Monday, July 30, 2018

माझी संग्रहवृत्ती - भाग २ - नाणी

विद्यार्थीगृहातला काळ

आमच्या काळातल्या हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये कपाटे किंवा कोनाडे नसायचे. मी आपले चांगले कपडे, महत्वाची कागदपत्रे, पैसे वगैरे गोष्टी एका पत्र्याच्या ट्रंकेत भरून तिला पलंगाखाली सरकवून ठेवत असे. माझे बाकीचे सामान उघड्यावरच पडलेले असायचे. अशा परिस्थितीत मी कसले कलेक्शन करणार आणि त्याचा संचय कुठे जपून ठेवणार ? नाही म्हणायला रेल्वे, बस किंवा सिनेमाची तिकीटे शर्टांच्या खिशांमध्ये काही काळ पडून राहिलेली असत. त्या काळातल्या रहस्यकथांमध्ये त्यांचे फार महत्व असायचे. एकादी विचित्र घटना घडली तर आपण तिचे साक्षीदार असण्याचा किंवा तिथे हजर नसण्याचा तो भक्कम पुरावा मानला जात असे. त्यामुळे कधी गरज पडली असती तर मला त्यांचा उपयोग करून घेता आला असता, पण तशी वेळ कधी आलीच नाही. ते शर्ट धुवायची वेळ आली की त्यांच्या खिशांमधले चिटोरे बाहेर  काढून टाकून दिले जात, नाही तर शर्टांबरोबर त्यांचीही धुलाई होऊन जात असे.

हॉस्टेलमध्ये रहात असतांना वस्तूंचा संग्रह करायची सोय नसल्यामुळे माझ्या मनातल्या कलेक्टरला अजीबात कामच नव्हते असे मात्र नाही. त्या काळात मला वस्तू जमवून ठेवणे कठीण होते म्हणून त्या मानसिक संग्राहकानेच दुसरे काम मनावर घेतले. मी लहान गावातले घर सोडून शहरांमधल्या हॉस्टेलमध्ये रहायला गेल्यावर माझ्या रोजच्या जीवनात खूप फरक पडला होता. तिथली व्यवस्था आणि ती ठेवणारी माणसे यांची माहिती करून घ्यायची होती. हॉस्टेलमधली कांही मुले मराठी भाषेच्या वेगळ्या बोली बोलत होती तर कांही वेगळ्या भाषा बोलत होती. मराठीभाषिक मुलांकडून नवे शब्द, वाक्प्रचार वगैरे ऐकायला मिळत. अमराठी मुलांशी संभाषण करण्यासाठी मला इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये बोलावे लागत होते. मी या भाषांचा पुस्तकी अभ्यास केला असला तरी आमच्या लहान गावात त्यांमधून चार शब्दसुद्धा कधी बोलायची गरज पडली नव्हती. त्यामुळे हॉस्टेलमधली इतर मुले कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकून ते समजून घेऊन मनात साठवून ठेवत होतो. कॉलेज आणि हॉस्टेलमध्ये रोज येत असलेले नव नवे अनुभव मी जाणीवपूर्वक गोळा करत राहिलो. या गोष्टी वस्तूंप्रमाणे डोळ्याला दिसत नसल्या तरी त्या मनामध्ये साचून रहात होत्या. या सगळ्यांशिवाय कॉलेजमधला प्रचंड अभ्यास तर होताच, शिकलेले धडे लक्षात ठेवले नाहीत तर मी परीक्षेत काय लिहिणार होतो ?  शिवाय तिथे साठवलेली ज्ञानाची शिदोरीच मला पुढे जन्मभर उपयोगी पडणार होती.

जुनी भारतीय नाणी


मी कॉलेज शिक्षणासाठी घर सोडल्यानंतर बरोबर दहा वर्षांनंतर लग्न करून संसार थाटला तोंपर्यंतच्या काळात "विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर" असे म्हणतात तसा रहात होतो. त्या काळात मला कसलाही संग्रह करणे किंवा तो सांभाळून ठेवणे शक्यच नव्हते. मात्र याला एक अपवाद होता.

मी शाळेत शिकत असतांनाच भारत सरकारने दशमान पद्धतीची अंमलबजावणी करायचे ठरवले आणि त्यानुसार नवी वजने आणि मापे आणलीच त्याप्रमाणे नवे चलनसुद्धा प्रसारात आणले. इंग्रजांच्या काळातल्या रुपये, आणे, पै या पद्धतीच्या जागी १०० नव्या पैशांचा रुपया झाला. ते करत असतांना सरकारने रुपयाचे मूल्य आधीच्याइतकेच ठेऊन नवा पैसा हे नवे नाणे काढले आणि सोयीसाठी २,३,५,१०,२०,२५ आणि ५० नव्या पैशांची नाणी आणली. मात्र हे डिमॉनेटायझेशन एका रात्रीत करणे शक्यच नव्हते. ते काम सावकाशपणे एक दोन वर्षे चालले होते.

पै या जुन्या काळातल्या नाण्याची किंमत कवडीपेक्षाही कमी झाल्यामुळे ही दोन्ही चलने बहुधा माझ्या जन्माच्याही आधी नाहीशी झाली होती. ढब्बू पैसा, भोकाचा पैसा, दोन पैसे, आणा, चवली, पावली, अधेली वगैरे नाणी माझ्या लहानपणी प्रचलित होती. "नवे पैसे येणार" अशी बातमी आल्यानंतर किती तरी दिवस आम्ही त्यांची आतुरतेने वाट पहात होतो. आमच्या गावातल्या बाजारात ते येऊन पोचल्यानंतर आधी तर ती नवी नाणी मिळवून जपून ठेवायची चढाओढ लागली आणि जुनी झिजलेली किंवा काळवंडलेली नाणी खर्च होत राहिली. "तुमच्याकडचे जुने पैसे इथे द्या आणि नवे पैसे घेऊन जा." अशी आम जनतेसाठी काढलेली कसली स्कीम आमच्या गावात पाहिल्याचे मला तरी आठवत नाही. ही नवी नाणी ट्रेझरीमधून बॅकांकडे आणि त्यांच्याकडून परस्पर व्यापाऱ्यांकडे जात असावीत आणि व्यापारी जमा झालेला जुन्या पैशांचा गल्ला त्यांच्याकडे नेऊन भरत असावेत. आमच्या घरातल्या पैशांच्या डब्यातली जुनी नाणी जसजशी कमी होत चालली तसे मला त्यांच्याबद्दल प्रेम वाटायला लागले होते, आपण ती खर्च करू नये असे मला वाटत होते पण कोणीच माझे ऐकून घेत नव्हते. अखेरीस हट्ट धरून मी थोडी नाणी मागून माझ्या ताब्यात घेतली.

त्या काळात कुणाकडे जेवायला गेल्यास वर पैसा दोन पैसे दक्षिणा मिळायची, तसेच आमच्याकडे येऊन गेलेले काही पाहुणे खाऊ आणायसाठी म्हणून किंवा त्यांची आठवण म्हणून चार आठ आणे हातावर ठेऊन जात असत. ती नाणी मात्र मी घरातल्या पैशांच्या डब्यात टाकायला देत नव्हतो. कधी कधी बाजारात न चालणारी  काही भलतीच नाणी चुकून घरी आलेली असत. घरातल्या कुठल्यातरी कोनाड्याच्या किंवा कपाटाच्या कोपऱ्यात पडून राहिलेली पण आता बाद झालेली जुनी नाणी पुढल्या काळात अचानक सापडत तेंव्हा मला खूप आनंद होत असे. अशी कांही जुनी नाणी मी जमवून ठेवली होती.  घरातल्या आणखी कोणाला सापडू नयेत म्हणून मी ती लपवून ठेवत होतो. कॉलेज शिक्षणासाठी घर सोडल्यानंतर सुद्धा मी त्यांची  पुरचुंडी मात्र जिवापलीकडे सांभाळून ठेवली आणि ती नाणी आजपर्यंत माझ्याकडे आहेत.

नाण्यांची वैशिष्ट्ये

मी शाळेत असतांना जसे चित्रविचित्र आकारांचे दगड, गारगोट्या, शिंपले वगैरेंचे कलेक्शन करत होतो तेवढ्याच उत्साहाने निरनिराळी नाणी गोळा करत होतो. काडेपेट्यांचे छाप, सिगरेटची (रिकामी, उगीच संशय नको) पाकिटे, फुलबाज्यांचे डबे यासारख्या कागद किंवा पुठ्ठ्याच्या नाशिवंत पदार्थांना घरातच अनेक शत्रू होते, उदाहरणार्थ दंमट हवा, भिंतीतली ओल, मुंग्या, झुरळे, उंदीर आणि स्वच्छता व टापटीप. माझ्या खजिन्यातल्या इतर कांही वस्तूंचा समावेशसुद्धा पसारा या कॅटेगरीत होत असल्याच्या गुन्ह्यासाठी त्यांना हद्दपारीची शिक्षा मिळत असे. ज्या कोणा महाभागाने टापटीप आणि पसारा या दोन शब्दांचा शोध लावला तो माझा शत्रू नंबर एक होता. त्याच्या अंगावर शाई आणि राड टाकावी, त्यांच्या नाकातोंडात भुसा आणि राख कोंबावी असे मला त्या वेळी वाटायचे.

माझ्या पसाऱ्यातल्या इतर वस्तूंपेक्षा नाण्यांमध्ये काही खास वैशिष्ट्ये होती. प्रत्येक नाण्यावर एकाद्या राजाचे वा राणीचे चित्र किंवा राजमुद्रा असायची, तसेच त्यांचे मूल्य आणि ते तयार केल्याच्या वर्षाची नोंद असायची. यातून प्रत्येकाची एक ओळख असायची. त्यामुळे ती मी अधिक काळजीपूर्वक सांभाळून ठेवली होती. अधून मधून त्यांना चिंच लावून रांगोळीने घासून पुसून चमकवत होतो. त्यांना मिळालेल्या या खास वरिष्ठ दर्जामुळे ती मात्र माझ्याकडे शिल्लक राहिली.

नाणी जमा करण्यामागे माझा हौसेपलीकडे कुठलाच विचार किंवा उद्देश नसायचा. मोठे झाल्यानंतर सुद्धा "तू न्यूमिस्टॅटिस्ट आहेस का?" असे मला कुणीतरी विचारले तेंव्हा  मी तर सरळ "नाही रे बाबा." म्हणून टाकले. हा प्राणी कुठला स्पेशालिस्ट असतो की भ्रमिष्टाचा प्रकार असतो तेच मला ऐकूनही ठाऊक नव्हते. थोडी चौकशी केल्यानंतर समजले की न्यूमिस्टॅटिस्ट अशा भारदस्त नावाचे लोक नाणी जमवण्यासारखे प्रकार करतात म्हणे.  शिवाय नाण्यांचेसुद्धा एक शास्त्र असते आणि हे लोक त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करतात. मला असले काही करायचे नव्हते, माझ्याकडे तेवढा उत्साहही नव्हता आणि वेळही.

परदेशांमधली नाणी


छंद जोपासण्यासाठी मदत करणारी अनेक दुकाने मुंबईपुण्यामध्ये आहेत. देशोदेशींची नाणी आणि पोस्टाची तिकीटे विकणारे कांही विक्रेते तर फोर्टमधल्या रस्त्यांच्या फूटपाथवरून हिंडतांनाच दिसायचे. पण मुद्दाम माझ्या छंदांसाठी म्हणून वेगळा खर्च करायचा नाही असे एक ढोबळ धोरण मी ठरवले होते आणि ते पाळत आलो.  मी कधीच या गोष्टी विकत घेतल्या नाहीत, मग तो तत्वाचा प्रश्न असो किंवा उपजत आलेल्या कंजूसपणाचा प्रभाव. मी शाळेत असतांना जमवलेल्या नाण्यांच्या लहानशा संख्येत पुढील २०-२२ वर्षात लक्षणीय अशी भर पडली नाही.

त्यानंतर मला आठवडाभरासाठी परदेशी जाऊन यायची एक संधी मिळाली. मला त्या काळात दिवसाला मिळणाऱ्या वीस डॉलर्स एवढ्या घसघशीत प्रवासभत्त्यामध्ये जेवणखाण आणि इतर किरकोळ खर्च भागवायचा होता आणि ते करून उरलेल्या शिल्लकेमधून पत्नी आणि मुलांसाठी कांही तरी वस्तू न्यायच्या होत्या. तोंपर्यंत मॅकडोनाल्ड सुरू झाले नव्हते पण फिश अँड चिप्स आणि बर्गर किंवा वडापावसारखे दिसणारे युरोपातले पदार्थ पुरवणारी कोपऱ्यावरची दुकाने असल्यामुळे रात्रीच्या जेवणाऐवजी ते चाखून पाहिले. मी त्यापूर्वी कधीही न खाल्लेली अनेक प्रकारची बिस्किटे, क्रॉइसाँ, मुफिन्स, पफ्स वगैरेंची पाकिटे स्टोअर्समधून आणून ठेवली होती. ती भरीला असल्यामुळे व्यवस्थित उदरभरण होत होते. तिकडे जातांना नेलेले सगळे ट्रॅव्हलर्स चेक आणि नोटा दुकानदारांना देण्यात संपल्या, पण त्यांनी परत केलेली जर्मनी आणि इंग्लंडमधली चिल्लर नाणी तेवढी खिशात खुळखुळत शिल्लक राहिली. त्यामधून माझ्या नाणेनिधीत भर पडली आणि तो आंतरराष्ट्रीय झाला.  आणखी कांही वर्षांनी कॅनडाची एक वारी झाली, त्यात अमेरिकेतली नाणी मिळाली.

माझी मुले मोठी होऊन नोकरीला लागल्यानंतर लवकरच त्यांचे परदेशभ्रमण सुरू झाले आणि परत आल्यावर त्यांनी आणलेली नाणी मला मिळत गेली. त्यातून थायलंड, सिंगापूर, सौदी अरेबिया यासारख्या आशियातल्या देशांची तसेच स्पेन, इटली, नेदरलँड यासारख्या देशांची स्वतंत्र नाणी माझ्याकडे आली. पुढे आम्ही युरोपच्या टूरवर गेलो तोंपर्यंत युरोपियन युनियन झाले होते आणि आम्ही सतरा देशांमधून फिरून आलो असलो तरी स्विट्झरलँड सोडून इतर सगळीकडे युरो हे एकच चलन होते. प्रवासाच्या दृष्टीने ते सोयीचे होते पण त्यात विविधता नसल्यामुळे उगीच भाराभर चिल्लर जमवून ठेवण्यात अर्थ नव्हता.  मुलांना भेटायच्या निमित्याने इंग्लंड अमेरिकेतही जाणे येणे आणि राहणे झाल्यानंतर पौंड आणि डॉलरचे अप्रूप राहिले नाही.

माझ्या एका मित्राने विविध देशांची नाणी जमवली असल्याचे मला बोलण्यामधून समजले तेंव्हा एकमेकांकडे नसलेले एकादे नाणे एक्स्चेंज करायचे ठरले. मात्र मी त्याला एक चांगला बंदा डॉलर दिला आणि त्याने एका निराळ्याच देशातले एक क्षुल्लक नाणे दिले. म्हणजे आर्थिक दृष्ट्या पहायला गेले तर त्यात माझे नुकसान झाले, पण माझ्याकडे आणखीही डॉलर्स होते आणि ते नाणे मिळण्याची शक्यताही नसल्यामुळे ते अनमोल होते. 

या दीर्घ कालावधीमध्ये भारतातल्या चलनामध्ये कांही घडामोडी झाल्या. १,२,३,५ आणि १० पैशांची नाणी निरर्थक किंवा अर्थशून्य होऊन एका पाठोपाठ एक करत व्यवहारातून अदृष्य झाली होती. कांही वर्षांनंतर २५ आणि ५० पैशांनाही कांही मोल उरले नाही. २, ५ आणि १० रुपयांची नाणी निघाली. अनेक संत, नेते, सण, सोहळे यांच्या स्मरणार्थ खास नाणी प्रसारित करण्यात आली. या सगळ्यांचे नमूने माझ्याकडे साठत गेले.
................ (क्रमशः)

