Monday, October 21, 2019

महान विद्युतशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे


महान विद्युतशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे याचा जन्म सन १७९१मध्ये इंग्लंडमधील एका गरीब कुटुंबात झाला. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याचे शालेय शिक्षण धडपणे झाले नाही. चौदा वर्षांचा असतांना तो एका बुकबाइंडिंग आणि पुस्तकांची विक्री करणाऱ्याकडे नोकरीला लागला. पण ज्ञान संपादन करण्याची त्याच्या मनातली इच्छा इतकी तीव्र होती की तो बाइंडिंगसाठी आलेल्या आणि दुकानात ठेवलेल्या पुस्तकांची पाने वाचूनच त्यातून अनेक विषयातील ज्ञानाचे मिळतील तितके कण जमा करत राहिला आणि त्यामधून मिळालेली शिकवण अंमलात आणत राहिला. या अशा वाचनातूनच त्याच्या मनात विज्ञान आणि विशेषतः विद्युत् या विषयाबद्दल ओढ निर्माण झाली.

वीस वर्षांचा असतांना फॅरेडेने हम्फ्री डेव्ही या प्रख्यात शास्त्रज्ञाची व्याख्यानमाला लक्षपूर्वक ऐकली, त्याच्या नोट्स काढून त्यांचे बाइंडिंग करून एक पुस्तक तयार केले आणि अभिप्रायासाठी डेव्हीकडे पाठवले. त्याने केलेले ते काम डेव्हीला आवडले. पुढे सन १८१३मध्ये एका प्रयोगात झालेल्या अपघातात डेव्हीची दृष्टी अधू झाल्यामुळे त्याला प्रयोगशाळेत काम करण्यासाठी एका सहाय्यकाची गरज भासली तेंव्हा त्याने फॅरेडेला बोलावून घेतले. नंतरच्या काळात डेव्हीने त्याला आपल्यासोबत दोन वर्षांच्या दौऱ्यावर फ्रान्सलाही नेले. त्या वेळी फॅरेडे डेव्हीला प्रयोगशाळेत मदत करायचा तसेच त्याची इतर कामेही करायचा. डेव्हीच्या बायकोने तर त्याला गड्यासारखे वागवले. फॅरेडेने डेव्हीची मनोभावे सेवा केली त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक प्रयोगामध्ये समरस होऊन लक्षपूर्वक सहभाग घेतला. यातून त्याने प्रात्यक्षिक कामामध्ये विलक्षण नैपुण्य मिळवलेच, विज्ञान या विषयामध्येसुध्दा प्राविण्य मिळवले. पुढील काही वर्षांमध्ये डेव्हीने केलेल्या संशोधनामध्ये फॅरेडेचा महत्वाचा वाटा होता.

रसायनांवर प्रयोग करत असतांना झालेल्या एका स्फोटात डेव्ही आणि फॅरेडे हे दोघेही जखमी झाले होते, पण हिम्मत न सोडता ते आपले संशोधन करत राहिले. फॅरेडेने काही नवे वायू तयार केले. क्लोरिनसारख्या काही वायूंना थंड करून द्रवरूपात आणता येते हे दाखवले. बेंझीन या महत्वाच्या रसायनाचा शोध लावला. असे असले तरी फॅरेडेचे नाव त्याने विजेवर केलेल्या क्रांतिकारक संशोधनामुळेच प्रसिध्द झाले आणि त्या क्षेत्रामधील अग्रगण्य शास्त्रज्ञांमध्ये घेतले जाते.

फॅरेडेने स्वतःची व्होल्टाइक पाईल तयार करून त्यावर रसायनांच्या पृथःकरणाचे प्रयोग सुरू केले. इलेक्ट्रॉलिसिस या क्रियेमधील उपकरणांचे अॅनोड, कॅथोड, इतेक्ट्रोड ("anode", "cathode", "electrode") यासारखे शब्द त्याने प्रचारात आणले. त्याने सांगितलेले या विद्युतरासायनिक क्रियेचे नियम त्याच्या नावाने प्रसिध्द आहेत. रसायनामधून जात असलेल्या विजेच्या प्रवाहाच्या सम प्रमाणात रासायनिक क्रिया घडते. असा हा नियम आहे.

