Sunday, December 14, 2008

अब्जाधीश की गरजू ?

या गोष्टीला आता एक वर्ष होत आले आहे. मागच्या वर्षी याच दिवसात श्रेष्ठ भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय चित्रकार कै.सदानंद बाकरे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी वर्तमानपत्रात आली होती. त्यापाठोपाठच त्यांनी अब्जावधी रुपयांचा अनमोल खजिना मागे सोडला असून त्याची मालकी आता कोणाकडे जावी याबद्दल लगेच वाद सुरू झाले असल्याची बातमी आली होती. बाकरे यांचे सांसारिक आयुष्य रूढ अर्थाने सरळ मार्गाने गेले नाही. त्यांनी बरीच वर्षे परदेशात वास्तव्य केले. तिथेच एका युरोपीय महिलेशी त्यांचा विवाह झाला. उतारवयात त्यांनी मायदेशी, अगदी कोंकणातल्या छोट्या गांवात येऊन स्थाईक होण्याचा निर्णय घेतला आणि अंमलात देखील आणला. पण त्यानंतर त्यांची परदेशी पत्नी फार काळ त्यांच्यासोबत राहिली नाही. त्यांना सोडून ती परत गेली वगैरे मजकूर या निमित्याने प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे चार लोकांप्रमाणे त्यांचा निर्विवाद वारस नसावा असे वाटते. वेगवेगळ्या मृत्युपत्रांच्या आधारे त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगणारे दावेदार त्यांच्या मृत्यूनंतर पुढे आले होते असे म्हणतात. या संधीचा लाभ घेऊन ती संपदा आता जनतेच्या मालकीची करावी, म्हणजे पर्यायाने आपल्या नियंत्रणाखाली यावी असे प्रयत्न राजकीय वर्तुळात सुरू झाले अशीही बातमी आली होती.

या बातम्या वाचल्यावर कांही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात आलेल्या वेगळ्या प्रकारच्या बातमीची आठवण झाली. श्री.बाकरे यांना एक चित्रकलेचे संग्रहालय उभे करायचे होते, पण त्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध नव्हता. या कार्यात त्यांची मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या चित्रांचे एक प्रदर्शन भरवले होते. तो उद्देश सफल झाला की नाही कोण जाणे. बहुधा नसावा, कारण तसे चित्रसंग्रहालय उभे राहिले असते तर भरपूर त्याचा गाजावाजा झाला असता.

या सगळ्यावरून माझ्या मनात प्रश्न उठतो की अब्जाधीश माणसाला मदतीची गरज कां पडावी? चित्रकृतीसारख्या मौल्यवान गोष्टी ज्यांच्या संग्रहात असतात त्यांना खर्च करण्यासाठी त्या संपत्तीचा विनियोग करता येतो कां? हल्ली भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींना खूप भाव आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या लिलावांमध्ये त्यांची किंमत कोट्यावधी रुपयांपर्यंत केली जाते वगैरे बातम्या वाचून आपण मनातल्या मनात सुखावतो. पण इतकी बोली लावून दिलेले हे पैसे नक्की कोणाला मिळतात? मूळ चित्रकाराने ते चित्र कधीच अगदी अल्प किंमतीला विकलेले असते किंवा कदाचित कुणाला तरी ते भेट म्हणून फुकटसुद्धा दिले असण्याची शक्यता आहे. ते चित्र हस्ते परहस्ते प्रवास करून आता लिलावांत येऊन विकले गेल्यावर अखेर ज्या माणसाने ते तिथे आणले त्यालाच त्याची किंमत मिळाली असणार.

असे असतांना एका चित्राची किंमत इतके रुपये तर तितक्या चित्रांची किती असेल असा हिशोब करून आपण त्या कलाकाराला अब्जाधीश ठरवू शकतो का? रिलायन्स कंपनीच्या एका शेअरचा आजचा बाजारभाव एवढा आहे म्हणून इतके शेअर धारण करणारा अंबानी आज जगातील सर्वात श्रीमंत माणसांच्या रांगेत विराजमान झाला आहे. पण समजा त्याने आपले सगळे शेअर एकदम विकायला काढले तर त्याचे मूल्य धडाधड कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे चित्रकाराची चित्रे त्याच्या संग्रहात असेपर्यंत त्याला मूल्य आहे पण ते खर्च करण्याच्या उपयोगाचे नाही, त्यासाठी त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो. अशी किती विचित्र परिस्थिती आहे ना?
त्यांचे एक चित्र या दुव्यावर पहा. http://www.askart.com/AskART/photos/BOL20070521_4544/49.jpg

No comments: