Tuesday, July 29, 2008

आमच्या छकुल्या (भाग १ - ४)

मी हा लेख २००८ साली चार भागात लिहिला होता. आता त्या चारही भागांना एकत्र करून आणि थोडे संपादन करून पुनर्प्रकाशित केला आहे.
 दि.०८ ऑक्टोबर २०१८.
--------------------------------------

आमच्या छकुल्या (भाग १)आमच्या घरी जेंव्हा या आमच्या छकुल्या नाती जन्माला आल्या तेंव्हा काय झालं माहीत आहे?
माझ्या अंगणांत दोघी मुग्ध कलिका या आल्या । घरदार परिसर आनंदाने ओसंडला ।।
सगळं घर आता त्यांच्याभोवती फिरायलाच नव्हे तर नाचायला बागडायला लागलं. आमच्यापुढे पहिला प्रश्न होता तो म्हणजे त्यांची नांवे काय बरं ठेवायची?
दोन अर्थपूर्ण नांवे शोधाया लागल्या बुद्धी । कुणी सांगे अंजू मंजू, सोना मोना, रिद्धी सिद्धी ।।
मनाजोगती मिळाली जोडी शोधता धुंडता । एक इरा सरस्वती दुजी ईशा दुर्गामाता ।।

त्यांच्या बाळलीला दिवसेगणिक वाढत गेल्या. आम्ही कौतुकाने त्या पहात होतो. आज काय नजरेला नजर देऊन पाहिलं, आज पहिला हुंकार दिला, आज कोण कुशीवर वळली, आज कोण पालथी झाली, आज पुढे सरकली, आज मुठीत बोट पकडलं, आज हांक मारतांच हंसून साद दिली असं कांही ना कांही नवं नवल दोघींच्या बाबतीत रोजच घडत होतं. बघता बघता दोघी रांगायला लागल्या, आता जमीनीवर कोठली वस्तू ठेवायची सोय नव्हती. त्या उचलून थोड्या वर ठेवीपर्यंत दोघीही आधार धरून उभ्या रहायला लागल्या.
दोघी झाल्या भारी द्वाड करतात ओढाओढ । आरडाओरड मस्ती, झोंबाझोंबी चढाओढ ।।
दांडगाईला कळेना कसा घालावा आवर । उचलून ठेवायाच्या सा-या वस्तू उंचावर ।।

असंच पहाता पहाता वर्ष उलटून गेलं. दोघी एकमेकीच्या मागे पळायला लागल्या. त्यांच्या निरर्थक गोंगाटातून अर्थपूर्ण शब्द उमटू लागले. शब्देविण संवादू कडून सुसंवादाकडे पावले पडायला लागली. त्या दोघीही आवडीने गाणी ऐकायला लागल्या आणि आपल्या बोबड्या उच्चारातून ती म्हणायला लागल्या, त्याच्या तालावर हातवारे करीत पाय नाचवू लागल्या. पण थोड्याच दिवसांनी माझ्या मुलाची, इंग्लंडमध्ये बदली झाली आणि आमच्या छकुल्या  परदेशी चालल्या गेल्या. त्यांना जेमतेम कामापुरते मराठी शब्द समजू लागले होते. तरीही त्या देशात गेल्यावर तिकडची भाषा सहज शिकून गेल्या. आता वेबकॅम व ईमेलमधून फोटो दिसत, फोनवर व चॅटिंगमधून बोलणे होई. त्यावरून समजलं की,
आंग्ल भाषेतून घेती पारंपरिक संस्कार । कृष्ण खातसे बटर, देवी लायनवर स्वार ।।
पाखरे उडून गेली परी किती दूर दूर । बोल बोबडे ऐकाया मन सदैव आतुर ।।
ईमेलमधून येती छायाचित्रे मनोहर । त्यांचे संग्रह करून पहातसे वारंवार ।।

असंच आणखी एक वर्ष होत आलं. तेंव्हा मात्र अगदी राहवेना. कामाच्या व्यापातून मुक्तता मिळाली होती. तेंव्हा सरळ तिकीटं काढली आणि इंग्लंड गाठलं.
---------------------------------

आमच्या छकुल्या (भाग २)आम्ही उभयता लीड्सला जाऊन पोचलो पण आमचे सामान कांही तिथपर्यंत आले नाही. त्यामुळे आता काय करायचे याची चौकशी करून ऑफीसात जाऊन रीतसर तक्रार नोंदवण्याचे सोपस्कार पूर्ण करून बाहेर येईपर्यंत बराच वेळ लागला आणि सगळा मूडही गेला होता. पण फरमध्ये नखशिखांत गुंडाळून घेऊन कडाक्याच्या थंडीत आमची वाट बघत उभ्या असलेल्या छकुल्यांना पाहिले आणि सगळा मनस्ताप व थकवा कुठच्याकुठे पळून गेला. घरी पोचेपर्यंत ईशा व इराबरोबर नव्याने छान गट्टीसुद्धा जमून गेली. खास त्यांच्यासाठी हौसेने आणलेल्या वस्तू तर सामानाबरोबर राहिल्या होत्या पण त्याने कांही बिघडले नाही. नंतर यथावकाश आमचे सामानसुमान घरपोच पोचले.

घरी आल्या आल्या दोघीही एक चित्रमय पुस्तक घेऊन जवळ आल्या व त्यातील गोष्ट सांगायचा हट्ट धरून बसल्या. जेमतेम अडीच वर्षाच्या वयात त्यांना अक्षरज्ञान कोठून असणार? चित्रे बघत बघत बाजूला लिहिलेली गोष्ट वाचून सांगायची. त्यांच्याकडे असलेल्या साऱ्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या. सिंड्रेलाच्या सावत्र आईऐवजी 'तिची काकू' म्हंटले तर लगेच हटकायच्या. तरीसुद्धा त्या गोष्टी पुनःपुनः ऐकायचा भयंकर नाद! एक गोष्ट सांगून झाल्यावर मी इराला म्हंटलं,"आता तू सांग." तिने लगेच मी सांगितलेल्यातला पन्नास साठ टक्के भाग घडा घडा आपल्या बोबड्या बोलात सांगून टाकला. ईशा आधी पळून गेली. परत आल्यावर तिने ऐटीत ते पुस्तक हातात धरले आणि वाचायला येत असल्याचा आव आणत "वन्स अपॉन ए टाईम" पासून सुरुवात करून मध्ये थोडा वेळ "ग्लंग्लॅंग्लींग्लूं" वगैरे इंग्रजी टोनमध्ये म्हणून "दे लिव्ह्ड हॅपीली देअरआफ्टर" करून टाकलं. कधीकधी त्या आपल्या मनाने गोष्ट रचून सांगायच्या. या बाबतीत इराची कल्पनाशक्ती अफाट आहे. आपल्या सभोवतालचे खरे विश्व तसेच पुस्तकातून आणि टी.व्ही.वर दिसणारे काल्पनिक विश्व यातील पात्रांचे बेमालुम मिश्रण ती करत असे. तिच्या गोष्टीतली सिंड्रेला पार्टीला जाण्याऐवजी जंगलात फिरायला गेली, तिथे तिला मोगली भेटला, त्याने तिला केक दिला. ती दोघे मिळून स्नोव्हाईटकडे जेवायला गेली. वाटेत एक नदी लागली. तिच्या काठावर लिटल मर्मेड बसलेली होती. एक शार्क मासा तिच्या अंगावर धांवून आला, इराने त्याला घाबरवून पळवून लावले, त्याबद्दल आईने तिला चॉकलेटचा डबा दिला. त्यातल्या गोळ्या तिने शाळेतल्या मित्रामैत्रिणींना दिल्या तसेच पोस्टमन पॅट आणि शॉपकीपरलाही दिल्या. अशा प्रकारे ती वाटेल तिकडे मनसोक्त भरकटत जात असे आणि कंटाळा आला की कोठला तरी प्रिन्स घोड्यावरून येऊन सिंड्रेलाला घेऊन जायचा. त्यानंतर दे लिव्ह्ड हॅप्पीली देअरआफ्टर.

इंग्लंडमधील इतर लोकांबरोबर त्यांना येत होती तेवढी इंग्लिश भाषा त्या तिकडल्या उच्चाराप्रमाणे बोलायच्या. आमच्यासाठी मात्र त्यांनी आपली एक वेगळीच भाषा बनवली. सुचेल ते इंग्रजी क्रियापद लावून पुढे ती क्रिया करते म्हणायच्या. "मी ईट करते, ड्रिंक करते, स्लीप करते" वगैरे. 'र' चा उच्चार करता येत नसल्याने इरा आपले नांव 'इवा' सांगायची तर ईशा तिला 'इया' म्हणायची. मराठी शब्दच मुळात कमी माहीत असतांना त्यातला लिंगभेद व वचनभेद कसा कळणार? आम्ही तिला "येतेस कां" म्हंटले तर ती आम्हालासुद्धा "येतेस कां" असंच म्हणणार. त्या वयातली बहुतेक मुले असेच बोलतात. एकदा इरा मला मला "खव्वी मव्वाठी गोष्ट सांग" असे म्हणाली. मी आपली त्यांना काऊ चिऊची गोष्ट सांगितली. त्यातही मेण आणि शेण म्हणजे काय हे त्यांना समजणे कठीणच होते, ते कसेबसे सांगितले. ती गोष्ट त्यांना कितपत समजली ते पहावे म्हणून मी त्यांना विचारले "चिऊ कशी करते?"

खिडकीबाहेर चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या त्यांच्या चांगल्या ओळखीच्या होत्या. इराने लगेच दोन्ही हात पसरून पंख फडफडण्याची क्रिया करीत चिवचिव करून दाखवली. मी जेंव्हा विचारले "काऊ कसं करतो?" तेंव्हा लगेच ईशा हंबरली "मूऊऊऊऊ". त्या दोघींनी इंग्लंडमध्ये कधी कावळा पाहिलाच नव्हता तेंव्हा त्यांना काऊ म्हणजे त्यांना चित्रात पाहिलेली गायच वाटली!

ईशा व इरा या दोघी जुळ्या बहिणी असल्या तरी एकमेकीपासून भिन्न आहेत. इरा जास्तच गोरी, उंच व थोडी दांडगट आहे. ती ईशाच्या हातातली वस्तु हिसकावून घ्यायचा प्रयत्न करते. ईशा चपळाईने तिची खोडी काढून पळून जाते किंवा तिची वस्तु पळवून लपवून ठेवते. असा टॉम आणि जेरीचा खेळ त्यांच्यामध्ये चालू असतो. पण दोघींचाही एकमेकीवर खूप जीव आहे. कुठलीही गोष्ट कधीही दुसरीला मिळाल्याखेरीज एकटीने खात नाहीत. सगळ्या गोष्टी लोकांना दाखवायची इराला खूप हौस आहे. तिला संधी मिळायचा अवकाश, लगेच तिचे नाचणे व गाणे सुरू होऊन जाते पण ईशा मात्र तिची इच्छा असेल तेंव्हाच अप्रतिम गाणार किंवा नाचणार. इराची स्मरणशक्ती चांगली आहे. ऐकलेले शब्द समजू देत किंवा नाहीत ते उच्चार तिच्या लक्षात राहतात. ईशाची आकलनशक्ती चांगली आहे. कुठलीही गोष्ट तिच्या चटकन लक्षात येते. तिला तालासुराची उपजत जाण आहे. त्यामुळे ती सारेगमचे आरोह व अवरोह व्यवस्थित दाखवते. इरा सरगममधली सगळी अक्षरे कधीकधी एकाच सुरात म्हणून टाकते, पण इंग्रजी व मराठीतलीच नव्हेत तर अनेक हिंदी गाणीसुद्धा तिला चालीवर आणि मधल्या म्यूजिकसकट पाठ आहेत.

दोन वर्षांपूर्वी ती मंडळी भारतात परतल्यावर आधी मुंबईला राहून सगळी नीट व्यवस्था झाल्यानंतर पुण्याला गेली. तिकडून येतांना "इंडियाला जायचंय्" असे बोलणे झाले असेल. त्यामुळे मुंबईतले आमचे घर म्हणजे इंडिया अशीच ईशा व इरा या दोघींची समजूत झाली होती. देश ही संकल्पना त्या वयात समजणे कठीण होते. त्यामुळे पहिल्यांदा आम्ही त्यांच्याकडे पुण्याला गेलो तेंव्हा इरा म्हणाली होती, "मला पण तुमच्याबरोबर इंडियाला यायचंय्." त्यानंतर जेंव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेंव्हा परत निघायच्या वेळी ईशा म्हणाली, "आजोबा, तुला माहीत आहे कां की इथं सुद्धा इंडियाच आहे. मग तू पण इथंच कां नाही रहात?"

---------------------------------------------

आमच्या छकुल्या (भाग ३)आमच्या ईशा आणि इरा या दोन व तीन वर्षांच्या झाल्या त्या वेळचे त्यांचे वाढदिवस त्या इंग्लंडमध्ये असतांना आले. ते भारतात करत असायचे तशाच पध्दतीनेच पण तिथल्या भारतीय मित्रमैत्रिणींना बोलावून तिथे साजरे केले गेले. आम्हीही टेलीफोन, इंटरनेट, वेबकॅम वगैरे माध्यमातून त्यात जेवढा सहभाग करता आला तेवढा करून घेतला. चौथ्या वर्षपूर्तीच्या दिनापर्यंत त्या भारतात आल्या होत्या आणि पुण्याला आमचे जाणे येणे सारखे चाललेले असे. त्यामुळे वाढदिवसाला जाणे झालेच.

आजकालची लहान मुले आपले नांव सांगायला लागतात त्याच्यापाठोपाठच आपली जन्मतारीखसुद्धा सांगायला शिकतात. आमच्या ईशा आणि इरा यांना आपापल्या नांवांमधल्या 'श' आणि 'र' चा उच्चारसुद्धा नीट जमत नव्हता तेंव्हापासून त्या "सोळा जूनला माझा बड्डे आहे." असे सांगताहेत. त्या वेळी संख्या आणि महिना या संकल्पनाच त्यांना कळलेल्या नसल्यामुळे 'सोळा' ही एक 'संख्या' आहे आणि 'जून' हे एका 'महिन्या'चे नांव आहे एवढे कळण्याइतकीही समज आलेली नव्हती. 'बड्डे' म्हणजे 'धमाल' एवढेच त्यांना पक्के समजलेले होते. त्या दिवशी छान छान कपडे घालायचे, हॉलमध्ये भिंतीवर रिबिनी, फुगे वगैरे लावायचे, खूप मुलांना जमवून मनसोक्त दंगा करायचा, केक कापायचा, 'हॅपी बर्थडे'चे गाणे म्हणायचे, टाळ्या वाजवायच्या, यम्मीयम्मी गोष्टी खायच्या. सगळे लोक त्या 'बड्डे बॉय' किंवा 'बड्डे गल्' ला 'विश' करतात, त्यांना 'प्रेसेंट्स' देतात वगैरे सगळा तपशील त्यांना पाहून पाहून ठाऊक झाला होता. त्यामुळे आपले वाढदिवस नेहमी नेहमी येत रहावेत असे त्यांना वाटायचे. अधून मधून त्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या बर्थडे पार्ट्यांना जाऊन तिथे धमाल तर करायच्याच, इतर दिवशी आपल्या भातुकलीच्या खेळात मिकी उंदीरमामा, टेडी अस्वल किंवा बार्बी भावली यांचे साग्रसंगीत वाढदिवस 'मनवत' असत.

आता त्या शाळेत जायला लागल्या होत्या. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी शाळेचा गणवेश न घालता नवा ड्रेस घालून आणि शाळेत वर्गातल्या मुलींना वाटण्यासाठी चॉकलेट्सचे डबे घेऊन त्या शाळेला गेल्या. शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या वर्गात पहिला वाढदिवस त्यांचाच आला होता का काय कोण जाणे, शाळेत बर्थडे कसा साजरा करतात हे त्यांनाही ठाऊक नव्हते आणि आम्हालाही. शाळेतून घरी परत आल्यावर त्यांनी थोडक्यात शाळेतली गंमत सांगितली पण त्या थोड्याशा हिरमुसलेल्या वाटल्या. खोदून खोदून विचारल्यावर ईशाने सांगितले, "स्कूलमध्ये आपला बड्डे झाला, पण त्याची पाट्टीच नाही झाली!" या वर्षीचा वाढदिवस हा असाच होणार की काय असे तिला वाटले होते. "हा फक्त शाळेतला बर्थडे झाला, आतां संध्याकाळी आपण घरी पार्टी करू, त्यात तुमचे फ्रेंड्स, अंकल, आँटी वगैरे खूप लोक येणार आहेत. त्यावेळी घालायसाठी दुसरे नवीन ड्रेस आणले आहेत. तेंव्हा आपण नाच, गाणी, खेळ वगैरे सगळे करायचे आहे. " असे समजाऊन सांगितल्यानंतर त्यांची कळी खुलली.
--------------------------------

आमच्या छकुल्या (भाग ४)
आता आमच्या छकुल्या पांच वर्षांच्या झाल्या आहेत. वयाबरोबर त्यांची समजशक्ती आणि समजुतदारपणा वाढला आहे. त्याबरोबर सगळे कांही समजून घेण्याची जिज्ञासा अपार वाढली आहे. कुठल्याही प्रश्नाचे त्यांना समजेल आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांना आता काऊचिऊ, कुत्रामांजर यांच्यापेक्षा जिराफ, झेब्रा, अजगर आणि देवमासा अशा प्राण्यांबद्दल कुतुहल वाटते. त्यांची चित्रे पाहून त्या या प्राण्यांना ओळखतातच, शिवाय ते प्राणी काय खातात आणि कसे ओरडतात वगैरेसारखे प्रश्न त्या विचारतात. त्यांना प्राणीसंग्रहालयात नेऊन कांही वेगळे प्राणी दाखवता येतील, त्यावेळी त्या प्राण्यांनी खाण्यासाठी किंवा ओरडण्यासाठी आपले तोंड उघडले तर नशीब!
एकदा मी बसलो आता इरा मागून आली आणि माझ्या टकलावरून हात फिरवत म्हणाली," आजोबा, तुझे केस कुठे गेले?"
या अचानक आलेल्या प्रश्नाला मी कांहीतरी उत्तर द्यायचे म्हणून सांगितले, "अगं, वाऱ्याने थोडे थोडे उडून गेले."
या उत्तराने तिचे समाधान झाले नाही. आपल्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, "हे पहा, माझे केस किती छान वाढताहेत. तुझेच कसे उडून गेले?"
मी सांगितले, "तुझे केस कसे छान काळेभोर आणि दाट आहेत, तसे माझे नाहीत ना! माझे तर पांढरे आणि हलके झाले आहेत, म्हणून ते उडून जातात. "
" पण तुझे केस असे पांढरे आणि पातळ कां झाले?" लगेच पुढला प्रश्न आला.
"मी आता ओल्ड झालोय ना, म्हणून. "
"पण तू ओल्ड कशाला झालास?"
काय सांगावे ते मला सुचेना. "वयानुसार सगळेच म्हातारे होतात." असे सांगून तिला भीती घालायची माझी इच्छा नव्हती. मी सांगितले, "खरं म्हणजे चुकलंच माझं! "
"मग सॉरी म्हण. "
इराच्या या वाक्याचा अर्थ मला लागत नाही असे पाहून ईशाने स्पष्टीकरण दिले, "अरे आजोबा, कुणाचं चुकलं असलं तर त्यानं सॉरी म्हणायचं असतं. एवढं पण तुला ठाऊक नाही कां?"
"अरे हो, मी तर विसरलोच होतो. पण मी कुणाला सॉरी म्हणू?" मी विचारलं.
"कुणाला नाही तर देवबाप्पाला सॉरी म्हण, म्हणजे तो तुला पुन्हा केस देईल."
तिचे आशावादी विश्व सरळ सोपे होते. त्याला तडा द्यावा असे मला वाटले नाही. पण थोडी वस्तुस्थिती मान्य करता यायला हवी. म्हणून मी सांगितले, "देवबाप्पा म्हणतो की तुला आजोबा व्हायचं असेल तर आधी म्हातारा व्हायला पाहिजे. तुम्हाला ओल्ड आजोबा आवडतो ना?"
"ओके", " ओके" म्हणत त्यांनी तो संवाद थांबवला.
आता त्या मैसूरला रहायला गेल्या आहेत. पुण्याच्या सेंट मेरी कॉन्व्हेंटमधून एकदम तिथल्या पुष्करणी बालोद्याना शाळेत गेल्याने त्यांना कल्चरल शॉक वगैरे बसेल अशी आम्हाला भीती वाटत होती. पण तसे कांहीच झाले नाही. इथे जुन्या शाळेतल्या मैत्रिणी नाहीत म्हणून थोडी कुरकुर केली, पण तेवढीच. आता त्यांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि कन्नड या चार भाषा आणि गणित, सामान्य ज्ञान, चित्रकला वगैरे विषय आहेत. त्यांची पुस्तके आणि वह्या मिळून अठरा आयटमचे गांठोडे पाहून आम्हालाच घाम फुटला होता. त्याशिवाय घरी मराठी बोलायचे शिक्षण चाललेच असते. त्यामुळे आम्ही त्यांना हवे तसे बोलू देतो. त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढून आणि आदरार्थी बहुवचन वगैरेचा घोळ घालून त्यांना बोलतांना आडवत नाही. एकदा मनात आलेले विचार मांडता येणे जमू लागले की बाकीच्या गोष्टी हळू हळू जमतील.

सिंड्रेला, स्नोव्हाइट वगैरेंच्या परीकथांच्या जगातून त्या पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, पण आता माणसांच्या जगातल्या कांही गोष्टी ऐकायला आणि सांगायला लागल्या आहेत. त्यांना आता अक्षरज्ञान झाले असले आणि बोलतांना शब्द जुळवून वाक्यरचना करता येऊ लागली असली तरी अजून पुस्तक वाचता येत नाही. त्यामुळे गोष्टींच्या पुस्तकांतल्या गोष्टी त्यातल्या चित्रांच्या आधारानेच सांगाव्या लागतात. एका चित्रात एक पोलिस एका चोराचा पाठलाग करतो आहे असे दाखवले होते त्याप्रमाणे मी इराला सांगितले. त्यावर तिने विचारले, "तुला हे कसे समजले?"
मी म्हंटले, "ते तर अगदी सोप्पं आहे. मागून धांवणाऱ्या या पोलिसाने त्याचा युनिफॉर्म घातला आहे. हा बघ! "
"पण मग चोर युनिफॉर्म कां नाही घालत?" खरेच सगळ्या गुन्हेगारांनी विशिष्ट गणवेष घातले असते आणि त्यांना ओळखता आले असते तर किती बरे झाले असते ना?

अशा आहेत आमच्या गोड छकुल्या. चिवचिवाट करून मन रमवणाऱ्या आणि मध्येच न सुटणारे प्रश्न विचारून निरुत्तर करणाऱ्या.
.
.
.
हा लेख लिहूनही आता दहा वर्षे होऊन गेली. आता त्या छकुल्या राहिल्या नाहीत. त्यांनी आपले विश्व निर्माण केले आहे आणि त्यांना कुठलाही प्रश्न पडला तर त्याचे उत्तर त्या स्वतःच गूगलवरून शोधून काढतात आणि मलाच नवनवी माहिती देतात.  

Thursday, July 24, 2008

पूजा आणि व्यापार


आपल्याकडे नव्या दुकानाचे उद्घाटन हमखास देवाची पूजा करून व नारळ फोडून होते. किंबहुना 'नारळ फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थच 'नव्याने सुरुवात करणे' असा झाला आहे. व्यापारी वर्षाच्या सुरुवातीला धूमधडाक्याने लक्ष्मीपूजन केले जाते. इतर अनेक प्रसंगीसुद्धा परंपरागत विधीने पूजा अर्चा करून ते साजरे केले जातात. व्यापारातील नफ्यातोट्याच्या अनिश्चिततेमुळे व्यापार व्यवसाय करणारे लोक नोकरदारांच्या मानाने अधिकच श्रद्धाळू वृत्तीने व सढळ हाताने पूजापाठ, नवससायास करतांना दिसतात. हे करतांना अर्थातच आपली भरभराट होवो, आपले उत्पन्न आणि संपत्ती यामध्ये भरघोस वाढ होवो अशी प्रार्थना ते करतातच. यासाठी ते आपल्या प्राप्तीमधला कांही भाग खर्च करतात. पण पूजाविधी हेच प्राप्तीचे एक साधन बनवण्याची कल्पना कांही सुपीक डोक्यांत आली.


तशी ती कांही अगदी नवी कल्पना नाही. प्रत्येक देवस्थानांच्या दारात फुले, हार, नारळ, उदबत्त्या वगैरे विकून त्यावर उदरनिर्वाह करणा-या लोकांची झुम्मड उडालेली आपण पाहतोच. त्यांना "नको नको" म्हणत देवळात प्रवेश करतांना नाकी नऊ येतात. पण घरी होणा-या धार्मिक समारंभांची गोष्ट जरा वेगळी आहे.
माझ्या लहानपणच्या काळात खेडोपाड्यात रहाणा-या लोकांच्या घरातल्या देवांची रोज साग्रसंगीत पूजा करायची प्रथा होती. त्यामुळे त्यासाठी लागणा-या सर्व वस्तू देवघरात नेहमीच ठेवलेल्या असायच्या. स्वयंपाकासाठी लागणा-या वस्तूंचेही साठवण घरी केलेले असायचे. तुळस, दुर्वा, फुले वगैरे ज्याच्या त्याच्या अंगणात नाहीतर परसात मिळायच्या. त्यामुळे सत्यनारायणासारख्या पूजेसाठी खास बाजारहाट करण्याची गरज पडायची नाही.


मुंबईच्या धांवपळीच्या जीवनात दैनिक देवपूजेचा संकोच झाला. तसेच जागेच्या टंचाईमुळे रोजच्या जीवनाला आवश्यक तेवढ्याच गोष्टी घरात ठेवता येतात. चाळीत किंवा फ्लॅटमध्ये रहात असलेले लोक अंगणातली पानेफुले कोठून आणणार? एकत्र कुटुंबपद्धत जाऊन विभक्तपणे राहण्यामुळे कुठल्या विधीसाठी काय काय लागते हे सांगणारी वडीलधारी माणसे घरी नसतात. या सगळ्या कारणांनी सत्यनारायण, हरतालिका, मंगळागौर, गृहप्रवेश अशी एखादी खास पूजा करायची असल्यास त्यासाठी चांगली पूर्वतयारी करावी लागते. शहरातल्या लोकांच्या हातात ब-यापैकी क्रयशक्ती असल्याने अशा ग्राहकांचा एक वर्ग निर्माण झाला आहे.


साहजीकच या ग्राहकवर्गाला लागणारे सामान पुरवणारे व्यापारी पुढे आले. नुकताच मी एका ठिकाणी गेलो होतो. त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेचा 'किट' विकत आणला होता. त्यात पूजाविधीसाठी लागणा-या एकोणीस वस्तू पुठ्ठ्याच्या एका सुबक चौकोनी डब्यात पॅक केल्या होत्या. त्या शिवाय बाहेरून आणावयाच्या वस्तूंची यादी त्यावर छापलेली होती. डब्यावरच सत्यनारायणाचे सुंदर चित्र दिले होते. ते पूजेच्या चौरंगावर कलशाच्या मागे उभे करून ठेवायचे.


योगायोगाने त्याच दिवशी व्यापार उद्यम या विषयाला वाहिलेल्या एका नियतकालिकात एका आगळ्या उद्योजकाची माहिती वाचायला मिळाली. त्याचे नांव आहे प्रकाश मुंदडा. या तरुण उद्योजकाने पुण्याच्या सिंबॉयसिस मधून मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एम् बी ए ची पदवी घेतली. ते शिक्षण सुरू असतांनाच त्यांनी कांही स्पर्धांमध्ये भाग घेतला व आपल्या कल्पकतेच्या जोरावर व्यापारक्षेत्रात अभूतपूर्व अशा संकल्पना मांडून पारितोषिके मिळवली. लठ्ठ पगाराच्या नोक-या त्यांच्याकडे चालून आल्या होत्या, पण त्यांना स्वतःचा उद्योग स्थापन करून तो बहराला आणायचा होता.


स्पर्धांसाठी प्रबंध लिहीत असतांनाच यथासांग पूजाविधी करू इच्छिणा-या सधन कुटुंबातील व्यक्ती ही नवी बाजारपेठ त्यांच्या दृष्टीस पडली. तिच्या गरजा व आवडी निवडी यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अशा प्रकारच्या ग्राहकांचा गुणवत्तेवर कटाक्ष असतो, देवा धर्माच्या बाबतीत कसलीही चूक केलेली त्यांना चालत नाही, त्यांना सुटसुटीत आकाराच्या पण आकर्षक दिसणा-या वस्तू घ्यायला आवडतात. या सगळ्यासाठी किंमत मोजावयाची त्यांची तयारी असते. स्वतः श्रद्धाळू नसूनसुद्धा श्री.मुंदडा यांनी विविध पूजाविधींचा बारकाईने अभ्यास करून त्यातील अगदी तेलातुपापासून जास्तीत जास्त किती वस्तू आपल्याला व्यवस्थित पॅक करून पुरवता येतील ते ठरवले आणि 'ब्लेसिंग्ज' या नांवाखाली आपला पूजासामानाचा संच बाजारात आणला. हे संच घरोघर पोचायला वेळ लागेल हे पाहून त्यांनी एकदम मोठमोठ्या व्यापारी संस्थांच्या संचालकांना गाठले आणि दिवाळीसाठी एक अभिनव भेटवस्तू म्हणून हे संच देण्याची कल्पना त्यांना पटवून दिली. यामुळे त्यांची विक्री एकदम लक्षावधीच्या घरात गेली, इतकेच नव्हे तर त्यांची उत्पादने थोरामोठ्यांच्या घराघरात जाऊन पोचली. आता हिंदूंच्या वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी तसेच इतर धर्मीयांना लागणा-या वस्तूंचे वेगवेगळे संच बनवण्याच्या योजना त्यांच्या मनात आहेत.

Wednesday, July 23, 2008

हितगुज


माजी संरक्षणमंत्री माननीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट दिल्यावर "खडकवासला महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र खडकवासल्यात कुठे दिसत नाही" असे उद्गार काढले होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर मुंबईत आहे, पण तसे जाणवण्याइतक्या मोठ्या संख्येने मराठी माणसे कांही तिथे भेटत नाहीत. जे मराठी लोक भेटतात ते सुद्धा मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन असल्या विषयांवर आपसात कधी बोलत नाहीत. त्यामुळे कांही मंडळींनी दर महिन्यातून एक दिवस एकत्र जमून खास याच विषयांवर चर्चा करायचे ठरवले. आपल्या अनौपचारिक समूहाला त्यांनी 'हितगुज' हे नांव दिले. या गोष्टीला दहा बारा वर्षे होऊन गेली असतील. त्या काळात मी आपल्या तांत्रिक कामात आकंठ बुडालेलो होतो आणि साहित्य, संस्कृती किंवा समाज यातील 'स'चा सुद्धा मला कधी स्पर्श झाला असेल अशी शंका कोणाला येण्याचे कारण नव्हते. त्यामुळे मला हितगुजच्या अस्तित्वाचा पत्ता लागला नाही.

नाही म्हणायला श्रवणभक्ती करण्याइतपत संगीतातील 'स'ची थोडी गोडी निर्माण झालेली असल्यामुळे मी कधी कधी गायनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावीत होतो. अशाच एका कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये चार मराठी माणसे चहा पीत बोलत उभी होती त्यांच्यात मी ही सामील झालो. पुढील भाग सुरू होत असल्याची घोषणा झाल्यावर आम्ही आपापल्या जागांकडे परतलो. जाताजाता एक पाटील कां कुलकर्णी दुस-याला म्हणाले, "आता पुन्हा पुढच्या शनिवारी आपण हितगुजमध्ये भेटणारच आहोत." ते वाक्य ऐकल्यावर डोक्यात एका कुतूहलाच्या किड्याने जन्म घेतला. 'हितगुज'मध्ये म्हणजे हे लोक कुठे भेटणार आहेत? त्या भागातली सगळी हॉटेले आणि हॉल मला माहीत होते. त्यात हे नांव कधी ऐकले नव्हते. कदाचित एखादा बंगला किंवा गृहनिर्माण संस्था असेल असे मनाचे समाधान करून त्या किड्याला झोपवून दिले. आणखी कांही दिवस गेल्यावर योगायोगाने पुन्हा तेच नांव असेच कानावर आले, शिवाय "तुम्ही आला असतात तर तुम्हाला ती चर्चा नक्कीच आवडली असती" असे कांहीतरी कोणीतरी म्हणाले. ते ऐकून झोपी गेलेला 'तो' जागा झाला आणि ताडकन स्वतः उठून वळवळ करू लागला व मला
स्वस्थ बसू देईना. पण लोकांच्या बोलण्यात मध्येच नाक खुपसून चौकशा करण्याचे तंत्र मला कधी जमलेच नाही. त्यामुळे त्या बाबतीत फारशी माहिती मिळाली नाही.

हितगुजची माहिती काढायचे काम मग मी एका बोलक्या व्यक्तीला दिले. तिने एका दिवसात कोणाला तरी विचारून माहिती पुरवली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी कोणाच्या तरी घरी जमून कांही लोक मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती, सामाजिक समस्या असल्या विषयांवर दीड दोन तास चर्चा करतात. शिवाय या कार्यक्रमात गाणेबीणे आणि खाणेपिणे अजीबात नसते (थोडक्यात माझे तिथे कांही काम नाही) एवढी माहिती मिळाली. आधी वाटले की ज्या गांवाला जायचे नाही त्या गांवाची वाट कशाला विचारा?

पण नंतर लक्षात आले की आपण जी चर्चासत्रे, संमेलने, कार्यशाळा वगैरे पाहतो त्या ठिकाणी तर खाण्यापिण्याची चंगळ असते. रसाळ रसगुल्ले खाल्ल्यावर वक्त्याची वाणी किती 'रसवंती' होते आणि खमंग चटपटे नमकीन पदार्थ खाऊन त्याचे भाषण व त्यावरील चर्चा कशी खुमासदार होते ? पण कांही न खाता पिता हे लोक उपाशीपोटी इतका वेळ कसली गहन चर्चा करीत असतील? ही विचारवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, प्रतिभावंत वगैरे कलावंत मंडळी तावातावाने चर्चा करतांना कशी दिसत असतील? आपला मुद्दा मांडतांना त्यांच्या आवाजाला कशी धार चढत असेल? तो जिंकल्यावर त्यांची मुद्रा कशी प्रफुल्लित होत असेल? अशा प्रकारच्या प्रश्नांनी कुतूहलाच्या कीटकांची फौज उभी केली. त्यांना शांत करण्यासाठी मला स्वतच तिथे जाऊन तो कार्यक्रम पाहणे आवश्यक होते.

त्यांच्या पुढील महिन्यातल्या बैठकीची माहिती मिळवून भिंतीवर टांगलेल्या कालनिर्णयावर खूण करून ठेवली. त्या दिवशी ठरलेल्या वेळी घरातून निघायला थोडा उशीरच झाला होता. एवीतेवी आपण कांहीतरी ऐकायलाच जाणार आहोत तेंव्हा कोणी कांही म्हणालेच तर तेही 'ऐकून' घेऊ असा विचार करीत त्या बिल्डिंगपर्यंत जाऊन पोचलो. जिना चढत असतांना वरून जोरजोरात हंसण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे खिशातला पत्ता काढून पुन्हा पाहून घेतला. त्या घरी पोचलो तोंवर वीस पंचवीस मंडळी जमली होती. त्यातली निम्मीतरी आमच्या परिचयाची होती. त्यामुळे आमचे आपुलकीने स्वागत झाले. कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातील विनोदी उतारे कोणीतरी वाचून दाखवत होते. त्यावर हास्याचे फवारे उडत होते. इथे तर अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. त्यामुळे मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला.

लग्नाचा रौप्पमहोत्सव होऊन गेलेल्या एका गृहस्थाने तो प्रेमगीते लिहायचे वय असतांना त्याने लिहून ठेवलेल्या कांही कविता वाचून दाखवल्या. त्याची अर्धांगी समोरच बसलेली होती. या कविता नेमक्या कोणाला उद्देशून केल्या होता त्याचा पत्ता लागत नसल्याने तिने लाजावे की रुसावे हेच तिला समजेनासे झाल्यागत ती गोंधळली होती. काव्यवाचन झाल्यावर सगळ्यांनीच 'वाः वाः' केले. कांही लोकांनी त्यांना न कळलेल्या शब्दांचे अर्थ विचारून घेतले तर कांही जणांनी यावरून त्यांना आठवलेल्या सुप्रसिद्ध कवितांच्या ओळी म्हणून दाखवल्या.

लग्नसमारंभाच्या वेळी आहेर देण्याच्या प्रथेवर बरीच चर्चा झाली. "ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली असल्याकारणाने त्यात कांही तरी तथ्य पूर्वीच्या लोकांनी पाहिलेच असणार." असा सूर कोणी लावला. "या निमित्ताने लग्नाच्या खर्चाची जबाबदारी थोडी वाटली जाते" असे कोणाला वाटले. "देण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते ते देणा-याला मिळते, घेणा-याची प्राप्ती तर झालेली असतेच" असा युक्तीवाद कोणी केला. या उलट "हा एक प्रकारचा कर झाला आहे. मनाविरुद्धसुद्धा लोकलाजेस्तव तो भुर्दंड द्यावा लागतो. त्यामुळे लग्नाचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद होण्यापेक्षा आहेर द्यावा लागणार या विचाराने तापच होतो." असे मुद्दे मांडले गेले. "पण त्याची काय आवश्यकता आहे?" यावरून सुरुवात होऊन, "लग्नासाठी खर्चाची, खर्चासाठी समारंभाची, समारंभाला लोकांच्या गर्दीची अशा सगळ्याच गोष्टींची काय आवश्यकता आहे?" असे करता करता "लग्नाची तरी काय आवश्यकता आहे?" या दिशेने चर्चा चालली आहे हे पाहून एका ज्येष्ट महिलेना चर्चेचे सूत्र हातात घेतले आणि "आहेर देण्याची प्रथा प्राचीन कालापासून चालत आलेली असली तरी कालाप्रमाणे त्यात बदल करून ती ऐच्छिक ठेवावी, ज्यांना आहेर द्यावा घ्यावा असे वाटेल त्यांनी तो द्यावा व घ्यावा ज्यांना तो नकोसा वाटत असेल त्यांच्यावर तो लादला जाऊ नये" असे सर्वानुमते ठरले असल्याचे सांगून ही चर्चा आता इथेच थांबल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमात खाणेपिणे वर्ज्य असल्याची माहिती मिळालेली असल्यामुळे व गंभीर चर्चा ऐकण्यासाठी स्टॅमिना रहावा म्हणून दुपारच्या चहाबरोबर दोनच्या ऐवजी चार बिस्किटे खाऊन घरून निघालो होतो. पण त्याची गरज नव्हती कारण तिथे बिस्किटासकट चहाही मिळाला आणि चर्चाही डोक्यावरून गेली नाही. फक्त गंमत पहायला म्हणून गेलेलो असतांना मी त्यात केंव्हा ओढला गेलो व हिरीरीने भाग घ्यायला सुरुवात केली ते कळलेच नाही. क्रिकेटची मॅच पहायला गेलेल्या प्रेक्षकाने नकळत बाउंडरीलाईनवर फील्डिंग करायला लागावे तशातली माझी गत झाली. एकदाच जायचे म्हणून त्या बैठकीला गेल्यावर तिथला कायमचा सदस्य बनून परत घरी आलो.

Tuesday, July 22, 2008

अजब ही टक्केवारी


पूर्वापारपासून आपल्याकडे १६ आण्यांचा एक रुपया असायचा. त्या काळात "१६ आणे खरे", "१२ आणे काम फत्ते झाले", "फक्त ८ आणे शक्यता आहे", "४ आणे सुद्धा पीक आले नाही", "एका पैशाएवढा विश्वास नाही" अशा प्रकारचे शब्दप्रयोग सर्रास वापरात होते. त्याचा अर्थ सगळ्यांना लगेच कळायचा. दशमान पद्धती सुरू झाल्यावर १६ आण्यांपासून एकदम १०० पैशांचा रुपया झाला आणि टक्केवारीत सांगणे सुरू झाले. मात्र ३७.७९ टक्के आणि ८६.५७ टक्के असे मोठे आकडे दिल्यावर त्यातला नेमका फरक सर्वसामान्य माणसाला चटकन समजत नाही. यामुळेच आकडेवारीबरोबरच चार्ट दिले जातात. त्यातील स्तंभांच्या आकारमानावरून अधिक बोध होतो. सामान्य माणसाला बुचकळ्यात पाडणारे दोन किस्से खाली दिले आहेत.

----------------------------------------------------------------------


पहिला किस्सा


एक माणूस घरोघरी जाऊन टोमॅटोचा सॉस विकत होता. लोकांनी त्याला विचारले, "हा सॉस शुद्ध आहे कां?"
त्याने सांगितले, " मी खोटे बोलणार नाही. यात ९०% टोमॅटो आणि १०% इतर खाद्यपदार्थ आहेत पण मी तुमच्याकडून बाजारभावाच्या फक्त ८०% किंमत घेत आहे. म्हणजे त्यात तुमचा फायदाच आहे." त्याच्या कडील सर्व बाटल्या एकाच दिवशी खपल्या.
दुसरे दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी लोकांनी सॉसची चव घेऊन पाहिली ती विचित्रच लागत होती. पण तो विक्रेता पुन्हा त्या बाजूला फिरकलाच नाही. एका माणसाने त्याला शहराच्या दुस-या भागात फिरतांना पाहिले आणि पकडले. तो पुन्हा म्हणाला, "देवाशप्पथ सांगतो, यांत ९० टक्के टोमॅटो आहेत. खोटे वाटत असेल तर माझ्याबरोबर कारखान्यात चला."
दोघे कारखान्यात गेले. तिथे एक माणूस यंत्रामध्ये कच्चा माल टाकत होता. मोजून नऊ टोमॅटो आणि एक भोपळा. ९०% टोमॅटो आणि १०% भोपळा!!!

-----------------------------------------------------------------------

दुसरा किस्सा


हा किस्सा गणितात हमखास शंभर टक्के गुण मिळवणा-या लोकांनी वाचला नाही तरी चालेल. आज गणिताचा पेपर आहे म्हणून ज्यांच्या छातीतली धडधड थोडी वाढत असेल त्यांनी अवश्य वाचावा.
चार मित्र दर रविवारी एकत्र जमून पत्ते कुटायचे. एका नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना असे वाटले की नवीन वर्षात आपला कंपू वाढवावा, महिन्यातून एक दिवस पत्ते खेळण्याचे ऐवजी साहित्य, संगीत, कला वगैरे विषयावर अवांतर गप्पा माराव्या वगैरे. त्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येकाने आपापल्या दोन तीन जवळच्या मित्रांना घेऊन यायचे असे ठरले.
ठरल्याप्रमाणे चौघांनीही आपापल्या मित्रांना बरोबर आणले. त्यामुळे उपस्थितीत एकदम ३०० टक्के वाढ झाली. इतक्या लोकांची नीट सोय करणे कठिणच होते आणि एकंदरीत गोंधळ उडाला. त्यामुळे मार्च महिन्यात उपस्थिती ७५ टक्क्यांनी कमी झाली. पुन्हा प्रयत्न करून त्यांनी एप्रिल महिन्यात उपस्थिती १५० टक्क्यांनी वाढवली. या वेळेस नीट व्यवस्था झाली असली तरी चर्चेविषयी कुणीच तयारी करून आले नव्हते. त्यामुळे ती फारशी रंगली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मे महिन्यात उपस्थितीत ६० टक्क्यांची घट झाली.
त्यानंतर जून मध्ये १०० टक्क्यांनी वाढली ती जुलै मध्ये ५० टक्क्यांनी कमी झाली. ऑगस्ट मध्ये ५० टक्के वाढ, सप्टेंबर मध्ये ३३ टक्के घट, ऑक्टोबर मध्ये २५ टक्के वाढ तर नोव्हेंबरमध्ये २० टक्के घट झाली. डिसेंबर महिन्यात कांहीच फरक न पडता उपस्थिती पूर्वीच्या आंकड्यावर स्थिरावली.
वर्षभराचा आढावा घेतला तर असे दिसेल की उपस्थितीमध्ये ३००, १५०, १००, ५० आणि २५ टक्क्यांनी वाढ झाली तर ७५, ६०, ५०, ३३ आणि २० टक्के घट झाली. एकंदर ६२५ टक्के वाढ आणि २३८ टक्के घट म्हणजे त्यांचा ग्रुप ब-यापैकी वाढला असेल नाही कां? नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो केवढा मोठा झाला असेल ?
.
.
कसचं काय? ज्या चार लोकांनी सुरुवात केली होती तेवढेच शिल्लक राहिले होते. बाकीचे मित्र मध्यंतरी येऊन गेले पण त्यातले कोणीच स्थिरावले नाहीत. वर्षभरातील उपस्थितीची संख्या अनुक्रमे ४,१६,४,१०,४,८,४,६,४,५,४ आणि ४ अशी होती.

गीतसंगणकायन


माझ्या संगणकाला कविता पाडण्याची खोड आहे. त्याने केलेला थोडा वात्रटपणा आपण पाहिलाच आहे. कुठेतरी गीतरामायण वाचून त्याला पुन्हा सुरसुरी आली. पण उगाच कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून त्याने रामकथेला धक्का न लावता गीतरामायणावरून प्रेरणा घेऊन गीतसंगणकायन लिहायचा विचार केला. त्यातल्याच कांही ओळी खाली दिल्या आहेत. यात एक सुसंगत कथानक नसल्यामुळे त्या विस्कळीत स्वरूपात आहेत.


निवेदक

सर्वही पार्टिसिपन्ट्स पाहती ।

कॉम्प्यूटर्स प्रेझेन्टेशन्स देती ।।

भिन्न रूपडी विभिन्न नांवे ।

कुणी उभे तर कुणी आडवे ।

जुने पुराणे कुणी कुणि नवे ।

सर्वही आत्मकथा सांगती ।।

---------------------------------
पत्नी

उगा कां काळिज माझे उले । पाहुनी पीसी दुकानांतले ।।


पती

उदास कां तू आवर वेडे पाणी नयनातले ।

पीसीचे लोन सॅंक्शन झाले ।


दुकानदार

ग्राहका घे रिसीट ठेऊन ।

मम संगणक तुवा निवडला हा माझा सन्मान ।।


पतीपत्नी
दोन प्रहरी कां ग उरी हर्ष दाटला ।

संगणक आला ना घरी सुरू जाहला ।।


पती (दुकानदारास)

श्रेष्ठ तुझा अँटीव्हायरस देई मज आता । कॉंम्प्यूटर रक्षणास योग्य सर्वथा ।।


पतीपत्नी

आकाशातुन जुळले नाते सा-या कॉम्प्यूटर्सचे।

कनेक्शन झाले इंटरनेटचे ।।


........ पुढील भाग पुन्हा कधी तरी.. (संगणकाला लहर आली तर .....)

Monday, July 21, 2008

संगणक उवाच


उषःकाल होता होता काळरात्र झाली ।
अरे पुन्हा आणा डेटा फाईल भ्रष्ट झाली ।।
--------------------
थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता ।
कंट्रोल आल्टर डिलीट करते मी आता ।।
--------------------------------------
फ्लॉपीची तिजोरी डेटाचाच ठेवा ।
उघड फाईल देवा आता उघड फाईल देवा ।।
--------------------------------------
विसरशील खास मला दृष्टीआड होता ।
कट करुनी क्विट करशील पेस्ट न करता ।।
------------------------------------
इथेच आणी या बांधावर अशीच श्यामल वेळ ।
रीड ओन्ली सखीसवे किती रंगणार खेळ ।।
-------------------------------------------
नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचिला पौंड ।
फुकट घेतला अकौंट ।ई मेलचा फुकट घेतला अकौंट ।।
कुणी म्हणे ही असेल चोरी ।
कुणा वाटते असे उधारी ।
विपुल वायफळ जाहीरातींचा सोसतो ना मी लोट ।।
--------------------------------------
धागा धागा अखंड विणुया ।
वेबसाईटचे जाल रचूया ।।
एचटीएमेलचा धागा धरुनी ।
जावास्क्रिप्टचे सूत्र गुंफुनी ।
हायलाइटेड इंडेक्स करूया ।। वेबसाईटचे .....
टेक्स्ट लिहूया ज्ञानवर्धक ।
मुद्देसूद पण ध्यानाकर्षक ।
बुलेटेड फॉर्मॅट धरूया ।। वेबसाईटचे .....
इन्फॉर्मेशन सर्व जमवुनी ।
क्लासिफिकेशन त्याचे करुनी ।
टेबल्समध्ये नीट मांडुया ।। वेबसाईटचे .....
ग्राफिक्सचा करू सढळ वापर ।
एक चित्र जणु शब्द हजार ।
अनिमेशन फ्लॅशने करूया ।। वेबसाईटचे .....
वेबसाईटचे विस्तृत प्रांगण ।
साईटमॅपने करू आरेखन ।
क्रॉसलिंक्स सर्वत्र देऊया ।। वेबसाईटचे .....
सर्फिंगकरुनी इंटरनेटवर ।
साइट्स शोधू अन्य मनोहर ।
दुवे तयांचेही देऊया ।। वेबसाईटचे .....

मधुरबाला


हल्ली नेहमीच कोठे ना कोठे सौंदर्यस्पर्धा (खरे तर स्त्रीसौंदर्यस्पर्धा) होत असतात. त्यातून विजेत्या महिलांना नगरसुंदरीपासून विश्वसुंदरीपर्यंतचे बहुमान दिले जातात. त्या सौंदर्यवतींची छायाचित्रे आपण वर्तमानपत्रात पाहतो आणि विसरून जातो. ऐश्वर्या रायसारखी एकादीच दीर्घकाळपर्यंत प्रसिध्दीच्या झोतात असते, त्यामुळे तिचा चेहेरा लक्षात राहतो. इतर सिनेतारकासुध्दा त्यांना मिळालेल्या प्रसिध्दीनुसार कमीअधिक काळ डोळ्यासमोर असतात. त्यातले कांही चेहेरे कायम स्मरणात राहतात. असाच एक असामान्य सुंदर चेहेरा सुमारे साठ वर्षांपूर्वी जगासमोर आला आणि दहाबारा वर्षे सिनेजगतावर राज्य करून अस्तंगत झाला आणि अकाली काळाच्या पडद्याआड गेला. त्यालाही जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली. तरीही तिच्या मृत्यूनंतर जन्माला आलेली आजची रसिकांची पिढी "तुझे देखके ऐ मधुबाला, मेरा दिल ये पागल झाला" असे म्हणत नाचते आहे. 'भारतीय सिनेसृष्टीमधील सर्वात सुंदर चेहेरा' हा तिला मिळालेला खिताब आजपर्यंत कोणी काढून घेऊ शकलेली नाही. कोणीतरी तिला ' भारतीय मेरिलिन मनरो' असे म्हणताच तिच्या एका चाहत्याने "यापेक्षा मेरिलिन मनरोला हॉलिवूडची मधुबाला" असे म्हणायला पाहिजे असे सुचवले.
मधुबालाचा जन्म दिल्लीच्या एका पठाण कुटुंबात झाला. तिचे नांव मुमताज असे ठेवले होते. तिला मिळालेले सौंदर्याचे वरदान घरची बिकट आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी कामाला येईल असा विचार करून तिच्या वडिलांनी मुंबई गाठली आणि प्रयत्न करून मुमताजला बाल कलाकार बनवले. बेबी मुमताज या नांवाने तिने अनेक सिनेमात काम करून अर्थार्जन केले. त्या काळातल्या परिस्थितीत बाल कलाकारांना तसा मर्यादितच वाव असायचा. पण वयाची चौदा वर्षाची झाल्यावर तिने केदार शर्मा यांच्या नीलकमल या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत पदार्पण केले तेसुध्दा राजकपूर बरोबर! याच वेळी तिला पडद्यावर मधुबाला हे नांव देण्यात आले ते पुढे सर्व रसिकांच्या तोंडी झाले. त्यानंतर दोन वर्षांनी आलेला महल हा सिनेमा सुपरहिट झाला आणि मधुबाला तसेच लता मंगेशकर या दोघी या चित्रपटानंतर सुपरस्टार झाल्या. त्यातले आयेगा, आयेगा, आयेगा आनेवाला हे रहस्यमय गाणे आजसुध्दा अनेकांच्या टॉप टेनमध्ये आहे.
अनुपम सौंदर्याच्या सोबतीला मधुबालाकडे अभिनयकौशल्य होते, तसेच चांगले काम करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी वगैरे अनेक गुण होते. घरच्या परिस्थितीमुळे तिला शालेय शिक्षण मिळाले नाही, पण तिने हिंदी उर्दूमध्ये तर प्राविण्य मिळवलेच, शिवाय 'गाँवकी गोरी' प्रकारचा रोल करत असतांना सहकलाकाराकडून ती फावल्या वेळात इंग्रजी शिकत असे. या वृत्तीमुळेच ती खेड्यातल्या गरीब अडाणी मुलीपासून ते शहरातल्या श्रीमंत किंवा मॉडर्न मेमसाहिबापर्यंत कुठलाही रोल सहजपणे करत असे.
तिने राजकपूरबरोबर काम करून सुरुवात केली आणि अशोककुमार, दिलीपकुमार, देवआनंद, भारतभूषण, प्रेमनाथ, प्रदीपकुमार,गुरुदत्त, सुनीलदत्त इत्यादीं तिच्या काळातील सर्व आघाडीच्या नायकांसोबत काम केले. त्यातल्या कांहींबरोबर तिचे नांव जोडले गेले, कांहींनी तिच्यावर एकतर्फी प्रेम केले, एकाशी तिचे सूत जमले होते वगैरे बातम्या त्या काळातल्या फिल्मी गॉसिपमध्ये चवीने वाचल्या जात असत. अखेरीस किशोरकुमारबरोबर तिचे लग्न झाले तोपर्यंत ती हृद्रोगाने व्याधीग्रस्त झाली होती.
मधुबाला ज्या काळात सिनेमा गाजवत होती तो काळ सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचा होता. त्यामुळे अनिल बिस्वास, नौशाद, शंकर जयकिशन, मदनमोहन, ओ.पी.नैयर आदि सर्व आघाडीच्या संगीत दिग्दर्शकांनी दिलेल्या मधुर चालींनी नटलेली गाणी तिने पडद्यावर गायिली आणि ती गाणी अजरामर झाली आहेत. अशाच निवडक गाण्यांचा खजिना अशोक हांडे यांनी आपल्या मधुरबाला या आपल्या नव्या कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांपुढे आणला आहे. स्वतः श्री अशोक हांडे यांचे निवेदन, मधुबालाच्या जुन्या दुर्मिळ चित्रपटातली निवडक दृष्ये आणि नव्या पिढीतल्या वादकांच्या ताफ्याबरोबर नव्या दमाच्या गायकगायिकांच्या आवाजात मधुबालाने पडद्यावर म्हंटलेली गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. सादरीकरणाच्या बाबतीत हांडे तरबेज आहेतच. त्यांचे निवेदन, पडद्यावरील दृष्ये आणि लाइव्ह म्यूजिक हे तीन्ही इतके सफाईने एकमेकात मिसळले जातात की क्षणभराचाही खंड त्यात पडत नाही.
विस्मृतीच्या आड गेलेल्या जुन्या सिनेमांची थोडीशी झलक दाखवल्यानंतर महल मधले आयेगा आनेवाला हे जबरदस्त गाणे येते आणि प्रेक्षक सांवरून बसतात. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस फिफ्टीफाय, गेटवे ऑफ इंडिया, काला पानी, हावडा ब्रिज, बरसातकी रात, हाफ टिकट वगैरे सिनेमातली एकाहून एक गोड गाणी येत राहतात. मुगले आजम आणि चलतीकी नाम गाडी हे दोन चित्रपट मधुबालाच्या आयुष्यात खास महत्वाचे आहेत. हे दोन्ही चित्रपट हिंदी सिनेमाच्या इतिहासात आपापल्या जागी लँडमार्क ठरले आहेतच. मुगले आजम या भव्य चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस दिलिपकुमार आणि मधुबाला यांचे व्यक्तिगत संबंध पराकोटीचे बिघडलेले होते हे त्यातली प्रणयदृष्ये पाहतांना कोणाला खरे वाटणार नाही. चलतीका नाम गाडी बरोबर मधुबाला आणि किशोरकुमार यांच्या प्रेमसंबंधाची गाडी चालू लागली आणि त्याची परिणती अखेर त्यांच्या विवाहात झाली. या दोन्ही सिनेमातली गाणी या कार्यक्रमात अप्रतिम बसवली आहेत आणि प्रेक्षकांनीही वन्समोअरची मागणी करून त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
हा कार्यक्रम पाहतांना जुन्या आठवणींना उजळा मिळाला असे नेमके मला म्हणता येणार नाही कारण रेंगाळलेला मुगले आझम सोडून मधुबालाचा कोणताच चित्रपट माझ्या आठवणीत रिलीज झाला नाही. मधुबालाच्या बहराच्या काळात मी अजून सिनेमे पहायला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे कधीकाळी मी तिचा फॅन असण्याचा संभव नव्हता. तिचा अभिनय असलेले बहुतेक चित्रपट मी मॅटिनीमध्येच पाहिले आहेत, तेंव्हाच ते खूप जुने झालेले होते. त्यानंतर ते टीव्हीवर अधून मधून पहायला मिळतात. पण इतक्या जुन्या काळात अस्तित्वात असलेल्या टेक्निकमधून केलेल्या कृष्णधवल छायाचित्रणातूनसुध्दा तिचे जे सौंदर्य दिसते ते लाजवाबच म्हणावे लागेल.

Sunday, July 20, 2008

पु.ल.देशपांडे यांचा स्मृतीदिवस


मागच्या महिन्यात माझे आवडते लेखक पु.ल.देशपांडे यांचा स्मृतीदिवस येऊन गेला त्यावेळी मी बाहेरगांवी गेलो होतो. त्यामुळे माझी अनुदिनी बंद होती. पुलंचा सखाराम गटणे याला मिळतील तेवढ्या लेखकांच्या स्वाक्ष-या जमवण्याचा छंद होता आणि त्यातल्या प्रत्येकाला तो "साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात." अशा अर्थाचे कांही तरी सांगत असे. कोठल्याही सुप्रसिध्द लेखकाच्या भेटीचे भाग्य अजूनपर्यंत मला लाभलेले नाही, पण जे लोक मला नेहमी भेटतात त्या सर्वांना पु.ल.हे माझे आवडते लेखक आहेत हे माहीत आहे, कारण मीच अनेकदा तसे सांगितले आहे किंवा बोलतांना अनेकदा पुलंच्या लेखनातले दाखले दिले आहेत. सखाराम गटण्याला ज्या वयात साने गुरूजींच्या 'श्यामची आई'ने भारावले असेल अगदी त्या वयापासून ते आतापर्यंत मला मात्र पुलंच सर्वात जास्त आवडत आले आहेत. इंजिनियरिंगचा अवाच्या सवा अभ्यासक्रम आणि त्यानंतर प्रकल्पांची किचकट कामे यातच जे वाचन, लेखन आणि आरेखन घडत असे त्यानेच डोळे शिणून जात. जेंव्हा चष्म्याचा नंबर जास्तच वाढायला लागला तेंव्हा डॉक्टरांनीच माझे अवांतर वाचन बंद करायला लावले आणि वर्तमानपत्र वाचणेसुध्दा फक्त मथळ्यापुरते शिल्लक राहिले. त्यातून त्यानंतर जे कांही वाचन झाले असेल आणि त्यातले जेवढे स्मरणात राहिले त्यातला बराच मोठा हिस्सा पुलंच्या लेखनाने व्यापलेला आहे एवढे नक्की.
पुलंना प्रतिभेचे अगणित पंख लाभले होते आणि ते एकापेक्षा एक वरचढ होते. त्यांची पुस्तके आणि मासिकांमधले लेखन तर वाचलेच, त्यांनी लिहिलेली नाटके पाहिली, त्यांनी काढलेले सिनेमे पाहिले, दूरदर्शनवर अनेक वेळा त्यांचे दर्शन घडले, त्यांच्या कार्यक्रमांच्या कॅसेट्स ऐकल्या, सीडी पाहिल्या. कसलीही वेशभूषा, सेट्स, लाइट इफेक्ट्स, पार्श्वसंगीत वगैरेच्या सहाय्याशिवाय मराठी रंगमंचावर एकपात्री प्रयोग सादर करण्याचे साहस बहुधा सर्वात आधी त्यांनीच 'बटाट्याची चाळ' फक्त शब्दात आणि हावभावात उभी करून केले असावे आणि अनेक व-हाडी मंडळींना सोबतीला घेऊन त्यांनी काढलेली 'वा-यावरची वरात' अफलातून होती. अशा प्रकारचे इतके चांगल्या दर्जाचे कार्यक्रम फार म्हणजे फारच दुर्मिळ असतात. निदान मी तरी पाहिलेलेच नाहीत.
पुलंनी त्यांच्या लेखनाच्या ओळीओळीतून आणि कार्यक्रमातल्या प्रत्येक हावभावातून पोट धरधरून हंसवलेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचे सांगायचे झाले तर वाचकांना आणि प्रेक्षकांना त्यांनी अंतर्मुख करवले. आपण काय करत आहोत याचा आरसा त्यांना दाखवून यापेक्षा वेगळे काय करू शकतो हे उपदेश न करता त्यांनी शिकवले. एक उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणापासून माझ्यावर गडक-यांच्या एकच प्याला या नाटकाचा खोलवर प्रभाव होता आणि माझ्या आजूबाजूची सर्व मंडळी दारूच्या थेंबालाच काय तिच्या रिकाम्या बाटलीलासुध्दा स्पर्श न करणारी होती. अर्थातच त्यामुळे मलाही मनातून तसेच वाटायचे. पण "लुत्फ ए मय तुझसे क्या कहूँ ऐ जाहिल, हाय कम्बख्त तूने पीही नही।" हे काकाजींचे वाक्य ऐकल्यानंतर घट्ट बंद करून ठेवलेली मनाची कवाडे थोडीशी उघडून पहावीशी वाटली. "धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती" अशी बोधकथांमध्ये दाखवलेली विभागणी प्रत्यक्षात नसते हे त्यांनी दाखवले. "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे" यात कांही गैर नाही हे सांगतांनाच त्या धनाचे चांगल्या कामांसाठी मुक्तहस्ते दान कसे करावे हे स्वतः उदाहरणाने दाखवून दिले. पुलंनी लिहिलेली खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर खादाडी अधिकच चविष्ट वाटायला लागली. त्यांनी शिकवलेल्या अशा सगळ्या गोष्टींची यादी करणे अशक्य आहे.
ज्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त आले त्या दिवशी मी एक छोटासा परिच्छेद लिहून आमच्या ऑफिसच्या कँटीनच्या वाटेवर असलेल्या नोटीस बोर्डावर लावला होता. त्यापूर्वी "जागा भाड्याने हवी आहे, जुनी स्कूटर विकणे आहे, अमकी वस्तू हरवली आहे" अशा प्रकारच्या सूचना बहुतेक करून या फलकावर असायच्या, त्यांना बाजूला सारून मी शब्दांकन केलेली ही आदरांजली तिथे चिकटवली होती. अनेकांनी ती वाचून तिला चांगला प्रतिसाद दिला होता.