ऑर्स्टेडने विद्युतचुंबकीयत्वाचा (electromagnetism) शोध लावल्यानंतर डेव्ही आणि वोलॅस्टन या ब्रिटिश संशोधकांनी त्यावर संशोधन सुरू केले, पण त्यांना घवघवीत यश मिळत नव्हते. फॅरेडेने त्यावर अधिक प्रयोग करून जगातली पहिली इलेक्ट्रिक मोटर तयार केली. त्यासाठी त्याने एक लोहचुंबक पाऱ्यामध्ये ठेऊन त्याच्या बाजूला एक इलेक्ट्रोड टांगून ठेवला. त्यामधून विजेचा प्रवाह सोडल्यावर तो इलेक्ट्रोड हळूहळू फिरायला लागला. विजेपासून गति निर्माण करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग होता.
   
फॅरेडेने आपले हे संशोधन स्वतंत्रपणे प्रसिध्द केलेले डेव्हीला आवडले नाही. त्याने फॅरेडेचे कौतुक तर केले नाहीच, उलट त्याला फैलावर घेतले. यामुळे पुढील काही वर्षे फॅरेडेने विजेवर संशोधन न करता पारदर्शक काच बनवण्याच्या शास्त्रावर काम केले. त्यात त्याने जगातली पहिली पोलॅराइड काच बनवली तसेच प्रकाशकिरण व विद्युतचुंबकीयत्व यांच्यातल्या संबंधावर प्रकाश टाकला.

डेव्हीच्या मृत्यूनंतर फॅरेडे पुन्हा आपल्या आवडत्या कामाला लागला. विद्युतचुंबकीय प्रवर्तन (electromagnetic induction) हा सर्वात महत्वाचा शोध त्याने लावला. लोखंडाच्या कडीभोवती गुंडाळलेल्या तारांच्या दोन वेगवेगळ्या वेटोळ्यांपैकी एकीमध्ये विजेचा प्रवाह सोडला की इंडक्शनमुळे दुसरीमध्ये क्षणभर वीज चमकून जाते हे त्याने दाखवले. तारेच्या वेटोळ्यामधून जर लोहचुंबक नेला किंवा लोहचुंबकाच्या भोवती तारेचे वेटोळे वर खाली नेले तर एक विजेचा प्रवाह निर्माण होऊन त्या तारेतून जातो असेही त्याने दाखवून दिले. त्याने या तत्वावर चालणारा जगातला पहिला डायनॅमो किंवा जनरेटर तयार केला. आजसुध्दा जगातले बहुतेक सगळे जनरेटर, ट्रान्स्फॉर्मर आणि सगळ्या विजेच्या मोटारी फॅरेडेच्या या साध्या यंत्रांच्या मागे असलेल्या मूलभूत तत्वांवरच चालतात यावरून त्यांचे महत्व लक्षात येईल. मायकेल फॅरेडेच्या सन्मानार्थ धारिता (Capacitance) या विजेच्या गुणधर्माच्या एककाचे नाव फॅरड (farad) असे ठेवले गेले आहे.

तत्कालीन इंग्लंडमधील जनतेच्या अनेक अडचणींकडे लक्ष देऊन त्यातून मार्ग सुचवण्याचे समाजकार्यही फॅरेडे याने केले. त्याने केलेल्या महत्वपूर्ण योगदानासाठी त्याला सरदारपद देऊ केले गेले होते, पण आपल्याला कोणी 'सर फॅरेडे' म्हंटल्यापेक्षा 'मि.फॅरेडे' असेच म्हंटलेले आवडेल असे सांगून त्याने ते नम्रपणे नाकारले.
Wednesday, October 09, 2019

वॉर्नर ब्रदर्सचा स्टूडिओ


मी शाळेत असेपर्यंत एकही इंग्रजी सिनेमा पाहिला नव्हता. आमच्या लहान गावातल्या थेटरात बहुधा ते कधी लागतही नसावेत. मी १९६१ साली कॉलेजला शिकायला शहरात आलो त्याच वर्षी गन्स ऑफ नेव्हेरॉन नावाचा धडाकेबाज युद्धपट आला होता. सगळ्यांनी त्याची इतकी भरभरून तारीफ केलेली मी ऐकली की आपण काहीही करून हा पिक्चर तर पहायलाच पाहिजे असे माझ्या मनाने घेतले. एका रात्री त्या काळातल्या ठाण्याच्या ओसाडवाण्या घोडबंदर रोडवरून निघून पार बाँबे व्हीटी पर्यंत गेलो आणि तिथल्या एका आधुनिक थेटरात हा चित्तथरारक सिनेमा पाहून अखेरच्या ट्रेनने ठाण्याला परत आलो तोपर्यंत शेवटची बस सुटून गेली होती.  मग रात्रभर स्टेशनातल्या एका बाकड्यावर मुटकुळे करून पडून राहिलो आणि सकाळी उठून वसतीगृहावर परतलो. ग्रामीण भागातून आलेल्या पंधरासोळा वर्षाच्या मुलासाठी एवढे धाडस करणेसुद्धा अँथनी क्विनने त्या सिनेमात दाखवलेल्या धाडसासारखेच होते.  एकदाचा तो सिनेमा बघून माझ्या जीवनाचे पुरेसे सार्थक झाले असे मला वाटले आणि मी पुन्हा कधी तसला वेडेपणा केला नाही.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधली निम्म्याहून अधिक मुले परदेशी जायची स्वप्ने पहात होती आणि त्याची पूर्वतयारी म्हणून धडाधड  इंग्रजी सिनेमे पहात होती. त्यांच्यासमोर आपण अगदीच गांवढळ दिसायला नको म्हणून मीसुद्धा अधून मधून त्यांच्याबरोबर वेस्टएंड किंवा अलका टॉकीजला जाऊन थोडे येस्स फॅस्स ऐकून येत होतो. सुरुवातीला त्यातले षष्पही डोक्यात शिरत नसले तरी एक फायदा एवढा झाला की इंग्रजीतल्या चार शिव्या समजल्या आणि दुसऱ्या कुणी मला तसली शिवी दिलीच तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर द्यायची तयारी झाली.  पुढे मग हळूहळू थोडेफार इतर संभाषणही कळायला लागले.


मी पाहिलेल्या सगळ्या इंग्रजी सिनेमांची नावे लक्षात राहिली नसली तरी ते तयार करणाऱ्या ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स, एम जी एम आणि वॉर्नर ब्रदर्स यासारख्या काही प्रमुख कंपन्यांची नावे मात्र पक्की लक्षात राहिली. इतके भव्य दिव्य चित्रपट तयार करणाऱ्या त्या कंपन्यांबद्दल मला प्रचंड कौतुक आणि आदरही वाटत असे आणि तितकेच कुतूहलही. आपल्याला कधी तरी त्यांचा स्टूडिओ पहायला मिळेल असे मात्र मला तेंव्हा स्वप्नातही वाटले नव्हते.

मी मुलाकडे अमेरिकेत लॉस एंजेलिसला आलो तेंव्हा अर्थातच हॉलीवुडची आठवण प्रामुख्याने झाली आणि जमेल तेंव्हा ते पहायला जायचेच होते.  तसा मी जन्मभर मुंबईत राहिलो, पण मला तिथला कुठलाही फिल्म स्टूडिओ आतून पहायची संधी मात्र कधीच मिळाली नाही. तिथले दरवान तिथे काम असल्याशिवाय कुणालाही आत सोडतच नाहीत. आम्ही आर के स्टूडिओतला गणपती पहायला जात होतो तेंव्हा बाहेरूनच एकादी शेड दिसली असेल तेवढेच स्टूडिओचे दर्शन मला झाले होते. मी बँडस्टँडला रहात असतांना तिथे कित्येक वेळा औटडोअर शूटिंग पाहिले होते आणि ते किती कंटाळवाणे असते हे मला समजले होते त्यामुळे माझे त्यातले औत्सुक्य संपले होते. मी दूरदर्शन, झी आणि स्टार प्लस यांच्या एक दोन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यामुळे तिथले सेट्स आणि कॅमेरे पाहून मला स्टूडिओमधल्या शूटिंगच्या प्रक्रियेचाही थोडा फार अंदाज आला होता.

मी मागे अमेरिकेला आलो असतांना अॅटलांटा इथला सी एन एनचा स्टूडिओ आतून पाहिला होता आणि आता तर चक्क वॉर्नर ब्रदर्सचा स्टूडिओ पहायचे ठरले. कुठल्याही गोष्टीचे प्रदर्शन मांडण्यात अमेरिकन लोक खूप पटाइत आहेत हे मला मागच्या अमेरिकावारीतच दिसले होते. त्याचाच प्रत्यय वॉर्नर ब्रदर्सच्या भेटीतही आला. तिथे स्टूडिओच्या प्रदर्शनाचा एक सुनियोजित कार्यक्रमच तयार करून ठेवला आहे आणि त्यासाठी रोज शेकडो पर्यटक त्यांच्या स्टूडिओला भेट देऊन तो पाहून जातात.

तिथे जाऊन आयत्या वेळी नकार मिळायला नको म्हणून आम्ही इंटरनेटवरूनच तीन वाजताच्या वॉर्नर ब्रदर्सच्या व्हिजिटचे  रिझर्वेशन केले आणि तास दीड तास आधीच घरातून निघालो. पण रस्त्यात वाहतुकीची इतकी कोंडी झालेली होती की जेमतेम तीन वाजेपर्यंत गेटपाशी पोचलो. आता पुढे काय करायचे? व्हिजिटर्स पार्किंग पाचव्या पातळीवर असा बोर्ड दिसला. तो पाहून वळणावळणाच्या रस्त्याने लेव्हल फाय पर्यंत चढत गेलो, गाडी लावली आणि लिफ्टने पुन्हा खाली स्वागतकक्षात आलो. पण आम्हाला यायला उशीर झाला असे काही कुणी म्हंटले नाही. आम्ही व्हिजिटची तिकीटे काढली आणि एका रांगेत उभे राहिलो. माणशी पासष्ट डॉलरच्या तिकीटांमध्ये कसलेले कन्सेशन मिळून ती पन्नास पन्नास डॉलर्सना पडली. रांगेतून पुढे गेल्यावर एका हॉलमध्ये चार वेगवेगळ्या रांगा होत्या. त्याच्यातल्या एका रांगेत आम्हाला पाठवले गेले. थोड्या थोड्या वेळाने एक माणूस किंवा बाई येऊन एकेका रांगेतल्या लोकांना सोबत घेऊन जात असे. तसाच आमचा मार्गदर्शक आला आणि त्याने आम्हाला आधी एका लहानशा थिएटरमध्ये नेले.

त्या लहानशा हॉलमध्ये एका शॉर्ट फिल्ममधून वॉर्नर ब्रदर्सची थोडक्यात माहिती सांगितली गेली. त्या चार भावंडांपैकी कोणता भाऊ कधी लॉसएंजेलिसला आला आणि त्याने फिल्म्सचा उद्योग सुरू केला आणि त्यानंतर कोणकोणता भाऊ येऊन त्यात सामील होत गेला वगैरे माहितीमध्ये कुणालाच इंटरेस्ट नव्हता पण ती देणे हे बहुधा त्यांचे कर्तव्य असावे. जवळ जवळ शंभर वर्षांपूर्वी या स्टूडिओची स्थापना झाली आणि पुढे त्याची भरभराटच होत गेली एवढेच माझ्या लक्षात राहिले. एक दोन वाक्यात आमच्या व्हिजिटची रूपरेषाही सांगितली गेली आणि आम्हाला त्या थिएटरमधून बाहेर नेले.


१५-२० लोकांच्या प्रत्येक ग्रुपसाठी एक वाहन दिलेले होते. ती एक उघडी मिनिबस होती. एकाच वेळी अशी अनेक वाहने पर्यटकांना घेऊन तिथे इकडून तिकडे फिरत होती. स्टूडिओच्या दीडदोनशे एकर आवारात पसरलेल्या परिसरात पन्नासच्यावर मोठमोठ्या इमारती आहेत, त्यातल्या प्रत्येकाला ते 'स्टूडिओ' म्हणतात आणि त्यांना क्रमांक दिले आहेत. सुरुवातीला आम्हाला युरोप अमेरिकेतल्या जुन्या काळातल्या एकाद्या गावाचा देखावा वाटावा अशा एका भागात नेले. तिथे मधोमध एका वाहतूक बेटावर (ट्रॅफिक आयलँडवर) काही लहान मोठी झाडे, झुडुपे आणि गवताचे लॉन्स आहेत आणि त्याच्या चारी बाजूंनी सुरेख रस्ते बांधले आहेत. त्या रस्त्यांवर बंगला, चर्च, शाळा, दुकान, लायब्ररी असे काही तरी असावे असे बाहेरून वाटणाऱ्या दहा बारा छान छान इमारती बांधून ठेवल्या आहेत. त्यात इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली वगैरे अनेक देशातल्या स्टाइल्सच्या इमारती आहेत. कुठे गोल कमानीचे दरवाजे आहेत, कुठे त्रिकोणी छप्पर आणि त्यातून डोकावणारी चौकोनी चिमनी आहे, एका इमारतीच्या दर्शनी भागात तर चक्क ग्रीक आर्किटेक्चरसारखे अनेक उंच आणि  गोल खांब बांधले आहेत.


सिनेमामध्ये जसे दृष्य दाखवायचे असेल त्याप्रमाणे त्यातल्या इमारतीची निवड करून वाटल्यास तिला वेगळा रंग देतात, खिडक्याचे पडदे किंवा काचाही बदलतात, वेगळी पाटी लावतात आणि तसा सीन उभा करतात. आमच्या गाईडने अशी चारपाच उदाहरणे सांगितली, पण मी ते सिनेमे पाहिलेच नसतील किंवा मला आता त्यातले सीन आठवत नसतील. त्यामुळे मला फारसा बोध झाला नाही, पण इतर काही लोकांनी होकारार्थी माना डोलावल्या.आम्ही दोन तीन इमारती आत जाऊनही पाहिल्या. त्या आतून रिकाम्याच होत्या आणि त्यात वरच्या बाजूला जाणारे निरनिराळ्या आकारांचे जिने होते. सिनेमाच्या गरजेप्रमाणे त्यातल्या इमारतीची निवड करतात. त्या इमारतीत हवी तशी पार्टिशन्स ठेऊन खोल्या बनवतात. निरनिराळ्या रंगांची किंवा वॉल पेपर्सने मढवलेली अशी शेकडो निरनिराळी पार्टिशन्ससुद्धा आधीपासून तयार करून ठेवलेली आहेत. तिथे शूटिंग झालेल्या अनेक चित्रपटांची नावे आमच्या गाइडने सांगितली. काही जाणकार लोकांनी त्याला दाद दिली, बाकींच्यांनी नुसतेच "हो का?" म्हणून कौतुक केले. यातून एवढे लक्षात आले की ते लोक प्रत्येक सिनेमाच्या प्रत्येक सीनसाठी भाराभर नवे सेट उभारत नाहीत. बांधून ठेवलेल्या इमारतींमधून आणि तयार पार्टीशन्समधून निवड करतात आणि आपल्याकडे नाटकांच्या रंगमंचावर नेपथ्य बदलतात तसे तिथले सेट्स फटाफट बदलतात.  अर्थातच या सर्वच इमारती सर्व तांत्रिक दृष्टीने सुसज्ज असतात आणि कॅमेरामन्सना व्यवस्थितपणे शूटिंग करता यावे यासाठी पुरेशी सोय ठेवलेली असते.  शिवाय कॅमेरामध्येही काही ट्रिक्स असतात त्या वापरून त्यांना वस्तूंचे आकार कसे लहान किंवा मोठे करून दाखवता येतात याचेही एक उदाहरण एका स्टूडिओत पाहिले. 

