमी भाभा हे तोंडात चांदीचा किंवा कदाचित सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले होते. त्यांच्या कुटुंबाकडे गडगंज संपत्ती होती आणि तिच्यात भर घालावी अशी त्यांची वृत्ती नव्हतीच. मी असे ऐकले की ते महिन्याला फक्त एक रुपया सांकेतिक पगार घेऊन रात्रंदिवस झपाटल्यासारखे काम करत होते. त्यांचे पंतप्रधान पं.नेहरूंशी चांगले संबंध होते आणि त्याचा ते आपल्या कामात कुशलतेने उपयोग करून घेत होते. त्यांच्या दूरदृष्टीला तोड नव्हती. त्यांनी परमाणु ऊर्जा विभागाचे मुख्य कार्यालय दिल्लीच्या सचिवालयापासून दूर मुंबईत ठेवले. त्या ऑफीसात काम करणाऱ्या आयसीएस किंवा आयएएस अधिकाऱ्यांनाही आपल्या व्यक्तीमत्वाने भारावून टाकले. त्यांनी भाभांना त्यांच्या नवनिर्मितीच्या कार्यात सहकार्य व सहाय्य दिले. 

 त्यांच्या विभागाला अणुशक्तीकेंद्र स्थापन करण्यासाठी मुंबईजवळील तुर्भे इथली सरकारची हजारो एकर ओसाड जमीन दिली गेली. त्यात एक भला मोठा डोंगर आणि त्याचा खाडीपर्यंत जाणारा उतार होता. या खडकाळ भागात रस्ते आणि इमारती बांधून त्यात निरनिराळ्या प्रयोगशाळा उभ्या करायचे आव्हान भाभांनी स्वीकारले, ते काम करण्यासाठी एक स्वतंत्र आणि कार्यक्षम यंत्रणा उभी केली आणि तिच्याकडून हे जागतिक दर्जाचे केंद्र उभारून ते नावारूपाला आणले. कंबाला हिल, शिवाजी पार्क, वांद्रे, चेंबूर, घाटकोपर अशा मुंबईतल्या भागांमधल्या अनेक रहिवासी इमारती ताब्यात घेऊन तिथे या केंद्रातल्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करून दिली, त्यांना तुर्भ्यापर्यंत जाण्यायेण्यासाठी बसेसची सेवा सुरू करून दिली. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील.

डॉ.भाभांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानंतर डॉ.विक्रम साराभाई यांच्यावर अणुशक्तीखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेसुद्धा गडगंज श्रीमंत अशा एका उद्योगपती कुटुंबातून आले होते. मी अणुशक्तीकेंद्रात नोकरीला लागलो तोपर्यंतच्या काळात तिथल्या अधिकाऱ्यांना अजून डॉ.साराभाई यांच्या कार्यपद्धतीचा विशेष अनुभव आला नव्हता.  होमी भाभांचे शिष्य होमी सेठना अणुशक्तीकेंद्राचे संचालक झाले होते आणि मुख्यतः तेच तिथला कारभार भाभांच्या धोरणानुसार चालवत होते. माझी नेमणूक जिथे झाली होती त्या रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनच्या प्रमुखपदी (हेड आरईडी) श्री.विनय मेकोनी हे होते. तेसुद्धा घरंदाज श्रीमंत असावेत, ते मरीन ड्राइव्हवर रहात होते असे ऐकले.

 

मी कोण आहे ?   भाग ५४

माझ्या आयुष्यातल्या पहिल्या नोकरीतल्या पहिल्या दिवशीची सुरुवात मी श्री.मेकोनी यांना रिपोर्ट करून केली. ते माझे पहिले साहेब होते, पण त्यांनी पहिल्या भेटीतच आम्हा सर्वांना रिअॅक्टर्सवर प्रत्यक्ष काम करून त्यांना चालवण्याचे ट्रेनिंग घेण्यासाठी रिअॅक्टर ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये पाठवून दिले. त्या वेळी त्या डिव्हिजनचे प्रमुखही श्री.मेकोनीच होते. त्यामुळे तेच आमचे साहेब राहिले होते. हे नुसते स्वयंपाकघरातून माजघरात जाण्यासारखे होते. अजूनही आमच्यावरचे 'ट्रेनी' हे लेबल तसेच राहिले असले तरी आता आम्हाला दरमहा ३०० रुपये स्टायपेंड न मिळता स्केलप्रमाणे पूर्ण पगार मिळणार होता. त्या काळात तो भत्ते धरून पाचशे रुपयांवर जात असला तरी त्यातून फंड, टॅक्सेस वगैरे कापले जाऊन सुमारे साडेचारशे इतका हातात मिळणार होता. पण आता रहायला होस्टेल आणि जेवायला मेस नव्हती. राहण्याची आणि खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आम्हालाच करायची होती.

आमची क्लास वन गॅझेटेड ऑफीसर (राजपत्रित शासकीय अधिकारी वर्ग १) अशा 'मोठ्या' पदावर नेमणूक झाली होती. गॅझेटेड ऑफीसरला सरकारी ऑफीसात खूप मानाचे स्थान असते असे मी ऐकले होते, पण आमच्याकडे काम करायला ऑफिसही नव्हते, आमचे असे टेबल नव्हते, खुर्ची नव्हती आणि अधिकार गाजवायला हाताखाली कोणीही स्टाफ नव्हता. आम्ही असले फक्त नामधारी ऑफिसर किंवा अधिकारी झालो होतो. गॅझेटेड ऑफीसरला नेमके कुठले खास अधिकार असतात हेही त्यावेळी आम्हाला कुणी सांगितले नाही. शिवाय आमची नेमणूक 'तात्पुरती, पण कायम होण्याची शक्यता असलेली' अशी  होती. पण तीन वर्षांचा बाँड लिहून घेतलेला असल्यामुळे तितकी वर्षे तरी काही काळजी नव्हती. 


मी कोण आहे ?           भाग ५५

मेकोनी साहेबांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळे त्यांच्या ऑफिसातून निघून चालत चालत सायरस या रिअॅक्टरकडे जायला निघालो. या रिअॅक्टरची एकाद्या भव्य अशा शिवलिंगासारखी अवाढव्य इमारत मी याआधीही बाहेरून पाहिली होती आणि त्याच्या आत काय दडलेले असेल हे पहाण्याची मला खूप उत्सुकता होती. आता आम्हाला वर्षभर तिथेच काम करायचे होते. ते कसे असेल याचा विचार करत करत आम्ही तिकडे जाऊन पोचलो. पण या वर्तुळाकार विशेष इमारतीत जाण्याचा मार्ग त्याच्या समोर असलेल्या चौकोनी इमारतीतूनच जात होता. त्याही इमारतीच्या बाहेरच आम्हाला एका सुरक्षारक्षकाने अडवले. 

बीएआरसीच्या मुख्य गेटमधून आत शिरायच्या आधीच आमची पूर्ण झडती घेतली गेली होती आणि ओळखपत्र पाहूनच आम्हाला आत प्रवेश मिळाला होता. असे असले तरी आतल्या महत्वाच्या भागांमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश नव्हता. सायरसमध्ये जाण्यासाठी वेगळे खास ओळखपत्र असणे जरूरीचे होते. तिथल्या दरवानाने आम्हाला बाहेरच थांबवून कुणाला तरी फोन केला. मग आतून एक अधिकारी बाहेर आले आणि आमच्याशी बोलून त्यांनी आम्हाला आत येण्याची परवानगी दिली.

त्या इमारतीतल्या अनेक खोल्यांमध्ये निरनिराळी ऑफिसेस होती, तसेच भोजनगृह (कँटीन), स्नानगृहे, लॉकररूम्स वगैरे होती. त्यातच एक लहानसे सभागृह किंबहुना लेक्चररूम होती, तिथे आम्हाला नेऊन बसवले. थोड्या वेळाने यम् रंगनाथराव नावाचे एक अत्यंत गप्पिष्ट असे मध्यमवयाचे गृहस्थ तिथे आले आणि त्यांनी आमचा ताबा घेतला. एक विशिष्ट प्रकारचा दक्षिण भारतीय हेल काढून  कुठल्याही विषयावर न थांबता तासन् तास बोलत रहायची किमया त्यांनी साधली होती. उरलेला सगळा वेळ त्यांनीच आमच्याशी गप्पा मारत काढला. त्यामुळे त्या वर्तुळाकार इमारतीत आम्हाला जायला मिळालेच नाही.


मी कोण आहे ?        भाग ५६

आमची सायंटिफिक ऑफीसर या पदावर नेमणूक झाली असली तरी आम्हाला आपले ऑफिस आणि बसायला खुर्ची मिळालीच नव्हती. त्यामुळे दुसऱ्या  दिवशी सकाळी आम्ही पुन्हा त्या लेक्चररूममध्ये जाऊन एकमेकांशी बोलत बसलो. सावकाशपणे रंगनाथराव सर आले आणि त्यांनी फळ्यावर काही तरी लिहून शिकवायला सुरुवात केली. पण आम्हाला तर रिअॅक्टर पहायची उत्सुकता होती. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्याची आठवण करून दिली. रंगनाथराव सर हसायला लागले, ते म्हणाले, " जरा दमाने घ्या, इतकी काय घाई आहे? तुम्ही तर तिथे काम करायलाच इथे आला आहात ना?"

"पण कधी?" एकाने विचारले.

ते म्हणाले, "त्याचे असे आहे की रिअॅक्टर सुरू असतो तेंव्हा त्यातून अल्फा, बीटा, गॅमा यासारखे डेंजरस किरण बाहेर पडत असतात. त्यामुळे काही आवश्यक काम असल्याशिवाय कुणीच रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये जायचे नसते आणि जे जातात तेही ठराविक वेळेच्या आत लगेच बाहेर परत येतात. त्याची रीतसर नोंद ठेवली जाते".

"पण रेडिएशनपासून बचावासाठी शील्डिंग दिले असते ना, सर?" कुणी तरी पुस्तकी ज्ञान पाजळले.

"हो. हे किरण बाहेर येऊ नयेत म्हणून या बिल्डिंगला जाडजूड भिंती बांधल्या आहेत. या इमारतीला कुठलीही खिडकीच काय, पण एकादे लहानसे छिद्रसुद्धा नाही. आतले किरण किंवा हवासुद्धा भिंतीतून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली जाते. पण त्यामुळे सूर्यप्रकाश आणि वारासुद्धा आतही जाऊ शकत नाहीत. बाहेर ऊन पाऊस काही असले तरी ते आत समजत नाही. इतकेच काय दिवस चालू आहे की रात्र आहे तेही कळत नाही."

"बाप रे !"

"पण जर तुम्हाला जर या भक्कम तटबंदीतून आत जायचे असेल तर आपल्या संरक्षणाची विशेष काळजी घ्यायला हवी. आत गेल्यावर काय करायचे आणि काय करायचे नाही हे नीट समजून घ्यायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे हा दरवाजा उघडून तुम्ही या खोलीत आलात तसे रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये जाता येत नाही. तिथे आत कसे जायचे आणि बाहेर कसे पडायचे याचेच आधी ट्रेनिंग घ्यावे लागते. मी तुम्हाला ते सगळे तपशीलवार शिकवीन आणि जेंव्हा तुम्ही आत जायला सज्ज व्हाल तेंव्हा संधी बघून तुम्हाला त्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाईन."    


मी कोण आहे ?       भाग ५७

मग पुढील तीन चार दिवस रंगनाथराव सरांनी आम्हाला त्या सायरस रिअॅक्टरचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे सगळे थोडक्यात शिकवले. तिथले कडक नियम, कायदेकानून वगैरेंची माहिती दिली. जिथे किरणोत्सार होण्याची शक्यता असते अशा जागी काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला सदोदित एक फिल्मबॅज आपल्या शर्टाला लावून ठेवणे आवश्यक असते. दर आठवड्याला त्यातली फिल्म काढून ती तपासणीला दिली जाते आणि तिच्या जागी नवीन फिल्म बसवली जाते. त्या आठवड्यात त्या फिल्मला रेडिएशनचा किती डोस मिळाला याची मोजदाद करून तिची नोंद ठेवली जाते. अशा प्रकारे त्या माणसाला एकंदर किती डोस मिळाला याचा रेकॉर्ड ठेवला जातो. तो रेकॉर्ड जन्मभर ठेवला जातो आणि निदान जितकी वर्षे तो माणूस तिथे कामावर आहे तिथपर्यंत  तरी तो उपलब्ध करून दिला जातो.  एकाद्या प्रसंगात जर काही कारणामुळे त्याला प्रमाणाबाहेर डोस मिळाला तर त्याला काही काळासाठी त्या कामापासून दूर ठेवले जाते. दर आठवड्याला, एका महिन्यात, तीन महिन्यात आणि बारा महिन्यात जास्तीत जास्त किती डोस घेणे सुरक्षित आहे याचे तक्ते दिले असतात आणि त्यांचे कसोशीने पालन केले जाते. एकदोन दिवसातच आम्हा सर्वांनाही आपापल्या नावाचे फिल्मबॅज मिळाले आणि घरी जाण्यापूर्वी त्यांना अडकवून ठेवण्याच्या बोर्डावर आमच्या नावाच्या जागा मिळाल्या.

रिअॅक्टर बिल्डिंगमधल्या हवेत असलेले धुळीचे किंवा वाफेचे कण कपड्यांना चिकटून बाहेरच्या जगात शिरण्याची शक्यता असते. ती कमी करण्यासाठी आत जायच्याआधी एक पांढरा ढगळा कोट परिधान केला जातो, तसेच पायातले नेहमीचे बूट काढून वेगळे कॅनव्हासचे जोडे घातले जातात. नंतरच्या काळात एकदा माझा एक मित्र एकदा चुकून नवे कोरे बाटाचे बूट घालून टिकटॉक करत आत जाऊन आला. तिथे कुठेतरी सांडलेल्या पाण्यात त्याचा पाय पडला असेल. बाहेर आल्यावर त्याच्या बुटातून थोडे रेडिएशन बाहेर पडतांना दिसले म्हणून त्यांना जप्त करून क्वारंटाइन केले गेले. त्याला ते अखेरपर्यंत परत मिळालेच नाहीत. असे होऊ नये म्हणून रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये प्रवेश करायच्या आधी ही अशी सगळी पेहेरावाची तयारीही करून घ्यायची असते याची माहिती मिळाली होती. पण माझ्या मित्राला त्याचे विस्मरण झाले आणि नवे कोरे जोडे गमवावे लागले.  

काही कामगार ज्या वेळी प्रत्यक्ष रेडिओअॅक्टिव्ह पदार्थ हाताळतात त्यांना तर सर्वांग झाकणारे चिलखत आणि शिरस्त्राणसुद्धा परिधान करावे लागतात. कोरोनाच्या काळात काही नर्सेस आणि डॉक्टरांनी पीपीई किट घातलेले आपण टीव्हीवर पाहिले. आम्हाला तसे पेहेराव या ट्रेनिंगच्या काळातच पहायला मिळाले होते. पण आम्हाला शिकाऊ लोकांना तसली कामे करावी लागण्याची अपेक्षा नव्हती, त्यामुळे ते प्लॅस्टिक सूट घालावे मात्र लागले नाहीत किंवा घालायला दिले नाहीत.

"जे काही काम करायचे असेल ते आधी व्यवस्थितपणे लिहून काढावे आणि जसे लिहिले असेल तंतोतंत तसेच ते करावे." असा एक मूलमंत्र आयएसओ सर्टिफिकेशनमध्ये सांगितला जातो. पण आयएसओचा उदय होण्याच्याही आधीपासून जगभरातल्या अणुशक्तीउद्योगांमध्ये तो पाळला जात आला आहे. रेडिओअॅक्टिव्ह जागेत जे काही काम करायचे असेल त्याची बाहेर स्वच्छ वातावरणात पूर्ण पोशाख अंगावर चढवून रंगीत तालीम घेतली जाते. ती आम्ही पाहिली.


मी कोण आहे ?      भाग ५८

वर्तुळाकार रिअॅक्टर बिल्डिंग आणि चौकोनी ऑफीसची इमारत यांना जोडणारा एक लांबुळका चौकोनी बोगदा आहे. त्याला एअरलॉक असे म्हणतात. त्याच्या दोन्ही टोकांना दोन यांत्रिक दरवाजे आहेत, त्यातला एका वेळेस एकच दरवाजा उघडता येऊ शकतो. रिअॅक्टर बिल्डिंगमधील हवेचा बाहेरील वातावरणाशी संपर्क येऊ नये म्हणून अशी व्यवस्था आहे. बाहेरून आत जातांना एक बटन दाबल्यावर आधी एअरलॉकमधील हवेचा दाब आणि बाहेरील वातावरणातला हवेचा दाब समान केला जातो आणि बाहेरचा दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडतो. त्यातून आत गेल्यावर आतले बटन दाबले की तो दरवाजा यंत्राने चांगला घट्ट सीलबंद होतो तसेच लॉक केला जातो.  त्यानंतर एअरलॉकमधील हवेचा दाब  आणि रिअॅक्टर बिल्डिगमधील हवेचा दाब समान केला जातो. तसे केल्याशिवाय आतला दरवाजा उघडता येत नाही. मग आतील दरवाजाचे बटन दाबल्यावर तो दरवाजा आतल्या बाजूने उघडतो. आत गेलेल्या माणसाने तिथेच थांबून आधी तो दरवाजा बंद करायला हवा आणि त्यानंतरच तिथून आत जायचे असते. आतून बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करायची असते.  बाहेरचा दरवाजा पूर्णपणे चांगला बंद झाला आहे याची खात्री करून घेऊनच आपल्याला जिथे जायचे असेल तिथे जाता येते. हे सगळे शिकून घेतल्यानंतर आम्हाला एकदाचे आत जायला मिळाले, तेही अनुभवी जाणकाराला सोबत घेऊन.


मी कोण आहे ?       भाग ५९

मी घरी, शाळेत, कॉलेजात, हॉस्टेलमध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी जेवढे दरवाजे पाहिले होते ते सगळे हातांनीच उघडायचे होते. फक्त अल्लाउद्दीनच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण गोष्टीतल्या गुहेचा दरवाजा तेवढा "खुल जा सिमसिम" अशा मंत्राने उघडत होता. मी आता रोजच लिफ्टचे दार बटन दाबून उघडत असतो, पण पन्नास वर्षांपूर्वी मी तरी तसला अनुभव घेतला नव्हता.   त्यामुळे सायरस रिअॅक्टरच्या बिल्डिंगमध्ये शिरतांना आपोआप उघडणारा दरवाजा हेसुद्धा एक नवलच वाटले होते. आता आतल्या गुहेमध्ये काय काय अजूबे पहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोचली होती.

इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असतांना आम्ही पुण्यातल्या काही कारखान्यांना भेटी दिल्या होत्या, दक्षिण भारताच्या शैक्षणिक सहलीमध्ये बंगळूरू आणि चेन्नै इथले काही मोठे कारखाने पाहिले होते, शिवाय आमचे कॉलेजमधले  वर्कशॉप तर ओळखीचे होतेच. या सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या शेड्समध्ये ओळीने मांडून ठेवलेली यंत्रे खडखडाट करत असत त्यांचे आवाज आणि इंधन व वंगणाच्या तेलांचे चमत्कारिक वास भरूव राहिलेले असायचे. आता आपले सगळे आयुष्य या असा वातावरणात जाणार आहे आणि याची सवय करून घ्यावीच लागेल अशी आपल्या मनाची समजूतही घातली होती. पण इथे रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये आत शिरल्यावर खूप शांतता दिसली आणि कसले वासही आले नाहीत.

रिअॅक्टरच्या पात्राच्या (व्हेसलच्या) सर्व बाजूंनी पाचसहा फूट जाडीच्या भिंती बांधलेल्या असल्यामुळे बाहेरून फक्त एक बुरुजासारखा आकार दिसत होता. त्याच्या आतमध्ये अणूंची केवढी धुमश्चक्री चालली असेल आणि त्यातून किती ऊर्जा व किती प्रकारचे किरण बाहेर पडत असतील याची यत्किंचितही कल्पना बाहेर उभे राहून येत नव्हती. हा रिसर्च रिअॅक्टर होता. संशोधनासाठी अनेक उपकरणे आणि यंत्रे तिथे मांडून ठेवली होती, पण त्यावर कोणीही संशोधक काम करतांना दिसत नव्हता. बहुधा सगळी निरीक्षणे (ऑब्झर्व्हेशन्स) आपोआप रेकॉर्ड होत असतील आणि शास्त्रज्ञ लोक अधून मधून फेरी मारून कमीत कमी वेळात ती पाहून जात असतील. त्या बिल्डिंगच्या तळघरांमध्ये अनेक पंप, व्हॉल्व्ह्ज, व्हेसल्स वगैरे उपकरणे आणि त्यांना जोडणारे नळ यांची दाटी होती. पण कशालाही स्पर्श करायचा नाही आणि कुठेही जास्त वेळ थांबायचे नाही अशी सक्त ताकीद आम्हाला दिलेली असल्यामुळे आमच्या वाटाड्याने धावतपळत एक फेरी मारून आम्हाला त्या जादूई दरवाजातून पुन्हा बाहेर काढले.


मी कोण आहे ?      भाग ६०

रिअॅक्टर बिल्डिंगमध्ये शक्यतो कुणी जायचे नाही आणि तिथे फार वेळ थांबायचे नाही असे असले तर त्याचे काम कसे चालते ? आणि त्याला चालवण्यासाठी इतकी माणसे नेमून ठेवली आहेत ते काय काम करतात? असे प्रश्न मनात येत होतेच. तिथले नियंत्रण कक्ष पाहिल्यावर त्यांचा उलगडा झाला. रिअॅक्टर बिल्डिंगच्या बाहेर एका वेगळ्या खोलीत हे कंट्रोल रूम असते. रिअॅक्टरमधली हवा किंवा पाणी यातले काहीही त्या खोलीत येऊ शकणार नाही याची काळजी घेतली जाते. रिअॅक्टर बिल्डिंग आणि कंट्रोल बिल्डिंग यांना जोडणाऱ्या शेकडो तारांमधून संदेशांचे वहन होते.  या लांबट आकाराच्या हॉलच्या भिंतींवर अनेक सुबक कंट्रोल पॅनेल्स मांडलेले होते. कारच्या डॅशबोर्डवर जशी काही गोल किंवा चौकोनी उपकरणे बसवली असतात आणि त्यात फिरणाऱ्या सुया निरनिराळे आकडे दाखवत असतात, काही छोटे छोटे दिवे आणि बटने असतात, त्यांच्या तीनचार पट मोठे पॅनेल विमानांच्या कॉकपिटमध्ये असते आणि त्याच्याही चारपाचपट एवढे मोठे पॅनेल त्या रिअॅक्टरच्या नियंत्रणकक्षात होते. मी तोपर्यंत कुठलेही विमान आतून पाहिलेले नव्हते त्यामुळे तिथले ते अद्भुत दृष्य पाहूनच मी चकित झालो. मधोमध एका आकर्षक आणि सुबक रेखाचित्रामध्ये रिअॅक्टरचा आकार दाखवला होता आणि त्यातल्या पाण्याची पातळी वेगळ्या रंगाने दाखवली होती. प्रत्यक्ष रिअॅक्टरमध्ये जेवढी पातळी असेल त्यानुसार त्या चित्रामधली पातळी कमीजास्त होत होती. आजूबाजूला खूप डायल्स, लाल किंवा हिरवे दिवे आणि बटने वगैरे मांडून ठेवलेली होती. काही रेकॉर्डरसुद्धा होते, त्यातल्या कागदांवर सतत निरनिराळ्या प्रकारच्या माहितीचे आरेखन होत होते. पॅनेलच्या समोर मांडून ठेवलेल्या स्टुलांवर बसलेले इंजिनियर आणि ऑपरेटर त्या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवत होते.  

त्या हॉलच्या एका टोकाला एक प्रशस्त टेबल मांडले होते आणि त्याच्या मागे एक गोल फिरणारी आरामशीर खुर्ची होती. त्या वेळी असलेला शिफ्ट इंजिनियर त्या सिंहासनावर विराजमान झालेला असे. त्याचा रुबाब एकाद्या राजासारखा असे.  त्याला बसल्या बसल्या सगळी पॅनेल्स दिसत असत आणि परिस्थिति नियंत्रणात ठेवण्यासाठी काय अॅक्शन घ्यायची हे तो ठरवू शकत असे. नियंत्रणाची बहुतेक कामे कंट्रोल पॅनेलवरची बटने दाबून किंवा फिरवूनच होत असत. काही कारणाने एकादी गोष्ट हवी तशी नाहीच झाली तर रिअॅक्टर बंद केला जात असे किंवा आपोआप बंद होत असे आणि मग प्रशिक्षित कामगार आत जाऊन दुरुस्ती करत असत. शिफ्ट इंजिनियरच्या सहाय्याला दोन तीन अनुभवी आणि दोन तीन शिकाऊ इंजिनियरही असायचे. ते केंव्हा तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर बसायचे तर केंव्हा लायब्ररीत किंवा ऑफिसात बसून काही वाचन, लेखन वगैरे करत असत. थोड्याच दिवसांनी मी त्यांच्यात सामील झालो.


मी कोण आहे ?       भाग ६१

ट्रेनिंग स्कूलमध्ये शिकत असतांना आम्हाला दिलेल्या हॉस्टेलचे पत्र्याचे का होईना, पण एक छप्पर डोक्यावर होते. तो परिसर तर फारच निसर्गरम्य होता. पण ट्रेनिंग संपल्यावर आम्हाला आपापल्या राहण्याची सोय करावी लागणार होती. जी मुले मुंबईतलीच होती ती तर आता घरी रहायला जाणार म्हणून आनंदात होती. काही मुलांचे सख्खे काका किंवा मामा मुंबईत रहात होते ते त्यांच्याकडे जाणार म्हणत होते. सधन घरातल्या मुलांना खात्री होती की त्यांचे आईबाबा येऊन त्यांची काही ना काही व्यवस्था लावून देतील. अनेक मुले मुंबईच्या बाहेर पोस्टिंग मिळावे यासाठी प्रयत्न करणार होती. मला तेही नको होते, शक्यतो मुंबईतच रहायचे होते. माझ्यासारख्या मुलांना मात्र आता आपले काय होणार याची काळजी लागली होती.

तशी माझीही एक मोठी चुलत बहीण आणि एक आते बहीण मुंबईत रहात होत्या, पण त्या दोघींचीही घरे मात्र फारच लहान होती. एकेका खोलीच्या घरांमध्ये नवराबायको, मुले आणि कधी कधी येणारा जाणारा एकादा पैपाहुणा असे सगळेजण रहायचे आणि जमीनीवर पथारी पसरून दाटीवाटीने झोपायचे. जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटायला जात असे तेंव्हा त्या अतीशय प्रेमाने माझे स्वागत करत असत, मी त्यांच्यापेक्षा वयाने बराच लहान असल्यामुळे माझे थोडे लाडही करत असत आणि आग्रहाने तसेच हक्काने मला मुक्कामाला थांबवूनही घेत असत. ते एकाददोन दिवसासाठी ठीक असले तरी त्या परिस्थितीत त्यांच्या घरी रहायला जाणे मला शक्यच नव्हते. मी वर्षभरातल्या स्टायपेंडमधून थोडीशी बचत केली असली तरी तेवढ्या भांडवलावर मुंबईत कुठेही एक खोलीसुद्धा भाड्याने मिळत नव्हती असे चौकशी करता समजत होते. त्यासाठी मोठी पागडी किंवा डिपॉझिटतरी देणे आवश्यक होते. 

मी कॉलेजमध्ये असतांनाच माझ्या वडिलांचे निधन झाले होते आणि माझे मोठे भाऊ स्वतःच अजून त्यांच्या आयुष्यात पुरते स्थिरस्थावर झालेले नव्हते, तरीही त्यांनीच माझे शिक्षण पुरे करून दिलेले होते. आता पुन्हा त्यांच्याकडून आणखी मदत मागायलासुद्धा मला लाज वाटत होती आणि त्यांनाही फार काही मदत करता येईल असे मला दिसत नव्हते. त्यामुळे आता आपण हॉस्टेल सोडल्यावर कुठे आसरा घ्यावा हे मला काही केल्या कळत नव्हते.


मी कोण आहे ?         भाग ६२

आमच्या ट्रेनिंगच्या अखेरच्या टप्प्यात आम्हाला प्रात्यक्षिक अनुभवासाठी थोडे दिवस बीएआरसीमध्ये पाठवले गेले. मी त्यासाठी रोज आरईडीमध्ये जात होतो. तिथे साउरकर नावाचा मला दोन वर्षांनी पुढे असलेला मुलगा भेटला आणि आमची मैत्री झाली. त्याच्याशी बोलतांना मला समजले की तो माहीमला कुणाकडे तरी पेइंग गेस्ट म्हणून रहात होता. ते लोक अतीशय सज्जन, समजुतदार आणि मनमिळाऊ होते आणि साउरकर त्याच्या घरी राहतांना एकंदरीत खूष दिसत होता. आमचे ट्रेनिंग चाललेले असतांनाच त्याची कोटा इथे सुरू असलेल्या प्रकल्पाच्या कामावर बदली झाल्याचा हुकूम आला. त्याला स्वतःला ही बदली हवीच होती म्हणे. त्याने केलेला अर्ज तेंव्हा मंजूर झाला होता. 

आमचे ट्रेनिंग संपल्यावर मला रहाण्याची सोय करायची होतीच आणि साउरकरच्या घरमालकांनाही एक सरळमार्गी चांगला मुलगा असा पेइंग गेस्ट हवा होता. एक दिवस तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. मला ती जागा आणि वातावरण बरे वाटले आणि त्यां लोकांनाही माझा बायोडेटा आणि चेहेरा पसंत पडला. साउरकरच्या जागी मी त्यांच्या घरी रहायला जायचे असे दोन्ही बाजूंनी नक्की केले. त्याप्रमाणे मी ट्रेनिंग स्कूलच्या हॉस्टेलमधला शेवटचा दिवस झाल्यावर लगेच त्यांच्याकडे मुक्काम हलवला.

