Thursday, November 23, 2023

शाश्वत ऊर्जा

 ऊन, वारा आणि नदीचा प्रवाह या निसर्गातील शक्तींचा उपयोग करून घेऊन आपले जीवन अधिकाधिक चांगले बनवण्याचे प्रयत्न मानव खूप पूर्वीपासून आजतागायत करत आला आहे. पूर्वी  वाऱ्यामधील ऊर्जेवर  शिडाची जहाजे चालत असत, हॉलंडमधले लोक पवनचक्क्यांचा उपयोग पाणी उपसण्यासाठी करत असत, लाकडाचे ओंडके आणि तराफे यांना पूर्वापारपासून नदीच्या पाण्याच्या सहाय्याने पुढे वहात नेले जात असे, मध्ययुगात काही ठिकाणी पाणचक्क्या बसवून त्यांच्या सहाय्याने यंत्रे चालवली जात होती. निसर्गामधील ऊर्जेच्या या साधनांचा उपयोग करून घेण्यासाठी ऊर्जेचे हे स्रोत (सोर्सेस) जिथे आणि जेंव्हा उपलब्ध असतील तेंव्हा त्या ठिकाणी जाऊन तिथेच आपले काम करणे शक्य असते. दुसरी गोष्ट म्हणजे या नैसर्गिक स्त्रोतांवर माणसाचे कणभरही नियंत्रण नसते. जेवढे प्रखर ऊन पडेल, जेवढ्या जोराचा वारा सुटेल आणि ज्या वेगाने पाणी वहात असेल त्यानुसार त्याला आपली कामे करून घ्यावी लागतात. 

अग्नी चेतवणे आणि विझवणे याचे तंत्र मानवाने अवगत करून घेतल्यानंतर ऊर्जेचे हे साधन मात्र त्याला केंव्हाही, कोठेही आणि हव्या तेवढ्या प्रमाणात मिळवणे शक्य झाले. अन्न शिजवणे, खनिजापासून धातू तयार करणे आणि त्यांना तापवून आणि ठोकून हवा तसा आकार देणे अशा अनेक कामांसाठी गरजेप्रमाणे चुली, शेगड्या आणि भट्ट्या वगैरे बांधून आपण आपल्याला गरज असेल तेंव्हा आणि पाहिजे त्या जागी अग्नीचा उपयोग करून घेऊ शकतो. या ऊष्णतेचा उपयोग करून यंत्रांची चाके फिरवता येतात आणि ती यंत्रे चालवून अनेक वस्तूंचे उत्पादन केले जाते. पण ऊष्णता ही ऊर्जासुद्धा जिथे निर्माण केली जाते तिथेच तिचा वापर करावा लागतो.

एका जागी असलेल्या वीजनिर्मितीकेंद्रात (पॉवर स्टेशनमध्ये) मोठ्या प्रमाणावर तयार झालेली वीज तारांमधून कितीतरी दूरपर्यंत नेता येते आणि तितक्या दूरवर पसरलेल्या शेकडो गावांमधल्या हजारो घरातले दिवे, पंखे, यंत्रे  वगैरेंना पुरवता येते.  वीज या प्रकारच्या ऊर्जेचे आणखी एक वैशिष्ट्य असे आहे की  ध्वनी, प्रकाश, ऊष्णता, गतिज ऊर्जा (Kinetic Energy) यांच्यासारख्या ऊर्जेच्या इतर रूपांमध्ये तिचे परिवर्तन करणे सुलभ असते. त्यामुळे मानवाच्या जीवनात क्रांतीकारक बदल झाले. दिव्यांच्या उजेडात रात्री अभ्यास किंवा काम करणे शक्य झाले, कारखान्यांमधली अवजड यंत्रे विजेवर चालतात आणि आपल्याला लागणाऱ्या बहुतेक सगळ्या वस्तू तिथे तयार होतात, विजेवर चालणाऱ्या रेल्वेच्या इंजिनांमुळे प्रवास सुखकर झाला आहे. विजेच्या उपयोगामुळेच टेलिफोन, काँप्यूटर्स, इंटरनेट वगैरे अनंत उपकरणे चालतात, आपले रोजचे जीवन आता जवळजवळ पूर्णपणे विजेवर अवलंबून असते. एकाद्या देशाचा किंवा विभागाचा किती विकास झाला आहे याचे मोजमाप आता तिथे होत असलेल्या विजेच्या वापराशी निगडित झाले आहे.