Saturday, July 21, 2018

माझी संग्रहवृत्ती - भाग १


प्रस्तावना 

कोणतीही नदी उगमापासून निघून समुद्राकडे जात असतांना तिच्याबरोबर दगड, माती, झाडांच्या फांद्या, पाने वगैरेंना वाहून नेते तसेच त्यांना ठिकठिकाणच्या किनाऱ्यावर पसरतही जाते. कांही ठिकाणी त्यांचा गाळ साचून सुपीक जमीन तयार होते तर कांही ठिकाणी नदीकाठी एक लहानसे वाळवंट बनते. आपण गाळाच्या चिखलात तर सहजपणे जाऊ शकत नाही, पण नद्या किंवा समुद्र यांच्या किनाऱ्यावरच्या वाळवंटात रमत गमत फिरत रहायला सर्वांना आवडते. अशा वेळी आपल्या मनातले लहान मूल जागे होते आणि वाळूत पसरलेले गुळगुळीत, रंगीत किंवा चमकदार लहान लहान खडे, दगड, तसेच शंख, शिंपले वगैरे वेचायला लागते. एक एक गोष्ट खिशात टाकता टाकता खिसे भरून जातात, रुमालात गुंडाळून त्याची पोटली होते किंवा एकाद्या कागदात गुंडाळून त्याचा पुडा केला जातो. अधून मधून ते उघडून पाहिले तर त्यातल्या कांही वस्तू रस्त्यात पडून गेलेल्या असतात, तर कांही आपल्यालाच नको वाटतात म्हणून आपण टाकून देतो. उरलेल्या थोड्या वेचक वस्तू आपण घरी नेतो आणि कांही काळ ठेऊन देतो. असे जवळपास सगळ्यांच्या बाबतीत घडत असावे, पण मला त्याचा थोडा जास्तच सोस आहे.

आपल्या आयुष्यातसुद्धा अनेक घटना घडतात, अनेक माणसे भेटतात, आपण अनेक गोष्टी शिकत असतो, पुस्तके वाचतो, नाटकसिनेमे पाहतो, पर्यटन करतो. या सगळ्यांच्या कांही आठवणी मनात कुठेतरी साठत असतात तसेच विस्मरणात जात असतात. त्यातले चमकदार, रंगीबेरंगी, चित्रविचित्र आकारांचे कण उठून दिसतात. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिण्याचा प्रयत्न मी गेली दहा वर्षे या ब्लॉगमधून करत आलो आहे. या मनातल्या गोष्टींशिवाय किंवा कधी कधी त्यांच्याशी निगडित असलेल्या कांही वस्तूसुद्धा आपल्याकडे साठत जातात. आठवण म्हणून किंवा पुन्हा कधीतरी पहाव्याशा वाटल्या तर जवळ असाव्यात म्हणून आपण त्या ठेऊन घेतो, लगेच टाकून देत नाही. मी अशा असंख्य गोष्टींचा संग्रह करून ठेवला आहे.

मी माझा हा संग्रह कुणालाही दाखवत नाही. इतरांना ती अडगळ वाटण्याची दाट शक्यता असते. त्यातली कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी मी विशेष प्रयत्न केला नव्हता किंवा ती मुद्दाम तेवढ्यासाठी विकत घेतली नव्हती. त्यामुळे याला माझा आवडता छंद असे म्हणता येणार नाही. आपले नांव अमक्या तमक्या बुक ऑफ रेकॉर्डमध्ये यावे अशी  इच्छा मला कधीच झाली नाही. मी तसे प्रयत्न करायचा विचारही मनात आणला नाही. नदीच्या किनाऱ्यावर वाळू, गारगोट्या आण शंखशिंपले जमावेत तितक्या सहजपणे त्या वस्तू , ती चित्रे किंवा ते कागद माझ्याकडे येत राहिले आणि बरीच वर्षे मला रहायला प्रशस्त घर मिळाले असल्यामुळे त्यातल्या कुठल्यातरी कान्याकोपऱ्यात त्यांना जागा मिळत गेली.

काँप्यूटर्सची स्मरणशक्ती फारच वेगाने वाढत गेली आणि त्यात असंख्य फाइली साठत गेल्या. आता तर क्लाऊड किंवा ढगांमध्येच त्या साठवायची सोय झाल्यामुळे त्याला कसलीच मर्यादा राहिली नाही. याच्या उलट गूगलमधून आपल्याला हवे ते क्षणात शोधून काढायची सोय झाल्यामुळे आपल्या स्वतःच्या संग्रहाचे कांहीच महत्व राहिलेले नाही. पण म्हणून त्या गोळा करण्यासाठी मी जन्मभर केलेली मेहनत वाया गेली असेच कांही म्हणता येणार नाही. कारण त्या जमा करण्याच्या कामातच माझे समाधान मला मिळून गेले होते. त्यांना पुन्हा पहाण्यातला आनंद म्हणजे बोनस आहे.

अनुभव, माणसे किंवा प्रसंग यांच्याविषयी लिहित असतांनाच माझ्या अशा संग्रहांबद्दलही चार शब्द लिहावे असे माझ्या मनात आले आणि ते लिहायला मी सुरुवात केली. आधी फेसबुकवर स्टेटस म्हणून टाकून पाहिले आणि त्यांचे संकलन करून आता हा ब्लॉग लिहीत आहे.

कलेक्टर 

जुन्या काळातली माझी आई चूल, मूल, नातेवाईक आणि देवधर्म यातच नेहमी गुंतून पडलेली असल्यामुळे बाहेरच्या जगाबद्दल तिला अंधुकशी माहिती होती. तिच्या दृष्टीने मामलेदार हीच खूप मोठी आणि कलेक्टर ही तर बहुधा सर्वात मोठी आणि पॉवरफुल पोस्ट होती. घरातला कोणी मुलगा आळशीपणा करून काम करणे टाळत असला तर त्याला "तू काय आपल्याला कलेक्टर समजतोस काय ?" असे विचारले जायचे. कलेक्टरच्या वर कदाचित थेट राजा आणि त्याच्यावर खुद्द परमेश्वरच होता. लोकशाही आल्यानंतर त्यातल्या राजाच्या जागी मंत्री आले, पण आईच्या दृष्टीने त्यामुळे फारसा फरक पडला नव्हता.  आपल्या मुलांनी चांगले शिकून कलेक्टर व्हावे अशी तिची इच्छा होती, पण त्यासाठी काय शिकावे लागते हे तिलाही माहीत नव्हते किंवा तिच्या मुलांनाही ते समजले नाही. ती आपली त्यांना मिळेल ते शिक्षण घेऊन मिळेल त्या नोकरीला लागली. त्यातलाच एक म्हणजे मी.

शाळेत इंग्रजी भाषा शिकत असतांना कलेक्ट म्हणजे गोळा करणे आणि कलेक्टर म्हणजे गोळा करणारा असे या शब्दांचे अर्थ समजले. कलेक्टर नावाचा ऑफीसर काय काय जमा करतो याचा मात्र मला कांहीच पत्ता नव्हता. त्याचा प्रचंड रुबाब असतो एवढेच मी लहानपणी ऐकले होते. रयतेकडून रेव्हेन्यू म्हणजे मुख्यतः शेतसारा जमा करून तो सरकारी तिजोरीत भरण्यासाठी इंग्रजांनी हे पद निर्माण केले होते. पण तो प्रत्यक्षात जिल्ह्याचा राज्यकारभार सांभाळणारा एक जबाबदार सरकारी अधिकारी असतो आणि काही कलेक्ट करण्याव्यतिरिक्त इतरच खूप कामे त्याला करायची असतात हे मला खूप उशीराने कळले.

लहानपणीचे कलेक्शन

 मला अगदी लहानपणापासूनच जे मिळेल ते गोळा करून ठेवायचा नाद होता, तो मला कोणी कलेक्टर बिलेक्टर व्हायचे होते म्हणून नव्हे. तशी बहुतेक सगळ्याच मुलांना ती आवड असते, पण मला थोडी जास्त होती. त्या काळातले वातावरण काटकसरीचे होते. वापरा आणि फेकून द्या (यूज अँड थ्रो) हा माजोरी प्रकार अजून सुरू झाला नव्हता. कपडे फाटले तरी ते शिवून आणि ठिगळे लावून वापरायचे आणि पुढे त्याच्या चिंध्यांचासुद्धा या ना त्या गोष्टी पुसण्याच्या कामासाठी उपयोग करून झाल्यावर अखेर त्या बंबात जळून पाणी तापवायचे काम करत. घरातली कुठलीही वस्तू शक्य तो टाकून दिली जात नसे. त्यामुळे माझ्याकडे आलेल्या वस्तूसुद्धा मी गोळा करून ठेवत असे.

 त्या लहान गावात मला मिळून मिळून असे काय काय मिळणार होते ? त्या काळात पॉकेट मनी हा शब्द ऐकूनही ठाऊक नव्हता आणि आमच्या गावात हॉबीच्या वस्तूंची दुकाने नव्हती.  मी आपले चिंचोके, कवड्या, सोंगट्या, गजगे (सागरगोटे), गोट्या, भोंवरे अशा आमच्या खेळायच्या वस्तू जमवून ठेवत असे, शिवाय विचित्र आकारांचे किंवा रंगीबेरंगी खडे, गारगोट्या, शंखशिंपले वगैरेही त्यांच्या सोबतीला असत. रिकाम्या काडेपेट्या आणि त्यांच्यावरची चित्रे, लहानसहान डब्या, बाटल्या, त्यांची झांकणे, खोके, पुठ्ठे वगैरेंनी माझा खजिना हळूहळू भरायला लागला. क्वचित कधी घरी पोस्टाने एकादे पाकीट आले तर मी हळूच त्याच्या लिफाफ्यावरचे तिकीट काढून घेत असे.

आमच्या लहानपणीच्या काळातले बहुतेक शिक्षण मौखिक घोकंपट्टीचेच असायचे.  शाळेतल्या अभ्यासासाठी अगदी थोडी लहानशी पुस्तके आणि वहीच्या नावाने फक्त एक रफबुक असायचे.  शाळेच्या इन्स्पेक्शनची वेळ आली की घाईघाईने त्यातला काही भाग चाळीस चाळीस पृष्ठांच्या फेअर वह्यांमध्ये लिहून काढत असू.  त्यामुळे आमच्यावर पुस्तकवह्यांचा जास्त भार नव्हता किंवा त्या फार जास्त जागा अडवून ठेवत नसत. शाळेतल्या अभ्यासासाठी पेन्सिली, खोडरबर, कंपास पेटी, दौत टाक, फाउंटन पेन वगैरेंचीही गरज असायची. चित्रकलेसाठी रंगीत पेन्सिली, रंग, ब्रश वगैरे गोष्टी लागायच्या. या सगळ्या वस्तूंच्या सोबतच मी गोष्टीची पुस्तके आणि गोळा केलेला माझा सगळा खजिना  मला मिळालेल्या एका लहानशा कोनाडेवजा कपाटात कोंबून ठेवत असे.

अधून मधून माझी आई माझे कपाट आवरायचे म्हणून हे सगळे सामान कपाटाबाहेर बाहेर काढत असे आणि उगाच पसारा नको म्हणत त्यातल्या बऱ्याचशा वस्तू फेकून देत असे. एक दोन दिवस चिडचिच करून झाल्यावर मी पुन्हा नव्या जोमाने माझे कलेक्शनचे काम सुरू करून देत असे.

