गे ल्यूसॅक आणि जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांचा समवयस्क असलेल्या हम्फ्री डेव्ही यानेही रसायनशास्त्राच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात त्यात मोलाची भर टाकली. व्होल्टाने त्याच्या पाइलचा शोध लावल्यानंतर शास्त्रज्ञांना मिळालेल्या या नव्या साधनावर काम करणे हम्फ्रीने सुरू केले आणि अनेक पदार्थांमधून वीजेचा प्रवाह सोडून त्याचे रासायनिक तसेच भौतिक परिणाम पाहिले. त्याला विद्युत रसायनशास्त्रज्ञ आणि सुरक्षा दिव्याचा संशोधक म्हणूनही प्रसिद्धी मिळाली.
हम्फ्रीचा जन्म सन १७७८ मध्ये इंग्लंडच्या नैऋत्य टोकाला असलेल्या मागासलेल्या भागातल्या पेन्झन्स नावाच्या गावात झाला. त्या गावठी भागातल्या लोकांना ज्ञानविज्ञानाची आवड नव्हतीच. हम्फ्रीच्या घरातली परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने तो सहा वर्षांचा झाल्यानंतर डॉन टॉन्किन नावाच्या सद्गृहस्थाच्या आश्रयाला गेला आणि त्याने त्याचा सांभाळ केला. त्याच्याकडे राहून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो एका डॉक्टरकडे औषधे बनवून देणारा सहाय्यक म्हणून कामाला लागला. पण तो त्याशिवाय वाचनालयांमध्ये जाऊन अनेक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास करत होता आणि त्यातून ज्ञान मिळवत होता. तो टॉन्किन्सच्या गॅरेजमध्ये काही रसायनांवर प्रयोग करायला लागला. त्याचे असले भलती सलती रसायने आणून त्यांच्याशी खेळणे इतर लोकांना धोकादायक वाटत असे, पण हम्फ्रीने आपले प्रयोग करणे सुरूच ठेवले. त्याची अंगभूत हुशारी, चिकाटी, बोलण्यातली चतुराई आणि त्याने स्वकष्टाने मिळवलेल्या ज्ञान आणि अनुभव यांच्या आधाराने त्याला आधी ब्रिस्टल येथील न्यूमॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रीय संशोधनावर काम करण्याची नोकरी मिळाली.
न्यूमॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये असतांना त्याने अनेक प्रकारच्या वायूंवर निरनिराळे प्रयोग केले. प्रीस्टले, कॅव्हेंडिश यासारख्या शास्त्रज्ञांनी प्राणवायू, नायट्रस ऑक्साइड वगैरे वायू कृत्रिम रीत्या प्रयोगशाळेत तयार केले होते. तसेच ते स्वतः तयार करून त्यांचे गुणधर्म पहायचे संशोधन डेव्ही करत होता. त्यात त्याने अनेक धोके पत्करले. एकदा नायट्रिक ऑक्साइडने त्याचे तोंड भाजले होते, प्रयोग करतांना एका रसायनाचा स्फोट झाला होता आणि कार्बन मोनॉक्साइड या विषारी वायूचा श्वास घेऊन पाहतांना तर तो एकदा काही तास बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या जिवावर बेतले होते. अशा प्रकारची धोकादायक कामे करतांनासुद्धा तो डगमगला नाही. त्यानेच नायट्रस ऑक्साइड वायूच्या वासाने नशा चढतो आणि हसू येते हे पाहिले आणि त्या वायूला हास्यवायू (लाफिंग गॅस) असे नावही दिले.
वायूंवर संशोधन करत असतांनाच त्याचे लक्ष त्या काळात नव्याने पुढे आलेल्या वीज या विषयाकडे गेले. व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पाइलवर त्याने काम करायला सुरुवात केली आणि स्वतः त्या काळातली सर्वात मोठी बॅटरी तयार केली. त्या उपकरणातून निघालेल्या विजेच्या प्रवाहाने प्लॅटियम धातूच्या अत्यंत पातळ पट्टीला खूप तप्त केले आणि अशा प्रकारे विजेपासून कृत्रिम रीत्या प्रकाश निर्माण करण्याचा जगातला पहिला प्रयोग केला. पण त्या बॅटरीमधून निघणारा प्रवाह आणि ती पट्टी जास्त वेळ टिकू शकत नसल्यामुळे त्या प्रकाशाचा काही प्रत्यक्ष उपयोग नव्हता. पुढे डेव्हीनेच ग्राफाइटच्या इलेक्ट्रोडमधून विजेच्या ठिणग्या टाकून जगातला पहिला आर्क लाइटही तयार करून दाखवला. त्याचाही लगेच काही उपयोग करण्याची संधी नव्हती.
विजेचे रासायनिक परिणाम हे डेव्हीच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र होते. त्याने निरनिराळ्या रसायनांमधून विजेचा प्रवाह सोडून त्यांचे पृथक्करण केले आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरियम, क्लोरिन यांच्यासारखी महत्वाची मूलद्रव्ये त्यांच्या शुद्ध स्वरूपात सर्वात प्रथम उत्पन्न केली. या कामात मायकेल फॅरडे हा त्याचा प्रयोगशाळेतला सहाय्यक होता. फॅरडे हा माझा सर्वात मोठा शोध आहे असे एकदा डेव्ही म्हणाला होता. त्याचे ते बोल पुढे खरे झाले.
त्या काळातल्या खाणींमध्ये कधीकधी मीथेन वायू तयार होऊन साठून रहात असे आणि तिथे उतरणाऱ्या कामगारांनी उजेडासाठी नेलेल्या मशालीमुळे मीथेन व हवा यांच्या मिश्रणाला आग लागली तर त्याचा भडका उडत असे. सन १८१२ मध्ये झालेल्या अशा एका अपघातात ९२ कामगार दगावल्यामुळे खाणकामगारांमध्ये दहशत बसली होती. डेव्हीने त्यावर उपाय शोधण्याचे काम हातात घेतले आणि एक सुरक्षित दिवा तयार केला. त्याने त्यात दिव्याच्या ज्योतीच्या सर्व बाजूंना एक लोखंडाची जाळी बसवली होती. हवेबरोबर जाळीच्या आत गेलेल्या वायूमुळे तो दिवा भगभग करे आणि धोक्याची सूचना देत असे, पण ज्वलनातून निघालेली बरीचशी ऊष्णता जाळीमध्ये शोषली गेल्यामुळे त्याचे तापमान लगेच खूप वाढत नसे आणि त्यामुळे बाहेरचा वायू पेट घेत नसे.
डेव्हीने केलेल्या बहुमूल्य संशोधनाची त्या काळातल्या समाजाकडून आणि इंग्लंडच्या राजाकडूनही कदर केली गेली. सन १८१८ मध्ये हम्फ्री डेव्हीलाही सर फ्रान्सिस बेकन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याप्रमाणे सरदारपद दिले गेले आणि तो सर हम्फ्री डेव्ही झाला. सन १८१९ मध्ये त्याला प्रख्यात रॉयल सोसायटीचे अध्यक्षपदही मिळाले.
हम्फ्रीकडे चतुरस्र प्रतिभा होती. कोणी म्हणतात की तो शास्त्रज्ञ झाला नसता तर कवि झाला असता, तत्वज्ञ झाला असता किंवा फर्डा वक्ता झाला असता. प्रत्यक्षात तो हे सगळे झाला. त्याने विज्ञानामधले अनेक महत्वाचे शोध लावलेच, प्रख्यात कवि वर्डस्वर्थ याच्या कवितांची पुस्तके छापून आणण्यात मदत केली. त्याच्या लहानपणापासूनच त्याने स्वतःही कविता लिहिल्या होत्या आणि त्या प्रकाशितही झाल्या होत्या. आपल्या व्याख्यानांमध्ये शास्त्रीय माहिती देत असतांना तो मनोरंजक प्रात्यक्षिके दाखवत असे, त्याला तत्वज्ञानाची जोड देऊन आणि त्यात थोडा धार्मिक विचारांचाही अंश मिसळून तो आपल्या काव्यमय आणि बेजोड वक्तृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकत असे. त्याने इंग्लंडमध्ये अनेक व्याख्याने दिली आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
त्याच्या हुषारीची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्या काळात इंग्लंडचे शत्रूराष्ट्र असलेल्या फ्रान्समध्येही त्याचा सन १८१३ मध्ये गौरव करण्यात आला. त्यावेळी तो न घाबरता फ्रान्सला गेला आणि तिथे त्याने फ्रेंच शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर तिथून पुढे इटली, स्विट्झर्लँड, जर्मनी आदि देशांचा दीर्घकाळ दौरा करून त्याने तिथल्या प्रयोगशाळांमध्येही जाऊन तिथे संशोधन कार्य केले आणि जागतिक प्रसिद्धी मिळवली. अशा संशोधनामध्येच त्याने हिरा हे शुद्ध कार्बनचे एक रूप असल्याचे इटलीमधल्या फ्लॉरेन्स इथल्या मुक्कामात सिद्ध केले. सन १८२९ मध्ये तो स्विट्झर्लँडला फिरायला गेला असतांना तिथेच आजारी पडून त्याचा जिनिव्हा इथे दुःखद देहांत झाला.