ते कुटुंब खरेच चांगले होते आणि मला त्यांच्यात मिसळून रहायला काहीच अडचण आली नाही. माझीही नेमणूक साउरकर जात असलेल्या आरईडीमध्येच झाली होती, त्यामुळे जसे त्याचे रूटीन होते तसेच माझेही असणार असे आम्हाला वाटले होते. पण मला सायरसमध्ये ट्रेनिंगकरता पाठवले गेले आणि काही दिवसांनंतर माझी शिफ्ट ड्यूटी सुरू झाली. पहिली पाळी सकाळी सात ते दुपारी तीन, त्यानंतर दुसरी पाळी रात्री अकरा वाजेपर्यंत आणि तिसरी पाळी रात्री अकरा ते सकाळी सात वाजेपर्यंत असे. त्यामुळे पहिल्या पाळीसाठी भल्या पहाटे उठून निघावे लागायचे तर दुसऱ्या पाळीनंतर घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटलेली असायची. तिसऱ्या पाळीत मला दिवसभर घरी लोळत पडले रहावे लागायचे.  हे सगळे त्या कुटुंबालाही त्रासदायकच होते हे मला जाणवत होते. त्यामुळे त्यांनी काही बोलायच्या आधी मीच तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला. 


मी कोण आहे ?        भाग ६३

नेमके आमचे ट्रेनिंग संपायच्या आधीच साउरकरची बदली होते काय, मी त्याच्याबरोबर त्याच्या घरी जातो काय आणि तिथे रहायला जायचे ठरवतो काय ? हे सगळे इतके अचानक होत गेले की मलाही तो एक दैवयोग वाटला होता. हॉस्टेल सोडल्यावर आपले सामान घेऊन कुठे जायचे ? या प्रश्नाने मी तेंव्हा खूप अस्वस्थ झालो होतो, त्यामुळे या योगायोगाने मला जरा हायसे वाटले होते. हे असे तडकाफडकी ठरवायच्या आधी मला माझ्या हॉस्टेलमधल्या घनिष्ठ मित्रांशी काही विचार विनिमय करायला वेळही मिळाला नाही, किंवा कदाचित मी उगाचच घाई केली होती. त्या लोकांचे कोणी ना कोणी जवळचे नातेवाइक मुंबईत रहात असल्यामुळे ते तसे निर्धास्त दिसत होते. पण मी त्यांना न विचारता आपली वेगळी सोय करून घेतल्याचा त्यांना थोडा रागही आला असावा.

माझ्या एका मित्राचा आत्ते किंवा मामेभाऊ चांगल्या पदावर नोकरीला होता आणि  मोठ्या सरकारी जागेत रहात होता. त्याने नुकताच दादरला एक नवा फ्लॅट विकत घेतला होता, पण तो तिथे लगेच रहायला जाणार नव्हता, म्हणून त्याने तो फ्लॅट माझ्या मित्राला रहायला दिला आणि तो मित्र आमच्या बॅचच्याच आणखी तीन मित्रांसह तिथे रहायला गेला. मी घाई केली नसती तर त्या तीघांमध्ये माझा नंबर नक्की लागला असता, पण मी दुसरी सोय केल्यामुळे तिसऱ्याच एका मित्राला त्यांच्यात जागा मिळाली. अशा प्रकारे आपल्या मित्रांच्या संगतीत रहाण्याची माझी संधी हुकली. एवढे करून मला महिनाभरातच माझी जागा पुन्हा सोडायची वेळ आली तेंव्हा मला ही गोष्ट जास्तच अखरली, पण आता त्याला इलाज नव्हता.

आमच्याबरोबर नोकरीला असलेली काही मुले दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये कॉटबेसिसवर रहात होती. त्यांच्या घरमालकाने त्या भागातल्या अशा सातआठ फ्लॅट्समध्ये वीसपंचवीस मुलांना रहायला ठेवले होते. त्यातला एक मुलगा सोडून जाणार होता असे कळल्यावर मी लगेच खटपट करून तिथे जागा मिळवली. तिथे सगळी मुले मुलेच होती आणि त्यातली बरीचशी बीएआरसीत नोकरी करणारीच होती, त्यामुळे मला त्यांच्या अॅडजस्ट व्हायला वेळ लागला नाही. तिथे सगळेच जण आपापल्या मर्जीप्रमाणे राहू शकत असल्यामुळे कुणीही वेळी अवेळी यायला जायला मोकळा होता. काही महिन्यांनंतर दादरला रहाणाऱ्या चार मित्रांपैकी एकाचे लग्न झाले आणि तो आपल्या घरी रहायला गेला. मग बाकीच्या तीघांनी मला त्यांच्यात रहायला घेतले. तिथे मात्र मी पुढील तीनचार वर्षे मुक्काम केला. 


मी कोण आहे ?       भाग ६४

थोडे दिवस क्लासरूममधले शिकवणे झाल्यावर आम्हाला चार गटांमध्ये विभागले गेले आणि शिफ्टवर कामाला लावले. वीजनिर्मिती किंवा इस्पितळातली सेवा चोवीस तास सुरू ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे एकादी अणुभट्टी एकदा सुरू झाली की तिच्या कामावर रात्रंदिवस लक्ष ठेवणे अत्यावश्यक असते. त्यासाठी तिथले अभियंते आणि कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये कामावर येतात. मी काम करत होतो त्या काळात पहिली शिफ्ट सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, दुसरी दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत आणि तिसरी रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत असायची. सहा दिवस पहिल्या शिफ्टमध्ये काम केल्यानंतर एक दिवस सुटी घेऊन दुसऱ्या शिफ्टला जायचे, ती सहा दिवस करून दोन दिवस सुटी घ्यायची आणि त्यानंतर सहा दिवस तिसऱ्या पाळीत काम केल्यानंतर तीन दिवस सुटी घ्यायची आणि पुन्हा पहिल्या शिफ्टवर जायचे असे २४ दिवसांचे चक्र असे. त्यात प्रत्येक शिफ्टमध्ये सहा दिवस काम आणि एकंदर सहा सुटीचे दिवस येत. पण त्याशिवाय कधीही कुठलीही सुटी नसे. शनिवार असो की रविवार, दिवाळी असो की होळी, ईद असो की ख्रिसमस आणि स्वातंत्र्यदिन असो की गणतंत्रदिवस असो, त्या दिवशी ठरलेल्या पाळीत कामावर जायलाच हवे. त्यात कुणालाही सूट मिळत नाही. कामावरून परत आल्यानंतर किंवा कामावर जायच्या आधी त्याने आपला सण साजरा करून घ्यायचा. न सांगता दांडी मारणे हा अक्षम्य अपराध समजला जात असे.

शिफ्टमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे काम आणि जबाबदारी ठरवून दिलेली असते आणि पुढील शिफ्टमधल्या माणसाने येऊन चार्ज घेतल्याशिवाय आधीच्या शिफ्टमधल्या माणसाला आपली जागा सोडता येत नाही. काही कारणाने पुढच्या शिफ्टमधला माणूस येऊ शकला नाही तर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्याला आपल्या जागेवर थांबून रहावे लागते. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांचे चार गट ठरलेले असतात त्यांना क्र्यू असे म्हणतात. त्यांच्याशिवाय इतरही लोक असतात ते जनरल शिफ्टमध्ये म्हणजे ऑफिसच्या वेळेसारखे काम करतात. तेसुद्धा चांगले प्रशिक्षित असतात. त्यामुळे एकादा कामगार आजारी असला किंवा त्याला रजा घेण्याची गरज असली तर ते लोक त्याच्या जागी बदली काम करू शकतात. मुख्य अधिकारी त्याचे सगळे नियोजन करतात.

आम्ही लोक ट्रेनी म्हणजे शिकाऊ असल्यामुळे आमच्यावर कुठली जबाबदारी सोपवली जात नव्हती. तरीही आम्हाला या कडक शिस्तीचे पालन करावे लागत होतेच. कदाचित तोसुद्धा आमच्या प्रशिक्षणाचा भाग असावा.      



