Sunday, September 25, 2022

जमखंडीची देवस्थाने


 आमची जमखंडी हा मुख्य ब्लॉग या पानावर पहा आनंदघन: आमची जमखंडी (anandghan.blogspot.com)

माझे लहानपण १९४५ ते १९६१ या काळात जमखंडी गावात गेले. ते आधी एक संस्थान होते, स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबई इलाख्यात विलीन झाले, राज्यपुर्रचनेनंतर ते मैसूर राज्यात गेले आणि त्या राज्याचे नाव कालांतराने बदलून कर्नाटक असे झाले. माझ्या लहानपणच्या काळातले तिथले वातावरण बरेचसे धार्मिक होते. लहान मुलेसुद्धा भक्तीभावाने देवळात जाऊन देवांच्या पाया पडत असत, साष्टांग नमस्कार आणि प्रदक्षिणा घालीत असत, उत्साहाने भजन करत असत आणि उत्सुकतेने कीर्तन ऐकत असत. त्या काळात घरात कुठलीच करमणुकीची साधने नव्हती, गावात एक सिनेमा थेटर होते, पण मुलांनी सिनेमा पाहणे जवळ जवळ वर्ज्य होते, मी जे दोन चार चित्रपट पाहिले ते सगळे धार्मिक होते. देवळातले भजन, कीर्तन यासारखे कार्यक्रम ही सुद्धा एक प्रकारची मौज वाटत असे आणि मित्रांच्या घोळक्यात रमतगमत देवांच्या जत्रेला जाणे ही आमची पिकनिक असायची. मी ते गाव सोडून आता साठ वर्षे होऊन गेली असली तरी माझ्या काही जुन्या आठवणी ताज्या राहिल्या आहेत आणि मी त्यांच्या आधारानेच हा लेख लिहीत आहे. मात्र इथे दिलेली छायाचित्रे अलीकडच्या काळातली आहेत.

अर्थातच गावातल्या गल्लीगल्लीमध्ये निरनिराळ्या देवतांची मंदिरे होती आणि सोमवारी शंकराच्या, मंगळवारी देवीच्या, गुरुवारी दत्ताच्या अशा प्रकारे वार आणि तिथीनुसार त्या त्या देवतांच्या देवळांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असे. शिवाय वर्षातल्या ठराविक काळात त्यांचे उत्सव दणक्यात साजरे केले जात असत आणि त्या निमित्याने खास कार्यक्रम ठेवलेले असत. जमखंडीहून पायी चालत जाता येईल एवढ्या अंतरावर असलेल्या काही देवस्थानांच्या ठिकाणी वार्षिक जत्रा भरत, एका ठिकाणी अबूबकरचा उरूसही भरत असे. अशा वेळी त्या त्या जागी आजूबाजूच्या खेड्यांमधले लोकही येऊन गर्दी करत असत.


जंबुकेश्वर हे जमखंडीतले पुरातन काळातले देवस्थान आहे, ते जागृत समजले जात असे. तिथे काही शतकांपूर्वी संपूर्णपणे दगडांनी बांधलेले शंकराचे अतिप्राचीन देऊळ आहे. त्याचे खांब, तुळया, छत वगैरे सगळे काही दगडांच्या मोठमोठ्या फरशांनी तयार केले आहे. तिथे प्राचीन काळापासूनची शंकराची पिंडी तर आहेच.  अलीकडच्या काळात तिथे एक शंकराची भव्य अशी मूर्ती स्थापन केली आहे. 


जंबुकेश्वराच्या देवळाजवळच शंकरमठाची भव्य वास्तू उभारण्यात येत आहे.

 

उमारामेश्वर मंदिरउमारामेश्वर नावाचे त्या मानाने आधुनिक, तरीही आता शंभर दीडशे वर्षाहून जुने असे शंकराचे दुसरे मंदिर आहे. माझ्या लहानपणी तर ते खूपच प्रेक्षणीय वाटायचे. हे देऊळ जमखंडीच्या संस्थानिकाने बांधले होते आणि त्याला राजाश्रय होता. त्याची रंगरंगोटी आणि सजावट राजेशाही थाटात होत असे. या देवळाच्या सभागृहात चक्क काचेची मोठमोठी हंड्याझुंबरे टांगलेली होती. देवळाच्या बाहेर कमान, कारंजे आणि प्रशस्त मोकळी जागा होती. जमखंडी संस्थान विलीन झाल्यानंतर राजेसाहेबांच्या खाजगी मालमत्तेची एक कचेरी या देवळाच्या एका भागात होती. जवळच असलेल्या सरकारी कचेरीत मामलेदार आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांची ऑफिसेस होती.


आमच्या हायस्कूलच्या पलीकडे एक शंकराची लहानशी घुमटी होती. लहान मुलांनाही वाकून किंवा बसून तिच्या आत जावे लागावे इतका छोटासा दरवाजा होता आणि आत गेल्यावर उभे राहतासुद्धा येत नव्हते. तो रस्ता पुढे एसटी स्टँड आणि पोलो ग्राउंड नावाच्या मैदानाला जातो. आम्ही लोक जाता येता या शंभोला हात जोडून पुढे जात असू. गावाला लागून असलेल्या एका डोंगराच्या शिखरावर मेलगिरीलिंगप्पाची घुमटी होती. तीच आमची पर्वती आणि तेच आमचे माउंट एव्हरेस्ट होते आणि आम्ही मुले मुले मिळून तिथे नेहमी गिर्यारोहण करत असू. याशिवायही गावात आणखी काही शिवालये होती आणि आहेत.

त्या काळातल्या जुन्या गावाच्या मधोमध एक मारुतीचे देऊळ आहे.  ते आमच्या अत्यंत आवडीचे ठिकाण होते. रोज संध्याकाळी खेळून परत येतांना आम्ही सगळी मुले मिळून आधी त्या देवळात जाऊन मारुतीरायाचे दर्शन घेत असू आणि नंतर आमची आपापल्या घराच्या दिशेने फाटाफूट होत असे.


 या मारुतीची उभी मूर्ती एका प्रचंड शिलाखंडावर समोरच्या बाजूने कोरलेली आहे आणि पाठीमागचा भाग सपाट आहे. त्याला अगदी खेटून प्रदक्षिणा घालता येण्याएवढी चिंचोळी मोकळी जागा सर्व बाजूंनी ठेवली आहे. 


दर शनिवारी तिथे नारळ फोडणे आणि देवाला तेल वाहणे यासाठी लोक गर्दी करत असत.शेजारच्या दुकानात त्यासाठी नारळांचे ढीग आणि लहान लहान तेलाचे बुधले विकायला मांडून ठेवलेले असत.  


आता या देवळाचे मूळ स्वरूप तसेच ठेऊन त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे आमि मारुतीरायाची एक भव्य मूर्ती त्याच्या माथ्यावर उभी करण्यात आली आहे.मारुतीच्या देवळापासून पूर्वेच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर दत्ताचे देऊळ होते. त्याच्या गाभाऱ्यात तीन शिरे सहा हात असलेली दत्तात्रेयाची सुबक मूर्ती होती आणि बाहेर प्रशस्त सभामंटप होता. गाभाऱ्याच्या पाठीमागेही प्रशस्त जागा होती, त्यात एक औदुंबराचा वृक्ष होता. त्या देवळातही भजनकीर्तनाचे कार्यक्रम होत असत. एकदा त्या देवळासमोरच्या रस्त्यावर चक्क पं.भीमसेन जोशी यांचे गायन झाले होते. या देवळात येणाऱ्या लोकात गावातल्या मराठी भाषिक (कोकणस्थ) लोकांची जास्त संख्या असे.

मारुतीच्या देवळापासून दक्षिणेच्या दिशेने पुढे गेल्यावर एक आडवी गल्ली येत असे. त्या गल्लीत गणपतीचे देऊळ होते. तिथे बसायला भरपूर मोठी जागा होती आणि अनेक धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. ते आमच्या घरापासून ते थोडे दूर असले तरी माझे नेहमी तिथे जाणे होत असे. त्यापेक्षाही दूर एक रामाचे देऊळ होते. तिथे रामनवमीला उन्हाचे चटके खात आम्ही जात असू. द्वारकानाथ नावाचे एक कृष्णाचे देऊळ होते, पण कृष्णजन्मासाठी मध्यरात्री तिथपर्यंत जायची हिंमत होत नव्हती. मी कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आहे, पण जमखंडीच्या अंबाबाईच्या देवळात गेलो तर मुले चिडवतील म्हणून मी सहसा जात नसे. ते बहुधा महिलावर्गासाठी राखीव होते. आमच्या घराच्या अगदी जवळ एक विठोबाचे देऊळ होते. त्याच्या समोर अप्पासाहेबांची विहिर होती. ज्यांच्या घरी नळाचे कनेक्शन घेतले नव्हते असे आमच्या बोळातले लोक तिथून पाणी भरून आणत असत. या देवळात विठ्ठल आणि रखुमाईच्या सुबक काळ्या दगडातल्या मूर्ती होत्या. सभामंटपात सगळ्या संतांच्या सुंदर तसबिरी लावलेल्या होत्या. माझ्या लहानपणच्या काळात ते गावातले सर्वात जास्त अॅक्टिव्ह देऊळ होते.  तिथे नेहमी संध्याकाळी टाळमृदुंगाच्या तालावर भजन होत असे, फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून एकनाथषष्ठीपर्यंत उत्सव असे. त्या वेळी एक भक्त गळ्यात वीणा अडकवून आणि हातात चिपळ्या धरून दिवसभर सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असे, भजनांमध्ये भारुडे वगैरे नाचत म्हंटली जात असे. दर आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूर यात्रेसाठी तिथून वारकरी जात असत. दहापंधरा दिवस आधी ते गावातून पालखी घेऊन दिंडी काढत असत.


 जे लोक पंढरपूरला जाऊ शकत नसत ते त्या दिंडीतच नाचून आणि गाऊन यात्रेचा आनंद घेत असत.  मी शाळेच्या शेवटच्या एक दोन वर्षात असतांना या देवळाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्या काळात माझे वडील नेहमी त्याच कामात गुंतलेले असायचे.


रामतीर्थजमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रामतीर्थ नावाच्या ठिकाणी थोड्या उंचावर तिथल्या संस्थानिकांचा अत्यंत सुरेख असा राजवाडा होता. त्याच्या परिसरात पण खालच्या पातळीवर रामेश्वराचे सुंदर देऊळ होते. त्यात एक सुबक असा नंदी आणि शंकराची पिंडी होती. त्या देवळाच्या समोर बांधलेल्या पुष्करणीमध्ये नेहमी पाणी भरलेले असे आणि त्यात बरेच मासे असायचे. तिच्या बाजूला रस्त्यातच एक स्फिंक्सचे लहानसे मॉडेल वाटावे असे काहीतरी होते, त्याला धार्मिक महत्व नव्हते.  आजूबाजूला आणखीही काही देवळे होती. दर वर्षी श्रावण महिन्यातल्या दर सोमवारी तिथे जत्रा भरत असे. मंदिरातल्या शंकराच्या पिंडीवर बुत्तीपूजी बांधली जात असे. हा प्रघात अजूनही चालू आहे. शेवटच्या सोमवारी शंकराच्या प्रतिमेची रथयात्रा काढली जात असे. आमच्या शाळेलाही सोमवारी दुपारचा अर्धा दिवस सुटी असायची आणि आम्ही सगळी मुले मिळून घोळका करून त्या जत्रेला जात असू. मला त्या जत्रेसाठी एक आणा मिळत असे. सगळे मित्र मिळून काही खाद्यपदार्थ विकत घेऊन आणि एकत्र बसून ते खात असू.कल्हळ्ळी
हे त्या भागातले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.  तिरुपतीच्या श्रीव्यंकटेशाने आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी तिथे येणे केले आणि तो तिथेही कायमचा राहिला आहे अशी त्याच्या भक्तांची दृढ श्रद्धा आहे.  जमखंडीत तर त्याचे असंख्य भक्त आहेतच, मुंबईपुण्यात स्थायिक झालेले कित्येक लोक दर दोनचार वर्षात एकदा जमले तर सहकुटुंब, नाहीतर एक एकटे तरी जमखंडीमार्गे कल्हळ्ळीला जाऊन देवाच्या पाया पडून येत असतात. मोठ्या रस्त्याने गेल्यास ते स्थान सुमारे आठ किलोमीटरवर आहे, पण आम्ही नेहमी डोंगऱ्यातल्या पायवाटेने चालत जात होतो आणि सव्वा ते दीड तासात पोचत होतो.  


या स्थानाची भौगोलिक रचना काहीशी तिरुपतीसारखी आहे.  इथेही उंचवट्याच्या तळाशी सपाट जमीनीवर गोविंदराजाचे देऊळ आहे त्यात शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. त्या देवळाच्या आवारात तीन चार दगड रचून एक लहानसे घर बांधले तर त्या माणसाचे स्वतःचे घर होते असे म्हणत असत म्हणून आम्ही आधी दहा पंधरा मिनिटे तिथे पडलेले गोल किंवा चपटे दगड गोळा करून घरे बांधत असू. 

तिथून पन्नास साठ पायऱ्या चढून वर गेल्यावर एक मोठी कमान आहे. तिच्यातून आत गेल्यावर प्रशस्त अशी सपाट मोकळी जागा आहे. त्यात वेंकटेशाचे मोठे सुबक असे मंदिर आहे. त्याच्या सभामंटपाच्या भिंतींवर त्या काळी पौराणिक कथांच्या गोष्टी चित्रांमधून रंगवलेल्या होत्या. गाभाऱ्यात श्रीव्यंकटेशाची सुबक मबर्ती आहे. तिला नेहमी उंची वस्त्रप्रावरणे आणि अलंकारांनी छान सजवलेले असे. तेंव्हा तिथे विजेचे दिवे नव्हते, मोठमोठ्या समयांच्या प्रकाशातच जेवढे दिसत असेल तेवढे त्याचे दर्शन घडत असे.


 मुख्य देवळाच्या आजूबाजूला इतर देवतांची अनेक मंदिरे आहेत, त्यातले एक वराह अवताराचे आहे. या सगळ्या देवळांना मिळून प्रदक्षिणा घालण्यासाठी एक रुंद रस्ता आहे. दर वर्षी नवरात्रात भरणाऱ्या जत्रेत एका दिवशी व्यंकोबाच्या उत्सवमूर्तीला रथात बसवून त्या रस्त्यावरून पूर्ण प्रदक्षिणा घालून आणत असत. एका लांबलचक दोराला धरून भक्तमंडळीच त्या रथाला ओढून नेत असत. तिरुपतीप्रमाणे इथेही रुक्मिणी रुसून दूर रानात जाऊन बसली आहे. तिथे तिचे पद्मावती नावाने वेगळे मंदिर आहे, पण वेंकटेशाचे सगळे भक्त तिच्या दर्शनाला जात नाहीत. त्यामुळे तिथे गर्दी नसे.नवरात्रात होणाऱ्या उत्सवाच्या काळात तिथे जत्रा भरत असे. काही निष्ठावान भक्त नवरात्रात रोज पहाटे उठून चालत चालत कल्हळ्ळीला जाऊन आधी व्यंकोबाचे दर्शन घेत असत. आम्ही मात्र रथयात्रेच्या मुख्य दिवशी मात्र न चुकता त्या जत्रेला जात असू. त्या दिवशी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणाऱ्यांची गर्दी मुंबईतल्या लोकलपेक्षाही जास्त असायची. त्या काळात तरी तिथे रांग हा प्रकार नव्हता. आम्ही धक्काबुक्की करूनच कसेबसे आत घुसून बाहेर पडेपर्यंत घामाघूम होत असू. पण देवाच्या दर्शनासाठी तेवढे तरी कष्ट करायला हवेतच. कधीकधी त्याशिवाय इतर दिवशीही कल्हळ्ळीला जाऊन यायचा कार्यक्रम ठरवत असू. तेंव्हा निवांतपणे दर्शन घेऊन काही स्तोत्रे किंवा श्लोक म्हणायलाही मिळत असे.


कडपट्टी

त्या काळातल्या जमखंडी गावाला लागूनच कडपट्टी नावाचे एक खेडे होते. ते आता जमखंडीतच समाविष्ट झाले आहे. तिथे वर्षातून एकदा जत्रा भरत असे, त्यावेळी गुरांचा मोठा बाजारही भरत असे. तिथे बहुधा बसवेश्वराचे देऊळ होते, पण आम्हाला त्याचे विशेष धार्मिक महत्व वाटत नव्हते. त्यामुळे त्याचे दर्शन घ्यायला किंवा पूजा, उपायना करायला कधी गेल्याचे मला आठवत नाही.

Kadapatti Rath usav

ಕಡಪಟ್ಟಿ ಬಸವೇಶ್ವರ ರಥೋತ್ಸವದ ಸರಳವಾಗಿ ಜರುಗಿತು ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಮದ್ದು ಜಗಮಗಿಸುವ ಲೈಟ್ ಗಳೊಂದಿಗೆ

https://www.youtube.com/watch?v=zMxYHzgWWao

मधुरखंडी

जमखंडीहून जवळच कल्हळ्ळीच्या वाटेवर मधुरखंडी नावाचे खेडे आहे. तिथे महालक्ष्मीचे देऊळ आहे.शूरपाली

जमखंडीहून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीकाठी शूरपाली इथे नरसिंहाचे मंदीर आहे. तिथेही वर्षातून एकदा जत्रा भरत असे. पण इतके दूर चालत जाणे येणे माझ्या कुवतीबाहेर होते आणि त्या काळात कुठले सार्वजनिक वाहन उपलब्ध नसायचे. त्यामुळे मी कधी त्या जत्रेला गेलो नाही. मी एकदाच कुणाच्या तरी बरोबर बहुधा बैलगाडीतून तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो होतो.मुत्तूर

शूरपालीच्याही पलीकडे मुत्तूर नावाच्या खेड्यात मुत्तूरव्वा या नानाने देवीचे देऊळ आहे. त्याबद्दल मला फारशी माहिती नाही.  पण माझ्या मामाच्या कुटुंबातले लोक या देवीचे भक्त होते. मी एकदा त्यांच्याबरोबर वाहनात बसून तिथे जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. तेंव्हा तिथे मी पहिल्यांदाच दीपमाळ पाहिली होती एवढे माझ्या लक्षात राहिले आहे.


मूळचे जमखंडीचे श्री.मधुकर आपटे यांनी या विषयावर लिहिलेला एक लेख खाली दिला आहे. तसेच एक भक्त श्री.दिलीप जोशी यांनी त्यांना आलेल्या प्रचीतीवर आधारलेला एक लेख सोबत जोडला आहे.
. . . आनंद घारे

------------------------------------------------------------------

माझ्या आईने केलेल्या दोन काव्यरचना इथे देत आहे.

१.आमच्या जमखंडी या गावाजवळच कल्हळ्ळी नावाच्या खेड्याजवळील वेदगिरी या डोंगरावर श्री व्यंकटेशाचे पुरातन देऊळ आहे. तिरुपती येथील व्यंकटेश भक्तांसाठी इथे प्रकट झाले आणि राहिले अशी भाविकांची श्रद्धा आहे. 


 कल्लहळ्ळी  ( कल्हळ्ळी ) व्यंकटेश क्षेत्रावतार

गौरिसुताते नमन करूनी, नमिते मी श्रीगुरुपायी 

श्री हरिचे गुण गान कराया, बुद्धी द्या मज लवलाही    ।।१।।

    अंबरिषास्तव शेषशयन प्रभु, नटले की दश अवतारी 

    कलि माझारी तोच श्रीहरी, व्यंकटेश हे नाम धरी    ।।२।।

कवण्या भक्तास्तव गिरिधारी, आले व्यंकटगिरीवरी

प्रियभक्तांची कथा मनोरम, ऐका ऐका हो सारी         ।।३।।

     गिरिधारीचा एक भक्तवर, अमरगोळ त्याचे गांवऽ

     'नागण्णय्या',  नाम तयाचे, श्रीहरि चरणी दृढ भावऽ     ।।४।।

नवरात्रोत्सव पहावयास्तव, जात असे की दरसालंऽ

वृद्ध जाहला, शरीर थकले, प्रभुचरणी निष्ठा अढळऽ     ।।५।।

    वृद्धत्वामुळे गिरि चढवेना, तळमळ वाटे बहु भारी 

    'चुकेल माझा नेम' असा हा, ध्यास लागला मनांतरी ।।६।।

शयनि पहुडता,  निद्रा आली, स्वप्नी आला द्विज एकंऽऽ

काय बोलला "न करी चिंता, मद्वचनाते तू ऐकऽऽ ।।७।।

    जमखंडीहुन द्वय कोसावर, वेदगिरी हा असे पहा

    संनिध कल्हळ्ळी ग्राम असे, तिथे जाउनी स्वस्थ रहा ।।८।।    

द्वय भक्ताते देतिल दर्शन वेदगिरीवर गिरिधारी

न करी चिंता" ऐसे वदुनी, गुप्त जाहले देव तरी ।।९।।

  सोबत खाशी बघुनि भक्त तो, आला कल्हळ्ळी गांवी

  यल्लम्मा कुलस्वामिनि त्याची, पुजा तियेची नित्य करी ।।१०।।

 'त्रिमलाचारी', नामे ब्राह्मण, बेलगुप्पिचा रहिवासी

मनी वासना असे तयाच्या, जावे एकदा गिरीवरी ।।११।।

    साधारण स्थिति असे तयाची, द्रव्य नसे संचित कांही

   कसे गिरीवर घडेल जाणे ? इच्छा मनिची मनि राही ।।१२।।

हळु हळु द्विज तो द्रव्य सांठवी, करी तयारी जाण्याची

गिरिवरि  जाउनि गिरिधारीचे, रूप मनोहर पहाण्याची ।।१३।।

  सर्व तयारी करूनि निजता, स्वप्नि एक तो द्विज आला

  रूऽऽप मनोहर असे तयाचे, शेला भरजरि पांघरला ।।१४।।  

वदे "सुभक्ता, होतिल श्रम तुज, अवघड गिरि बहु चढण्याला

वेदगिरीवर जा तु त्वरेने, देतिल दर्शन प्रभु तुजला ।।१५।।

   शुरपाली हे क्षेत्र मनोरम, त्या मार्गाने त्वा जावे

   देव असे नरसिंह तिथे जो, दर्शन त्याचे त्वा घ्यावे" ।।१६।।

असे कथुनि द्विज गुप्त जाहला, जागृत झाला भक्तवरंऽऽ    

  स्वप्नाचा मनि विचार करिता, खेद वाटला मनि फारंऽऽ ।।१७।।

  "गिरिवरि येऊ नको" असे कां, वदले मजला प्रभुरावंऽ ?

  काय मजमुळे पवित्र स्थळ ते, विटाळेल हो तरि कायऽऽ? ।।१८।।

पतीतपावन नाम तुझे प्रभु, उद्धरिसी जन पापि किती?

