Thursday, August 27, 2009

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव - २

१८९३ साली लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याला जो विरोध झाला त्याचा त्यांनी कसा समाचार घेतला याबद्दल त्रोटक माहिती मी मागील लेखात दिली होती. हा विरोध वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि वेगवेगळ्या स्तरांवर झाला होता. देवघरात बसून सोवळ्याने ज्या देवाची पूजा करायची पध्दत होती त्याला चौकाचौकात बसवण्याने आणि रस्त्यावरून मिरवत नेण्यामुळे त्याच्या पावित्र्याचा भंग होतो अशी ओरड कर्मठ धर्ममार्तंड करत होते, एवढेच नव्हे तर त्यामुळे देवाचा कोप ओढवण्याची भीती ते घालत होते. दुस-या बाजूला टिळक आणि त्यांचे कांही मुख्य सहकारी ब्राह्मण जातीचे असल्यामुळे हा सगळा ब्राह्मणांना पुढे पुढे करून समाजावर वर्चस्व गाजवण्याचा त्यांचा एक कुटील डाव आहे असा आरोप कांही लोक करत होते. ही मुसलमानांच्या मोहरमच्या ताबूतांची नक्कल आहे असे सांगून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना भडकवण्याचा उद्योग इतर कोणी करत होते. अशा तात्विक मुद्द्यांशिवाय सजावट आणि मेळ्यांचे कार्यक्रम यांचा दर्जा, त्यावर होणारा खर्च आणि त्यात वाया जाणारा वेळ याबद्दल नाक मुरडणारे बरेच लोक होते. या सर्वांनी उडवलेल्या राळीमुळे विचलित न होता त्यांचे मुद्देसूद खंडन करून समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचा विश्वास संपादन करणे आणि आपल्या या नव्या उपक्रमाला त्यांची मान्यता मिळवून त्यांना मोठ्या संख्येने त्यात सहभागी करून घेणे हे अत्यंत कठीण काम लोकमान्यांनी त्या काळात करून दाखवले आणि वर्षभरातच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या मंडळांची संख्या शतपटीने वाढली. त्यासंबंधी टिळकांनी सन १८९४ साली लिहिलेल्या अग्रलेखाचा सारांश मी मागील लेखात दिला होता.
त्यानंतर आणखी एक वर्षाने म्हणजे सप्टेंबर १८९५ मध्ये टिळकांनी लिहिलेला केसरीचा अग्रलेखसुध्दा उपलब्ध आहे. तोपर्यंत विरोधाची धार इतकी बोथट झाली होती की या अग्रलेखात त्यांनी आपल्या बचावाचा पवित्राही घेतला नाही की झालेल्या टीकेचा खरपूस समाचारही घेतलेला नाही. त्यांच्या अत्यंत प्रगल्भ आणि सकारात्मक लेखनाचा नमूना यात दिसतो. त्यापूर्वीच्या वर्षभरात पुणे शहरात कांही अप्रिय घटना घडलेल्या होत्या आणि त्यामुळे पोलिसांनी उत्सवावर बरेच निर्बंध लादले होते. 'यंदाचा गणपत्युत्सव' या मथळ्याखाली लिहिलेल्या या लेखाच्या प्रारंभीच पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्ताचे लोकमान्यांनी कौतुक करून त्यांचे आभार मानले आहेत. त्याबरोबरच लोकांच्या संयमाची आणि सहनशीलतेची त्यांनी भरभरून प्रशंसा केली आहे. कांही निर्बंध जाचक वाटले तरीसुध्दा त्याबद्दल संताप किंवा चीड व्यक्त करण्याची ही वेळ नव्हे हे जाणून त्यांचे काटेकोरपणे पालन केले, आपल्या उत्साहाच्या भरात अविचाराने कांही चूक होऊ नये याची काळजी घेतली आणि पोलिसांबरोबर संघर्ष केला नाही किंवा त्यांना कोणतेही निमित्य मिळू दिले नाही. लोकमान्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर कोणाच्या कोंबड्याने कां उजाडेना असे लोकांना वाटू लागले होते व त्यामुळे पोलिसांनी केलेल्या नियमांचे त्यांनी उल्लंघन केले नाही, इतकेच नव्हे तर उलट आपल्या हौसेस आपण होऊनच स्वतः आळा घालून आपला सुस्वभाव सर्वांस व्यक्त करून दाखवला आणि हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत केली.
यानंतर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. मेळ्यांमधील बहुतेक पदात कांही ना कांही सार्वजनिक हिताचाच उल्लेख केला होता. जेणेकरून लोकांत स्फूर्ती उत्पन्न होईल अशीच पदे रचलेली होती. एकाद्या ज्ञातीत, लोकांत अगर प्रांतात विशेष चळवळ सुरू झाली म्हणजे कवितेत अशाच प्रकारे स्फूर्ती येत असते हे सांगून त्यांनी त्याबद्दल आपले समाधान व्यक्त केले आहे.
निरनिराळ्या कारणांसाठी हा उत्सव निरनिराळ्या लोकांना प्रिय होत असला तरी राष्ट्राच्या अभ्युदयासाठी असा उत्सव होणे आवश्यक आहे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे. हिंदू धर्मात अनेक सण असले तरी त्यातले बहुतेक सण आपापल्या घरी साजरे केले जातात. पंढरीची वारी सार्वजनिक असली तरी ती पुरातन असल्यामुळे तिच्यात आपल्या मनासारखे परिवर्तन घडवून आणणे अशक्य नसले असाध्य आहे. शिवाय ती एकाच ठिकाणी होते. गणपतीचा उत्सव गांवोगांवी लोकांना साजरा करता येतो. वर्षातले दहा दिवस कां होईना, एका प्रांतातल्या सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गढून जावे ही कांही लहान सहान गोष्ट नव्हे. ती साध्य झाली तर आपल्या भावी अभ्युदयाचा पाया आपणच घातल्यासारखे होईल. सार्वजनिक प्रार्थनेचा जो फायदा ख्रिस्ती व मुसलमान धर्मातील लोकांना मिळतो तसाच तो हिंदू धर्मीयांनासुध्दा होईल.
दोन वर्षातच या उत्सवाचा प्रसार मुंबई, कोल्हापूर, सातारा, नगर, धुळे इत्यादी अनेक गांवात झाला होता, पण असले उत्सव सर्व ठिकाणी सुरू झाल्याखेरीज त्याचा खरा फायदा आपणास दिसणार नाही. कोणत्याही देवाची एकनिष्ठपणे आराधना केल्याने उपासकांच्या मनाला एक वळण लागून उपासकबंधुत्वाची बूध्दी जागृत होते. मन व बुध्दी अशा प्रकारे सुसंस्कृत झाल्यावर त्याचा उपयोग अशा रीतीने इतर ठिकाणी करण्यात अडचण येत नाही. विषय वेगळे असले तरी ते ग्रहण करण्यास मनाची आणि बुध्दीची स्थिती एकाच प्रकारची लागते हे उघड आहे. धर्मोन्नतीचा व धर्माभिमानाचा अशा प्रकारे राष्ट्रोन्नतीशी संबंध आहे. या वर्षी ज्यांनी ज्यांनी म्हणून हा उत्सव साजरा करण्याच्या कामी द्रव्याने, अंगमेहनतीने, गौसेने अथवा कवित्वाने मदत केली त्यांचे आभार मानून पुढील वर्षी यापेक्षाही जास्त प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यास गणपती त्यांस बुध्दी देवो अशी प्रार्थना करून लोकमान्य टिळकांनी हा लेख संपवला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करतांना अवघ्या प्रांताच्या आणि राष्ट्राच्या अभ्युदयाचे उदात्त ध्येय लोकमान्य टिळकांच्या डोळ्यासमोर होते ही गोष्ट या लेखातून स्पष्ट होते.

Tuesday, August 25, 2009

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव

संपादन दि.२४-०८-२०२०:
 माननीय भाऊसाहेब रंगारी यांनी लोकमान्य टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती अशी माहिती अलीकडच्या काळात पुढे आली आहे. दहा वर्षांपूर्वी मी हा लेख लिहिला असल्याकारणाने या लेखात त्याचा उल्लेख नाही.
------------------------

"लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला" असे मी मला समजायला लागल्यापासून ऐकत आलो आहे. 'वैयक्तिक' आणि 'सार्वजनिक' यातील फरक कळायला लागल्यानंतर "लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला" अशी सुधारणा त्यात झाली. "लोकमान्यांनी लावलेल्या रोपाचा केवढा मोठा वृक्ष झाला आहे." असे कौतुकाचे शब्द कालांतराने ऐकू येऊ लागले. अलीकडच्या काळात "लोकमान्यांनी उदात्त हेतूने सुरू केलेल्या या उत्सवाला हे कसले स्वरूप पात्र झाले आहे?" असे निराशेचे उद्गार अनेक वेळा ऐकावे लागतात. या सर्वात लोकमान्य टिळक हा एक समान धागा आहे. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला म्हणजे त्यापूर्वी तो कोणाला माहीत नव्हता, गुरुत्वाकर्षणाचा किंवा ऑक्सीजनचा जसा कोणा शास्त्रज्ञाने शोध लावला त्याप्रमाणे टिळकांनी गणेशोत्सवाचा शोध लावला अशा थाटात कांही लोक बोलतांना आढळतात. याबद्दल मला मिळालेली थोडी त्रोटक माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न करीत आहे. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्यांची गाढ श्रध्दा असल्याने पेशवाईच्या काळात पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली. तो उत्सव तमाम जनतेसाठी खुला नसला तरी पेशव्यांच्या दरबारातील प्रतिष्ठित मंडळींची हजेरी तिथे लागत असे. त्यानिमित्य शनिवारवाड्याची सजावट आणि दिव्यांची रोषणाई केली जात असे तसेच भजन कीर्तन, गायन, नृत्य आदि कार्यक्रम होत असत. पेशव्यांचे मुख्य सरदार हा उत्सव आपापल्या संस्थानांच्या ठिकाणी करू लागले. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी सुरू करण्यापूर्वीपासूनच कांही ठिकाणी गणेशोत्सव साजरा होत होता. लोकमान्य टिळकांनी सन १८९३ मध्ये पुण्यात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर त्यांनी आपल्या केसरी या वृत्तपत्रात आणि जाहीर भाषणांमध्ये त्यासंबंधी प्रचार चालू ठेवला होता. टेलीफोन, टेलीव्हिजन व इंटरनेट अशा आजकालच्या माध्यमांच्या अभावीसुध्दा लोकमान्यांचे सोशल नेटवर्किंग इतके चांगले होते की वर्षभरानंतर सन १८९४ साली शेकडो ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले गेले. या वेळी टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखात या गणेशोत्सवाचे समग्र वर्णन केले आहेच, त्याला विरोध किंवा त्याची टिंगल करणा-या लोकांवर चांगले आसूड ओढले आहेत. त्यातील कांही मुद्द्यांचा सारांश खाली उद्धृत केला आहे. यंदाचा भाद्रपद महिना, विशेषतः गेले कांही दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे गाजले. सर्व पुणे शहर गणपतीच्या भजनाने गजबजून गेले होते.प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादि औद्योगिक वर्ग यांनी घेतलेली मेहनत केवळ अपूर्व आहे. कोतवाल चावडी, रे मार्केट .... आदि ठिकाणच्या गणपतीच्या मूर्ती प्रेक्षणीय होत्याच, मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. त्यात जो अश्रुतपूर्व चमत्कार दृष्टीस पडणार याची आम्हास कल्पना करता आली नाही. "गणपतीची ही स्वारी ब्राह्मणांच्या प्रोत्साहनाने निघाली आहे, यात धर्ममूलक थेंबही नाही, हे एक नवे खूळ आहे, ही ताबूतांची नक्कल आहे, करमणूक करून घेण्यासाठी केलेले थोतांड आहे" असे नाना प्रकारचे तर्क युरोपियन वगैरे लोकांच्या डोक्यातून निघत आहेत. ज्यांचे मस्तक मत्सराने, भीतीने व क्रोधवशतेने शांतिशून्य झाले आहे, त्यांच्यापुढे मोठ्या वशिष्ठाने वेदांत सांगितला तरी पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे होणार आहे. पण ज्यास दोन आणि दोन चार इतके समजण्यापुरती अक्कल आहे तो एकदम कबूल करेल की यात सर्व हिंदू लोकांचा हात आहे. पेशवाईचा इतिहास वाचल्यास आणि बडोदे, सांगली, जमखिंडी आदि जागी भाद्रपद महिन्यात जाऊन आल्यास हा उत्सव बराच जुना व सार्वत्रिक आहे हे ताबडतोब लक्षात येईल. यंदा नवीन गोष्ट झाली ती म्हणजे गणपतीची मिरवणूक मोठ्या थाटामाटात झाली. सर्व जातीच्या लोकांनी जातीमत्सर सोडला आणि एका दिलाने आणि धर्माभिमानाने ते मिसळले ही आनंदाची गोष्ट झाली. मेळ्यात भाग घेणा-या सुमारे तीन हजार माणसांनी रात्री पाच पाच तास मेहनत घेऊन जी गाणी बसवली व हजारो स्त्रीपुरुषांनी ती ऐकली या सर्वांना जर चैन, लहर, करमणूक असे नाव द्यायचे असेल तर भक्तीपंथ कोणता ते आम्हास समजत नाही किंवा ज्याला अधर्मवेडाने पछाडले आहे त्यांस भजनाचा आनंद समजत नाही असे तरी म्हंटले पाहिजे. सर्व भारतीय लोकांनी आपसातले भेद सोडून एकत्र यावे ही लोकमान्य टिळकांची मुख्य इच्छा होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्याने निदान कांही दिवस तरी ते घडतांना दिसले याचे त्यांना समाधान वाटले. सर्व लोकांनी आपापल्या कामात भरभराट केल्यावर हिंदुस्थानची कीर्तीसुध्दा जगभरात पसरेल. इंग्लंड व हिंदुस्थान या दोन देशांमध्ये अपूर्व प्रेमाचे संबंध उत्पन्न होऊन हे दोन्ही देश प्रलयकाळापर्यंत जगाचे पुढारीपण करतील अशी आशा लोकमान्यांनी या लेखात व्यक्त करून त्यासाठी सर्वांना बुध्दी देण्याची प्रार्थना केली आहे.

Sunday, August 23, 2009

मूषक आणि माउस


घोडा, बैल, रेडे, उंट यासारख्या प्राण्यांना पाळीव बनवून माणसाने त्यांचा उपयोग आपली ओझी वाहण्यासाठी प्राचीन काळातच सुरू केला. राजा महाराजांकडे पाळलेले हत्तीसुध्दा असत. जगाच्या कांही भागात गाढवे आणि खेचरे यांचा उपयोग वहनासाठी केला जाऊ लागला. ध्रुवप्रदेशात स्लेज ओढण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. आकाराने त्याहून लहान असलेल्या मांजरीचे पालन मात्र बहुतेक करून फक्त जवळ घेऊन कुरवाळण्यासाठी आणि घरात शिरू पाहणा-या उंदरांवर अंकुष ठेवण्यासाठी होते. उंदीर हा मात्र कधीच घरातला पाळीव प्राणी बनला नाही. प्रयोगशाळांमध्ये उंदीर पाळून त्यांच्यावर प्रयोग करण्यात येतात, तेवढाच याला अपवाद म्हणायचा.
त्यामुळे उंदीर हा प्राणी एक वाहन म्हणून कधीच आपल्या डोळ्यासमोर येत नाही, पण गणपतीचे वाहन मात्र उंदीर मानले जाते. मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी सुध्दा गणपतीचे वाहन म्हणून ओळखला जातो. त्यावरून मयूरेश, मोरेश्वर आदि नांवे गजाननाला दिली आहेत. याचा उलगडा करण्यासाठी गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारात त्याची वेगवेगळी वाहने होती असा खुलासा केला जातो. उंदीर हे गणपतीचे वाहन कसे बनले यासंबंधी एक पौराणिक कथा प्रसिध्द आहे. मूषकराज नांवाच्या दैत्याला गजाननाने पराभूत केल्यानंतर तो शरण आला आणि त्याने गयावया करून गणपतीचे वाहन होण्याचे कबूल केले असे सांगतात.
या गोष्टीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न कांही विद्वानांनी केला. प्राचीन काळात मूषक या नांवाने ओळखली जाणारी एक जमात होती. ते लोक चांचेगिरी करत असत. सर्व गणांचा प्रमुख असलेल्या गणाधिपाच्या नेतृत्वाखाली त्यांचा पाडाव केल्यानंतर त्यांनी शरणागती पत्करून गणपतीचे दास्यत्व स्वीकारले असा निष्कर्ष कोणा विद्वानाने काढला आहे. उंदीर हा प्राणी देखील एक उपद्रव देणारा प्राणीच समजला जातो. बिळातल्या चोरवाटेने घरात शिरून तो अन्नधान्य, कागदपत्रे, कपडेलत्ते वगैरे सगळ्यांची नासधूस करत असतो. त्यावरून तसे करणा-या मूषक जमातीचे नांव पडले असेल आणि त्यांना आटोक्यात आणणा-या गणपतीला त्याच्यावर स्वार झालेले दाखवले गेले असेल.
उंदीर हा उपद्रवी असला तरी अत्यंत चपळ आणि तल्लख प्राणी आहे. त्याला मारण्यासाठी मांजर पाळले तरी अनेक वेळी तो त्याला मुळीच दाद देत नाही. टॉम अँड जेरीच्या कारटून्समध्ये तर जेरीच्या उपद्व्यापामुळे नेहमी टॉम अगदी जेरीला आलेला दिसतो. टॉम अँड जेरी, मिकी माऊस यासारख्या कारटून्समधून उंदीरमामा लहान मुलांचा लाडका तर झाला आहेच, केसरी टूरबरोबर फिरत असतांना मोठी माणसे सुध्दा प्रत्येक प्रवासाच्या सुरुवातीला गणपतीबाप्पा मोरया च्या बरोबर उंदीरमामाकी जय चा गजर करत असत.
संगणकक्रांती आल्यापासून तर माऊस नांवाच्या आधुनिक उंदीरमामाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. या माऊसला हाताशी धरून आपण काँप्यूटरकडून विविध प्रकारची कामे करून घेतोच, आंतर्जालावर भ्रमण करून विश्वरूपदर्शन करून घेऊ शकतो. हे काम कधी इतके सोपे होऊ शकेल असे पूर्वीच्या काळात स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. गणपती या बुध्दीच्या देवतेच्या उपासकांना गणपतीचे हे वाहन मनाने क्षणार्धात कुठल्या कुठे घेऊन जाते. एकाद्या शब्दावरून त्याबद्दल असलेली प्रचंड माहिती शोधयंत्रावरून आपल्याला चुटकीसरशी मिळू शकते. अशा प्रकारे या माऊसने आपल्याला ज्ञानमार्गातील नवनव्या गोष्टींच्या अगदी जवळ आणले आहे.

आधी वंदू तुज मोरया


गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया


कुठल्याही महत्वाच्या कामाचा शुभारंभ आपण गणपतीच्या स्तवनाने करतो. पूर्वीच्या काळात 'श्रीगणेशायनमः' लिहून मुलांची अक्षर ओळख होत असे. बालमानसशास्त्र वगैरेचा विचार करून आता 'गमभन' ने सुरुवात केली तरी त्यात सर्वात पहिल्यांदा 'ग गणेशाचा'च येतो. सर्व मंत्रांची सुरुवात ओंकाराने होते. इतर देवतांच्या पूजेच्य़ा आधी गणपतीची पूजा केली जाते. कुठल्याही पोथीचे वाचन श्रीगणेशायनमः ने सुरू होते. अशा प्रकारे सर्व धार्मिक कृत्यात तसेच इतर महत्वाच्या प्रसंगी गजाननाला अग्रपूजेचा मान मिळतो.ही प्रथा पूर्वीपासून चालत असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथाची सुरुवात ओं नमोजी आद्या या गणेसस्तवनाने सुरू केली होती. विठ्टलभक्त संत तुकाराम, आणि रामाचे परमभक्त समर्थ रामदास यांनी सुध्दा गणपतीची स्तुती करण्यासाठी सुंदर रचना केल्या आहेत.


असे असले तरी जसे एकादे यंत्र सुरू होऊन व्यवस्थितपणे चालायला लागले की त्याचे स्टार्ट बटन किंवा सर्किट बाजूला राहते, त्याप्रमाणे एकादी मोठी पूजा करतांना सुरुवातीला गणेशपूजा झाल्यानंतर शेवटी आरतीच्या वेळेपर्यंत गणेशाची आठवण रहात नाही. उत्तर आणि दक्षिण भारतात बहुतेक सर्व देवतांच्या मंदिरात प्रवेशद्वारावरती किंवा एकाद्या कोनाड्यात गणपतीची प्रतिमा असते. अशा प्रकारे तो सगळीकडे उपस्थित असतो, पण खास गणपतीची प्रसिध्द मंदिरे मुख्यतः महाराष्ट्रात दिसतात. प्रसिध्द अष्टविनायक पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात आहेत. त्याखेरीज पुळ्याचा गणपती, दिवेआगरचा सोन्याचा गणपती, पुण्यातला कसबा गणपती, मुंबईचा सिध्दीविनायक वगैरे देवस्थानांच्या ठिकाणीही भक्तांची गर्दी असते.
कोकणातून बाळाजी विश्वनाथ भट पुण्याला आले आणि त्यांना पेशवेपद मिळाले. पुढील सुमारे शंभर वर्षाच्या काळात मराठ्यांच्या साम्राज्याची धुरा पेशव्यांकडे होती. गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होते आणि त्याच्या कृपाप्रसादानेच त्यांची भरभराट झाली अशी श्रध्दा असल्यामुळे पुणे शहरात आणि त्याच्या परिसरात गणेशाच्या उपासनेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले. पेशव्यांनी त्यांच्या शनिवारवाडा या निवासस्थानात गणेशोत्सव सुरू केला आणि तो धामधुमीत चालवला. पटवर्धन, रास्ते, मेहेंदळे आदि कोकणातली काही कुटुंबे पेशव्यांबरोबर पुण्यात आली आणि सरदारपदापर्यंत त्यांची प्रगती झाली. त्यांनीसुध्दा आपापल्या वाड्यात आणि संस्थानात गणपतीची सुरेख मंदिरे बांधली आणि त्याची भक्तीभावाने उपासना केली. पण हे सगळे मुख्यतः व्यक्तीगत पातळीवर चालायचे आणि त्यांच्या खास मर्जीतले लोकच त्यात सहभागी होत असत.
पुण्यातच राहणा-या लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचे महत्व ओळखून त्याला सार्वजनिक रूप दिले आणि त्या निमित्याने लोकसंग्रह सुरू केला. भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करायचा नाही असे इंग्रजांचे धोरण असल्यामुळे त्यांनी त्याला विरोध केला नाही आणि पौराणिक गोष्टींच्या आधाराने भारतीयत्वाचा विचार पसरवणे लोकमान्यांना शक्य झाले. त्यांनी सुरू केलेला उत्सव लोकप्रिय होत गेला आणि आता तर गणेशोत्सव ही महाराष्ट्राची एक ओळख झाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यात आणि परदेशातसुध्दा अनेक ठिकाणी तो उत्साहाने साजरा होत आहे.
आज गणेशचतुर्थीच्या दिवशी श्रीगजाननाला शतशः सादर प्रणाम.

Sunday, August 16, 2009

न्यूयॉर्कची सफर - १- आगमन


न्यूयॉर्क, जगातील सर्वात बलाढ्य आणि धनाढ्य देशातले सर्वात मोठे शहर! हा मान लंडन शहराकडे निदान शंभर वर्षे तरी होता. पहिल्या महायुध्दानंतर लवकरच लंडन शहराचा हा दिमाख न्यूयॉर्कने उतरवला आणि पहिला क्रमांक पटकावला. दुस-या महायुध्दानंतर त्याचे अग्रगण्य स्थान अधिकच पक्के झाले. मला समजायला लागल्यापासून न्यूयॉर्क हेच जगातले 'सर्वात मोठे' शहर आहे असेच ऐकत आलो असल्यामुळे परदेशातली जी शहरे पाहण्याची इच्छा मनात होती त्यात न्यूयॉर्कचा नंबर सर्वात वर असायचा, लंडन, पॅरिस आणि इतर शहरांची नांवे त्यानंतर येत असत. त्यातल्या लंडनला भेट देण्याची संधी खूप पूर्वी मिळून गेली. पॅरिससहित युरोपाची सहल झाली. न्यूयॉर्कला जायची संधी मात्र हुलकावण्या देत राहिली. पहायला गेलो तर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यापासूनच अमेरिकेला जायचे बोलणे सुरू झाले होते, पण प्रत्यक्ष योग येत नव्हता. अखेर अमेरिकेत गेल्यानंतर आणि तिथे न्यूयॉर्कच्या शेजारी असलेल्या न्यूजर्सीला पोचल्यानंतरसुध्दा खराब हवामानामुळे न्यूयॉर्कदर्शनात बाधा पडते की काय अशी शंका निर्माण झाली होती. पण वरुणराजा आणि वायुदेवता या दोघांनीही आपापल्या सामर्थ्याची थोडी चुणुक दाखवून आपले हात आवरते घेतले आणि आम्ही एकदाचे न्यूयॉर्कमध्ये दाखल झालो.


न्यूजर्सीमधल्या पार्सीपेन्नीहून निघालेली आमची आरामबस न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनच्या जवळ आल्यानंतर एका प्रचंड बोगद्यात शिरली आणि आंतूनच वाट काढत पोर्ट ऑथॉरिटीच्या भव्य इमारतीच्या पोटात दडलेल्या मुख्य बस स्थानकावर जाऊन उभी राहिली. सर्व प्रवाशांच्या मागोमाग आम्ही बाहेर पडलो. न्यूयॉर्कचे मुख्य आकर्षण असलेल्या स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन सर्वात आधी घ्यायचे हे ठरलेलेच होते. पण बस स्टेशनपासून ती जागा दूर असल्यामुळे लोकलमधून तिथपर्यंत जायचे होते. विमानतळावर असतात तशा प्रकारच्या मार्गदर्शक पाट्या बस स्टेशनवरसुध्दा होत्या, पण त्या वाचून त्यांचा अर्थ उमगण्यासाठी सुध्दा थोडी स्थानिक माहिती आणि अनुभव असावा लागतो.


आरामगाडीतून आणि तेही थंड हवेत केलेल्या तासाभराच्या प्रवासानंतर कोणालाही किंचितही थकवा आला नव्हता, तरीसुध्दा प्रत्येकालाच रेस्टरूममध्ये जाऊन यायचे होतेच. अमेरिकेतल्या 'रेस्टरूम'मध्ये विश्रांती घेण्यासाठी आरामखुच्या किंवा उबदार कोच ठेवलेले नसतात. रेस्टरूमच्या पाटीवरच पुरुष, स्त्री, अपंग वगैरे चित्रे पाहून आत काय असेल याची कल्पना येते. त्याशिवाय कांही ठिकाणी तान्ह्या मुलांची डायपर्स बदलण्यासाठी खास व्यवस्था केलेली असते आणि तसे चिन्ह त्या विश्रांतीगृहाच्या फलकावर असते.


रेस्टरूमला भेट देऊन 'फ्रेश' झाल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे मोर्चा वळवला. लंडनमधल्या 'अंडरग्राउंड' प्रमाणेच न्यूयॉर्कच्या 'सबवे'चे त्याहूनही मोठे आणि गुंतागुंतीचे असे प्रचंड जाळे आहे. त्यात कित्येक 'लाइनी' आहेत आणि त्यावर चारपाचशे इतकी स्टेशने आहेत. ते समजावून घेण्याइतका वेळ माझ्याकडे नव्हता आणि आमची 'गाइडेड टूर' असल्यामुळे त्याची गरजही नव्हती. सौरभच्या पाठोपाठ तो नेईल तिकडे जायचे, मध्येच कांही आकर्षक दिसले म्हणून अधेमध्ये कुठे रेंगाळायचे नाही, एवढेच आम्हाला करायचे होते. बस स्थानकातून निघाल्यावर अनेक कॉरीडॉर आणि सरकते जिने पार करून त्या इमारतीच्या आंतूनच आम्ही एका सबवे स्टेशनवर जाऊन पोचलो. पोर्ट ऑथॉरिटीची ती अगडबंब बिल्डिंग बाहेरून कशी दिसते हे कांही त्या वेळी पहायला मिळाले नाही.


आम्ही गेलो होतो त्या जागेवर ते रेल्वेस्टेशन वाटावे अशी कसलीही खूण दिसली नाही. रूळ, फलाट, प्रवासी, हमाल, स्टॉलवाले, रेल्वे कर्मचारी, तिकीटाची खिडकी वगैरेमधले कांहीसुध्दा तिथे दिसत नव्हते. एका हॉलमध्ये एका बाजूला ओळीने तीनचार यंत्रे मांडून ठेवली होती आणि समोरच्या बाजूला तीनचार यांत्रिक गेट्स होती. आमच्याखेरीज अन्य कोणी माणसेही तिथे नव्हती. बहुधा रविवार असल्यामुळे अशी परिस्थिती असावी. सौरभने त्यातल्या एका यंत्रावरची दोन तीन बटणे दाबून पाहिली, पण त्याने कांहीच प्रतिसाद दिला नाही. मनातला वैताग त्या यंत्रावर काढून दुस-या यंत्रावरची बटणे दाबून पाहिली. त्याच्या स्क्रीनवर कांही वाक्ये उमटली. त्यानंतर आणखीन एक बटण दाबून स्लॉटमधून क्रेडिट कार्ड फिरवल्यावर सरसर करीत सहा तिकीटे बाहेर आली. ती घेऊन आम्ही समोर असलेल्या गेटपाशी गेलो. एकेकाने तिथल्या बारला चिकटून उभे राहून आपले तिकीट त्या यंत्राला दाखवले की ते गेट काटकोनात फिरायचे आणि तेवढ्यात त्या माणसाने पलीकडे जायचे. त्याच्यामागे दुसरा बार येऊन ते गेट बंद होत असे. आमच्यातले पहिले दोघे यशस्वीरीत्या पार गेले, पण तिस-या आणि चौथ्या व्यक्तींच्या हातातल्या तिकीटांना पाहून ते गेट फिरलेच नाही. पाचव्या आणि सहाव्या तिकीटाने गेटाचे चक्र फिरले, पण दोघेजण अजून बाहेर राहिले होते. तक्रार करायची झाली तर ती ऐकून घ्यायला तिथे कोणीच नव्हते. त्या तिकीटाचा नंबर, स्टेशनाचे नांव, तारीख, वाळ वगैरे तपशील रेल्वे कंपनीला कळवून रिफंड मिळवण्याची व्यवस्था होती पण साडेतीन डॉलरसाठी कोणताही अमेरिकन माणूस एवढी झिगझिग करत नाही. गेटच्या पलीकडे जाण्यासाठी नवी तिकीटे काढणे आवश्यक होतेच, ती काढली आणि पुढे गेलो. आमची ही झटपट चालली असतांनाच एक अमेरिकन बाई आपल्या दहा बारा वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन आल्या, त्या दोघीही गेटच्या बारला खेटून ऊभ्या राहिल्या आणि एकाच तिकीटाचा वापर करून पलीकडे गेल्या. आमचे पैसे वाया घालवणा-या रेल्वे कंपनीला कोणी तरी गंडा घातलेले पाहून थोडे बरे वाटले आणि पुन्हा आपल्यावर अशी पाळी आली तर हा प्रयोग करून पहायचे ठरवले.


गेटच्या पलीकडच्या बाजूला प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी सरकते जिने होते, त्यावरून खाली गेलो. तिथेही गाड्यांच्या वेळा दाखवणारे इंडिकेटर होते, पण ते वेगळ्या पध्दतीचे असल्यामुळे शोधायला आणि समजायला किंचित वेळ लागला. आमची गाडी आधी येणार असल्याचे त्यात दाखवले होते, पण प्रत्यक्षात विरुध्द बाजूला जाणारी गाडी आधी आल्यामुळे मनात थोडा संभ्रम झाला, पण तेवढ्यात आमच्या गाडीच्या दिव्याचा उजेड बोगद्यात दिसायला लागला. त्याच्या पाठोपाठ आमची गाडी आलीच. त्यात फारशी गर्दी नव्हती. रविवारचा परिणाम असावा, पण गाडी रिकामीही नव्हती. त्यामुळे आरामात चढायला मिळाले आणि बसायला जागासुध्दा मिळाली.


माझ्या अपेक्षेप्रमाणे त्या सबवे लाइनचे रेखाचित्र डब्यात लावलेले होते. गाडीने कोठपर्यंत प्रगती केली आहे हे त्यात दाखवले जात होते, तसेच प्रत्येक स्टेशन येण्यापूर्वी येऊ घातलेल्या स्टेशनचे नांव आणि त्याच्या पुढील थांब्याचे नांव यांची घोषणा होत होती. आमचे गंतव्य स्थानक जवळ यायला लागले त्यावेळी याशिवाय एक वेगळी अनाउन्समेंट झाली. अमक्या अमक्या स्टेशनांवर ज्यांना उतरायचे आहे त्या प्रवाशांनी गाडीच्या पुढल्या भागात बसून घ्यावे असे सांगितले गेले. त्यात आमच्या स्टेशनचे नांव असल्यामुळे आम्ही उठून डब्यातल्या डब्यात पुढे सरकलो, पण तो डबा आंतून पुढच्या डब्याला व्हेस्टिब्यूलने जोडलेला नव्हता. त्यामुळे पुढल्या स्टेशनवर खाली उतरलो आणि धांवत पळत एक डबा ओलांडून पलीकडल्या डब्यात जाऊन चढलो. हा धांवपळ कशासाठी चालली आहे यावर चर्चा चालली असतांनाच आमचे स्टेशन आले आणि आम्ही खाली उतरलो. पहातो तो त्या स्टेशनवरचा फलाट लहान आकाराचा होता आणि आमचा आधीचा डबा त्यावर आलाच नव्हता. तो बोगद्याच्या आंतच राहिला होता. परदेशातल्या रेल्वेगाडीचा डबा फलाटावर आल्याखेरीज त्याचे दरवाजे उघडत नाहीत, त्यामुळे अंधारात खाली पडायची भीती नव्हती, पण आम्ही डबा बदलला नसता तर निष्कारण पुढे जाऊन परत मागे यावे लागले असते. नेहमी प्रवास करणा-या प्रवाशांना ही गोष्ट ठाऊक असा नाहीवी, त्यामुळे आमच्यासारखी धांवपळ आणखी कोणी केलेली दिसली नाही.

आमच्याबरोबर त्या डब्यातले बहुतेक सगळे प्रवासी उतरले आणि स्टेशनाबाहेर पडल्यानंतर एकाच दिशेने चालायला लागले. ते सगळे लिबर्टी द्वीपाकडेच जाण्यासाठी आले होते.
समोरच एक मोठा बगीचा होता आणि त्याच्या पलीकडले चौपाटीसारखा शांत समुद्रकिनारा दिसत होता, त्यात तीन चार स्टीमर बोटीसुध्दा चालतांना दिसत होत्या. बागेत आंतल्या बाजूला तिकीटांची खिडकी होती. "आधीच ही जागा अनेक वेळा पाहिली असल्यामुळे आम्ही कांही पुन्हा यावेळी येणार नाही." असे सौरभ आणि सुप्रिया यांनी जाहीर केले. आम्ही त्यांना सोबत यायचा आग्रह करणारच हे माहीत असल्यामुळे त्यांनी ते आधी सांगितले नव्हते. शिवाय "त्या बेटावर अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबसुध्दा न्यायची परवानगी नाही, गळ्यातला कॅमेरा आणि खांद्याला टांगलेली पर्स सोडली तर दोन्ही हात मोकळे ठेऊन जावे लागते, त्यामुळे दिवसभर चरण्यासाठी बरोबर आणलेले अन्नपदार्थ टाकून द्यावे लागतील आणि अव्वाच्या सव्वा भावाने ते पुन्हा विकत घ्यावे लागतील. पुन्हा ते घरच्यासारखे असणार नाहीतच. थंडी पडली तर घालण्यासाठी नेलेले जास्तीचे गरम कपडे अंगावर चढवून त्यांचे ओझे वहावे लागेल." वगैरे अनंत कारणे त्यांनी पुढे केल्यामुळे आम्ही त्यांना मागे थांबू दिले आणि तिकीटांच्या रांगेत जाऊन उभे राहिलो. त्यावेळी तिथे पन्नास साठ लोक असतील. टूरिस्ट सीजन संपला असल्यामुळे त्या दिवशी कांहीच गर्दी नाही असे सौरभने सांगितले. महिनाभरापूर्वी ते आले होते तेंव्हा तिकीटाच्या रांगेतच त्याचा तास दीड तास वेळ गेला होता. या बाबतीत आम्ही थोडे सुदैवीच होतो. साठ वर्षांपेक्षा वयाने मोठे असणा-या ज्येष्ठ नागरिकांना तिकीटात दोन डॉलर सूट असल्याचे अगदी शेवटच्या क्षणी कुठे तरी वाचले आणइ आपले दोन डॉलर वाचवले. तिकीटे काढून झाल्यावर आम्ही उभयता आणि आमचे एक आप्त जोडपे असे चौघेजण स्टीमरच्या धक्क्यावर जाऊन रांगेत उभे राहिलो.

. . . . . . . . . . (क्रमशः)

Wednesday, August 12, 2009

श्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार

चातुर्मासात केलेल्या धार्मिक कृत्यांचे फळ जास्त मिळते आणि श्रावण महिन्यात तर ते त्याहून जास्त मिळते अशी भाविकांची श्रध्दा असल्यामुळे या काळात जास्त प्रमाणात व्रतवैकल्ये केली जातात. माझ्या लहानपणी आमच्या घरातल्या बहुतेक प्रौढ बायका दर चातुर्मासाला कसला तरी नेम करायचा असा विचार करून त्याची सुरुवात करीत असत, पण चार महिन्यांचा काळ जरा जास्तच लांब वाटत असल्यामुळे श्रावण महिनाभर तरी तो नेम पाळून मिळेल तेवढे जास्तीत जास्त पुण्य पदरात पाडून घेत असत. या महिन्याची सुरुवात जिवतीच्या पटाने आणि कहाण्या वाचण्याने होत असे हे मी मागील लेखात सांगितले आहेच. महिन्यातल्या वेगवेगळ्या वारी आणि तिथींना त-हेत-हेची व्रतवैकल्ये आणि रूढी पाळायच्या असत.

कंटाळा करून घालवलेली सूर्यनमस्काराची संवय श्रावणातल्या रविवारी पुन्हा सुरू केली जाई. त्यासाठी सूर्याची बारा नांवे एका कागदावर लिहून घेतली जात आणि एकेकाच्या नावाने साष्टांग नमस्कार घातले जात. श्रावण सोमवारी मोठ्या लोकांचा उपवास असे. हे शिवव्रत एकदा घेतले की मोडता येत नाही अशी श्रध्दा असल्यामुळे आणि ही पोरे मोठी झाल्यावर त्यांना शिंगे फुटणारच याची खात्री असल्यामुळे मुलांना त्यातून वगळले जात असे. त्यामुळे नेहमीच्या जेवणाबरोबरच साबूदाण्याची खिचडी पण खायला मिळत असे.

आमच्या जमखंडीपासून कोसभर अंतरावर डोंगरावर रामतीर्थावर रामेश्वराचे पुरातन मंदीर आहे, श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी त्याचे दर्शन घ्यायचेच. त्या दिवशी तिथे जत्रा असल्यामुळे त्याचे जास्तीचे आकर्षण असायचे. जत्रेत खर्च करण्यासाठी प्रत्येक मुलाला एक आणा मिळायचा. इतर कुठल्या पॉकेटमनीची पध्दत नसल्यामुळे त्याचे अप्रूप वाटायचे. घरातली, शेजारची आणि शाळेतली मित्रमंडळी मिळून सात आठ जणांचा घोळका करून आम्ही जत्रेत फिरत असू. सगळ्यांचे मिळून झालेल्या सात आठ आण्याचे कुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे वगैरे घेऊन ते खायचे. त्या काळात ते पुरेसे असत. रामतीर्थाच्या परिसरात गुलमोहोराची बरीच झाडे होती. तिथल्या स्थानिक बोलीभाषेत त्याला संकासूर म्हणतात. त्याला उन्हाळ्यात आलेली लालभडक फुले कोमेजून पावसाबरोबर पडून जातात. त्या जागी काळपट लाल रंगाच्या शेंगा येऊन श्रावण महिना येईपर्यंत त्या चांगल्या हातभर लांब झालेल्या असत. त्यातली सर्वात जास्त लांब आणि सरळ शेंग शोधून ती पटकावण्याची चढाओढ लागत असे. त्या शेंगा हातात धरून वाटेवरच्या गवतावर आणि झुडुपांवर त्या सपासपा चालवीत आम्ही घराकडे परतत असू. पण वाटेतच कोणाच्या तरी अंगात मावळा संचारल्यामुळे युध्द सुरू होई आणि त्यात झालेले त्या शेंगांचे तुकडे आसमंतात भिरकावून दिले जात. त्यातून गुलमोहराची किती नवी झाडे उगवली असतील याची गणना करायचा प्रयत्नही कधी केला नाही. पण अभावितपणे कां होईना आम्ही या प्रकारे निसर्गाला साथ दिली होती असे आता सांगता येईल.

मंगळवारी मंगळागौर असायची. गांवात बहुतेक सगळी एकत्र कुटुंबेच होती. त्यातल्या आमच्या घरी, शेजारपाजारी, किंवा गावात राहणा-या काकामामांपैकी कोणा ना कोणाच्या घरी नवीन लग्न झालेल्या लेकी किंवा सुना असायच्या आणि त्यामुळे मंगळागौरीची पूजा व्हायचीच. त्या निमित्याने प्रसाद खायला मिळायचा. स्त्रीवर्गामध्ये खेळ, नाचगाणी, उखाणे वगैरेचा कार्यक्रम रंगायचा, त्यात मुली तर उत्साहाने भाग घेतच, मुलांनाही त्याची झलक तरी पहायला मिळत असे. बुधवार आणि गुरुवारची वैशिष्ट्ये आता मला आठवत नाहीत, पण शुक्रवारचा दिवस खास असायचा. त्या दिवशी पुरणाचे दिवे लावून जिवतीला त्याची आरती केली जात असे आणि त्यानंतर मुलांचे औक्षण केले जाई, तसेच लेकुरवाळ्या सवाष्णींना त्यांच्या लेकरांसह भोजनाला बोलावले जात असे. त्या निमित्य पुरणावरणाचा घाट घातला जाई. शनिवारी ज्वारी किंवा बाजरीच्या कण्या शिजवून त्या ताकाबरोबर खायचा रिवाज होता. कांही जणांना तो पदार्थ आवडत असे, पण बाकीच्यांना त्या दिवशी दोन चार घास तरी खावाच लागत असे. संध्याकाळी मारुतीच्या देवळात नारळ फोडायचा आणि तिथल्या दिव्यात आपले पळीभर तेल घालायचा रिवाज होता. आधीच्या काळात त्यासाठी घरून बुदलीभर तेल न्यावे लागत असे. पुढे त्याचे व्यापारीकरण झाले. देवळाशेजारीच एका तेल्याने दुकान उघडले आणि छोट्या छोट्या अनेक पात्रात तेल भरून ते मारुतीला वाहण्यासाठी तो तयार ठेऊ लागला. शिवाय त्या तेलाची किंमत बाजारभावापेक्षा कमी असे. ते तेल खाण्यासाठी वापरावयाचे नसल्यामुळे त्याच्या दर्जाबद्दल विचार करायचे कारण नव्हते. स्वस्त आणि सुटसुटीत असा हा पर्याय लोकांनी लगेच उचलून धरला.

नागपंचमीला वेताच्या गोल डब्यात नागाची वेटोळी ठेऊन ती घेऊन गारुडी लोक घरोघरी जात. इतर वेळी पुढे पुढे करणारी बच्चे कंपनी या वेळी मात्र आईच्या पदराआड दडून विस्फारलेल्या डोळ्यांनी नागाचा उभारलेला फणा पहात असत. आमच्या गावापासून शंभर कोसांच्या अंतरात कोठेही समुद्रकिनारा नव्हता. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा समुद्राशी कांही संबंध नसायचा. त्या दिवशी भरपूर नारळी भात केला जात असे. इतके चविष्ट आणि सर्वांना आवडणारे पक्वान्न एरवी कधीच होत नसे. ते खाण्यासाठी पुढल्या वर्षाच्या नारळी पौर्णिमेची वाट पहावी लागे. नंदा या नटीची प्रमुख भूमिका असलेला छोटी बहन हा लोकप्रिय चित्रपट आल्यानंतर घरातल्याच रेशमाच्या धाग्यापासून राखी बनवून बहिणी आपल्या भावांना बांधायला लागल्या होत्या. त्या काळात त्या बाजारात मिळत नसत किंवा पोस्टाने येत नसत. ग्रीटिंग कार्ड हा प्रकारच त्या भागात ऐकूनही ठाऊक नव्हता.

गोकुळाष्टमीला कृष्णजन्म होत असे आणि त्याच्या दुसरे दिवशी गोपाळकाला. आपापल्या घरातून निरनिराळे चविष्ट पदार्थ आणून ते एका मोठ्या परातीत मिसळले जायचे आणि तो काला सगळ्यांच्या हातावर घास घास ठेवला जात असे. ती एक प्रकारची भेळ असली तरी त्यात कोणते पदार्थ आणि किती प्रमाणात मिसळायचे हे ठरले नसल्यामुळे गोड, तिखट, आंबट, खारट या सगळ्या चवींनी युक्त अशी दर वेळी एक वेगळीच चंव तयार होत असे. याशिवाय जास्त फळ मिळण्याच्या आशेने सत्यनारायणादि अनेक प्रकारच्या पूजा केल्या जात असत. जुन्या काळातल्या पूजा अर्चा, एकादष्ण्या, अभिषेक वगैरे अनेक गोष्टी आता बंद झाल्या आहेत, तर संतोषी माता आणि वैभवलक्ष्मी वगैरे नवी कांही व्रते लोकप्रिय होऊ लागली आहेत असे दिसते. त्या सुध्दा श्रावण महिन्यातच जास्त प्रमाणात होतात.

श्रावण महिन्यात कर्माचे जास्त फळ मिळत असल्याने सगळे लोक देवाच्या नजरेत गुड बॉय किंवा गुड गर्ल बनण्याच्या प्रयत्नात असत. त्या महिनाभर कांही लोक मद्यपान वर्ज्य करत तर कांही लोक शुध्द शाकाहारी बनत. आमच्या घरात मद्य आणि मांस या दोन्ही गोष्टींचा उच्चार सुध्दा करायला मनाई होती. तोंडाला बाटली लावण्याचा किंवा एका हाताने दुस-या हाताच्या पंजावर सुरी चालवण्याचा अभिनय करून त्याचा उल्लेख केला जात असे. त्यामुळे श्रावण महिन्यामुळे त्यात कांही फरक पडत नसे. पण कांदा लसूण वर्ज्य केलेले जाणवत असे. चातुर्मासात जमले नाही तर महिनाभर तरी कांही ना कांही सोडायची फॅशनच असायची. न आवडणा-या गोष्टी आधीच जन्मभरासाठी सोडलेल्या असत आणि उपलब्ध नसलेल्या गोष्टी सो़डल्या म्हणून सांगितले तर हंसे होईल. यामुळे कांही प्रौढ महिला चहा किंवा बटाटा यासारखी रोजच्या उपयोगातली एकादी वस्तू सोडत. यात आपण फार मागे रहायला नको म्हणून पुरुषवर्ग महिनाभरात हजामत करून घेत नसत, कांही लोक दाढीमिशादेखील वाढवत.

अशा त-हेने श्रावण महिना चांगला गाजत असे आणि तो संपण्यापूर्वीच गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असे.

जिवतीचा पट आणि कहाण्या


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत श्रावण महिन्याला एक खास स्थान आहे. जिवतीचा पट आणि कहाण्या या दोन गोष्टींना हा महिनाभर विशेष महत्व प्राप्त होते. शहरातल्या वातावरणात आता पंचांगातल्या महिन्यांना महत्व राहिले नाही आणि जीवनातले सर्व व्यवहार कॅलेंडरबरहुकूम होत असल्यामुळे ते महिनेच बाजूला पडले आहेत असे चित्र दिसत असले तरी निदान ग्रामीण भागात आणि शहरातल्या कांही घरात अजून श्रावण महिना पाळला जातो. पूर्वी तो सरसकट सगळ्यांच्या घरी पाळला जात असे, आता एका बाजूने त्याचे प्रमाण कमी कमी होत आहे असे असले तरी परदेशात गेलेले मराठी लोकसुध्दा त्यातला कांही भाग पाळतात असेही मी पाहिले आहे.

श्रावण महिना लागताच देव्हा-याच्या बाजूला जिवतीच्या पटाची स्थापना होते. पूर्वी तो साध्या कागदावर काळ्या शाईने छापला जात असे. आता तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे गुळगुळीत कागदावर सुबक आणि रंगीत चित्रे असलेले पट मिळतात. हिरण्यकश्यपूचे पोट फाडत असलेले श्रीनरसिंह, त्यांच्या समोर हात जोडून उभा असलेला बालक प्रह्लाद, कालियामर्दनाचा प्रसंग, अनेक बालगोपालांसह दोन जिवत्या, हत्तीवर आरूढ झालेले बुध आणि वाघावर स्वार झालेले बृहस्पती यांची चित्रे या पटावर काढलेली असतात. त्यासाठी याच देवतांची निवड कोणी आणि कां केली वगैरे प्रश्नांची उत्तरे मला कधी मिळाली नाहीत. परंपरांच्या मुळाशी जाऊन पोचणे कठीण असते. तिथी आणि वार पाहून यातल्या एकेका देवतेची पूजा करावी असा विचार कदाचित असेल, पण बहुतेक सगळे लोक रोजच या सर्व चित्रांना गंध, फूल, हळद, कुंकू वाहतात. पूर्वीच्या काळी वापरलेल्या साध्या कागदावरचे चित्र महिनाभरानंतर ओळखू येत नसे आणि त्याचे विसर्जन केले जात असे. आजकाल कांही लोक हा पट लॅमिनेट करून घेतात आणि श्रावण महिना संपल्यानंतर स्वच्छ पुसून तो उचलून ठेवतात. पुढच्या वर्षी श्रावण आल्यानंतर (त्या वेळी तो सापडला तर) पुन्हा त्याची पूजा करावी अशी योजना असते, ती किती यशस्वी होते ते माहीत नाही.

श्रावण महिन्यात संध्याकाळी कहाण्या वाचण्याचा प्रघात मात्र आता मागे पडत चालला आहे. माझ्या लहानपणी संध्याकाळी दिवेलागणी झाल्यानंतर घरातली सगळी मुले एकत्र बसून शुभंकरोती आणि परवचा म्हणत असत. श्रावण महिन्यात त्यानंतर कहाणीवाचनाचा कार्यक्रम ठरलेला असे. त्या वेळी घरातली कांही मोठी माणसे सुध्दा येऊन बसत आणि श्रवण करत असत. पहिली कहाणी नेहमी गणेशाची असे. "निर्मळ मळं, उदकाचं तळं, तेथे गणेशाची देवळंरावळं" अशी त्याची सुरुवात केल्यानंतर "संपूर्णाला काय करावे, पसापायलीचे पीठ कांडावे, त्याचे अठरा लाडू करावेत, सहा देवाला द्यावेत, सहा ब्राम्हणाला द्यावेत, सहाचे सहकुटुंब भोजन करावे." वगैरे सूचना असत. पण रोज वाचूनसुध्दा त्यावर कोणी अंमलबजावणी केलेली मात्र कधी माझ्या पाहण्यात आली नाही.

त्यानंकर रोज त्या दिवसानुसार वेगळी कहाणी वाचायची. रविवारी आदित्यराणूबाईची, सोमवारी शंकराची, मंगळवारी मंगळागौरीची, नागपंचमीला नागोबाची वगैरे. या सर्व कहाण्या "आटपाट नगर होते." पासून सुरू होत आणि "ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण " या वाक्याने संपत. त्यात बहुतेक करून तीन चार शब्दांची लहान लहान वाक्ये असत. आटपाट नगर होते झाल्यानंतर "तिथे एक राजा होता. तो खूप शूर होता. त्याला दोन राण्या होत्या." किंवा "तिथे एक ब्राम्हण रहायचा, तो खूप गरीब होता." वगैरे सोप्या वाक्यांमधून ती गोष्ट पुढे सरकत असे. त्याचे वाचन करतांना सुध्दा ते एका विशिष्ट लयीत केले जात असे.

कांही कहाण्यांमधून खूप चांगला आशय मनावर बिंबवला जात असे. उदाहरणार्थ शुक्रवारची कहाणी घेता येईल. एका श्रीमंत भावाची दुर्दैवी बहीण अत्यंत गरीब होती. एकदा त्या भावाने रोज सहस्रभोजन घालायला सुरुवात केली, पण आपल्या बहिणीला जेवणाचे आमंत्रण दिले नाही, तिची दैन्यावस्था पाहून लोक आपल्याला नांवे ठेवतील याची भीती त्याला वाटली. आपल्या मुलांच्या पोटात चार चांगले घास जावेत या उद्देशाने अन्नाला मोताद झालेल्या बहिणीने तिथे जायचे ठरवले. पण निमुटपणे रांगेत जाऊन बसलेल्या आपल्या बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या अंगावरले कपडे पाहून त्या निष्ठुर भावाला लाज वाटली आणि तिचा राग आला. तिने तिला पुन्हा न यायला सांगितले, पण मुलांनी मामाकडे जायचा हट्ट धरल्यामुळे झालेला अपमान विसरून ती बहीण दुसरे दिवशी पुन्हा सहस्रभोजनाच्या पंक्तीत जाऊन बसली. भाऊ या वेळी जास्तच डाफरला. तिसरे दिवशी तर त्याने तिला हाताला धरून बाहेर काढले.

पुढे तिच्या कुटुंबाला ऊर्जितावस्था आली. आता मात्र भावाने तिला आग्रहाने आपल्याकडे जेवायला बोलावले. तिच्यासाठी पंचपक्वांनांचा बेत केला. ती जेवायला आल्यावर तिला सन्मानाने पाटावर बसवले. त्या बहिणीने आपला भरजरी शेला, गळ्यातला चंद्रहार, हातातल्या गोठ पाटल्या वगैरे एकेक अलंकार काढून त्या पाटावर ठेवले. मग त्यातल्या एकाला जिलबीचा घास दिला, दुस-याला पुरणाच्या पोळीचा, तिस-याला लाडूचा वगैरे. ती हे काय करते आहे असे भावाने विचारताच त्या मानिनीने उत्तर दिले, "आज तू ज्यांना जेवायला बोलावले आहेस त्यांनाच मी हे जेवण भरवते आहे. माझे जेवण मला सहस्रभोजनाच्या दिवशी मिळाले आहे." त्या बोलण्याने भावाचे डोळे खाडकन उघडले, त्याने बहिणीची क्षमा मागितली आणि आपल्या वागणुकीत सुधारणा केली.

अशा अनेक बोधप्रद गोष्टी या कहाण्यांमध्ये आहेत. पण आजच्या जीवनात घरातली सारी मंडळी तीन्हीसांजेला घरी परतच नाहीत आणि आल्यानंतर टीव्हीसमोर बसलेली असतात. ते मनोरंजन सोडून त्यांनी जुन्या पुराण्या कहाण्या ऐकाव्यात अशी अपेक्षा धरता येणार नाही.

Saturday, August 08, 2009

बालकवी ठोंबरे

बालकवींचा अगदीच त्रोटक परिचय श्रावणमासी या मागील लेखात करून दिला होता. त्यांच्याबद्दल आणखी कांही माहिती देण्यासाठी वेगळा भाग लिहिणे मला आवश्यक वाटले. ते खानदेशातले होते. खानदेश हा प्रदेश सुपीक जमीनीचा म्हणून ओळखला जातो. तिथे कापसाचे उत्पादन होते असे शाळेत शिकल्यासारखे आठवते. आजकाल त्या भागातून रेल्वेने जातांना अनेक ठिकाणी केळ्याच्या बागा दिसतात. पण खानदेशात एकादे निसर्गरम्य प्रेक्षणीय असे ठिकाण असल्याचे मात्र कधी ऐकले नाही. शंभर वर्षांपूर्वी कदाचित परिस्थिती वेगळी असेल. अशा खानदेशातच त्र्यंबक बापूजी ठोंबरे लहानाचे मोठे झाले. बालपणापासूनच त्यांना कविता रचण्याची आवड होती आणि तिथल्या निसर्गापासून त्यासाठी त्यांना स्फूर्ती मिळत होती.
सन १९०७ मध्ये जळगांवला महाराष्ट्रातले पहिले कविसंमेलन भरले होते. तो बोलपटांचा जमाना नसल्यामुळे गीतकार हा पेशा अजून जन्माला आलेला नव्हता. मुद्रण, प्रकाशन, वितरण वगैरेचा फारसा विकास झालेला नसल्यामुळे कवितासंग्रह काढून ते विकून त्यातून खूप पैसे मिळण्याची शक्यता कमीच होती. त्या काळी प्रसिध्द होत असलेल्या वाङ्मयिन नियतकालिकांमध्ये त्या छापून येक असत. त्यामुळे कविता करणे ही एक मनातली हौस किंवा आंतरिक ऊर्मी असे आणि सुस्थितीत असलेले त्या काळातले प्राध्यापक, अधिकारी, न्यायाधीश, दिवाण, रावसाहेब, रावबहाद्दूर अशी प्रतिष्ठित मंडळीच कवी म्हणून ओळखले जात असत. खानदेशातल्याच अशिक्षित बहिणाबाईंनी अप्रतिम काव्यरचना केली होती, पण त्यांच्या हयातीत त्यांना प्रसिध्दी मिळाली नाही. तत्कालीन समाजातल्या मान्यवर मंडळींनीच जळगावच्या त्या कविसंमेलनात भाग घेतला असणार. त्या काळात टेलीफोन, ई-मेल वगैरे कांही नव्हते. पत्रोपत्रीच सगळे ठरवून माहितीतल्या कवींना आमंत्रणे केली असतील आणि जीआयपी रेल्वेच्या ज्या एक दोन गाड्या त्या काळी धांवत असतील त्यातून ही मंडळी जळगावला जाऊन पोचली असतील. तरीसुध्दा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, इंदूर वगैरे दूर अंतरावरील ठिकाणांहून शास्त्री, पंडित, कवी आणि रसिक श्रोते मंडळी आली होती. जवळपास राहणा-या स्थानिक लोकांनी गर्दी केली होतीच.
एकंदर २३ कवी या संमेलनात आपले काव्यवाचन आणि गायन करणार होते. त्यातच एक १७ वर्षाचा मुलगा अचानक मंचावर चढला आणि त्याने थेट सभेचे अध्यत्र कर्नल डॉ.कीर्तीकर यांचेजवळ जाऊन त्यांना आपले मनोगत तिथल्या तिथे रचलेल्या चार ओळीतून ऐकवले. ते ऐकून सर्वानुमते त्यालाही मंचावर येऊन आपल्या कविता सादर करायची अनुमती दिली गेली. त्याने म्हणजे त्र्यंबकने सर्व रसिक श्रोत्यांना आपल्या शीघ्रकवित्वाने स्तिमित केले. रीतीप्रमाणे त्याचाही सत्कार झाला तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अध्यक्षांनी त्याला बालकवी ही उपाधी दिली आणि त्यानंतर ते त्याच नांवाने ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर त्यांनी अनेक सुंदर रचना केल्या. त्यात निसर्गसौंदर्याची अत्यंत रसिकतेने केलेली वर्णने आहेतच, कांही कवितामध्ये एक सकारात्मक जीवनदृष्टी आहे. माझे गाणे या कवितेत ते लिहितात,
ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची, सौभाग्याची तार तशी ही, ही जगदैक्याची.
"निरध्वनी हे, मूक गान हे" यास म्हणो कोणी, नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी.
सर्व धर्म हे, भेद-पंथही सर्व एक झाले, माझे, माझे विश्व, तार ही प्रेमाची बोले ।।
ते असेही सांगतात,
सुंदरतेच्या सुमनावरले दंव चुंबुनि घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे ।।
जगात जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद पसरलेला आहे हे सांगतांनाच ते पुढे लिहितात,
स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे ।।
त्यांच्या गाण्यात सौंदर्य होते, तत्वज्ञान होते, त्यातल्या शब्दांना नादमाधुर्य असायचे. त्यामुळे चांगल्या संगीतकारांच्या हातात पडल्यावर त्यांना अवीट गोडी प्राप्त झाली. सुमारे नव्वद ते शंभर वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कवितांनी पन्नास वर्षांपूर्वी माझ्या मनावर मोहिनी घातली होती. तीस पस्तीस वर्षांपूर्वी त्यातली कांही गाणी स्वरबध्द केली गेली आणि आजसुध्दा ती ऐकली जात आहेत, यावरून त्यांचे काव्य कसे अजरामर आहे याची कल्पना येईल.
अशा या बालकवींना आणखी आयुष्य लाभले असते तर त्यांनी आणखी किती अद्भुत काव्यरचना लिहून ठेवले असत्य़ा कोणास ठाऊक. मराठी सारस्वताच्या दर्दैवाने त्यांना अल्पायुष्यातच, वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी काळाने ओढून नेले.

Friday, August 07, 2009

श्रावणमासी ........

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

आषाढात सुरू झालेल्या पावसाचा वेळी अवेळी होणारा धिंगाणा आता कमी झालेला असतो. उन्हाबरोबर त्याचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. कधी लख्ख ऊन पडले असतांना मध्येच पावसाची सर येऊन जाते तर पिशवीतली छत्री बाहेर काढून ती उघडेपर्यंत ती ओसरून पुन्हा ढगांमधून उन्हाच्या तिरिपी दिसायला लागतात. ना थंड ना ऊष्म अशा या सौम्य वातावरणात मन प्रसन्न होतेच. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून ते अधिकच उल्हसित होते.
बालकवी ठोंबरे यांच्या या प्रसिध्द कवितेत त्यांनी श्रावणातल्या या निसर्गाच्या विलोभनीय रूपाबद्दल जे लिहिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी दिलेल्या कांही अनुपम उपमा खाली दिलेल्या पंक्तींमध्ये पहायला मिळतात.

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

आकाशातल्या हवेत पाण्याचे तुषार असतील तर त्यातला प्रत्येक सूक्ष्म कण स्फटिकाप्रमाणे काम करतो आणि त्यावर पडलेल्या सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यांचे असंख्य रंगांमध्ये परावर्तन करतो. आकाशात सूर्य तळपत असला आणि समोरच्या बाजूला दमट हवा असेल तर आपल्याला त्यातून सप्तरंगी सूर्यधनुष्य दिसते. हे त्याच्या मागे असलेले सायन्स झाले. एकमेकात बेमालूमपणे गुंतलेल्या सात रंगांचा ङा गोफ विणला आहे असे बालकवींच्या कवीमनाला वाटते आणि श्रावणराजाच्या आगमनाने आनंदून जाऊन सृष्टीदेवीने आभाळाच्या मांडवावर हे मंगल तोरण बांधले आहे असा भास त्यांच्या संवेदनशील मनाला होतो.
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

बगळ्यांची माळ अंबरात उडत असतांना ती म्हणजे स्वर्गातल्या तल्पवृक्षाच्या फुलांची माळ आहे किंवा आकाशातल्या चांदण्या, ग्रह, तारे वगैरे रांगेने जमीनीवर उतरत आहेत असे बालकवींना वाटते.
पुराणातल्या एका आख्यानाचा दाखला देऊन ते म्हणतात,
सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला!

सोनचाफा फुलला, केवडा दरवळला आणि त्यांच्या सोबतीने पारिजातकांनेसुध्दा बहरून फुलांचा सडा पाडला, पण बालकवींची सत्यभामा "फुले कां पडती शेजारी" असे म्हणत रुष्ट किंवा खिन्न होत नाही. उलट त्या नाजुक फुलांच्या मंद सुगंधाने तिच्या मनात असलेली अढी मावळते.
असे हे श्रावणाचे रूप कोणाकोणाला मोहवत असेल?
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात, 
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत
हिरव्या गार कुरणातून मनसोक्त चरत फिरतांना गायी आणि त्यांची खिल्लारे मौजमस्ती करतातच. त्यांना सांभाळणारे गुराखी आनंदाने गाणी गातात आणि आपल्या अलगुजाच्या मधुर आवाजातून श्रावणराजाच्या महात्म्याचे गुणगान करतात. श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या निमित्याने देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहे-यावरच क्षावण महिन्याचे गीत स्पष्ट दिसते.
या ब्लॉगचा मागोवा घेणारे श्री.सुजीत बालवडकर यांच्या स्थळावर मला ही बालपणीची अत्यंत आवडती कविता वाचायला मिळाली. त्यांचा मी आभारी आहे. ही संपूर्ण कविता या दुव्यावर वाचता येईल.
http://kavyanjali.info/?p=237
इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांना बालकवी हे नांव कदाचित खास परिचयाचे नसेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिले आहेत. त्यांचे पूर्ण नाव श्र्यंबक बापूजी ठोंबरे. मुख्यतः निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यांमध्ये केले होते.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती ।।
या गाण्याचा समावेश ती फुलराणी या नाटकात अतिशय सुंदर रीतीने केला आहे. तर
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी । काय हरवले सांग साजणी या यमुनेच्या जळी ।।
हे गाणे मत्स्यगंधा या नाटकात चपखलपणे बसवले आहे.
बालकवींच्या कवितांमध्ये नेहमी एक सकारात्मक विचार असतो.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे ।
आणि
माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे । 
या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका अतीशय लोकप्रिय आहेत.
------------------------------------------------------

श्रावणमासी ..... संपूर्ण कविता
ज्या कवितेशिवाय कदाचीत मराठी काव्य सृष्टीला पूर्णत्व येणार नाही,जी कविता भर वैशाखात जरी म्हटली तरी श्रवणाचा अनुभव देते,ती म्हणजे कवी कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची कविता,अर्थातच
*श्रावण मासी*
हि संपूर्ण कविताच स्वभावोक्ती अलंकाराच उदाहरण आहे अस मला वाटते.श्रावण महिन्यात सर्व चराचर सृष्टी कवितेत वर्णन केल्याप्रमाणेच वागत असते.किंबहुना सृष्टीचा स्वभावच त्या काळात तसा असतो
श्रावण मासी हर्ष मानसी,  हिरवळ दाटे चोहीकडे   । 
क्षणात येते सरसर शिरवे,  क्षणात फिरुनी ऊन पडे  ।।धृ।।
वरती बघता इंद्रधनुचा,  गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधिले,  नभोमंडपी कुणी भासे ।।१।।
झालासा सूर्यास्त वाटतो,  सांज अहाहा तो उघडे ।
तरु शिखरावर उंच घरांवर,  पिवळे पिवळे ऊन पडे ।।२।।
बलाकमाला उडता भासे,   कल्पसुमांची माळच ते ।
उतरून येती अवनीवरती,    ग्राहगोलची कि एक मते ।।३।।
फडफड करुनी भिजले अपुले,  पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी,  निज बालांसह बागडती ।।४।।
खिल्लारेही चरती रानी,  गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गात तयाचा,  श्रावण महिमा एक सुरे ।।५।।
सुवर्ण चंपक फुलला विपिनि,   रम्य केवडा दरवळला ।
पारिजात हि बघता भामा,   रोष मनीचा मावळला ।।६।।
सुंदर परडी घेऊन हाती,   पुरोपकंठी शुद्ध मती ।
सुंदर बाला त्या फुलमाला,   रम्य फुले पत्री खुडती ।।७।।
देव दर्शना निघती ललना,   हर्ष माईंना हृदयात ।
वदनी त्यांच्या ऐकून घ्यावे,   श्रावण महिन्याचे गीत ।।८।।


Thursday, August 06, 2009

१२ ३४ ५६ ७ ८ ९


शतकाच्या सुरुवातीला खांही मजेदार क्षण येतात. सध्याचे शतक सुरू झाल्यानंतर वर्षभराने २००१ साली १ जानेवारीला १ वाजून १ मिनिट, १ सेकंद अशी वेळ आली ती ०१ ०१ ०१ ०१ ०१ ०१ अशी होती. त्यानंतर ०२, ०३, ०४, ०५, ०६, ०७ आणि ०८ या आंकड्यांच्या पुनरावृतीचे क्षण येऊन गेले. पुढच्या महिन्यात ०९ ०९ ०९ ०९ ०९ ०९ येईल. पण त्यापूर्वी उद्याच एक गंमतीदार क्षण येणार आहे. दुपारी १२ वाजून ३४ मिनिटे ५६ सेकंद ७ तारीख, ८ वा महिना आणि या शतकातले ९ वे साल असा तो क्षण असेल. अमेरिकेतल्या पध्दतीनुसार महिना आधी आणि तारीख नंतर गणली जाते. तिथे हा क्षण मागील महिन्यातच येऊन गेला.

या मजेदार क्षणाला असे काय घडणार आहे? कांहीसुध्दा नाही. एकविसावे शतक सुरू झाले त्या २ के च्या क्षणी सगळे संगणक बंद पडून भयानक उत्पात माजेल अशी भीती कांही लोकांनी व्यक्त केली होती आणि ते घडू नये यासाठी वर्षभर आधीपासून जगभरातले संगणकतज्ज्ञ राबत होते. कांही सॉफ्टवेअर कंपन्यांनी त्यात भरपूर कमाई केली. त्या सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आणि कांही अनुचित प्रकार घडला नाही.

पण हे संकट मानवनिर्मित होते. निसर्गाला या असल्या योगायोगांतून कांही फरक पडत नाही. सूर्यचंद्राच्या आकाशात होतांना दिसणा-या भ्रमणाच्या आधारावर कालगणना करण्याच्या पध्दती तयार केल्या गेल्या हे खरे असले तरी वर्ष, महिना, तारीख, तास, मिनिटे, सेकंद, तिथी, घटिका, पळे वगैरे सर्व कालखंडांची मोजणी कुठून सुरू करायची आणि ती कशा रीतीने करायची वगैरे सारे माणसाने ठरवलेले आहे. त्यामुळे त्यात एकवाक्यता नाही. युरोप, मध्यपूर्व, चीन आणि भारत या भागात सर्वस्वी वेगळ्या पध्दती आहेत. भारतातसुध्दा उत्तरेत वेगळी आणि दक्षिणेत वेगळी आहे. महाराष्ट्रातसुध्दा टिळक पंचांग, दाते पंचांग वगैरेंमध्ये मतभेद आहेत. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी भारत सरकारने एक राष्ट्रीय कालगणना सुरू केली, ती तर प्रत्यक्षात कोणीसुध्दा वापरत नाही. त्यामुळे सध्या तरी जगभरात रूढ झालेली ग्रेगोरियन पध्दतीच आपण सर्वजण वापरतो.
पण निसर्ग ते कशाला मानेल ? त्यामुळे गेल्या नऊ वर्षातल्या अशा प्रकारच्या विलक्षण क्षणी कांहीही घडले नाही आणि उद्यादेखील घडण्याची शक्यता नाही. आणखी एक गंमत म्हणजे जगभरात सगळीकडे एकाच क्षणी समान वेळ किंवा तारीखसुध्दा नसते. त्यामुळे हा क्षण ठिकठिकाणच्या स्थानिक घड्याळांनुसार ठराविक वेळेला पण प्रत्यक्षात वेगवेगळ्या वेळी येणार आहे. अमेरिकेसारख्या विशाल देशात पाच टाइम झोन आहेत म्हणे, रशियात तर आणखी जास्त असतील. त्यातील वेगवेगळ्या भागात तासातासाच्या अंतराने हा क्षण येणार. वर लिहिल्याप्रमाणे अमेरिकेत तो येऊन गेलासुध्दा, आता रशीयात यायचा आहे.
निसर्ग या क्षणी कांही करणार नाही. वाटल्यास त्याची आठवण रहावी म्हणून आपणच ठरवून कांही तरी करू शकतो.

Wednesday, August 05, 2009

स्वाइन फ्ल्यू

थोड्या दिवसांपूर्वी हे नांव पहिल्यांदा ऐकले होते तेंव्हा ते दूर परदेशात आलेल्या एका साथीचे नांव होते. डुकराचे मांस खाल्यामुळे तो रोग होतो असा त्याच्याबद्दल गैरसमज असल्यामुळे आपल्याला त्याची कांही भीती नाही याची इकडील लोकांना खात्री वाटत होती. यापूर्वी बाहेरच्या जगात मॅड काऊ आणि बर्डफ्ल्यूच्या साथी येऊन गेल्या होत्या. भारतात गोमांसभक्षण अत्यल्प प्रमाणात होते आणि त्या साथीचा प्रादुर्भाव झाला नाही. बर्डफ्ल्यूची लागण आधी कोंबड्यांना झालेली समजत असे आणि त्या संशयाने लक्षावधी कोंबड्यांची कत्तल करण्यात आली. त्यानंतरसुध्दा अनेक महिने कित्येक लोक चिकन खात नव्हते. तो आजारही इकडे पसरला नाही. या अनुभवामुळे स्वाइनफ्ल्यूच्या साथीचे सुरुवातीला फारसे गांभीर्य वाटले नव्हते.
हळूहळू तो जगभर पसरत गेला. तेंव्हा परदेशातून येणा-या प्रवाशांतल्या संशयित रोग्यांची आरोग्यतपासणी होऊ लागली. परदेशातून येणारे लोक विमानानेच येतात आणि कांही थोड्या महानगरांतच ते उतरतात यामुळे त्याचे नियंत्रण करणे शक्य आणि सोपे आहे असा समज होता. परदेशात लागण होऊन इकडे आलेल्या रोग्यांची संख्या चाचणीनुसार वाढत असली तरी त्यांच्यातील बरेचसे लोक त्या परीक्षेचा निष्कर्ष येण्यापूर्वीच बरे होऊन गेलेले असत. त्यामुळे या रोगाचे स्वरूप अगदी सौम्य असावे आणि पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या तुलनेत भारतीय लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते अशा समजुतीने इथल्या लोकांना त्यापासून भीती नाही असे वाटले होते.
कालपरवा आलेल्या बातम्यांवरून हे सगळे गैरसमज दूर झाले असणार. परदेशात जाऊन न आलेल्या, पुण्यातील एका मुलीचा मृत्यू या आजाराने झाला आहे. एकंदर रोग्यांची संख्या पाहता आणि संख्याशास्त्राच्या हिशोबाने हा रोग कॉलरा, प्लेग या रोगांसारखा भयानक नाही असे असले तरी एकाद्या केसमध्ये तो प्राणघातक होऊ शकतो हे दिसून आले आहे. या घटनेमधून खालील विदारक सत्ये समोर आली आहेत.
१. परदेशातून आलेले विषाणू आता स्थानिक वातावरणात पसरले आहेत आणि त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे अवघड झाले आहे.
२. याची लक्षणे पावसाळ्यात सर्रास सगळ्या लोकांना होत असलेल्या विकारांपासून फारशी वेगळी नाहीत. त्यामुळे तो पटकन ओळखू येत नाही.
३. याची चाचणी करण्याची पध्दत अत्यंत महाग आहे आणि थोड्या जागी ती उपलब्ध आहे. फक्त परदेशातून आलेल्या विमानप्रवाशांच्या बाबतीत ती करणे शक्य होते, पण सरसकट सगळ्या रोग्यांची त्यासाठी तपासणी करणे शक्य नाही.
४. ज्या दुर्दैवी मुलीचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करणे आणि त्यानुसार औषधोपचार करणे शक्य होते व ते झाले होते असेही या बातमीत आले आहे. पुण्यातल्या विख्यात हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार होत होते. त्यात हयगय झाली की पूर्वीचा अनुभव नसल्यामुळे त्यात कांही तृटी राहिल्या की तिला झालेला हा रोगच वैद्यकशास्त्राच्या आंवाक्याच्या बाहेर गेला होता वगैरेवर चर्चा होत राहील. हे प्रकरण आता राजकारण आणि न्यायव्यवस्था या क्षेत्रात जाणार अशा बातम्या आहेत. त्यामुळे वृत्तपत्रातल्या बातम्यांच्या आधारे त्याबद्दल कांही न बोलणेच इष्ट आहे.
५. आतापर्यंत ज्या शाळांची नांवे या संदर्भात पेपरमध्ये आली आहेत त्या सर्व शाळा उच्चभ्रू लोकांच्या मुलांच्या आहेत. 'हा एक परदेशातला रोग आहे' असा समज आधी होता, आता "तो कॉन्व्हेंटमधल्या मुलांना होणारा आहे" असे कोणाला कदाचित वाटेल. तसे समजायचे कारण नाही. तो आबालवृध्द कोणालाही होऊ शकतो.

