Sunday, July 18, 2021

माझे आजोबा


माझे पणजोबा कुठे रहात होते आणि आपला उदरनिर्वाह कसा करत होते याची कणभरही माहिती मला कधीच मिळाली नाही. माझ्या लहानपणीच्या मित्रांमधल्या कुणाच्याच घरी त्यांचे पणजोबा रहात नव्हते. कदाचित 'पणजोबा' हा शब्दच सहसा माझ्या कानावर पडत नसावा. त्यामुळे तेंव्हा मला त्यांच्याबद्दल काही कुतूहलही वाटत नव्हते. माझे आईवडील, काकू, आत्या वगैरे घरातली मोठी माणसे बोलत असतांना त्यांनीही माझ्या पणजोबांबद्दल काही बोललेले ऐकल्यासारखे मला तरी आठवत नाही. पण ते अनेक वेळा माझ्या आजी आणि आजोबांविषयी मात्र भरभरून बोलत असत आणि आम्हालाही वेळोवेळी सांगत असत. त्यावरून माझे आजोबा हे एक सौम्य प्रवृत्तीचे, शांत, सोज्जवळ, हुशार, धोरणी, परोपकारी, कर्तव्यदक्ष आणि अत्यंत आदरणीय व्यक्ती होते अशी त्यांची एक दिव्य प्रतिमा माझ्या मनात तयार झाली.  माझ्या आजोबांना सगळे तात्या म्हणत असत. माझ्या जन्माच्या आधीच तात्या निवर्तले होते आणि माझी आजी तर त्यांच्याही आधी देवाघरी गेली होती. त्यामुळे मला त्या दोघांचेही प्रत्यक्ष दर्शन झालेच नाही. आमच्या घरात एक जुना फॅमिली फोटो होता त्यातच मी त्यांना पाहिले आहे. यामुळे तात्यांबद्दल जी काही माहिती माझ्या आठवणींमध्ये साठून राहिली आहे ती मी घरातल्या वडीलधारी लोकांकडून ऐकलेली आहे.

माझे पणजोबा किंवा खापरपणजोबा यांनी पुढील काही पिढ्या बसून खातील अशी गडगंज मालमत्ता जमा करून ठेवली नव्हती. तात्यानी स्वतःच जन्मभर आपली विद्या आणि अक्कलहुषारी वापरून आणि अपार कष्ट करून जे काही कमावले तेच त्यांच्याकडे होते असे मी लहानपणी ऐकत होतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ते जमखंडी संस्थानामधल्या सावळगी नावाच्या खेड्यात स्थायिक झाले होते. ते तिथले शाळामास्तरही होते आणि पोस्टमास्तरही होते. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीच्या काळात भारतातल्या सगळ्या खेड्यांमधली बहुतेक जनता निरक्षरच होती. त्यामुळे तिथल्या शाळेतही अगदी थोडी मुले येत असणार. त्या काळात बैलगाडीखेरिज वाहतुकीची साधने नव्हती. त्यामुळे बहुतेक लोकांचे सगळे नातेवाईकही त्याच गावात किंवा आजूबाजूच्या खेड्यांमध्ये रहात असत आणि टपाल तरी या गावाहून त्या गावाकडे कसे आणि किती दिवसांनी जात होते कोण जाणे. त्यामुळे त्या काळी पोस्टखात्यालाही ग्रामीण भागात फारसे काम पडत नसावे. हे पाहता दोन्ही हुद्दे सांभाळतांना तात्यांवर कामाचा खूप मोठा भार पडत असेल असे वाटत नाही. सावळगी हे त्या भागातले जरा मोठे खेडे होते म्हणून संस्थानच्या दयाळू सरकारने त्या भागातल्या लोकांसाठी त्या गावात महिन्याला पाच रुपये पगारावर एक शाळामास्तर आणि पोस्टमास्तर नेमला होता. त्या जागेवर माझ्या आजोबांची नेमणूक झाली होती.

सावळगीपासून तीन मैल अंतरावरील तुंगळ नावाच्या खेड्याला जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी एक पडीक जमीन विकत घेऊन तिचा विकास केला होता. त्यावर वाढलेली रानटी झुडुपे तोडून आणि उपटून टाकली, थोडी थोडी जमीन खणून तिथले दगडधोंडे बाजूला काढून टाकले, खणलेली माती पसरून सपाट केली आणि खत वगैरे टाकून तिला लागवड करण्यायोग्य केली. तिथे दोन विहिरी खणून पाण्याची सोय केली होती म्हणून आम्ही तिला 'मळा' असे म्हणत होतो. त्या काळात कसली यंत्रे नव्हतीच. हे सगळे काम कुदळ आणि फावडे वापरून मजूरच करत असत. त्यमुळे तात्यांना त्यासाठी वर्षानुवर्षे चिकाटीने मेहनत करून ती सगळी कामे करून घेत रहावे लागले असणार. त्यांचा मळा जसजसा तयार होत गेला, तसतशी त्यावर ते शेती सुरू करत गेले. अगदी माझ्या लहानपणापर्यंत जोंधळ्याची भाकरी हे त्या भागातल्या लोकांचे मुख्य अन्न होते. त्यामुळे ज्वारी हेच तिथले मुख्य पीक असायचे. त्याशिवाय कडधान्ये, भुईमूग, रताळी वगैरेंची लागवड ते करीत असत. त्यांनी मळ्यात अनेक प्रकारची झाडे लावली होती, त्यात आंब्याची झाडेही होती. आमच्या मळ्यात काम करणाऱ्या कुळांना त्यांचा वाटा देऊन झाल्यावरही भरपूर धान्य घरी येत असे. त्यामधून तात्यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेसे अन्न मिळत असे तसेच त्यातून  सुतार, लोहार, कुंभार आदि बलुतेदारांनाही धान्य दिले जात असे.

त्या काळातल्या ग्रामीण भागातल्या 'कॅशलेस सिस्टम'मध्ये शेतात पिकणाऱ्या आणि खेड्यात तयार होणाऱ्या नेहमी लागणाऱ्या पदार्थांची किंमत आणि सेवांचा मोबदला बहुतेक वेळा धान्याच्या रूपात दिला जात असे. कापडचोपड. भांडीकुंडी, सोनेचांदी यासारख्या कधीतरी घेण्याच्या वस्तूंसाठी रोकड पैसे मोजत असत. काही वेळा गरजू लोकांकडे त्यासाठी पुरेसे पैसे नसले तर ते थोडीशी रक्कम तात्यांच्याकडून उसनी घेत आणि सुगीच्या काळात व्याजासकट तिची परतफेड करत असत. या लहानशा सावकारीच्या व्यवहारातूनही तात्यांची थोडी कमाई होत असे. मवाळ आणि प्रेमळ स्वभावामुळे ते स्वतः तर कुणाला जास्त तगादा करू शकत नव्हतेच आणि पैशांच्या वसूलीसाठी त्यांनी कुणा पठाणाला किंवा रामोशाला पदरी ठेवले नव्हते. त्यांनी कुणावरही कधी जप्ती आणली नाही.  त्यांचे बहुतेक कर्जदार उसने घेतलेले पैसे आपणहूनच आणून देत असत आणि एकाद्याने कधी बुडवले तरी ते त्याला दान केले असे म्हणून ते त्या पैशांवर पाणी सोडत असत. आपण कुणाच्या तरी अडीअडचणीत त्याला मदत केल्याचे समाधानच त्यांना महत्वाचे वाटायचे.

