Wednesday, December 26, 2018

पुण्याजवळ बांधलेली महाकाय दुर्बिण


बहुतेक लोकांनी लहानपणी शाळेतल्या प्रयोगशाळेमध्ये एकादी दुर्बीण पाहिलेली असते. नेहरू सेंटरसारख्या काही संस्था आकाशाचे निरीक्षण करण्यासाठी खास शिबिरे भरवून लोकांना ग्रहताऱ्यांचे दुर्मिळ दर्शन घडवतात. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियासारख्या ठिकाणी काही लोक समुद्रात दूरवर थांबलेली जहाजे दुर्बीणींमधून दाखवतात. या सगळ्या दुर्बिणींची रचना पाहिली तर त्यात एका लांब नळीच्या दोन्ही टोकांना विशिष्ट आकारांची भिंगे बसवलेली असतात. त्यामधून प्रकाशकिरण अशा प्रकारे रिफ्रॅक्ट होतात की पाहणाऱ्याच्या डोळ्यामधल्या पटलावर उमटलेली आकृती अनेकपटीने मोठी होते, त्यामुळे ती वस्तू जवळ आल्याचा भास त्याला होतो.

सतराव्या शतकातल्या गॅलीलिओने तयार केलेल्या शक्तीशाली दुर्बिणींमधून पहिल्यांदाच आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुध्दा कला असतात हे त्याने दुर्बिणींतून पाहिले तसेच शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली. शनी ग्रहाच्या पलीकडे असलेला नेपच्यून त्याला दिसला. गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्याने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगेही पाहून त्यांची नोंद केली. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ताऱ्यांनी भरलेली आहे असे त्याने सांगितले आणि ग्रह व तारे यांचे आकार ढोबळमानाने मोजण्याचाही प्रयत्न केला. 

गॅलीलिओच्या नंतर आलेल्या काळातल्या बहुतेक शास्त्रज्ञांना आकाशाचे निरीक्षण करण्याचे विलक्षण आकर्षण वाटले. त्यांनी दुर्बिणींमध्ये अनेक सुधारणा करून अधिकाधिक मोठे आणि स्पष्ट चित्र मिळवण्याचे प्रयत्न तर केलेच, शिवाय आकाशातल्या विशिष्ट ग्रहाचे किंवा ताऱ्याचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणीला विशिष्ट कोनामध्ये बसवून आणि सावकाशपणे फिरवून त्याची बारकाईने मोजमापे घेण्याचे तंत्र विकसित केले. ब्रॅडली या शास्त्रज्ञाने ध्रुवाजवळच्या एका ताऱ्याची वर्षभर अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे करून त्या ताऱ्याचे आपल्या जागेवरून किंचितसे हलणे मोजले. ते मोजमाप एक अंशाचा सुमारे १८० वा भाग इतके सूक्ष्म होते. त्यानंतरच्या काळातसुद्धा दुर्बिणींची निरीक्षणशक्ती वाढवण्याचे प्रयत्न होतच राहिले आहेत. हबल नावाची प्रचंड दुर्बिणच अवकाशातल्या एका कृत्रिम उपग्रहावर बसवून तिच्यातून अथांग अवकाशाचा वेध घेतला जात आहे.

आपल्या डोळ्यांना फक्त दृष्य प्रकाशकिरण दिसतात, गॅलीलिओनेसुद्धा फक्त तेवढेच पाहिले होते, पण पुढील काळातल्या शास्त्रज्ञांनी अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, एक्स रेज, गॅमा रेज, रेडिओ लहरी यासारख्या अनेक प्रकारच्या अदृष्य किरणांचा शोध लावला. सूर्य आणि इतर ताऱ्यापासूनसुद्धा असे अनेक प्रकारचे किरण निघून विश्वाच्या पोकळीमधून इतस्ततः पसरत असतात. ते साध्या दुर्बिणीमधून दिसत नाहीत. त्यांच्यासाठी विशेष प्रकारची उपकरणे तयार केली जातात. काही गॅमा किरण इतके प्रखर असतात की ते शिशाच्या जाड भिंतींमधूनसुद्धा लीलया आरपार जातात. त्याचे निरीक्षण करण्यासाठी कोलारच्या सोन्याच्या खाणीच्या तळाशी काही उपकरणे ठेवली आहेत. दोन तीन किलोमीटर जाड दगडमातीच्या थरांमधून पलीकडे गेलेल्या दुर्लभ अशा कॉस्मिक किरणांचा अभ्यास तिथे केला जातो. दूरच्या ताऱ्यांपासून येणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय महत्वाची प्रयोगशाळा पुण्याजवळ खोदाड इथे उभारली आहे. आजच्या काळातला अवकाशाचा अभ्यास अशा प्रकारच्या अनेक खिडक्यांमधून निरीक्षणे करून होत असतो.

जगप्रसिध्द ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना झाली असल्याचे मला पहिल्यापासून माहीत होते, पण एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) हे नांव मी तीन वर्षांपूर्वीच ऐकले. या दोन्ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या मागच्या बाजूला खडकी औंध रस्त्यावर आहेत. भारतातील अनेक विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संशोधक आयुकामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करत आहेत. एनसीआरए ही संस्था मुख्यतः नारायणगांवजवळील खोदाड येथे स्थापन केलेल्या विशालकाय दुर्बिणीचे (Giant Metrewave Radio Telescope) काम पाहते.

ही अशा प्रकारची जगातील सर्वात मोठी दुर्बिण आहे आणि जगभरातले संशोधक इथे येऊन प्रयोग आणि निरीक्षणे करतात. या खास प्रकारच्या दुर्बिणीमध्ये परंपरागत दुर्बिणीसारख्या लांब नळकांड्या आणि कांचेची भिंगे नाहीत. ४५ मीटर एवढा प्रचंड व्यास असलेल्या ३० अगडबंब अँटेना मिळून ही दुर्बिण होते. या अँटेनासुध्दा १०-१२ वर्गकिलोमीटर्स एवढ्या विस्तृत भागात पसरलेल्या आहेत. त्या सर्व अँटेना या भागामध्ये एकमेकीपासून दूर दूर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. यातली प्रत्येक अँटेना एका गोल आकाराच्या इमारतीच्या माथ्यावर मोठ्या यंत्रांना जोडून उभारल्या आहेत. आकाशातील विशिष्ट ग्रह किंवा तारे यांचे निरीक्षण करण्यासाठी यातली प्रत्येक अँटेना त्यावर फोकस करून त्याच्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. यासाठी तिला जोडलेल्या यंत्रांमधून अत्यंत मंद गतीने सतत फिरवत रहावे लागते. या ताऱ्यांपासून निघून पृथ्वीवर पोचणाऱ्या रेडिओलहरींची वेव्हलेंग्थ काही मीटर्समध्ये असते म्हणून या दुर्बिणीचे नाव GMRT असे आहे.

या तीसही अँटेनांमध्ये रेडिओलहरींमधून येणारे संदेश (Signals) कंट्रोल रूममध्ये एकत्र केले जातात आणि विशिष्ट काँप्यूटर प्रोग्रॅम्सने त्यांचे विश्लेषण केले जाते. जगभरातले शास्त्रज्ञ आपापल्या प्रयोगशाळांमध्ये हे प्रोग्रॅम तयार करतात तसेच एनसीआरएमध्ये असलेले विशेषज्ञ त्यात सहभाग घेतात. त्यासाठी आवश्यक असलेले काँप्यूटर्स आणि तज्ज्ञ यांनी इथली प्रयोगशाळा सुसज्ज आहे. जगामधील प्रमुख अशा अत्याधुनिक फॅसिलिटीजमध्ये तिचा समावेश केला जातो. गेल्या वर्षी ज्या संशोधनाला नोबेल प्राइझ मिळाले त्यातला काही हिस्सा या विशालकाय दुर्बिणीचा उपयोग करून केला होता असे त्यावेळी सांगितले गेले होते. विज्ञानविषयक बातम्यांमध्ये एनसीआरए किंवा जीएमआरटीचे नाव अनेक वेळा येते.

दूरच्या तारकांपासून येत असलेल्या या रेडिओलहरी अतीशय क्षीण असतात. पृथ्वीवर प्रसारित होत असलेल्या रेडिओलहरींचा उपसर्ग होऊ नये यासाठी ही मनुष्यवस्तीपासून दूर अशी एकांतातली जागा निवडली आहे. तिथे रेडिओ, टेलीव्हिजन वगैरे काहीही नाहीच. कुठल्याही प्रकारची विजेवर चालणारी यंत्रे अनाहूतपणे काही विद्युतचुंबकीयलहरी (Electromagnetic waves) उत्पन्न करतच असतात, त्यांच्यामुळे ताऱ्यांच्या निरीक्षणात बाधा (Noise) येऊ नये म्हणून त्या जागेच्या आसपास कुठल्याही प्रकारचे कारखाने उभारायला परवानगी नाही. अशा पूर्णपणे निवांत जागी ही विशालकाय दुर्बिण बसवली आहे.

ही माहिती ऐकल्यानंतर हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पहायची मला खूप उत्सुकता होती, पण अशा खास ठिकाणी जाण्यासाठी आधी सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात आणि तिथे रेल्वे किंवा बस वगैरे जात नसल्यामुळे स्वतःच वाहनाची व्यवस्थाही करायला हवी. हे कसे साध्य करावे याचा मला प्रश्न पडला होता. पण मागच्या वर्षी ११-१२ सप्टेंबरला मला अचानक एका मित्राचा फोन आला आणि मी एनसीआरएमधल्या इंजिनिअरांना एकादे व्याख्यान देऊ शकेन का? असे त्याने विचारले. मी गंमतीत उत्तर दिले, "मी तर नेहमी तयारीतच असतो, पण माझे भाषण ऐकणाराच कुणी मला मिळत नाही." ही दुर्मिळ संधी अनपेक्षितपणे मिळत असल्याने अर्थातच मी लगेच माझा होकार दिला.

१७ सप्टेंबर २०१७ ला खोदाडला जीएमआरटीमध्ये मागील वर्षीचा इंजिनियरदिन साजरा केला गेला. त्यात मुख्य पाहुणे आणि व्याख्याता म्हणून मला पाचारण करण्यात आले आणि अर्थातच माझी जाण्यायेण्याची सोय झाली आणि पाहुण्याला साजेशी बडदास्त ठेवली गेली. निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यानंतर अशा संधी क्वचितच मिळतात, ती मला मिळाली, त्या निमित्याने अनेक तरुण इंजिनियरांना भेटायला मिळाले आणि मुख्य म्हणजे जीएमआरटीमधली जगातली सर्वात मोठी रेडिओदुर्बिण विनासायास अगदी जवळून आणि आतून बाहेरून पहायला मिळाली.   

Saturday, December 15, 2018

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट


दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट।
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा ।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

कविवर्य ग दि माडगूळकरांनी जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य अशा शब्दांमध्ये गीतरामायणात सांगितले आहे. साधारण अशाच अर्थाचा "यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ|" हा श्लोक महाभारतात आहे. ही उपमा मी असंख्य वेळा वाचली आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्नही सतत चाललेले असतात आणि ते बऱ्याच प्रमाणात  यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे.  प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच आणि ठरल्याप्रमाणे ती झालीही. आपल्या जीवनात आलेली काही माणसेसुद्धा काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असेही होतच असते, म्हणून मी याला अर्धसत्य म्हंटले आहे.

 काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे जातात, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही आणि अनेक वेळा ती पुन्हा कधीच भेटतही नाहीत. त्यांची गणना स्मृती ठेवुनी जाती या सदरातच करावी लागते.

माझे बालपण आता कर्नाटक राज्यात असलेल्या जमखंडी नावाच्या एका लहानशा गावात गेले. दुष्काळी भागातल्या आमच्या या गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि तिथे अगदी साध्या पिण्याच्या पाण्यापासून ते अनेक गोष्टींचा नेहमीच खडखडाट असायचा. त्यामुळे शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तितकेसे मजेदार वाटत नव्हते. मोठेपणी परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते जुने खडतर लहानपण आपल्याला परत मिळावे अशी तीव्र इच्छा कधी मनात आली नाही. कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, त्यांचे बालपण आनंदाने ओसंडून गेलेले असेल, म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझ से मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन" असे त्यांना म्हणावेसे वाटले असेल पण आमची परिस्थिति तसे वाटण्यासारखी नव्हती. पण त्या गीतामधल्या "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची आणि वाटत राहणार आहे. त्याचप्रमाणे मी ज्या मित्रांबरोबर चढाओढीने या कागदाच्या नावा चालवत होतो, सायकलच्या टायरच्या किंवा सळीच्या रिंगा पळवत होतो, लपंडाव खेळत होतो त्यांना आता आमच्या सर्वांच्याच दुसऱ्या बालपणात पुन्हा भेटायची ओढ मात्र वाटते.

माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या हायस्कूलमधल्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी साधे बोलायलासुध्दा बंदी होती, मैत्री करणे कल्पनेच्या पलीकडे होते. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी गावातल्या मैदानावर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण संपल्यानंतर त्यातले फक्त तीन चारजण, तेही निरनिराळ्या ठिकाणच्या कॉलेजला जाऊ शकले. नोकरीचाकरी शोधण्यासाठी इतर मुलांची त्यांच्या कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सुऱ्या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझेच आमच्या गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत पार हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा मित्र निव्वळ योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा नक्की भेटायचे असे ठरवून पण आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात  मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी नंतर पुन्हा एकमेकांशी बोलणार कसे?

कॉलेजच्या जीवनामध्ये मी घरापासून दूर हॉस्टेलमध्ये रहात होतो. तिथे मला फक्त मित्रांचाच सहवास असायचा. त्या काळात मला अनेक नवे मित्र भेटले, मी त्यांच्या संगतीतही खूप रमलो, आम्ही सर्वांनी एकत्र खूप धमाल केली त्याचप्रमाणे अडीअडचणीला साथही दिली, जीवनातले कित्येक अनमोल क्षण मिळवले. पण पुन्हा वर्ष संपले की जुदाई आणि विदाई ठरलेलीच. एकदा संपर्क तुटला की "पुन्हा नाही गाठ" याचीच खूणगाठ मनाशी बांधून ठेवलेली.  जीवन असेच पुढे पुढे जात राहिले. नोकरीमधल्या दीर्घ कालावधीत आणखी  असंख्य नवे मित्र मिळत गेले, त्यातले काही जवळ राहिले, काही दूरदेशी चालले गेले आणि त्यांच्याशी संपर्क तुटत गेले.

टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता  वाढल्या आहेत. इंटरनेट आणि फेसबुक या माध्यमामधून मी शाळेतल्या जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला, पण कदाचित माझे मित्र माझ्याइतके टेक्नोसॅव्ही झालेच नसावेत किंवा त्यांना या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला त्यांच्यातला कोणीच नेटवर सापडला नाही. सायन्स कॉलेजमधला माझा मित्र डॉ.एकनाथ देव मला सापडला, पण तो खूप वर्षांपूर्वी अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला आहे. आता फेसबुकवर आमचे मेसेजिंग आणि फोटो पाठवणे सुरू आहे.

इंजिनियरिंग कॉलेजमधल्या मित्रांच्या बाबतीत मात्र मी बराच सुदैवी होतो. दहा पंधरा वर्षांपूर्वी मी मुंबईला रहात असतांना एकदा माझ्या घरी पुण्याहून एक पाहुणी आली होती. तिच्याशी बोलता बोलता समजले की अशोकराव जोशी या नावाचे तिच्या पतीचे कोणी काका की मामासुद्धा माझ्याच कॉलेजला शिकलेले आहेत. अशोक हे नाव आणि जोशी हे आडनाव धारण करणारे लाखो लोक असतील. पण माझ्याबरोबरसुद्धा एक अशोक जोशी शिकत होता आणि कदाचित तोच असू शकेल म्हणून मी लगेच तिच्याकडून त्यांचा फोन नंबर घेतला आणि फिरवला. तो चक्क माझा हॉस्टेलमेट अशोक जोशीच निघाला आणि आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला. पण त्या काळात आम्ही मुंबईतच पण एकमेकांपासून खूप दूर रहात होतो आणि नोकरी व घर यांच्या व्यापात पार गुरफटून गेलो होतो. त्यामुळे आम्हा दोघांनाही प्रत्यक्ष भेटणे शक्य झालेच नाही. दोन तीन वेळा फोनाफोनी केल्यानंतर ते बंद झाले. 

तीन वर्षांपूर्वी पुण्याला आल्यानंतर पुण्याच्या कॉलेजमधल्या मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याच्या शक्यता वाढल्या. मला तशी इच्छा होती, पण त्यांच्यातल्या कुणाशी गेल्या पन्नास वर्षात संबंध न आल्यामुळे कुठून सुरुवात करायची हेच मला उमजत नव्हते. पण गंमत अशी की योगायोगाने अशोक जोशीसुद्धा आतापर्यंत पुण्याला स्थायिक झाला होता आणि पुण्यातल्या मित्रांमध्ये सामील झाला होता. त्यातला सदानंद पुरोहित आमच्या स्नातकवर्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याच्या कामाला उत्साहाने लागला होता. जोशीबुवांकडून त्याला माझे नाव कळताच त्याने लगेच मला फोन लावला आणि दुसरे दिवशी तो माझ्या घरी येऊन थडकला सुद्धा. हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे असे झाले. मी लगेच त्यांच्या रेडीमेड ग्रुपचा सदस्य झालो आणि त्यांच्या मीटिंग्जना जायला लागलो. आम्ही एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला आणि या मित्रांबरोबर चॅटिंगही सुरू केले. त्यांच्यातले दोघेतीघे फेसबुकवर अॅक्टिव्ह होते, त्यांच्याशी मैत्री केली.

आता माझ्या संपर्कक्षेत्राच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या होत्या. कशी कुणास ठाऊक, पण बबन या नावाच्या एका माणसाने माझ्या फेसबुकावरच्या एका पोस्टवर कॉमेंट टाकली होती. त्याची विचारपूस केल्यावर तो माझा मित्र एट्या निघाला. त्याने फेसबुकवर बबन असे टोपण नाव घेतले होते. तो कॉलेज सोडल्यावर २-३ वर्षातच अमेरिकेला गेला होता आणि तिकडचाच झाला होता. आता फेसबुकवरून त्याच्याशी संपर्क सुरू झाला. तो भारतात आला असतांना एक दोन दिवस पुण्यात मुक्कामाला होता. मी त्याच्यासोबत एक ब्रेकफास्ट मीटिंग ठरवली आणि इतर समाईक मित्रांना बोलावले. लाटांबरोबर पार सातासमुद्रापलीकडे दूर गेलेला आणखी एक ओंडका आठ दहा इतर ओंडक्यांना पुन्हा भेटला आणि ते घडवून आणण्याचे पुण्य मला मिळाले.

आमच्याबरोबर कॉलेजमध्ये असलेला पण अजीबातच संपर्कात नसलेला शरदसुद्धा मला अचानकच फेसबुकवर भेटला. मी दहा वर्षांपूर्वी टाकलेला माझा फोटो त्याने ओळखला, माझी माहिती वाचली आणि मला मैत्रीची हाक दिली. पूर्वी कॉलेजात शिकतांनाही तो आमच्या कंपूमध्ये नव्हता त्यामुळे मला तो आता आठवतही नव्हता, पण त्याने दिलेल्या खुणा ओळखून मीही त्याचा हात हातात घेतला. या एका काळी फक्त तोंडओळख असलेल्या कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि चांगली मैत्री झाली.

एकदा त्याच्याशी बोलता बोलता दिलीप हा माझा एक गांववाला मित्र त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे शरदला घेऊन सरळ दिलीपच्या घरी जाऊन धडकलो.  त्या अकल्पित भेटीतून आम्हा दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये एकत्र घालवलेल्या जुन्या काळातल्या अनंत आठवणी उजळून निघाल्या. मधल्या पंचावन्न वर्षात कुणी काय काय केले याची अगदी थोडक्यात माहिती करून घेऊन आम्ही वर्तमानकाळापर्यंत आलो. आमच्या शाळेतले इतर मित्र आता कुठे आहेत आणि काय करतात त्याचा दिलीपलाही पत्ता नव्हता, पण त्याला सुरेशचा फोन नंबर तेवढा माहीत होता. मग आम्ही लगेच त्याच्याबरोबर बोलून घेतले. आमचा आणखी एक वॉट्सॅप ग्रुप तयार केला.

कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढाच होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे बालपण मुंबई महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे परंपरागत संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि तो थकवा घालवण्यासाठी आराम करण्यात तसेच इतर आवश्यक कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणाऱ्या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.

कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक अत्यावश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने त्या वेळी लावला नव्हता. हे कसे काय शक्य आहे? असा विचार करत मी त्याच्याकडे निरखून पहात असतांना तो माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे घाऱ्या, काय पाहतोय्स? मी कामत्याच आहे. माझं कॅटरॅक्टचं ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा एकदा अचानक अदृष्य झाला. या वेळी तर तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.

२०१७ साली म्हणजे मधल्या काळात आणखी बारा वर्षे लोटल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणाऱ्या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका डॉक्टरच्या दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहकाऱ्यांशी बोलून एक पूर्ण  दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे जवळ जवळ पन्नास वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही अत्यंत जवळचा मित्र श्रीकांत भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे येऊ शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे अशोकला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. तेंव्हाही भोजकर चांगल्या मूडमध्ये आणि पूर्वीप्रमाणेच हसत खेळत होता. आम्ही चौघांनी तासभर चांगला हसत खिदळत पूर्वीच्या आठवणींवरून एकमेकांना डिवचत आणि पुन्हा कधी निवांतपणे भेटायचे याच्या योजना आखत काढला. पण ती श्रीकांतशी अखेरची भेट ठरली. काही महिन्यांनंतर मी पुन्हा त्या वास्तूमध्ये गेलो तो त्याचे अंत्यदर्शन घ्यायला.

ठरवल्याप्रमाणे मी कामतला घेऊन रवी या बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्यालाही सोबत घेऊन केशवकडे म्हणजे आमच्या दुसऱ्या एका जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या निरनिराळ्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त फेसबुक आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे आणि मोटारगाडीसारखे वाहन जवळ असल्यामुळे. अलेक्झँडर ग्रॅहॅम बेल, हेन्री फोर्ड आणि मार्क झुकरबर्ग यांचे आम्ही मनोमनी आभार मानले.       

पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले माझे कांही जुने मित्र गेल्या १-२ वर्षांमध्ये मला पुन्हा सापडले. त्यातल्या कांहींना मी प्रयत्नपूर्वक शोधून काढले आणि काही अवचित भेटले. आता पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणी पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.


Tuesday, December 11, 2018

आयुष्यातला तिसरा टप्पा आणि तिसरा कप्पा

बालपण, तारुण्य आणि वार्धक्य हे माणसाच्या आयुष्यातले तीन मुख्य टप्पे असतात हे सांगण्याची गरज नाही. "कैवल्याच्या चांदण्याला", "दयाघना का तुटले", "एक धागा सुखाचा" यासारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांमधून या टप्प्यांची वैशिष्ट्ये  दाखवली गेली आहेत. तिसऱ्या टप्प्यावर पोचलेल्या माझ्या वयोगटातल्या लोकांनी आता काय काय करू नये आणि काय काय करावे किंवा वेळ वाया न घालवता लगेच करून घ्यावे याबद्दल निरनिराळ्या शब्दांमध्ये निरनिराळ्या भाषातले ज्ञानामृत पाजणाऱ्या किती तरी सूचना वॉट्सॅपवरील महापंडित रोज पाठवत असतात. त्यात आता मी आणखी काय भर घालणार?

श्री. प्रसाद शिरगांवकर यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. त्यात त्यानी असे लिहिले आहे की आपल्या आयुष्यात दोन मोठे आणि मुख्य कप्पे असतात, कामाचा कप्पा आणि कुटुंबाचा कप्पा.  कामाच्या कप्प्यातून पैसा, यश, प्रसिद्धी आणि समाधान मिळते आणि कुटुंबाच्या कप्प्यातून प्रेम, स्थैर्य, आधार आणि आनंद मिळतो. पण त्याशिवाय एक तिसरा कप्पाही असायला हवा, आपला स्वतःचा, स्वतःसाठीचा कप्पा.