मी कोण आहे ?     भाग ६५

माझ्या लहानपणी आमच्या घरात मध्यभागी एक मोठे घड्याळ भिंतीवर लावलेले होते. त्यातला मिनिट काटा बारावर आला की तेंव्हा जितके वाजले असतील तेवढे टोले त्या घड्याळात बडवले जात आणि तो काटा सहावर आला की एक टोला होत असे. हे टोले घरातल्या सगळ्या खोल्यांमध्ये ऐकू येत असत आणि त्यावरून सगळ्यांना वेळेचा अंदाज येत असे. तसे आमचे त्यावेळचे आयुष्य घड्याळाच्या काट्यांना विशेष बांधलेले नव्हते. पण ते कवितेमधल्या 'आजीच्या घड्याळा'नुसार मात्र बरेचसे चालत असे. पहाटे झुंजूमुंजू उजाडले की घरातली मोठी माणसे जागी होऊन स्वतः उठत असत आणि सूर्य उगवेपर्यंत इतरांनाही उठवत असत. अगदी लहान बाळे सोडून सगळे जण उठून अंथरूणे पांघरुणे वगैरे आवरून ठेवत आणि सकाळच्या कामाला लागत, एकापाठोपाठ एकजण न्हाणीघरात जाऊन आंघोळही करून घेत असत. सर्वांच्या आंघोळी आणि घरातल्या देवांची पूजा झाल्याशिवाय कुणीही काहीही तोंडात टाकायला मनाई होती.

त्या काळात बेकरी किंवा हॉटेलमधून कुठलाही खाद्यपदार्थ कधीही घरी येत नसे, कोणी पाहुणे आले असले तरच पोहे, शिरा, उप्पिट असा एकादा खास पदार्थ केला जात असे. आमची रोजची न्याहारी म्हणजे चटणी भाकरी किंवा थालिपिठाचे एक दोन चतकोर, फोडणीचा भात अशीच असे. त्याचे दोन घास खाऊन आम्ही कुठलाही डबा बरोबर न घेता शाळेला पळत असू.  शाळेतून परत येईपर्यंत चांगली सडकून भूक लागलेली असे आणि दुपारचे जेवण घेतले जाई. त्यानंतर थोडा वेळ टंगळमंगळ करून पुन्हा दुपारची शाळा असे. ती झाल्यावर कधी कधी हातावर एकादा लाडू, वडी किंवा वाटीत चिवडा असे काहीतरी मिळायचे, ते खाऊन खेळायला जायचे ते अंधार पडायच्या आत घरी परत यायलाच पाहिजे असा सक्त नियम होता. रस्त्यावर सगळीकडे अंधारच होत असल्यामुळे तो आपणहूनच पाळला जात असे.  मग परवचे, स्तोत्रे वगैरेंचा घोष करून रात्रीची जेवणे आटोपली की जमीनीवर गाद्या अंथरून त्यावर पाठ टेकायची. उन्हाळ्यात सकाळी लवकर सूर्य उगवतो आणि उशीरा मावळतो आणि थंडीच्या दिवसात याच्या उलट होते त्यामुळे दिवस आणि रात्र लहानमोठे होत असले तरी त्या काळात करायची कामे त्याच क्रमाने होत असत. त्यामुळे उठणे, झोपणे, आंघोळ आणि जेवणखाण या सगळ्या गोष्टी नेहमीच ठरावीक वेळी होत असत आणि जगातले सगळे लोक असेच करत असतील असे मी धरून चाललो होतो. पुढे हॉस्टेलमध्येही खाण्यापिण्याच्या वेळा ठरलेल्याच होत्या, पण अभ्यासासाठी कधी रात्री जाग्रण करणे किंवा पहाटे गजर लाऊन उठणे असे प्रकार सुरू झाले.

शिफ्टमध्ये काम करायला लागल्यावर मात्र सगळ्या गोष्टी पार बदलल्या. पहिल्या पाळीत सात वाजायच्या आधी पोचायचे असल्यामुळे पहाटे साडेपाचलाच घर सोडावे लागे. त्याच्या आधी कसली आंघोळ आणि कुठले खाणे ? एकदम लंचटाइममध्ये जेवण आणि संध्याकाळी घरी गेल्यावर स्नान. दुसरे दिवशी पुन्हा पहाटे लवकर उठायचे असल्यामुळे रात्रीचे भोजन लवकरच घेतले जायचे. दुसऱ्या शिफ्टमध्ये घरी पोचेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असायची आणि सकाळी उठायची घाई नसल्यांमुळे लोळत पडले जायचे. मग सावकाशपणे आंघोळ, खाणेपिणे वगैरे करायचे. तिसऱ्या पाळीत दिवसभर घरी घालवायचा असायचा त्यातच सगळी कामे, खाणेपिणे आणि झोपही घ्यायची. त्यामुळे कसलाच ताळतंत्र किंवा नियमितपणा नसायचा. शिवाय या पाळ्या दर आठवड्याला बदलत असल्यामुळे शरीराचे घड्याळ किंवा बॉडी क्लॉक असे काही असते हे समजायच्या आधीच ते पार विस्कटले होते.


मी कोण आहे ?      भाग ६६

डॉ.होमी भाभा हे एक महान दृष्टे होते आणि त्यांचा भारतीय वंशाच्या लोकांची बुद्धिमत्ता, कौशल्य व क्रियाशीलता यावर पूर्ण विश्वास होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात इथे अगदी साधी साधी यंत्रसामुग्री किंवा उपकरणेसुद्धा तयार होत नव्हती. शिवाय त्या काळात जगभरातच अणुशक्ती हा विषयही अत्यंत संवेदनशील आणि गोपनीय समजला जात होता. त्यासंबंधी साधी माहितीही मिळणे कठीण होते. अशा वेळी डॉ.भाभांनी भारताच्या अणुशक्तीच्या क्षेत्रामधील विकासाचा एक भव्य आराखडा तयार केला होता. त्यात अनेक अणुशक्तीकेंद्रे, त्यासाठी लागणारे इंधन, काही विशिष्ट आधुनिक धातू आणि रसायने, खास प्रकारची यंत्रसामुग्री, उपकरणे वगैरे सर्वांची निर्मिति भारतात करायची योजना होती. यासाठी लागणारे उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञही इथेच तयार करायचे असा आत्मनिर्भरतेचा मार्ग आखलेला होता. या अत्याधुनिक क्षेत्रात जे यश पाश्चिमात्य देशातल्या लोकांनी मिळवले होते ते मिळवणे या देशातल्या लोकांनाही प्रयत्नांती शक्य आहे असा विश्वास भाभांना वाटत होता.

पण सगळ्याच गोष्टी अगदीच शून्यामधून तयार करणे शक्य नसते किंवा सोयीचे नसते. विकसित पाश्चिमात्य जगाच्या मदतीने सुरुवात करून त्यात भारतीयांनी प्राविण्य मिळवायचे हा मार्ग यंत्रोद्योगाच्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये अवलंबला जात होता. अगदी नटबोल्टपासून मोटारगाड्यापर्यंत अनेक वस्तू निर्माण करण्याचे कारखाने फॉरेन कोलॅबोरेशनमधून उभे रहात होते. तशाच विचारातून कॅनडा या देशाच्या सहकार्याने भारतातली सायरस ही प्रमुख अणुभट्टी सुरु केली गेली. अमेरिकेतल्या जनरल इलेक्ट्रिक या कंपनीला तारापूर इथे भारतातले पहिले अणुविद्युतकेंद्र उभारण्याचे काम दिले होते. त्यानंतर राजस्थानमधील रावतभाटा इथे दुसऱ्या प्रकारचे अणुविद्युतकेंद्र बांधायचे काम कॅनडाच्या सहकार्याने केले जाणार होते. मी ट्रेनिंगस्कूलमध्ये प्रवेश केला तेंव्हापर्यंत तारापूरच्या कामात थोडीफार प्रगति झाली होती आणि रावतभाट्याचे काम नुकतेच सुरू झाले होते. पण आपल्यापुढे भरपूर कामांचे डोंगर आहेत याची कल्पना  आम्हाला दिली जात होती.


मी कोण आहे ?      भाग ६७

डॉ.भाभांनी आखून दिलेल्या विशाल आराखड्यानुसार पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यायाठी त्यांनी ट्रेनिंगस्कूल सुरू केले होते. त्यात आमच्या बॅचमध्ये थोड्या जास्तच इंजिनियरांना घेतले होते. आमच्या बॅचमधून दोघा जणांना तारापूरला पाठवून दिले, दहा बाराजणांना राजस्थानातील रावतभाटा इकडे पाठवून दिले आणि पंधरासोळा जणांना बीएआरसीमध्ये अणुभट्ट्यांवर काम करण्यासाठी निवडले होते. त्यातले चारजण आरओडी नावाच्या डिव्हिजनमध्ये घेतले गेले होते त्यांना पुढेसुद्धा तिथले रिअॅक्टर चालवायचे होते आणि आम्ही बाकीचे अकरा बाराजण रिअॅक्टर इंजिनियरिंग डिव्हिजनमध्ये होतो, आम्हाला खरे तर डिझाइनवर काम करायचे होते पण अणुभट्टी कशी असते हे पाहून घेण्यासाठी तिथे पाठवले होते.

त्यावेळी आरईडीमध्ये आधीपासून काम करणारे वीस पंचवीस लोकच त्यांच्या लहानशा ऑफिसात अत्यंत दाटीवाटीने बसत होते आणि आपला बराचसा वेळ वाचनालयात किंवा लेक्चर्स, सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंवर घालवत होते.  आणखी अकरा बारा लोकांना तिथे बसायला रिकामी जागाही नव्हती आणि त्यांना लगेच देता येण्यासारखे काही कामही तिथे नव्हते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्या वेळी आम्ही 'बेंच'वर होतो, पण प्रत्यक्ष बसायला तिथे बेंचसुद्धा उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला विभागून देऊन रिअॅक्टर्समध्ये शिफ्टमध्ये काम करायला पाठवून दिले होते. नियमितपणे तिथे काम करणाऱ्या लोकांना खरे तर आम्ही नकोसे होतो, कारण आम्ही तिथे तात्पुरते थोडे दिवस राहून निघून जाणार होतो. त्यामुळे आम्ही तिथले प्रशिक्षण घेण्यात किती मन लावून लक्ष देऊ याबद्दल त्यांना दाट शंका वाटत होती आणि त्यांना आमचा प्रत्यक्ष कामात फारसा उपयोग नव्हताच. कदाचित आमच्या आधीच्या बॅचमधल्या लोकांचा त्यांना तितकासा चांगला अनुभव आला नसेल आणि त्यामुळे ते पूर्वग्रहदूषित झाले असतील. कारण काहीही असले तरी ते आम्हाला मात्र पहिल्या दिवसापासूनच थोडी सापत्न वागणूक देत होते. 

मोटारीचे ड्रायव्हिंग शिकवतांना ती सुरू कशी करायची आणि कशी थांबवायची ते शिकवतात आणि गीअर्स, क्लच, ब्रेक, अॅक्सलरेटर. स्टीअरिंग व्हील वगैरेंची ओळख करून देऊन त्यांचा उपयोग कसा करायचा याची भरपूर प्रॅक्टिस करवून घेतात. ती करून गाडी चालवायचा आत्मविश्वास आल्यानंतर आरटीओ वाले परीक्षा घेऊन ड्रायव्हिंग लायसेन्स देतात. अणुभट्टीमध्ये मोटारीच्या अनेकपट गुंतागुंतीची तऱ्हेतऱ्हेची यंत्रे असल्यामुळे ती चालवणे शिकायला आणि त्याचे लायसेन्स मिळवायला निदान दोन वर्षांचा काळ लागतो. पण आम्हाला तर पुढे तिथे काम करायचे लायसेन्स घ्यायचे नव्हतेच.  तिथे कशा प्रकारची यंत्रे असतात आणि ती काय कामे करतात हे आम्हाला फक्त समजून घ्यायचे होते, ती चालवण्याचे कौशल्य मिळवायचे नव्हते.  आमची भूमिका ड्रायव्हरची नसून ऑटोमोबाईल इंजिनियरची असायची.  त्यामुळे आमचे माहिती मिळवण्यासाठी खोदून खोदून विचारणे तिथल्या सीनियर लोकांना पसंत पडत नसे. त्यांच्या वागण्यात  थोडासा तुसडेपणा जाणवत असे. नोकरीच्या सुरुवातीलाच होणारा असा थोडासा अप्रत्यक्ष सासुरवास मला बेचैन करत होता, पण महिनाभरात मीही निर्ढावलो.


मी कोण आहे ?       भाग ६८

 सायरस या रिअॅक्टरची काही कॅनडामधून आलेली किंवा तिथे ट्रेनिंगला गेलेल्या भारतीय इंजिनियरांनी लिहिलेली माहितीपूर्ण मॅन्यूअल्स होती आणि फ्लोशीट्सची अनेक ड्रॉइंग्ज होती. त्या रिअॅक्टरसंबंधीची सगळी तांत्रिक माहिती त्यात भरलेली होती. ट्रेनिंग घेणाऱ्या इंजिनियरांनी  त्यांचा कसून अभ्यास करायचा होता. तिथल्या प्रत्येक सिस्टिमसाठी वेगळी अशा पंधरावीस चेकलिस्टा होत्या. त्यांमध्ये अनेक मुद्दे आणि किचकट प्रश्न लिहिलेले होते. काही महिने अभ्यास करून झाल्यानंतर एका वरिष्ठ इंजिनियरसमोर एका शिकाऊ इंजिनियरने बसून त्या वरिष्ठाचे पूर्ण समाधान होईपर्यंत एक एक करून त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे  द्यायची आणि एक एक करून सगळ्या चेकलिस्टा क्लीअर करायच्या असत. एक चेकलिस्ट पास केली म्हणजे ती सिस्टिम त्याला पूर्णपणे चांगली समजली असे होते. त्यासाठी त्यामागे असलेली सगळी थिअरी आणि प्रत्यक्ष काम करतांना आलेले अनुभव, पूर्वी कधीकाळी होऊन गेलेल्या घटना किंवा दुर्घटना वगैरे सगळ्यांची माहिती कसून तपासली जात असे. हे इंटरव्ह्यू टप्प्याटप्प्याने अनेक महिने चालत असत.   

आम्ही नोकरीला लागलो तोपर्यंतच्या काळात झेरॉक्सचा शोध लागलेला असला तरी ते मशीन भारतात तरी प्रचारात आले नव्हते. त्यामुळे पुस्तकातल्या पानांची फोटोकॉपी काढून ठेवणे शक्य नव्हते. सुरक्षेच्या कडक नियमानुसार ती माहिती बाहेर नेणे हा तर अक्षम्य असा गुन्हा होता. डुप्लिकेशनची सोयच नसल्यामुळे कुठलाही दस्तऐवज अत्यंत दुर्मिळ समजला जात असे आणि त्याची जिवापाड काळजी घेतली जात असे. त्याची एक एकच प्रत लायब्ररीत ठेवलेली असे आणि  ती तिथेच बसून वाचायची होती. आरओडीमधल्या इंजिनियरांना ही सगळी माहिती असणे अत्यावश्यक असल्यामुळे आणि प्रत्यक्ष काम करत असतांनाही त्यांची गरज पडत असल्यामुळे ती डॉक्युमेंट्स देण्यात त्यांना प्राधान्य दिले जात असे. आम्ही आरईडीचे ट्रेनी उपरे समजले जात असल्यामुळे आम्हाला ती कधी सहजासहजी मिळतच नसत.  मग आम्ही ती वाचून आत्मसात कशी करणार आणि चेकलिस्टा कशा क्लिअर करणार ? आम्हाला चेकलिस्टसाठी द्यायच्या असलेल्या इंटरव्ह्यूसाठी वरिष्ठांकडून वेळही दिला जात नसे. त्यांना विचारले तर ते म्हणत, "तुम्हाला त्याची काय गरज आहे ? तुम्हाला थोडेच इथे काम करायचे आहे ?"  अशा वातावरणात आम्ही मन लावून फारसे सखोल ज्ञान संपादन कसे करणार? दिवसभर तिथे बसून आजूबाजूला काय चालले आहे ते पहात रहायचे आणि शिफ्ट इंजिनियरने काही विशिष्ट लहानसे काम सांगितले तर ते करायचे अशी आमची साधारण दिनचर्या होती.


मी कोण आहे ?    भाग ६९

मी नोकरीला लागलो त्या काळी म्हणजे १९६७ साली भारतात तरी फारसा दहशतवाद फोफावला नव्हता. अपघातांच्या बातम्या येत असत, पण त्यात सहसा घातपाताची शंका घेतली जात नव्हती. कुठल्याही विमानाचे अपहरण झाले नव्हते. विमानतळावर किंवा कुठेच फारशी कडक 'सुरक्षा जाँच' होत नव्हती. बीएआरसीमध्ये तेंव्हाही त्या मानाने कडक सिक्यूरिटी असली तरी ती आजच्यासारखी नव्हती. तिथून बाहेर जातांना कुणीही कुठलीही वस्तू किंवा गोपनीय माहिती नेऊ नये म्हणून आमच्या बॅगा किंवा थैल्या उघडून दाखवाव्या लागत, कधी कधी तर खिसेसुद्धा चाचपून पाहिले जात असत. कुणाकडेही काही सापडले तर त्याची धडगत नव्हती. त्याची नोकरी तर जाईलच, कदाचित तुरुंगातही जायची वेळ येईल अशी भीती दाखवली जात होती. 

पण कुणीतरी देशद्रोही अतिरेकी आत येऊन घातपात करेल असे मात्र बहुधा कुणाला वाटत नसावे. त्यामुळे आत शिरायच्या वेळी फक्त आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागत असे. कोणी एकाद्या दिवशी ते आणायला विसरला तरी मोठा प्रॉब्लेम नव्हता. बसमधला दुसरा कोणीही मित्र त्याला आपल्यासोबत आत प्रवेश मिळवून देऊ शकत असे. फक्त गेटवर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये दोघांनी आपली नावे लिहून सह्या करणे पुरेसे होते. आजकाल आमच्या बिल्डिंगमध्ये कोणी मला भेटायला आला तर त्याला रजिस्टरमध्ये नोंद करावी लागतेच, शिवाय तिथला गार्ड मला फोन करून परवानगी विचारतो. 

त्या काळात बीएआरसी हे एक प्रकारचे प्रेक्षणीय ठिकाणही होते. दर महिन्यातल्या दोन शनिवारी ठराविक वेळेमध्ये बाहेरच्या लोकांना तिथे भेट देण्याची परवानगी होती. मात्र त्यासाठी अणुशक्ती विभागाच्या मुख्य कार्यालयातल्या पब्लिक रिलेशन्स ऑफिसरकडे प्रार्थनापत्र देऊन त्याची आगाऊ अनुमति घेणे आवश्यक होते. फारशा लोकांना ही माहिती नव्हती, पण तरीही त्या वेळेमध्ये काही लहान लहान गट नेहमीच येत असत. त्यांना ते केंद्र दाखवण्याचे काम आम्हाला दिले होते.


 मी कोण आहे ?       भाग ७०

आज सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण १९६७-६८मध्ये मी जेंव्हा तिथे ट्रेनिंग घेत होतो त्या काळात बीएआरसी हे एक प्रेक्षणीय स्थळ होते आणि अनेक व्हिजिटर्स तिथे फक्त भेट देण्यासाठी येत असत. प्रत्येक महिन्यातल्या दोन शनिवारी त्यांना बीएआरसी पहायला आत येण्याची मुभा होती. त्यासाठी गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेल्या परमाणु ऊर्जा विभागाच्या ऑफिसात जाऊन जनसंपर्क विभागात एक फॉर्म भरून दिला की परवानगी मिळत असे.

बीएआरसीला जाऊन पोचणे मात्र तितकेसे सोपे नव्हते. आज जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते अस्तित्वातच नव्हते. चेंबूर कॉलनीवरून माहूलमार्गे पुढे जाऊन रिफायनरीज आणि टाटा थर्मल पॉवर स्टेशन ओलांडून गेल्यावर बीएआरसीचे गेट येत होते आणि तिथपर्यंत येणाऱ्या फक्त दोन बसेस होत्या. त्या काळात मुंबईत ऑटोरिक्शा नव्हत्याच आणि टॅक्सीही कमीच होत्या. तो रस्ताही खड्ड्यांनी भरलेला होता. आम्हालाच रोज जाता येता खूप त्रास होत असे.

बीएआरसीचा परिसर मात्र फारच रम्य होता. एका बाजूला गर्द वनराईने नटलेला भला मोठा डोंगर, त्याला वळसा घालून वळत वळत जाणारा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला चंद्रभागेसारखा वक्राकार खाडीचा समुद्रकिनारा. त्या किनाऱ्यावर काही समतल जागा होत्या त्यावर थोड्या निरनिराळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा आणि कार्यशाळा बांधल्या होत्या. आता असलेल्या काही मोठ्या इमारती तेंव्हा अजून बांधल्या जात होत्या. होमी भाभा हे मोठे शास्त्रज्ञ होते तसेच मनाने कलाप्रेमी होते. त्यांनी बहुधा प्रथमच लँडस्केप आर्किटेक्ट असे एक पद निर्माण करून त्यावर एका तज्ञाची नेमणूक केली होती. त्या गृहस्थाने डोंगराच्या उतारावर आणि इतरत्र लक्षावधी झाडे लावून जिकडेतिकडे सुंदर लॉन्स आणि बगीचे तयार केले होते. तिथे सगळीकडे सुंदर मनमोहक तसेच प्रेरणादायक दृष्य होते. मुंबईच्या जवळच इतके रम्य ठिकाण असेल हे मुंबईकरांना माहीतच नव्हते.  

पण तिथे येणारे प्रेक्षक ते पहाण्यासाठी येत नव्हते. किंबहुना तिथे लोकांनी निसर्गरम्य ठिकाणची सहल करावी असा उद्देशच नव्हता आणि तिथे येऊन पिकनिक करायला बंदीच होती. प्रयोगशाळा आणि कार्यशाळांमधल्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून तिथेही कुणाला आत जाण्याची परवानगी नव्हती. बीएआरसीमधल्या सायरस या रिअॅक्टरची मोठा डोम असलेली गोल बिल्डिंग नाविन्यपूर्ण आणि प्रसिद्ध होती, अणुशक्तीच्या संदर्भात अजूनही तिचाच फोटो नेहमी दाखवला जातो. तिच्या आतल्या अलीबाबाच्या गुहेत काय काय दडले असेल याचे लोकांना कुतूहल असे आणि ते पहाण्यासाठी ते तिथे येत असत.