एकंदरीत पाहता तात्यांचे जीवन सुरळीतपणे चालले होते. त्यांची गणना गावातल्या 'खाऊन पिऊन सुखी' कुटुंबांमध्ये होत होती. त्यांनी आपल्या कर्तबगारीने त्या गावात एक प्रशस्त घर बांधले होते. मी लहानपणी ते घर पाहिले आहे. त्या घराच्या अंगणामध्ये एक लहानशी विहीर आणि बाजूला गुरांचा गोठा होता, म्हणजे त्यात गुरेढोरेही बांधलेली असणार. त्या खेडेगावातले एक सुशिक्षित, सुजाण आणि माहीतगार सद्गृहस्थ म्हणून त्यांना मानाचे स्थान होते. काही लोक आपल्या अडचणी घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला त्यांच्याकडे येत असत आणि त्यांच्या अडचणी शांतपणे समजून घेऊन तात्या त्यांना योग्य ते मार्गदर्शन करीत असत.

माझ्या वडिलांचा जन्म १९०३ साली झाला, त्यानंतरच्या १०-१५ वर्षांमध्ये त्यांची लहान भावंडे जन्माला आली असावीत. म्हणजे तात्यांचा काळ हा सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या आजूबाजूचा काळ होता. तात्या स्वतःच शाळामास्तर असल्यामुळे त्यांनीच सगळ्या मुलांना  लिहायला वाचायला शिकवले. त्या काळात मराठीसारख्या भारतीय भाषांमधल्या शाळांना 'व्हर्नाक्युलर स्कूल' म्हणत आणि त्यात पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण दिले जात असे. सातवीच्या परीक्षेला 'व्हर्नाक्युलर फायनल' असे नाव होते. ती दिली की बहुतेक सगळ्या मुलांचे शिक्षण संपत असे, पण बरीचशी मुले त्याच्याही आधीच शाळा सोडून जात असत. त्याशिवाय त्या काळात काही ठिकाणी "इंग्रजी शाळा" असायच्या. मराठी शाळेच्या चार इयत्ता पास झाल्यानंतर इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत असे आणि तिथले शिक्षण मॅट्रिकपर्यंत चालत असे. तेंव्हा मॅट्रिक परीक्षा बरीच कठीण समजली जात असे आणि 'मॅट्रिक पास' होणे ही एक मोठी बहुमानाची गोष्ट असायची. कित्येक लोक 'नॉनमॅट्रिक' रहात असत.  सावळगीला इंग्रजी शाळा नव्हती. जमखंडीच्या संस्थानिकांनी जमखंडी इथे 'परशुरामभाऊ हायस्कूल' नावाची एक उत्तम संस्था उभी केली होती. तात्यांनी माझ्या वडिलांना म्हणजे आमच्या दादांना त्या शाळेत शिक्षणासाठी पाठवून दिले.

सावळगी गाव जमखंडीपासून बारा मैल दूर आहे आणि दोन्हींच्या मधून कृष्णा नदी वाहते. त्यामुळे सात मैल चालत किंवा बैलगाडीतून गेल्यावर नावेतून नदी ओलांडायची आणि पुन्हा पुढे पाच मैल चालत जायचे असा खडतर प्रवास करावा लागत असे.  नदीला पूर आला तर ती पार करणे अशक्य होऊन इकडे लोक इकडे आणि तिकडचे लोक तिकडे राहून जायचे अशी अवस्था होत असे. त्यामुळे आमचे दादा हायस्कूल शिक्षणासाठी जमखंडीला कोणा नातेवाइकांकडे रहात असत आणि जमेल तेंव्हा सावळगीला घरी जाऊन येत असत. ते शाळेतले हुषार विद्यार्थी होते आणि चांगले मार्क घेऊन मॅट्रिक परीक्षा पास झाले. 

१९२०च्या सुमारासच्या त्या काळात फार थोड्या शहरांमध्येच कॉलेजे उघडली गेली होती. तिथे जाऊन रहायचे हे खर्चाचे काम होते. तात्यांचे कुटुंब घरात खाऊन पिऊन सुखी असले तरी रोख पैसे उचलून देणे त्या काळात थोडे अवघड होते. पण दादांच्या बहिणींनी तात्यांकडे हट्टच धरला की "वाटले तर आम्हाला एक वेळा जेवायला द्या, पण आमच्या दादाला शिकायला पाठवून द्या." ही गोष्ट मी प्रत्यक्ष दादांच्या तोंडून ऐकली आहे आणि त्या वेळीही त्यांच्या डोळ्यात तरळलेले पाणी मी कधी विसरू शकणार नाही. तेसुद्धा आयुष्यभरात आलेल्या बऱ्यावाईट काळामध्ये सतत आपल्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते.

तात्यांनी काही ना काही करून खर्चाची व्यवस्था केली आणि दादा सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये शिकून बी.ए.ची डिग्री घेऊन आले. त्यानंतर मात्र इकडे तिकडे कुठेही न जाता त्यांनी सरळ जमखंडी संस्थानाच्या कचेरीत नोकरी धरली आणि ते संस्थान भारतात विलीन होईपर्यंत तिथे काम केले. पण त्यासाठी त्यांना सावळगी सोडून जमखंडीला मात्र यावे लागले म्हणून त्यांनी जमखंडीला आपले बिऱ्हाड थाटले. आता तात्या आणि आजी कधी सावळगीला तर कधी जमखंडीला असे रहायला लागले. त्यांच्या दोन मुलींना म्हणजे माझ्या दोन आत्यांनाही जमखंडीतच सासर मिळाले.  त्यामुळे जमखंडीत येऊन रहायचे आकर्षण वाढत गेले.

मधल्या काळात तात्यांच्या कुटुंबावर मोठ्या विपत्ती आल्या. तात्यांचा धाकटा मुलगा म्हणजे माझे काका यांनी मला वाटते फारसे उच्च शिक्षण न घेता नोकरी धरली होती. त्यांचे लग्न होऊन त्यांना दोन मुली झाल्या होत्या. पण त्या अजून अगदी लहान असतांनाच अचानक काकांना देवाज्ञा झाली. त्याच सुमाराला आमच्या सर्वात लहान आत्यांचे यजमानही अकस्मात देवाघरी गेले. तरुण मुलगा आणि जावई यांच्या आकस्मकपणे जाण्याचे जबर धक्के तात्यांना सहन करावे लागले. पण त्यांनी सगळ्यांना धीर दिला. मुलीला आपल्या घरी आणले आणि तिची समजूत घालून काही काळानंतर तिला जमखंडीच्या मुलींच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी लावून दिली. ऐंशी वर्षांपूर्वीच्या सामाजिक परिस्थितीत त्याला विरोधही झाला असेल, पण तात्यांनी त्याला खंबीरपणे तोंड दिले.

पण तात्या आणि आजी या दोघांच्याही प्रकृतीवर अशा तीव्र मानसिक धक्क्यांचे परिणाम झाले असणार. आजींना दम्याचा त्रास व्हायला लागला होता. त्या काळात जी काही औषधोपचारांची सोय होती तिने थोडा आराम पडायचा आणि नंतर हवामानात फरक पडला की तो परत उसळी मारायचा. ज्या वेळी दम्यामुळे त्यांचा श्वास कोंडला जायचा तेंव्हा "आता मी काही यातून वाचणार नाही."  असेही त्या कधी कधी म्हणत असत आणि नंतर बऱ्याही होत असत. पण एकदा त्यांनी असे म्हंटले आणि "बरं बाई." असे काही तरी शब्द अनवधानाने तात्यांच्या तोंडून निघाले. पण त्या दिवशी मात्र त्या चालता बोलता अचानक खरोखरीच चालल्या गेल्या. ही गोष्ट तात्यांच्या मनाला फार लागून राहिली आणि वर्षादोन वर्षातच त्यांनीही शांतपणे या जगाचा निरोप घेतला.

त्या काळातल्या आणि त्यांच्या पिढीमधल्या इतर लोकांशी तुलना करता तात्या एक समाधानकारक जीवन जगले होते. त्यांनी आपल्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सर्व मुलामुलींची लग्ने करून देऊन सुना आणि जावई आणले होते. अनेक नातवंडाना मांडीवर खेळवले होते. त्यात माझा समावेश झाला नव्हता हे माझे दुर्दैव.  पण तात्यांच्या आयुष्याचे सोने झाले असेच त्या वेळी बहुतेक लोकांनी म्हंटले असेल.  "अनायासेन मरणं विनादैन्येन जीवनम्। देहान्ते तव सायुज्यम् देहि मे परमेश्वर ।।" अशी एक प्रार्थना पूर्वीचे लोक नेहमी देवापुढे करत असत. देवाने तात्यांची प्रार्थना ऐकली असणार असे वाटते.


Thursday, July 15, 2021

श्री विनायकाची उपासना

 माझ्या एका भाविक सुहृदाने श्री गणपतिअथर्वशीर्षाचे मराठीत लिहिलेले ओवीबद्ध रूपांतर मी मागच्या वर्षी या ब्लॉगवर दिले होते. 

https://anandghan.blogspot.com/2020/08/blog-post.html

विविध रूपांमधून प्रकट झालेल्या श्रीविनायकाच्या उपासनेवर त्यांनी लिहिलेल्या ओवीबद्ध रचना, अष्टविनायकांची आरती आणि मुद्गलपुराणातला काही भाग व स्तोत्रे या पानावर देत आहे. गणेशभक्तांनी त्यांचा लाभ घ्यावा.ॐ श्री गणेशाय नम: |


ॐ नमो जी श्रीगणेशा । आद्य वन्द्य तु सुरवरेश्वरा । ॐकार_शुण्डा, शूर्प_कर्णा । ब्रह्माण्ड_उदरा, लम्बोदरा (१)

उत्पत्ति, स्थिति, लय कधी ? कसा ?। का ? कुणाचा ? या गणितांच्या । 'समीकरण'रूपी तव 'पाशा'। हस्ती धरुनी क्रीडसी मोदे (२)

तव सु'स्वरूप', लीलादिका । वर्णावे ऐशी मम इच्छा । पूर्ण करावी हीच प्रार्थना । तव चरणी मी करीतसे (३)

तव लीला_'अवतार' कथा । व्रते, पूजा विधि विधाना । गणेश, मुद्गल पुराणी वर्णिल्या । व्यासावतारी नारायणाने (४)

त्यातील काही वेचक माहिती । 'मराठी' भाषेत करण्यास 'उक्ति' । द्यावी मजला बौद्धिक शक्ति । ऐशी विनवणी तव चरणी (५)

'कृत'युगी अदिति-कश्यप पुत्र । अवतरलास तु 'महोत्कट' । मारावयास नरांतक देवांतक । लीला विनोदे मांडिली (६)

'त्रेता' युगी तु गिरिजात्मज । नामे 'गुणेश', 'मयूरेश्वर' । मारिलास 'सिंधु' दैत्येश्वर । भक्त संरक्षणाप्रीत्यर्थ (७)

'द्वापर' युगी ब्रह्मदेवे । देता जांभई 'सिन्दूर' उद्भवे । वरेण्य पुत्र 'गजानन' रूपे । चिरडून 'सिन्दूर'_वर्ण तव झाला (८)

'कलि' युगी तु युगांत समयी । 'धर्म' पुन: प्रस्थापण्यासी। 'धुम्रकेतु' नामावतारी। प्रगट होशील भविष्यात (९)

अवस्थेतली चतुर्थावस्था । जिला नाम 'तुरीया' वा 'तुर्या' । तीच स्वानंदे 'सहज' साध्य होता । तव सालोक्य मुक्तिचा लाभ (१०)

चारही पुरुषार्थाञ्चा दाता । चारही सं_कष्टांचा हर्ता । विघ्न कर्ता धर्ता हर्ता । अनाकलनीय या तुझ्या लीला (११)

तुझे चतुर्थी तिथी_व्रत । शुक्ल, कृष्ण दोनही पक्षांत । 'विनायकी', 'संकष्टी' नामे प्रसिद्ध । प्रिय सर्व गाणेश भक्तासी (१२)

शुक्ल पक्षात चंद्रोदय । दिवसा सूर्योदयानंतर । मेळविण्यास चारही पुरुषार्थ । ज्ञान_सूर्य उजेडात मानसीच्या (१३)

कृष्ण पक्षात चंद्रोदय । रात्री सूर्यास्ता नंतर । रात्री अंधार अज्ञान तिमिर । त्यावरी सं_कष्टांचा मारा (१४)

जेथे मानवी शक्ती, युक्ती । अपुरी पडे ऐशिया समयी । गणेशा तुझी कृपा दैवी । मागावया संकष्टी व्रताचरण (१५)

गणेशा तुझी आद्य वंदना । मान्य सर्व वैदिक जना । शैव, शाक्त, सौर, वैष्णवा । 'गाणेश' तर तुझेच अनुयायी (१६)

अवैदिक बौद्ध, जैन, शीख । वीरशैवादिक पंथ अनंत । तेही तुला मानिती अत्यंत । सर्वमान्य तु जगद्वंद्या (१७)

वार_व्रत तव मंगळवारी । भौम, भूमिपुत्र ग्रहाचे वारी । येता 'चतुर्थी' त्याच वारी । 'अंगारकी' योग तव वरदाने (१८)

ऐशी 'अंगारकी' विनायकी । तैशीच 'अंगारकी' "संकष्ट_चतुर्थी" । जे जे भक्तीने आचरिती । 'पुण्यार्जन' त्यांस अधिक होई (१८)

व्रताचरणार्थ 'उपवास'। पूजा, अर्चना करुनी 'विशेष' । गाती जे तुझी स्तोत्रे सतत । त्यांवरी 'प्रसन्न' होसी तु (१९)

