Friday, January 29, 2010

कारवाँ बढता गया ।


सुमारे एक वर्षापूर्वी मी 'कारवाँ बनता गया' हा लेख या ठिकाणी लिहिला होता. तेंव्हा याच्या फॉलोअर्सची संख्या फक्त पाचच होती. तरीही मला त्याचे नवल वाटल्यामुळे मी त्यांना 'थवा' असे नांव देऊन करून खाली दिलेला प्रसिध्द उर्दू शेर मराठीत स्वैर रूपांतर करून दिला होता.

जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।

त्या लेखातला महत्वाचा भाग नवीन वाचकांच्या सोयीसाठी खाली उद्धृत केला आहे.

"खरे तर मी चौफेर लिहीत आलो आहे. मी एकादा वेगळा पंथ काढला नव्हता आणि त्यात सामील व्हायचे आवाहनही कधीच कोणाला केले नव्हते. त्यामुळे माझा अनुयायी म्हणून एक नांव माझ्या ब्लॉगवर दिसू लागल्यावर मला त्याचे थोडे आश्चर्यच वाटले. त्यांची संख्या वाढत वाढत आता पांचावर गेली आहे. यापूर्वी आंतर्जालावर भटकत असतांना ब्लॉगधारकांना आवडलेल्या इतर ब्लॉग्जची यादी आणि आंतर्जालावरून तिकडे जाणारे दुवे कांही ब्लॉग्जवर दिलेले मी पाहिले होते. कदाचित त्यांची लेखकमंडळी आपापल्या मित्रांच्या ब्लॉगची नांवे एकमेकांच्या अनुदिन्यांवर घालून ते चटकन पहाण्याचा सोयीचा मार्ग तयार करून ठेवत असतील किंवा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा ओघ आपल्या मित्रांकडे वळवीत असतील अशी माझी कल्पना होती. माझ्या ब्लॉगचे अनुयायी झालेल्या मंडळींची मात्र माझी साधी तोंडओळखसुध्दा झालेली नाही आणि त्यांनी कधी माझ्या लिखाणावर प्रतिसाद दिले असले तरी ते माझ्या ध्यानात राहिलेले नाहीत. चांगला लक्षात रहावा एवढा संवाद नक्कीच कोणाबरोबर साधलेला नाही. त्यातील एका अनुयायाने आपले नांवसुध्दा माझ्यापासून गुप्त राहील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे समजले तर मला जास्तच आनंद होईल. माझ्याकडून त्यांना कांही अपेक्षा असतील आणि त्यांनी त्या व्यक्त केल्या तर मला त्या समजू शकतील. हा भाग वाचल्यानंतर ते प्रतिसाद पाठवतील अशी अपेक्षा आहे."

'फॉलोअर' या इंग्रजी शब्दाला 'अनुयायी' असा प्रतिशब्द असला तरी या बाबतीत मला तो तेवढा सयुक्तिक वाटला नाही. त्यामुळे मी त्यांना माझे 'पाठीराखे' असे म्हणायचे ठरवले. या पाठीराख्यांची संख्या वाढून आता चाळीसवर पोचली आहे. यात कोण कधी आले आणि कोण किती दिवस राहून (कंटाळून) सोडून गेले वगैरेचा हिशोब मी कधी ठेवला नाही. तशी माहिती सोयीस्कररीत्या उपलब्धही नाही. सुरुवातीला मी त्या सर्वांच्या संकेतस्थळावर जाऊन ती पहायचे ठरवले होते. पण वेळेअभावी ते जमलेच नाही याबद्दल क्षमायाचना करतो. या वर्षी पुन्हा प्रयत्न करावा असा विचार आहे.

मी वर दिलेल्या उता-यातले बहुतेक मुद्दे अजून अनुत्तरितच आहेत. नरेंद्र गोळे माझ्या ओळखीचे आहेत आणि देवदत्तची नुकतीच ओळख झाली. इतर अडतीस लोकांबद्दल कांहीच माहिती नाही, पण जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यांनी पुढे येऊन खाली दिलेल्या प्रश्नांपैकी योग्य वाटतील तेवढी उत्तरे द्यावीत अशी कळकळीची विनंती आहे.
१. टोपणनांव दिले असल्यास खरे नांव काय आहे?
२. माझ्या ब्लॉगवरील कोणता भाग आवडतो आणि कोणता आवडत नाही?
३. आणखी काय वाचायला किंवा पहायला आवडेल?

Thursday, January 28, 2010

ब्लॉग माझा स्पर्धा

हा लेख आधी दोन भागात लिहिला होता. दि.०३-१०-२०१९ ला त्यांचे  एकत्रीकरण केले.


माझ्या या ब्लॉगला वाचकांचा चांगला पाठिंबा मिळत गेला आहे याबद्दल मला समाधान आहेच. त्याशिवाय त्याची इतरत्र दखल घेतली गेली तर मग दुधात साखर पडेल असे वाटायचे. गेल्या वर्षी 'स्टार माझा' या वाहिनीने 'ब्लॉग माझा' ही स्पर्धा जाहीर केली आणि या स्पर्धेच्या निमित्याने अशी एक संधी आयती चालून आली. एका सन्माननीय तज्ज्ञ व्यक्तीकडून या ब्लॉगचे मूल्यमापन होऊन याची गणना 'उल्लेखनीय' या सदरात केली गेल्याचे वृत्त मी दिलेच होते. अशा प्रकारची शाबासकीची थाप पाठीवर पडावी हे माझे सुदैवच आहे.

या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळ जवळ दोन महिने होत आले तरी पुढील हालचाल दिसली नाही. त्यामुळे मनात थोडी शंका उत्पन्न होऊ लागली होती. तेवढ्यात स्टार माझाच्या प्रसन्न जोशींची मेल आली आणि पाठोपाठ फोनही आला. रविवारी २४ तारखेला आमची प्रमाणपत्रे आम्हाला समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची उत्साहवर्धक बातमी त्यांच्याकडून मिळाली. त्या ईमेलमध्ये जो कार्यक्रम दिला होता त्याप्रमाणे दुपारी साडेअकरा ते बारा वाजायच्या दरम्यान स्टूडिओमध्ये पोचायला हवे होते म्हणजे साडेनऊ दहाला घरातून निघायला हवे आणि कार्यक्रम संपल्यानंतर तीन साडेतीन वाजता अल्पोपहार मिळणार होता. दुपारच्या जेवणाचा डबा बरोबर नेला तरी तो खायला संधी मिळेल की नाही याबद्दल शंकाच होती. गोड फळ मिळवण्यासाठी थोडी कळ सोसावी लागते अशी मनाची समजूत घालून त्या कार्यक्रमाला जाण्याच्या तयारीला लागलो. स्टार माझाच्या स्टूडिओचा पत्ता दिलेला होता. गूगलवरून त्या जागेचा नकाशा काढून घेतला. ईमेलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला जाण्यापेक्षा वरळी नाक्याच्या बाजूने तेथे जाणे अधिक सोयीस्कर वाटल्याने तो मार्ग ठरवला आणि खरोखरच तो सोपा निघाला.

पुढे घडणार असलेल्या उपवासाचा विचार करून घरून निघतांना ब्रेकफास्टच्या ऐवजी बऱ्यापैकी ब्रंच घेतला. रविवारचा दिवस असल्यामुळे रस्त्यात वाहनांती गर्दी कमी होती. दिलेल्या वेळेच्या अगोदरच स्टार टीव्हीच्या ऑफीसापर्यंत जाऊन पोचलो. बाहेरील गेटवरच्या दरवानाला आमच्या आगमनाची वर्दी मिळालेली नसावी. त्याने थोडी विचारपूस केल्यानंतर आंत प्रवेश करायची परवानगी दिली. स्वागतकक्षात नेहमी दिसते तशी स्वागतिका नव्हती, तिथे स्वागतक होता. त्याच्या पोषाखावरून तो सिक्यूरिटी ऑफीसर वाटत होता. त्याला मात्र आमच्या येण्याची कल्पना होती. त्याने समोरच्या कोचावर बसून घ्यायची सूचना केली. त्या कार्यक्रमासाठी येणाऱ्यातला मी पहिलाच असावा अशी माझी कल्पना झाली. कदाचित माझ्याहून आधी आलेल्यांना त्याने आधीच ऑफीसच्या आंत पाठवून दिले असले आणि नंतर येणाऱ्या लोकांना बाहेरच थांबवून ठेवण्याचा आदेश त्याला मिळाला असला तर ते योग्यच होते असे नंतर जाणवले.

