Wednesday, December 03, 2008

खाऊन माजू नकोस !


"एक वेळ खाऊन माजलास तरी चालेल पण टाकून माजू नकोस." असे माझ्या लहानपणी सतत आमच्या कानीकपाळी सांगितले जायचे. त्या काळातल्या सगळ्याच मुलांना ही शिकवण दिली जात असे आणि त्यांचे आईवडील आपल्या आचरणातून ती गोष्ट मुलांच्या मनावर ठसवत असत. "जितके अन्न तू पानात टाकशील तेवढे तुला पुढच्या आयुष्यात कमी पडेल, तेवढी उपासमार होईल, तेवढी भीक मागावी लागेल." वगैरे प्रकारच्या तंब्या दिल्या जात असत. मेजवान्यांमध्ये प्रचंड आग्रह करून पानात वाढले जात असे, पण सर्वांनी सावकाशपणे ते सगळे अन्न उदरात ढकलल्यानंतरच ती पंगत उठे. पानात टाकून उठणे म्हणजे अगदीच अशिष्टपणा किंवा असंस्कृतपणाचे लक्षण समजले जायचे. अन्न वाया जाऊ नये हा चांगला उद्देश यामागे असला तरी ते टाकले जाऊ नये याकडेच सगळे लक्ष असायचे. कसेही करून ते कोणाच्या तरी पोटात गेले म्हणजे सत्कारणी लागले असे समजले जात असे.
त्या काळात बहुतेक लोकांची शेतीवाडी असे पण रोख उत्पन्न फारसे नसे. त्यामुळे स्थानिक शेतीत जे धान्यधुन्य, भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध असेल तेच सर्व लोकांचे मुख्य अन्न असे. वाहतूकीची एवढी चांगली व्यवस्था नव्हती आणि फक्त टिकाऊ वस्तूच बाहेरून येत असत. त्या स्थानिक मालाच्या मानाने खूपच महाग असत. चहा, कॉफी आणि बिस्किटे या खेरीज पॅक केलेले कोणतेही अन्नपदार्थ मी लहानपणी पाहिलेसुद्धा नाहीत. ज्वारी हे आमच्या भागातले मुख्य पीक होते. गहू व तांदूळसुद्धा बाहेरून आणावे लागत असत आणि बाजारात ते ज्वारीच्या चौपट महाग असत. शिवाय ज्वारी घरचीच असे. त्यामुळे ज्वारीची भाकरी हा सर्वांचा, अगदी श्रीमंत लोकांचासुद्धा मुख्य आहार होता. जेवणे सुरू असतांनाच भाक-या भाजून वाढण्याची पद्धत असल्याने त्या कधी फारशा उरत नसत. त्यामुळे वाया जायचा प्रश्नच नव्हता. भाजीपाला व फळफळावळ फक्त ऋतुमानाप्रमाणे मिळत असे. जेंव्हा त्यांचा बहर असेल तेंव्हा त्यांची लयलूट असे आणि इतर दिवसात ती पहायलादेखील मिळत नसत. फक्त सणासुदीलाच पक्वान्ने खाल्ली जात. आज शहरात रोजच्याच जेवणात पोळी असते आणि नेहमीच घरात केळी आणून ठेवलेली असतात. त्यामुळे मुलांना 'रोज रोज पोळी शिकरण' करून दिली तरी मुले ती खाणार नाहीत. माझ्या लहानपणी मात्र असे देणारी 'मामाची बायको सुगरण' असणार असे वाटणे साहजीक होते. साधी चटणी भाकरी असो किंवा शिरापुरी असो, स्वयंपाकघरात जे कांही शिजवले जाईल ते पूर्णपणे खाऊन संपवले गेले पाहिजे यावर कटाक्ष असायचा.
हा हट्ट कितपत बरोबर होता याचा विचार करावा लागेल. शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळते तसेच त्याची जी झीज होते तिची भरपाई करण्यासाठी अन्नातून आवश्यक ती तत्वे मिळतात हे खरे. पण ही गरज भागवण्यासाठी जितक्या अन्नाची गरज आहे त्याहून जास्त अन्न खाल्ल्यावर त्याचे काय होते? शरीराला आवश्यक तेवढ्या वस्तू घेतल्यानंतर त्याची पचनक्रिया मंदावते. तिची कार्यक्षमता कमी होते आणि न पचलेला भाग उत्सर्जक इंद्रियांमार्गे शरीराच्या बाहेर टाकला जातो. पचन झालेल्या अन्नाचा संपूर्ण उपयोग झाला नाही तर जास्तीचे रस मेदवृध्दी करतात. तरुणपणी आपल्याला ते चांगले वाटते. पण मध्यमवयानंतर यातून अनेक प्रकारचे विकार निर्माण होतात. उतारवय झाल्यावर तर गोड खाल्ले की रक्तातली साखर वाढते, खारट खाल्लाने रक्तदाब वाढतो, तिखटाने आम्लपित्ताचा त्रास होतो आणि ओषट पदार्थ तर फारच भयंकर! असे करून सारे खाणेपिणे बंद होऊन जाते. नको असतांना खाल्ल्याचे परिणाम लगेच आणि प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे जास्तीचे खाण्यापेक्षा ते टाकणे परवडते.
आपण अन्नाच्या निर्मितीचे पूर्ण चक्र पाहिले तर काय दिसते? शेतकरी शेतात काबाडकष्ट करतात, पण तासभर काम केले की दहा किलो उत्पादन वाढले असा त्याचा सरळ हिशोब नाही. पाऊस न पडणे किंवा तो अवेळी पडणे यांचा पिकावर परिणाम होतो. उभ्या पिकांवर रोग पडतात, गुरे ती खातात, पक्षी त्यातले दाणे वेचतात अशा अनेक प्रकाराने त्यातला कांही भाग नाश पावत असतो. बाजारात आलेले सगळेच धान्य ग्राहकांपर्यंत पोचत नाही. त्यातला कांही भाग पोरकिडे आणि उंदीर खातात तर कांही गोदामातच सडून जातो. या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न चाललेलेच असले तरी थोडे नुकसान अपरिहार्य असते. खाल्लेल्या अन्नावर पोसलेल्या किती मानवदेहांचा सत्कारणी उपयोग होतो आणि किती लोक नुसतेच खायला काळ आणि भुईला भार होतात हा एक वेगळाच विषय आहे. तेंव्हा या चक्रामधील शिजवलेले अन्न पोटात घालणे एवढ्या एकाच कडीला इतके जास्त महत्व कां द्यायचे?
लोकांनी अन्नाची मुद्दाम नासाडी करावी असे म्हणण्याचा माझा उद्देश नाही. त्याचा अपव्यय शक्य तोंवर टाळावाच. पण त्यासाठी मुळातच गरजेपेक्षा जास्त शिजवू नये किंवा पानात वाढून घेऊ नये. गरजेपेक्षा जास्त खाणे हा देखील एक प्रकारचा अपव्ययच आहे. त्यामुळे टाकून तर माजू नयेच पण खाऊनसुद्धा माजू नये.

No comments: