Wednesday, September 30, 2009

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस -भाग १ - प्रयाण


न्यूयॉर्कहून निघून वॉशिंग्टन डीसी आणि नायगारा धबधबा वगैरे पाहून येण्याची तीन दिवसांची सहल आम्ही ठरवली होती. अमेरिकेतल्या एका यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या या सहलीची तिकीटे आम्ही इंटरनेटवरून काढली होती. त्यासाठी अॅटलांटाहून नेवार्कला येतांना विमानाचा प्रवास केल्यामुळे सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेले सामान हँडबॅगेत आणि उरलेले सूटकेसमध्ये भरून नेले होते. आता तीन दिवस बसमधून फिरायचे असल्यामुळे सामानाची उलथापालथ करावी लागली. बसमधून उतरून पायी फिरतांना लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या आणि इतर अत्यावश्यक वस्तू खांद्याला टांगून नेण्याच्या झोळीत ठेवल्या, संध्याकाळी मुक्कामाला गेल्यावर लागणाऱ्या गोष्टी आणि जास्तीचे कपडे बसच्या होल्डमध्ये टाकायच्या बॅगेत ठेवले, मळलेले कपडे आणि अनावश्यक वस्तूंचे गाठोडे बांधून बाजूला केले आणि प्रवासात घालायचे कपडे बॅगेवर ठेवले. सकाळी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून रात्री झोपण्याच्या आधीच ही सारी आवराआवर करूनच गादीवर अंग टाकले.

पहाटे गजर लावून जाग आल्यावर आधी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आदल्या दिवशी होता तसा पाऊसवारा नव्हता हे पाहून हायसे वाटले. हवामान अनुकूल नसले तरीसुध्दा वेळेवर जाऊन टूरिस्ट बस गाठायची होतीच, पण वरुणदेवाच्या कृपेने सारे कांही शांत होते. त्यामुळे अंगातला उत्साह दुणावला. झटपट सारी कामे आटपून चहाबरोबरच दोन चार बिस्किटे खाऊन निघालो. सोमवारी सकाळी न्यूयॉर्कला ऑफीसला जाणाऱ्या लोकांची गर्दी असणार हे लक्षात घेऊन आणि शक्य तर ती टाळण्यासाठी जरूरीपेक्षा थोडे आधीच घराबाहेर पडलो. बसस्टॉपवर विशेष गर्दी नव्हती, लवकरच बस आली. तिच्यातही पुरेशी जागा होती. यावेळच्या प्रवासात फक्त आम्ही दोघे आणि फडके पतीपत्नी अशी पर्यटक मंडळीच होतो, पण आदले दिवशी न्यूयॉर्कला जाण्याची रंगीत तालीम झाली असल्यामुळे निर्धास्त होतो. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसै काढून तयार ठेवले होते. तिकीट काढून चांगल्या जागा पकडून बसून घेतले.

वाटेत चढणाऱ्यांची गर्दी थोडी जास्त असल्यामुळे भराभर बस भरत गेली. मी या रस्त्याने एकदा गेलेलो असल्यामुळे कांही खुणेच्या जागा पाहिल्यावर आठवत होत्या. पहिल्या वेळी नजरेतून निसटलेल्या कांही जागा या वेळी लक्ष वेधून घेत होत्या. तासाभरात पोर्ट ऑथॉरिटीचे बस टर्मिनस आले. या वेळी सबवेच्या भानगडीत न पडता टर्मिनसच्या बाहेर पडून सरळ टॅक्सी केली आणि बोवेन स्ट्रीटवरल्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफीसकडे प्रयाण केले. आम्ही पोचेपर्यंत ते ऑफीस उघडलेही नव्हते. आजूबाजूची बरीच दुकानेसुध्दा बंदच होती, थोडी उघडली होती आणि कांही आमच्यादेखतच उघडत होती. दरवाजापाशीच सामान ठेऊन आजूबाजूचे निरीक्षण करत उभे राहिलो.

हा भाग म्हणजे न्यूयॉर्कचे चायनाटाउन असावे. जिकडे पहावे तिकडे चित्रलिपीतली विचित्र अक्षरे दिसत होती. ती पाहून अक्षरसुध्दा न कळणे या वाक्प्रचाराचा अर्थ समजत होता. त्या चित्रांच्या बाजूला इंग्रजी भाषेतली अक्षरे नसली तर आम्ही चीनमध्ये आलो आहोत असेच वाटले असते. सगळ्या दुकानांवर चिंगमिंग, झाओबाओ, हूचू असलीच नांवे दिसत होती. भारताप्रमाणेच युरोपअमेरिकेतसुद्धा सगळ्या जागी चिनी खाद्यगृहे असतात, भारतात कुठे कुठे चिनी दंतवैद्य दिसतात, पण न्यूयॉर्कच्या या भागात हेअरकटिंग सलूनपासून डिपार्टमेंटल स्टोअरपर्यंत आणि इलेक्ट्रीशियनपासून अॅडव्होकेटपर्यंत सगळ्या प्रकारच्या दुकांनांचे किंवा ऑफीसांचे चिनी नांवांचे फलक होते. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांत सुद्धा  प्रामुख्याने मंगोलवंशीयच दिसत होते.

थोड्या वेळाने एका चिनी माणसाने येऊन दरवाजा उघडला. समोर फक्त एक जिना होता आणि तो चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर टूरिस्ट कंपनीचे केबिनवजा ऑफीस होते. दोनतीन मिनिटात त्याचा सहाय्यकही आला. त्याच्या पाठोपाठ आम्ही जिना चढून वर गेलो. आम्ही पर्यटक असल्याचे सांगताच त्याने काँप्यूटरवर आमची नांवे पाहून घेतली आणि केबिनच्या बाहेर पॅसेजमध्ये मांडलेल्या खुर्च्यांवर बसायला सांगितले. आम्ही रेस्टरूमची चौकशी केल्यावर त्याने शेजारचा एक बंद दरवाजा किल्ली लावून उघडून दिला. रस्त्यावरची नको ती माणसे त्याचा दुरुपयोग करायला येतात म्हणून ही खबरदारी घ्यावी लागत असल्याचे त्याने कुलुप उघडता उघडता सांगितले.

आमच्या पाठोपाठ आणखी कांही माणसे चौकशी करायला माडीवर आली, तिथे ठेवलेल्या सातआठ खुर्च्या केंव्हाच भरून गेल्या. कांही तरुणांनी उठून वरिष्ठ नागरिकांना जागा दिल्या. त्यानंतर सारखी माणसे येऊन चौकशी करून जातच होती आणि खाली रस्त्यावर जमलेल्या माणसांचा मोठा गलका ऐकायला येऊ लागला होता. थोड्याच वेळात तीनचार युवक ऑफीसात जाऊन हातात पॅड्स घेऊन बाहेर आले. एटथर्टी, एटफॉर्टी, फिली, डीसी असे कांही तरी पुटपुटणाऱ्या त्यातल्या एकाला मी माझ्याकडचे ई-टिकीट दाखवले, ते पाहून त्याने दुसऱ्याला बोलावले. त्याने आपल्या पॅडवरील चार नांवांवर टिकमार्क करून मला आमचे सीटनंबर्स सांगितले. आम्ही सर्वांनी आपली ओळख दाखवण्यासाठी आपापले पासपोर्ट तयार ठेवले होते, पण त्याची गरज पडलीच नाही. बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत हे सुध्दा त्या प्राण्याने मला विचारले नाही. खाली जाऊन रस्त्यावरील एका दुकानाच्या समोर जाऊन थांबायला सांगून तो धडाधडा जिना उतरून नाहीसा झाला.

आम्ही हळूहळू खाली उतरलो. रस्त्यावर शंभर दीडशे माणसांची झुम्बड उडालेली होती. ते तीनचार युवक एकेकाची तिकीटे पाहून त्याला कुठकुठल्या दुकानांच्या समोर जाऊन थांबायला सांगत होते. अशा रीतीने तीन चार वेगवेगळे घोळके तयार झाले. कांही लोक तेवढ्यात समोरच्या दुकानात जाऊन तिथे काय मिळते ते पाहून विकत घेत होते. तोंपर्यंत रस्त्यावर ओळीने तीन चार बसगाड्या येऊन उभ्या राहिल्या. प्रत्येक युवकाने आपापला घोळका त्यातल्या एकेका गाडीत नेला. आम्हीही आमच्या ग्रुपबरोबर आमच्या गाडीत जाऊन आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. त्या गाड्या साधारणपणे एकाच वेळी सुटून वेगवेगळ्या ठिकाणांना जाणार होत्या हे उघड होते. पण त्या जागी बस स्टेशनसारखे फलाट नव्हते की कसलेही बोर्ड नव्हते आणि कोणती गाडी कुठल्या गावाला जाणार आहे हे दाखवणारे कसलेच चिन्ह नव्हते. पण सगळे प्रवासी आपापल्या गाडीत पोचले असणार. अमेरिकेसारख्या प्रगत देशातले हे रस्त्यावरचे प्रिमिटिव्ह स्टाईलचे मॅनेजमेंट माझ्या चांगले लक्षात राहील.

आमच्या मार्गदर्शकाने बसमध्ये येऊन सगळे प्रवासी आले असल्याची खात्री करून घेतली. आमच्या अपेक्षेप्रमाणेच ही वॉशिंग्टन आणि नायगाराची तीन दिवसांची ट्रिप असल्याचे सांगून त्याबरोबर त्याने एक हलकासा धक्का दिला. इंटरनेटवर वाचलेल्या माहितीनुसार आम्ही पहिल्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला जाणार होतो. दुसऱ्या दिवशी नायगाराला जाऊन तिसऱ्या दिवशी परतणार होतो. न्यूयॉर्कच्या मानाने वॉशिंग्टनला हवा उबदार राहील आणि अंगातले लोकरीचे कपडे काढून फिरता येईल अशी आमची कल्पना होती. त्यानुसार तिथल्या व्हाईट हाउस सारख्या शुभ्र इमारतींच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या फोटोत आपल्याला कोणता रंग खुलून दिसेल याचा सखोल विचार करून कांही महिलांनी त्या दृष्टीने आपला वेष परिधान केला होता. त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पाडणारी घोषणा त्या मार्गदर्शकाने केली. हवामानाचे निमित्य सांगून त्यामुळे आपली सहल उलट दिशेने जाणार असून आता तिसरे दिवशी परत येतांना आपण वॉशिंग्टनडीसीला जाणार आहे हे ऐकून अनेकांचा थोडा विरस झाला. पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते
. . . . . . . . . . . . . .

 अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस - भाग २- सहस्त्र द्वीपे


आमच्या बसमध्ये सर्वात जास्त चिनी प्रवासी होते आणि त्यानंतर भरतखंडातून आलेले दिसत होते. आमच्या चिनी वाटाड्याने हंसतमुखाने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि प्रवासाची माहिती दिली. आम्ही ठरलेल्या मार्गावरूनच पण उलट दिशेने प्रवास करून वर्तुळ पूर्ण करणार आहोत आणि एक बिंदूसुध्दा वगळला जाणार नाही असे आश्वासन देऊन या तीन दिवसात आपण कायकाय पहाणार आहोत याची लांबलचक यादी वाचून दाखवली. आम्ही त्या सहलीची पुस्तिकाच पाहिली नसल्यामुळे नायगरा आणि वॉशिंग्टन या दोन शब्दांपलीकडे त्यातून आम्हाला फारसा बोध झाला नाही. पण खूप कांही पहायला मिळणार आहे हे ऐकून सुखावलो.

त्यानंतर त्याने या प्रवासाचे कांही नियम सांगून कांही आज्ञावजा सूचना केल्या. संपूर्ण प्रवासात प्रत्येक प्रवाशाने त्याला दिलेल्या जागेवरच बसले पाहिजे. बसचा नंबर लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा. कोठल्याही ठिकाणी बसमधून उतरल्यानंतर सर्व पर्यटकांनी सतत मार्गदर्शकासोबतच रहाणे उत्तम, पण घोळक्यातून कोणी वेगळा झालाच तर त्याने दिलेल्या वेळेवर बसपाशी येऊन थांबावे. गाईडचा मोबाईल नंबर आपल्याकडील मोबाईलवर सांठवून ठेवावा, पण कृपया "आमच्यासाठी बस थांबवून ठेवा." असे सांगण्यासाठी त्याचा उपयोग करू नये, पुढच्या ठिकाणाची चौकशी करून "आम्ही त्या जागी स्वखर्चाने येऊन भेटू." असे सांगण्यासाठी करावा. तीन दिवसांचा बसचा प्रवास आणि दोन रात्री झोपण्याची सोय एवढ्याचाच समावेश या तिकीटात आहे. त्याखेरीज अन्य सर्व खर्च ज्याने त्याने करायचे आहेत. पोटपूजेसाठी अधून मधून बस थांबवली जाईल, तेंव्हा जवळ असलेल्या कोणत्याही खाद्यगृहात जाऊन ज्याला पाहिजे ते आणि हवे तेवढे हादडून घ्यावे किंवा बरोबर नेण्यासाठी विकत घेऊन ठेवावे, पण वेळेवर बसपर्यंत पोचायचे आहे याचे भान ठेवावे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाण पाहण्यासाठी तिकीट काढावे लागते. त्यासाठी एकंदर बत्तीस डॉलर गाईडकडे सुरुवातीलाच द्यावेत. गाईड आणि ड्रायव्हर यांना दर डोई दररोज सहा डॉलर टिप द्यायची आहे, ती मात्र टूरच्या शेवटी एकत्रच गोळा केली जाईल. अशा प्रकारचे त्याचे निवेदन बराच वेळ चालले होते. प्रत्येक वाक्य एकदा इंग्लिशमध्ये बोलून त्याचे मँडारिनमध्ये भाषांतर करून तो सांगत होता. यँकीजच्या मानाने त्याचे शब्दोच्चार स्पष्ट होते आणि बंगाली लोकांशी बोलण्याची संवय असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना ते समजायला अडचण येत नव्हती. इंग्लिशमधील वाक्यच मँडारिनमध्ये सांगायला त्याला दुप्पट वेळ लागतो आहे असे वाटून तो कदाचित त्यांना जास्त सविस्तर सांगत असावा अशी शंका येत होती.

त्याचे निवेदन संपल्यानंतर आमची बस सुरू होऊन मार्गाला लागली तोंपर्यंत सव्वानऊ वाजले होते आणि सकाळच्या न्याहरीची वेळ झाली असल्याचे संदेश जठराकडून यायला लागले होते. प्रवाशांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी टूरिस्ट कंपनीकडे नव्हतीच. "सर्व पर्यटक ब्रेकफास्ट करूनच आले असावेत" असे त्यांनी गृहीत धरले होते की "हे चिनी लोक नाश्ताच करत नाहीत." यावर चर्चा करीत आम्ही आपले फराळाचे डबे उघडून जठराग्नीला आहुती दिल्या. दोन तीन तासानंतर आमची बस एका गॅस स्टेशनवर म्हणजे अमेरिकेतल्या पेट्रोल पंपावर थांबली. बस आणि प्रवासी दोघांनीही अन्नपाणी भरून घेतले.

न्यूयॉर्क शहर सोडून बाहेर पडतांना आमची गाडी अतीशय रुंद अशा महामार्गावरून धावत होती. तोंपर्यंत आम्हाला अमेरिकेत येऊन चार पांच दिवस झाले होते आणि आम्ही रोज फिरतच होतो. त्यामुळे तिकडले महामार्ग, त्यावरून सुसाट वेगाने धांवणारी वाहने, त्यांचा एकत्रित घोंघावत येणारा आवाज, मैल दीड मैल लांब रस्त्यावरील असंख्य वाहने पाहून एक अजस्त्र प्राणी सरपटत जात असल्याचा होणारा भास या सर्व गोष्टींची संवय व्हायला लागली होती. जसजसे आम्ही शहरापासून दूर जात गेलो, रस्त्यांची रुंदी, त्यांवरील वाहनांची गर्दी, बाजूला दिसणाऱ्या इमारतींची उंची आणि संख्या वगैरे सारे कमी कमी होत गेले. थोड्या वेळाने नागरी भाग संपून कंट्री साइड (ग्रामीण भाग) सुरू झाला आणि तोसुध्दा मागे पडून डोंगराळ भाग सुरू झाला. ही सारी न्यूयॉर्क राज्याचीच विविध रूपे असल्याचे समजले. त्या वेळी फॉल सीजन चालला असल्यामुळे सारे डोंगर फक्त दुरून साजरेच दिसत नव्हते, तर रंगाच्या बरसातीने चांगले सजले होते. शत्रूपासून आपला जीव वाचवण्यासाठी लहानसा सरडा रंग बदलतो आणि झाडीमध्ये किंवा झाडांच्या खोडात दिसेनासा होतो. शीत कटिबंधातले हे ताडमाड उंच असंख्य वृक्ष मात्र थंडीपासून आपला जीव वाचवण्यासाठी आपले रंग बदलतात आणि जास्तच उठून दिसतात.

संध्याकाळच्या सुमाराला आम्ही थाउजंड आयलंडच्या भागात जाऊन पोचलो. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (यूएसए) आणि कॅनडा या दोन देशांच्या दरम्यान पांच मोठमोठी सरोवरे आहेत. त्यातल्या ओंटारिओ सरोवरात एका उथळ भागाच्या तळावर हजारोंनी उंचवटे आहेत. त्यातले जे बाराही महिने पाण्याच्या वर राहतात आणि ज्यावर निदान दोन वृक्ष बारा महिने असतात अशा बेटांची संख्याच अठराशेच्या वर आहे. त्याशिवाय पाण्याची पातळी वर जाताच अदृष्य होणारी किंवा वृक्षहीन अशी कितीतरी बेटे असतील. यातील बहुतेक बेटे त्यांवर जेमतेम एकादी इमारत, थोडीशी बाग वगैरे करण्याइतकी लहान लहान आहेत. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी लोकांचे लक्ष या बेटांकडे गेले. अनेक श्रीमंत लोकांनी यातली बेटे विकत घेऊन त्यावर बंगले बांधले आणि उन्हाळ्यात ते इथे येऊन मौजमजा करू लागले. थंडीच्या दिवसात हे सरोवरच गोठून जात असल्यामुळे या भागातली रहदारी कमी होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसात लहान मोठ्या मोटरबोटींनी कुठल्याही बेटावर जाता येते.
अंकल सॅम बोट टूर कंपनीच्या मोटरबोटीत बसून आजूबाजूची बेटे पहात आम्ही तासभर या सरोवरात फेरफटका मारला. प्रत्येक बेटावरील इमारत वास्तुशिल्पकलेचा नमूना वाटावा इतकी आगळी वेगळी वाटते. कोणी त्याला किल्ल्याचा आकार दिला आहे तर कोणी भूतबंगला वाटावा असा आकार दिला आहे. सरोवरातून जाता जाता दृष्टीपथात येणाऱ्या द्वीपांबद्दल एक मार्गदर्शक माहिती सांगत होता. कोणते बेट कोणत्या अब्जाधीश सरदाराने कधी विकत घेतले किंवा सध्या कोणत्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्या ताब्यात आहे याबद्दल मनोरंजक माहिती दिली जात होतीच, कांही बेटांसंबंधी करुण कथासुध्दा सांगितल्या जात होत्या. त्यातली कोणतीच नांवे ओळखीची नसल्यामुळे आम्हाला त्यात फारसा रस नव्हता आणि एकदा ऐकून ती नांवे लक्षात राहणे तर केवळ अशक्य असते. यांमधील अनेक बेटांवर आता हॉटेले उघडली असून जगभरातले नवश्रीमंत लोक उन्हाळ्यात तिथे सुटी मजेत घालवण्यासाठी येतात. हे कामसुध्दा आमच्या ऐपतीच्या पलीकडचे होते.

तासभर या आधीच निसर्गरम्य तसेच मानवाने जास्तच आकर्षक केलेल्या सहस्रद्वीपांची एक झलक दुरूनच पाहून आम्ही आपल्या बसमध्ये परत आलो.

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस - भाग ३
   बफेलो सिटी - अमेरिकन महिषऊरु 


ओंटारिओ सरोवरातल्या सहस्रद्वीपांमधील चाळीस पन्नास बेटांच्या किनाऱ्याजवळून जातांना त्यांवरील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित सौंदर्यस्थळांचे अवलोकन करीत तासभर जलविहार करून परत आल्यावर आम्ही आमचा पुढचा प्रवास सुरू केला.  सूर्य मावळतीच्या दिशेने बराच खाली उतरला होता. त्या मावळत्या दिनकराचे फिकट होत बदलत जाणारे रंग आणि डोंगरमाथ्यांच्या गडद किंवा काळपट होत जाणाऱ्या विविध रंगांच्या छटा पहात पहात पुढे जाता जाता सूर्यास्त झाला आणि हेडलाईट्सच्या उजेडात आमची बस मार्गक्रमण करत राहिली. अखेर पहिल्या दिवसाच्या मुक्कामाचे  ठिकाण आले.

कन्नड भाषेत गांवाला ऊरु म्हणतात. आपल्याकडे जशी वडगांव, पिंपळगांव, रावळगांव वगैरे नांवे असलेली खूप गांवे आहेत, त्याचप्रमाणे कर्नाटकात हुन्नूर, बसरूर, बेलूर वगैरे नांवांची असंख्य लहान लहान गांवे आहेत. अशाच प्रकारचे बंगळूरु हे गांव महानगर झाले आणि आता कर्नाटकाची राजधानी आहे, महिषासुराचे म्हैसूर हे सुध्दा मोठे शहर आहे आणि पूर्वी कित्येक शतके या भागाची राजधानी या गांवात होती. महिषऊरु या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द घेतले तर बफेलो सिटी असे भाषांतर होईल. अमेरिकेच्या मिनिटूरमधला आमचा पहिला मुक्काम या गांवी होता.

बफेलो हे न्यूयॉर्क राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे, पण न्यूयॉर्क शहराशी तुलना करायची झाली तर मुंबई आणि कोल्हापूरमध्ये जेवढा फरक असेल तेवढा या दोन शहरांच्या आकारात आहे. शिवाय न्यूयॉर्क शहर त्या राज्याच्या दक्षिणेच्या किंवा आग्नेय दिशेच्या टोकाला अॅटलांटिक महासागराच्या किनारी आहे तर बफेलो सिटी त्याच्या बरोबर उलट दिशेच्या म्हणजे उत्तरेच्या किंवा वायव्य दिशेच्या टोकाला कॅनडाच्या सीमेवर आहे. एक सागरकिनाऱ्यावर आहे तर दुसरे डोंगराळ प्रदेशात आहे. बफेलो या गांवाचे नांव कुठल्याशा फ्रेंच शब्दांवरून पडले असे सांगतात. त्या गावातल्या रस्त्यांवर म्हैस पहायला मिळण्याची शक्यता नव्हतीच, पण कुठल्याही रस्त्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्यात डुंबणारी एकसुध्दा म्हैस दिसली नाही, तसेच गांवाबाहेर म्हशींचे गोठे किंवा तबेले कांही दिसले नाहीत. किंबहुना अमेरिकेत म्हैस आणि रेडे हे पाळीव पशु असावेत असे वाटतच नाही. तिथल्या मुक्कामात निरनिराळे टक्के स्निग्धांश असलेले दुधाचे सारे नमूने चाखून पाहिले, पण आपल्याकडच्या म्हशीच्या सकस दुधाची सर त्यातल्या एकालाही आली नाही.

बफेलोला पोचल्यावर क्षुधाशांतीसाठी एका खूप प्रशस्त अशा चायनीज हॉटेलात नेले गेले. अमेरिकेतल्या बाजारभावांचा विचार करता अगदी क्षुल्लक दरात पोटभर इच्छाभोजनाची सोय तिथे होती. तीनचार लांबलचक टेबलांवर प्रत्येकी दहा तरी वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवले होते. मक्याच्या पिठाच्या घोळात शिजवलेल्या दोन तीन भाज्या आणि उकडलेले बटाटे किंवा पांढरा भात असे मोजके पदार्थ सोडले तर इतर सर्वकांही सामिष होते. चिनी लोक त्यांच्या घरात उंदीर, पाली, झुरळे वगैरे खातात असे ऐकले असले तरी निदान इतरांना किळस येऊ नये म्हणून तरी त्याचे सार्वजनिक प्रदर्शन करत नाहीत.  बेडूक, खेकडे आणि शिंपल्यातले किडे यांच्या कांही पाकसिध्दी होत्या, त्या कणभर चाखूनही पाहिल्या, पण त्यांचे एवढे कौतुक कशासाठी करतात हे समजले नाही. त्यामुळे चिकन आणि प्रॉन्सयुक्त नूड्ल्स आणि फ्राईडराइसच्या ओळखीच्या तऱ्हा खाणे इष्ट वाटले. कसले तरी सूप होते, त्याचे नांव लक्षात राहिले नाही, पण त्याची चंव अप्रतिम होती.

बफेलो शहरापासून नायगरा धबधबा अगदी जवळ आहे, पण सहस्रद्वीपांपासून बफेलोपर्यंत जाण्याच्या रस्त्यातून आम्हाला त्याची दुरून झलकसुध्दा दिसली नाही. रात्रीच्या वेळी लेजरच्या रंगीबेरंगी झोतातून त्यावर खूप छान रोषणाई करतात असे ऐकले होते. दुसरे दिवशी मुक्कामाला वेगळ्या गांवी जायचे असल्यामुळे आम्हाला ती पहायला मिळणार नव्हती. बारा वर्षांपूर्वी मी कॅनडाच्या बाजूने नायगराचा धबधबा रात्री पाहिला होता, पण त्यातले आता एवढे आठवत नव्हते. शिवाय बारा वर्षात त्यात केवढी तरी प्रगती झाली असणार! आमच्यासोबत आलेली बाकीची मंडळी पहिल्यांदाच या जागी येत होती. धबधब्यावरची ही रोषणाई पहायला रात्री टॅक्सीने पटकन जाऊन यावे अशी एक कल्पना डोक्यात आली. पण परदेशात अशी व्यवस्था करण्यासाठी काय करावे लागते, त्याला किती खर्च येईल आणि त्यातून काय पदरात पडेल यातल्या कशाचीच नीट कल्पना नव्हती. शिवाय दुसरे दिवशी पहाटे लवकर उठावे लागले होते, दुपारी वामकुक्षीही घेतली नव्हती आणि दिवसभर बसमधून फिरलो असलो तरी त्यातून शरीराची दमणूक झाली होती. त्यामुळे हॉटेलवर जाऊन आपली खोली ताब्यात घेण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर आधी गादीवर पडावेसे वाटले आणि गादीला पाठ टेकताच क्षणार्धात निद्राधीन झालो.
--------------
                            -------- पुढील भाग दुसरा दिवस
   

Monday, September 28, 2009

नवरात्र


मागच्या वर्षी मी नवरात्रात अमेरिकेतली कांही प्रेक्षणीय ठिकाणे पहाण्याच्या दौ-यावर होतो. त्यामुळे त्या काळात ब्लॉगवरून सुटी घेतली होती. एकदा नवरात्राचा उत्सव या ब्लॉगवर साजरा करायचा विचार तेंव्हा मनात घोळू लागला होता. घटस्थापनेच्या सुमाराला त्याची आठवण झाली. पण नक्की काय लिहायचे हे ठरले नव्हते. माहिती गोळा करायला सुरुवात केल्यानंतर ती सहजपणे मिळत गेली. पण तिचे संकलन करून आपल्या शब्दात ती मांडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे त्यातली कांही माहिती निवडून नऊ दिवस रोज देत गेलो. त्याचबरोबर कांही पारंपरिक, कांही लोकप्रिय आणि कांही मला खूप आवडलेली गीतेसुध्दा रोज एक एक करून देत गेलो. वेळ आणि जागा यांच्या मर्यादा पाहता या वर्षी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि दोन प्रसिध्द देवस्थानांची माहिती दिली. याखेरीज कितीतरी स्थाने शिल्लक राहिली. मुंबईतच मुंबादेवी, काळबादेवी वगैरे जुनी आणि वॉर्डन रोडवरील समुद्रकिना-यावरील अत्यंत लोकप्रिय महालक्ष्मी वगैरे महत्वाची देवस्थाने आहेत. त्याशिवाय कल्याणची दुर्गाडी देवी, विरारच्या डोंगरमाथ्यावरली देवी वगैरे पुरातन आणि लोकप्रिय देवस्थाने आपल्या जवळपासच आहेत. शेजारच्या गोव्यातली शांतादुर्गा प्रसिध्द आहे. यातल्या दोन रूपांची चित्रे वर दिली आहेत.
शिवाय महाराष्ट्राबाहेर तर वायव्येला वैष्णोदेवीपासून ईशान्येला कामाख्यादेवीपर्यंत आणि दक्षिणेला मदुराई, कन्याकुमारीपर्यंत खूप जगप्रसिध्द मंदिरे आहेत. गुजराथी आणि बंगाली समाजात नवरात्रीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा होतो. गुजराथ आणि बंगाल राज्यात तर तो गांवागांवातल्या गल्लीगल्लीत होत असतो, पण इतर राज्यातच नव्हे तर परदेशातसुध्दा ज्या ज्या ठिकाणी या समाजातल्या मंडळींची थोडी फार वस्ती आहे त्या सगळ्या ठिकाणी हा सण सार्वजनिक उत्सवाच्या रूपाने साजरा होतो. आता महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत त्याचे स्वरूप गणेशोत्सवाशी तुलना करता येण्याइतके मोठे झाले आहे. मराठी, गुजराथी वगैरे परंपरेप्रमाणे नवरात्र नऊ दिवसांचे असते आणि त्यात दस-याचा अंतर्भाव केला तर दहा दिवस होतात, बंगालातली दुर्गापूजा चार पाच दिवसच असते. उत्तर भारतीय लोक वेगळ्या प्रकारचे नवरात्र साजरे करतात. या नऊ दिवसात रोज संत तुलसीदासांच्या रामचरितमानसाचे सुरात पठण केले जाते आणि रंगमंचावर त्यातल्या प्रसंगांचे नाट्यमय सादरीकरण रामलीलेतून केले जाते. अखेर दस-याच्या संध्याकाळी गावणदहनाने त्या नवरात्रोत्सवाची अक्षरशः धडाकेबाजसांगता होते. पुढे मागे जमेल तसे सीमोल्लंघन करून या उत्सवांबद्दल लिहायची इच्छा आहे.
या लहानशा मालिकेची सांगता माझ्या आणि सगळ्यांच्याच अतीशय आवडत्या भैरवीने करीत आहे.
भवानी दयानी, महाबाकबानी ।
सुर नर मुनिजन मानी, सकल बुद ग्यानी ।
जगजननि जगजानी, महिषासुरमर्दिनी ।
ज्वालामुखी चंडी, अमरपददानी ।।

Sunday, September 27, 2009

महासरस्वती


महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली ही आदिशक्तीची तीन प्रमुख रूपे आहेत. त्यातली सरस्वती ही विद्येची देवता आहे. विद्या म्हणजे शिक्षण आणि ते म्हणजे शाळेत जाऊन परीक्षा पास होणे आणि कॉलेज शिकून पदव्या प्राप्त करणे असा संकुचित अर्थ यात अभिप्रेत नाही. जे जे कांही शिकण्यासारखे आहे ते शिकून घेणे असा विद्या या शब्दाचा व्यापक अर्थ आहे. परंपरागत समजुतीनुसार १४ विद्या आणि ६४ कलांची गणती केली होती. त्या नेमक्या कोणत्या होत्या यावर एकमत नाही आणि कालमानानुसार त्यातल्या कांही आता उपयोगाच्या राहिल्या नसतील आणि अनेक नव्या विद्या आत्मसात करणे गरजेचे झाले असेल. १४ आणि ६४ या आंकड्यांनाही फार महत्व द्यायचे कारण नाही. त्यापेक्षा विद्येची संकल्पना समजून घेणे महत्वाचे आहे.
कलाकार हा प्रतिभेचे लेणे घेऊन जन्मावा लागतो असे म्हणतात ते बव्हंशी खरे आहे. पण त्या अंगभूत कलेचा विकास करण्यासाठी विद्येचा अभ्यास करावा लागतो, किंवा विद्याध्ययनाने अंगातली कला जास्त बहराला येते. उदाहरणार्थ गोड गळा जन्मजात मिळाला तरी सूर, ताल, लय वगैरे समजून घेऊन नियमित रियाज करून तयार झालेला गायक संगीताचा उच्च दर्जाचा आविष्कार करू शकतो. चित्रकाराच्या बोटात जादू असली तरी त्याने रंगसंगतीचा पध्दतशीर अभ्यास केला आणि हातात ब्रश धरून तो कागदावर सफाईदारपणे फिरवण्याचा सराव केला तर त्यातून अप्रतिम चित्रे तयार होतात. महाविद्यालयीन संस्था चालवण्याच्या व्यावसायिक गरजेतून आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स असे ढोबळ विभाग केले गेले असले तरी विद्येच्या राज्यात कला, विज्ञान आणि व्यापार असे कप्पे नसतात. पदवीपरीक्षा देण्यासाठी ठराविक विषयांमधला ठरलेला अभ्यासक्रम शिकून घ्यावा, पण विद्या प्राप्त करण्यासाठी असे बंधनही नाही आणि ते शिक्षण पुरेसेही नसते. अंगात कलागुण असतील, विज्ञानाची आवड असेल, व्यापार करण्याचे चातुर्य असेल तर या क्षेत्राची थोडी माहिती या अभ्यासक्रमांमधून मिळते आणि त्या विषयाच्या अभ्यासाला एक दिशा मिळते. विद्याध्यनासाठी पुढचा प्रवास अखंड चालत ठेवावा राहतो.
ज्ञान आणि विद्या मिळवण्यासाठी याव्यतिरिक्त अगणित क्षेत्रे उपलब्ध आहेत आणि अनेक मार्गांनी ते प्राप्त करता येते. कोणत्याही विषयाची माहिती असणे हे ज्ञान झाले आणि त्या माहितीचा उपयोग करता येणे ही विद्या असे ढोबळ मानाने म्हणता येईल. त्यामुळे ज्ञान मिळवणे महत्वाचे असले तरी ती पहिली पायरी आहे. ते ज्ञान आत्मसात करून त्याच्या आधारे निर्णय घेता येणे, कार्य करणे वगैरे विद्या संपादन केली असल्याची लक्षणे आहेत. विद्या हे असे धन आहे की जे कधी चोरले जाऊ शकत नाही, दिल्याने कमी होत नाही वगैरे तिची महती सांगणारी सुभाषिते आहेत.
सरस्वती या अशा विद्येची देवता आहे. सरस्वतीचे पूजन करून शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा रिवाज होता. बहुतेक शाळांमध्ये सुरुवातीला सरस्वतीची प्रार्थना सामूहिक रीतीने केली जाते. तिच्या रूपाचे वर्णन या श्लोकात केले आहे.
या कुंदेंदुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा
ही गोरी पान देवी पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून श्वेत रंगाच्याच कमळावर आसनस्थ आहे. ( शुभ्र रंग निर्मळता दर्शवतो) तिने आपल्या हातात वीणा धारण केली आहे, (कोठलेही शस्त्र नाही.) ब्रह्मा, विष्णू, महेश यांसह सर्व देव नेहमी तिला वंदन करतात. बुध्दीमधील जडत्वाचे निःशेष निर्मूलन करणारी ही सरस्वती देवी मला प्रसन्न होवो अशी प्रार्थना या श्लोकात केली आहे. सरस्वतीमातेचे असेच सुंदर, सालस आणि तेजस्वी रूप राजा रवीवर्मा यांनी वरील चित्रात रंगवले आहे. (फक्त ती कमळावर बसलेली नाही.) रंगीबेरंगी मोर हे तिचे वाहन जवळच उभे आहे. शुभ्र राजहंस हा शारदेचे वाहन आहे असे कांही ठिकाणी दाखवतात. कवयित्री शांताबाई शेळके यांनी लिहिलेली सरस्वतीची अत्यंत सुंदर आणि प्रसिध्द स्तुती खाली देत आहे.
जय शारदे वागीश्वरी ।
विधिकन्यके विद्याधरी ।।

उजळो तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा ।
तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षु दे अमुच्या शिरी ।।
वीणेवरी फिरता तुझी, चतुरा कलामय अंगुली ।
संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली ।
उन्मेष कल्प तरुवरी, डवरुन आल्या मंजिरी ।।
शास्त्रे तुला वश सर्वही, विद्या, कला वा संस्कृती ।
स्पर्शामुळे तव देवते, साकारती रुचिराकृती ।
लावण्य काही आगळे, भरले दिसे विश्वान्तरी ।।

Saturday, September 26, 2009

महालक्ष्मी


सगळ्या लोकांच्या घरात असते त्याप्रमाणे आमच्या घरातल्या देव्हा-यातसुध्दा अन्नपूर्णेची मूर्ती होती, तिला सगळे अंबाबाई म्हणत. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होत असे तेंव्हा कमळातल्या लक्ष्मीचे चित्र असलेले नाणे बाहेर काढून घासून पुसून लख्ख करून पूजेसाठी चौरंगावरील तबकात ठेवले जात असे. पाठीमागे गजांतलक्ष्मीचे सुबक चित्र उभे केलेले असे. क्षीरसागरामध्ये शेषशयन करत असलेल्या विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसली असल्याचे चित्र पाहिले होते आणि समुद्रमंथनामध्ये निघालेल्या लक्ष्मीकौस्तुभपारिजातक वगैरे चौदा रत्नांच्या यादीत पहिलेच नाव लक्ष्मीचे होते. त्याशिवाय कोणाच्या 'घरात लक्ष्मी पाणी भरते आहे' किंवा कोणाचा जोडा 'लक्ष्मीनारायणासारखा आहे' अशासारख्या वाक्प्रचारात तिचा उल्लेख होत असे. लक्ष्मीची कधी द्विभुज, कधी चतुर्भुज तर कधी अष्टभुज अशी निरनिराळी रूपे पहायला मिळत होती. त्यातल्या महालक्ष्मी या नांवाभोवती एक प्रकारचे गूढ वलय असायचे. नवरात्रातल्या अष्टमीच्या रात्री कोणाच्या तरी घरी महालक्ष्मीची पूजा असायची. तिला घरातला बहुतेक स्त्रीवर्ग आवर्जून जात असे. एरवी कुठल्याही देवळात जातांना त्या देवाच्या पाया पडण्यासाठी लहान मुलांना बरोबर नेत असत, पण महालक्ष्मीच्या या पूजेला जातांना मात्र त्यांना घरीच ठेवून जात. त्या रात्री कोणाकोणाच्या अंगात किती आले, तिने कोणकोणते दृष्टांत आणि चमत्कार दाखवले वगैरेवर त्यानंतर खूप चर्चा रंगत असत. मुलांना त्या चर्चेत सहभाग घ्यायला बंदी असली तरी मोठ्यांचे बोलणे त्यांच्या कानावर पडायचेच. खरे तर ती मोठ्यांचे बोलणे जास्तच लक्षपूर्वक ऐकत असतात. मला हा सगळा प्रकार अगम्य वाटायचा आणि विशेषतः एरवी ज्या महिलांच्या वागणुकीबद्दल फारसे चांगले मत नसायचे त्यांची निवड अंगात येण्यासाठी ही देवी कशाला करेल असा प्रश्न मनात आला तरी तो विचारणे हा अक्षम्य अपराध असे. मोठेपणी विज्ञानाचा मार्ग धरल्यानंतर आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण वगैरे वाचल्यानंतर असले प्रश्न पडेनासे झाले.

कांही लोकांच्या घरी महालक्ष्मीपूजनाची प्रथा असते. नवरात्रातील अष्टमीच्या संध्याकाळी ते महालक्ष्मीची मूर्ती तयार करतात. त्यासाठी एका लाकडाच्या ढांच्याला कापडाचे हातपाय जोडून त्याला व्यवस्थित लुगडे चोळी नेसवतात. मस्तकाच्या जागी कापडाच्या पट्ट्या घट्ट गुंडाळून त्याचे योग्य आकाराचे गाठोडे तयार केल्यावर त्यावर उकड थापून त्यात नाक डोळे वगैरे कोरून रंगवतात. त्या मूर्तीच्या अंगावर अलंकार घालतात. आजकाल हे करण्याचे कौशल्य लुप्त होत गेल्यामुळे धातूचा तयार मुखवटा बसवू लागले आहेत. महालक्ष्मीच्या त्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर कांही स्त्रिया देवीची गाणी गातात आणि इतरजणी आळीपाळीने घागरी फुंकतात. दोन्ही हातांच्या तळव्यावर एक रिकामी घागर पेलून धरून त्या गाण्याच्या तालावर घागरीत जोरजोराने फू फू करत त्या बेभान होऊन नाचत असतात. त्यांचा आवाज रिकाम्या घागरीत घुमून त्यातून एक धुंद करणारा ध्वनी निर्माण होत असतो. अंगातले सारे बळ एकवटून पुरती दमछाक होईपर्यंत चढाओढीने हा कार्यक्रम चालत राहतो. यावेळी पुरुषांना मात्र त्या ठिकाणी जाण्याला पूर्ण मज्जाव असतो. ही प्रथा कधी आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली हे मला न सुटलेले एक कोडे आहे.

हिंदू धर्मातल्या परंपरागत धारणेप्रमाणे एकाच परमेश्वराच्या ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन रूपांकडे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे वाटून दिली आहेत. ती कामे करण्याच्या परमेश्वरी शक्तीच्या तीन मुख्य रूपांना महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली अशा संज्ञा दिल्या आहेत. या तीन देवी अनुक्रमे ज्ञान, समृध्दी आणि बल यांची प्रतीके आहेत. त्यानुसार सरस्वतीच्या पूजनाने ज्ञानोपासना सुरू केली जाते आणि ज्ञानवर्धन हीच सरस्वतीची उपासना आहे असे समजले जाते. धनधान्यसंपत्ती वगैरे प्राप्त करण्याच्या हेतूने लक्ष्मीची आराधना केली जाते आणि ज्यांना ती भरपूर प्रमाणात मिळते त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे असे म्हणतात. दुष्टांचे निर्दाळन करण्यासाठी अंगात बळ मिळावे अशी प्रार्थना कालिकामातेकडे केली जाते.

त्यातील महालक्ष्मी देवीचे रूप अत्यंत सुंदर दाखवले जाते. तिच्या शांत सोज्वळ मुद्रेवर नेहमी वत्सलतेचा प्रेमळ भाव असतो. कोणालाही अशी आई मनापासून आवडेल. ती नेहमी प्रसन्न होते, कधीही कृध्द होत नाही. फार तर रुसून एकाद्यापासून दूर जाईल, पण त्याला शासन करत नाही. ही समृध्दीची देवता आहे. धर्माचरण म्हणजे वैराग्य, सर्व सुखांचा त्याग वगैरे जी कल्पना कधी कधी पसरवली जाते ती कशी चुकीची आहे हे यावरूनच स्पष्ट होते. माणसाने अती लोभ धरू नये, मोहाला पडून चुकीची गोष्ट करू नये हे बरोबरच आहे, पण चांगल्या मार्गाने अर्थार्जन किंवा धनसंचय करण्यामुळे माणूस सुखी समाधानी होईल आणि सुखी समाज सुदढ होईल. धर्माचा हाच तर उद्देश आहे. सोनेनाणे तृणवत मानणा-या संतांनीसुध्दा "जोडावे धन उत्तम वेव्हारे" अशीच शिकवण दिली आहे. लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृध्दी, वैभव वगैरे प्राप्त होते या अर्थी त्याला दैवी मान्यता आहे असाच होतो. अशा या देवीच्या अपार वैभवाचे तिच्या एका भक्ताने केलेले वर्णन खालील गीतात दिले आहे.


बसुनि पालखीत, येई मिरवीत, अंबेची स्वारी ।

चालली, जंबुलगिरी मंदिरी ।।

सोन्याची पालखी तियेला, चांदीचे दांडे ।

गाद्या गिरद्या लोड मखमली, जरतारी गोंडे ।

लोडाला टेकून बैसली, अंबा जगदीश्वरी ।।


गर्द भरजरी हिरवा शालू, चोळी बुट्टीदार ।

गोठ पाटल्या तोडे वाकी, नथ लफ्फेदार ।

तियेची, नथ लफ्फेदार ।


रत्नहार कंठात शोभतो, मुकुट मस्तकावरी ।।


वाजंत्र्यांचे ताफे घुमती, सनईचे सुस्वर ।

भक्त नाचती धिंद होऊनी, करिती जयजयकार ।

तियेचा, करिती जयजयकार ।


उदो उदो अंबे उदो उदो उदो उदो .

अंबे तुझिया उदोकारे दुमदुमली नगरी ।।

Friday, September 25, 2009

यमाई आणि योगेश्वरी


महाराष्ट्रातील आदिमायेच्या प्रमुख स्थानांमध्ये औंधची यमाई आणि अंबेजोगाईची योगेश्वरी या दोन्ही मंदिरांचा समावेश केला जातो. सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वाईजवळ औंध नांवाचे एक छोटे गांव आहे. तेथील पुरोगामी आणि कलाप्रेमी संस्थानिकांनी ब्रिटीशांच्या काळातसुध्दा चांगला नावलौकिक कमावला होता. औंधला एका टेकडीवर यमाईमातेचे सुंदर मंदिर आहे. त्याच्या जवळच श्रीभवानी म्यूजियम आहे. राजा रविवर्मा, रावबहादुर धुरंधर, पं.सातवळेकर आणि हेन्री मूर वगैरे जगप्रसिध्द कलाकारांची चित्रे आणि शिल्पकृती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.

मराठवाड्यातील अंबेजोगाई या गांवी योगेश्वरी मातेचे प्रसिध्द देवस्थान आहे. यमाईप्रमाणेच ही देवीसुध्दा अनेक मराठी कुटुंबांची कुलदेवता आहे. मध्यप्रदेशातील सरदार भुस्कुटे यांच्या ब-हाणपूर येथील वाड्यात योगेश्वरी देवीची स्थापना केली होती. त्या वाड्यातल्या दिवाणखान्यात नवरात्राचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असे. आता तेथील देवीचे स्थलांतर भुस्कुट्यांच्या टिमरनी येथील वाड्यात केले आहे. तिथेसुध्दा मोठ्या श्रध्देने नवरात्राचा उत्सव संपन्न केला जातो. रोज देवीची मंत्रोच्चारांसह साग्रसंगीत पूजा केली जाते. सायंआरतीच्या वेळी सारेजण एकत्र बसून विविध स्तोत्रे म्हणतात. त्यातले एक स्तोत्र खाली दिले आहे. आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या या अष्टकातील शब्दरचना, लयबध्दता आणि अनुप्रास मनोवेधक आहेत.


त्रिपुरसुंदरी अष्टकम् ।


कदंबवनचारिणीम् मुनिकदंबकादंबिनीम् ।

नितंबजितभूधराम् सुरनितंबिनीसेविताम् ।

नवांबुरुहलोचनाम् अभिनवांबुदश्यामलाम् ।

त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।१।।


कदंबवनवासिनीम् कनकवल्लकीधारिणीम् ।

महार्हमणिहारिणीम् सुखसमुल्लसद्वारुणीम् ।

दयाविभवकारिणीम् विशदलोचनीम् चारिणीम् ।

त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।२।।


कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया ।

कपचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया ।

मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ।

कयापि घननीलया कवचिता वयंलीलया ।।३।।


कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थिताम् .

षडंबुरुहवासिनीम् सततसिद्दसौदामिनीम् ।

विडंबितजपारुचिम् विकलचंद्रचूडामिनीम् ।

त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।४।।


कुचांचितविपंचिकाम् कुटिलकुंतलालंकृताम् ।

कुशेशयनिवासिनीम् कुटिसचित्विद्वेषिणीम् ।

मदारुणविलोचनाम् मनसिजारिसंमोहिनीम् ।

मतंगमुनिकन्यकाम् मधुरभाषिणीमाश्रये ।।५।।


स्मरप्रथमपुष्पिणीम् रुधिरबिंदुनीलांबराम् ।

गृहीतमधुपत्रिकाम् मदविघूर्णनेत्रांचलाम् ।

घनस्तनभरोन्नताम् गलितचूलिकाम् श्यामलाम् ।

त्रिलोचनकुटुंबिनीम् त्रिपुरसुंदरीमाश्रये ।।६।।


सकुंकुमविलेपिनाम् अलकचुंबिकस्तूरिकाम् ।

समंदहसितेक्षणाम् सशरचापपाशांकुशाम् ।

अशेषजनमोहिनीम् अरुणमाल्यभूषांबराम् ।

जपाकुसुमभासुराम् जपविधौ स्मराम्यंबिकाम् ।। ७।।


पुरंदरपुरन्ध्रिकाम् चिकुरबंधसैरंध्रिकाम् ।

पितामहपतिव्रताम् पटपटीरचर्चारताम् ।

मुकुंदरमणीमणीम् लसदलंक्रियाकारिणीम् ।

भजामि भुवनांबिकाम् सुरवधूटिकाचेटिकाम् ।।८।।

Thursday, September 24, 2009

सप्तशृंगी देवी जगदंबा माता


आदिमायेचे महाराष्ट्रातले चौथे शक्तीपीठ नाशिकजवळील वणी येथे सप्तशृंग नावाच्या डोंगरमाथ्यावर आहे. त्या ठिकाणी कधीकाळी सात शिखरे असावीत असा एक तर्क आहे, तर सह्याद्री पर्वताच्या सात शिखरांमधील भागाला सप्तशृंग असे म्हणत असावेत असा दुसरा तर्क आहे. पुरुषाकडून मरण निळणार नाही असा वर मिळाल्यामुळे महिषासुर दैत्य फारच माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर चढाई करून देवाधिराज इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करायला गेला. त्या तीघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. त्या वेळेस महिषासुर सप्तशृंगाच्या परिसरात होता. तिथेच जाऊन देवीने त्याचा वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केल्यामुळे तिला जगदंब हे नांव प्राप्त झाले अशी कथा आहे. महिषासुरमर्दिनीची कहाणी इतर जागी सुध्दा सांगितली जात असल्यामुळे तो नक्की कुठल्या भागात होता ते समजत नाही. कदाचित त्याच्या नावाने आजपर्यंत प्रसिध्द असलेल्या म्हैसूर इथे त्याची राजधानी असेल आणि त्याचा वध दुसरीकडे झाला असेल. सप्तशृंग पर्वत रामायणकाळातील दंडकारण्याचा भाग होता. वनवासात फिरत असतांना श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी येऊन सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले होते असे म्हणतात. ऋषी पराशर आणि मार्कंडेय यांनी या पर्वतावर तपश्चर्या केली होती अशा आख्यायिका आहेत.


तुळजापूर, कोल्हापूर आणि माहूर या तीन्ही शक्तीस्थानांपेक्षा वणी ही जागा मुंबईहून जवळ असली तरी या क्षेत्राबद्दल मी कुणाकडूनच फारसे कधी ऐकले नाही. तिथे जाऊन आलेले लोकही क्वचितच भेटले. नाशिकला गेलेले बहुतेक लोक वेळ मिळाल्यास त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन येतात, मीही आलो आहे, पण नाशिकलासुध्दा कुणीच मला वणीला जायचे सुचवले नाही. कदाचित या देवस्थानाला जाण्यासाठी खूप चढून जावे लागते म्हणून तिथे जाण्यासाठी लोक फारसे उत्सुक नसावेत.


माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई ।

सेवा मानून घे आई ।।

तू विश्वाची रचिली माया ।

तू शीतल छायेची काया ।

तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई ।।तू अमला अविनाशी कीर्ती ।

तू अवघ्या आशांची पूर्ती ।

जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई ।।तूच दिलेली मंजुळ वाणी ।

डोळ्यांमधले निर्मळ पाणी ।

तुझ्या पूजना माझ्या पदरी याविण दुसरे नाही ।।

Tuesday, September 22, 2009

रेणुका माउली


महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांमध्ये माहूर येथील रेणुका माउलीचा समावेश होतो. नांदेड जिल्ह्यात माहुरगड नांवाचा एक किल्ला आहे. इतिहासकाळात या भागाचा कारभार या ठिकाणी असलेला मोगलांचा सुभेदार पहात असे. विष्णूचा सहावा अवतार परशुराम याची आई रेणुका हिचे माहूर हे जन्मस्थान आहे असे सांगतात. परशुरामाचे पिता जमदग्नी हे अत्यंत शीघ्रकोपी ऋषी होते. रेणुका ही तितकीच सात्विक स्वभावाची होती. तिच्या सत्वशीलतेमुळे आणि पुण्याईने तिच्या अंगात विलक्षण सामर्थ्य होते. दररोज सकाळी उठून ती नदीवर जात असे. नदीच्या काठावरील वाळूपासून एक घडा तयार करून त्यात नदीचे पाणी भरत असे आणि नेमाने रोज त्या जागी येणा-या एका सापाची चुंबळ बनवून ती डोईवर ठेऊन त्यावर पाण्याने भरलेला घडा ठेऊन ती आश्रमात परत येत असे. त्या पाण्याने जमदग्नी मुनी आपले अनुष्ठान करत असत.


एकदा रेणुका रोजच्याप्रमाणे नदीवर गेली असतांना गंधर्वांचा एक समूह त्या जागी जलक्रीडा करत असलेला तिला दिसला. त्या स्त्रीपुरुषांची मौजमस्ती पाहून रेणुकेच्या मनातसुध्दा मोह उत्पन्न झाला आणि तिच्या एकाग्रतेचा भंग झाला. त्यानंतर कितीही प्रयत्न करून ती रेतीपासून घागर बनवू शकली नाही आणि तो सापसुध्दा वळवळत निघून गेला. हिरमुसली होऊन बिचारी रेणुका आश्रमात परत आली. तिला रिक्तहस्त पाहून जमदग्नी ऋषी संतापले आणि "ती सत्वहीन झाली आहे." असे म्हणत त्याने तिला मारून टाकण्याची आज्ञा आपल्या पुत्रांना केली. पहिल्या चार मुलांनी ती मानली नाही. जमदग्नीच्या रागाच्या आगीत ते भस्म होऊन गेले. त्यानंतर बाहेरून परत आलेल्या परशुरामाला त्याने तीच आज्ञा केली. परिस्थितीचे भान ठेऊन त्याने आपल्या हातातल्या परशूने त्याने रेणुकेचा शिरच्छेद केला. त्याच्या आज्ञाधारकपणावर प्रसन्न होऊन जमदग्नींनी परशुरामाला कोणताही वर मागायला सांगितले. त्यावर त्याने आपल्या भावासहित आईला पुनः जीवंत करण्याची विनंती केली. जमदग्नी ऋषींनी आपल्या तपोसामर्थ्याच्या बळावर ती पूर्ण केलीच, शिवाय रेणुकेचे नांव देवतांमध्ये गणले जाऊ लागून तिची आराधना केली जाणे सुरू झाले. आदिशक्तीच्या इतर सर्व स्थानी तिने एकाद्या असुराचा वध केल्याची कथा असते, तसे रेणुकेच्या बाबतीत नाही.


रेणुकेची ही कथा मी लहानपणापासून एका वेगळ्या संदर्भात ऐकत होतो. उत्तर कर्नाटकात ती यल्लम्मा या नांवाने ओळखली जाते. तिला वाहिलेल्या देवदासी तिची प्रतिमा डोक्यावर घेऊन दारोदार फिरत असतात. सौंदत्ती या गांवी रेणुकेचे (किंवा यल्लम्माचे) मोठे मंदिर आहे. त्या जागी असलेल्या मलप्रभा नदीच्या किनारी जमदग्नीचा आश्रम होता आणि वर दिलेली घटना तिथेच घडली असे त्या भागात सांगितले जाते. यल्लम्मा देवीच्या भक्तांची संख्या कर्नाटकांत खूप मोठी आहे. नांदेडजवळ असलेल्या माहूरच्या जवळपासही कधी जाण्याचा मला योग आला नाही, पण सौंदत्तीचे यल्लम्मागुडी मात्र लहानपणी पाहिले आहे.

रेणुकेलाच महाराष्ट्रात एकवीरा देवी असेही म्हणतात. लोणावळ्याजवळ जुन्या मुंबई पुणे रस्त्यापासून अगदी जवळ कार्ल्याची लेणी आहेत. तिथेच एकवीरा देवीचे देऊळ आहे. कोळी समाजात तिचे अनेक भक्तगण आहेत. "एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर हाय तुझी कोल्यावरी।" हे गाणे झीटीव्हीवरील सारेगमप या कार्यक्रमात खूप गाजले होते.


विष्णुदास या तिच्या भक्ताने केलेली तिची स्तुतीपर रचना खाली दिली आहे.


माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।।

जैसे वत्सालागी गाय, जैसे अनाथांची माय, माझी रेणुका ......


हाकेसरशी घाई घाई, वेगे धांवतची पायी ।

आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात, माझी रेणुका ......खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।

विष्णुदास आदराने, वाका घाली पदराने, माझी रेणुका ...

Monday, September 21, 2009

तुळजा भवानी माता

लहानपणी असंख्य वेळा गोष्टीरूपाने शिवचरित्र ऐकले होते, त्यातला भवानीमातेने शिवाजीवर प्रसन्न होऊन त्याला भवानी तलवार दिली आणि तिच्या जोरावर पराक्रम करून ते छत्रपती शिवाजी महाराज बनले, त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली वगैरे भाग मनावर ठसला होता. आमच्या गांवात भवानीमातेचे देऊळ नव्हते, ती तुळजापूरला असते एवढेच मोठ्या लोकांकडून ऐकले होते. तिचे दर्शन घेऊन आलेल्यांची संख्या माझ्या ओळखीत कमीच होती.


महाबळेश्वरला फिरायला गेलो तेंव्हा तिथल्या स्थानिक साइटसीइंग ट्रिपमध्ये प्रतापगडावर गेलो होतो. त्या ठिकाणी भवानीमातेचे देऊळ आहे. शिवाजीराजांच्या काळात तुळजापूर हे स्थान विजापूरच्या आदिलशाही अंमलाखाली असल्यामुळे तिचे दर्शन घेणे कठीण होते. शिवाय ते राज्यकर्ते तिथल्या देवस्थानाला उपद्रव देत असत. यामुळे त्यांच्या वहिवाटीपासून दूर असलेल्या दुर्गम अशा प्रतापगडावर तिच्या प्रतिमेची स्थापना महाराजांनी केली असावी. भवानीमातेने प्रतापगडावरील याच ठिकाणी शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष दर्शन देऊन भवानी तलवार दिली असे कांहीसे आमच्या वाटाड्याने सांगितले. हे मंदिर छानच वाटले. ते अनपेक्षितपणे पहायला मिळाल्यामुळे जास्तच चांगले वाटले, पण ते आरामात पहायला वेळ नव्हता. झटपट देवीचे दर्शन घेऊन लगेच पुढचा पॉइंट पहायला जायचे होते. आमच्या ग्रुपमधले पर्यटक सोडले तर इतर भाविकांची फारशी गर्दी देवळात नव्हती. कदाचित ती नेहमी दर्शन घेणा-या लोकांची येण्याची वेळ नसेल, दूरदूरहून आलेले यात्रेकरू कांही दिसले नाहीत. आम्हीही त्यावर जास्त विचार करायच्या मूडमध्ये नव्हतो.


पुढे अनेक वेळा तुळजाभवानीचा उल्लेख वाचनात आणि बोलण्यात आला, पण प्रत्यक्ष दर्शनाचा योग कांही आला नव्हता. दोन तीन वर्षांपूर्वी एकदा पुण्याहून मुलाचा अचानक फोन आला आणि त्याने वीकएंडला तुळजापूरला जाऊन यायचे ठरवले असल्याचे सांगून आम्हाला यायला जमेल कां ते विचारले. आम्ही तर एका पायावर तयार होतो. "चलो बुलावा आया है, माताने बुलाया है।" असे मनाशी म्हणत बॅगेत दोन कपडे टाकले आणि पुण्याला जाऊन दाखल झालो. सकाळी लवकर उठून आन्हिके आटोपली आणि सोलापूरच्या रस्त्याला लागलो. मी वीसपंचवीस वर्षांपूर्वी यस्टीच्या लाल डब्ब्यातून या रस्त्यावरून गेलो होतो, तेंव्हा पाहिलेले दृष्य आठवत होते, पण त्यात आता बराच फरक झाला होता. रस्ता चांगला प्रशस्त झाला होता आणि त्यावर असलेले असंख्य खळगे बुजले होते. पूर्वी मुख्यत्वे एस्टी बसगाड्या, मालगाड्या आणि जीप दिसल्या होत्या, आता आरामशीर लक्झरी कोच, वातानुकूलित टेंपो आणि कार दिसायला लागल्या होत्या. त्यांच्या वेगातही वाढ झाली असल्यामुळे फारशी गर्दी जाणवत नव्हती. जागोजागी गाड्या अडवून वसूली करणारे टोलनाके मात्र त्रासदायक वाटत होते. पूर्वी वाटेतल्या एस्टीस्टँडवर टिनाच्या टपरीत तिखटजाळ भजी खाऊन बशीत 'चा' ओतून प्यालो होतो. आता महामार्गाच्या कडेला फूडमॉल दिसत होते, कांही ढाबेसुध्दा उबे राहिले होते. चहाच्या टपरीभोवती रेंगाळणारे किंवा जमीनीवरच बसकण मारून बसलेले गांवकरी दिसत नव्हते. पागोटी आणि नऊवारी लुगडी जवळ जवळ अद्ष्य झाली होती, गांधी टोप्या आणि धोतरांची संख्या कमी होऊन जीनपँट्सची वाढली होती. मोठ्या संख्येने सलवार कमीज होत्याच, कॅप्रीसुध्दा दिसत होत्या. उजनी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय दिसला. एके काळी पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष्य असलेल्या रखरखीत दुष्काळी प्रदेशाचा अगदी कायापालट झाला नसला तरी अधून मधून हिरवळ आणि बागायतींचे दर्शन होत होते. हा बदल निश्चितच सुखद होता.


सोलापूर ओलांडून पुढे गेल्यानंतर रस्ता अरुंद झाला तरी चांगलाच होता. मध्ये थोडा खडबडीत भाग लागला तेंव्हा पेंगणारी मंडळी दचकून जागी झाली. थोड्याच वेळात तुळजापूर आलेच. गावात प्रवेश करताच कोणी मुले आली आणि त्यांनी ग्रामपंचायतीची पट्टी घेतली. पुढे पहावे तिकडे माणसांचा सागर पसरला होता. त्यात गाडी कुठे उभी करायची आणि देवळात कुठल्या बाजूने प्रवेश करायचा यातले कांहीच समजत नव्हते. तेवढ्यात गळ्याभोंवती उपरणे गुंडाळलेले एक गृहस्थ उगवले आणि "आज फार गर्दी आहे, लाइनीतून दर्शन मिळायला पाच सहा तास तरी लागतीलच" वगैरे माहिती देऊन आम्हाला शॉर्टकटने आत घेऊन जाण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. दोन लहान लेकरे आणि दोन ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेला आमचा ग्रुप तळपत्या उन्हात उभे रहाण्याचे दिव्य करायचा विचारसुध्दा करणार नाही याची त्याला खात्री होती, शिवाय खाजगी मोटारगाडीतून आलेली पार्टी गबर असणार हे त्याने गृहीत धरून अवास्तव मागणी केली. आम्ही सेलफोनवरून एका अनुभवी नातेवाइकाशी बोलणे केले आणि त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे घासाघीस करून त्याचे पॅकेज ठरवले. माणसांच्या गर्दीतूनच हाडत हुडत करीत त्याने गाडीला पुढे जाण्याची वाट करून तिला आडोशाला नेऊन उभी केली आणि एका आडवाटेने आम्हाला देवळात प्रवेश मिळवून दिला. वाटेत एका जागी एक पाण्याचा नळ होता, पण त्या ठिकाणी उघड्यावर आंघोळ करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. हातपाय धुवून चार शिंतोडे डोक्यावर उडवले आणि पुढे गेलो.

या देवीची जेवढी प्रचंड ख्याती ऐकली होती, त्या मानाने देऊळ जरा सामान्य वाटले. वास्तुशिल्पकलेच्या दृष्टीने त्यात भव्य, दिव्य असे फारसे कांही नजरेत भरले नाही. देवळात अफाट गर्दी होती. आम्हाला गाभा-याच्या जवळ रांगेत घुसवले गेले. पुढे जाऊन जेमतेम क्षणभर देवीचे दर्शन मिळाले, त्याने मनाचे पूर्ण समाधान कांही झाले नाही. आमच्या भाग्यात तेवढे तरी होते याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आम्ही पुढे आलो. देवीला वहायचा खण, नारळ, फुलांचा हार, उदबत्ती, नैवेद्य वगैरे सगळ्यांचा अंतर्भाव आमच्या पॅकेजमध्येच होता. उपरणेवाल्याने देवीचा प्रसाद, अंगारा, हळदकुंकू वगैरे आणून दिले आणि बाहेर जाण्याचा रस्ता दाखवून आमचा निरोप घेतला.


श्रीक्षेत्र तुळजापूर मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात असले तरी सोलापूर शहरापासून जास्त जवळ आहे आणि जायला सोयीचे आहे. यमुनाचल नावाच्या टेकडीच्या माथ्यावर ते वसले आहे. तिथली भवानी देवी तुरजा, त्वरजा, तुकाई वगैरे नांवानीही ओळखली जाते. महिषासुर आणि मातंग नांवांच्या राक्षसांचा तिने या जागी संहार केल्याच्या दंतकथा आहेत, पण अशाच दंतकथा आदिशक्तीच्या इतर स्थानीसुध्दा ऐकायला मिळतात. तुळजाभवानीवर श्रध्दा असणा-या भाविकांची संख्या खूप मोठी आहे हे निश्चित. तुळजाभवानीच्या उपासनेमध्ये गोँधळ या पारंपरिक लोकगीताच्या प्रकाराला मोठे महत्व आहे. असाच परंपरागत पण अलीकडच्या काळात रचलेला एक गोंधळ खाली दिला आहे.

--------------------------------------------------------------------------------------

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला

अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं !


गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ

हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संभळ

धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता

भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी

आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोधळाला ये

गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये


उधं उधं उधं उधं उधं

तुळजापूरची भवानीआली आई भवानी स्वप्नात ।

श्रीवरदा सुप्रसन्न मूर्ती,

जशी वीज चमके गगनात ।। आली आई भवानी स्वप्नात ।


सरळ भांग निज भुजंगवेणी,

काजळ ल्याली नयनात ।

रत्नजडित हार कासे पीतांबर,

कंचुकी हिरवी अंगात ।। आली आई भवानी स्वप्नात ।केशर कस्तुरी मिश्रित तांबुल,

लाल रंगला वदनात ।

कंकणी कनकांची खणखणती,

वाजती पैंजण पायात ।। आली आई भवानी स्वप्नात ।


विष्णुदास म्हणे अशी निरंतर,

दे आवडी मज भजनात ।। आली आई भवानी स्वप्नात ।

Sunday, September 20, 2009

कुलस्वामिनी अंबाबाई

कोल्हापूरची अंबाबाई


महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबाचे एक कुलदैवत असते. घरात एकादे मंगल कार्य ठरले तर त्याचे निमंत्रण सर्वात आधी त्या कुलदैवताला देऊन ते निर्विघ्न पार पाडण्याची विनंती केली जाते, तसेच कधीकधी त्यासाठी नवस बोलला जातो आणि ते कार्य यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर तो नवस फेडण्यासाठी किंवा निदान नव्या जोडप्याला पाया घालण्यासाठी पुन्हा त्या देवस्थानाची यात्रा केली जाते. माझ्या नात्यातली कांही कुटुंबे नोकरी व्यवसायासाठी पुण्यामुंबईला स्थाईक झाली असली तरी आमच्या जमखंडीजवळ असलेल्या कल्हळ्ळीच्या प्रति तिरुपती व्यंकोबाच्या किंवा मुत्तूरच्या मुत्तूरव्वा देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या घरातले कोणी ना कोणी नेहमी आमच्याकडे येत असत. कोल्हापूरची अंबाबाई ही आमची कुलदेवता आहे असे बोलले जात असे, पण हा कुळाचार मात्र नव्हता.


त्या काळात जमखंडीहून कोल्हापूरला जाणे तसे कठीणच होते. आधी बसने कुडची नांवाच्या एमएसएम रेल्वेच्या स्टेशनाला जायचे. बंगलोर किंवा हुबळीकडून येणा-या एक दोनच गाड्या त्या स्टेशनावर थांबत असत. त्यातल्या भयानक गर्दीत कसेबसे चढून मिरजेपर्यंत जायचे आणि तिथून वेगळ्या रेल्वेगाडीत बसून कोल्हापूरला जायचे. घरातल्या सगळ्या पोराबोळांना घेऊन असला तीन टप्प्यांचा प्रवास करणे अशक्यच असायचे. त्यामुळे घरात त्याचा विचारसुध्दा कधी झाला नाही. कुठल्या तरी इतर कामासाठी कोणी एकट्या दुकट्याने सांगली मिरजेकडे जाऊन आला तर जमल्यास कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन तिथले हळदकुंकू, अंगारा आणि प्रसादाचे पेढे वगैरे घेऊन येत असे. त्यांच्याकडून ऐकलेल्या रसभरीत वर्णनामुळे माझ्या मनातले कुतूहल मात्र वाढत गेले. कोल्हापूरला दक्षिण काशी असे म्हंटले जात असे. हिंदू धर्मीयांचे सर्वात महत्वाचे तीर्थक्षेत्र काशी मानले जाई. तिथे गेल्याचे पुण्य कोल्हापूरला जाण्याने मिळते अशी अनेकांची श्रध्दा असे. त्या काळात काशी रामेश्वराची यात्रा तर जवळ जवळ अशक्यप्राय असल्यामुळे आयुष्यात कधी तरी कोल्हापूरला जाणे घडले तर लोकांना प्रचंड आनंद होत असे. तिथल्या महालक्ष्मीच्या देवळाला अगणित खांब आहेत. एकदा कोणी तरी ते मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो आंधळा होऊन गेला. अशा प्रकारच्या दंतकथासुध्दा त्यावेळी प्रचलित होत्या आणि त्यावर विश्वास असल्यामुळे कोल्हापूरला गेलात तर तेवढे मात्र करू नका अशा सूचना तिथे जाणा-यांना दिल्या जात असत.


लहानपणी मोठ्या माणसांच्या बरोबर कोल्हापूरला जाण्याचा योग कांही मला आला नाही, पण मनातली इच्छा मात्र तीव्र होत गेली. त्यामुळे मुंबईला वेगळा संसार थाटल्यानंतर आम्हीच कोल्हापूरची यात्रा केली, खणानारळाने देवीची ओटी भरली, पेढ्यांचा नैवेद्य दाखवला, श्लोक आणि स्तोत्रे म्हंटली आणि जेवढे कांही करायचे असते असे ऐकले होते ते करून घेतले. मंदिराची पुराणकालीन हेमाडपंती वास्तू मात्र तिच्याबद्दल जेवढे ऐकले होते त्याच्या अनेकपटीने भव्य आणि आकर्षक वाटली. तोपर्यंत मी इतके मोठे आणि कलाकुसरीने सजवलेले दुसरे कोणते देऊळ पाहिलेच नव्हते. त्यानंतरच्या काळात मी जगभरातली अनेक प्रसिध्द मंदिरे पाहिली असली तरी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या आवारात गेल्यानंतर एक वेगळीच प्रसन्नता वाटते. देवीच्या दर्शनाचे सुखसुध्दा अनुपम असते. देवाच्या मूर्तीविषयी बोलतांना सौंदर्यशास्त्र किंवा तिचा पेहराव, अंगावरले दागिने वगैरेचा विचार करण्याची पध्दत नाही, पण आपल्या नकळत त्याची छाप मनावर पडत असते आणि या सगळ्या निकषांवरसुध्दा अंबाबाईची मूर्ती छानच वाटते. तिच्याकडे पहात रहावे असेच वाटत राहते.


नंतर पुढील आयुष्यात अनेक वेळा कोल्हापूरला जाण्याचा योग आला. सांगली मिरजेच्या बाजूला गेल्यास कोल्हापूरला जाऊन येण्याची परंपरा मी कायम ठेवली. त्यामुळे नरसोबाची वाडी किंवा किर्लोस्करवाडीला कांही कामानिमित्य गेलो तर परतीच्या वाटेवर कोल्हापूर होऊन जात असे. देवाच्या किंवा देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी दिवसातल्या अमूक वेळेलाच जायचे असली बंधने पाळायची मला गरज वाटत नसल्यामुळे बहुतेक वेळी मी सगळी कामे आटोपून संध्याकाळीच तिथे पोचत असे आणि रात्री उशीरा निघणारी बस घेऊन परतत असे. त्याशिवाय मुद्दाम कोल्हापूरलाच महालक्ष्मी एक्सप्रेसनेही जाणे झाले. आता तर एनएच ४ हा हमरस्ता इतका चांगला झाला आहे की गेल्या वेळी आम्ही फक्त चार तासांत कोल्हापूरहून पुण्याला पोचलो.


कोल्हासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी महालक्ष्मीने हा अवतार धारण केला अशी कथा आहे आणि ती त्यानंतर इथेच वास्तव्य करून राहिली अशी श्रध्दा आहे. या ठिकाणी बांधलेले मूळ मंदिर खूप प्राचीन काळापासून या जागी आहे. त्याचे कांही भाग सातव्या किंवा दहाव्या दशकात बांधलेले असावेत असे तज्ज्ञांना वाटते. पंचगंगा नदीच्या काठी वसलेल्या कोल्हापूर गांवाला मराठी साम्राज्याच्या काळात महत्व प्राप्त झाले. त्या काळात मंदिराचा अधिक विस्तार करण्यात आला. कलाकुसर केलेल्या अनेक चौकोनी उभ्या दगडी खांबांवर आडव्या शिळा ठेऊन त्याचे छत तयार केले आहे. त्यांना जोडणारे चुनागच्चाचे काम कोठे दिसत नाही. लाकडाच्या तुळया वगैरेही नाहीत. लाकूडकाम आहे ते चौकटी, दरवाजे, कमानी वगैरेंपुरतेच आहे. गाभा-यावरील शिखर मात्र विटांचा वापर करून वेगळ्या तंत्राने बांधले आहे. मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे, त्याला महाद्वार म्हणतात. आत गेल्यानंतर अनेक दीपमाळा दिसतात. मंदिरासमोर गरुडध्वजाचा उंच खांब आहे. देवळाच्या सभोवार प्रशस्त असे प्रांगण आहे. ते नेहमीच भाविकांनी भरलेले दिसते. महालक्ष्मीशिवाय तिच्या आजूबाजूला महाकाली आणि महासरस्वती आहेत, तसेच इतर अनेक देवतांच्या मूर्ती या परिसरात आहेत. मंदिराची रचना अशी केली आहे की वर्षातल्या विशिष्ट दिवशी मावळणा-या सूर्याचे किरण थेट महालक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत येतात. प्रत्यक्ष सूर्यनारायण त्यावेळी तिच्या दर्शनाला येतो असे मानले जाते.


ब्रिटीशांच्या काळात कोल्हापूरच्या पुरोगामी संस्थानिकांनी अनेक समाजोन्मुख कामे करून या शहराला आघाडीवर आणले आणि ते पुणे बंगलोर महामार्गावर असल्यामुळे त्याला व्यापारी क्षेत्रात महत्व प्राप्त झाले. यंत्रयुगाचा काळ आल्यानंतर अनेक लहान आणि मध्यम आकाराचे कारखाने या भागात उभे राहिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराला येणा-या लोकांची संख्या वाढली आणि तिथे गेलेला माणूस बहुधा अंबाबाईचे दर्शन घ्यायला जातोच.
या मंदिराचा इतिहास आणि अधिक माहिती इथे दिली आहे.

-------------------------------------------------------------------

अंबे हासत ये, अंबे नाचत ये । फुलांचा झेला झेलत ये ।।

पायीचे पैंजण वाजवत ये ।

भक्तांच्या मेळ्यासाठी धांवत ये, अंबे हासत ये ।।


गोंधळ गोंधळ गोंधळ घालिते ।

आईचा जोगवा जोगवा मागिते ।।

काम क्रोध हे, क्रोध हे, क्रोध महिषासूर ।

आईने मर्दुनी, मर्दुनी, मर्दुनि केले चूर ।

सत्वगुणाची, गुणाची, गुणाची तलवार ।

गोंधळ गोंधळ गोंधळ घालीते ।। आईचा जोगवा जोगवा मागिते ।।


सूक्ष्म स्थळीच, स्थळीच, स्थळी आईचं हो देणं ।

अंबा भवानी, भवानी, तेथे तूझं ठाणं ।

चैतन्य स्वरूपी, स्वरूपी, होता नित्य लीन ।

गोंधळ गोंधळ गोंधळ घालीते ।। आईचा जोगवा जोगवा मागिते ।।

Saturday, September 19, 2009

घटस्थापना - आई अंबाबाईचा गोंधळआज घटस्थापनेप्रीत्यर्थ आई अंबाबाईच्या चरणी लक्ष प्रणाम . एक गोंधळ या दिवशी देत आहे.

आई उदे ग अंबे उदे, उदे
आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई । गुणगान लेकरू गायी ।।
आई उदे ग अंबाबाई ।।
तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये।
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये।
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये।
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये।
गुणगान लेकरू गायी।
आई उदे ग अंबाबाई ।।
आईची मूर्ति स्वयंभुवरि शोभली, सिंव्हावरी साजरी।
सिंव्हावरी साजरी, हिऱ्यांचा किरिट घातला शिरी।
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी।
आई उदे ग अंबे उदे, उदे।
गुणगान लेकरू गायी ।आई उदे ग अंबाबाई ।।
आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा।
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई।
आई उदे ग अंबाबाई।
गुणगान लेकरू गायी।
आई उदे ग अंबाबाई ।।
शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये।
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये।
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये।
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये।
गुणगान लेकरू गायी।आई उदे ग अंबाबाई ।।

Wednesday, September 16, 2009

न्यूयॉर्कची सफर - ५


नील आर्मस्ट्राँग आणि एड्विन आल्ड्रिन जेंव्हा चंद्रावर जाऊन उतरले होते त्यावेळी त्यांचे साथीदार एका यानातून चंद्राभोवती घिरट्या घालत होते. दोघा चांद्रवीरांनी चंद्रावरचे काम आटोपल्यानंतर ते या यानात परत गेले आणि त्यातून पृथ्वीवर परतले. त्याचप्रमाणे आम्हा पाहुण्यांना लिबर्टी आयलंडवर पाठवून सौरभ आणि सुप्रिया न्यूयॉर्क शहरात भटकंती करत होते आणि आम्ही त्यांचेबरोबर मोबाईलवर संपर्क साधून होतो. त्यामुळे एलिस आयलंड पाहून आम्ही परत येईतोपर्यंत ते आमच्या स्वागतासाठी बॅटरी पार्कमध्ये येऊन पोचले होते. दिवस मावळण्यापूर्वी न्यूयॉर्क शहराचे अवलोकन करण्यासाठी दीड दोन तास वेळ होता. त्या वेळात न्यूयॉर्कच्या हृदयात (हार्ट ऑफ दि सिटी) मध्ये पायी पायी फिरत राहिलो. रविवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे कामासाठी त्या भागात येणा-या लोकांची वर्दळ नव्हती. हा अनुभव आपल्याला मुंबईच्या फोर्टमध्येसुध्दा रविवारी फिरतांना येतो. हंसतखिदळत गटागटाने पायी चालणारे बहुतेक लोक पर्यटकच असावेत आणि न्यूयॉर्कचा अजूबा डोळेभर पाहून थक्क होण्यासाठीच तिथे आले असावेत हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट होत होते. त्यातले निदान निम्मे तरी चिनी किंवा भारतीय वंशाचे आशियाई होते.
मॅनहॅटन म्हणजे दाटीवाटीने उभ्या असलेल्या उंचच उंच गगनचुंबी इमारतींची भाऊगर्दी हे चित्र मी लहानपणापासून पहात आलो होतो आणि अनेक इंग्रजी सिनेमात पाहिले होते. कफपरेड आणि नरीमन पॉइंटला उभ्या असलेल्या त्याच्या संक्षिप्त आवृत्त्या पाहिल्या होत्या. तरीसुध्दा न्यूयॉर्कला प्रत्यक्ष गेल्यावर तिथे आजूबाजूला दिसलेले काँक्रीटच्या जंगलाचे दृष्य विस्मयचकित करणारेच होते. फिरतांना डोक्यावर टोपी किंवा कॅप घातली असती तर ती एका हाताने धरूनच ठेवावी लागली असती. फिरत फिरत ज्या जागी एके काळी वर्ल्ड ट्रेड टॉवर्स उभे होते त्या जागी गेलो. ती रिकामी जागा पाहून ११ सप्टेंबरची आठवण जागी झाली. जवळ जवळ उभ्या असलेल्या त्या उंच इमारती छायाचित्रात पाहून जर त्यातली एक इमारत बाजूला कलंडली तर स्टँडवर एकाला लागून एक उभ्या केलेल्या सायकली पडत जातात त्याप्रमाणे ओळीने त्या इमारती कोसळत जातील असे मला वाटायचे. उभा केलेला खांब त्याला बाजूने धक्का दिल्यास आडवा होतो त्याचप्रमाणे समुद्रावरून येऊन विमानाने आडवी धडक दिल्यास ११० मजल्यांच्या या उत्तुंग इमारती मागच्या बाजूच्या उंच इमारतींना पाडत जातील असे कदाचित हे कृत्य करणा-या आत्मघातकी अतिरेक्यांनासुध्दा वाटले असेल. पण ११ सप्टेंबरला वर्ल्ड ट्रेड टॉवर्सचे दोन मनोरे कोसळून जागच्या जागीच त्यांचे ढिगारे झाले हे पाहून आधी तर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. पण पुढे तीच चित्रे पुनःपुन्हा दिसत राहिली आणि स्मरणात कोरली गेली. तो धक्का आणि ढिगाराच प्रचंड असल्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आवारातल्या इतर इमारती तेवढ्या जमीनदोस्त झाल्या. न्यूयॉर्कला गेल्यावर त्या जागी मोकळी जागा पहात होतो. नव्या बांधकामाला सुरुवात झाल्याच्या खुणा दिसत होत्या. लवकरच त्या जागी पहिल्याहून अधिक भव्य आणि देखण्या गगनचुंबी इमारती उभ्या राहतील आणि माणसांनी गजबजून जातील. गतस्मृतींना ताज्या ठेवण्यासाठी ११ सप्टेंबरचे एक स्मारक देखील बांधण्यात येत आहे. अर्थातच त्याचेसुध्दा व्यापारीकरण होऊन त्यातून गडगंज माया निर्माण केली जाईल हे ओघाने आलेच.
तिथून आम्ही फिरत फिरत अमेरिकन कुबेरांच्या राजवाड्याच्या भागात आलो. न्यूयॉर्कच्या या लहानशा भागातून अमेरिकेचीच नव्हे तर सगळ्या जगाची आर्थिक सूत्रे हलवली जातात असे समजले जाते. वॉल स्ट्रीटवरील बाजारात समभागांचे भाव वधारले किंवा कोसळले तर त्याचा परिणाम टोक्योपासून लंडनपर्यंत मुंबईसकट सगळ्या शेअरबाजारांवर होतो. मध्यंतरीच्या काळात अमेरिकन बँकांनी आपला व्यवसायाचा व्याप वाढवण्याच्या उद्देशाने घराच्या तारणावर भरमसाट कर्जे वाटण्याचा सपाटा चालवला होता. सुलभरीत्या मिळालेल्या कर्जामधून कोणीही घर विकत घ्यावे, याच कारणाने मागणी वाढल्यामुळे त्याची किंमत वाढली की त्या तारणावर जास्त कर्ज मिळायचे. अशा रीतीने घरांच्या किंमती आणि त्यासाठी होणारा कर्जपुरवठा या दोन्ही गोष्टी आभाळाळा भिडू लागल्या होत्या. पण हा फुगा केंव्हाही फुटण्याच्या तयारीत होता. कांही लोकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरणे आर्थिक मंदीमुळे कठीण होऊ लागले. घरांच्या किंमतीत सतत होणारी वाढ पाहून यापासून अनार्जित धनार्जन करण्याचा विचार अनेकांनी केला होता. त्यांना ते कर्ज हप्त्याहप्त्याने फेडायचे नव्हतेच, थोड्या दिवसांनी ते घर विकून त्यापासून फायदा मिळवण्याच्या इराद्याने त्यांनी कर्ज काढून त्याची खरेदी केली होती. पण आता त्यांनी विकायला काढलेल्या घरांना जास्त किंमत देणारे गि-हाईक मिळेनासे झाले. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळे घरांच्या किंमती आणखी खाली आल्या. त्याचा परिणाम गहाण ठेवलेल्या तारणाची किंमत कमी होण्यात झाला आणि गहाण ठेवलेल्या घराचा लिलाव करून त्यातून कर्जाची रक्कम मिळणे अशक्य झाले.. एकाद्याची पैशाची व्यवस्था होऊ शकत असेल तरी ते पैसे बँकेत भरून आपले घर सोडवून घेण्यापेक्षा तेवढ्याच पैशात दुसरीकडे जास्त चांगली जागा विकत घेणे शक्य झाले. दिलेले कर्ज वसूल न होऊ शकल्यामुळे बँका अडचणीत सापडल्या. त्यामुळे बँकांच्या ठेवीदारांनी आपले पैसे काढून घ्यायला सुरुवात केल्यानंतर तर त्यांना दिवाळखोरीतच जावे लागले. त्यामुळे इतर क्षेत्रांना मिळणारा अर्थपुरवठा कमी झाला. यावर उपाय म्हणून अमेरिकन सरकारने अनेक पॅकेजेस आणली तरीसुध्दा याचा फटका भारतासकट जगभरातल्या अर्थकारणाला बसलाच.
न्यूयॉर्कच्या फायनॅन्स डिस्ट्रिक्टध्ये फिरतांना या गोष्टी आठवणारच. या बाबतीतले अनेक निर्णय त्या भागातील उंच इमारतींमधील ऑफीसांच्या बंद खलबतखान्यात घेतले असतील, पण तशी पुसटशी जाणीवसुध्दा रस्त्याच्या फूटपाथवरून चालतांना येणे शक्य नव्हते. या भागात कांही उत्तुंग गगनचुंबी अवाढव्य इमारती आहेत, त्याचप्रमाणे जुन्या काळातील युरोपियन वास्तुशिल्पाची आठवण करून देणा-या कमानी आणि खांब वगैरेंनी नटलेल्या भव्य वास्तूसुध्दा आहेत. त्यांच्या दर्शनी भागात विविध प्रकारचे पुतळेही उभे केलेले आहेत. वॉल स्ट्रीटवर येताच एका जागी पर्यटकांची तोबा गर्दी उडालेली दिसली. जवळ जाऊन पहाता तिथल्या अवाढव्य आकाराच्या वळूच्या पुतळ्याभोंवती सगळे जमलेले होते. अमेरिकेतली गुरे पहाण्याचे भाग्य काही मला लाभले नाही, पण भारतात पाहिलेल्या सर्वात आडदांड खोंडाच्या मानाने तो निदान दीडपटीने तरी मोठा होता. मान खाली घालून, पण डोळे वटारून पहात समोरच्याला ढुशी मारण्याच्या किंवा कोणी अंगावर चालून आलाच तर त्याला सरळ शिंगावर घेण्याच्या पवित्र्यात तो शेपूट उभारून जय्यत तयारीत खडा आहे. त्याच्या नजरेतला बेदरकार आक्रमक भाव आणि अंगाप्रत्यंगातले सौष्ठव पहात राहण्याजोगे आहे. पण तिथल्या गर्दीतल्या कोणाला त्याचे रसग्रहण करावे असे वाटतांना दिसले नाही. त्यातला जो तो त्याच्यासोबत आपला फोटो काढून घेण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी जशी जिथे जागा सापडेल तिथे त्याला रेलून किंवा त्याच्या समोर उभे राहून ते आपली छायाचित्रे काढून घेत होते. कोणी त्याच्या पाठीवर हात ठेवून उभा होता, तर कोणी त्याचे एक शिंग हातात धरले होते, कोणी हात उंच करून त्याचे शेपूट पकडायला पहात होता तर आणखी कोणी त्याच्या पायांमध्ये बसून आणखी काही कुरवाळत होता. त्या प्रवाशांची हौसेची व्याख्या पाहून मला हंसू आवरत नव्हते.
तिथून हिंडत हिंडत आम्ही टाइम्स स्क्वेअरमध्ये आलो तोंपर्यंत अंधार झाला होता, पण असंख्य रंगीबेरंगी निऑनच्या दिव्यांतून बनवलेल्या प्रचंड जाहिरातींनी तो सारा परिसर झगमगत होता. इतक्या जाहिराती एकत्र पाहिल्यावर त्यातली कोणती लक्षात राहील आणि ती कोणाच्या नजरेत भरलीच नाही तर ती देऊन काय फायदा असा प्रश्न पडतो. रोजच्या वर्तमानपत्रातली जाहिरातींनी भरलेली पाने न उघडताच आपण बाजूला करतो, त्याचप्रमाणे रोज तिथून येजा करणारे लोक मान वर करून या जाहिराती पहाण्याचा आणि पाहिल्यानंतर त्या वाचण्याचा प्रयत्न करतील असे वाटत नाही. आम्हाला मात्र हे दृष्य नवे असल्याने आम्ही त्या कौतुकाने पहात होतो आणि त्यात आकर्षक असे नवीन काही आढळले तर ते एकमेकांना दाखवत होतो. त्यातली कुठलीच वस्तू किंवा सेवा आम्हाला विकत घ्यायची नसल्यामुळे त्या जाहिरातीचा परिणाम शून्य एवढाच होता. आम्ही फक्त त्या पाहून त्यातल्या कलाकौशल्याचा आस्वाद घेत होतो.
न्यूयॉर्कमधील कांही ठळक गोष्टी पाहून झाल्या होत्या आणि सकाळपासून केलेल्या पायपिटीमुळे पायाचे स्नायू कुरकुर करू लागले होते. त्यामुळे आम्ही "आजचा दिवस छान गेला" असे म्हणत त्या दिवसाचा दौरा आटोपता घेतला आणि पोर्ट ऑथॉरिटी बस स्टेशनमार्गे पार्सीपेनीला परत गेलो. दुसरे दिवशी पुन्हा आम्हाला त्या भागात मार्गदर्शकाविना यायचे असल्यामुळे वाटेवरल्या महत्वाच्या जागा यावेळी नीटपणे पाहून घेतल्या.

Sunday, September 13, 2009

न्यूयॉर्कची सफर - ४ एलिस द्वीप


स्वातंत्र्यदेवतेच्या भव्य आणि सुंदर प्रतिमेचे सर्व बाजूंनी मनसोक्त अवलोकन करून घेतले. तिच्या स्मरणिका विकत घेतल्या, जिकडे तिकडे चोहिकडे आनंदीआनंदाने भारलेल्या वातावरणात कांही काळ स्वतःला डुंबून घेतले आणि मनसोक्त पेटपूजाही झाली. त्यानंतर परतीच्या प्रवासासाठी आम्ही जेटीवर परत आलो. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीला जाण्यासाठी तिथे दोन वेगवेगळ्या रांगा होत्या. आम्ही न्यूजर्सीहून आलो असलो तरी न्यूयॉर्कमार्गे आलो होतो. त्यामुळे तिथेच परत जाणे आवश्यक होते म्हणून न्यूयॉर्कच्या रांगेत उभे राहिलो. थोड्याच वेळात आमची बोट आली. क्षुधाशांती झालेली असल्यामुळे अंगात सुस्ती आली होती आणि आता आजूबाजूला पहाण्यासारखे फारसे उरले नव्हते. खुर्च्यांवर बसकण मारून गप्पा मारत राहिलो. बोट सुटल्यानंतर पाचसहा मिनिटांमध्येच किना-याला लागली. "इथे ज्यांना उतरावयाचे असेल त्यांनी उतरून घ्यावे" अशा अर्थाची कसली तरी सूचना अर्धवट ऐकली आणि तिचा त्याहून कमी बोध झाला. येतांना न्यूयॉर्कहून निघून आम्ही थेट लिबर्टी आयलंडलाच पोचलो होतो. मध्ये कुठला थांबाच नव्हता. त्यामुळे "परत जातांना आपली उतरावयाची जागा किती पटकन आली" असे म्हणत आम्ही उभे राहिलो. बोटीतले जवळजवळ सर्वच पर्यटक खाली उतरत असल्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही सुध्दा पायउतार झालो. तो स्टॉप पहिल्यापेक्षा थोडासा वेगळा वाटत असला तरी ते एवढ्या तीव्रतेने जाणवले नाही, पण किना-यावरल्या इमारती पहाता त्या फारच वेगळ्या दिसत होत्या. आपण भलत्याच जागी उतरलो आहोत याची खात्री पटली. पण तोपर्यंत आमची बोट पुढे चालली गेली होती. मुकाट्याने इतर उतारूंच्या पाठोपाठ चालत गेलो. हे एलिस आयलंड नांवाचे वेगळे बेट आहे आणि या जागेला भेट देण्याचा सहभाग आमच्या तिकीटात आहे असे थोडी चौकशी केल्यावर समजले.
एकादी मोठी नदी समुद्राला मिळते त्या जागी तिच्या प्रवाहाचे अनेक भाग होतात आणि वेगवेगळ्या वाटांनी जाऊन समुद्राला मिळतात. त्यामुळे त्या भागात पंख्याच्या आकाराचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी या प्रवाहांत शिरून जमीनीची झीज घडवते आणि तिथली दगडमाती ओढून नेते. यातून अनेक लहान लहान खाड्यांचे जाळे तयार होते, तसेच सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले अनेक लहान लहान भूभाग तयार होतात. अशा बेटांच्या आडोशाला बोट उभी केली तर त्याला समुद्रातील लाटा आणि तुफानी वारे यापासून थोडे संरक्षण मिळते. न्यूयॉर्क हे हडसन नदीच्या मुखापाशी अशाच प्रकारे तयार झालेले एक नैसर्गिक बंदर आहे. तिथल्या समुद्रात अनेक लहान लहान बेटे आहेत. त्यातल्याच एका बेटावर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा केला आहे. त्या बेटापासून जवळच हे एलिस बेट आहे. न्यूयॉर्क बंदरावर तैनात असलेल्या सैनिकांकडेच या सगळ्या बेटांच्या संरक्षणाची जबाबदारी असल्यामुळे त्यांचा अंतर्भाव न्यूयॉर्क या शहरात आणि राज्यात करण्यात आला. पिटुकल्या न्यूजर्सीच्या मानाने बलाढ्य असलेल्या न्यूयॉर्कने ती सारी बेटे आपल्या ताब्यात ठेऊन घेतली आहेत.
लिबर्टी द्वीप प्रत्यक्षात न्यूजर्सीच्या किना-यापासून जास्त जवळ आहे. त्यामुळे त्या जागेला वीज, पाणी वगैरे सुविधा जर्सी शहरातून दिल्या जाताच. अशा प्रकारे भौगोलिक कारणांमुळे ते बेट न्यूजर्सीचा भाग असल्यासारखे दिसत असले तरी ऐतिहासिक कारणांमुळे न्यूयॉर्कने त्यावरील आपला हक्क कधी सोडला नाही. एलिस आयलंड तर जर्सीला जास्तच जवळ आहे. एकंदर एक हेक्टर एवढ्या आकाराच्या या चिमुकल्या बेटाचे क्षेत्रफळ भरतीच्या वेळी कमी आणि ओहोटी आल्यावर जास्त होत असे. या बेटाच्या आसपास कोणाला मोती असलेले शिंपले सापडल्यामुळे त्याचे नांव लिट्ल् ऑइस्टर आयलंड असे पडले. पण ते मोती कांही फार काळ मिळाले नसावेत. एलिस कुटुंबाच्या ताब्यात हे बेट बराच काळ असल्यामुळे त्यांच्या नांवाने ते ओळखले जाऊ लागले.
त्याची मोक्याची जागा लक्षात घेऊन या बेटाचा एका महत्वाच्या कामासाठी उपयोग करून घ्यायचे ठरले. त्याच्या किना-यावरील दलदलीमध्ये भर टाकून त्यावर एक देखणी इमारत बांधण्यात आली. यानंतर इथले बांधकाम चाळीस पन्नास वर्षे चालले होते. जवळच्या न्यूजर्सीमधूनच त्यासाठी दगडमाती आणलेली असणार. ती वाहून नेण्यासाठी एक कामचलाऊ पूलसुध्दा बांधला होता. पण बेटावर कोठलेही वाहन न्यायचे नाही असे ठरले होते आणि लोक पायी चालत जाऊ लागले तर आपल्या धंद्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल या भीतीने नावा चालवणा-या लोकांनी चाव्या फिरवल्या. त्यामुळे हा पूल कधीच सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. हे बेट आपल्या राज्यात असल्याचा दांना न्यूजर्सीने केला आणि तो अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयात चालला. या बेटाचा सुमारे १५-२० टक्के असलेला मूळचा भाग न्यूयॉर्कमध्ये आहे आणि पाण्यात भर घालून बांधलेला ८०-८५ टक्के नवा भाग न्यूजर्सीमध्ये आहे असा निवाडा मिळाल्यामुळे त्यावर बांधल्या गेलेल्या इमारतींच्या कांही खोल्या एका राज्यातल्या एका महानगरात तर उरलेल्या खोल्या दुस-या अशी परिस्थिती आहे. या यगळ्याच इमारती फेडरल गव्हर्नमेंटच्या म्हणजे अमेरिकेच्या केंद्र सरकारच्या मालकीच्या असल्यामुळे तिथला कारभार त्याच्या अखत्यारातच चालतो. सगळ्या प्रकारच्या सेवा अमेरिकेत खाजगी क्षेत्रात चालतात. यामुळे ही दोन राज्ये आणि दोन महानगरे यांचा शासकीय व्यवस्थेत कितपत सहभाग असतो कुणास ठाऊक.
सन १८९२ ते १९५४ च्या दरम्यान अमेरिकेत स्थलांतर करणा-या लोकांच्या नोंदणीचे काम या ठिकाणी केले गेले. त्यासाठीच एक भव्य इमारत बांधली गेली आणि ती आजसुध्दा उत्तम स्थितीत आहे. एकूण एक कोटी वीस लाख लोकांनी इथून अमेरिकेत प्रवेश केल्याची नोंद आहे. त्यात १९०७ या एकाच वर्षात दहा लाखांहून अधिक लोक आले. त्यात १७ एप्रिल या तारखेला एका दिवसात ११७४७ इतकी विक्रमी नोंद आहे. यावरून हे काम केवढ्या मोठ्या प्रमाणावर चालले होते याची कल्पना येईल. परदे्शातून आलेल्या प्रत्येक माणसाचे नांव, गांव, देश वगैरे माहिती लिहून तो अमेरिकेत कशासाठी आला आहे, कुठे जाणार आहे वगैरे चौकशी केली जात असे, तसेच त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला अमेरिकेत प्रवेश देण्याबद्दल निर्णय घेतला जात असे. सरासरी सुमारे दोन टक्के लोकांना प्रवेश नाकारून त्यांची परत पाठवणी होत असे. यात कांही हजार दुर्दैवी लोकांना हकनाक प्राणाला सुध्दा मुकावे लागले. जगभरातल्या दीनदुबळ्यांनी या ठिकाणी यावे असे आवाहन करीत उभ्या असलेल्या स्वातंत्र्यदेवतेच्या पायाशी बसून काम करणा-या अधिका-यांनी आलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा असली तरी कसले तरी खुसपट काढून आलेल्या लोकांना माघारी पाठवण्यात अनेकांना धन्यता वाटत असे अशा तक्रारी सुध्दा झाल्या असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी एक कोटीहून अधिक लोक या ठिकाणी येऊन पुढे अमेरिकेत स्थायिक झाले. त्यांचा वंशावळ वाढून आजच्या अमेरिकेतील दहा कोटी लोकांचे पूर्वज इथून आले असावेत असा अंदाज आहे.
या पुरातन कालीन पध्दतीच्या भव्य इमारतीत आज एक अनोखे म्यूजियम आहे. इथे येऊन गेलेल्या लोकांच्या सविस्तर नोंदी या ठिकाणी आहेतच, शिवाय त्या काळची छायाचित्रे, तसेच अनेक प्रकारची सचित्र आंकडेवारी, इथे येऊन पुढे नांवलौकिक कमावलेल्या मोठ्या आणि प्रसिध्द लोकांची माहिती वगैरे खूप मनोरंजक गोष्टी मोठमोठ्या फलकांवर मांडलेल्या आहेत. अनेक अमेरिकन लोक या ठिकाणी येऊन आपल्या पणजोबा किंवा खापरपणजोबांची नांवे शोधत असतात. एक प्रचंड आकाराचा पृथ्वीचा गोलसुध्दा ठेवला आहे. कोणकोणत्या काळात, जगातील कोणकोणत्या भागातून किती लोकांनी इथे स्थलांतर केले या माहितीवरून त्या भागाच्या इतिहासाची कल्पनाही येते. आम्हाला त्यात कांहीच व्यत्तीगत रस नसल्यामुळे असली माहिती भराभरा नजरेआड करून पूर्वीची छायाचित्रे, त्याकाळचे प्रवासात न्यायचे सामान वगैरे पहाण्यावर जास्त भर दिला. तासाभरात या संग्रहालयातली सगळी दालने पाहून आम्ही धक्क्यावर परत आलो आणि न्यूयॉर्कला जाणारी बोट घेतली.

Thursday, September 10, 2009

न्यूयॉर्कची सफर - ३ स्वातंत्र्यदेवता (उत्तरार्ध)


लिबर्टी आयलंडवरील लँडस्केपिंग खूप छान केलेले आहे. दीडशे फूट उंच पेडेस्टलवरील दीडशे फूट उंच पुतळा जवळून नीट दिसणार नाही. हे लक्षात घेऊन त्याच्या सभोवताली पूर्वी जिथे किल्ला होता तेवढ्या जागेत अकरा कोन असलेल्या ता-याच्या आकाराचा चौथरा बांधला आहे. त्याच्या सर्व बाजूला मोठी मोकळी जमीन सोडून त्यात सुंदर लॉन केले आहे आणि समुद्रकिना-याच्या बाजूने प्रशस्त असा रस्ता बांधला आहे. या बेटावर कोणतेही वाहन न्यायला परवानगी नाहीच. हे प्रेक्षणीय स्थळ पहात पहात मौजमजा करण्याच्या उद्देशाने तिथे आलेले हौशी पर्यटक घोळक्या घोळक्याने पायी फिरत असतात. तो भव्य आणि सुडौल पुतळा, त्याच्या सभोवतालचा गवताचा हिरवा गार गालिचा, अफाट पसरलेल्या समुद्रातल्या लाटा, न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरातल्या उंच इमारती आणि रंगीबेरंगी चित्रविचित्र पोशाखात फिरणारे पर्यटकांचे नमूने आळीपाळीने पहात आणि रमतगमत आम्ही त्या बेटाला एक प्रदक्षिणा घातली. तोपर्यंत सर्वांना चांगली भूक लागली होती म्हणून क्षुधाशांतीसाठी मॅक्डोनाल्डच्या खाद्यगृहात गेलो.
त्याच्या विशाल रेस्तराँमध्ये ग्राहकांच्या सातआठ रांगा लागल्या होत्या आणि प्रत्येक रांगेत तीसपस्तीस माणसे उभी होती. हे सगळे लोक आमच्यासाठी कांही खाद्यपदार्थ शिल्लक ठेवतील की नाही अशी शंका मनात आली आणि आम्हाला जेवण मिळायला किती वेळ लागणार आहे असा प्रश्न पडला. पण त्या रांगा भराभर पुढे सरकतांना दिसल्यामुळे त्यात उभे राहून घेतले. चार पाच प्रकारच्या काँबोंचे सचित्र वर्णन समोरच्या मोठमोठ्या फलकांवर दिले होते. त्यात कोणताच शाकाहारी प्रकार दिसत नव्हता. बरीच चौकशी करून कदाचित सॅलड या नांवाने अनोळखी पालेभाज्यांची न चिरलेली पाने मिळाली असती, पण चार पाच दिवस नुसती तीच खाऊन राहणे जरा कठीणच होते. फिरण्यासाठी अंगात त्राण आणि मनात उभारी यायला हवी आणि त्यासाठी पोटोबा शांत राहणे अत्यंत आवश्यक होते. अशा वेळी शेळ्यामेंढ्यांचे खाणे आपण खायचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनाच आपल्या पोटात जागा देणे बरे वाटले. त्यामुळे यावेळी घरी नवरात्र बसलेले असल्याचा विचार बाजूला ठेवला आणि प्रवासातल्या आपद्धर्माचे पालन केले.
एवढा विचारविनिमय करून मेनू ठरवेपर्यंत आम्ही काउंटरपाशी येऊन पोचलो होतो. तिथे ऑर्डर आणि पैसे देऊन कूपने विकत घेतली आणि पुढे सरकलो. डिलीव्हरी काउंटरवर पोचेपर्यंत आमचे ट्रे मांडून तयार होते. त्या ठिकाणचे दृष्य अविस्मरणीय होते. एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे गरमागरम बर्गर एकापाठोपाठ एक सरकत येत होते. फायरब्रिगेडच्या मोठ्या नळातून बदाबदा पाणी पडावे तसे फ्रेंच फ्राईज धबाधब कोसळत होते आणि तिथले अत्यंत तत्पर कर्मचारी त्यातून भराभर ट्रे जमवत होते. पेय घेण्यासाठी रिकामे पेले दिले. बाजूला प्रत्येकी चारपाच तोट्या असलेली चारपाच वॉटरकूलरसारखी दिसणारी यंत्रे होती. त्यातून हवे ते पेय आपल्या हाताने आपल्या पेल्यात पाहिजे तेवढे घ्यायचे. मी भारतातल्या तसेच युरोप आणि अमेरिकेतल्यासुध्दा अनेक शहरातले मॅक्डोनल्डचे जॉइंट्स पाहिले आहेत, पण अशी कार्यक्षमता आणि तत्परता इतर कुठे मला दिसली नाही. अन्न पुरवणारी तिथली यंत्रसामुग्री आणि कर्मचारी दोघांची कामे एकमेकांना साजेशीच होती. लंचटाइमच्या मर्यादित वेळात ऑफीसमधल्या सगळ्या लोकांना जेवण वाढून देणा-या कंटीनबॉइजचे मला नेहमीच कौतुक वाटायचे. त्याच श्रेणीत या मॅक्डोनल्डवाल्यांनी बराच वरचा क्रम पटकावला.
१८८३ साली न्यूयॉर्क इथल्या एम्मा लाझारस या कवयित्रेने लिहिलेली एक कविता ब्राँझच्या पत्र्यावर कोरून या पुतळ्याच्या पायथ्याशी ठेवली आहे. जगभरातल्या सगळ्या देशांनी आपल्याला नको असलेली बेघर, दरिद्री, गांजलेली आणि थकलेली माणसे इकडे पाठवावीत. त्यांना इथे मोकळा श्वास घेता येईल, मी माझ्या हातातला दिवा त्यांच्यासाठी उंच धरते आहे, असे या कवितेत तिने लिहिले आहे. त्या काळात अमेरिकेत भरपूर नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तिचा सदुपयोग करण्यासाठी मनुष्यबळ कमी अशी परिस्थिती होती. त्यामुळे जो कोणी येईल त्याचे स्वागत होते. तरीसुध्दा वाहतुकीची साधने कमी असल्यामुळे आगबोटीत बसून परदेशी जाऊ इच्छिणा-यांची संख्या कमी होती. आज सव्वाशे वर्षानंतर अशी परिस्थिती आली आहे की जगभरातले धडधाकट, कष्टाळू आणि हुषार लोक तिथे जायला उत्सुक आहेत आणि त्यांना अमेरिकेत येण्यावर कडक निर्बंध घालावे लागत आहेत, तसेच त्यांना मायदेशात थांबवून धरण्यासाठी प्रयत्न केले जातात.

The New Colossus
A sonnet by poet Emma Lazarus is inscribed in bronze at the base of the Statue of Liberty. The sonnet, titled “The New Colossus”, reads:
Not like the brazen giant of Greek fame
With conquering limbs astride from land to land;
Here at our sea-washed, sunset gates shall stand
A mighty woman with a torch, whose flame
Is the imprisoned lightning, and her name
Mother of Exiles. From her beacon-hand
Glows world-wide welcome; her mild eyes command
The air-bridged harbor that twin cities frame,
"Keep, ancient lands, your storied pomp!" cries she
With silent lips. "Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore,
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!"

by Emma Lazarus, New York City, 1883

Monday, September 07, 2009

न्यूयॉर्कची सफर - २ - स्वातंत्र्यदेवीचा पुतळा


स्टॅच्यू ऑफ लिबर्टी या नांवाने जगप्रसिध्द असलेला स्वातंत्र्यदेवताचा पुतळा न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन या अत्यंत गजबजलेल्या मुख्य भागापासून अडीच किलोमीटर दूर असलेल्या एका निर्जन अशा बेटावर उभा केला आहे. तिथे जाण्यासाठी मोटर लाँचची व्यवस्था आहे. आम्ही रांगेत उभे राहून काढलेले तिकीट फक्त या प्रवासासाठीच होते. (असे तिथे गेल्यानंतर समजले.) मॅनहॅटमच्या बॅटरी पार्कमध्ये असलेल्या काउंटरवरून तिकीटे काढून समोरच असलेल्या फेरी स्टेशनवर गेलो आणि विमानतळावर असते तसल्या लांब रांगेत उभे राहिलो. लिबर्टी द्वीपावर जाऊ इच्छिणा-या सर्व पर्यटकांची त्या जागी कसून सुरक्षा तपासणी होत होती. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची धारदार किंवा अणकुचीदार वस्तू, विषारी द्रव्य, स्फोटक किंवा घातक रसायन, हत्यार वगैरे कांही नाही आणि तिथे असलेल्या कोणा माणसाला किंवा निर्जीव वस्तूला आमच्यापासून किंचितही धोका नाही याची पूर्ण खातरजमा झाल्यानंतर आम्हाला पुढे जायची परवानगी मिळाली.
पलीकडच्या बाजूला मोटरलाँचच्या धक्क्याकडे जाण्यासाठी एक लांबलचक मार्गिका होती. तिच्यात फारशी गर्दी नाही हे पाहून आम्ही झपाझपा चालत पुढे गेलो. पण तिच्या दुस-या टोकाला पोचेपर्यंत तिथले गेट बंद झाले. आमच्या पुढे गेलेले लोक तिथे उभ्या असलेल्या बोटीत चढत असलेले दिसत होते. ते सगळे चढून गेल्यावर तिथला तात्पुरता यांत्रिक पूल उचलला गेला, तटावरील खुंटाला बांधलेले साखळदंड सोडले गेले आणि ती बोट जागची हलली. पलीकडून परत आलेली बोट आसपास रेंगाळतांना दिसतच होती. जागा मिळताच ती पुढे येऊन किना-याला लागली. तोपर्यंत आमच्या मागे भरपूर पर्यटक येऊन उभे राहिलेले होतेच. आम्ही सर्वजण रांगेने बोटीत चढलो. खालच्या बाजूला बसण्यासाठी आसने होती, तरी आम्ही तडक डेकवर गेलो आणि मोक्याची जागा पकडून उभे राहिलो.
सागरकिना-यावर आल्यापासून समोरचे लिबर्टी आयलंड आणि त्यावरील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचा आकार दिसत होता. लाँच किना-यावरून निघून जसजशी दूर जाऊ लागली तसतसा तो अधिकाधिक स्पष्ट होत गेला. तसेच मॅनहॅटनच्या अगडबंब इमारतींचा आकार हळूहळू लहान होत गेला आणि त्याच्या आजूबाजूच्या, तसेच मागील बाजूच्या इमारती दिसू लागल्या. खाडीच्या मध्यावर जाईपर्यंत न्यूयॉर्कचा ब्रुकलिन भाग, जर्सी सिटी, न्यूयॉर्क बंदरावरील राक्षसी क्रेन्स, तिथे उभी असलेली जहाजे वगैरे मनोरम दृष्य एका बाजूला आणि बेटावरील भव्य चबूतरा आणि त्यावर असलेली शिल्पकृती दुस-या बाजूला असे सगळेच पाहून डोळ्यात साठवून घेण्यासारखे होते. पहाता पहाता लिबर्टी द्वीप जवळ आले. त्याला अर्धा वळसा घालून आमची बोट पलीकडल्या बाजूला असलेल्या धक्क्यावर गेली. बेटाला वळसा घालता घालता स्वातंत्र्यादेवीच्या पुतळ्याचे सर्व बाजूने दर्शन घडत गेले. मागून, पुढून व बाजूने अशा सर्व अंगांनी दिसणारे त्याचे सौष्ठव आणि सौंदर्य पाहून सारेजण विस्मयचकित होत असलेले त्यांच्या चेह-यावर दिसत होते. जेटीला बोट लागताच उतरून आम्ही बेटावर गेलो.
सहा हेक्टर क्षेत्रफळाचे हे पिटुकले बेट म्हणजे एक मोठा खडक आहे असे म्हणता येईल. युरोपियन लोकांचे ताफे जेंव्हा न्यूयॉर्कमार्गे अमेरिकेत यायला लागले तेंव्हा त्यातल्या कोणीतरी हे बेट काबीज करून घेतले. या ठिकाणी एक दीपस्तंभ बांधून येणा-या जहाजांना धोक्याचा इशारा दिला जाऊ लागला. हस्ते परहस्ते करीत ते सन १६६७ मध्ये बेडलो नांवाच्या गृहस्थाकडे आले आणि ऐंशी वर्षे त्या कुटुंबाकडे राहिल्यामुळे त्याच्या नांवानेच ते ओळखले जाऊ लागले. आणखी कांही हस्तांतरणानंतर अखेर ते सरकारी मालकीचे झाले. या जागी कधी क्षयरोग्यांची वसाहत बनवली गेली होती तर कधी छोटीशी लश्करी छावणी. त्या काळात या बेटावर अकरा कोन असलेल्या ता-याच्या आकाराची छोटी गढी सुध्दा बनवली होती.. सम १८७७ मध्ये स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा उभा करण्यासाठी या जागेची निवड करण्यात आली.
फ्रान्सच्या जनतेच्या वतीने अमेरिकन जनतेला ही अद्भुत भेट दिली गेली आहे. सुप्रसिध्द फ्रेंच शिल्पकार फ्रेडरिक ऑगस्ता बार्तोल्दी याने याची निर्मिती केली. त्यासाठी आलेला खर्च फ्रेंच जनतेने वर्गणी काढून उभ्या केलेल्या निधीतून झाला. अमेरिकन सरकारने हा पुतळा बेडलो बेटावर उभारण्याची परवानगी दिली, पण त्यायाठी निधी मंजूर केला नाही. अमेरिकेतल्या पुलित्झर आदी प्रभृतींनी त्यासाठी वर्गणी गोळा केली. सुमारे दीडशे फूट उंच आणि सव्वादोनशे टन वजनाचा हा पुतळा जुलै १८८४ मध्ये तयार झाल्यावर त्याची तीनशे तुकड्यात विभागणी करून ते भाग दोनशेहून अधिक पेट्यात भरून समुद्रमार्गे अमेरिकेत पाठवण्यात आले. हा पुतळा उभारण्यासाठी दीडशे फूट उंचीचा म्हणजे सुमारे पंधरा मजले उंच असा मोठा चबुतरा बांधला गेला. त्यावर सर्व भागांची जोडणी करून ऑक्टोबर १८८६ मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण झाले. या पुतळ्याचे इतके वजन असले तरी तो आंतून पोकळ आहे. भरीव असता तर ते किती हजार टन झाले असते याची कल्पना यावरून येऊ शकेल. जहाजातून आणणे तर शक्यच झाले नसते आणि दुसरा कोणता मार्गही उपलब्ध नव्हताच.
या पुतळ्याच्या आंतल्या अंगाला एक मजबूत पोलादी सांगाडा आहे. प्रसिध्द आयफेल टॉवरचा निर्माता गुस्ताव्ह आयफेल याने तो तयार केला होता. तांब्याच्या पत्र्याचे अनेक भाग साच्याच्या सहाय्याने ठोकून तयार करून त्या सांगाड्यावर बसवले आहेत आणि एकमेकांना जोडून त्यातून अखंड आकृती तयार केली आहे. दीडशे फूट उंचीची हा प्रमाणबध्द पुतळा सर्वसामान्य माणसाच्या तीसपट एवढा मोठा आहे. म्हणजेच त्याचे नाक, कान डोळे वगैरे प्रत्येकी कांही फुटात असणार. त्याच्या चबुत-याच्या आंतल्या अंगाने वर जाण्यासाठी शिड्या आहेतच, त्यातून वर चढत लिबर्टीच्या मस्तकावरील मुकुटापर्यंत जाता येते. मुकुटाच्या डिझाइनमध्येच २५ खिडक्यांचा समावेश केला आहे. त्यातून सभोवतीच्या प्रदेशाचे विहंगावलोकन करता येते.
दक्क्यावर लाँचमधून उतरल्यानंतर आम्ही जेटीवरून चालत मुख्य बेटावर आलो. पुतळ्याच्या सर्व बाजूला प्रशस्त मोकळी जागा ठेवली आहे. आमच्या आधीच सेकडो पर्यटक तिथे येऊन पोचलेले होते. त्यामुळे अगदी जत्रेइतकी दाटी नसली तरी चांगली वर्दळ होती. बरोबर खाणेपिणे नेणे वर्ज्य असले तरी त्या ठिकाणी गेल्यावर ते विकणा-यांची रेलचेल होती. त्यामुळे तोंडात कांहीतरी चघळत किंवा हातातल्या बाटलीतले घोट घेत सगळे आरामात फिरत होते. आम्ही त्यात सामील झालो.
फिरता फिरता एका जागी थोडे लोक चबुत-याच्या आंतमध्ये प्रवेश करतांना दिसले म्हणून आम्ही तिकडे गेलो. पण त्या जागी एक चौकीदार होता आणि त्यांने आमच्याकडे तिकीट मागितले. तिथे आंत जाण्यासाठी वेगळे तिकीट होते असे तो म्हणाला. त्यासाठी तिकीट काढण्याची आमची तयारी होतीच, पण हे तिकीट त्या बेटावर मिळतच नाही, नावेत बसण्याआधी ऑफीसमधूनच ते काढायला हवे होते. पण तिकीटविक्रीच्या जागी तसे कांहीच लिहिलेले नव्हते आणि इतक्या दुरून आलेल्या आम्हाला ती जागा पाहू द्यावी वगैरे आम्ही त्याला सांगितले, पण तो बधला नाही. "तुम्ही वाटले तर परत गेल्यानंतर ऑफीसात जाऊन वाटेल तेवढे भांडू शकतो, पण आता कृपया मला माझे काम करू द्या." असे त्याच्या आडदांड आकाराच्या मानाने अत्यंत सभ्य शब्दात त्याने सांगितल्यामुळे आम्हाला चबुत-याच्या आंत जाऊन वरपर्यंत चढून जाता आले नाही. अमेरिकन व्यवस्थेला शिव्या घालत आणि ही गोष्ट आम्हाला आधी न सांगितल्याबद्दल सौरभला दोष देत आम्ही पुतळ्याची परिक्रमा चालू ठेवली. हे तिकीट किना-यावरसुध्दा काउंटरवर मिळत नाही. त्यासाठी खूप आधीपासून ऑनसाइन बुकिंग करावे लागते वगैरे माहिती हळूहळू कळत गेल्यानंतर त्याबद्दल कांही करणे आम्हाला शक्यच नव्हते हे लक्षात आले. विमानातून प्रवास केल्यानंतर उंचावरून खाली जमीनीवरले दृष्य पाहण्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्यामुळे त्याचे फारसे वाईट वाटले नाही.
युरोप अमेरिकेतल्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळी असते तसे सॉवेनियर्सचे दुकान इथे होतेच, ते जरा जास्तच विस्तीर्ण होते. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे चित्र काढलेल्या असंख्य प्रकारच्या शोभेच्या तसेच उपयोगाच्या वस्तू तिथे ठेवल्या होत्या. त्या पाहून त्यातली निवड करण्यात मग्न झालेल्या पर्यटकांची झुम्मड उडाली होती. आम्हाला पुढील प्रवासात जवळ ठेऊन घेता येईल अशी बेताच्या आकाराची मूर्ती घेऊन आम्ही बाहेर निघालो.

. . . . . . . . . . (क्रमशः)

Thursday, September 03, 2009

पुढच्या वर्षी लवकर या ... की एकदा येऊच नका?

'पुढच्या वर्षी एकदा येऊच नका' य मथळ्याखाली श्री.संजय पेठे यांनी लोकसत्तामधल्या आपल्या 'थर्ड आय' या सदरात एक लेख लिहिला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक याला आज जे स्वरूप आले आहे त्याबद्दल खेद आणि सात्विक संताप व्यक्त करून गणरायांनासुध्दा कदाचित पुढच्या वर्षी येऊ नये असे वाटत असेल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे. "या उत्सवात धार्मिकपणा नाही", "या निमित्याने कांही लोक मिरवण्याची हौस भागवून घेतात", "बहुतेक लोक मनाची करमणूक करून घेतात", "यातले कार्यक्रम दर्जेदार नव्हते", "यात पैशाचा अपहार व अपव्यय होतो", "लोकांचा वेळ वाया दवडला जातो" आणि "परदेशी लोक यातून आपल्या देशाची बदनामी करतात" हे मुख्य मुद्दे त्यांनी आपल्या लेखात मांडले आहेत. मागील आठवड्यात मी या ब्लॉगवर लिहिलेल्या दोन लेखात लोकमान्य टिळकांनी सन १८९४ आणि १८९५ मध्ये केसरीत लिहिलेल्या दोन अग्रलेखांबद्दल लिहिले होते. एकशे पंधरा वर्षांपूर्वीसुध्दा नेमके हेच मुद्दे टिळकांच्या विरोधकांनी मांडले होते असे त्यातून दिसते. आज गणेशोत्सवाचे संयोजन करणा-या लोकांना लोकमान्य टिळकांच्या पायाच्या नखाचीसुध्दा सर येणार नाही हे ते स्वतः देखील मान्य करतील. असे असले तरी विरोधकांचे मुद्दे जसेच्या तसेच राहिले असल्याचे पाहून गंमत वाटली. त्यांचे दृष्य स्वरूप बदलले आहे, आवाका शतपटीने वाढला आहे आणि त्यातल्या वाईट प्रकारांचे समर्थन करता येणे शक्यच नाही. गणेशोत्सवावर होत असलेल्या टीकेचा जसा खरपूस समाचार लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात घेतला होता तसा आता कोणालाच घेता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या उत्सवाच्या निमित्याने लोकसंग्रह करून त्यांना देशभक्तीच्या मार्गाला लावण्याचे लोकमान्यांच्या डोळ्यासमोर असलेले उदात्त उद्दिष्ट आज आपल्यापुढे राहिलेले नाही. तरीसुध्दा लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कांही चांगले उपक्रम कांही ठिकाणी होत आहेत हे संजयनेसुध्दा मान्य केले आहे.

शंभर वर्षातल्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक दिसतो. "एरवी मद्यपान करून लोळत पडणारे बरेच लोक गणेशोत्सवाचे दहा दिवस व्यसनापासून दूर राहतात" असा एक मोठा फायदा लोकमान्यांनी नमूद केला होता. आज याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसते. अनेक प्रकारच्या धुंदीत कांही लोक 'वहावत' जातांना पहायला मिळतात. पण सारेच त्या अवस्थेत नसतात. माझ्या आजूबाजूच्या कित्येक गणेशोत्सवांच्या मंडपांत डोकावून पाहिल्यावर, आतापर्यंत झालेले कांही विसर्जन सोहळे प्रत्यक्ष पाहून झाल्यावर आणि आज या क्षणाला गांवोगांवी होत असलेल्या अनंतचतुर्दशीच्या भव्य मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण पाहतांना ज्या समाजात आज आपण राहतो त्याचेच प्रतिबिंब मला त्या गर्दीत दिसत आले आहे. "त्या समूहात फक्त आपल्यासारखे निवडक लोक तेवढे तांदळाचे दाणे आहोत आणि बाकीचे सरसकट सारे लोक खडे आहेत" असा आव आणणे मला योग्य वाटत नाही. आपल्या भोंवताली असलेला समाज जसा आहे तसा असल्याच्या सत्याचा स्वीकार करून आपल्या परीने आपल्या कार्यक्षेत्रात जेवढे बदल करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या घरापासून करणे हेच माझ्या मते महत्वाचे आहे. सर्व समाजाला नाक मुरडून नाकारण्याने कांही साध्य होणार नाही किंवा कांही गोष्टी व्यक्तीशः आपल्याला आवडल्या नसतील तर त्या चुकीच्याच किंवा हिणकसच असतात असे समजण्याचेही कारण नाही.

संजयने मांडलेले एकूण एक चांगले विचार आणि त्याने केलेल्या सर्व सूचना यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा कदाचित योगायोग असेल किंवा आम्हाला मिळालेल्या समान प्रकारच्या संस्कारांचा भाग असेल. त्या सूचना अंमलात आणल्यास त्यातून समाजाचे भलेच होईल यात व्यक्तीशः मला कांही शंका नाही. फक्त इतक्या बलिष्ठ मांजरांच्या गळ्यात कोण कोण, कशा आणि कधी घंटा बांधणार हाच एक प्रश्न आहे. पण संजय माझ्यापेक्षा वयाने इतका तरुण असला तरी मी मात्र त्याच्या एवढा निराश झालेलो नाही आणि गणपतीबाप्पाला पुढच्या वर्षी येऊच नका असे म्हणणार नाही. या निमित्याने लोक एकमेकांना भेटतात हीच माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. वर्षभरातून थोडे दिवस तरी ते एकत्र उभे राहून देवाच्या पारंपरिक आरत्या म्हणतात, त्यातले कांही शब्द तरी त्यांच्या मनाच्या आंतपर्यंत जाऊन पोचत असतील. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय असतो आणि कांही ना कांही निमित्य काढून मनातल्या उत्साहाला उधाण आणत असतो आणि ते तो करत राहणारच. त्यात एकमेकांचे अनुकरण होत असते तसेच प्रसारमाध्यमांमधून जे दाखवले जाते त्याचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता त्यामुळे इतर अप्रिय गोष्टी होतात म्हणून उत्सवच बंद करावा असे मी म्हणणार नाही आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मतितार्थ जर मला समजला असेल तर त्यांनीसुध्दा असे सांगितले नसते असे मला वाटते. या निमित्याने लोक एकत्र येऊन एका प्रकारे वेळ घालवतात ही साधी सुधी गोष्ट नाही. एकदा ते आले म्हणजे त्यांना आपल्याला हवे तसे वळण लावणे हे आपले काम आहे असे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात स्पष्ट केले होते.

Wednesday, September 02, 2009

यंदाचा आमचा गणेशोत्सव

फार पूर्वीपासून म्हणजे माझ्या जन्मापूर्वीपासून आमच्या घरी पांच दिवसाचा गणेशोत्सव होत आला आहे. आमचे घर बांधतांनाच त्यातल्या सोप्याच्या मधोमध एक खास 'गणपतीचा कोनाडा' ठेवण्यात आला होता. एकादा लहान मुलगा त्यात चढून बसू शकेल इतका तो रुंद, उंच आणि खोल होता. त्याच्या आजूबाजूच्या भिंतीसुध्दा थोड्या सजवलेला होत्या. एरवी त्यात इतर शोभेच्या किंवा अत्यावश्यक वस्तू ठेवल्या जात. गणेशचतुर्थीच्या आधी तो रिकामा करून रंगरंगोटी करून तयार ठेवला जाई. घरातली मुले आपले कलाकौशल्य पणाला लावून दरवर्षी नवे मखर आणि इतर सजावट करीत असत. कॉलेजला गेल्यानंतर दिवाळीला घरी जायचे असायचे. त्यापूर्वी गणपतीसाठी एक वेगळी ट्रिप करणे शक्य नसल्यामुळे स्थानिक नातेवाईकांना भेट देणे आणि सार्वजनिक गणेशोत्सवांची आरास पहात तिथले थोडे गाण्याबिण्याचे कार्यक्रम पाहणे एवढाच माझा गणेशोत्सवात सहभाग होत असे. लग्न करून घर थाटल्यानंतर दोन खोल्यांच्या इवल्याशा घरात गणपतीची पिटुकली मूर्ती आणून आमचा वेगळा घरचा गणेशोत्सव सुरू केला. बदलत्या परिस्थितीनुसार दरवर्षी कांहीतरी नवे आणि चांगले करण्याच्या प्रयत्नामधून त्यात सुधारणा होत गेली.
सेवानिवृत्तीनंतर प्रशस्त सरकारी निवास सोडून लहानशा सदनिकेत रहायला गेलो. त्यानंतर कांही महिन्यांनी एक मोठे दुखणे येऊन गेले. २००६ च्या गणेशोत्सवापर्यंत मी त्यातून हळूहळू मार्गावर येत होतो, पण अजून हिंडू फिरू लागलो नव्हतो आणि काही काम करायला अंगात फारसे त्राण नव्हते. त्यामुळे नव्या घरात पुन्हा एकदा लहान प्रमाणात गणेशोत्सव सुरू केला. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे २००७ साली पुण्याला मुलाकडे गणपती ठेवायचे ठरवले. सर्वांनी खूप उत्साहात हा सण साजरा केला. मागल्या वर्षी घरात आम्ही दोघेच राहिलो होतो, त्यामुळे जुन्या आठवणी काढत आणि शेजारपाजारच्या लोकांना बोलवत गणेशोत्सव साजरा केला.
यंदा मात्र पुन्हा एकदा गणेशचतुर्थीला घराचे गोकुळ झाले होते. त्यामुळे सर्वांच्या आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. पण आता दिवस बदलले आहेत. पूर्वीप्रमाणे आपल्या कलाकौशल्याला वाव देऊन कांही नवी निर्मिती करण्याला तितकेसे महत्व राहिलेले नाही. उगाच आपल्या डोक्याला ताप देण्यापेक्षा बाजारातून रेडीमेड वस्तू आणणे सोईचे वाटते. नाना प्रकारची मखरे आणि सजावट करण्यासाठी असंख्य प्रकारच्या सुबक आणि झगमगीत गोष्टी बाजारात खचाखच भरलेल्या असतात. उपलब्ध जागा आणि खिशाचा विचार करून त्यातल्या कांही आणल्या आणि फटाफट जोडून टाकल्या. गणपतीच्या नैवेद्यापुरते एक दिवस तळलेले आणि एकदा उकडीचे मोदक घरी केले होते. त्याशिवाय पुण्याहून चितळे बंधूंची आंबाबर्फी आणि बाकरवडी आणली होती, हल्दीरामची सोनपापडी, बिकानेरची दाळमोठ आणि गुलाबजाम, शिवकृपाचे फरसाण आणि काजू कटली, गोडबोल्यांचे लाडू आणि शंकरपाळी, आणखी कोठले कांही, कोठले कांही अशा नाना त-हेच्या मिठाया आणि नमकीन खाद्यवस्तूंची लयलूट होती. या निमित्याने अनेक आप्तेष्ट येऊन भेटून गेले. त्या गडबडीत पाच दिवसाचा उत्सव कसा संपला ते कळलेच नाही.
ब्लॉगगिरी सुरू केल्यापासून दरवर्षी गणेशोत्सवात कांही तरी प्रासंगिक लिहायचे असे ठरवले होते. पहिल्या वर्षी म्हणजे २००६ साली घरबसल्याच वृत्तपत्रे आणि टीव्हीवर जेवढे गणेशोत्सव पाहिले त्यावरून गणेशाच्या 'कोटी कोटी रूपां'वर एक लेखमालिका लिहिली. सलग अकरा दिवस मी स्वतः, माझा संगणक आणि आंतर्जाल सक्षम राहिलो आणि रोज एक लेख लिहून तो ब्लॉगवर टाकू शकलो ही त्या श्रीगणेशाची कृपाच. पुढील वर्षी मी मुंबईत नव्हतोच, पण आधीपासून थोडी तयारी केली आणि आंतर्जालावर भ्रमण करून थोडी शोधाशोध केली आणि पुण्याला राहूनच रोज एक गजाननाचे गीत ब्लॉगवर टाकत राहिलो. मागल्या वर्षी 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर एक लेखमाला लिहिली होती. या वर्षी काय करायचे किंवा काय करता येईल हे ठरत नव्हते. योगायोगाने काही विचार सुचले, कांही जुने कागद हाताशी लागले आणि त्यातून 'आधी वंदू तुज मोरया', 'मूषक आणि माउस', 'लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव' हे लेख लिहिले गेले. आणि आजचे हे पुनरावलोकन.