Friday, October 30, 2009

डॉ.होमी भाभा - भाग ३


डॉ.होमी भाभा यांनी केलेली कांही वक्तव्ये आणि दिलेले संदेश त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. "No power is costlier than No power" हे त्यांनी दिलेले बोधवाक्य तर आमच्यासाठी केवळ ब्रम्हवाक्य होते. "कोणतीही शक्ती अशक्तपणापेक्षा जास्त महाग नसते" असा त्याचा शब्दशः अर्थ होतो. शक्ती प्राप्त करण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा अशक्तपणामुळे होणारे नुकसान जास्त असते, त्यामुळे शक्तीहीनता अखेर महागात पडते हे सत्य त्यात आहे. आरोग्य, राजकारण, व्यवसाय, संरक्षण वगैरे जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये त्याचे वेगळे अर्थ निघतील, पण आमच्या दृष्टीने त्या वेळी 'पॉवर' या शब्दाचा 'इलेक्ट्रिकल पॉवर' किंवा 'वीज' एवढाच अर्थ आम्हाला अभिप्रेत होता. अणुशक्तीपासून विद्युतनिर्मिती करण्याची संयंत्रे इतर प्रकारच्या केंद्रांच्या मानाने खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे त्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळात तरी ती वीज इतर स्रोतांच्या मानाने स्वस्तात उपलब्ध करून देणे शक्यच नव्हते. पण त्यामुळे नाउमेद न होता ती वीज निर्माण करत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाण्यात डॉ.भाभांच्या या वाक्याने दिलासा मिळत असे. इतर स्रोतांपासून मिळू शकत असेल तेवढी वीज तर निर्माण करून घ्यायची आहेच, इतर लोक त्या कामाला लागलेले आहेतच, पण ती घेतल्यानंतरसुध्दा आपल्या देशाला अधिक वीज लागणार आहे. त्यासाठी अणुशक्तीपासून तयार होणारी थोडी महाग वीज जरी तयार केली तरी त्यातून देशाचा फायदाच होणार आहे. कारण त्यामुळे अनेक घरांत प्रकाश पडेल, कारखान्यात तयार होणारा माल घरोघरी पोचेल, कामगारांना रोजगाराची संधी मिळेल, या सगळ्यांमुळे जास्त लोकांचे राहणीमान सुधारेल. अशा प्रकारे दर युनिटमागे कांही पैसे जास्त खर्च आला आणि त्यापासून कांही रुपयांएवढा लाभ मिळाला तर त्यातून देशातल्या समाजाचा फायदाच आहे. या भावनेने प्रेरित होऊन आम्ही ही वीज तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागलो होतो. त्यात यश येऊन देशात अनेक जागी अणुविद्युत केंद्रे उभी राहिली आणि ती आता बाजारभावाने वीजनिर्मिती करू लागली आहेत.


ज्या काळात जगातल्या कोणत्याच देशात अणुशक्तीपासून व्यापारी तत्वावर विद्युतनिर्मिती सुरू झाली नव्हती त्या काळातच भविष्यात ती निश्चितपणे होणार असल्याचे डॉ.भाभांनी ओळखले होते आणि निदान या क्षेत्रात भारताने अगदी सुरुवातीपासून जगाच्या बरोबर रहावे, मागासलेले राहू नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आपण प्रयत्न केले तर ते शक्यतेच्या कोटीत असल्याचा आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या जमान्यात साधी टांचणीसुध्दा परदेशातून आयात करावी लागत असे. खादी ग्रामोद्योग सोडला तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे कारखाने अत्यल्प होते. तेंव्हा भारतात निघालेले बहुतेक कारखाने परदेशी कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशनमधून उभे राहिले होते आणि ते चालवण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागत असे. असे असतांना जे तंत्रज्ञान पुढारलेल्या देशातसुध्दा अजून विकसित व्हायचे होते ते आपण पहिल्यापासून आत्मसात करू असे म्हणायला अंगात जबरदस्त धमक लागते. ती डॉ.भाभांनी दाखवली. अणुशक्तीविभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडतांना त्यांनी असे सांगितले, "When nuclear energy has been successfully applied for power production in say a couple of decades from now, India will not have to look abroad for its experts but will find them ready at hand." आजपासून वीस एक वर्षांनंतर जेंव्हा अणुशक्तीचा उपयोग विजेच्या निर्मितीसाठी यशस्वीरीत्या करण्यात येईल तेंव्हा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी आपल्याला परदेशांकडे पहावे लागणार नाही, ते आपल्याकडेच तयार झालेले असतील. डॉ.भाभांनी काळजीपूर्वक नियोजन आणि अथक परिश्रम करून आपले भाकित खरे करून दाखवले. हे त्यांनी करून दाखवले हे तर महत्वाचे आहेच, पण आपण हे करू शकू हे त्यांना माहीत होते याचेसुध्दा आश्चर्य वाटते.भारतीय कारखानदारीबद्दल बोलतांना डॉ.भाभांनी असे सांगितले होते, "If Indian industry is to take off and be capable of independant flight, it must be powered by science and technology based in the country." जर भारतीय उद्योगक्षेत्राला स्वतंत्रपणे उड्डाण करायचे असेल तर त्याने या देशात विकसित झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर ते करायला हवे. हा संदेश त्यांनी उद्योगपतींकडे तर पोचवलाच, पण त्यांच्या अखत्यारीखाली असलेल्या विभागात स्वदेशीकरण हा मूलमंत्र त्यांनी सर्वांना पढवला. अणुशक्तीसाठी लागणारी खास द्रव्ये, यंत्रे आणि उपकरणे सुरुवातीच्या काळात परदेशी बाजारात विकत मिळत होती आणि आपण ती आयात करतही होतो, पण अगदी जमीनीखाली दडलेल्या खनिजाचा शोध घेण्यापासून त्यांचे उत्खनन, शुध्दीकरण, उत्पादन वगैरे करून त्या सर्वांचा वीज निर्माण करण्यासाठी उपयोग करण्यापर्यंत आणि त्यानंतर अखेर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावायची यासकट त्या बाबतीतले संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यासाठी सविस्तर योजना आंखल्या. हीच गोष्ट अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही केली. पुढील काळात जेंव्हा सर्व पुढारलेल्या देशांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वाळीत टाकले होते तेंव्हासुध्दा अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रात आपली प्रगती होतच राहिली यामागे डॉ.भाभा यांची दूरदृष्टीच कारणीभूत होती यात शंका नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.


अशा या द्रष्ट्या महामानवाला आज त्याच्या जन्मशताब्दीच्या दिवशी त्रिवार मुजरा आणि सतशः दंडवत.

Thursday, October 29, 2009

डॉ.होमी भाभा - भाग २

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतल्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. दक्षिण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या त्या काळातल्या अग्रगण्य शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेऊन १९२७ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. तेथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्राविण्य प्राप्त करून त्यांनी परत यावे आणि टाटा कंपनीच्या जमशेदपूर येथील कारखान्यांचा कारभार चालवण्यात लक्ष घालावे अशी त्याच्या घरच्यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले सुध्दा आणि १९३० साली त्या परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले, पण त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करण्याची अतीव ओढ होती. त्यामुळे "नोकरी किंवा धंदा करणे हे माझ्या स्वभावाच्या विपरीत आहे. एक मोठा यशस्वी उद्योगपती म्हणून मिरवण्याची मुळीसुध्दा हौस नाही, फिजिक्समध्ये चांगले संशोधन करणे हीच माझी महत्वाकांक्षा आहे ....... " वगैरे त्यांनी आपल्या पालकांना निक्षून सांगितले आणि ते त्यांना पटवून दिल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात आपले पुढील शिक्षण आणि संशोधनकार्य सुरू ठेवून डॉक्टरेटची पदवी मिळवली. विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक जगद्विख्यात विद्वानांच्या संपर्कात येण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांनी संशोधनाच्या कामात आपली घोडदौड चालू ठेवली. अतीसूक्ष्मकणांच्या विज्ञानात (पार्टिकल फिजिक्समध्ये) त्यांनी मांडलेले सिध्दांत आणि प्रसिध्द केलेले शोधलेख यांना विज्ञानाच्या जगात मान्यता प्राप्त झाली, त्यांना अनेक महत्वाची बक्षिसे आणि शिष्यवृत्या मिळत गेल्या आणि ते एक जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.

सन १९३९ मध्ये ते सुटीवर भारतात आलेले असतांना युरोपमध्ये दुसरे महायुध्द भडकल्यानंतर त्यांनी कायमचे इकडेच राहण्याचे ठरवले. बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये डॉ.सी.व्ही.रामन यांच्या हाताखाली त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. कांही काळ तिथे काम केल्यानंतर स्व.जे.आर.डी.टाटा यांच्या मदतीने त्यांनी मुंबईला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केली. प्रयोगशाळेत काम करणारा शास्त्रज्ञ या भूमिकेतून त्यानंतर ते संस्था चालवणारा आणि तिला ऊर्जितावस्थेला नेणारा या भूमिकेत शिरले आणि त्यांनी टी.आय.एफ.आर.ला अल्पावधीत चांगले नांवारूपाला आणले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा जो कार्यक्रम सुरू झाला त्यात होमी भाभांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. पं.नेहरू आणि होमी भाभा हे दोघेही सधन उच्चभ्रू कुटुंबातून आले होते, उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहिले होते, त्या देशाने यंत्रयुगात केलेली प्रगती त्यांनी जवळून पाहिली होती, प्रगत देशातील सामाजिक सुस्थिती त्यांनी अनुभवली होती, पण स्वदेशाच्या उन्नतीची तीव्र तळमळ त्यांच्या मनात होती आणि विज्ञान तंत्रज्ञानामधूनच ती साधता येईल अशी त्यांची खात्री पटलेली होती. आचारविचारात असलेल्या साम्यामुळे आणि समान ध्येय असल्यामुळे त्या दोघात खूप जवळचे स्नेहसंबंध जुळले.

त्या काळात जगभर बाल्यावस्थेत असलेल्या अणुशक्तीचा भारतात विकास करण्याची जबाबदारी पं.नेहरूंनी डॉ.भाभा यांच्यावर सोपवली आणि त्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला. डॉ.भाभा यांच्याकडे भरपूर वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यात आणखी भर टाकण्याची इच्छा त्यांना नव्हती तसेच भोगलालसाही नव्हती, सत्ता, प्रसिध्दी वगैरेची हांव नव्हती. अशा सर्व गुणांमुळे ते कोणताही निर्णय आपल्या व्यक्तीगत फायद्याचा विचार करून घेणार नाहीत याची पंडितजींना पुरेपूर खात्री होती. त्यांनी होमी भाभांना अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष नेमले, तसेच केंद्रीय सरकारच्या अणुशक्ती विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली आणि सरकारी नियम थोडेसे वाकवून त्यांना आपल्या कामात बरेच स्वातंत्र्य दिले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या विभागाचे काम सरकारी खाक्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारे चालत आले आणि थोड्या प्रमाणात तरी लालफीताशाहीपासून मुक्त राहिले. होमी भाभांनी काय किमया करून ठेवली आहे कोण जाणे, पण त्यांच्यानंतर लगेच आलेल्या डॉ.विक्रम साराभाई यांच्यापासून सध्याचे डॉ.काकोडकरांपर्यंत सर्वच अध्यक्ष आणि सचिव हे त्या विभागात काम करीत असलेल्या निष्णात तज्ज्ञांमधूनच निवडले गेले आहेत आणि यापूर्वीचे सर्वजण सेवानिवृत्त होईपर्यंत त्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. इतर सरकारी महामंडळे, समित्या, आयोग वगैरेंप्रमाणे सनदी अधिकारी किंवा राजकारणी लोकांचा शिरकाव या ठिकाणी कधी झाला नाही आणि जास्त चांगली जागा मिळते असे पाहून कोणीही ही जागा सोडून गेला नाही. सुरुवातीच्या अणुशक्ती आयोगातून निघालेले अवकाश आयोग किंवा इलेक्ट्रॉनिक्स कमिशन आणि त्यांच्या अखत्यारीत येणा-या संस्थांबद्दलही असेच सांगता येईल.

भविष्यकाळात भारताने अणुशक्तीच्या क्षेत्रात कशा प्रकारे प्रगती करावी याचा एक सविस्तर नकाशा भाभांनी आंखून दिला होता, त्यांच्या मृत्यूनंतर नोकरीला लागलेली आमची पिढीसुध्दा सेवानिवृत्त होऊन गेली असली तरी अजूनही मुख्यतः भाभांनी आंखलेल्या आराखड्यानुसारच प्रगती होत आहे. वेळोवेळी प्राप्त परिस्थितीनुसार त्याच्या तपशीलात किरकोळ फेरफार केले जात असले तरी त्यामागील धोरणात्मक भाग आणि त्यामागे असलेली मूलतत्वे यांना धक्का लावण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही, किंबहुना तशी गरजच कधी निर्माण झाली नाही किंवा त्याहून जास्त चांगल्या कल्पना पुढे आल्या नाहीत असे म्हणावे लागेल. यावरून भाभांच्या दूरदर्शित्वाची कल्पना येईल.

. . . . . . . . . . (क्रमशः)
पुढील भागासाठी पहा  Newer post
https://anandghan.blogspot.com/2009/10/blog-post_29.html

Wednesday, October 28, 2009

डॉ. होमी भाभा - भाग १

"जगातले सर्वांत उंच शिखर कोणते?", "भारतातले सर्वात मोठे शहर कोणते?", "सर्वात प्रसिध्द नाटककार कोण?" अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जमवून ती लक्षात ठेवायची हौस लहान मुलांना असते. मी त्या वयात असतांनाच्या काळात "भारतातला सध्याचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ कोण?" या प्रश्नाचे उत्तर 'होमी भाभा' असे कानावर पडले होते किंवा वाचनात आले होते. हे दोन्ही शब्द मी त्यापूर्वी कधी ऐकलेच नव्हते. 'होमी' हे नांव एका पुरुषाचे असेल असे त्या वेळी वाटले नाही आणि 'भाभा' हे आडनांवसुध्दा चमत्कारिक वाटले. पण त्यामुळे नवलापोटी हे नांव मात्र लक्षात राहिले. 'शास्त्रज्ञ' म्हंटला की त्याने कसला तरी 'शोध' लावला असणारच. या भाभा महाशयांनी काय शोधून काढले होते ते कांही त्या वेळी समजले नाही. पावसात बाहेर पडण्यापूर्वी घरात कुठे तरी पडलेली छत्री शोधण्यापेक्षा वैज्ञानिक लावत असलेले शोध खूप वेगळ्या प्रकारचे असतात हे वय वाढल्यानंतर समजायला लागले. त्यासाठी आधी अंगात असामान्य बुध्दीमत्ता असावी लागते, एकाद्या विषयाचा कसून सखोल अभ्यास करून प्रचंड ज्ञानसंपत्ती मिळवून ठेवावी लागते आणि त्यानंतर कसला तरी ध्यास घेऊन अष्टौप्रहर कष्ट केल्यानंतर लागलाच तर एकादा शोध लागतो हे कळल्यानंतर मला सर्वच शास्त्रज्ञांबद्दल नितांत आदर वाटू लागला आणि अजून वाटतो. त्यात होमी भाभा 'सर्वात मोठे शास्त्रज्ञ' म्हंटल्यावर त्यांची गणना मनातल्या परमपूज्य व्यक्तींमध्ये होत राहिली. कॉलेजमध्ये गेल्यावर मेसमध्ये खाण्यापिण्याबरोबरच वृत्तपत्रांचे माफक वाचन होत असे. त्यात अधून मधून भाभांचे नांव येत असे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि मन सुन्न होऊन गेले.


त्याच सुमारास कै.लालबहादुर शास्त्री यांचेही भारताबाहेर अचानक देहावसान झाले होते आणि या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये कोणा दुष्ट शक्तीचा हात तर नसेल अशी चर्चा होत असल्यामुळे त्यांच्या संबंधी येणारा मजकूर आवर्जून वाचला जात असे. त्यामुळे स्व. होमी भाभा यांच्या कार्याबद्दल जी माहिती मिळत गेली त्यामुळे त्यांच्याबध्दल मनात असलेला अमूर्त प्रकारचा आदर अर्थपूर्ण होत गेला तसेच तो कांही पटीने वाटला. इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या माझ्या आधीच्या बॅचमधली दोन तीन मुले अणुशक्तीखात्यात प्रशिक्षण घेत होती. पुण्याला आली तर ती हॉस्टेलमध्ये येऊन आम्हाला भेटत असत. त्यांच्या बोलण्यातून त्या खात्याची एक उज्ज्वल प्रतिमा मनात झाली. त्यामुळे आमच्या कंपूमधल्या बहुतेक मुलांनी त्या प्रशिक्षणात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. त्यात मला यश येऊन माझी निवड झाली. शिवाय त्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत मला दुस-या कोणा मोठ्या कंपनीकडून बोलावणेही आले नाही, त्यामुळे मी अणुशक्तीखात्याच्या प्रशिक्षण प्रशालेत (ट्रेनिंग स्कूलमध्ये) दाखल होऊन रुजू झालो.


आमच्या प्रशिक्षणालयाच्या कार्यालयात प्रवेश करताच समोर होमी भाभांचे भव्य छायाचित्र दिसायचे तसेच वसतीगृहाच्या मुख्य दालनातही ते लावलेले असल्यामुळे त्याचे दर्शन रोज घडत असे. अणुशक्ती खात्याच्या विविध प्रयोगशाळा, संयंत्रे, कारखाने, कार्यालये वगैरेंमध्ये काम करणारे अनुभवी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आम्हाला शिकवायला येत असत. ही सारीच मंडळी होमी भाभांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वामुळे प्रभावित झालेली आणि विचारांनी भारावलेली दिसत असत. "भाभांनी असे ठरवले, हे सांगितले, ते अशा प्रकाराने केले" वगैरेंचे उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये येत असतच, कधी कधी त्यांच्या हृद्य आठवणी सांगतांना त्यांना भरून येत असे. योग्य अशा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्या निवडीपासून त्यांना घडवण्याच्या प्रक्रियेतल्या प्रत्येक महत्वाच्या बाबीवर स्व.भाभांचे पूर्ण लक्ष असे. जर त्यांच्या विमानाला अपघात झाला नसता तर निश्चितच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष पाहता आले असते आणि कदाचित त्यांची ओळखही झाली असती असे वाटत राही. तसे झाले असते तर 'तेथे कर माझे जुळती' या माझ्या ब्लॉगवरील मालिकेतले पहिले पुष्प कदाचित मी त्यांनाच समर्पण केले असते. आता त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्य हा लेख मी त्यांना सादर अर्पण करीत आहे.


मी अणुशक्तीखात्यात रुजू झालो त्या काळात आमच्या मुख्य संशोधनकेंद्राचे नांव अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (एईईटी) असे होते. आमचे प्रशिक्षण चालले असतांनाच आलेल्या भाभांच्या प्रथम स्मृतीदिनी त्या केंद्राचे नांव बदलून भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर असे नामकरण तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या केंद्राच्या उभारणीच्या कामात स्व. होमी भाभांचा केवढा मोठा वाटा होता ते त्या प्रसंगी झालेल्या प्रत्येक भाषणांतून व्यक्त होत होते. तेथे उभारलेल्या प्रत्येक प्रयोगशाळेची इमारत, तिचे बाह्य स्वरूप, अंतर्गत रचना, त्या ठिकाणी उभी करण्यात येणारी साधनसामुग्री, तिथे काम करणा-यांसाठी सुखसोयी अशा असंख्य बाबीकडे त्यांनी अत्यंत बारकाईने लक्ष पुरवलेले ठळकपणे दिसून येत होते. आपली संस्था जागतिक पातळीवर नांवाजली गेली पाहिजे इतकी ती सर्वच दृष्टीने चांगली असायला पाहिजे आणि तशी दिसायलासुध्दा पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्याचा ठसा जागोजागी प्रतीत होत होता आणि चार दशकांच्या दीर्घ कालावधीनंतरसुध्दा तो जाणवल्याशिवाय रहात नाही.


