Friday, February 05, 2021

चीनमार्गे परतीचा प्रवास

 आजकाल विमानाच्या प्रवासाची तिकीटे इंटरनेटवरूनच काढली जातात आणि त्यांची किंमत ठरलेली नसते. समजा मला आज पुण्याहून बंगलोरला जायचे तिकीट पाच हजाराला मिळाले असेल तर माझ्या शेजारच्या प्रवाशाला कदाचित सहा हजार रुपये मोजावे लागले असतील किंवा त्याला ते तिकीट फक्त चार हजारालाही पडले असेल. 'मेक माय ट्रिप' सारख्या काही कंपन्या हे बुकिंग करतात. आपल्याला कुठून कुठे आणि कधी प्रवास करायचा आहे ही माहिती कांप्यूटरवरून किंवा सेलफोनवरून दिली की त्या तारखेला जात असलेल्या अनेक विमान कंपन्यांच्या विमानाच्या उड्डाणाच्या व पोचण्याच्या वेळा आणि तिकीटाची यादी समोर येते. त्यातला सगळ्यात स्वस्त किंवा सोयिस्कर पर्याय निवडून आपण काय ते ठरवायचे आणि लगेच तितके पैसे क्रेडिट कार्डाने भरून ते बुकिंग करून टाकायचे. परदेशाला जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांच्या दरांमध्ये तर प्रचंड तफावत असते. दोन महिने आधीपासून बुकिंग केले तर ते तिकीट अर्ध्या किंवा पाव किंमतीतही मिळू शकते आणि आयत्या वेळी काढल्यास कदाचित तीन चारपट जास्त पैसे मोजावे लागतात किंवा ते विमान रिकामेच जात असेल तर आयत्या वेळी ते तिकीट अगदी स्वस्तातही मिळू शकते. जे लोक केवळ मौजमजेसाठी दोन चार दिवस कुठे फिरायला जाऊन येत असतात ते अशा दुर्मिळ संधीचा लाभ उठवतात, पण त्यात खूपच अनिश्चितता असते. त्यामुळे आधीपासून ठरवून प्रवासाला जाणारे माझ्यासारखे रिकामटेकडे पर्यटक दोन महिने आधीपासून नियोजन करतात.

मी मागल्या वर्षी अमेरिकेला जाऊन आलो होतो. तिथे तीन महिन्याचा मुक्काम होऊन गेल्यावर मला परतीच्या प्रवासाचे वेध लागले. ख्रिसमसच्या सणाच्या काळात जगभर सगळीकडेच पर्यटकांची गर्दी होत असल्याने विमानांच्या तिकीटांना जास्त मागणी असते आणि अमेरिकेत राहणारे बरेचसे भारतीय लोकही तिथली थंडी टाळून उबदार भारताचा दौरा काढत असतात. त्यामुळे त्या काळात तिकीटांचे दरही वाढलेले असतात. म्हणून तो काळ संपल्यावर म्हणजे जानेवारीच्या अखेरीकडे मी भारतात परत यायचे असे नोव्हेंबरमध्येच ठरले. त्यानुसार निरनिराळ्या तारखांना उपलब्ध असलेल्या तिकीटांची चौकशी करतांना एक प्रचंड सवलतीची डील मिळाली. वीस जानेवारीला लॉस एंजेलिसहून निघून बेजिंगमार्गे मुंबईला जायच्या प्रवासाचे तिकीट फक्त प्रत्येकी साडेतीनशे डॉलर्सला मिळत होते. यावर क्षणभर तरी माझा विश्वासच बसला नाही कारण मी अमेरिकेला जातांना एमिरेट्सच्या विमानाने दुबईमार्गे गेलो होतो तेंव्हा ते सहा सातशे डॉलर्स एवढे होते. माझ्या मुलाने लगेच एअर चायनाची टिकीटे बुक करून टाकली. यात काही फसवाफसवी तर नसेल ना अशी शंका मला आली, पण माझा मुलगा गेली अनेक वर्षे याच कंपनीतर्फे बुकिंग करत आला होता आणि नेहमी त्याला चांगलाच अनुभव आला होता म्हणून तो निर्धास्त होता.

माझ्या मनात लहानपणापासूनच चीनबद्दल संमिश्र भावना होत्या. मी शाळेत शिकतांना भूगोल या विषयात मला चीनबद्दल जी माहिती मिळाली ती अद्भुत होती. आपल्या भारताच्या अडीचपट एवढा विस्तार असलेल्या या अवाढव्य देशात भारताच्या दीडपट एवढी माणसे रहातात, तरी ते सगळे लोक एकच भाषा बोलतात आणि एकाच लिपीत लिहितात हे कसे याचे मला मोठे गूढ वाटायचे. तिथेही काही हजार वर्षांपासून चालत आलेली जुनी संस्कृती आहे आणि हजारो वर्षांच्या इतिहासात तो देश अखंडच राहिला आहे. मुसलमानी आणि युरोपियन लुटारूंच्या धाडींना त्यांनी दाद दिली नाही आणि कडेकडेचा किंवा किनाऱ्यावरला थोडा भाग सोडला तर चीनच्या मुख्य भूमीवर कुणाही परकीयांना कधी कबजा करू दिला नाही. दुसऱ्या महायुद्धातला अगदी थोडासा काळ सोडला तर इतर सर्व काळ हा संपूर्ण देश स्वतंत्रच राहिला होता. कम्युनिस्टांनी आधी रशीयाची मदत आणि शस्त्रास्त्रे घेऊन उठाव केला आणि हा देश जिंकून घेऊन आपली सत्ता स्थापित केली, पण रशीयाच्या सैनिकांना तिथे शिरकाव करू दिला नाही. चीनने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून धरले होते एवढेच नव्हे तर थोड्याच कालावधीत रशीयाचे बहुतेक सगळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेतले होते.  त्या काळात भारताचे चीनबरोबरचे संबंध चांगले होते. माओझेदुंग आणि चौएनलाय या दुकलीने भारताला भेट दिली तेंव्हा त्यांचे प्रेमाने स्वागत केले गेले होते आणि "हिंदी चीनी भाई भाई" च्या घोषणा दिल्या गेल्या होत्या.  कम्युनिस्टांच्या राज्यात तिथल्या जनतेवर प्रचंड दडपशाही केली जात होती असे काहीसे ऐकले असले तरी मला लहान वयात त्याचा अर्थ समजत नव्हता. त्यामुळे लहानपणी मला तरी चीनबद्दल कौतुक, गूढ आणि आकर्षण वाटत होते.  

१९६२ साली चीनने विश्वासघात करून सीमाप्रदेशावर आक्रमण केले आणि तेंव्हा झालेल्या लढाईत भारताचे अनेक जवान मारले गेले, तसेच आपल्या देशाची नाचक्की झाली. यामुळे चीन हा एकदम एक नंबरचा शत्रू झाला आणि ते देश व तिथले लोक यांच्याबद्दल मनात द्वेष निर्माण झाला तो जवळजवळ कायमचा. मध्यंतरीच्या काळात तो राग हळूहळू कमी होत होता, पण गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि सीमेवर झालेल्या चकमकींमुळे तो आता पुन्हा वाढत गेला आहे. 

असे असले तरी मी मुंबईला रहायला गेल्यावर आधी गंमत म्हणून तिथल्या चिनी हॉटेलांमध्ये जाऊन चिनी खाद्यपदार्थ खात होतो. पुढील काळात सरसकट सगळ्याच हॉटेलांमध्ये चायनीज अन्न मिळायला लागले, इतकेच नव्हे तर त्याचा थेट आमच्या स्वयंपाकघरातही प्रवेश झाला. परदेशांमध्ये तर  बहुतेक सगळीकडे मला चायनीज फूड मिळत असे आणि ते सर्वात जास्त आवडत असे. मी पश्चिम अमेरिका दर्शनाची लहानशी ट्रिप केली होती ती एका चिनी कंपनीने काढली होती आणि त्यातले निम्म्याहून जास्त पर्यटक चिनी होते. त्यातले किती चीनमधून आलेले होते आणि किती अमेरिकेत स्थाईक झालेले चिनी होते कोण जाणे. पण त्यांच्यासोबत फिरतांना ना मला शत्रुत्व वाटले होते, ना त्या लोकांना.  गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातल्या सगळ्या बाजारपेठांमध्ये जिकडे तिकडे चीनमधून आलेल्या वस्तू प्रचंड प्रमाणात दिसत होत्या आणि त्या कमालीच्या स्वस्त भावाने विकल्या जात असल्यामुळे हातोहात खपत होत्या आणि घरोघरी जाऊन पोचत होत्या. इतकेच नव्हे तर मी कामानिमित्य ज्या कारखान्यांमध्ये जात होतो तिथेही यंत्रसामुग्री आणि कच्चा माल वाढत्या प्रमाणात चीनमधून यायला लागला होता.  या सगळ्यांमुळे मला चीनविषयी अधिकाधिक कुतूहल वाटायला लागले होते. 

माझ्या आयुष्यातल्या बहुतेक कालखंडामध्ये चीन हा देश बांबूच्या दाट पडद्याआड दडला होता आणि परकीय पर्यटकांना तिथे प्रवेश नव्हता, त्यामुळे मी कधी चीनला जाण्याचा विचारही करू शकत नव्हतो. पण पंधरावीस वर्षांपूर्वी चीनने आपली धोरणे बदलली आणि अर्थव्यवस्था थोडी मुक्त करून युरोपअमेरिकेतील भांडवलदारांना चीनमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिली. त्यानंतर अनेक लहानमोठ्या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने स्थापन केले, ऑफीसे उघडली आणि त्यानिमित्याने अनेक लोक चीनला जाऊन यायला लागले. काही प्रमाणात पर्यटकांचेही जाणेयेणे सुरू झाले. माझ्या माहितीतलेही काही लोक चीनचा दौरा करून आले. पण आता वयोमानाने माझ्यातच फिरायचे त्राण उरले नसल्यामुळे मला ते शक्य नाही. त्यामुळे असा अचानक चीनमार्गे प्रवास करायचा योग आला याचा मला मनातून थोडा आनंदच झाला. खरे तर वाटेत दोन दिवस बैजिंगला मुक्काम करून फिरायला मला आवडले असते, पण ते शक्य नव्हतेच. निदान तिथला विमानतळ तरी पहायला मिळेल, आभाळातूनच थोडे दर्शन घडेल आणि जमीनीवर आपले पाय टेकतील एवढे तरी होईल याचेच समाधान.

काही दिवसांनी आमच्याकडे भारतातला एक पाहुणा आला. त्याला आयटी उद्योगातला उदंड अनुभव होता आणि त्याने अनेक वेळा निरनिराळ्या मार्गांनी पृथ्वीप्रदक्षिणा केलेली होती. त्यात चीनमार्गे केलेला प्रवासही होता. तो म्हणाला, " ते ठीक आहे, पण तुम्ही जेवणाचे काय करणार आहात?"

मी म्हंटले, " मस्त दोन वेळा चायनीज फूड खाऊ, मला तर खूप आवडते."

त्यावर तो म्हणाला, "अहो आपण पुण्यामुंबईला किंवा इथे अमेरिकेत जे चायनीज खातो तसले काही खरे चिनी लोक खातच नाहीत.  ते लोक मीट म्हणून जे काय खायला घालतील त्याचा भयंकर वाससुद्धा तुम्हाला सहन होणार नाही. तुम्ही आपले तुमच्यासाठी 'हिंदू फूड' बुक करा." असा सल्लाही त्याने दिला.  

आम्ही तो ऐकून घेतला, पण त्यावर काही कारवाई केली नाही, कारण माझी सून एकदा चायना ए्रअरने प्रवास करून आली होती आणि ती तर पक्की शाकाहारी होती. ब्रेड, भात, बटाटे असे काही ना काही पोटभर अन्न तिला प्रवासात मिळाले होते.   

वीस जानेवारीला आमचे उड्डाण होते. त्यासाठी आधी काही चौकशी करायची गरज आहे का असे मी मुलाला विचारले, पण त्याला पूर्ण खात्री होती. एक दोन दिवस आधी विमानकंपनीकडून का ट्रॅव्हलएजंटकडूनच आम्हाला स्मरणपत्र आले आणि तयार रहाण्याची सूचना आली.  मी आपले सगळे कपडे आणि औषधे वगैरे इतर सामान माझ्या बॅगेतच ठेवले होते. रोजच्या वापरातले कपडे हँगरला टांगले होते. ते गोळा करून बॅगेत ठेवायला तासभरसुद्धा लागला नसता. मी स्वतःसाठी अमेरिकेत काहीच खरेदीही केली नव्हती कारण मला लागणारे सगळे काही इथे पुण्यातच मिळते हेही मला ठऊक होते. पण भारतातल्या इतर नातेवाईकांना देण्यासाठी काही खेळणी, कॉस्मेटिक्स, खाऊ आणि इतर काही सटरफटर लहानशा गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या त्या सगळ्या वस्तूंना कपड्यांबरोबर अॅडजस्ट करून प्रवासाच्या बॅगा भरल्या.  

ठरल्याप्रमाणे वीस जानेवारीला आम्ही लॉसएंजेलिस विमानतळाकडे जायला निघालो. विमानतळावरच काही बांधकाम सुरू केले होते आणि तिथे जाणारा मुख्य रस्ताच वहातुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे टॅक्सीवाल्याने वळसा घालून आम्हाला विमानतळाच्या दुसऱ्या भागात नेऊन सोडले. त्यात थोडा जास्तीचा वेळ खर्च झाला, पण थोडी घाई करून आम्ही आमच्या विमानाच्या निर्गमन स्थानावर वेळेवर जाऊन पोचलो. त्या भागात गेल्यागेल्याच मला चीनमध्ये गेल्याचा भास झाला. आमच्या चहूबाजूला सगळे चिनीच दिसत होते. कॅलिफोर्नियामध्ये चीन, जपान, कोरिया या भागातून आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यातले काही लोक चीनला जायला निघाले असतील, तसेच चीनमधून अमेरिकेला फिरायला आलेले लोक परत जात असतील अशा लोकांमध्ये सगळे आपल्याला तर सारखेच दिसतात. तसे थोडे गोरे किंवा काळे अमेरिकन आणि भारतीय वंशाचे लोकही होते, पण ते सगळे मिळून पंधरावीस टक्के असतील. 

आम्ही ज्या ठिकाणी बसलो होतो तिथे आमच्या समोरच शाळेतल्या मुलामुलींचा एक घोळका बसला होता आणि किलबिलाट करत होता. आठदहा वर्षाची ती गोल गोबऱ्या चेहेऱ्याची गुटगुटित मुले खूपच गोड दिसत होती. ती वीसपंचवीस मुले आईवडिलांना सोडून शिक्षकांच्या सोबतीने चीनच्या सहलीला निघाली असावीत किंवा चीनमधून अमेरिकेला येऊन आता परत मायदेशी चालली असावीत. त्यांच्या धिटाईचेच आम्हाला कौतुक वाटले. प्रत्येकाच्या हातात एक लेटेस्ट मॉडेलचा सेलफोन होता आणि ती त्यावर काही तरी आजूबाजूच्या मुलांना चढाओढीने दाखवत होती आणि ते पाहून खिदळत होती. मधून मधून त्यांचा गाईड त्यांना काहीतरी सूचना देत किंवा दटावत होता. मला त्यातले अक्षरही समजत नव्हते, पण पहाण्यतच मजा येत होती आणि वेळ चांगला जात होता.

विमानत जाऊन बसायला ठरवून दिलेल्या वेळेला अजून दहापंधरा मिनिटे अवकाश असतांनाच काही लोकांनी गेटच्या दिशेने रांगेत उभे रहायला सुरुवात केली आणि ते पाहून मला भारताची आठवण झाली. आमची जी सीट ठरलेली होती तीच आम्हाला मिळणार होती, आधी विमानात शिरून जागा पकडायचा प्रश्नच नव्हता. तरीही लोक का घाई करतात ते मला काही समजत नाही. म्हणून आम्ही आपल्या जागी शांतपणे बसून राहिलो होतो. पण ती रांगच मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत वाढत आमच्यापर्यंत आली तेंव्हा नुसते उठून उभे राहिलो आणि पाय मोकळे करून घेतले.  तेवढ्यात ती रांग पुढे सरकायलाही लागली आणि आम्ही सगळे आपापल्या जागेवर जाऊन स्थानापन्न झालो. ती गोड चिनी बालके मात्र अदृष्य झाली होती. त्यांना विमानाच्या वेगळ्या भागात जागा दिली गेली असणार आणि बहुधा आधी आत नेऊन बसवले असावे.