मग कां मजला दूर लोटिशी ?  मोडवेना तव वचन परी"।।१९।।

  पत्नीसह द्विज निघे जावया, शुरपाली क्षेत्रावरुनी

  कृष्णेमध्ये स्नान करोनी, नरहरिचे दर्शन घेई ।।२०।।

वेदगिरीवर त्वरे पातला, मार्गी वृक्ष लता फुलल्या

नानापरि पशु, पक्षि क्रीडती, अवलोकित त्यांच्या लीला ।।२१।।

   गिरिवरि येता, शब्द ऐकला, "आले, आले भक्तवरंऽऽ"

  ध्वनी परिसता, विस्मित झाला, भये व्यापिले अंतरंऽ ।।२२।।

नागण्णय्या,  पूजा करुनी, बसे देउळी ध्यानस्थंऽऽ 

शब्द तयाच्या श्रवणी पडतां, आला गिरिवरि धांवतऽऽ ।।२३।।

  दंपतीस त्या नयनि पाहता, म्हणे "हेच की यदुरावंऽऽ?" 

  नागण्णाला बघुनि द्विजाला, वाटे 'आला हा देव' ।।२४।।

भक्तवरांच्या भेटि जाहल्या, सांगति आपुला वृत्तांतऽऽ 

दुग्ध शर्करा एक जाहली, ऐसे वाटे चित्तांतऽऽ       ।।२५।।

  नागण्णय्या  दंपतीस त्या, घेउनिया निज गृहि गेला

  'कमलाकर कधि देतिल दर्शन?' वेध लागला चित्ताला ।।२६।। 

बहु जन्मांची बहु पुण्याई, उदया येई एक दिनी

मंगल सुस्वर बहु वाद्यांचा, ध्वनि ये वेदगिरीवरुनी ।।२७।।

  भक्त द्वय सुस्नांत होउनी, बसले देव पुजा करुनी

  अरुणोदय तो असे जाहला, घंटा रव ऐकू येई ।।२८।।

धावति दोघे तया दिशेने, प्रकाश होईना सहनंऽऽ 

स्थीर राहिले, तोवरि पुढती, प्रगट जाहले भगवानंऽऽ ।।२९।।

  सिंहासन जे जडित हिऱ्यांचे, त्यावरि सुंदर रूऽऽप दिसे

  चहुहस्ती शोभती आयुधे, पीत पितांबर झळकतसे ।।३०।।

दंडि शोभती बाहु भूषणे, कंठी कौस्तुभ वनमाळा

वत्सलांछन हृदयि विराजे, मस्तकि रत्नमुकुट दिसला ।।३१।।

  रूऽऽप असे हे नयनि पाहता, भक्त लागती चरणाला 

  स्तुती करीती बहू परीने, हर्ष मावेना गगनाला ।।३२।।

व्यंकटेश प्रभु वदति तयासी, "मागावे हो वरदाना"

भक्त बोलती, "रहावे येथेऽ, उद्धराया येथील जना" ।।३३।।

   प्रिय भक्तांच्या वचनास्तव प्रभु, स्थीर राहिले त्या ठाया 

   कमलावर पदि कमलपुष्प हे अर्पुनि पद कमली नमुया ।।३४।।

पद्मावति पति पद्मनाभ तव, महिमा न कळे गा मजसीऽऽ

जोडुनि पाणी मागत लक्ष्मी, ठाव देइ तव चरणासीऽऽ  ।।३५।।


२.आरती तिरुपति व्यंकटेशाची

    भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,

 देवा,  नमिते तव चरणा,

  ओवाळीते आरति तुजला,  पद्मावति रमणा ||धृ ||


  व्यंकट गितिवरि भव्य  मंदिरी, शोभे तव मूर्ती,

 देवा, शोभे तव मूर्ती

  ध्वज वज्रांकुश पद कमली तव, नूपुर रुणझुणती  |

 देवा, नूपुर रुणझुणती  |

  कटीसि शोभे रत्न मेखला, पीताम्बर कसिला,

 कासे, पीताम्बर कसिला,

  नवरत्नांचा मुकुट मस्तकी, कंठी वनमाला  (१)


  कर्णि कुण्डले  झळकति दण्डी, वाकि बाजुबंद 

 दण्डी, वाकि बाजुबंद |

  ध्यान असे हे हृदयी  स्मरता वाटे  आनंद

 मनाला,  वाटे आनंद |

  भवाब्धि मधुनी पार करी मज,  येऊ  दे करुणा |

 देवा, येऊ  दे करुणा !

  त्रिविध काल-गुण-देहातीता, नमन तुझ्या चरणा (२)


  शाम सावळे  रूप मनोहर, पाहुनिया तुजला

  देवा, पाहुनिया तुजला !

  भुलली पद्मावति तव कण्ठी घाली वरमाला

 देवा, घाली वरमाला

  अष्टैश्वर्ये नटलासी प्रभु, काय वर्णु थाट !

 तुझा प्रभु, काय वर्णु थाट !

   प्रिय भक्तास्तव  निर्मिलेस तु  गिरिवरि वैकुण्ठ (३)


  चांदीच्या समयांत तेवती  दीपहि  ते बहुत

 देवा, दीपहि  ते बहुत |

  सुवर्ण शिखरांवरि सोन्याचे कळस झळकतात

 सोन्याचे, कळस झळकतात |

  अपार वैभव,  अगम्य लीला  वर्णवेन कवणा 

 लीला,  वर्णवेन कवणा !

  एक मुखे मी काय वर्णु तुज, शरण तुझ्या चरणा

 लक्ष्मी,  नमिते  तव चरणा  (४)


भक्त वत्सला, व्यंकटेश प्रभु, नमिते तव चरणा,

 देवा,  नमिते तव चरणा,

  ओवाळीते आरति तुजला,  पद्मावति रमणा !

  पद्मावति रमणा !   पद्मावति रमणा !!!

*******************************************************


माझा प्रवास - यात्रा - जमखिंडी

                              - श्री. मधुकर आपटे

आज आपण जमखंडी मधील प्रमुख मंदीरे व ईतर प्रगति पाहु. 

प्रमुख मंदीरे :

१. जंबूकेश्र्वर :

या मंदिरामुळे च या गावाला हे नांव पडले असे म्हणतात. अशी आख्यायिका आहे की या जागी जांभळाची बरीच झाडे होती म्हणून जंबु (जामुन) व शिव असे मिळून जंबुकेश्र्वर झाले. हे मंदीर फार जुने आहे जवळ जवळ १५००-२००० वर्षापुर्वी बांधलेले असावे असा अंदाज आहे. मंदीराच्या सभोवताली ४-५ विहरी आहेत व पाण्याच्या टंचाईच्या वेळी या विहरी उपयोगी पडायच्या. असे ऐकले आहे की हल्ली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.

या मंदीराच्या आत १९४० साली एक शाळा चालु करण्यात आली. ती शाळा अजुनही कार्यरत आहे. शाळेचे ऑफिशियल नाव नुतन विद्यालय - कन्नड गंडु (बॉईज) मक्कळ  स्कुल असले तरी त्याला जंबुकेश्र्वर शाळा म्हणून च ओळखले जाते. 


२. ऊमारामेश्र्वर :

हे मंदीर महाराजा पटवर्धन सरकारांनी बांधलेले असुन हे राम तीर्थाटन सारखे नसुन हे महादेवाचे मंदीर आहे. ईथे शिवाची  वेगळया रीतीने पुजा केली जात असे. जशी बुत्ती पुजा, मुकुट अलंकार, पुष्प अलंकार वगैरे. मंदिरात प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला सरकारांचे ऑफिस होते जिथे दीवाणसाहेब श्री. बळवंतराव काळे व श्री. गुरुनाथ वाटवे बसुन कारभार पहात असत. 

येथे रोज सकाळी सनई चौघडे वाजत असत. मंदीराच्या प्रांगणात डाव्या हाताला महीला मंडळ चालक असे. 

बाहेर पटांगणात कारंजे होते व डाव्या हाताला सरकारी दवाखाना व उजव्या हाताला मॉंटेसरी जी बहुतेक प्रभाताई आपटे चालवत होत्या. नंतर जवळच भारतीय स्टेट बँक व कचेरी रोड वगैरे. 


३. मेलगिरी लिंगप्पा :

हे मंदीर वरच्या रस्त्याने रामतीर्थ ला जाताना वर डोंगरावर स्थित आहे. ईथे पाण्याच्या टाक्या असुन गावाला पाण्याचा पुरवठा केला जातो. हे स्थान ब-याच लोकांच्या  सकाळ-संध्याकाळ फिरण्याचे ठीकाण आहे 

डोंगरावर वारे भरपुर असल्याने पतंग उडवण्यास ऊत्तम ठीकाण. 

खाली रस्त्याजवळ एक मोठा तलाव आहे लेक्कनगिरी तलाव. व येथेच डोंगरावर पावसाळ्यात एक झरा वाहतो. 


४. रामतीर्थ :

 रामतीर्थ येथे महाराजांचा राजवाडा होता व शिवशंकर, दत्तात्रय, गणपती यांची मंदिरे पण आहेत. 

श्रावण महीन्यात प्रत्येक सोमवारी इथे जत्रा भरायची व बुत्ति पुजा (दही भाताची) हरकंगी ह्यांचे कडुन बांधली जायची. शेवटच्या श्रावण सोमवारी रथयात्रा असत असे. 


वरील प्रमुख मंदीरा शिवाय अन्य म़दीरांचा उल्लेख :

- श्री रूद्रावधुत मठ

- श्री खंडोबा मंदीर

- श्री लक्ष्मी मंदिर

- परमार्थ मंदीर

- खरे विठ्ठल मंदिर

- अप्पासाहेब विठ्ठल मंदिर

- सज्जी हनुमान मंदिर, ऊमारामेश्र्वर रोड

- दत्त मंदिर

- सदानंद मंदिर

- जुने हनुमान मंदिर


जवळपास असलेले देवस्थान म्हणजे कल्हळ्ळी. येथे वेंकटरमण गोविंदाचे (भगवान विष्णू) भव्य मंदिर आहे. दरवर्षी नवरात्रात (दसरा) येथे उत्सव साजरा होतो. 


Kadapatti Rath usav

ಕಡಪಟ್ಟಿ ಬಸವೇಶ್ವರ ರಥೋತ್ಸವದ ಸರಳವಾಗಿ ಜರುಗಿತು ಪಟಾಕಿ ಸಿಡಿಮದ್ದು ಜಗಮಗಿಸುವ ಲೈಟ್ ಗಳೊಂದಿಗೆ

https://www.youtube.com/watch?v=zMxYHzgWWao

Tuesday, September 20, 2022

आमची सिंधूताई

 


सिंधूताई ही माझी सर्वात मोठी बहीण आणि मी तिचा सर्वात धाकटा भाऊ. सिंधूताई आमच्या आईवडिलांचे पहिले अपत्य आणि आजीआजोबांचे पहिले नातवंड. ती गोरी पान, चुणचुणित आणि  रूपाने सुरेख, स्वभावानेही गोड आणि लाघवी होती. त्यामुळे तिचे लहानपणी घरात भरपूर लाड आणि कौतुक झाले असणार. ती शाळेत शिकत असतांनाच तिला महादेवरावांनी मागणी घातली आणि ते स्थळ फारच चांगले आहे हे पाहून तिचे थाटात लग्न करून दिले गेले. तेंव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मला समजायला लागल्यापासून एवढे माहीत झाले होते की त्यांचा गोकाक नावाच्या गावात मोठा वाडा होता आणि निपाणी नावाच्या गावात एक सिनेमाचे थेटर होते. ताई जेंव्हा माहेरपणाला येत असे तेंव्हा घरात खूपच उत्साहाने आणि आनंदीआनंदाने भारलेले वातावरण असायचे.

सगळे चांगले चालले असतांना एक दिवस सकाळीच तारवाला पोस्टमन एक वाईट बातमी घेऊन आला. तो दिवस मला अजून आठवतो. महादेवरावांना हार्टफेल झाला असे त्या तारेत लिहिले होते. आमची आई तर एकदम पार गळून गेली आणि घरातल्या सगळ्यांची रडारड सुरू झाली. कुणीतरी धावाधाव करून सर्व्हिसची गाडी आणली आणि आईला निपाणीला घेऊन गेले. ती परत येतांना सिंधूताई आणि तिच्या मुलांना आपल्याबरोबर जमखंडीला घेऊन आली. पण या वेळी मात्र सर्व घर शोकाकुल झाले होते.

हळूहळू ताईने स्वतःला सावरले, शाळेच्या पुस्तकांचा अभ्यास केला आणि एक्स्टर्नल स्टूडंट म्हणून एसएससी परीक्षेचा फॉर्म भरून ती चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झा्ली. त्याबरोबर हिंदीच्या एक दोन परीक्षाही देऊन ती सर्टिफिकिटेही घेतली. त्यानंतर मिरजेला राहून एसटीसी आणि सीपीएड असे दोन कोर्स एकदम केले आणि शाळेत शिक्षिकेची नोकरी धरली. मग ती सोडून सोलापूरला दुसरी नोकरी धरली. मी यातली कुठलीच गावे पाहिली नव्हती कारण त्या काळात अत्यावश्यक असेल तरच प्रवास केला जात असे. पण ही मंडळी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जमखंडीला येत असत तेंव्हा बोलण्यात त्या गावांची सगळी माहिती येत असे.

ताई आमच्याबरोबर असतांना सगळ्यांची खूपच प्रेमाने विचारपूस करत असे, आमच्याशी गप्पा मारत असे, आमची थट्टामस्करी करत असे, आमच्याबरोबर पत्ते खेळत असे, आम्हाला कोडी घालत असे, आमच्याकडून गाणी म्हणवून किंवा नकला वगैरे करवून घेत असे आणि त्यांचे तोंडभर कौतुक करत असे, प्रसंगी समजूत घालत असे, धीर देत असे. काही वेळा वादविवाद किंवा वितंडवादही झाले तरी ती बरीच मोठी असल्यामुळे त्यातून भांडण मात्र कधीच झाले नाही. माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्या वयात जास्त अंतर असल्याने आमच्यामध्ये थोडा जास्तच जनरेशन गॅप होता. ताई मात्र मनाने माझ्या फारच जवळची झाली होती.

मी कॉलेजला मुंबईला गेलो तेंव्हा ताई सोलापूरला स्थायिक झाली होती. जमखंडीहून मुंबईला जाण्यासाठी कुडची स्टेशनपर्यंत बसने जाऊन पुढे रेल्वेने जाणे हा मुख्य मार्ग होता आणि मी पहिल्यांदा जातांना तसाच गेलो होतो, पण सुटीसाठी घरी जातांना मात्र वाट थोडी वाकडी करून आधी सोलापूरला ताईला भेटायला गेलो आणि नंतर पुढे विजापूरमार्गे जमखंडीला गेलो. त्या वेळी आईपासून पहिल्यांदाच दूर राहिल्यानंतरही ताईला भेटायची ओढ जास्त प्रबळ होती. त्यानंतरही मी बहुतेक वेळा सुटी लागल्यावर आधी ताईकडे जाऊन थोडे लाड करून घेतल्यानंतर जमखंडीला जात होतो.

ताईचे सोलापूरचे घर आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. कसबा या गजबजलेल्या भागातल्या मुख्य रस्त्यावर त्या घराचा मोठा दरवाजा होता, पण आत आल्यानंतर लांबलचक पॅसेजमधली तीन दारे पार करून गेल्यानंतर एक लहानसे अंगण होते आणि त्याच्या पलीकडे समोर ताईच्या घराची एक खोली होती. तिच्या डाव्या बाजूला लहानसे स्वयंपाकघर आणि उजव्या बाजूला एक लहानशी खोली होती ती अर्धी सामानाने भरली होती. असे आकाराने छोटे घर असले तरी ताईचे मन खूप मोठे होते. तिने आपुलकीने खूप माणसे जोडून ठेवली होती, त्यामुळे तिच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची बरीच वर्दळ असायची. 

तिच्या परिचयांमधूनच माझ्या दोन मोठ्या भावांची लग्ने जमली आणि सोलापुरात झाली. त्या लग्नाला आलेल्या सगळ्या नातलगांची रहायची सोय ताईने त्या जागेत आणि वाड्यात केली. त्या वाड्याची मालकीण आणि इतर बिऱ्हाडकरू हे सगळेजण नेहमीच ताईच्या मदतीला तयार असत इतके प्रेमाचे संबंध तिने जुळवून ठेवले होते. माझ्या त्या दोन्ही वहिनींच्या माहेरच्या लोकांशी ताईने अगदी निकटचे संबंध जोडले होते, ते पुढच्या पिढीतही टिकून राहिले आहेत. माझ्या वडिलांच्या शेवटच्या आजाराच्या वेळी त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आणि त्यांनी आशा सोडल्यानंतर त्यांचे अखेरचे दिवस त्याच घरात गेले. तेंव्हाही बरीच नातेवाईक मंडळी तिथे गोळा झाली होती. 

मी नोकरीला लागलो तेंव्हा माझे इतर सहकारी दरवर्षी महिनाभर अर्न्ड लीव्ह घेऊन आपापल्या होमटाउनला आईवडिलांकडे जात असत आणि जिथे ते लहानाचे मोठे झाले त्या त्यांच्या घरी राहून येत असत. आमचे वडील गेल्यानंतर मला असे होमटाउन राहिले नव्हते. वीकएंडला जोडून एकादी सुटी आली की मी पटकन एका झोळ्यात दोन कपडे कोंबून निघत असे आणि सरळ सोलापूरला जाऊन थडकत असे. त्या काळात फोनची सोय नव्हती, त्यामुळे आधीपासून सांगायची किंवा विचारायची सुविधा नव्हतीच. पण वेळी अवेळी केंव्हाही गेलो तरी ताई माझे अत्यंत प्रेमाने स्वागत करत असे. मी अगांतुक गेलो असलो तरी तिच्यासाठी मी पाहुणा नव्हतो, तिने मला तेवढा हक्क दिला होता आणि मी तो  निःसंकाचपणे बजावत होतो. पुढे मी लग्न करून संसाराला लागल्यानंतर असे जाणे कमी झाले. पण मला ऑफिसच्या कामासाठी अनेक वेळा हैद्राबादला जावे लागत असे. तिथून परत येतांना वाटेत सोलापूर स्टेशन आले की मी कधीकधी उतरून जात असे आणि ताईला भेटून काही तासांनी दुसऱ्या गाडीने पुढे जात असे. 

एकदा आम्ही एका बारशासाठी पुण्याला गेलो होतो आणि तो कार्यक्रम झाला की लगेच परत जाणार होतो, म्हणून काही कपडे नेले नव्हते. तिथे ताईही आली होती. तिने सांगितले की तिच्या मुलीचा साखरपुडा एक दोन दिवसांनी करायचे ठरले आहे आणि त्याला आम्ही यायलाच हवे.  मला तर ऑफिसला दांडी मारणे शक्यच नव्हते, पण पत्नी आणि मुलाला ती आपल्याबरोबर सोलापूरला घेऊन गेली.  तिथे गेल्यावर आठवडाभरात लग्नसमारंभ करून टाकायचा असे ठरले.  त्या वेळी माझ्याकडे फोनही नव्हता.  कसा तरी माझ्यापर्यंत निरोप पोचला आणि मी सर्वांचे कपडे घेऊन तिथे गेलो. 

घाईघाईत ठरलेल्या त्या लग्नासाठी कुठले मंगल कार्यालय मिळाले नव्हते. एक हॉल भाड्याने घेतला आणि आचारी, वाढपी, भटजी, वाजंत्री, भांडीकुंडी, स्वैपाकासाठी लागणारे सामान वगैरे सगळ्यांची व्यवस्था आमच्या कर्तबगार ताईने आणि तिच्या वीसबावीस वर्षाच्या मुलाने न डगमगता शांतपणे फक्त चार पाच दिवसात केली, शिवाय आलेल्या पाहुण्यांचीही सोय केली. आम्ही लोक मदतीला होतो, पण बाहेरगावाहून आलेले लोक अशी किती मदत करू शकणार होतो ? सगळ्यांसाठीच तो एक संस्मरणीय अनुभव होता.

मुलीचे शिक्षण आणि लग्न झाले आणि मुलाचे शिक्षण पूर्ण होऊन तो डॉक्टर झाला. त्यानंतर सोलापूरला रहायचे विशेष प्रयोजन राहिले नाही म्हणून तिने नोकरी आणि ते गाव सोडले आणि ती  मुलासह गोकाकला रहायला गेली. मला कामाच्या वाढत्या व्यापामुळे वेळ मिळत नव्हता आणि मुंबईहून गोकाकला जाणे येणे एवढे सोपे नसल्यामुळे तिला वरचेवर भेटायला जाणे मला जमत नव्हते. पण परिवारातल्या कुणाकुणाच्या लग्नसमारंभांमध्ये आमच्या भेटी होत राहिल्या.  ताई आता फिरायला मोकळी असल्यामुळे कधी मुलाकडे, कधी मुलीकडे जाऊन रहात असे, तर कधी एकाद्या भावाकडे तिचा चार दिवस मुक्काम असे. 

ती एकदा माझ्याकडेही आली होती आणि दहा बारा दिवस राहिली होती.  सतत काम करत रहायची सवय असल्यामुळे तिला स्वस्थ बसून राहणे अस्वस्थ करायचे, पण आजकाल घरातली सगळी कामे सोपी करणारी यंत्रे असल्यामुळे आमच्याच हातांना जास्त काम नव्हते आणि ती यंत्रेही तिच्या ओळखीची नव्हती. फ्लॅट संस्कृतीमुळे शेजारीपाजारी जरा दूर दूरच असतात आणि त्यात ते सगळे परभाषिक होते. त्यामुळे नवीन ओळखी करून घेणे कठीण होते. पोथ्यापुस्तके वाचत आणि टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम पहात ती वेळ घालवत होती. पण तेवढ्या दिवसात तिने माझ्या मुलांना मात्र आपला चांगला लळा लावला होता.

माझ्या मुलाचे लग्न नाशिकला झाले त्यावेळी योगायोगाने ताई नाशिकलाच तिच्या  मुलीकडे रहायला आली होती.  त्याचा आम्हाला आनंद झालाच, तेंव्हा सर्वांना भेटून तिलाही खूपच आनंद झाला. तिला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली होती म्हणून एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही तिचा नावापुरता छोटासा सत्कार केला. त्या वेळी तिची तब्येत छानच दिसत होती.  ती चांगली हिंडत फिरत होती. ही आमची शेवटची भेट असेल अशी पुसटशी कल्पनाही आली नव्हती. पण नंतर ती गोकाकला मुलाकडे गेली. तिथे असतांना एक दिवस देवासमोर बसून काही प्रार्थना करत असतांना तिने अचानक डोळे मिटले. असा विनासायास अंत होण्यासाठीसुद्धा मोठी पुण्याई लागते म्हणतात. अशा आमच्या प्रेमळ सिंधूताईच्या स्मृतीला शतशः प्रणाम.