Thursday, April 30, 2009

महाराष्ट्र गीते -१,२, ३

महाराष्ट्र गीत - १

उद्यापरवा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने तीन जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे ।
आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे ।
अटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे ।
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ।
पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे ।
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे ।
रमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

नग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे ।
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरीपटका भगवा झेंडाही डोलती ।
धर्म राजकारण समवेत चालती ।
शक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो ।
स्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो ।
वचनी लेखनीही मराठी गिरा दिसो ।
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो ।
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा ।
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

कवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
---------------------------------------------------------------

महाराष्ट्र गीत - २

दुस-या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा ।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।
अंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा ।
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ।
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्थासी ।
वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।

अपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा ।
सह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा ।
पाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा ।
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा ।
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची ।
मंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची ।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी ।
जोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी,वैभवासी, वैराग्यासी ।
जरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा ।
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।।


..... गोविंदाग्रज

-------------------------------------------------------------------

महाराष्ट्र गीत - ३

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
निढळाच्या घामाने भिजला ।
देशगौरवासाठी झिजला ।
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

कवि - राजा बढे
संगीत नियोजन - श्रीनिवास खळे
स्वर - शाहीर साबळे

Tuesday, April 28, 2009

मराठी दिवस

लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे। या निमित्याने मी मराठी दिवस या विषयावर लिहिलेला लेख देत आहे. दर वर्षी मराठी दिवस पाळला जातो. पण कोणते लोक आणि कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही. मातृभाषेच्या अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. पण या बाबतीतले एकंदरीत औदासिन्य पाहता कांही लोक सातत्याने मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.

सन १९२२ मध्ये कवीराज माधव ज्यूलियन यांनी लिहिलेल्या "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती, त्यासोबतच "नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे" अशी आशा व्यक्त केली होती. तसेच आम्ही ते करून दाखवू असा आत्मविश्वास प्रकट केला होता. त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्‍हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून "मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।" अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

नेहमीप्रमाणेच मी अशा टोकाच्या विचारांबरोबर सहमत होऊ शकत नाही. माझ्या मते साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे शुध्द मराठी लिहिण्या वाचण्याच्या बाबतीत प्रचंड वाढ झालेली आहे. जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात आले तर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. ज्या इंग्रजीच्या नांवाने सारखे खडे फोडले जातात तिच्यात रोज असंख्य नवनव्या शब्दांची भर पडते आहे. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच. आजकाल जीवनचर्येतला बदल फार झपाट्याने होत आहे, त्यामुळे भाषेत होणारा बदल लगेच जाणवतो एवढेच. मला तर त्याबद्दल फारशी काळजी वाटत नाही.

'आठवणीतली गाणी'च्या सौजन्याने माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. निदान कांही अंशाने त्यातल्या आकांक्षा पूर्ण होतील अशी मला आशा वाटते.
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्‌मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।

माधव ज्यूलियन

Monday, April 27, 2009

ग्रँड युरोप - भाग ९ : इटलीचा ग्रामीण भाग


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : इटलीचा ग्रामीण भाग


इटालियन भाषेतील 'रोमा' ते 'पिसा' आणि 'पिसा' ते 'फिरेंझे'पर्यंत प्रवास करतांना आम्ही दिवसभर त्यांच्या 'कंट्रीसाईड' मधून म्हणजेच ग्रामीण भागातून जात होतो. शहरातल्यासारखेच सरळ व रुंद पक्के रस्ते, वीज, पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, करमणुकीची व खेळाची साधने इत्यादी सगळे कांही युरोपातील खेड्यांमध्येही उपलब्ध असते, तेथील घरेसुद्धा आकाराने कदाचित लहान असतील, संख्येने नक्कीच कमी असतील पण ती सर्व सुखसोयींनी युक्त पक्की घरे असतात, तिथे कुठेही झोपड्या, अस्ताव्यस्तपणा, कच-याचे ढीग वगैरे दिसत नाहीत हे सगळे मी वीस बावीस वर्षापूर्वीच पाहिले होते. आता शहरात गगनचुंबी इमारतींची संख्या बरीच वाढली आहे, वाहतूक तर बेसुमार वाढली आहे व तिला तोंड देण्यासाठी जागोजागी उड्डाणपूल नाहीतर भुयारी मार्ग बनवले गेले आहेत एवढाच फरक मधल्या दोन दशकात पडला आहे.
आपल्याकडे परंपरागत परकर पोलके, घाघरा चोली, सलवार कमीज, नऊ वार लुगडी, सहा वार साड्या, त्यातही उलटे सुलटे पदर घेण्याच्या पद्धती आणि आधुनिक फ्रॉक, स्कर्ट, जीन्स, टॉप्स वगैरेचे वैविध्य असल्याने लोकांच्या समूहाकडे पाहून आपण कुठे आहोत याचा अंदाज बांधता येतो. युरोपमध्ये मात्र शहरात व खेड्यात राहणा-या लोकांच्या पोशाखात जाणवण्याजोगा फरक तेंव्हाही नव्हता व आताही नसावा. नसावा म्हणण्याचे कारण एवढेच की या वेळेस मला खेड्यातली माणसे कुठे दिसलीच नाहीत. शहरात फिरतांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, पर्यटनस्थळ अशा जागी मोठ्या संख्येने माणसांचे दर्शन घडत असे, पण ग्रामीण भागातील हायवेवरून आमची बस जात असतांना तेथील रस्त्यांवरून पायी चालतांना कोणी दिसतच नव्हते. सगळे लोक आपापल्या कारमधूनच हिंडत असणार आणि शेतात गेले तर ट्रॅक्टरवर स्वार होत असतील. उन्हातान्हात काबाडकष्ट करून आपल्या घामाच्या धारांनी जमीनीचे सिंचन करणारा शेतकरी तिकडे आता अदृष्यच झाला असावा. जितकी शेती दिसली ती सगळी यांत्रिक
पद्धतीनेच केली जात होती. जणु कांही ते धान्य पिकवण्याचे कारखानेच असावेत असे वाटते. शेतांमधून यंत्रांना फिरवणे सोपे जावे यासाठी सरळ रेषेमधील बांध वा कुंपणे
घालून चौरस वा आयताकृती आकाराची शेते केलेली होती. त्यात मध्ये कडमडणारी झाडे नव्हती. झाडांझुडुपांसाठी वेगळे प्लॉट ठेवलेले होते. इटलीमध्येच काय, पण युरोपभरात कोठेही बैल किंवा घोडा जोडलेला नांगर किंवा गाडी दिसली नाही. शेतात काम करणारी माणसेसुद्धा क्वचितच दिसली. ट्रॅक्टरच्या वापराने सगळी कामे फारच वेगाने होत असल्यामुळे त्यांना दिवसरात्र राबण्याची गरज पडत नसावी. ज्या शेतांमध्ये कापणी झालेली होती त्यात प्लॅस्टिकच्या मोठमोठ्या रोलमध्ये कांहीतरी भरून ठेवलेले
दिसत होते, तो बहुधा चारा असावा. हार्वेस्टरमधून निघालेले धान्य सरळ कोठारात भरले जाते. कुठेच कसलीही उघडी रास किंवा ढीग दिसत नव्हता.
इटलीमधील हमरस्त्यावरून जातांना दोन्ही बाजूला सुंदर दृष्य होते. इटली हा डोंगराळ प्रदेश असल्याने तेथे नजर पोचेपर्यंत पसरलेली विस्तीर्ण शेते फारशी नव्हती. लागवडीखाली आणलेल्या जमीनीइतकाच भाग जंगलांनी व्यापलेला दिसत होता. त्यात कांही नैसर्गिक वनराई होती तर कांही जागी एकाच प्रकारची झाडे रांगांमध्ये दिसत होती. डोंगर असो वा सपाट प्रदेश, सगळा हिरवा गर्द होता. त्यात आपल्याकडच्या वड, पिंपळ, निंब, आंबा यासारखे डेरेदार वृक्ष नव्हते. बहुतेक सगळी पाईनसारखी उभी झाडे होती. त्यातली कांही ख्रिसमस ट्रीप्रमाणे खाली रुंद व वर निमूळती होत जाणारी होती तर कांही एखाद्या छत्रीच्या आकाराची म्हणजे खाली उभा उंच दांडा व वर पानांनी गच्च भरलेला अर्धगोल अशी होती. जमीनीवर ताठ उंच वाढणारे तुरेदार गवत नव्हते, तर हरळीप्रमाणे आडव्या पसरत जाणा-या वनस्पती होत्या. त्यामुळे सगळीकडे गालिचे पसरून ठेवल्यासारखे वाटत होते. वसंत ऋतु सुरू होऊन गेलेला होता. सगळीकडे नवी तजेलदार पालवी फुटलेली होती तसेच फुले बहरली होती. वीस पंचवीस छोट्या छोट्या पाकळ्या असलेली दुरून शेवंतीसारखी भासणारी अगणित पिवळी फुले आणि बटमोग-यासारखी दिसणारी असंख्य पांढरी फुले या गालिचांना सजवीत होती.
हायवेवर कुठेही कसलाही अडसर नव्हता. त्याला छेद देणारे रस्ते पुलावरून किंवा जमीनीखालील बोगद्यामधून जात. ते येणार असल्याची सूचना देणारे फलक आधीपासून दिसू लागत व तो पाहून चालकाने आपली गाडी बाजूला काढायची. अशी व्यवस्था आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिसते. मार्गात अनेक ठिकाणी टोल द्यावा लागतो, पण त्यासाठी गाडी थांबवावी लागत नाही. तिथे ठेवलेला स्कॅनर चालत्या गाडीची नोंद करून तो टोल तत्काल त्या गाडीच्या मालकाच्या बँकेतील खात्यातून परस्पर वसूल करतो. एखाद्या गाडीच्या बाबतीत कांही अडचण आलीच तर रस्त्यावरील बॅरियर आडवा करून ती थांबवली जाते, पण असे क्वचितच घडते कारण त्यासाठी जबरदस्त भुर्दंड पडतो.
दर दोन तासानंतर चालकाने दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेणे सक्तीचे आहे. त्यासाठी जागोजागी हायवेच्या बाजूला उपरस्त्यांवर विश्रामगृहे आहेत. पेट्रोल पंप, किरकोळ दुकान, अल्पोपाहारगृह आणि स्वच्छतागृह हे सगळे या ठिकाणी एकत्र असतात. अशी सुविधाकेन्द्रे आता भारतातसुद्धा दिसायला लागली आहेत. युरोपमधील टॉयलेट्स मात्र अत्यंत स्वच्छ ठेवलेली असतात. अनेक ठिकाणी प्रत्येक उपयोगानंतर ती स्वच्छ करणारी यांत्रिक उपकरणे होती. नळाच्या तोट्यांना पाणी असते व त्यानंतर हांत कोरडे करण्याची
व्यवस्था असते. यासाठी कोठेही हस्तस्पर्श करण्याची गरज नसते. नळाखाली हांत धरला की आपोआप त्यातून पाणी पडते आणि हांत सुकवण्याच्या यंत्राखाली हांत धरला की त्यातून ऊष्ण हवेचा झोत येतो. अशा प्रकारची यंत्रे आपल्याकडे पंचतारांकित हॉटेलांत किंवा अत्याधुनिक कार्यालयात दिसतात. तिथे ती आम जनतेसाठी आहेत.
ही सगळी यंत्रे आणि उपकरणे बसवण्यासाठी व त्याची निगा राखण्यासाठी खर्च येणारच. या सोयींचा वापर करणा-या लोकांकडूनच तो वसूल केला जातो. त्यामुळे बहुतेक जागी तिथे प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशमूल्य आकारले जाते व ते गोळा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे बसवलेली असतात. त्यात नाणे टाकल्यावर दारामधले चक्र फिरून एका व्यक्तीला आत जाऊ देते. भारतासारख्या देशातून आलेल्या लोकांना नैसर्गिक विधीसाठी असे पैसे खर्च करणे जिवावर येते. असाच एक भारतीय पर्यटकांचा समूह युरोप पहायला आला होता. भ्रमंतीला सुरुवात करतांनाच त्यांच्या मार्गदर्शकाने आता वाटेत सगळीकडे 'पेड टॉयलेट्स' असणार आहेत असे सांगितले. पहिला थांबा आल्यावर तो खाली उतरून विश्रामगृहात गेला व बरेचसे प्रवासी त्याच्या मागोमाग गेले. मागच्या बाजूला बसलेले एक बूढे बाबा थोड्या वेळानंतर उतरले व विश्रांतीगृहाच्या विरुद्ध दिशेला गेले. दहा पंधरा मिनिटांनी बाकीचे सारे प्रवासी आपापले विधी, खाणेपिणे, खरेदी वगैरे आटोपून परत आले तरी बाबांचा पत्ताच नव्हता. अखेरीस एकदाचे ते धांपा टाकीत आले
आणि म्हणाले, "अरे तुमने तो बोला की यहॉंपर सभी जगहापर पेड टॉयलेट हैं, मगर मुझे पेड ढूँढनेमें कितनी तकलीफ हुई? तुम सब लोग कहॉं गये थे?"
. . . . . . . (क्रमशः)

Sunday, April 26, 2009

ग्रँड युरोप - भाग ८ : पिसा ते फ्लॉरेन्स


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा ते फ्लॉरेन्स


पिसा येथील मनो-याच्या तिरकसपणाला इतके अवास्तव महत्व दिले गेले आहे की त्याच्या वास्तुशिल्पाच्या सौंदर्याकडे कोणाचे जायला पाहिजे तितके लक्षच जात नाही. संपूर्णपणे पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडांनी हा मनोरा मढवलेला आहे. त्यात ठराविक जागी काळ्या रंगाच्या संगमरवराचे तुकडे बसवून सुंदर कलाकृतींची रंगसंगति साधलेली आहे. कलात्मक व प्रमाणबद्ध कमानी आणि स्तंभ यांनी युक्त असे वर्तुळाकृती सज्जे, त्यावर लावलेल्या कलाकुसर केलेल्या झालरी, आकर्षक चौकोनी जाळीदार गवाक्षे वगैरेमुळे ते एक मनोहारी वास्तुशिल्प आहे. हा मनोरा सरळ रेषेत उभा राहिला असता तरीसुद्धा तो पहायला रसिक पर्यटकांनी गर्दी केली असती. पण केवळ कलता मनोरा म्हणूनच तो प्रसिद्धीला आला आहे.


याच्या वाकडेपणाचे भांडवल करून प्रचंड व्यापार होतो व त्यावर आधारलेला व्यवसायच उभा राहिला आहे. इथे येणा-या पर्यटकांना स्मरणचिन्हे विकणा-या दुकांनांच्या लांबच लांब रांगा आहेत. त्यात संगमरवरापासून तसेच कांच, चिनी माती, लाकूड व अनेक प्रकारच्या धातूंमध्ये बनवलेल्या मनो-याच्या विविध आकारमानाच्या प्रतिकृती आहेत. अगदी मुठीत मावतील इतक्या छोट्या मॉडेलपासून ते पुरुषभराहूनही उंच अशा आकृती येथे मिळतील. त्याखेरीज की चेन, वॉल हँगिंग्ज, टेबल लँप, टी शर्ट यासारखे सर्वसामान्य प्रकार तर आहेतच, पण मनो-यासारख्या वाकड्या आकाराच्या कपबशा, तिरकस कॉफी मग, वाकडे मद्याचे प्याले, टेढ्यामेढ्या बाटल्या, तशाच विचित्र आकाराच्या पिशव्या, इतकेच काय पण त्या आकाराची मूठ असलेल्या छत्र्यासुद्धा दिसल्या. कलाकारांच्या कल्पकतेला मर्यादा नसते म्हणतात, पण इतर कोठल्याही व्यंगाचा एवढा मोठा व्यापार होत असण्याची शक्यता कमी आहे.
या तिरकसपणाबद्दल एक तिरकस किस्सा ऐकायला मिळाला. उन्हाने लालबुंद झालेले गोरे, अंधाराहून काळेकुट्ट हबशी, गहूवर्णी, पीतवर्णी वगैरे सगळ्या वंशाचे प्रवासी लोक या जागी आवर्जून आलेले तर दिसतातच, पण त्यात कांही उणीव राहू नये यासाठी जगभरातले भामटेगिरी आणि उचलेगिरी करणारेसुद्धा इकडे येऊन आपले कसब दाखवून नशीब आजमावून पहातात. अशाच एका शर्विलकाने तेथील गर्दीचा फायदा घेऊन दुस-या एका पर्यटकाचा खिसा कापला. पण त्याच्या हातात युरो किंवा डॉलर्सच्या नोटांनी भरलेले पाकीट पडण्याऐवजी कसल्याशा भलत्याच प्रकारच्या उत्तेजक द्रव्याचे पाकीट पडले. निराशेच्या भरात त्याने ते भिरकावून दिले आणि ते मनो-याच्या पायथ्यापाशी पडले. त्यानंतर पावसाची एक सर आली व त्यातील पदार्थ भिजून जमीनीत पसरला. त्याचा परिणाम असा झाला की कलता मनोरा ताठ उभा राहिला! अर्थातच त्याचा असर थोड्याच वेळात उतरला.
पिसाला पोचेपर्यंत जेवणाची वेळ झालेलीच होती. या ठिकाणी भारतीय पद्धतीचे जेवण मिळेल याची मला सुतराम कल्पना नव्हती, कारण आजूबाजूला दिसत असलेली एकूण एक हॉटेले पाश्चात्य पद्धतीचीच दिसत होती. फार तर एखाद दुसरे चायनीज होते एवढेच. पण आमच्या मार्गदर्शकाने एका लांबलचक गल्लीच्या दुस-या टोकाला असलेले एक भारतीय भोजनगृह शोधून काढून तिथे आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही तिथे जाऊन पोचलो तोपर्यंत विवेकच्या नेतृत्वाखालील केसरीचाच दुसरा ग्रुपही जेवण करून तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. परदेशातील असल्या आडगांवी येऊन भारतीय पद्धतीचे भोजन पुरवणा-या त्या उद्योजकाचे आधी कौतुक वाटले, पण ते खाणारे बहुतेक सगळे भारतीय पर्यटकच होते हे पाहिल्यानंतर या उद्योजकांनी आणखी प्रगती करून भारतीय पद्धतीच्या खान्याला आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवले पाहिजेत असे वाटले. युरोपमध्ये बहुतेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर चायनीज हॉटेलांचे फलक लावलेले दिसले तसे भारतीय दिसले नाहीत. इंग्लंडमधील परिस्थिती जरा वेगळी आहे. तिथे अनेक जागी इंडियन फूड देणारी रेस्टॉरेंट्स दिसतात, पण त्यातील बरेच जागी प्रत्यक्षात पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लोक ती चालवत असलेले दिसते. कदाचित पाश्चात्यांना हवे तसे मांसाहारी पदार्थ पुरवण्यात भारतीयांचे कौशल्य कमी पडत असावे.
पिसाच्या मिरॅकल चौकातील चमत्कृती पाहून व स्मरणचिन्हे खरेदी करून झाल्यावर तेथून निघालो तो पुढच्या मुक्कामाला फ्लॉरेन्स (फिरेंझे) या गांवी पोचलो. आधी थेट एका उंच टेकडीवरील मीकेलँजिलो पॉइंटवर गेलो. या ठिकाणी डेव्हिडचा पाच मीटर उंच असा भव्य पुतळा ही मीकेलँजिलो याची सुप्रसिद्ध शिल्पकृती एका उंच चबुत-यावर उभारलेली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्यदेवतेच्या मूर्तीनंतर कदाचित डेव्हिड हाच जगातील सर्वाधिक प्रसिद्ध पुतळा असेल. हा पुतळा देखील एका मोकळ्या मैदानाच्या मधोमध उघड्या जागेवर ठेवला आहे. यापूर्वी पाहिलेली मीकेलँजिलोने बनवलेली पियाटा ही शिल्पकृती सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये बंदिस्त जागेत जपून ठेवलेली होती.
पाश्चात्य पुराणातील डेव्हिड हा कथानायक त्याने अवाढव्य अंगाच्या गोलियाथ या दुष्टाला मारल्याबद्दल प्रसिद्ध आहे. आपल्याकडे राक्षसाच्या उरात त्रिशूल रोवून उभ्या ठाकलेल्या महिषासुरमर्दिनी दुर्गामातेची प्रतिमा असते त्याप्रमाणेच खाली कोसळलेल्या गोलियाथच्या महाकाय देहाजवळ हांतात तलवार धरून विजयी मुद्रेने उभ्या असलेल्या डेव्हिडचा पुतळा बनवण्याची पद्धत प्राचीन काळात तिकडे होती. पण मीकेलँजिलोने तसे केले नाही. महापराक्रमी पुरुषाची आकृती घडवतांना त्याला भरपूर दाढीमिशा, अंगभर वाढलेले केस, अतिशयच पिळदार मांसल हात पाय, विक्राळ चेहेरा वगैरेनी युक्त असा एक राकटपणा त्याच्या व्यक्तिमत्वात पूर्वीच्या काळी दाखवला जात असे. मीकेलँजिलोने या सगळ्या परंपरा सोडून देऊन डेव्हिडला एक आगळेच नवीन रूप दिले. सौष्ठवपूर्ण शरीरयष्टी, मोहक व गुळगुळीत चेहरा, त्यावर दृढनिश्चयाचे भाव वगैरे आणून एक अजरामर कलाकृती त्याने निर्माण केली आहे. मोजून पहायला गेले तर त्याच्या डोके व छातीचा भाग पायांच्या मानाने मानवी देहाच्या सर्वसामान्य प्रमाणापेक्षा मोठा आहे. तो इतरांपेक्षा अधिक बुद्धीमान व शक्तीशाली होता असे यातून दाखवायचे असेल असा तर्क कोणी करतात, तर उभा असलेला पुतळा पायथ्यावरून पहातांना तो प्रमाणबद्ध दिसावा अशी त्याची योजना केली आहे असे कांहीजणांना वाटते.
या शिल्पामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. मीकेलँजिलोच्या जन्माच्याही दहा अकरा वर्षे आधी प्रसिद्ध शिल्पकार डोनॅटेलो याचा सहाय्यक अगोस्तिनो यांने सुरुवात करून थोडासा पायांचा भाग बनवला आणि दोन पायांच्या मधल्या जागेत एक भोक पाडून ठेवले. त्यानंतर हे काम बंद पडले. हे शिल्प कोणी पूर्ण करायचे यावर फ्लॉरेन्सवासियांत मतभेद होते. त्यात पस्तीस वर्षे गेली. त्यासाठी लिओनार्दो दा विंची आदि तत्कालिन दिग्गज शिल्पकारांना विचारून झाल्यावर अखेरीस मीकेलँजिलो या स्थानिक तरुण कलाकाराची निवड झाली. त्याने तब्बल तीन वर्षे हातात छिनी घेऊन संगमरवराचा तो अर्धवट तोडून ठेवलेला विचित्र आकाराचा प्रचंड प्रस्तर फोडून काढला व त्यातून हे अद्वितीय शिल्प घडवले.
हा पुतळा बनवण्यापूर्वी तो तेथील कॅथेड्रलच्या समोर उभा करण्याचा विचार होता. पण त्याचे रूप पाहून तो दुसरीकडे ठेवला गेला. त्या काळी त्याच्या लज्जारक्षणासाठी एक ब्रॉंझचा कंबरपट्टा त्याला नेसवला होता असे म्हणतात. या पुतळ्याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. कोणीतरी मीकेलँजिलोला विचारले की "हा इतका प्रचंड पुतळा तू नेमका कसा बनवलास? त्यासाठी कुठून सुरुवात करायची व कसे खोदत जायचे हे कसे ठरवलेस?" त्यावर मीकेलँजिलो शांतपणे म्हणाला, "अहो त्या दगडात दडलेला हा पुतळा मला दिसतच होता. मी फक्त त्याच्या आजूबाजूला असलेला दगडाचा अवांतर भाग काढून बाजूला केला."
या टेकडीवरून फ्लॉरेन्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. हे एक ऐतिहासिक शहर आहे. मध्ययुगीन युरोपची ते सांस्कृतिक राजधानी होते असे म्हणता येईल इतके प्रसिद्ध कलाकार या शहराने जगाला दिले आहेत. अनेक वर्षे इटलीच्या या भागाची राजधानी इथे होती. इथेही कांही पुरातन सुंदर इमारती, कॅथेड्रल वगैरे आहेत, पण ती पाहण्याएवढा वेळ आमच्याकडे नव्हता. शिवाय दोन दिवसांपासून रोममध्ये तशाच प्रकारच्या जगप्रसिद्ध इमारती पहात फिरत होतो. त्यामुळे फ्लॉरेन्सचे दुरूनच दर्शन घेण्यात समाधान मानून घेतले.

Friday, April 24, 2009

ग्रँड युरोप - भाग ७ : पिसा येथील कलता मनोरा


दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा येथील कलता मनोरा

दोन दिवस रोमचे रोमहर्षक दर्शन घेतल्यानंतर तिस-या दिवशी आमचे युरोपमधील खरे भ्रमण सुरू झाले. त्यासाठी सगळेच जण उत्साहाने लवकर उठून तयार झाले. पुढील चार दिवस रोज थोडा प्रवास व थोडे पहाणे होते. त्यातील तीन दिवस रोज प्रवास केल्यानंतर मुक्कामाला एका वेगळ्या हॉटेलात जायचे होते. त्यासाठी सगळ्या सामानाची उचलाउचली आणि हलवाहलवी टाळायची असेल तर चार दिवसापुरते कपडे व आवश्यक वस्तू एका लहान बॅगेत वेगळ्या ठेऊन इतर सामान, विशेषतः न लागणारे जाडजूड लोकरीचे कपडे वगैरे मोठ्या बॅगेत ठेवावेत आणि ती बॅग बसमध्येच राहू द्यावी अशी कल्पना निघाली. त्यानुसार सामानाची जमवाजमव करून ते बसच्या वेगवेगळ्या कप्प्यात ठेवण्यात आले.

रोम ते पिसा हा चांगला चार पांच तासांचा प्रवास होता. या वेळाचा उपयोग करून घेण्यासाठी कांही कार्यक्रम पाहिजे. सदस्यांच्या औपचारिक ओळखींच्या कार्यक्रमाने सुरुवात केली. तशा पहिल्या दोन दिवसात आमच्या सर्वांशी अनौपचारिक ओळखी झाल्याच होत्या, पण आता आसन क्रमांकाप्रमाणे एकेकाने समोर येऊन आपली थोडक्यात ओळख करून द्यायची, त्यात नांव, गांव, व्यवसाय, आवडी निवडी, गुणविशेष वगैरे सांगायचे होते. त्याप्रमाणे सर्वांनी आपापली माहिती सांगितली.

आमच्या बत्तीस जणांच्या समूहात तेरा पतिपत्नींची जोडपी होती. गंमत म्हणजे त्यातील एकानेही आपल्या मुलांना सोबत आणलेले नव्हते. कांही जणांची मुले मोठी होऊन त्यांनी आपापले संसार थाटलेले होते तर कांही जणांनी आपल्या शाळा कॉलेजात जाणा-या मुलांना घरी किंवा कोणा आप्तांकडे ठेवले होते. उरलेल्या सहा जणापैकी एक पितापुत्रांची जोडी होती व दोन वयस्कर मैत्रिणींची एक जोडी होती आणि फक्त दोन सद्गृहस्थ एकेकटे आलेले होते. केसरीने या सहलीपुरती त्या दोघांची एक जोडी बनवून दिली.

पुरुष वर्गातील पाच सहा लोक नोकरी करून सेवानिवृत्त झालेले होते व बाकीचे सर्वजण व्यावसाय़िक होते. त्यात कोणी चार्टर्ड अकौंटंट, कॉंट्रॅक्टर, लघु उद्योजक, व्यापारी वगैरे होते. एक डॉक्टर पतिपत्नी व एक दंतवैद्य होते. डॉक्टरीणबाई सोडल्यास महिलावर्गातील इतर बहुतेकजणी मुख्यतः गृहकाम करणा-या होत्या, पण त्यातल्या बरेच जणी पतीच्या व्यवसायात त्याला हातभारसुद्धा लावीत होत्या तर कोणी संगीत, कला वगैरेची साधना करणे व शिकवणे यांत मग्न होत्या. अद्वैत हा एकटाच अजून विद्यार्थीदशेत होता आणि ठराविक चाकोरीबद्ध नोकरी करणारे असे बहुधा कोणी नव्हतेच. अर्थातच याला प्रातिनिधिक समूह म्हणता येणार नाही कारण त्याच सहलीमध्ये सगळीकडे आमच्या बरोबरच येत असलेल्या केसरीच्या दुस-या ग्रुपमध्ये कांही निराळ्या प्रकारचे लोक व अगदी कडेवरच्या बाळापासून ते शालेय शिक्षण घेणारी वेगवेगळ्या वयातली मुले होती. आमच्या ग्रुपमधील लोकांच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती हळूहळू पुढे येईल.

दुपार होईपर्यंत आमची बस पिसाला पोचली. पिसा या आधुनिक काळातील शहरापासून थोडेसे दूर प्राचीन काळातील 'स्क्वेअर ऑफ मिरॅकल' आहे. या ठिकाणी बॅप्टिस्ट्री, कॅथेड्रल व लीनिंग टॉवर या तीन प्रमुख इमारती आहेत. बॅप्टिस्ट्रीमध्ये ख्रिस्ती धर्माची संथा दिली जाते, कॅथेड्रलमध्ये नेहमीच्या प्रार्थनाविधी होतात आणि टॉवर हा मुख्यतः घंटाघर म्हणून बांधला गेला. सर्वसामान्यपणे चर्चमध्येच उंचावर किंवा शिखरावर घंटा बांधलेली असते, पण आपल्या समृध्दीचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणा किंवा दूरवरचे निरीक्षण करता यावे यासाठी स्वतंत्र घंटामीनार (बेलटॉवर) बनवायचे पिसावासियांनी ठरवले व इसवीसन ११७३ साली या बांधकामाला सुरुवात झाली. लढाया व अशांत परिस्थिती यामुळे सुरुवातीपासूनच हे काम रेंगाळत चालत होते. सुमारे दहा वर्षांमध्ये पहिले तीन मजले बांधून झाले. पण एका बाजूचा पाया कच्चा राहिल्यामुळे ते त्या बाजूस खचत चालले असल्याचे त्या वेळेसच लक्षात आले व काम थांबवण्यात आले. ते कधी कोसळेल याचा नेम नाही असे वाटत असल्यामुळे जवळ जवळ शंभर वर्षे तसेच पडून राहिले होते. तिसरा मजलासुद्धा तोंवर पूर्ण बांधला गेला नव्हता.

इसवी सन १२७५ साली एका नव्या वास्तुशिल्पशास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली बांधकामाला पुनश्च सुरुवात झाली. खचलेला पाया दुरुस्त करणे त्याला शक्य नव्हते, पण गेल्या शंभर वर्षात तो फारसा अधिकाधिक खचत गेला नव्हता की ती इमारत कोसळली नव्हती हे महत्वाचे होते. या आधारावर पुढील बांधकाम हातात घेण्यात आले. तिरप्या झालेल्या इमारतीच्या मजल्यावरील जमीन शक्य तेवढी समतल रहावी या दृष्टीने नवीन मजले बांधतांना मुद्दामच प्रत्येक मजल्याची एक बाजू दुसरीपेक्षा थोडी अधिक उंचीची बांधण्यात आली. यामुळे हा टॉवर नुसता कललेलाच नव्हे तर थोडासा वक्राकारसुद्धा झाला आहे. सहावा मजला बांधल्यावर हे काम पुन्हा बंद पडले. त्यामुळे सातवा मजला सन १३१९ मध्ये पुरा झाला आणि त्याच्या मस्तकावरील घंटागृह तर सन १३५० मध्ये. अशा रीतीने या इमारतीचे बांधकाम तब्बल पावणे दोनशेहे वर्षे चालले होते. त्यानंतरही वेळोवेळी त्यावर किंवा त्याच्या पायाखाली कधी शिसे तर कधी कॉंक्रीट लादून त्याचा कलणारा तोल सांवरण्याचे प्रयत्न होतच राहिले.

अलीकडच्या काळात पुन्हा एकदा त्याच्या सुरक्षिततेचा पूर्ण अभ्यास करून कांही भूमीगत सुधारणा तसेच त्याची संपूर्ण साफसफाई व डागडुजी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाने कदाचित त्याला सरळसुद्धा करता येईल, पण मग तो पहायला कोण येणार व त्या निमित्ताने येणा-या पर्यटकांवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचे काय होईल? सुमारे छप्पन मीटर उंचीच्या या मनो-याचा बाहेरील व्यास तळापाशी साडेपंधरा मीटर एवढा आहे तसेच भिंतीची जाडी सुमारे अडीच मीटर इतकी आहे. जसजसे आपण वर जाऊ तसतसा त्याचा व्यास तसेच भिंतीची जाडी कमी होत जाते. सध्या तो सरळ उभ्या रेषेशी साडेपांच अंशाचा कोन करून उभा आहे व त्याचे शिखर पायापासून साडेचार मीटर एका बाजूला ढळलेले आहे. पण हा आंकडा गेल्या आठशेहे वर्षात वेळोवेळी मोजला गेला व वेगवेगळा मिळाला. वरपर्यंत चढण्यासाठी आंतून जिना आहे, त्याला २९४ पाय-या आहेत. इतक्या पाय-या चढण्या व उतरण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता.

या टॉवरवरून लहान व मोठ्या आकाराचे गोळे खाली टाकून ते एकाच वेगाने जमीनीवर पोचतात असे गॅलीलिओने दाखवून दिले होते असे म्हणतात, पण या गोष्टीला कांही पुरावा नाही असेही मत मांडले जाते. कांही असले तरी गॅलीलिओच्या या निरीक्षणाचा चांगला उपयोग त्याच्या नंतर आलेल्या आयझॅक न्यूटनने करून घेतला व त्याचे पर्यवसान अखेरीस गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात होऊन विज्ञानाच्या अभ्यासालाच त्यातून एक नवीन दिशा मिळाली एवढे खरे.

या कलत्या टॉवरच्या शेजारी असलेल्या दोन्ही इमारतीसुद्धा तत्कालिन वास्तुशिल्पकलेचे उत्तम नमूने म्हणून पाहण्याजोग्या आहेत आणि हा प्रशस्त असा परिसरच पर्यटकांचे नंदनवन म्हणता येईल इतका विकसित केला गेलेला आहे. जगभरातील सर्व खंडातले वेगवेगळ्या वंशाचे, रंगाचे आणि भाषा बोलणारे पर्यटक इथे हिंडतांना दिसत होते.
पिसाच्या मनो-याला इतकी प्रसिद्धी मिळाली की वेळोवेळी त्याचा उल्लेख वाङ्मयामध्येही होत गेला तसेच त्याच्यावर आधारलेले विनोद रचले गेले. असाच एक नमूना इथे देत आहे.
प्रश्न: बिग बेन पिसाच्या मनो-याला काय म्हणाला असेल?

उत्तर: तुझा कल असेल तर माझ्याकडे वेळ आहे.(If you have the inclination, I have got Time.)

Wednesday, April 22, 2009

ग्रँड युरोप - भाग ६ - रोममधील उरलेसुरले


दि.१६ व १७-०४-२००७ रोममधील उरलेसुरले


दि.१६ एप्रिलला ज्या दिवशी आम्ही मुंबईहून प्रयाण केले त्याच दिवशी योगायोगाने अलकाचा म्हणजे माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. मध्यरात्रीनंतर आमचे विमान सुटणार असल्यामुळे आम्ही दि.१५च्या रात्रीच सहार विमानतळावर येऊन पोचलो होतो. प्रयाणकक्षात बसून विमानाची वाट पहात असतांनाच बरोबर रात्री बाराच्या ठोक्याला आमच्या ग्रुपमधल्या अद्वैतने आमच्याकडे येऊन अलकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केसरीतर्फे दिलेल्या सहप्रवाशांच्या यादीमधून त्याने ही माहिती शोधून काढली होती. आजूबाजूला इतर एक दोघे बसलेले होते त्यांनीही शुभेच्छा दिल्या. त्या जागी तरी उत्तरादाखल धन्यवादाशिवाय आणखी कांहीच देता येणे आम्हाला शक्य नव्हते. रोमला पोचल्यावर विमानतळावर सामानाची वाट पहात असतांना, तसेच नंतर रोममध्ये फिरतांना आमच्या इतर सहप्रवाशांबरोबर जसजशी आमची ओळख होत गेली, तसतशी ही बातमीसुद्धा पसरत गेली व अधिक शुभेच्छा मिळाल्या.