उगाच भीती पसरवावी असा हे लिहिण्याचा उद्देश नाही. जगातल्या कुठल्याच देशात या रोगामुळे हाहाःकार उडालेला नाही. त्यामुळे त्याचे स्वरूप सौम्यच असावे असे वाटते. पण तो आता दर्लक्ष करण्याइतका किरकोळ राहिलेला नाही. तो होऊ नये यासाठी नक्की कशी सावधानता बाळगावी हे मलासुध्दा ठाऊक नाही. जमेल तेवढी सावधगिरी बाळगावी आणि नियमित आहार, व्यायाम वगैरे करून आपली प्रतिकारशक्ती शाबूत ठेवावी एवढेच करणे सध्या शक्य आहे.
मला ईमेलवरून आलेली त्रोटक माहिती वरील चित्रात आणि इस्पितळांची यादी खाली दिली आहे.GOVERNMENT AUTHORIZED HOSPITALS FOR TREATMENT OF SWINE FLU
They are in following order
City
Hospital
Address
Contact
Chennai
King Institute of Preventive Medicine (24/7 Service)
Guindy, Chennai 32
(044) 22501520, 22501521 & 22501522 Communicable Diseases Hospital
Thondiarpet, Chennai
(044) 25912686/87/88, 9444459543
Government General Hospital
Opp. Central Railway Station, Chennai 03
(044) 25305000, 25305723, 25305721, 25330300
Pune
Naidu Hospital
Near Le'Meridian, Raja Bahadur Mill, GPO, Pune 01
(020) 26058243 National Institute of Virology
20A Ambedkar Road, Pune 11
(020) 26006290
Kolkata
ID Hospital
57,Beliaghata, Beliaghata Road, Kolkata - 10
(033) 23701252
Coimbatore
Government General Hospital
Near Railway Station,
Trichy Road, Coimbatore 18
(0422) 2301393, 2301394, 2301395, 2301396
Hyderabad
Govt. General and Chest Diseases Hospital,
Erragadda, Hyderabad
(040) 23814939
Mumbai
Kasturba Gandhi Hospital
Arthur Road, N M Joshi Marg, Jacob Circle, Mumbai - 11
(022) 23083901, 23092458, 23004512 Sir J J Hospital
J J Marg, Byculla, Mumbai - 08
(022) 23735555, 23739031, 23760943, 23768400 / 23731144 / 5555 / 23701393 / 1366 Haffkine Institute
Acharya Donde Marg, Parel, Mumbai 12
(022) 24160947, 24160961, 24160962
Kochi
Government Medical College
Gandhi Nagar P O, Kottayam - 08
(0481) 2597311,2597312 Government Medical College
Vandanam P O, Allapuzha - 05
(0477) 2282015 Taluk Hospital
Railway Station Road, Alwaye, Ernakulam
(0484) 2624040 Sathyajit - 09847840051 Taluk Hospital
Perumbavoor PO, Ernakulam 542
(0484) 2523138 Vipin - 09447305200 Gurgaon & Delhi
All India Institute of Medical Sciences (AIIMS)
Ansari Nagar, Aurobindo Marg Ring Road, New Delhi 29
(011) 26594404, 26861698 Prof. R C Deka - 9868397464 National Institute for Communicable Diseases
22, Sham Nath Marg,
New Delhi 54 (011) 23971272/060/344/524/449/326 Dr. Ram Manohar Lohia Hospital
Kharak Singh Marg,
New Delhi 01
(011) 23741640, 23741649, 23741639
Dr. N K Chaturvedi 9811101704 Vallabhai Patel Chest Institute
University Enclave, New Delhi- 07
(011) 27667102, 27667441, 27667667, 27666182
Bangalore
Victoria Hospital
K R Market, Kalasipalayam, Bangalore 02
(080) 26703294 Dr. Gangadhar - 94480-49863 SDS Tuberculosis & Rajiv Gandhi Institute of Chest Diseases
Hosur Road, Hombegowda Nagar, Bangalore 29
(080) 26631923 Dr. Shivaraj - 99801-48780

Sunday, August 02, 2009

वो जब याद आये ....... भाग २

चित्रपट बनवण्याचे तंत्र आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री पाश्चात्य देशातून आपल्याकडे आली. तिच्या सोबतीने किंवा त्याअगोदरपासून हॉलीवुडमध्ये तयार होत असलेले इंग्रजी सिनेमे भारतात प्रदर्शित होऊ लागले. त्यांची छाप भारतात तयार होणा-या चित्रपटांवर पडणे साहजीक होते. इथल्या प्रेक्षकांना आपला वाटावा यासाठी कथावस्तू आणि वातावरण भारतीय ठेऊन तांत्रिक बाबतीत तिकडच्या कांही कल्पना उचलल्या जात होत्या. चित्रपटसंगीतावर सुध्दा त्याचा प्रभाव पडलेला दिसतो. अभिजात भारतीय संगीत आणि सिनेसंगीत यात एक महत्वाचा फरक मी पहात आलो आहे. आपल्या शास्त्रीय संगीतात पेटी, सारंगी, वीणा, व्हायलिन वगैरे स्वरसाथ देणारी वाद्ये गायनाबरोबर सारखी वाजत असतात आणि गायकाने आळवलेल्या सुरांची पुनरावृत्ती त्यातून होत असते. सिनेमातल्या गाण्यात मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वी आणि दोन कडव्यांच्या मध्ये त्या गाण्याशी सुसंगत पण वेगळ्या चालीवरचे वाद्यसंगीताचे तुकडे असतात. वादकांनी तर ते तुटकपणे वाजवायचे असतातच, गायकाने त्यात मधून मधून गायचे असते. एकाद्या रागाचा पध्दतशीर सलग विस्तार करत जाणे आणि तुटकतुटकपणे एकदम खालचे किंवा वरचे स्वर गळ्यातून काढणे या वेगळ्या कला आहेत. ऐकणा-याला त्यातून वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. कांही कलाकारांना या दोन्ही कला साध्य होतात, पण प्रत्येकाची आपापली आवड असते, मर्यादा असतात, इतर कारणेसुध्दा असतात, त्यामुळे शास्त्रीय संगीत गाणारे गायक आणि चित्रपटांचे पार्श्वगायक असे वेगळे वर्गीकरण झालेले आपल्याला दिसते.
भारतीय संगीतातले सूर, ताल, लय आणि वेस्टर्न क्लासिकल म्यूजिकमधली मेलडी, हार्मनी आणि रिदम यांचा सुरेख मिलाफ करून त्यातून आपल्या प्रतिभेचा आविष्कार शंकर जयकिशन या जोडगोळीने कसा केला होता याचे उदाहरण देणारे एक गाणे यानंतर सादर करण्यात आले. शिवरंजनी रागाची आठवण करून देणारी सुरावली थिरकत्या ठेक्यावर गातांना त्यात भावनांचा ओलावा निर्माण करण्याची अद्भुत किमया मोहम्मद रफी यांनी या गाण्यात करून दाखवली आहे. वादकवृंदाने तर कमालच केली. मोजक्या वाद्यांमधून मोठ्या ऑर्केस्ट्राचा आभास निर्माण करून या गाण्याचे प्रिल्यूड, इंटरल्यू़ड वगैरे बहुतेक सगळे तपशील त्यांनी व्यवस्थितपणे दाखवले. ब्रम्हचारी या चित्रपटातले हे गाणे तेंव्हा तर गाजले होतेच, अजूनही ऐकतांना मजा येते. सभागृहातल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्या गाण्याचा ठेका धरला होता. ते गाणे होते
दिलके झरोकेमें तुझको बिठाकर । यादोंको तेरी मै दुलहन बनाकर । रक्खूंगा मै दिलके पास । मत हो मेरी जाँ उदास ।।

या गाण्यानंतर एक हाँटिंग मेलडी सादर करण्यात आली. महल चित्रपटातील आयेगा आनेवाला या गाण्यापासून थरारनाट्य असलेल्या चित्रपटात (सस्पेन्स मूव्हीजमध्ये) लतादीदींच्या आवाजात अशा प्रकारचे एक गाणे घालून ते वेगवेगळ्या सीनमध्ये पुन्हा पुन्हा वाजवण्याची रूढीच पडली होती. मधुमती, वो कौन थी, मेरा साया, गुमनाम वगैरे त्याची अनेक उदाहरणे देता येतील. या कार्यक्रमात सादर केलेले गाणे होते, अकेले हैं, चले आओ, चले आओ ।
खूप वर्षांपूर्वी आलेल्या, मी न पाहिलेल्या, रतन नावाच्या सिनेमासाठी नौशाद यांनी स्वरबध्द केलेले आणि जोहराबाई या गायिकेने गायिलेले जुन्या अनुनासिक ढंगाचे गाणे यानंतर आले. अजूनही ते कधीतरी ऐकायला मिळते. ते होते, अँखियाँ मिलाके, जिया भरमाके, चले नही जाना, ओओओ ..... चले नही जाना।
अशी खास वेगळ्या प्रकारची गाणी झाल्यानंतर नौशाद यांनीच संगीतबध्द केलेले कोहिनूर चित्रपटातले हमीर रागातले सुप्रसिध्द गाणे प्रभंजन मराठे यांनी अप्रतिम रीतीने गाऊन दाखवले. त्यातल्या तराण्यावर तबलजीने अशी कांही साथ दिली की मुद्दाम त्याच्या तबलावादनासाठी वन्समोअरचा आग्रह धरण्यात आला.
मधुबनमें राधिका नाची रे, गिरिधरकी मुरलियाँ बाजी रे ।।
नौशाद अलींच्याच संगीतरचनेतला खास उत्तर प्रदेशातल्या लोकसंगीताचा बाज पुढील गाण्यात दिसला. त्यानुसार यावेळी तबल्याऐवजी ढोलक या त्या भागात लोकप्रिय असलेल्या तालवाद्यावर ठेका धरला होता. भांगेच्या तारेत असतांनासुध्दा आपण पू्र्णपणे शुध्दीवर असल्याचा विनोदी आव आणत आपली चाल दाखवण्याचे आव्हान देण्याचा अजब प्रकार या गाण्यात आहे.
मेरे पैरोंमें घुंघरू बँधा दो के फिर मेरी चाल देख लो ।।
त्यानंतर खास शम्मीकपूर स्टाइलचे गाणे आले. मला ते पूर्वीसुध्दा विशेष आवडले नव्हते
ये आँखें उफ् युम्मा ।
शास्त्रीय संगीत, लोकसंगीत वगैरे झाल्यानंतर एक अनोखे देशभक्तीपर गाणे झाले. स्व.मदनमोहन या गजलसम्राटाने हकीकत या चित्रपटासाठी स्वरबध्द केलेले हे आवेशपूर्ण गाणे स्वातंत्र्यदिनासारख्या प्रसंगी हमखास ऐकायला मिळते. युध्दात वीरगती प्राप्त झालेले सैनिक अखेरच्या क्षणी आपल्या देशवासियांचा निरोप घेताघेता त्यांना जे आवाहन करतात त्या प्रसंगातले कारुण्य आणि त्यांच्या मनातली देशप्रेमाची भावना याचे सुरेख मिश्रण असलेली मनाला भिडणारी शब्दरचना, ते भाव दाखवणारी स्वररचना आणि त्यात रफीसाहेबांनी आपल्या धीरगंभीर आवाजाने भरलेली जादू असे काँबिनेशन क्वचितच ऐकायला मिळते.
कर चले हम फिदा जान ओ तन साथियों । अब तुम्हारे हवाले वतन साथियों ।।
या गाण्यानंतर गाडी पुन्हा एकदा प्रेमगीतांवर आली. एक गजल सादर झाली,
मुझे दर्द ए दिलका पता न था, मुझे आप किसलिये मिल गये ।
मैं अकेला यूँ ही मजेमे था, मुझे आप किसलिये मिल गये ।।
त्यानंतर एकदम वेगळ्या मूडमधले प्यासा चित्रपटातले विनोदी आणि खटकेबाज गाणे आले. नोहम्मद रफी यांनी फक्त कथानायकांनाच आवाज दिला नव्हता, जॉनी वॉकर आदी विनोदवीरांनासुध्दा साजतील अशी अनेक गाणी त्यांनी गायिली आहेत त्यातले सर्वाधिक लोकप्रिय गाणे आहे,
सर जो तेरा चकराये, या दिल डूबा जाये, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए ।।
गायकाची एवढी दमछाक झाल्यानंतर गायिकेच्या आवाजातले एक गाणे घेऊन प्रभंजन मराठे यांना थोडी विश्रांती दिली गेली. तुम कमसिन हो नादाँ हो या रफी यांनी गायिलेल्या नायकाच्या गाण्याच्या चालीवरच हे गीत सिनेमातल्या नायिकेने म्हंटले आहे.
मैं कमसिन हूँ, नादाँ हूँ, नाजुक हूँ । थाम लो मुझे मै तेरी इल्तजाँ करूँ ।।
त्यानंतर एक युगलगीत झाले.
ओ आ जा पंछी अकेला है । ओ सो जा नींदियाकी बेला है ।।
एक गायक आणि दोन गायिका यांनी एकत्र गायिलेले लोकगीताच्या ढंगातले बैजूबावरा या चित्रपटातले आणखी एक गाणे यानंतर आले, दूर कोई गाये, धुन ये सुनाये, तेरे बिन छलिया रे, बाजे ना मुरलिया रे ।।होजीहो ... होहो ... होहो.....
त्यानंतर पंचमदांनी (आर.डी.बर्मन यांनी) संगीतबध्द केलेली नव्या धर्तीच्या संगीताने सजलेली गाणीसुध्दा रफी यांनी कशी गायिली याची झलक दाखवण्यात आली. पुढे अशा प्रकारची गाणी किशोरकुमार यांनी गायिली असली तरी सुरुवातीला त्यातली कांही रफी यांच्या आवाजात स्वरबध्द केली गेली. याची उदाहरणे आहेत,
गुलाबी आँखें, ये जो है तेरी, शराबी ये दिल, हो गया ।।
तसेच हे मादक द्वंद्वगीत,
ओ हसीना जुल्फोंवाली जान ए जहाँ, ढूँढती है शातिर आँखे जिसका नशा । मेहफिल मेहफिल ओ शमा, फिरती हो कहाँ ।।वो अनजाना ढूँढती हूँ, वो परवाना ढूँढती हूँ .........
यानंतर पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांची मेलडी आली,
अजी रूठकर अब कहाँ जाइयेगा, जहाँ जाइयेगा हमें पाइयेगा ।।
आणि रोशन यांचे काळजाला भिडणारे सूर, दिल जो न कह सका, वोही राज ए दिल, कहनेकी रात आयी है।।
मी सुरुवातीपासून ज्या गाण्याची वाट पहात होतो ते काळीज पिळवटून टाकणारे अजरामर गाणे अखेर आलेच. इतकी आर्तता, इतके शांत आणि सावकाशपणे आंदोलन घेत असलेले स्वर, त्यातला ठहराव वगैरे खुबी फार कमी गाण्यात ऐकायला मिळतात. त्यामुळे असे गाणे दीर्घकाळपर्येत स्मरणात राहते. सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगे । हवाभी रुख बदल चुकी, ना जाने तुम कब आओगे ।।
कार्यक्रमाची अखेर रफीसाहेबांनी गायिलेल्या आणि अनेक लोकांच्या टॉपटेनमध्ये असलेल्या अजरामर अशा गाण्याने झाली. बैजूबावरा चित्रपटातले हे गाणे त्या काळी लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेले होते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले माधुर्य या गाण्यातून व्यक्त झाले होते.
तू गंगाकी मौज मैं जमुना की धारा । ये हमारा तुम्हारा मिलन ये हमारा तुम्हारा ।।
श्री.प्रभंजन मराठे यांनी कितीही चांगल्या रीतीने आणि जीव तोडून ही सगळी गाणी गायिली असली तरी मोहम्मद रफी यांच्या गाण्याची पातळी त्यांनी गाठली होती असे त्यांनाही वाटले नसेल. तसे शक्य असते तर त्यांचे स्वतःचेच नांव झाले असते. पण त्यांच्या गाण्यातून रफी यांची जुनी गाणी आठवली आणि पुन-प्रत्ययाचा आनंद मिळाला. नवोदित गायिकांनी चांगला प्रयत्न केला, पण त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे जाणवत होते. यात न घेतलेली आणखी किती तरी मोहम्मद रफी यांची गाणी अजून लोकांच्या ओठावर आहेत. त्यातली कोणती सांगू आणि कोणती वगळू ?