................... (क्रमशः)


Thursday, July 12, 2018

लोकप्रिय नेता असलेला अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिनसतराव्या शतकामधील पास्कल, न्यूटन, हूक, बॉइल, ह्यूजेन्स आदि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामामधून युरोपमधील देशांमध्ये विज्ञानावरील संशोधनाला गति आली होती.  अमेरिकेत स्थाईक होण्यासाठी गेलेले बहुतेक लोक युरोपमधून गेले होते. त्यांनी आपल्याबरोबर ख्रिश्चन धर्म आणि युरोपमधील संस्कृतिसुद्धा तिकडे नेली होती.  युरोपमध्ये होत असलेल्या बदलांकडे त्यांचे लक्ष होते. यामुळे विज्ञानाच्या अभ्यासाचे लोणसुद्धा अमेरिकेत पोचले. तिथेसुद्धा प्रयोगशाळा बांधल्या गेल्या आणि त्यात शास्त्रीय संशोधन सुरू झाले. या प्रक्रियेमधून प्रसिद्ध शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँकलिन हा पहिला मोठा अमेरिकन शास्त्रज्ञ तयार झाला.

बेंजामिन फ्रँकलिनचा जन्म बोस्टन येथील एका सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्याच्या वडिलांना झालेल्या १७ मुलांपैकी तो दहावा होता. त्याने चर्चमध्ये शिक्षण घेऊन धर्मगुरु व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती म्हणून त्या उद्देशाने त्याला बोस्टनच्या शाळेत घातले होते, पण ते शिक्षण परवडत नसल्याने दोन वर्षांनंतर थांबले.  बेंजामिन अत्यंत तल्लख बुद्धीचा आणि मेहनती होता. त्याने पुस्तके आणून आणि ती वाचून आपला अभ्यास सुरू ठेवला.  बारा वर्षाचा असतांना त्यांने आपल्या मोठ्या भावाच्या छापखान्यात काम करायला सुरुवात केली आणि अवघा पंधरा वर्षाचा असतांना त्या भागातले पहिले वर्तमानपत्र सुरू केले. ते काम सोडून कांही वर्षे इकडे तिकडे नोकऱ्या केल्या. त्याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने भावाचा छापखाना चालवायला घेतला आणि तो लेखनही करायला लागला. त्याने अनेक वर्तमानपत्रे काढून त्यांची साखळी तयार केली. त्यात लेख लिहून आणि व्यंगचित्रे काढून तो समाजाचे प्रबोधन करत राहिला. तो आपली मते प्रांजलपणे आणि धीटपणे मांडून चांगल्या गोष्टींसाठी आग्रह धरायचा. त्याने अनेक समाजसेवा करणाऱ्या संस्थांमधून समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. एक विचारवंत, प्रतिभाशाली आणि तळमळीने काम करणारा लेखक म्हणून समाजात त्याचा मान वाढत गेला. पोस्टमास्टर जनरल, अमेरिकेचा राजदूत आणि पेन्सिल्व्हानिया राज्याचा अध्यक्ष यासारखी मोठी पदे त्याने भूषवली. इंग्रजांना लढाईत पराभूत करून घालवून दिल्यानंतर अमेरिकेतल्या निरनिराळ्या स्टेट्सनी एकत्र येऊन संयुक्तपणे युनायटेड स्टेट्स असे राष्ट्र उभारावे यासाठी फ्रँकलिनने खूप प्रयत्न करून ते घडवून आणले. यामुळे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन वगैरेंच्या समवेत बेंजामिन फ्रँकलिन याचेही नाव फाउंडर्समध्ये घेतले जाते.

बेंजामिन फ्रँकलिनचे हे सगळे सामाजिक आणि राजकीय काम चाललेले असतांनाच  तो विज्ञानात नवनवे संशोधन करून क्रांतिकारक असे शोध लावून गेला यावरून त्याच्या कर्तृत्वाची कल्पना येईल. विल्यम गिल्बर्टने दाखवून दिलेल्या स्ठिर विद्युतभारावर पुढील शंभर वर्षे हळूहळू संशोधन होत होते. बेंजामिन फ्रँकलिन याने कांच आणि शिशाच्या चपट्या पट्ट्यांपासून विजेचा भार (चार्ज) साठवून ठेवण्याचा एक कपॅसिटर तयार केला. हा भार ऋण (निगेटिव्ह) आणि धन (पॉझिटिव्ह) अशा दोन वेगळ्या प्रकारचा असतो हे सांगितले. या संशोधनासाठी त्याला मानद (ऑनररी) डिग्री मिळाली आणि रॉयल सोसायटीची फेलोशिप (एफ आर एस) दिली गेली. आकाशात चमकणारी वीज आणि स्थिर विद्युत या दोघी एकच असतात असे भाकित करून ते सिद्ध करण्यासाठी त्याने एक प्रयोग करवला. एका पतंगाला वादळी हवेत उंच उडवले गेले. त्याला जोडलेल्या तारेमधून ढगांमधली वीज खाली उतरली आणि तिने ठिणगी पा़डली. त्या विजेचा भार कपॅसिटरमध्ये गोळा करण्याचे प्रयोग सुद्धा त्याने केले. हे करत असतांना विजेचा धक्का बसू नये यासाठी बेंजामिनने पूर्ण काळजी घेतली. तसे प्रयोग करून पाहणारे इतर कांही संशोधक मात्र प्राणाला मुकले. इमारतींवर वीज कोसळू नये यासाठी बेंजामिनने लाइटनिंग रॉड (अरेस्टर) तयार केला.   

बेंजामिन फ्रँकलिनने इतरही निराळ्या प्रकारचे संशोधन केले. अॅटलांटिक महासागरामधील अंतर्गत प्रवाह आणि वारे यांच्यामुळे युरोप ते अमेरिका प्रवास करणाऱ्या जहाजांना कमी अधिक दिवस लागतात हे दाखवून त्यांचा योग्य मार्ग कसा असावा हे सांगितले. वारे आणि तापमान यांच्या त्याने केलेल्या अभ्यासामधून हवामानखाते होण्याला मदत झाली. जोराच्या वाऱ्यात मोठमोठे पतंग उडवून त्यांच्या सहाय्याने माणसांना आणि नौकांना पाण्यातून ओढून नेण्याची कल्पना करून त्यावर प्रयोग केले. लोकसंख्यांमधील वाढीचा अभ्यास करून अमेरिकेत त्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे दाखवले आणि त्याच्या मागची कारणे शोधली.  ख्रिश्चन ह्यूजेन्सने मांडलेल्या प्रकाशाच्या लहरींच्या सिद्धांताला बेंजामिन फ्रँकलिनने उचलून धरले होते, पण न्यूटनच्या प्रभावामुळे त्या काळात तिला मान्यता मिळाली नाही. भिजलेले कपडे घातलेल्या माणसाला कोरडे कपडे घातलेल्यापेक्षा जास्त थंडी वाजते यावरून त्याने थर्मॉमीटरच्या बल्बला ईथरमध्ये भिजवून प्रयोग केले आणि तसा ओला थर्मॉमीटर कमी तापमान दाखवतो हे दाखवून दिले.

बेंजामिन फ्रँकलिनने काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यावर साधक बाधक विचार करतांना दोन्ही बाजूंचे मुद्दे आधी मांडून घ्यावे आणि एक एक करून त्यांची तुलना करावी अशी पद्धत त्याने सांगितली. नाण्यांच्या ऐवजी कागदावर छापलेल्या नोटा वापरण्याचा आग्रह केला, एवढेच नव्हे तर आपल्या छापखान्यात त्या छापून दिल्या. तो चांगला संगीतज्ञ होता, कांही वाद्ये वाजवण्यात पारंगत होता आणि त्याने ग्लास हार्मॉनिका नावाचे एक वाद्य तयार केले.  तो उत्कृष्ट बुद्धीबळपटू होता आणि त्याने त्या खेळावर निबंध लिहिले.  त्याने आयुष्यातली अनेक वर्षे इंग्लंड आणि फ्रान्समध्ये घालवली. तिथे असतांनासुद्धा आपल्या हुषारी आणि कर्तबगारीमुळे त्याला मानसन्मान मिळत गेले. शालेय शिक्षणसुद्धा पूर्ण न केलेल्या बेंजामिन फ्रँकलिनने पुस्तके वाचून, त्यांचा अभ्यास करून आणि संशोधन करून इतके ज्ञान मिळवले, त्यावर अनेक पुस्तके लिहून ते दाखवून दिले की ऑक्सफर्डसारख्या प्रसिद्ध विद्यापीठाने त्याला डॉक्टरेटची मानद पदवी दिली.  त्याचे चित्र असलेली पोस्टाची तिकिटे अमेरिकेमध्ये अनेक वेळा छापली गेली.

असा हा एक अष्टपैलू माणूस एक महान शास्त्रज्ञही होऊन गेला.

Sunday, July 01, 2018

लंबकाचा शोध लावणारा ख्रिश्चन ह्यूजेन्स (किंवा हायगन)ख्रिश्चन ह्यूजेन्स हा महान डच शास्त्रज्ञ साधारणपणे सर आयझॅक न्यूटनचा समकालीन होता. त्याचा जन्म सन १६२९ साली म्हणजे न्यूटनच्या आधी झाला होता. त्यानेसुद्धा न्यूटनप्रमाणेच गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र आणि नैसर्गिक तत्वज्ञान या विज्ञानाच्या शाखांवर संशोधन केले आणि कांही महत्वाचे शोध लावले. लंबकाच्या घड्याळाचा शोध हा त्याच्या नावावरचा सर्वात मोठा शोध असला तरी त्याने केलेले इतर विषयांमधले संशोधनसुद्धा महत्वाचे आहे.

 ख्रिश्चन ह्यूजेन्सचा जन्म हॉलंडमधील एका सधन कुटुंबात झाला. त्याचे वडील एक कूटनीतिज्ञ (डिप्लोमॅट) होते तसेच ते प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि रसिक गृहस्थ होते. त्यांनी  ख्रिश्चनच्या सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची सोय करून दिली. अनेक भाषा, तर्कशास्त्र, गणित, इतिहास, भूगोल वगैरेंबरोबर संगीत, नृत्य, खेळ आणि घोडेस्वारी वगैरे निरनिराळ्या गोष्टी त्याला लहानपणीच शिकायला मिळाल्या. कायदा आणि गणित या विषयांचे शिक्षण घेण्यासाठी त्याला विद्यापीठात पाठवले होते. आपल्यासारखेच त्यानेसुद्धा पुढे कूटनीतिज्ञ व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती, पण ते शक्य झाले नाही आणि ख्रिश्चनलाही त्यात रस नव्हता. तो गणित व विज्ञानाकडे वळला.

त्याने भूमितीमधील कठिण अशी अनेक प्रमेये सोडवली. संभाव्यतेचा सिद्धांत (प्रॉबेबिलिटी थिअरी) मांडून त्या शास्त्राची सुरुवात करून दिली. कुठलीही गोष्ट घडण्याची किती टक्के शक्यता असावी याची त्याने गणिते मांडली आणि माणसाचे सरासरी अपेक्षित आयुष्य (लाइफ एक्स्पेक्टन्सी) किती असते याचा शोध घेतला.  त्या काळात ही गोष्ट पूर्णपणे देवाची इच्छा आणि त्या माणसाचे नशीब यावर सोडलेली होती, पण ह्यूजेन्सला त्यावर शास्त्रीय पद्धतीने विचार करावा असे वाटले.

ह्यूजेन्सने भिंगांच्या आणि आरशांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांच्यातले दोष काढले आणि स्वच्छ प्रतिमा दाखवणाऱ्या एकाहून एक शक्तिशाली दुर्बिणी तयार करवून घेतल्या, तसेच आकाशाचे निरीक्षण करणे सुरू केले.  १६६१ साली एका खास प्रकारच्या दुर्बिणीमधून निरीक्षण करतांना त्याने सूर्यबिंबासमोरून जात असलेल्या लहानशा बुध ग्रहाला पाहिले. अशा प्रकारचे निरीक्षण करून ते सांगणारा तो पहिलाच संशोधक होता. त्याच्याही आधी दुसऱ्या एका शास्त्रज्ञाने शुक्राला सूर्यासमोरून जातांना पाहिले असल्याचे नमूद करून ठेवले होते, पण ते प्रसिद्ध केले नव्हते. ह्यूजेन्सने ते निरीक्षण उजेडात आणले. त्याने शनि या ग्रहाचे निरीक्षण करीत असतांना त्याच्या भोवती पातळशी  कडी आहेत हे पाहिले, तसेच शनि ग्रहाचा टिटान हा एक उपग्रह ओळखला. कोपरनिकसने सांगितलेल्या आणि गॅलीलिओने उचलून धरलेल्या सूर्यमालिकेच्या कल्पनेला  ह्यूजेन्सने केलेल्या अशा निरीक्षणांमधून आधार मिळत जाऊन मान्यता मिळाली.

सर आयझॅक न्यूटन यांच्याप्रमाणेच  ह्यूजेन्सलासुद्धा सायन्स किंवा त्या काळातल्या नैसर्गिक तत्वज्ञानाची मुख्य गोडी होती. आपले सिद्धांत  गणिताच्या आधारे सिद्ध करून सूत्रे आणि समीकरणे यांच्या स्वरूपात मांडण्याचे काम त्याने न्यूटनच्याही आधी सुरू केले होते. त्याने गोल गोल फिरणाऱ्या वस्तूंचा अभ्यास केला आणि वर्तुळाच्या केंद्रबिंदूच्या दिशेने असलेल्या अभिकेंद्री बलामुळे (Centripetal Force) त्या वस्तूला वृत्तीय गति मिळते हे सिद्ध करून त्याचे समीकरण मांडले. न्यूटनचा दुसरा नियमसुद्धा ह्यूजेन्सने वेगळ्या स्वरूपात मांडला होता.  त्याने लंबकाच्या बदलत जाणाऱ्या गतीचाही अभ्यास करून त्याचे गणित मांडले होते, पण न्यूटनने ते सिंपल हार्मॉनिक मोशन या नावाने अधिक व्यवस्थितपणे मांडले.  दोन समान किंवा असमान आकाराच्या वस्तू एकमेकांवर आपटल्या (इलॅस्टिक कोलिजन) तर त्यानंतर काय होईल, त्या वस्तू कोणत्या दिशेने आणि किती वेगाने जातील याचा अभ्यास करून  ह्यूजेन्सने त्याचे नियम गणितामधून मांडले होते.

प्रकाशकिरण ठराविक वेगाने प्रवास करतात असे ह्यूजेन्सने प्रतिपादन केले आणि ते लहरींच्या (वेव्ह्ज) स्वरूपात असतात असेही त्याने गणितामधून मांडले होते, पण ध्वनिलहरींप्रमाणे प्रकाशलहरीसुद्धा लॉंगिट्यूडिनल असाव्यात असे त्याला वाटले होते. त्याच काळात न्यूटनने मांडलेली सूक्ष्म प्रकाशकणांची कल्पना तत्कालिन विद्वानांना अधिक पटली. मात्र शंभरावर वर्षे उलटून गेल्यानंतर ट्रान्सव्हर्स वेव्ह्जच्या स्वरूपातल्या प्रकाशलहरींना मान्यता मिळाली.

ह्यूजेन्सच्या काळापूर्वीपासून यांत्रिक घड्याळे तयार होत होती, पण त्यांचे काटे कमी अधिक वेगाने फिरत असल्यमुळे ती बिनचूक वेळ दाखवत नसत. लंबकांची आवर्तने अचूक असतात हे गॅलीलिओने केलेल्या संशोधनावरून सिद्ध झाले होते. लंबकाच्या या गुणधर्माचा उपयोग घड्याळांसाठी करण्याची कल्पना ह्यूजेन्सला सुचली आणि त्याने त्यावर काम करून त्याने घड्याळाच्या वेळेवर काटेकोर नियंत्रण ठेवणारी प्रणाली तयार करून ती अंमलात आणली.  त्यावर संशोधन करत राहून त्यातल्या त्रुटींवर उपाययोजना केली, त्यासाठी खास प्रकारचे लंबक विकसित केले आणि अत्यंत अचूक अशी घड्याळे तयार केली. लहान घड्याळांसाठी बॅलन्स व्हीलची योजनाही त्यानेच केली. पुढील अडीच तीनशे वर्षे म्हणजे इलेक्ट्रॉनिक घड्याळांचा शोध लागेपर्यंत ह्यूजेन्सने डिझाइन केलेल्या प्रकारची घड्याळेच निर्माण होत राहिली आणि त्यांनी प्रयोगशाळांमध्ये चालत असलेल्या संशोधनकार्यात मोलाचा वाटा उचलला.

ह्यूजेन्सने अशा प्रकारे खूप मोठे सैद्धांतिक (थिअरॉटिकल) तसेच प्रायोगिक (प्रॅक्टिकल) काम करून ठेवले होते, पण तत्कालिन अस्थिर राजकीय परिस्थिती आणि संपर्कसूत्रांचा अभाव यामुळे त्याच्या हयातीत त्याचे त्या मानाने कमी कौतुक झाले किंवा त्याला कमी मान सन्मान मिळाला. नंतरच्या काळातल्या शास्त्रज्ञांना त्याचे महत्व पटत गेले. आधुनिक विज्ञानाचा पाया रचण्यामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता हे मान्य केले गेले.
-------------------------------------