Monday, August 26, 2013

दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून

सुमारे सात आठ वर्षांपासून मी आंतरजालावर (इंटरनेटवर) मराठी अक्षरे वाचायला आणि लिहायला लागलो आहे. या सगळ्या काळात एक ओरड आणि एक रड अधून मधून समोर येत आली आहे. "इंग्रजी आणि हिंदी भाषांकडून होत असलेल्या आक्रमणामुळे मराठी भाषा अधिकाधिक भ्रष्ट होत चालली आहे." अशी ओरड आणि "मराठी भाषा आता लुप्तच होत चालली आहे, तिला कोणी वाली उरला नाही." अशी रड सारखी नजरेसमोर येत राहते. "यात नवे किंवा जगावेगळे असे काही नाही, जगातल्या सगळ्या भाषांमध्ये काळानुसार बदल होतच आले आहेत, मराठी लिहिणा-या आणि वाचणा-यांची संख्या शिक्षणाच्या प्रसारामुळे वाढतच आहे, ग्रामीण लोकांचे बोलणेसुध्दा आता जास्त शुध्द होत आहे." वगैरे संख्यात्मक आणि गुणात्मक मुद्दे मांडून मी माझे विचार अनेक वेळा व्यक्तही केले आहेत. पण गेल्या महिन्याभरात मी दोन मराठी चित्रपट आणि एक मराठी नाटक लागोपाठ पाहिले त्यांची नावे पाहून मलाही थोडे अस्वस्थ वाटले. ती नावे आहेत 'दुनियादारी, टाईम प्लीज आणि गेट् वेल् सून'. त्यांच्या निर्मात्यांना योग्य असे मराठी शब्द का सापडू नयेत? असा प्रश्न पडला. याच अर्थाचे मराठी शब्द वापरायचे असल्यास 'दुनियादारी'ला 'जगरहाटी' असे म्हणता आले असते, पण 'टाईम प्लीज' च्या ऐवजी 'कृपया वेळ' एवढे पुरले नसते. त्याच्यापुढे 'दे, घे, द्या, घ्या' असे काहीतरी यायला हवेच आणि हे कोणी कोणाला म्हणायचे या प्रश्नाभोवती तर त्या सिनेमाचे कथानक फिरते. 'गेट् वेल् सून' याचेसुध्दा "लवकर बरा हो, बरी हो, बरे व्हा, ब-या व्हा" वगैरे अर्थ काढता येतात आणि त्यातला कोठला अर्थ काढायचा हे या नाटकातले रहस्य आहे. शिवाय यातले कोठलेही पर्याय सिनेमा किंवा नाटकाचे शीर्षक म्हणून आकर्षक वाटत नाहीत. मी तरी असल्या शीर्षकाचे नाटक वा सिनेमा पहायला बहुधा कधी गेलो नसतो. त्यापेक्षा इंग्लिश नावच प्रेक्षकांना आकर्षक वाटेल यात शंका नाही. अखेर प्रेक्षकांनी यावे हाच तर या नाटक सिनेमाच्या निर्मितीच्या प्रपंचामागे असलेला मुख्य उद्देश असतो ना!

दुनियादारी हा चित्रपट एका प्रसिध्द कादंबरीवरून काढला असला तरी मी काही ती कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे थेटरात जातांना माझी पाटी कोरीच होती. सुरुवातीलाच सई ताम्हणकरला चांगली वयस्क दाखवली आहे आणि माझी समजूत चुकली नसेल तर ती तिच्या नातीला पूर्वीच्या काळातली गोष्ट सांगते आहे असे दाखवून फ्लॅशबॅकमध्ये मुख्य कथानक सुरू होते. तसे असेल तर सुरुवातीच्या सीनमधली सई (तिचे पात्र) सुमारे माझ्या वयाची असावी आणि या सिनेमातल्या कथानकाचा काळ मी पुण्यात कॉलेज शिकत असतांनाचा असायला हवा. त्या काळातसुध्दा एस पी कॉलेज, अलका टॉकीज आणि ससून हॉस्पिटल होते, पण त्या ठिकाणांमधले वातावरण, रस्त्यातली रहदारी, माणसांचे कपडे, बोलणे. चालणे वगैरेतले काहीच मला ओळखीचे वाटले नाही. या कादंबरीची कथा कालातीत आहे, त्यामुळे तिचा विशिष्ट 'पीरीयड' मुद्दाम दाखवण्याची गरज नाही असे म्हणता येईल. पण तसेच करायचे असेल तर सुरुवातीचा आणि शेवटचा सीन कापून टाकायलाही काही हरकत नव्हती. त्या दोन्ही सीन्समध्ये सिनेमाच्या गोष्टीवर काही परिणाम होईल असे काहीच घडत नाही. शेवटच्या सीनमध्ये सगळ्या पात्रांच्या चेहे-यावर सुरकुत्या रंगवायचा आणि त्यांच्या केसात चंदेरी छटा दाखवायचा मेकअपमनचा त्रास तरी वाचला असता.

अंकुश चौधरी आणि जितेंद्ग जोशी हे दोघेही गुंड मवाली असले तरी त्यातला अंकुश हा नीच नाही असे तो स्वतःच एका प्रसंगात सांगतो आणि तसे वागतो.  चुलबुल पांडे सारखे दबंग डीएसपीचे (नावापुरता) पात्र त्याने टेचात रंगवले आहे. जितेंद्र मात्र गुंडही आहे आणि नीचही आहे असे दाखवले असले तरी तो मला तरी तसा दिसला नाही. टीव्हीवर त्याला अनेक वेळा 'इनोदी' काम करतांना पाहिलेले असल्यामुळे त्याच्या चेहे-यावर बसलेली ती छाप काही केल्या जात नाही. उलट त्याला असा निगेटिव्ह रोल देणे हाच मला एक विनोद वाटला. सिनेमाच्या तिकीटांचा काळाबाजार आणि दारूचे गुत्ते वगैरे उद्योग करणा-या त्यांच्या टोळक्यातल्या मुलांना (खरे तर बाप्यांना) कॉलेजात नावे घालण्याची काय गरज पडली तेच जाणोत. त्यांचे गँगवॉर खेळायला त्यांना पुण्यात आणखी कुठे जागा नव्हत्या का? मी कॉलेजात शिकत असतांना तरी पुण्यातल्या कॉलेजांचे असे स्वरूप पाहिले किंवा ऐकले नव्हते. आता तसे झाले असले तर ते भयंकर आहे.

निरागस आणि गोड चेहेरा असलेला स्वप्निल जोशी लहानगा कृष्ण म्हणून टीव्हीवर आला तेंव्हा जबरदस्त लोकप्रिय, अगदी सुपरहिट, झाला होता. त्यानंतरही मी त्याला बहुतेक वेळा चॉकलेट हीरोच्या रूपातच पाहिला आहे. दुनियादारीमध्ये त्याला थोडा वेगळा आणि थोडा त्याच्या प्रतिमेला साजेसा असा रोल मिळाला आहे. यात केवळ मैत्रीखातर तोसुध्दा एका गँगमध्ये सामील होतो, पण गँगस्टर लोकांना सद्बुध्दी देण्यासाठी प्रयत्न करत राहतो. "यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी।.. ये दोसती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे।... यारबिना चैन कहाँ रे।." वगैरे गाण्यांना साजेल असे तो बोलत आणि वागत असतो. "तेरी मेरी पक्की यारी आणि xxमध्ये गेली दुनियादारी" अशा प्रकारचे एक पालुपद नेहमी म्हणत असतो. पण त्याच्या अंतर्मनात एक उदात्त, महान वगैरे आत्मा नेहमीच वास करत असतो. स्वप्निलने हे दुहेरी पात्र मोठ्या ताकदीने उभे केले आहे.

सई ताम्हणकर हे एक अजब पात्र या सिनेमात आहे. ती काही डॉक्टरसारखी दिसत नाही असे सिनेमातलेच एक कॅरॅक्टर एकदा सांगते, पण काही प्रसंगांमध्ये ती डॉक्टरसारखी दिसते आणि तसे वागतेसुध्दा. एरवी ती अगदी चंट बनून बिनधासपणे वावरत असते, पण चार लोकांसारखे आपण सुखाने जगायचे नाहीच असे तिने मनाशी ठरवले असावे. कथेतल्या एका व्यक्तीसाठी ती एवढा मोठा त्याग का करते आहे असा प्रश्न पडतो किंवा तो तिचा  मूर्खपणा वाटतो, आणि दुस-या व्यक्तीसाठी मोठा त्याग केल्यामुळे ती एकदम महान वाटायला लागते. कथेनुसार हे तिचे निरनिराळ्या प्रकारे दिसणे, न दिसणे आणि वागणे वगैरे तिने अप्रतिम साधले आहे. ऊर्मिला कानेटकरने केलेला  सुंदर अभिनय अपेक्षित होता. इतर पात्रांनीही आपापली कामे ठीक केली आहेत.

'दुनियादारी' या शब्दाचा अर्थ 'जगरहाटी', 'जनरीत' वगैरे असावा असे मी समजत होतो. घरी आल्यावर मी हिंदी शब्दकोश उघडून त्याची खात्रीही करून घेतली. पण 'आपले हित सोडून विनाकारण दुस-याच्या फंदात पडणे' असा काहीसा या शब्दाचा अर्थ या चित्रपटात ध्वनित होतो. तो अर्थ जो काही असेल तोसुध्दा फक्त xxमध्ये जाण्यापुरताच आहे. त्याव्यतिरिक्त मला तरी या गोष्टीत कुठेच सर्वसामान्य जगरहाटी दिसली नाही. कदाचित माझ्या माहितीतले जगच वेगळे आहे की काय असे वाटायला वागले. असे सगळे असले तरी हा चित्रपट पाहतांना आपण त्यात गुंतत जातो, कोणता माणूस कुठे आणि कोणत्या रूपात अचानक समोर येईल ते सांगतां येत नाही, त्यामुळे आपल्याला आश्चर्याचे धक्के बसतात, पुढे काय होणार याची उत्कंठा वाटते. हंसू येते, डोळ्यात पाणी येते, पण केंव्हाच जांभया येत नाहीत.  त्यामुळे थेटरामधून बाहेर येतांना पैसे वसूल झाल्यासारखे वाटते. सामान्य प्रेक्षकाला याहून आणखी काय हवे?

टाईम प्लीज या सिनेमात प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तुफान लोकप्रिय झालेल्या एका मालिकेमध्ये या दोघांनी एकत्र काम केले होते तेंव्हाच ते त्यांच्या जीवनातसुध्दा एकत्र येणार असल्याच्या बातम्या, वावड्या, अफवा उठल्या होत्या. त्यानंतरसुध्दा त्यांनी काही सिनेमे किंवा मालिकांमध्ये जोडीने काम केले असेल. या क्षेत्रातली माझी माहिती फारच तोकडी आहे. पण ती मालिका बंद होऊन बराच काळ लोटून गेल्यावर त्यांच्या लग्नाची बातमी आली. अर्थातच त्यांनी त्यासाठी बराच 'वेळ' (टाईम) दिला घेतला असणार. पण 'टाईम प्लीज' या चित्रपटात मात्र सुरुवातीलाच एका रेस्तराँमध्ये त्यांच्या पहाण्याचा कार्यक्रम होतो. "काहीच का बोलत नाहीस?", "काय बोलू?", "अशा वेळी काय बोलायचं असतं?" अशा प्रकारच्या दोन चार संवादात ती मुलाखत आटोपून लगेच त्यांचे शुभमंगल झाल्याचे दाखवले आहे आणि उमेशच्या घरात प्रिया रहायला येते. उमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या हुद्द्यावर पोचून प्रतिष्ठित माणूस झालेला असतो, तर प्रिया वयाने वाढली असली तरी मनाने अजून शरतबाबूंची अल्लड 'बालिका बोधू'च राहिलेली असते. तिच्या निरागस वाटणा-या स्वच्छंदी वागण्याने आणि त्यात घडोघडी चुका करत राहण्याने आधी त्यामुळे होणारा त्रास भोगून सुध्दा उमेशचेही मनोरंजन होते. पण प्रियाचा बालमित्र सिध्दार्थ जाधव त्यांच्या घरी अचानक अवतीर्ण होतो आणि तिथेच ठिय्या मारून राहतो. त्यानंतर चित्र बदलते.

लहान मुले जशी एकमेकांशी वागतात तसेच प्रिया सिध्दूसोबत थिल्लरपणे नाचत बागडत असते, पण उमेशला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा सहन होत नाही, त्या दोघाच्याबद्दल उमेशच्या मनात संशय निर्माण होतो. याच काळात उमेशची भूतकाळातली प्रेयसी सई योगायोगाने त्याच्याच ऑफीसात कामाला लागते. मित्रत्वाच्या नात्याने आणि तिला नव्या जागी रुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून उमेश तिला साथ देतो, तिला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतो आणि कंपनीने एक अर्जंट काम त्यांना करायला दिले असल्यामुळे ते करण्यासाठी तिला रात्री अपरात्री घरीसुध्दा घेऊन येतो. आतापर्यंत मनाने लहान असलेली प्रिया आता या बाबतीत मोठी होते आणि असूयेच्या भावनेने पेटते. अशा त-हेने दोन्ही बाजूंनी संशयकल्लेळ सुरू होतो आणि वाढत जातो. त्यातच नको त्या वेळी, नको त्या ठिकाणी, नको ती माणसे अचानक दृष्टीला पडल्यामुळे गैरसमजुती होतात आणि गुंता वाढत जातो. चार दिवस दोघांनी एकमेकांपासून दूर रहावे आणि आपल्या नातेसंबंधाबद्दल शांतपणे विचार करून काय ते ठरवावे अशी 'टाईम प्लीज' सूचना उमेश करतो आणि प्रियाला तिच्या माहेरी पोचवून येतो. तिथे तिची आई आणखी एक गौप्यस्फोट करते. मनाशी काहीतरी ठरवून प्रिया घरी परत येते आणि आणखी एका गैरसमजाला बळी पडून परत जाते. तिचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड सिध्दूच त्याच्या भात्यामधून आणखी एक अस्त्र बाहेर काढतो आणि संशयपिशाच्च्याचे दमन करतो. अशा प्रकारे उमेश आणि प्रियाची लग्नानंतरची प्रेमकहाणी सफळ संपूर्ण होते.

उमेश आणि प्रिया यांनी सिनेमातल्या नायक नायिकांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत, पण सहकलाकार असलेला सिध्दार्थ जाधवच त्यांना झाकाळून टाकतो. थेटरमधले बहुतेक प्रेक्षक त्याच्या प्रत्येक वाक्याला आणि कृतीला उत्स्फूर्तपणे दाद देत असतात, ते बहुधा त्यालाच पहायला थेटरात आले आहेत असे वाटते. मला ते पात्र थोडे गरजेपेक्षा जास्त भडक आणि उथळ वाटले, पण ते प्रभावीपणे सादर करणा-या सिध्दार्थचे कौतुकही वाटले. या चित्रपटातले सईचे पात्रसुध्दा बरेच गुंतागुंतीचे आहे आणि त्यातल्या विविध छटा तिच्या अभिनयात तिने उत्तम प्रकारे आणल्या आहेत. अभिनयाचे इतके चांगले अंग असतांना तिने तिची भूमिका वठवण्यासाठी उगाच वेगळे कपडे घालण्याची आणि भसाभसा सिगारेटी फुंकत बसण्याची गरज नव्हती. या सिनेमातल्याच एका जोडप्याचा संसार आयुष्यभर वेळ देऊनसुध्दा धड चालत नाही आणि दुसरा त्याआधीच सहनशक्तीचा अगदी अंत पाहून अखेर मोडला असतो, असे असले तरीही. 'लग्न ठरवणे किंवा ते मोडणे यासारखे महत्वाचे निर्णय घाईघाईत घेऊ नयेत, त्यापूर्वी जोडीदाराला थोडा वेळ द्यावा, स्वतः थोडा वेळ घ्यावा.' असा संदेश या चित्रपटात दिला आहे. या चित्रपटाची मांडणी, त्यातले लहान लहान प्रसंग, संवाद, मुख्य पात्रांचा अभिनय, भावपूर्ण शेवट वगैरे सगळे मिळून एक चांगली भट्टी जमली आहे.        

'गेट वेल सून' हे एक चाकोरीबाहेरचे नाटक आहे. यात सेटच्या एका भागात आनंद या मानसोपचारतज्ज्ञाचा दवाखाना थाटला आहे, म्हणजे भिंतीवर काही चित्रे, एक टेबल, दोन चार खुर्च्या, एक कपाट वगैरेंधून तसा आभास निर्माण केला आहे आणि स्टेजच्या उरलेल्या भागात निरनिराळे सेट मांडून कथेमधले इतर प्रसंग दाखवले जातात. एक महिला पत्रकार डॉक्टरांची मुलाखत घेत असतात आणि मनोरुग्णांचे प्रकार, त्यातले व्यसनाधीन लोक, त्यांचे प्रकार, त्यांच्या व्यसनात अडकण्यातल्या आणि त्यातून बाहेर पडण्यातल्या स्टेजेस वगैरेंची वैद्यकीय माहिती डॉक्टरसाहेब त्या रिपोर्टरला देत असतात. या विषयावरील एक उद्बोधक डॉक्युमेंटरी आपण पहात आहोत असेच बरेच वेळा वाटते. हे सांगत असतांना डॉक्टर एका गोंडस सैतानाचा (लव्हेबल रास्कलचा) उल्लेख करतात आणि त्याची गोष्ट फ्लॅशबॅकमधून सुरू होते. पण दुनियादारी सिनेमाप्रमाणे आपल्याला ती भूतकाळात घेऊन जात नाही. दोन तीन वाक्यांचे छोटे छोटे तुकडे डॉक्टर सांगत आहेत अशा पध्दतीने ती कथा हळूहळू उलगडत जाते. त्या गोष्टीतसुध्दा एका व्यसनाधीन माणसाचे वागणे, त्याने व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याला आधी विरोध करणे, डॉक्टरांनी त्यांच्या संभाषणकौशल्याने त्याचे मन वळवणे वगैरे पहात असतांना ती मुक्तांगण किंवा अल्कोहोलिक अॅनॉनिमसवरची डॉक्युमेंटरी वाटते. पण स्वप्निल जोशीचा सुरेख अभिनय आणि चटपटीत संवादांमधून ती मनोरंजक बनवली आहे. मध्यंतराच्या वेळेस अचानक एक घटना घडते आणि ती महिला पत्रकार स्वतःच त्या कथेचा भाग बनते. व्यसनमुक्त झालेला स्वप्निल पुन्हा त्यात परत जाणार की काय अशी आशंका निर्माण होते. पण अखेर सगळे काही आलबेल होते, कोणी व्यसनमुक्त होतात आणि कोणी त्या मार्गाला लागतात.

