Saturday, October 30, 2010

नव(ल)रात्री - भाग ४

परदेशभ्रमणाचा थोडा अनुभव माझ्या गाठीशी होता. पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला कोणत्या गेटवर विमान मिळणार आहे हे विमानतळावरील फलकावर पाहून घेतले आणि कॉरीडॉरमधील पाट्या वाचून त्यात दाखवलेल्या खुणांनुसार डाव्या उजव्या बाजूला वळत आणि एस्केलेटर्सने वर खाली चढत उतरत आमचे गेट गाठले. विमान गेटवर लागायला बराच अवकाश होता. मुंबईतल्या ऑक्टोबर हीटमधून थेट अमेरिकेतल्या फॉल सीझनमध्ये आल्याने तपमानात पंचवीस तीस अंशांचा फरक पडला होता. त्याने सर्वांग गारठून गेले होते. थंडीचा विचार करून गरम कपड्यांची गाठोडी आणली होती आणि एक एक करून ते कपडे अंगावर चढवलेही होते. तरीही नाकातोंडामधून आत जाणारी थंड हवा तिचा हिसका दाखवत होती. त्यावर इलाज म्हणून गरम गरम चहा घेतला. आधी थोडी चंव घेऊन पहावी या विचाराने घेतलेला तिथला स्मॉल पेला, आमच्या नेहमीच्या कपाच्या दुप्पट आकाराचा होता. तो घशात रिचवल्यानंतर अंगात पुरेशी ऊब आली. ठरल्यावेळी आमचे विमान आले आणि त्यात बसून आम्ही अॅटलांटाला जाऊन पोचलो.

हे विमान लहानसे होते, तराही अर्धवटच भरले होते. त्यातलेही अर्ध्याङून अधिक उतारू अॅटलांटाला न उतरता पुढे चालले गेले. आमच्यासोबत वीस पंचवीस लोक तिथे उतरले असतील. स्टॉलवरून काही खरेदी करण्यासाठी आम्ही दोन तीन मिनिटे थांबलो तेवढ्यात ते लोक कुठे अदृष्य झाले ते कळलेही नाही. आमचे सामान घेण्यासाठी बॅगेजची पाटी वाचून त्यात दाखवलेल्या बाणाच्या दिशेने चालत राहिलो. तो एक लांबच लांब कॉरीडॉर होता आणि चालण्याचे कष्ट टाळायचे असल्यास सरकत्या पट्ट्यावर उभे राहून पुढे जायची सोय होती. पाचसहा मिनिटे पुढे जाऊनसुध्दा आमचे ठिकाण येण्याची लक्षणे दिसत नव्हती. कोणाला विचारावे म्हंटले तर नजरेच्या टप्प्यात कोणी नव्हते. आम्हा दोघांच्या आजूबाजूला, मागेपुढे कोणीही त्या मार्गाने जात नव्हते. पुढे चालत राहिल्यानंतर एक ठिकाण आले. त्या जागी थोडी माणसे नजरेला पडली. "सामान घेऊन विमानतळाबाहेर पडण्यासाठी ट्रेनने जायचे असते" असे त्यांनी सांगितले. "ट्रेनचे स्टेशन कुठे आहे?" हे विचारल्यावर बोटाने एक जागा दाखवली.

लिफ्टचा दरवाजा असावा असे काहीतरी तिथे होते आणि त्याच्या समोर चारपाच उतारू उभे होते. दोन तीन मिनिटातच आतल्या बाजूने हलकासा खडखडाट ऐकू आला आणि तो दरवाजा उघडला. पलीकडे एक अगदी पिटुकला प्लॅटफॉर्म होता आणि आगगाडीचा एकच डबा उभा होता. पटापट सगळे जण त्यात चढले, दरवाजे बंद झाले आणि त्या डब्याने वेग घेतला. हे लिफ्टमध्ये चढल्यासारखेच वाटत होते, फक्त ती उभ्या रेषेत वरखाली न करता आडव्या रेषेत धांवत होती. अॅटलांटाचा विमानतळ इतका विस्तीर्ण आहे की त्याचे ए, बी, सी, डी वगैरे विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांना बाहेरून जाण्यायेण्याच्या वाटेशी जोडणारी शटल सर्व्हिस आहे. इथे असे काही असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. सामान उतरवून घेण्याच्या जागी जाऊन पोचलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेले अजय आणि किरणराव पट्ट्याजवळच उभे होते आणि आमच्या बॅगाही पट्ट्यावर फिरत होत्या. आपले सामान उतरवून घेतल्यावर त्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसलो. कोणता माणूस कोणते सामान घेऊन बाहेर जात आहे याची चौकशी करणारा कोणीच इसम तिथल्या दरवाज्यावर नव्हता.

अॅटलांटाचा विमानतळ शहराच्या दक्षिण टोकाला आहे, तर अजय रहात असलेले अल्फारेटा गाव अॅटलांटाच्या उत्तरेला पंचवीस तीस मैलांवर आहे. आधीचे निदान पंधरावीस मैलतरी आम्ही अॅटलांटा शहराच्या भरवस्तीमधून जात होतो. पण वाटेत एकही चौक लागला नाही की ट्रॅफिक सिग्नल नाही. कुठे जमीनीखालून तर कुठे जमीनीवरून सरळसोट रस्त्यावरून आमची कार सुसाट वेगाने धांवत होती. वाटेत जागोजागी उजव्या बाजूला फाटे फुटले होते. शहरातल्या आपल्या इच्छित स्थळी जाणारे लोक आधीपासून आपली गाडी उजवीकडील लेनमध्ये आणत होते आणि वळण घेऊन हमरस्त्याच्या बाहेर पडत होते. हा हमरस्ता अॅटलांटापासून पन्नास साठ मैल दूर गेल्यानंतर एका राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वाटेत लागणा-या शहरांना जोडणारे एक्झिट्स होते. नऊ की दहा नंबराच्या एक्झिटमधून आम्ही एक्झिट केले आणि अल्फारेटा शहरातल्या अजयच्या घराकडे गेलो. या गावातल्या रस्त्यांवर मात्र जागोजागी ट्रॅफिक सिग्नल होते आणि रस्त्यात दुसरे वाहन असो वा नसो, लाल दिवा दिसताच लोक आपली गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट पहात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे नवनवे अनुभव घेत आम्ही घरी जाऊन पोचलो.

जेट लॅगचे निमित्य करून दोन दिवस झोपून काढले आणि चौथ्या दिवशी आम्ही पर्यटनासाठी निघालो. आम्ही उभयता आणि किरणराव व विद्याताई अशा चार लोकांचे नायगराचा धबधबा, वॉशिंग्टन डीसी आणि इतर काही ठिकाणे पहाण्यासाठी तीन दिवसांच्या एका लघुसहलीचे रिझर्वेशन केलेले होते. ती न्यूयॉर्कहून सुरू होऊन तिथेच संपणार होती. न्यूयॉर्कला जाणेयेणे आपल्या आपण करायचे होते. आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला एकदा आल्याने त्या मार्गावरले तज्ज्ञ झालो होतो. नेहमीची सरावाची वाट असावी अशा आविर्भावात आम्ही अॅटलांटाहून निघालो आणि नेवार्कला सुखरूप जाऊन पोचलो. तो शनिवारचा दिवस असल्याने सौरभला सुटी होती. आम्हाला नेण्यासाठी विमानतळावर तो आला होताच. तिथल्या महामार्गावरून तो आम्हाला पर्सीपेन्नी या त्याच्या गावाला घेऊन गेला. खूप रुंद आणि सरळसोट रस्ते, त्यावरून कुठेही न थांबणारी वाहतुकीची रांग, एक्झिटवरून बाहेर पडणे वगैरे आता ओळखीचे झाले होते.

रविवारी सगळे मिळून बसने न्यूयॉर्कला गेलो. अर्थातच सर्वात आधी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. "जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वंदे।" हे स्फूर्तीदायक गीत लहानपणापासून म्हणत आलो असलो तरी स्वतंत्रता ही एक मनाला जाणवणारी आणि बुध्दीला आकलन होणारी संकल्पना होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहून ती दृष्य स्वरूपात नजरेसमोर आली. स्वातंत्र्यमातेच्या या मूर्तीचा भव्य आकार, तिची मुद्रा, तिच्या चेहे-यावर असलेले भाव या सर्वांमधून तिचे स्वरूप प्रकट होत होते. आदिशक्तीचे हे आगळे रूपसुध्दा नवरात्रातच पहायला मिळाले.

त्यानंतर तीन दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून दसरा येईपर्यंत आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला परत आलो. या सफरीबद्दल मी पूर्वीच विस्तारपूर्वर लिहिलेले आहे. रोममध्ये असतांना रोमन व्हा अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. थोड्या वेगळ्या अर्थाने गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास असे हिंदीत म्हणतात. अमेरिकेत गेल्यानंतरसुध्दा घरात आम्ही मराठीच राहिलो होतो, पण चिनी लोकांनी चालवलेल्या अमेरिकन यात्रा कंपनीबरोबर जातांना समझोता करावाच लागला. ज्या हॉटेलांमध्ये आमची झोपायची व्यवस्था झाली होती त्यातल्या खोल्या इतर सुखसोयींनी युक्त असल्या तरी त्यांमध्ये आंघोळीची सोय नसायची. विमानात असते तशा प्रकारचे एक छोटेसे टॉयलेट रूमला जोडलेले असले तरी त्यात टब किंवा शॉवरसाठी जागाच नसायची. पहाटेच्या वेळी तपमान शून्याच्या जवळपास असायचे आणि बदलण्यासाठीसुध्दा अंगावरचे कपडे काढणे जिवावर येत असे. त्यामुळे बाथरूमचे नसणे आमच्या पथ्यावरच पडत असे. त्या वर्षीच्या नवरात्रातले दोन दिवस पारोसेच राहिलो. जेवणासाठी आमची बस एकाद्या केएफसी किंवा मॅकडीच्या दुकानासमोर उभी रहात असे. आपल्याकडे मिळतात तसले उकडलेल्या बटाट्याचे व्हेजी बर्गर तिथे नसायचे. नवरात्र चालले असल्याची जाणीव बाजूला ठेवून नाइलाजाने थोडा मांसाहार करणे भाग पडत होते. गोडबोले की आठवले नावाचे एक तरुण जोडपे आमच्याबरोबर सहलीला आले होते. त्यांनी काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची मोठी पुडकी आणि खूप सफरचंदे आणली होती. शिवाय मिळतील तिथे केळी, संत्री, मोसंबी वगैरे ते घेत होते. ते मात्र शुध्द शाकाहारी राहिलेच, कदाचित त्यांना तीन दिवस उपवाससुध्दा घडला असेल. रक्तामधली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे वाढण्याच्या भीतीने आम्ही तसे करू शकत नव्हतो आणि ते कमी होण्याच्या भीतीने उपाशीही राहू शकत नव्हतो. त्यामुळे जो काही पापसंचय होत होता त्याला इलाज नव्हता. हे नव(ल)रात्र नेहमीपेक्षा खूपच आगळे वेगळे असल्यामुळे कायम लक्षात राहील.

Thursday, October 28, 2010

नव(ल)रात्री - भाग ३

दोन वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली सर्वपित्री अमावास्येच्या रात्री आम्ही दोघांनी मुंबईहून विमानाने प्रस्थान केले आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नेवार्क विमानतळावर उतरून अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आमच्या दृष्टीने एका अर्थाने हे सीमोल्लंघनच होते. नवरात्र संपून दस-याच्या मुहूर्तावर करण्याऐवजी आम्ही ते नवरात्राच्या सुरुवातीलाच केले होते. आमचे दुसरे पाऊल अजून अधांतरीच होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन ऑफीसरने परवानगी दिल्यानंतर आम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार होता. काँटिनेंटल विमान कंपनीच आम्हाला पुढे अॅटलांटाला नेणार होती, पण आमचे सामानसुमान पुढे पाठवण्यात अर्थ नव्हता. आम्ही नेवार्कलाच ते उतरवून घ्यावे आणि इमिग्रेशन क्लीअरन्स मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीकडे सुपूर्द करावे अशी आज्ञा झाली. इतर प्रवाशांबरोबर आम्ही बॅगेज क्लीअरन्सच्या विभागात जाऊन पोचलो.

भारतातल्या आणि युरोपातल्या विमानतळांवर मी जे बॅगेजचे कन्व्हेयर बेल्ट पाहिले होते त्यांचे एक शेपूट बाहेर गेलेले असायचे आणि त्यावर व्यवस्थित मांडून ठेवल्याप्रमाणे आमचे सामान आत येतांना दिसायचे. नेवार्कला मात्र वेगळेच दृष्य पहायला मिळाले. एका विशाल हॉलमध्ये अनेक लहान लहान वर्तुळाकार बेल्ट गोल गोल फिरत होते. कोणत्या विमानातले बॅगेज कोणत्या बेल्टवर येणार हे दाखवणारे मोठे तक्ते होते. त्यात आमचा नंबर पाहून त्या वर्तुळापाशी गेलो. त्याच्या मधोमध एक घसरगुंडी होती आणि डोक्यावर असलेल्या फॉल्स सीलिंगच्या आडून सामान येऊन छपरामध्ये असलेल्या एका पोकळीतून बदाबदा त्या घसरगुंडीवर पडून ते बेल्टवर येत होते. त्यात अनेक बॅगा उलटसुलट होत होत्या. आपले सामान दुरूनच पटकन ओळखू येण्यासाठी आम्ही बॅगांच्या वरच्या अंगाला मोठमोठी लेबले चिकटवली होती, पण ती काही दिसत नव्हती. काही लोकांना आपल्या बॅगा अचूक ओळखता येत होत्या, त्यांनी त्या पटकन काढून घेतल्या. इतर लोक अंदाजाने एक बॅग उचलून घेत होते आणि ती त्यांची नसल्यास तिला सुलट करून पुन्हा बेल्टवर ठेवत होते. या सस्पेन्समध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला आमचे सर्व सामान मिळाले. ते नसते मिळाले तर काय करायचे हा एक प्रश्नच होता, कारण आम्हाला तर लगेच पुढे अॅटलांटाला जायचे होते, बॅगांची वाट पहात नेवार्कला थांबायची कसली सोयच नव्हती. विमानातून आपले सामान न येण्याचा अनुभव आम्ही लीड्सला जातांना घेतला होता, पण त्यावेळी आम्ही सामानाविनाच निदान घरी जाऊन पोचलो होतो. त्यावेळी अर्ध्या वाटेत थांबायची गरज पडली नव्हती.

आमचे सामान गोळा करून आम्ही इमिग्रेशन काउंटरकडे गेलो. त्या ठिकाणी बरीच मोठी रांग होती, तिच्यात जाऊन उभे राहिलो. आमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही स्वतः फॉर्म भरून, तासन् तास रांगांमध्ये उभे राहून आणि आवश्यक असलेली सारी कागदपत्रे दाखवून मिळवले होते आणि पुन्हा पुन्हा त्यातला तपशील तपासून घेतला होता. त्यामुळे त्यात कसलीही उणीव निघण्याची भीती नव्हती. गरज पडली तर दाखवण्यासाठी ते सारे दस्तावेज आम्ही आपल्या हँडबॅगेत ठेवले होते. केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वांना द्यायचे सर्व कर वेळेवर भरले होते, आमचे वाईट चिंतणारा कोणी आमच्याविरुध्द कागाळी करेल अशी शक्यता नव्हती. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नव्हते, पण एक दोन ऐकीव गोष्टींमुळे मनात थोडीशी धाकधूक वाटत होती.

माझ्या एका मित्राच्या अमेरिकेत राहणा-या मुलीकडे गोड बोतमी होती. या प्रसंगी तिला धीर देण्यासाठी, तिची आणि होणा-या बाळाची नीट काळजी घेण्यासाठी तिच्याकडे जायला तिची आई आतुर झाली होती. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीने माहेरी जायचे अशी आपल्याकडली पूर्वापारची पध्दत आहे. आजकालच्या जगात काही कारणामुळे ते शक्य नसेल तर मुलीच्या आईने काही दिवस तिच्याकडे जाऊन राहणेही आता रूढ झाले आहे. आपल्या मुलीकडे अमेरिकेत जाण्यासाठी केवळ पुरेसेच नाही तर चांगले भरभक्कम कारण आपल्याकडे आहे अशी त्या माउलीची समजूत होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. दुसरे एक गृहस्थ मुंबईतल्या धकाधुकीमुळे हैराण झाले होते. त्यांची म्हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा, अमेरिकेत ऐषोआरामात रहात होता. कांही दिवस त्याच्या आधाराने रहावे, सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्याच्या निवासस्थानाचा अनुभव आणि उपभोग घ्यावा अशा विचाराने ते अमेरिकेला जायला निघाले. त्यांनाही जाता आले नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या घरी आम्ही सुखी आहोत, अमेरिकेतली नवलाई पाहून परत जाणार आहोत असे आम्ही मुलाखतीत सांगितले होते. तेच पुन्हा सांगायचे होते, फक्त त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव करत होतो.

आमचा नंबर ज्या काउंटरवर आला त्या जागी कोणी खडूस तिरसिंगराव माणूसघाणे नव्हता. एका सुहास्यवदना ललनेने गोड हंसून आमचे स्वागत केले. "अमेरिकेत पहिल्यांदाच आला आहात ना?" असे विचारून "जा, मजा करा (एंजॉय युवरसेल्फ)" असे म्हणत एक चिटोरे आमच्या पासपोर्टमध्ये ठेवले आणि ते जपून ठेवायला सांगितले. आम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकतो ते त्यावर लिहिले होते आणि त्यापूर्वी अमेरिकेहून परत जातांना विमानतळावर ते परत द्यायचे होते. घटस्थापनेच्या दिवशी अंबाबाईनेच आपल्याला या रूपात दर्शन दिले अशी मनात कल्पना करून आणि तिचे आभार मानीत आम्ही पुढे सरकलो.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

Tuesday, October 26, 2010

नव(ल)रात्री - भाग २

या वर्षी नवरात्रात ज्या आप्तांच्याकडे जाण्याचा आमचा बेत होता त्यांचे पूर्वज पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचे सरदार होते. बाळाजी विश्वनाथांप्रमाणे ते कोकणातून पुण्याला आले होते आणि शिंदे होळकरांच्या सैन्यातून दिग्विजयासाठी उत्तर हिंदुस्थानात गेले होते. तिकडल्या मोहिमांमध्ये त्यांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या मोबदल्यात त्यांना त्या भागात (सध्याच्या मध्यप्रदेशात) काही जहागिरी, वतने वगैरे मिळाली होती. पुढे शिंदे, होळकर, गायकवाड आदि मोठ्या मराठा सरदारांनी ब्रिटीशांबरोबर तह केले आणि ते सारे ब्रिटीशांचे मांडलीक राजे झाले. या संस्थानिकांच्या दरबारातल्या सरदार मंडळींना एवढा बहुमान मिळाला नव्हता तरी त्यांच्या जहागिरी, वतने, जमीनी, वाडे वगैरे मालमत्ता शाबूत राहिली होती. याशिवाय ब्रिटीश सरकारकडून त्यांना सालाना तनखा मिळत असे. तसेच समाजामध्ये ते सरदार या सन्मानपूर्वक उपाधीने (सरदारजी नव्हे) ओळखले जात असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात सामाजिक समतेचे वारे वाहू लागले आणि अनुपस्थित भूमीधारकांना आपल्या जमीनीवर ताबा ठेवणे कठीण होत गेले. काळाची गरज पाहून या कुटुंबातील लोकांनी इतस्ततः असलेली मालमत्ता विकून टाकली आणि ब-हाणपूरचा वाडा, टिमरनी येथील गढी आणि शेतजमीनी यांवर आपले लक्ष केंद्रित केले.

यांच्या पूर्वजांच्या काळापासून ब-हाणपूरच्या वाड्यात अंबाबाईच्या मूर्तीची उपासना केली जाते. अंबेजोगाई येथील योगेश्वरीमातेचा या मूर्तीमध्ये वास आहे अशी या कुटुंबातील आबालवृध्द सर्वांची नितांत श्रध्दा आहे. घरातील कोणत्याही महत्वाच्या कार्याला आरंभ करण्यापूर्वी तिचा आशीर्वाद घेतला जातो तसेच कार्यसिध्दी झाल्यावर तिचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या कारणासाठी बाहेरगावी गेलेली मंडळीसुध्दा हा प्रघात पाळत आली आहेत. तसेच लग्न करून सासरी नांदत असलेल्या माहेरवाशिणीसुध्दा काही प्रमाणात तो पाळतात. हे सारे अत्यंत भक्तीभावाने होत असल्यामुळे देवीच्या सभोवताली असलेले वातावरण पूर्णपणे मंगलमय वाटते. त्यात दांभिकतेचा किंवा व्यापारीकरणाचा अंशसुध्दा आलेला नाही.

ब-हाणपूरच्या वाड्यात या देवीसाठी प्रशस्त असे देवघर बांधलेले होते. त्याशिवाय नवरात्राच्या उत्सवासाठी एक मोठा दिवाणखाना होता. सुरेख नक्षीकाम केलेले खांब आणि कमानी, कडीपाटाच्या छपराला टांगलेल्या हंड्या झुंबरे यांनी तो छान सजवलेला होता. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना या दिवाणखान्यात केली जात असे आणि त्यानंतर दस-यापर्यंत तिचा उत्सव तिथे चालत असे. रोज पहाटेच्या वेळी देवीला जाग आणण्यासाठी ताशा सनई नगा-याचा मंगल नाद करण्यापासून त्याची सुरुवात होत असे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत झाल्यावर देवीची साग्रसंगीत शोडषोपचार पूजा केली जात असे. हा विधी चांगला दोन अडीच तास चालायचा. देवीला शोडष पक्वांन्नांचा नैवेद्य दाखवला जाई. त्यानंतर जेवणावळी सुरू होत आणि दुपार टळून जाईपर्यंत त्या चालत असत. नवरात्रीच्या उत्सवासाठी कुटुंबातील एकूण एक लोक आणि अनेक जवळचे आप्त या वेळी तिथे आवर्जून येत असत. त्यामुळे घराला एकाद्या लग्नघराचे स्वरूप येत असे.

कालांतराने या कुटुंबाच्या ब-हाणपूरच्या शाखेतल्या पुढील पिढीमधील मुलांनी ब-हाणपूरहून पुण्याला स्थलांतर केले. त्यानंतर देवीची पूजाअर्चा करायला तिथे कोणीच उरले नाही. तेंव्हा सर्वानुमते अंबाबाईच्या मूर्तीला ब-हाणपूरहून टिमरनीला नेण्यात आले. तिथल्या वाड्यामधल्या बैठकीच्या खोलीचे रूपांतर देवघरात करण्यात येऊन देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवघरात केली गेली. तेंव्हापासून नवरात्रीचा उत्सव टिमरनीच्या वाड्यात साजरा केला जाऊ लागला. पूर्वीपासून परंपरागत पध्दतीने चालत आलेला हा उत्सव अजूनही जवळजवळ तशाच रूपात साजरा केला जात आहे. रोज सकाळी मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा, त्यानंतर सुग्रास अन्नाचा नैवेद्य, जेवणाच्या लांबलचक पंगती, संध्याकाळ झाल्यानंतर घरातल्या सर्वांनी देवीसमोर बसून तिची अनेकविध स्तोत्रे म्हणणे, बराच वेळ चालणारी आरती, रात्रीची जेवणे झाल्यानंतर पुन्हा भजनांच्या गायनाने संगीतसेवा वगैरेमुळे दहा दिवस घर देवीमय झाले असते आणि एक प्रकारच्या चैतन्याने भारलेले असते. अष्टमीच्या रात्री शिजवलेल्या भाताच्या उकडीपासून महालक्ष्मीची प्रतिमा तयार करून तिची वेगळी पूजा केली जाते आणि घागर फुंकण्याचा विधी केला जातो.

पूर्वीच्या काळात रूढ असलेल्या सोवळेओवळे वगैरेच्या चालीरीती आता कालबाह्य झाल्या असल्यामुळे विस्मृतीत गेल्या आहेत. शहरात वाढलेल्या मुलांना त्यांचा गंधही नसतो. अजूनही नवरात्राच्या काळात मात्र या घरात त्या कटाक्षाने पाळल्या जातात. पूजाअर्चा करण्यासाठी देवघरात प्रवेश करणा-या पुरुषांसाठी रेशमाचा कद आणि महिलांसाठी नऊवारी लुगडे, लहान मुलींसाठी परकर पोलके हा ड्रेसकोड अजूनही शक्यतोंवर पाळला जातो. नव्या पिढीतली मुले मुली जास्तच हौसेने यात सहभागी होतात. सकाळी उठून लवकर स्नान करणे वगैरे मात्र त्यांना समजाऊन सांगावे लागते.

यापूर्वीही काही वेळा मी या उत्सवात सहभागी झालो होतो. पाटरांगोळी केलेल्या भोजनाच्या पंगतीमध्ये केळीच्या पानात आग्रह करकरून वाढलेले मनसोक्त सुग्रास जेवण केले होते, जेवण चालू असतांना इतरांबरोबर नवा संस्कृत श्लोक (मुद्दाम पाठ करून) मोठ्याने म्हंटला होता. स्तोत्रपठण, आरत्या, मंत्रपुष्प, भजन आदींमध्ये आठवेल तेवढा आणि जमेल तेवढा सहभाग उत्साहाने घेतला होता. या सर्वांमध्ये मिळणारा वेगळ्या प्रकारचा आनंद उपभोगला होता. नोकरीत असतांना जास्त रजा मिळणे शक्य नसल्यामुळे नवरात्रोत्सवातल्या एक दोन दिवसाकरताच भोज्ज्याला शिवून आल्याप्रमाणे जाणे होत होते. या वर्षी चांगला आठवडाभराचा कार्यक्रम योजला होता, पण योग नव्हता.

. . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, October 23, 2010

नव(ल)रात्री

१.श्रृंगार, २.हास्य, ३.करुण, ४.रौद्र, ५.वीर, ६.भयानक, ७.बीभत्स, ८.अद्भुत, आणि ९.शांत असे नऊ प्रमुख रस सांगितले गेले आहेत. नवरात्री नावाच्या एका जुन्या तामिळ चित्रपटात यातील एकेका रसाचे प्रामुख्याने दर्शन घडवणारी एक घटना रोज घडत जाते, अशा घटनांची साखळी दाखवली आहे. (बहुधा) शिवाजी गणेशन या नटश्रेष्ठाने नऊ सर्वस्वी भिन्न अशा भूमिकांमधून ही रसनिष्पत्ती अप्रतिमरीत्या साधली आहे. पुढे या सिनेमाचे हिंदीकरण करण्यात आले. नया दिन नयी रात नावाच्या या चित्रपटात हरहुन्नरी आणि गुणी नट संजीवकुमार यानेसुध्दा नऊ निरनिराळ्या भूमिका छान वठवल्या आहेत. धोपटमार्गाने जाणा-या माझ्यासारख्याच्या जीवनात असे लागोपाठ नऊ दिवस एवढे नाट्य घडणे शक्य नाही. पण दरवर्षी येणारे नवरात्र एक अनपेक्षित आणि वेगळा अनुभव देऊन जाते असे मात्र योगायोगाने ओळीने गेली काही वर्षे घडत आले आहे.

यंदाच्या नवरात्रात आठदहा दिवस बाहेरगावी जाऊन फिरून येण्याचा कार्यक्रम तीन महिन्यापूर्वीच ठरवला होता आणि आयत्या वेळी मिळणार नाहीत म्हणून जाण्यायेण्याची तिकीटेही काढून ठेवली होती. त्या आठवडाभरात काय काय मौजमजा करायची याचे थोडे नियोजन करून मनातल्या मनात मांडे खाणे चालले होते. पण ते तसेच हवेत विरून गेले. घटस्थापनेच्या दोनच दिवस आधी पहाटे अचानक आम्हा दोघांनाही अस्वस्थ वाटू लागले म्हणून शेजारच्या मुलाने दवाखान्यात नेऊन पोचवले. मला आणि पत्नीला वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये अॅड्मिट करून घेतले.

पहिल्या दिवशी तर आजार आणि त्यावरील औषधोपचार यांच्या संयुक्त प्रभावाने आलेल्या ग्लानीत मी आपल्या खाटेवर निपचित पडून होतो. दुस-या बिछान्यावरला रुग्ण बरा दिसत होता. सकाळपासून तो कोणाची तरी वाट पहात होता. दुपारच्या सुमाराला चाळिशीला आलेल्या त्याच्या दोन मुली आणि तिशीमधली भाची की पुतणी (नीस) अशा तीघीजणी मिळून आल्या. बराच वेळ त्या रुग्णाशी बोलत बसल्या. सगळी तयारी झाल्यानंतर त्याला व्हीलचेअरमध्ये बसवून बाहेर घेऊन गेल्या. संध्याकाळ उलटून गेल्यानंतरच तो आपल्या बेडवर परत आला. मेंदूचे स्कॅनिंग करण्यासाठी त्याला नेले होते असे त्याच्याकडून समजले.

त्या तीन्ही मुली एकमेकींशी आणि त्याला उद्देशूनसुध्दा फर्मास इंग्रजीत बोलत होत्या. अधून मधून एक दोन वाक्ये तो इंग्रजीतच पण ज्या टोनमध्ये बोलला त्यावरून तो कारवारी किरिस्तांव असावा अशी अटकळ मी बांधली होती. हॉस्पिटलमध्ये परत आल्यानंतर त्याने पत्नीला फोन लावून माका तुका केले तेंव्हा माझा अंदाज खरा ठरला. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये मी त्याच्याशी बोलू शकत होतो, पण यातल्या कोणत्याही भाषेत त्याने सांगितलेल्या गोष्टी मला समजत तरी नव्हत्या किंवा त्यांवर माझा विश्वास तरी बसत नव्हता. त्यामुळे फारसा संवाद साधता आला नाही. एक अजब व्यक्ती भेटली एवढीच त्याची मनात नोंद झाली. त्याला व्हीलचेअरमधून नेले आणले असले तरी तसा तो बरा दिसत होता आणि त्याच्यावर कसले उपचार चाललेले दिसत नव्हते. बहुधा तपासण्या करवून घेण्यासाठी त्याला अॅड्मिट केले असावे. त्या झाल्यावर आणि त्यावरून त्याच्या आजाराचे निदान झाल्यावर त्याला घरी पाठवले.

या व्यक्तीच्या जागेवर आलेला माणूस मात्र वल्ली निघाला. जेवढा वेळ तो जागा असेल, तेवढा वेळ त्याच्या तोंडाची टकळी चाललेली असायची. त्यातून तो केंव्हा केंव्हा मला काहीतरी सांगायचा आणि केंव्हा केंव्हा स्वतःशीच पुटपुटायचा. दोन तीन वेळा नर्सने येऊन त्याला चुप रहायला सांगितले, पण बोलणे बंद झाले की तो कण्हायला लागायचा. त्याच्या विव्हळण्यापेक्षा बोलणे कानाला बरे वाटत असे. निदान ते एका कानाने ऐकून दुस-या कानाने सोडता येत असे. त्यालाही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायला काही वाटत नव्हते. त्यामुळे न ऐकलेले वाक्य काही वेळानंतर पुन्हा कानावर पडत असे आणि वाटले तर त्या वेळी ते समजून घेता येत असे. या वल्लीवर एक स्वतंत्र लेख लिहिता येईल इतका त्याच्याबद्दलचा मालमसाला मला त्याच्याकडूनच समजला.

हॉस्पिटलमध्ये काही काम करण्याचा प्रश्नच नव्हता. आयव्हीला जोडलेल्या नळीने मी कॉटशी जखडलेला गेलो होतो. गरजेनुसार नर्सने ती तात्पुरती सोडून मोकळीक दिली तरच मी आजूबाजूला थोडा फिरू शकत होतो. त्यामुळे वेगळ्या वॉर्डमध्ये असलेल्या पत्नीला तिकडे जाऊन पाहणेसुध्दा मला शक्य नव्हते. सुदैवाने दोघांनीही आपापले मोबाईल सोबत नेले असल्यामुळे त्यावरूनच संवाद करता येत होता. उरलेला वेळ काय करायचे हा एक प्रश्न होता. ब्लॉगवर मी ज्या प्रकारचे लेखन नेहमी करत असतो, त्यासाठी काही संदर्भ पहावे लागतात, थोडे उत्खनन करावे लागते. त्याची सोय नव्हती. त्यामुळे पूर्णपणे काल्पनिक असे काय रचता येईल याचा विचार करता करता मनात एक कल्पना सुचली. त्यावर काम करतांना मजा वाटू लागली.

हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या आधी टीव्हीवरील एक मालिका मी अधून मधून पहात असे. त्यातली केंद्रीय कल्पना, कथासूत्र आणि पात्रे ओळखीची झाली होती. शेवटचा जो भाग मी पाहिला होता त्यानंतर त्यात काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. पण यापुढे ही मालिका जास्त ताणून धरण्यापेक्षा तिला संपवून टाकावे असे माझे मत होते. लेखकाच्या जागी मी असलो तर ती कशा रीतीने संपवता येईल आणि त्याआधी तिचे अस्ताव्यस्त पसरलेले धागे कसे जुळवून आणता येतील याचा विचार करून त्यानुसार काही नाट्यमय घटना रचल्या आणि संवाद रचू लागलो. यात एक सूत्रबध्दता असल्यामुळे ते लक्षात राहतील असे वाटले. घरी परतल्यानंतर ते टंकून सहा भागात ब्लॉगवर चढवले देखील.

चार दिवसात माझ्या प्रकृतीला आराम पडला. आयव्हीमधून (शिरेतून) औषध देण्याची गरज उरली नाही, तसेच कोणी सेवाशुश्रुषा करण्याची जरूरी उरली नाही. सगळ्या तपासण्या होऊन त्यांचे रिपोर्ट आले होते. आता हॉस्पिटलात राहण्याची आवश्यकता उरली नसल्यामुळे घरी पाठवण्यात आले. पण घर म्हणजे चार भिंतीच होत्या कारण पत्नीचा हॉस्पिटलमधला मुक्काम लांबला होता. संपर्कासाठी चेलीफोन, मनोरंजनासाठी टेलीव्हिजन आणि अनेक उपयोगांसाठी संगणक साथीला होते. तसे शेजारी येऊन चौकशी करून गेले. त्यातल्या एकाने नाश्त्यासाठी आणि दुस-याने जेवणासाठी आग्रह केला. नात्यातला एक मुलगा ऑफीस सुटल्यानंतर झोपायला आला. अशा रीतीने मी तसा माणसात होतो. पण अजून खडखडीत बरा झालो नसल्यामुळे नेहमीचे रूटीन सुरू करू शकत नव्हतो. तान्ह्या मुलाप्रमाणे आलटून पालटून थोडा वेळ झोपणे आणि थोडा वेळ जागणे चालले होते. वेळ घालवण्याची साधने हाताशी होतीच.

आमचे नेहमीचे हॉस्पिटल घरापासून दहा किलोमीटर दूर आहे. अद्याप पत्नी तिथे होती. दोन तीन दिवसांनंतर काही वेगळ्या तपासण्या करण्यासाठी तिला चाळीस किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. माझ्या अंगात पुरेसे त्राण आले नसतांनासुध्दा उसने अवसान आणून तिला भेटायला आणि तिची प्रगती पहाण्यासाठी जावे लागत होतेच, पण स्वतःला थकवा येऊ नये यासाठी विशेष काळजी घेणेही आवश्यक होते. जराशी तारेवरची कसरत होत होती. पहिल्या दिवशी मलाच आत्मविश्वास वाटत नसल्यामुळे एका शेजा-याला सोबत नेले. दुस-या दिवशी मला गरज वाटत नव्हती तरी पत्नीच्या आग्रहावरून त्याला आणले. त्यानंतर वेगळ्या आप्तांना ही ड्यूटी लावून दिली.

आजूबाजूला नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात चाललेला दिसत होता. रस्त्यात जागोजागी मांडव घातलेले होते, त्यावर रंगीबेरंगी सजावट केली होती. संध्याकाळी परततांना उशीर झाला तर विजेची आकर्षक रोषणाई दिसत होती. आतापर्यंत बहुतेक दरवर्षी मी सुध्दा त्यात भाग घेत आलो होतो. यंदा पहिल्यांदाच या गोष्टी अलिप्तपणे पहात होतो. त्यामुळे वाहतुकीला होत असलेल्या अडथळ्याबद्दल तक्रार करत होतो. या वर्षी मराठी, गुजराथी, बंगाली, उत्तर भारतीय यांतल्या कुठल्याच नवरात्राच्या मांडवात घेऊन दर्शनसुध्दा घेतले नाही.

नवरात्र संपूनही गेले. दस-याच्या दिवशी पत्नीला डिस्चार्ज मिळाला. त्या दिवशी तिला पहायला हॉस्पिटलात जाण्याची मला गरज नव्हती. विजयादशमीला सीमोल्लंघन करून गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्याचा रिवाज आहे. या वर्षी मी घराच्या उंब-याच्या बाहेर पाऊल टाकले नाही. उलट दिशेने सीमोल्लंघन करून तिने गृहप्रवेश केला. असे हे या वर्षीचे एक वेगळे नवरात्र.

. . . . . . . (क्रमशः)

Monday, October 18, 2010

***** कल्याणम् (भाग १ ते ६)***** कल्याणम्

(ही मालिका कधीच संपून विस्मरणात गेलेली असल्याने या गोष्टीचे फारसे औचित्य राहिलेले नाही. आधी सहा भागात लिहिलेली ही गोष्ट मी आता एकत्र आणली आहे.)

अलीकडे मी टेलीव्हिजनवर एक मराठी मालिका पहात असे. चाकोरीबाहेरच्या आणि काहीशा अवास्तव अशा तिच्या कथाभागात चमत्कार, भुताटकी, करणी, कुंडली, भविष्यवाणी असले अतार्किक प्रकार नव्हते, अवास्तव वाटणा-या व्यक्तीरेखासुध्दा सपाट किंवा उथळ वाटत नव्हत्या. त्यांच्या अंगात वेगवेगळ्या प्रमाणात असलेले गुणदोष एकमेकांशी सुसंगत वाटायचे. रोज मिळणारे धक्के सुसह्य असायचे. घरातले चित्रण दाखवणारे सेट्स उघडउघडपणे कृत्रिम वाटत नव्हते. अशा कारणांमुळे ही मालिका एका बाजूने कुठे तरी वास्तवाला धरून चालली आहे असे वाटत होते. आजारपणामुळे गेला आठवडाभर मी टीव्ही पाहू शकलो नाही. त्यापूर्वी तिची कथा एका टप्प्यावर येऊन उत्कंठेच्या शिगेला (क्लायम्रक्सला) पोचली होती. अंथरुणावर पडल्या पडल्या आता पुढे काय होईल याचा विचार करता करता माझ्यापुरती मीच त्या मालिकेची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या कल्पनेनुसार तिचा शेवट करून टाकला. असा हा एक प्रयत्न ......

(प्रत्यक्षात ही मालिका पुढे चाललेली आहे. फक्त मी तिचा शेवट असा केला आहे.)

---------------------------------------------------------------------------------------
भाग १

प्रेमा आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसली आहे. मनूकाकू चहाचे दोन कप घेऊन येतात.
"हा घे बाई चहा. आणि ही चिन्नी उठली नाही का अजून?"
"तिला रिकामटेकडीला काय उद्योग आहे? लोळत पडली असेल!"
"जरा तिला बघतीस का? तिच्यासाठी पण चहा आणला आहे मी, आता मला हे जिने चढणं उतरणं जमत नाही गं. लगेच गुढगे ठणके मारायला लागतात. जरा बघ ना!"
"आई तू पण ना! बघू, माझा चहा पिऊन झाला की मी बघते महाराणी काय करताहेत ते!"
आपला चहा पिऊन झाल्यावर चहाचा कप हातात घेऊन प्रेमा गॅलरीत जाते. चिन्मयी गादीवर अस्ताव्यस्त पडलेली असते. तिला गदागदा हलवत प्रेमा म्हणते, "उठा उठा चिन्नूताई, सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले, अजूनही, अजूनही।।
बोटाने तिचा एक डोळा उघडायचा प्रयत्न करते. पण चिन्मयी त्यालाही प्रतिसाद देत नाही. घाबरलेली प्रेमा खाली येऊन स्वातीकडे जाते, "अगं, ही चिन्नी बघ कसं तरी करते आहे. खरं तर कसली हालचालच करत नाहीये!"
"असं का? अगं, आता एक नवीन नाटक सुरू केलं असेल तिनं! आपण तिच्याकडे लक्ष दिलं तर ती लगेच डोक्यावर चढून बसेल. तू लक्षच देऊ नकोस, तीच कंटाळेल, कंटाळेल आणि मुकाटपणे उठेल बघ थोड्या वेळानं."
"पण मग मी आईला काय सांगू?"
"म्हणावं, तिनं प्यायला चहा आणि तू लाग आपल्या कामाला."
---------------------------------------------------------------------

सर्वांसाठी ब्रेकफास्ट तयार करून ठेवल्यावर मनूकाकू जेवणाचे डबे भरायच्या तयारीला लागलेल्या असतात. घरातले एक एकजण येऊन कांदेपोहे खाऊन पुढच्या कामाला लागत असतात. काकू प्रेमाला विचारतात, "चिन्नी खाऊन गेली का गं?"
"नाही अजून. मी बघते हं."
या वेळी प्रेमा आपण होऊन माडीवर जायला निघते तेंव्हा स्वाती तिला अडवते, "अगं कशाला उगीच चढ उतर करतेय्स? ती केंव्हाच तिच्या त्या कोमू की ढोमू तिच्या कडे गेलीय्."
"काही खाल्यापिल्ल्याशिवाय?"
"कुठल्यातरी हॉटेलात जायचं त्यांचं ठरलं असेल आधीपासून. ती कुठे आपल्याला सांगते?"
"असेल बाई, तिचा काही नेम सांगता येत नाही. महा नाटकी आणि पक्की आतल्या गाठीची!"
---------------------------------------------------------
प्रशांत टेबलावर नाश्ता करत बसलेला असतो.
कौमुदी धावत पळत आत येते. "चिन्ने, चिन्ने, काय करते आहेस?"
प्रेमा, "अगं, ती तर तुझ्याचकडे गेली आहे."
"नाही "
"मग त्या ऋषीकडे गेली असेल." पुढे येत स्वाती म्हणते.
"ते शक्य नाही."
स्वातीला बाजूला सारून कौमुदी धडाधडा जिना चढून वर जाते. तिला पाहून प्रशांत उठतो आणि तिच्या मागे जातो.
"प्रशांतदादा!!! लवकर ये!!!" कौमुदी किंचाळते. दोघे मिळून चिन्मयीला उचलून खाली आणतात. काय झाले आहे ते पहायला दोन्ही काका काकू वगैरे सगळे बाहेर येतात.
"आपल्याला एक सेकंदसुध्दा वाया घालवता येणार नाही. चल..." कौमुदी धापा टाकतच बोलते. वरुणकाकांना हातानेच बाजूला करत चिन्मयीला घेऊन दोघेही बाहेर जातात. दारात रिक्शा उभीच असते. तिच्यात बसून वेगाने चालले जातात.
"हे काय चाललंय?" वरुण ओरडतात
"एक नवीन नाटक सुरू झालेलं दिसतंय्." स्वाती सांगते, "अहो पाहिलंत ना, ही कौमुदी बाहेर रिक्शा थांबवून आत आली हेोती आणि प्रशांतसुध्दा तयार बसला होता. तीघांनी मिळून सगळं ठरवून केलं असणार.
"अगं, मघाशी तू तर म्हणालीस चिन्नी कोमूकडे गेली आहे." मनूकाकू विचारतात
"बहुधा तिनं नुसतं तसं दाखवलं असेल आणि हळूच पुन्हा वर जाऊन बसली असेल." स्वाती
"महा नाटकी कुठली!" प्रेमा
पण हे पहात असतांना किशोर अस्वस्थ झाले आहेत. म्हणाले, "नाही दादा, मला तसं नाही वाटत. मी चौकशी करून येतो."
"हो भावजी, मलासुध्दा चिन्नी ठीक वाटली नाही. मी येते तुमच्याबरोबर" मनूकाकू.
"कुठे निघालात तुम्ही आणि तिला कुठे शोधणार आहेस?" वरुण
"सध्या तरी आपल्याला सुभाषकडेच जावे लागेल. त्यालाच कदाचित माहीत असेल." किशोर
"त्याचं नाव सुध्दा नको काढूस माझ्यापुढे. मला तर त्याचं तोंड बघायची इच्छा नाही." वरुण
"अहो ते डॉक्टरकाकाही त्यांच्याच नाटकात भागीदार आहेत ना? सगळे मिळून कुठेतरी खिदळत बसले असतील आणि आपल्याला हसत असतील" स्वाती
"ठीक आहे. मग आपण त्यांना लगेच रेड हँडेड पकडू आणि त्यांचे दात पाडून त्यांच्या घशात घालू. चल मी येतो तुझ्याबरोबर." वरुण
"अहो बाबा, तुम्ही आताच नाही म्हणाला होतात ना?" स्वातीच्या वाराचा उलट परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे ती वैतागली आहे. पण आता उपयोग नाही. दोघे भाऊ बाहेर चालले जातात.
------------------
(क्रमशः)
-----------------------------------------------------------------
***** कल्याणम् (भाग २)

वरुण आणि किशोर सुभेदार हे दोघे भाऊ डॉक्टर सुभाष यांच्या दवाखान्यापर्यंत पोचले आहेत. दाराशीच कम्पौंडर गाडगीळ गोंधळलेल्या मुद्रेने उभे आहेत. या दोघांना पाहून म्हणतात, "अहो, डॉक्टरसाहेबांना एक फोन आला होता. त्यांनी नुसता रिसीव्हर कानाला लावला आणि तो खाली आपटून ते उठले, गाडी स्टार्ट केली आणि तुफान स्पीडने चालले गेले. मी आणि इथले पेशंट्स नुसते पहात राहिलो."
"कुठे गेले असतील? आणि कशाला?" किशोर
"माहीत नाही. पण बहुधा तुमच्या चिन्मयीसाठीच .."
"कुठल्या हॉटेलात?" वरुण
"अहो हॉटेल काय म्हणताहात् ? हॉस्पितळात .. ते त्या आयुष क्नीनिकमध्ये ते जातात"
"ते आणिक कुठे आहे?" किशोर
"तुम्हाला माहीत नाही? आता कमाल झाली. गॅलॅक्सी मॉलला वळसा घालून उजवीकडे वळलात की थोड्या अंतरावर डावीकडे एक रस्ता जातो. तिथं आहे ते."
"चला, आता तिथे जाऊन गाठूया त्यांना." वरुण
--------------------------------------------------------------------------------------

आयुष क्लीनिकमध्ये गेल्यावर तिथल्या रिसेप्शनिस्टला किशोर विचारतो, "चिन्मयी सुभेदार .. "
"आत आहेत"
"ती कशी आहे?" किशोर
"तिला कसली धाड भरली आहे? ती आत कुठे आहे? तिची ती मैत्रीण, भाऊ आणि तो डॉक्टरडा?" वरुण ओरडतो
"सगळे आहेत, पण तुम्ही कोण?"
"तिचे काका, हे लोक कुठे बसले आहेत?" वरुण अधिक जोरात ओरडतो
"हे पहा हे हॉस्पिटल आहे. इथे दंगा करायचा नाही. सिक्यूरिटी ... यांना इथून आधी बाहेर घेऊन जा."
"अहो पण, माझं ऐका .." किशोर तिला शांत करायचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करत रिसेप्शनिस्ट म्हणते
"सिक्यूरिटी, इन्स्प्क्टर शिंत्र्यांना सांगा की त्यांना काय विचारायचं आहे ते यांना विचारून घ्या म्हणावं."
-------------------------------------------------------------------

प्रचंड घाईघाईत असलेले डॉक्टर सुभाष तेवढ्यात आतून बाहेर येतात. किशोर त्यांना हाका मारतो, पण त्या न ऐकता ते गाडीत बसून चालले जातात.
"काय माजलाय् बघ हा!" वरुण
"त्याला धक्के मारून घराबाहेर ढकलून दिल्यावर तो कशाला आपल्याकडे येईल?"
थोड्या वेळाने पोलिस इन्स्पेक्टर शिंत्रे बाहेर येतात. हातातल्या कॅमे-यामधून तिथल्या सगळ्या हालचाली टिपून घेत असलेला एक वार्ताहर त्यांच्यासोबत येत आहे.
शिंत्रे, "बोला काका, चिन्मयीला काय केलंत?"
"आम्ही कुठं काय केलं? तिचीच नाटकं चालली आहेत" वरुण
"असं होय्? म्हणून तिची ही कंडीशन झालीय्?
"अहो ती कशी आहे?" काकुळतीला आलेला किशोर
"तशी जीवंत आहे, पण तिचं काही खरं नाही."
"म्हणजे?"
"तुम्हाला खरंच काही माहीत नाही की तुम्ही नाटक चालवलंय्? तुम्हाला हे महाग पडणार आहे हां."
"खरंच आम्हीही गोंधळात पडलो आहोत हो." किशोर
"असंच दिसतंय्, चला देशमाने, आपण घटनास्थळावर जाऊ. तिकडे लगेच पोचायला पाहिजे."
"म्हणजे?"
"सुभेदार वाडा, येताय्?"
---------------------------------------------------------------------

सुभेदारवाडा यायच्या थोडे अंतर आधीच इन्पे.शिंत्रे दोघा भावांना जीपमधून खाली उतरवतात आणि सांगतात, "आम्ही पुढे जाऊन चौकशीची थोडीशी सुरुवात करतो. तुम्हाला यायला पाच मिनिटं लागतील तोंवर आम्हाला तुमच्या घरच्यांना काही तरी विचारायचं आहे."
दोन कॉन्स्टेबल आणि वार्ताहराला घेऊन वाड्यात आल्याआल्या इन्स्पेक्टर शिंत्रे सांगतात, "एक महत्वाची चौकशी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत."
"कसली? काय झालं?" स्वाती
"ते आम्ही विचारणार आणि तुम्ही सांगायचंय्"
"आत्ता घरात कोणी पुरुष माणूस नाही. तुम्ही नंतर या हं."
"तुम्ही चांगल्या शिकल्यासवरल्या दिसता, नोकरी वगैरे करता ना? आम्हाला थोडी माहिती द्यायला तुम्हाला काय हरकत आहे?"
"कसली?"
"हेच. आज सकाळपासून घरात काय काय झालं?"
"काय व्हायचंय्? रोजच्यासारखं नेहमीचंच चाललंय्?"
"काहीसुध्दा वेगळं नाही?"
"काही नाही. उठलो, चहा प्यालो, आंघोळी केल्या वगैरे वगैरे.."
"तुमची पुरुष माणसं कुठं आहेत?"
"ती गेली कामावर"
"एक कॉलेजमधला पोरगा आहे ना, तो कुठं आहे?"
"बाहेर गेलाय्. त्यानं काही केलं का?"
"आणि ती छोकरी, चिन्मयी की कोण? ती कुठे आहे?"
"तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे."
"तिनं सकाळी काही वेगळं केलं का?"
"काही नाही. सकाळी उठली, तोंड धुतलंन्, चहा प्याली, हो ना गं प्रेमा?"
"बरं, तिला भेटायला इथे कोणी आलं होतं का?"
"नाही."
"अगं, असं काय करते आहेस स्वाती? ती कौमुदी नव्हती का आली?" मनूकाकू उद्गारल्या.
"हां, पण ती बहुतेक दरवाजातच चिन्मयीला भेटली असेल, म्हणून नाही सांगितलं." स्वाती
तोपर्यंत वरुण आणि किशोर वाड्यावर येऊन पोचतात. त्यांना आत येतांना पहात शिंत्रे उद्गारतात, "काय मजा आहे पहा. या घरातली माणसं वेगवेगळ्या दिशांना बाहेर जातात आणि नेमकी एकाच ठिकाणी जाऊन पोचतात."
"म्हणजे?" वरुण
"अहो या स्वातीताईंनी सांगितलं की तुम्ही रोजच्यासारखे आपापल्या कामाच्या ठिकाणांवर गेला होतात. मग ते सोडून तुम्ही दोघं त्या क्लिनिकपाशी काय करत होतात? आणि तुमची पोरंसुध्दा नेमकी तिथेच कशी गेली होती? सांगा."
"धडधडीत खोटं बोलतीय् ती. काय गं स्वाती? असं का सांगितलंस?" वरुण
"आता तुम्ही कुठं गेला होतात ते मला काय माहीत? तरी मी यांना सांगत होते की पुरुष माणसं घरात नाहीय्त. ते ऐकायला तयार नव्हते म्हणून मला जसं वाटलं तसं मी सांगितलं." स्वाती
"बरं, तुमची चिन्मयी तरी तिच्या मैत्रिणीबरोबर नेहमीसारखी हंसतखिदळत बाहेर पडली होती ना?" शिंत्रे
"नाही हो, कौमू आणि प्रशूंनी तिला उचलून बाहेर नेलं होतं. म्हणून तर आम्ही तिला शोधत तिथं आलो होतो." किशोर
"हे असलं सगळं रोज तुमच्या घरात घडतं कां हो? यांना त्यात काही वेगळं वाटलंसुध्दा नाही, म्हणून म्हणतो." शिंत्रे
"अगदी असंच नसेल, पण आमची चिन्मयी काही काही वेळा नाटकं करत असते, आपली गंमत म्हणून. ते सगळं तुम्हाला कुठं सांगायचं!" स्वाती
"तिचा काही नेम सांगता येत नाही. महा नाटकी आणि पक्की आतल्या गाठीची आहे ती!" प्रेमा
"प्रेमाताई तुम्ही बोललात ते बरं झालं. आता तुम्हाला एक दोन प्रश्न विचारायचेय्त. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आता या वेळी जर तुम्ही खरं खरं सांगितलं नाहीत तर तुम्ही एकट्या फासावर लटकणार आहात."
"काय?"
"हेच. आत्ता जर तुम्ही लपवाछपवी केलीत तर तुम्हाला फाशीची शिक्षा होऊ शकते." करड्या आवाजात शिंत्रे बोलतात.
प्रेमा हादरते. रडायला लागते. आईच्या कुशीत शिरते. मनूकाकू म्हणतात, "असं काय घाबरवताहात हो माझ्या पोरीला? किती लहान आहे ती?"
"अहो, तिनं काय केलंय?" वरुण
"चिन्मयीचा खून. निदान खुनाचा प्रयत्न तरी!" इन्स्पेक्टर शिंत्रे
-------
(क्रमशः)
-----------------------------------------------------
***** कल्याणम् (भाग ३)

"एवढ्याशा पोरीनं खुनाचा प्रयत्न केलाय् म्हणता, शुध्दीवर आहात ना?" वरुण ओरडतात.
"वरुणराव, आधी तुम्ही भानावर या. तुमच्याच घरातली एक मुलगी आज मृत्यूच्या दारात उभी आहे याचं गांभीर्य ओळखा." शिंत्रे
"म्हणून काय तुम्ही या चिमुरडीवर आळ घेणार?"
"छे, छे, उलट या प्रकरणात तिचा नाहक बळी जाण्याची शक्यता मला दिसते आहे म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे."
"म्हणजे?"
"जाऊ दे, या घरातला कर्ता पुरुष म्हणून मी तुम्हाला काही साधे प्रश्न विचारतो त्यांची उत्तरे घरातल्या कोणीही दिली तरी चालेल. आता नसतील द्यायची तर तुम्हालाच ती पोलिस कचेरीत येऊन द्यावी लागतील."
"विचारा."
"तुम्ही स्वतः चिन्मयीला चालतांना बोलतांना शेवटचं केंव्हा पाहिलं आहे?"
"काल रात्री जेवायच्या वेळी."
"त्यानंतर तिनं काय केलं?"
"थोड्या वेळानंतर झोपायला गेली."
"कुठे? मला ती जागा दाखवा."
वरुण इन्स्पेक्टरांना मुलांच्या राहण्याच्या खोलीत घेऊन जातात.
"इथल्या कुठल्या बिछान्यावर ती झोपली होती?"
"अलीकडे ती माडीवरच्या गॅलरीत झोपते, तिकडे ती झोपायला गेली." प्रेमाने माहिती पुरवली.
"मला ती जागा दाखवा."
सगळे जिना चढू लागतात. वरच्या पायरीवर आल्यावर शिंत्रे थांबून म्हणतात, "इथून सगळी गॅलरी दिसते आहे. आज तिथे काय घडलं याच्या खुणा इथे दिसत आहेत. इथे उभे राहून वाटले तर त्या पाहून घ्या. पण आता या पायरीच्या पलीकडे कोणीही जायचे नाही. हवालदार, इथे दोरी बांधून सील लावा आणि पहारा करा. आमची टीम येईल, फोटो काढेल, बोटांचे ठसे घेईल, पंचनामा करून इथल्या महत्वाच्या वस्तू ताब्यात घेईल. आता खाली जाऊन बोलू या."
"तुमच्या घरात रोज सकाळी सगळे लोक चहा पितात ना?"
"हो"
"आज सकाळी चिन्मयीनं चहा घेतला?"
शांतता
"तिनं घेतला असं मी मघाशी ऐकलं. तिनं तो कुठे बसून घेतला? म्हणजे ती खाली आली होती की चहा तिच्याकडे पाठवला गेला होता?"
शांतता
"ठीक आहे. त्या गॅलरीत एक चहाचा कप आहे. त्याचं निरीक्षण केल्यावर त्यातला चहा केंव्हा बनवला होता ते आमचे तज्ज्ञ सांगतील आणि तो कप तिथे कोणी नेला होता हे त्या कपावरच्या बोटांच्या ठशावरून समजेल आम्हाला."
"इतक्या भानगडी कशाला? चिन्मयीसाठी प्रेमाच चहा घेऊन वर गेली होती हे सगळ्यांना माहीत आहे. कोणी सांगत का नाही आहे? बहिणीला चहा नेऊन देणं हा गुन्हा आहे का?"
"मुळीच नाही. बरं, इतक्या प्रेमानं तुमची प्रेमा चहाचा कप घेऊन गॅलरीत गेली ...... आणि तिथं जाऊन तिनं काय केलं?" करड्या आवाजात शिंत्रेनी विचारलं.
"मी काही केलं नाही.... आधीच.... आपणच... " भीतीने थरकाप झालेली प्रेमा तोंडातल्या तोंडात पुटपुटत होती.
"आधीच काय? आपणच काय?" शिंत्रे विचारतात, पण स्वातीचे वटारलेले डोळे पाहून प्रेमा चुप्प बसते.
"ठीक आहे. प्रेमानं काही केलं नाही. पण चिन्मयीनं काय केलं? प्रेमानं तिथं काय पाहिलं?"
"आई, मी सगळं स्वातीला सांगितलं आहे गं"
"अहो आधीच चिन्मयी आपणहूनच उठली होती. तिनं प्रेमाशी छान गप्पा मारल्या. आज मैत्रिणींबरोबर बाहेर जाऊन ती खूप मज्जा करणार होती म्हणून ती छान मूडमध्ये होती. हो ना ग प्रेमा?"
स्वातीकडे अविश्वासाने पहात गोंधळलेली प्रेमा पुटपुटली, "अं .. हो... नाही.. माहीत नाही."
"नंतर चिन्मयी मैत्रिणीकडे गेली होती ना? इथं गॅलरीत तर बाथरून, बेसिन वगैरे काही दिसत नाही आहे. त्यामुळे बाहेर जायला तयार होण्यासाठी चिन्मयी खाली आली असेलच. तिला हात पाय तोंड धुतांना, केस विंचरतांना, कपडे बदलतांना कुणी तरी पाहिलं असेलच ना. किती लोकांनी पाहिलं?"
पुन्हा शांतता.
"स्वातीताईंनी तरी नक्की पाहिलं असेल ना? चिन्मयी बाहेर गेली आहे असं मघाशी त्याच म्हणाल्या होत्या."
"छेः, मला कुठे एवढा वेळ आहे? मी तर माझ्या खोलीत होते आणि ऑफिसला जायची तयारी करत होते. प्रेमानं मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं." स्वाती
"अं.. नाही... हो... माहीत नाही.. आई गं... " प्रेमाला आता रडू कोसळलं आहे
"या स्वातीताई किती सफाईनं या बोटावरची थुंकी त्या बोटावर करताहेत आणि प्रेमाला यात अडकवत आहेत पाहिलंत?" शिंत्रे उद्गारले. "या तर काहीही करून कदाचित निसटून जातील पण प्रेमाताईंचं कसं होईल? काही हरकत नाही. उद्या पोलिस स्टेशनमध्ये जबानी द्यायची वेळ येईल तेंव्हा त्यांच्यामागे असलेला हा रिमोट कंट्रोल नसेल आणि अशा नवनव्या थापा त्यांना सुचणार नाहीत. तेंव्हा आपसूक त्या खरं सांगतील आणि निर्दोष असल्या तर त्याचा त्यांना फायदाच मिळेल."
"म्हणजे?" वरुण
"चिन्मयीच्या अंथरुणावरचे हे रक्ताचे डाग आहेत ना?" शिंत्रे
"रक्त कसलं, साधं नेल पॉलिश असेल ते." प्रेमा
"ते काय आहे हे आमचे सायंटिस्ट सांगतील हं. ते कुणाचं रक्त आहे आणि त्या व्यक्तीच्या शरीरातून ते केंव्हा बाहेर निघालं ते सगळं समजेल. समजा ते रक्त कपातल्या चहापेक्षा जुनं निघालं, म्हणजेच प्रेमाताई चहा घेऊन गॅलरीत गेल्या त्याच्या आधीच चिन्मयीनं रक्त ओकलं होतं असं त्यातून सिध्द झालं तर त्यासाठी आम्ही प्रेमाताईंना जबाबदार धरणार नाही."
"नक्की तसंच झालं असणार. माझी खात्री आहे." वरुण
"पण मग अशा रक्तबंबाळ अवस्थेत चिन्मयीचा मूड चांगला कसा होता ते मात्र त्यांना सांगावं लागेल."
"आई गं... मी काय करू?" प्रेमा विव्हळते.
"सगळं ठीक होईल हं बाळ. तू शांत हो बरं." मनूकाकू प्रेमाला समजावतात. पण त्यासुध्दा भेदरलेल्या आहेत.
"तुला स्वतः थापा रचून मारायला जमणार नाही. त्यापेक्षा सगळं खरं खरं सांगून टाकलेलं बरं असं तुलाच वाटेल. तर वरुणराव, या जागी काय काय घडलं असणार याचा अंदाज मला आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास जवळ जवळ संपायला आला आहे. आता पुरावे गोळा करणं आणि जबान्या घेणं शिल्लक उरलं आहे. ते काम आम्ही आमच्या पध्दतीनं घेऊ."
"वरचा जिना तर तुम्ही सील केला आहेच. आता आणखी काय राहिलं आहे?"
"एक अगदी लहानसा पण महत्वाचा पुरावा बाहेर आहे. स्वातीताई, जरा तुमचा मोबाईल फोन मला पहायला देता का?"
------------
(क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------------------

***** कल्याणम् (भाग ४)

"आल्यापासून तुम्ही हात धुवून माझ्या मागे लागला आहात. आता मी काही देणारही नाही आणि सांगणारही नाही." स्वाती
"तुमच्या सेलफोनवरून कोणकोणत्या नंबरांना फोन लागले त्याची यादी मला मिळणारच आहे, पण त्यांची नावे शोधून काढण्यात उगाच वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्ही आपणहून आपला मोबाइल फोन दिला तर ठीक आहे, नाही तर आम्हाला तुमची झडती घेऊन तो जप्त करावा लागेल."
"हा घ्या. यात तुम्हाला काहीही मिळणार नाही आहे." स्वाती फणका-याने म्हणाली. शिंत्र्यांनी त्यातला एक नंबर शोधून फोन लावला आणि स्पीकरफोन सुरू केला.
"हॅलो, अप्पासाहेब सुभेदार का?"
"हो. आपण कोण?"
"मी इन्स्पेक्टर शिंत्रे"
"अरे वा, कुठून बोलताय्?"
"तुमच्याच वाड्यातून. तुम्हाला भेटायला आलो होतो, पण भेट झाली नाही म्हणून फोनवरच बोलावं म्हंटलं."
"छान. इथे आल्यापासून हे यंत्र मी आपल्यासोबत बाळगतो आहे, पण पहिल्यांदाच वाजलं बघा."
"तुम्ही कसे आहात?"
"मस्त. तिकडे सगळं ठीक आहे ना?"
"बाकी ठीक आहे, पण तुमच्या चिन्मयीकडे मात्र बघवत नाही हो. घरातल्यांचा तिच्यावरचा राग अजून गेला नाही. त्यांनी तिला वाळीतच टाकलंय्."
"तरी माझ्याबरोबर चल असं मी तिला म्हंटलं होतं. तिनं नाही ऐकलं. म्हणाली सगळं ठीक होईल."
"यावेळी तिचा अंदाज चुकला असं दिसतंय्. तुम्ही येऊन तिला आधार दिलात तर बरं होईल."
"येईन ना. आता लगेच निघालो तर संध्याकाळपर्यंत तिकडे पोचेनसुध्दा."
"सांभाळून या हं. ती तशी सुखरूप आहे. तिची काळजी करू नका. आणखी एक गोष्ट. तिच्याबद्दल तुम्हाला कुणीही काहीही वेडंवाकडं सांगितलं तर त्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. स्वातीताईंनी सांगितलं तर मुळीसुध्दा नाही. एवढं पक्कं लक्षात ठेवा. संध्याकाळी भेटू आपण."
एवढे सांगून शिंत्र्यांनी फोन बंद केला. घरातली मंडळी दिग्मूढ होऊन त्यांच्याकडे पहात होती. वरुणने विचारले, "आत्ता तुम्ही कुणाशी बोलत होतात?"
"तीर्थरूपांचा आवाज नाही ओळखलात? आणि काय हो, इतक्या दिवसात घरातल्या कुणालाच त्यांची आठवण एकदाही झाली नाही का?"
"अप्पांच्याकडे मोबाइल फोन आहे हेच घरात कुणालाही माहीत नाही हो."
"पण स्वातीताईंना होतं. त्यांच्याशिवाय आणखी एकीला होतं. म्हणून तर ते मला समजलं."
"ते कसं शक्य आहे?" स्वाती आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच पुटपुटली
"ती बेशुध्द आहे म्हणून का? अहो चिन्मयीनं हे कुणालाही कळू दिलं नव्हतंच, पण बेशुध्दावस्थेत ती जे बडबडली त्यातून तुमचं हे गुपित बाहेर पडलं. पण वरुणराव, मला एक सांगा. ही स्वाती अप्पांची खूप लाडकी आहे कां हो आणि चिन्मयी तिची अगदी खास जवळची आहे का? मला तर तसं काही वाटत नाही आहे म्हणून आपलं विचारलं. या केसशी त्याचा काही संबंध नाही."
यावर कुणाच्याही तोंडातून शब्दही फुटला नाही.
"याला एक गोष्ट सांगायची, त्याला नाही सांगायची असली लपवाछपवी तुम्ही नेहमीच खेळत असता का हो?" शिंत्रे
"तुम्हाला काय म्हणायचंय्?"
"हेच बघा, चिन्मयीला कँसर झाला आहे असं जेंव्हा तुम्ही सगळे समजत होता तेंव्हा ही गोष्ट तुम्ही अप्पासाहेबांना सांगितली होतीत का?"
"नाही. त्यांना धक्का बसू नये म्हणून सांगितली नव्हती."
"चिन्मयीनंसुध्दा सांगितली नसेल."
"ती तर नाहीच सांगणार. सर्वांपेक्षा तिला अप्पांची जास्त काळजी वाटायची."
"मग तिचा कँसर खोटा आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं? आणि तुम्ही त्या गोछ्टीवर विश्वास कसा ठेवलात?"
"स्वातीनं ते अगदी पुराव्यासकट सिध्द करून दाखवलं ना. शंकेला तिनं जागाच ठेवली नव्हती. चिन्मयीही काही बोलली नाही. याचा अर्थ तिनंही ते मान्य केलं. खुद्द अप्पांनी तिला दुजोरा दिला. आणखी काय पाहिजे?"
"समजा की ते पुरावे खोटे आहेत आणि कँसर खरा आहे असं चिन्मयीनं सांगितलं असतं तर ती गोष्ट अप्पासाहेबांना कळली असती आणि त्यांना धक्का बसला असता. तसं व्हायला नको म्हणून तिनं आपले ओठ घट्ट मिटून घेतले असतील."
"मग ती मूर्ख आहे."
"आहेच. अप्पांना त्रास होऊ नये म्हणून स्वतः इतकं सोसणं हा जगाच्या दृष्टीनं निव्वळ मूर्खपणाच आहे. पण असे वेडे लोक असतात. ती त्यातलीच आहे आणि हे तुम्हाला ठाउक आहे."
"पण अप्पा परगावाला गेल्यानंतर तरी तिनं सांगायचं होतं. ते का केलं नाही?"
"त्याचं रहस्य या मोबाइलमध्ये दडलेलं आहे."
"काय?"
"चिन्मयीच्या समोर स्वातीनं अप्पांना एक मोबाईल फोन दिला आणि चिन्मयीला वेगळे बोलावून अशी धमकी दिली की जर काही तिनं तिच्या कँसरबद्दल घरच्यांना सांगितलं, तर लगेच ती बातमी स्वाती अप्पांच्या कानावर घालेल आणि ते एकटे परगावी असतांना त्यांना धक्का बसून त्यांचं काय होईल त्याचा विचार चिन्मयीनं करावा. गेले चार दिवस ती रोज अशा धमक्या देत आली आहे आणि चिन्मयीला गप्प बसायला भाग पाडत आली आहे. स्वाती आणि प्रेमा या दोघी मिळून गेले चार दिवस तिला सतत छळत आले आहेत."
"पण मग ती माझ्याकडे का नाही आली? मला विश्वासात घेऊन तिनं सगळं सांगायचं होतं."
"नीट आठवून पहा. ती तुम्हा दोघांकडे आली होती. तिला स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे मला समजून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा अशा कळकळीच्या विनवण्या ती करत होती. तुम्ही त्यावर काय केलंत? तिला सरळ धुडकावून लावलंत ना?"
तेवढ्यात देशमान्यांचे सहाय्यक पुढे येऊन सांगतात, "आता बातम्यांची वेळ झाली आहे. आजचा बाइट सांगताय् ना"
कॅमेरासमोर उभे राहून देशमाने बोलू लागतात, "दोनशे वर्षांपूर्वी नारायणराव पेशव्यांना मारायला गारदी आले होते तेंव्हा त्यांनी आपल्या राघोबाकाकांना घट्ट मिठी मारली आणि काका मला वाचवा असा धावा केला. पण राघोबाने त्यांना गारद्यांच्या हवाली केले. या घटनेची आजच्या कालानुरूप पुनरावृत्ती या सुभेदारवाड्यात झाली आहे. चिन्मयी नांवाची एक अत्यंत सालस आणि सद्गुणी पण अनाथ मुलगी इथे राहते. तिचा मत्सर करणा-या घरातल्या दोघींनी एक कपटकारस्थान केलं. भयंकर रोगाने शारीरिक रीत्या जर्जर झालेल्या चिन्मयीविरुध्द कुभांड रचून बनावट पुराव्यांच्या आधाराने तिला खोटारडी, विश्वासघातकी, फसवणूक करणारी वगैरे ठरवलं. बिचा-या किमयाने आपल्या दोन काकांकडे आशेने पाहिले, पण त्या दोघांनीही तिला या कैदाशिणींच्या हवाली केलं. त्यांनी चार दिवस तिचा अनन्वित मानसिक छळ करून तिची जगण्याची इच्छाच मारून टाकायचा प्रयत्न केला. तरीही ती जीवंत राहिली आहे हे त्यांना सहन न झाल्यामुळे आज त्यांनी तिला बेशुध्दावस्थेत अडगळीमध्ये फेकून दिलं आणि औषधपाण्यावाचून तिनं तडफडून मरावं अशी व्यवस्था केली. चिन्मयीचं पुढे काय झालं हे पुढच्या बातमीपत्रात पहा."
--------------
(क्रमशः)
-----------------------------------------------------------------------------------
***** कल्याणम् (भाग ५)

"अहो, अहो, अहो, काय भयंकर बोलताय्? अशानं आम्हाला बाहेर कुणाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आमची एवढी बदनामी करून तुम्हाला काय मिळणार आहे? मी तुम्हाला सोडणार नाही. कोर्टात खेचेन..........." संतापाने बेभान झालेले वरुण बेंबीच्या देठापासून किंचाळत होते. त्यांच्याकडे लक्ष न देतात देशमाने आणि त्यांचे सहकारी चालले गेले.
काही क्षणानंतर शिंत्रे म्हणाले, "शांत व्हा. ते लोक इथून गेलेले आहेत. सनसनाटी बातम्या देणं हाच त्यांचा व्यवसाय आहे. कसलीही घटना घडल्याचा त्यांना सुगावा लागला की ते तिथे जाऊन पोचतात आणि तिखटमीठ लावून त्या घटनेचा वृत्तांत देत असतात. हे त्यांचे रोजच चालले असते. पहाणारे पहातील आणि विसरून जातील. तुम्ही अब्रूनुकसानीचा दावा लावलात तर मात्र तो रोज लोकांसमोर येत राहील आणि मुख्य म्हणजे तुम्ही तो खटला हराल. कारण इथे जे घडले तेच त्यांनी नाटकी पध्दतीने सांगितले आहे आणि ते तसे सिध्द करू शकतील. तुम्हाला वाटलंच तर पुढच्या बुलेटिनला तुम्हीच त्यांना मुलाखत द्या आणि तुम्ही किती कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ आहात, चिन्मयीवर किती माया करता, तिच्यासाठी तुम्ही काय काय केलं आहे ते सगळं सविस्तर सांगा."
"नको."
"वाटलंच तर या स्वाती आणि प्रेमाताईंची मुलाखत घेऊ देत. छळणूक करण्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची प्रात्यक्षिके त्या दाखवतील. खोटा पुरावा रचणे, खोटा आळ घालणे, सर्वांपासून तोडणे, घालून पाडून बोलणे, केस कापायला लावणे, गॅलरीत झोपायला लावणे वगैरे गोष्टी समोर आल्या आहेत. आणखी काय काय केलं असेल ते त्यांनाच ठाऊक." शिंत्रे
"म्हणजे हे सगळं यांच्यामुळे झालंय्?" मनूकाकू
"नाही, नाही, नाही. ते चिन्नूनं स्वतःहून केलं आहे. तिनंच तसं सांगितलं आहे ना?" स्वाती
"आधी तिला ऑर्डर द्यायची, वाटेल ते करायला भाग पाडायचं आणि वर मी काही सांगितलं नाही, तू स्वतःच सगळं करते आहेस असंच सगळ्यांना सांग अशी ताकीद द्यायची. नाही तर मोबाईल आहे आणि मी आहे अशी तंबी द्यायची. छान तंत्र आहे हो तुमचं. कपाळाला पिस्तुल टेकवून ब्लॅकमेल करण्यासारखंच आहे हे."
"हे सगळं खोटं आहे. मी असलं काही केलेलं नाही."
"तुम्ही असंच म्हणणार, तुम्ही कबूल करणार नाही आणि ती मूर्ख मुलगी तक्रार करणार नाही. ज्यानं त्यानं काय ते समजून घ्यावं. हा मोबाईल म्हणजे पुरावा नाही, हे एक भयानक शस्त्र आहे. आधी त्याच्या जोरावर चिन्मयीला ब्लॅकमेल करायचं आणि तिचं बरंवाईट झालं की लगेच फोन करून अप्पासाहेबांना तिकडच्या तिकडे उडवायचं, म्हणजे दोन्ही अडथळे दूर होणार असा प्लॅन होता ना? शिवाय हे अगदी सुरक्षित शस्त्र आहे. त्यानं कसली जखम होत नाही की मागे खूण ठेवत नाही, कुणाला याचा थांगपत्ताही लागायचा नाही. करून सवरून नामानिराळं रहायचं आणि वर गळा फाडून रडायला मोकळ्या. झकास योजना होती हं."
तेवढ्यात क्षमा, पुनीत आणि त्याची आई प्रवेश करतात. पुनीतच्या आईंना उद्देशून इन्स्पेक्टर शिंत्रे बोलतात, "या, या. तुमचीच आठवण आली होती. निष्पापांचा छळवाद करण्यातल्या तुम्ही तज्ज्ञ. टॉर्चर चेंबरमध्ये तुमचं लेक्चर ठेवलं पाहिजे. बाकी चिन्मयीला धमकी देऊन आपल्या कह्यात ठेवायचं तुमचं टेक्निक स्वातीताईंनी छान आत्मसात केलं आहे आणि त्याचा उपयोग केला आहे. तुम्हाला ते माहीत असेलच म्हणा."
"हे काय बोलताहेत?" आई म्हणाल्या, "विशाखाताई काय झालं हो हे?"
"थांबा, इतक्यात गळा काढू नका. अजून काहीही झालेलं नाही. तुम्हाला हवी असलेली बातमी यायची आहे. तुमच्या मनातून तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना? उगाच हे रडायचं सोंग कशाला आणताय्?"
"बोला, सगळेजण मला हवं तेवढं बोलून घ्या. मी इतकी वाईटच वागत आले आहे. पण अगदी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी मनानं दुष्ट नाही हो. या जगात मला वाईट अनुभव आल्यामुळं तसं वागावं लागलं होतं."
"अनेक वेळा परिस्थिती माणसाला खोटं बोलायला किंवा मूग गिळून बसायला भाग पाडते, पण दुस-याचा छळ कर असं कधी म्हणत नाही. आणि चिन्मयीचा इतका छळ करून तुम्हाला काय मिळालं हो? तिला त्रास द्यायची कुणी तुम्हाला सुपारी दिली होती का?"
"नाही. ते चुकलंच माझं. अगदी अक्षम्य अपराध घडला हे मला मान्य आहे. पण जरा माझं ऐकून घ्या. पुनीतचं लग्न झाल्यावर ही क्षमा आमच्या घरी आली. माझ्याशी ती अतीशय चांगली वागत होती, मलाही तिच्याबद्द्ल माया वाटायला लागली होती. पण तुमची स्वाती सतत माझे कान भरत होती. क्षमाचं सध्याचं वागणं नाटकी आहे. ती मला पुनीतपासून वेगळं पाडणार आहे, घरातून बाहेर काढणार आहे. त्यासाठी चिन्मयी प्लॅन बनवते आहे वगैरे विष तिनं माझ्या मनात भरलं आणि चिन्मयीनं काही करायच्या आधीच आपण तिच्यावर हल्ला केला पाहिजे असं माझ्या मनावर बिंबवलं म्हणून घाबरून मी त्या वेळी तसं वागले. नंतर मलाच हे खात राहिलं म्हणून मी मनःशांतीसाठी तीर्थयात्राही केली होती. परत आल्यावर पुन्हा चिन्मयीच्या खोटेपणाबद्दल ऐकलं आणि मी तिला नाही नाही ते बोलले. तिनं बिचारीनं मला एका शब्दानं उलट उत्तर दिलं नाही की तक्रार केली नाही. फक्त खाली मान घालून डोळे पुसत राहिली. आज सत्य बाहेर आल्यावर मला मेल्याहून मेल्यासारखं वाटतं आहे हो. मला चिन्मयीची मनापासून क्षमा मागायची आहे. तशी संधी एक मिळेल का हो?"
"तिला बरं वाटावं अशी आता सगळेचजण देवाकडे प्रार्थना करा. प्रेमाताईंना आता फक्त चिन्मयीच सोडवू शकेल. ती वाचली आणि तिनं प्रेमाच्या बाजूनं साक्ष दिली तरच ती सुटू शकेल. तेंव्हा मनात इच्छा नसली तरी आज तरी तिनंही चिन्मयीसाठी प्रार्थना करावी." शिंत्रे
तेवढ्याक राकेश आणि प्रशांत हे दोघे भाऊ येतात.
"राकेश तू ..?"
"हॉस्पिटलमध्ये गेल्यागेल्या मी दादाला फोन करून बोलावून घेतलं." प्रशांतनं सांगितलं
"अरे चिन्नू कशी आहे?"
"ती ठीक आहे."
"मी सांगितलं होतं ना की हे सगळं एक मोठं नाटक आहे." स्वाती पचकली. मात्र या वेळी प्रेमाचा प्रतिध्वनी आला नाही.
राकेश तिच्या अंगावर धावून जातांना ओरडतो, "मागच्या वेळी तू हे बोललीस तेंव्हा मी फक्त एकच थप्पड मारली होती ते चुकलंच माझं. तेंव्हाच तुझे तोंड कायमचं बंद करायला हवं होतें. या घरातच काय, या जगातसुध्दा रहायची लायकी नाही तुझी......"
बाकीच्या लोकांनी राकेशला पकडून मागे खेचलं. वरुण म्हणाले, "अरे शांत हो, सोड तिला. आधी चिन्नूबद्दल सांगा."
"अरे, कधीचा आमचा जीव इथे टांगणीला लागलाय् " मनूकाकू
प्रशांतने सांगायला सुरुवात केली, "आम्ही हॉस्पिटलात पोचल्याबरोबर लगेच तिला ऑक्सीजन आणि सलाईन लावलं, रक्त दिलं. माझे कार्ड या वेळी कामाला आलं. तिची नाडी आणि रक्तदाब दोन्ही अगदी कमी झाले होते. त्यात हळू हळू सुधारणा होत गेली. शुध्दीवर यायच्या आधी ती ओठातल्या ओठात काही तरी पुटपुटत होती. अप्पा, स्वाती, मोबाइल, वाचवा असे तुटक तुटक शब्द निघत होते. आम्हाला त्याचा अर्थ कळत नव्हता. कौमुदीला थोडी कल्पना होती. ती आणि हे इन्स्पेक्टर या दोघांनी मिळून त्याचा अर्थ लावला. चिन्नू काही शुध्दीवर येत नव्हती हे पाहून इन्स्पेक्टरसाहेब बाहेर गेले. त्यांनी इथे येऊन काय केलं .."
"ते जाऊ दे रे. चिन्नूबद्दल सांग."
"तिचं बीपी आणि पल्सरेट वरखाली होत होतं. डॉक्टर म्हणाले की आत्ता फिफ्टी फिफ्टी चान्स आहे. अजून थोडा उशीर झाला असता तर सरळं हाताबाहेर गेलं असतं. आम्ही वाट पहात बसण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. हळू हळू सुधारणा होत गेली. चिन्नूनं किंचित हालचाल केली, डोळे अर्धवट उघडून पुन्हा मिटले, त्यात पुसटशी ओळख दिसली. डॉक्टरांनी तिला सेडेटिव्ह देऊन झोपवून ठेवलं आहे. ते म्हणाले आता धोका टळला आहे. रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वासोछ्वास या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या आहेत. तुम्ही घरी जाऊन सर्वांना सांगा. अजून दोन तीन तासांनी ती जागी होईल. उद्यापर्यंत बहुधा ठीक व्हायला पाहिजे."
"आणि तिचा कँसर?"
"दुर्दैवानं तो खरा आहे. या स्वाती आणि प्रेमानं तिला ढोंगी, खोटारडी ठरवलं आणि आपण सगळे त्याला बळी पडलो." राकेश उद्वेगाने बोलला.
"दादा. तुझ्यासारखीच स्वातीच्या कांगाव्यानं मी सुध्दा फसले रे. त्यात माझी काही चूक नाही." प्रेमा
"तिच्यावर तू जळत नव्हतीस? तिचा सारखा राग राग करत नव्हतीस? ती खोटारडी आहे असं सगळ्यात मोठ्यानं तूच ओरडत होतीस ना? आणि ते जगभर सांगत फिरलीस. आज सकाळी तिला ज्या अवस्थेत तू पाहिलंस त्यानं तुला काही वाटलं नाही? अगं काकांना, बाबांना, मला, कोणाला तरी सांगायचं होतंस. तेंव्हा तुझी अक्कल कुठं गेली होती? तुला बहीण म्हणायची लाज वाटते मला." राकेश
"तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होतो की स्वातीच्या नादाला लागू नकोस, माझं नाही ऐकलंस. स्वातीची पपेट व्हायलाच तुला आवडायचं. त्याला कोण काय करणार?" प्रशांत
"मंडळी, आजचा धोका टळला असला तरी अप्पासाहेब आणि चिन्मयी दोघेही तुमचे काही दिवसांचे सोबती आहेत हे लक्षात घेऊन वागा."
"आम्ही नेमके तसंच वागत होतो हो. मन घट्ट करून त्यांच्यासाठी आम्ही गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला होता. त्याची चांगली आठवण चिन्नूच्या स्मरणात रहावी असा आमचा प्रयत्न होता." वरुण
"पण स्वातीला ते पहावलं नाही. त्याच्यावर बोळा फिरेल इतकं दुःख तिनं चिन्नीला दिलं" प्रशांत
"आणि आज तिला संपवून टाकायची प्रेमाताईंना घाई झाली." शिंत्रे
"नाही हो. माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. चिन्नूला पाहून मीसुध्दा जाम घाबरले होते. माडीवरून धडधड करून मी खाली आले आणि स्वातीला सांगितलं. ती म्हणाली हे नवं नाटक असेल, आपण तिला भाव द्यायचा नाही. मला ते खरं वाटलं. उगाच मी तिचं ऐकलं" प्रेमा
"आणि आता अडचणीत आला आहात. असंगाशी साथ आणि प्राणाशी गाठ अशी म्हणच आहे."
-------
(क्रमशः)