आपला आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी, व्यवसाय असे काहीतरी करावे लागते, ते पहिल्या कप्प्यात येते. ते करतांना कष्ट करावे लागतात, कधी अपमान कधी निराशा पदरात पडते, कधी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. पण कमाईच्या रूपात या सगळ्याची भरपाई मिळते असे समजून माणसे ते सगळे सोसतात. कुटुंबाच्या कप्प्यातसुद्धा अपेक्षाभंग, गैरसमजुती, चिंता वगैरे नकारात्मक गोष्टी कधी कधी तरी आपल्या वाट्याला येतातच. त्यातून विरंगुळा मिळण्यासाठी तिसरा कप्पा ठेवावा. तो फक्त स्वतःपुरता ठेवला तर त्यात जाऊन आपल्या मनासारखे, आपल्याला आवडेल ते आपण आपल्या सोईनुसार करावे आणि त्यातून फक्त आनंदच घेत रहावा अशी ही कल्पना आहे. 

शिरगावकरांनी बहुधा मध्यमवर्गातल्या मध्यमवयीन माणसांसाठी ही कल्पना मांडली असावी. गरीब लोकांचा कामाचा कप्पा कधी संपतच नाही आणि त्यांना तिसरा कप्पा उघडून त्यात रमायची फारशी संधी मिळत नाही. जन्मजात धनाढ्य लोकांना काम करणे ऐच्छिक असते आणि ते आपले सगळे आयुष्य स्वतःच्या मर्जीनुसार मौजमजा करत जगू शकतात.

हे कप्पे आणि टप्पे यांचा एकत्र विचार केला तर असे दिसते की जन्माला आलेले मूल हा तिसरा कप्पा घेऊनच येते. तान्हे बाळ फक्त स्वतःच्या मनासारखेच वागत असते. पण ते इतके दुर्बल असते की हंसणे, रडणे, ओरडणे आणि थोडीशी हालचाल एवढेच करू शकते. त्याच्या कुटुंबाचा म्हणजे त्याचा दुसरा कप्पाच त्याचे पूर्ण संगोपन करत असतो. ते थोडे मोठे होऊन त्याचे शिक्षण सुरू झाले की अभ्यास आणि शिस्त यांच्यामुळे त्याला कधी कधी मनाविरुद्ध वागणे भाग पडत जाते आणि त्याच्या स्वतःच्या अशा तिसऱ्या कप्प्यामधून त्याला हळूहळू बाहेर काढणे सुरू होते. पुढे मोठा झाल्यावर त्याला पहिला कप्पा सांभाळायचा आहे एवढ्यासाठीच हे करावे लागत असल्यामुळे तो भाग पहिल्या कप्प्यासारखाच समजायला हरकत नाही. म्हणजे दुसरा कप्पा हा बालपणातला मुख्य कप्पा असतो, तिसरा हळू हळू लहान लहान होत आणि पहिला वाढत जातो. कदाचित यामुळे काही मुलांच्या मनात कामाच्या कप्प्याबद्दल अढी पडत असावी.

तरुणपणी कामधंदा आणि कुटुंब म्हणजेच पहिला आणि दुसरा हे मुख्य कप्पे असतात आणि तिसरा स्वतःचा कप्पा ऐच्छिक असतो, काही लोक स्वतःच्या आवडी, छंद वगैरेंना जन्मभर जाणीवपूर्वक जोपासतात, यामुळे कदाचित त्यांना काम आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देता येत नाही किंवा निदान तशा टीकेला तोंड द्यावे लागते. काही लोक स्वतःच्या कप्प्याकडे पूर्ण दुर्लक्षही करतात. पण उतारवयाबरोबर शरीरातली शक्ती कमी व्हायला लागते आणि कष्ट सोसेनासे होतात, मुले आपापल्या मार्गाला लागल्यानंतर ती स्वतंत्र होत जातात. पहिला कप्पा आकुंचन पावत जातो तसाच दुसराही. यामुळे उतारवयाची चाहूल लागल्यावर तिसऱ्या कप्प्याची अधिकाधिक गरज निर्माण होते आणि काळाबरोबर ती वाढतच जाते.

माझ्या बाबतीत असे झाले की माझा जो तिसरा कप्पा लहानपणी तयार झाला होता त्यात कोणतेही विशिष्ट छंद किंवा आवडीनिवडी नव्हत्या, पण कुतूहल आणि हौस यांना जागा होती. कोणीही कुठलेही काम करत असतांना दिसला की मी ते लक्ष देऊन पहात असे, ते काम माझे नसले तरी ते शिकून घ्यायचा आणि जमले तर स्वतः करून पहायचा प्रयत्न करत असे. लश्करच्या एक दोन भाकऱ्या भाजायची ही वृत्ती माझ्याबरोबर राहिली. पहिल्या कप्प्यात मला नेमून दिलेले काम मी मन लावून करत असल्यामुळे मला कधी त्याचा त्रास वाटला नाही. पण ते करून झाल्यावर मी स्वतःच्या समाधानासाठी आणखी काही तरी करून त्यातून जास्तीचा आनंद मिळवत असे. सुदैवाने माझे कौटुंबिक जीवनही सुरळीत चालले होते. त्यामुळे माझ्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात तिथला वैताग घालवण्यासाठी म्हणून मुद्दाम आणखी काही करायची खरे तर मला गरज पडत नव्हती, पण हा तिसरा कप्पा मी उघडून ठेवला होता आणि त्यात अधून मधून जात येत होतो.

आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्याची चाहूल लागली तेंव्हा मला त्या कप्प्याचा चांगला उपयोग झाला. नोकरी करणाऱ्या लोकांना सेवानिवृत्तीचे मोठे संकट वाटते तसे मला वाटले नाही. कुठलेही वेगळे काम समजून घेऊन ते शिकण्याची हौस असल्यामुळे प्राप्त परिस्थितीत जे सहज जमण्यासारखे होते ते करत गेलो. त्यात मजा आली तर ते केले, नाही तर सोडून दिले. माझा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून नव्हता, त्यामुळे तो माझा पहिला कप्पा नसून तिसरा होता. स्वान्तसुखाय चालवलेली  माझी ही ब्लॉगगिरी हाही त्यातलाच एक भाग आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

Monday, December 03, 2018

काचेचा इतिहास
गॅलिलिओने एका नळीमध्ये काचेची भिंगे बसवून दुर्बीण तयार केली आणि तिच्यामधून आकाशातल्या ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले, टॉरिसेलीने काचेच्या नळीत पारा भरून वायुभारमापक तयार केला आणि हवेचा दाब मोजला, सर आयझॅक न्यूटन यांनी काचेच्या प्रिझममधून सूर्याच्या प्रकाशकिरणांमधले सात रंग वेगळे करून दाखवले. अशा प्रकारे पूर्वीपासूनच विज्ञानामधील अनेक प्रयोगांमध्ये काचेचा उपयोग होत आला आहे. विज्ञानामधील प्रगतीमध्ये जसा धातूविद्येचा वाटा आहे तसाच काचेच्या निर्मितीमधील प्रगतीचासुद्धा आहे. आजसुद्धा प्रयोगशाळा म्हंटल्यावर आपल्याला काचेची टेस्ट ट्यूबच आठवते आणि डिजिटल आभासी जग आपल्याला काचेमधूनच दिसते. काच आणि संशोधन यांचेमध्ये खूप जवळचे नाते असल्यामुळे विज्ञानामधील प्रगतीचा वेध घेत असतांना काचेच्या इतिहासाबद्दलची माहिती समजून घेणे देखील गरजेचे आहे.

काच हा एकच विशिष्ट रासायनिक रचना (chemical composition) असलेला पदार्थ नसतो. ती एक प्रकारची स्थिति आहे आणि अनेक पदार्थ या स्थितीमध्ये येऊ शकतात किंवा आणता येतात. ही क्रिया निसर्गातसुद्धा घडत असते. ज्वालामुखींमधून बाहेर पडत असलेला अत्यंत तप्त असा लाव्हारस वेगाने थंड झाला तर त्या प्रक्रियेत लाव्हारसामधील कांही द्रव्यांपासून काचेचे तुकडे किंवा गोळे तयार होतात, वाळूवर आभाळातून वीज पडली तर निर्माण होणाऱ्या प्रचंड ऊष्णतेमुळे तिथली थोडी वाळू वितळते आणि थंड होतांना तिची काच बनते. अणुबाँबच्या स्फोटाच्या ठिकाणीसुद्धा क्षणभरासाठी हजारो डिग्रींमध्ये तापमान वाढते त्यातून काच तयार होते. काचेच्या कारखान्यांमध्ये मुख्यतः वाळू, चुना आणि सोडा यांच्या मिश्रणाला खूप जास्त तापमानापर्यंत तापवून काच तयार करतात. त्यात इतर निरनिराळे धातू किंवा क्षार मिसळले तर तिचा रंग बदलतो आणि बाकीचे अनेक गुणधर्म बदलतात. काच तयार करतांना तिच्यात गरजेनुसार इतर अनेक पदार्थ घालून हवी तशी काच तयार केली जाते.

ज्वालामुखींमधून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या काचेचा उपयोग अश्मयुगापासून होत आला आहे. अशा काचेचे अणकुचीदार तुकडे अत्यंत कठीण आणि धारदार असल्यामुळे त्यांचा उपयोग हत्यारांसाठी होत असे. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवनिर्मित काच तयार झाली. लोखंड किंवा तांबे यासारख्या धातूंच्या निर्मितीसाठी त्यांची खनिजे इतर पदार्थांबरोबर भट्टीमध्ये उच्च तापमानापर्यंत तापवली जात असतांना त्यांतल्या राखेमधून कदाचित कांही वेळा काचेचे तुकडे किंवा गोळेही निघाले असावेत. त्या काळातल्या कांही कारागीरांनी वाळू, चुना आणि सोडा यांना एकत्र भाजून त्यातून काच तयार करण्याचे कसब हस्तगत केले होते, पण तिचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जीवनात होत नव्हता. त्या काळातले राजेरजवाडेच त्या वस्तू वापरत असावेत. जुन्या काळातल्या अवशेषांमध्ये सापडणाऱ्या बहुतेक सगळ्या काचेच्या वस्तू मुख्यतः शोभेच्या आणि अर्थातच मौल्यवान असतात. हिरेमाणिकासारख्या अमूल्य रत्नांसारखे दिसणारे काचेचे नकली खडेही तयार केले जात होते आणि त्यांचाही उपयोग अलंकारांमध्ये होत होता. अशा प्राचीन काळातल्या वस्तूंचे अवशेष जगभरातल्या अनेक ठिकाणच्या उत्खननांमध्ये सापडले आहेत.

सुमारे सातआठशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये काचेची निर्मिती अधिक प्रमाणात व्हायला लागली. पुढील कांही शतकांमध्ये तिथल्या काही शहरांमध्ये उत्कृष्ट प्रतीची काच आणि काचेच्या वस्तू तयार करणारे कुशल कारागीर तयार झाले. त्यांनी काच तयार करण्याच्या तंत्रज्ञानात अनेक महत्वाच्या सुधारणा केल्या. जास्तीत जास्त पारदर्शक अशी काच तयार केली, कोणते रसायन वापरून किंवा मिसळून ती काच लाल, निळ्या, हिरव्या अशा वेगळ्या रंगाची होते याचा अभ्यास केला आणि काचेवर चित्रे काढण्याची कला विकसित केली. सर्वात महत्वाचे म्हणजे तापवलेली गरमागरम काच लवचिक झालेली असतांनाच तिच्यात नळीमधून जोरात फुंकर मारून एक मोठा फुगा तयार करायचा आणि त्याला चंबू, बाटली, नळी किंवा पेल्यासारखे आकार द्यायचे तंत्र विकसित केले. काचेला पसरून त्याचा मोठा आणि सपाट पत्रा (Sheet) तयार केला. काचेला पॉलिश करून गुळगुळित करायचे आणि चमकावण्याचे कौशल्य मिळवले. या सुधारणा होत असतांना काचेपासून वेगवेगळ्या आकारांची पात्रे, पेले, सुरया आणि नलिका अशा अनेक प्रकारच्या उपयोगी वस्तू तयार व्हायला लागल्या. पारदर्शक काचेपासून भिंगे आणि आरसे बनवले गेले. काचेच्या शीटपासून दारे आणि खिडक्यांची शोभिवंत तावदाने तयार केली जाऊ लागली. युरोपमधील बहुतेक सर्व जुन्या चर्चेसमधील दरवाजे आणि खिडक्यांवर अशी स्टेन्ड ग्लासची अत्यंत सुबक चित्रे पहायला मिळतात. गॅलीलिओच्या काळापर्यंत काचेच्या अनेक प्रकारच्या वस्तू तयार होऊ लागल्या होत्या. त्यामुळे पुढील काळातल्या प्रयोगशाळांमध्ये त्यांचा उपयोग प्रयोग करण्यासाठी होत गेला. 

काच सहसा रासायनिक क्रियेत भाग घेत नाही, ती हवापाण्याने गंजत नाही की सर्वसामान्य उपयोगातल्या द्रवात विरघळत नाही. त्यामुळे अनेक प्रकारची रसायने काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवता येतात. काचेचे विघटन आणि झीज होत नसल्यामुळे ती दीर्घकाळ टिकते. पारदर्शक काचेच्या उपकरणांमधल्या वस्तू आणि त्यांच्यात चालत असलेल्या क्रिया सहजपणे दिसतात. कुठल्याही प्रकारचे मोजमाप करणाऱ्या साधनांमध्ये (Meter) फिरणारी सुई काचेमधून सहजपणे दिसते त्यामुळे डायलवर काचेचे झाकण असलेली असंख्य साधने (Instruments) निघाली. तेले, रसायने, औषधे वगैरेंवर प्रयोग करण्यासाठी अनेक पात्रांना जोडण्याची जुळवाजुळव करावी लागते ते काम काचेच्या नलिकांच्या माध्यमामधून सुलभपणे करता येते. काचेपासून मिळणाऱ्या अशा अनेक फायद्यांमुळे प्रयोगशाळांमध्ये काचेचा उपयोग वाढत गेला. धक्क्का लागून किंवा तापवतांना न फुटणाऱ्या, विशिष्ट घनता किंवा प्रकाशविषयक (Optical) गुणधर्म असलेल्या खास प्रकारच्या काचा तयार होत गेल्या. इतकेच नव्हे तर काचेचा धागासुद्धा (Fiber glass) तयार झाला. विज्ञानाची घोडदौड वेगाने व्हायला गेल्या दोन तीन शतकांमधील काचेच्या उत्पादनामधील प्रगतीची मोठी मदत झाली आहे.