अलकाचा या वर्षीचा वाढदिवस रोम येथे साजरा करायचा हे आमचे आधीपासून ठरलेलेच होते. हा वाढदिवसही एरवीपेक्षा वेगळा होता. इंग्रजी तारीख व मराठी पंचांगातील तिथी या दोन्ही पद्धतीने यंदा तो एकाच दिवशी आला होता. असे येणे हा एक दुर्मिळ योगायोग असत असावा असे मला पूर्वी वाटायचे. पण वर्षातील सगळ्याच तारखा व तिथी दर एकोणीस वर्षानंतर पुन्हा त्याच क्रमाने येतात असे एका ब्लॉगच्या निमित्तानेच या विषयाचा थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले होते. अलकाच्या सत्तावन्नाव्या वाढदिवसामुळे त्या पुस्तकी ज्ञानाची प्रत्यक्ष प्रचीती आली. मात्र त्या दिवशी आमचे आपल्या कुटुंबापासून दूर परदेशी असणे हा एक योगायोग होता. या वर्षी अनायासे नवीन मित्रमंडळींचा एक समूह त्या दिवशी एकत्र भेटणारच होता. त्याचा फायदा घेऊन त्या दिवशी थोडीशी मौजमजा करण्याचा आमचा विचार होता.
याआधी इंग्लंड व कॅनडाला गेलो असतांना तिथे त-हेत-हेचे आकर्षक केक दुकानांत ठेवलेले मी पाहिले होते. यामुळे या निमित्ताने रोममध्ये तसाच एखादा वैशिष्ट्यपूर्ण केक आणायचा विचार होता. पण नव्या देशातली कांही माहिती नाही आणि भाषेची अडचण यामुळे आपल्याला स्वतःला कांही शोधाशोध करता येण्यासारखे नव्हते. समूहाला सोडून एकट्याने फिरणे धोकादायक असल्यामुळे तसे करण्याला सक्त मनाई केलेली होती. अशा कारणाने मनातला विचार संदीपलाच बोलून दाखवला व कांही सहाय्य करण्याची विनंती केली. संध्याकाळी रोममध्ये फिरायला जाण्यासाठी निघतांना बसमध्येच त्याने अलकाच्या वाढदिवसाची जाहीर घोषणा करून केसरीतर्फे एक अभिनंदनपर पत्र व चॉकलेटची भेट तिला दिली आणि सगळ्यांना एक्लेअर्स वाटले.

त्या दिवशी आम्ही ट्रेव्ही फाउंटनच्या ज्या भागात फिरलो त्या भागात आम्हाला कुठेच बेकरी किंवा डिपार्टमेंटल स्टोअर दिसले नाही. त्यामुळे साधा केकसुद्धा मिळाला नाही. टाईम एलेव्हेटर राईड घेऊन रात्रीच्या जेवणासाठी ज्या भारतीय रेस्टॉरेंटमध्ये गेलो तिथे तर एखाद्या आडगांवातल्या खानावळीत असाव्यात तशा दोन तीन छोट्या छोट्या खोल्यांमध्ये टेबल खुर्च्या मांडून बसण्याची जेमतेम सोय केली होती आणि चार ठरावीक खाद्यपदार्थांचे जेवण होते. आयत्या वेळी केकच काय पण कुठलाच पदार्थ मागवण्याची मुळी सोयच त्या जागी नव्हती. अखेरीस बाहेर जाऊन सर्वांसाठी आईसक्रीम आणले आणि आमच्यातर्फे ते वाटून आम्ही वाढदिवस साजरा केला.
रोमला आल्यानंतर पुढील प्रवासासाठी जी बस मिळाली होती ती आपल्याला परिचित असलेल्या व्हॉल्व्हो आरामगाड्यांहून भारी होती तसेच वेगळी होती. एक तर युरोपमधील वाहतूक नियमांनुसार तिचा चालक डाव्या बाजूला बसायचा आणि प्रवाशांसाठी ठेवलेली दोन्ही दारे उजव्या बाजूला होती. सामानासाठी असलेले कप्पे खालच्या बाजूला असल्यामुळे बसण्याच्या सीट्स खूपच उंच होत्या व त्यामुळे चांगल्या चार पांच पाय-या चढून आंत जावे लागे. चालकाच्या हांताशी असलेली बटने दाबून तो सर्व दरवाजे उघडत किंवा मिटत असे. त्या देशात ड्रायव्हरला सन्माननीय वागणूक देणे आवश्यक आहे आणि गाडी चालवण्याव्यतिरिक्त इतर कोठलेही तो काम करणार नाही व कुणी त्याला कांही सांगायचे नाही हे त्याची कॅप्टन म्हणून ओळख करून देतांनाच संदीपने स्पष्ट केले होते. तरीही कधी कधी सामान चढवण्या व उतरवून घेण्यासाठी आपण होऊन तो आम्हाला मदत करीत होता.
त्याच्या शेजारीच संदीपच्य़ा बसण्याची जागा होती आणि त्याच्याकडे एक ध्वनिक्षेपक होता. त्याचा उपयोग करून तो रोज सगळ्या सूचना देत असे. बस हीच आमची कॉन्फरन्स रूम होती व पुढील प्रवासात त्याचा चांगला उपयोग करून घेतला. एक व्हीडिओ मॉनिटरसुद्धा होता, पण त्याचा कधीच उपयोग केला गेला नाही. कदाचित त्यासाठी जी इतर उपकरणे लागतात ती उपलब्ध झाली नसावीत. बसमध्ये खाली गालिचा अंथरलेला होता व तो स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनिंग करणे एवढाच एक उपाय होता. ती बस रोजच्या रोज स्वच्छ करण्याची कांहीच योजना नव्हती. बसमध्ये प्रवाशांनी कसलाही कचरा टाकू नये, विशेषतः ओले खाद्यपदार्थ खाली गालिचावर पडता कामा नयेत याची खबरदारी आम्ही घ्यायची होती.
बसमध्ये एक संगणक होता व संपूर्ण दौ-याचा कार्यक्रम त्यात एका सीडीद्वारे फीड केला जायचा. ड्रायव्हरने एका दिवसात बारा तासांपेक्षा अधिक काळ काम करायचे नाही, दर दोन तासानंतर सक्तीची पंधरा मिनिटे विश्रांती घ्यायची वगैरे वाहतूकीचे नियम पाळणे आवश्यक होते व बसचे इंजिन सुरू होणे व बंद होणे, ती किती किलोमीटर चालली वगैरे माहिती त्या संगणकात आपोआप जात असल्यामुळे तो संगणक एका प्रकारे नियंत्रणाचे काम करीत होता. कोठल्याही नियमाचे उल्लंघन होत आहे असे वाटल्यास तो तशी पूर्वसूचना देई व तरीही उल्लंघन झाल्यास इंजिन सुरू ठेवणे अशक्य होत असे म्हणे. या कडक नियमांमुळे आमचा प्रवास विशेष दगदग न करता आरामात होत असे हे खरे असले तरी त्यासाठी कधी लवकर उठण्याची किंवा भूक लागलेली नसतांना रात्रीचे जेवण आटोपून घेण्याची घाई करावी लागत असे ते त्रासदायक वाटत असे.
रोमला आलेल्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने थोडासा आश्चर्याचा धक्का दिला. पण गंमत म्हणजे कुठून तरी एक बांगलादेशी विक्रेता छत्र्या घेऊन रस्त्यातच त्या जागी हजर झाला आणि ब-याच जणांनी त्याच्याकडून छत्र्या खरेदी केल्या. दुस-या दिवशी आम्ही त्या छत्र्या बरोबर घेतलेल्या होत्या, तरीही दिवसभर स्वच्छ ऊन पडलेले असल्यामुळे कधीच त्या हांतात घेऊन बसखाली उतरावेसे वाटले नाही. त्यामुळे शेवटी आम्ही नोव्होना पियाझाला गेलो तेंव्हासुद्धा त्या गाडीतच राहिल्या. खरे तर ती जागा दहा पंधरा मिनिटात सहज पाहण्यासारखी होती पण आमच्या वेळापत्रकानुसार त्या ठिकाणी तास सव्वा तास दिलेला होता. तो वेळ कसाबसा घालवून आम्ही परत जायला निघालो आणि एकदम गारांचा वर्षाव सुरू झाला. मुंबईला तर गारा फारच क्वचित पडतात, पण भारतातील इतर शहरातसुद्धा मी असा गारांचा सडा पडलेला यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. बसपर्यंत पोचण्यासाठी पांच मिनिटे चालणेसुद्धा अशक्य झाल्यामुळे सर्वांनी रस्त्याच्या कडेला मिळेल तो आसरा घेतला आणि पावसाची सर थांबल्यानंतर ओल्याचिंब अवस्थेत गाडीत जाऊन बसलो.
कोलोजियम पहायला गेलो त्या जागी कांही लोक प्राचीन रोमनकालीन कपडे परिधान करून हिंडत होते व पर्यटक त्यांचे व त्यांच्याबरोबर स्वतःचे फोटो काढून घेत होते. पियाझा नोव्होनामध्ये तर चित्रविचित्र कपडे घालून कोणी पुतळ्यासारखा उभा होता तर कोणी चमत्कारिक अंगविक्षेप करीत होता. अर्थातच भीक मागण्याचेच हे विविध प्रकार होते. आपल्याकडच्या डोंबा-याने तिथे एकादा खेळ लावला असता तर तो नक्कीच चांगला चालला असता!

ग्रँड युरोप - भाग ५- रोमन साम्राज्याचे अवशेष


दि. १७-०४-२००७ दुसरा दिवस - रोमन साम्राज्याचे अवशेष


व्हॅटिकन सिटीच्या ख्रिश्चन विश्वाचे धांवते दर्शन घेतल्यानंतर तिच्यातून बाहेर पडून पुन्हा आम्ही सगळे रोम शहरात आलो. व्हॅटिकन सिटीच्या कोठल्याही दारातून बाहेर पडले की आपण सरळ रोम शहरातच प्रवेश करतो इतके ते त्याला खेटून किंवा वेढा घालून वसलेले आहे. आदल्या दिवशी ट्रेव्ही फाउंटन पाहून झाल्यावर टाईम एलेव्हेटर राईड घेतांना रोमच्या इतिहासकालीन घटनांचे चलचित्र पाहतांना तेथील कांही प्रमुख इमारतींचे पडद्यावर दर्शन मिळाले होते. आज त्या इमारती प्रत्यक्ष पहायला मिळाल्या.
दोन अडीच हजार वर्षापूर्वीच्या रोमन साम्राज्यकालीन वाडे, राजवाडे, सभागृहे, किल्ले, कोट, बुरुज, खंदक वगैरेंचे भग्नावशेष, ब-यापैकी परिस्थितीत असलेले मध्ययुगीन सुवर्णकाळात बांधलेले वाडे, चर्चेस व उभारलेल्या कमानी, स्तंभ आणि आजच्या काळातील मोठमोठी कांचेची तावदाने असलेल्या आधुनिक इमारती यांचे एक विलक्षण मिश्रण या शहरात पहायला मिळते. एकमेकांच्या बाजूबाजूला तर त्या सर्रास दिसतात, पण कधीकधी इतिहासाच्या खांद्यावर वर्तमान उभे असलेले दृष्य पहायला मिळते.
येथील लोकांची राहती घरे बहुतेक करून तीन चार मजल्यांची दिसली. प्रत्येक घराला प्रशस्त बाल्कन्या आहेत आणि जवळ जवळ प्रत्येक बाल्कनीमध्ये फुलझाडांनी बहरलेल्या कुंड्या मांडून ठेवलेल्या दिसतात. कांही थोड्या ठिकाणी तर भिंतींवर जागोजागी हुक्स लावून त्यावर वेली चढवलेल्या दिसल्या. या मौसमांमध्ये आलेल्या नवपल्लवींनी त्यांनी भिंती पार झाकून टाकल्या होत्या, तसेच रंगीबेरंगी फुलांचा बहर आलेला असल्याने त्या फारच मनोहर दिसत होत्या. आमच्या ग्रुपमधील कांही वृक्षप्रेमी लोकांना तर येथून फुलझाडांची रोपे नेण्याची अनावर इच्छा होत होती, पण प्रवासात ती कशी सांभाळायची आणि विमानांतून ती नेता येतील कां हे प्रश्न पडल्यामुळे अखेरीस त्यांनी त्या झाडांची बी बियाणेच घेऊन जाण्याचा मार्ग पत्करला.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर पडल्यावर पियाझा व्हेनिझाजवळ व्हिट्टोरिय़ो स्मारक दिसले. प्राचीन ग्रीक व लॅटिन शिल्पकला आणि आधुनिक वास्तुशिल्पशास्त्र यांचा सुरेख मिलाफ या जागी पहायला मिळतो. प्राचीन मूर्तीकला व आधुनिक स्थापत्यशास्त्र यांचा संयोग करून आपल्याकडे अनेक नवी मंदिरे बांधण्यात आली आहेत. दिल्ली येथील स्वामीनारायण मंदिर किंवा पुण्याजवळ केतकावली येथील प्रति तिरुपती देवस्थान ही अलीकडची उदाहरणे सांगता येतील. रोम येथील व्हिट्टोरियो स्मारकामध्ये गेल्या शतकातल्या वास्तुशिल्पशास्त्रावर आधारलेली एक भव्य इमारत आहे, पण अनेक उत्तमोत्तम मूर्तींचा उपयोग करून ती सुबकपणे सजवलेली आहे. समोरच एका उंच चबूत-यावर एका अश्वारूढ वीराचा एक देखणा पुतळा आहे. अनेक राज्यांमध्ये विभागल्या गेलेल्या प्रदेशांचे एकत्रीकरण करून आजचा इटली देश निर्माण करणा-या व्हिट्टोरियो या पहिल्या राजाच्या स्मरणार्थ हे स्मारक उभे केले गेले. तसेच पहिल्या महायुद्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचेसुद्धा हे स्मारक आहे.
टायबर नदीच्या किना-यावरील सात टेकड्यांवर रोम हे शहर वसलेले आहे. नदीच्या किना-यावरच प्राचीन काळातील रोमचे अनेक भग्नावशेष विखुरलेले पहायला मिळतात. अगदी रोम्युलसने नगरीची सुरुवात कुठून केली तिथपासून वेगवेगळ्या सम्राटांनी कोणकोणच्या इमारती बांधल्या वगैरेचे सुरस वर्णन आमचा गाईड करीत होता. माझे इतिहासविषयक ज्ञान कधीच इतिहासजमा झालेले असल्यामुळे मधेच कुठेतरी सीजर, ऑगस्टस असे ओळखीचे शब्द कानावर पडल्यासारखे वाटायचे. इतर राजा रजवाड्यांबद्दल कांडीचेही आकर्षण नसल्यामुळे कोणी बांधले यापेक्षा काय बांधले होते इकडेच मी थोडे लक्ष देऊन ऐकत होतो.
एक तर स्वसंरक्षणार्थ बांधलेली तटबंदी, खंदक वगैरे व वाड्यांचे अवशेष दिसत होते. "खंडहर बताते हैं कि इमारत कितनी बुलंद थी।" या वाक्याचा अर्थ इथे चांगला लक्षात येतो. कांही जागी पडक्या भिंती, कांही ठिकाणी छपराशिवाय नुसतेच खांब उभे असलेले तर कांही जागी फक्त जमीनीखालच्या पायाची रचना एवढीच साक्ष आता उरली आहे. एका ठिकाणी एक इजिप्शियन पद्धतीचे पिरॅमिडसुद्धा आहे. कांही जागी पूर्वीच्या काळातील पाणीपुरवठा करपणारे अक्वेडक्ट आहेत. हे सर्व अवशेष व्यवस्थितपणे जतन करून ठेवले आहेत, तसेच त्याचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. ते पाहून तत्कालिन वास्तुशास्त्र, बांधकामात उपयोगात आणलेले दगड, माती, विटा आदि सामान, त्या काळांतल्या समाजाची राहणी, त्यांचे अन्न, त्यांची करमणुकीची साधने अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करणारी मंडळी इथे मुक्काम ठोकून बसतात व त्यांना भरपूर माहिती मिळते.
कोलोजियम हे पूर्वीच्या रोमन लोकांचा पराक्रम, तत्कालिन स्थापत्यशास्त्र याचप्रमाणे त्यांचा अमानुष क्रूरपणा दाखवणारे सर्वाधिक प्रसिद्ध, भव्य व उत्तम उदाहरण म्हणता येईल. आठ दरवाज्यामधून प्रत्येकी दहा हजार प्रेक्षकांना आत जाऊन बसता येईल इतके मोठे हे वर्तुळाकार स्टेडियम दोन हजार वर्षापूर्वी बांधले गेले. भरभक्कम उंच भिंती व आंतील भागात बनवलेले भूगर्भाखालील रस्त्यांचे जाळे यांवरून त्याच्या बांधकामातील कौशल्य दिसून येते. त्याच्या भिंतींवर दोन्ही बाजूंनी संगमरवराच्या फरशा बसवल्या होत्या असे म्हणतात. या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी इथे ग्लॅडिएटर्सच्या ख-याखु-या लढाया खेळल्या जात असत. गुन्हेगार, गुलाम व राजाची गैरमर्जी झालेले लोक यांना ग्लॅडिएटर बनण्यासाठी तालिमीत तयार करून इथे मृत्यूच्या दाढेत ढकलून देत असत व कोण कोणाला कसे मारतो हे प्रेक्षकगण चवीने पहात असत. एका युद्धात प्रतिस्पर्ध्याला ठार मारून मिळवलेला विजय अल्पकालच टिकत असे कारण लगेच त्या विजयी वीराला दुस-या योध्द्याशी मुकाबला करवा लागत असे. कधीकधी तर भुकेलेले वाघसिंहादि हिंस्र पशूं त्यांच्या अंगावर सोडले जात व त्यांनी केलेली चिरफाड पहातांना आणि माणसांच्या करुण किंकाळ्या ऐकतांना प्रेक्षक टाळ्या वाजवीत असत. रोमन साम्राज्याच्या -हासाबरोबरच हा रानटीपणा बंद झाला व कोलोजियम ओस पडले. त्यानंतरच्या काळात लोकांनी तेथील दगड काढून नेण्यास सुरुवात केली. रोममधील अनेक सुंदर इमारती बनवतांना कोलोजियममधून आणलेले संगमरवराच्या दगडांचा त्यात उपयोग केला गेला असे म्हणतात.
कोलोजियम पाहून झाल्यावर आम्ही पियाझा नोव्होना या ठिकाणी गेलो. पूर्वीच्या काळी इथे रथांच्या शर्यती वगैरे होत असत म्हणे. त्याचा मूळचा ओव्हल आकार अद्याप टिकवून ठेवलेला आहे. मधे कांही कारंजे व सुंदर मूर्ती आहेत. एका जागी त्या काळात माहीत असलेल्या चार प्रमुख नद्यांचे प्रतिनिधित्व करणारे पुतळे आहेत, त्यात एक आपली गंगा नदीसुद्धा आहे. इजिप्तमधून आणलेला एक कोरीव काम केलेला उभा चौकोनी उंच दगडी खांब आहे, त्याला ओबेलिस्क म्हणतात. हे एवढे अवजड धूड इजिप्तमधून अथपर्यंत कसे वाैहून आणले असेल ते देव जाणे. एका ठिकाणी लुशोभीकरण सुरू असल्यामुळे तेथील शिल्पे प्लॅस्टिकमध्ये झांकून ठेवलेली दिसली. सर्व बाजूने सुंदर इमारती आहेत. त्यात एक प्रसिद्ध चर्चसुद्धा आहे, तसेच हॉटेले, दुकाने आणि राहण्याची घरेदेखील आहेत.

Tuesday, April 21, 2009

ग्रँड युरोप - भाग ४ - व्हॅटिकन सिटी


दि। १७-०४-२००७ दुसरा दिवस - व्हॅटिकन सिटी

मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली 'व्हॅटिकन सिटी' हे एक स्वतंत्र राष्ट्र बनवण्यात आले. फक्त एकशे नऊ एकर म्हणजे अर्धा वर्ग किलोमीटरपेक्षाही लहान आकाराचे क्षेत्रफळ असलेले हे जगातील सर्वात लहान राष्ट्र आहे व त्याची लोकसंख्या एक हजाराच्याही आंत आहे. आपल्या सर्वसामान्य खेड्यापेक्षासुद्धा लहान जागा आणि कमी लोकवस्ती असलेला हा देश! पण कोठल्याही महानगरात मिळतील अशा सर्व सुखसोयी मात्र तिथे उपलब्ध आहेत बरे. पोप आणि त्याचे निकटवर्गीय धर्मगुरू यांचाच बहुधा या लोकसंख्येत समावेश होत असावा. कारण तिथली व्यवस्था पाहण्यासाठीच मुळी तीन हजारावर कर्मचारी काम करतात. बहुधा बाजूच्याच रोममधून ते रोज तेथे जातात. यापेक्षाही कित्येक पटीने जास्त पर्यटक तिथे रोज भेट देण्यासाठी येत असतील! त्यांची सेवा सुविधा वगैरेसाठी आणखी लोक तेथे येत असणार.
व्हॅटिकन पाहण्यासाठी आम्ही सकाळी थोडे लवकरच उठून निघालो होतो, तरीही त्या दिशेला जाणारे रस्ते वाहनांनी तुडुंब भरलेले असल्याकारणाने सव्वा दीड तासानंतर तेथे पोचलो, तोपर्यंत भरपूर गर्दी झालेली होती. व्हॅटिकनच्या संरक्षणासाठी पूर्वीच्या काळी बांधलेली उंच भिंत अजून शाबूत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूलाच असलेल्या एका प्रचंड भूमीगत पार्किंग लॉटमध्ये बस उभी करून बाहेर निघालो. जमीनीखाली असलेल्या त्या अवाढव्य तळघरात पूर्वीच्या काळच्या इमारतींसाठी त्या काळी घातलेल्या पायाच्या मजबूत दगडी भिंती मध्ये मध्ये दिसत होत्या. त्या पायाच्या आधारावरच आज त्या ठिकाणी जमीनीच्या वर दिसत असलेल्या इमारती उभ्या आहेत. जमीनीखाली प्राचीन किंवा मध्ययुगातील पाया व त्यावर शेकडो वर्षानंतर बांधलेल्या इमारती असे जुन्या नव्याचे मिश्रण रोममध्ये सर्रास पहायला मिळते.
स्वतंत्रपणे येणा-या पर्यटकांसाठी लांबलचक रांग लागलेली होती, पण पर्यटकांच्या समूहांसाठी वेगळा दरवाजा होता. त्यामधून लगेच प्रवेश मिळाला. तिथेच आमचा स्थानिक मार्गदर्शक भेटला. या जागी एकाच वेळी अनेक ग्रुप येत असल्यामुळे प्रत्येक गाईड वेगवेगळ्या प्रकारचा झेंडा हातांत घेऊन हिंडत होता. त्या झेंड्याकडे पाहून आपला गाईड कुणीकडे चालला आहे हे समजत असे. त्या ग्रुपमधील प्रत्येकाला एक हेडफोन दिला जाई व गाईडकडे एक मायक्रोफोन असे. त्यातून वायरलेस संदेशवहनामधून त्याचे बोलणे सर्वांना ऐकू जात असे. अशा प्रकारे त्या प्रचंड गर्दी व गोंगाटामधून आपला मार्ग न चुकता सर्वांबरोबर हिंडणे व शक्य तितकी माहिती ऐकून व समजून घेणे शक्य झाले.
गेल्या अनेक शतकांपासून या ठिकाणी मोठमोठ्या चॅपेल्स, चर्चेस वगैरेंचे बांधकाम चालले होते. मध्ययुगात जेंव्हा धर्मगुरू हेच सर्वेसर्वा झाले तेंव्हा तर त्यांना राजवाड्यांचेच स्वरूप आले होते. मात्र ती धार्मिक श्रद्धास्थाने असल्यामुळे कोठल्याही लढायांमध्ये त्यांची विशेष हानी करण्यात आली नाही. नैसर्गिक आपत्तींमध्येच जी कांही पडझड होत गेली तिची डागडुजी तत्परतेने केली गेली. या कारणाने अत्यंत भव्य अशा ऐतिहासिक इमारती आजही येथे चांगल्या स्थितीमध्ये पहायला मिळतात. कलाकारांच्या पिढ्यान पिढ्या शतकानुशतके या इमारतींच्या सुशोभिकरणाच्या कामाला लागलेल्या होत्या. त्यांनी अनेक प्रकारे त्यांच्या सौंदर्यात भर घातली आहे.
यांत संगमरवराच्या व इतर प्रकारच्या दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती आहेत, तसेच कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे वगैरेंची लयलूट आहे. भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज आहेत. ती बनवतांना भिंतीवरील गिलावा ओला असतांनाच ब्रशाने त्यावर चित्रे रंगवली जातात. त्यामुळे दोन्ही एकजीव होऊन एकमेकाबरोबरच सुकतात. अशी फ्रेस्कोज वक्राकृती सीलिंग्जच्या किंवा घुमटांच्या आंतल्या बाजूने सुद्धा काढलेली आहेत. ती रंगवण्यासाठी त्या कलाकारांनी इतक्या उंचावरील मचाणावर चढून व आडवे झोपून कसे काम केले असेल व त्यातून इतक्या सुंदर कलाकृती कशा निर्माण केल्या असतील या विचाराने मन थक्क होते. सर्वसामान्य कलाकारच नव्हेत तर मीकेलँजिलोसारख्या तत्कालिन सर्वोत्तम कलावंतांनी देखील अशा प्रकारे काम या ठिकाणी वर्षानुवर्षे केलेले आहे. जमीनीवर तर अगणित प्रकारांनी रंगीबेरंगी फरशा बसवून त्यातून तरत-हेच्या आकृती निर्माण केल्या आहेतच, छोट्या छोट्या रंगीबेरंगी दगडांच्या मोझेकमधून भिंतीवर देखील सुंदर चित्रे बनवली आहेत. टॅपेस्ट्री नांवाच्या आणखी एका प्रकारात प्रचंड आकाराचे गालिचे विणतांनाच त्यामधील धाग्यांना योग्य प्रकारचे रंग देऊन त्यातून सुंदर चित्रे निर्माण केलेली आहेत व ते गालिचे उभे करून भिंतींवर चिकटवले आहेत. बहुतेक खिडक्यांच्या कांचेच्या तावदानांवर सुंदर आकृती रंगवलेल्या आहेत. त्यासाठी आधी कांच बनवतांना ती वितळलेल्या स्थितीत
असतांनाच त्यात रंग मिसळले जातात व त्यावर विशिष्ट रंगांनी चित्र काढून ती कांच भट्टीमध्ये भरपूर भाजली जाते.
कांही चित्रांतील चेहेरे अशा खुबीने बनवले आहेत की त्यांच्याकडे पहात या टोकांपासून त्या टोकापर्यंत दहा बारा पावले चालत जातांना ती व्यक्ती सतत आपल्याकडे टक लावून पहात असल्याचा भास होतो किंवा पन्नास माणसांचा घोळका ते चित्र पहात असतांना त्यातील प्रत्येकाला ते आपल्याकडे पाहते आहे असे वाटते. एका जागी तर सपाट छपरावर एक चित्र रंगवून त्यावरील छायाप्रकाशाच्या खेळाने त्या जागी त्रिमितीमध्ये रेखीव कलाकुसर कोरली असल्यासारखे दिसत होते. महाभारतातील मयसभेबद्दल फक्त ऐकले किंवा वाचले होते. इथे आल्यावर अशा प्रकारची दिशाभूल प्रत्यक्ष पहायला मिळाली. याशिवाय तत्कालिन युरोप खंडातील व इजिप्तसारख्या देशातून जिंकून आणलेले कलाकृतींचे कित्येक नमूने जागोजागी मांडून ठेवले आहेत. आज ही सगळी चर्चेस उत्कृष्ट वस्तुसंग्रहालये झाली आहेत.
व्हॅटिकनमध्ये अशा प्रकारची चार स्वतंत्र म्यूजियम्स आहेत. वेळे अभावी आम्हाला त्यातील सिस्टीन चॅपेल ही जगप्रसिद्ध इमारत व सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च एवढेच आंतून पहायला मिळाले. पंधराव्या व सोळाव्या शतकातील युरोपमधील सर्वोत्तम कलाकारांच्या चित्रकला व शिल्पकला यांनी सिस्टीन चॅपेल सजले आहे. सिक्स्टस नांवाच्या पोपने चौदाव्या शतकात याचे उद्घाटन केले म्हणून त्याचे नांवावरून सिस्टीन हे नांव पडले. मीकेलँजिलोने या चॅपेलच्या छपरावर आंतल्या बाजूला रंगवलेली 'दि क्रीएशन' व 'दि लास्ट जजमेंट' ही अनुक्रमे मानवजातीची परमेश्वराद्वारे करण्यात आलेली उत्पत्ती आणि शेवटी त्यांची स्वर्गात वा नरकात रवानगी दाखवणारी चित्रे जगप्रसिद्ध आहेत. ईव्हची उत्पत्ती, ईडन बाग, निषिद्ध असलेले फळ खाणे वगैरे दाखवणारी याच मालिकेतील आणखी कांही चित्रेही आहेत. गेल्या शेकडो वर्षांत धुरामुळे या चित्रांवर साठलेला कार्बनच्या कणांचा थर हलकेच काढून कांही वर्षांपूर्वीच त्यांना पुन्हा एकदा पूर्वीचा तजेला प्राप्त करून दिला आहे. हे काम सुद्धा कित्येक वर्षे चालले होते म्हणे. त्यामुळे आम्हाला मात्र ती चित्रे स्वच्छ व चांगल्या स्वरूपात पहायला मिळाली. बायबलमधील ओल्ड व न्यू टेस्टामेंटमध्ये वर्णिलेले अनेक प्रसंग दाखवणारी भव्य चित्रे जिकडे तिकडे आहेत. ग्रीक व लॅटिन पुराणांतील वेगवेगळ्या देवता, राजे, महापुरुष तसेच खलनायक वगैरेंच्या चित्रांची व पुतळ्यांची गणतीच करता येणार नाही.
सेंट पीटर्स बॅसिलिका हे जगातील सर्वात मोठे चर्च हे एक स्थापत्यशास्त्राचे अद्भुत आश्चर्य मानावे लागेल. त्याच्या भिंतीच पंचेचाळीस मीटर उंच उभ्या आहेत आणि मधला घुमट तर तब्बल एकशे छत्तीस मीटर उंच आहे. क्रेन किंवा लिफ्टसारखी कोठलीही यांत्रिक साधने नसतांना माणसांनी आपल्या ताकतीने व हिंमतीने इतक्या उंचीवर दगडविटा नेऊन हे बांधकाम कसे केले असेल? ते काम सुरू असतांना अर्धवट बांधलेल्या भागाला खालून आधार कसा दिला असेल? आपल्याकडल्या ताजमहाल व गोलघुमटाबद्दल सुद्धा असेच कौतुक वाटते. या ठिकाणी भव्य असा घुमट तर आहेच पण त्यावर सुरेख चित्रे देखील रंगवली आहेत. त्याच्या भिंतींच्या बाह्य कठड्यावर वेगवेगळ्या ख्रिश्चन साधूसंतांच्या पूर्णाकृती पुतळ्यांची रांगच उभी केली आहे. आंत जाण्यासाठी समोरील मुख्य दरवाजाच्या बाजूलाच उपद्वारे आहेत. त्यातील एक दरवाजा फक्त अतिविशिष्ट अतिथींसाठी राखून ठेवलेला आहे तर एका दरवाजातून आंत प्रवेश केल्यास सर्व पापांचा नाश होऊन ती व्यक्ती नक्की स्वर्गाला जाते अशी भाविकांची समजूत आहे. मात्र हा दरवाजा बंद करून व त्याची किल्ली त्याच दाराच्या आड ठेऊन त्याच्या मागच्या बाजूला एक भिंती बांधून ठेवली आहे. पंचवीस वर्षातून एकदा ही भिंत फोडून ती चावी बाहेर काढली जाते व प्रत्यक्ष पोपमहाराज त्या किल्लीने तो दरवाजा उघडून आंत प्रवेश करतात. अर्थातच त्या वेळी त्यांच्या मागोमाग जाऊ
इच्छिणा-या लोकांची भाऊगर्दी नक्की उडत असणार. प्रवेशद्वारातून आंत गेल्यावर किती तरी प्रशस्त व उंच दालने आहेत. तिकडे जाण्यासाठी मोठमोठे पॅसेजेस आहेत. त्यात जागोजागी चित्रे व पुतळे यांची रेलचेल आहे.
मीकेलँजेलो याचे पिएटा हे सुप्रसिद्ध शिल्पही येथेच आहे. तळघरांमध्ये पूर्वी होऊन गेलेल्या अनेक पोपांची दफनभूमी आहे, तर कांही विशिष्ट संतांची शरीरे जतन करून ठेवलेली आहेत. त्यांचे दर्शन घेणा-यांचीही गर्दी असते. घुमटावर चढून जाण्यासाठी सोय आहे पण तिकडे जाण्यासाठी इच्छुक लोकांनी लावलेली रांगच नजर पोचेल तिथपर्यंत लागलेली होती. अर्थातच आमच्याकडे इतका वेळ नव्हता.
सेंट पीटर्स बॅसिलिका पाहून झाल्यावर सेंट पीटर्स पियाझामध्ये बाहेर आलो. पियाझा म्हणजे चौक. हा चौक तर एखाद्या पटांगणासारखा अवाढव्य आहे. सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या दोन्ही अंगाने पसरलेले खांबावर उभे असलेले लांब रुंद व उंच असे प्रशस्त आडोसे पाहून ती वास्तू दोन्ही हांत पसरून आपल्याला आवाहन करीत असल्याचा भास होतो. येथील सर्व वास्तुशिल्प मुख्यतः बेनिनी या सुप्रसिद्ध इटालियन वास्तुशिल्पकाराच्या अचाट कल्पनाशक्तीतून निर्माण झाले आहे. त्याने सुरू केलेली बरोक ही शैली पुढे युरौपभर आणि तेथून जगभर पसरली व उंच कमानी, भव्य दरवाजे, भरपूर कलाकुसर वगैरे वैशिष्ट्याने नटलेल्या अनेक भव्य वास्तू त्या शैलीमध्ये बनवल्या गेल्या.
पोपचे वसतीस्थान इथे उभे राहून दिसते. दर आठवड्यात ठरलेल्या वेळी आपल्या खिडकीत उभे राहून पोप महाराज दर्शन देतात व हांत हलवून अभिवादन करतात. ते पाहण्यासाठी खूप गर्दी होते. तसेच वर्षातील ठरलेल्या उत्सवांच्या दिवशी ते धार्मिक प्रवचन देतात. ते इथे येऊन ऐकण्यासाठी निमंत्रणाची आवश्यकता असते.
व्हॅटिकन सिटीमधून बाहेर येतांना कांही तरी अचाट, भव्य, दिव्य असे पाहिल्याचा अनुभव येतो व ख्रिश्चन धर्माबद्दल मनात यत्किंचित प्रेमभावना नसलेल्यांनासुद्धा "तेथे कर माझे जुळती" असे म्हणावेसे वाटते.