---------------------------------------------------------------------------------------
***** कल्याणम्  (भाग ६)

"अरे राकेश आणि प्रशांत, इथे आणखी एक घोटाळा होऊन बसला आहे. या इन्स्पेक्टरांच्या बरोबर एक गृहस्थ कॅमेरा घेऊन आले होते. तो त्यांचाच माणूस असेल असं मला वाटलं होतं. पण तो एक रिपोर्टर निघाला. त्यानं ही बातमी त्याच्या चॅनलवरून जगजाहीर केली आहे." वरुण खिन्नपणे म्हणाले
"आम्हा दोघांची तुलना त्यानं राघोबा पेशव्यांशी केली. आमच्या अब्रूचे पार धिंडवडे निघाले रे." किशोरने भर घातली.
"काही काळजी करू नका, तसं काही झालेलं नाही." शिंत्र्यांनी खुलासा केला.
"मग ते बातमीपत्र?"
"त्याचं प्रसारण झालेलं नाही. देशमाने माझ्यामागे यायला निघाला तेंव्हाच मी त्याला बजावलं होतं की यातलं काहीही टीव्ही चॅनलवर दाखवण्यापूर्वी माझी परवानगी घे, नाहीतर गुन्ह्याच्या तपासात अडथळा आणण्याचा आरोप तुझ्यावर लावीन."
"तुमचे खरंच खूप उपकार आहेत."
"मी हे तुमच्यासाठी केलं असं समजू नका. टीव्हीवर आलेली बातमी अप्पासाहेबांनी पाहिली किंवा कुणीतरी पाहून त्यांना सांगितली तर ज्यासाठी चिन्मयीनं आपला प्राण धोक्यात घातला ती तिची धडपड व्यर्थ ठरेल. त्यामुळे अप्पासाहेब सुखरूपपणे इथे येऊन पोचेपर्यंत मी त्याला परवानगी देणार नाही. चिन्मयी बरी होऊन गेली तर तिलाही हे आवडणार नाही. शिवाय या बातमीमधली हवा निघून जाईल आणि तोपर्यंत देशमानेंना दुसरी एकादी सनसनाटी बातमी मिळेल. या दोन चांगल्या माणसामुळे आज तुमची अब्रू वाचणार आहे. आता माझं काम झालं आहे"
असे म्हणून हवालदाराला मागे ठेऊन इन्स्पेक्टर शिंत्रे निघून जातात.


श्रीयुत व श्रीमती दाभोळकर आणि त्यांचा मुलगा ऋषभ या तीन दिशांना तोंडे असलेल्या तीघांना एकत्र आलेले पाहून सारेच आश्चर्यचकित होतात. किशोर उद्वेगाने म्हणतात, "ब्रह्मराक्षस आणि आग्या वेताळ एकत्र आला आहात? चला, आम्हाला खाऊन टाका, नाहीतर हा वाडा पाडून टाका, आम्हाला गाडून टाका. आधीच आम्ही गळ्यापर्यंत चिखलात रुतलो आहोत. आता आणखी काय फरक पडणार आहे?"
"अहो, मी आज वाईट हेतूने इथे आलेलो नाही." दाभोळकर सांगायला लागतात. "रग्गड पैसा कमावूनसुध्दा अतीलोभाने मी आंधळा झालो होतो आणि मला संपत्तीचा माज चढला होता. त्यामुळे आतापर्यंत मी खूप वाईट वागलो. वाईट वागून आणखी जितके काही मिळवण्यासारखे होते ते मिळवत राहिलो. काही गोष्टी मिळवता येत नाहीत हे ही समजलं, तसंच काही गोष्टी गमवाव्या लागल्या. आता थोडं चांगलं वागून त्या परत मिळवायचा प्रयत्न करायचं ठरवलं आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी फक्त दिलगिरीच व्यक्त करू शकतो, माफी मागतो, पण तुमचं जितकं नुकसान झालं ते आधी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वात आधी त्या खंडागळ्याकडून तुमच्या प्रेसचा संपूर्ण ताबा तुम्हाला मिळवून देईन. त्याचा विस्तार वाढवायला मदत करेन. तुमची जुनी गाडी कदाचित परत मिळणार नाही, पण नवी कोरी गाडी तुमच्या दारापाशी उभी करेन. त्या विकासनं जे पैसे तुम्हाला दिले आहेत त्याची दुप्पट परतफेड त्याला करेन."
"तो मानेल का?"
"चिन्मयीला कँसर झाल्याचं कळल्यापासून तिच्याबद्दल त्याला वाटणारी ओढ डळमळली आहे असं दिसतंय्. आजच्या दिवसात तो काही हॉस्पिटलकडे फिरकला नाही असं संजलं. आपण उगीच तिच्यावर इतका वेळ खर्च केला असं बहुधा आता त्याला वाटायला लागलंय्. चिन्मयीला त्याच्यात इंटरेस्ट नाही हे तर त्याला पूर्वीपासून माहीत आहेच. त्यामुळे बाबांची ही ऑफर तो सोडेल असं मला वाटत नाही." ऋषभने तर्क केला.
"ऋषीला सोडून ती विकासकडे कधीच गेली नसती." ऋषीच्या आई, सविताताई उद्गारल्या. " खरं तर गणेशोत्सवाच्या वेळी मनात एक बेत रचून मी तुमच्याकडे आले होते."
"पण त्या दिवशी काय झालं? देवाचा प्रसादसुध्दा न घेता तुम्ही तडकाफडकी चालला गेलात." मनूकाकू
"आधी चिन्मयीला ऋषीबद्दल विचारायचं, ती हो म्हणणारच अशी माझी खात्री होती, तिचा होकार घेतला की घरातल्या मोठ्या माणसांशी चर्चा करायची असं मी मनात योजलं होतं, पण चिन्मयीनं होकार दिला नाही आणि त्याचं कारणही सांगितलं नाही. त्यामुळे मी थोडी खट्टू झालेले होते. त्यातून जेंव्हा ती प्रसाद आणायला आत गेली तेवढ्यात स्वाती बाहेर आली आणि तिनं चिन्मयीबद्दल मला भलतं सलतं सांगितलं हो."
"काय सांगितलं?"
"की तिच्या मनात ऋषीबद्दल काही नाजुक भावना नाहीत. अशा अनेक मुलांना ती निर्दयपणे खेळवते आहे. तिच्या दृष्टीनं ही सगळी फक्त चार घटकांची मौजमजाच आहे. वगैरे वगैरे. त्यामुळे मला इथे क्षणभरसुध्दा थांबावं असं वाटलं नाही."
"खरं तर आपण जास्त काळ जगणार नाही असं चिन्मयीला वाटायला लागलं होतं. तिनं माझ्याशी जवळीक वाढवली तर नंतर मला त्याचा खूप त्रास होईल, कदाचित मी तो सहन करू शकणार नाही असं गृहीत धरून ती अलीकडे माझ्यापासून दूर दूर रहायला लागली होती. त्यामुळे तिनं आईला होकार दिला नाही. पण आमचा गैरसमज झाला." ऋषभनं भर घातली. "शिवाय तिनं ती पैजेची थाप तिच्या मैत्रिणीकडून मला ऐकवली. तिच्या अपेक्षेप्रमाणे मी चिडलो, संतापलो, पण तिचा द्वेष करू शकलो नाही."
"का?"
"मी लहानपणापासून माझ्या आईपासून दुरावलो होतो. तिचं तोंडदेखील पहायला तयार नव्हतो. चिन्मयीनं प्रचंड खटपट करून आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. यातही बिब्बा घालायचा प्रयत्न प्रेमानं केला होता, मी स्वतः साथ देत नव्हतो. त्यामुळे चिन्मयीला खूप त्रास झाला होता. माझ्यासाठी तिनं तो सगळा सहन केला. फक्त एक पैज जिंकण्यासाठी कोणीही हे करणार नाही. आधी मी ऐदी होतो. व्यवसाय करायला निघालो तो सुध्दा आयत्या मिळालेल्या आजोबांच्या पैशावर. ते जमलं नाही तेंव्हा मी जाम वैतागलो होतो. चिन्मयीनं मला धीर दिला, माझी साथ केली आणि मला आपल्या पायावर उभं केलं. हे सारं मी विसरू शकत नव्हतो, पण चिन्मयीनं असं अचानक घूम जाव का केलं तेही समजत नसल्यामुळे गोंधळलो होतो. त्यात हा विकास आमच्यातले गैरसमज वाढवायचे प्रयत्न करत होता आणि स्वाती, प्रेमा आगीत तेल ओतायचं काम करत होत्या. या सगळ्यामुळे मी अस्वस्थ होतो. भविष्यकाळात मला कमी दुःख व्हावं म्हणून ती करत असलेल्या प्रयत्नांमुळे मी आज किती भरकटत चाललो आहे हे समजल्यावर चिन्मयीला आपली चूक कळली होती, पण माझ्याकडे परत येण्याचा तिचा मार्ग बंद झाल्यामुळे तिचीही घुसमट होत होती."
"हे सगळं तुला कसं कळलं?"
"चिन्मयीची आजची अवस्था पाहून कौमुदीला रहावलं गेलं नाही. हॉस्पिटलमधून ती थेट आमच्याकडे आली आणि चिन्मयीनं जे जे माझ्यापासून लपवून ठेवलं होतं ते सगळं तिनं आम्हाला खुलासेवार सांगितलं. आता आमच्या कुणाच्याही मनात तिच्याबद्दल आढी उरलेली नाही. उद्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवण्यात शहाणपणा नाही ही गोष्ट आता चिन्मयीलाही पटेल अशी माझी खात्री आहे. तिच्या गंभीर स्वरूपाच्या दुखण्यासकट मी तिचा स्वीकार करणार आहे आणि आता तिला माझ्यापासून दूर रहावेसे नक्कीच वाटणार नाही." ऋषी
"आम्ही तिला पहायला हॉस्पिटलात गेलो होतो, पण ती गाढ झोपलेली असल्यामुळे तिला उठवलं नाही आणि तडक इकडे आलो." सविताताई म्हणाल्या, "आम्ही असा विचार केला आहे की अप्पासाहेब आले की त्यांची संमती घेऊन आम्ही लगेच या मुलांचे चार हात करून टाकू आणि चिन्मयीला आमच्याकडे घेऊन जाऊ. यापुढे तिला तळहातावरच्या फोडासारखे जपू आणि या दुखण्यातून बाहेर काढायच्या प्रयत्नांची शर्थ करू."
"आम्ही डॉक्टर आयुष्मान यांच्याशी बोललो. ते म्हणाले की परदेशात अलीकडे अशा प्रकारच्या दोन तीन केसेस ब-या झाल्या आहेत. वाटल्यास चिन्मयीला तपासण्यासाठी तिकडच्या डॉक्टरांना इकडे आणू किंवा तिच्या उपचारासाठी या दोघांना तिकडे पाठवू. जे जे काही शक्य असेल ते ते करायला मागे पुढे पाहणार नाही." दाभोळकरांनी आश्वासन दिलं
"आता आम्ही निघतो. बरीच कामं करायची आहेत. अप्पासाहेब आले की लगेच कळवा हं." सविताताई निरोप घेतात.

अप्पासाहेब सुभेदार, उल्का, संपत आणि सुभेदारांच्या घरातला नोकर साहेब एकत्र प्रवेश करतात. घरातले लोक चकित होऊन पहात आहेत. संपतराव सांगतात, "यात्रा संपवून आमची बस परतीच्या वाटेला लागलेली होती. इन्स्पेक्टर शिंत्र्यांचा फोन आला. आजच्या घडामोडींबद्दल त्यांनी सांगितलं. अप्पांना घेऊन येण्यासाठी आमच्या बसचा मार्ग थोडासा बदलला आणि त्यांना घेऊनच इकडे आलो. वाटेतच या साहेबचं गावही लागलं. आपला नवस फेडून झाल्यावर परत येण्यासाठी तो बसच्या स्टँडवर उभा होता. त्यालाही बरोबर घेतलं."
अप्पासाहेब सांगू लागले, "या संपतरावांनी चाचपडत मला थोडीशी कल्पना दिली आहे. पण मला कसला धक्का सहनच होणार नाही असं तुम्ही का समजता? अरे तुम्हाला लहानाचे मोठे करतांना या आयुष्यात कितीतरी धक्के मी खाल्ले आहेत आणि पचवले आहेत. ही चिन्मयी तर इतकी वेडी आहे की मला त्रास होऊ नये म्हणून वाट्टेल ते सहन करायची तिची तयारी असते. अरे, त्रासाला, दुःखांना असं घाबरायचं नसतं. आल्या परिस्थितीला धीरानं तोंड द्यायचं. आपल्या परीनं चांगलं वागायचं. मानवतेची ज्योत आपल्या ह़दयात तेवत ठेवायची आणि तोंडानं म्हणायचं...."
"शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा। शत्रुबुध्दी विनाशाय दीपोज्योती नमोस्तुते।। " एका सुरात सारे जण म्हणतात.

......................... (समाप्त)

Sunday, October 03, 2010

पितृपक्ष आणि बेचाळीस पिढ्या

सध्या पितृपक्ष चालू आहे. भाद्रपद महिन्याच्या दुस-या पंधरवड्याला हे नाव दिले गेले आहे. आई आणि वडील यांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला दरवर्षी त्यांचे 'श्राध्द' करायचे आणि त्यापूर्वीच्या सर्व पिढ्यांमधील पितरांसाठी पितृपक्षातल्या एकाद्या दिवशी 'पक्ष' घालायचे अशी पध्दत पूर्वीच्या काळी होती. त्या त्या दिवशी विशिष्ट मंत्रोच्चाराने करायचा एक खास विधी असे आणि पिंडदान केल्यावर ते भाताचे गोळे कावळ्यांना खायला दिले जात असत किंवा नदीत सोडून दिले जात असत. श्राध्दपक्षाला जेवलेल्या भटांच्या, कावळ्यांच्या, नदीतल्या जलचरांच्या पोटात गेलेले अन्न आपल्या स्वर्गवासी पितरांना मिळते आणि त्यावर त्यांचा वर्षभर निभाव लागतो अशी श्रध्दा होती.

आमच्या घरी परंपरेने तशी पध्दत चालत आली होती आणि दरवर्षी माझे वडील नेमाने श्राध्द पक्ष करत असत. मात्र हा विधी प्रत्यक्ष पहायला मुलांना बंदी असे. त्यामुळे तो विधी सांगणारे स्पेशॅलिस्ट पुरोहित घरात आले की आम्हाला घराच्या माडीवर पिटाळले जाई आणि हाक मारून बोलावीपर्यंत कोणीही जिना उतरायचा नाही अशी तंबी दिली जात असे. तसेच दंगा करायचा नाही, आमचा आवाज खाली येता कामा नये वगैरे कडक नियम असत. माडीवर बसून शक्य तितक्या शांतपणे पत्ते, सोंगट्या वगैरे खेळत आम्ही वेळ घालवत रहायचे. विधी एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर हाक मारली जाई. तेंव्हा आम्ही सगळे खाली उतरून तिथे एका पाटावर मांडून ठेवलेल्या गोष्टींना वाकून नमस्कार करत असू आणि पुन्हा माडीवर जाऊन आपला खेळ पुढे चालवत असू. जेवणखाण करून ब्राह्मण निघून गेल्यानंतर विधी केलेल्या जागेची पूर्ण सारव सारव करून झाल्यानंतर आमची पंगत मांडली जात असे. वर्षभरात एरवी कधीही खाण्यात न येणारे कांही पदार्थ जेवणात असत. ते चविष्ट असले तरी कुठल्याही मंगल प्रसंगी करणे निषिध्द होते.

लहान असतांना या सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल वाटत असे, पण कोणीच त्याच्याबद्दल काही सांगत नसे. मोठा झाल्यावर माझा अजीबात विश्वास नसल्यामुळे मी त्याबद्दल कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. आमच्या भावंडात मी लहान असल्यामुळे परंपरेने सुध्दा माझ्यावर ही जबाबदारी आली नव्हती आणि मोठे भाऊ काय करतात याची चौकशी करावी असेही मला कधी वाटले नाही. माझ्यासाठी हा विषय कायमचा बंद झाला होता. परवा मला एक मेल आली. या पितृपक्षामध्ये आपण आपल्या दिवंगत नातेवाइकांच्या आठवणी एकमेकांना सांगाव्यात आणि एक नव्या प्रकारची श्रध्दांजली त्यांना समर्पण करावी अशी सूचना त्यात होती. ही कल्पना मी लगेच उचलून धरली आणि काही व्यक्तींची शब्दचित्रे रंगवायला सुरुवात केली. एक वय होऊन गेल्यानंतर भूतकाळात जाऊन मन रमवणे बरे वाटते. घडून गेलेल्या घटनांपासून आपण फारसा बोध घेतला नसला, आपल्याला भेटलेल्या थोर व्यक्तींचे आपण फारसे अनुकरण केले नसले तरी इतरांनी (त्यांना वाटले तर) ते करावे, त्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळावी वगैरे उद्देशसुध्दा त्याला जोडले जातात. यामुळेच भाराभर चरित्रे लिहिली जात असावीत.

या ठिकाणी मला त्याबद्दल लिहायचे नाही. एक वेगळाच मुद्दा मांडावयाचा आहे. पितरांचे पक्ष घालतांना माता आणि पिता या दोन्ही बाजूच्या बेचाळीस पिढ्यांमधील लोकांना त्यांच्या नावाने आवाहन केले जाते असे त्या मेलमध्ये लिहिले होते. 'बेचाळीस पिढ्यांचा उध्दार' हा वाक्प्रचार जरा वेगळ्या अर्थाने रूढ असला तरी त्यातही बेचाळीस पिढ्यांचा उल्लेख आहे. मी सहज विचार केला. माझ्या आई आणि वडिलांची पूर्ण माहिती मला आहे. पण त्यांच्या आईवडिलांना मी पाहिलेले नाही, फक्त त्यांच्याबद्दल ऐकले आहे. स्वतःचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या क्रमाने नाव लिहिण्याची पध्दत असल्यामुळे वडिलांच्या वडिलांचे नाव ठाऊक आहे. पण आईच्या माहेराचा उल्लेख कागदोपत्री कुठेच होत नसल्यामुळे तिच्या आई वडिलांची नावे सांगायला आज कोणीच उपलब्ध नाही. लाइफ एक्स्पेक्टन्सी वाढली असल्यामुळे आजकाल बहुतेक मुलांना त्यांचे आजी आजोबा भेटतात. काही सुदैवी लोकांची त्यांच्या पणजोबा आणि पणजीशी सुध्दा भेट होते. पण त्यापलीकडे काय?

दुसरी गोष्ट म्हणजे (निदान अजूनपर्यंत) प्रत्येकाला फक्त एक आई आणि वडील असतात. या दोघांचे आई व वडील म्हणजे दोन आजोबा आणि दोन आज्या असतात. या चौघांचे आई व वडील धरून चार पणज्या आणि चार पणजोबा होतात. चार पाच नातवंडे असलेले आजोबा माझ्या पाहण्यात आहेत. त्यातल्या काही जणांना एकाद दुसरे पणतवंडही झाले आहे. पण कोणालाही चार पणजोबा आणि चार पणज्या आहेत असे मूल मी अजून पाहिलेले नाही. त्यामुळे तिस-या पिढीमधली एकाददुसरी व्यक्तीच असली तर माहितीची असते. त्याच्या पलीकडे सगळा अंधार असतो.

बेचाळीस पिढ्या म्हणजे त्यात किती माणसे येतील? लहानपणी एक बोधकथा ऐकली होती. त्यात एक राजा खूष होऊन आपल्या भाटाला काय हवे ते मागायला सांगतो. तो हुषार भाट म्हणतो, "माझे लई मागणे नाही. आज मला फक्त तांदळाचा एक दाणा दे. उद्या दोन, परवा चार असे ते रोज दुपटीने वाढवत जा. असे फक्त एक महिना कर." राजाला वाटले की हा भाट मूर्ख आहे. त्याने भरसभेत त्याची मागणी मान्य केली. पण दोन, चार, आठ, सोळा, बत्तीस, चौसष्ठ असे करत हा आकडा इतका वाढला की महिनाअखेर राजाचे कोठार रिकामे करूनसुध्दा तेवढे तांदळाचे दाणे पुरवणे शक्य झाले नाही. त्याचप्रमाणे दोन गुणिले दोन असे बेचाळीस वेळा केले तर  43,98,04,65,11,104 एवढी मोठी संख्या येईल. ही जगाच्या आजच्या लोकसंख्येच्या सुमारे सहा हजारपट भरते. अख्ख्या जगाची इतकी मोठी लोकसंख्यासुध्दा कधीच अस्तित्वात नव्हती. अर्थातच हे सगळे पितर वेगळे होते ही कल्पनाच चुकीची आहे. तीन चार पिढ्यांनंतर संपर्क रहात नाहीत आणि एकाच व्यक्तीचे वंशज एकमेकांशी विवाहबध्द होतात. काही जातीजमातींमध्ये आतेमामेभावंडे किंवा मामाभाची यांची लग्ने ठरवतात. त्यामुळे त्यांचे पितर वेगवेगळे असायचा प्रश्नच नसतो.

थोडक्यात सांगायचे तर बेचाळीस पिढ्या वगैरे सगळ्या समजुतींना काही अर्थ नाही. आपण फार फार तर मागच्या आणि पुढच्या तीन पिढ्या पाहू शकतो. वैयक्तिक बाबतीत आपली माहिती तेवढीच असते. देशाचे राजघराणे वगैरेंचा इतिहास अनेक पिढ्यांपर्यंत पोचतो, पण तो सुध्दा फार फार तर दहा बारापर्यंत असेल. तेवढ्यात एकादी क्रांती होते आणि राजघराणेच बदलते. पूर्वीच्या राजघराण्यामधल्या पुढल्या वंशजांना कोणीही विचारत नाही.

आपण प्रत्यक्षात पाहलेले किंवा आपल्या माहितीमधले जेवढे दिवंगत पितर असतील त्यांची या पितृपक्षात आठवण करून त्यांना श्रध्दांजलि वाहणे ही कल्पना मात्र स्तुत्य आहे. 

Friday, October 01, 2010

यंदाच्या गणेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टीलालबागच्या राजाच्या उत्सवासाठी या वर्षी दक्षिण भारतातल्या प्राचीन मंदिराची सजावट केली होती, पण यात फारसे नाविन्य वाटणार नाही कारण दरवर्षी कुठल्या ना कुठल्या प्रसिध्द देवालयाच्या प्रतिकृती केलेल्या पहायला मिळतात. या वर्षीचे खास वैशिष्ट्य म्हणायचे झाले तर या गणपतीमंडळाचा गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रसिध्द केला गेला. गणपतीच्या दर्शनासाठी येणा-या अनेक लोकांनी भक्तीभावाने हे पुस्तक विकत घेतले असणारच. गेली काही वर्षे वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर या राजाचे जे दर्शन घडते त्यातल्या मूर्तीचा आकार सारखाच वाटतो. लालबागचा राजा फोटोवरून ओळखता यावा
इतका ओळखीचा झाला आहे. पुण्यातला दगडूशेट हलवाई गणपतीसुध्दा जेंव्हापासून प्रसारमाध्यमात प्रामुख्याने दिसायला लागला आहे, त्याच्या रूपात काही फरक पडलेला नाही. पण लालबागचा राजा मात्र पहिल्यापासून असा एकाच रूपात येत नव्हता. राजकीय आणि सामाजिक परिस्थितीनुसार तो वेगवेगळी रूपे घेऊन साकारला आहे. १९४६ सालच्या उत्सवात सिंहाच्या पाठीवर पाय ठेऊन उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्रांच्या रूपात तो दिसतो, तर १९४८ साली महात्मा गांधीजींच्या रूपात. १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळात तो दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर पंडिकजींच्या रूपात बैलगाडी चालवत होता.

गणेशोत्सवाच्या निमित्याने येणा-या दर्शकांचे लक्ष वेधून घेणा-या जाहिराती लावण्याची कल्पना कोणाच्या सुपीक मेंदूतून निघाली कोण जाणे, पण सिमेनाची पोस्टर्स लावण्याची सुरुवात लालबागच्या राजापासूनच झाली. त्याचसोबत सिनेकलावंतांनी प्रत्यक्ष लालबागला येऊन या राजाचे दर्शन घेण्याला सुरू केल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी येणा-या लोकांची गर्दी होऊ लागली. तो नवसाला पावतो अशी श्रध्दा उत्पन्न झाली आणि मग दर्शनोत्सुकांची गर्दी वाढता वाढता वाढत उच्चांक करू लागली आणि तिचे नियोजन करण्याचे कामही वाढत गेले. लालबागला सुरू झालेले जाहिरातबाजीचे लोण मात्र कानाकोप-यापर्यंत पोचले आणि त्यात कशाची जाहिरात करावी याचा नेम राहिला नाही. एक दोन वर्षांखाली जिकडे तिकडे माणिकचंद दिसत असे. या वर्षी मात्र तंबाखू, मद्य आदि व्यसनांना उत्तेजन देणा-या द्रव्यांची जाहिरात करायची नाही असा निर्बंध पाळला गेला असे दिसले.

आंतर्जालावर नवे व्हर्च्युअल जग निर्माण झाले आहेच, त्याची वाढ तर पटीने होत चालली आहे. गणरायाचा यात प्रवेश होऊन त्याने आपले स्थान निर्माण करणे ओघाने आले. अनेक उत्सव मंडळांनी या वर्षी आपापल्या वेबसाइट्स उघडल्या आणि वर्गणी गोळा करण्यापासून बाप्पांचे दर्शन, पूजा आरती वगैरे दाखवण्यापर्यंत सेवा प्रदान केली. या वर्षीचा उत्सव आता संपून गेला आहे, पण पुढच्या वर्षी आधीपासून तयारी केलीत तर संगणकीय मूषकाच्या पाठीवर दोन बोटांनी टिचक्या मारत जगभरातल्या गणेशाच्या उत्सवांची चित्रे पहात विहरण करता येईल तसेच गांवोगांवच्या किंबहुना देशोदेशींच्या गणपतींची विविध रूपे पहाता येतील. ज्यांना संगणकाची एवढी आवड नाही अशा लोकांनासुध्दा लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिध्दीविनायक यांच्या आरत्या घरबसल्या पाहम्याची सोय वाहिन्यांनी केली होती आणि काही भक्तगण या वेळी टाळ्या वाजवत त्या आरत्यांमध्ये सहभागी होत होते.

लोकसत्ता या दैनिकाने गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये एक लेखमालिका सादर केली होती. जपान, चीन, श्रीलंका, जावा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम आदि परदेशांमध्ये निरनिराळ्या नावाने आणि रूपांमध्ये पूजल्या जाणा-या गजाननाची माहिती दिली होती. सुप्रसिध्द अष्टविनायकांची माहिती देणा-या लेखमालिका दरवर्षीच येतात. या वर्षी एका जाहिरातीमध्ये ती दिली होती, तर दुस-या एका जाहूरातदाराने आरत्या आणि मंत्रपुष्प दिले होते. या निमित्याने महाराष्ट्रातल्या खेडोपाडी असलेल्या अप्रसिध्द पण जागृत समजल्या जाणा-या काही देवस्थानांची माहिती या काळात प्रसिध्द झाल्यामुळे वाचायला मिळाली.

हिंदुस्थान टाइम्स हे दिल्लीचे वर्तमानपत्र मुंबईमध्ये जम बसवू पहात आहे. त्याने या वर्षी एक आगळा प्रयत्न केला. मोबाइल फोनवर एसएमएस देणा-या वाचकांमधून लकी डॉ काढून भाग्यवान विजेत्यांना हॅलिकॉप्टरमधून गणपती विसर्जनाची दृष्ये दाखवण्यात येतील अशा अर्थाच्या मोठमोठ्या जाहिराती रोज छापून येत होत्या. ही संधी फक्त ७ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलामुलींना उपलब्ध होती. प्रत्यक्षात असे दर्शन घडवण्यात आल्याची बातमीही आली.