(क्रमशः)
पुढील भागासाठी पहा Newer Post
https://anandghan.blogspot.com/2009/10/blog-post_29.html

Monday, October 19, 2009

लक्ष्मीपूजन


आमच्या घरी वडिलोपार्जित गडगंज मालमत्ता नव्हती, पण आमची गणना खाऊन पिऊन सुखी लोकात होत असे. मौसमानुसार जी कांही धान्ये, भाजीपाले आणि फळफळावळ वगैरे त्या भागात मुबलक आणि स्वस्तात किंवा फुकट उपलब्ध होत असत ती घरी यायची, पाककौशल्याने त्यांतून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार होऊन पानात पडायचे आणि अन्न हे पूर्णब्रम्ह म्हणत सर्वजण ते चवीने पोटभर खात असत. रोज लहान मुलांना दूध मिळायचे, जेवणात ताक असायचे, आल्या गेल्यांसाठी चहा कॉफी व्हायची आणि मोसमानुसार आंब्याचे पन्हे किंवा लिंबाचे सरबत बनायचे. आमची पेयसंस्कृती एवढ्यापुरतीच मर्यादित होती. त्यामुळे खाऊनपिऊनचा अर्थ सुध्दा एवढाच होता. आमचा उद्योग व्यवसाय वगैरे नसल्यामुळे माझ्या वडिलांना दर महिन्याला जेवढा पगार मिळत असे आणि वर्षाला स्केलप्रमाणे इन्क्रिमेंट मिळत असे त्यापेक्षा जास्त धनप्राप्ती होण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे लक्ष्मीमाता आमच्यावर प्रसन्न झाली असती तरी तिने कशा रूपाने आम्हाला घबाड दिले असते ते समजत नाही. अर्थातच त्या काळात असा विचारही कोणी करत नसे.
त्या मानाने सरस्वतीची आमच्या घरावर जास्त कृपा असावी. सगळ्याच मुलांची आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती चांगली असल्यामुळे आणि त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे ती शाळेत हुषार समजली जायची. त्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हायचे आहे असे सतत त्यांच्या मनावर बिंबवले जात असे आणि एकदा ते मोठे झाले की लक्ष्मीची कृपाही त्यांच्यावर होईलच अशी आशा वाटत असे. त्यामुळे आम्ही सगळी मुले मनोमनी सरस्वतीची उपासक होतो. पण देवी शारदेची पूजा मात्र फक्त शाळेतच केली जात असे. घरात सरस्वतीची प्रतिमा नव्हतीच. तिच्या चित्राला कधी हार घातल्याचे मला आठवत नाही. दर वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अत्यंत उत्साहाने केले जात असे.
पूजेच्या देव्हा-यात अंबाबाईची मूर्ती असली तरी दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनासाठी वेगळा चांदीचा शिक्का होता. तो कोठीतून बाहेर काढून चिंच आणि रांगोळीने घासून लखलखीत केला जायचा. ताट, वाट्या, पेले, तबक, निरांजने, कुंकवाच्यी कोयरी, पळी पंचपात्र वगैरे सर्व चांदीची भांडी काढून तीही स्वच्छ केली जात. संध्याकाळ झाली की एका चौरंगावर देवीची आरास करायची. चांदीच्या नाण्याच्या शेजारी एक दोन सोन्याचे अलंकार ठेवायचे. त्या सर्वांची साग्रसंगीत शोडशोपचार पूजा केली जायची. त्या वेळी घरातली सर्व मंडळी नवे कपडे आणि ठेवणीतले दागदागिने अंगावर चढवून त्या काळात जितके शक्य असेल तितके नटून थटून त्या जागी उपस्थित होत असत. दरवर्षी दिवाळीला घरी कोणी ना कोणी पाहुणे असतच. तेसुध्दा सालंकृत होऊन पूजेला येऊन बसत. डाळिंबे, सीताफळे यासारखी एरवी आमच्या भागात न दिसणारी फळे लक्ष्मीपूजनासाठी मुद्दाम शहरातून मागवली जात. केळी, चिकू, संत्री, मोसंबी वगैरे असतच. एका ताटात विविध प्रकारची फळे मांडून ठेवली जात तर दुस-या ताटात काजू, बदाम, पिस्ते, बेदाणे वगैरे सुका मेवा नैवेद्यासाठी मांडून ठेवलेला असे. पेढे बर्फी वगैरे मिठाई असेच. साळीच्या लाह्या आणि बत्तासे असणे अत्यावश्यक असे. असा इतका आकर्षक प्रसाद समोर दिसत असला तरी आमचे लक्ष तिकडे नसायचे. ही पूजा संपली रे संपली की आम्ही अंगणात धूम ठोकून फटाके उडवायला सुरुवात करत असू.
मागल्या वर्षी आम्ही दिवाळीला अमेरिकेत होतो. पण तिथेसुध्दा लक्ष्मीपूजन केलेच. त्यासाठी काय काय लागते याची यादी करून आणि ते कुठे मिळते याची चौकशी करून त्यातल्या बहुतेक गोष्टी पैदा करून ठेवल्या. फटाकेसुध्दा आणले होते, पण अमेरिकेतल्या प्रदूषणाच्या नियमात ते उडवणे बसेल की नाही याची भीती असल्यामुळे ते उडवायचा धीर झाला नाही. पूर्वीपासून अमेरिकेत राहणारे दुसरे कोणी आधी सुरुवात करेल याची वाट आम्ही पहात होतो, पण ती झालीच नाही.

Saturday, October 17, 2009

दीपोत्सव


"असतोमासद्गमय। तमसोमाज्योतीर्गमय। मृत्योर्माअमृतंगमय।" असे आदर्श मानवी जीवनाचे त्रिसूत्र आपल्या प्राचीन वाङ्मयात दिलेले आहे. यातली पहिला म्हणजे सत्याची कास धरून नेहमी सदाचाराचे पालन करण्याचा सन्मार्ग आदर्श असला तरी कांही प्रसंगी व्यावहारिक दृष्ट्या तो बिकट वाटतो. मिथ्या किंवा फसव्या प्रलोभनांचा मोह आवरता येत नाही. सदाचरणाचे सुपरिणाम दूरगामी असतात, ते लगेच दिसत नाहीत. कीर्तीरूपे अजरामर होण्याचा तिसरा रस्ता तर अडचणींचे पहाड फोडून स्वतःच तयार करावा लागतो आणि ते सर्वांना शक्य नसते. शिवाय तेवढे कष्ट करणा-याला त्याचे फळ प्रत्यक्ष मिळत नाहीच. दुसरा मार्ग तुलनेत सोपा आहे. एक लहानशी ज्योतसुध्दा आसपासचा आसमंत उजळून टाकते आणि त्या उजेडात आपण न ठेचकाळता मार्गक्रमण करू शकतो. त्यामुळे जीवनाचा हा दुसरा मार्ग हा सर्वसाधारण माणसाला अवलंबता येतो आणि त्याची फळे लगेच दिसू लागतात. ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार आणि इच्छा असेल तेवढी मजल त्या मार्गावर मारणे शक्य असते. या वचनात तमस याचा अर्थ फक्त रात्रीचा काळोख एवढ्यापुरता मर्यादित नसून सर्व प्रकारच्या अंधारांचा समावेश त्यात होतो. अज्ञान, भय, निराशा आदींमुळे मनात दाटलेला अंधःकार जास्तच भीषण असतो. ज्ञानाच्या प्रकाशात आपल्याला हित आणि अहित समजल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊन त्यानुसार प्रगती करू शकतो. अज्ञात गोष्टींबद्दल वाटणारी भीती त्याची माहिती मिळाल्यावर कमी होते किंवा नाहीशी होते, निराशेने ग्रस्त झाले असतांना आशेचे किरण दिसल्यावर मनाला केवढी उभारी येते!
एका दिव्याचा उजेडसुध्दा काळ्याकुट्ट अंधारातून एक छान दृष्य अनुभव आपल्याला देतो, तर दिव्यांची रांगच लावली तर ती पाहून किती मजा येईल? आश्विन महिन्यातल्या कोजागरी पौर्णिमेला चंद्राच्या पिठुर चांदण्याचा अनुभव घेतल्यानंर येणा-या अमावास्येची काळोखी रात्र दिव्यांनी उजळून टाकण्याची कल्पना ज्या कोणाला सुचली असेल त्याचे कौतुक वाटते. आजकाल विजेच्या दिव्यांच्या कृत्रिम प्रकाशात आपण रोज रात्री पडणारा अंधार आपल्यापुरता तरी मिटवून टाकला आहे, पण शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजही अनेक खेड्यापाड्यांपर्यंत वीज पोचलेली नाही किंवा भारनियमनामुळे ती असून नसल्यासारखी असते, पण उजेड पाडण्यासाठी तेथे रॉकेलचे कंदील तरी असतात. पूर्वीच्या काळात तेसुध्दा नव्हते. समई, निरांजन किंवा पणतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे दिसेल तेवढ्यावरच समाधान मानून घ्यावे लागत असे. फारच महत्वाचे काम असले तर दिवटी किंवा मशाल पेटवीत असत. अशा काळातल्या गडद अंधारात पणत्यांची रांग करून केलेली आरास, उंच काठीवर बांधलेला आकाशदिवा वगैरे फारच मनोहर दिसत असणार.
काळानुसार प्रगत झालेल्या तंत्रज्ञानामुळे रात्रीच्या काळोखाचा गडदपणा कांहीसा कमी झाला आहे आणि जास्त लखलखीत उजेड पाडण्याची साधने उपलब्ध झाली आहेत. विजेने उजळणा-या दिव्यांच्या माळा अधिकाधिक प्रखर होत आहेत, त्यांची होत असलेली उघडझाप आणि बदलते रंग यांतून त्या अधिकाधिक आकर्षक होत आहेत. आतिशबाजीचे नवनवे प्रकार निघत आहेत. जमीनीवरून आभाळात उंचवर उडणारी प्रकाशाची झाडे अधिकाधिक रंगीबेरंगी होत आहेतच, पण आधी आकाशात उंच उडून तिथून खाली रंगीबेरंगी ठिणग्यांचा वर्षाव करणारे अग्निबाण खूपच नयनमनोहर दिसतात. तेजाची ही सगळीच रूपे अत्यंत विलोभनीय वाटतात.
माझ्या जन्माआधी आलेल्या शेजारी या चित्रपटातल्या या गाण्यात तेजाच्या या न्यारी दुनियेचे किती छान वर्णन केले आहे?
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती हा हा हा !
चला धरू रिंगण, गुढी उभी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
गातसे चंद्र तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम हा, हा !
झोत रुपेरी, भूमीवरी गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कण कण उजळीत, हासत हसवीत
सरीतील गार हा हा हा !
आनंदुन रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी कुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या या या !

Friday, October 16, 2009

आली दिवाळी


येणार येणार म्हणता दिवाळी आता उद्यावर आली. भारताच्या महाराष्ट्रासह बहतेक सगळ्या भागात या सणाची पूर्वतयारी कधीच सुरू झाली आहे, उद्या हा आनंदोत्सव सुरू होत आहे. आपल्याला दिवाळीमुळे कां आनंद व्हावा या प्रश्नाचे पटकन उत्तर देणे तसे कठीण आहे. हा सण कशासाठी साजरा करायचा यासंबंधी कांही आख्याने आहेत. दुष्ट नरकायुराचा वध करून श्रीकृष्णाने ज्या हजारो स्त्रीपुरुषांना बंदीवासातून मुक्त केले त्यांना खूप आनंद झाला असेल आणि बळीराजाला बटु वामनाने पाताळात पाठवून दिल्यामुळे भयमुक्त झालेल्या देवादिकांना दिलासा मिळाला असेल, पण पुराणकाळात असंख्य राक्षस, दैत्य आणि असुर होऊन गेले आणि देवाने किंवा देवीने प्रकट होऊन त्यांचा निःपात केला, त्या सगळ्यांची आपण आठवण ठेवत नाही. त्यातही बंगालमधल्या दुर्गापूजेत महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीची स्थापना करून आराधना केली जाते आणि उत्तर भारतीय लोक दस-याला रामलीला व रावणदहन यातून तो पौराणिक काळ उभा करतात. पण द्वाळीच्या दिवसात आपण श्रीकृष्ण किंवा वामनाची पूजा करत नाही आणि नरकासुर किंवा बळीराजाचा ुल्लेखसुध्दा होत नाही. मग हा आनंदोत्सव कशासाठी? दुःख किंवा बंधनातून मुक्ती मिळतांना जो आनंद होतो तो त्या दुःखाच्या तीव्रतेवर आणि बंधनाच्या जांचकपणावर अवलंबून असतो. नरकासुर किंवा बळीराजा यांच्यामुळे आपल्याला त्रासच झाला नाही तर त्यापासून मुक्तीचा आनंद तरी कसा वाटणार? त्यामुळे ही कारणे सयुक्तिक वाटत नाहीत.
इतर असंख्य प्रकारे सुध्दा आपल्याला आनंद मिळत असतो. सुरेख दृष्य, मधुर आवाज, सुगंध, चविष्ट पदार्थ आणि कोमल स्पर्श आपल्या शरीराला सुखवतात. कथा, कविता, वर्णने वगैरे वाचतांना त्यात मन रमते, रहस्याचा उलगडा करताना बुध्दी संतुष्ट होते अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुळात माणसाला आनंद हवाच असतो आणि तो मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चाललेले असतात. आनंद प्राप्त झाल्यावर तो व्यक्त करण्यातसुध्दा मजा असते. हे जर मेहमीचेच असले तर त्यासाठी दिवाळी कशाला हवी?
आनंद ही व्यक्तीगत भावना असल्यामुळे तो ज्याला त्याला आपापल्या मनात होत असतो, पण इतरांच्या सहवासात तो व्यक्त केला तर जास्त मजा येते. यामुळेच वाढदिवसापासून बढतीपर्यंत अनेक घटना आपण एकत्र येऊन साज-या (सेलिब्रेट) करतो. पण हा सुध्दा तसा लहानसा ग्रुप असतो. एकादा सण सर्व समाजाने ठरवून एकाच दिवशी साजरा केला तर तो असंख्यपट मोठ्या प्रमाणात होतो. या कारणाने असे सण साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. दिवाळीपर्यंत पावसाळा संपून नद्यांना आलेले पूर ओसरलेले असतात. त्यामुळे दळणवळण पूर्ववत झालेले असते. खरीप पिके हातातोंडाशी आलेली असल्यामुळे त्यासाठी केलेल्या श्रमांचे सार्थक होतांना दिसत असते. हे कृषीउत्पन्न बाजारात येणार असल्यामुळे व्यापारी खुषीत असतात. हवामान प्रन्न असते. अशा सगळ्या दृष्टीने हा कालखंड सर्वांना सोयीचा असल्यामुळे दिवाळीचा सण लोकप्रिय झाला असावा.
आता नागरी समाजजीवनात यातल्या कशाचेच विशेष महत्व राहिले नाही. त्यामुळे दिवाळी म्हणजे ठरवून केलेली मौजमजा हाच अर्थ उरला असला तरी धमाल करून सण साजरा करण्यासाठी तो पुरेसा आहे. दिवाळीचे प्रसन्न वातावरण निर्माण करणा-या कवी यशवंत देव यांच्या एका गीताच्या कांही ओळी खाली दिल्या आहेत.
दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !


ही दिवाळी सर्व वाचकांसाठी सुखसमृध्दी आणि भरभराट घेऊन येवो अशा शुभेच्छा.

Wednesday, October 14, 2009

पुण्याचा स्वाइनफ्ल्यू

मेक्सिकोमध्ये स्वाइनफ्ल्यूचा उद्रेक झाल्यानंतर त्याची साथ शेजारच्या यूएसएमार्गे जगभरात पोचेल अशी आशंका सगळ्यांनाच वाटू लागली होती. त्याला रोखण्याच्या उद्देशाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याला सुरुवात झाली होती. पण ही तपासणी नेमकी कशी करत होते कोण जाणे? क्ष किरणांच्या तपासणीतून शस्त्र दिसू शकते, स्फोटकाचा वास प्रशिक्षित कुत्रे ओळखू शकते, पण स्वाईनफ्ल्यूचे विषाणु अशा रीतीने शोधून काढून अलार्म वाजवणारे यंत्र अजून निघालेले नाही. "आमची तपासणी झाल्याचे आम्हाला तर समजले सुध्दा नाही", "त्या पांढरा डगला घातलेल्या बाईंचे प्रवाशांच्याकडे लक्ष तरी कुठे होते? ती तर मोबाईल कानाला लावून नुसती खिदळत होती." अशा प्रकारचे शेरे, ताशेरे ऐकायला किंवा वाचायला मिळत होते. रोगी डुकराचे मांस खाल्ल्यामुळे हा रोग होतो अशी भ्रामक समजूत पसरली असल्यामुळे भारतातले लोक निर्धास्त होते. पण अखेर व्हायचे होते ते झालेच. पुण्यातली एक दुर्दैवी शाळकरी मुलगी या रोगाला सर्वात आधी बळी पडली आणि त्या बातमीने हाहाःकार उडवला.
त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा केसेस लागोपाठ येत गेल्या. पुण्याबाहेर मुंबई, बंगळूरू, दिल्ली, अहमदाबाद अशा दूर दूर असलेल्या शहरातून स्वाईन फ्ल्यूच्या बातम्या येऊ लागल्या, एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातसुध्दा त्याची लागण झाली असल्याचे वाचून सर्वांचे धाबे दणाणले. संशयित, पॉझिटिव्ह निघालेले, उपचार घेत असलेले आणि दगावलेले अशा सर्व रुग्णांची आंकडेवारी रोजच्या रोज वर्तमानपत्रात येऊ लागली. पण या सर्वच संख्यांमध्ये संपूर्ण भारतातली अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात अर्ध्याहून अधिक पुण्यातले रोगी असत. यामुळे पुण्याचा उल्लेख फ्लुणे असे व्हायला लागला होता. कांही लोकांनी तर स्वाईन फ्ल्यूइतकाच पुण्याचा धसका घेतला होता. सर्दीखोकल्याच्या उपचारासाय़ी मुंबईतल्या आमच्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, "पुण्याला जाऊन आलात कां?". त्यानंतर दुसरा प्रश्न होता, "पुण्याहून तुमच्या घरी कोणी आले आहेत काय?" मी जर हो म्हंटले असते तर बहुधा त्यांनी मला थेट कस्तरबा रुग्णालयात पाठवले असते. आम्हालाही मनातून भीती वाटत होतीच. मुंबईच्या घरातला पांच दिवसाचा गणेशोत्सव संपल्यानंतर चार दिवस पुण्यातली आरास आणि तिथला विसर्जनाचा सोहळा पहायचा असे आमचे ठरले होते, पण भीतीपोटी तो बेत रद्द केला. या साथीचा पुण्याच्या गणेशोत्सवावर परिणाम झालेला टीव्हीवर दिसत होता, पण तो साजरा झालाच आणि विसर्जनाची मिरवणूकसुध्दा निघालीच. सुदैवाने त्यातून साथीचा मोठा उद्रेक झाला नाही.
असे असले तरी ती साथ पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. महिनाभर उलटून गेला असला तरी अजून नवे रुग्ण सापडत आहेत. कालच दोन लहान मुलींचा बळी पडल्याची बातमी आजच्या पेपरात आहे. फक्त आता कोणालाही त्याचे फारसे कांही वाटेनासे झाले आहे. दहशत वाटेनासी झाल्यावर आता दिवाळीसाठी आम्ही पुण्याला आलो आहोत आणि नाकावर आच्छादन न घालता पुण्याच्या रस्त्यातून फिरतही आहोत. पुण्यातील रस्त्याने चालतांना तोंडावर मास्क परिधान केलेले किंवा नाकाला रुमाल लावून जाणारे लोक दिसतात, पण त्यांची टक्केवारी ८०-९० पासून १०-१५ पर्यंत खाली आली आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात लोकांची तोबा गर्दी आहे. स्वाईनफ्ल्यूसंबंधी उपयुक्त माहिती आणि खबरदारीचे उपाय यांचे फलक पुणे महानगरपालिकेने शहरात जागोजागी लावले आहेत. त्यातून लोकांचे प्रबोधन होऊन या साथीच्या प्रसाराला थोडा आळा बसला आहे यात शंका नाही.
या साथीवर लस बनवण्याच्या कामातसुध्दा पुणेकर शास्त्रज्ञांनी प्रगती केली असल्याची बातमी वाचली होती. त्याशिवाय कांही लोकांनी इतर मार्ग शोधून काढले आहेत. योगायोगाने नारायण पेठेतल्या एका पुरातन गणपतीमंदिरासमोरून चाललो होतो. हे नांव पुणेकर मंडळींच्या बोलण्यातून ऐकलेले असल्यामुळे आत जाऊन दर्शन घेतले. लाकडाचे चौकोनी खांब, त्यावर लाकडी तुळया, कडीपाटाचे छत वगैरे जुन्या पध्दतीचे बांधकाम अजून टिकून आहे. बहुतेक खांबांवर अमूक तमूक गोष्टी करू नयेत याबद्दल सूचना देणा-या पुणेरी पाट्या लावलेल्या होत्या. बाहेर येतांना प्रवेशद्वाराजवळच स्वाईनफ्ल्यूबद्दल कांहीतरी लिहिलेला फलक दिसला. त्यावर एक संस्कृत श्लोक दिसल्यामुळे तो फलक वाचून पाहिला. स्वाईनफ्ल्यूपासून स्वतःचा खात्रीपूर्वक बचाव करण्याच् म्हणून कांही उपाय त्यावर दिले होते. ते असे आहेत.
- गायीच्या शेणाच्या गोव-या आणून घरात ठेवाव्यात
- रोज गोमूत्रप्राशन करावे
- अमक्या तमक्या पदार्थांनी युक्त असा धूप जाळावा
- खाली दिलेला मंत्र २१ वेळा म्हणावा
संगजा देशकालोत्थाअपि सांक्रमिका गदाः।
शाम्यन्ति .त्सरणतो दत्तात्रेयम् नमामि त्वम् ।।

Thursday, October 08, 2009

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - नायगारा धबधबाभाग -१

नायगाराच्या धबधब्याहून खूप उंच असलेले धबधबे आणि नायगारा नदीच्या कांहीपट रुंद पात्र असलेल्या विशाल नद्या आपल्या भारतात आहेत. यातल्या कांही नद्यांना पूर आलेला असतांना त्याना घातलेल्या बंधा-यांवरून खाली झेपावत जाणारे प्रचंड जलौघही मी पाहिले आहेत. नायगारासारखे रुंद धबधबे मी फारसे पाहिले नसले तरी कदाचित जगात इतरत्र असतील असे मला वाटते. पण नायगाराला जेवढी उदंड प्रसिध्दी मिळाली आहे तेवढी इतर कुठल्याही जागेला मिळत नाही. नायगारा नदी फारशी मोठी नसली तरी ती पहायला येणा-या पर्यटकांना ओघ मात्र नेहमीच प्रचंड असतो. या पाहुण्यांना निरनिराळ्या प्रकारचा अनुभव देऊन तृप्त करणारे अनेक कल्पक उपक्रम या जागी चालतात. त्या सगळ्याच ठिकाणी हौशी पर्यटकांच्या लांब रांगा लागतात. यात आपली पाळी लवकर येऊन जावी म्हणून आम्हाला शक्य तितक्या लवकर तिथे न्यायचे आमच्या सहलीच्या आयोजकांनी ठरवले होते.

आमच्या भ्रमणकाळात त्या भागात चांगलीच थंडी पडू लागली होती. आम्ही तर मुंबईच्या उकाड्यातून तिकडे गेलो असल्यामुळे आम्हाला जरा जास्त हुडहुडी भरत होती. सांगितले गेल्याप्रमाणे आम्ही भल्या पहाटे उठलो तेंव्हा हवेतले तपमान शून्याच्या जवळपास पोचलेले होते. नळाचे पाणी गोठले नसले तरी बर्फासारखे थंडगार होते, त्यामुळे लगेच गीजर सुरू केला. झोपायच्या खोलीत गालिचा अंथरलेला होता, पण बाथरूममधल्या बर्फासारख्या लादीला पाय टेकवत नव्हता. दोन दिवसाच्या प्रवासात ओझे नको म्हणून आम्ही चपला बरोबर नेल्या नव्हत्या. एक टर्किश टॉवेल जमीनीवर अंथरून पायाला लागणारा थंडीचा चटका घालवला. थंडीमुळे दिवसभरात घाम आलेला नव्हताच आणि धुळीशीही संपर्क झालेला नसल्यामुळे शारीरिक स्वच्छतेसाठी सचैल स्नान करण्याची आवश्यकता नव्हती, ते करण्याची तीव्र इच्छा होत नव्हती आणि त्यासाठी पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर अमेरिकनांसारखे रहायचे ठरवून गरम पाण्याने हातपायतोंड धुवून घेतले आणि कपडे बदलून तयार झालो.

युरोपच्या दौ-यावर गेलो असतांना प्रत्येक मुक्कामात रोज सकाळी भरपूर काँटिनेंटल ब्रेकफास्ट मिळत होता. आम्हाला एकादे दिवशी सकाळी लवकर निघायचे असले तरी खास आमच्या ग्रुपसाठी तो देण्याची व्यवस्था असे. या मिनिटूरमध्ये खाण्यापिण्याची जबाबदारी आयोजकांवर नव्हतीच. हॉटेलची रेग्युलर सर्व्हिस सुरू व्हायला अवधी होता. पण याची कल्पना आधीच देऊन ठेवलेली असल्यामुळे आम्ही आदल्या रात्रीच बन, वेफर्स, फळे वगैरे खाद्यसामुग्री आणून ठेवली होती. शिवाय न्यूजर्सीहून आणलेले फराळाचे डबे सोबतीला होतेच, पण इतक्या लवकर काही खाण्याची इच्छा नसल्य़ामुळे गीजरच्या पाण्यात डिपडिप करून गरम गरम चहा बनवला आणि बिस्किटांबरोबर प्राशन केला.

सकाळी उजाडताच आम्ही बफेलो शहर सोडले आणि वीस पंचवीस मिनिटांत नायगराच्या परिसरात जाऊन पोचलो. तो जगप्रसिध्द धबधबा पाहण्याची सर्वांना उत्कंठा असली तरी आधी आम्हाला तिथल्या एका सभागृहात नेले गेले. तिथला शो सुरू व्हायला वेळ होता, म्हणून बाजूच्या स्टॉलवरून सर्वांनी सँडविचेस, बर्गर यासारखे कांही विकत घेतले आणि एका हातात ती डिश आणि दुस-या हातात कोकची बाटली धरून अमेरिकन स्टाइलने हॉलमध्ये प्रवेश केला. अलीकडे मॉल्समध्ये असतात तशासारखे हे लहानसे सभागृह होते, पण त्यात समोरच्या बाजूला अवाढव्य आकाराचा पडदा होता. नायगारा लीजेंड्स ऑफ अॅड्व्हेंचर या नांवाचा एक माहितीपट त्यावर दाखवला गेला. हजारो वर्षांपूर्वी त्या भागात वास्तव्य करणा-या रेड इंडियन लोकांच्या टोळक्यांचे दृष्य सुरुवातीला पडद्यावर आले. त्यात लेलावाला नांवाची एक सुंदर, धीट आणि मनस्विनी युवती असते. तत्कालीन रिवाजाप्रमाणे टोळीमधील सर्वात बलदंड अशा पुरुषाबरोबर तिचे लग्न ठरवले जाते. पण वडिलांच्या आज्ञेखातर त्या आडदांड धटिंगणाशी विवाह करणे लेलावालाला मान्य नसते. लग्नसमारंभाच्या रात्रीच ती आपल्या झोपडीतून निसटते आणि घनदाट जंगलात पळून जाते. खलनायकाची माणसे शिकारी कुत्र्यांसारखी तिच्या मागावर जातात. त्यांना चुकवण्यासाठी एका लहानशा नांवेत बसून ती नायगारा नदीत शिरते आणि धबधब्याच्या परिसरातल्या दाट धुक्यात अदृष्य होते. अशी कांहीशी दंतकथा त्या भागातील आदिवासी लोकांमध्ये प्रसृत आहे. त्यानंतर चांदण्या रात्री अधूनमधून तिची अंधुक पण कमनीय आकृती त्या धबधब्याच्या कोसळत्या पाण्यात कोणाकोणाला दिसत राहते अशी समजूत आहे. या प्रेमकथेचे अत्यंत मनोवेधक चित्रण या लघुपटात केले आहे.

त्यानंतर एकदम पंधरासोळाव्या शतकात येऊन युरोपातल्या लोकांनी अमेरिकेतील मिळेल त्या भागाचा ताबा घ्यायला सुरुवात केल्याची दृष्ये पडद्यावर आली. इंग्रज आणि फ्रेंच लोकांनी आधी आदिवासी लोकांना तिथून पिटाळून लावले आणि त्यानंतर आपसात मारामा-या सुरू केल्या. अमेरिकन राज्यक्रांती झाल्यानंतर तो भाग स्वतंत्र झाला, पण पलीकडचा कॅनडा ब्रिटीशांच्या ताब्यात राहिला. नायगाराच्या परिसरात होऊन गेलेल्या त्या काळातल्या कांही चकमकी आणि लढायांचे छायाचित्रण पडद्यावर जीवंत केले गेले. त्या ऐतिहासिक काळातले गणवेश, त्यांची शस्त्रास्त्रे, त्यांच्या रणनीती वगैरे सर्व गोष्टी अत्यंत लक्षवेधी स्वरूपात दाखवल्या गेल्या.

सगळी युध्दे संपल्यानंतर त्या भागातल्या नागरी वाहतुकीचा कसा विकास होत गेला, कोणकोणत्या प्रकारच्या नौकांचा उपयोग करून इथल्या नदीचा खळखळता प्रवाह ओलांडण्याचे प्रयत्न करण्यात यश आले, त्यात यशस्वी झालेल्या तसेच कधीकधी अपयशी ठरलेल्या साहसी वीरांच्या गाथा सांगितल्या गेल्या. नायगराचा धबधबा, त्याच्या वरच्या भागात अतीशय वेगाने धांवणारा आणि खाली खळाळत जाणारा पाण्याचा प्रवाह या तीन्ही गोष्टी साहसी लोकांना कांही तरी अचाट करून दाखवण्याची प्रेरणा नेहमीच देत आल्या आहेत. अनेक लोकांनी त्या प्रयत्नात आपले प्राण गमावले आहेत, कांही लोक त्या दिव्यातून सुखरूपपणे बाहेर आले आहेत, तर कांही लोक त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट असल्याकारणाने जेमतेम बचावले. यातल्या कांही लोकांच्या चित्तथरारक कथा दाखवल्या गेल्या. विशेषतः एक लहान मुलगा नांवेत बसून वरच्या भागात नदी ओलांडत असतांना ती नांव भोव-यात सापडते त्याची कथा मनाला स्पर्श करते. अनेक धाडशी लोक जिवावर उदार होऊन त्याला वाचवण्याचा आटेकाट प्रयत्न करतात आणि अगदी अखेरच्या क्षणी त्या प्रयत्नांना यश येऊन त्याचे प्राण वाचतात. तसेच एक प्रौढ बाई लाकडाच्या पिंपात बसून धबधब्याच्या पाण्याबरोबर खाली कोसळते. खालच्या बाजूला असलेले नावाडी तिचा शोध घेऊन ते पिंप कांठावर घेऊन येतात. आजूबाजूला जमा झालेले तिचे आप्त जसे श्वास रोखून ते पिंप उघडण्याची वाट पहात असतात तसेच प्रेक्षकसुध्दा मुग्ध होऊन पुढे काय होणार याची वाट पहात असतात. ती बाई हंसत हंसत पिपातून बाहेर आलेली पहाताच सर्वजण सुटकेचा निःश्वास सोडतात.

अशा प्रकारची अनेक चित्तथरारक नाट्ये एकमेकात गुंफून या लघुपटात पेश केली गेली. पार्श्वभूमीवर सतत नायगराचा धबधबा निरनिराळ्या अँगलमधून दाखवला जात होता. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये दिसणारी त्याची अनंत रूपे मंत्रमुग्ध करणारी होती. त्याच्या जोडीला रहस्यमय कथा उलगडत जात होत्या. आकर्षक दृष्ये आणि मनोरम पार्श्वसंगीत यांच्या मिश्रणाने तो कार्यक्रम बहारदार असाच होता. त्यात तासभर गेल्याचे कोणालाही वैषम्य वाटले नाही. बहुतेक पर्यटक इतके प्रभावित झाले होते की घरी गेल्यानंतर इतरांना दाखवण्यासाठी या लघुपटाच्या डीव्हीडी त्यांनी विकत घेतल्या.

. . . .. . . . .. . . .

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस -  नायगारा धबधबा - भाग २


नायगारावरील चित्रफीत पाहून झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष धबधबा पहायला निघालो. आपल्याला माहीत असलेल्या बहुतेक सर्व नद्या पर्वतावर उगम पावतात आणि समुद्राला किंवा दुसर्‍या मोठ्या नदीला जाऊन मिळतात. पण नायगरा नदी ही या नियमाला अपवाद आहे. कॅनडाच्या सीमेवर असलेल्या पाच महासरोवरांपैकी ईरी या सरोवरातून नायगारा नदी निघते आणि ओंटारिओ या दुसर्‍या सरोवराला जाऊन मिळते. थोडक्यात ईरी सरोवराचा ओव्हरफ्लो या नदीतून ओंटारिओ सरोवरात होतो. या नदीची लांबी जेमतेम छप्पन मैल आहे. आणि तिला सलग उतार नसून ती एका कड्यावरून धाडकन उडी मारून एकदम खालच्या पातळीवर येते. यातूनच हा धबधबा तयार झाला आहे.

धबधब्याच्या वरच्या अंगाच्या प्रदेशात कांही बेटे आहेत. त्यातल्या गोट आयलंड नावाच्या बेटाने नदीचा प्रवाह दुभंगून त्याचा एक भाग कॅनडाच्या प्रदेशातून आणि दुसरा यूएसएमधून वहात जातो आणि वेगवेगळ्या जागी खाली कोसळतो. यूएसएमधील नदीच्या प्रवाहाचे पुन्हा दोन वेगळे भाग होतात आणि एकमेकांच्या जवळच पण वेगळ्या कड्यांवरून खाली येतात. अशा तर्‍हेने एका परिसरातच तीन स्वतंत्र धबधबे आहेत.

सर्वात लहानसा ब्राइडल वील हा सुमारे १७ मीटर रुंद आणि २५ मीटर उंच आहे, दुसरा अमेरिकन फॉल तीनशे मीटर रुंद आणि असाच २५-३० मीटर उंच आहे आणि तिसरा म्हणजेच सर्वात मोठा हॉर्सशू फॉल मात्र ८०० मीटर रुंद आणि ५० मीटरावर उंच आहे. या भागातली जमीन अतीशय उंचसखल असल्यामुळे हे आंकडे वेगवेगळ्या बिंदूंपाशी वेगळे असणार आणि पाण्याचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने या आंकड्यांत सारखा बदलही होत असतो. ही मोजमापे फक्त अंदाज येण्यापुरती आहेत. या ठिकाणी खूप मोठे जलविद्युत केंद्र आहे आणि पाण्याचा बराचसा भाग तिकडे वळवला जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी कधी कधी धबधब्यावरून पडणारा मुख्य प्रवाह अर्ध्यावरसुध्दा आणला जातो. तरीदेखील तो दर सेकंदाला दीड हजार घनमीटर इतका प्रचंड असतो. हिवाळ्यात सरोवरातले पाणी गोठून गेल्यामुळे त्याचा प्रवाह कमी होतो आणि उन्हाळ्यात ते वितळल्यामुळे नायगरा नदीला पूर येतो.

पावसाळ्याच्या दिवसात पुणे मुंबई प्रवासात खंड्याळ्याच्या घाटातून जात असतांना आपल्याला अनेक जलौघ कडेकपारावरून खाली झेपावतांना दिसतात. तशाच प्रकारचा पण मोठ्या आकाराचा ब्राइडल वील हा धबधबा आहे. त्याच्या पाण्याच्या झिरझिरीत पापुद्र्यातून अनेक झिरमिळ्या लोंबतांना पाहून कोणा कवीमनाच्या संशोधकाला नववधूचा चेहरा आठवला. कपाळाला फुलांच्या मुंडावळ्या किंवा सेहरा बांधलेली भारतीय नववधू किंवा अत्यंत तलम कापडाचा बुरखा (ब्राइडल वील) पांघरलेली ख्रिश्चन ब्राइड यांचा चेहरा म्हंटले तर झाकलेला असतो पण त्या पडद्यातून दिसतही असतो, तसेच या धबधब्याचे रूप आहे, म्हणून त्याला ब्राइडल वील फॉल असे नाव दिले आहे. हा धबधबा पाहण्यासाठी एक जागा ठेवली आहे, त्या ठिकाणाहून तो व्यवस्थितपणे पाहता येतो.

ब्राइडल वील पाहणे आणि फोटो काढणे वगैरे झाल्यानंतर आम्ही अमेरिकन फॉल्स पहायला गेलो. हा धबधबा खूप मोठा आहे. ज्या डोंगरावरून नायगारा नदी खाली उडी मारते त्याला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे प्रत्येक धबधब्याच्या समोरच्या बाजूला दुसर्‍या कंगोर्‍यावर उभे राहून त्याचे छान दर्शन घेता येते. अमेरिकन धबधब्याचा आकार विशाल आहे, तसेच खाली पडत असलेले पाणी खाली पडतांना खालच्या खडकावर आपटून पुन्हा वर उसळी घेते त्यामुळे उडणारे तुषार खूप उंचवर उडत असतात. ते एकमेकात मिसळून धुक्याचा एक प्रचंड पडदाच उभा असल्यासारखे वाटते. आम्ही सकाळच्या वेळी गेलो असल्यामुळे सूर्याचे किरण या पडद्यावर पडून त्यातून अत्यंत सुरेख असे इंद्रधनुष्य तयार होत होते. खाली पाण्याला टेकलेले आणि वर आभाळापर्यंत पोचलेले ते इंद्रधनुष्य आपल्याबरोबर पुढे पुढे जात असतांना पाहून खूप गंमत वाटत होती.

अमेरिकन फॉल मनसोक्त पाहून झाल्यावर आम्ही हॉर्सशू फॉल पहायला गेलो. कॅनेडियन बाजूला असलेला हा खरा नायगरा धबधबा! घोड्याच्या नालेसारखा वक्राकार असलेल्या या भव्य धबधब्याचे दर्शन खरोखरच स्तिमित करणारे आहे. आम्ही यूएसएच्या बाजूला असल्यामुळे आम्हाला या वेळी तो बाजूनेच पहायला मिळाला, पण पूर्वी मी हा धबधबा कॅनडामधून पाहिला होता तेंव्हा त्याचे अगदी समोरून दर्शन झाले होते. त्यावेळी त्या धबधब्याला नजरेसमोर ठेऊन आम्ही निदान तासभर तरी समोरच्या रुंद रस्त्यावर पायी येरझारा घालत होतो. त्याशिवाय कॅनडाच्या भागात असलेल्या उंच मनोर्‍याच्या सर्वात टोकाच्या मजल्यावर असलेल्या फिरत्या रेस्टॉरेंटमध्ये बसून धबधब्याकडे पहात पहात रात्रीचे भोजन घेतले होते. या वेळी पलीकडच्या तीरावर असलेला हा मनोरा सहप्रवाशांना दाखवून मी तिथे गेलो होतो असे सांगून थोडा भाव खाऊन घेतला.

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस -  नायगारा धबधबा - भाग ३


नायगाराच्या धबधब्यावरून पडणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे त्या जागी एक लांब, रुंद आणि खोल अशी दंतुर आकाराची मोठी घळ तयार झाली आहे. या घळीच्या कांठाकांठाने वेगवेगळ्या ठिकाणांवरून तिथल्या तीन धबधब्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. त्यातील प्रत्येक पॉइंटला जाण्यासाठी पक्का रस्ता, त्या जागी निरीक्षण करीत उभे राहण्यासाठी विस्तीर्ण जागा, सुरक्षेसाठी मजबूत असे कठडे अशा सगळ्या प्रकारच्या सोयी आहेत. त्याखेरीज घळीच्या तळाशी जाऊन समोरून खाली पडणारे पाण्याचे प्रवाह पाहण्यासाठी अनेक सोयी आहेत. त्यातल्या दोन व्यवस्था पाहण्याचा समावेश आमच्या सहलीच्या कार्यक्रमात होता.

मेड ऑफ दि मिस्ट या नांवाची वाहतूक कंपनी मोटर लाँचमधून या नदीतून फिरवून आणते. तीन्ही जागी धबधब्यातून पडणारे पाणी खालच्या एकाच मोठ्या डोहात एकमेकांमध्ये मिसळते आणि त्याचा खळाळता प्रवाह नदीच्या पात्रातून वहात वहात पुढे ओंटारिओ सरोवराकडे जातो. धबधब्याच्या पातळीवरून खाली उतरण्यासाठी लिफ्टची व्यवस्था केलेली आहे. कॉलेजात असतांना मी गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो. त्या काळी खाली उतरण्यासाठी मातीच्या उतारावर पायऱ्या होत्या. त्यातून घसरत आणि पडत पडत आम्ही मित्रमंडळी खाली उतरून गेलो होतो आणि रांगत रांगत वर चढून आलो होतो. त्या वयात ते शक्य होते आणि त्यात खूप मजाही वाटली होती, पण आता त्याचा विचारसुध्दा केला नसता. नायगाराला मात्र अपंग माणूस सुध्दा व्हीलचेअरवर बसून खालपर्यंत जाऊ शकतो. त्या खोल घळीच्या एका किनाऱ्यावर एक उंचच उंच पोकळ खांब उभा करून त्यावर मोठा प्लॅटफॉर्म केला आहे. वरील बाजूच्या इमारतीतून तिथपर्यंत जाण्यासाठी बांधलेल्या पुलावरून तिथपर्यंत गेलो आणि लिफ्टने खाली उतरलो. याचे इंजिनिअरिंगसुध्दा थक्क करणारे आहे.

खाली मोटर लाँचचा धक्का आहे. त्यात जाण्यापूर्वी सर्व पर्यटकांना एक निळ्या रंगाचा प्लॅस्टिकचा रेनकोट देतात. तो अंगावर चढवणे आवश्यक आहे. खळाळत्या पाण्यातून ती बोट हिंडकळत पुढे पुढे जाते आणि एकेका धबधब्याचे दृष्य अगदी जवळून पहायला मिळते. इतक्या उंचीवरून खाली पडतांनाच त्या पाण्याचा शॉवर झालेला असतो. त्याची धार शिल्लक रहात नाही. शिवाय खाली पडलेल्या पाण्याचे असंख्य तुषार पुन्हा कारंज्यासारखे उंच उडत असतात. ते अंगावर घेत घेत फिरायला अपूर्व मजा येते. जोराचा थंडगार वारा सुटलेला असल्यामुळे अंगावर पुरेसे गरम कपडे असणे आवश्यक होते. त्या डोहात अर्धा पाऊण तास चक्कर मारून एक वेगळा अनुभव गांठीला बांधून परत आलो.

त्यानंतर केव्ह ऑफ दि विंड नांवाच्या जागी गेलो. धबधब्याच्या खाली डोंगराच्या कड्याच्या कांठाकांठाने चालत जायची एक वळणावळणाची वाट बांधली आहे. या ठिकाणी अंगावर पिवळा रेनकोट आणि पायात प्लॅस्टिकचे सँडल्स घालून त्या निसरड्या वाटेवरून फिरून यायचे. काही कांही ठिकाणी अनेक पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागतात. या पदयात्रेत सगळीकडेच जवळ जवळ मुसळधार पाऊस पडत असल्याचा भास होतो. थेट धबधब्याच्या खाली उभे राहून वरून बदाबदा पडणारे पाणी त्याचा प्रचंड आवाज ऐकत पहाणे हा एक अभूतपूर्व अनुभव आहे. त्या जागेच्या नांवावरून तिथे एकादे विंड टनेल असेल असे मला आधी वाटले होते. तसा गार वारा वहात होता, पण भुयार मात्र नव्हते. पैसे खर्च करून आणि शरीराला कष्ट देऊन असा थरारक अनुभव घ्यावा असे माणसाला कां वाटते याचे मात्र कोडे पडते.

या परिसरात एक पार्क आहे. त्याच्या प्रवेशद्वारापाशी निकोला टेसला या संशोधकाचा पुतळा उभा केला आहे. नायगारा धबधब्यापासून वीजनिर्मिती करणारी यंत्रसामुग्री बसवून त्याचा उपयोग करण्याचे काम त्याने केले. या खेरीज अनेक चित्तवेधक जागा या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या आम्ही पाहू शकत नव्हतो. पुरेसा वेळ आणि पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर त्या ठिकाणी दोन तीन दिवस मुक्काम करूनच त्या पाहता येतील. पण महत्वाच्या आणि प्रसिध्द गोष्टी पाहून त्या सहलीचे सार्थक झाल्याचे समाधान बरोबर घेऊन आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.

 दुसरा दिवस -भाग ४ नायगारा - न पाहिलेल्या गोष्टी


चाळीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा गिरसप्पाचा धबधबा पहायला गेलो होतो त्या काळात त्या जागेपर्यंत जाऊन पोचणे हेच एक दिव्य होते आणि ते करायला आलेल्या माणसांना पहायला कुतूहलाने जे कोणी पशुपक्षी बाहेर आले असतील तेवढेच जीव तिथे आमच्यासोबत होते. गोकाकजवळ असलेला घटप्रभा नदीवरचा धबधबा तसा मनुष्यवस्तीपासून जवळ असला तरी तो पहाण्यासाठी ज्या वेळी आम्ही तेथे गेलो होतो तेंव्हा तरी आमच्याव्यतिरिक्त आणखी कोणीच तेथे दिसले नाही. भेडाघाटचा धबधबा जेंव्हा मी पहिल्यांदा पाहिला त्या वेळी वाळूतून मैलभर चालत जातायेतांना वाटेत भेटलेली माणसे धरून एकंदर पन्नाससाठजण भेटले होते. पण अलीकडे मी तेथे गेलो तेंव्हापर्यंत तिथल्या रस्त्यात खूप सुधारणा झाली होती, एवढेच नव्हे तर धबधब्यावरून खाली कोसळणारे पाणी अगदी जवळून पहाता यावे यासाठी खास प्लॅटफॉर्म उभे केलेले दिसले. परगांवाहून आलेले पर्यटक आणि सहलीला आलेले स्थानिक यांनी तो भाग फुलून गेला होता. नायगाराचा धबधबा पाहायला जगभरातून येणारे पर्यटक आणि त्यांची पैसे खर्च करण्याची ऐपत यांचा विचार करता ही एक खूपच मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे आणि मार्केटिंगच्या बाबतीत अग्रणी असलेल्या अमेरिकन लोकांनी त्या दृष्टीने जे जे कांही उभे करून ठेवले आहे ते कल्पनातीत आहे असे म्हणता येईल.

अमेरिकेतल्या तीन वेगवेगळ्या पॉइंटवरून आम्ही या धबधब्याच्या तीन धारा पाहिल्याच, यापूर्वी कॅनडामधून हॉर्सशूफॉलकडे पहात पहात मी चांगला तासभर तिथल्या घळीच्या कांठाकांठाने बांधलेल्या रस्त्यावर फिरलो होतो. मेड ऑफ द मिस्ट च्या बोटीत बसून आम्ही खळाळणाऱ्या प्रवाहातून धबधब्याच्या जवळजवळ खाली पोचलो आणि केव्ह ऑफ द विंडमध्ये जमीनीवरून धबधब्याच्या आंतल्या अंगाला जाऊन समोर कोसळणाऱ्या पाण्याच्या धागा जवळून पाहिल्या. नायगाराचा इतिहास सांगण्याच्या निमित्याने त्याची विविध रूपे दाखवणारी चित्रफीत पाहिली होती. त्याशिवाय उंच मनोऱ्यावरून दिसणारे खालचे विहंगम दृष्यसुध्दा पूर्वी पाहिले होते. याहून आणखी वेगळे काय पहायचे राहिले असे कोणालाही वाटेल. पण अमेरिकन लोकांच्या कल्पकतेला दाद द्यावीच लागेल इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या सोयी या ठिकाणी करून ठेवल्या आहेत. रात्रीच्या वेळी धबधब्याच्या पाण्यावर लेजरबीम्सचे झोत सोडून त्याला रंगीबेरंगी करण्यात येते याबद्दल मी ऐकले होते, पण हे पाहण्याची व्यवस्था आमच्या टूरमध्ये समाविष्ट नसल्याचे ऐकल्यावर थोडा खट्टू झालो होतो. नायगाराला आलेल्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी केलेल्या त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी तिथे गेल्यानंतर समजल्या. त्यांचा लाभ घेण्यासाठी आम्हाला वेळही नव्हता, आमच्याकडे जास्तीचे पैसेही नव्हते आणि मुख्य बाबी पाहून झाल्यानंतर त्याचे एवढे वैषम्य वाटले नाही.

नायगाराच्या व्हिजिटर सेंटरच्या बाहेरच एक मोठे फुलांचे उद्यान आहे. अमेरिकेतील वेगवेगळ्या सरोवरांचे आकार हिरवळीतून त्यात दाखवले आहेत. नायगरा गॉर्ज डिस्कव्हरी सेंटरमध्ये ही सरोवरे आणि नद्या कशा तयार झाल्या याची कुळकथा चित्रांमधून दाखवली आहे. तिथल्या मत्स्यालयात दीड हजार प्रकारचे जलचर तसेच पेंग्विनसारखे पक्षी पहायला मिळतात. डेअरडेव्हिल म्यूजियममध्ये साहसवीरांची साहसी कृत्ये चित्रे आणि चलचित्रे यांतून उभी केली आहेत. भयानक दृष्ये दाखवून घाबरवून सोडण्यासाठी एक भुताटकीचे घर (हाँटेड हाऊस) आहे. इथल्या एरोस्पेस म्यूजियममध्ये आधुनिक युगातली प्रगती  पहायला मिळते. आर्ट अँड कल्चरल सेंटरमध्ये नानाविध कलांचे दर्शन घडते. लंडनच्या प्रसिध्द मादाम तूसाद म्यूजियमच्या धर्तीवर बनवलेल्या हाउस ऑफ वॅक्समध्ये मोठमोठ्या प्रसिध्द व्यक्तींचे पूर्णाक़ती पुतळे ठेवले आहेत. स्कूबा सेंटरमध्ये जाऊन पाण्यात खोलवर डुबकी मारून येण्याची सोय आहे, तर हॅलिकॉप्टरमध्ये बसून वरून खालचे दृष्य पहायची व्यवस्था आहे. अॅनिमेटेड राइडमध्ये बसून चक्क धबधब्यावरून पाण्याबरोबर खाली कोसळल्यासारखा अनुभव घेण्याची व्यवस्था एका ठिकाणी केलेली आहे. ही कांही उदाहरणे झाली, अशासारख्या अनंत गोष्टी त्या जागी आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या सुखसोयींनी युक्त अशी ज्याच्या त्याच्या खिशाला परवडणारी किंवा कापणारी अनेक हॉटेले, कॅसिनोज आणि रेस्तराँज तर आहेतच.
---------------------------

अमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - ५ - कॉर्निंग ग्लास सेंटर


नायगाराच्या धबधब्याच्या सान्निध्यात तीन तास घालवतांना त्याचे सौंदर्य सर्व बाजूंनी पाहून डोळ्यात भरून घेतले, कड्यावरून खाली झेपावणाऱ्या पाण्याचा कल्लोळ कानात घुमत राहिला होता, पोटपूजा करून पोटही भरून घेतले आणि आमची बस पुढील प्रवासाच्या मार्गाला लागली. अमेरिकेतल्या फॉल सीजनमध्ये रंगीबेरंगी साजशृंगाराने नटलेल्या वृक्षराईचे सौंदर्य दोन्ही बाजूला पसरले होते. ते न्याहाळत तीन साडेतीन तासांनंतर आम्ही कॉर्निंग ग्लास सेंटरला जाऊन पोचलो. या ठिकाणी कांचेच्या खास वस्तूंचे सुंदर संग्रहालय आहे, तसेच पर्यटकांनी, विशेषतः लहान मुलांनी या जागी भेट देऊन कांचेबद्दल माहिती मिळवावी यासाठी छान व्यवस्था केली आहे.

कॉर्निंग ही कांचसामान तयार करणारी जगातली एक अग्रगण्य कंपनी आहे. अत्यंत बारकाईने कलाकुसर केलेल्या नाजुक शोभिवंत वस्तूपासून ते बंदुकीच्या गोळ्यांनासुध्दा दाद न देणाऱ्या बुलेटप्रूफ कांचेपर्यंत आणि ग्लासफायबरसारख्या बारिक तंतूपासून ते विकिरणांना प्रतिरोध करणाऱ्या जड लेडग्लासपर्यंत सारे कांही कांचेचे सामान ही कंपनी तयार करते. बाहेरून दिसणारा त्या इमारतीचा आकार आणि जेथपर्यंत आम्हाला नेले गेले तिथून दिसणारा अंतर्भाग पाहता या कारखान्याच्या अवाढव्य पसाऱ्याचा अंदाज आला.