आमच्या गाईडने एक मजेदार गोष्ट सांगितली. एका सिनेमासाठी तिथल्या ग्रीक वास्तुशिल्प असलेल्या इमारतीत कोर्ट लावले होते आणि तिथे बरेचसे सीन शूट करायचे होते. पण त्या सिनेमाचा त्या काळातला सुपरस्टार हीरो अडून बसला की तो काही त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या सात आठ पायऱ्या चढून येणार नाही. मग त्यांनी त्याच्या डमीला आणले, त्याच्या अंगावर हीरोचे निरनिराळे कपडे चढवून त्याला त्या पायऱ्या अनेक वेळा चढायला आणि उतरायला लावल्या आणि त्याचे निरनिराळ्या अँगल्समधून भरपूर शॉट्स घेऊन ठेवले. हे सगळे काम एका दिवसात झाले आणि त्यांचे तुकडे सिनेमामध्ये जागोजागी  जोडले.

आम्ही एका डेरेदार झाडाखाली उभे असतांना आमचा गाईड आजूबाजूच्या इमारतींबद्दल माहिती देत होता. त्याने मध्येच एकदा आम्हाला मान वर करून पहायला सांगितले. आम्ही पाहिले आणि चाटच पडलो. ज्या घनदाट फांद्यांच्या दाट सावलीत आम्ही उभे होतो त्या चक्क झाडाच्या बुंध्यामध्ये केलेल्या खोबणींमध्ये खोचलेल्या होत्या आणि वरून साखळदंडांनी उचलून आणि तोलून धरलेल्या होत्या. त्याची पाने हिरवी गार दिसावीत म्हणून आणखी काही केले असेल म्हणजे ते अख्खे झाड कृत्रिम होते आणि अशी अनेक झाडे तिथे होती. शूटिंगच्या वेळी जशा प्रकारचे झाड हवे असेल तसे झाड ते तिथे उभे करू शकतात. त्यामधून त्यांना हवा तो ऋतूही कधीही दाखवता येतो. 


या प्रकारच्या सोयी मुख्यतः सर्वसाधारण सामाजिक चित्रपटांसाठी उपयोगाला येतात, पण बॅटमॅन, अॅक्वामॅन, हॅरी पॉटर वगैरे चित्रपटांसाठी वेगळे खास स्टूडिओज आहेत. अशा खास सिनेमांसाठी  लागणारी विशेष प्रॉपर्टी तिथे एकाद्या प्रदर्शनात ठेवल्यासारखी मांडून ठेवली आहे. सध्या अशा सिनेमाचे शूटिंग सुरू नसल्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. बॅटमॅनच्या दालनात बॅटमॅनचा एक उंचापुरा पुतळा आणि बॅटमॅनच्या दुचाकी तसेच चार चाकांच्या खास बॅटमोबाइल्स ठेवल्या आहेत. या खास गाड्या मुद्दाम डिझाइन करून वर्कशॉप्समध्ये तयार करून घेतल्या आहेत आणि त्यांना विशेष शक्तीशाली इंजिने बसवली आहेत. प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी बॅटमॅन ती मोटार चालवतो असे वाटते, पण एका कोपऱ्यात लपवून बसवलेला वेगळा एक्स्पर्ट ड्रायव्हर ती चालवत असतो असे आमच्या मार्गदर्शकाने सांगितले. 


हॅरी पॉटरची पुस्तके आणि सिनेमे आजकालच्या मुलांची अत्यंत आवडती आहेत. त्या गोष्टीतल्या पात्रांचे युरोपमधल्या मध्ययुगातले चित्रविचित्र पोशाख आणि ते लोक वापरत असलेल्या पुराणकाळातल्या खास गोष्टी हॅरी पॉटरच्या स्टूडिओत पहायला मिळतात. तसेच त्याच्या काही सिनेमामधल्या खास दृष्यांचे फोटोही तिथे लावून ठेवले आहेत. हे दालन बाल प्रेक्षकांना खूप आवडते.


फ्रेंड्स ही मजेदार सीरियल अमेरिकेतल्या टीव्हींवर गेली पंचवीस वर्षे चालत आलेली आहे. त्यातली जो, मोनिका, रॉस वगैरे पात्रे इथल्या मुलांच्या तसेच युवकांच्या अगदी ओळखीची झाली आहेत. इतकी की त्यांच्या नावांची खास ड्रिंक्स इथल्या कॅफेमध्ये ठेवली आहेत.  सेंट्रल पर्क हे या मित्रांचे आवडते कॅफे आहे. सीरियलमधले बरेचसे प्लॅन इथे बसून केले जात असतात, तसेच फालतू टाइमपासही इथेच बसून केला जातो. या सेंट्रल पर्कच्या हुबेहूब प्रतिकृति दोन तीन ठिकाणी करून ठेवल्या आहेत. आपणही तिथे बसून कॉफी पिऊ शकतो, गप्पा मारू शकतो आणि आठवण म्हणून त्याचे फोटो किंवा व्हीडिओ घेऊन ठेऊ शकतो. इतकेच नव्हे तर या सीरियलमध्ये जो सोफा दाखवतात त्यावरही बसून त्याचे फोटो घेऊ शकतो. अशा गिमिक्सनी ही सहल मजेदार होते आणि पर्यटक खूष होतात.

निरनिराळ्या स्टूडिओजची गाइडेड टूर झाल्यानंतर अखेरीस आम्हाला एका सेंट्रल पर्कमध्ये ठेवलेल्या कॉफीशॉपमध्ये सोडून गाइडने आमचा निरोप घेतला. तिथे थोडा अल्पोपाहार घेऊन ताजेतवाने झाल्यावर त्याच स्टूडिओमध्ये असलेले वस्तुसंग्रहालय पाहिले. असंख्य फोटो आणि व्हीडिओंमधून इथे  वॉर्नर ब्रदर्सच्या सिनेमांचा गेल्या शंभर वर्षांचा इतिहास जतन करून ठेवला आहे. त्यातले काही इंटरअॅक्टिव्हही आहेत. एक कळ दाबली की टेबलावर ठेवलेल्या साध्या दिसणाऱ्या काचेमध्ये आपण निवडलेला सीन आपल्याला दिसायला लागतो. ज्या लोकांना वेस्टर्न सिनेमा या विषयात रस आणि गति आहे त्यांच्यासाठी तर ही मेजवानीच आहे. गाइड टाटा बाय बाय करून गेलेला असल्यामुळे इथे आपल्याला हवा तितका वेळ थांबून हे प्रदर्शन सावकाशपणे पाहता येते. शिवाय इथल्या एका खास दालनामध्ये तर बॅटमॅनचा गाऊन घालून त्याच्यासारखा फोटो सुद्धा ते लोक काढून देतात. आधी फोटो काढून घ्या आणि तो आवडला तर नंतर त्याची प्रत विकत घ्या अशी पद्धत आहे. यामुळे बरेच हौशी लोक विशेषतः त्यांच्यासोबत आलेल्या मुलांचे असे फोटो काढून घेतात, त्यामुळे मुलांची बॅटमॅन व्हायची हौस भागते, पण फोटोंच्या कॉपीजची किंमत न परवडणारी असल्यामुळे त्यातले थोडेच लोक त्या विकत घेतात.अमेरिकेतल्या कुठल्याही प्रेक्षणीय स्थळामधून बाहेर पडण्याची वाट त्यांच्या खास सजवलेल्या दुकानामधून असते तशीच इथेही आहे. या स्टोअरमध्ये वॉर्नर ब्रदर्सच्या सिनेमा आणि सीरियल्सशी संबंध असलेली चित्रे छापलेल्या पिशव्या, मग्ज, प्लेट्स, कार्पेट्स, बोर्ड्स वगैरे अनंत गोष्टी आकर्षक रीतीने सजवून ठेवलेल्या आहेत, पण त्यांच्या किंमतीही अवाच्या सवाच आहेत. तरीही आठवण म्हणून काही लोक त्यातले काही ना काही घरी घेऊन जातात. एकंदरीत पाहता आमची ही वॉर्नर ब्रदर्सच्या स्टूडिओ टूर छान झाली आणि लक्षात राहण्यासारखा असा काही तरी वेगळा अनुभव मिळाला.