या नाटतात डॉक्टर, स्वप्निल आणि महिला पत्रकार एवढी तीनच मुख्य पात्रे आहेत. स्वप्निलची पत्नी अधून मधून दिसते आणि डॉक्टरांकडे एक असिस्टंट आहे एवढे दाखवण्यापुरती येजा ती करत असते. डॉक्टरची भूमिका करणारे संदीप मेहता आणि पत्रकार सुमेधा गुरू यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या आहेत. स्वप्निल जोशीचे रंगभूमीवरचे हे पहिलेच नाटक आहे. यापूर्वी मी त्याला सिनेमा आणि टीव्हीवरच पाहिले आहे. पण त्याने या नाटकातली लव्हेबल रास्कल प्रतीकची अवघड भूमिका अप्रतिम उठवली आहे. व्यसनी पण सुसंस्कृत माणसाच्या मनात चालत असलेले अंतर्द्वंद्व त्याने कुशलतेने दाखवले आहे. या सगळ्यांचे श्रेय रंगमंचावरील कलाकांरांइतकेच किंबहुना कणभर जास्तच या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना द्यावेसे वाटते. डॉ.आनंद नाडकर्णी या नावाजलेल्या नामसोपचारतज्ज्ञाने लिहिलेल्या कादंबरीवरून प्रशांत दळवी यांनी लिहिलेल्या या नाटकातले संवाद त्यांनी खूपच अभ्यासपूर्ण लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संवादामधून त्यांनी कुठेही कंटाळवाणी न वाटता पण खूप उद्बोधक माहिती दिली आहे आणि त्याबरोबरच या नाटकाच्या कथेचा ओघही मनोरंजकपणे पुढे नेला आहे. त्यात थोडा रहस्यमय़ भाग आणला आहे. व्यसनग्रस्त माणसाची बदलती मनस्थिती, त्याच्या आप्तांची तळमळ, समाजाला व्यसनमुक्त करण्याचे कंकण हाती बांधलेल्या डॉक्टरांनी वेळोवेळी येणा-या अपयशाने निराश न होता होईल तितके करण्याचा गेतलेला ध्यास हे सगळे दळवींनी संवादामधून अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. आवर्जून पहावे आणि इतरांना पहायला सांगावे असे वाटणारे हे नाटक आहे.   

सिनेमा किंवा नाटकाची गोष्ट आणि विशेषतः तिचा शेवट न सांगता त्यावर शेरेबाजी करीत  लिहिणे कठीण आहे, पण एका वाचकाने केलेल्या प्रेमळ सूचनावजा मागणीमुळे प्रेरणा घेऊन मी तसा एक लहानसा प्रयत्न मी करून पाहिला आहे.

Friday, August 23, 2013

होडी ते पाणबुडी आणि ..... मी


'नदीपार जाण्यासाठी आणि नद्यांच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापारपासून लहान होड्यांचा उपयोग होत आला आहे. भारतातल्या बहुतेक सर्व मोठ्या नद्यांवरसुध्दा आता जागोजागी पूल बांधले गेले आहेत आणि खेडोपाडी जाणारे रस्ते झाले आहेत. माझ्या लहानपणी तसे नव्हते. जमखंडी गावातल्या आमच्या राहत्या घरापासून आमचे वडिलोपार्जित घर आणि शेतजमीन असलेल्या मूळ खेडेगावापर्यंतचे अंतर फक्त वीस किलोमीटर होते, पण घरातून निघून तिकडे जाऊन पोचण्यासाठी एक पूर्ण दिवस लागत असे, कारण दोन्ही गावांच्यामध्ये कृष्णा नदीचा प्रवाह होता आणि तिच्या दोन्ही बाजूंना पक्के रस्तेही नव्हते. जिथपर्यंत रस्ता जात होता तिथपर्यंत बसमधून गेल्यानंतर पुढे चालत जाऊन नदी पार करून पलीकडे जायचे आणि पुन्हा थोडे अंतर चालत जाऊन पुढे जाण्यासाठी दुसरी बस मिळेल तेंव्हा पकडायची असे सोपस्कार करावे लागत.

कृष्णामाईच्या तीरावर गेल्यानंतर तिथेसुध्दा नावेची वाट पहात बसावे लागत असे. घरून आणलेले डबे तिथल्या रम्य जागी उघडून आणि केळी, पेरू वगैरे त्याबरोबर खाऊन आम्ही पिकनिकचा आनंद घेत असू. त्यातही पावसाळ्यात जेंव्हा नदीला महापूर येई तेंव्हा तिला येऊन मिळणा-या ओढ्यानाल्यांमध्ये नदीचे पाणी शिरून त्यांचे रूपांतर दोन तीन उपनद्यांमध्ये होत असे आणि एरवी नावेत चढण्या व उतरण्यासाठी ठरवलेल्या जागा पाण्याखाली जाऊन अदृष्य होत असत. प्रचंड वेगाने खळखळाट करत जात असलेल्या पाण्याच्या रौद्र रूपाच्या त्या प्रवाहात नाव चालवण्याचे धाडस कुणी करत नसे आणि कोणा धीट माणसाने ते केलेच तरी त्याला उतारू मिळणे अशक्य असल्यामुळे तिथली (आताच्या भाषेतली) 'फेरी सर्व्हिस' पावसाळ्यात बंद रहात असे. त्या नदीनाल्यांना नावेमधून पार करून पलीकडे जाणे तेवढ्या काळात शक्यच नव्हते. पलीकडचे लोक पलीकडे आणि अलीकडचे लोक अलीकडे रहायचे. उगारला असलेला रेल्वेचा पूल तेवढा बारा महिने पाण्याच्या वर असे. त्यामुळे फारच निकडीची गरज असल्यास दीडदोनशे किलोमीटरचा वळसा घालून उगार शेडबाळ अथणीमार्गे जावे लागत असे. पण इतर दिवसात मात्र आम्ही नावेत बसून मजेत कृष्णा नदी पार करत असू.

ती नाव सुमारे आठदहा मीटर लांब आणि मधोमध तीन चार मीटर रुंद एवढी मोठी असायची. माणसे, त्यांची गाठोडी, सायकली आणि कोंबड्या वगैरे त्यात जितके भरता येतील तेवढे भरून त्यांना नावेमधून पलीकडे नेले जात असे. पहिल्या फेरीत न मावल्यामुळे उरलेले लोक नावेला पलीकडच्या तीरावर जाऊन परत येण्याची शांतपणे वाट पहात बसत. क्वचित प्रसंगी एक एक करून त्यावरून बैलगाड्यासुध्दा पलीकडे जाऊ शकत. कारवारजवळील एका ठिकाणी तर एस.टी.च्या बसलासुध्दा मोठ्या नावेमधून नदीच्या पार नेतांना मी पाहिले आहे. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून आणि नावेचा समतोल राखण्यासाठी माणसांना खाली उतरवून त्यांना आणि गाड्यांना वेगवेगळ्या फे-यांमध्ये नावेतून नेले जात असे. बैलांनी नावेवर दंगा गोंधळ करू नये म्हणून त्यांना मात्र नावेच्या बाजूने पाण्यामधून पोहवत पलीकडे नेत असत. गायी म्हशींनासुध्दा लांब दोरीने बांधून नावेच्या सोबत पाण्यामधून पोहत नेत असत.

नदीच्या पात्रामधील पाण्याच्या खोलीचा अंदाज घेऊन नावेत चढण्या उतरण्यासाठी जागा ठरलेल्या होत्या. पण तिथे पक्के बांधकाम केलेले धक्के नव्हते. ती नाव नदीकिना-यापासून दूर कंबरभर पाण्यात उभी रहात असे आणि माणसांनी आपले सामान डोक्यावर धरून पाण्यामधूनच तिथपर्यंत चालत जाऊन नावेत चढायचे असे. कोणी ना कोणी धडधाकट उतारू  लहान मुलांना उचलून नेत असे. नावेच्या कडांवर दोन्ही बाजूंना मोठमोठी वल्ही बसवलेली असत आणि बलदंड नावाडी "हुश्शा हुय्या" करत जोर लावून ती चालवत. उन्हाळ्यात नदीचे पाणी फारच कमी असले तर पलीकडे जाण्यासाठी एक लहान नाव असायची आणि लांब बांबूच्या सहाय्याने नदीच्या तळाला रेटा देऊन नावेला ढकलतच पार करत असत. अशा प्रकारचा नावेमधला प्रवास मी लहान असतांना अनेक वेळा केला असल्यामुळे माणसांच्या हातांच्या जोराने चालवलेली होडी माझ्या ओळखीची झाली होती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये तर आमचाच बोटक्लब होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यानंतर केंव्हाही वाटले की एकाद दोन मित्रांसोबत आम्ही तिकडे जात होतो आणि स्वत-च होडी चालवून तिथल्या शांत पाण्यावर तरंगत राहण्याची मजा घेत होतो. यात मजेबरोबर चांगला व्यायामही होत असल्याने चांगली सडकून भूक लागत असे आणि मेसमधले जेवण अमृततुल्य वाटत असे. पुढे मुंबईला आल्यावर गेटवे ऑफ इंडियाच्या जवळून चालणा-या मोटरलाँचमध्ये बसून वेळ असल्यास घारापुरी (एलेफंटा) बेटापर्यंत आणि नसेल तर आजूबाजूच्या समुद्रात फेरफटका मारून आणणे हा मुंबईदर्शनाचा आवश्यक भाग झाला होता. आमच्याकडे येऊन गेलेल्या बहुतेक सगळ्या पाहुण्यांना आम्ही हा जलविहार घडवून आणलाच, शिवाय मित्र, सहकारी, शेजारी वगैरेंच्या निरनिराळ्या ग्रुपमधून घारापुरी बेटाची सहलही केली.

एकदा सात आठ मित्रांचे आमचे टोळके एलेफंटाहुन परत येत असतांना आमच्याच लाँचमध्ये थोड्या अंतरावर आठ दहा समवयस्क मुलींचा एक वेगळा ग्रुप बसला होता. वेळ घालवण्यासाठी आम्ही गाणी म्हणायचे ठरवले, आमच्या ग्रुपमधल्या एक दोन मुलांचे आवाज चांगले होते, त्यांना आवडही होती आणि अनेक गाणी तोंडपाठ होती. त्यांनी गाणी म्हणणे हा आमच्या मेळाव्यांमधला नेहमीचाच भाग होता. पण आम्ही जसे ठरवले तसेच त्या मुलींनीही गाणी गायचे ठरवले. सर्वात आधी याची सुरुवात कुणी केली ते सांगता येणार नाही. सुरुवातीला एकेक जणच आपापल्या कंपूसाठी गाणे म्हणत होता किंवा होती, पण दोन्ही ग्रुपमधल्यांना एकमेकांची गाणी ऐकू येतच होती. त्यामुळे आपला आवाज मोठा करण्यासाठी त्यात इतरांनी साथ द्यायला सुरुवात केली, त्यातून मग एक प्रकारची चढाओढ सुरू झाली, गाण्यांमधूनच सवालजवाब, उत्तरेप्रत्युत्तरे होत गेली. अतीशय सभ्य आणि सुसंस्कृत स्वरूपाचा आमचा हा धिंगाणा आमची लाँच गेटवेच्या धक्क्याला लागेपर्यंत चालला. तो इतका रंगत गेला की एरवी कधी गाण्यासाठी तोंडही न उघडणारे मित्रसुध्दा शेवटी शेवटी बेंबीच्या देठापासून किंचाळायला लागले होते. इतर प्रवाशांची त्यामुळे चांगली करमणूक झाली असेल. उतरल्यानंतर आम्ही दुरून हात हालवूनच मुलींच्या टोळीचा निरोप घेतला आणि त्यांनीही गोड हंसून दिला. त्या कोण होत्या, कुठून आल्या होत्या कोण जाणे, पण नावेमधल्या त्या लहानशा प्रवासाची एक अविस्मरणीय अशी सुखद आठवण मनात ठेऊन गेल्या.

आम्ही प्रत्यक्षात काश्मीरला जाण्यापूर्वी हिंदी सिनेमांमधून जेवढे काश्मीर पाहिले होते त्यात नौकाविहार आणि बर्फामधून घसरत जाणे हेच लक्षात राहिले होते. आम्ही स्वतः श्रीनगरला गेलो तेंव्हा दोन प्रवाशांना सरोवरात विहार करवून आणणारी छोटीशी नाव पाहिली, तिच्यात बसून फिरून आलो आणि राहण्याच्या सर्व सुखसोयींनी सज्ज असलेली हाउसबोटही पाहिली. दल सरोवरातून फेरफटका मारत असतांना तिथे नावांमधून फुले, फळे, भाज्या, शोभेच्या वस्तू वगैरे गोष्टी होडीत बसूनच विकणारे फिरते विक्रेते असलेला बाजारसुध्दा पाहिला. चिनाब नदीवर एक बंधारा घालून दल सरोवर निर्माण केले आहे आणि त्यातले पाणी वाहून जाऊ नये यासाठी ते नियंत्रित स्वरूपात नदीत सोडले जाते. बहुतेक सगळ्या नावा मात्र नदीच्या खालच्या अंगाला ठेवलेल्या असतात. नदीचे पात्र आणि सरोवर या दोन्हींच्या मध्ये एक लहानसे कुंड आहे. त्याला दोन्ही बाजूंना घट्ट बसणारे दरवाजे आहेत. नदीमधून सरोवरात जायचे असल्यास आधी बाहेरचा दरवाजा वर उचलून नावांना त्या कुंडात घेतात आणि तो दरवाजा घट्ट बंद करतात. सरोवरातले पाणी तिथे सोडून तिथल्या पाण्याची पातळी वाढवतात. ती सरोवराइतकी झाल्यानंतर आतल्या बाजूचे गेट उघडून त्या नावांना सरोवरात जाऊ देतात. बाहेर येतांना याच्या उलट क्रमाने कृती करतात. असे करून सरोवर आणि नदीचे पात्र यातल्या पाण्याच्या लेव्हल्स वेगवेगळ्या ठेवल्या जातात. पण यामुळे नौकाविहार करणा-या पर्यटकांना आत जातांना तसेच बाहेर येतांना बराच वेळ लहानशा जागेत ताटकळत थांबावे लागते.

जबलपूरजवळ असलेला भेडाघाटचा धबधबा आणि तिथून दोन तीन किलोमीटरपर्यंत असलेला नर्मदा नदीचा प्रवाह खूप प्रेक्षणीय आहे. या भागातला डोंगरच संगमरवरी दगडांचा आहे. नर्मदेच्या त्या भागातल्या प्रवाहातून नावेत बसून विहार करण्याची चांगली सोय आहे. नदीचे पात्र खूप रुंद नसले तरी ब-यापैकी आहे, अत्यंत निर्मळ आणि पारदर्शक असे पाणी आणि दोन्ही बाजूला संगमरवरी पहाडांच्या उंच कड्यांची शोभा पहात त्या बोटीमधून जातांना खूप मजा येते. माझ्या कुटुंबीयांसोबत तर मी अनेक वेळा ही मौज लुटलेली आहेच, एकदा एका सेमिनारसाठी जबलपूरला गेलो असतांना तिथे आलेल्या फॉरीन पार्टिसिपेंट्सच्यासोबतही हे भ्रमण करायचा योग आला होता. त्या मोटर लाँचेसचे नावाडी अत्यंत गंमतशीर असी कॉमेंटरी हिंदी भाषेत करतात. त्या दिवशी सुध्दा त्यातल्या कोणाला इंग्रजीत बोलता येत नव्हते. त्यामुळे मलाच दुभाषा बनून त्यांनी सांगितलेल्या गमतीजमतींचे जमेल तेवढे भाषांतर करून सांगावे लागले होते. शिवाय भारतीय परंपरांबद्दल माहिती देऊन त्याचा अर्थ थोडा समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा लागत होता.

आम्ही केलेल्या युरोप आणि अमेरिकेच्या सहलींमध्येसुध्दा क्रूज हा एक महत्वाचा भाग असायचा. त्यात आधुनिक पध्दतीच्या आलीशान बोटी पहायला मिळाल्या. थेम्स नदीतून जातांना दोन्ही बाजूंना दिसणारे जुने आणि नवे लंडन आणि सीन नदीमधून नावेतून फिरतांना पॅरिसमधल्या ऐतिहासिक आणि आधुनिक इमारती बाहेरून पाहिल्या. पाण्यातच उभारलेला व्हेनिस शहराचा जुना भाग दोनचार शतकांपूर्वी जसा होता तसाच अद्याप ठेवला आहे. या भागात रस्ते नाहीतच, सगळी घरे कालव्यांनी जोडलेली आणि सगळीकडे होडीमधूनच फिरायचे. आम्हीसुध्दा जुन्या वाटणा-या पण मोटरवर चालणा-या एका लहानशा नावेत बसून व्हेनिसच्या अरुंद गल्लीबोळामधून भटकंती करून घेतली, पण सिनेमात किंवा फोटोत दिसतो तसा तो भाग प्रत्यक्षात प्रेक्षणीय तर वाटला नाहीच, उलट दुर्गंधाने भरलेला, गलिच्छ आणि किळसवाणा वाटला. पर्यटन करतांना काही जागी अशी निराशा होत असते. अॅमस्टरडॅम हे शहरसुध्दा खाड्या आणि कालवे यांनी भरलेले आहे. तिथली बोटराईड मात्र छान होती. हॉलंड या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीच्या खाली आहे. समुद्राला जेंव्हा भरती येते तेंव्हा तिथल्या नद्या, खाड्या वगैरे जिथे समुद्राला मिळतात त्या ठिकाणी त्यांच्या पाण्याची पातळी समुद्रापेक्षा खाली असते. त्या वेळी त्यात समुद्राचे पाणी उलट दिशेने शिरू नये म्हणून बंधारे, गेट्स आणि झडपा वगैरेंची बरीच गुंतागुंतीची व्यवस्था केलेली आहे. श्रीनगरच्या दल लेकमध्ये नावांना आत शिरण्याची आणि बाहेर पडण्याची जशी योजना आहे त्याच प्रकारची पण खूप मोठ्या प्रमाणावर केलेली योजना अॅमस्टरडॅम बंदरात मोठमोठ्या जहाजांसाठी कार्यरत आहे.  

सिंदबादपासून ते कोलंबस, वास्कोडिगामा करत करत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजींपर्यंत अनेकांनी केलेल्या समुद्रातल्या प्रवासाची वर्णने मी लहानपणी खूप चवीने वाचत असे. "हा सुवेझ कालवा, थक्क करील मानवा।।" यासारख्या कविताही शाळेतल्या पुस्तकांमध्ये होत्या. आपणही एकदा मोठ्या जहाजामधून प्रवास करून पाहण्याची सुप्त इच्छा त्या वर्णनांमधून मनात येत होती. पण ती काही पूर्ण झाली नाही. मला परदेशी जाण्याची संधी मिळेपर्यंत तो प्रवास विमानानेच करायचा हे रूढ झालेले होते, प्रवासात अनेक दिवस घालवण्याची तयारी आणि इच्छा कोणाच्या मनात असली तरी तशी सोयच तोपर्यंत बंद झाली होती. पुढे माझे काही मित्र आणि आप्त आगबोटीने जाऊन अंदमानची सहल करून आले, पण या बाबतीतही मला जरा उशीरच झाला.      

दर वर्षी डिसेंबर महिन्यात नौदल दिन साजरा करतात. त्या दिवशी मुंबई बंदरातली एक युध्दनौका आम जनतेला पाहण्यासाठी खुली परवानगी दिलेली असते. याविषयी अनेक वेळा ऐकल्यामुळे एका वर्षी आम्ही ती नाव पहायला गेलो. ती पहायला त्या दिवशी आलेल्या लोकांची जवळ जवळ गेट वे ऑफ इंडियापर्यंत लांब रांग लागली होती, पण ती हळू हळू पुढे सरकत होती हे पाहून आम्ही रांगेत जाऊन उभे राहिलो. हळू हळू पुढे सरकत तासाभरात लायन गेटपर्यंत जाऊन पोचलो. आत गेल्यानंतर पुन्हा तितकीच लांब रांग डॉकच्या आतमध्ये होती. ते चालत चालत जाऊन आणखी एक तासानंतर आम्ही एका फ्रिगेटवर चढलो. तिथला फक्त डेकच लोकांना पहाण्यासाठी खुला ठेवला होता. त्यावर एक दोन तोफा बसवलेल्या होत्या. बाकीची केबिन्स आणि इतर सर्व जागा कड्याकुलुपांमध्ये बंद होत्या. इतर प्रेक्षकांना कदाचित त्यात रस नसेल, पण माझ्यातला मेकॅनिकल इंजिनियर जागा असल्यामुळे मला तिथली यंत्रसामुग्री पहाण्याची खूप इच्छा होती. ती पूर्ण होऊ शकली नाही. पाच मिनिटात त्या युध्दनौकेच्या रिकाम्या आणि सपाट डेकवर एक प्रदक्षिणा घालून आम्हाला खाली उतरावे लागले. तिरुपतीच्या व्यंकटेशाचे किंवा पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे रहावे आणि ते घेतल्यानंतर एक सेकंदात पुढे ढकलले जावे तसे झाले. 

आगबोटी तयार करण्याचा माझगावच्या गोदीतला कारखाना पहाण्याची एक संधी मला मिळाली, तेंव्हा तिथे काही युध्दनौकांची बांधणी चाललेली होती. शिंप्याने शर्ट पँट्सची कापडे खुणा करून कराकरा कापावीत तेवढ्या सहजतेने तिथे अवाढव्य आकारांचे पोलादाचे पत्रे कापले जात होते. त्यांच्या ड्रॉइंग्जची फिल्म एका प्रोजेक्टरमध्ये लावलेली असे आणि त्या पत्र्यांवर आधी अंधार करून ते प्रकाशचित्र प्रोजेक्ट करून खडूने गिरवून घेतले जात होते. अशा प्रकारची यंत्रणा मी कुठेच पाहिली नव्हती. पुढे एका यंत्राला जोडलेल्या टॉर्चने त्या पत्र्यांचे चित्रविचित्र आकारांचे तुकडे त्यांच्या ड्रॉइंगप्रमाणे कापले जात होते. पंधरावीस मिलिमीटर आणि त्यापेक्षाही जाड पत्र्यांचे आणि त्यांना कापून तयार केलेल्या मोठमोठ्या आकारांचे ढीग पाहूनच हे काम किती मोठे असते याची कल्पना येत होती. ते तुकडे एकमेकांना जोडण्याचे कामसुध्दा स्वयंचलित यंत्रांकडूनच चालले होते. अर्थातच ती यंत्रे चालवण्यासाठी कुशल कामगार तिथे तैनात होतेच. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारे वेल्डिंग मी त्यानंतरही पुन्हा कधी पाहिले नाही. त्या कारखान्यात काही युध्दनौकांचे सांगाडे उभे होते, तर काहींवर इतर उपकरणे बसवण्याचे काम चालले होते. ते सगळे वरवर पाहूनसुध्दा त्यांचे आकार (साइझ) आणि त्यातली गुंतागुंत (कॉम्प्लेक्सिटी) यांची कल्पना आली.  

अणुशक्तीवर चालणा-या भारतीय बनावटीच्या पहिल्या पाणबुडीच्या रिअॅक्टरचे काम अणुशक्ती खात्यामध्ये होत होते. याबाबत अत्यंत कडक गोपनीयता पाळली जात असल्यामुळे ते कोणाकडे होते हे कधीच समजू दिले जात नसले तरी कुठेतरी तशा प्रकारचे काम चालले असल्याची अस्पष्ट कुणकुण कानावर येत होती. बाहेरच्या ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यात रिअॅक्टरशी संबंधित असलेले भागही असायचे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती किंवा भोंगळ वाटणारी नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून ते समजू शकणा-यांना थोडा अंदाज येत होता. अणुशक्तीसाठी उपयोगात येणारी सर्वच उपकरणे आणि यंत्रसामुग्री निर्माण करतांना त्या कामात विशेष प्रकारची काळजी घेतली जाते. त्यासाठी लागणारी प्रोसीजर्स, स्पेसिफिकेशन्स वगैरे एकदम वेगळी असतात. ती तयार करून त्यानुसार या कारखान्यांमध्ये सगळे काम करवून घेण्याची सुरुवात आमच्या पिढीने केली होती. त्यापूर्वीच्या काळात तिथे साखर, सिमेंट यासारख्या कारखान्यांची यंत्रसामुग्री तयार होत असे. त्यांच्या कार्यपध्दतीत अनेक प्रकारच्या आमूलाग्र सुधारणा घडवून आणून आणि नवीन प्रकारची यंत्रसामुग्री, इन्स्पेक्शनची उपकरणे वगैरे आणून त्यांच्या कामाचा दर्जा अणुशक्तीच्या कामासाठी आवश्यक इतका उंचावण्यात आम्ही खूप मदत केली होती. या सर्वांचा उपयोग ही पाणबुडी बनवण्याच्या कामात केला जात होताच. अशा प्रकारे अप्रत्यक्ष रीतीने त्या कामाला कुठेतरी माझाही स्पर्श झाला होता. काही दिवसांपूर्वी अरिहंत या नावाच्या पाणबुडीवरील रिअॅक्टर क्रिटिकल झाल्याची बातमी वाचली तेंव्हा या आठवणी झर्रकन डोळ्यासमोर येऊन गेल्या.

होडी ते पाणबुडी यांच्या मधल्या जहाज, गलबत, आगबोट वगैरेंशी माझा कधीच संबंध आला नसला तरी होडी, नावा वगैरेंच्या खूप आठवणी माझ्या मनात आहेत. खरे पाहता रेल्वे आणि विमाने यातून मी शेकडो वेळा दूर दूरचे प्रवास केले आहेत. नावेमधून एकंदर जितके किलोमीटर मी हिंडलो असेन त्याच्या कित्येकशेहेपट आगगाडीमधून आणि कित्येक हजारपट अंतर विमानांमधून कापले आहे. पण तरीसुध्दा आठवणीत राहण्यासारखे असे काही अगदी लहान लहान प्रवास नावांमधून झाले आहेत. ते या निमित्याने सादर केले.

Thursday, August 22, 2013

होडी ते पाणबुडी (उत्तरार्ध)

होडी ते पाणबुडी (पूर्वार्ध) - http://anandghan.blogspot.in/2013/08/blog-post_18.html
-----------------------------
मागील भागावरून पुढेः

इंग्रजी भाषेत 'बोट' आणि 'शिप' असे दोन शब्द आहेत पण त्यांची स्पष्ट अशी व्याख्या नाही. इंग्लिश भाषेतली 'बोट' म्हणजे लहान आकाराची आणि 'शिप' म्हणजे अगडबंब असे सर्वसाधारणपणे समजले जाते. 'नदी, सरोवरे वगैरेमध्ये चालते ती बोट' आणि 'समुद्रात जाते ती शिप' असेही ढोबळपणे म्हणता येईल, पण त्यांच्यामधली ही सीमारेषासुध्दा अस्पष्ट आहे. मोठ्या 'शिप्स'सुध्दा बंदरात येऊन दाखल होण्यासाठी एकाद्या खाडीमधून आत शिरतात आणि मासे पकडण्यासाठी लहान लहान 'बोटीं'मधून कोळी लोक दर्यावर ये जा करत असतात. मराठी भाषेत होडी, नाव, नौका, जहाज, गलबत वगैरे शब्द आहेत. त्यातले काही शब्द 'बोट' या अर्थाने आणि काही 'शिप' या अर्थाने वापरले जातात. 'बोट' या इंग्लिश शब्दाचा मराठीत मात्र जहाज या अर्थानेसुध्दा प्रयोग होतो. 'आगबोट' असा एक अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजी जोडशब्द फक्त यांत्रिक जहाजासाठीच उपयोगात आणला जातो. पाण्यातून चालणा-या या सर्व वाहनांच्या आकारानुसार आणि उपयोगानुसार त्यांच्या रचनेमध्येही फरक असतो.


अगदी लहानशा होडीत ती चालवणा-या आणि इतर माणसांना बसायला फक्त एक दोन फळकुटे असतात. थोड्या मोठ्या नावेत फळ्या जोडून बनवलेला सपाट पृष्ठभाग (फ्लोअर) असतो. बहुतेक लहान होड्यांमध्ये तो वरच्या बाजूला उघडा असतो, पण प्रवाशांसाठी चालवल्या जाणा-या काही नावांमध्ये त्याच्यावर हलकेसे छप्पर असते. बहुतेक वेळा उघड्या जागेला 'डेक' आणि बंद जागेला केबिन असे म्हणतात. त्यामुळे काही नावांमध्ये केबिनच्या माथ्यावर डेक असते. काही लाँचेस डबलडेकर असतात, त्यांना केबिनचे दोन मजले आणि शिवाय एकादी डेक असते. मोठ्या जहाजांमध्ये पाण्याच्या पातळीवर असलेल्या डेकच्या खाली होल्ड असतात. त्या होल्डचे अनेक कप्पे करून जहाज चालवणारी यंत्रे, इंधन, हत्यारे, औजारे, अन्नधान्य वगैरेसारख्या गोष्टी त्या कप्प्यांमध्ये ठेवतात. डेकच्या वर 'सुपरस्ट्रक्चर' उभारलेले असतात. कॅप्टन आणि इतर अधिका-यांची राहण्याची व्यवस्था, आगबोटीचे कार्यालय, नियंत्रणकक्ष (कंट्रोव रूम), संपर्काची (कम्युनिकेशन) साधने वगैरेंचा समावेश त्यात केलेला असतो.

जहाजांचा आकार सर्वच बाजूने वक्राकार असल्यामुळे त्याची मोजमापे देण्याची विशिष्ट परिभाषा आहे. ती सोबत दिलेल्या आकृतीमध्ये दाखवली आहे. आगबोटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या अंतराला 'लांबी (लेंग्थ)' असेच म्हणतात, पण मधोमधच्या भागाच्या रुंदीला मात्र 'बीम' असे नाव आहे. डेक आणि सुपरस्ट्रक्चरचा भार तोलण्यासाठी अनेक आडव्या तुळया (बीम्स) बसवलेल्या असतात त्यातली सर्वात मोठी 'बीम' जहाजाच्या रुंदीएवढी लांब असते. जहाजाच्या बाहेरील पाण्याच्या पातळीपासून ते जहाजाच्या तळापर्यंत त्याच्या पाण्याखाली बुडलेल्या भागाच्या उंची किंवा खोली याला 'ड्राफ्ट' असे म्हणतात. आगबोटीला कोणत्याही बंदरात नेण्यापूर्वी या सगळ्या मोजमापांचा विचार करणे आवश्यक असते. त्या बंदरात किंवा गोदीमध्ये इतकी लांब आगबोट मावेल एवढी रिकामी जागा असली पाहिजे, तिचा आत जाण्याचा मार्ग बीमपेक्षा रुंद असायला हवा आणि तिथल्या पाण्याची खोली ड्राफ्टहून जास्त असली पाहिजे. असे असेल तरच ती आगबोट सुखरूपपणे बंदरात जाऊन उभी राहू शकते. आगबोटीचा जितका भाग पाण्यात बुडलेला असेल तेवढे पाणी तिने बाजूला सारून ती जागा व्यापलेली असते आणि त्या पाण्याच्या वजनाइतका पाण्याचा जोर तिला वर उचलून धरत असल्यामुळेच ती पाण्यावर तरंगत असते. त्या पाण्याच्या वजनाला डिस्प्लेसमेंट किंवा टनेज असे म्हणतात. मोठ्या आगबोटींसाठी ते हजारो टन असते.

आगबोटीचे मुख्य भाग या आकृतीमध्ये दाखवले आहेत. तिच्या सर्वात समोरच्या टोकाला 'बो' असे म्हणतात. त्याला 'आगबोटीचे नाक' म्हणता येईल. या 'बो'चा आकार नाकाप्रमाणेच निमूळता असतो. पाण्यामधून जहाज पुढे जात असतांना समोरील पाण्याचे दोन भाग होऊन ते जहाजाच्या दोन्ही बाजूला जाय़ला त्यामुळे मदत मिळते आणि पाण्याचा विरोध कमी होतो. समोरील भाग सपाट असल्यास समोरचे पाणी मागे ढकलले जाईल आणि मागे असलेल्या पाण्याच्या रेट्याने ते पुन्हा आगबोटीला धडकेल, शिवाय ते उंच उसळून आगबोटीत शिरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी बो ला विशिष्ट आकार दिलेला असतो. त्या जागी आगबोटीतले काहीच नसते. तिची यंत्रसामुग्री मागील टोकाला पाण्याच्या खाली असते. त्या टोकाच्या डेकवरील भागाला स्टर्न असे म्हणतात. आगगाडीचे इंजिन सर्वात पुढे असते, विमानाची इंजिने त्याच्या बाजूच्या पंखांवर असतात. मोटारीचे इंजिन बहुधा पुढे असले तरी ते मागल्या चाकांना जोडलेले असते पण स्टिअरिंग व्हील पुढल्या चाकांना जोडलेले असते, आगबोटीचे इंजिन, पंखा (प्रोपेलर), सुकाणू (रडर) वगैरे सगळेच महत्वाचे भाग मागील भागात पाण्याच्या पातळीच्या खाली बसवलेले असतात. प्रोपेलरची पाती पाण्याला मागे ढकलतात आणि त्याच्या प्रतिक्रियेने आगबोट पुढे जाते. सुकाणूच्या कलण्यामुळे ती दिशा बदलते. इंग्लंड आणि अमेरिकेतल्या रस्त्यावरील रहदारीमध्ये डावा उजवा भेद असला तरी आगबोटींसाठी मात्र जगभरात सारखेच नियम आहेत. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, रशीया, भारत, चीन अशा कुठल्याही देशाच्या आगबोटीच्या डाव्या अंगाला पोर्टसाईड असे म्हणतात. बोटीत चढण्या व उतरण्याची सोय या बाजूलाच केलेली असते. पलीकडील बाजूला स्टारबोर्ड साईड म्हणतात. समुद्रात उठत असलेल्या लाटांमुळे त्यातली जहाजे, नौका वगैरे सारखी पुढे मागे होत असतात. ती अशीच सोडली वहात वहात कुठेही जातील. ते होऊ नये म्हणून आगबोटीला भर समुद्रात किंवा बंदरात आल्यावर एका ठिकाणी स्थिर ठेवण्यासाठी मोठमोठे नांगर (अँकर) असतात. ते एका लांब आणि दणकट साखळीच्या टोकाला अडकवलेले असतात. एका रहाटाच्या (पुलीच्या) सहाय्याने ते पाण्यात सोडले की तळापर्यंत जाऊन तिथल्या गाळात रुतून बसतात. मुक्काम हलवतांना त्यांना यंत्रांच्या सहाय्याने पुन्हा वर उचलून घेतात आणि रहाटाला गुंडाळून ठेवतात.