ते एक महाकाय जंबो जेट होते, तरीही त्यातल्या सगळ्या म्हणजे चारपाचशे जागा भरल्या असल्यासारखे दिसत होते. आमच्या आजूबाजूला तसेच मागेपुढे सगळे चिनीच होते. त्यांच्याशी काही संवाद साधायचा प्रश्नच नव्हता आणि मी तसा प्रयत्नही केला नाही.  समोरच्या स्क्रीनवर काय काय दिसते ते पहायचा प्रयत्न केला, पण तो स्क्रीन, त्याची बटने आणि त्यावर दिसणारी हलणारी चित्रे या कशाचीच क्वालिटी वाखाणण्यासारखी नव्हती, त्यामुळे जे दिसेल ते कसेबसे पहावे लागत होते. मी घरी येईपर्यंत त्यातले काहीसुद्धा माझ्या लक्षात राहिले नाही. आता तर त्यात कुठले प्रोग्रॅम होते हेसुद्धा आठवत नाही.

विमानात ठरल्याप्रमाणे जेवणे आणि नाश्ते मिळाले ते अगदीच काही वाह्यात नव्हते. चिकन किंवा फिश मागून घेता येत होते त्यामुळे बैल, उंदीर किंवा बेडूक असे काही खायची वेळही आली नाही की नुसते उकडलेले बटाटेही खावे लागले नाहीत. विमानप्रवासात कुठेच झणझणीत पदार्थ देत नाहीत. सगळीकडे मिळतात तितपत सौम्य किंवा बेचव जेवण या विमानप्रवासातही मिळाले. आमच्या मित्राने घातलेली भीती सत्यात उतरली नाही. 

लॉसएंजेलिसहून निघाल्यावर आम्ही पश्चिमेच्या दिशेने पॅसिफिक महासागरावरून झेप घेऊ अशी माझी अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात आमचे विमान उत्तरेकडेच झेपावले आणि अमेरिकेच्या भूप्रदेशावरूनच पुढे जात राहिले. मला खिडकीजवळची सीट मिळाली नसल्याने बाहेरचे फारसे दिसत नव्हतेच, पण दूर क्षितिजावरसुद्धा पाणी दिसत नव्हते.  पृथ्वी गोलाकार असल्यामुळे उत्तरेच्या दिशेनेही आपण दुसऱ्या गोलार्धात जाऊ शकतो याचा अनुभव मी या आधीही घेतला होता, तसा  या प्रवासातही आला. आमच्या विमानाने पुढे गेल्यावर कुठेतरी वळून पॅसिफिक महासागर ओलांडलाही असेल, पण ते माझ्या लक्षात आले नसेल. 

आम्ही बैजिंगच्या जवळपास पोचलो तोपर्यंत तिथला स्थानिक सूर्यास्त व्हायची वेळ झाली होती आणि प्रत्यक्ष तिथे पोचेपर्यंत तर अंधारच पडला. त्यामुळे त्या शहराचे फारसे विहंगम दर्शन झालेच नाही. तिथे उतरल्यानंतर पुढे मुंबईला जाणारे विमान पकडण्यासाठी आमच्याकडे दीड तासांचा वेळ होता. त्यामुळे इकडेतिकडे रेंगाळायला जास्त फुरसत नव्हती. तरीही आपण ट्रान्जिट लाउंजमध्ये जाऊन आधी पुढील विमानाचे गेट पाहून घेऊ आणि बैजिंगची आठवण म्हणून एकादी शोभेची वस्तू विकत घेऊन तिथला चहा किंवा कॉफी प्यायला वेळ मिळेल असे मला वाटले होते. 

सर्व प्रवाशांबरोबर विमानातून उतरल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चालायला लागलो. मी आतापर्यंत जेवढे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले आहेत त्या सगळ्या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी ठळक अक्षरातले इंग्रजी बोर्ड जागोजागी लावलेले पाहिले होते, पण बैजिंगला ते सापडतच नव्हते. आमच्या विमानातले बहुतेक प्रवासी बहुधा शहरातच जाणार हे मला अपेक्षित होतेच, पण ट्रँजिट लाउंज किंवा इंटरनॅशनल कनेक्शन्सकडे जाणारा रस्ता असा बोर्डच कुठे दिसला नाही. विचारपूस करायला कोणता काउंटरही नव्हता. सगळ्या प्रवाशांबरोबर बाहेर जाणाऱ्या रस्त्यावरून पुढे जात असतांना एक युनिफॉर्म घातलेली महिला दिसली. ती बहुधा गर्दीवर लक्ष ठेवणारी सिक्यूरिटीवाली असावी. तिलाच आम्ही मुंबईला जायच्या विमानाकडे जायची वाट विचारली. भाषेचा प्रॉब्लेम तर होताच. त्यामुळे तिला आमचे बोलणे कळले की नाही ते ही आम्हाला समजत नव्हते. पण तिने एका बाजूला बोट दाखवले आणि आम्ही त्या बाजूला वळून चालायला लागलो.

त्या अरुंद रस्त्यानेही बरेच प्रवासी पुढे जात होते, त्यांच्या मागोमाग पुढे गेल्यावर तिथे एक सिक्यूरिटी चेक लागला. कदाचित दुसऱ्या देशांमधील सुरक्षातपासणीवर चिनी लोकांचा विश्वास नसावा. त्यामुळे विमानातून आलेल्या प्रवाशांनीसुद्धा पुढल्या विमानात शिरायच्या आधी तिथल्या सिक्यूरिटीमधून जाणे आवश्यक होते. रांगेमध्ये शंभरावर लोक होते आणि फक्त दोनच एक्सरे मशीने होती. त्यांचे कामही सावकाशपणे चाललेले होते. तिथे गेल्यावर अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट आणि खिशातल्या सगळ्या वस्तू काढून ट्रेमध्ये ठेवल्या, एका सैनिकाने पायापासून डोक्यापर्यंत अगदी कसून तपासणी केली आणि पुढे जायची परवानगी दिली. पुन्हा सगळे कपडे अंगावर चढवून आणि पर्स, किल्ल्या, घड्याळ, मोबाईल वगैरे गोष्टी काळजीपूर्वक जागच्या जागी ठेवायचे सोपस्कार केले. 

तोपर्यंत एक तास होऊन गेला होता आणि पुढे जाणारे विमान कुठे मिळेल हेही आम्हाला अजून समजले नव्हते. इकडे तिकडे पहातांना एका ठिकाणी सगळ्या फ्लाइट्सची यादी दिसली त्यावरून आम्हाला प्रस्थान करायचे गेट समजले. ते गेट कुठे आहे हे शोधून काढून तिथे जाऊन पोचेपर्यंत आमच्या फ्लाइटचे बोर्डिंग सुरू होऊन गेले होते. आता कुठले सोव्हनीर आणि कुठली कॉफी? तिथे आजूबाजूला कसली दुकाने आहेत, ती आहेत तरी की नाहीतच हेसुद्धा पहायला वेळ नव्हता. आम्हीही घाईघाईने विमानात जाऊन बसलो. 

या विमानातले बहुसंख्य प्रवासी भारतीय होते. त्यामुळे एक वेगळा फील आला. हे विमान लहान आकाराचे असले तरी एअर चायनाचेच असल्यामुळे तिथली सर्व्हिसही पहिल्या विमानासारखीच होती. तसेच स्क्रीन, त्यावर तसलेच व्हीडिओ, तशाच हवाई सुंदरी आणि तसेच जेवण होते. बाहेर सगळा अंधारगुडुपच होता.  थोडे स्क्रीनकडे पहात आणि थोड्या डुलक्या घेत वेळ काढला. स्थानिक वेळेनुसार रात्रीचे एक दीड वाजता मुंबई विमानतळ जवळ आल्याची आणि थोड्याच वेळात विमान खाली उतरणार असल्याची घोषणा झाली आणि त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या त्याबरोबर एक खास आणि वेगळी सूचना दिली गेली. "जर कोणता प्रवासी वूहानहून आला असेल आणि त्याला ताप किंवा सर्दीखोकला असेल तर त्याने मुंबई विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्याला भेटावे." असे त्यात सांगितले गेले. आम्हाला त्याचे थोडे नवल वाटले, पण आम्हाला तर वूहान नावाची एक जागा आहे हेसुद्धा माहीत नव्हते आणि आम्ही तर थेट अमेरिकेतून आलो असल्यामुळे ती सूचना आम्हाला लागू होत नव्हतीच. पण हा काय प्रकार असेल याचा पत्ता लागत नव्हता.

मुंबई विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशन काउंटरकडे जायच्या रस्त्यावर एक मोठा उभा बोर्ड ठेवला होता आणि त्यावर 'करोनाव्हायरस' असा मथळा होता. ते वाचून मला पहिल्यांदा हा शब्द समजला. पुढे तो सगळ्यांच्या जीवनात इतके थैमान घालणार असेल याची मात्र तेंव्हा पुसटशी कल्पनाही आली नाही. त्या बोर्डावर खाली बरेच काही लिहिले होते, पण ते वाचायला त्यावेळी कुणाकडेच वेळ नव्हता. त्या काळात रात्रीच्या वेळी परदेशांमधून अनेक विमाने मुंबईला येत असत. त्यामुळे इमिग्रेशन काउंटरसमोर ही भली मोठी रांग होती. त्यातून पुढे सरकत सरकत आमच्या पासपोर्टची पाहणी झाल्यावर आम्ही सामान घ्यायला गेलो. 

आम्हाला उशीर झाल्यामुळे आमच्या विमानातले थोडे सामान आधीच येऊन कन्व्हेयर बेल्टवर आले होते आणि काही सामान कुणीतरी उचलून बाजूला काढून ठेवले होते.  परदेशातून आल्यावर बेल्टवरली आपली बॅग ओळखणे हेही एक मोठे दिव्य असते. एक तर आपण असल्या अवाढव्य बॅगा एरवी कधी कुठेच नेत नाही, त्यामुळे त्यांचे रंग, आकार वगैरे आपल्या ओळखीचे नसतात आणि इतर अनेक प्रवाशांकडेही तशाच दिसणाऱ्या बॅगा असतात. म्हणून आपली बॅग ओळखून येण्यासाठी मी त्यांवर मोठी लेबले चिकटवतो, त्यांना रंगीत रिबिनी बांधतो अशा खुणा करून ठेवतो, पण वाटेत बॅगांची जी आदळआपट होते त्यात कधीकधी त्या खुणा नाहीशा होण्याचीही शक्यता असते. 

आम्ही आमच्या बॅगा शोधल्या, त्यात आमच्या दोन बॅगा आम्हाला सापडल्या आणि दोन सापडल्याच नाहीत. आता त्या आल्याच नाहीत की भामट्यांनी पळवून नेल्या हे कळायला मार्ग नव्हता. आम्ही एअरलाइन्सच्या काउंटरवर चौकशी करायला गेलो. तिथे बॅगा न मिळालेले वीसपंचवीस प्रवासी तावातावाने भांडत होते. काउंटरवाल्या माणसावर जोरजोरात ओरडत होते. तो तरी काय करणार?  सगळे ऐकून घेत होता. थोडी शांतता झाल्यावर त्याने सगळ्यांना एकेक फॉर्म दिला आणि तो भरून द्यायला सांगितले. आपले नावगाव, पत्ता, फ्लाइट नंबर, सामानाच्या रिसीटचे नंबर वगैरे सगळा तपशील भरून आम्ही तो फॉर्म परत दिला. तोपर्यंत त्याच्याकडे विमानकंपनीकडून काही माहिती आली होती त्यात बैजिंगलाच राहून गेलेल्या सामानाचा तपशील होता. आमच्या नशीबाने त्यात आमच्या बॅगाही होत्या असे वाटले आणि थोडा धीर आला.  

ते सामान पुढच्या फ्लाइटने मुंबईला पाठवतील असे आश्वासन मिळाले, पण बैजिंगहून मुंबईला येणारे पुढचे विमान तीन दिवसांनंतर येणार होते. पण आम्हाला तर पुण्याला जायचे होते, मुंबईत राहणे शक्यच नव्हते.  मग आमचे सामान कूरियरने पुण्याला पाठवले जाईल असे सांगून त्याने आमचा पुण्याचा पत्ता लिहून घेतला. या गोंधळामध्ये आणखी तासदीडतास गेला. पण जास्त सामान नसल्यामुळे कस्टममध्ये वेळ लागला नाही. आम्ही ग्रीन चॅनेलमधून लवकर बाहेर आलो. आम्ही पुण्याला जाण्यासाठी गाडी बुक केलेली होतीच आणि तिचा सज्जन ड्रायव्हर आमची वाट पहात थांबला होता. पुढे मात्र आम्ही दिवस उजाडेपर्यंत सुरळीतपणे पुण्याला घरी येऊन पोचलो आणि एकदाचे हुश्श म्हंटले. तीन दिवसांनंतर आमचे राहिलेले सामानही आले.  

अमेरिकेतले लोक सहसा घरात वर्तमानपत्रे घेतच नाहीत.  मी तिथे असतांना रोज टीव्हीवरल्या बातम्यासुद्धा पहात नसे. अधून मधून जेंव्हा ऐकल्या होत्या त्यात कधीच करोनाव्हायरसचा उल्लेखही झाला नव्हता. २० जानेवारी २०२० रोजी आम्ही लॉसएंजेलिस विमानतळावर चांगले दीडदोन तास बसलो होतो किंवा इकडेतिकडे फिरत होतो. तिथून तर दररोज कितीतरी विमानांची बैजिंग किंवा शांघायला उड्डाणे होत असतात, पण तिथेही या साथीच्या वृत्ताचा मागमूससुद्धा नव्हता. कुठेही मुंबईतल्यासारखा बोर्ड नव्हता आणि कोणीही प्रवासी मास्क लावून बसले नव्हते. बैजिंगच्या विमानतळावरसुद्धा आम्हाला काही वेगळे जाणवले नाही. तिथे काही लोकांनी मास्क लावलेले दिसले, पण त्या लोकांना काही त्रास असेल किंवा प्रदूषणामुळे त्रास होण्याची भीती वाटत असेल असे मला त्यावेळी वाटले असेल. खरे तर आम्हाला त्याबद्दल विचार करायला सवड नव्हती. त्यामुळे २२ जानेवारीला मी मुंबईला येऊन पोचेपर्यंत कोरोना हे नावही ऐकले नव्हते. 

 मी पुण्याला आल्यावर मात्र रोजच्या वर्तमानपत्रात त्याविषयी उलटसुलट काहीतरी छापून आलेले समोर येत होते. त्या काळात तो फक्त चीनमधल्या वूहान या शहरापुरताच मर्यादित होता, पण तिथे तो झपाट्याने वाढत होता आणि टीव्हीवर दाखवली जाणारी त्या शहरातली दृष्ये भयानक असायची.  आम्हा दोघांना सर्दीखोकला, ताप असले काही लक्षण नसल्यामुळे आम्ही बचावलो अशी खात्री होती, पण पुढे बातम्यांमध्ये असे यायला लागले की ती लक्षणे २-३ दिवसांनंतर दिसायला लागतात. आम्ही इथे येऊन पोचल्याच्या २-३ दिवसानंतर हा कालावधी क्रमाक्रमाने ४-५, ७-८, १०-१२ दिवस असा वाढतच गेला आणि त्याप्रमाणे आमच्या मनातली सुप्त भीतीही रेंगाळत राहिली. शिवाय असेही समजले की ज्याला अजीबात लक्षणे कधी आलीच नाहीत असा माणूससुद्धा संसर्गाचा वाहक असू शकतो.  त्यामुळे मी शक्यतो स्वतःला इतरांपासून दूर दूरच ठेवत राहिलो. मी चीनमार्गे प्रवास केला आहे असे कुणाला सांगायचीही सोय राहिली नव्हती.  त्यामुळे मी तो विषयच टाळत राहिलो. यातून पूर्णपणे मुक्त व्हायला जवळजवळ महिनाभर लागला, पण त्यानंतर लवकरच हा कोरोना इतर मार्गांनी भारतात आलाच आणि सगळा देश लॉकआउट झाला. त्यातून तो आजवर पूर्णपणे सावरलेला नाही. 

थोडक्यात सांगायचे झाल्यास चीनमार्गे भारतात परत येण्याच्या प्रवासात किंवा त्यानंतर मला तसा काही त्रास झाला नाही. तो सुरळीतच झाला असे म्हणता येईल, पण त्यात काही मजा मात्र आली नाही आणि तो संस्मरणीय वगैरे काही झाला नाही.