Thursday, August 23, 2012

प्लॅस्टिक - ब्रह्मराक्षस की बागुलबोवा ?

"वाचवा हो, वाचवा या वसुंधरेला ! हा प्लॅस्टिकचा ब्रह्मराक्षस तिला मारायला लागलाय् !" असा आरडाओरडा हल्ली जरा जास्तच ऐकू येतो. अलीकडेच मुखपुस्तकाच्या (फेसबुकच्या) एका पानावर ही आरोळी वाचली आणि तिकडे लक्ष गेले. या पानावर प्लॅस्टिकबद्दल खाली दिलेली माहिती दिली होती.


History of Plastic

First used commercially in 1947,

Relatively expensive until the early 1960s when high-density polyethylene was introduced.

Gained popularity due to their lightweight nature

Relatively low production costs compared with glass bottles.

Food industry has now completely replaced steel n glass with plastic.

Plastic is ruling us….We have become slaves.

--------------------------------------------------------------------What is so bad about plastic…???

Chemical used in plastic bottles that could cause severe health issues is BPA (Bisphenol-A)

What are the potential hazards?

an increase in prostate and breast cancer, uro-genital abnormalities in male babies, early onset of puberty in girls, metabolic disorders including insulin-resistant diabetes, obesity and Neurobehavioral problems. (EWG Guide to BPA)

--------------------------------------------------------------------

How to be careful??

Way to check the grade of plastic:

Resin identification code

(mentioned at the bottom of every bottle)

• 1 - PET (Polyethylene Terephthalate)

• 2 - HDPE (High Density Polyethylene)

• 3 - PVC (Polyvinyl Chloride)

• 4 - LDPE (Low Density Polyethylene)

• 5 - PP (Polypropylene)

• 6 - PS (Polystyrene)

• 7 - Other

USE #5 bottles

Look at the reverse side of bottle or container.

If you find plastic bottles made from #1 or #2 plastic try not to reuse them as they are intended only for single use.

If you are using a #1 plastic water bottle, try to consume the contents as soon as possible because leaching of antimony increases with time.

Never ever use #3 bottles.

ही माहिती खरी असेल तर नक्कीच मार्गदर्शक आहे. माझ्याकडे असलेले अनेक डबे आणि बाटल्या मी उलटसुलट करून पाहिल्या. त्या कोणत्या प्रकारच्या प्लॅस्टिकपासून तयार केल्या आहेत याचे नाव किंवा क्रमांक कुठेच दिसला नाही. त्यामुळे ते वापरतांना कसली काळजी घ्यायची ते काही कळले नाही. शुध्द पाण्याच्या बाटल्यांवर आयएसआय मार्क असतो, पण तो बाटलीसकट त्यातल्या पाण्याला असतो का? माझ्या मते असायला हवा. पण पाणी पिऊन झाल्यानंतर ती बाटली तोडून फोडून टाका असे लिहिले असते. यामागचा मुख्य उद्देश असा असतो की रिकामी बाटली कोणीतरी भलतेसलते पाणी त्यात भरून ते पाणी त्या कंपनीच्या नावाने विकू नये. शिवाय कंपनीच्या मालाचा खप वाढवण्याच्या दृष्टीने जुन्या बाटल्या नष्टच करायला पाहिजेत. पण यात एक अशी गोची आहे की ती मोडून तोडून टाकून दिलेली बाटली पर्यावरणाच्या बोडक्यावर जाऊन बसते. वर दिलेल्या माहितीचा उपयोग करायचा झाला तर ती पॉलीप्रॉपेलिनची असायला पाहिजे. तशी सक्ती या बॉटलिंग कंपन्यांवर केलेली आहे का?एका वाचकाने असा प्रतिसाद दिला होता.

काय आहे हे प्लास्टिक?
 ते कशापासून बनते? जगभरात इतके लोकप्रिय कसे झाले? हानीकारक असूनही त्याचा वापर वाढतच का जातो? हे प्रश्न अनेक लोकांना पडत असतात.

विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाला प्लास्टिकसारखे पदार्थ तयार करणे शक्य झाले. ज्यामध्ये आकर्षकपणा, हाताळण्यास सुलभ, दीर्घायुष्य हे गुणधर्म आहेत. प्लास्टिक अत्यंत घातक असून त्याचे जैविक विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणावर फार दूरगामी दुष्पपरिणाम होत असतात. प्लास्टिक उत्पादन, वापर, पुनर्वापर या सर्व बाबतीत खलनायकाच्या भूमिकेत असते. या विविध टप्प्यांमध्ये हवा, पाणी व पृथ्वी या सर्वासाठी येणारी रसायने, वायू, द्रव्ये हे घातक व प्रकृतीला अपायकारक आहेत. ज्वलनशील असल्यामुळे त्याचा वापर अत्यंत धोकादायकदेखील ठरू शकतो. प्लास्टिक निर्मितीत हवेत सोडले जाणारे इथिलीन ऑक्साईड, बेन्झिन, झायलीन यांच्यामुळे शरीरातल्या मेंदू, किडनी, रक्त व हृदय या भागांवर परिणाम तर होतोच पण, कॅन्सर होण्याचाही संभव असतो.

प्लास्टिक पूर्ण वापरून फेकल्यावर तरी त्यापासून आपल्याला सुटका मिळेल का? तर मुळीच नाही! जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण प्लास्टिकला लागू पडत नाही! फेकून दिल्यावरही प्लास्टिकचे भूत तुमचा (पर्यावरणाचा) पिच्छा सोडत नाही. प्लास्टिकचे व्यवस्थापन, विनियोग निव्वळ काल्पनिक असून जाळून किंवा फेकून दिल्यावरही त्याचा भस्मासूर अधिकच उग्ररूप धारण करतो. अतिउच्च तापमानास विघटन होवून त्याचे अत्यंत हानीकारक असे विषारी वायू पर्यावरणात सोडले जातात. पुनर्निर्मितीद्वारे तयार होणारे प्लास्टिक हलक्या दर्जाचे असते. या प्रक्रियेत वायुप्रदूषण होते. शिवाय ही प्रक्रिया खर्चिकही असते. नुसतेच फेकून दिलेले प्लास्टिक नद्या, नाले, समुद्रात जाऊन पडते व सजीवसृष्टीला त्रासदायक ठरते. बरं, जमिनीत पुरावे तर तेही घातक! त्यातील विषारी घटक जमिनीतून पाण्यात जातात. यामुळे भूजल व जमिनीचा कस यावरही विपरीत परिणाम संभवतात. थोडक्यात, प्लास्टिकचा वापर म्हणजे दूरगामी दुष्पपरिणामांना आमंत्रणच. यावर उपाय म्हणजे प्लास्टिकचा अगदी कमीत-कमी वापर करणे! आपण सर्वानी जेथे जेथे व जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा प्लास्टिकचा वापर निकराने टाळावा.


ही माहिती त्या गृहस्थांनी कुठून मिळवली होती आणि त्यांनी ती किती पडताळून पाहिली होती कोणास ठाऊक, पण त्यांनी सकसकट अवघ्या प्लॅस्टिकविश्वाला मोडीत काढले होते.

या विषयावर माझी मते मी अशी मांडली होती.

Remove plastic and be prepared for a different lifestyle altogether. Just see how many things we get from market are wrapped in plastic bags / bottles. All solid things would be traded loose or wrapped in old newspapers and all liquids in metallic or erathen containers. Who is going to ensure that they are clean? Without plastis there would be no disposable seringes, saline bottles, no implanted lenses after cataract operations. Further no computers, cellphones, So no internet and no facebook. Life would be really as wonderful as it was before 1947.

The problem is not plastic, it is our own foolishness in discarding it carelessly and causing harm to the environment.

आपल्या जीवनांधून प्लॅस्टिकला काढून टाकाल तर एका वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीसाठी तयार रहा. आपल्या घरात येणारे किती पदार्थ प्लॅस्टिकच्या वेष्टनातून येतात ते पहा. यातले घनरूप पदार्थ सुटे किंवा जुन्या (घाणेरड्या) वर्तमानपत्रांमध्ये गुंडाळून मिळतील आणि द्रवरूप पदार्थ धातूंच्या किंवा मातीच्या भांड्यांमधून. ती भांडी स्वच्छ करून ठेवण्याचे काम कोण करणार आहे? (आणि त्यासाठी वापरल्या गेलेल्या डिटर्जंट्समुळे पर्यावरणाची जी हानी होईल त्याचे काय?) प्लॅस्टिक नसेल तर इंजेक्शनच्या सिरिंज, सलाईनच्या बाटल्या, मोतीबिंदूच् ऑपरेशन झाल्यावर डोळ्यात बसवले जाणारे भिंग (अशा असंख्यवस्तू) नसतील. संगणक (काँप्यूटर), भ्रमणध्वनी (सेलफोन), आंतर्जाल (इंटरनेट), मुखपुस्तक (फेसबुक) असले काही काही असणार नाही. आपले जीवन कसे १९४७ च्या पूर्वी होते तसे मजेदार होईल!

प्लॅस्टिक ही आपल्यापुढे उभी ठाकलेली समस्या नाही. आपल्या मूर्खपणामुळे आपण निष्काळजीपणे इकडे तिकडे टाकतो आणि पर्यावरणाची हानी करतो.

प्लॅस्टिकच्या विरोधात अशा प्रकारचा अपप्रचार अलीकडे फार होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की प्लॅस्टिक हे द्रव्य गंजत नाही, कुजत नाही, पाण्यात विरघळत नाही आणि कुठल्याचा मार्गाने आपल्या अन्नपदार्थांच्या साखळीत ते येत नाही, त्याचा कण चुकून पोटात गेला तरी तो पचत नाही आणि आपल्या शरीरातून उत्सर्जित केला जातो. हीच गोष्ट वनस्पतींच्या बाबतीत आहे. झाडावर किंवा त्याच्या मुळाशी प्लॅस्टिक टाकले तर त्यामुळे ते मरत नाही. त्यामुळे प्लॅस्टिकला विषारी म्हणता येणार नाही. कँसर, लिव्हर, किडनी, मेंदू वगैरेंबद्दल जे सांगितले जाते ते इतर अनेक रासायनिक पदार्थांच्या बाबतीत, विशेषतः खते, जंतूनाशके, रंग, स्फोटके, सौंदर्यप्रसाधने, साबण वगैरेंच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणात लागू आहे आणि त्यांचे प्रत्यक्ष परिणाम दिसतात. प्लॅस्टिकच्या उपयोगाने खाद्यपदार्थ जास्त काळ टिकवणे आणि रोगजंतूंचा संसर्ग टाळणे शक्य झाले आहे. त्यामुळे आरोग्यरक्षणाला त्याची मदतच झाली आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर थेट प्रभाव पडत नाही. प्लॅस्टिकच्या दीर्घायुष्यामुळे त्याची विल्हेवाट लागत नाही, ते साचून राहते, पाण्याच्या प्रवाहाला त्याचा अडथळा होतो, अशा प्रकारचे दुष्परिणाम होतात. प्लॅस्टिकच्या पदार्थांचा वापर करतांना योग्य ती शिस्त बाळगली तर हे टाळता येण्याजोगे आहे आणि पाश्चिमात्य देशात प्लॅस्टिकचा उपयोग आपल्या देशापेक्षाही जास्त होत असला तरी त्याचे पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळले जातात.

मी प्लॅस्टिकचा कारखानदार किंवा व्यापारी नाही आणि माझे त्यात कसलेही हितसंबंध नाहीत हे स्पष्ट करू इच्छितो. केवळ अपप्रचाराला बळी पडून प्लॅस्टिकसारख्या अत्यंत उपयुक्त पदार्थाचा सरसकट त्याग करणे आपल्या हिताचे नाही. समतोल बुध्दीने विचार करावा. मीसुध्दा ओल्डफॅशन्ड कापडाच्या पिशव्या घेऊन खरेदीला जातो, दुकानदाराकडे कॅरीबॅग्ज मागत नाही आणि आलेल्या पिशव्या इतस्ततः भिरकावून देत नाही. प्लॅस्टिकला नाक मुरडणारे लोक पत्र्याच्या ट्रंका आणि पितळेचा फिरकीचा तांब्या घेऊन प्रवासाला निघणार आहेत का?

प्लॅस्टिक हे वरदान आहे की अभिशाप?

Wednesday, August 15, 2012

स्मृती ठेवुनी जाती - विलासराव देशमुख

राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून मी नेहमी कोसभर दूर रहात आलो आहे. आजवर मी कधीच मंत्रालयात प्रवेशही केला नाही किंवा माझ्या ओळखीतले कोणी तिथे जात नाही. लातूर शहराचे नाव मी फक्त वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर वाचले किंवा ऐकले आहे. त्यामुळे विलासरावजींचा माझा कधीच परिचय झाला नव्हता, योगायोगानेसुध्दा मी कधीच त्यांच्या संपर्कात आलो नव्हतो. तरीसुध्दा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत चेन्नाईच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे हे ऐकून मला चिंता वाटू लागली आणि काल त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून वाईट वाटले, आपण काही तरी गमावले आहे असे वाटले. काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्या लिहून काढाव्या असे वाटले. विलासरावांच्या राजकीय कारकिर्दीबद्दलच्या लेखांनी आजची सर्व वर्तमानपत्रे भरून गेली आहेत, त्यात भर टाकण्यासारखे माझ्याकडे काही नाही आणि त्यांच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल मला कधीच कसली माहिती नव्हती. माझ्या स्वतःच्याच स्मृतीमधील विलासरावांबद्दल मी लिहू शकेन.
तीस बत्तीस वर्षांपूर्वी वेल्डिंग या विषयावरील एका सेमिनारला मी हाजीअलीजवळच्या एका सभागृहात गेलो होतो. त्याच्या उद्घाटनाला एक मंत्री येणार आहेत असे ऐकले. ते महाशय वेळेवर येणार नाहीत, सावकाशपणे ते आल्यानंतर त्यांचे स्वागत, त्यांची हाँजीहाँजी, त्यांचा सत्कार, त्यांचे कंटाळवाणे भाषण वगैरेमध्ये बराचसा वेळ निघून जाईल आणि सेमिनारचे वेळापत्रक कोलमडून पडेल अशी भीती मला वाटत होती आणि आजूबाजूची अनुभवी मंडळी तसेच बोलत होती. पण त्या दिवशीचे प्रमुख पाहुणे असलेले विलासराव देशमुख (त्या वेळी ते बहुधा बांधकामखाते सांभाळत असावेत) तेवढ्यात येऊन पोचले. सत्कारासारख्या नॉनटेक्निकल बाबीवर वेळ घालवायचा नाही असे बहुधा त्यांनीच बजावले असावे. कसलीही फापटपसारा न लावता तो समारंभ अगदी थोडक्यात आटोपला. त्या दिवशी विलासरावाच्या घशाला जबरदस्त इन्फेक्शन झाले असल्यामुळे ते स्वतः बोलू शकत नव्हते, पण त्यांचे छोटेसे भाषण वाचून दाखवले गेले, ते मुद्याला धरून आणि सेमिनारच्या विषयाशी सुसंगत होते. कधी कधी अशी भाषणे लिहिणारे घोस्ट राइटर्स असतात ही गोष्ट मला त्यावेळी माहीत नव्हती, त्यामुळे ते विलासरावांनीच लिहिले असणार असे समजून मी खूप इम्प्रेस्ड झालो होतो. त्यांचे हसरे आणि उमदे व्यक्तीमत्व, देहबोलीमधून व्यक्त होणारे भाव वगैरेंमुळे माझ्यावर त्यांचा चांगला प्रभाव पडला आणि ते फर्स्ट इम्प्रेशन टिकून राहिले.
एकदा योजना प्रतिष्ठानच्या एका सांगीतिक कार्यक्रमाला मी दादरच्या शिवाजी मंदिरात गेलो होतो. त्याच इमारतीतील दुस-या एका सभागृहातल्या कार्यक्रमाला किंवा बैठकीला विलासराव आले होते. हे समजताच प्रतिष्ठानच्या संयोजकांनी त्यांना या कार्यक्रमालाही भेट देण्याची विनंती केली आणि ती स्वीकारून विलासराव तिथे आले, थोडा वेळ बसले आणि सत्कारसमारंभात दोन शब्द बोलले. नेत्याने लोकाभिमुख कसे असायला हवे याचे एक उदाहरण पहायला मिळाले. त्या वेळी ते बहुधा मुख्यमंत्रीपदावर नव्हते, पण व्हीआयपी नक्कीच होते. त्यानंतर एकदा एक मोठे परदेशी पाहुणे बीएआरसीला भेट देण्यासाठी आले असतांना त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख प्रोटोकॉलनुसार त्यांच्यासोबत आले होते आणि औपचारिक चार शब्द बोलले होते. या सर्व कार्यक्रमाला मी एक सर्वसामान्य प्रेक्षक होतो आणि विलासराव रंगमंचावर दिमाखात वावरत होते. त्यांचे बोलणे, चालणे, हसणे या सगळ्यात ऐट दिसायची पण अहंमन्यता किंवा मिजास दिसली नाही. त्यात एक प्रकारचा सुसंस्कृतपणा होता.

राजकीय क्षेत्रात उच्चपदावर गेल्यानंतर त्यांचे टेलिव्हिजनवर वेळोवेळी दिसणे अपरिहार्य होते. त्यांची भाषणे, मुलाखती वगैरेमधून त्यांचे वाक्चातुर्य, हजरजबाबीपणा वगैरे गुण दिसून येत होते. त्यांना उत्तम विनोदबुध्दी होतीच, राजकारणी लोकांचा उपहास करणे हा मराठी रंगमंचावरला आवडता विषय आहे. पण अशा वेळीसुध्दा समोरच्या रांगेत बसलेले विलासराव संतापत नसत किंवा नाराजी व्यक्त करत नसत, उलट असा विनोदांनासुध्दा हसून दाद देत असत. चर्चांमध्ये आलेले काही संवेदनशील विषय ते गंमतीत टोलवून लावत असत. एका राजकीय नेत्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण व संघटनकौशल्य आणि मंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे वाहण्यासाठी लागणारे प्रशासनकौशल्य हे गुण त्यांना सढळ हाताने मिळाले असणार. त्यामुळेच इतकी वर्षे त्यांनी आपले स्थान सांभाळले होते. या गुणांची झलकसुध्दा त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसून यायची.

त्यांचा मुलगा रितेश सिनेक्षेत्रात आला आणि त्यासंबंधित अॅवॉर्ड्स फंक्शन्सचे संचालन करू लागला तेंव्हा काही वेळा विलासरावसुध्दा काही क्षणांसाठी तिथे आलेले दिसायचे. राज्याचा मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्रीमंडळाचे वरिष्ठ सदस्य असतांना अशा कार्यक्रमाला हजर राहण्यात त्यांना कमीपणा वाटत नव्हता आणि मंचावर चालत असलेले चाळे पहातांना एंबरॅसमेंट होत नव्हती, याचेच आमहाला थोडे नवल वाटायचे. पण हा सुध्दा त्याच्या मनाच्या मोठेपणाचाच एक भाग होता.
एकंदरीतच पाहता विलासरावांनी असंख्य लोकांच्या मनात स्वतःची जागा बनवली होती, त्यामुळेच त्यांच्या अकाली निधनाने त्यांना धक्का बसला. विलासराव देशमुख ही व्यक्ती आता पंचत्वार विलीन झालेली असली तरी त्यांच्या स्मृती शिल्लक राहणार आहेत. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.

Tuesday, August 14, 2012

अधिक महिना

Monday, August 13, 2012


अधिक महिना (पूर्वार्ध)

"या वर्षी दिवाळी नोव्हेंबर महिन्यात येते आहे, मागच्या वर्षी ती ऑक्टोबरमध्ये आली होती."


"ती अशीच आलटून पालटून कधी ऑक्टोबरमध्ये तर कधी नोव्हेंबरमध्ये येत असते." मी.

"ते तरी ठीक आहे, पण रमजानचा महिना तर काही वर्षांपूर्वी नवरात्रात आला होता, नंतर तो गणेशोत्सवाच्या वेळेला आला आणि या वर्षी आपल्या श्रावण महिन्याबरोबर आला आहे."

"आणि पुढच्या वर्षी तो आषाढात येणार आहे." मी.

"अलीकडे पावसाचा सुध्दा काहीच नेम राहिला नाही. यंदा सगळा आषाढ महिना कोरडा गेला आणि आता श्रावणात तो धो धो कोसळतोय्."

"यंदा पावसाला थोडा उशीर झाला आहे, पण आपला श्रावण महिनाही बराच आधी आला आहे. पुढच्या वर्षी बघा आषाढातच पाऊस येईल, कदाचित ज्येष्ठातही सुरू होईल." मी.

"तुम्ही असे कशावरून म्हणता?"

"कारण या वर्षातला पुढचा महिना अधिक महिना आहे, त्यामुळे पुढल्या वर्षी आषाढ महिना उशीरा येणार आहे." मी.

"हा अधिक मास सुध्दा वाटेल तेंव्हा येत असतो. हा कधी अचानक उपटेल त्याचा काही नेमच नाही."

"असं नाही बरं. तो केंव्हा आणि कशासाठी येतो याचे अत्यंत काटेकोर असे गणित आहे" मी.


अशा प्रकारचे संवाद होत असतात. वर आलेल्या तीन्ही विसंगतींचे कारण एकच आहे, ते म्हणजे आठवडाभरात येऊ घातलेला अधिक महिना. हा अधिक महिना का आणि कधी येतो हे समजून घेण्यासाठी महिना म्हणजे काय हे आधी पहायला लागेल. श्रावण, रमजान आणि ऑगस्ट हे महिने त्यांच्या आपापल्या कालगणनांच्या पध्दतींनुसार ठराविक वेळीच येत असतात, पण या पध्दती निरनिराळ्या असल्यामुळे त्यांच्यात फरक येतो.

आज आपल्या घरातल्या भिंतीवर, टेबलावर, डायरीमध्ये किंवा पाकिटात एकादे कॅलेंडर असते आणि आपण नेहमी त्यात महिना आणि तारीख पहात असतो. पण जेंव्हा छापखानेच नव्हते आणि लोकांच्याकडे अशी छापील कॅलेंडरे नसायची त्या काळातले लोक काय करत असतील? त्या काळातले लोक नोकरीसाठी रोज ऑफीसात किंवा कारखान्यात जात नव्हते, त्यांना महिन्याच्या एक तारखेला पगार मिळत नसे, त्यांना ठराविक तारखेच्या आत विजेचे बिल, टेलीफोनचे बिल, विम्याचे हप्ते भरावे लागत नव्हते, ते रेल्वेचे रिझर्व्हेशन करत नव्हते, सिनेमाची तिकीटे काढत नव्हते वगैरे वगैरे पाहता त्यांच्या रोजच्या जीवनात कॅलेंडरवाचून त्यांचे काहीच अडत नव्हते. पण माणसाला त्याच्या आयुष्यात पूर्वी होऊन गेलेल्या घटनांच्या आठवणी असतात, त्याही आधी काय घडून गेले हे जाणून घेण्याची इच्छा असते, पुढे येणा-या काळासाठी त्यांच्या मनात काही योजना असतात, पुढे काय होणार आहे याबद्दल उत्सुकता असते. या गोष्टी क्रमानुसार कळण्यासाठी वेळेचा संदर्भ आवश्यक असतो. असा संदर्भ सर्वांना सहजपणे कळावा या उद्देशाने निसर्गातील घटनांच्या आधारे तो ठरवण्याच्या निरनिराळ्या पध्दती प्रचलित झाल्या.


सूर्यनारायण रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि संध्याकाळी पश्चिमेला मावळतो असे ढोबळपणे म्हंटले जाते. पण सकाळी ज्या डोंगरामधून तो वर येतांना दिसतो तिथली त्याच्या उगवण्याची विवक्षित जागा आणि संध्याकाळी ज्या ठिकाणी तो क्षितीजाला टेकतो ती त्याची मावळण्याची जागा या दोन्ही नेमक्या जागा रोज किंचित बदलत असतात. वर्षातले सहा महिने त्या हळूहळू उत्तरेकडे सरकत जातात आणि सहा महिने दक्षिणेकडे सरकत असतात. यामुळे बरोबर एका वर्षानंतर त्या नेमक्या मूळ ठिकाणी परत येतात. याशिवाय पहाटे सूर्योदयाच्या आधी आणि रात्री सूर्य मावळल्यानंतर जे तारकासमूह आकाशात दिसतात त्यातसुध्दा रोज थोडा पण निश्चित स्वरूपाचा बदल होत असतो. या सर्वांचा बारकाईने अभ्यास करून पूर्वीच्या काळातल्या पाश्चात्य विद्वानांनी प्रत्येकी सुमारे ३०-३१ दिवसांचे बारा महिने असलेले कॅलेडर तयार केले आणि त्यात लीप इय़रचे नियम वगैरे सुधारणा करून ते अचूक बनवले. युरोपियन लोकांनी जगभर साम्राज्ये स्थापन करतांना हे कॅलेंडर आपल्यासोबत नेले आणि जगभरातील लोक त्याचा वापर करू लागले. आपणही रोजच्या जीवनात याचाच उपयोग करतो. हे कॅलेंडर सौर पध्दतीचे म्हणजेच पूर्णपणे सूर्याच्या निरीक्षणावर आधारलेले असते. या कॅलेंडरमधील वर्षाच्या किंवा त्यातील कोणत्याही महिन्याच्या पहिल्या तारखेला आकाशात काहीच विशेष लक्षणीय असे घडत नाही. त्यामुळे हे थोडेसे अवैज्ञानिक वाटण्याची शक्यता आहे. पण सूर्याच्या उन्हातून पृथ्वीला जी ऊर्जा मिळते त्यानुसारच उन्हाळा, हिंवाळा वगैरे ऋतू ठरतात. त्यामुळे या कॅलेंडरनुसार पृथ्वीवरील ऋतूचक्र अचूकपणे चालत असते. वर्षामधील सर्वात मोठा दिवस, सर्वात मोठी रात्र आणि बारा बारा तासांचे दोन समान दिवसरात्र या कॅलेंडरनुसार ठराविक तारखेलाच येतात. शिवाय वापरासाठी ते सोपे असल्यामुळे सर्वमान्य झाले आहे

सौर काल गणनेनुसार पृथ्वीवरील ऋतूचक्र चालतांना दिसते, पण सूर्याच्या बाबतीत दररोज होत असलेले दृष्य बदल फार सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाला ते समजणार नाहीत. त्या मानाने चंद्राचे उगवणे रोजच आदल्या दिवसाच्या मानाने दोन घटकांनी उशीरा होत असते, त्यामुळे त्याच्या आजूबाजूला दिसणाऱ्या चांदण्यांचे समूह (नक्षत्रे) रोज बदलत असतात, तसेच चंद्राचा आकार रोज कलेकलेने बदलत असतो. चंद्राची उगवण्याची वेळ, त्याच्या सोबत दिसणारे नक्षत्र आणि चंद्राच्या कला यांचा विचार करून आणि त्यात रोज घडत असलेला फरक पाहून महिन्यामधील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य निश्चित करता येते. दर महिन्यात अमावास्येच्या रात्री चंद्र उगवतच नाही आणि दिवसाही तो दिसत नाही. त्यानंतर रोज कलेकलेने वाढत पंधरा दिवसांनी तो पौर्णिमेला पूर्ण वर्तुळाकार दिसतो आणि त्यानंतर कलेकलेने लहान होत अमावास्येला पूर्णपणे अदृष्य होतो. अशा रीतीने एक महिना पूर्ण होतो आणि पुढील प्रत्येक महिन्यातसुध्दा चंद्राच्या कला याच क्रमाने वाढत किंवा घटत राहतात. अशा सुमारे तीस दिवसांचा एक महिना होतो. एका सौर वर्षात बारा चांद्र महिने येतात. अरबस्थानात अशा प्रकारचे (चांद्र) ल्यूनर कॅलेंडर अवलंबले गेले आणि प्रचलित झाले. या कालगणनेसाठी किचकट गणिते मांडून ती सोडवायची गरज नसते. काळ्याकुट्ट अमावास्येनंतर ज्या संध्याकाळी चंद्र दिसेल त्या दिवसापासून नवा महिना सुरू होतो आणि पुन्हा असेच नवचंद्रदर्शन घडेपर्यंत तो महिना चालत राहतो. असे बारा महिने होऊन गेले की नवे वर्ष सुरू होते. मुस्लिम धर्मीय आजतागायत या हिजरी कॅलेंडरचा उपयोग करतात.
प्राचीन काळातील भारतीय विद्वानांनी आकाशात घडत असलेल्या सर्वच घटनांचे खूपच बारकाईने निरीक्षण करून सौर आणि चांद्र अशा दोन कालगणना विकसित केल्या. पृथ्वीवरील आपल्या जागेवरूनच आकाशातले चंद्र आणि सूर्य कोणत्या वेळी कसे आणि कुठे दिसतात यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्या माहितीचा उपयोग या दोन प्रकारच्या कालगणनेसाठी केला गेला. आकाशस्थ ग्रहताऱ्यांचे निरीक्षण आणि त्याचा कालगणनेशी जोडलेला संबंध हे काम त्यात निष्णात असलेल्या तज्ज्ञांकडे गेल्यानंतर त्यांनी ते अचूक बनवण्याच्या दृष्टीने त्यात प्रचंड गुंतागुंत निर्माण केली. वर्तुळाकार आकाशाचे त्यांनी बारा समान भागात (राशीत) विभाजन केले तसेच त्याचीच सत्तावीस भागात वेगळ्या प्रकारे वाटणी करून प्रत्येक भाग म्हणजे एक नक्षत्र असे त्या भागांचे नामांकन केले. आकाशाच्या त्या भागात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या समूहांच्या आकारावरून त्यांना मेष, वृषभ आदि बारा राशी आणि अश्विनी, भरणी वगैरे सत्तावीस नक्षत्रांची नावे दिली. रात्रीच्या वेळी ही नक्षत्रे आणि राशी दिसतात आणि ओळखता येतात, तसेच चंद्राच्या आजूबाजूला दिसणाऱ्या ताऱ्यांवरून त्या क्षणी तो कोणत्या नक्षत्रात किंवा राशीत आहे ते समजते. त्यांनी प्रत्येक राशीत तीस अंश, प्रत्येक अंशाचे साठ भाग (कला), त्यातील प्रत्येक भागाचे पुन्हा साठ भाग(विकला) करून त्यानुसार अतीशय सूक्ष्म निरीक्षणे आणि त्याची आकडेमोड केली आणि आपल्याला दिसणारे चंद्राचे आकाशातील भ्रमण त्यांनी अचूकपणे समजून घेतले. त्या माहितीच्या आधाराने महिन्यामधील तिथी निश्चित केल्या, तसेच कोणत्या क्षणी चंद्र एका नक्षत्रामधून बाहेर पडून दुसऱ्या नक्षत्रात किंवा एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो याचे गणित मांडले. ही सर्व माहिती पंचांगात दिलेली असते.

पाश्चिमात्य कालगणनेच्या पध्दतीत मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, आपल्याला ही वेळ घड्याळ पाहूनच समजते कारण त्या क्षणी आभाळात काहीच घडत नाही. पण भारतीय पद्धत थोडी गुंतागुंतीची आहे. आपला दिवस कोणालाही सहजपणे दिसणाऱ्या सूर्योदयापासून सुरू होतो आणि त्या क्षणी जी तिथी चाललेली असते ती त्या दिवसाची तिथी मानली जाते. अर्थातच तिथीची व्याख्या वेगळ्या प्रकारे केली जाते. ती सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीची तुलना करून ठरते. आकाशात दिसणारे सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे हे सारेच पूर्वेला उगवतात आणि पश्चिमेला मावळतात असे असले तरी पूर्वेच्या क्षितिजाकडून पश्चिमेच्या क्षितिजापर्यंतचा त्यांचा प्रवास एकमेकांच्या सोबतीने समान गतीने होत नाही. तारकामंडळाच्या तुलनेत सूर्य किंचित धीम्या गतीने जात दररोज सुमारे एका अंशाने मागे पडत जातो तर चंद्रमा सूर्यापेक्षाही थोडा संथ गतीने जात दिवसाकाठी सुमारे तेरा अंशाने मागे राहतो. आपल्याला आभाळातले तारकामंडळ पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते असे दिसते, पण ते जागच्या जागी स्थिर आहे असे गृहीत धरले (तसे ते आहेच), तर त्याच्या तुलनेत सूर्य आणि चंद्र हे दोघेही हळूहळू पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असतात. ज्या वेळी चंद्र बारा अंशाने सूर्याच्या पुढे जातो तेंव्हा तिथि बदलते. ही गोष्ट दिवसा किंवा रात्री आणि चंद्र व सूर्य आकाशात असतांना किंवा नसतांना कोणत्याही वेळी घडू शकते.

नभोमंडळाची बारा राशी आणि सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागणी केलेली असल्यामुळे सूर्य, चंद्र (आणि इतर ग्रह) या राशी व नक्षत्रांमधून प्रवास करतांना आपल्याला दिसतात. या प्रवासात चंद्राचा वेग सूर्याच्या जवळ जवळ तेरा पट इतका जास्त असतो. त्यामुळे एक वर्ष इतक्या कालावधीत सूर्य जेंव्हा एक फेरी पूर्ण करतो तेवढ्यात चंद्राने तेरापेक्षा जास्त घिरट्या घातलेल्या असतात. एकाद्या लहानशा वर्तुळाकार मैदानाच्या कडेकडेने एक माणूस पायी फेऱ्या घालत असेल आणि त्याच रस्त्याने दुसरा माणूस सायकलवर बसून फेऱ्या मारत असेल, तर तो माणूस पायी चालत जाणाऱ्या माणसाला वारंवार ओव्हरटेक करत राहील. त्याचप्रमाणे दर महिन्यात अमावास्येला सूर्याला ओव्हरटेक करून चंद्र पुढे जात असतो. अशा दोन ओव्हरटेकिंगच्या मधला काळ हा भारतीय पंचांगानुसार एक चांद्र महिना असतो.

प्राचीन भारतीयांनी वेगळी सौर कालगणनासुध्दा तयार केली होती. सूर्याने मेष राशीत प्रवेश केल्याने वर्षाचा पहिला महिना, वृषभ राशीत जाताच दुसरा असे करीत मीन रास पार केल्यानंतर बारावा महिना आणि ते वर्ष संपते. अशा प्रकारचे पंचांग भारताच्या काही भागात आजसुध्दा वापरात आहे. केरळीय लोकांचे सौर वर्ष ओणमला सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश केल्याने सुरू होते आणि बारा महिन्यानंतर बदलते. भारताच्या बहुतांश भागात उपयोगात येत असलेल्या पंचांगात चांद्र आणि सौर पध्दतींचा समन्वय करून दोन्हींमधील फायद्यांचा लाभ उठवला आहे. हे साधण्यासाठी अधिकमास जोडला जातो. याबद्दल सविस्तर माहिती उत्तरार्धात अवश्य वाचावी.   . . . . . . . ............................... (क्रमशः)


अधिक महिना (उत्तरार्ध)


पृथ्वीच्या सूर्याभोवती होत असलेल्या भ्रमणामुळे वर्षभराचे ऋतूचक्र निर्माण होते, चंद्राच्या पृथ्वीप्रदक्षिणेमुळे महिन्यामधील अमावास्या, पौर्णिमा वगैरे होतात आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे आता आपल्याला चांगले माहीत झाले आहे, पण पृथ्वी आणि चंद्र यांचे हे अवकाशामधले फिरणे आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकत नाही. चंद्र, सूर्य आणि ग्रह, तारे पृथ्वीवरून जसे दिसतात त्याचेच निरीक्षण करणे शक्य असते आणि त्यांच्या अभ्यासामधून आणि त्याच्या विश्लेषणातूनच शास्त्रज्ञांनी वरील निष्कर्ष काढले. प्राचीन काळात जेंव्हा कालगणनांचा विकास होत होता तेंव्हा या गोष्टी सर्वश्रुत झालेल्या नव्हत्या. पण त्या काळातील विद्वानांनी तयार केलेल्या पंचांगाचे आकलन होण्यात आपल्याला अलीकडील वैज्ञानिकांच्या संशोधनाचा उपयोग होतो.