जहाजांच्या उपयोगानुसार त्यांचे दोन मुख्य प्रकार असतात, नागरी उपयोग आणि सैनिकी सामर्थ्य. विमानांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या आधी त्रिखंडातल्या दूरच्या प्रवासासाठी आगबोट हेच मुख्य साधन होते. त्या काळात प्रवासी आणि माल या दोन्हींची वाहतूक आगबोटींमधूनच होत असे. युरोप आणि आशिया खंडांमधील विभागांना जोडणारे जमीनीवरचे चांगले रस्ते अस्तित्वातच नव्हते आणि उपलब्ध असलेले मार्ग अनेक देशांमधून आणि दुर्गम भागांमधून जात असल्यामुळे त्या मानाने सागरी प्रवास जास्त सोयीचा आणि कमी धोका असलेला असे. औद्योगिक क्रांतीमुळे मोठमोठ्या आगबोटी तयार करता येऊ लागल्याने हे शक्य झाले होते. युरोपमधील कारखान्यांना आशिया खंडातून, मुख्यतः भारतातून कच्चा माल पुरवणे आणि औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या युरोपमध्ये तयार होणारा पक्का माल मागासलेल्या देशांमध्ये आणून विकणे हा किफायतशीर धंदा झाला होता. त्या पूर्वीच्या काळातल्या वास्कोडिगामाला आफ्रिका खंडाला मोठा वळसा घालून भारताकडे यावे लागले होते. पण आगबोटींची ये जा खूप वाढल्यानंतर हा लांबचा प्रवास कमी करण्यासाठी सुवेझचा कालवा खणून हिंद महासागर आणि भूमध्य समुद्र यांना जोडण्यात आले. त्याचप्रमाणे अमेरिका खंडाच्या पूर्व आणि पश्चिम किना-यांवरील शहरांमधील वाहतूक सुकर करण्यासाठी पनामाचा कालवा खोडून अंतर कमी करण्यात आले. केवळ आगबोटींच्या सोयीसाठी एवढे मोठे आणि कठीण प्रकल्प त्या काळात बांधले गेले यावरून एका काळी असलेले त्यांचे महत्व लक्षात येईल.

आजकाल हवाई वाहतूक स्वस्त आणि सुरक्षित झालेली आहे आणि ती अत्यंत वेगाने होत असल्यामुळे त्याला आगबोटीच्या मानाने अत्यल्प वेळ लागतो. अर्थातच प्रवाशांचा कल आता पूर्णपणे विमानाने प्रवास करण्याकडे आहे. पॅसेंजर शिप्स आता शिल्लक तरी आहेत की नाही याची शंका आहे. पण गंमत, मौज मजा करण्यासाठी आता लक्झरी क्रूझच्या सफरी निघाल्या आहेत. शहरांपासून दूर समुद्रात हळूहळू चालणा-या जहाजावर सर्व सुखसोयींनी युक्त अशा या तरंगत्या आलीशान महालांमध्ये दोन चार दिवस मौजमजा, दंगामस्ती करण्यासाठी नवश्रीमंत लोक त्यांचा लाभ घेतात. माल वाहतुकीसाठी, विशेषतः जड मालासाठी आजसुध्दा आगबोट हाच सर्वात चांगला आणि किफायतशीर पर्याय आहे. खनिजलोह, कोळसा, तेल, धान्ये, सिमेंट, साखर वगैरे अनेक वस्तूंची आयात निर्यात आगबोटींमधूनच होते. त्यासाठी आता खास प्रकारच्या आगबोटी, टँकर्स वगैरे तयार केल्या जातात. इतर वस्तूंचे जहाजांवर चढवणे आणि उतरवणे सोपे करण्यासाठी त्या कंटेनर्समध्ये ठेवल्या जातात आणि बंदरावरील क्रेन्सच्या सहाय्याने सहजपणे हाताळल्या जातात.

सैनिकी कार्यासाठी किंबहुना युध्दात उपयोगी येण्यासाठी विशिष्ट प्रकारची वेगळी गलबते पूर्वापारपासून तयार केली जात आहेत. त्या जहाजांवर तोफा, दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे ठेवलेली असत आणि त्यांचा कुशल उपयोग करू शकणारे लढवय्ये तैनात असत. त्यासाठी आरमार हा सैन्यदलाचा एक वेगळा विभाग तयार केला जात असे. या आरमारांमध्ये सागरी युध्दे होत असत. इंग्लंडच्या आरमाराने एका काळी इतर मुख्य देशांच्या आरमारांवर विजय मिळवून समुद्रावर आपली निरंकुश सत्ता प्रस्थापित केली आणि त्याच्या जोरावर जगाच्या पंचखंडात आपल्या वसाहती स्थापन केल्या. काही शतके आपापसांमध्ये लढाया केल्यानंतर युरोपियन देशांनी समझोता करून आशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडांमधले भूभाग वाटून घेतले आणि ते काबीज करण्यावर लक्ष केंद्रित करून तिथे आपापल्या देशांच्या वसाहती स्थापन केल्या. औद्योगिक क्रांतीमधून निर्माण झालेल्या यंत्रसामुग्रीतून आणि दारूगोळ्यामुळे आरमारातल्या युध्दनौका अधिकाधिक सक्षम आणि आक्रामक होत गेल्या.

काळाबरोबर प्रगत झालेल्या नवनव्या प्रकारच्या तोफा आणि क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) यांनी आरमारातल्या आगबोटी अधिकाधिक सुसज्ज होत गेल्या. आगबोटींमधून किना-यावरील शहरांवर हल्ले करता येऊ लागले. त्यांचा प्रतिकार आणि त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी जहाजांना बुडवणारी टॉर्पेडोसारखी अस्त्रे तयार करण्यात आली. विमानांमधून बाँबगोळे टाकून आगबोटींना नष्ट करणे सोपे होते. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी खास विमानविरोधी तोफा तर निघाल्याच, शिवाय लढाऊ विमानांचा ताफाच सोबत घेऊन जाणा-या अजस्त्र आकाराच्या आगबोटी (एअरक्राफ्ट कॅरीयर) तयार करण्यात आल्या. अशा आगबोटींवरून उड्डाण करता येण्याजोगी खास विमाने बनवली गेली. 

आपल्या युध्दनौका शत्रूला दिसू नयेत म्हणून त्यांना पाण्याखालून गुपचुप नेण्याच्या दृष्टीने लढाऊ विमानांच्या आगमनाच्या आधीपासूनच प्रयत्न चाललेले होते. पहिल्या महायुध्दात त्यांना जोराने चालना मिळाली आणि त्यातून  पाणबुड्या तयार झाल्या. कुठलेही जहाज पाण्यावर तरंगत असते तेंव्हा त्याचे वजन त्याने बाजूला सारलेल्या पाण्याइतके असते हे आपण पाहिलेले आहे. हे वजन वाढवत नेले की अखेर ते जहाज पाण्यात बुडते. एकदा का ते बुडले की त्यात पाणी शिरून त्याचे वजन आणखी वाढत जात असल्यामुळे त्याला सुप्रसिध्द टायटॅनिक जहाजासारखी कायमची जलसमाधी मिळते. जहाजावरील माणसे आणि सामान पाण्यात बुडून नुकसान होते. जहाज पाण्याखाली गेल्यानंतर त्याला वर आणण्यासाठी त्याचे वजन पुन्हा कमी कसे करायचे आणि त्यावरील माणसे आणि माल यांना पाण्याखाली कसे सुरक्षित ठेवायचे ही पाण्यात बुडून पुन्हा वर येऊ शकणारी जहाजे तयार करण्यामध्ये दोन मुख्य आव्हाने होती.

जहाज पाण्याखाली गेले तरी त्यातल्या माणसांना श्वासोच्छ्वासासाठी हवा लागणारच. त्यासाठी त्या माणसांना संपूर्णपणे हवाबंद (एअरटाईट) खोल्यांमध्ये ठेवणे आवश्यक आहे. पाण्याखाली गेल्यानंतरसुध्दा त्या जहाजांच्या यंत्रांनी काम करत रहायला पाहिजे आणि त्यांना चालवण्यासाठी किंवा त्यांच्या रखरखाव (मेटेनन्स) आणि दुरुस्ती (रिपेअर)साठी कामगारांना त्या यंत्रांपाशी जाण्याची आवश्यकता लागणार. अन्नपुरवठा, दारूगोळा, शस्त्रास्त्रे वगैरे पाण्यामुळे खराब होऊ नयेत आणि गरज पडताच ती तत्काळ उपलब्ध व्हायला पाहिजेत, यामुळे तीही पाण्यापासून दूर असायला हवीत. अशा प्रकारे जवळजवळ संपूर्ण आगबोटच एका प्रचंड हवाबंद खोलीच्या स्वरूपात तयार करावी लागते. प्रोपेलर आणि रडर यासारखी एरवीसुध्दा नेहमी पाण्याखाली यंत्रे तेवढी त्या हवाबंद जागेच्या बाहेरच असावी लागतात. पाणबुडीचे वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी त्याच्या रचनेतच काही स्वतंत्र आणि हवाबंद मोकळ्या जागा ठेवल्या जातात. ज्या वेळी पाणबुडी पाण्यावर तरंगत असते तेंव्हा या जागा हवेने भरलेल्या असतात. तिने पाण्याखाली जायचे ठरवल्यानंतर त्या जागांमध्ये समुद्राचे पाणी भरले जाते. त्यामुळे ती जड होऊन खाली खाली जात रहाते. पण तिने सागराच्या पार तळापर्यंत जाऊन पोचणेही धोक्याचे असते. त्यामुळे तिला दोनतीनशे मीटर खालील ठरलेल्या पातळीपर्यंत जाऊ दिल्यानंतर एका कॉम्प्रेस्ड गॅस सिलिंडर्समध्ये साठवून ठेवलेली हवा त्या मोकळ्या जागेत सोडून तिथे असलेल्या पाण्यातल्या थोड्या भागाला पुन्हा बाहेर टाकले जाते. त्यामुळे तिचे खाली जाणे थांबते, पण हे करत असतांना पाणबुडी पुन्हा हलकी होऊन वर येणार नाही किंवा जड असल्यामुळे खालीही जाणार नाही या दोन्हींची काळजी घ्यावी लागते. हा समतोल अत्यंत काटेकोरपणे सांभाळून पाणबुडीला पाण्याखाली एका ठरलेल्या पातळीवर ठेवतात. या पातळीवरसुध्दा ती एका जागी स्थिर नसते, तर तिच्या गंतव्य स्थानाच्या दिशेने पुढे पुढे जात असते. इतक्या खोल पाण्यात सगळीकडे अंधारगुडुपच असतो, प्रत्यक्ष काहीच दिसू शकत नाही. सोनारसारख्या आधुनिक उपकरणांच्या सहाय्यानेच सगळी माहिती जाणून घेऊन पाणबुडीचालकाला मार्गक्रमण करायचे असते. 

पाणबुडी हीसुध्दा एक प्रकारची आगबोटच असल्यामुळे तिला चालवणारे इंजिनाचे एक मोठे धूड असते आणि त्यातल्या इंधनाचे ज्वलन होण्यासाठी खूप हवेची आवश्यकता असते. त्यासाठी महिनोंमहिने पुरेल एवढी हवा सिलिंडर्समध्ये भरून नेणे अशक्यप्राय असते. त्यामुळे इंधनावर चालणारी पाणबुडी थोडे दिवसच पाण्याखाली राहते आणि तिच्या इंजिनांना श्वास घेऊ देण्यासाठी तिला पाण्याच्या बाहेर येऊन काही काळ रहावेच लागते. अणुशक्तीचा विकास झाल्यानंतर इंधन तेलांवर चालणा-या इंजिनांच्या जागी अॅटॉमिक रिअॅक्टर बसवला गेला. त्याला काम करत राहण्यासाठी हवेची आवश्यकता नसते. अशा पाणबुडीतल्या माणसांना दीर्घ काळ पुरेल एवढा प्राणवायूचा साठा सोबत नेला आणि त्यांनी उच्छ्वासामधून बाहेर टाकलेला कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साईड) वायू शोषून घेण्याची व्यवस्था केली तर ती पाणबुडी महिनोगणती पाण्याखाली दडून राहू शकते. अशा पाणबुडीलासुध्दा नौसैनिकांसाठी अन्नपाणी, कपडे लत्ते वगैरे आणणे, विजेची बॅटरी चार्ज करणे अशा कामांसाठी कधी ना कधी पाण्याबाहेर यावे लागतेच, पण हे योजनापूर्वक करता येते आणि केले जाते.  . 

प्राचीनकालीन होडी ते अणुशक्तीवर चालणारी आधुनिक पाणबुडी हा जलप्रवास घडण्यात हजारो वर्षांचा कालावधी गेला. या लेखाच्या फक्त दोन भागात त्याचा अत्यंत संक्षिप्त असा आढावा घेण्याचा हा एक तोकडा प्रयत्न मी केला आहे. अरिहंत आणि सिंधूरक्षक या आधुनिक पाणबुड्यांबद्दल ज्या बातम्या अलीकडे वृत्तपत्रांमधून येऊन गेल्या त्यांचा अर्थ समजण्यासाठी या लेखात दिलेल्या माहितीचा थोडा उपयोग व्हावा असा उद्देश या खटपटीमागे आहे.   
---------------------------------------
पुढील भाग -  होडी ते पाणबुडी आणि ... मी
http://anandghan.blogspot.in/2013/08/blog-post_23.html

Sunday, August 18, 2013

होडी ते पाणबुडी (पूर्वार्ध)खाद्यवस्तू शोधण्यासाठी जंगलात भटकत असतांना आदिमानवाला काही ठिकाणी पडलेले मोठे दगड आणि झाडाचे ओंडके दिसले. त्यांना हाताने उचलून बाजूला करणे अशक्य होते, ओढत किंवा ढकलत नेणेसुध्दा कठीण होते, पण त्यातले गोलाकार धोंडे किंवा ओंडके यांना गडगडत नेणे त्यामानाने सोपे होते. या निरीक्षणावरून लागलेला 'चाकाचा शोध' हा मानवाच्या उत्क्रांतीमधला एक महत्वाचा टप्पा मानला जातो. ज्या प्रदीर्घ कालखंडात चाक, अग्नी, भाषा वगैरेंचा उपयोग आदीमानव करू लागला त्याच काळात त्याने निसर्गात घडत असलेली आणखी एक महत्वाची गोष्ट पाहिली. नदीच्या काठावरील झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या पाण्यात पडल्या तर त्या तरंगतात आणि पाण्याच्या प्रवाहासोबत सहजपणे वहात वहात पुढे जातात, सरोवराच्या संथ पाण्यात पडलेला लाकडाचा मोठा ओंडकासुध्दा हाताने कुठल्याही दिशेने ढकलणे सोपे असते. या ज्ञानाचा त्याने उपयोग करून घेतला. काही ओंडके एकमेकांना जोडून त्याचे तराफे बनवले आणि त्यावरून जलवाहतूक सुरू झाली.

हळू हळू इतर बाबतीतही मानवाची प्रगती होत गेली आणि त्याने कु-हाड, करवत, पटाशी यासारखी सुतारकामाची हत्यारे तयार केली. त्यांचा उपयोग करून त्याने झाडांचे बुंधे आणि फांद्या कापून त्या लाकडापासून अनेक उपयोगाच्या वस्तू तयार केल्या. काही झाडांच्या रुंद किंवा पोकळ बुंध्यांमधून नावा कोरून काढल्या, लाकडाच्या ओंडक्यांना कापून त्याच्या फळ्या केल्या, त्या फळ्यांना विशिष्ट आकार दिले आणि त्यांना एकमेकांशी जोडून होड्या तयार केल्या आणि त्यांना चालवण्यासाठी वल्हे, दिशा देण्यासाठी सुकाणू वगैरेंनी सुसज्ज केले. निरनिराळ्या आकारांच्या नावा, नौका, पडाव, जहाजे, गलबते वगैरेसारखी पाण्यावर तरंगणारी एकाहून एक सरस आणि मोठी अशी वाहने तो तयार करत गेला. यातली लहानशी कॅनू एकटा माणूससुध्दा जमीनीवर असतांना उचलून खांद्यावर घेऊन कुठेही घेऊन जाऊ शकतो आणि पाण्यात सोडल्यानंतर तिला वल्हवत पुढे नेऊ शकतो, पण मोठी आणि लांबलचक नाव चालवण्यासाठी अनेक लोकांनी एका लयीत वल्हे मारावे लागतात. तसे करण्याची सोय असलेल्या नौका आपल्याला ओणमच्या सुमाराला केरळात होत असलेल्या रेसेसमध्ये दिसतात. नौकेला एक शीड बांधून केलेली यॉट आणि अनेक शिडे असलेली अवाढव्य गलबते यांना चालवण्यासाठी माणसाने निसर्गातल्या वा-याच्या शक्तीचा उपयोग करून घेतला. नौकेच्या नायकाला ज्या दिशेला तिला न्यायचे असेल तिकडे वाहणारा वारा सुटला की ही शिडे म्हणजे कापडाचे पडदे उंचावतात. त्यात वारा भरला की त्यांना ढकलत पुढे नेतो. पण उलट दिशेने वारा वहायला लागला, तर लगेच शिडे गुंडाळून ठेवतात आणि समुद्राच्या तळाशी नांगर टाकून त्या जहाजाला जागच्या जागी खिळवून ठेवतात. पुढच्या प्रवासासाठी ते नाविक वा-याची दिशा बदलण्याची वाट पहात राहतात. अशा प्रकारे मजल दरमजल करीत महासागर ओलांडण्याचा पराक्रम हे दर्यावर्दी करत असत. 

यंत्रयुग सुरू झाल्यानंतर या क्षेत्रातही अनेक बदल आणि सुधारणा होत गेल्या. आधी वाफेच्या इंजिनांचा शोध लागल्यावर कोळसा जाळणारे बॉयलर्स आणि वाफेची इंजिने मोठ्या जहाजांवर बसवण्यात आली. त्या इजिनांना जोडलेले अवाढव्य पंखे (प्रोपेलर्स) पाण्याला मागे ढकलून जहाजांना गती देऊ लागले. यावरून 'शिप' या शब्दासाठी 'आगबोट' असा मराठी प्रतिशब्द रूढ झाला. पूर्वीच्या काळातल्या गलबतांची शिडे उंचावणे आणि त्यांना गुंडाळून ठेवणे, अनुकूल वा-याची वाट पहात राहणे वगैरे करावे लागत असे. इंजिन बसवल्यानंतर त्याची गरज उरली नाही. अवाढव्य आकारांची शिडे बांधण्यासाठी उभे करावे लागणारे खांब नाहीसे झाल्यामुळे त्यांनी व्यापलेली जागा रिकामी झाली. अशा अनेक कारणांमुळे वाफेचे इंजिन लगेच पॉप्युलर झाले. पण त्यासाठी कोळसा आणि पाणी यांचा मोठा साठा जहाजांवर न्यावा लागत असे. खनिज पेट्रोलियम तेलापासून डिझेल, पेट्रोल वगैरे इंधने काढली गेल्यानंतर सुटसुटीत आकाराच्या डिझेल इंजिनांचा वापर सुरू झाला. लहान आकाराच्या होड्यांसाठी लहान इंजिने आणि पंखे वगैरे बसवून मोटरबोटी आणि लाँचेस तयार झाल्या. हाताने वल्हे मारून किंवा शिडाच्या सहाय्याने चालवायच्या नौका आता फक्त क्रीडाक्षेत्रात दिसतात. रोइंग आणि यॉटिंग या नौकानयनाच्या स्पर्धांचा समावेश ऑलिंपिक गेम्समध्येसुध्दा होतो. प्रवासी आणि मालवाहतूक आणि संरक्षणासाठी उपयोगात येणा-या बहुतेक सगळ्या नौकांना आता डिझेल इंजिने बसवलेली असतात. अधिक वेगवान बोटींसाठी इंजिनांच्या ऐवजी टर्बाइन्स असतात. अणुशक्तीचा शोध लागल्यानंतर काही आगबोटी अॅटॉमिक रिअॅक्टरच्या जोरावर चालवल्या जाऊ लागल्या आहेत. पण त्यांचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. 

या सगळ्या लहान किंवा मोठ्या होड्या आणि प्रचंड आकाराच्या जहाजांच्या रचनेतसुध्दा काही प्रमाणात साम्य असते. यातले कुठलेच वाहन बसगाडीप्रमाणे सरळसोट चौकोनी ठोकळ्यासारखे तर नसतेच, चौरस, पंचकोनी, षट्कोनी  किंवा वर्तुळाकार तबकडीच्या आकाराचेही नसते, त्यांचे आकार नेहमी लांबुळके आणि बसकेच असतात, त्यांचा मध्यभाग सर्वात जास्त रुंद असतो, दोन्ही बाजूंनी तो निमुळता होत जातो. त्याचप्रमाणे नेहमी पाण्याच्या बाहेर राहणारा वरचा भाग सर्वात रुंद असतो आणि खालच्या बाजूने त्याची रुंदी कमी कमी होत जाते. सर्वच बाजूंना भरपूर गोलाई दिलेली असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास एकाद्या माशाला त्याच्या तोंडापासून शेपटापर्यंत लांबीच्या दिशेने आडव्या रेषेत  मधोमध  कापल्यावर त्यातल्या अर्ध्या भागाचा जो आकार येईल साधारणपणे तसा आकार सर्व नावांना दिलेला असतो. पाण्यामधून हालचाल करतांना होत असलेला पाण्याचा विरोध कमीत कमी व्हावा या दृष्टीने निसर्गानेच माशांना असा आकार दिला आहे. होडीचा जेवढा भाग पाण्यात बुडालेला असतो त्याला माशासारखा आकार देऊन त्याच्या पुढे जाण्याला होणारा पाण्याचा विरोध कमी केला जातो.

आर्किमिडीजच्या सिध्दांतानुसार कुठलाही घनरूप पदार्थ पाण्यात बुडवला तर तो त्याच्या आकारमानाइतके पाणी बाजूला सारतो, त्या सारल्या गेलेल्या पाण्याच्या वजनाइतक्या जोराने ते पाणी त्या पदार्थाला वर उचलते. याला बॉयन्सी म्हणतात. यामुळे त्या पदार्थाचे वजन कमी होऊन तो हलका होतो. लाकडासारखा जो पदार्थ पाण्यापेक्षा हलका असतो तो अर्धवट पाण्यात बुडला तरी त्याच्या बुडालेल्या भागामुळे जेवढे पाणी बाजूला सारले जाते तेवढ्याच पाण्याचे वजन वर तरंगणा-या लाकडाच्या वस्तूच्या संपूर्ण वजनाइतके असते. होडीचा जेवढा भाग पाण्यात बुडलेला असतो तितके पाणी तिने बाजूला सारलेले असते, तितक्या पाण्याचे वजन होडीमधल्या सामानासकट तिच्या संपूर्ण वजनाइतके भरते. समजा सुरुवातीला रिकामी होडी ६० टक्के पाण्यात आणि ४० टक्के पाण्याच्या वर असेल आणि आपण त्यात वजनदार सामान भरत गेलो तर तिचे वजन वाढेल आणि तितके वजन उचलून धरण्यासाठी जास्त पाणी बाजूला व्हायला हवे. जास्त पाण्याला बाजूला ढकलण्यासाठी ती होडी खाली जाईल. जर ती ७० टक्केपर्यंत पाण्यात गेली तर तेवढे पाणी बाजूला सारूनच ती जाईल. त्यामुळे पुन्हा तिने जेवढे पाणी बाजूला सारले आहे तेवढ्याच पाण्याचे वजन तिच्या संपूर्ण वजनाइतके भरेल. अशा प्रकारे जेवढे जास्त सामान आपण त्या होडीत ठेवत जाऊ तितकी ती पाण्याच्या आत जात राहील आणि ते प्रमाण १०० टक्क्यावर गेल्यानंतर ती तरंगणारच नाही, पाण्यात बुडून जाईल. यामुळे प्रत्येक नावेत जास्तीत जास्त किती वजन ठेवू शकतो याची मर्यादा ठरलेली असते.

संपूर्णपणे लाकडाची बनलेली रिकामी होडी स्वतः कधीच बुडणार नाही. पण लाकडाची भार वाहण्याची (सहन)शक्ती फार कमी असते. पाण्यात भिजण्यामुळे ती क्षमता आणखी कमी होत जाते. त्यामुळे वजनाखाली लाकडाची फळी तुटू शकते, त्यांचे कमकुवत सांधे निखळू शकतात. लाकडामधली ही शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पोलादाच्या सळ्या किंवा तुळयांच्या मजबूत फ्रेमचा आधार दिला जातो. शिवाय होडीत ठेवले जाणारे बहुतेक सामान आणि माणसे पाण्यापेक्षा जडच असतात. आजकालच्या बहुतेक नावा आणि जहाजे तर पोलादाच्या पत्र्यापासून तयार केली जातात. या सगळ्या कारणामुळे नावेची एकंदर घनता (डेन्सिटी) पाण्यापेक्षा अधिक असते. पण ती पोकळ असल्यामुळे जास्त पाण्याला बाजूला सारते आणि तरंगत राहते. पण होडीला एकादे छिद्र पडले आणि त्यातून बाहेरील पाणी आत शिरत राहिले तर मात्र ती नाव पाण्याने भरून जाऊन पाण्यापेक्षा जड होते आणि बुडते. असे होणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते.

किमान तीन पाय (किंवा खूर) असलेली कोणतीही वस्तू जमीनीवर स्थिर (स्टेबल) राहते, किमान तीन चाके असलेली वाहने व्यवस्थितपणे उभी राहतात. पण पाण्यामध्ये जमीनीसारखा कसलाच भक्कम आधार नसतो. त्यामुळे होडीला सतत तिचा तोल राखणे आवश्यक असते. वरून मोठा आणि खाली लहान असा तिचा आकारच अस्थिर असतो. त्यामुळे नावेच्या आत ठेवलेले वजन संतुलित नसले, एका बाजूला त्याचा जास्त भार पडला तर ती नाव त्या बाजूला  कलंडण्याची शक्यता असते. इंजिन सुरू होतांना आणि थांबतांना नावेला एक धक्का बसतो आणि ती वळण घेत असतांना सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे बाहेरच्या बाजूला कलंडण्याची शक्यता असते. या सगळ्या कलंडण्यामुळे जर नावेची एक बाजू पाण्याच्या पातळीपर्यंत खाली गेली तर तिकडून बाहेरचे पाणी आत घुसेल आणि तिचे असंतुलन जास्तच वाढवेल. नदी किंवा समुद्रात उठणा-या लाटांमुळे तिथले उसळलेले पाणी नावेत येऊन पडण्याचीही शक्यता असते. नावेचे डिझाइन करतांना या गोष्टी लक्षात घेतल्या जातात आणि नावेत तिच्या मर्यादेइतके वजन ठेवल्यानंतरसुध्दा तिचा काही भाग निश्चितपणे पाण्याच्या पातळीच्या वर राहील याची काळजी घेतली जाते. 


 . . . . . .  . . . . . . .  (क्रमशः)

 होडी ते पाणबुडी (उत्तरार्ध) - http://anandghan.blogspot.in/2013/08/blog-post_22.html

Thursday, August 15, 2013

अरिहंत आणि सिंधूरक्षक

नौकेमधून जलविहार, नावेमधून वाहतूक वगैरे क्रिया पुरातन काळापासून चालत आल्या आहेत. उतारूंना नदी पार करून नेणारा एक नावाडी रामायणात आहे आणि नौकेमधून व्यापार करण्यासाठी परगावी व परदेशी जाणारा साधूवाणी सत्यनारायणाच्या कथेत येतो. जेंव्हा जगबुडी आली होती तेंव्हा नोहाने पृथ्वीवरील सर्व पशुपक्षी, प्राणीमात्रांच्या प्रजातींना आपल्या नौकेमधून सुखरूप नेऊन वाचवले अशी पाश्चात्यांची दंतकथा आहे. लाकडापासून तयार केलेल्या होड्या, नावा, जहाजे वगैरे प्रवासाची साधने प्राचीन काळापासून सगळीकडे चालत आली आणि त्यातली काही साधने आजतागायत अस्तित्वात आणि उपयोगात आहेत. पोलादाच्या पत्र्यापासून जहाजांची बांधणी करण्याचे काम औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाले, त्यांचे कारखाने उभारले गेले आणि त्यांमधून लहान, मोठी, अतीप्रचंड, अती वेगवान वगैरे निरनिराळ्या प्रकारांच्या नौका, होड्या, तराफे, आगबोटी वगैरे तयार होत गेल्या. त्यातही मुख्यत्वे प्रवाशांची किंवा सामानाची वाहतूक करणारी आणि युध्दामध्ये शत्रूवर हल्ला करणारी असे दोन गट असतात. त्यांच्या गरजांनुसार त्यांची बांधणी केली जाते. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळात नदी किंवा सागरामधील पाण्याच्या पृष्ठभागावरूनच या सगळ्या नौका तरंगत पुढे जात असत. काही कारणाने त्यातली एकादी नाव एकदा बुडली तर तिला कायमची जलसमाधी मिळत असे. पाण्याच्या पातळीच्या खाली राहून लपत छपत पुढे जायचे आणि शत्रूच्या मोठ्या आगबोटीच्या तळाला जोराचा तडाखा देऊन भगदाड पाडायचे प्रयत्न दोन तीन शतकांपासून केले जात होते. अशा प्रकारच्या लहान पाणबुड्या लाकडांपासूनसुध्दा तयार केल्या गेल्या होत्या. पण त्यांच्या बांधणीमध्ये अनेक त्रुटी उरलेल्या असल्यामुळे त्या फारशा भरोसेमंद किंवा परिणामकारक ठरत नव्हत्या. पहिल्या महायुध्दात मात्र जर्मनीने पाणबुड्यांचा चांगला वापर केला आणि शत्रूपक्षाची म्हणजे इंग्लंडची मोठी जहाजे बुडवून त्यांना चकित केले. इंग्लंड आणि अमेरिकेकडेसुध्दा पाणबुड्या तयार होत्याच. त्यांनीही त्यांचा वापर सुरू केला.

पाणबुडी आणि विमान या दोन्ही साधनांची भेदक शक्ती पहिल्या महायुध्दात दिसून आल्यामुळे त्यानंतर त्यांच्या विकासावर अगदी युध्दपातळीवर प्रयत्न केले गेले आणि दुस-या महायुध्दातील सागरी आणि हवेमधील युध्दातली ती प्रमुख अस्त्रे बनली. दुस-या महायुध्दाने क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रे जगासमोर आणली. त्यानंतरच्या काळात या दोन्हींवर अधिकाधिक भिस्त टाकली जात आहे. देशाच्या संरक्षणाची ती आता प्रमुख साधने झाली आहेत. अरिहंत आणि सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुड्यांच्या संदर्भात ही पार्श्वभूमी महत्वाची आहे. ही दोन नावे गेल्या काही दिवसांमध्ये अचानक प्रमुख बातम्यांमध्ये समोर आली. अरिहंत या पाणबुडीवरील रिअॅक्टर अलीकडे कार्यान्वित झाला आणि अमेरिका, रशीया, चीन यांच्यासारख्या जगामधील निवडक प्रमुख देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले ही उत्साहवर्धक बातमी होती तर सिंधूरक्षक या अत्याधुनिक पाणबुडीवर अचानक एक मोठा स्फोट होऊन त्यात ती जवळजवळ नष्ट झाली आणि तिथे काम करणारे अठराजण म्हणजे देशाचे १८ अनमोल हिरे आपण नाहक गमावले ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक दुर्घटना काल घडली. या दोन्ही पाणबुड्यांची अगदी त्रोटक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

अरिहंत
लांबी ११२ मीटर, रुंदी १५ मीटर, पाण्यात बुडालेली उंची किंवा खोली १० मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ६००० टन
प्रत्येक मजल्यावर दोन बेडरूम्सचे (टू बीएचकेचे) वीस वीस फ्लॅट असलेली तीन मजली बिल्डिंग साधारणपणे एवढ्या आकाराची असते. यावरून आकाराची कल्पना येईल. 
वेग पाण्यावर ताशी २२-२८ किलोमीटर, पाण्याखाली ताशी ४४ किलोमीटर
३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.
ऊर्जेचा स्त्रोतः अॅटॉमिक ऱिअॅक्टर 

सिंधूरक्षक
लांबी ७३ मीटर, डिस्प्लेसमेंट सुमारे ३००० टन
३०० मीटर खोलवर जाऊन काम करू शकते.
वेग ताशी ३३ किलोमीटर,
ऊर्जेचा स्त्रोतः डिझेल इलेक्ट्रिक

या दोन्ही पाणबुड्यांवर कोणत्या प्रकारची किती शस्त्रास्त्रे ठेवता येतील ही माहिती अर्थातच अत्यंत गुप्त ठेवली जाते. पूर्वीच्या काळातले योध्दे हातात तलवार किंवा गदा घेऊन अमोरसमोर येऊन एकमेकांशी झुंजत असत, काही वीर धनुष्यबाण, भाला, बरची वगैरे हाताने फेकून मारा करणारी शस्त्रास्त्रे घेऊन लढत असत. त्यात पिस्तुले, बंदुका, तोफा वगैरेंची भर पडल्यावर शत्रूपासून थोडे अंतर दूर राहून त्याच्या सैन्यावर मारा केला जाऊ लागला. पण तो मारा अचूकपणे फक्त सैन्यावरच करता येणे कठीण असल्यामुळे शत्रुपक्षाची शहरे, कारखाने, पूल, धरणे वगैरेंवर तोफांमधून आणि विमानामधून बाँबगोळे टाकणे सुरू झाले. सागरी युध्दामध्ये पूर्वीच्या काळात युध्दनौकाच एकमेकांमध्ये लढत, प्रवासी आणि मालवहातूक करणारी जहाजे बुडवणे नंतरच्या काळात सुरू झाले. त्यात पाणबुड्यांना त्या जहाजांच्या थोडे तरी जवळ जावे लागत असे. आता क्षेपणास्त्रांचे युग आहे. शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या एकाद्या गुप्त ठिकाणामधून उडवलेली क्षेपणास्त्रे (मिसाईल्स) त्यांच्या लक्ष्याचा अचूक वेध घेतात. पण पहिल्यांदा वार करणा-या देशाने शत्रुपक्षाची अशा प्रकारची सगळी ठिकाणेच एका फटक्यात उध्वस्त केली तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी (सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी) असणे आवश्यक असते. या दृष्टीने रचल्या जात असलेल्या आजच्या युध्दनीतीमध्ये आवश्यक असलेली लांब पल्ल्याची अस्त्रे या दोन्ही प्रकारच्या पाणबुड्यांवर ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे.