माझ्यानंतर कांही मिनिटांनी श्री.प्रमोद देव आले. मनोगतच्या ठाणे कट्ट्यावर त्यांची ओळख झाली होती आणि मिसळपावच्या ई-हॉटेलात अधून मधून भेट होत असे. त्यांच्यासोबत बंगळूरहून आलेले छोटा डॉन आणि ठाण्याचे निखिल देशपांडेही होते. त्यानंतर इतर ब्लॉगकर्ते येत गेले आणि एकमेकांच्या ओळखी करून देत आणि घेत गेले. बाहेरच्या कक्षातल्या बसायच्या जागा भरत आल्यावर आम्हाला आत पाठवण्यात आले. तिथले दृष्य इतर सर्वसामान्य ऑफीसांपेक्षा थोडे निराळे होते. आजकाल इतर अनेक ठिकाणी दिसते तसेच ते ऑपन ऑफीस असले तरी तिथल्या टेबलखुर्च्या एकाच दिशेने तोंड करून रांगेने मांडल्या नव्हत्या किंवा लहान लहान चौकोनात एकमेकांकडे पाठ करून कोणाला बसवलेले नव्हते. एका मोठ्या हॉलमध्ये पांच सहा जणांचा एक असे अनेक घोळके करून सारे जण बसले होते. अर्थातच प्रत्येकाच्या पुढ्यात एक संगणक होता आणि तो पहाता पहाता एकमेकांशी संवाद साधून एकमेकांच्या सहकार्याने ते सर्वजण काम करत होते. अशा प्रकारच्या व्यवस्थेत अत्यंत कडक शिस्त असायलाच हवी. तशी नसली तर तिचा मासळीबाजार होणे सहज शक्य आहे असा विचार मनात चमकून गेला. त्याच हॉलच्या एका कोपऱ्यात थोड्या खुर्च्या गोळा करून आम्हाला बसवण्यात आले. आधी तर मला थोडे अवघडल्यासारखे वाटले. त्यातून सावरून आमचा मासळीबाजार रंगात येतांना पाहून आमच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली.

ज्या खोलीत आम्हाला पाठवण्यात आले तिचे आकारमान पाहता त्या खोलीचा उपयोग स्टोअररूम किंवा अडगळीची खोली याहून वेगळा होत असेल असे वाटत नव्हते. खोलीत मोकळी हवा येण्यासाठी खोलीत शिरायचा दरवाजा उघडा ठेवून आणि तो बंद होऊ नये म्हणून त्याला एका खुर्चीचा अडसर लावून त्यावर मी विराजमान झालो. सर्वांच्या मनोवृत्ती उल्हसित असल्यामुळे असल्या क्षुल्लक गोष्टींकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. एकमेकांचे ब्लॉग सोडून इतर अनेक विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा चालल्या होत्या. आणखी कांही ब्लॉगकर आल्यानंतर त्या खोलीत जास्त खुर्च्या मांडायला जागा उरली नसल्यामुळे कांही लोकांना बाहेर स्वागतकक्षात ठेवलेल्या सोफ्यांवर बसायला सांगण्यात आले. आधी आम्ही सगळेच उठून बाहेर गेलो आणि तिथे सर्वांना पुरेशी जागा नसल्यामुळे अर्धे लोक परत आलो.

फक्त एक अपवाद सोडून इतर सारे पुरस्कार विजेते आले होते आणि त्यातले बहुतेकजण वेळेवर येऊन पोचले होते. थो़ड्या वेळाने प्रमुख पाहुणे येऊन पोचल्याची बातमी आली. उरलेल्या एका स्पर्धिकेची थोडा वेळ वाट पाहून झाल्यानंतर आम्हा सर्वांना त्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये नेण्यात आले. त्या प्रशस्त हॉलमध्ये निदान साठसत्तर तरी लोकांनी एका वेळी जेवण घेण्याची सोय दिसत होती, पण जेवण खात असलेला किंवा ते वाढून देत असलेला एकही जण त्या जागी दिसला नाही. अत्यावश्यक कर्मचारी सोडून त्या इमारतीत काम करणाऱ्या इतर सर्वांना बहुधा रविवारची सुटी असल्यामुळे त्या दिवशी कँटीन बंद असावे.

प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले आल्यावर आम्ही सारेजण आपापल्या खुर्च्या सरकवून त्यांच्या भोंवताली गोळा झालो. प्रसन्न जोशीने त्यांची औपचारिक ओळख करून दिली आणि तो पुढच्या कार्यक्रमाचे संयोजन करण्यासाठी चालला गेला. अच्युतरावांना सर्वजण ओळखत होतेच. फक्त त्यांचे नांव सांगणे पुरेसे होते. खरे तर त्यांचा फोटोसुध्दा अनेक वेळा वर्तमानपत्रात पाहिला असल्यामुळे चेहरासुध्दा ओळखीचा होताच. त्यांनी लिहिलेली पुस्तके कांही लोकांनी वाचली होती. एकाने तर त्या पुस्तकांची पारायणे केली असल्याचे सांगितले. यापूर्वी एका कार्यक्रमात मी त्यांना प्रत्यक्ष जवळून पाहिलेले होते. समोरासमोर बसून वार्तालाप करण्याची मात्र ही पहिलीच वेळ होती.

त्यांनी या ब्लॉगस्पर्धेत परीक्षण केले होते. हे परीक्षण कोणत्या निकषांवर केले गेले हे त्यांनी आधी थोडक्यात सांगितले. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना या संस्कृत सुभाषितानुसार प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी आणि त्याची मते भिन्न असणारच. परीक्षकाच्या वैयक्तिक आवडी किंवा मते यांच्याशी त्या गोष्टी जुळतील अशी अपेक्षाच नव्हती. त्या कशा प्रकारच्या आहेत यावर भर न देता प्रत्येकाच्या ब्लॉगवर त्या कशा प्रकारे मांडल्या गेल्या आहेत हे पाहिले गेले. ब्लॉगचा विषय, आशय, मांडणी, सजावट, त्याला आलेले प्रतिसाद वगैरे पाहून त्याला कांही गुण दिले गेले आणि त्यांची बेरीज करून सर्वांगसुंदर अशा ब्लॉग्जची निवड करण्यात आली असे त्यांनी सांगितले.

प्रमुख पाहुणे श्री. अच्युत गोडबोले यांच्याबद्दल काय काय सांगावे? आजच्या युगातला एक चमत्कार वाटावा इतके अनेकविध पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. केमिकल इंजिनियरिंगची पदवी घेऊन सुरुवात केल्यानंतर पुढे व्यावसायिक सांधे बदलत ते आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त संगणकतज्ज्ञ झाले. आज आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळून त्यांनी आपल्या कारकीर्दीत त्या कंपन्यांना चांगले नांवारूपाला आणले. संगणक आणि व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रातील सर्वोच्च स्तरावरील तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होते. त्यासाठी अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरवलेले आहे. त्यांनी तंत्रज्ञानावर अनेक इंग्रजी पुस्तके लिहिली आहेतच. त्या पुस्तकांना आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान जगतात महत्व प्राप्त झाले आहे. इतर अनेक भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली आहेत.

