Tuesday, December 23, 2008

मेरि ख्रिसमस भाग २


आम्ही गोवा पाहण्यासाठी मुद्दाम ख्रिसमसच्या वेळेतच गेलो होतो. एक तर डिसेंबरमध्ये तिथले हवामान उत्तम असते, त्या वेळेस उकाडा किंवा पाऊस नसतो आणि शिवाय ख्रिसमसचा उत्सव. त्यामुळे अर्थातच पर्यटकांची तोबा गर्दी उडते. पण गोव्याचे लोक सगळे सांभाळून घेतात. आम्ही पणजी शहराच्या भरवस्तीत हमरस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात मुक्काम केला होता. सागरकिनाऱ्यावरील निवांतपणात शांतपणे विश्राम करण्यापेक्षा गजबजलेला भाग पाहून लोकांच्या उत्साहात सहभागी होण्याची आम्हाला इच्छा होती. ती चांगल्या प्रकारे फलद्रूप झाली.

घराघरांवर चांदण्यांच्या आकाराचे आकाशकंदील लावलेले होते. कांही ठिकाणी सुंदर ख्रिसमस ट्री लावून त्यांना छानपैकी सजवले होते. कुठेकुठे बायबलमधल्या गोष्टीमधले देखावे मांडले होते. दुकाने आणि हॉटेले प्रकाशात झगमगत होती आणि गर्दीने फुललेली होती. सगळ्या चर्चेसमध्ये नाताळनिमित्य खास धार्मिक कार्यक्रम ठेवले होते. रस्त्यावर फिरत असलेल्या लोकांत फॅशनेबल आणि आकर्षक पेहराव घालण्याची चढाओढ लागली होती. एकंदरीत गोव्यातल्या वातावरणातच चैतन्य संचारले होते.

दोन वर्षे आम्ही नेमके ख्रिसमसच्याच दिवसांत इंग्लंडला गेलो होतो. त्यातल्या एका वर्षी त्या दिवशी हिमवर्षाव झाला आणि सगळीकडे बर्फच बर्फ झाले. याला तिकडे 'व्हाईट ख्रिसमस' म्हणतात, तोही पहायला मिळाला. त्यात पाहण्यापेक्षा थंडीने कुडकुडणेच जास्त होते. तिकडे घरांच्या सजावटीपेक्षा खरेदी आणि भेटवस्तू देणे यालाच जास्त महत्व दिसले. ज्या लोकांना शक्य असेल ते तर सुटी काढून कुठल्या तरी उबदार जागीच चालले जातात. शॉपिंग मॉल्समध्ये मात्र या सगळ्याची कसर भरून काढली जाईल इतकी प्रचंड सजावट आणि दिव्यांचा नुसता झगमगाट असतो. दोन तीन मजले उंचीचे अवाढव्य ख्रिसमस ट्री लावतात आणि हजारो शोभिवंत वस्तू त्याला टांगतात. कांही ठिकाणी सांताक्लॉजच्या वेषात पांढरी दाढी लावलेली माणसे हिंडत असतात आणि दिसेल त्याला "मेरि ख्रिसमस" म्हणत शुभेच्छा देत असतात, तर कांही जागी त्याला बसण्यासाठी पुरातनकाळाचा आभास निर्माण करणारी खास सजवलेली गुहा बनवलेली असते. त्याच्या आंत जाऊन त्याला भेटण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतात. सांताक्लॉजबाबाचे मुखवटे, लाल डगले आणि गोंडा सावलेल्या टोप्या या गोष्टींना या काळात प्रचंड मागणी असते. या वर्षी मी ख्रिसमसला अमेरिकेत आहे. इथले वातावरणसुध्दा साधारणपणे इंग्लंडमध्ये दिसले तसेच आहे. इथली दुकाने अवाढव्य आहेत आणि त्यांना साजेशी रोषणाई आहे. तसेच नवनव्या आकर्षक वस्तू मांडून ते खचाखच भरलेले दिसतात. खरेदी करून परतणाऱ्या बहुतेक लोकांच्या ट्रॉल्या भेटवस्तूंनी भरलेल्या असतात.

कांही हुषार लोक या सणाच्या दिवसांत बाजारात जाऊन कोणत्या नव्या वस्तू आल्या आहेत, कुठल्या गोष्टींना खूप उठाव आहे वगैरे बारकाईने पाहून घेतात आणि टूथपेस्ट, साबणासारख्या रोज लागणाऱ्या जिन्नसा घेऊन घरी येतात. उत्सव संपला की एक दिवस सुटी घेऊन बाजार उघडला की बहुतेक नव्या वस्तूंना 'मूळ किंमत २० पौंड, ख्रिसमससाठी १५ पौंड आणि आज घेतल्यास ४.९९ पौंड' अशा प्रकारची लेबले लावलेली असतात. त्यांच्या जोडीला 'त्वरा करा. ही सवलत साठा शिल्लक असेपर्यंतच' वगैरे सूचना असतात. जागा अडवणारी खेळणी आणि इतर शोभेच्या वस्तू तर 'टके सेर भाजी, टके सेर खाजा' विकणाऱ्या 'पौंड शॉप'मध्ये जाऊन पोचतात. या वेळेस मात्र ही हुषार माणसे बाजारावर तुटून पडतात आणि तिथला फुगलेला साठा संपवायला मदत करतात. त्यात आपले भारतीय वंशाचे लोक मोठ्या संख्येने दिसतात. एक दीड पौंडात मिळणाऱ्या वस्तू ते डझनांवारी नेतात. भारतात सुटीला गेल्यावर आपल्या आप्तांना वाटायला ती बरी पडतात. कुठे कुठे तर भारतीयांची गर्दी पाहून आपण कनॉट प्लेस किंवा कुलाबा कॉजवेला आलो असल्याचा भास होतो.

या सगळ्याचा येशू ख्रिस्ताच्या जन्माशी काय संबंध आहे? त्याला जन्माला येऊन दोन हजार वर्षे होऊन गेली. आता त्यात एवढा आनंद वाटण्यासारखे काय आहे? असे प्रश्न बुद्धीवादी किंवा खडूस वृत्तीचे लोक विचारतील. पण हे जगभर सगळीकडेच चालत आले आहे. रामनवमी, गोकुळाष्टमी वगैरे तिथी आपण उत्साहाने साजरे करत होतो, आजकाल गांधी जयंती, शिवजयंती आणि आंबेडकर जयंती यांचा सोहळा होतो. त्या दिवशी त्या देवाच्या मूर्तीची पूजा आणि त्या महात्म्याच्या पुतळ्याला किंवा तसबिरीला हार घालण्यची औपचारिकता आटोपण्यापलीकडे त्यांना किती महत्व दिले जाते आणि त्यांच्या जीवनापासून किंवा शिकवणीपासून पासून कोणता धडा आपण त्या दिवशी घेतो यावर विचार करावा लागेल.

पण त्याबाबतीत अगदीच निराश होण्याचे कारण नाही. गांधीजयंतीच्या दिवशी जर दहा लोकांनी दारू पिणे सोडायचे ठरवले तर त्यातला एकादा तरी पुन्हा त्या मार्गाने जात नाही आणि तीन चार लोकांना पुन्हा घेतांना कुठे तरी त्यांच्या मनाला त्याची टोचणी लागते आणि त्यावर थोडे नियंत्रण येते. त्यामुळे थोडा फरक पडतच असेल. दुसरे म्हणजे सगळ्याच लोकांना या ना त्या प्रकारे मनातला आनंद व्यक्त करायची एका प्रकारची हौस असते. ती पुरवण्यासाठी एक निमित्य मिळाले आणि एक सर्वमान्य पद्धत मिळाली तर त्यांना तो एकत्रपणे व्यक्त करता येतो. त्यात तो अनेकपटीने वाढतो.

या निमित्याने मनातला आनंद व्यक्त करणे असेच असेल तर आपल्यालासुद्धा ख्रिसमसच्या निमित्याने थोडीशी मौजमजा करायला काय हरकत आहे? आणि शुभेच्छा तर कोणालाही कधीही द्याव्यात. तेंव्हा सर्व वाचकांना माझ्याकडून ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!
 'मेरी ख्रिसमस!'

No comments: