Monday, September 23, 2013

गणेशोत्सवातली उणीव

प्रमोदचं लहानपण एका लहान गावातल्या मोठ्या कुटुंबात गेलं होतं. दरवर्षी गणेशचतुर्थीला त्यांच्या घरी गणपतीची स्थापना होत असे आणि त्याचा उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जात असे. कळायला लागल्यापासूनच प्रमोदही त्यात हौसेने सहभाग घ्यायला लागला. गणपतीच्या मूर्तीला वाजत गाजत घरी आणण्यापासून ते त्याचे मिरवत नेत विसर्जन करण्यापर्यंतच्या सर्व काळात त्याच्या मखराची सजावट, पूजा, आरती, भजन, कीर्तन, नैवेद्य, प्रसाद वगैरे सगळ्या गोष्टींकडे तो लक्ष देऊन पहात असे आणि शक्य तितके काम अंगावर घेऊन ते उत्साहाने आणि मनापासून करत असे. स्वतःच्या प्रत्यक्ष सहभागामधून या उत्सवाची इत्थंभूत माहिती त्याने लहानपणीच करून घेतली होती. 

शिक्षण पूर्ण करून प्रमोद नोकरीला लागला, त्याने लग्न करून बि-हाड थाटले आणि तो दरवर्षी आपल्या नव्या घरात गणपती बसवायला लागला. त्याची पत्नी प्रमिलाही त्याच्याइतकीच किंबहुना त्याच्यापेक्षाही कांकणभर जास्तच उत्साही होती. दरवर्षी गणेशचतुर्थीच्या आठ दहा दिवस आधीपासूनच दोघे मिळून प्रचंड उत्साहाने तयारीला लागत असत आणि सगळे काही व्यवस्थित आणि उत्तम प्रकारे होईल याची संपूर्ण काळजी घेत. यथाकाल त्यांच्या संसारात मुलांचे आगमन झाले आणि जसजशी ती मोठी होत गेली तशी तीसुध्दा आईवडिलांना हातभार लावण्याच्या उद्देशाने त्यांच्या कामात गोड लुडबूड करायला लागली. दरवर्षीचा गणेशोत्सव आधीच्या वर्षीपेक्षा अधिक चांगला कसा करायचा याचा प्रयत्न ते दोघे करत असत. त्या उत्सवाच्या काळात ते सगळ्या आप्तेष्टांना अगत्याने त्यांच्या घरी बोलावत असत आणि दोघांचेही मित्रमैत्रिणी, शेजारीपाजारी, नातेवाईक वगैरे त्यांच्याकडे  येऊन जात, दोन घटका गप्पा मारत, चांगले चुंगले जिन्नस खात त्यांचे तसेच गणपतीच्या सजावटीचे कौतुक करत, आरत्यांमध्ये भाग घेत. एकंदरीत ते काही दिवस त्यांच्या घरात खूप धामधूम, धमाल चालत असे. सगळ्यांनाच याची इतकी सवय होऊन गेली की "आमच्याकडे गणपतीच्या दर्शनाला या" म्हणून मुद्दाम सर्वांना सांगायचीही गरज वाटेनासे झाले. उत्सव सुरू झाला की बोलावणे मिळाले नसले तरीही नेहमीचे लोक आपणहून येऊ लागले. गणेशोत्सवाचे एक बरे असते, ते म्हणजे कोणालाही येऊन जाण्यासाठी तारीख वार वेळ वगैरे ठरवावे लागत नाही. ज्याला जेंव्हा जेवढा वेळ मिळेल तेंव्हा तो डोकावून जातो आणि त्याचे त्यावेळी हसतमुखाने स्वागतच केले जाते.

अशी पंधरा वीस वर्षे गेली. प्रमोद आणि प्रमिला हे दोघेही आपापल्या क्षेत्रात प्रगतीपथावर होते, त्यांची मुले मोठी होत होती आणि कामाला मदत करू लागली होती. दरवर्षी येणारा गणेशोत्सवसुध्दा पहिल्याइतक्याच उत्साहात साजरा होत होता. पण एकदा गणेशोत्सव अगदी तोंडावर आलेला असतांना प्रमिलाला कसलेसे गंभीर आजारपण आले आणि काही दिवसांसाठी बेडरेस्ट घेणे आवश्यक झाले. तिची प्रकृती तशी काळजी करण्यासारखी नव्हती, तिच्यात हळूहळू सुधारणा होत होती, पण तिला घरातसुध्दा ऊठबस करायला आणि इकडे तिकडे फिरायला डॉक्टरांनी बंदी घातली होती. तिने लवकर बरे होण्यासाठी ती बंधने पाळणे आवश्यक होते. अर्थातच प्रमोदने ऑफिसातून रजा घेतली आणि पूर्णवेळ तो घरी राहू लागला. मुलेही आता मोठी झाली होती आणि त्याला लागेल ती मदत करत होती.

कुठलेही काम योजनापूर्वक आणि सगळ्या गोष्टी तपशीलवार ध्यानात घेऊन मन लावून करणे हा प्रमोदचा स्वभावच होता. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी त्याने त्यासाठी लागणा-या एकूण एक वस्तूंची यादी तयार केली. दुर्वा, शेंदूर, बुक्का आणि अष्टगंध वगैरे पूजाद्रव्यांपासून ते किती प्रकारचे मोदक आणायचे इथपर्यंत सगळे लिहून काढले, ती यादी प्रमिलाला वाचून दाखवली, त्यात आणखी कशाकशाची भर घालायची ते विचारून घेतले आणि ते सगळे सामान बाजारातून घरी आणून ठेवले. दोन दिवस बसून सुंदर मखर तयार केले, त्याला रंगीबेरंगी विजेच्या माळांनी सजवले, दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले. घरी येणा-या पाहुण्यांना देण्यासाठी तीन चार प्रकारच्या मिठाया आणि तीन चार प्रकारचे टिकाऊ तिखटमिठाचे पदार्थ आणून ते डब्यांमध्ये भरून ठेवले. त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या त्या डब्यांवर चिकटवून ठेवल्या. दोन तीन प्रकारच्या थंड पेयांच्या मोठ्या बाटल्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या. पेपर डिशेस आणि प्लॅस्टिकच्या ग्लासेसची पॅकेट्स आणून जवळच ठेवली. पहिल्या दिवसाच्या पूजेसाठी भरपूर फुले आणली आणि रोज फुलांचे दोन ताजे हार आणून देण्याची ऑर्डर फूलवाल्याला देऊन ठेवली.

गणेशचतुर्थीचा दिवस उजाडण्याच्या आधीच प्रमोदने अशी सगळी तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी त्याने दरवर्षाप्रमाणेच गणपतीची स्थापना करून त्याची पूजा अर्चा केली. आंब्याचे, खव्याचे आणि तळलेले मोदक, इतर मिठाया, सफरचंद, केळी, चिकू वगैरे निरनिराळी फळे या सर्वांचा महानैवेद्य दाखवला. जवळ राहणारे शेजारीपाजारी झांजांचा आवाज ऐकून आले होते त्यांना प्लेटमध्ये प्रसाद दिला. उत्सवाची सुरुवात तर नेहमीप्रमाणे अगदी व्यवस्थित झाली. एरवी त्याला रोज सकाळी नोकरीवर जाण्याची घाई असायची. यापूर्वीच्या वर्षापर्यंत घाईघाईत गणपतीला हार घालून आणि दिवा व उदबत्ती ओवाळून तो ऑफिसची बस पकडायला जात असे. या वर्षी तो दिवसभर घरीच असल्यामुळे रोज सकाळी गणपतीची साग्रसंगीत पूजा करत होता, अथर्वशीर्षाची आवर्तने करत होता, स्तोत्रसंग्रह, समग्र चातुर्मास यासारख्या पुस्तकांमधून वेगवेगळी स्तोत्रे शोधून काढून ती वाचत होता. निरनिराळ्या आरत्या म्हणत होता. "सर्वांना सुखी ठेव", विशेषतः "प्रमिलाला लवकर पूर्णपणे बरे वाटू दे" यासाठी रोज प्रार्थना करत होता.

गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जो कोणी येईल त्याचे स्वागत करणे, त्याच्याशी चार शब्द बोलणे, त्याला प्लेटमध्ये प्रसाद भरून देणे वगैरे सगळे मुलांच्या सहाय्याने तो व्यवस्थितपणे सांभाळत होता. यापूर्वी दरवर्षी हे काम प्रमिला करायची. फराळाचे सगळे डबे असे खाली मांडून ठेवणे तिला पसंत नसल्यामुळे ती एक एक डबा खाली काढून त्यात काय आहे हे पाहून प्लेट भरायची आणि खाली काढलेले डबे उचलून ठेवायला प्रमोदला सांगायची. ते करतांना तो हमखास इकडचा डबा तिकडे आणि तिकडचा तिसरीकडे वगैरे करायचा आणि त्यामुळे पुन्हा कोणासाठी प्लेट भरतांना प्रमिलाला जास्त शोधाशोध करावी लागायची. यात वेळ जात असे. शिवाय कोणी बेसनाचा लाडू खात नसला तर "खरंच तुला लाडू आवडत नाही का? थांब तुझ्यासाठी काजूकटली आणते." असे म्हणून प्रमिला आत जायची आणि "काजूकटली कुठे ठेवली गेली कुणास ठाऊक, हा पेढा घे." असे म्हणत बाहेर यायची. कधी एकादीला उपास असला तर "तुझ्यासाठी मी बटाट्याचा चिवडा आणायचा अगदी ठरवला होता गं, पण आयत्या वेळी लक्षातून राहून गेलं बघ." असे म्हणत तिच्या प्लेटमध्ये एक केळं आणून ठेवायची. पण या वर्षी असे काही होत नव्हते. जवळच्या लोकांच्या आवडीनिवडी प्रमोदला चांगल्या ठाऊक झाल्या होत्या. त्याच्या घरी आलेले लोक गणपतीचे दर्शन घेऊन, त्याला हळदकुंकू, फुले, दुर्वा वाहून नमस्कार करून आणि आरास पाहून खुर्चीवर येऊन बसेपर्यंत त्यांच्या आवडीच्या पदार्थांनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर येत होती.

प्रमोदचे मित्र त्याच्याशी आरामात गप्पा मारत बसत, त्याच्या ऑफिसातले सहकारी तर जास्त वेळ बसून त्याच्या गैरहजेरीत ऑपिसात काय काय चालले आहे याची सविस्तर चर्चा करत. जाण्यापूर्वी प्रमिलाची चोकशी करून तिला "गेट वेल सून" म्हणून जात. प्रमिलाच्या मैत्रिणी प्लेट घेऊन आतल्या खोलीत जात आणि तिच्याशी गप्पागोष्टी करत बसत. बहुतेक वेळी त्या अशा होत असत.
"अगं तुला काय सांगू? मी अशी बिछान्यावर पडलेली, आता कसला गणपती आणि कसचं काय? देवा रे, मला माफ कर रे बाबा."
"खरंच गं, मुख्य तूच नाहीस तर मग यात काय उरलंय्? तुझी सारखी किती धावपळ चाललेली असायची ते मला माहीत आहे ना."
"अगं, एक सेकंद श्वास घ्यायला पण फुरसत मिळायची नाही बघ. या वर्षी काय? जे काही चाललंय तसं चाललंय्" .... वगैरे वगैरे
शेजारच्या खोलीत चाललेला हा संवाद प्रमोदच्या कानावर पडायचा पण त्याला त्याचा अर्थ समजत नव्हता.
"मी काही विसरतोय का? माझ्याकडून गणपतीचं काही करण्यात राहून जातंय का?" असं त्यानं प्रमिलाला विचारून पाहिलं. त्यावर "मी कुठं असं म्हणतेय्?" असं म्हणून ती त्याला उडवून लावायची आणि आणखी एकादी मैत्रिण आली की पुन्हा तेच तुणतुणं सुरू करायची. त्यामुळे "या वर्षीच्या उत्सवात कोणती उणीव राहिली?" या प्रश्नाचा भुंगा प्रमोदच्या डोक्यात भुणभुणत राहिला.

त्या वर्षातला गणपतीचा उत्सव संपला, पुढे प्रमिलाही पूर्ण बरी होऊन हिंडूफिरू लागली, त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित रुळावर आली. वर्षभराने पुन्हा गणेशचतुर्थी आली. पूर्वीप्रमाणेच दोघांनी मिळून सगळी खरेदी, सजावट वगैरे केली. गणपतीच्या मूर्तीची स्थापना, पूजा आरती वगैरे झाले. प्रमिला नेमके काय काय करते आहे यावर मात्र या वेळी प्रमोद अगदी बारीक लक्ष ठेवून पहात होता. दुपारचा चहा होऊन गेल्यानंतर काही वेळाने प्रमिलाच्या दोन तीन मैत्रिणी आल्या आणि तिच्या खोलीत त्यांची मैफिल जमली. प्रमिलानं तिच्या कपाटातल्या सगळ्या साड्या काढून पलंगावर ठेवल्या आणि त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या. त्यातली एक चांगली दिसणारी साडी हातात घेऊन प्रमिलानं विचारलं, "आज संध्याकाळी मी ही साडी नेसू का?"
"कुठे बाहेर जाणार आहेस का?"
"छेः गं, आज ही कसली बाहेर जातेय्? आता हिच्याच घरी सगळे लोक येतील ना?"
"हो, म्हणून तर जरा नीट दिसायला नको का?"
"ही साडी तशी ठीक आहे, पण जरा जुन्या फॅशनची वाटते ना?" 
"मग तर छानच आहे, लोकांना एथ्निक वाटेल."
"इतकी काही ही जुनीही नाहीय् हां. पण ठीक आहे, ही बघ कशी वाटतेय्?"
"अगं मागच्या महिन्यात त्या सुलीच्या घरी फंक्शनला तू हीच साडी नेसली होतीस. ही नको, ती बघ छान आहे."
"पण महिला मंडळाच्या मागच्या मीटिंगला मी ही साडी नेसले होते, आज त्यातल्या कोणी आल्या तर त्या काय म्हणतील?"
"हो ना? हिच्याकडे एकच साडी आहे की काय? असंच म्हणायच्या, महाखंवचट असतात त्या."
या चर्चा चालल्या असतांना बाहेर ताईमावशी आल्याची वर्दी येते.
"त्यांना पाच मिनिटं बसायला सांगा हं, मी आलेच." असे प्रमोदला सांगून प्रमिला एक साडी निवडते, ती परिधान करते आणि पंधरा वीस मिनिटांनी बाहेर येते. ताईमावशी तिच्याच दूरच्या नात्यातल्या असतात. त्यांच्याशी काय बोलावे हे प्रमोदला समजत नाही. महागाई, गर्दी, आवाज प्रदूषण, ताज्या बातम्या वगैरेंवर काही तरी बोलत तो कसाबसा वेळ काढून नेतो.
ताईमावशी थोडा वेळ बसून बोलून गेल्यानंतर प्रमिला पुन्हा आत जाते. मैत्रिणी तिची वाट पहातच असतात.
"ही साडीसुध्दा नेसल्यावर छान दिसते आहे हं, पण बाकीच्याचं काय?" मग प्रमिला कपाटातले ख-या खोट्या दागिन्यांचे सगळे बॉक्स बाहेर काढते. त्यातला एक एक उघडून "अय्या कित्ती छान?", "कुठून घेतलास गं?" "केवढ्याला पडला?" वगैरे त्या अलंकारांचं साग्रसंगीत रसग्रहण सुरू होते. त्याला फाटा देत "यातलं मी आज काय काय घालू?" असे म्हणत प्रमिला मुद्द्याला हात घालते.
त्यावर मग "हे छान दिसेल.", "नाही गं, या साडीला हे इतकं सूट नाही होत, त्यापेक्षा हे बघ.", "तुझ्या हॉलमधल्या लाइटिंगमध्ये हे फँटास्टिक दिसेल बघ." वगैरे चर्चा सुरू असतांना बाहेर आणखी कोणी येतात.
"हे लोक सुध्दा ना, एक मिनिट निवांतपणे बसून काही करू देणार नाहीत" असे काही तरी पुटपुटत ती त्यातला एक सेट गळ्यात, कानात, हातात वगैरे चढवून बाहेर यायला निघते.   
"अगं, अशीच बाहेर जाणार? जरा आरशात तोंड बघ, घामानं किती डबडबलंय?"
मग प्रमिला घाईघाईत तोंडावरून हात फिरवते, मुखडा, केस वगैरे थोडे नीटनीटके करून बाहेर येते. तोपर्यंत आलेली मंडळी तिची वाट पाहून "आम्हाला आज आणखी एकांकडे जायचे आहे" असे सांगून निघून गेलेली असतात. ती फणफणत पुन्हा आत जाते. जरा साग्रसंगीत तयार होऊन बाहेर येते. त्यानंतर आलेल्या मंडळींना हसतमुखाने सामोरी जाते, त्यांची चांगली विचारपूस, आदरातिथ्य वगैरे करून दमून जाते. शिवाय पलंगावर पडलेला तिच्या साड्यांचा ढीग तिची वाट पहात असतो. त्याला एका हाताने बाजूला सारून आणि अंगाचं मुटकुळं करून उरलेल्या जागेत पडल्या पडल्या ती झोपी जाते.

हे सगळं पाहून झाल्यावर प्रमोदच्या डोक्यातला भुणभुण करणारा भुंगा मात्र शांत होतो. "मागल्या वर्षीच्या गणेशोत्सवात प्रमिलाला कोणती उणीव भासत होती? ती काय मिस् करत होती?" या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले होते.

Wednesday, September 18, 2013

अनंतचतुर्दशी

'अनंत' या शब्दाने माझा लहानपणापासून पिच्छा पुरवला आहे. साठसत्तर वर्षांपूर्वी हे नाव खूपच प्रचलित असायचे. अनंतराव, अंतूशेठ, अनंता, अंत्या वगैरे नावांनी ओळखली जाणारी निदान शंभर तरी लहानमोठी मुलेमाणसे आमच्या गावात होती आणि त्यातली चारपाच तरी आमच्या अगदी जवळची आणि नेहमी आमच्या घरी येणारी होती. 'आनंद' हे नाव धारण करणारी मोठी माणसे नव्हतीच आणि मुलेसुध्दा त्या मानाने अगदी कमी होती. त्यामुळे कुठेही माझे नाव मी 'आनंद' असे सांगितले तरी ऐकणारा माणूस ते 'अनंत' असेच लिहून घेत असे आणि हे आजतागायत होत आले असल्याने मी केलेल्या खर्चासाठी मिळालेल्या शेकडो पावत्या 'अनंत' या नावाने फाडल्या गेल्या आहेत, या नावाने मला प्रवास करावा लागला आहे आणि या नावाने माझ्यासाठी उद्घोषणा (अनाउन्समेंट्स) झालेल्या ऐकून त्यांना प्रतिसाद दिला आहे. हळूहळू मलाही त्याचे काही वाटेनासे झाले आहे. पण सरकारदरबारी महत्व असलेल्या कागदपत्रांमध्ये मात्र माझे नाव चुकीचे लिहिले जाऊ नये यासाठी मला थोडी धडपड करावी लागली आणि ते तसे झाल्यानंतर त्या चुका दुरुस्त करून घेण्यासाठी हेलपाटे घालावे लागले आहेत.  मुंबईला आल्यानंतर मात्र 'अनंत' नावाची माणसे भेटणे कमी कमी होत गेले आणि मला भेटणा-या 'आनंदां'ची संख्या वाढत गेली, काही परमानंद, नित्यानंद आणि सदानंदही भेटले. नंतर त्यांची संख्याही कमी होत गेली आणि स्वानंद, आमोद वगैरे त्या नावाचे नवे अवतार येत गेले. सध्याच्या नव्या पिढीतले कोणतेच जोडपे त्यांच्या मुलाला 'अनंत' हे नाव आता ठेवत नसेल.

'अनंत' या नावाचा अर्थ खरे तर खूप मोठा आहे. 'ज्याला अंत नाही' असा तो होतो. अमित, अगणित, असंख्य, इन्फिनिटी यासारखी ही एक अचाट कल्पना आहे किंवा कल्पनातीत अशी संख्या आहे, त्याचा कालावधी कधीही न संपणारा इतका आहे. असे स्वरूप फक्त परमेश्वराचेच असू शकते. भगवान विष्णूच्या सहस्रनामांमधले हे एक प्रमुख नाव आहेच, पण नवनागस्तोत्राची सुरुवात अनंतं वासुकी शेषं अशी होते. केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम् (त्रिवेन्द्रम्) येथील पद्मनाभस्वामीचे मंदिर खूप मोठे आणि प्रसिध्द आहे. त्याला अनन्तपद्मनाभदॆवालयः असेही म्हणतात. त्यामधले अनंत हे नाव शेषाचे आहे की विष्णूचे आहे की त्या दोघांचे आहे असा संभ्रम पडतो. शेषशायी विष्णूची भव्य अशी आडवी मूर्ती या देवळात आहे. 

अनंतचतुर्दशी हा वर्षातला एक दिवसच अनंताच्या नावाने ओळखला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुध्द चतुर्थीला हे नाव दिलेले आहे. या दिवशी अनंतचतुर्दशीचे एक व्रत केले जात असे. त्या दिवशी शेषशायी विष्णूच्या प्रतिमेची आणि एका विशिष्ट दो-याची पूजा करून तो मंतरलेला दोरा मनगटावर गुंडाळायचा आणि पुढल्या वर्षी अनंतचतुर्दशीला पूजा करून तो बदलायचा असे चौदा वर्षे करायचे असे नियम होते. हे फार क़डक व्रत आहे आणि ते पाळले गेले नाही तर फार मोठे दुष्परिणाम होतात वगैरे भीतीपोटी सहसा कोणी ते व्रत करत नसत. असे मी लहानपणी ऐकले होते. आता तर या व्रताचा मागमूसही कुठे दिसत नाही.

पण दरवर्षी अनंतचतुर्दशी प्रचंड प्रमाणात गाजते ती मात्र गणपतीविसर्जनासाठी. त्याचा गाजावाजा, गोंगाट आणि धामधूम वाढतच आहे. गणेशचतुर्थीला प्रतिष्ठापना केलेल्या गणपतीच्या मूर्तीची दहा अकरा दिवस भक्तीभावाने पूजा केल्यानंतर अनंतचतुर्दशीच्या दिवशी तिचे समारंभपूर्वक पाण्यात विसर्जन केले जाते. घरांमध्ये बसवलेल्या गणपतींच्या उत्सवांचे दीड, तीन, पाच, सात वगैरे दिवस कालावधी असतात. वंशपरंपरेमधून ते चालत आलेले असतात. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यापासून त्यांचा कालावधी अनंतचतुर्दशीपर्यंत ठरवला गेला आणि त्याचे पालन होत राहिले आहे. ज्या मंडळांना इतके दिवस उत्सव करणे शक्य नसते ते आपल्या गणपतींचे विसर्जन आधी करून घेतात, पण बहुतेक सगळे प्रमुख गट मात्र त्यांच्या उत्सवमूर्तीचे अनंतचतुर्दशीच्या दिवशीच विसर्जन करतात. हा कार्यक्रम प्रचंड मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यात सामील होणा-यांची संख्याही अगणित असते.

नोकरीसाठी मी मुंबईला आल्यानंतर पहिली अनेक वर्षे माझे ऑफिस दक्षिण मुंबईत होते. अनंतचतुर्दशीच्या दिवशी बाहेर कुठेही मीटिंग किंवा व्हिजिटला जाण्याचा प्रश्नच नसायचा, आमच्या ऑफिसातली उपस्थितीही रोडावली असल्यामुळे त्या दिवशी महत्वाच्या बैठका ठेवल्या जात नसत. रस्त्यावरील तुडुंब वाहणारी गर्दी, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी वगैरेंचा विचार करून दोन तीन तास आधीच घरी जाण्याची परवानगी मिळत असे. त्यानंतर आम्ही तीनचार मित्र मिळून ठिकठिकाणच्या मिरवणुका पहात हिंडत असू आणि आमच्या ग्रुपमधल्या शेवटच्या मित्राला कंटाळा येईपर्यंत फिरून झाल्यानंतर आपापल्या निवासस्थानी परतत असू.  लहानमोठे असंख्य गणपती, त्यांचे देखावे वगैरेंमधून त्याची कोटीकोटी रूपे त्या काळात मला पहायला मिळाली. लग्न झाल्यानंतर  मात्र या तोबा गर्दीत सहकुटुंब जाणे आणि परतणे शक्य नसल्यामुळे आम्ही थोडा लहानसा फेरफटका मारून सुखरूप परतत होतो.

योजना प्रतिष्ठानशी आमचा संबंध आल्यानंतर दर वर्षी अनंतचतुर्दशीला एक वेगळा कार्यक्रम निश्चित झाला. परळच्या ऑव्हरब्रिजला लागूनच असलेल्या एका चाळीतल्या खोलीत या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी अनंतचतुर्दशीच्या दिवशी संगीत भजनाचा लहानसा घरगुती पण चांगल्या दर्जाचा कार्यक्रम केला जात असे आणि त्यात स्व.शिवानंद पाटील, योजनाताई आणि त्यांचे निवडक शिष्यगण भक्तीपूर्ण गायनसेवा सादर करीत असत. बाहेरील रस्त्यावरून जात असलेल्या मिरवणुकांमध्ये चाललेला ढोलताशांचा गजर आणि त्याच्यावर आवाज काढून बंदिस्त खोलीत केलेले ते गायन यात एक वेगळा रंग येत असे. संध्याकाळच्या सुमारास घरी परत येतांना आमची बस मुंगीच्या पावलाने चालत असे आणि उलट दिशेने समुद्राकडे जाणारे खूप गणपती पहायला मिळत असत.


आज अनंतचतुर्दशी आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इन्दौर वगैरे सर्वच प्रमुख शहरांमध्ये या विसर्जनांच्या भव्य मिरवणुकी निघायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंडळामधील गणपतीसोबत त्या भागातले किंवा त्याच्याशी संबंधित असलेले सगळे लोक त्या मिरवणुकींमध्ये सामील होतातच, शिवाय या मिरवणुकी पहायला ज्याला ज्याला शक्य असलेल तो त्या पहायला जातो. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभलेला असल्यामुळे गिरगाव, दादर, जुहू वगैरे अनेक ठिकाणी हे विसर्जन होते, पण त्यांच्या जागा ठरलेल्या आहेत. लालबागपासून दादर जवळ असले तरी लालबागचा राजा आणि त्या भागातले मोठे गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरच वाजत गाजत नेले जातात. टेलिव्हिजनवर या मिरवणुकींचे वृत्तांत दाखवले जात असल्याने घरात राहिलेले सगळेजण आता टीव्हीसमोर बसलेले आहेत. तेंव्हा मीसुध्दा हा लेख इथे आटोपता घेऊन आता तिकडे चाललो आहे.
गणपतीबाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या।।
-----------------------------------------

Monday, September 16, 2013

वक्रतुंड महाकायमी शाळेत असतांना वर्गातल्या बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे त्यांना थोडा घाबरत असे. त्यातल्या कोणाला "अरे वाकड्या तोंडाच्या" अशी हाक मी मारली असती तर त्याने माझा एक गाल सुजवून माझेच थोबाड वाकडे करून टाकले असते आणि कोणाला जर मी "ढबाल्या" म्हंटले असते तर त्याच्या गुबगुबीत हाताचा ठोसा मला खावा लागला असता. त्यामुळे असले काही धाडस करायची माझी हिंमत झाली नसती, पण आपले गणपतीबाप्पा कधी असे रागावत नाहीत. मला कळायलाही लागायच्या आधीपासून "वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।" हा त्यांचा श्लोक कानावर पडून मला तोंडपाठ झाला होता आणि मीसुध्दा इतर बडबडगीतांबरोबरच "वक्कतुंड म्हाकाय सुल्यकोटी समप्पब" असे काही तरी बडबडू लागलो होतो. त्या शब्दांच्या उच्चारणात हळूहळू सुधारणा होत गेली आणि मी ते व्यवस्थित म्हणू लागलो. तेंव्हापासून ते आजतागायत जगातल्या कुठल्याही ठिकाणच्या, अगदी इंग्लंड अमेरिकेतल्यासुध्दा, एकाद्या देवळात गणेशाची मूर्ती दिसली की त्याला हात जोडून नमस्कार करताच हा श्लोक माझ्या ओठावर येतो. मुंबईतल्या कुठल्याही रस्त्याने जात असतांना वाटेत गणेशोत्सवाचे मंडप लागतात आणि आत जाऊन मंगलमूर्तीचे दर्शन घेतांना हा श्लोकही म्हंटला जातो. असे गेल्या आठवड्यात रोज घडत आले आहे.

कोणत्या ऋषीमुनीने हा श्लोक लिहिला आहे हे काही मला ठाऊक नाही, पण गणपतीच्या सहस्रनामांमधले 'वक्रतुंड' हेच नाव त्यांना या श्लोकात घ्यावेसे का वाटले कोण जाणे, 'महाकाय' याचा अर्थ 'आडव्या अंगाचा' असा न घेता शक्तीशाली, सामर्थ्यवान असाही घेता येईल. या देवाचा मुखडा आणि शरीरयष्टी कशीही (कदाचित भयभीत करणारी) असली तरी त्याचे तेज कोटी सूर्यांइतके दिपवून टाकणारे आहे असे या श्लोकाच्या पहिल्या चरणात लिहिले आहे. पण त्या महाशक्तीला वंदन, नमन वगैरेसुध्दा न करता "निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा" म्हणजे "माझ्या सगळ्या कार्यांमध्ये येणारी विघ्ने सर्व वेळी दूर कर" अशी प्रार्थना किंवा मागणे या श्लोकाच्या पुढल्या ओळीत मांडले आहे. पहिल्या शब्दात त्याला नावे ठेवायची आणि पुढे लाडीगोडी लावून त्यालाच नेहमी आपली मदत करायला सांगायचे असे या श्लोकाचे स्वरूप दिसते. चांगली बुध्दी, स्वर्ग, मोक्ष, संपत्ती, शांती यातले काही न मागता आपल्या कामातले अडथळे तेवढे दूर करण्याची ही विनंती या श्लोकात आहे. देवाच्या कृपेने आपला मार्ग निर्विघ्न झाला की आपले काम आपल्या प्रयत्नानेच तडीला न्यायचे, आपले यश आपण मिळवायचे, ते आयते हातात पडायला नको असा एक चांगला विचार त्यात दिसतो.  

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नम् कुरुमे देव सर्वकार्येशु सर्वदा।।

या श्लोकाच्या पाठोपाठ म्हंटला जाणारा श्लोक आहे,
गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती । पंचैतैनि स्मरेन्नित्यम् आयुःकामार्थसिध्दये।।

आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले सगळे काही साध्य करून घेण्यासाठी गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती या पाचजणांचे स्मरण करावे असा या श्लोकाचा अर्थ आहे. यातला गणनाथ म्हणजेच गणपती हा सर्व गणांचा म्हणजे देवांच्या सर्व सेवकांचा प्रमुख आहे. सगळे काही करणे वा न करणे, करू देणे वा न देणे हे  त्याच्या हातात आहे. सरस्वती ही विद्या, कला वगैरेंची देवता आहे. रवी शुक्र आणि बृहस्पती हे नवग्रहांमधले प्रमुख ग्रह आहेत, त्यातला सूर्य अत्यंत तेजस्वी, प्रखर आणि जीवनाधार आहे. शुक्र आणि गुरू हे अनुक्रमे दैत्य आणि देवांचे गुरू होते. त्यांच्या सैन्यांना युध्दामधले सारे कौशल्य आणि डावपेच ते शिकवत असत. बृहस्पती हे अत्यंत बुध्दीमान आणि विद्वान तर शुक्राचार्य हे अत्यंत धोरणी समजले जात असत. पुराणातल्या सर्व लढायांमध्ये शेवटी देवांचाच विजय होत असला तरी पराभवाने निष्प्रभ झालेल्या असुरांना शुक्राचार्य संजीवन देऊन पुन्हा बलिष्ट बनवण्याचे काम करत असत. सामर्थ्य, कलाकौशल्य, तेज, बुध्दीमत्ता, विद्वत्ता, चतुराई हे सगळे गुण अंगात बाणवले तर माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होणारच.  शुक्र आणि बृहस्पती यांना विकार आणि विवेक यांची प्रतीके असेही बहुधा मानता येईल. 'सगळे काही' मिळवायचे असल्यास या दोघांचीही मदत लागेलच, शिवाय शक्ती, युक्ती, कौशल्य वगैरेही पाहिजेत. 

 -------------------------------------
 • पंचैतैनि स्मरेन्नित्यम् " ----- ह्यानंतर " वेदवाणीप्रवृत्तये " असं मला का आठवते कोण जाणे  
  अशी प्रतिक्रिया एका सुविद्य भगिनीने फेसबुकावर दिली होती.

  यावर मी थोडेसे संशोधन करून खाली दिलेले स्पष्टीकरण देत आहे.
   माझ्या लेखनातली चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद. मी हा श्लोक फक्त आठवणीमधून लिहिला होता आणि मला वाटला तसा त्याचा अर्थ काढला होता. गूगलवरून शोध घेता असे दिसते की हा श्लोक गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् ।
  पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाण
  ी प्रवृत्तये ॥ असाच आहे. आयुष्कामार्थ सिध्दये हा भाग खालील श्लोकाचा आहे. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
  भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥Tuesday, September 10, 2013

गणपतीची आरती - २ - शेंदुर लाल चढायो

'सुखकर्ता दुखहर्ता' ही गणपतीची आरती आमच्या घरी रोज म्हंटली जात होतीच, गणेशोत्सवामध्ये त्याच्या जोडीला एक हिंदी आरती म्हंटली जात असे. राष्ट्रभाषेचा परिचय होत असतांना सुरुवातीच्या काळात त्या भाषेतल्या ज्या रचना मी म्हंटल्या असतील त्यातली ही एक होती. या आरतीची सुरुवात अशी होती,
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
श्रीगणेशाला लाल रंगाचा शेंदूर अंगभर लावलेला आहे, शंकरपार्वतीच्या या मुलाचे लंबोदर (विशाल पोट) त्यामुळे छान लालचुटुक दिसते आहे, त्याच्या हातात गुळाचा लाडू आहे, अशा या गजाननाचा महिमा साधुसंतांना आणि देवाधिकांनाही सांगता येणार नाही इतका महान आहे, मी त्याच्या पायावर लोटांगण घालतो आहे.

त्यानंतर ध्रुवपदात त्याचा जयजयकार केला आहे.
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
विद्या आणि सुख दोन्ही देणा-या गणगायाचा जयजयकार असो, तुमचे दर्शन घेऊन मी धन्य झालो, माझे मन त्यात रमून जाते.

दुस-या कडव्यात गणपतीचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकारी ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबिहारी ॥जय० ॥२॥
आठही सिध्दी याच्या दासी आहेत, त्याच्या आज्ञेनुसार त्या वागतात, हा संकटांचा वैरी आहे, त्यांचा नाश करतो, हा मांगल्याची मूर्ती आहे, कोटी सूर्यांइतका हा तेजस्वी आहे मदमस्त हत्त्तीच्या (त्याच्या) झुलत असलेल्या मस्तकावर चंद्रकोर आहे. अशा श्रीगणरायाचा जयजयकार.

या गजाननाची भक्ती करणा-याला कोणते लाभ मिळतात हे या आरतीच्या तिस-या कडव्यात सांगितले आहे.
भावभगतसे कोई शरणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥
जो कोणी भक्तीभावाने त्याला शरण जातो त्याला भरपूर संतती आणि संपत्ती मिळते, आजच्या जमान्यात खूप मुले होणे हे वरदान कोणाला परवडणारे नाही, पण तीनचारशे वर्षांपूर्वी जितकी जास्त वंशवृध्दी होईल तितके ते चांगले मानले जात असे. असे हे महाराज मला अत्यंत प्रिय आहेत म्हणून हा गोसाव्याचा मुलगा दिवसरात्र त्यांचे गुणगान करत असतो. श्रीगणरायाचा जयजयकार असो.

ही आरती हिंदी भाषेत असली तरी त्याची चाल आणि त्यातला भाव मराठी भाषेतल्या आरत्यांसारखाच वाटतो. माझ्या ओळखीतले सगळे हिंदी भाषिक जय जगदीश हरे या चालीवरच्या आरत्याच नेहमी गातात. 'शेंदूर लाल चढायो' ही आरती मी कधीच त्यांच्या तोंडी ऐकली नाही. 'गोसावीनंदन' या नावाविषयी मी थोडी माहिती गुगलून काढली. ती खाली दिली आहे, पण तो गाणपत्य होता एवढाच संदर्भ जुळतो. बाकीच्या माहितीचा या हिंदी आरतीशी कसलाच धागा जुळत नाही. त्यामुळे ही आरती लिहिणारा गोसावीनंदन कदाचित वेगळा असेल. त्याने ती कोणासाठी लिहिली याचा बोध होत नाही.

''गोसावीनंदन.- याचें नांव वासुदेव असून बापाचें नांव गोस्वामी (गोसावी) होतें. हा तंजावरकडील राहणारा असून याचे गुरु गोपाळश्रमगजानन नांवाचे होते. अर्वाचीनकोशकार याच्या गुरूंचें नांव निरंजनस्वामी असें देतात. याचा काल इ. स. १६५०-१७०० चा होय. याचा मुख्य ग्रंथ ज्ञानमोदक नावाचा असून शिवाय सीतास्वयंवर व अभंग, पदें वगैरे स्फुटकाव्य बरेंच आहे. यांचीं स्तोत्रें व अष्टकें लहान मुलांनां शिकतां येतील अशीं सोपीं व साधीं आहेत; हा गाणपत्य होता''
----------------------------------------

Monday, September 09, 2013

गणपतीची आरती - सुखकर्ता दुखहर्ता


माझ्या लहानपणी आमच्या गावातले सगळे रस्ते मातीचे होते, रस्त्यांच्या दोन्ही कडांना उघडी गटारे असायची, त्यांच्या बाजूला इतरही घाण केलेली किंवा टाकलेली असायची आणि काही गलिच्छ प्राणी त्यातून स्वैर हिंडत असायचे. रस्त्यातल्या विजेच्या खांबांवरचे दिवे कधी पेटलेच तरी अगदी मिणमिणता उजेड देत. त्यामुळे रात्रीच्या अंधारात त्या तसल्या रस्त्यांवरून फिरायला नकोसे वाटत असे. दिवेलागणी होईपर्यंत आम्ही सगळेजण आपण होऊनच घरी परतत होतो. त्यावेळी घरातला महिला वर्ग रात्रीच्या जेवणासाठी स्वयंपाकात गुंतलेला असायचा आणि आम्ही मुले घरी आल्यानंतर शुभंकरोती आणि परवचा म्हणून झाल्यावर श्लोक, गाणी वगैरे म्हणत बोलावण्याची वाट पहात असू. स्वैपाक पुरा होत आला की "दुपार्तीला या रे" अशी हाक यायची आणि घरातले सगळे जण देवासमोर येऊन उपस्थित होत असत. "या वेळच्या आरतीला 'दुपारती' असे का म्हणतात?" असे मी एकदा मोठ्या भावाला विचारले, तेंव्हा त्याने उत्तर दिले "अरे आपण दुपारी शाळेत असतो ना? म्हणून ती संध्याकाळी करतात." त्याचे खरे नाव 'धूप आरती' असे असते हे ज्ञान खूप उशीराने झाले. पण त्याने काही फरक पडला नाही, कारण आमच्या घरातल्या 'दुपारती'मध्ये सहसा धूप नसायचाच, ती निरांजन ओवाळूनच केली जात असे. दररोज करण्याच्या या आरतीत फक्त दोनच आरत्या म्हंटल्या जात. गणपतीची आरती दररोज म्हणायची आणि सोमवारी शंकराची, मंगळवार व शुक्रवारी देवीची, बुधवारी विठोबाची, गुरुवारी दत्ताची व शनिवारी मारुतीची आरती म्हणायची हा कार्यक्रम खंड न पाडता कित्येक वर्षे चालत आला होता.

संध्याकाळच्या वेळेला भुते, पिशाच्चे, दुष्टआत्मे वगैरे मोकळे हिंडत असतात आणि आरत्यांचे आवाज ऐकून ते घाबरून दूर पळून जातात असे सांगितले जात असे. त्यांना जास्तच घाबरवण्यासाठी आम्ही जोरजोरात झांजा वाजवून आणि तारस्वरात आरत्या म्हणत असू. आजकाल नावापुरते सायन्स शिकलेले काही लोक निगेटिव्ह व्हायब्रेशन्स, निगेटिव्ह एनर्जी वगैरे शब्द वापरतात, त्यांनाही कसली तरी अनामिक भीती वाटत असते. आरत्यांचा ध्वनीच प्रभावी समजला जात असल्यामुळे त्यातल्या शब्दांकडे कोणी लक्ष देत नसत. योग्य तो ध्वनि उत्पन्न करण्यासाठी फक्त त्यांचा उच्चार बरोबर यायला हवा, अर्थ समजून घेण्याचे काही कारण नसायचे. पण माझा स्वभाव थोडा चिकित्सक असल्यामुळे मला तो समजून घ्यावा असे वाटत असे. त्यातल्या कुठल्या शब्दांमुळे किंवा वाक्यांमुळे भुतांना घाबरायला होते याचे कुतूहलही वाटत होते. गणपतीची आरती रोजच कानावर पडत असल्यामुळे मला बोलायला लागण्याबरोबर ती आरती आपोआप पाठ झाली होती. या आरतीतले सगळे शब्द अगदी सोपे आहेत. तरीही आज गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याचा अर्थ समजून घेण्याचा थोडा प्रयत्न करू.

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।।
या पहिल्या ओळीतल्या पहिल्या दोन शब्दांचे अर्थ सुख करणारा (देणारा) आणि दुःखाचा नाश करणारा असे होतात, पण पुढे विघ्नाची वार्ता कशाला? त्याचे उत्तर पुढील ओळीत आहे.
नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।
म्हणजे विघ्नाची वार्ता नुरवी, तिला शिल्लक ठेवत नाही, शिवाय प्रेमाचा पुरवठा करते अशी ज्याची कृपा आहे. अशा त्या गणपतीचे वर्णन पुढील ओळींमध्ये आहे.
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।।
कंठी झळके माळ मुक्ता फळाची।।
त्याने सर्वांगाला शेंदुराची उटी लावली आहे आणि चमकदार मोत्याची माळ गळ्यात परिधान केली आहे. अशा त्या मंगलमूर्ती गणेशाचा जयजयकार ध्रुवपदात केला आहे.
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।।
दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।।
त्याचे फक्त दर्शन घेतल्यानेच मनातल्या कामना, इच्छा वगैरे पूर्ण होऊन जातात असे संत रामदासांनी म्हंटले आहे. 'दर्शनमात्रे'च्या जोडीला काही भक्त तर 'स्मरणमात्रे'च मनोकामना पूर्ण होतात असेही म्हणतात. पण ही जरा अतीशयोक्ती झाली कारण संपूर्ण समाधान मिळणे हे माणसाच्या स्वभावातच नाही. तो नेहमीच 'ये दिल माँगे मोअर' म्हणत राहतो. शिवाय दोन शत्रूपक्षातल्या किंवा स्पर्धक भक्तांनी एकाच वेळी परस्परविरोधी कामना मनात बाळगल्या तर त्या दोन्ही कशा पूर्ण होणार ?

या आरतीच्या दुस-या कडव्यात राजसी थाटाच्या गजाननाच्या ऐश्वर्याचे साग्रसंगीत वर्णन केले आहे. गणपतीचे पिताश्री शंकर महादेव अंगाला भस्म लावून अगदी साधेपणे रहात असतांना दाखवले जातात, तसेच त्याची आई पार्वतीसुध्दा माहेरच्या ऐश्वर्याचा त्याग करून कसलेही अलंकार न घालता वावरतांना पुराणात दिसते, पण त्यांचा पुत्र गणेश मात्र नेहमी राजसी थाटात असतो.
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा ।।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।
हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।।
पार्वतीच्या या पुत्राने रत्नखचित अलंकार परिधान केला आहे, त्याने सर्वांगाला लावलेल्या शेंदुराच्या उटीचा उल्लेख पहिल्या चरणात आलेला आहे, आता त्याच्या जोडीला सुगंधी चंदन आणि लालचुटुक कुंकुमाची भर पडली आहे. त्याच्या पायात रुणुझुणू वाजणा-या नूपुरांच्या (पैंजणांच्या) छोट्या छोट्या घाग-यांपासून ते मस्तकावर धारण केलेल्या हिरेजडित मुकुटापर्यंत हा गणपती सुंदर सजलेला आहे.

लंबोदर पितांबर फणिवर वंधना ।।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
तिस-या कडव्याच्या पहिल्या दोन ओळींमध्ये गणपतीचे वर्णन असे केले आहे, त्याचे उदर (पोट) मोठे आहे, त्यावर नागाला (पट्ट्यासारखे) बांधले आहे, पिवळ्या रंगाचे धोतर तो नेसला आहे, त्याची सोंड सरळ पण तोंड वाकडे आहे, त्याला तीन डोळे आहेत असे वर्णन या आरतीमध्ये केले आहे, पण गणपतीच्या कुठल्याच चित्रात मी त्याच्या कपाळावर तिसरा डोळा काढलेला पाहिला नाही.  
दास रामाचा वाट पाहे सदना ।।
संकटी पावावे सुरवर वंदना ।।
अशा वर दिलेल्या स्वरूपाच्या गजाननाची वाट रामाचा दास (रामदास) घरी बसून पहात आहे, या देवांनाही वंदनीय अशा देवाने संकटकाळात प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना संत रामदासांनी केली आहे. (आणि निर्वाणी रक्षावे, या निर्वाणीच्या क्षणी आपले रक्षण करावे, अशी पुस्ती भक्तांनी त्याला जोडून ही विनंती अधित स्पष्ट केली आहे).  काही लोक शेवटची ओळ ''संकष्टी पावावे'' असे म्हणून सगळा अर्थच बदलून टाकतात.

सुखकर्ता दुखहर्ता या आरतीची शब्दरचना अशी अगदी सोपी आहे, त्यात खूप गहन अर्थ भरला असेल असे मला तरी कधी जाणवले नाही. सर्वसाधारण जनतेला ती कळावी, पटावी म्हणजे ते या आरतीचा स्वीकार करतील असाच विचार त्यामागे असावा आणि तसा असल्यास तो कल्पनातीत प्रमाणात साध्य झाला आहे. तीनशेहे वर्षांनंतरही आज अक्षरशः कोट्यावधी लोक गणपतीची ही आरती म्हणतात आणि आज ती देशोदेशी पसरलेल्या मराठी माणसांच्या घरी म्हंटली जात आहे. या आरतीचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की गणपती, गणेश, गजानन, विनायक यासारख्या कुठल्याच प्रसिध्द नावाचा समावेश या आरतीच्या कुठल्याही कडव्यात नाही, तरीसुध्दा यातल्या एकंदर वर्णनावरून ही त्याच देवाची आरती आहे यात कोणाला शंका येत नाही.
--------------------------------------------------

या वर्षी परवाच्या शुक्रवार सकाळपर्यंत अलका हॉस्पिटलमधल्या अतिदक्षता विभागात (आय़सीयूमध्ये) झोपून होती. तिची प्रकृती काळजी करण्यासारखी नसली तरी नाजुकच होती. आता या वर्षी गणपती उत्सव कसा साजरा करायचा याची तिला चिंता वाटत होती. पण दोन दिवसात तिच्यात सुधारणा होऊन रविवारी डिस्चार्जही मिळाला. आणि आज गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापनाही करता आली. त्याचीच कृपा.

गणपती बाप्पा मोरया ।