अरिहंत हे नाव मी काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा ऐकले आणि सिंधूरक्षक हे नाव तर कालच ऐकले. असे असले तरी या दोन्ही पाणबुड्यांशी माझा खूप दूरचा अप्रत्यक्ष संबंध पूर्वी येऊन गेला होता. अनेक वर्षांपूर्वी आमच्या कॉलनीमध्ये असलेल्या रस्त्यावरून रोज एक खास बस जात असे आणि त्यात नेव्हीचा गणवेश धारण केलेले लोक बसलेले दिसत. ते कदाचित आमची सुरक्षा पहायला आले असतील असे आधी वाटले, पण त्यासाठी रोज रोज येण्याचे काही कारण नव्हते. त्यांचा एकादा नवा सीक्रेट प्रॉजेक्ट असणार याची कल्पना आली. खात्यात इतकी गुप्तता बाळगली जाते की कोणता माणूस नेमके कोणते काम करतो हे कोणीही कधीही सांगू शकत नाही. पण एकाद्याच्या एरवीच्या बोलण्यात हल, डेक असे अनोळखी शब्द यायला लागले की त्याचा आगबोटीशी काही संबंध येत असणार असा तर्क करता येतो. ज्या कारखान्यांमध्ये आमच्या पॉवर प्रॉजेक्टसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते त्याच कारखान्यात संरक्षण खात्यासाठी लागणारी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्रीही बाजूलाच तयार होत असल्यामुळे तीही दिसत असे. त्यांची नावे आणि उपयोग त्या कारखान्यातल्या लोकांपासून सुध्दा गुप्त ठेवली जातात किंवा त्यांना मुद्दाम भलतीसलती नावे दिली जातात. असे असले तरी त्यांची रचना आणि आकार पाहून थोडा अंदाज येतो. अणुशक्ती, संरक्षण खाते आणि आगबोट या तीन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्याची परिणती न्युक्लियर पॉवर्ड सबमरीनमध्ये होणार असे वाटत होते. त्याची बातमी वाचल्यावर तो अंदाज खरा ठरला. पाणबुड्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी रशीयाला जाऊन आलेले एक गृहस्थ मला एकदा भेटले होते. पाणबुडी केवढी अवाढव्य असते आणि तरीही आतमध्ये ती कमालीची कंजस्टेड असते वगैरे मला त्यांच्याकडून कळले होते. आपल्या पूर्वीच्या उत्साही राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील एकदा पाणबुडीच्या आत जाऊन पाहणार होत्या, पण ते शक्य झाले नाही अशी बातमीही वाचली होती. सिंधूरक्षकची बातमी ऐकल्यावर त्याची आठवण झाली.   


Friday, August 09, 2013

अनंता पेठे

'अनंत वासुदेव पेठे' असे त्याचे नाव शाळेच्या हजेरीपटावर होते. त्या काळात रोज रोज हजेरी घेण्याची रीत नव्हती. वर्गावर नजर फिरवताच कोण कोण आले आहेत ते मास्तरांना समजत असे. कधी तरी एकादे नवे शिक्षक क्लास घ्यायला आले आणि त्यांना वर्गातल्या मुलांची हजेरी घेण्याची इच्छा झाली तर इतर मुलांच्या नावांबरोबर ते अनंताचे पूर्ण नाव पण वाचत. एरवी शाळेत, घरी, गल्लीमध्ये आणि गावात सगळे लोक त्याला 'अंत्या' असेच म्हणायचे. त्याला 'अनंता' असेसुध्दा क्वचितच कोणी म्हंटले असेल, मला तरी ते ऐकल्याचे आठवत नाही. तो 'अनंतराव' झाल्यानंतर मला कधी भेटलाच नाही.

अंत्याचे घर आमच्या शेजारच्या आळीमध्ये होते. आमच्या घरापासून सात आठ घरे सोडून त्याचे घर होते आणि तिथून बारा तेरा घरे सोडून पुढे गेल्यावर आमची प्राथमिक शाळा लागत असे. शाळेमधून परत येतांना आम्ही दोघे नेहमी एकमेकांबरोबर येत होतो आणि त्याला त्याच्या घरी सोडून मी आमच्या घरी जात होतो. पण आमचे हायस्कूल एकदम विरुध्द दिशेला होते. त्यामुळे हायस्कूलमधून परत येतांना अंत्या आधी मला माझ्या घरी सोडून, वाटल्यास तिथे एकादा छोटा हॉल्ट घेऊन पुढे त्याच्या घरी जायचा. असे आम्ही जवळ जवळ दहा वर्षे करत होतो.

अंत्या एक सद्वर्तनी, सालस, समजूतदार, सुस्वभावी, मनमिळाऊ म्हणजे 'ए गुड बॉय' म्हणावा असा शहाणा मुलगा होता. अभ्यासात त्याची बरी गती होती. त्याची गणना वर्गातल्या स्कॉलर मुलांमध्ये होत नसली तरी तो सगळ्या परीक्षांमध्ये सगळ्या विषयात नेहमी व्यवस्थित पास होत असे. तो अंगापिंडाने आडदांड नसला तरी धट्टाकट्टा होता. मी मात्र वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा वयाने आणि चणीनेही लहान असल्यामुळे इतर मुलांना थोडा घाबरत असे, पण अंत्यासारखा एकादा मित्र जवळ असला की मला सुरक्षित वाटायचे. त्यामुळे मी नेहमी त्याच्या जवळ रहात असे आणि त्यानेही कधी मला नको म्हंटले नाही. 

अंत्याचे वडील भिक्षुकी करत होते. त्यांचे स्वतःचे उदरभरण तरी झकास चाललेले असणार असे त्यांच्या तुंदिलतनूवरून दिसायचे. "भट्ट जेवले, तट्ट फूगले, घरा जाउनी स्वस्थ नीजले." असे त्या काळातले बडबडगीत ऐकतांना वासूभटांची मूर्ती डोळ्यासमोर येत असे. ते एका यजमानांकडे दुपारच्या भोजनाला गेले. त्या काळात पिटुकल्या चमच्याने जपून तूप वाढत नसत. एका लहान तपेलीमध्ये गरम केलेले तूप घेऊन वाढायला येत आणि पानातल्या भातावर किंवा पोळीवर त्याची धार धरत. वासूभटजींनी त्यांच्या पानात वाढलेल्या पुरणपोळ्यांच्या ढिगावर भरपूर तूप वाढून घेतले. यजमानांनी आग्रह करून आणखी वाढलेल्या पुरणपोळ्याही तुपात चांगल्या भिजवून घेऊन फस्त केल्या आणि तृप्त होऊन ते घरी येऊन झोपले ते कायमचेच. इतका धष्टपुष्ट आणि भरभक्कम असा चांगला चालता फिरता माणूस एवढ्या लहान वयात असा तडकाफडकी जातो हे समजण्यासारखे नव्हतेच, विश्वास ठेवण्यासारखेही नव्हते. कोणी म्हणाले, "त्यांना दृष्ट लागली.", कोणी म्हणाले, "त्यांच्यावर कुणीतरी करणी केली." "त्यांना जोराचा हार्ट अटॅक आला." असे डॉक्टरांनी सांगितले. मग "दृष्ट लागल्यामुळे हार्ट अटॅक आला." किंवा "हार्ट अटॅक यावा म्हणून करणी केली." असे तर्क करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे अंत्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले. दोन तीन खोल्यांचे राहते घर असल्यामुळे ते एकदम रस्त्यावर आले नाहीत, निवा-यासाठी त्यांच्या डोईवर छप्पर होते, पण खाण्यापिण्याचे काय ? थोडी वडिलोपार्जित संपत्ती असेल, वासूभटजींनीही त्यात भर टाकली असेल, जवळचे नातेवाईक असतील आणि त्या कुटुंबाचे गावात खूप मोठे गुडविल होते. यांच्या आधारानेच आता अंत्याला शिकवून तो मिळवता होईपर्यंत गाडा ढकलायचे काम त्याच्या आईवर पडले होते आणि त्या माउलीने ते चांगल्या प्रकारे सांभाळले.

त्या काळातल्या लहान गावांमध्ये वार लावून जेवण्याची पध्दत अस्तित्वात होती. खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबांमध्ये एकादा होतकरू मुलगा दर आठवड्यातल्या एका ठराविक वारी जेवायला येत असे. अशी मुले सोमवारी सोमणांकडे, मंगळवारी कुळकर्ण्यांकडे वगैरे जाऊन जेवून येत. अंत्यालाही असे काही 'वार' मिळाले, त्यातला एक वार आमच्या घरी होता. त्या दिवशी घरी जेवणात जे काही अन्न शिजवलेले असेल ते सर्वांच्या जोडीने त्यालाही पोटभर वाढले जात असे. त्यात कसलाही पंक्तीप्रपंच केला जात नसे. आजकाल काही घरांमध्ये ईनमीन तीन माणसे असली तरी तीसुध्दा वेगवेगळ्या वेळी जेवतात आणि काही घरांमध्ये तर ते तीघे वेगवेगळे अन्नपदार्थ खातात. माझ्या लहानपणी तसे नव्हते, अजूनही सगळीकडे तसे झालेले नाही, पण शहरांमध्ये कुठे कुठे ते पहायला मिळते.

तेंव्हा आमच्याच नव्हे तर गावातल्या कोणाच्याच घरात डायनिंग टेबल नव्हते. स्वयंपाक तयार झाला की पाटपाणी करायची, म्हणजे जमीनीवर ओळीने पाट मांडायचे, त्यांच्या समोर ताटे, वाट्या, पाणी पिण्याची भांडी मांडून ठेवायची, पाण्याने भरलेले तांबे ठेवायचे. त्यानंतर घरातल्या सगळ्यांना जेवण करायला बोलवायचे. घरात जास्त माणसे असली आणि तेवढे पाट मांडायला जागा नसली तर मग मुलांची, पुरुषांची, बायकांची वगैरे निरनिराळ्या पंगती बसायच्या. जितके पाट मांडले असतील त्यावर बसणारी सगळी मंडळी येऊन स्थानापन्न झाल्यानंतर वाढायला सुरुवात होत असे. आधीच वाढून ठेवले तर त्या अन्नावर माश्या बसतील किंवा हळूच मांजर येऊन त्यात तोंड घालेल अशी भीती दाखवली जात असे. त्यामुळे हाक आली की सगळे पटापटा येऊन पाटावर बसत असत. आपल्यामुळे पंगतीचा खोळंबा होऊ नये म्हणून 'वार'करी मुलगा आधीच येऊन बसलेला असे. त्याप्रमाणे अंत्याही जेवणाच्या वेळेच्या थोडे आधी येत असे आणि माझ्याबरोबर गप्पा मारत किंवा खेळत बसत असे. काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि अंत्याचे आमच्या घरी जेवायला येणे थांबले. तरीही शाळेत आणि मैदानात आम्ही रोज भेटत असू, कधी कधी अभ्यास किंवा खेळण्यासाठी तो आमच्या घरीही येत असे. त्यामुळे आमच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. शाळा संपेपर्यंत आमची चांगली गट्टी होती.

शालांत परीक्षेला पूर्वी मॅट्रिकची परीक्षा म्हणत असत. आमच्या वेळेपर्यंत त्याला आधी एसएससी आणि नंतर एसएसएलसी अशी नावे दिली गेली असली तरी मॅट्रिक हेच नाव सगळ्या लोकांच्या तोंडी येत असे. मॅट्रिक झाल्यानंतर सगळ्या मुलांची पांगापांग झाली. ती होणार हे आधीपासूनच सर्वांना माहीत असल्यामुळे सगळ्यांनी तशी मनाची तयारी केलेली होती. रिझल्ट लागल्यानंतर मी सायन्स कॉलेजसाठी मुंबईला चालला गेलो. अंत्या नोकरीच्या शोधात पुण्याला गेला असे समजले. दोन सव्वादोन वर्षे आमची भेट झाली नाही.

मी पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दाखल होऊन तीन चार महिने झाल्यानंतर एकदा तो माझा पत्ता शोधत आमच्या होस्टेलवर आला. त्याला पाहताच माझ्या आनंदाची परमावधी झाली. मधल्या काळात शाळेतल्या सगळ्याच मित्रांशी संपर्क तुटला होता. आता अंत्याकडून पुण्यातल्या मित्रांचे पत्ते लागतील, सवडीने त्यांच्याही भेटी होतील वगैरे मांडे मी मनातल्या मनात खाल्ले. अंत्या कुठे नोकरीला लागला होता ते त्याने सांगितले, पण ते नाव ऐकल्यानंतर तो कारखाना होता की छापखाना होता की दुकान होते याचा मला उलगडा झाला नाही. मीही त्याला जास्त खोदून विचारले नाही. बहुधा त्याच भागात तो रहातही असावा, कदाचित तसे नसेलही. त्याने सांगितलेला त्याच्या राहण्याचा पत्ताही मला त्या वेळी समजला नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असते त्याप्रमाणे माझ्या पुण्याबद्दलच्या ज्ञानाची सीमा शिवाजीनगरपासून डेक्कन जिमखान्यापर्यंतच होती. लकडी पुलाच्या पलीकडे असलेल्या मुख्य पुण्यनगरीमधल्या निरनिराळ्या वारांच्या पेठा आणि त्यातले गणपती, मारुती, त्यांच्या नावांचे गल्लीबोळ वगैरेंच्या भूलभुलैयामध्ये शिरण्याचे धाडस मी अजून केलेले नव्हते. मला त्यासाठी वेळही मिळाला नव्हता आणि कारणही पडले नव्हते. अंत्याबरोबर दोन घटका बोलून जुन्या आठवणींची वरवर उजळणी झाली, काही ताज्या बातम्या समजल्या. त्याच्याच सहाय्याने आता पुणे समजून घ्यायचा विचार आणि तसे प्रयत्न मी बोलतांना करत होतो.

त्यानंतर दोन तीनच दिवसांनी सकाळीच अंत्या माझ्या रूमवर आला. मला लवकर ब्रेकफास्ट करून कॉलेज गाठायचे होते. त्यालाही माझ्या बरोबर मेसमध्ये घेऊन गेलो आणि गेस्ट म्हणून नोंद केली. तिथले ब्रेड, बटर, सॉस,  ऑम्लेट वगैरे त्याला भयंकर आवडले. इतके की दोन दिवसांनी तो पुन्हा सकाळी येऊन हजर झाला आणि येत राहिला. असे तीनचार वेळा झाल्यानंतर मात्र मला त्यावर विचार करावा लागला. त्या कालखंडात आमची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. शक्य तितकी काटकसर करून आणि आपल्या शिक्षणावर कमीत कमी खर्च करून तो भागवण्याचा प्रयत्न मी करत होतो. महिन्याचा सगळा जमाखर्च मला घरी पाठवावा लागत होता. अचानक माझे मेसबिल वाढणे मला परवडण्यासारखे नव्हते. शिवाय इतर मुलांनी रेक्टरकडे तक्रार केली तर त्याचा प्रॉब्लेम आला असता. यामुळे आता पुन्हा जेंव्हा अंत्या येईल तेंव्हा भीड न बाळगता त्याला स्पष्टपणे नकार द्यायचा असे मी मनात ठरवले. पण ती वेळ येणारच नाही हे मला त्या वेळी ठाऊक नव्हते.

दर रविवारी संध्याकाळी आमच्या मेसला सुटी असे. त्या दिवशी आम्हाला बाहेरच खावे लागत असे. काही मुले आपापल्या स्थानिक नातेवाईकांकडे जाऊन त्यांना भेटून आणि त्यांच्याकडे घरचे अन्न खाऊन पिऊन येत असत. माझ्या होस्टेलमधल्या चारपाच मित्रांसह मी जंगली महाराज रोडवरली चालती फिरती शोभा पहात आणि त्यावर भाष्य करत डेक्कनपर्यंत फिरत फिरत गेलो. त्यात आमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. आम्ही पूना कॉफी हाउसपर्यंत जाऊन पोचलो तेवढ्यात समोरच्या फुटपाथवर मला अंत्या दिसला. त्याची आणि माझी नजरानजर होते न होते तेवढ्यात पीएमटीची एक बस आमच्या मध्ये येऊन ट्रॅफिक जाम मध्ये उभी राहिली. हीच घटना महिनाभरापूर्वी घडली असती तर मी आधी जागच्या जागी उभा राहिलो असतो, थोडे मागे किंवा पुढे जाऊन अंत्याला हात दाखवला असता, मी रस्त्याच्या पलीकडे गेलो असतो किंवा तो मधला रस्ता ओलांडून अलीकडे आला असता. माझ्या नव्या मित्रांना सोडून मी त्याच्याबरोबर कुठे तरी गेलो असतो.

पण त्या दिवशी मी तसे केले नाही. रस्त्याकडे पाठ फिरवून मित्रांच्या सोबत पूना कॉफी हाउसमध्ये चाललो गेलो. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त भूक भागवणारा मसाला डोसा खाल्ला आणि मित्रांच्या टोळक्याबरोबर परत रूमवर गेलो. मी काही तरी चुकीचे वागलो अशी पुसटशी जाणीव मनात होत होती, पण दोन दिवसांनी अंत्या आला की आधी त्याला सॉरी म्हणायचे आणि नंतर ठरवलेल्या इतर गोष्टी त्याला सांगायच्या असा विचार करून मी शांतपणे झोपलो. अठरा वर्षाच्या मुलाने यापेक्षा वेगळे वागायलाच हवे होते असे मला नंतरही कधी वाटले नाही. पण त्या दिवसानंतर अंत्या माझ्याकडे आलाच नाही आणि त्यामुळे ती सल मनातच राहून गेली.

मला पूना कॉफी हाउसमध्ये शिरतांना अंत्याने नक्कीच पाहिले असणार. माझ्यासोबत कोणी होते की नाही हे त्याने कदाचित पाहिलेही नसेल. पण मला त्याच्याकडे पाठ फिरवून जातांना पाहून तो मनातल्या मनात काय समजायचे ते समजला किंवा त्याने नको तो गैरसमज करून घेतला कोण जाणे. त्यामुळे रागावून त्यानेही माझ्याकडे पाठ फिरवली की त्यामागे आणखी कोणते कारण होते तेही समजायचा मार्ग नव्हता. त्याच्या ऑफीसचा किंवा घराचा पत्ता मी लिहून घेतला नव्हता आणि "चिमण्या मारुतीच्या पुढे आणि कावळ्या गणपतीच्या अलीकडे" अशा प्रकारचा त्याने तोंडी सांगितलेला पत्ता मला तेंव्हाही लक्षात आला नव्हता, त्यामुळे मी तो विसरून गेलो होतो. त्या रविवारनंतर पहिले आठ दहा दिवस तो आला नाही याचे मला बरेच वाटले होते, पण त्यानंतर त्याने एकदा यावे, वाटल्यास आणखी एक दोन वेळा आमच्या मेसमधला ब्रेकफास्ट खावा असे वाटायला लागले. पण आता एवढ्या मोठ्या पुण्यात मी त्याला कुठे आणि कसा शोधणार होतो? रस्त्यामधून जाता येता माझी नजर भिरभरत त्याला शोधत असे. विशेषतः डेक्कन जिमखान्यावरल्या त्या स्पॉटवर मी पुन्हा पुन्हा रोखून पहात होतो, पण तो तिथेच पुन्हा कसा दिसणार? मी पुण्यात असेपर्यंत मला अंत्या कुठेच भेटला नाही. शिक्षण संपल्यावर मीही पुणे सोडून मुंबईवासी झालो. मागल्या गोष्टी विसरून पुढे जात राहिलो.

अंत्या मला पुण्यात भेटला होता तेंव्हाच अनंता झाला होता, अनंतरावही झाला असणार. पण तो आता कुठे आहे कोण जाणे. त्याला कधी तरी माझी आठवण येत असेल का?

Sunday, August 04, 2013

माझ्या शाळेतल्या मित्रांनो

अंत्या पेठे, सुऱ्या देवधर, पम्या जोशी, अरव्या पोटे, राजा फाटक, लक्ष्या सोमण, वझे, रास्ते, गोटखिंडी .... माझ्या जमखंडीतल्या शाळेतल्या मित्रांनो, आता तुम्ही कुठे आहात? तुम्ही म्हणाल, "पन्नास वर्षं झोपला होतास का रे?" तुमचं म्हणणंही अगदी बरोबर आहे. माझा अपराध मला मान्य आहे. त्यासाठी दोन्ही कान पकडून उठाबशा काढायला मी तयार आहे. पण शाळा सोडल्यानंतर मी ज्या परिस्थितीतून गेलो ती तुम्हीही थोडी अनुभवली असेलच. 

त्या काळात आतासारखे फोन नव्हते, ई मेल नव्हती त्यामुळे एकमेकांना कसा संपर्क करायचा हा प्रॉब्लेम होता खरा, पण ते एक निमित्य होते. त्याहून मोठे कारण म्हणजे मला माझेच प्रॉब्लेम सोडवता सोडवता नाकी नऊ येत होते. घर आणि शाळा या दोन्ही लहानशा पण सुरक्षित डबक्यांमधून एकदम बाहेरच्या जगाच्या  अफाट सागरात मी एकट्याने गटांगळ्या खात होतो.  त्यात मी अगदी बुडून गेलो होतो. आपले नाक कसेबेसे पाण्याबाहेर ठेवायची धडपड करत होतो. त्यात पुन्हा आधी सायन्स कॉलेज, मग इंजिनियरिंग कॉलेज, त्यानंतर नोकरी अशा तीनदा जागा बदलल्या प्रत्येक नव्या जागी नव्या वातावरणात मला हात देऊन मदत करायला नव्या मित्रांची गरज पडत होती आणि ते मिळत होते. त्यातून नवी विश्वे तयार होत गेली आणि आधीच्या जगाशी संबंधच राहिले नाहीत. ते कसे जोडायचे हेही समजत नव्हतं आणि ते जोडायला वेळही मिळत नव्हता. शाळा सोडल्यानंतर सगळे जण दाही दिशांना पांगलेले. कुणाकुणाला आणि कुठे शोधणार?

मध्यंतरी एक दोन लग्नसमारंभांमध्ये सुश्र्या आपटे भेटला होता, त्याच्याकडून कळले की वाश्या आपल्याला सोडून गेला. काही वर्षांनी समजले की सुश्र्यापण राहिला नाही. अगदी योगायोगाने पांबिं परांजपेशी दूरचा नातेसंबंध जुळला होता, त्याच्या घरीही जाऊन आलो, पण तोसुध्दा जास्त काळ राहिला नाही. हणमू मंगळवेढेकर मात्र माझ्याच खात्यात पण निराळ्या जागी नोकरीला लागला होता. हे मला उशीरानेच समजले, पण त्याची अधूनमधून भेट होत होती. आता आम्ही दोघेही रिटायर होऊन एकमेकांपासून दूर निरनिराळ्या ठिकाणी राहतो. त्यामुळे पुन्हा कसला संपर्क राहिला नाही. आता नव्या जागी नवे मित्र जोडणे जवळजवळ अशक्यच दिसते. तसे मला आता खूप नवे मित्र मिळाले आहेत, पण ते सगळे इंटरनेटच्या आभासी दुनियेत आहेत. स्क्रीनवर दिसतात आणि एक दोन ओळी लिहून बोलतात.

आज म्हणे मैत्रीदिवस आहे. अशा वेळी तुमची खूप खूप आठवण येते. एका काळी आपण रोज शाळेत तर भेटत होतोच, पण संध्याकाळी खेळायला जाणं, नंतर कट्ट्यावर बसून तासन् तास खिदळत राहणं, एकमेकांच्या खोड्या काढणं, फिरक्या घेणं, एकमेकांना चिडवणं, कधीकधी तर रडवणं, कडाडून भांडणं, कट्टी करणं, पुन्हा गळ्यात गळे घालणं. हे सगळं त्यानंतर कधीच मला करायला मिळालं नाही. कुणीतरी हळूच मागून आपल्या पाठीत धपाटा मारावा, आपण कळवळून "&# $@* #, माजलास का ?" असे त्याला डाफरावे यातली मजा औरच असते. हे फक्त आपले बालमित्रच म्हणजे तुम्हीच करू शकता. आता तसे करणारे कोणीच आसपास नाहीत याची मनाला चुटपुट लागते आहे. खरंच तुम्ही मला पुन्हा कुठे भेटाल का?

Saturday, August 03, 2013

कोलेस्टेरॉल - काही गैरसमज आणि माहिती - उत्तरार्ध

जमीनीखालून बाहेर काढलेल्या खनिज तेलाचे रिफायनरीमध्ये पार्श्य़ल डिस्टिलेशन केल्यावर त्यामधून निरनिराळी उत्पादने तयार होतात. त्यांचे वर्गीकरण करून ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. या क्रियेमध्ये क्रूड पेट्रोलियम तेल गाळून एका खास निर्वात पात्रामध्ये तापवून उकळत ठेवतात. सर्वात आधी कमी तपमानावर (टेंपरेचरवर) बाष्पीभवन झालेल्या त्यातील द्रवांची वाफ वेगळी बाहेर काढून थंड केल्यावर त्यातून पेट्रोल (गॅसोलीन) निघते. त्यानंतर त्या तेलाचे तपमान वाढवून नेत त्याला तसेच उकळत ठेवतात. थोड्या थोड्या उच्च तपमानावर ते नेत असतांना त्यांतून केरोसीन, डिझेल, ल्युब्रिकेटिंग ऑइल्स वगैरे निरनिराळ्या तेलांची क्रमाक्रमाने वाफ होऊन ती बाहेर निघत जाते. तिला थंड करून ती द्रवरूपात आल्यानंतर त्या तेलांना वेगवेगळ्या टाक्यांमध्ये  साठवतात. 

ही सगळी तेले म्हणजे हैड्रोकार्बन्सच असतात, पण त्यांच्या रेणूंच्या (मॉलेक्यूल्सच्या) रचनेमधील कार्बन आणि हैड्रोजन अणूंची संख्या निरनिराळी असते. त्यामुळे त्यांची घनता (डेन्सिटी), उत्कलनबिंदू (बॉइलिंग पॉइंट), ज्वलनबिंदू (फ्लॅश पॉइंट) वगैरे गुणधर्म निराळे असतात. पाणी (H2O), मीठ (NaCl), चुना (CaCo3) या पदार्थांप्रमाणे पेट्रोल, केरोसीन, डिझेल वगैरे पदार्थांचा एकच केमिकल फॉर्म्यूला नसतो. यातले प्रत्येक तेल हे अनेक निरनिराळ्या संयुगांचे (काँपाउंड्सचे) मिश्रण असते. उदाहरणार्थ पेट्रोल हे एकच द्रव्य नसून काही द्रव्यांचा एक गट किंवा समूह असतो. सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे हे एक सोपे उदाहरण आहे. एका प्रकारचे पण थोडे वेगळे असे अनेक पदार्थ एकेका गटात असणे ही गोष्ट बहुतेक सगळ्याच सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांमध्ये दिसते. पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स), प्रथिने (प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्स) वगैरे अन्नपदार्थांच्या गटांमधील पदार्थांच्या रेणूंची रचना प्रचंड गुंतागुंतीची (काँप्लेक्स) असते. साधारणपणे एका प्रकारची अशी अनेक रासायनिक संयुगे (केमिकल काम्पाउंड्स) एकेका गटात असतात. ते पदार्थ त्या गटाच्याच नावाने ओळखले जातात. त्यातल्या स्निग्धपदार्थांना 'लिपिड' असेही संबोधले जाते. कोलेस्टेरॉलचा समावेश त्यात होतो.

शरीरामधल्या प्रत्येक पेशीमध्ये कोलेस्टेरॉल असतो, पण तो इतर संयुगांच्या रेणूंशी (मॉलेक्यूल्सशी) जोडलेला असतो. त्याला वेगळा काढून त्याचे प्रमाण मोजण्याचे काम साध्या प्रयोगशाळेत होऊ शकत नाही. आपल्या जवळच्या पॅथॉलॉजी लॅब्जमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण मोजण्यासाठी रक्ताची 'लिपिड प्रोफाइल' काढली जाते. रक्तांमधली लिपिड्स काही प्रोटीन्सना सोबत घेऊन 'लिपोप्रोटीन्स' या नावाने वावरत असतात. त्यांचे एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), व्हीएलडीएल (व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स), ट्रायग्लिसराईड्स वगैरे ढोबळ गट करतात. यामधील प्रत्येक गटात असलेल्या कोलेस्टेरॉलची टक्केवारी वेगवेगळी असते आणि त्यांचे गुणधर्मसुध्दा वेगळे असतात. ज्या लिपोप्रोटीन्समध्ये कोलेस्टेरॉलची टक्केवारी जास्त असते ते वजनाने हलके असतात, यामुळे त्यांना एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स) असे म्हणतात, तर याच्या उलट एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)मध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण त्या मानाने कमी असते. रक्ताची तपासणी करतांना या सगळ्या गटांच्या मात्रा मोजल्या जातात.

यात एलडीएल (लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे रक्तामधले प्रमाण सर्वात जास्त असते. तसेच एलडीएलमध्ये कोलेस्टेरॉलही जास्त प्रमाणात असतो. शरीरामधील सर्व पेशींना कोलेस्टेरॉल पुरवण्याची जबाबदारी एलडीएलकडे असते. ती बजावत असतांना जास्तीचा कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साठून त्यांना अरुंद करू शकतो. यामुळे त्याला 'बॅड कोलेस्टेरॉल' असे म्हंटले जाते. एचडीएल (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे काम याच्या उलट असते. एचडीएलमध्ये कोलेस्टेरॉलचा अंश कमी असल्यामुळे शरीरामधील पेशींमधले थोडे कोलेस्टेरॉल शोषून घेऊन ते त्यांना यकृताकडे घेऊन जातात. हे करत असतांना ते रक्तवाहिन्यांची थोडी सफाईही करतात, एलडीएलमधले कोलेस्टेरॉल तिथे रेंगाळत बसले असल्यास एचडीएल त्यांना बकोटीला धरून यकृताकडे परत घेऊन जातात. (व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स)चे चिकटण्याचे गुणधर्म आणि त्यांचे रक्तामधले प्रमाण अगदी कमी असल्यामुळे त्यांचा उपद्रव कमी असतो. रक्तामधल्या लिपोप्रोटीन्स या घटकांचे मिळून जे एकंदर प्रमाण असते त्याला टोटल कोलेस्टेरॉल असे सुटसुटीत नाव दिले आहे. प्रत्यक्षात त्यातला फक्त काही हिस्सा कोलेस्टेरॉलचा आणि उरलेला इतर द्रव्यांचा असतो, पण या बेरजेलाच 'टोटल कोलेस्टेरॉल' असे म्हणायची पध्दत आहे. ट्रायग्लिसराईड्सचा मुख्य उपयोग साखरेप्रमाणेच ऊर्जा मिळण्यासाठी होतो. प्राणवायूशी त्यांचा संयोग होऊन त्यापासून जास्त प्रमाणात ऊर्जा निघते. रक्तामध्ये या द्रव्याचा अतिरेकही धोकादायक असतो.

रक्ताची तपासणी करून आलेल्या रिपोर्टमध्ये टोटल कोलेस्टेरॉलचे प्रमाण २०० mg/dL यापेक्षा कमी असले तर चांगले, २०० ते २४० mg/dL मध्ये असले तर ते कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत आणि २४० mg/dLच्या वर गेले तर मात्र नक्कीच त्यावर उपचार करायला हवेत असे सर्वसाधारणपणे मानले जाते. ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण १५०-१६० यापेक्षा जास्त असल्यास तेही कमी करणे हिताचे असते. हे झाले सर्वसामान्य माणसांसाठी, पण ज्यांना हृदय किंवा मेंदूचा विकार झालेला आहे किंवा एकदा होऊन गेलेला आहे त्यांच्या रक्तवाहिन्या आधीच काही जागी अरुंद झाल्या असतात. त्या आणखी बिघडू नयेत यासाठी त्यांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण आणखी कमी ठेवावे. मधुमेह (डायबेटिस) किंवा उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) हे विकार जडले असतील तर त्यांनीसुध्दा कोलेस्टेरॉलवर जास्त नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ज्या लोकांचे कोलेस्टेरॉल २००च्या वर किंवा जवळ गेले असते, ज्यांना वर दिलेले विकार जडलेले असतात किंवा ते होण्याची संभावना असते, त्यांच्या एचडीएल, एलडीएल वगैरेंचा विचार करून त्यासाठी वेगवेगळ्या मर्यादा दिल्या जातात. त्यातला एचडीएल हा (चांगला) गु़ड कोलेस्टेरॉल  (एकूण) टोटल कोलेस्टेरॉलच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त असायला हवा. किंवा टोटल कोलेस्टेरॉल एचडीएलच्या चौपटीवर असता कामा नये. हा रेश्यो (गुणोत्तर) ३,२ किंवा त्याहूनही कमी असले तर ते चांगले समजले जाते.  

सामान्यपणे आपले शरीर आपण होऊनच कोलेस्टेरॉलवर चांगले नियंत्रण ठेवत असते. पण काही कारणांमुळे ते पुरेसे प्रभावी ठरत नाही आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. यातली प्रमुख कारणे अशी दिली जातात.
१. आहारामधील स्निग्ध पदार्थांचे प्रकार आणि प्रमाण - हा एक मोठा आणि वेगळा विषय आहे. पुढील परिच्छेदात याची माहिती थोडक्यात दिली आहे.  
२. स्थूलपणा - आहार, पचनशक्ती यामधून शरीराला मिळणारी ऊर्जा आणि शारीरिक क्रिया, व्यायाम यामधून होणारा तिचा व्यय यात असंतुलन झाल्यामुळे हा येऊ शकतो.
३. आनुवंशिकता - याला कोणाचाही इलाज नसतो.
४. वयोमान - जसजसे माणसाचे वय वाढत जाते त्याप्रमाणे शरीरातल्या सगळ्याच इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर त्याचा प्रभाव पडतो.
५. इतर आजार - मधुमेह (डायबेटिस) किंवा उच्च रक्तदाब (हाय ब्लडप्रेशर) यासारख्या व्याधी असल्या तर कोलेस्टेरॉलच्या वाढण्यामुळे होणारे परिणाम जास्त धोकादायक ठरू शकतात.

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्याचे, किंबहुना एकंदरीतच निरोगी रहाण्याचे व रोगमुक्त होण्याचे तीन प्रकारचे उपाय असतात. ते आहेत आहारावरील नियंत्रण (पौष्टिकता, पथ्यपाणी वगैरे), व्यायाम आणि औषधोपचार.
१. आहार -  कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये यावर निरनिराळ्या प्रकारची माहिती सारखी दिली जात असते आणि त्यात मतभिन्नता दिसते. वनस्पती तेले (डालडा) किंवा मार्गारिन यासारखे प्रक्रिया केलेले स्निग्ध पदार्थ धोकादायक असण्याची शक्यता जास्त असते असे बहुतेक लोक म्हणतात. काही तेलबिया चांगल्या आणि काही वाईट असल्याचे सांगितले जाते. निरनिराळ्या भागातल्या लोकांचे त्यावर वेगवेगळे मत असते. आयुर्वेदाप्रमाणे तूप हे अत्यंत चांगले अन्न समजले जाते असे बहुतेक वैद्य सांगतात. "आमच्या गोशाळेतल्या गायींना आम्ही निवडक चारा खायला देतो त्यामुळे त्यांच्या दुधापासून आम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने तयार केलेले तूपच तेवढे सुरक्षित असते." असेही त्यातले काही हुषार वैद्यराज सांगतात. काही कंपन्यांकडून त्यांच्या कंपनीच्या तेलांमध्ये बॅड कोलेस्टेरॉल नसते असे दावे केले जातात, पण ते तेल खाल्ल्यानंतर शरीरात ते तयार होत असले तर त्या दाव्याला अर्थ उरत नाही. माझे व्यक्तीगत मत असे आहे की काय खावे किंवा खाऊ नये यापेक्षा ते किती प्रमाणात खावे हे महत्वाचे आहे. त्यामुळे काजूबदामांपासून ते तीळ, खोबरे किंवा शेंगदाण्यापर्यंत काहीच मी वर्ज्य समजत नाही. कोणतेच अन्न गरजेपेक्षा जास्त खाऊ नये, तळलेले पदार्थ फक्त रुचीपालट म्हणून चवीपुरतेच खावेत आणि वेळोवेळी रक्ताची तपासणी करून कोलेस्टेरॉल किती आहे यावर नजर असू द्यावी. एवढी सावधगिरी माझ्या मते पुरेशी आहे. ज्यांना काही व्याधी जडलेल्या आहेत त्यांनी मात्र डॉक्टरांचा आणि डायटीशियनचा सल्ला घ्यावा आणि तो पाळावा.
२. व्यायाम - याचा अर्थ व्यायामशाळेत जाऊन जोरबैठका काढणे किंवा जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे एवढाच नाही. ज्यांना ते शक्य असेल त्यांनी ते अवश्य करावे, पण इतरांनीसुध्दा नेहमीच आपल्या शरीराच्या भरपूर हालचाली करत रहायला हवे. आळशीपणावर ताबा ठेवला तर रोजच्या आयुष्यातही हातपाय चालवून करण्यासारखी अनेक कामे असतात. तीही नसतील तर मोकळ्या हवेत नियमितपणे सलग वीस पंचवीस मिनिटे तरी चालत जाऊन येणे शक्य असते. आपल्या आहारातून जेवढ्या कॅलरीज शरीराला मिळतात तेवढ्या त्या खर्च झाल्या तर कोलेस्टेरॉलवर शरीरच नियंत्रण ठेवते.
३. औषधोपचार - आनुवंशिक कारणांमुळे किंवा मध्यमवय उलटून गेल्यानंतर पथ्य आणि व्यायाम करूनसुध्दा कोलेस्टेरॉलच्या वाढण्यावर समाधानकारक नियंत्रण रहात नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने योग्य तेवढा औषधोपचार करणे आवश्यकच ठरते. पण औषधे घेणे हा आहारनियंत्रण आणि व्यायाम याचा पर्याय मानू नये, त्याला पूरक मानावे. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी कदाचित दोन वेगवेगळी औषधे किंवा त्यांचे काँबिनेशन्सही घ्यावी लागतात. औषधे घेण्याबरोबरच नियमितपणे रक्ताची तपासणी करून घेणेसुध्दा आवश्यक असते.

याखेरीज योगासने, प्राणायाम वगैरें उपचारसुध्दा आरोग्यासाठी लाभदायक असतात. ते आधीपासून नियमितपणे चालू ठेवले तर कदाचित कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी काही करण्याची गरजच पडणार नाही. आपल्याला मनःशांतीचीही खूप गरज असते किंवा तिचा शरीरावर चांगला परिणाम होत असतो असे म्हणतात. मन अस्वस्थ असेल तर निश्चितच त्याचा त्रास होतो हे सर्वांनाच ठाऊक असते. त्यामुळे कदाचित रक्तचाप (ब्लडप्रेशर) वाढेल, शांत झोप लागणार नाही आणि त्यामुळे इतर व्याधी निर्माण होतील अशा शक्यता असतातच.

कोलेस्टेरॉलवर मला ठाऊक असलेली माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न मी या लेखात केला आहे. मी या विषयावरला तज्ज्ञच काय पण विद्यार्थीसुध्दा नाही, पण मी दिलेली माहिती शक्य तितकी अचूक असावी हे तपासून घेण्याचा थोडासा जाणीवपूर्वक प्रयत्न मात्र मी केला आहे.

Thursday, August 01, 2013

कोलेस्टेरॉल - काही गैरसमज आणि माहिती - पूर्वार्ध

परवा एका दवाखान्यात गेलो असतांना तिथे मी एक संभाषण ऐकले. एक महिला, आपण तिला 'प्रतिमा' म्हणू, तिच्या मैत्रिणीला सांगत होती. "अगं, मी तुला काय सांगू? काल आम्ही एका नातेवाईकांकडे गेलो होतो. त्यांनी मस्त टेस्टी आणि गरमगरम बटाटेवडे केले होते. पण म्हणून काय पाच सहा खायचे का? तरी मी प्रतीकला 'आता पुरे कर' असं सारखं सांगत होते, पण ते लोक आग्रह करताहेत आणि हा आपला खातोय् ! आता सकाळपासून जिवाला कसं तरी वाटतय् म्हणाला म्हणून त्याला इथे घेऊन आले. त्याचा ईसीजी काढायला पाहिजे असं डॉक्टर म्हणताहेत. कालच्या बटाटेवड्यातलं सगळं कोलेस्टेरॉल त्यात येणार बघ ! कालचे ते वडे त्या लोकांनी कसल्या तेलात तळले होते कोण जाणे !"
तिची मैत्रिण, वाटल्यास आपण तिला 'सुनीता' म्हणू , त्यावर उद्गारली, "अगं, सुशांत गेले कित्येक वर्षे नुसत्या कोरड्या पोळ्या खातोय्, भातावरसुध्दा थेंबभर तूप पडू देत नाही. तळलेल्या पापडाचा तुकडाही त्यानं कधी तोंडात टाकलेला नाही. पण त्याचा उपयोग काय ? डॉक्टर म्हणताहेत की त्याचं कोलेस्टेरॉल म्हणे खूप वाढलंय्. खरंच ते कसं शक्य आहे गं? यांचंही कायतरीच आपलं !"

अशा प्रकारची वाक्ये अलीकडे अनेक वेळा कानावर पडत असतात. वर्तमानपत्रे आणि टीव्हीवर या कोलेस्टेरॉलबद्दल कसल्या ना कसल्या तथाकथित माहितीचा आणि जाहिरातींचा इतका भडिमार सतत चाललेला असतो की हे इतके अवघड नावसुध्दा आता ज्याच्या त्याच्या तोंडी बसले आहे. पण 'तेल' म्हणजे 'कोलेस्टेरॉल' आणि 'ते आपल्या हृदयाला घातक' अशी त्याच्याबद्दलची ढोबळ समीकरणेही रूढ होऊन बसली आहेत. मग त्यावर उपाय म्हणून "स्वयंपाकात आमचेच तेल वापरा, त्यात कोलेस्टेरॉल नसते." अशा जाहिराती काही उत्पादक करत असतात. सुशांतसारखी काही माणसे अतीसावध किंवा थोडी घाबरट असल्यामुळे तेच विशिष्ट तेल वापरतात आणि प्रतीकसारखे मनमौजी लोकसुध्दा "आता हे तेल वापरले तर आपल्याला वाटेल तेवढे तळकट खायला हरकत नाही." असे समजून त्या खास तेलाचा अवलंब करतात. अखेर दोघेही आयसीयूमध्ये जाऊन पोचले की "आपलं काय चुकलं?" याचा दोघेही विचार करत राहतात.

कोलेस्टेरॉलविषयी प्रचलित असलेली अर्धवट माहिती आणि काही गैरसमज या सगळ्याच्या मुळाशी असतात. ते थोडेसे दूर करण्याचा एक प्रयत्न मी या लेखात करणार आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोलेस्टेरॉल हा कोणी राक्षस किंवा आपला शत्रू नसून आपल्या शरीरामधला एक अत्यावश्यक घटक आहे. मानवी शरीराच्या प्रत्येक पेशीच्या आवरणांध्ये कोलेस्टेरॉल असतेच असते. त्यामुळे आपले शरीरच हा घटक निर्माण करत असते.  सर्वसामान्य माणसाच्या रक्ताच्या तपासणीमध्ये जेवढे कोलेस्टेरॉल सापडते त्यातला सुमारे तीन चतुर्थांश भाग त्याच्या शरीरामध्येच तयार झालेला असतो आणि एक चतुर्थांश त्याच्या खाण्यामधून आलेला असतो. जेवणात जास्त स्निग्धपदार्थ खाल्ले तर त्यामुळे रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता असते, पण त्या प्रमाणाचा आणि आहारामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाचा गणितामधल्या समीकरणासारखा थेट संबंध नसतो. शरीरात तयार होत असलेल्या सगळ्याच द्रव्यांच्या निर्मितीवर त्याचे काटेकोर नियंत्रण असते. त्यामुळे खाण्यात जास्त स्निग्धपदार्थ आले तर ते शरीरात कमी तयार केले जाऊ शकतात. शरीरामधील पेशींची झीज होत असते त्याचप्रमाणे श्वसनामधून घेतलेल्या प्राणवायूशी संयोग होऊन त्यामधील द्रव्यांचे ऑक्सिडेशन होत असते. त्यात सारखे थोडे कोलेस्टेरॉल नष्ट होत असते, नवीन पेशींची रचना करण्यासाठी सुध्दा कोलेस्टेरॉलचा उपयोग केला जात असतो. यामुळे शरीरामधील कोलेस्टेरॉल अणूंच्या संख्येमध्ये घटही होत असते आणि आहारामधून मिळणारे व शरीरात तयार होणारे कोलेस्टेरॉल मिळून त्याची भरपाई करण्यात येत असते.

आपल्या पोटातली यकृत किंवा लिव्हर नावाची एक मोठी केमिकल्सची फॅक्टरी शरीराला लागणारे निरनिराळ्या प्रकारचे रस आणि श्राव तयार करत असते, त्यात कोलेस्टेरॉलचाही समावेश आहे. यकृत हा एक कारखाना आहेच. शिवाय ते एक तात्पुरते गोडाऊनसुध्दा आहे. रक्तामध्ये किती प्रमाणात साखर किंवा स्निग्ध पदार्थ असावेत याचे नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो. जास्तीचे पदार्थ यकृतात ठेऊन घेतले जातात आणि गरजेनुसार ते परत रक्तात पाठवले जात असतात. फक्त तेल आणि तूपच नव्हे तर पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) यांचेसुध्दा तिथे काही प्रमाणात स्निग्धपदार्थात रूपांतर केले जाते आणि ते पदार्थ हळूहळू रक्तप्रवाहात मिसळले जातात. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ मिळत असल्यास ते चरबीच्या रूपात ठिकठिकाणी साठवले जातात. ही सगळी उलाढाल रक्तप्रवाहामधूनच होत असते.

कोलेस्टेरॉल हा जर एक शरीराचा उपयुक्त आणि आवश्यक घटक आहे तर त्याची एवढी दहशत का निर्माण झाली आहे? काही लोकांच्या मते तर औषध कंपन्यांनी राईचा पहाड करणा-या प्रचारामधून ती मुद्दाम तयार केली गेली असावी. हा मुद्दा थोडा बाजूला ठेऊन कोलेस्टेरॉलच्या विरोधात कोणते मुद्दे आहेत, शरीरावर त्याचे कोणते वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे हे पाहू. कोलेस्टेरॉल एरवी जरी चांगले असले तरी 'अती तेथे माती' या म्हणीचे हे एक उदाहरण देता येईल. सर्वसामान्यपणे मुले आणि युवकांमध्ये शरीराला आवश्यक एवढेच कोलेस्टेरॉल वेळोवेळी तयार केले जात असते आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला त्याचा पुरवठा केला जात असतो. पण यावर नियंत्रण करणा-या यंत्रणेत मध्यम वयानंतर किंवा उतारवयामध्ये काही बिघाड झाला तर मात्र शरीरात गरजेपेक्षा जास्त कोलेस्टेरॉल तयार होत राहते आणि त्याचे रक्तामधले प्रमाण वाढत जाते. त्याच्या या वाढण्यामुळेही रक्ताभिसरणावर काही परिणाम होत नाही किंवा कोणत्या अवयवालाही कसलीही बाधा पोचत नाही. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचे कसलेही बाह्य लक्षण दिसून येत नाही, पण हे जास्तीचे कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूला चिकटून राहते आणि कॅलशियमसारखी इतर द्रव्ये त्यात मिसळली गेली तर त्याचे थर तयार होतात. या थरांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात तसेच त्यांचा लवचीकपणा कमी होतो. त्यामुळे त्यांमधून वहात असलेल्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. हा प्रकार शरीरभर होत असला तरी हातापायांवर त्यामुळे मुंग्या येणे यासारखा सौम्य परिणाम दिसतो, पण हृदयाच्या कप्प्यांचे आकुंचन व प्रसरण करणा-या स्नायूंनाच जर पुरेसा रक्तप्रवाह मिळाला नाही तर ते व्यवस्थित काम करत नाहीत आणि त्यातून हृदयविकार निर्माण होतात. मेंदूमधल्या रक्तवाहिनीत अडथळा निर्माण झाला आणि मेंदूला पुरेसे रक्त मिळाले नाही तर पक्षाघात (पॅरॅलिटिक स्ट्रोक) होऊ शकतो. या दोन्हींमध्ये प्राणहानी होण्याचीसुध्दा शक्यता असते.

वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे आता साथीचे रोग आटोक्यात आले आहेत, साप, विंचू चावणे किंवा वाघसिंहाने खाणे असले अपमृत्यूचे प्रकार तर आता इतिहासजमा झाले आहेत. यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढले आहे. त्याची जीवनशैली बदलून सुखासीन झाली आहे. या कारणांमुळे हृदय आणि मेंदू यांच्या विकारांची टक्केवारी खूप वाढली आहे. ते जडण्याची भीती सर्वांना वाटते, कसलीही पूर्वसूचना न देता ते अचानक हल्ला करतात, त्यातून जे लोक वाचतात त्यांच्या हृदय किंवा मेंदूची झालेली हानी काही वेळा कधीच भरून निघत नाही. या शक्यतेमुळे त्या विकारांबद्दल वाटणा-या भयात आणखी भर पडली आहे. पण कोणतेही पूर्वलक्षण न दिसतांना रक्ताची तपासणी केली तरी कोलेस्टेरॉलचे वाढणे हे या रोगांचे एक संभाव्य कारण समजू शकते आणि त्यावर वेळीच उपचार केल्यास ते आटोक्यात आणता येणे शक्य आहे. यामुळे त्यावर आता प्रकाशझोत पडत आहे.

वर दिलेल्या विवेचनावरून हे स्पष्ट होते की प्रतिमाला वाटले त्याप्रमाणे आज खाल्लेल्या वड्यांमधल्या एकदोन चमचे तेलाचा लोंढा पोटातून थेट हृदयात जाऊन तिथे गडबड घोटाळे निर्माण करेल असे घडत नाही. अन्नामधील कोलेस्टेरॉल रक्तामध्ये जाऊन पोचण्याची आणि त्याचे प्रमाण वाढण्याची क्रिया खूप संथ असते. आपण खाल्लेले अन्न पचल्यानंतर त्याचा रस हळूहळू रक्तामधून शरीरभर पसरत असतो. त्यातले कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूला चिकटून त्याचे थर तयार होण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात. ही क्रिया आधीपासून घडत आलेली असेल, पण बाह्य लक्षण नसल्यामुळे ती कोणाच्या लक्षात आली नसेल. त्या अवस्थेत असतांना एकादे तात्कालिक निमित्य झाले तर ते कावळा बसायला आणि झाडाची फांदी मोडायला गाठ पडण्यासारखे असेल.

त्याचप्रमाणे एकाद्याने अजीबात तेलतूप खाल्लेच नाही तर त्याच्या रक्तात कुठून कोलेस्टेरॉल येणार? असे जे सुनीताला वाटते तेही शास्त्रीय दृष्ट्या बरोबर नाही. रक्तात कोलेस्टेरॉल येण्यासाठी ते अन्नामधल्या तेलकट तुपकट पदार्थांमधून पोटात जाण्याची मुळीच गरज नसते. इतर जनावरांच्या खाण्यात असे स्निग्ध पदार्थ कुठे येतात? पण त्यांच्या शरीरातसुध्दा कोलेस्टेरॉल निर्माण होतेच. पिष्टमय पदार्थ (कार्बोहैड्रेट्स) आणि प्रथिने (प्रोटीन्स) यांचेपासूनसुध्दा आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल तयार केले जाते. भातावर तूप न घेता पण गरजेपेक्षा जास्त भात खाल्ला तरी त्यानेसुध्दा रक्तामधले कोलेस्टेरॉल वाढत जाऊ शकते.

रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची मात्रा किती आहे याची तपासणी करणे, त्याच्या रिपोर्टाचा अन्वयार्थ लावणे, त्यावरील नियंत्रण वगैरे मुद्दे पुढील भागात पाहू.

.  . . . . . .  . . . . . . . . . . . . . . . (क्रमशः)