वो जब याद आये ....... भाग १

या ठिकाणी लिहितांना मी नेहमी माझ्या लहानपणच्या आठवणी सांगत असतो असे कोणाला वाटेल। उतारवय आल्यावर बहुतेक लोकांना ती खोड लागत असावी. त्यात आणखी एक गंमत अशी आहे की त्या गोष्टी ऐकणे लोकांना आवडते अशी त्यांची आपली (कदाचित गैर)समजूत असते. तर मी एकदा बाहेरगांवाहून येणार असलेल्या कोणाला तरी बसमधून उतरवून घेण्यासाठी एस्टीस्टँडवर जाऊन मोटारीची वाट पहात बसलो होतो. तेंव्हा तशी पध्दतच होती. आपल्या इवल्याशा जगाच्या बाहेर काय चालले आहे ते पहाण्याची तीही एक खिडकी असल्यामुळे आम्हालाही ते काम हवेच असायचे. गृहपाठाचा बोजा नसल्यामुळे स्टँडवर जाऊन थोडा वेळ बसून रहायला फावला वेळ असायचा. खांद्यावर गांठोडे घेऊन चिल्ल्यापिल्ल्यांचे लटांबर सांभाळत दूरवरच्या खेड्यातून पायपीट करत दमून भागून येणा-या खेडुतांपासून ते प्रवासात घामाघूम झाल्यामुळे खिशातून रुमाल काढून त्याने घाम पुसत आपला चुरगळलेला मुळातला झकपक पोशाख ठीकठाक करण्याचा प्रयत्न करणा-या मोठ्या शहरातल्या पांढरपेशा पाहुण्यापर्यंत वेगवेगळे नमूने, त्यांचे कपडे, त्यांचे हांवभाव वगैरे पाहण्यात आणि त्यांच्या निरनिराळ्या बोलीतले आगळे वेगळे हेलकावे ऐकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. तर एकदा असाच बसच्या येण्याची प्रतीक्षा करत बसलो होतो. त्या दिवशी बुधवार होता आणि रात्रीची वेळ होती. स्टँडवरल्या कँटीनमधल्या रेडिओतून बिनाका गीतमालेचे सूर ऐकू येत होते. अमीन सायानींनी त्यांच्या विशिष्ट लकबीत घोषणा केली, "अब अगली पादानपर आप सुनेंगे मोहम्मद रफीकी आवाजमें एक फडकता हुवा गीत ..." आणि लगेच एक अद्भुत आवाजातली लकेर आली, "ओ हो हो..., ओ हो ... हो, खोया खोया चाँद, खुला आसमान, ऐसेमें कैसे नींद आयेगी ..... " त्यातला झोप न येणे वगैरेचा अनुभव नसल्यामुळे तो भाग कळण्यासारखा नसला तरी ते ओहोहो तेवढे थेट काळजापर्यंत जाऊन भिडले आणि तिथेच कायमचा मुक्काम ठोकून राहिले.

पुढे तो दिव्य आवाज नेहमी कानावर पडत आणि मनाचा ठाव घेत राहिला. रफीसाहेबांनी हजारो गाणी गायिली आणि त्यातली निदान शेकडो अजरामर झाली. आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले. भूतकाळातल्या आठवणींना सतत उराशी बाळगून वर्तमानकाळ हातातून घालवायचा नसतो हे खरे असले तरी त्यांनीच गायिलेल्या 'वो जब याद आये, बहुत याद आये' या गाण्यानुसार जेंव्हा कांही लोकांची आठवण येते तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ती उत्कटपणे येते हेसुध्दा तितकेच खरे आहे. रफीसाहेबांच्या निधनाला एकोणतीस वर्षे एवढा काळ लोटून गेला असला तरी अजून त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम होतात आणि त्यांच्या मागून आलेल्या पिढीतले लोकसुध्दा तो पहायला व ऐकायला गर्दी करतात.
काल असाच एक कार्यक्रम पहायचा योग आला. मोहम्मद रफींच्या आवाजातली खूपशी उत्तमोत्तम सुरेल गाणी श्री. प्रभंजन मराठे यांनी त्या कार्यक्रमात गायिली. 'मेंदीच्या पानावर' या अत्यंत लोकप्रिय झालेल्या वाद्यवृंदातून ते मराठी माणसांना परिचित झालेले होतेच. सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातल्या प्रौढांच्या पर्वात त्यांनी भाग घेतल्यामुळे ती ओळख दृढ झाली होती. दोन कीबोर्ड आणि एक सेक्साफोन एवढीच सुरांची संगत देणारी वाद्ये साथीला होती आणि तबला, ढोलक, खुळखुळे व ऑक्टोपॅड ही तालवाद्ये गरजेनुसार वाजवणारे तीन वादक होते. पण या सर्वांच्या अप्रतिम कौशल्याची दाद द्यायलाच हवी. त्यांनी सतार, व्हायलिन किंवा फ्ल्यूटवर वाजवलेल्या खास जागासुध्दा घेऊन आणि कोंगोबोंगो किंवा ड्रम्सवरील नाद आपापल्या वाद्यांमधून काढून त्यांची उणीव भासू दिली नाही. ड्यूएट्स गाण्यासाठी विद्या आणि आसावरी या दोन नवोदित गायिका होत्या. रफींनी गायिलेली आणि त्याच चालीवर एकाद्या गायिकेने गायिलेली अशी कांही गाणी त्यांनी स्वतंत्रपणे गायिली. वेगवेगळ्या गीतकारांनी रचलेली, निरनिराळ्या संगीतकारांनी, त्यात पुन्हा अनेक प्रकारच्या संगीताच्या आधाराने स्वरबध्द केलेली, विविध भाव व्यक्त करणारी अशी गाणी निवडून त्यात शक्य तेवढी विविधता आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न स्तुत्य होता. मोहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची रेंज दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. पण त्यातले वैविध्य थोडे कमी करून माझ्या आवडीची आणखी कांही गाणी घेतली असती तर मला ते अधिक आवडले असते. तरीसुध्दा जी घेतली होती ती सगळीच गाणी त्या त्या काळी लोकप्रिय झाली होती आणि माझ्या ओळखीचीच होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन दोन शब्द लिहिण्याचा मोह होतो. कुठल्या तरी एका प्रकारच्या वर्गवारीनुसार क्रम घेतला तर तो दुस-या प्रकारात बसणार नाही. यामुळे ज्या क्रमाने ती सादर केली गेली त्याच क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलेले बरे. हा क्रम ठेवण्यामागे आयोजकांचासुध्दा कांही उद्देश असणारच ना !

कवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेली आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबध्द केलेली मोजकीच गाणी गाऊन मोहम्मद रफी यांनी मराठी सुगमसंगीताच्या विश्वात त्यांचा खास ठसा उमटवला आहे. बहुतेक मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात त्यातले एकादे गाणे असतेच. या कार्यक्रमाची सुरुवात 'शोधिसी मानवा राउळी मंदिरी । नांदतो देव हा आपुल्या अंतरी ।।' या गाण्याने झाली. 'काया ही पंढरीस आत्मा हा विठ्ठल ।' या शब्दांत संत नामदेवांनी सांगितलेले मानवतेचे तत्वज्ञान शिकवून अंतर्मुख करणारे हे गंभीर स्वरूपाचे मराठी गीत एका परभाषिक आणि परधर्मीय गायकाने गायले असेल असे वाटतच नाही.
त्यानंतर रफींच्या खास अंदाजातले नायकाच्या प्रेमिकेच्या रूपाचे कौतुक करणारे गाणे सादर झाले आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या सिनेमात असणारी रोमँटिक दृष्ये नजरेसमोर आली. नायकाने किंचित झुकून तिची वाहवा करायची आणि तिने लाजत मुरडत त्याला साद द्यायची वगैरे त्यात आले.
ऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका । तेरा मुस्कुराना गजब हो गया ।।न होशमें तुम न होशमें हम । नजरका मिलाना गजब हो गया ।।
ऊँचे लोग या त्या काळातल्या ऑफबीट सिनेमातले चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेले एक वेगळ्या प्रकारचे गाणे त्यानंतर आले. त्यातले उच्च प्रकारचे उर्दू शब्दप्रयोग ओळखीचे नसल्यामुळे त्यातला भाव बहुतेक लोकांपर्यंत पोचत नव्हता. फक्त सुरावलीतली मजा तेवढीच समजत होती.
जाग दिल ए दीवाना रुत आयी रसिल ए यार की ।
प्रेमगीतांच्या या मालिकेतले पुढचे गाणे जरतर करणारे पण त्याबरोबरच आशावाद दर्शवणारे होते,
गर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होंगे । हम तुम जुदा न होंगे ।।
त्यानंतरच्या गाण्यात एक खोटी खोटी प्रेमळ तक्रार करून एक लटका सल्ला (न मानण्यासाठी) दिला होता.
आवाज देके हमें तुम बुलाओ । मोहब्बतमें इतना न हमको सताओ ।।
यापुढच्या द्वंद्वगीतात एकरूप होऊन साथसाथ राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
तेरे मेरे सपने अब एक रंग हैं । ले जहाँ भी ये राहे, हम संग हैं ।।
'त्यां'च्या जवळ येण्यामुळे आपण सगळ्या जगापासून दूर गेल्याची भावना पुढच्या गाण्यात होती.
दो घडी वो जो पास आ बैठे । हम जमानेसे दूर जा बैठे ।।
तर प्रेमाच्या धुंदीत धुंद झालेला प्रेमिक सगळे जगच आपल्या मालकीचे करत असल्याचा दावा त्यापुढील गाण्यात केला होता. है दुनिया उसीकी जमाना उसीका । मोहब्बतमें जो भी हुवा है किसीका ।।
. . .. .. . . . .. . ..(क्रमशः)----