अदिती, पार्वती, लक्ष्मी देवीन्नी । ऐसेच तुजसी सुप्रसन्न करुनी । 'वरदानार्थ' तव मातृत्व मागुनी । अवतार तुजसी घडविले (२०)

अदितीपुत्र 'महोत्कट'। पार्वतीपुत्र 'गिरिजात्मज' । लक्ष्मीपुत्र 'ढुंढिराज'। अवतार तुझे ऐसे नाना (२१)


----------------------- =============== ------------------------


आरती अष्ट विनायकांची

------------------------


जय देव, जय देव, जय श्रीविनायका

अष्ट विनायक तीर्थ क्षेत्री स्मरू तुला ।

जय देव, जय देव (धृ)


मोरगावि 'मयुरेश्वर' सुंदर मूर्ति तुझी

'सिद्धिविनायक' रूपे सिद्धटेकि वससी ।

'पालि'स 'बल्लाळेशर' तू अवतरलासी

भक्ता 'वरद_विनायक' तू महाड क्षेत्री (१)

जय देव, जय देव


'कदम्ब_नगरी' 'थेउर' क्षेत्री 'चिन्तामणी'

'गिरिजात्मज' लेण्याद्रिस तू गिरिजेसाठी ।

ओझरला 'विघ्नेश्वर' विघ्नराज वससी

'महागणपती' भक्त प्रिय रांजणगावी (२)

जय देव, जय देव


गणेश, मुद्गल पुराणि वर्णित कथानका

अनुरूप अशा'स्वयम्भू' मूर्त्या स्थापुनिया

गाणेश भक्त श्रद्धेने करिती यात्रा

पूजा, अर्चा, जप, तप गाणेश व्रतान्ना (३)

जय देव, जय देव


मत्सरासुरा शमवण्या 'वक्रतुण्ड' झाला

मदासुरा शमवण्या 'एकदन्त' अवतार

मोहासुरा शमवण्या 'महोदर'ख्यात:

लोभासुर शमवाया 'गजानन' तु झाला (४)

जय देव, जय देव


क्रोधसुरा शमवण्या 'लम्बोदर' होसी

कामासुरा शमवण्या 'विकट' रूप धरिसी

'विघ्नराज' रूपे तु 'ममतासुर' शमिसी

'धूम्रवर्ण' अभिमानासुर नाशक होसी (५)

जय देव, जय देव---------------- ================ --------------------

मुद्गल पुराण : (२० : ५-१२) (Spiritual significance of विनायक incarnations)


वक्रतुण्डावतारश्च देहानाम ब्रह्मधारक:

मत्सरासुर हंता स सिंहवाहनग: स्मृत: (१)

एकदन्तावतारो वै देहिनाम ब्रह्मधारक:

मदासुरस्य हंता स आखुवाहनग: स्मृत: (२)

'महोदर' इति ख्यात: 'ज्ञान_ब्रह्म' प्रकाशक:

मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनग: स्मृत: (३)

'गजानन:' स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धि दायक:

लोभासुर प्रहर्ता वै आखुगश्च प्रकीर्तित: (४)

लम्बोदरावतारो वै क्रोधसुर निबर्हण:

शक्तिब्रह्माखुग: सत यत तस्य धारक उच्यते (५)

'विकटो' नाम विख्यात: कामासुर विदाहक:

मयूरवाहनश्च अयम 'सौर_ब्रह्म'धर स्मृत: (६)

विघ्नराजावतारश्च शेष वाहन उच्यते

'ममतासुर' हंता स विष्णु_ब्रह्मेति वाचक: (७)

धूम्रवर्णावतारश्चाभिमानासुर नाशक:

आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते (८)

-----------------

नारद आणि मुद्गलपुराणामधील  गणपतीस्तोत्रे

१ संकट नाशन गणेश स्तोत्र

(नारद पुराण, नारद विरचित)

|| ॐ श्री गणेशाय नम: ||

नारद उवाच ||

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं |

भक्तावासं स्मरेत् नित्यं आयु: कामार्थ सिद्धये ||१||

प्रथमं वक्रतुण्डं च एकदंतं द्वितीयकं |

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं ||२||

लंबोदरं पञ्चमं च षष्ठमं विकटमेव च |

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णम् तथाष्टकं ||३||

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकं |

एकादशं गणपतिम् द्वादशं तु गजाननं ||४||

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेत् नर: |

न च विघ्नभयं तस्य सर्व सिद्धिकरं भवेत् ||५||

विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं |

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ||६||

जपेत् गणपति स्तोत्रं षड्भि: मासै: फ़लं लभेत् |

संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशय: ||७||

अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्र्च लिखित्वा य: समर्पयेत |

तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादत: ||८||


|| इति श्री नारद पुराणे नारद विरचितं

“संकटनाशनं” नाम श्रीगणेश स्तोत्रं संपूर्णम् ||

शुभं भवतु | शुभं भवतु | शुभं भवतु |

----
|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||
|| ॐ गं गणपतये नम: ||

२ श्री गणेश द्वादश नाम स्तोत्र  (मुद्गल पुराण )

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
शुक्लाम्बर धरं देवं शशिवर्णम् चतुर्भुजं |
प्रसन्न वदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये ||१|
अभिप्सितार्थ सिद्ध्यर्थम् पूजितो य: सुरासुरै: |
सर्व विघ्नहर: तस्मै गणाधिपतये नम: ||२||
गणानां अधिप: चण्डो गजवक्त्र: त्रिलोचन: |
प्रसन्नो भव मे नित्यं वरदात: विनायक: ||३||
सुमुख: एकदंतश्र्च कपिलो गजकर्णक: |
लंबोदरश्र्च विकट: विघ्ननाशो विनायक: ||४||
धूम्रकेतु: गणाध्यक्ष: भालचन्द्र: गजानन: |
द्वादश एतानि नामानि गणाध्यक्षश्र्च य: पठेत् ||५||
विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं |
इष्टकामं तु कामार्थी धर्मार्थी मोक्षं अक्षयं ||६||
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा |
संग्रामे संकटे चैव विघ्न: तस्य न जायते ||७||

|| इति श्री मुद्गल पुराणोक्तं श्रीगणेश द्वादश नाम स्तोत्रं संपूर्णम् ||
शुभं भवतु | शुभं भवतु | शुभं भवतु |

------------

३ योगशांतिप्रद स्तोत्र (मुद्गल पुराण )