भेंडीबाजारवाले घराणे
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात घराणेशाहीचे मोठे महत्व आहे. 'ग्वाल्हेर', 'आग्रा', 'पतियाळा' यासारख्या मोठ्या शहरांच्या नांवाने प्रसिद्ध झालेली घराणी त्या भागात विकसित झालेल्या संगीतशैलीवरून निर्माण झाली असतील असे वाटेल. 'जयपूर' घराणे राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरामध्ये स्थापन झाले असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण या घराण्याच्या नांवातील जयपूर हे अत्रौली नांवाच्या उत्तर भारतातील छोट्या गांवाच्या नांवाला जोडून 'जयपूर-अत्रौली' घराणे स्थापन करणारे उस्ताद अल्लादियाखाँ आपले अत्रौली गांव सोडून कांही दिवस जयपूरला राहून पुढे मुख्यतः कोल्हापूरला राहिले होते. त्याचप्रमाणे 'किराणा' घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँ उत्तर भारतातील किराणा हे गांव सोडून दक्षिणेत येऊन स्थिरावले होते. त्यांनी किराणा मालाचे दुकान कांही चालवले नव्हते.
या सगळ्या गांवांच्या नांवावरून पडलेल्या घराण्यांच्या नांवात 'भेंडीबाजार' घराणे हे नांव जरा विचित्रच वाटते. ते नाव ऐकून बरेच लोक स्मितहास्य करतात. या घराण्याचे पूर्वीच्या काळातील मोठे गायक मरहूम उस्ताद अमान अली खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीताची मैफिल गेल्या वर्षी वाशी येथील गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतीत आयोजित केली होती. या घराण्याच्या प्रसिद्ध गायिका तसेच प्रख्यात विदुषी डॉ.सुहासिनी कोरटकर यांनी या प्रसंगी त्यांच्या घराण्याविषयी खास माहिती सांगितली. तसेच संगीताची खूप चांगली माहिती थोडक्यात सांगून प्रात्यक्षिकांसह आपल्या सुरेल आवाजात तिची उदाहरणे ऐकवली व त्यातील बारकावे श्रोत्यांना दाखवून दिले.
त्यांनी सांगितले की 'घराणे' हा शब्द पूर्वी प्रचलित नव्हता. वेगवेगळ्या गायकांनी आपापल्या शैलींचा विकास केला व ते त्याप्रमाणे गायन करीत असत. ते कोठून आले किंवा कोठे राहतात या अर्थाने 'आग्रावाले' किंवा 'ग्वाल्हेरवाले' असे त्याच्या गांवाच्या नांवाचे विशेषण या गायकांच्या नांवाच्या मागे किंवा पुढे लावले जाई. 'गिरगावचे गाडगीळ' किंवा 'माटुंग्याचे म्हात्रे' असे आपल्या बोलण्यात येते तसेच. यातील कांही प्रमुख गायक पुढे प्रसिद्ध झाले व त्यांच्यामागे त्यांची शिष्यपरंपरा निर्माण झाली. त्यांच्या गायनाची खास वैशिष्ट्ये निर्माण झाली. गुरुकुल पद्धतीने सतत त्यांच्या बरोबर राहणा-या शिष्यांनी ती आत्मसात केली व अधिक विकसित केली. बहुतेक गायकांच्या मुलांनी संगीत क्षेत्रातसुद्धा आपल्या वाडवडिलांचा वारसा घेतला व पुढे चालवला. कदाचित या कारणाने त्यांना कालांतराने 'घराणे' हे नांव पडले. या घराण्यात वंशपरंपरा असेल किंवा नसेल, पण शिष्यपरंपरेला अधिक महत्व आहे.
उस्ताद छज्जूखाँ, उस्ताद नजीरखाँ व उस्ताद खादिम हुसेनखाँ हे तीन बंधु त्यांचे वडील उस्ताद दिलावर हुसेन व उत्तर प्रदेशातील रामपूर येथील उस्ताद इनायत हुसेनखाँ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेऊन एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी चरितार्थासाठी मुंबईला आले. मुंबईला आधीच स्थाईक झालेल्या आपल्या भावासोबत ते भेंडीबाजार या भागात राहू लागले म्हणून 'भेंडीबाजारवाले' या नांवाने ओळखले जाऊ लागले. आजच्या भेंडीबाजारातील गर्दी, गलका, बकालपणा पाहिल्यावर या कोलाहलात कसले संगीत निपजले असेल असे वाटेल. पण त्या कालखंडात भेंडीबाजार ही श्रीमंतांची वस्ती होती. मोठे व्यापारी व सरकारी अधिकारी तेथे बंगले बांधून रहात असत. त्या काळात मलबार हिल व मरीन ड्राइव्हचा विकास झालेला नसावा. स्वयंचलित वाहने नव्हती. त्यामुळे फोर्टपासून जवळ असलेल्या भेंडीबाजार भागाला महत्व होते. त्या भागात राहणे प्रतिष्ठेचे मानले जाई. त्यामुळे 'भेंडीबाजारवाले' या नांवाला प्रतिष्ठेचे वजन होते.
त्यानंतरच्या काळात या घराण्यात अनेक गवई होऊन गेले. त्यातील मरहूम उस्ताद अमान अली खाँ व स्व.अंजनीबाई मालपेकर यांनी संगीताच्या क्षेत्रात विशेष कामगिरी करून यशाचे शिखर गांठले व अमाप प्रसिद्धी मिळवली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अमान अली खाँ यांचेकडे व किशोरी आमोणकर यांनी अंजनीबाईंच्याकडे कांही काल संगीताचे मार्गदर्शन घेतले होते ही गोष्ट नमूद करण्याजोगी आहे. या दोघींनाही शास्त्रीय संगीताचा अद्भुत असा वारसा घरातूनच मिळाला होता हे सर्वश्रुत आहे. पण तरीसुद्धा त्यांनी या घराण्यातील गुरूंकडून शिक्षण घेतले हे महत्वाचे आहे.
डॉ.सुहासिनी कोरटकर यांनी भेंडीबाजार घराण्याच्या संगीताबद्दल थोडक्यात पण बरेच कांही महत्वाचे मुद्दे चांगले समजावून सांगितले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर शास्त्रीय संगीत पुस्तक वाचून शिकता येत नाही, ते योग्य गुरूकडूनच शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे ते वाचून समजणार नाही, प्रत्यक्ष ऐकणे आवश्यक आहे. जे वाचून समजत नाही ते शब्दात लिहिण्याचे सामर्थ्य माझ्यासारखा संगीत क्षेत्रातील अशिक्षित माणूस कोठून आणणार? त्यांच्या सांगण्यातील मला जितके आकलन झाले ते थोडेसे माझ्या शब्दात देण्याचा एक तोकडा प्रयत्न इथे करणार आहे. सुहासिनीताईंच्या तोंडून ऐकलेले विचार व त्यावरून मला सुचलेली रोजच्या जीवनातील उदाहरणे यांची मिसळ यात केलेली दिसेल. प्रास्ताविक करतांनाच त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की अमक्या अमक्या गोष्टी भेंडीबाजार घराण्यात आहेत असे म्हंटले तर इतर घराण्यात त्या नाहीत असे नाही. सगळ्या घराण्यात त्या वेगवेगळ्या प्रमाणात व विविध प्रकाराने असतात व त्यामुळे त्या घराण्यांना वेगळेपण प्राप्त होते.
सगळ्यात पहिलीच गोष्ट म्हणजे आवाजाचा लगाव. आपापल्या शरीररचनेनुसार आपल्या गळ्याला कष्ट न देता त्यामधून निर्माण होईल अशा नैसर्गिक आवाजात आपण आपले रोजचे बोलणे बोलतो. रागाच्या भरात किंवा आश्चर्याने किंचाळतांना वरच्या पट्टीतील बारीक स्वर लागतो तर दुःखाने किंवा भावनावेगाने कंठ दाटून आल्यास त्यात खालचे सूर लागतात आणि आपोआपच घोगरेपणा येतो. कुशल नट आवाजातील हे सगळे फरक मुद्दाम ठरवून आपल्या अभिनयात व संवादात दाखवून देतात. वरच्या स्वरांना टोकदारपणा आणायचा तर खर्जातील आवाजाला हवी तेवढीच रुंदी द्यायची हे तर गायकाला करायचे असतेच, त्यशिवाय आणखी अनेक गोष्टी असतात. कांही स्वरांच्या आवती भोवती दुसरे स्वरकण फिरवून ते त्यातून गुंजन निर्माण करतात, गुंजारव करणा-या भँवराची आठवण करून देतात. कधी एक स्वर कांही क्षण घट्ट धरून ठेवतात तर कधी त्याला कंपायमान करतात. त्यासाठी गळ्यातील स्वरयंत्रावर चांगला ताबा ठेवावा लागतो तर आवाजात चढ उतार करण्याचा व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासाठी श्वासाच्छ्वासावर नियंत्रण मिळवावे लागते. या सगळ्या गोष्टी आपल्या शिष्याकडून रियाजामार्फत गुरू करवून घेतात व ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याचा आवाज तयार करतात. पूर्वीच्या काळचे जाणकार लोक आवाजाच्या लगावावरून त्या गायकाचे घराणे कोणते ते ओळखायचे असे म्हणतात.
आवाज तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग गायनात कसा करायचा हे आले. शास्त्रीय संगीतामधील फक्त ख्यालगायन घेतले तरी त्यात एका रागाच्या सुरावटी आलाप व तानांमधून दर्शवणे, त्यातील सरगम गाणे व ते करता करता बंदिशीच्या शब्दामधील भाव व्यक्त करणे हे सगळे आले. आलाप घेतांना कधी अत्यंत संथ लयीमध्ये त्यातील एक एक स्वर उलगडून दाखवतात. अनुभवी व जाणकार रसिकांना ते आवडते पण नवखे श्रोते त्याला कंटाळतात. त्यातील कांही कुंपणावर बसलेले श्रोते असतात. एक दोन अनुभव घेतल्यानंतर ते पुन्हा शास्त्रीय संगीत ऐकायला येणारच नाहीत. त्यांना आपल्या बाजूला करून घेण्याच्या दृष्टीने थोड्या जलद लयीने आलाप घेणे इष्ट ठरते. दोन स्वरांना जोडणारी मींड अनेक प्रकाराने घेता येते. जवळ जवळचे किंवा दूरदूरचे स्वर वेगवेगळ्या प्रकाराने जोडून त्यातून सौंदर्य निर्माण होते. एका रागातील स्वर विविध क्रमाने घेता येतात. उदाहरणादाखल ग, म आणि प हे तीनच स्वर गमप, गपम, पमग, पगम, गगमप, गमपप अशा अनेक प्रकारे त्यांनी गाऊन दाखवले. प्रत्येक रागात एका सप्तकातील पाच ते सात स्वर असतात आणि वरचे खालचे धरून दहा पंधरा पर्यंत सहज जातात. अर्थातच यातून असंख्य कॉंबिनेशन्स करता येतात. त्यातून सौंदर्य निर्माण करण्यात गायकाचे कौशल्य दिसते.
सरगम गाणे म्हणजे फक्त आलापांची स्वरलिपी एका लयीमध्ये गाणे नव्हे. त्यातील प्रत्येक स्वर ठसठशीतपणे दाखवणे हे एक स्वतंत्र कौशल्य आहे. 'आ'कारात आलापी गाण्यापेक्षा तो किती वेगळा प्रकार आहे हे त्यांनी उदाहरणासह दाखवले. भेंडीबाजार घराण्याच्या गाण्यात याला महत्व दिले आहे. स्वरांमधून प्रकट होणा-या भावनांना साजेसे शब्द बंदिशीमध्ये असल्यास त्यात उत्कटता निर्माण होते. तसेच गायनाच्या दृष्टीने नादपूर्ण शब्दांची निवड उपयुक्त ठरते. खाष्ट, दुष्ट असले क्लिष्ट शब्द टाळून शब्दात माधुर्य असलेल्या बंदिशी अमान अली खाँसाहेबांनी मुद्दाम रचल्या व त्यांना साजेसा स्वरसाज चढवून आपल्या गायनात आणल्या. अर्थातच त्या रसिक श्रोत्यांना अत्यंत आवडल्या.
गायकांची आवड, सक्षमता व श्रोत्यांची पसंती यांमधून त्यांच्याकडून कांही राग पुन्हा पुन्हा गायिले गेले तसे त्यांच्या गायनात अधिकाधिक प्राविण्य, माधुर्य व चमत्कृती येत गेल्या. शिष्यांनी गुरूचेच अनुकरण करून त्यात आणखी भर घातली. ते राग गाण्याची परंपराच मिर्माण झाली. अशा त-हेने प्रत्येक घराण्याचे कांही खास राग ओळखले जाऊ लागले व अजूनही जातात. यात कांही सर्वमान्य लोकप्रिय राग आहेत तसेच कांही दुर्मिळ अनवट रागही आहेत. कांही घराण्यात जोड राग किंवा त्रिवेणीला प्राधान्य दिले जाते.
अशा प्रकारच्या अनंत गोष्टी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत हा एक अथांग रत्नाकरासारखा आहे. आपल्याला जमतील तेवढ्या ओंजळी भरून घ्याव्यात. प्रत्येक ओंजळीत वेगवेगळी चमचमती रत्ने सापडतील.
**********************************************************************

गोविंदराव व गोपाळराव शेजारी रहात होते. एके दिवशी गोविंदरावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. त्यात अनेक गवयांचे गायन व वादकांचे वादन झाले. दुसरे दिवशी त्यांची गोपाळरावांबरोबर भेट झाली तेंव्हा त्यांनी मानभावीपणाने विचारणा केली,"काल रात्री उशीरापर्यंत येणा-या आवाजामुळे तुम्ही त्रस्त तर झाला नाहीत ना?"
"छे! छे! उलट फार बरं वाटलं बघा. काल तुमच्याकडे फारच परिणामकारक गाणं झालं."
"हो कां? तुम्हाला गाण्याची इतकी आवड आहे हे मला माहीतच नव्हतं. तरी काय झालं? तुम्ही यायचं होतं."
"नाही हो, आमच्याकडे पाहुणे आले होते."
"हो कां? मग त्यांनासुद्धा बरोबर आणायचं. काल कुठल्या घराण्याची गायकी झाली माहीत आहे?"
"नाही बुवा! मासळीबाजार घराणं होतं का ? म्हणजे आमचे पाहुणेच विचारत होते. आपल्याला त्यातलं काय कळतय्?"
"अस्स? आता कुठे आहेत ते पाहुणे?"
"ते ना? गेले आठ दिवस इथं ठिय्या मारून बसले होते, हलायचं नांव काढीत नव्हते. पण आज सकाळीच आपला गाशा गुंडाळून गेले बघा. मी त्यांना एवढंच सांगितलं की हा गाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालणार आहे."
@#$#&"

फेनॉमेनॉलॉजी

शरीर आणि आत्मा हे दोघे मिळून मनुष्य असे साधारणपणे समजले जाते. नाक, कान, डोळे यांसारखी ज्ञानेंद्रिये, हात, पाय वगैरे कर्मेंद्रिये, हृदय, फुफ्फुस यांसारखी अंतर्गत इंद्रिये आणि मेंदू हे शरीराचे भाग झाले. मेंदूत वास करणा-या बुध्दीचे पुन्हा आकलनशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती वगैरे अनेक विभाग आहेत. मन म्हणजे नक्की काय आहे याचा नीट उलगडा होत नाही आणि शरीरात ते कुठल्या जागी असते (की नसतेच!) यावर विविध संकल्पना आहेत. आत्मा किंवा जीव हे तर फारच मोठे न सुटलेले कोडे आहे. हा बहुधा शरीराच्या रोमारोमात भिनलेला असावा. " मी आलो, गेलो, बसलो, उठलो, दमलो, झोपलो, मी पाहिले, मला ऐकू आले " वगैरे आपण म्हणतो तो शारीरिक क्रियांचा भाग झाला. जेंव्हा आपण "मला आठवले, मला आवडले, मला राग आला, मला त्रास झाला, माझा अपमान झाला" असा विचार करतो तेंव्हा त्यातला हा "मी" म्हणजे आपल्याला नक्की काय अभिप्रेत असते ते सांगता येत नाही.
"कोहम् (मी कोण आहे) ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न मोठमोठ्या तत्ववेत्यांनी करून आपापल्या परीने त्याचे उत्तर दिले आहे. आदि शंकराचार्यांनी तर "मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रौ। न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।" असे सांगितले आहे. यात "मी म्हणजे मन, बुध्दी, अहंकार किंवा चित्त नाही, कान, जीभ, नाक किंवा डोळे नाही, आकाश, जमीन, तेज आणि वायू नाही. एक चिरंतन मंगलमय आनंद आहे." असे ते सांगतात. याचा अर्थ किती लोकांना पूर्णपणे समजला आणि पटला कोणास ठाऊक! त्यानंतरसुध्दा ब्रह्म आणि माया यांचे द्वैत अद्वैत वगैरे बाबत अनाकलनीय अशा चर्चा हजार वर्षांहून अधिक काळ चालल्या आहेत. शंकराचार्यांच्या निर्वाण षटकांमधला 'शिव' म्हणजे 'भगवान शंकर' आहे असे समजून लोकांनी त्यांना अवतार ठरवून टाकले आणि निर्वाण षटकाची गणना तत्वज्ञानाऐवजी स्तोत्रात झाली.
संगणकात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतात. हार्डवेअरमधल्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला डोळ्यांना दिसतात, स्पर्शाला जाणवतात आणि तेवढ्या अर्थाने माहीत असतात. सॉफ्टवेअरमध्ये सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर नांवापुरती माहीत असतात. त्यातल्या तज्ञांना ती जास्त चांगल्या प्रकाराने समजली असतात. हे उदाहरण घेतले तर हात, पाय, नाक, डोळे वगैरे आपले हार्डवेअर जमीन, हवा, पाणी, ऊर्जा वगैरेंच्या संयोगाने बनले आहे आणि मन, बुध्दी, चित्त वगैरेंना सॉफ्टवेअर म्हणता येईल. शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे 'मी' त्यातले कांहीच नसतो. कॉम्प्यूटरमधले सगळे भाग त्यांना दिलेल्या आज्ञांप्रमाणे आपापली कामे करत असतात. पण कॉम्प्यूटरला आत्मा नसतो आणि सजीव प्राण्यांना तो असतो, त्यामुळे याशिवाय आणखी कोणते तरी तत्व त्यात आहे असे गृहीत धरून आपल्या परंपरागत शिकवणुकीमध्ये त्याचा संबंध परमात्म्याशी जोडला जातो आणि एकदा धर्माच्या प्रांतात शिरल्यावर गाडी रूळ बदलून वेगळ्या मार्गाने जाऊ लागते. तिथे तर्काचे स्थान दुय्यम होऊन श्रध्देला महत्व प्राप्त होते. त्यामुळे सगळे अधिकाधिक अगम्य होत जाते आणि श्रध्दा नसेल तर ते बुध्दीला पटेनासे होते.
"कुठल्याही धर्माच्या चौकटीबाहेर राहून यावर विचार करता येईल का?" या प्रश्नाचे उत्तर मला एका मित्राकडून योगायोगाने अचानक मिळाले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी हूसर्ल नांवाच्या जर्मन शास्त्रज्ञाने गणित, तत्वज्ञान आणि मनोविज्ञान या वेगवेगळ्या शाखांचा साकल्याने विचार करून त्यावरून कांही सिध्दांत मांडले आणि कालांतराने त्यानेच त्यात बरेचसे बदल केले. त्यानंतर अनेक विद्वानांनी त्याला विरोध दर्शवला, कांहींनी त्याचे सांगणे उचलून धरले आणि कांहींनी त्यात सुधारणा केल्या. हे सगळे ज्ञान आता 'फेनॉमेनॉलॉजी' या तत्वज्ञानाच्या (फिलॉसॉफीच्या) शाखेत समाविष्ट होते. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टींचे असे एक वेगळे शास्त्र आहे हे मात्र मला आतापर्यंत ठाऊक नव्हते.
आपल्या जगातल्या गोष्टी प्रत्यक्षात कशा असतात आणि आपल्याला त्या कशा भासतात आणि कां याचा अभ्यास 'फेनॉमेनॉलॉजी' या शास्त्रात होतो. एक साधे उदाहरण घ्यायचे झाले तर समोर असलेल्या वस्तूवरून परावर्तित झालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात, तिथल्या बहिर्गोल भिंगामुळे तिचे प्रतिबिंब आपल्या नेत्रपटलावर उमटते एवढे आपण पदार्थविज्ञानशास्त्रात शिकतो. त्याची संवेदना मज्जातंतूमार्फत मेंदूकडे जाते आणि तो त्या संदेशाचा अर्थ लावतो हे शरीरशास्त्रात शिकतो, पण म्हणजे नेमके काय होते ते समजत नाही. खरी मजा तर त्यापुढे आहे. त्या चित्रात जे दिसते त्यावरून ती वस्तू आहे की तो माणूस आहे, वस्तू असेल तर ती सुस्थितीत आहे की नाही, मनुष्यप्राणी असेल तर पुरुष आहे की स्त्री, मुलगा की प्रौढ, सशक्त की क्षीण, निरोगी की आजारी, आनंदी की दुःखी, ओळखीचा की अनोळखी, सज्जन की दुष्ट, हुषार की मठ्ठ अशा असंख्य गोष्टी एका क्षणात आपल्या लक्षात येतात आणि त्यावरून आपण आपल्या नकळत आनंदी, दुःखी, आश्चर्यचकित, भयभीत वगैरे होतो. हेच प्रतिबिंब कागदावर किंवा कापडाच्या पडद्यावर पडले तर तो सुध्दा आनंदाने डोलायला लागला किंवा भीतीने थरथरू लागला असे कांही होत नाही. घरातल्या साध्या संगणकाच्या पडद्यावर जे दिसेल त्याचे सोयरसुतक त्याला नसते. संगणकासाठी ते फक्त कांही हजार किंवा लक्ष पिक्सेल असतात. याचाच अर्थ त्या चित्रात कांहीही नसते, जे असते ते आपल्या मनात असते. त्या पिक्सेलवरून बोटाचे ठसे, स्वाक्षरी वगैरे तपासण्याचे काम करून तंत्रज्ञानात हल्ली एक पाऊल पुढे पडले आहे, पण प्रत्येक जीव जन्मतःच अशी असंख्य पावले पुढे असतो.
जे 'असते' आणि त्याचे जे 'आकलन' आपल्याला होते यातला फरक आपल्या मनात त्याचे जे चित्र उमटलेले आणि साठवलेले असते त्यामुळे येतो. पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राप्रमाणे विचार केला तर जी गोष्ट कांही अब्ज अणुपरमाणूंच्या एकत्र येण्यामुळे घन, द्रव किंवा वायुरूपात अस्तित्वात येते तीच गोष्ट 'असते'. फेनॉमेनॉलॉजीचे तसे नाही. काल्पनिक अलीबाबा किंवा स्पायडरमँन, पौराणिक कथांमधील पात्रे वगैरेंबद्दलसुध्दा आपल्या मनात प्रतिमा निर्माण होतात त्या अर्थी त्या 'असतात'. इतिहासकाळातल्या व्यक्ती कधीच दिवंगत झाल्या असल्या तरी त्यासुध्दा अजूनही 'असतात.' पण त्यांचे 'असणे' आणि 'आपल्याला जाणवणे' यात फरक असतो. पहिल्या दिसण्या, वाचण्या किंवा ऐकण्यापासून कोठल्याही गोष्टीचे एक चित्र मनात तयार होते आणि कालानुसार आपली समज वाढत जाईल त्याप्रमाणे त्यात रंग भरत जातात. जेंव्हा आपण पुन्हा कधी त्या दृष्याचा थोडासा भाग पाहतो किंवा त्याचा नुसता उल्लेख येतो, तेंव्हा आपल्या मनातले ते चित्र त्याला जोडलेली अनेकविध माहिती पुढे येते आणि त्यामुळे वर दिल्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया होतात.
हे सगळे कसे घडते, ते कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे वगैरेचे अनेक सिध्दांत या शास्त्रात आहेत. Intentionality , Consciousness , Intentional object, perception, memory, protention, retention, signification, essence or idea, intuition, lived-Body,empathy, noetic, noematic, epoché. इत्यादी संकल्पना मांडून त्यातून हा विचार केला गेला आहे. यावर झालेल्या वादविवादातून Transcendental phenomenology, Realist phenomenology, Existential phenomenology, Autophenomenology, Heterophenomenology वगैरे या शास्त्राच्या उपशाखा तयार होत गेल्या. अर्थातच त्यात मतभेदही आहेत. त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्यावर अधिक बोलणे इष्ट नाही.
'मी' कोण आहे (की नाही) वगैरेचा विचार न करता आणि त्याचा परमात्म्याशी संबंध न लावता बाह्य जगाच्या आकलनाचे काम माणसाच्या अंतरंगात (मनात किंवा बुध्दीत) कसे होते याचा वेध फेनॉमेनॉलॉजी या शास्त्रात घेतला जातो.

Saturday, July 19, 2008

मेघदूत


मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके आणि अस्ति, कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये कालिदासाने लिहिली. त्याच्या तीनही नाटकांमध्ये त्यांमधील कथेला अनुसरून अनेक रोचक किंवा मनोरंजक प्रसंग त्याने अनुपम कौशल्याने रंगवले आहेत. रघुवंश या महाकाव्यात राघवाच्या (श्रीरामाच्या) वंशातल्या अनेक पिढ्यांमध्ये होऊन गेलेल्या सम्राटांची चरित्रे आहेत. शंकर आणि पार्वती यांच्या प्रेमाच्या कहाण्या कुमारसंभव या महाकाव्यात आहेत. त्यात दक्षकन्या उमा आणि हिमालय पर्वताची पुत्री गिरिजा किंवा पार्वती अशा दोन जन्मात तिने केलेली शंकराची खडतर आराधना, महादेवाने तिचा स्वीकार करणे, त्यांचे मीलन आणि कार्तिकेयाचा जन्म याची सुरस कथा आहे. मेघदूत हे काव्य मात्र या सर्वांहून वेगळे आहे. सांगण्यासारखी कथा अशी या खंडकाव्यात नाही.
कुबेराची सेवा करणारा एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमात (किंवा बाहुपाशात) इतका गुरफटलेला असतो की त्यामुळे त्याच्या हातून धन्याच्या सेवेत अक्षम्य कुचराई होते. त्याच्या अशा उद्दंडपणाच्या वर्तनामुळे कुबेर संतापतो आणि त्या यक्षाला वेगळ्याच प्रकारची शिक्षा देतो. त्या शिक्षेप्रमाणे एक वर्षभर त्याने दूर रामगिरीवरील आश्रमात रहायचे आणि त्याच्या पत्नीने मात्र हिमालयातील यक्षांच्या अलकानगरीतील घरी रहायचे अशी आज्ञा त्याला होते. असल्या 'पनिशमेंट पोस्टिंग'वर गेलेला बिचारा यक्ष पत्नीचा विरह मोठ्या कष्टाने कसाबसा सहन करत असतो. गोष्टीची ही सगळी पार्श्वभूमी मेघदूताच्या पहिल्या श्लोकात सांगून टाकली जाते.
कश्चित्कान्ताविरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गणितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।। १ ।।

जानकीने (सीतेने) या जागी स्नान केल्यामुळे पावन झालेल्या जलाशयाच्या कांठावरील स्निग्ध छाया देणाऱ्या वृक्षराजीमध्ये तो आश्रम आहे असे रामगिरी येथील आश्रमाचे काव्यमय वर्णन कालिदासाने या श्लोकात केले आहे. एवढी प्रस्तावना करून कालिदास मुख्य मुद्यावर येतो.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।

पत्नीच्या विरहाच्या वेदनेने यक्ष दिवसमास खंगत असतो आणि त्याच्या सुकलेल्या दंडावरील सोन्याची वलये खाली ओघळत असतात. अशा कृष्ट अवस्थेत असतांना आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला त्याला आभाळ काळ्या ढगांनी दाटलेले दिसते. त्या मेघराजाला पाहताच तो मीलनोत्सुक आणि मदोन्मत्त असा हत्ती आहे असा भास त्याला होतो आणि त्याच्या मनातली प्रियेबद्दल वाटणारी आसक्ती उफाळून वर येते. उन्हाळ्याची रखरख संपून पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण होताच त्या यक्षाला आपल्या पत्नीची जास्तच प्रकर्षाने आठवण येते. कांही करून आपण तिच्याबरोबर संपर्क साधलाच पाहिजे असे त्याला तीव्रतेने वाटू लागते. पण तो काय करू शकणार होता? त्या काळात सेल फोन, एसटीडी, आयएसडी, इंटरनेट चॅटिंग, ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप असले कांही नव्हते. चिठ्ठी नेऊन पोचवणारा पोस्टमन नव्हता. सांडणीस्वार, संदेशवाहक कबूतरे वगैरे साधने एका यःकश्चित सेवकाला परवडणारी नव्हती आणि असली तरी त्यांची रेंज हिमालयापर्यंत असणार नाही. अशा अवस्थेत आकाशमार्गे उत्तरेच्या दिशेने जात असलेल्या मेघाला पाहून यक्षाच्या मनात आशेचा किरण फुटला. "हा निर्जीव वाफेचा पुंजका मला काय समजून घेणार आहे आणि माझा कोणता संदेश घेऊन जाणार आहे? " असली शास्त्रीय शंका त्याच्या हळुवार मनाला शिवली नाही कारण "मदनबाणांनी विध्द झालेल्या पुरुषाची विवेकबुध्दी जागेवर नसते." असे कालिदासानेच पुढे नमूद केले आहे.

त्यामुळे असला रुक्ष विचार करत न बसता त्या मेघालाच दूत ठरवून आपले मनोगत त्याच्यापुढे व्यक्त करायचे आणि हा संदेश अलकापुरीमध्ये रहात असलेल्या आपल्या प्रियपत्नीला पोचवण्याची विनंती त्याला करायची असे तो यक्ष ठरवतो. आधी त्या मेघाची तोंडभर स्तुती करून त्याला आपला मित्र बनवतो. आपल्या मनातल्या पत्नीबद्दल वाटणाऱ्या प्रेमभावनांना शब्दात व्यक्त करतो. विरहामुळे आपण किती व्याकुळ झालो आहोत ते सांगतो. रामगिरीपासून अलकापुरीचा मार्ग कसा कसा जातो, वाटेत कोणते पर्वत, नद्या, अरण्ये, कोणकोणती रम्य नगरे आणि स्थळे लागतील त्यांचे रसभरित वर्णन करतो. वाटेत कांही सुंदर कृषीवलकन्या तुला पाहून हर्षभरित होतील, पण तू मात्र त्यांच्या नादी लागून आपल्या मार्गावरून विचलित व्हायचे नाहीस अशी त्याची थट्टा करतो. अखेरीस अलकापुरी आल्यानंतर ती सुंदर नगरी कशी दिसेल याचे सुरेख वर्णन करतो. तिथे आपली पत्नी आपल्या वाटेवर डोळे लावून बसलेली असेल असे सांगून तिच्या मनात कोणत्या भावनांचे वादळ उठलेले असेल याचे वर्णन करतो. तिच्या रूपाचे वर्णन तर आलेच. अखेर आपला निरोप तिला देऊन तिचे कुशलमंगल वृत्त माझ्यापर्यंत आणून पोचव अशी परोपरीने त्या मेघाची विनवणी करतो. तसेच तू माझ्यासाठी हे करशील असा विश्वास दाखवतो.

अशा प्रकारे हे कथाकथन नसलेले विशुध्द काव्य आहे. मेघाला दूत बनवून त्याच्यामार्फत संदेश पाठवण्याची कल्पनाच भन्नाट आहे. तिचा विस्तार करतांना निसर्गातील सौंदर्यस्थळे आणि मनातील नाजुक तसेच उत्कट भावना यांना कालिदासाने आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबध्द केले आहे. या काव्यातील एक एक उपमा, उत्प्रेक्षा, रूपके पाहता "उपमा कालिदासस्य" असे कां म्हणतात ते पटते. या काव्यासाठी कालिदासाने मंदाक्रांता हे वृत्त निवडले आहे. या वृत्तात ला ला ला ला अशी संथ सुरुवात करून लललललला अशी जलद लय येते आणि ला ललाला ललाला अशी ती दुडक्या चालीने संपते. आजच्या काळातले संगीतकार मेघदूतातील नादमय शब्दांना यमन, केदार आदि रागांच्या सुरात गाऊन अधिकच मजा आणतात. हजार वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेली मेघदूताची जादू पुढेही अनंत काळपर्यंत रसिकांच्या मनाला मोहिनी घालत राहील यात शंका नाही.

शाकुंतल - कालिदासाचा परीसस्पर्श


कालिदास दिनाच्या निमित्याने 'हितगुज'च्या बैठकीत फलटणचे प्रा. विक्रम आपटे यांनी या विषयावर सुरेख आणि रसाळ असे व्याख्यान दिले त्याचा हा गोषवारा.

कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जगप्रसिध्द आहे. एक अजरामर अशी 'ऑल टाइम ग्रेट' समजली जाणारी ही साहित्यकृती आहे. मात्र याची मूळ कथा कांही कालीदालाने स्वतः रचलेली नाही. किंबहुना त्याची सर्वच नाटके पौराणिक कथांवर आधारलेली आहेत. शेक्स्पीअरची नाटकेसुध्दा अशा इतरांनी सांगितलेल्या गोष्टींवरच रचलेली आहेत. पण मूळ कथाबीजांचा या महान लेखकांनी आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने कसा विस्तार केला यावरून त्यांचे आगळेपण दिसते.

महाभारतात दुष्यंत शकुंतला आख्यानाची जी कथा दिली आहे तिच्यानुसार दुष्यंत राजा शिकार करता करता कण्व मुनींच्या आश्रमापाशी येतो. मुनींचे दर्शन घेण्यासाठी तो आश्रमात जातो तेंव्हा मुनी समिधा गोळा करून आणण्यासाठी अरण्यात गेले असतात. त्यांची मानसकन्या शकुंतला दुष्यंताचे स्वागत करते, प्रथमदर्शनीच दुष्यंत तिच्या प्रेमात पडून तिला लग्नाची मागणी घालतो. पण "माझ्या पुत्राला तुझ्या पश्चात राज्याधिकार देणार असशील तरच मी लग्नाला तयार आहे." अशी अट शकुंतला त्याला घालते. कामातुर राजा ही अट त्या क्षणी मान्य करतो आणि त्यांचा गांधर्वविवाह होतो. शकुंतलेला सन्मानाने राजवाड्यात बोलावून घेण्याचे आश्वासन देऊन दुष्यंत परत निघून जातो. परंतु तो आपले वचन पाळत नाही. शकुंतला कण्व मुनींच्या आश्रमातच एका पुत्राला जन्म देते आणि त्याचे नांव सर्वदमन असे ठेवते. तो सहा वर्षांचा झाल्यानंतर ती त्याला दुष्यंत राजाकडे घेऊन जाते. शकुंतलेचे म्हणणे साफ नाकारून दुष्यंत तिचा स्वीकार करत नाही. यावर ती रागाने थयथयाट करते आणि "असला खोटारडा आणि विश्वासघातकी माणूस तुमचा राजा कसा झाला? " असा प्रश्न त्याच्या दरबारातील मंडळींना करते. पण तरीही दुष्यंत तिला दाद देत नाही. ती निराश होऊन परत फिरते तेवढ्यात "शकुंतला हीच दुष्यंताची पत्नी आहे आणि तिचा मुलगा राजपुत्रच आहे. " अशी आकाशवाणी होते. ती ऐकल्यावर मात्र दुष्यंत राजा "आपल्याला सगळे आठवत होते, पण प्रजा काय म्हणेल? असा विचार करून आपण ते विसरल्याचे नाटक केले." अशी सारवासारवी करतो आणि शकुंतलेचा तिच्या मुलासह जाहीरपणे स्वीकार करतो.

या मूळ गोष्टीवर नाटक लिहिण्यापूर्वी कालिदासाने सखोल विचार करून त्यात अनेक फेरफार केले. अट घालून लग्नाला तयार होणारी शकुंतला आणि दिलेले वचन मोडणारा दुष्यंत त्याला पसंत नव्हते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकांचे नायक व नायिका हे धीरोदात्त, निष्कलंक, चारित्र्यवान, सद्गुणी, समाजाला आदर्श वाटावा असे हवेत. त्यांनी मनापासून निखळ प्रेम केले असले पाहिजे. त्यात नफ्यातोट्याचा हिशोब असू नये. त्यांनी हेतुपुरःसर स्वार्थ किंवा ढोंग करणे उचित नव्हते. यामुळे अनेक उपकथानके आणि प्रसंग रंगवून, काल्पनिक पात्रे टाकून कालिदासाने हे नाटक निर्माण केले. त्याचे नांव ' अभिज्ञान शाकुंतल' म्हणजे 'शकुंतलेची ओळख' असे ठेवून त्यात शकुंतलेची ओळख पटणे याला केंद्रस्थानी धरले. यासाठी त्याने कोणते महत्वाचे बदल केले ते पाहू.

सुरुवातीलाच राजा दुष्यंत शिकार करण्यासाठी वनात हिंडत असतांना एका सुंदर हरिणावर नेम धरून बाण सोडणार असतो तेवढ्यात ते हरिण कण्वमुनींच्या आश्रमातले असल्याचे तिथला एक आश्रमवासी त्याला सांगतो. "मी इथला राजा आहे, मला पाहिजे ते मी करीन. " असा उन्मत्तपणा न दाखवता तो धनुष्यावर चढवलेला बाण मागे घेतो आणि अंगावरील राजवस्त्रे, अलंकार वगैरे उतरवून ठेऊन साध्या कपड्यात कण्वमुनींची भेट घेण्यासाठी आश्रमात जातो. इथेच दुष्यंताच्या व्यक्तीरेखेला सुसंस्कृततेची झालर लावणे सुरू होते. मूळ कथेनुसार समिधा आणण्यासाठी कण्वमुनी रानात गेलेले असतात. पण हे काम तासा दोन तासात पूर्ण होण्यासारखे आहे. दुष्यंत व शकुंतलेची भेट, प्रेम, मीलन आणि ताटातूट या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी एवढा वेळ पुरेसा नाही. म्हणून कण्वमुनींना कुठले तरी व्रत करण्यासाठी कालिदास एका तीर्थक्षेत्राला पाठवून देतो आणि आपल्याला हवे तेवढे प्रसंग नाटकांत घालण्याची सोय करून घेतो.

दुष्यंत आणि शकुंतलेची भेट घडवून आणण्यासाठी कालिदासाने मोठ्या चतुराईने एक काव्यमय प्रसंग रंगवला भहे. शकुंतला वेलीवरची फुले तोडीत असतांना राजा दुष्यंत झुडुपांमागून तिला पहात असतो पण आपण होऊन पुढे होण्यात त्याला संकोच वाटत असतो. त्याच वेळी एक भ्रमर शकुंतलेच्या मुखकमलाजवळ फेऱ्या घालून तिला हैराण करतो. "याच्या त्रासातून कुणीतरी मला सोडवा गं." असे ती आपल्या सख्यांना सांगते. त्यावर एक सखी म्हणते, "शत्रूपासून तुझे संरक्षण करणे हे तर राजाचे काम आहे." झाले, लगेच झुडुपाआडून निघून समोर येण्यासाठी दुष्यंताला चांगले निमित्य मिळते. तो त्या भुंग्याला पिटाळून लावून शकुंतलेला त्याच्या त्रासातून मुक्त करतो आणि नकळतच आपल्या प्रेमाच्या जाळ्यात गुंतवतो.

शकुंतलेच्या ओढीमुळे दुष्यंताला तिकडून परत राजधानीकडे फिरायचे नसते, पण कण्व मुनींच्या आश्रमात तो थांबणार तरी कसा? यावर कालिदासाने तोड काढली. कण्वमुनींचे शिष्यच ते करत असलेल्या यज्ञकर्मांचे राक्षसांपासून संरक्षण करण्याची विनंती दुष्यंताला करतात आणि तो एका पायावर तयार होऊन त्यासाठी स्वतः जातीने तेथे थांबतो. दुष्यंताचे मन तर लगेच शकुंतलेवर जडलेले असते पण तिच्या मनात काय आहे हे त्याला कसे समजणार? त्याला भेटून जातांजाता तिच्या मनगटाला बांधलेली फुलांची माळ गळून पडते आणि ती आणण्याचे निमित्य करून ती त्याच्याकडे परत येते. यावरून दुष्यंत त्याला जे समजायचे असते ते समजतो आणि त्यांचे मनोमीलन होते.

पण कांही झाले तरी राजा आपल्या राज्याचा कारभार सोडून किती दिवस दूर राहणार? दुष्यंताला माघारी तर जावेच लागते. शकुंतलेला आणा भाका वचने वगैरे देऊन तो परत जातो. जाण्यापूर्वी आपली आठवण म्हणून आपली अंगठी तिच्या बोटात घालतो. आता यापुढे कथाभागाप्रमाणे या प्रेमिकांचा विरह व्हायला हवा. तो घढवून आणण्यासाठी कालिदासाने दुर्वासमुनींना नाटकात आणले. दुष्यंताच्या आठवणीत मग्न असल्यामुळे शकुंतलेला दुर्वास मुनी आश्रमात आलेले समजतच नाही. या अपमानाने क्रुध्द झालेले दुर्वास मुनी " ज्याच्या आठवणीत तू एवढी हरवून गेली आहेस तोच तुला विसरून जाईल. " असा शाप शकुंतलेला देतात. तिला बिचारीला ते ही समजत नाही. पण तिच्या सख्य़ा तिच्या वतीने रदबदली करून मुनींकडून उःशाप मागून घेतात. दुष्यंतानेच शकुंतलेला दिलेली एकादी वस्तू त्याला दिसली तर त्याची स्मृती जागी होईल असा तो उःशाप असतो. त्यामुळे सखी निर्धास्त होतात आणि शकुंतलेला यातले कांही सांगत नाहीत.

कण्वमुनी तीर्थक्षेत्राहून परत आल्यानंतर त्यांना सर्व हकीकत समजते. शकुंतला गर्भवती असल्यामुळे आता तिने पतीच्या घरी जाणेच श्रेयस्कर असते. "अर्थोहि कन्या परकीय एव।" याची जाणीव होताच ते तिची सासरी पाठवणी करायचे ठरवतात. शकुंतला तर कधी दुष्यंताचे बोलावणे येईल याची आतुरतेने वाट पहात असते, पण दुर्वासांच्या शापवाणीमुळे त्याला शकुंतलेचे विस्मरण झालेले असते. अखेर आश्रमातील दोन शिष्यांना सोबतीला घेऊन शकुंतला हस्तिनापुराला जायला निघते. त्यावेळी कण्वमुनींची तर दाटून कंठ येतो अशी अवस्था होतेच पण आश्रमातील हरिणी आणि इतर प्राणीच नव्हे तर फुलझाडेसुध्दा गद्गदून जातात असे हृद्य दृष्य कालिदासाने उभे केले आहे.

दुर्वास मुनींच्या शापाच्या प्रभावाखाली असल्यामुळे दुष्यंताला शकुंतलेची ओळख पटत नाही. तिचे सौंदर्य पाहून तिला स्वीकारण्याचा मोह त्याला क्षणभर होतो, पण ती गरोदर आहे याचा अर्थ आधीच ती दुसऱ्या कोणाची झालेली आहे हे पाहून तो आपल्याला झालेला मोह टाळतो. अशा प्रकारे पुन्हा त्याचे उदात्तीकरण केलेले आहे. दुष्यंताने दिलेली अंगठी त्याला दाखवावी म्हणून शकुंतला नाट्यमय पध्दतीने आपला पंजा पुढे करते आणि बोटात अंगठी नसल्याचे पाहून तिला धक्का बसतो. तिने सांगितलेल्या आपल्या कर्मकथेतले कांहीच आठवत नसल्याचे दुष्यंत सांगतो.

दुष्यंत राजाने न स्वीकारल्यानंतर शकुंतलेने कुठे जायचे हा प्रश्न उभा राहतो. तिचे म्हणणे खरे असेल तर तिने कसेही पतीकडेच राहिले पाहिजे आणि दुष्यंताचे सांगणे खरे असेल ती कुलटा ठरते आणि त्यामुळे आश्रमात जाऊन राहू शकत नाही. या दुविधा अवस्थेतून मार्ग काढण्यासाठी दुष्यंताचा अमात्य तिला आपल्या घरी घेऊन जातो आणि तिचे संगोपनाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. पण शकुंतलेची माता मेनका स्वर्गातून पृथ्वीवर अवतरते आणि तिला उचलून घेऊन जाते. आकाशातून दिव्य विजेचा लोळ खाली उतरला आणि शकुंतलेला घेऊन अदृष्य झाला एवढेच त्याला दिसते आणि तो दिग्मूढ होऊन जातो. शकुंतलेच्या बाबतीत कांही तरी अद्भुत आहे एवढे त्याला समजते पण त्याला कांहीच करता येण्यासारखे नसते.

कांही दिवसांनी राजदूत एका कोळ्याला पकडून दुष्यंताच्या समोर आणतात. त्याने राजाची अंगठी चोरली आहे असा आरोप त्याच्यावर असतो. त्याचे असे झाले असते की सासरी जात असतांना वाटेत एक नदी लागते. नांवेत बसून ती पार करत असतांना शकुंतला पाण्यात हात घालून मजेत तो हलवण्याचे चाळे करीत असते. त्या वेळी ती अंगठी तिच्या बोटातून निसटून केंव्हा पाण्यात पडते ते तिलाही समजत नाही. त्यावेळी तिथून जात असलेला एक रावस मासा ती अंगठी गिळतो. आणि ती अंगठी त्याच्या पोटात जाते. एक कोळी त्या माशाला जाळ्यात पकडून घरी नेतो. खाण्यासाठी तो मासा कापताच ती अंगठी त्याला सापडते. नदीमातेनेच आपल्याला हे धन दिले अशा समजुतीने तो कोळी ती अंगठी विकण्यासाठी बाजारात घेऊन जातो. त्यावरील राजमुद्रा पाहताच ती अंगठी राजाचीच आहे हे सराफ लगेच ओळखतो आणि त्या कोळ्याला शिपायांच्या स्वाधीन करतो. कोळ्याच्या सांगण्यावर कोणीच विश्वास ठेवीत नाही आणि प्रत्यक्ष राजाचाच अपराध त्याने केला असल्याने राजानेच त्याला दंड करावा म्हणून ते त्याला दुष्यंताच्या समोर उभे करतात.

दुर्वास ऋषींनी दिलेल्या उःशापानुसार ती अंगठी पाहताच दुष्यंताला सारे कांही एकदम आठवते आणि शकुंतलेच्या विरहाने तो व्याकुल होतो. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण ती अदृष्य झाली आहे एवढेच त्याला समजते. पश्चात्ताप दग्ध झाल्यामुळे त्याला राज्यकारभारातही रस रहात नाही आमि तो सैरभैर होऊन जातो. याच अवस्थेत फिरत असतांना एक चमत्कार घडतो. एक दिवस त्याचा विदूषक मित्र अचानकपणे हवेत तरंगू लागतो. "ही कसली गंमत आहे?" असे विचारताच तो सांगतो," मी आपल्या मनाने उडत नाही आहे. कोणीतरी मला हवेत वर उचलत आहे." त्याला वाचवण्यासाठी दुष्यंत आपले धनुष्य आणि बाणांचा भाता घेऊन येतो आणि अदृष्य अशा शक्तीला मारण्याचे अस्त्र धनुष्यावर चढवतो. ते पाहताच इंद्राचा सारथी मातली तिथे प्रकट होऊन दुष्यंताला वंदन करून सांगतो, "हे राजन, इंद्रावर कोण्या बलाढ्य असुराने हल्ला केला असून त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला नेण्यासाठी मी इथे आलो आहे." हे ऐकून दुष्यंताचा क्षात्रधर्मजागा होतो आणि तो मातलीबरोबर युध्दाला निघून जातो.

दैत्याचे पारिपत्य करून पृथ्वीकडे परततांना त्याला एक अत्यंत रमणीय अशी जागा दिसते म्हणून तो मातलीला आपला रथ तिकडे न्यायला सांगतो. मारिच ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांचा आश्रम तिथे असतो. आश्रमात गेल्या गेल्या दुष्यंताला एक लहानगे मूल सिंहाच्या छाव्याबरोबर खेळतांना दिसते. दोन्ही हातांनी त्याचा जबडा उघडून त्याला सिंहाच्या छाव्याच्या तोंडातले दांत मोजायचे असतात. त्या मुलाच्या या अजब हट्टाने त्याच्याबरोबर असलेली आश्रमकन्या भयभीत होऊन " या मुलाला कांही तरी समजाऊन सांगा" असे दुष्यंताला सांगते. त्या बालकाला पाहून दुष्यंताच्या मनात प्रेमाचे भरते येते आणि तो त्याच्याशी संवाद करू लागतो. इतक्यात दुसरी एक आश्रमकन्या तिथे येते. बाजूच्या झाडावर बसलेल्या शकुंत पक्ष्याला पाहून ती आपल्या सखीला "पश्य शकुंतलावण्य। " असे म्हणते. त्यातील शकुंतला एवढे ऐकताच चमकून तो मुलगा " माझी आई कुठे आहे?" असे विचारतो. ते ऐकताच दुष्यंत राजा चपापतो. "हा मुलगा आपला तर नाही ना?" असा विचार त्याच्या मनात चमकतो.

त्याच वेळी आणखी एक घटना घडते. त्या बालकाच्या दंडाला बांधलेला मंतरलेला ताईत निसटून खाली पडतो. जमीनीवरून तो उचलून पुन्हा त्या मुलाच्या दंडात बांधण्यासाठी दुष्यंताने खाली वाकताच ती आश्रमकन्या त्याला ओरडून थांबायला सांगते. त्या ताइतात अशी जादू असते की त्या बालकाचे माता आणि पिता याखेरीज इतर कोणीही त्याला स्पर्श करताच त्याचे रूपांतर एका विषारी सर्पात होऊन तो त्या माणसाला दंश करेल. पण दुष्यंताला थांबवण्याच्या आधीच त्याने तो उचललेला असतो आणि त्याचा साप बीप कांही होत नाही हे पाहून त्या आश्रमकन्येला आश्चर्य वाटते. एवढ्यात प्रत्यक्ष शकुंतला तेथे येते. तिच्याशी नजरानजर होताच दुष्यंत अत्यंत खजील होऊन तिची माफी मागतो. शकुंतला त्याला झाल्या प्रकाराबद्दल दोष देत नाही. "कदाचित विधीलिखितच असे असेल आणि त्याप्रमाणे घटना घडत गेल्या असणार" असे ती शांतपणे सांगते. एवढ्यात मारिच ऋषी तिथे येतात आणि दुर्वासमुनींच्या शापामुळे हे घडले असल्याचे त्यांनी सांगितल्यावर कोणाच्याही मनात किंतू रहात नाही आणि नाटकाचा पडदा पडतो.

अशा प्रकारे एका साध्या कथेला कालिदासाने अत्यंत रोचक बनवले आहे आणि त्यातल्या अनेक प्रसंगांचे धागे एकमेकांबरोबर व्यवस्थित जुळवले आहेत. त्यात अनेक व्यक्तीरेखा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह समर्थपणे उभ्या केल्या आहेत. कोणाच्याही वागण्यात विसंगती नाही, कोणीही दुष्टपणाने वागत नाही, कसलेही कपट कारस्थान नाही, तरीही नाटकाची कथा रहस्यमय पध्दतीने उलगडत जाते. यातून चांगल्या वर्तनाचे वस्तूपाठ मिळतात, प्रणयातला शृंगाररस, भावनातिरेकाचा करुण रस आणि इतर रसांचा अनुभव येतो. हे सगळे कालिदासाच्या परीसस्पर्शामुळे घडते.

महाकवी कालिदास

संस्कृत भाषेची साधी तोंडओळख असलेल्या माणसालासुध्दा कवी कालीदासाचे नांव नक्की ठाउक असते. कालिदासाच्या रचनांचे अनुवाद बहुतेक सर्व भारतीय तसेच परकीय भाषांमध्ये प्रसिध्द झालेले आहेत आणि त्यावर आधारलेल्या अगणित साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे जगभरातील साहित्यिक जगतात कालिदास हे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. त्याने लिहिलेली मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके, रघुवंश व कुमारसंभव ही महाकाव्ये आणि मेघदूत हे खंडकाव्य एवढे प्रमुख ग्रंथ आज उपलब्ध आहेत. त्याने केलेल्या इतर रचना कदाचित काळाच्या उदरात लुप्त झाल्या असाव्यात. तसेच त्याच्या नांवाला जोडल्या जात असलेल्या इतर कांही रचनांबद्दल तज्ञांच्या मनात मतभेद आहेत.

कालिदासाने स्वतःबद्दल कांहीच लिहून ठेवलेले नाही. त्यामुळे त्याच्या चरित्राबद्दल विश्वसनीय अशी माहिती कमी आणि कपोलकल्पित आख्यायिकाच जास्त ऐकायला मिळतात. त्याचा जीवनकाल नक्की केंव्हा होता यावर एकमत नाही. तो विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता असे सर्वश्रुत आहे. पण विक्रमादित्य हे नांव धारण करणारे निदान चाळीस राजे भरतखंडात होऊन गेले, कदाचित एकाहून अधिक कालीदासही होऊन गेले असतील. त्यामुळे त्यातला महाकवी कालीदास नेमका कुठे आणि कोणत्या काळात होऊन गेला हे सांगणे कठीण आहे. तो उज्जयनी येथील विक्रमादित्य राजाच्या दरबारात होता असे बहुतेक लोक मानतात, पण काश्मीरपासून बंगालपर्यंत अनेक जागी कालीदास तिथला होता असे मानले जाते. त्याने लिहिलेल्या नाटकांमधील राजा अग्निमित्र हे पात्र इतिहासात प्रत्यक्षात होऊन गेलेल्या राजा अग्निमित्राच्या चरित्रावरून घेतले असेल तर कालिदास हा अग्निमित्रानंतरच्या काळात होऊन गेला असणार. संस्कृत आणि भारतीय भाषांमधील वाङ्मयातील अनेक साहित्यकृतींमध्ये कालिदासाच्या रचनांचा उल्लेख सापडतो. त्याअर्थी कालीदास नक्कीच त्या रचना लिहिल्या जाण्यापूर्वी होऊन गेला असणार. अशा प्रकारे तर्क करून त्याचा कालखंड हा येशू ख्रिस्ताच्या आधीची पांच शतके आणि नंतरची पांच शतके या हजार वर्षांच्या दरम्यान केंव्हा तरी होऊन गेला असावा.

कोणा पूर्णपणे अनोळखी माणसाकडल्या छायाचित्रांचा संग्रह अचानक आपल्या हाती पडला तरी त्या छायाचित्रांमधील माणसांचे वेष, पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या रेडिओ, टेलीव्हिजन, टेलीफोन, घड्याळ यासारख्या घरातल्या गोष्टी किंवा पाठीमागील इमारती, त्यांच्या छपरावरील अँटेने किंवा डिस्क, टॉवर, रस्त्यावरली वाहने अशा अनेक बाबीवरून आपल्याला आपल्या आयुष्यात त्या चित्राचा कालखंड कोणता असेल याचा अंदाज येतो. याचे कारण गेल्या अर्धशतकात समाजजीवनात वेगाने जो बदल होत गेला तो आपण पाहिलेला आहे. सामाजिक कथा कादंबऱ्यातल्या तपशीलवार उल्लेखांवरून त्यातील घटना कोणत्या काळात घडल्या आहेत हे वातावरणनिर्मितीसाठी जाणीवपूर्वक दाखवले जाते, तसेच त्यातील भाषाशैलीवरून ते पुस्तक कोणत्या काळात लिहिले गेले असावे याचा अंदाज आपण करू शकतो.

ऐतिहासिक किंवा पौराणिक गोष्टींबद्दल तो करणे थोडे कठीण जाते. कालिदास स्वतः हजाराहून अधिक वर्षांपूर्वी होऊन गेला आणि त्याच्या सर्व रचना पौराणिक काळातील घटनांवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे त्याने आपल्या काव्यातून आणि नाटकांतून रंगवलेला काळसुध्दा प्रत्यक्ष त्याच्या जीवनकालातला नाही. अशा परिस्थितीत इतर अनेक साहित्यकृतींच्या तुलनेवरून तज्ञ लोकच कांही आडाखे बांधू शकतात आणि त्याची शहानिशा करणे केवळ अशक्य असते. कालिदास कधी कां होऊन गेला असेना, सर्वसामान्य वाचकाला त्याच्या साहित्यकृतींचा आस्वाद घेता येण्यात कांही फरक पडत नाही. संस्कृत भाषा न शिकलेल्या लोकांनी त्याचे संस्कृतमधील ग्रंथ मुळातून वाचण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या इंग्रजी, मराठी अनुवादांचे सोप्या भाषेत काढलेले सार प्राशन करूनच त्यांना समाधान मिळते.

कालीदासाबद्दल अशी वदंता आहे की तो आधी महामूर्ख समजला जात असे. म्हणजे तो तसा वागत असे. एका राज्याची राजकन्या धर्मशास्त्रांच्या अभ्यासात पारंगत होती, पण तिला तिच्या ज्ञानापेक्षा त्याचा दुरभिमान जास्त वाटत होता. जो कोणी आपल्याला शास्त्रार्थावरील वादविवादात हरवेल त्याच्याशीच आपण विवाह करू असे तिने जाहीर केले होते. पण जो या चर्चेत हरेल त्याचे मुंडण करून त्याला गाढवावर बसवून हाकलून दिले जाईल असा उपनियम त्या पणाला जोडला होता. कांही विवाहोत्सुक युवकांनी प्रयत्न करून पाहिला आणि स्वतःचे हंसे करून घेतले. अपमानित झालेल्या त्या युवकांनी राजकन्येची चांगली खोड मोडायचे ठरवले. कांही करून तिचे लग्न एका मूर्खशिरोमणीबरोबर लावून द्यायचा घाट त्यांनी घातला आणि ते महामूर्खाच्या शोधात निघाले.

एका झाडावर बसलेला कालिदास त्यांना दिसला. तो एका उंच अशा फांदीच्या टोकावर बसून तिच्या मुळावर घाव घालत होता. इतका मूर्ख माणूस दुसरा मिळणार नाही म्हणून त्यांनी कालीदासाची या कामासाठी निवड केली. त्याला चांगली वस्त्रे परिधान करयला लावून, कपाळावर चंदनाचा टिळा, मस्तकावर पगडी वगैरेंनी सजवून राजकन्येपुढे नेले. दिसायला तसा तो गोरागोमटा होताच. हे महान पंडित असून त्यांनी मौनव्रत धारण केले असल्यामुळे ते फक्त मूकविवाद करतात असे कालिदासाचे वर्णन त्यांनी केले आणि कालिदासाला आपले तोंड बंद ठेऊन फक्त हातवारे करायचे असे सांगितले.

राजकन्येने प्रथम एक बोट समोर धरून दाखवले. तिला त्यातून "ब्रह्म एक आहे." असे सांगायचे होते. कालिदासाला त्याचा अर्थ "तुझा एक डोळा फोडीन. " असा वाटला. त्याने रागाने "मी दोन्ही डोळे फोडीन. " अशा अर्थाने दोन बोटे दाखवली. राजकन्येने त्याचा "ब्रह्म आणि माया अशी दोन रूपे आहेत. " असा घेतला. तिने पंजाची पांच बोटे दाखवून "हे विश्व पंचमहाभूतातून निर्माण झाले आहे. " असे दाखवले. पण ती पंजाने थप्पड मारणार आहे असे कालिदासाला वाटले. त्यानेही आधी पंजा उगारला आणि त्याची मूठ बनवून "आपण गुद्दा मारू." असे दर्शवले. "पंचमहाभूते मिळून एक शरीर किंवा वस्तू निर्माण करतात." असा त्याचा अर्थ राजकुमारीने घेतला. अशा प्रकारे चाललेल्या वादविवादात अखेरीस राजकन्येने आपला पराभव मान्य केला आणि कालिदासाचे श्रेष्ठत्व मान्य करून त्याचेबरोबर विवाह केला.

पण आपली घोर फसवणूक झाली असल्याचे  पहिल्या रात्रीच तिच्या लक्षात आले आणि तिने रागाच्या भरात कालिदासाला आपल्या महालाच्या सज्ज्यातून खाली ढकलून दिले. तो जिथे जमीनीवर पडला तिथे समोर कालीमातेची मूर्ती होती आणि आ वासून खाली पडतांना त्याची जीभ त्याच्याच दातांमध्ये चावली जाऊन तिचा तुकडा थेट कालीमातेच्या पायाशी जाऊन पडला. या बलिदानाने प्रसन्न होऊन कालीमातेने त्याला विद्येचे वरदान दिले आणि तो विद्वान बनला. अशी एक दंतकथा आहे.

या कथेचेही कांही पाठभेद आहेत. त्यातल्या एकात पत्नीने झिडकारल्यानंतर आणि आपल्याला वापरले गेल्याचे लक्षात आल्यावर निराशाग्रस्त झालेला कालीदास जीव देण्यासाठी एका नदीच्या किनाऱ्यावर जातो. त्या ठिकाणी एका जागी गांवातल्या स्त्रिया दगडावर आपटून कपडे धूत असतात. ज्या दगडांवर कपडे आपटले जात असतात ते गुळगुळीत झालेले असतात, तर आजूबाजूचे इतर दगड खडबडीत राहून त्यांचे कंगोरे दिसत असतात. "जर कापडाने ठोकून दगडाचा आकार बदलत असेल तर ज्ञानाचे घांव घालून आपले मठ्ठ डोके कां सुधारणार नाही?" असा विचार त्याच्या डोक्यात चमकतो आणि तो अत्यंत कष्टाने ज्ञानार्जन करून शास्त्रार्थ जाणणारा पंडित होऊन परत घरी येतो. आल्या आल्या त्याची पत्नी त्याला "अस्ति कश्चित वागार्थः।" (" कांही अर्थपूर्ण बोलणार आहेस का?" साध्या भाषेत सांगायचे तर "तुला बोलायला तोंड तरी आहे का?") असे विचारते. यातील अस्ति, कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये रचून तो तिला चोख उत्तर देतो. असे दुसऱ्या एका गोष्टीत सांगतात.

Friday, July 18, 2008

लीड्सच्या चिप्स - भाग २१ - वैद्यकीय सेवा


आपल्या शहरातल्या डॉक्टरांना आपण एरवी कितीही नांवे ठेवत असलो तरी मनातून आपल्याला त्यांचाच केवढा आधार वाटत असतो हे बाहेरगांवी गेल्यावर लक्षात येते. मागच्या महिन्यात मैसूरसारख्या रम्य गांवी गेलो होतो आणि चांगले मजेत रहात होतो. पण किंचित प्रकृती अस्वास्थ्य वाटायला लागताच आपल्या मुंबईला परत यावेसे वाटायला लागले. परदेशात गेल्यावर तर ही भावना अधिकच प्रकर्षाने जाणवते. मागे लीड्सला जायला निघण्यापूर्वी सर्दी खोकला, ताप, अपचन यासारख्या सामान्य रोगांवर आपल्याला लागू पडणारी सगळी औषधे आणि डेटॉल, कापूस, बँडएड आदि प्रथमोपचाराचे सामान मुद्दाम बरोबर नेले होते. मेडिक्लेमचा विमा काढला होताच. इंग्लंडमधील राहणी इथल्यापेक्षा चांगल्या दर्जाची असल्यामुळे तिथे सरस वैद्यकीय सेवा उपलब्ध असणारच असा ढोबळमानाचा विश्वासही होता, पण मनात कुठे तरी थोडी अस्वस्थता होती.
आरोग्याचा विमा काढला असला तरी पॉलिसीचा कागद कांही आपल्याला बरे करत नाही. डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्यानंतर त्यावर खर्च झालेले पैसे क्लेम करण्यापुरताच त्यांचा उपयोग असतो. त्यामुळे तिथे गेल्यावर तिकडचे धन्वंतरी कुठे भेटू शकतात याचा शोध हळू हळू सुरू केला. पण आमच्या गल्लीच्या आसपासच नव्हे तर सिटी सेंटरच्या गजबजलेल्या भागातसुध्दा मला कुठल्या डॉक्टराच्या नांवाची एकादी पाटीसुध्दा दिसली नाही. आपल्याकडल्या कोणत्याही शहरात मध्यमवर्गीयांच्या वस्तीत पंधरा मिनिटे फिरलात तर डॉक्टरांच्या नांवाचे पांच दहा तरी बोर्ड दिसतात. इंग्लंडमधले डॉक्टर लोक असतात तरी कुठे आणि रोगी त्यांना कसे शोधून काढतात याची उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना.
मुलाला त्याबद्दल विचारता त्याने सांगितले की तिथली सरकारी आरोग्यसेवा अत्यंत चांगली आहे आणि बहुतेक लोक त्याचाच लाभ घेतात. शहरात जागोजागी असलेली मोठमोठी हॉस्पिटले मला दिसली होतीच. ती चांगली सुसज्ज असतात आणि तिथे रोग्यांचा बजबुजाट नसतो. त्यातल्या कोठल्याही विभागात सहजपणे एपॉइंटमेंट मिळते. त्याच दिवशी भेटण्याची वेळसुध्दा तासभर आधी ठरवून ती कसोशीने पाळली जाते. आणीबाणीसाठी ट्रॉमाकेअर युनिट्स असतात तिथे मात्र रुग्ण येताच लगेच त्याचेवर उपचार केला जातो. त्याखेरीज शहराच्या वेगवेगळ्या भागात हेल्थ सेंटर्स असतात. लहान सहान तक्रारीसाठी रोगी तिथे जातात. हॉस्पिटल किंवा हेल्थ सेंटरमध्ये जाऊनच डॉक्टर त्या लोकांना तपासून त्यांचेवर उपचार करतात किंवा त्यांना औषधे लिहून देतात. पेशंटच्या घरी व्हिजिट करणे वगैरे गोष्टी तिकडे कधीच कालबाह्य झाल्या असाव्यात. डॉक्टरचे स्वतःचे खाजगी नर्सिंग होम असणे सुध्दा दुर्मिळ झाले होते.
सुदैवाने माझ्या मुलाला किंवा सुनेला डॉक्टरला भेटण्याची फारशी गरज पडली नव्हती, पण नियमित तपासण्या करून घेण्यासाठी किंवा उपचारासाठी मुलींना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागत असे. 'बर्ली सेंटर' नांवाच्या जागी त्याच्या कुटुंबातील सर्वांच्या नांवाची नोंदणी झाली होती. ती जागा घरापासून दोन अडीच किलोमीटर लांब असल्यामुळे इंग्लंडच्या हवामानात इतके अंतर चालत जाणे शक्य नव्हते. प्रत्येक वेळी ते फोनवर अपॉइंटमेंट घेत आणि कार किंवा कॅबने तिकडे जाऊन येत. " आम्हाला गरज पडली तर काय करायचे?" या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे तयार नव्हते. त्याच्या एका मराठी मित्राचे आईवडील नुकतेच येऊन तीन चार महिने तिथे राहून गेले होते. त्याने काय केले याची चौकशी केल्यावर त्यांनी 'हाइड पार्क सर्जरी'मध्ये रजिस्ट्रेशन केले होते असे समजले. ही जागा वाहनांच्या रस्त्याने आमच्या घरापासून दूर असली तरी टेकडी उतरून पायी गेल्यास शॉर्टकटने दहा मिनिटांच्या अंतरावर होती. प्रत्यक्ष आजारी पडून आवश्यकता निर्माण होण्यापूर्वी धडधाकट असतांनाच आपण चौकशी करावी म्हणून आम्ही दोघे तिथे चालले गेलो.
रस्त्यावरून पाहतांना 'हाइड पार्क सर्जरी'ची इमारत दवाखान्यासारखी दिसत नाही. मला ते एक लहानसे क्लबहाउस वाटले. समोर सात आठ मोटारी उभ्या होत्या आणि आंत सगळी मिळून तितकीच माणसे होती. प्रशस्त अशा कॉरीडॉरमधून थोडे आंत गेल्यावर छोटीशी आच्छादन केलेली मोकळी जागा होती. तिच्या एका कोप-यात रिसेप्शन काउंटर होते आणि आजूबाजूला वीस पंचवीस लोकांनी बसण्याची व्यवस्था होती. पण त्यावर तीन चार लोक आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करत बसले होते. सुंदर रंगीत चित्रे आणि छायाचित्रांनी सजवलेली गुळगुळीत पृष्ठांची खूप मॅगेझिन्स एका जागी ठेवली होती. त्यातले आपल्याला पाहिजे ते घेऊन चाळत बसाले आणि वाचून झाल्यावर पुन्हा जागेवर ठेऊन द्यावे. मुले, स्त्रिया आणि वृध्दांचे विकार, एड्स किंवा कँसरसारखे घातक रोग, थंडीपासून बचाव, धू्म्रपान आणि मद्यपानाचे दुष्परिणाम अशा विविध विषयांसंबंधी लोकशिक्षणार्थ तयार केलेली एक दोन पानाची आकर्शक पँफ्लेटस जागोजागी ठेवली होटी. त्यातली आपल्याला हवी ती घेऊन वाचावी किंवा घरी नेऊन इतरांमध्ये त्यांचा प्रसार करावा. एका कोप-यात अगदी लहान मुलांसाठी मिकी माउस, डोनाल्ड डक, बार्बी डॉल्स, हत्ती, घोडे, उंट, मोटारी, विमाने यासारखी भरपूर खेळणी ठेवली होती. मुलांनी ती पाहिजे तशी हाताळावीत, तिथे बसावे, लोळावे, नाचावे, बागडावे असे कांही करायला पूर्ण मुभा होती. पण ते करायला अलीकडे फारशी लहान बाळेच तिकडे दिसत नाहीत. देशाची सरासरी जनसंख्या प्रौढ होत चालली आहे.
खरे सांगायचे झाल्यास सहा महिन्याचा व्हिसा घेऊन परदेशातून आलेल्या माणसाला तेथे कोणी उभे राहू देईल असे मला वाटले नव्हते. त्यातून माझ्या मुलाचे रजिस्ट्रेशनसुध्दा तेथे नव्हते. त्यामुळे आमची नांवे रेशनकार्डाप्रमाणे त्याच्या खात्यात जोडण्याची सोय नव्हती. तरीही नक्की कुठे जाऊन काय करावे लागेल हे तरी समजून घ्यावे एवढ्या उद्देशाने तिथे गेलो. बरोबर पासपोर्ट आणि व्हिसा मिळवण्यासाठी दिलेली सर्व कागदपत्रे असलेली फाईल नेली. सरकारी मामला म्हणजे केंव्हा कोणती माहिती आणि पुरावे लागतील याचा नेम नाही असा आपला अनुभव असतो. 'हाइड पार्क सर्जरी'मध्ये गेल्यावर रिसेप्शन काउंटरवरल्या मुलीने आधी "एपॉंइंटमेंट घेतली आहे कां?" असे विचारताच आता नन्नाचा पाढा इथूनच सुरू होणार असे वाटले. पण तसे झाले नाही. "नाही" म्हंटल्यावर तिने मला थोडे बसून घ्यायला सांगितले आणि तिच्या हांतातले काम आटोपताच मला बोलावून घेतले.
मी भारतातून आलो असून चौकशी करण्यासाठी आलो आहे म्हणताच तिने एक छोटासा फॉर्म देऊन तो भरायला सांगितले. त्यात नांव, पत्ता, टेलिफोन नंबर, मुलाचे नांव एवढेच भरायचे होते. मी तिथला रहिवासी आहे की पाहुणा आहे तेसुध्दा लिहिण्याची गरज नव्हती. त्यानंतर अनेक रोगांची किंवा ऑपरेशन्सची यादी दिलेली होती आणि त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी माझ्या शरीराने अनुभवल्या आहेत त्यावर टिक करायची होती. त्यामुळे तिथेच बसल्या बसल्या फॉर्म भरून मी तिला तो फॉर्म सुपूर्द केला. तिने लगेच संगणकावर आमची नांवे घालून आम्हाला तीन चार दिवसानंतर येण्याची तारीख आणि वेळ सांगितली. पासपोर्ट, व्हिसा, राहत्या जागेबद्दल कोणतेही कागदपत्र असला कसलाच पुरावा तिने मागितला नाही. आपल्याकडे जिकडे तिकडे फोटो आयडेंटिटी आणि अड्रेसप्रूफ मागतात आणि ते असल्याशिवाय पान हलत नाही. मी भरलेला फॉर्मदेखील त्यातील माहिती इनपुट झाल्यानंतर त्या पेपरलेस ऑफीसमध्ये नष्ट केला गेला असणार.
आम्ही ठरलेल्या तारखेला ठरलेल्या वेळी तिथे गेलो. आमची ती एपॉइंटमेंट एका नर्सबरोबर आहे हे तेथे गेल्यानंतर समजले. त्या वयस्कर नर्सबाईंना सगळेच लोक डॉक्टर्सपेक्षाही जास्त मान देत होते असे दिसत होते. बाई हंसतमुख, मनमिळाऊ आणि बोलक्या होत्या. त्यांनी पटापट आमची उंची, वजन, रक्तदाब, नाडीचे ठोके, वगैरे तपासून त्याच्या नोंदी केल्या. रक्ताचे नमूने काढून तपासणीसाठी ठेऊन घेतले. हात पाय हलवून आणि नजर फिरवायला सांगून त्याच्या हालचाली पाहिल्या. पुन्हा एकदा भयानक आजारांची लांबलचक यादी वाचून त्यातले कोणकोणते आम्हाला होऊन गेले आहेत ते विचारले. त्यातली कित्येक नांवेसुध्दा मी ऐकलेली नव्हती. त्या अर्थी बहुधा मला ते झाले नसणार. पण हे सगळे अगदी खेळीमेळीने चालले होते. आम्ही परदेशातून आलो आहोत म्हंटल्यावर अगत्याने आमच्या कुटुंबाबद्दल ती विचारपूस करत होती. तिचे इंग्रजी उच्चार समजण्यात थोडी अडचण होत आहे हे पाहून सावकाशपणे बोलत होती. वर्णद्वेषाचा लवलेशही तिच्या वागणुकीत नव्हता. त्यानंतर आठवड्यानंतर पुन्हा बोलावले होते. हा सगळा रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसचा भाग होता. तोपर्यंत रक्ताची तपासणी होऊन त्याचा रिपोर्ट येईल अशी अपेक्षा होती. पण दोन दिवस आधी टेलीफोन करून एपॉइंटमेंट कन्फर्म करायची होती. ती विचारणी करता रक्ताच्या तपासणीचा रिपोर्ट आला नसल्याचे समजले आणि त्याचे सँपल पुन्हा द्यावे लागले. तिकडे सुध्दा असे मानवी चुकांचे घोटाळे होतात. चालायचेच म्हणा! शिवाय सगळे कांही कॉम्प्यूटरमध्ये बंद असल्यामुळे नक्की काय झाले असेल याची कोणाला कांही माहिती नसते. आमची तपासणी रूटीन असल्यामुळे आणि 'माहितीसाठी माहिती' अशा प्रकारची असल्यामुळे कोणाला त्याची पर्वा करण्याची जरूर नव्हती.
कालांतराने दुसरे रिपोर्ट आले आणि नवी एपॉइंटमेंट घेतली. सगळे कांही आलबेल होते. लहान मुलांना जसे नियमितपणे रोगप्रतिबंधक लशी देतात तसे तिकडे वरिष्ठ नागरिकांनाही देतात. त्यानुसार आम्हाला 'फ्ल्यूजॅब' घ्यायला सांगण्यात आले. आम्हीसुध्दा मुकाट्याने ते घेऊन टाकले. एवीतेवी आम्ही दवाखान्यात जात होतोच त्यामुळे या सेवेचा उपयोग करून पहावा असे ठरवले. पत्नीला थोडा सर्दीखोकल्याचा त्रास होत होता म्हणून डॉक्टरची भेट घेतली. त्याने तपासणी करून त्यावर कोणतेच औषध दिले नाही. वाटल्यास लॉझेंजेस घेऊन चघळायचा सल्ला दिला आणि ताप आल्यास घेण्यासाठी चार गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. आपल्याकडे मोठ्या रस्त्यावरसुध्दा केमिस्टची लहान दुकाने दिसतात. तिकडे तशी दिसत नाहीत. मॉल किंवा डिपार्टमेंट स्टोअरमध्ये कॉस्मेटिक्सच्या बाजूला कोठेतरी फार्मसी असते किंवा बारक्या गल्लीत एकादे फार्मसीचे दुकान असते. असेच एक दुकान सापडले तिथे ते प्रिस्क्रिप्शन नेऊन दिले. तो दुकानदार बहुधा भारतीय असावा. त्याने सांगितले की या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे हे औषध दिले तर त्याचे साडेपांच पौंड पडतील. सरकारी दवाखान्यातून आलेल्या दर प्रिस्क्रिप्शनमागे तेवढेच पैसे घेतात आणि ते पैसे सरकारजमा होतात. त्या औषधाची किंमत कितीही असो, त्याचे साडेपाच पौंडच पडतात. फार्मसिस्टला कांही कमिशन किंवा ठराविक सेवाशुल्क मिळत असेल. दिलेल प्रिस्क्रिप्शन फार्मसिस्ट आपल्याकडे ठेवून घेतो आणि तेच औषध पुन्हा हवे असल्यास नवे प्रिस्क्रिप्शन द्यावे लागते. मात्र आम्हाला लिहून दिलेले औषध 'एटीसी म्हणजे एक्रॉस दि काउंटर' या प्रकारात मोडते आणि हवे असल्यास ते प्रिस्क्रिप्शनशिवाय एक दीड पौंडाला मिळेल. विकत घेऊन त्यावरील मजकूर वाचल्यानंतर ते 'क्रोसिन' चेच वेगळे नांव होते हे समजले. म्हणजे तो पौंडसुध्दा अक्कलखात्यातच जमा झाला, कारण आम्ही क्रोसिन नेलेले होतेच.
औषधविक्रीबाबत तिथे फारच कडक नियम आहेत आणि त्याचे कसोशीने पालन होते. फारच थोडी औषधे 'एटीसी'खाली येतात. इतर औषधांसाठी प्रिस्किरप्शन आवश्यक असते आणि एका प्रिस्किरप्शनवर दुस-यांदा ते औषध मिळत नाही. आपल्याला एकच औषध डॉक्टरला न विचारता पुन्हा पुन्हा घेण्याची संवय असते. तसे तिकडे चालत नाही त्यामुळे ते जांचत वाटते. ग्राहकाच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखी वाटते. सर्दीखोकल्यासाठी तिकडे कोणतेच औषध देत नाहीत. त्या हवामानात बॅक्टीरिया एवढे वाढत नाहीत त्यामुळे त्यांच्या इन्फेक्शनचा संभव कमी असतो आणि व्हायरसवर अजूनही म्हणावी तेवढी परिणामकारक औषधे निघालेली नाहीत. शरीराची ताकद वाढवून त्यांचा प्रतिकार करणे हाच त्यावर उपाय आहे. रोग बळावल्यामुळे ताप आला, फुफ्फुसावर परिणाम झाला, रक्तदाब कमीजास्त झाला वगैरेवर सिम्प्टोमॅटिक उपचार करून ते काबूत आणले जातात.
तिकडच्या सा-या तपासण्या आणि रोगप्रतिबंधक उपाय संपेपर्यंत आमची परतीची तारीख आली होती. आम्ही अखेरच्या भेटीत नर्सला ते सांगून तिचा प्रेमळ निरोप घेतला. तिनेही "आता पुन्हा लवकर परत या आणि जास्त काळ इथे रहा." असे अगत्याने सांगितले. "तुम्हाला हेच करायचे होते तर माझा इतका वेळ फुकट कां घालवला?" असा खडूसपणाचा प्रश्न विचारला नाही. आमच्याच मनात तो विचार आला होता. तिला तसे वाटले की नाही कोणास ठाउक. कदाचित यालाच सेवाभाव म्हणत असावेत. समोर जो आला असेल तो कोण आहे आणि काय करणार आहे याचा विचार न करता आपले कर्तव्य करत रहायचे, आणि तेसुध्दा हंसतमुख राहून!

डॉ.विद्याधर ओक आणि बावीस श्रुतींची पेटी


डॉ.विद्याधर ओक हे नांव हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सुपरिचित आहे. स्व.गोविंदराव पटवर्धनांच्या या पट्टशिष्याने निष्णात हार्मोनियमवादक म्हणून आपले स्थान निर्माण केले आहेच, शिवाय प्राचीन शास्त्रीय संगीताला आधुनिक विज्ञानाचा आधार देणारा अभ्यासू वृत्तीचा आणि एक कुशाग्र बुध्दीचा संशोधक, या क्षेत्रात नव्या दिशा चोखाळणारा आणि दाखवणारा द्रष्टा, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणारा उद्योजक अशी अनेक प्रकाराने त्यांची ओळख करून द्यावी लागेल. हंसतमुख प्रसन्न चेहेरा, हजरजबाबीपणा, नेमक्या शब्दात आपल्या मनातला आशय बोलून व्यक्त करण्याची कला, श्रोत्यांना समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची हातोटी वगैरे अनेक पैलू त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वात आहेत. त्यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या खास हार्मोनियमसंबंधी सादर केलेल्या लेक्चर डेमॉन्स्ट्रेशनला हजर राहण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी जे पहायला आणि ऐकायला मिळाले त्याचा गोषवारा देण्याचा हा प्रयत्न आहे.


अणुशक्तीनगरमधील 'संवाद' तर्फे हा कार्यक्रम तिथल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ही मुख्यतः वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची वसाहत असल्याकारणाने बहुतेक श्रोते मंडळींकडे विज्ञाननिष्ठ चिकित्सक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती होती. त्याचप्रमाणे रविवार संध्याकाळच्या अमूल्य वेळेचा सदुपयोग हिंडणेफिरणे, बाजारहाट, खाणेपिणे, नाटक सिनेमा यासारख्या लोकप्रिय गोष्टीत न करता किंवा घरबसल्या टीव्हीवरील खास कार्यक्रम पहाण्यात तो न घालवता हे लोक या कार्यक्रमाला आले होते यावरून त्यांना संगीताची आवड, जुजबी माहिती किंवा निदान श्रोत्याचा कान तरी निश्चितच होता. ही बाब श्री. ओकांच्या लगेच लक्षात आली आणि त्यांनी आपल्या संभाषणाची सुरुवात तिथूनच केली.


आपल्या शिक्षणपध्दतीमध्ये शालेय शिक्षणाच्या अखेरीस कला आणि विज्ञान यांची फारकत केली जाते. किंबहुना आर्टस आणि सायन्स एकमेकांच्या विरोधात असल्यासारखे दाखवले जाते. संगीताचा समावेश कलाविषयात होत असल्यामुळे त्याचा विज्ञानाशी कसलाही संबंध नाही असेच समजले जाते. गायन किंवा वादन शिकण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची गरज पडतही नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या आजपर्यंतच्या कोणा महान कलाकाराला सुध्दा त्या विषयाच्या मागच्या विज्ञानाचा अभ्यास करावा असे वाटले नसेल. परंपरागत भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या लोकांना विज्ञानाची पार्श्वभूमीच नव्हती असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. पण वस्तुस्थिती अशी आहे की ध्वनिशास्त्रानुसार कोठलाही नाद किंवा ध्वनी याला एक विवक्षित कंपनसंख्या असते. या कंपनसंख्येच्या आधारानेच आपले श्रवणयंत्र तो नाद ओळखते आणि तो नाद स्मरणात साठवला जातो. एकामागोमाग कानावर पडणा-या नादांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसूत्रता असेल तर त्यातून संगीत निर्माण होते आणि ती नसेल तर तो गोंगाट होतो. बोलण्यातून किंवा गाण्यातून जे ध्वनी निर्माण होतात त्याची कंपनसंख्या किती असते ते कांही आपल्याला आंकड्यात समजत नाही, पण चांगला गवई सुरात गातो आहे हे आपल्या कानाला जाणवते त्याचे कारण त्याच्या सुरांच्या कंपनसंख्यांमध्ये सुसंगती असते. कसून रियाज करून त्याने ते साध्य केलेले असते.


समोर बसलेल्या श्रोत्यांना विज्ञान आणि कला या दोन्ही विषयात गती आहे हे ओळखून त्यांना समजेल अशा पध्दतीने श्री. ओकांनी आपले विवेचन केले. त्यांनी स्वतः विज्ञानाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्यांना ध्वनिशास्त्राची चांगली माहिती होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी संगीतावर विचार केला. सा रे ग म प ध नी हे स्वर एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे हे एकादा गवई ते स्वर गाऊन किंवा वादक वाजवून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीने पाहता त्यांच्या कंपनसंख्याचे अंक समजून घेऊन त्यांच्या समूहांकडे पाहिले तर त्यातील आंकड्यांना जोडणारी सूत्रे शोधता येतात. विद्याधररावांनी संशोधकाला लागणा-या चिकाटीने हे जिकीरीचे काम केले. पाश्चात्य जगात सुरुवातीपासूनच विज्ञान आणि गणिताचा थोडा संबंध होता असे दिसते. त्याचाही त्यांनी अभ्यास केला.
हार्मोनियम या वाद्याचे शिक्षण त्यांनी लहानपणापासूनच घेऊन त्यांनी त्यात प्राविण्य मिळवले होते. त्याचबरोबर हार्मोनियम हे 'टेंपर्ड स्केल' प्रमाणे ध्वनी निर्माण करणारे वाद्य असल्यामुळे विशुध्द शास्त्रीय संगीताला ते योग्य नाही अशी टीका ते सतत ऐकत होते. नेमके हे कसते वैगुण्य आहे हे समजून घेण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास केला. त्यात त्यांना यश आले एवढेच नव्हे तर ती उणीव भरून काढण्याचा मार्गसुध्दा त्यांनी शोधून काढला.


आपल्या भाषणात डॉ.ओक यांनी आधी थोडक्यात हार्मोनियमचा इतिहास सांगितला. इसवी सन १८४० साली रीडवर वाजणारे जगातले पहिले यंत्र फ्रान्समध्ये तयार केले गेले. म्हणजे हे वाद्य १६८ वर्षे जुने आहे. पण संगीत तर हजारो वर्षांपासून चालत आले आहे आणि तानपुरा, सतार, सारंगी यासारखी वाद्ये सुध्दा निदान कित्येक शतकांपासून प्रचारात आहेत. त्या मानाने हार्मोनियम फक्त १६८ वर्षांच्या बाल्यावस्थेत आहे असेही म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नेहमीच आघाडीवर असलेल्या जर्मनीतल्या कुशल कारागीरांनीसुध्दा हे वाद्य बनवण्याचे कसब आत्मसात केले आणि बाजाच्या पेट्या तयार करून विकायला सुरुवात केली. अल्पावधीत त्या युरोपभर पसरल्या. त्या काळात त्या पायपेट्या असायच्या. संगीतप्रेमी ब्रिटीश अधिका-यांनी त्या भारतात आणल्या आणि त्यांचे पाहून एतद्देशीय धनिक वर्ग, संस्थानिक वगैरेंनीसुध्दा त्या फ्रान्स किंवा जर्मनीतून आयात केल्या. हा सन १८६० ते १८८० चा कालखंड होता. बाजाची पेटी भारतातसुध्दा फार लोकप्रिय झाली. याचे मुख्य कारण म्हणजे तंतुवाद्यांच्या मानाने हे वाद्य शिकायला आणि वाजवायला सोपे आणि त्याचा जबरदस्त आवाज. शास्त्रीय संगीतापासून ते तमाशा, नौटंकी यासारख्या सर्व प्रकारच्या लोकसंगीतात तिचा वापर धडाक्याने होऊ लागला. सन १८८२ साली संगीत सौभद्र या नाटकात हार्मोनियमचा वापर सर्वात पहिल्यांदा झाला असा उल्लेख सांपडतो.


१८४० सालापासून ते आजतागायत बाजारात मिळत असलेले सर्व हार्मोनियम आणि त्या प्रकारची इतर वाद्ये ही टेंपर्ड स्केलवरच आधारलेली आहेत. याचा आवाज कसा निघतो हे सोदाहरण दाखवण्यासाठी डॉक्टर ओकांनी एक परंपरागत पेटी घेऊन वाजवायला सुरुवात केली. समाधीसाधन संजीवन नाम, धुंदी कळ्यांना, मौसम है आशिकाना, शुक्रतारा मंदवारा, प्रथम तुला वंदितो, सुखकर्ता दुखहर्ता, तीन्ही सांजा सखे मिळाल्या, जेथे सागरा धरणी मिळते, तोच चंद्रमा नभात, एहेसान तेरा होगा मुझपर, इथेच आणि या बांधावर, निगाहे मिलाने को जी चाहता है, पान खाये सैंया हमार .... एकाहून एक गोड गाणे ते अप्रतिम वाजवत होते. त्यातले स्वरच काय पण व्यंजने आणि शब्द सुध्दा ऐकू येत असल्याचा भास होत होता आणि टाळ्यांच्या कडकडाटाने श्रोते त्यांना दाद देत होते. वीस पंचवीस मिनिटे यमन राग अशा प्रकारे खुलवल्यावर त्यांनी विचारले, " कसे वाटले?" आता हा काय प्रश्न झाला? मग त्यांनी लगेच विचारले, " चांगलं वाटलं ना, मग यांत प्रॉब्लेम कुठे आहे?" टेम्पर्ड स्केलच्या पेटीवरील वादन ऐकून श्रोत्यांना त्यातून इतका आनंद मिळत असेल तर तिला नांवे ठेवण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याचा विचार करण्याची गरजच काय हा प्रश्न बुचकळ्यात टाकणारा होता.


क्षणभर थांबून त्यांनीच या प्रश्नाचे उत्तर देण्याला सुरुवात केली. पुन्हा एकदा सरगम आणि त्यातील स्वरांची कंपनसंख्या याकडे वळून त्यांनी सांगितले की वरच्या पट्टीमधील षड्जाची कंपनसंख्या खालील पट्टीमधील षड्जाच्या कंपनसंख्येच्या बरोबर दुपटीने असते. म्हणजे मुख्य सा जर १०० हर्टझ ( दर सेकंदाला १०० कंपने) असेल तर वरचा सा २०० इतका असतो आणि पंचम १५० असतो. सा आणि प मध्ये प्रत्येकी दोन दोन रे, ग आणि म असतात तसेच प आणि वरचा सा यांच्यामध्ये दोन दोन ध आणि नी असतात. त्यांतील रे, ग, ध आणि नी कोमल आणि शुध्द असतात तर दोन मध्यमांना शुध्द आणि तीव्र म्हणतात. अशा प्रकारे पहिल्या सा पासून वरच्या सा पर्यंत बारा नोट्स असतात. त्यातील प्रत्येक नोटची कंपनसंख्या तिच्या आधीच्या स्वराच्या १.०५९४६३१ इतक्या पटीने मोठी असते. १०० या आंकड्याला या पटीने बारा वेळा गुणल्यास २०० हा आंकडा येईल. यालाच टेम्पर्ड स्केल असे नांव दिले आहे. हार्मोनियमच्या डाव्या बाजूच्या पहिल्या पट्टीपासून प्रत्येक स्वर वाजवत गेल्यास तो इतक्या पटीने चढत जातो. त्यातला समजा काळी चार हा षड्ज धरला तर कोमल ऋषभ, शुध्द ऋषभ, कोमल गंधार, शुध्द गंधार वगैरे स्वर त्यानंतर क्रमाने येतात. आपल्याला पहिल्यापासून अशाच प्रकारचे स्वर ऐकण्याची संवय झाली असते त्यामुळे कानाला ते चांगले वाटतातही.


पण तरबेज गवयांना मात्र ते स्वर खटकतात, कारण आपल्या शास्त्रीय संगीतात जे गंधार, मध्यम, धैवत वगैरे स्वर येतात ते किंचित भिन्न असतात. खालच्या सा पासून वरच्या सा पर्यंत मधल्या स्वरांच्या कंपनसंख्यांचे प्रमाण १६/१५, १०/९, ९/८, ६/५, ४/३, ३/२ वगैरे साध्या अपूर्णांकाने वाढत वाढत ते २/१ पर्यंत जाऊन तसेच पुढे जाते. या अनुसार वाजणारे मधले स्वर हार्मोनियममधून निधणा-या स्वरांहून १-२ टक्क्याने हटके असतात. त्यामुळे तज्ञांना ते बेसुरे वाटतात. आपले कान एवढे तीक्ष्ण नसल्यामुळे त्यांना ते जाणवत नाही एवढेच. त्यातसुध्दा आपल्याला नेहमी ते स्वर एक गेल्यानंतर दुसरा असे ऐकू येतात त्यामुळे त्यांच्या प्रमाणबध्दतेतला हा सूक्ष्म फरक आपल्याला समजत नाही. पण एकाच वेळी पेटीचे तीन चार स्वर एकदम वाजवले तर मात्र थोडा गोंगाट वाटतो हे डॉक्टर ओक यांनी प्रत्यक्ष वाजवून दाखवले. त्यांनी जी खास श्रुतींची पेटी बनवली आहे त्यातले स्वर भारतीय शास्त्रीय संगीतातील पध्दतीप्रमाणे ट्यून केले होते. त्यातले वेगवेगळे स्वर एकदम वाजवल्यावरसुध्दा ते सुसंवादी वाटत होते. या दोन्हीतला फरक ज्या लोकांच्या कानांना जाणवत नाही त्यांनी संगीत हा आपला प्रांत नाही हे वेळीच ओळखून क्रिकेट किंवा टेनिस असा दुसरा छंद धरून त्यात आपले मन रमवावे असे ते गंमतीने म्हणाले.


हा फरक एवढ्यावर थांबत नाही. मुळात सात मुख्य स्वर आणि पांच उपस्वर ही सप्तकांची संकल्पनाच हार्मोनियमचे सोबतीने पश्चिमेकडून आपल्याकडे आली आहे. भारतीय संगीत श्रुतींवर आधारलेले आहे. त्याचे वैज्ञानिक पध्दतीने विश्लेषण केले गेले नसल्यामुळे श्रुती म्हणजे नेमके काय याची सर्वमान्य अशी व्याख्या उपलब्ध नव्हती. डॉक्टरसाहेबांनी यासंबंधी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, हिंदुस्थानी आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील स्वर कशा प्रकाराने लावले जातात हे पाहिले, अनेक प्रसिध्द संगीतकारांचे गायन व वादनाच्या ध्वनिफिती मिळवून त्यांचा अभ्यास केला. मल्टिचॅनेल एनेलायजरसारख्या आधुनिक उपकरणांचा उपयोग करून स्वरांच्या कंपनसंख्या मोजून त्याचा अभ्यास केला. या सर्व संशोधनानंतर प्रत्येक सप्तकामध्ये बावीस श्रुती असतात असा निष्कर्ष त्यांनी काढला. षड्ज आणि पंचम हे दोन अचल स्वर आहेत आणि ऋषभ, गंधार, मध्यम, धैवत व निषाद हे प्रत्येकी चार निश्चित अशा स्थानांवर श्रवण करता येतात अशा प्रकाराने एकूण बावीस हा आंकडा येतो. कोठल्याही एका रागात यातले सातच स्वर असतात. कांही रागात तर पांच किंवा सहाच असतात. पण ते अतिकोमल, कोमल, शुध्द किंवा तीव्र असू शकतात. या प्रत्येक प्रकाराला श्रुति म्ङणतात. त्या त्या रागातील इतर वादी, संवादी स्वर ज्या प्रकारचे असतात त्यांना प्रमाणबध्द अशा श्रुती आल्या तर ते संगीत अधिक श्रवणीय वाटते. अशा प्रकारे प्रत्येक स्वरातील योग्य ती श्रुति घेऊन त्या सात सुरांमधून रागाची गुंफण केली जाते.


संशोधनाअंती डॉक्टर ओक यांनी या श्रुतींच्या प्रमाणांचा तक्ता तयार केला आणि त्यानुसार वाजणा-या रीड्स बनवल्या. एवढेच नव्हे तर त्यांतून निघणा-या नादाचा अचूकपणा मोजणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रसुध्दा बनवले आहे. वाजवणा-याला सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्याच्या हार्मोनियम एवढ्याच आकाराची ही पेटी आहे. त्यात नेहमीच्या आकाराच्या तेवढ्याच पट्ट्या आहेत आणि प्रत्येक पट्टीच्या खाली दिलेली खुंटी बाहेर ओढून श्रुति बदलण्याची सोय आहे. जो राग वाजवायचा असेल त्यातल्या श्रुति आधी सेट केल्या की नेहमीप्रमाणेच तो हार्मोनियम वाजवायचा. याशिवाय त्यांनी मेटलोफोन नांवाचे एक वाद्य बनवले आहे. त्यात विशिष्ट धातूच्या पट्ट्या बसवायच्या आणि वाजवायला सुरुवात करायची. याचे उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी प्रेक्षकांमधून एका माणसाला स्टेजवर बोलावून घेतले. या गृहस्थाने आयुष्यात कधीही कोणतेही वाद्य़ वाजवलेले नव्हते. मारवा रागाचे सूर फिट केलेला मेटलोफोन त्याच्यापुढे ठेऊन हातातील बारक्या हातोड्याने त्यातल्या कोठल्यही पट्टीवर कोणत्याही क्रमाने प्रहार करायला सांगितले. सारे स्वर बरोबर जुळलेले असल्यामुळे कसेही वाजवले तरी कानाला ते गोडच लागत होते. असेच हंसतखेळत तुम्ही शास्त्रीय संगीताचा थोडा आनंद स्वतः घेऊ शकता आणि त्य़ातून प्रयोग करीत ते शिकूही शकता असे त्यांनी सांगितले.


त्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंका त्यांनी दूर केल्या. हे एवढे रंगत चालले होते की आणखी हार्मोनियम वादन ऐकायला मिळणार आहे की नाही असे लोकांना वाटू लागल्यामुळे ती चर्चा आटोपती घ्यावी लागली. अखेरीस डॉ.ओक यांनी तयार केलेल्या बावीस श्रुतींच्या वाद्यावर त्यांनी कट्यार काळजात घुसली या नाटकातील रागमालिका असलेले चलत पिया बिन छिन बिसुराये हे पद वाजवले आणि परदेमें रहने दो, प्रभु अजि गमला, बनाओ बतियां वगैरे गाण्यातून भैरवी वाजवून या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता केली.