पृथ्वीचे स्वतःभोवती फिरकी घेणे सतत एकाच गतीने होत असते आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणजे एक दिवस धरून त्या वेळेचे तास, मिनिटे, सेकंद किंवा प्रहर, घटिका, पळे, विपळे वगैरेंमध्ये विभाजन केले आहे. पृथ्वीला सूर्यप्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे ३६५ दिवस आणि ६ तास इतका आहे. अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळरेषेत येतात. त्या दिवसापासून सुरू झालेली चंद्राची पृथ्वीप्रदक्षिणा सुमारे सव्वासत्तावीस दिवसात पूर्ण होत असते. पण तेवढ्या काळात सूर्याभोवती फिरतांना पृथ्वी पुढे सरकली असल्यामुळे सूर्य आणि पृथ्वी यांच्या सरळरेषेत येण्यासाठी चंद्राला आणखी दोन दिवस लागतात. त्यामुळे अमावास्या ते अमावास्या होणारा चांद्र महिना सुमारे साडेएकोणतीस दिवस एवढा असतो. (प्रत्यक्ष कालावधींमध्ये यात काही सूक्ष्म फरक आहेत, पण ते या लेखासाठी महत्वाचे नाहीत.) एक महिन्याचा कालावधी दिवसांच्या पटीत नसतो आणि एक वर्षाचा कालावधी महिन्यांच्या कालावधीच्या पटीत नसतो. साडेएकोणतीस दिवसांचा चांद्रमास कधी तीस दिवसांचा आणि कधी एकोणतीस दिवसांचा धरावा लागतो आणि अशा बारा महिन्यांचा कालावधी फक्त ३५४ दिवस एवढाच होतो. एवढ्या काळात बारा महिन्यांच्या बारा अमावास्या येऊन जातात, पण सौर वर्ष संपायला अजून सव्वाअकरा दिवस शिल्लक असतात. तेवढ्या काळात पुढील चांद्रवर्ष सुरू होऊन जाते. ते संपेपर्यंत हा फरक साडेबावीस दिवसांचा होतो, तीन वर्षांच्या काळात तो एक महिन्यापेक्षा जास्त होतो आणि सात आठ वर्षांमध्ये महिना आणि ऋतू यांच्यातला संबंध संपून जातो. या कारणामुळे रमझानचा महिना कधी उन्हाळ्यात, कधी पावसाळ्यात, तर कधी थंडीच्या दिवसात येऊ शकतो.

आपला श्रावण महिना मात्र नेहमी पावसाळ्यातच येतो, कारण चांद्र आणि सौर पध्दतींमधला हा फरक एक महिना एवढा झाला की लगेच एक अधिकमास घेऊन शून्यावर आणला जातो. हे कसे करायचे, अधिक महिना केंव्हा पाळायचा, हे ठरवण्याची सुव्यवस्थित पध्दत पुढीलप्रमाणे आहे. पाश्चात्य पध्दतीत रोज मध्यरात्री बारा वाजता तारीख बदलते, पण भारतीय पध्दतीत सूर्याच्या तुलनेत चंद्र १२ अंशाने पुढे जातो तेंव्हा तिथी बदलते. हा क्रिया दिवसा, रात्री, सकाळी, संध्याकाळी वगैरे केंव्हाही होऊ शकते, त्यामुळे पंचांगामधली तिथी त्यानुसार केंव्हाही लागते किंवा संपते. असा पंधरा तिथींचा शुक्लपक्ष आणि पंधरा तिथींचा कृष्णपक्ष हे दोन्ही मिळून एक महिना होतो. तो सुमारे साडेएकोणतीस दिवसांचा असतो. पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्याही कक्षा लंबवर्तुळाकार (एलिप्टिकल) आहेत आणि त्यांच्या भ्रमणाची गती किंचित कमीअधिक होत असते, त्यामुळे चंद्राला सूर्याच्या पुढे १२ अंश जाण्यासाठी लागणारा वेळ समान नसतो. पाश्चिमात्य पध्दतीतला प्रत्येक दिवस हा बरोबर चोवीस तासांचाच असतो तर भारतीय पध्दतीमधील तिथीचा काळ कमी जास्त (बहुतेक वेळा २४ तासांपेक्षा कमीच) होत असतो.
खरे तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, पण आपण पृथ्वीवर रहात असल्यामुळे आपल्याला सूर्यच राशीचक्रामधून फिरतो असे वाटते. एका वर्षात तो बारा राशींमधून फिरून येत असतो. प्रत्येक राशीमधील त्याचा भ्रमणकाल एक महिना (३०-३१ दिवस) एवढा असतो. पण चांद्रमहिन्याचा काळ साडेएकोणतीस दिवस एवढाच असतो. त्यामुळे सूर्याने एका राशीत शुध्द प्रतीपदेला प्रवेश केला असेल तर तो महिना संपून गेला आणि पुढील महिना सुरू होऊन गेला तरी सूर्य त्याच राशीत असतो. शुक्ल प्रतीपदेला सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्या महिन्याचे नाव ठरत असते. पण चंद्राचा महिना बदलला तरी सूर्याची रास तीच असेल तर त्या महिन्याला पुढील महिन्याचे नाव देतांना 'अधिक' असे विशेषण लावले जाते. येत्या १८ ऑगस्टला सुरू होणारा महिना 'अधिक भाद्रपद' मानला जाईल. तो महिना सुरू असतांना सूर्याने पुढील राशीत प्रवेश केला असेल आणि पुढल्या महिन्याच्या शुक्ल प्रतीपदेला तो त्या राशीत असल्यामुळे त्याप्रमाणे १६ सप्टेंबरला सुरू होणारा महिना भाद्रपद असेल. त्याला 'निज भाद्रपद' असे म्हणतील.
अधिक महिन्यामध्ये कोणतेही नेहमीचे सणवार साजरे केले जात नाहीत. भाद्रपद महिन्यातले हरतालिका आणि गणेशचतुर्थी यासारखे सण व उत्सव 'निज' भाद्रपदात सप्टेंबरमध्ये पाळले जाणार आहेत. अधिक महिन्यात लग्नाचे मुहूर्तही नसतात. पूर्वी चातुर्मासातसुध्दा ते नसत. या वेळचा अधिक महिना चातुर्मासात आल्यामुळे या वेळचा चातुर्मासाचा व्रतकाळ पाच महिने चालणार आहे. सुमुहर्त पाहून शुभमंगल करणा-या लोकांना त्यासाठी पाच महिने वाट पहावी लागणार आहे. शेषशायी विष्णूभगवान या वर्षी पाच महिने सुखनिद्गा घेणार आहेत. 'अधिक' महिन्यामध्ये काही लोक वेगळे नेमधर्म धरतात आणि 'अधिकस्य अधिकम् फलम्' म्हणून त्यातून जास्त फलप्राप्ती व्हावी असा त्यांचा विश्वास असतो. अधिक महिन्याबद्दल अशी कथा आहे की पुराणकाळात अधिक महिना विष्णूभगवानांच्याकडे गेला आणि आपल्याला नेहमी इतर कोणा महिन्याच्या नावाने ओळखले जाते याबद्दल त्याने रोष व्यक्त केला. त्याची समजूत घालण्यासाठी "माझेच पुरुषोत्तम हे नाव मी तुला देतो." असा वर विष्णूने त्याला दिला. तेंव्हापासून अधिक महिन्याला 'पुरुषोत्तममास' असेही म्हणू लागले.

बहुतेक सर्व पंचांगांप्रमाणे १८ ऑगस्टला अधिक महिना येत असला तरी काही पंचांगात तो येणार नाही किंवा कदाचित आधीच येऊन गेला असेल. त्यानुसार चालणा-या लोकांचे सणवार वेगळ्या दिवशी साजरे होतात. त्या दिवशी त्यांना सुटी मिळत नाही आणि जेंव्हा सुटी असते तेंव्हा त्यांचेकडे उत्सव नसतात. यामुळे आजकाल अशा पंचांगांचे अनुकरण करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. हा फरक का येतो यालाही शास्त्रीय कारण आहे. राशी, नक्षत्रे वगैरेंच्या सीमारेखा आकाशात आखून ठेवलेल्या नाहीत आणि चंद्र किंवा सूर्याने या राशीतून त्या राशीत प्रवेश केलेला आपण तपासून पाहू शकत नाही. या सीमा काल्पनिक आहेत आणि वेगवेगळ्या विद्वानांनी त्यांच्या गणितानुसार त्या ठरवल्या असल्यामुळे त्यात किंचित फरक असतो. माझ्या लहानपणी टिळक पंचांगाप्रमाणे मकर संक्रांत १० जानेवारीला येत असे आणि दाते पंचांगानुसार ती १४ जानेवारीला येत असे (हल्ली १५ जानेवारीला येते), म्हणजे या संक्रमणात चार दिवसांचा फरक होता. अर्थातच अधिक महिना कोणता हे ठरवतांना यामुळे निश्चितपणे फरक येणारच.
दिवसातून ठराविक वेळ चालणारी ऑफिसे पूर्वीच्या काळी नव्हती, तसेच दर महिन्याला पगार देण्याची पध्दतही नव्हती. राजाच्या पदरी असलेल्या लोकांना वर्षासने मिळत आणि खेड्यातील बारा बलुतेदारांना दिवाळी किंवा होळीसारख्या सणाला धान्यधून्य मिळत असे. पीकपाण्याच्या आणेवारीनुसार दुष्काळाच्या वर्षी त्यात कपातही होत असे. वर्षातून एक दोन वेळा जे मिळेल त्यावरच पुढील बारा महिने गुजराण करावी लागत असे. अशा काळात ज्या वर्षात तेरावा महिना येई तेंव्हा ओढाताण होणे साहजीक आहे. त्यातून जर त्या वर्षी दुष्काळ पडला असेल आणि त्यामुळे चणचण झाली असेल तर दुहेरी आपत्ती ओढवत असे. यावरूनच 'दुष्काळात तेरावा महिना' ही म्हण पडली आहे आणि अधिक महिन्याला रागाने 'धोंडा महिना' असेही नाव मिळाले आहे.

Friday, August 03, 2012

श्रावणी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, ओणम् आणि बलरामजयंती

एकादे पुण्यक्रम चातुर्मासात केले तर वर्षभरातील इतर दिवशी मिळेल त्यापेक्षा अधिक फल मिळते आणि श्रावण महिन्यात ते त्याहूनही जास्त मिळते अशी धारणा आहे. त्यामुळे हा महिना धार्मिक समजला जातोच, शिवाय पूर्णचंद्राच्या प्रकाशामुळे पावन झालेला पौर्णिमा हा दिवस नेहमीच शुभ मानला जातो. अशा दुहेरी महत्वामुळे श्रावणी पौर्णिमेला दुग्धशर्करायोग म्हणता येईल. देशाच्या निरनिराळ्या भागात या दिवशी उत्सव साजरा केला जात असतो.

माझ्या लहानपणीची आठवण म्हणजे या दिवशी श्रावणी हा एक सार्वजनिक विधी होत असे. या दिवशी यज्ञयाग, मंत्रोच्चार वगैरे करून आणि पंचगव्य प्राशन करून देह व मनाचे शुध्दीकरण करायचे आणि जुने यज्ञोपवीत काढून टाकून नवे परिधान करायचे असे. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास मौंजीबंधनविधी करून मिळालेल्या पौरोहित्याच्या लायसेन्सचे वर्षभरासाठी रिन्यूअल करून घ्यायचे. मला तरी या लायसेन्सचे महत्वही कधी जाणवले नाही किंवा त्याचा उपयोग करण्याची वेळही आली नाही यामुळे मला हा विधी कधीच आवडला नाही. त्यातला पंचगव्य प्राशन करण्याचा भाग तर कमालीचा तिटकारा आणणारा होता.

त्या काळी संघात जाणारे माझे शाळेतले मित्र नेमाने त्या दिवशी शाखेत जाऊन त्यांच्या झेंड्याला राखी बांधायचे. तो राष्ट्रध्वज नसल्यामुळे तो कशाचे प्रतीक होता आणि माझे मित्र त्याचे रक्षण करणार म्हणजे ते काय करणार आहेत हे काही त्यातल्या कोणाला सांगता येत नसे. बेबी नंदाची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा सिनेमा लोकप्रिय झाल्यानंतर त्यातले भैया मेरे राखीबंधनको निभाना हे गाणे लोकांच्या ओठावर आले आणि या उत्तर भारतातल्या सणाचा अखिल भारतात प्रसार झाला. त्यापूर्वी दक्षिणेत हा सण फारसा कोणी पाळत नव्हते. माझ्या लहानपणीसुध्दा आमच्या गावातल्या बाजारात राख्या मिळत नसत. विणकाम, भरतकाम वगैरे करण्यासाठी आणलेल्या रेशमाच्या धाग्यांपासून मुलींनी घरच्या घरीच राख्या तयार करून आपल्या भावांच्या मनगटावर त्या बांधायला तेंव्हा नुकतीच सुरुवात झाली होती.

त्या दिवशीच्या जेवणात नारळीभात खायला मिळत असल्यामुळे त्या कारणाने मात्र आम्हा मुलांना श्रावणातली पौर्णिमा अतिशय प्रिय होती. सकाळी पंचगव्य प्राशन केल्याशिवाय जेवणात नारळीभात मिळणार नाही असा धाक दाखवला जात असल्यामुळे आम्ही नारळीभातासाठी तेही करायला तयार होत असू. समुद्रकिनारा खूप दूर आणि पावसाचे प्रमाणही कमी असल्यामुळे नारळाचे उत्पादन त्या भागात होत नसे. ओले खोबरे हा रोजच्या जेवणातला भाग नव्हता, ते खाणे हा थोडासा चैनीचा भाग होता. मोदक, करंज्या वगैरेतून खोबरे खायला मिळत असे आणि एकाद्या पूजेसाठी किंवा देवदर्शनाच्या वेळी नारळ फोडला गेला तर चटणी, भाजी, आमटीमध्ये खोबरे घालून त्यांची चंव वाढवली जात असे. त्यामुळे पोटभर नारळीभात म्हणजे एक मेजवानी होती आणि हा योग वर्षातून एकदाच येत असल्याने त्याचे मोठे अप्रूप वाटायचे.

हा सण कोळीबांधवांमध्ये खूप महत्वाचा असल्याचे मुंबईला आल्यानंतर समजले. मे महिन्याच्या अखेरीस मोसमी वारे वहायला लागतात आणि अंदमान, केरळ, कर्नाटक वगैरे करीत जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर मान्सून कोकणात येऊन दाखल होतो. त्यावेळी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यांच्याबरोबर समुद्रही खवळलेला असल्यामुळे मासेमारीसाठी दर्यात उतरणे धोक्याचे असते आणि या काळात मत्स्यव्यवसायाला वार्षिक सुटी दिली जाते. दोन महिन्यात पावसाचा आणि वा-याचा जोर कमी होतो आणि धीट मंडळी मासे पकडण्यासाठी समुद्रात खोलवर जाण्याचे कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला तयार होतात. त्याआधी नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून आपले रक्षण करण्याची प्रार्थना करतात. उत्सव म्हंटले की त्यानिमित्य नाचगाणे आणि खाणेपिणे आलेच. या बाबतीत कोळी लोक जास्तच उत्साही असतात.

कोकणाप्रमाणेच भारताच्या पश्चिम किना-यावर दक्षिणेला केरळात राहणारे लोक या काळात ओणम हा त्यांचा सर्वाधिक महत्वाचा सण साजरा करतात. त्या भागातले लोक सौर पंचांगानुसार चालतात. सूर्य कोणत्या राशीत आहे यावरून त्यांच्या महिन्यांची नावे ठेवलेली आहेत. श्रावण किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला सूर्याचे भ्रमण सिंह राशीमधून होत असल्यामुळे या महिन्याचे नाव चिंगम (सिंहम किंवा सिंघम चा अपभ्रंश) असे आहे. वामनावतारात श्रीविष्णूने ज्या बळीराजाला पाताळात घालवून दिले त्याचे राज्य सध्याच्या केरळ प्रदेशात होते अशी समजूत असल्यामुळे बळीराजाहा त्यांचा महानायक आहे. वामनाची आज्ञा शिरोधार्य मानल्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीविष्णूभगवानांनी त्याला अमरत्वाचे वरदान दिले आणि दरवर्षी ओणमच्या दिवसात पृथ्वीतलावर येऊन आपल्या प्रजेला भेटण्याची परवानगीही दिली. हा सण दहा दिवस चालत असल्यामुळे बरेच वेळा तो नारळी पौर्णिमेच्या काळात चाललेला असतो. या वर्षी श्रावण महिन्यानंतर लगेच अधिकमासाला सुरुवात होते आहे. अर्थातच या वेळी चांद्रमास सौरमासाच्या महिनाभर मागे पडला असल्यामुळे ओणमचा सण काही दिवसांनंतर येणार आहे. केरळीय लोक या दिवसात पूजाअर्चा वगैरे करतातच, शिवाय खास रांगोळ्या, खाणेपिणे वगैरे होते, तसेच नौकानयनाच्या स्पर्धा होतात. या बोटरेसेस पहायला आता जगभरातून पर्यटक येऊ लागले आहेत.

या वर्षा मला एक नवीच माहिती मिळाली. उडीशा (ओरिसा) राज्यात होऊन गेलेल्या चैतन्य महाप्रभू यांनी श्रीकृष्णभक्तीचा इतका प्रसार केला की त्यांनाच श्रीकृष्णाचा अवतार समजले जाते. अलीकडील काळात इस्कॉन ही आंतरराष्ट्रीय संघटना उदयाला आली आणि त्यांनी चैतन्यमहाप्रभूंच्या कृष्णभक्तीच्या कार्याला नवीन चालना दिली. या पंथाच्या लोकांनी जगभरात अनेक ठिकाणी मोठमोठी सुंदर देवळे बांधली आहेत आणि तिथे अनेक प्रकारचे उपक्रम चालले असतात. काल झालेल्या श्रावण पौर्णिमेला त्यांनी सर्व ठिकाणी श्रीबलरामजयंती साजरी केली. पुण्यात झालेल्या अशाच एका समारंभात सहभागी होण्याची संधी मला योगायोगाने मिळाली. एका सभागृहातल्या मंचावर श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या इस्कॉन स्टाइलच्या सुबक मूर्ती मांडून ठेवल्या होत्या. त्यांना वाहण्यासाठी पोते भरून फुले आणली होती आणि आलेल्या प्रत्येक इसमाला सढळ हाताने ओंजळ भरून फुले दिली जात होती. एक एक जण पुढे येऊन ती फुले देवांना अर्पण करून येत होता. काही लहान मुलांनी एकमेकांवर फुले उधळायला सुरुवात केल्यानंतर तो प्रकार थांबवण्याची विनंती घोषणेद्वारे केली गेली. पण पूजाविधी संपल्यानंतर एका महंतानेच येऊन उरलेली बरीचशी फुले तिथे उपस्थित असलेल्या मंडळींच्या डोक्यावर उधळली. त्यानंतर चारपाच महिलांनी एक लांबलचक पडदा देवासमोर आडवा धरून त्याला अदृष्य केले. देवांना छप्पनभोग (५६ प्रकारचे नैवेद्य) देण्याचे काम पडद्याआड चालले होते. त्याच वेळी तिथे आलेल्या मुख्य महंताचे प्रवचन सुरू झाले.

प्रवचनाच्या सुरुवातीला त्याने बलरामावताराची माहिती दिली. एका गोष्टीनुसार भगवान विष्णूच्या रामावतारात त्यांच्या शेषनागाने लक्ष्मणाचा अवतार घेऊन आज्ञाधारक लहान भावाची भूमिका उठवून झाल्यानंतर पुढच्या जन्मात विष्णूचा वडील बंधू व्हायचे ठरवले. त्यानुसार कृष्णावतारात बलराम हे त्याचे ज्येष्ठ बंधू म्हणून जन्माला आले. दुस-या कथेनुसार बलराम आणि कृष्ण हे दोघेही मिळून विष्णूचा आठवा अवतार होते. त्यातला बलराम गोरा तर कृष्ण सावळा, बलराम शक्तीशाली तर कृष्ण बुध्दीमान व विद्वान, बलराम सरळमार्गी तर कृष्ण खट्याळ वगैरे वगैरे एकाच परमेश्वराची दोन रूपे होती. कंसमामा, वसुदेव, देवकी, रोहिणी, नंद, यशोदा वगैरेंची कथा अतीशय त्रोटकपणे सांगून झाल्यानंतर महंत आध्यात्माकडे वळले. अथातो ब्रह्मजिज्ञासा वगैरे ऐकून त्यानंतर मी हळूच काढता पाय घेतला, पण शेजारच्या खोलीत जेवणाची व्यवस्था होती आणि प्रसादभक्षण केल्याशिवाय कोणाला बाहेर जाऊ देत नसल्यामुळे मी पानावर जाऊन बसलो. कढीभात, बटाट्याची भाजी आणि खीर असे साधेच पण रुचकर जेवण होते. भोजन करून परत जातांना सभागृहात डोकावून पाहिले तर फेर धरून हरे रामा हरे कृष्णाचा गजर करीत भक्तमंडळी नाचत होती. त्यात तल्लीन झालेली मंडळी किती काळ त्या तंद्रीत राहिली हे पहायला मी तिथे थांबलो नाही.