त्यांनी मराठी भाषेत लिहिलेली संगणकयुग, बोर्डरूम, नादवेध, किमयागार, झपूर्झा आणि अर्थात ही पुस्तके सुध्दा अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. ती अनुक्रमे संगणक, व्यवस्थापन, संगीत, विज्ञान, वाङ्मय आणि अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांवर आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते पं. कुमार गंधर्व पुरस्कार मिळाला आहे. इतक्या वेगवेगळ्या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यात इतकी उंची गाठलेली दुसरी कोणती व्यक्ती माझ्या पहाण्यातच काय, ऐकण्यातही नाही. या अष्टपैलुत्वासाठीच त्यांना इंद्रधनु पुरस्कार मिळाला आहे. याखेरीज एक सामाजिक जाणीव बाळगणारी आणि समाजकार्यासाठी तळमळीने काम करणारी व्यक्ती असा त्यांचा नांवलौकिक आहे. ऑटिस्टिक मुलांसाठी त्यांनी आशियाना ही संस्था चालवली आहेच, रानावनात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाच्या सर्वांगीण विकासासाठीदेखील त्यांनी कार्य केले आहे.

असे खास पाहुणे आम्हाला प्रमाणपत्र देण्यासाठी येणार असल्याचे समजल्यामुळेच आम्हाला आनंद झाला होता. त्यातून ते निवांतपणे आमच्याबरोबर बसून गप्पागोष्टी करणार आहेत हे ऐकून तर त्याला पारावार उरला नाही. कांही मोठी माणसे बडी प्रस्थे झालेली असतात. मोठेपणाबरोबरच आढ्यता आणि आत्मप्रौढी हे गुण येऊन त्यांना चिकटतात. इतरांना तुच्छ लेखणे, त्यांनी सतत आपल्यापुढे लांगूलचालन करत रहावे असे वाटणे यासारख्या संवयी त्यांना लागल्या तर मग त्यांच्याशी संवाद साधणे कठीण होऊन जाते. पूर्वी असे कांही अनुभव आलेले असल्यामुळे अच्युत गोडबोले कसे वागतील आणि आपण त्यांच्याशी काय बोलायचे असे प्रश्न मनात येत होते आणि थोडे बिचकत बिचकतच आम्ही त्यांच्या सभोवती गोळा झालो होतो. इतरांचे मला नक्की सांगता येत नसले तरी त्यांचेही बहुधा तसेच झाले असावे असे मला वाटले. पण गोडबोले यांना त्याचीही अपेक्षा असावी आणि संवय झाली असणार. त्यांनीच पुढाकार घेतला आणि अत्यंत कुशलतेने सुरुवात करून संवादाचे आभाळ मोकळे करून दिले. या स्पर्धेबद्दल थोडक्यात सांगून झाल्यानंतर क्रमाक्रमाने आमची माहिती विचारून घेतांनाच नर्म विनोद करीत त्यात ते आपला रंग भरत गेले.

कुठून तरी संवादाची गाडी पुण्यावर आली. पुणेरी पाट्यांना तर आता महाजालावर अढळ स्थान मिळाले आहे. पुण्यातल्या रस्त्यावर भेटलेल्या लोकांचे दोन मजेदार किस्से गोडबोल्यांनी सांगितले. एका नवख्या माणसाने आपल्या हाताने समोर तर्जनी दाखवत "शनिवारवाड्याकडे हे असेच समोर जायचे आहे ना?" असे विचारताच पुणेकर उद्गारला, "असंच कांही नाही. तुम्ही हात खाली करून गेलात तरीसुध्दा चालेल." दुसरा एक पुणेकर कर्वे रोडवर रस्त्याच्या मधोमध सायकल चालवत चालला होता. मागून येत असलेल्या ऑटोरिक्शावाल्याने अनेक वेळा भोंपू वाजवूनही तो बाजूला व्हायला तयार होईना. अखेर त्याने मोठ्याने हांक मारली, "अहो कर्वे" सायकलवाला थांबून म्हणाला, "माझे आडनांव कर्वे नाही." त्यावर रिक्शावाला उद्गारला, "तुम्ही हा रस्ता आपल्या बापाच्या मालकीचा असल्यासारखे चालला आहात म्हणून मला तसे वाटले." हा किस्सा निदान पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातला असला पाहिजे. आजच्या प्रशस्त कर्वे रोडवरून मिलिटरीचा रणगाडा जात असला तरी कदाचित त्याच्या दोन्ही बाजूंनी दोन रिक्शा पुढे जाऊ शकतील. त्यानंतर इतर लोकांनाही उत्साह आला आणि भारतात सरदारजीच्या किंवा इंग्लंडमध्ये आयरिश लोकांच्या नांवाने सांगितले जाणारे कांही विनोद त्यांनी पुणेकरांच्या नांवांवर खपवले. पुण्याहून आलेल्या दोन्ही पाहुण्यांनी ते खिलाडूपणाने स्वीकारले, पण आता मुंबईला राहणाऱ्या एका मूळच्या अस्सल पुणेकर सदस्याला मात्र ते नापसंत पडलेले जाणवले.

एकूण तेरा जणांना प्रमाणपत्रे मिळायची होती, त्यातल्या राजकुमार जैन आणि विजयसिंह होलाम या दोघांचे प्रतिनिधी आले होते आणि मेधा सकपाळच्याकडून सुरुवातीला कोणी नव्हते, पण नंतर त्यांचे प्रतिनिधित्व करणारे आले. उरलेले दहाजण मात्र जातीने उपस्थित राहिले होते. हरिप्रसाद भालेराव तर बंगलोरहून आलेले होते. योगायोगाने त्यांचे दुसरे एक काम निघाले होते किंवा त्यांनी ते जुळवून आणले असेल. स्टार माझा तर्फे तर टीएडीए मिळणार नव्हताच. प्रत्येकाने आपापली सोय करायची होती आणि सर्वांनी ती केली होती. ब्लॉग लिहिणाऱ्या लोकांमधले अनेक जण परदेशात रहात असावेत अशी माझी धारणा होती आणि देशांतर्गत सदस्यापैकी पुण्यामुंबईपलीकडे राहणारे कोणी येतील की नाही याबद्दल शंका वाटत होती. त्यामुळे उपस्थितीचा हा आंकडा माझ्या कल्पनेपेक्षा जरासा मोठाच होता.

आलेल्या बारा जणांत मी स्वतः आणि श्री.प्रमोद देव हे दोघे सेवानिवृत्त (किंवा रिकामटेकडे) काका होतो. एकादा अपवाद वगळता बाकीचे सारे जण माहिती तंत्रज्ञानाशी निगडित होते. एका सदस्याचा सिनेक्षेत्रातल्या तांत्रिक बाजू सांभाळण्याचा व्यवसाय होता. माझ्यासकट बहुतेक लोकांनी इतरांचे ब्लॉग फारसे वाचले नसावेत. त्यांवर टीका करण्याची ही वेळ नव्हतीच, पण प्रशंसा करण्याइतपतसुध्दा माहिती कोणाकडे नसावी. त्यामुळे ब्लॉगवरचे लेखन या विषयावर चर्चेची गाडी आली तरी तिथे ती थांबत नव्हती. "ब्लॉग हे एक उद्याचे सशक्त माध्यम आहे. त्याचा चांगला उपयोग करून घेता यायला हवा." वगैरे सूतोवाच करून झाले पण त्यावरून पुढे ती आपल्या देशांतले अज्ञान, गरीबी, महागाई, संपादकांची कात्री, लेखन स्वातंत्र्य, कायद्यातल्या तरतुदी वगैरेकडे भरकटत जात असे. आपल्या स्वांतसुखासाठी मनातल्या विचारांना अभिव्यक्ती देणे यापलीकडचा विचार फारसा कोणी करतांना दिसला नाही.

याला अपवाद होतेच. पुणेकर मंडळींनी पुढाकार घेऊन ब्लॉगलेखकांचे एक संमेलन भरवले होते आणि पुढील वाटचालीसाठी विचारमंथन केले होते असे पुण्याच्या सदस्याने सांगितले. एवढेच नव्हे तर ब्लॉग्जच्या रूपाने साहित्याचे एक दालन उघडले गेले असून मराठी साहित्य संमेलनाने त्याची दखल घ्यावी असा प्रस्ताव त्याच्या अध्यक्षांकडे पाठवला असल्याचेही त्याने सांगितले. आपल्या एका मित्राने आपली ओळख लेखक म्हणून करून दिल्याचा किस्सा एका सदस्याने सांगितला.

अशा गप्पा चाललेल्या असतांनाच प्रसन्न प्रगट झाला आणि शूटिंगची सर्व व्यवस्था झाली असल्याची शुभवार्ता त्याने दिली. त्याबरोबरच आता आधी अल्पोपाहार घेणार की सर्व काम संपल्यावर म्हणजे दोन तासांनंतर तो घ्यायचा अशी विचारणा त्याने केली. तोंपर्यंत दुपारचा दीड वाजून गेला असल्यामुळे माझ्या पोटातल्या ब्रंचचे सुध्दा पचन झाले होते. इतरांचा नाश्तासुध्दा पचलेला असणार. पण भिडेपोटी ते सांगायला कोणी तयार नसावेत किंवा "आधी लगीन शूटिंगचे" असा विचार ते करत असतील. मी मात्र आपल्याला भूक लागली असल्याचे प्रांजलपणे जाहीर करून "आधीच कांही खाद्यंती झाली तर ते बरे होईल" अशी इच्छा व्यक्त केली आणि कोणीही त्याला विरोध दर्शवला नसल्यामुळे ती सूचना एकमताने मान्य झाली. त्याबरोबरच अच्युत गोडबोले यांच्याशी वार्तालापाची दुसरी फेरी सुरू झाली आणि अल्पोपाहार येऊन व तो खाऊन होईपर्यंत ती बराच वेळ चालली. त्यातला एक क्षणसुध्दा कंटाळवाणा गेला नाही.

त्यानंतर आम्ही खाली स्टूडिओच्या बाजूलाच असलेल्या कंट्रोल रूममध्ये गेलो. त्या ठिकाणी असंख्य मॉनिटर ठेवलेले होते आणि त्यावर वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधून केले जात असलेले चित्रण आणि संग्रहातून घेतलेली दृष्ये वगैरे दिसत होती. त्यांचे मिश्रण करून प्रक्षेपण करण्यासाठी चित्रफीत करण्याचे काम चालले होते. क्रमाक्रमाने आमच्यातील एकेकाचे शूटिंग व्हायचे होते. त्यापूर्वी आमच्या तोंडाची साग्रसंगीत रंगरंगोटी झाली नाही, तरी पण ब्रशच्या स्पर्शाने थोडीशी साफसफाई झाली. माझा पहिलाच क्रमांक लागल्यामुळे मी सर्वात आधी स्टूडिओत गेलो. यापूर्वी मी दूरदर्शन, ईटीव्ही आणि सहारा या स्टूडिओंमधल्या चित्रणात भाग घेतला असल्यामुळे मला त्या बाबतीत नाविन्य नव्हते. त्या ठिकाणी झगमगणारे आणि उघडझाप करणारे असंख्य रंगीबेरंगी दिवे आणि छताला लटकवलेल्या रुळांवरून उभ्या आडव्या धावणाऱ्या कॅमेऱ्यांच्या ट्रॉल्या पाहून मी सुरुवातीला चक्रावून गेलो असलो तरी नंतर ते दृष्य माझ्या ओळखीचे झाले होते. त्यां स्टूडिओंच्या मानाने पाहता 'स्टार माझा'चा स्टूडिओ पिटुकला दिसला. सी एन एन च्या अॅटलांटा इथल्या केंद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना दाखवण्यासाठी एक लहानसा डमी स्टूडिओ ठेवला आहे, तसा हा स्टूडिओ वाटला.

सुरुवातीला मंचावर येऊन निवेदक अश्विन बापट यांनी या कार्यक्रमाची पूर्वपीठिका सांगितली तसेच प्रमुख अतिथींचे स्वागत केले. त्यानंतर अच्युत गोडबोले यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त केले. नंतर आम्हा सर्वांना एकेकाला बोलावून प्रमाणपत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आली. त्यानिमित्य आम्ही दोन वाक्ये बोलायची की दोन मिनिटे या बाबतीत थोडा घोळ झाल्यामुळे सर्वांनी तीन चार वाक्यांत आभार मानले आणि या कार्यक्रमाची सांगता झाली. एक नवा अनुभव आणि कांही नव्या ओळखी यांची प्राप्ती झाली.


-----
या लेखाच्या पूर्वार्धावर आलेला प्रतिसाद
1 comment:
मी अत्त्यानंद said...
वा! आनंदराव! खूपच सविस्तर लिहिताय.
वाचायला मजा येतेय.(मीही वृत्तांत लिहिलाय पण खूपच त्रोटक आहे तो.)
मी आपल्याला भेटलो तेव्हा माझ्याबरोबर श्री.देवदत्त आणि त्यांच्या सौभाग्यवती होत्या. छोटा डॉन आणि निखिल देशपांडे मागाहून आले.
--------------------------------------------------------------

Thursday, January 21, 2010

ग्रहणे सुटली


डिसेंबरअखेर जो तो गेल्या वर्षाचा आढावा घेत असतो. त्या वर्षात घडून गेलेल्या कोणकोणत्या घटना लक्षात राहिल्या त्यांची आठवण काढतो. त्यातल्या कांही सुखद असतात तर कांही क्लेशकारक, कांही थक्क करणा-या असतात तर कांही दिग्मूढ, कांही उत्साहवर्धक असतात तर कांही चिंताजनक, कांही मजेदार असतात, तर कांही विचार करायला लावतात. त्या घटनांवरून पूर्वीचे अनुभव आठवतात. गेलेल्या वर्षात कांही गोष्टी मनासारख्या घडून येतात तर कांही तशा घडत नाहीत, आपण केलेल्या कांही योजना सफळ झालेल्या दिसतात, तर कांही गोष्टी मनात असल्या तरी जुळून येत नाहीत. अशा सगळ्यांचा ताळेबंद वर्षाच्या अखेरीस मनोमनी होत असतो.

नव्या वर्षाचे स्वागत आपण नव्या उमेदीने करतो. नव्या कल्पना, नवे विचार घेऊन नवे मनसुबे बांधतो. या ब्लॉगचा जन्मच मुळी नववर्षदिनाला झाला आणि याचे पुनरुज्जीवनही नव्या वर्षाच्या सुरुवातीला झाले. त्यामुळे नववर्षदिनाला इथे फार महत्व आहे. गेल्या वर्षाची सांगता आणि नव्या वर्षाची सुरुवात या काळात या ठिकाणी बरेच कांही लिहायचा विचार होता. त्यासाठी अनेक विषय समोर येत होते. गेल्या वर्षीच्या मराठी ब्लॉगविश्वात झालेल्या एका स्पर्धेमध्ये या ब्लॉगचा समावेश उल्लेखनीयांच्या यादीत झाला होता. त्यामुळे अंगातला उत्साह वाढला होता. वाचनसंख्येचा आंकडा पुढे सरकत होता तसेच पाठीराख्यांची संख्या दुप्पट झाली होती. त्यांना नवनव्या गोष्टी दाखवण्याची जबाबदारी अंगावर येऊन पडली होती. एकंदरीत पहाता बरेच कांही करायची इच्छा होती आणि आवश्यकतासुध्दा होती. पण.....

फावला वेळ घालवण्यासाठी गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच दोन अवांतर कामे घेतली होती. वर्षभर ती हळूहळू चालत होती आणि मोकळा वेळ त्यात मजेत जात होता. पण वर्षअखेरीला काय झाले कुणास ठाऊक, दोन्ही कामांना अचानक भलताच वेग आला आणि त्यांचा पसारा वाढता वाढता एकमेकांना भेदून त्यांनी माझा सगळाच वेळ व्यापून टाकला. त्या राहू आणि केतूंनी या ब्लॉगला लावलेले ग्रहण जवळ जवळ महिनाभर चालले. अजूनही त्यांच्या पडछाया पूर्णपणे बाजूला झाल्या नसल्या तरी आता ग्रहण सुटून पुन्हा मार्ग दिसायला लागला आहे. त्यामुळे आता भेटत राहू.