कांचेपासून वस्तू कशा प्रकारे निर्माण करतात याचे प्रात्यक्षिक दाखवणारा एक कार्यक्रम दिवसभर चाललेला असतो. आमच्या आधी तेथे पोचलेली पर्यटकांची तुकडी बाहेर निघताच आम्ही त्या खास सभागृहात प्रवेश केला. तिथेच ठेवलेल्या एका छोट्याशा भट्टीमधून एका कुशल कारागीराने रसरसत्या कांचेचा एक छोटासा गोळा बाहेर काढला, त्यात जोराने फुंकर मारून त्याला चांगले फुलवले आणि विविध हत्यारांच्या सहाय्याने त्याला वेगवेगळे आकार दिले, त्या गोळ्याला निरनिराळ्या रंगांच्या भुकटीत लोळवून त्याला वेगवेगळ्या छटा दिल्या आणि बोलता बोलता त्यातून एक सुरेख फ्लॉवरपॉट तयार करून दाखवला. माझे सारे सहप्रवासी अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन त्याचे कसब पहात राहिले. तांत्रिक दृष्टीने पाहता मला त्यात कांही नवीन गोष्ट दिसली नसली तरी त्या कलाकाराचे कौशल्य मात्र निश्चितपणे वाखाणण्याजोगे होते.

वीस पंचवीस मिनिटांचे हे प्रात्यक्षिक पाहून झाल्यानंतर आम्ही त्या जागी असलेले प्रदर्शन पाहिले. ऐतिहासिक काळापासून अद्ययावत जमान्यापर्यंत वेगवेगळी तंत्रे वापरून तयार केलेल्या असंख्य वस्तू त्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडून ठेवल्या होत्या. जवळजवळ साडेतीन हजार वर्षांपासून माणूस कांच बनवत आला आहे हे मला माहीत नव्हते. संपूर्णपणे कांचेपासून तयार केलेला एक राजमहाल आणि एक नौका या वस्तू मला फार आवडल्या. याशिवाय अनेक प्रकारचे पेले, सुरया, तबके वगैरे नक्षीदार वस्तू होत्याच.

कॉर्निंग ग्लास सेंटर पाहून झाल्यानंतर आम्ही पुढला प्रवास सुरू केला आणि वॉशिंग्टन डीसीच्या जवळपास कुठेशी रात्रीच्या मुक्कामाला जाऊन पोचलो. अमेरिकन बर्गर किंवा सँडविचेस वगैरे खाण्यापेक्षा चिनी भोजन खाणे बरे वाटले आणि मिळालेसुध्दा. आदल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी करायच्या नास्त्याची बेगमी करून घेतली आणि हॉटेलातल्या उबदार अंथरुणावर अंग टाकले.
--------------------------------------

Sunday, October 04, 2009

ऑक्टोबर १, २, ३

मागच्या आठवड्याची सुरुवात दस-याने झाली. त्या दिवशी मराठी लोकांनी शिलंगणाचे सोने लुटले, गुजराथी बांधवांनी रासगरब्याने रंगलेल्या नवरात्रोत्सवाची आणि बंगाली बाबूंनी त्यांच्या सर्वव्यापी दुर्गापूजेची सांगता केली आणि उत्तर भारतीयांनी रावणदहन करून रामलीला संपवली. अशा रीतीने ''दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा' अशा दिमाखात तो भारतभर साजरा झाला. त्यानंतर दोनच दिवस सोडून ऑक्टोबर महिना सुरू झाला. त्यातले ओळीने पहिले तीन्ही दिवस वैशिष्ट्यपूर्ण होते.
१ ऑक्टोबरला चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांतीचा साठावा वाढदिवस भव्य संचलनाने दणक्यात साजरा करण्यात आला. लेनिनच्या कम्यूनिस्ट पक्षाने सोव्हिएट युनियनमध्ये सत्ता काबीज करून वीस पंचवीस वर्षात त्या देशाला जगातली एक महासत्ता बनवण्याइतकी घोडदौड केली होती. १९४९ साली माओझेदुंगच्या (पूर्वीचा उच्चार माओत्सेतुंग) नेतृत्वाखाली त्या पक्षाने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि प्रचंड आकाराच्या चीनचा ताबा घेतल्यानंतर या आंतरराष्ट्रीय साम्यवादाचा विस्तार आणखी किती होणार अशी काळजी लोकशाही आणि भांडवलशाहीचा पुरस्कार करणा-या राष्ट्रांना पडली आणि जगातील या दोन गटांमध्ये शीतयुध्द सुरू झाले. दीर्घकाळपर्यंत ते चाललेच होते. कालांतराने सोव्हिएट युनियनलाच उतरती कळा लागून त्याच्या अधिपत्याखाली असलेले पूर्व युरोपातले देश मुक्त झाले आणि खुद्द त्याचीच पंधरा सोळा शकले झाली. चीनमधील साम्यवादी पक्षाने आपली मजबूत पकड धरून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर त्याची प्रगतीपथावर घोडदौड चालूच आहे. मात्र त्याने आपल्या देशाच्या धोरणात आमूलाग्र बदल केले. शत्रू क्रमांक एक असलेली अमेरिका आता त्याची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. परदेशी लोकांना कम्युनिस्ट चीनने पूर्वी बाहेरचा रस्ता दाखवला होता, आता कांही मोठ्या शहरात त्यांना ऑफीसे थाटून व्यवसाय करायला परवानगी दिली आहे. माओने सत्तेवर आल्याआल्या देशातल्या सर्व संपत्तीचे सरकारीकरण केले होते, त्यात बदल करून लोकांना खाजगी संपत्ती गोळा करायला मुभा मिळाली आहे. सगळ्याच बाबतीत साधेपणाची जागा भव्यतेचे प्रदर्शन घेऊ लागले आहे. माओच्या काळातला साम्यवाद शिल्लक राहिलेला नाही. बांबूच्या पडद्याआड चिनी जनता कशी रहात आहे हे स्पष्ट दिसत नसले तरी बेजिंग ऑलिंपिकसारख्या महोत्सवातून तिचे जेवढे दर्शन दिसते त्यावरून ती एकंदरीत खुषहाल असावी असेच वाटते. जागतिक पातळीवर चीनचे महत्व वाढत जाणार असेच दिसत आहे. भारतावर चीनने केलेल्या आक्रमणात काबीज केलेली भूमी अजून त्याच्याच ताब्यात आहे. त्या युध्दात जवानांना वीरगती प्राप्त झाली त्याची जखम भरून येण्यासारखी नाही. त्यामुळे चीनच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करावे असे भारतीय मनाला वाटणार नाही. चीनमधील सामान्य नागरिकांना भारताबद्दल काय वाटते ते समजायला मार्ग नाही, पण युरोपअमेरिकेत जेंव्हा चिनी लोक भेटले तेंव्हा त्यांच्या वागणुकीत मला तरी वैरभाव दिसला नाही किंवा त्यांच्याबद्दल वाटलाही नाही.
२ ऑक्टोबरला बापूजींची जयंती येते. महात्मा गांधी, त्यांनी सुरू केलेली अहिंसक चळवळ आणि भारताला मिळालेले स्वातंत्र्य यांबद्दल चाललेली उलटसुलट चर्चा मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो आहे आणि ती अजून संपलेली नाही. त्याबद्दल आणखी कांही लिहिण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. बापूजींचे जीवन आणि त्यांनी केलेला उपदेश याचे मला जेवढे आकलन झाले त्यावरून पहाता व्यक्ती आणि समाज या दोन्हीची उन्नती व्हावी याबद्दल त्यांना मनापासून तळमळ होती असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ हा त्याचा एक भाग होता. तो बाजूला ठेवला तरी जगातल्या सर्वच माणसांनी नेहमी सत्याची आस धरावी, निर्भय बनावे, स्वावलंबी व्हावे, दुस-याला पीडा होईल असे कांही करू नये वगैरेसाठी त्यांनी जे अथक प्रयत्न केले, उच्चनीच हा भेदभाव मिटावा यासाठी स्वतःच्या वर्तणुकीतून उदाहरणे घालून दिली, अत्यंत साधी रहाणी ठेवली या सगळ्या गोष्टींपुढे नतमस्तक व्हावेच लागते. शस्त्रसज्ज इंग्रजांचा मुकाबला अहिंसक मार्गाने करून त्यासाठी स्वतःच्या जीवितवित्ताची हानी करून घ्यायला हजारोंनी नागरिक फक्त त्यांच्या सांगण्यामुळे कसे तयार झाले यावरच पुढील अनेक पिढ्या आश्चर्य करत राहतील. आता दरवर्षी २ ऑक्टोबरला सार्वजनिक सुटी देऊन काय साध्य होते ते मात्र मला समजत नाही. पूर्वीच्या काळात त्या निमित्याने जे कांही कार्यक्रम होत असत त्यामुळे समाजाचे प्रबोधन होत असेल, सध्या तरी तसे कांही दिसून येत नाही. ज्या काळात इंग्लंडमधील गिरण्यांमधून कापड आयात होत असे, त्या काळात चरख्यावर सूत कातून ते हातमागावर विणणे हा स्वावलंबनाचा एक मार्ग होता, तसेच त्याचा थोडा परिणाम इंग्लंडमधल्या गिरण्यांवर होत असेल. त्या गिरण्याच कधीच्या बंद पडल्या असून आता भारतातूनच तिकडे मोठ्या प्रमाणावर कपड्याची निर्यात होत आहे. त्यामुळे सूतकताईचे औचित्य शिल्लक राहिलेले नाही. २ ऑक्टोबरला योणारी गांधीजयंती कशा रीतीने साजरी करायची यावर फेरविचार केला पाहिजे.
३ ऑक्टोबरला म्हणजे काल कोजागरी पौर्णिमा होती. आश्विन महिना येईपर्यंत पावसाळा संपलेला असतो, आभाळ स्वच्छ झालेले असते आणि शरदाच्या पिठुर चांदण्यात उघड्यावर जमून गाणीबिणी म्हणायची, गप्पागोष्टी करायच्या आणि आटवलेल्या दुधाचा आस्वाद घ्यायचा अशी रीत होती. अशा कितीतरी कोजागिरीच्या मधुर रात्री माझ्या आठवणीत आहेत. ही पध्दत अजूनही कांही ठिकाणी आहे, पण आमच्या आसपास कुठे असा मेळावा हल्ली होतांना दिसत नाही. आम्ही आपले घरच्या घरी बसूनच केशरी दुधाचे प्राशन करतो. काल रात्री तर आभाळ काळ्या ढगांनी आच्छादलेले होते आणि चक्क पाऊस पडला. चंद्रदर्शन झालेच नाही. चांदण्यातून उतरत एक देवता जमीनीवर येऊन कोजागर्ती (कोण जागे आहे) असे विचारते आणि जे जागृत असतील त्यांच्यावर प्रसन्न होते अशी आख्यायिका आहे. आता एरवीसुध्दा रात्री विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात चांदणे दिसतही नाही. काल तर ते पडलेच नव्हते.