Saturday, April 18, 2009

ग्रँड युरोप - भाग ३ - रोममध्ये भ्रमण


दि. १६-०४-२००७ पहिला दिवस - रोममध्ये भ्रमण


प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन कालखंडांतील इतिहासाच्या खुणा दाखवणारे अवशेष बहुतेक करून वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. दिल्लीसारख्या क्वचितच एखाद्या जागी या तीन्ही प्रकारचे अवशेष सापडतात. पण गेल्या दोन हजाराहून अधिक काळातल्या सलग अशा इतिहासकाळाचे दर्शन घडवणा-या भव्य इमारतींचे भग्नावशेष तसेच सुस्थितीमध्ये ठेवलेल्या ऐतिहासिक वास्तू एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जागी रोमखेरीज अन्य कोठे दिसणार नाहीत. केवळ राजकीय घटनाक्रमाचा इतिहासच नव्हे तर कला व संस्कृती यांचा इतिहाससुद्धा दाखवणारा अत्यंत समृद्ध असा खजिना या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे.
रोम शहराच्या स्थापनेसंबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. त्या कथेप्रमाणे एका अविवाहित राजकन्येच्या पोटी जन्मलेल्या रोम्युलस आणि रेमस नांवाच्या जुळ्या भावंडांना तान्ही बाळे असतांनाच नदीकांठी सोडून दिले गेले होते. परंतु हिंस्र पशूंच्या भक्ष्यस्थानी पडण्याऐवजी एका लांडगीनेच स्वतःचे दूध पाजून त्यांना वाढवले. तरुण झाल्यावर ते मोठे शूरवीर बनले आणि त्यांनी आजूबाजूच्या भागात आपला अंमल सुरू केला. पुढे दोन्ही भावाभावातच लढाई होऊन त्यात रोम्युलसने रेमसला मारून टाकले व तो तेथील राजा झाला. त्याने एका डोंगरावरील उजाड जागी रोम या आपल्या राज्याच्यी नवी राजधानी वसवली. अशी रोमच्या जन्माची गोष्ट सांगतात. ही घटना ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात घडली.
त्यानंतर रोम शहराची तसेच त्या राज्याची भरभराट होत गेली. कालांतराने तिथे राजेशाहीच्या ऐवजी प्रजातंत्राची स्थापना झाली व लोकप्रतिनिधींच्या एकत्र विचारानुसार राज्यकारभार सुरू झाला. ज्युलियस सीजर या महापराक्रमी व महत्वाकांक्षी माणसाने रोमन प्रजातंत्राच्या राज्याचा चहूकडे विस्तार केला पण त्याची सर्व सत्तासूत्रे स्वतःच्या एकट्याच्या हांतात घेतली. यामुळे नाराज झालेल्या त्याच्या विश्वासू सहका-यांनीच कट करून त्याची हत्या केली. या प्रसंगातील नाट्य शेक्सपीयरच्या ज्युलियस सीजर या नाटकाने अजरामर केले आहे. त्यातील ज्यूलियसच्या तोंडी असलेले "ब्रूटस तू सुद्धा! मग आता सीजरला मरायलाच पाहिजे." हे अतीव वैफल्य दाखवणारे उद्गार, तसेच मार्क अँथनीच्या भाषणातील "आणि ब्रूटस हे एक सन्मान्य गृहस्थ आहेत." हे पुन्हा पुन्हा येणारे उपरोधिक वाक्य यांचा उल्लेख ब-याच वेळा नमून्यादाखल केला जातो. ज्यूलियस सीजरची हत्या झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रजातंत्र कांही प्रस्थापित होऊ शकले नाही. मागाहून आलेल्या सीजर्सनी, विशेषतः ऑगस्टसने आपला साम्राज्यविस्तार चालूच ठेवला व रोमन साम्राज्य हे एक शक्तीशाली साम्राज्य म्हणून उदयास आले.
सुरुवातीस रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्माला कडाडून विरोध केला, एवढेच नव्हे तर त्याच्या प्रसारकांना हाल हाल करून ठार मारले. तरीसुद्धा हळू हळू जनतेमध्ये तो अधिकाधिक लोकप्रिय होत गेला व सरतेशेवटी रोमन सम्राटानेसुद्धा त्या धर्माचा स्वीकार करून त्याला राजाश्रय दिला. त्यानंतरच्या काळात राजाची सत्ता क्षीण होत गेली व धर्मगुरूंचे प्राबल्य वाढत गेले. मध्यंतरीच्या कालखंडात तर पोप व त्याचे गांवोगांवचे प्रतिनिधी हेच सर्वसत्ताधारी बनून बसले होते. ठिकठिकाणी एखाद्या डोंगराच्या शिखरावर किल्ल्यासारखी तटबंदी बांधून बांधलेली त्यांची आलीशान निवासस्थाने आजसुद्धा पहायला मिळतात.
या काळात युरोपांत सर्वत्र व विशेषतः इटलीमध्ये अत्यंत भव्य अशी चर्चेस, चॅपेल्स, कॅथेड्रल्स वगैरे बांधण्यात आली. त्यामधील कांही वास्तू तर एवढ्या प्रचंड आहेत की त्याचे बांधकाम दोन तीनशे वर्षे चालले होते. तसेच देशोदेशीच्या महान कलाकारांनी पिढ्यान पिढ्या राबून त्या सजवल्या आहेत. यांत दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती, कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे, भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज, गालिचे, हंड्या, झुंबरे वगैरे असंख्य वस्तू आहेत.
आधुनिक काळात पोपची राजकीय सत्ता पुन्हा संकुचित झाली व देशोदेशीची साम्राज्ये युरोपात उभी राहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी जगभर आपापली साम्राज्ये पसरवली. रोम ही तर इटली या देशाची राजधानी बनली. पण पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली व्हॅटिकन सिटी हे एक स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. रोम आणि व्हॅटिकन सिटी मधील सर्व अवशेष आणि कलाकृती व्यवस्थितपणे पाहण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही असे म्हणतात. रोममधल्या आमच्या दोन दिवसांच्या मुक्कामामधला पाऊण दिवस तर निवासस्य़ानी पोचण्यात गेला होता. त्यामुळे आम्हाला जितके जमेल तितके रोम उरलेल्या जेमतेम सव्वा दिवसात पाहून घ्यायचे होते.
युरोपमध्ये व विशेषतः रोममध्ये वाहतुकीचे नियम जरा कडक आहेत. तरीही सगळीकडे ट्राफिक जाम झालेला असतो ही गोष्ट वेगळी. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बस नेता येत नाही की उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे मोठ्या रस्त्यावरील एका जागी आम्ही खाली उतरलो व संदीपच्या मागोमाग गल्ल्याबोळांतून चालत चालत ट्रेव्ही फाउंटन या जगप्रसिद्ध जागी आलो. या ठिकाणी नांवाप्रमाणे वाटतो तसा भव्य असा कारंजा नाही. पण छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे अत्यंत सुंदर अशा अनेक शिल्पांनी नटलेली एक मोठी इमारत आहे व त्या शिल्पांच्या मधूनच पाण्याचे अनेक प्रवाह खळाळत खालच्या कुंडात पडतात. त्यात फूट दीड फूट उंचीचे कांही फवारेही आहेत. एका मोठ्या चौकामध्ये ही प्रेक्षणीय कलाकृती तयार केली आहे. तीनशे वर्षापूर्वी ती बनवतांना जमीनीखालून तिथे वाहते पाणी आणण्याची अद्भुत व्यवस्था केली होती. आजकाल ते सतत वाहणारे पाणी कुठून येते व कुठे जाते ते समजत नाही. आजूबाजूला तरी कुठे पंपाचा आवाज ऐकू आला नाही. या कुंडामध्ये श्रद्धापूर्वक एखादे नाणे फेकले तर तो माणूस पुन्हा कधी ना कधी त्या ठिकाणी परत येतो अशी समजूत आहे. त्यावर इथे युरोच पाहिजे, चवली पावली चालणार नाही अशी मल्लीनाथी कोणीतरी केली. हे ठिकाण पहायला येणा-या पर्यटकांची ही झुंबड उडालेली होती. त्यात आंतरराष्ट्रीय पाकीटमार आणि खिसेकापूसुद्धा असण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात असा इशारा संदीपने आधीच देऊन ठेवला होता.
युरोपमधल्या बेभरंवशाच्या वातावरणाचा पहिला अनुभव इथे आला. आम्ही त्या ठिकाणी पोचलो तेंव्हा तेथे किती लख्ख ऊन पडले होते हे या छायाचित्रांवरूनही दिसते. पण पाहता पाहता आभाळ अंधारून आले आणि पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. सुदैवाने त्याचा जोर वाढला नाही आणि आम्ही चालक चालत आमच्या पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचू शकलो.
आमचा पुढील कार्यक्रम होता टाईम एलेव्हेटर राईड. हा एक अद्भुत प्रकारचा अनुभव आहे. आधी एका हॉलमध्ये उभ्या उभ्या रोमच्या इतिहासाची थोडक्यात माहिती ऐकून मुख्य सभागृहात गेलो. विमानात असतो तसा एक हेडफोन तिथे खुर्चीलाच जोडलेला असतो तो कानांना लावला की इटालियन किंवा इंग्रजी भाषेत समीक्षण व संवाद ऐकू येतात. त्या दृष्टीने त्या ठिकाणी इटालियन व इंग्रजी भाषिकांसाठी वेगवेगळे बसण्याचे विभाग आहेत. समोरील पडद्यावर रोमच्या इतिहासाचा चित्रपट दाखवला जात असतांनाच आपल्या खुर्च्या जागच्या जागी हलायला व थरथरायला लागतात, तसेच मागून, पुढून व सर्व बाजूने आवाज येऊ लागतात. समोरील चित्रे झूम शॉटने मागे पुढे होऊ लागतात. आपण त्रयस्थपणे पडद्यावरील दृष्य पहात नसून प्रत्यक्ष त्या घटनास्थळी हजर होतो असे वाटण्यात या सा-याचा परिणाम व्हावा असा उद्देश यामागे आहे. तो कांही प्रमाणात सफल होतो. केंव्हा केंव्हा मात्र विनाकारण आपल्याला जोरजोरात दचके बसत आहेत असेही वाटते. रोम्युलसच्या किंवदंतेपासून अलीकडच्या काळात रोममध्ये घडलेल्या घटनांपर्यंतच्या सगळ्या प्रमुख घटना एकापाठोपाठ दाखवल्या जात असतांना आपण खुर्चीला खिळून राहतो. ज्यूलियस सीझरचा खून, रोम जळत असतांना नीरोचे फिडल वाजवीत शांत राहणे, कांही युद्धाचे किंवा आक्रमणाचे प्रसंग फारच परिणामकारक वाटतात. एकदा रोममध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला होता असे सांगतांना अचानक पायापाशी हवेचा बारकासा झोत आल्याने आपण एकदम दचकून पाय वर उचलतो. एकंदरीत अर्ध्या पाऊण तासात आपले पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळते. रुक्ष वाटणारा किंवा फारसा ओळखीचा नसलेला इतिहाससुद्धा किती मनोरंजक पद्धतीने सांगता येतो याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.
. . . . . (क्रमशः)

Friday, April 17, 2009

ग्रँड युरोप - भाग २- रोम येथे आगमन


दि. १६-०४-२००७ रोम येथे आगमन
पंधरा एप्रिलच्या रात्री बारा वाजून गेल्यानंतर म्हणजे सोळा तारीख सुरू झाल्यानंतर तासाभराच्या आंतच आमच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले व ते सकाळी उजाडायच्या सुमारास व्हिएन्नाला पोचले. 'थ्रू चेक इन' केलेले असल्यामुळे पुढच्या प्रवासाची बोर्डिंग कार्डस आधीच मिळालेली होती आणि चेक्ड इन बॅगेज परस्पर रोमला जाणार होते. हँड बॅगेज तेवढे घेऊन खाली उतरलो. विमानतळावर पुढे कुठे जायचे, कसे जायचे वगैरे मार्गदर्शन संदीप करीत होता. त्यामुळे शोधाशोध करण्याची गरज नव्हती. घोळक्याबरोबर जात असल्याने वाट चुकण्याची भीती नव्हती. या जागीच युरोपियन युनियनमध्ये प्रवेश होत असल्यामुळे पासपोर्ट व्हिसा वगैरेची तपासणी होऊन त्यावर इमिग्रेशनचा शिक्का बसला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दुस-या विमानाने रोमला गेलो. या विमानातले बहुतेक प्रवासी आमच्यासारखे पर्यटकच दिसत होते. त्यांत एक चिनी किंवा जपानी लोकांचे घोळके होते, तसेच एक युरोपियन मुलामुलींचा ग्रुप होता. त्यांचे आपापसात हंसणे खिदळणे, झोंबाझोंबी व मौजमस्ती मुक्तपणे चालले होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.
सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाशांत वाटेत लागणा-या पर्वतांची हिमाच्छादित शिखरे चकाकत होती. तसेच त्याखाली हिरवी गर्द वनराई आणि हिरव्या किंवा पिवळ्या रंगाने कुंचल्याने रंगवल्यासारखे शेतांचे चौकोन दिसत होते. आकाश निरभ्र असल्यामुळे खालचे मनोहर दृष्य विमानातून स्पष्ट दिसत होते. विमानात सगळ्यांना सरसकट एकच प्रकारचा हलकासा नाश्ता होता, त्यांत शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेदभाव नव्हता. त्यात कसले पदार्थ होते ते धड समजत नव्हते. अजून भूकही लागलेली नव्हती. त्यामुळे कुणी त्यातले कांही खाल्ले, कुणी नाही.
दीड तासांनंतर रोमचे विमानतळ आले. मी बावीस तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा 'लिओनार्दो दा विंची' एअरपोर्टवर उतरत होतो. याच ठिकाणी मी युरोपच्या भूमीवर माझे पहिले पाऊल ठेवले होते ते आठवले. आता परिस्थिती बरीच बदलली होती. विमानातून जमीनीवर खाली उतरण्याची गरजच नव्हती. एरोब्रिजमार्गे सरळ विमानतळाच्या इमारतीत प्रवेश झाला. स्वागताला बंदूकधारी कमांडोज नव्हते. आम्ही ऑस्ट्रियामधून आलेलो असल्यामुळे इमिग्रेशनचे चेकिंग करण्याची गरज नव्हती. संदीपच्या पाठोपाठ आम्ही सगळे यात्रेकरू सामान आणणा-या कन्व्हेयर बेल्टपाशी येऊन उभे राहिलो.
व्यापारीकरण व यांत्रिकीकरण झालेल्या आधुनिक युरोपमधल्या संस्कृतीचे पहिले दर्शन रोमला पोचतांच घडले. सामान उचलणारे भारवाही हमाल तर इथून पूर्वीच अदृष्य झालेले होते, पण स्वतःच्या हाताने ढकलायच्या ट्रॉल्यासुद्धा आता तिथे मोफत उपलब्ध नव्हत्या. त्या सगळ्या एका जागी यांत्रिक रीतीने एकमेकांत अडकवून ठेवलेल्या होत्या. त्या यंत्रात एक युरोचे नाणे टाकले की त्यातली समोरची एक ट्रॉली सुटी होऊन बाहेर निघत होती. नोट आत सरकवली की सुटी नाणी देणारे ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन बाजूलाच होते. बहुतेकांनी त्यातून सुटी नाणी घेऊन एक एक ट्रॉली काढून घेतली. त्यांतही कांही लोकांनी एक युरो म्हणजे साठ रुपये असा हिशोब करून "आमच्या बॅगांना ओढून नेण्यासाठी अंगचीच चाके लावलीच आहेत की, पुन्हा मग भाड्याची ट्रॉली कशाला?" असा विचार करून एक युरो वाचवला.
दहा पंधरा मिनिटांत सामान मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि सर्व प्रवाशांनी कन्व्हेयर बेल्टला अक्षरशः गराडा घातला होता. पण पाऊण तास झाला तरी तो हलायला तयार नव्हता. आजूबाजूला बसायचीही कांही सोय नव्हती. त्यामुळे कंटाळलेल्या लोकांनी कुठे खांब, कुठे भिंत, कुठे पायरी, सरतेशेवटी सामानाची ट्रॉली, अशा मिळेल त्या आधाराला टेकायला हळूहळू सुरुवात केली. भारतात सुद्धा कुठेही विमानातील सामान यायला इतका विलंब लागलेला मला आठवत नाही. शेवटी एकदाचा तो पट्टा फिरायला लागला आणि पुन्हा सगळे लोक तिकडे धांवले आणि तिथे ही गर्दी झाली. त्यानंतरही एक एक दोन दोन करीत संथगतीने त्यावरील सामान येत होते. आपले सामान आलेले पाहून एक एक जण सुस्कारा टाकीत सामान घेऊन बाजूला होत होता. शेवटचे सामान येईपर्यंत तासभर उलटून गेला होता. आपापले सामान मिळाले हे ही नसे थोडके असे वाटले. मागच्याच वर्षी लीड्सच्या विमानतळावर उतरल्यानंतर आपले सामान मागेच राहिले असल्याचा अनुभव ताजा होता.
संदीपने सगळ्या कळपाला एकत्र गोळा केले आणि आधीच उशीर झाला असल्याकारणाने घाईघाईने चलायला सांगितले. पण प्रत्यक्षात बाहेरच्या पॅसेजमध्ये नेऊन तिथेच थांबवले आणि "मी जरा बाहेर जाऊन बस पाहून येतो." असे सांगून तो स्वतः नाहीसा झाला. रात्रभरच्या प्रवासाचा शीण, बसल्या स्थितीत अर्धवट झोप झाली असल्याने आंबलेले अंग, सकाळी नीट नाश्ता न झालेला आणि सामानाची वाट पहात तासभर ताटकळत उभे राहणे यामुळे सगळे पार थकले भागलेले दिसत होते. "मारे उत्साहाने नवे जग पहाण्यासाठी करीत असलेल्या ग्रँड युरोप टूरची ही असली सुरुवात?" असेच विचार मनात येत होते. कदाचित त्यामुळे असेल, पण पुढील प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण असह्य वाटायला लागला होता.
संदीप जसा गेला होता तसाच एकदम उगवला आणि आपली बस बाहेर उभी असल्याची सुवार्ता त्याने दिली. आलेली मरगळ झटकून सगळेजण बाहेर आलो. थोड्याशा अंतरावर आमच्यासाठी आणलेली अद्ययावत वातानुकूलित बस उभी होती. भारतात पाहिलेल्या कोठल्याही व्हॉल्व्होपेक्षा अधिक प्रशस्त व आरामशीर सीट्स त्यात होत्या आणि उतारूंना चढण्या उतरण्यासाठी एक पुढे आणि एक मधोमध असे दोन स्वतंत्र दरवाजे होते. सामान ठेवण्यासाठी मोठे होल्ड्स होते, बटन दाबून उघडझाप करणारे दरवाजे त्यांना बसवले होते. सर्व सदस्यांना सुरुवातीसच आसन क्रमांक दिले गेले. यापुढील संपूर्ण सहलीमध्ये तेच कायम राहतील असा केसरीचा नियम आहे असे सांगितले गेले. प्रत्येक थांब्यावर बसमधले सगळे प्रवासी परत आले आहेत याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने व एखादी जागा रिकामी असल्यास कोण यायचा आहे ते चटकन कळावे यासाठी ते आवश्यक होते.
आपापले सामान बसमध्ये ठेऊन सगळेजण आपापल्या जागांवर स्थानापन्न झाले. "मंगलमूर्ती मोरया" च्या गजराने आमच्या युरोपदर्शन सहलीचा शुभारंभ झाला. पण अंगावर घामेजलेले, मळलेले व चुरगळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस, दाढीचे वाढलेले खुंट, कोमेजलेले चेहेरे अशा अवस्थेत आम्ही सुंदर रोमनगरीचे दर्शन घेणार होतो कां? दूरचा प्रवास केल्यावर सर्वप्रथम आपण आपल्या तिथल्या मुक्कामाच्या जागी जातो, गरम गरम चहाचे दोन चार घोट मिळाल्यास घशाखाली उतरवतो, कढत पाण्याचा शेक घेत घेत स्वच्छ स्नान करून धुतलेले कपडे घालून थोडा वेळ निवांत पडतो आणि चार घास खाऊन घेतल्यानंतर पुढच्या कामाला लागतो. प्रवासाने आलेला थकवा घालवून ताजेतवाने होण्याची हीच एक रीत आहे अशी माझी समजूत होती. आतापर्यंत बहुतेक वेळी मी असेच करत आलो होतो. पण सामूहिक सहलीत भाग घेतल्यानंतर मनासारखे करण्याचे स्वातंत्र्य कुठे असते? आपला मार्गदर्शक जे सांगेल तसे करावे लागते. त्यामुळे बसमध्ये बसल्यावर ती जिथे नेईल तिथेच जायचे होते.
तिथून निघाल्यावर रोमचे कांही हमरस्ते आणि कांही उपमार्ग यावरून धांवत ती महाराजा नांवाच्या भोजनगृहासमोर येऊन थांबली. पोटात तहान आणि भूक लागली होती आणि बरोबर घेतलेले फराळाचे पदार्थ अजून सामानांत अडकलेले होते. त्यामुळे आम्हीसुद्धा भोजनासाठी आतुर झालो होतो, पण महाराजाला अजून पूर्णपणे जाग आलेली नसल्यामुळे त्याच्या वाड्याचा दरवाजा बंद होता. आंगणातच एक खुर्च्यांचा ढीग होता. हळू हळू त्यातलीच एक एक खुर्ची काढून एक एकजण त्यावर आसनापन्न झाले आणि एकमेकांच्या ओळखी करून घेऊ लागले. थोड्याच वेळात भोजनालयाचे महाद्वार उघडले आणि आम्ही आत जाऊन जेवायला बसलो. रोमसारख्या शहरात भारतीय पद्धतीच्या नांवाने काय खायला मिळणार आहे याची शाश्वती वाटत नव्हती. त्या मानाने फारच चांगले जेवण मिळाले. त्यांचे नान कांहीसे पिझाच्या बेससारखे वाटत होते. पण तोंडीलावणी रुचकर होती. अती मसालेदार किंवा तेलकटही नव्हती. पोटभर चविष्ट जेवण मिळाल्याने अंग सुखावले आणि बसमध्ये पेंगत पेंगत आमच्या राहण्याच्या हॉटेलला पोचलो. सामानसुमान घेऊन आपापल्या खोल्यांवर जाऊन, विश्रांती घेऊन तयार होण्यासाठी तासाभराचा वेळ दिला होता. सगळ्यांनाच युरोपातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची अतीव उत्सुकता असल्यामुळे बत्तीस लोकांचा आमचा ग्रुप अगदी दिलेल्या वेळेबरहुकूम बसपाशी हजर झाला. आता आमच्या ग्रँड युरोपदर्शनाची खरी सुरुवात झाली.
. . . . . . . (क्रमशः)

Thursday, April 16, 2009

ग्रँड युरोप - भाग १ - प्रास्ताविक


दोन वर्षांपूर्वी १६ एप्रिललाच आम्ही युरोपच्या दौ-यावर जायला निघालो। त्या प्रवासात आलेले अनुभव शब्दबध्द करून ठेवले आहेत ते क्रमाक्रमाने देण्यास आजपासून सुरुवात करत आहे. ही मालिका जरा लांबच असल्यामुळे थोड्या थोड्या कालावधीने अधून मधून इतर विषयांवरील लेख देत राहणार आहे.
२००७चे नवे वर्ष सुरू होताच नव्या वर्षात काय काय करायचे याचा विचारही सुरू झाला होता. कौटुंबिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक वगैरे सगळ्या परिस्थिती व अवस्था विचारात घेतल्यानंतर आम्ही उभयतांनी या वर्षी टूरिस्ट कंपनीबरोबर एक छानशी सहल करून येणे ही सर्वोत्कृष्ट कल्पना आहे असे सर्वानुमते ठरवण्यात आले. वर्तमानपत्रात व टीव्हीवर रोज दिसणा-या अनेक प्रकारच्या अतिशय आकर्षक जाहिरातींचासुद्धा या निर्णय प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याची दाट शक्यता आहे. काश्मीर, कन्याकुमारी व सिक्कीम ही भारताची तीन टोके माझी पाहून झालेली होती. मधला बराचसा भाग नजरेखाली येऊन गेला होता. उरलेला भाग थोडा थोडा करीत पाहणे चालूच होते. युरोप पहायची इच्छा मात्र बालपणापासून मनात घर करून राहिली होती, त्यामुळे युरोपची निवड होणे ओघानेच आले.
कुठल्या कंपनीची कुठली सहल निवडायची हा एक यक्षप्रश्न होता. ज्या कंपन्यांच्या मोठ्या जाहिराती पाहण्यात येतात त्यात केसरीचे नांव ठळकपणे नजरेसमोर येत होते. दोन तीन लोकांनी त्यांच्या व्यवस्थेसंबंधी अनुकूल मतही दिले होते म्हणून केसरीच्याच ऑफीसात प्रथम चौकशी करायला गेलो. त्यांच्या अद्ययावत पद्धतीच्या वातानुकूलित ऑफीसात प्रवेश करताच सस्मित स्वागत करून आम्हाला एका कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितले. तिथे एका मोठ्या स्क्रीनवर वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळे व्हीडिओवर दाखवत होते. तिथे बसलेल्या सगळ्यांना शीत पेय व चहा देण्यात आला. येणा-यावर पहिले चांगले इम्प्रेशन कसे पाडायचे असते हे इथे येऊन पहावे असे वाटले.
थोड्याच वेळात आम्हाला बोलावून एका एक्झिक्यूटिव्हकडे नेण्यात आले. परदेशी सहलीला जायचे आहे म्हणताच तिने केसरीचेच एक माहिती पुस्तक उघडले. दर दोन पानात मिळून एक अशा पन्नास साठ तरी वेगवेगळ्या सहलींची सविस्तर माहिती त्यात दिली होती. युरोपला जायचे आहे असे सांगितल्यावर त्यातही अनेक पर्याय होते. आमच्या वयोमानाचा विचार करता त्यातील 'ग्रँड युरोप' ही सर्वोत्तम सहल आहे असे तिने सुचवले. फार धांवपळ होणार नाही आणि कांही चांगल्या गोष्टी पाहिल्याचे समाधानही मिळेल अशा हृष्टीने या सहलीची योजना केली असल्याचे तिने सांगितले. हॉलंडमधील ट्यूलिप्सच्या बागा पहायच्या असल्यास लवकरच जायला हवे होते, तशा लवकर सुरू होणा-या सहलींमध्ये थोड्याच जागा शिल्लक राहिल्या होत्या आणि दोन दिवसात कागदपत्रे आणून दिली तरच वेळेवर व्हिसा मिळणे शक्य होते, असे असल्याने लगेच आमचे बुकिंग करून टाकले. साधी चौकशी करायला गेलो असतांना तत्क्षणी निर्णय
घेऊन टाकण्याची मला संवय झाली आहे. त्यावर पश्चात्ताप करायची वेळ कधी आली नाही. त्यामुळे कोणाला त्याचे आश्चर्य वाटत नाही आणि "इतकी घाई कशाला केली?" असेही कोणी सहसा म्हणत नाही.
परत येतांयेतांच व्हिसासाठी आवश्यक असणारे फोटो काढायला स्टूडिओमध्ये जायचे मनात होते पण पत्नी त्यासाठी सजून 'तयार' नव्हती म्हणून घरी जावे लागले. "हा फोटो फक्त व्हिसावर लावण्यासाठी हवा आहे. विमानाचा लांबचा प्रवास करून झाल्यानंतर इमिग्रेशनवरच्या काउंटरला तुझा चेहेरा यातल्या फोटोसारखा दिसला पाहिजे. त्या वेळी तू तिच्याकडे मेक अप वगैरे करून जाणार आहेस कां?" वगैरे तिला समजावून सांगितल्यानंतर 'तयारी'च्या वेळेतली पांच मिनिटे कमी करण्यात आली. दुस-या दिवशी बँकेची
स्टेटमेंट्स वगैरे गोळा करून झाल्यावर आमचे अस्तित्व सिद्ध करणारे उरले सुरले सगळे भरभक्कम पुरावे जमवले, त्याच्या तीन तीन प्रती काढल्या, दोन अप्लिकेशन फॉर्मांच्या चार चार प्रती हांताने लिहून भरल्या आणि एकदाचे सगळे कागद केसरीकडे नेऊन दिले. तिकडे जग 'पेपरलेस' कार्याच्या युगात जायला निघाले आहे आणि ते जग पाहण्यासाठी जाणारे आम्ही तेवढ्या कारणासाठी बॅग भरून कागदपत्रे तयार करीत होतो.
व्हिसाचे काम सुरळीतपणे चालू आहे हे पाहिल्यावर उरलेले पैसे भरून टाकले. व्हिसासह पासपोर्ट, विम्याची पॉलिसी व विमानाचे तिकीट हे सगळे विमानतळावरच मिळणार असल्याचे समजले. प्रवाशांसाठी उपयुक्त सूचना देणारी एक सीडी मिळाली. त्यांत खूप मनोरंजक माहिती दिली होती. एक सज्जन म्हणे नवे कोरे पायजमे घेऊन युरोपला गेले पण त्यांत घालायला नाडी न्यायला विसरले! मग टूर ऑपरेटरला त्यांच्यासाठी परदेशांत नाडी शोधत हिंडावे लागले. सामान भरण्यासाठी केसरीकडून छानशा बॅगा भेट दिल्या गेल्या. त्यात मावतील तेवढे कपडे ठेऊन उरलेले सामान आपल्याकडील बॅगांमध्ये भरले आणि सहार विमानतळावरील ठरलेल्या जागी १५ एप्रिलला रात्री दिलेल्या वेळी जाऊन पोचलो.
टूरचे बुकिंग करतांना आपले सहप्रवासी कोण आहेत याची कांही कल्पना नव्हती. आमच्या जोडीला आमच्या ओळखीचे कोणीच नव्हते. इतर प्रवासी कदाचित दोन्ही खिसे भरभरून युरोच्या नोटांच्या गड्ड्या आणतील आणि जिकडे तिकडे ते युरो उधळत जातील, पण आपल्याला तसे करणे जमणार नाही, किंवा ते सगळे तरुण लोक टणाटण उड्या मारीत धावत पुढे जातील आणि आपण त्यांच्या पाठीमागे धापा टाकीत खुरडत जात असू असे स्वप्नात दिसू लागल्यामुळे मनात अस्वस्थता वाटत होती. विमानतळांवर जेंव्हा सगळा ग्रुप जमा झाला तेंव्हा त्यांना पाहून सुखद आश्चर्य वाटले आणि मनांतल्या धाकधुकींची सांवटे अदृष्य होऊन गेली. तिथे जमलेली बहुतेक सगळी मंडळी आमच्यासारखीच, एकाच स्तरातली आणि वयोगटातली दिसत होती. केसरीच्या ग्रुप्समध्ये बहुसंख्य मराठी लोकच असतात एवढे ऐकले होते. पण आमचा गट तर अगदी शंभर टक्के मराठी होता. त्यामुळे गाईडबरोबर व आपापसातले सारे बोलणेमाय मराठीतच झाले.
विमानतळावर पोचल्यावर केसरीकडून ज्याला त्याला ज्याचे त्याचे पासपोर्ट, तिकीटे व विम्याची पॉलिसी वगैरे तर मिळालेच, प्रवासात त्या गोष्टी जपून ठेवण्यासाठी गळ्यात अडकवण्याचा सुरेख तसाच मजबूत पाउचसुद्धा दिला गेला. दुस-या एका छोट्या पाउचमध्ये टूथ ब्रश, टूथपेस्ट, रेझर, क्रीम, बँडएड, गाउज वगैरेचा संच होता. एका वेगळ्या पॅकेटमध्ये पुरणपोळी, चकली, खाकरा, वेफर्स, डिंकाचे लाडू, चॉकलेट व लिमलेटच्या गोळ्या, सुका मेवा, मुखशुद्धी, चटणी, लोणचे वगैरे अनेक प्रकारच्या टिकाऊ वस्तू भरलेली छोटी छोटी पॅकेट्स होती. प्रवासात वाटेत कुठेही भूक लागली किंवा खाण्याची इच्छा झाली तर कांही तरी तोंडात टाकायची सोय केलेली होती. मात्र या गोष्टी केबिन बॅगेजमध्ये कदाचित नेऊ देणार नाहीत, तेंव्हा प्रत्येकाने त्या चेक्ड इन बॅगेमध्ये टाकून घ्याव्यात अशी सूचना मिळाल्यावर प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. घरून निघतांना त्यांनी कांही विचार करून प्रवासाच्या बॅगा भरल्या होत्या. आता त्यातल्या कांही गोष्टी बाहेर काढून हे फराळाचे पदार्थ आंत ठेवावे लागले व जास्तीच्या गोष्टी हांतात धराव्या लागल्या. एअरपोर्टवर
असलेल्या रेस्तरॉंमध्ये स्नॅक्स घेतांघेताच सामानाची ही जमवाजमवी करून घेतली.
त्याच दिवशी ग्रँड युरोपच्या सहलीवर निघालेले केसरीचे दोन ग्रुप होते. आमचा ग्रुप ऑस्ट्रियन एअरने व्हिएन्नामार्गे रोमला जाणार होता आणि दुसरा ग्रुप अलइटालियाने मिलानमार्गे तेथेच पोचणार होता. आतापर्यंत आम्ही एकत्रच बसलो होतो. आमचे ग्रुप एस्कॉर्टस आल्यावर त्यांनी आपापल्या सदस्यांना वेगवेगळे बोलावून घेतले आणि महत्वाच्या सूचना दिल्या. आमच्या ग्रुपमधील प्रत्येकाचे नांव व पत्ता लिहिलेला एक कागद आणि प्रवासातील प्रत्येक टप्प्यावरील उतरण्याच्या ठिकाणांची यादी विमानतळावर आल्यावरच प्रत्येकाला दिलेली होती. संदीप पाटील हा आमचा वाटाड्या होता. याच नांवाच्या प्रसिद्ध क्रिकेटपटूशी त्याचा कांही संबंध नाही हे त्याने आल्या आल्याच सांगितले. त्याच्या बरोबर आम्ही इमिग्रेशन, कस्टम, सिक्यूरिटी वगैरे चेक्स पार करून प्रयाणकक्षात गेलो. जे लोक प्रथमच परदेशी जात होते त्यांना थोडेसे मार्गदर्शन करावे लागले. पण त्यासाठी फारसे कांही प्रयास पडले नाहीत. आजकाल एवढे सामान्यज्ञान प्रत्येकाकडे असते. ठरलेल्या वेळी आमच्या विमानाने व्हिएन्नाच्या दिशेने उड्डाण केले.
. . . . . . . (क्रमशः)

Monday, April 13, 2009

कोंडी - भाग १ -४

चार भागात लिहिलेली ही कथा आज एकत्र करून दिली आहे.
२१ जून २०१८

 भाग १


अगदी आडबाजूला असलेल्या एका लहान गांवातल्या एका बाळबोध वळणाच्या कुटुंबात जन्या जन्माला आला, तिथल्या सरकारी शाळेत गेला आणि तिथेच लहानाचा मोठा झाला. शाळेत जाऊन तो नक्की काय काय शिकला ते सांगणे थोडे कठीण आहे, पण त्या काळातली बहुतेक मुले शाळेत जाऊन जे कांही करायची तेच तोसुध्दा करत असे. शिक्षकांच्या नेमणुका, बदल्या वगैरेंची सूत्रे दूर कुठेतरी असलेल्या शिक्षणखात्याच्या मुख्यालयातून हलवली जात असल्यामुळे त्या लहान गांवातल्या शाळेतल्या वर्गांची आणि ते सांभाळणार्‍या शिक्षकांची संख्या यातले गणीत कांही नेहमीच सरळ सोपे नसे. नेमून दिलेल्या मास्तरांपैकी कोणाची गांवाजवळच शेतीवाडी नाही तर गांवात दुकान असायचे, आणिक कोणी पूजाअर्चा, अभिषेक वगैरेमध्ये मग्न असत. त्या व्यापातून वेळ मिळेल तसे ते शाळेत येत, वर्गातल्या मुलांना बाराखड्या, जोडाक्षरे किंवा पाढे लिहून काढायला सांगत आणि खुर्चीवर बसून आराम करत असत. परीक्षेत मात्र ते मुलांना सर्वतोपरी प्रयत्न करून वरच्या वर्गात ढकलत असत. बहुतेक सारी मुलेसुध्दा शेतीची कामे, दूधदुभते, सुतारकाम, लोहारकाम, विड्या वळणे वगैरे घरातल्या उद्योग व्यवसायाला हातभार लावत असत. जेंव्हा त्यांना देण्याजोगे काम नसे त्या वेळी घरातला दंगा कमी व्हावा म्हणून त्यांना शाळेत पिटाळले जात असे. वर्गात डोकावून पाहून गुरूजी दिसले नाहीत की ते शाळेच्या प्रशस्त आवारात गोट्या, विटीदांडू, लपंडाव वगैरे खेळू लागत किंवा चिंचा, आवळे, बोरे, कैर्‍या वगैरे ऋतुकालोद्भव फळांच्या झाडांकडे आपला मोर्चा वळवत. कांही मुले वर्गातच बसून गप्पा व थापा मारणे, नवनव्या गोष्टी सांगणे, कविता किंवा गाणी म्हणणे वगैरे गतिविधींमध्ये आपला वेळ घालवत आणि मास्तर येतांना दिसले तर बाहेर जाऊन आपल्या वर्गातल्या मुलांना गोळा करून आणत. जन्याचे कधी या गटात तर कधी त्या गटात असे आंतबाहेर चालले असे. प्राथमिक शाळेत असा आनंद होता.
माध्यमिक शाळेत गेल्यानंतर वर्गात उपस्थित असणारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांच्या संख्येत थोडी वाढ झाली. त्याबरोबरच वर्गात बसल्या बसल्या टिंगल-टवाळ्या, कुचाळक्या वगैरें करण्याचे नवनवे प्रयोग मुले करू लागली. जन्या त्यात उत्साहाने सहभागी होत राहिला. मॅट्रिकच्या परीक्षेचे पेपर बाहेरून येत आणि तपासण्यासाठी बाहेर पाठवले जात यामुळे त्या परीक्षेची सर्वांनाच धास्ती वाटत असे. शाळेतले त्यातल्या त्यात कामसू आणि अनुभवी शिक्षक जास्तीचे खास वर्ग घेऊन परीक्षेचा सारा अभ्यासक्रम संपवत असत. जन्याला अभ्यासची गोडी कधी लागली नसली तरी त्याचे डोके तल्लख असल्यामुळे कानावर पडलेल्या कांही गोष्टी त्याच्या लक्षात राहिल्या, नशीबाने त्याला थोडी साथ दिली आणि शाळेचा मॅट्रिक परीक्षेचा निकाल जेमतेम वीस बावीस टक्के लागला असला तरी त्यात जन्याचा नंबर लागून गेला. एकदाचे गंगेत घोडे न्हाले.
जन्याच्या गांवात महाविद्यालय नव्हते आणि त्याने शहरात राहून शिक्षण घेण्याइतकी त्याच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे कॉलेज शिकण्याचे स्वप्न त्याने कधी पाहिलेच नव्हते. किंबहुना स्वप्नरंजन हा प्रकारच त्याला माहीत नव्हता. आज मिळते तेवढी मौजमजा करून घ्यायची, उद्याचा विचार उद्या करू, त्याचा ताप आज कशाला ? असे तो वर्तमानकाळातच जगत आला होता. पण मॅट्रिकचा अडसर त्याने पहिल्या फटक्यात ओलांडल्याचे ऐकून शहरात राहणार्‍या त्याच्या कांही आप्तांनी मदतीचा हात पुढे केला. त्या काळात तांत्रिक शिक्षणाला आजच्याइतकी मागणी नव्हती, पण भविष्यकाळाचा विचार करून कांही नवी तंत्रशिक्षणाची केंद्रे उघडली गेली होती. तशा एका तंत्रनिकेतनात त्याला प्रवेश मिळवून दिला, आर्थिक दुर्बलतेच्या आधारावर नादारी मिळाली आणि कोणा उदार गृहस्थांकडे राहण्याजेवण्याची सोय झाली. अशा प्रकारे कांहीशा अनपेक्षित रीतीने जन्याचे उच्च शिक्षण सुरू झाले.
पण त्यापूर्वी त्याने कधीही मन लावून अभ्यास केला नव्हता किंवा अंग मोडून कामही केले नव्हते. तंत्रनिकेतनातील शिक्षणात रोज तीन चार तास कार्यशाळेत किंवा चित्रशाळेत उभे राहून काम करावे लागे आणि त्याशिवाय तीन चार तास कधी न ऐकलेल्या विषय़ांवरील व्याख्याने ऐकावी लागत असत. त्यानंतर घरी येऊन त्याचा अभ्यास करायचा. हे बहुतेक सारे विषय विज्ञान आणि गणितावर आधारलेले होते आणि ते इंग्रजी माध्यमातून शिकायचे होते. गणीत, विज्ञान आणि इंग्रजी हे विषय जन्याचे जरा जास्तच कच्चे राहिले असल्यामुळे वर्गात शिकवलेले समजत नव्हते आणि ते शिकण्यात रस वाटत नव्हता. आलेला दिवस जनार्दन कसाबसा ढकलत होता. अखेर पहिल्याच परीक्षेत तो एकूण एक विषयात नापास झाला आणि त्याचे बिंग फुटले. ज्यांनी त्याला मदत केली होती त्यांना ती वाया गेल्याचा राग आला आणि ज्यांनी त्यासाठी आपला शब्द टाकला होता ते तोंडघशी पडले. शहरातला आधार न राहिल्यामुळे जनार्दन गांवाकडे परत गेला.
पण तिथले चित्र तोंपर्यंत बदलले होते. त्याच्या वर्गात शिकणारी धनिक लोकांची मुले कॉलेजच्या शिक्षणासाठी शहरांत गेली होती. त्यातली कांही मुले तिथे अभ्यासात चांगली प्रगती करत होती, पण ज्यांना ते एवढे जमत नव्हते ती सुध्दा त्या निमित्याने शहरात राहू शकत होती. गरजू मुले वेगवेगळ्या जागी नोकरीला लागली होती किंवा नोकरीच्या शोधात हिंडत होती. ज्या मुलांचा घरचा उद्योग व्यवसाय होता ती पूर्णवेळ कामाला लागली होती. जनार्दनाबरोबर घालवण्यासाठी आता त्यातल्या कोणाकडेच फारसा वेळ नव्हता. घराची सांपत्तिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरातले लोक त्याच्याकडे डोळे लावून बसलेले होते. त्यांची बोलणी आणि शेजार्‍यांचे टोमणे सहन करणे दिवसेदिवस कठीण होत चालले होते. थोड्याच दिवसात आपले बालपण संपले असल्याचे त्याच्या ध्यानात आले आणि तो नोकरीच्या शोधाला लागला.
. . . . . . . .
------------------------------------

भाग २


'अन्नासाठी दाही दिशां'ना शोध घेता घेता जनार्दनाला मुंबईजवळच्या एका गांवात नोकरी मिळाली. तिथल्या नगरपालिकेच्या जकातनाक्यावर कारकुनाच्या जागेवर त्याची नेमणूक जाली. 'पोटापुरता पसा' मिळण्याची सोय झाली आणि त्या गांवात राहणार्‍या एका नातलगाच्या बाल्कनीत पथारी पसरून झोपायला आडोसा मिळाला. अशा प्रकारे त्याच्या जीवनाचा दुसरा खंड सुरू झाला. तिथले काम फारसे कठीण नव्हते, पण नोकरीच्या तीन पाळ्या असत, त्यामुळे कधी भल्या पहाटे, कधी भर दुपारच्या उन्हात, तर कधी अपरात्री तंगड्या तोडत गांवाच्या वेशीपर्यंत जावे यावे लागत असे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊसवारा सहन करत पाण्यातून व चिखलातून जाणे त्याच्या जीवावर येत असे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आता त्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागणार आहेत हे त्याला पूर्णपणे कळून चुकले.

कामावर नसतांना तसेच असतांनाही त्याला भरपूर मोकळा वेळ मिळायचा. त्याचा सदुपयोग करून घेऊन त्याने सार्वजनिक आरोग्यावरचा एक लहानसा अभ्यासक्रम पुरा केला आणि त्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याच्या आधारावर त्याला नगरपालिकेच्या आरोग्यविभागात बदली मिळाली. महिन्याचा पगार, कामाची जागा आणि कामाचे तास या तीन्ही गोष्टीत चांगला फरक पडला. दीड दोन वर्षे लक्षपूर्वक काम करून त्याने त्या कामाबाबतची सगळी माहिती शिकून घेतली. शिवाय इकडे तिकडे त्याचे लक्ष होतेच. मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत कांही जागा रिकाम्या असल्याचे कळताच त्याने त्यासाठी अर्ज केला. 

चांगल्या व्यक्तीमत्वाची देण जनार्दनाला जन्मतःच मिळालेली होती, त्याचा स्वभाव बोलका होता आणि कामाबद्दलची माहिती आणि अनुभव यातून त्याचा आत्मविश्वास वाढला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्या जागेसाठी त्याची निवड झाली आणि मुंबईच्या सीमेच्या पलीकडे असलेल्या लहान गांवातून तो मुख्य महानगरात आला. तरी त्याची पहिली नेमणूक मुंबईच्या पार सीमेवरच्या एका उपनगरात झाली होती. त्या काळात दळणवळणाची आणि संदेशवहनाची एवढी साधने नव्हती तसेच त्या भागात इतर नागरी सुखसोयीसुध्दा फारशा सुलभ नव्हत्या. त्या बाबतीत तो भाग थोडा गैरसोय़ीचा असल्याने मुंबईमधील रहिवासी तिथे जाऊन राहण्यास फारसे उत्सुक नसायचे. योगायोगाने जनार्दन नोकरीला लागल्यानंतर लवकरच तिथल्या महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या वसाहतीतली एक जागा रिकामी झाली आणि जनार्दनाला ती विनासायास मिळून गेली. 

पंचविशी गाठेपर्यंत जनार्दन नोकरीत चांगला रुळला होता, रहायला जागा मिळाली होती आणि कामावर जाण्यायेण्यासाठी त्याने हप्त्यांवर एक स्कूटर घेतली होती. साहजीकच उपवर कन्यांच्या पालकांची नजर त्याच्याकडे गेली आणि त्याच्यासाठी वधूसंशोधन सुरू झाले. या बाबतीतही त्याचे दैव जोरावर होते. फार काळ वाट पहावी न लागता अनुरूप अशी जीवनसंगिनी त्याला सापडली आणि जान्हवीबरोबर तो विवाहबध्द झाला. जान्हवी सर्व दृष्टीने जनार्दनाला हवी तशीच, किंबहुना त्याला पूरक अशी होती. प्राप्त परिस्थितीतील अडचणी व गैरसोयींबद्दल कुरकुर करत न बसता त्यात जमेल तेवढी सुधारणा करायची आणि उरलेल्यांची खंत मनात न बाळगता त्या शांतपणे सोसायच्या असे तिचे जीवनसूत्र होते. त्याचबरोबर मिळत असलेले सुख आनंदाने उपभोगायची तिची वृत्ती होती. जीवनात जास्त आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्न आणि कष्ट करायला ती नेहमी तयार असे. घराजवळच असलेल्या महानगरपालिकेच्या इस्पितळात तिलाही नोकरी मिळाली आणि दुहेरी अर्थार्जनाचे सुपरिणाम दिसू लागले. रंगीत टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, टेलीफोन, धुलाईयंत्र वगैरे उपयोगाच्या एकेक आधुनिक काळातल्या वस्तू त्यांच्या घरात येत गेल्या. 

जनार्दन आणि जान्हवीच्या संसारात प्राजक्ताने चिमुकले पाऊल टाकले आणि एका अनोख्या सुगंधाने तो दरवळला. लहानग्या प्राजक्ताचे अत्यंत मायेने लालन पालन होत गेले. तिला वसाहतीमधल्या इतर मुलांबरोबर तिथल्या महापालिकेच्या शाळेत न घालता मैलभर अंतरावरील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात शिकायला पाठवले. शाळेत जायच्या आधीच घरच्या घरी तिचा अभ्यास सुरू झाला होता. जान्हवीने तिच्या शिक्षणाकडे बारीक लक्ष ठेवले होते आणि प्राजक्ता सुध्दा अभ्यासात हुषार निघाली. पहिल्या इयत्तेत तिने वर्गात पहिला क्रमांक मिळवला आणि शालांत परीक्षेपर्यंत तो टिकवून धरला. त्यानंतर ती इंजिनियरिंग कॉलेजला गेली आणि तिथेही प्रत्येक वर्षी पहिला वर्ग टिकवून धरून ती उत्तम टक्केवारी घेऊन पदवीधर झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र तेंव्हा चांगले जोरात प्रगतीपथावर होते. एका प्रतिष्ठित कंपनीतली चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी प्राजूकडे आपणहून चालून आली. आयुष्याच्या सुरुवातीलाच ती आपल्या आई वडिलांच्या दुप्पट तिप्पट अर्थार्जन करू लागली. तिची प्रगती पहात असतांना जनार्दन आणि जान्हवी मनोमन हरखून जात होते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळतांना पाहून त्यांना अपूर्व समाधान वाटत होते. 
. . . . . . . . 

भाग ३


प्राजक्ता नाकीडोळी नीटस तसेच रंगाने उजळ होती, गोडवा आणि शालीनता हे तिचे दोन्ही गुण तिच्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसायचे, तिच्या बोलण्यात माधुर्य होते, ती बुध्दीमान होतीच, इंजिनियरिंगची पदवी तिने मिळवली होती आणि एका प्रख्यात कंपनीत ती चांगल्या पदावर नोकरी करत होती. तिचे लग्न तर अगदी चुटकीसरशी जमून जाईल याबद्दल सर्वच आप्तेष्टांना पूर्ण खात्री होती. तिला चांगला मनाजोगता जोडीदार मिळावा असेच सर्वांना आपुलकीपोटी वाटत होते आणि त्यातले थोडे श्रेय़ आपल्याला मिळाले तर तेही हवे होते. त्यामुळे शिक्षण पूर्ण करून प्राजू नोकरीला लागताच जो तो आपापल्या वर्तुळात तिच्यासाठी वरसंशोधन करू लागला. वय, उंची, शिक्षण आणि उत्पन्न या चार बाबतीत नवरा मुलगा मुलीच्या मानाने सरस असावा असा सर्वमान्य संकेत आपल्याकडे आहे. त्यात दोघांचे शिक्षण समान असले तरी चालते आणि उत्पन्नाचा आकडा सारखा बदलत असतो, पण लग्न जुळवण्याच्या वेळी तरी वराचेच उत्पन्न वधूपेक्षा जास्त असावे लागते. ठरवून केलेल्या विवाहात सहसा कोणीही परभाषिक, परजातीचे किंवा परधर्माचे स्थळ पहात नाही, सुचवत तर नाहीच नाही. एवढी किमान अवधाने पाळूनसुध्दा प्राजक्तासाठी योग्य अशा विवाहोत्सुक युवकांची कमतरता नव्हती. त्यामुळे सर्वच आप्तस्वकीयांनी आपापल्या परिचयातली दोन चार स्थळे सुचवली. प्राजक्ताचे लग्न जुळवण्याचा विचार मनात येतो न येतो तोंपर्यंत निदान शंभर तरी स्थळांची नांवे, माहिती, पत्ते आणि फोन नंबर जनूभाऊंच्याकडे आले. त्यांनी त्याची छाननी सुरू केली. या बाबतीत मात्र जनूभाऊ, जान्हवी आणि प्राजू यांचे निकष वेगवेगळे होते. त्यामागे तशीच सबळ कारणे होती. 

जनार्दनाचा जनूभाऊ होण्यापर्यंत त्याची प्रगति झाली असली तरी महापालिकेचे सफाई कामगार आणि त्यांनी गोळा केलेला कचरा ट्रकमध्ये भरून तो डंपिंग ग्राउंडमध्ये नेऊन टाकणारे ट्रक ड्रायव्हर यांच्यावर देखरेख ठेवणे हे त्याच्या कामाचे स्वरूप कांही बदलले नव्हते. त्यामुळे दिवसातला त्याचा बराचसा वेळ या लोकांच्या सहवासात जात असे. त्यातील अशुध्द शब्दोच्चारासह त्यांची गांवढळ भाषा त्याच्या जिभेवर बसली होती. कधी कधी अनवधानाने एकादा अपशब्द त्याच्या तोंडातून निघून जात असे. त्याचे दांत तंबाखूच्या सेवनाने रंगले होते आणि त्या लोकांचे हांतवारे, अंगविक्षेप वगैरे जनूभाऊंच्या देहबोलीचा भाग झाले होते. त्याच्या विचारसरणीवरही त्या कामगारांच्या सहवासाचा थोडा प्रभाव पडला असावा. जान्हवीचा संपर्क जास्त करून मध्यम वर्गातील पांढरपेशा महिलांबरोबर येत असे. त्यामुळे तिचे बोलणे, वागणे त्या वर्गाच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे झाले होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास ती जुन्या काळातल्या काकूबाईंची पण खूप सुधारलेली आधुनिक आवृत्ती वाटायची. प्राजूला लहानपणापासून जसे घरापासून दूर असलेल्या चांगल्या दर्जेदार अशा शाळेत घातले होते, तसेच घराच्या आसपासच्या मुलांपासूनही तिला थोडे दूरच ठेवले गेले होते. तिच्या बहुतेक वर्गमैत्रिणी उच्च मध्यवर्गीयांच्या हाउसिंग सोसायट्यातल्या फ्लॅटमध्ये रहात असत. प्राजू जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे आपल्या मैत्रिणींकडे जाणेयेणे वाढत गेले. इंजिनियरिंगसाठी ती कॉलेजच्या हॉस्टेलवर रहात होती, तिथल्या मैत्रिणी सांपत्तिक व सामाजिक दृष्ट्या अधिकच वरच्या स्तरातून आल्या होत्या. त्यांच्या संपर्कात राहून प्राजक्ताच्या वागण्यात सफाई, अदब आणि रिफाइनमेंट आली होती. वेषभूषा, केशभूषा, सौंदर्यसाधनांचा वापर वगैरे बाह्य स्वरूपाच्या गोष्टींच्या बाबतीत तिने आपल्या आईवडिलांना जितपत पसंत पडेल तितपतच मजल मारली असली तरी अंतरंगातून ती त्यांच्या विश्वापासून खूप पुढे गेली होती. त्या तीघांनीही कधीही ही गोष्ट आपल्या ओठावर येऊ दिली नसली तरी ती त्यांच्या कळत नकळत घडत होती. यामुळे लग्नसंबंधासाठी स्थळांचा विचार करून त्यांची छाननी करतांना त्या तीघांच्या हातात वेगवेगळ्या चाळणी होत्या. 

जनार्दन आणि जान्हवी या उभयतांचे बहुतेक सर्व नातलग मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातच रहात असल्यामुळे आपले लहानपणी वास्तव्य असलेले खेडेगांव सोडल्यानंतर जनार्दनाचा सारा प्रवास एवढ्या भागातच झाला होता. त्यापलीकडचे विश्व त्याने कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे आपल्या लाडक्या कन्यकेला लग्न लावून सातासमुद्रापलीकडे पाठवून द्यायची कल्पनासुध्दा तो सहन करू शकत नव्हता. फार फार तर बडोदा, इंदूर किंवा धारवाडपर्यंत तिला पाठवायची त्याच्या मनाची तयारी होती. प्राजूने आपल्या नजरेच्या टप्प्यात असावे असेच जान्हवीलाही वाटत होते. शिवाय नवरदेवाचे आईवडील, भाऊ बहिणी वगैरे मंडळीसुध्दा त्याच्यासोबतच रहात असली तर उत्तमच, निदान ती गरज पडतांच लगेच येऊ शकतील एवढ्या जवळ असावीत असे तिला वाटत होते. या बाबतीत प्राजूचे मत विचारण्याचा धोका त्यांनी पत्करला नाही. सांगून आलेल्या स्थळांमधली अनेक मुले परदेशी गेलेली होती, किंवा जायच्या तयारीत होती. ज्यांची भावंडे अमेरिकेत आधीच जाऊन स्थायिक झाली होती ती आज ना उद्या जाणारच असे गृहीत धरून अशी सर्व स्थळे जनूभाऊने यादीतून कटाप केली. नोकरीसाठी दिल्ली, कोलकाता किंवा बंगलोरला गेलेल्या मुलांचाही विचार केला नाही आणि ज्यांचे आईवडील डेहराडून किंवा कोचीनसारख्या दूरच्या ठिकाणी रहात होते त्यांनाही बाजूला ठेवले. मुंबई व पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातल्या इतर विभागात प्राजूपेक्षा जास्त पगार मिळवणारी अशी कितीशी मुले असणार? त्यामुळे तिच्यासाठी वरसंशोधन करण्याचे क्षेत्र मुंबईपुण्याच्या सीमेतच मर्यादित राहिले. 

प्राजूच्या ज्या मैत्रिणींची लग्ने झाली होती त्या माहेरच्या चांगल्या सुखवस्तू घरातून निघून सासरच्या अधिकच प्रशस्त घरी गेल्या होत्या. कांहीजणींची ठरलेली लग्ने त्यांच्यासाठी नवा फ्लॅट बांधून तयार होण्याची वाट पहात थांबवून ठेवली होती. तिलासुध्दा आपला नवा संसार छानशा जागी थाटावा असे वाटले तर त्यात काही विशेष आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. पण तिला सांगून आलेल्या स्थळातली कांही मुले सध्या तरी दादर गिरगांवातल्या चाळीत किंवा डोंबिवली भायंदरसारख्या दूरच्या नगरातल्या दोन खोल्यात रहात असलेल्या आपल्या मध्यमवर्गीय आईवडिलांकडे रहात होती. परदेशातल्याप्रमाणे वयात आल्याबरोबर मुलांनी लगेच स्वतंत्र होऊन राहणे अजून आपल्या देशात रूढ झालेले नाही. पुढे त्यांनी गरजेपोटी आपले वेगळे घर केले असतेच, पण लग्न झाल्या झाल्या त्यासाठी पुढाकार घेऊन प्राजूला वाईटपणा घ्यायचा नव्हता. तसेच ते होण्याची वाट पहात त्या माणसांच्या गर्दीत जाऊन राहण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती आणि तिला तसा आग्रह करावा असे जनार्दनालाही वाटत नव्हते. आधीपासूनच व्यवस्थित परिस्थितीत रहात असलेल्या कुटुंबात लग्नानंतर जायची तिची इच्छा त्यालासुध्दा मान्य होती. 

अशा प्रकारे मुंबईपुण्यात राहणारी सुस्थितीतली स्थळे निवडून त्यातील एकेकाला प्राजक्ताची माहिती, पत्रिका वगैरे पत्राने पाठवायला जनूभाऊंनी सुरुवात केली. तसेच संभाव्य वराची चौकशी केली. पत्रिका पाहणारे लोक गोत्र, मंगळ, एकनाड यासारख्या कांही किमान गोष्टींकडे लक्ष देतातच, सगोत्र विवाह कोणालाच चालत नाही आणि कांही गोत्रांचे आपसात जमत नाही. त्यामुळे त्या मुद्यांवरून १०-१५ टक्के पत्रिका वर्ज्य ठरतात. आकाशातील राशीचक्रातल्या एकूण बारा राशींपैकी पाच राशींमध्ये (म्हणजे सुमारे चाळीस टक्के लोकांच्या पत्रिकेत) मंगळ हा ग्रह असला तर त्या व्यक्तीला मंगळ आहे असे समजले जाते आणि उरलेल्या अमंगळ व्यक्ती त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार नसतात. कोणाला मंगळ असला तर यात साठ टक्के जागी पत्रिका जुळत नाहीत. जगातील एक तृतियांश म्हणजे तेहतीस टक्के लोकांची नाड एकच असते, ते ही गेले. त्याशिवाय कोणाचा जन्म चांगल्या तिथीवर झालेला नसतो, तर कोणाचे जन्मनक्षत्र अशुभ मानले जाते. अशा सर्व नकारघंटा ऐकल्यानंतर सुमारे वीस टक्के पत्रिकांतल्या जोड्याच एकमेकीशी जुळतात आणि बहुसंख्य म्हणजे ऐंशी टक्के जुळत नाहीतच. असे सर्वांच्याच बाबतीत होत असते. त्याप्रमाणे अनेक लोकांनी प्राजक्ताची पत्रिका त्यांच्या मुलाच्या पत्रिकेशी जुळत नसल्याचा निकाल जनूभाऊंना कळवला. 

म्युनिसिपल क्वार्टर्समधला जनूभाऊंचा पत्ता पाहूनच कांही वरपित्यांनी ते पत्र कचर्‍याच्या पेटीत टाकून दिले असेल. त्याला उत्तर देण्याची गरज त्यांना वाटली नसेल. कांही लोकांना टेलीफोन करून जनूभाऊने आठवण करून दिली, पण रांगडेपणाचा स्पर्श असलेल्या भाषेतले त्याचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांनी ते संभाषण जास्त वाढवले नाही. बंगल्यात किंवा उत्तुंग गगनचुंबी इमारतीत रहात असलेल्या लोकांच्या घरी जायला त्याला संकोच वाटत होता, पण उद्या आपली मुलगी त्यांच्या घरी द्यायची असेल तर तिथे जावे लागणारच, असा विचार करून तो कांही लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आला. पण दर वाक्यात दोन तीन इंग्रजी शब्द आणि दर दोन तीन वाक्यात एक अख्खे इंग्रजी वाक्य असे मिश्रण असलेले त्यांचे बरेचसे बोलणे जनूभाऊच्या डोक्यावरून जात होते. त्यांच्या घरातल्या स्त्रियांनी केलेली वेषभूषा, केशभूषा व एकंदर साजश्रुंगार आणि त्यांचे मॅनर्स व एटिकेट्स सांभाळत कृत्रिमपणे बोलणे जान्हवीच्या मनात इन्फीरिएरिटी काँप्लेक्स निर्माण करत होते. त्यांना एकमेकांशी बोलता येईल असा समान विषय सापडत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात सुसंवाद साधला गेला नाही. अर्थातच त्यांच्याकडून होकार येण्याची अपेक्षा धरण्यात अर्थ नव्हता. 

प्राजक्ताला प्रत्यक्ष पाहून कोणी तिला नाकारले असे कधी झाले नाही आणि दाखवल्यानंतर तिला कोणीही नकार दिलाही नसता, पण तिच्या वरसंशोधनाच्या प्रवासाची गाडी त्या स्टेशनापर्यंत गेल्याशिवाय पुढे जायला पसंतीचा हिरवा कंदील मिळणार तरी कसा? मुलीला दाखवणे किंवा मुलगा व मुलगी यांची भेट घडवून आणणे इथपर्यंतसुद्धा बोलण्यातली प्रगती होत नव्हती. दरम्यानच्या काळात प्राजक्ताची नोकरीतली घोडदौड मात्र चालू होती. प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस, रिवॉर्ड्स वगैरेमधून तिची प्राप्ती तीन वर्षात दुपटीवर गेली. त्याबरोबर वराबद्दलच्या अपेक्षा वाढत गेल्या आणि छाननीच्या चाळणीतल्या जाळीची वीण अधिकाधिक दाट होत गेली. ज्या आप्तस्वकीयांनी उत्साहाने आधी परिचयातली दोन चार स्थळे सुचवली होती त्यांना त्यांच्या ओळखीमध्ये पहिल्यापेक्षा जास्त चांगली स्थळे मिळालीही नसती आणि मिळाली असती तरी त्यांची पहिल्यासारखीच गत झाली असती असे पहिला अनुभव पाहिल्यानंतर वाटल्यामुळे त्यांनी आणखी नवी स्थळे शोधण्यात रस घेतला नाही. वधुवर सूचक मंडळे, वर्तमानपत्रातल्या आणि इंटरनेटवरच्या जाहिराती वगैरे पाहून जनूभाऊने आपले प्रयत्न चालू ठेवले होते, पण त्यातून कांही निष्पन्न होत नव्हते. प्राजू तर रात्रंदिवस आपल्या कामातच गढून गेली असल्यासारखे दिसत होते आणि तिचे असे कांही फार मोठे वय झाले नसल्यामुळे आपल्या कमावत्या मुलीचे तातडीने लग्न करून तिची सासरी पाठवणी करण्याची जनार्दनालाही विशेष घाई वाटत नव्हती. प्राजूचे आणि अज्ञात असलेल्या संभाव्य वराचे आईवडील एकमेकांना नापसंत करत होते किंवा आकाशातले ग्रह त्यांच्या आड येत होते. तिच्या लग्नाची झालेली अनपेक्षित अशी ही कोंडी कशी फुटणार हेच कळत नव्हते.
 . . . . . . . 

भाग ४

अशातच एका दिवशी अचानक जनार्दनाचा फोन आला. तो घाईघाईने बोलला, "अरे या रविवारी कसलाही कार्यक्रम ठरवू नकोस हां, ठरला असला तरी तो रद्द कर, तुम्हाला दोघांनाही आमच्या गेट टुगेदरला यायचंय् बरं."
मला कसलाच बोध होत नव्हता. त्या दिवशी त्याच्या घरी कोणाचा वाढदिवस नव्हता की दसरा, संक्रांत यासारखा सण नव्हता. यापूर्वी जनार्दनाने अशा निमित्याने सुध्दा कधीच असे संमेलन भरवले नव्हते. कधी कधी परदेशात राहणारे पाहुणे थोडी सुटी घेऊन भारतात येतात आणि सर्व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी वेगवेगळे जाण्याइतका वेळ त्यांच्याकडे नसतो म्हणून सर्वांना एकत्र भेटण्याचा कार्यक्रम ठेवतात. जनार्दनाच्या जवळचे असे कोणीच परदेशात रहात नव्हते. मी विचार करत असतांना जनार्दन पुढे सांगत होता, "तुझी मुलं इकडे आली असतील तर त्यांनाही घेऊन ये, नसतील तरी ती येण्यासारखी असतील तर त्यांना यायला सांग. त्यांच्याही सगळ्यांशी भेटी होतील."
मी त्याला म्हंटले, "अरे हो, हे कशाबद्दल आहे ते जरा नीट सांगशील तरी, प्राजूचं लग्नबिग्न ..." मी खडा मारून पहात होतो, पण माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तो म्हणाला, "हां, त्याबद्दलच आहे. तू आलास की सगळं कळेल तुला. आधी पत्ता तर लिहून घे. मला अजून खूप फोन करायचे आहेत."
मी दिसेल ते पेन हातात घेऊन समोरच्या वर्तमानपत्रावरच त्याने सांगितलेला पत्ता, तारीख आणि वेळ लिहून घेतली. तेवढ्यात त्याने फोन बंदच केला. मी त्याला फोन लावून पाहिला, पण तो सारखा एंगेज्ड येत राहिला. त्याने सांगितल्याप्रमाणे तो फोनवर एकामागून एक बोलावणी करत असणार. रात्री त्याच्या घरी कोणी फोन उचलतच नव्हते. बहुधा तो समारंभाच्या तयारीसाठी बाहेर गेला असावा आणि मुक्कामाला तिकडेच राहिला असावा असा तर्क करून मी त्याचा नाद सोडून दिला.

रविवारी त्याने दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोचलो. अनोळखी भागातल्या पूर्वी कधी न ऐकलेल्या जागेचा शोध घेताघेता थोडा उशीरच झाला. तीन मजले चढून गेल्यावर तिथे तो हॉल होता. त्याच्या अंवतीभोवती दिव्याच्या किंवा फुलांच्या माळांची आरास नव्हती की दाराला तोरण नव्हते किंवा स्वागतासाठी कोणी उभे नव्हते. बाहेर कसला बोर्डही नव्हता. उघड्या दरवाजातून आत बसलेली ओळखीची माणसे दिसली तेंव्हा त्यांना पाहून आम्हीही आत गेलो. मुंबई पुणे नाशिक त्रिकोणातली बरीचशी नातेवाईक मंडळी आमच्या आधी तिथे येऊन पोचली होती. आणखी कांही लोक यायला निघाले होते. दारातून आत गेल्यावर जे समोर दिसतील त्यांना "हॅलो, हाय्, कसं काय ?" वगैरे विचारत, वडिलधारी लोकांचा चरणस्पर्श करत आणि आमच्या पाया पडणार्‍या मुलांच्या पाठीवर थाप मारून त्यांची खुशाली विचारत आम्ही हळूहळू पुढे सरकत स्टेजपाशी जाऊन पोचलो. भेटवस्तू किंवा लिफाफे हातात घेऊन अभिनंदन करायला आलेल्या लोकांच्या छोट्याशा रांगेत उभे राहून समोरचे निरीक्षण केले.

नखशिखांत साजशृंगार करून स्टेजवर उभी राहिलेली प्राजक्ता दृष्ट लागण्यासारखी सुरेख दिसत होती. तिच्या आमच्याकडच्या बाजूला उभे असलेले जनार्दन आणि जान्हवी भेटायला येणार्‍या लोकाचे हंसतमुखाने स्वागत करत होते. प्राजूच्या पलीकडे एक काळासावळा, तिच्या मानाने थोडा राकट वाटणारा पण तरतरीत दिसणारा एक युवक उभा होता. अर्थातच तो तिचा पती असणार. त्याच्या पलीकडे बरीच जागा सोडून स्टेजच्या कडेला दोन खुर्च्या मांडून त्यावर एक वयस्क जोडपे बसले होते. त्यातल्या गृहस्थाने सुटावर बो बांधला होता. अशा प्रकारच्या समारंभात मी प्रथमच बो बांधलेला पहात होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मॅडमने चक्क फ्रॉक घातला होता. तिच्या कपाळाला कुंकुवाची टिकली नव्हती की गळ्यात मंगळसूत्र नव्हते. तिथे फक्त एक टपोर्‍या मोत्यांची माळ दिसत होती. त्यांचे रंगरूप आणि चेहेरामोहरा पाहता ते त्या युवकाचे मातापिता असणार हे लक्षात येत होते. हॉलमध्ये आलेल्या लोकांकडे दुरूनच पहात ते फक्त एक दुसर्‍याशी बोलत बसले होते. 

आमच्या पुढे असलेला ग्रुप स्टेजवरून उतरायला लागल्याबरोबर आम्ही पुढे झालो. जनार्जन आणि जान्हवीने एक पाऊल पुढे येऊन आमचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन करून होताच त्याने ओळख करून दिली, "हे आमचे जावई, टॉम कार्व्हाल्लो. "मी ही "हौडीडू" म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केले, "काँग्रॅट्स" म्हणून त्या जोडप्याला "ऑल द बेस्ट विशेस" दिल्या, आम्ही येऊन गेल्याची नोंद आल्बममध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढून घेतला आणि स्टेजवरून खाली उतरून जनार्दनाच्या सख्ख्या भावंडांच्या शेजारी जाऊन बसलो.

ती मंडळी अजून धक्क्यातून सावरलेली दिसत नव्हती आणि त्यांनाही संपूर्ण माहिती नव्हती. थोडी माहिती, थोडा तर्क, थोडा अंदाज यातून जे तुकडे कानावर पडले त्यातून मी एक सुसंगत वाटेल अशी गोष्ट गुंफली. प्राजू आणि टॉम सात आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोघेही शाळेत असतांना कसल्याशा कार्यक्रमात पहिल्यांदा भेटले होते आणि त्यांची नुसती तोंडओळख झाली होती. पुढे दोघे वेगवेगळ्या कॉलेजात शिक्षणासाठी गेले आणि कोण कुठे गेले तेसुध्दा त्यांना एकमेकांना समजायचे कांही कारण नव्हते. शिक्षण संपल्यावर टॉमला थेट दुबाईला नोकरी लागली आणि तो तिकडेच रहात होता. वर्षभरापूर्वी सहज ऑर्कुटवर मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींची नांवे वाचतांना त्यातल्या कोणा एकाला दुसरे नांव दिसले आणि "मला ओळखलंस का?, कांही आठवतंय् कां?" असे विचारत स्क्रॅप टाकायला सुरुवात झाली आणि "तूच ना?", "आता तुझं कसं चाललंय्?", सध्या तू कुठे आहेस?" वगैरेंमधून ते संभाषण वाढत गेले. स्क्रॅप नंतर मेल, चॅटिंग वगैरे करता करता आपण दोघे 'एकदूजेके लिये' निर्माण झालो असल्याचा साक्षात्कार होऊन त्याचे ई-लव्ह अफेअर सुरू झाले. प्राजक्ताने याबद्दल चकार शब्द न उच्चारल्यामुळे घरात किंवा तिच्या मैत्रिणींना त्याचा पत्ता लागला नाही.

ती इंजिनियरिंगला गेली तेंव्हा तिच्या अभ्यासासाठी घरी कॉम्प्यूटर आणला होता आणि नोकरीला लागल्यानंतर इंटरनेट कनेक्शन घेतले होते. घरी असतांना ती त्याच्यासमोर नेहमी बसलेली असते एवढेच तिच्या आईवडिलांना दिसत होते, पण ती इंग्रजी भाषेत काय गिटर पिटर करत असे ते त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्नसुध्दा कधी केला नव्हता. आठवडाभरापूर्वी टॉम भारतात आला. दोघांनी कुठे आणि केंव्हा भेटायचे हे आधी ठरवलेलेच होते, त्याप्रमाणे भेटून त्यांनी सर्व तपशील पक्का केला. टॉमला सोबत घेऊन प्राजू घरी आली आणि तिने सांगितले, "आम्ही दोघे तीन दिवसांनी चेंबूरच्या चर्चमध्ये विवाहबध्द होत आहोत. तिथून परस्पर विमानतळावर जाऊन सिंगापूरला जाऊ आणि चार दिवसांनी परत आल्यावर आठवडाभर मुंबईला हॉटेलात राहून व्हिसा, इन्शुअरन्स, बँक अकौंट्स वगैरेची कामे आटपून अमक्या तारखेला दुबईला जाणार आहोत. माझी बदली दुबईच्या ऑफीसमध्ये झाली आहे आणि दोन आठवड्यात मला तिकडे जॉइन करायचे आहे. सर्व प्रवासांची आणि हॉटेलांची रिझर्वेशने झाली आहेत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे."

कुशल इंजिनियरच्या सफाईने त्यांनी एकूण एक गोष्टी विचारपूर्वक आणि पध्दतशीर रीतीने नियोजन करून केल्या होत्या. त्यात अविचार किंवा उतावळेपणा दिसत नव्हता. त्यामुळे ते त्यात बदल करतील अशी शक्यता नव्हती. त्यांना होकार देऊन आपल्या मायेचे उरले सुरले बंध जपून ठेवणेच जनार्दन आणि जान्हवी यांच्या दृष्टीने शहाणपणाचे होते. ते अशा गोष्टी नाटकसिनेमातून रोज पहात असले तरी गदिमांच्या शब्दात सांगायचे झाले तर "अतर्क्य ना झाले कांही जरी अकस्मात" अशी गोष्ट आता त्यांच्याच जीवनात घडत होती. त्यांनी त्याला विरोध केला नाही. प्राजू आणि टॉमच्या बिझी शेड्यूलमधला रविवारचा सुटीचा दिवस तेवढा आपल्यासाठी मागून घेतला.

प्राजू जन्मल्यापासूनच तिच्या लग्नाची तयारी हळूहळू सुरू झाली होती. तिच्यासाठी एकेक ग्रॅम सोन्याची खरेदी करून ते साठवले होते. ती मोठी झाल्यावर त्याचे अलंकार घडवून घेतले होते. अलीकडे तर कुठेही छानशी साडी किंवा ड्रेस दिसला, एकादी नवी संसारोपयोगी वस्तू दिसली की तिच्यासाठी घेऊन ठेवली जात होती, आपण कोणाकोणाकडे लग्नकार्याला गेलो होतो त्या सगळ्यांना आग्रहाने प्राजूच्या लग्नासाठी बोलावून धूमधडाक्याने तिचा बार उडवायचा असे मनसुबे रचले जात होते. त्यासाठी सर्व नातेवाइकांचे लेटेस्ट पत्ते आणि फोन नंबर एका वेगळ्या वहीत उतरवून काढले होते. पण लग्नसमारंभ तर हे दोघे परस्पर ठरवून मोकळे झाले होते. तिथे इतर कोणाला बोलवायला वाव नव्हता. त्यामुळे जनूभाऊंनी या संमेलनाचा घाट घातला. त्या क्षणाला जो हॉल मोकळा सापडला तो बुक करून टाकला आणि दोन दिवस धांवपळ करून बाकीची सारी जमवाजमव केली. हे पाहता ते संमेलन छानच झाले होते आणि जवळ राहणारी झाडून सगळी आप्तेष्ट मंडळीसुध्दा आली होती. आजकाल कोणी 'खानदानकी इज्जत'चा बाऊ करत नाही.

राहून राहून सर्वांना एकच प्रश्न पडत होता. प्राजक्ताच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींच्या मित्रमैत्रिणींमध्ये भारतीय, हिंदू आणि मराठी मुले शेकड्यांनी असतील, त्यांना सोडून नेमका हा टॉमच कसा तिला भेटला ? त्याचप्रमाणे टॉमला त्याच्यासारखीच गोव्याची एकादी कोंकणी बोलणारी लिझ किंवा मॅग कशी सापडली नाही? कदाचित हे दोघे आपापल्या परिस्थितीच्या कोंडीत सापडल्यामुळे त्या धाग्यानेच एकमेकांत गुंतत गेले असतील आणि त्यांनी दोघांनी मिळून तिला फोडायचे ठरवले असणार! 

.. . . . . . . . (समाप्त)