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
|| ॐ श्री गणेशाय नम: ||

देवा ऊचु: ||
गजाननाय पूर्णाय 'सांख्य'रूपमयाय च |
विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नम: ||१||
अमेयाय च हेरम्ब परशू धारकाय ते |
मूषक वाहनायैव विश्र्वेशाय नमो नम: ||२||
अनंत विभवायैव परेषां पर रूपिणे |
शिवपुत्राय देवाय गुहाग्रजाय ते नम: ||३||
पार्वतीनन्दनायैव देवानां पालकाय ते |
सर्वेषां पूज्य देहाय गणेशाय नमो नम: ||४||
स्वानंद वासिने तुभ्यं शिवस्य कुलदैवतं |
विष्ण्वादीनां विशेषेण कुलदेवाय ते नम: ||५||
योगाकाराय सर्वेषां 'योगशांति' प्रदाय च |
ब्रह्मेषाय नमस्तुभ्यं ब्रह्मभूत प्रदाय ते ||६||
सिद्धि-बुद्धि पते नाथ सिद्धिबुद्धि प्रदायिने |
मायिने मायिकेभ्यश्र्च मोहदाय नमो नम: ||७||
लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च |
अमायिने च मायाया: आधाराय नमो नम: ||८||
'गज:' सर्वस्य 'बीजं' यत् तेन चिह्नेन विघ्नप |
योगिन: त्वां प्रजानंति तदाकारा भवंति ते ||९||
तेन त्वं गजवक्त्रश्र्च किं स्तुम: त्वं गजानन |
वेदादयो विकुण्ठाश्र्च शंकराद्याश्र्च देवपा:||१०||
शुक्रादयश्र्च शेषाद्या: स्तोतुं शक्ता: भवंति न |
तथापि संस्तुतोऽसि त्वं स्फ़ूर्त्या त्वत् दर्शनात्मना ||११||
एवं उक्त्वा प्रणेमु: तं गजाननं शिवादय: |
स तान् उवाच प्रीतात्मा भक्तिभावेन तोषित: ||१२||

|| श्री गजानन उवाच ||
भवत् कृतं इदं स्तोत्रं मदीयं सर्वदं भवेत् |
पठते श्रृण्वते चैव 'ब्रह्मभूत' प्रदायकं ||१३||
||ॐ इति श्री मुद्गल पुराणे 'ब्रह्मभूत' प्रदायक गजानन स्तोत्रं संपूर्णम् ||

-----

४ ब्रह्म भूत प्रदायक स्तोत्र (मुद्गल पुराण )

 || ॐ श्री गणेशाय नम: ||
देवा ऊचु: ||
गजाननाय पूर्णाय 'सांख्य'रूपमयाय च |
विदेहेन च सर्वत्र संस्थिताय नमो नम: ||१||
अमेयाय च हेरम्ब परशू धारकाय ते |
मूषक वाहनायैव विश्र्वेशाय नमो नम: ||२||
अनंत विभवायैव परेषां पर रूपणे |
शिवपुत्राय देवाय गुहाग्रजाय ते नम: ||३||
पार्वतीननदनायैव देवानां पालकाय ते |
सर्वेषां पूज्य देहाय गणेशाय नमो नम: ||४||

स्वानदं वासिने तुभ्यं शिवस्य कुलदैवतं |
विष्ण्वादीनां विशेषेण कुलदेवाय ते नम: ||५||
योगाकाराय सवेषां 'योगशांति' पदाय च |
ब्रह्मेषाय नमस्तुभ्यं ब्रह्मभूत पदाय ते ||६||
सिद्धि-बुद्धि पते नाथ सिद्धि-बुद्धि प्रदायिने |
मायिने मायिकेभ्यश्च मोहदाय नमो नम: ||७||
लम्बोदराय वै तुभ्यं सर्वोदरगताय च |
अमायिने च मायाया: आधाराय नमो नम: ||८||
'गज:' सर्वस्य 'बीजं' यत् तेन चिन्हेन विघ्नप |
योगिन: त्वां प्रजानंति तदाकारा भवंति ते ||९||
तेन त्वं गजवक्त्रश्च किं स्तुम: त्वं गजानन |
वेदादयो विकुण्ठाश्च शंकराद्याश देवपा:||१०||
शुक्राद्यश्च शेषाद्या: स्तोतुं शक्ता: भवंति न |
तथापि संस्तुतोऽसि त्वं स्फ़ूर्त्या त्वत् दर्शनात्मना ||११||
एवं उक्त्वा प्रणेमु: तं गजाननं शिवादय: |
स तान् उवाच प्रीतात्मा भक्तिभावेन तोषित: ||१२||
|| शी गजानन उवाच ||
भवत् कृतं इदं स्तोत्रं मदीयं सर्रदं भवेत् |
पठते शृणवते चैव 'बहभूत' पदायकं ||१३||
||ॐ इति श्री मुद्गल पुराणे 'ब्रह्मभूत' प्रदायक गजानन स्तोत्रं संपूर्णम् ||


५ सिद्धिविनायक स्तोत्र (मुद्गल पुराण)

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
विघ्नेश विघ्नचय ख़ंडन नामधेय |
श्री शंकरात्मज सुराधिप वंद्य पाद ||
दुर्गा महाव्रत फ़लाखिल मङ्गलात्मन् |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||१||
सत्पद्मराग मणिवर्ण शरीर कांति: |
श्री सिद्धि-बुद्धि परिचर्चित कुंकुमश्री ||
दक्षस्तने वलयिताति मनोज्ञ शुण्डो |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||२||
पाशांकुशाब्ज परशूंश्र्च दधत् चतुर्भि: |
दोर्भि: च शोण कुसुमस्रग् उमाङ्ग जात: ||
सिन्दूर शोभित ललाट विधु प्रकाश: |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||३||
कार्येषु विघ्नचय भीत विरञ्चि मुख़्यै: |
संपूजित: सुरवरै: अपि मोदकाद्यै: ||
सर्वेषु च प्रथममेव सुरेषु पूज्यो |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||४||
शीघ्रांचनस्खलन तुङ्गरवोर्ध्व कण्ठ |
स्थूलोन्दु रुद्र वण हासित देवसंघ: ||
शूर्प श्रुतिश्र्च पृथु वर्तुल तुङ्ग तुन्दो |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||५||
यज्ञोपवीत पदलंभित नागराजो |
मासादि पुण्यद दृशीकृत ऋक्षराज: |
भक्ताभयप्रद दयालय विघ्नराज |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||६||
सद्रत्नसारततिराजित सत्किरीट: |
कौसुम्भ चारु वसनद्वय ऊर्जितश्री: ||
सर्वत्र मङ्गलकर स्मरण प्रतापो |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||७||
देवान्तकाद्यसुर भीत सुरार्ति हर्ता |
विज्ञान बोधन वरेण तमोऽपहर्ता |
आनंदित त्रिभुवनेश कुमार बन्धो |
विघ्नं ममापहर सिद्धिविनायक त्वं ||८||

|| ॐ इति श्रीमुद्गल पुराणोक्त श्री सिद्धिविनायक स्तोत्रं संपूर्णम् ||
------

६  परब्रह्म रूप कर स्तोत्र (मुद्गल पुराण )

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
अजं निर्विकल्पं निराकारमेकं |
चिदानंदमानंदमद्वैत पूर्णम् ||
परं निर्गुणं निर्विशेषं निरीहं |
परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||१||
गुणातीतमाद्यं चिदानंद रूपं |
चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यं ||
मुनिध्येयमाकाश रूपं परेशं |
परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||२||
जगत् कारणं कारण ज्ञान रूपं |
सुरादिं सुखादिं युगादिम् गणेशं ||
जगद्व्यापिनं विश्र्ववंद्यं सुरेशं |
परब्रह्म रूपं गणेशं भजेम ||३||
रजोयोगतो ब्रह्मरूपं श्रुतिज्ञं |
सदा कार्यसक्तं हृदाऽचिन्त्य रूपं ||
जगत् कारणं सर्व विद्या निदानं |
परब्रह्म रूपं गणेशं नता: स्म: ||४||
सदा सत्ययोगं मुदा क्रीडमानं |
सुरारीन् हरन्तं जगत् पालयन्तं ||
अनेकावतारं निजज्ञान हारं |
सदा विश्र्व रूपं गणेशं नमाम: ||५||
तमोयोगिनं रुद्र रूपं त्रिनेत्रं |
जगत् धारकं तारकं ज्ञान हेतुं ||
अनेकागमै: स्वं जनं बोधयंतं |
सदा शर्व रूपं गणेशं नमाम: ||६||
नम: स्तोमहारं जनाज्ञानहारं |
त्रयी वेदसारं परब्रह्मपारं ||
मुनि ज्ञानकारं विदूरे विकारं |
सदा ब्रह्म रूपं गणेशं नमाम: ||७||
निजैरोषधी: तर्पयन्तं कराद्यै: |
सुरौघान् कलाभि: सुधास्राविणीभि: ||
दिनेशांशु संतापहारं द्विजेशं |
शशांक स्वरूपं गणेशं नमाम: ||८||
प्रकाश स्वरूपं नमो वायु रूपं |
विकारादि हेतुं कलाभार भूतं ||
अनेक क्रियानेक शक्ति स्वरूपं |
सदा शक्ति रूपं गणेशं नमाम: ||९||
प्रधान स्वरूपं महत् तत्त्वरूपं |
धराचारि रूपं दिगीशादि रूपं ||
असत् सत् स्वरूपं जगत् हेतु भूतं |
सदा विश्र्व रूपं गणेशं नता: स्म: ||१०||
त्वदीये मन: स्थापयेत् अंघ्रि युग्मे |
जनो विघ्नसंघात् न पीडां लभेत ||
लसत् सूर्यबिम्बे विशाले स्थितोऽयं |
जनो ध्वान्तपीडां कथं वा लभेत ||११||
वयं भ्रामिता: सर्वथाऽज्ञान योगात् |
अलब्धा: तवांघ्रिम् बहून् वर्ष पूगान् ||
इदानीम् अवाप्ता: तवैव प्रसादात् |
प्रपन्नान् सदा पाहि विश्र्वंभराद्य ||१२||
इदं य: पठेत् प्रातरुत्थाय धीमान् | त्रिसन्ध्यं सदा भक्तियुक्तो विशुद्ध: ||
सुपुत्रान् श्रियं सर्वकामान् लभेत | परब्रह्म रूपो भवेत् अंतकाले ||१३||

||इति परब्रह्म रूप कर श्रीगणेश स्तव: सम्पूर्ण: ||

---------

७ श्रीगणेश गीतासार स्तोत्र  (मुद्गल पुराण)

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
|| शिव उवाच ||
गणेश वचनं श्रृत्वा प्रणत: भक्ति भावत: |
प्रपच्छु: तं पुन: शांता ज्ञानं ब्रूहि गजानन ||१||

|| श्री गणेश उवाच ||
देह: चतुर्विध: प्रोक्त: त्वं पदं ब्रह्म भिन्नत: |
सोऽहं देही चतुर्धा तत् पदं ब्रह्म सदैकत: ||२||
संयोग उभयो: यत् च असिपदं ब्रह्म कथ्यते |
स्वत उत्थानकं देवा विकल्प करणात् त्रिधा ||३||
सदा स्वसुखनिष्ठं यद् ब्रह्म सांख्यं प्रकीर्तितं |
परत: चोत्थानकं तत् क्रीडाहीनतया परं ||४||
स्वत: परत उत्थान हीनं यद् ब्रह्म कथ्यते |
स्वानंद: सकलाभेद रूप: संयॊग कारक: ||५||
तदेव पंचधा जातं तन्निबोधत ईश्र्वरा: |
स्वतश्र्च परतो ब्रह्मोत्थानं तत् त्रिविधं स्मृतं ||६||
ब्रह्मणो नाम तद् वेदे कथ्यते भिन्न भावत: |
तयो: अनुभवो यश्र्च योगिनां हृदि जायते ||७||
रूपं तदेव ज्ञातव्यं असत् वेदेषु कथ्यते |
सा शक्ति: इयं आख्याता ब्रह्मरूपा हि असन्मयी ||८||
तत्र अमृतमय आधार: सूर्य आत्मा प्रकथ्यते |
शक्ति सूर्यमयो विष्णु: चिदानन्दात्मको हि स: ||९||
त्रिविधेषु तदाकार: तत् क्रियाहीन रूपक: |
नेति शिव: चतुर्थोऽयं त्रिनेति कारकात्पर: ||१०||
त्रिविधं मोहमात्रं यत् निर्मोह: तु सदाशिव: |
तेषां अभेदे यद् ब्रह्म स्वानन्द: सर्व योगक: ||११||
पञ्चानां ब्रह्मणां यत् च बिम्बं मायामयं स्मृतं |
ब्रह्मा तदेव विज्ञेय: सर्वादि: सर्वभावत: ||१२||
बिम्बेन सकलं सृष्टं तेनायं प्रपितामह: |
असत् सत् सदसत् चेति स्वानंद रूपा वयं स्मृता: ||१३||
स्वानंदात् यत् परं ब्रह्म यॊगाख्यं ब्रह्मणां भवेत् |
केषां अपि प्रवेशो न तत्र तस्यापि कुत्रचित् ||१४||
मदीयं दर्शनं तत्र योगेन योगिनां भवेत् |
स्वानंदे दर्शनं प्राप्तं स्वसंवेद्यात्मकं च ये ||१५||
तेन स्वानंद आसीनं वेदेषु प्रवदंति मां |
चतुर्णाम् ब्रह्मणां योगात् संयोगाभेद योगत: ||१६||
संयोगश्र्च हि अयोगश्र्च तयो: परतयो: मत: |
पूर्णशांतिप्रद: योग: चित्त वृत्ति निरोधत: ||१७||
क्षिप्तं मूढं च विक्षिप्तं एकाग्रं च निरोधकं |
पञ्च भूमिमयं चित्तं तत्र चिन्तामणि स्थित: ||१८||
पञ्च भूत निरोधेन प्राप्यते योगिभि: हृदि |
शांतिरूपात्म योगेन तत: शांति: मदात्मिका ||१९||
एतद् योगात्मकं ज्ञानं गाणेशं कथितं मया |
नित्यं युञ्जंत योगेन नैव मोहं प्रगच्छत ||२०||
चित्तरूपा स्वयं बुद्धि: सिद्धि: मोहमयी स्मृता |
नानाब्रह्म विभेदेन ताभ्यां क्रीडति तत् पति: ||२१||
त्यक्त्वा चिन्ताभिमानं ये "गणेशोऽहं" समाधिना |
भविष्यथ भवंतोऽपि मद् रूपा मोह वर्जिता: ||२२||

|| श्री शिव उवाच ||
इत्युक्त्वा विररामाथ गणेशो भक्त वत्सल: |
तेऽपि भेदं परित्यज्य शांति प्राप्ताश्र्च तत् क्षणात् ||२३||
एकविंशति श्र्लोकै: तै: गणेशेन प्रकीर्तितं |
गीतासारं सुशान्तेभ्य: शांतिदं योग साधनै: ||२४||
गणेशगीतासारं च य: ठिष्यति भावत: |
श्रॊष्यति श्रद्धधानश्र्चेद् ब्रह्मभूत समो भवेत् ||२५||
इह भुक्त्वा अखिलान् भोगान् अन्ते योगमयो भवेत् |
दर्शनात् तस्य लोकानां सर्व पापं लयं व्रजेत् ||२६||

|| इति श्री मुद्गल पुराणोक्तं गणेशगीतासार स्तोत्रं संपूर्णम् ||

-------------

८ ढुंढि स्वरूप वर्णन स्तोत्र (गणेश पुराण)

|| ॐ श्री गणेशाय नम: ||
 जैमिनी उवाच ||
न वक्तुं शक्यते राजन् केनाऽपि तत् स्वरूपकं |
नोपाधिन युतं ढुढिम् वदामि श्रृणु तत्वत: ||१||
अहं पुरा सुशांत्यर्थम् व्यासस्य शरणं गत: |
मह्यं संकथितं तेन साक्षात् नारायणेन च ||२||
तदेव त्वां वदिष्यामि स्वशिष्यं च निबोध मे |
यदि तं भजसि ह्यद्य सर्वसिद्धि प्रदायकं ||३||
देहि देहमयं सर्वम् 'ग'काराक्षर वाचकं |
संयोगायोग रूपं यद् ब्रह्म् 'ण'कार वाचकं ||४||
तयो: स्वामी गणेशश्र्च पश्य वेदे महामते |
चित्ते निवासकत्वाद्वै 'चिन्तामणि' स कथ्यते ||५||
चित्तरूपा स्वयं बुद्धि: भ्रान्ति रूपा महीपते |
सिद्धि: तत्र तयो: योगे प्रलभेत तयो: पति: ||६||

|| द्विज उवाच ||
शृणु राजन् गणेशस्य स्वरूपं योगदं परं |
भुक्ति मुक्ति प्रदं पूर्णम् धारितं चेत् नरेण वै ||७||
चित्ते 'चिन्तामणि:' साक्षात् पंच चित्त प्रचालक: |
पंच वृत्ति निरोधेन प्राप्यते योग सेवया ||८||
'असंप्रज्ञात' संस्थश्र्च 'गज'शब्दो महामते |
तदेव मस्तकं यस्य देह: सर्वात्मकोऽभवत् ||९||
भ्रान्ति रूपा महामाया सिद्धि: वामाङ्ग संश्रिता |
भ्रांतिधारक रूपा सा बुद्धिश्र्च दक्षिणाङ्गके ||१०||
तयो: स्वामी गणेशश्र्च मायाभ्यां खेलते सदा |
संभजस्व विधानेन सदा संलभसे नृप ||११||

|| ॐ इति श्री ढुण्ढि स्वरूप वर्णन स्तोत्रं संपूर्णम् ||

-------------

|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||   || ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||  || ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||  || ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||  || ॐ गं गणपतये नम: ||
|| ॐ श्री गजानन प्रसन्न ||  || ॐ गं गणपतये नम: ||
----------------------- =============== ------------------------Saturday, July 03, 2021

हे जग, ते जग, माहेर, सासर

 प्रत्येक माणसाला आत्मा किंवा रूह किंवा सोल ( Soul) असतोच असे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये सांगितले आहे. यातल्या रूह किंवा सोलचे स्वरूप नेमके कसे असते हे मला माहीत नाही, पण आत्मा आणि परमात्मा याबद्दल भगवद्गीतेत खूप काही सांगितले आहे. काही सोपी उदाहरणे दिली आहेत. "हा आत्मा अमर असतो, त्याला शस्त्रांनी तोडता येत नाही, आग त्याला जाळू शकत नाही. ..  माणूस कपडे बदलतो त्याप्रमाणे तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जात असतो." यावरील "नैनम् छिन्दन्ति शस्त्राणि नैनम् दहति पावकः । ..  वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि।" वगैरे श्तोक प्रसिद्ध आहेत.  पण या जन्मात केलेल्या पापपुण्याचे गाठोडेही तो आपल्याबरोबर घेऊन जात असतो. याशिवाय त्याच्यासाठी स्वर्ग आणि नरकही आहेत. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांमध्ये पुनर्जन्म नाही, पण जन्नत आणि जहन्नुम, हेवन आणि हेल् (Heaven and Hell) या संकल्पना आहेत.  माणसाने पुण्यकर्मे केलीत तर त्याला स्वर्ग मिळण्याची लालूच आणि त्याने पापे केलीत तर नरकात जायचा धाक दाखवून या तीन्ही धर्मांनी माणसाला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. 

पण असे असले तरी माणसांच्या हातून मोहापायी काही वाईट गोष्टी घडतात आणि देवाकडे परत जायच्या वेळी त्याला त्याची लाज वाटते. तो देवाकडून येतो आणि देवाकडे परत जातो, यावरून काही कवी लोकांना मुलीच्या माहेरी आणि सासरी जाण्याची कल्पना सुचली. देवाचे घर म्हणजे माहेर आणि हे जग म्हणजे सासर अशी ही कल्पना आहे. पाचशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या संत कबीरांनी असे लिहिले आहे:

मेरी चुनरीमें पर लग गयो दाग पिया

पांच तत्त्वकी बनी चुनरिया, सोरहसे बंध लागे पिया...

ये चुनरी मोरे मायकेसे आयी, ससुरेमे मनवा खोये दिया

मल मल धोये, दाग ना छुटे, ग्यानका साबून लाये पिया

कहत कबीर, दाग तब छुटी है, जब साहिब अपनाये लिया

कबीर म्हणतो...  परमेश्वराच्या घरून येताना मी ही पंचमहाभूतांनी बनलेली ओढणी / उपरणे (शरीर) घेऊन आलो... त्यावर सोळा संस्कारांचे विणकाम केले. मूलत: हे उपरणे पवित्र होते...  पण मोहाला बळी पडून मी अनेक पापे केली आणि ते उपरणे पार मलीन करून टाकले. जेव्हा हे लक्षात आले तेव्हा मी रगडून रगडून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. (पुण्य केले) पण काहीच उपयोग झाला नाही. (म्हणून कबीर परमेश्वराकडे प्रार्थना करतो की...) हे पापाचे डाग धुवून काढण्यासाठी ज्ञानाचा साबण दे...

कबीराला माहित होते की याचा फारसा उपयोग होणार नाही. यावर एकमेव उपाय म्हणजे परमेश्वराला शरण जाणे. जेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारेल तेव्हाच हे डाग जातील.


कबीराच्या या दोह्यांच्या आधारावर गीतकार साहिर लुधियानवी यांनी 'दिल ही तो है' या चित्रपटासाठी एक प्रसिद्ध गाणे लिहिले. 

लागा चुनरीमें दाग,  छुपाऊँ कैसे ? घर जाऊँ कैसे?

हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया

जाके बाबुल से नज़रें मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग...


भूल गई सब बचन बिदा के, खो गई मैं ससुराल में आके

जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग...


कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल

वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल

जाके बाबुल से नज़रे मिलाऊँ कैसे, घर जाऊँ कैसे

लागा चुनरी में दाग...

https://www.youtube.com/watch?v=gMT5-nTq5Jo


हे गाणे ऐकल्यावर प्रथमदर्शनी गाण्याचा अर्थ साधा व सरळ वाटतो... पण प्रत्यक्षात हे एक आध्यात्मिक गाणे आहे. 'चुनरी' हे शरीराचे रूपक म्हणून वापरले आहे. परमेश्वराचे घर हे आपले मूळ स्थान. ते आपले माहेर आणि पृथ्वी म्हणजे सासर.  (माझ्या उपरण्याला / ओढणीला डाग पडलेत... हे लपवू कसे?) हे शरीर पवित्र होते. पण अनेक पापं करून मी ते भ्रष्ट करून टाकले आहे. आता परमेश्वराच्या दारी मी कसा जाऊ...?  परमेश्वराच्या घरून पृथ्वीवर येताना मी वचन दिले होते की, मी या शरीराचे पावित्र्य राखीन; पण पृथ्वीवर आल्यानंतर मी हे पार विसरून गेलो... आता परमेश्वराला तोंड कसं दाखवू ?  आत्मा पवित्र आहे, पण त्यावर मायेचे आवरण पडले आहे... (मैल है मायाजाल) ते जग माझे माहेर आहे आणि हे पृथ्वीवरील जग हे सासर आहे. आता माहेरी जाऊन वडिलांना (परमेश्वराला) काय सांगू...?

खरं तर पृथ्वीवर आपण पर्यटकासारखे आहोत. जास्तीत जास्त शंभरएक वर्षे इथे काढायची, सुख-दु:ख उपभोगायची, जीवनाचा आनंद घ्यायचा, त्रास सहन करायचा आणि एक दिवस आपल्या मूळ स्थानी परत जायचे...! तेंव्हा आपल्याला लाज वाटायला नको ना?

संत कबीराच्या दुसऱ्या एका भजनात त्याने सासर माहेरचा उल्लेख केला नाही, पण चादरीचे रूपक घेतले आहे. त्यात ते म्हणतात :

चदरिया झीनी रे झीनी, ये राम नाम रस भीनी

चदरिया झीनी रे झीनी

अष्ट-कमल का चरखा बनाया,  पांच तत्व की पूनी ।

नौ-दस मास बुनन को लागे,  मूरख मैली किन्ही ॥

चदरिया झीनी रे झीनी...

जब मोरी चादर बन घर आई, रंगरेज को दीन्हि ।

ऐसा रंग रंगा रंगरे ने, के लालो लाल कर दीन्हि ॥

चदरिया झीनी रे झीनी...

चादर ओढ़ शंका मत करियो, ये दो दिन तुमको दीन्हि ।

मूरख लोग भेद नहीं जाने, दिन-दिन मैली कीन्हि ॥

चदरिया झीनी रे झीनी...

https://www.youtube.com/watch?v=93zw9h53zmk


कबीराच्या पहिल्या गीतासारख्या अर्थाचे प्रसिद्ध भजनगायक रघुवीर ओम् शरण यांचे एक भजन असे आहे:

मैली चादर ओढ़ के कैसे, द्वार तुम्हारे आऊँ।

हे पावन परमेश्वर मेरे, मन ही मन शरमाऊँ॥


तूमने मुझको जग में भेजा, निर्मल देकर काया।

आकर के संसार में मैंने, इसको दाग लगाया।

जनम् जनम् की मैली चादर, कैसे दाग छुड़ाऊं॥


निर्मल वाणी पाकर तुझसे, नाम न तेरा गाया।

नैन मूंदकर हे परमेश्वर, कभी ना तुझको. ध्याया।

मन वीणा की तारें टूटी, अब क्या गीत सुनाऊँ॥


इन पैरों से चल कर तेरे, मंदिर कभी न आया।

जहां जहां हो पूजा तेरी, कभी ना शीश झुकाया।

हे हरिहर मैं हार के आया, अब क्या हार चढाऊँ

मैली चादर ओढ़ के कैसे  द्वार तुम्हारे आऊँ।।

https://lyricspandits.blogspot.com/2019/07/hari-om-sharan-bhajan-lyrics-hindi.html


साहिर आणि रघुवीर या दोघांच्याही आधी आपल्या कवीवर्य भा.रा.तांबे यांनी असेच एक गर्भित आध्यात्मिक अर्थ असलेले काव्य लिहिले आहे, पण यात सासर आणि माहेर यांची अदलाबदल केली आहे. या गाण्यात इथले जग या माहेरातून निघून परमेश्वराकडे सासरी जायला निघालेला माणूस हा एकाद्या नववधूसारखा बिचकत आहे असे दाखवले आहे. या गीतामध्ये पापपुण्याचा काही संदर्भ येत नाही, फक्त माहेरची ओढ आणि सासरला गेल्यानंतरची किंचित अनिश्चितता यामुळे ही नववधू बावरली आहे.

नववधू प्रिया, मी बावरते;  लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,  कळे तूच आधार सुखा जरि

तुजवाचुनि संसार फुका जरि,  मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा,  सासरि निघता दाटतो गळा,

बागबगीचा, येथला मळा,  सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे  वाटे, बंधन करुनि मोकळे

पळत निघावे तुजजवळ पळे, परि काय करू ? उरि भरभरते

चित्र तुझे घेऊनि उरावरि,  हारतुरे घालिते परोपरि,

छायेवरि संतोष खुळी करि, तू बोलविता परि थरथरते

अता तूच भय-लाज हरी रे !  धीर देउनी ने नवरी रे :

भरोत भरतिल नेत्र जरी रे ! कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

https://www.youtube.com/watch?v=aSMzPWNAD5c


 कवीवर्य भा. रा. तांबे म्हणजे महान प्रतिभेचा कवी. आपल्या कवितेतून त्यांनी मृत्युलाही सुंदर बनवलं. जन्माला आलेला प्रत्येकजण कधी ना कधी मरणारच.तरीही मृत्युला सामोरं जाताना प्रत्येकाच्या जीवाची घालमेल होते. ती व्यक्ती गांगरून जाते, बावरून जाते; अगदी तशीच जशी सासरी जाणारी एखादी नववधू बावरलेली असते. नववधू आणि मृत्यूची चाहूल लागलेली व्यक्ती या दोघांच्या मनातील भावनांचा कल्लोळ खोलवर पोहोचणारा आहे.  भा. रा. तांबेंच्या या कल्पनाविष्कारालाच सलाम करायला हवा.


---

या लेखातले काही भाग मी वॉट्सॅपवरून आलेल्या निरनिराळ्या ढकलपत्रांमधून घेतले आहेत. त्यांच्या मूळ लेखकाचे मनःपूर्वक आभार.