जगातील विजेच्या उत्पादनातील साठ टक्क्याहून जास्त वीज आज कोळसा, तेल किंवा नैसर्गिक ज्वलनशील वायू ही इंधने जाळून तयार केली जाते. या वीजनिर्मितीकेंद्रांमध्ये इंधन जाळून निर्माण झालेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेने टर्बाइन नावाच्या यंत्राचे चाक फिरवले जाते. त्या चाकाला जोडलेल्या जनरेटरमध्ये वीज तयार होते. पण इंधनाच्या ज्वलनामधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे वातावरणाचे प्रदूषण होते आणि आता हे प्रदूषण इतके वाढले आहे की पृथ्वीवरचे तापमान वाढून सगळ्या जीवसृष्टीवरच भयानक संकटे येण्याची भीती आहे. शिवाय या भूमिगत इंधनांचा मर्यादित साठा कधीतरी संपणारही आहे. यावर जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे आणि औष्णिक वीजकेंद्रांवर कडक बंधने घालण्यात येत आहेत. त्यांची संख्या कमी कमी करत हळूहळू ती शून्यावर आणायचा विचार आहे. पण आजचे जीवन सुरळीतपणे चालवण्यासाठी विजेचा वापरही अत्यावश्यक आहे. म्हणून वीजनिर्मितीचे पर्यायी मार्ग शोधले जात आहेत.  त्यात पुनर्निर्मितीक्षम स्रोतांपासून (रिन्यूएबल एनर्जी सोर्सेसपासून) तयार केल्या जाणाऱ्या शाश्वत ऊर्जेला विशेष महत्वाचे स्थान आहे. या ऊर्जेसाठी लागणारे घटक निसर्गाकडूनच मिळणारे असल्यामुळे ते अनंत काळपर्यंत मिळत रहावेत अशी अपेक्षा आहे.

जलऊर्जा (हैड्रोइलेक्ट्रिक पॉवर) हे शाश्वत ऊर्जेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. यात पाण्याच्या प्रवाहामुळे फिरणारे चाक वीज तयार करते. आभाळातून पडणाऱ्या पावसाचे पाणी धरणांमध्ये येत राहते आणि वीज उत्पादनासाठी धरणामधून खाली सोडलेल्या पाण्याची त्यातून भरपाई होत असते. विजेचे उत्पादन करण्याच्या क्रियेत ते पाणी नष्ट होत नाही. तेच पाणी पुढे कृषी आणि इतर उपयुक्त कामांसाठी वापरता येते. या ऊर्जानिर्मितीत जमीन, पाणी किंवा वातावरणाचे प्रदूषण होत नाही. या प्रकारच्या विजेचे उत्पादन गेली शंभरावर वर्षे होत आले असल्यामुळे त्यामधील तंत्रज्ञान आणि त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री चांगली परिचयाची आहे. पण आतापर्यंत बहुतेक सगळ्या नद्यांवर शक्य असतील तितकी धरणे बांधून झाली आहेत. आणखी नवीन धरणे बांधण्यासाठी जमीन संपादन करणे, त्यामधून विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे यासाठी होणारा प्रचंड खर्च पाहता या क्षेत्रात अधिक वाढ होण्याला मर्यादा आहेत. सध्या जगातले सुमारे सोळा टक्के वीज उत्पादन पाण्यापासून होते, त्यात किती वाढ करता येईल हे पहावे लागेल.

अणूऊर्जा या प्रकारातून सध्या सुमारे दहा टक्के वीजनिर्मिति केली जाते. यात युरेनियम धातूच्या अणूच्या विखंडनातून बाहेर पडलेल्या ऊष्णतेचा उपयोग करून पाण्याची वाफ तयार करतात आणि त्या वाफेवर फिरणारे टर्बोजनरेटर वीज तयार करते. अणूभट्ट्यांमध्ये काही तीव्र किरणोत्सारी द्रव्ये तयार होतात त्यांना सध्या सुरक्षितपणे वेगळे ठेवले जाते, पण त्यांना नष्ट करता येत नाही आणि अपघाताने ती माणसांच्या संपर्कात आली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या भीतीमुळे अणूऊर्जेचा प्रसार बराच काळ मंदावला होता. पण या अणुविद्युतकेंद्रांमधून औष्णिक केंद्रांसारखे विषारी वायू वातावरणात सोडले जात नाहीत  त्यामुळे पर्यावरणाचा विचार करता अणुशक्तीवर पुनर्विचार सुरू झाला आहे आणि कदाचित भविष्यकाळात अशा प्रकारची अधिक केंद्रे बांधली जातील अशी शक्यता आहे. जगामधील युरेनियमचा साठाही मर्यादितच असल्यामुळे तोही कधीतरी संपेलच. त्यामुळे या विजेलाही शाश्वत म्हणता येणार नाही. पण पूर्णपणे शाश्वत ऊर्जेकडे वळेपर्यंत मधली काही दशके अणूऊर्जा आपली विजेची गरज भागवू शकेल आणि तिच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही. 

सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या शाश्वत ऊर्जांच्या दोन प्रकारांवरवर सध्या खूप भर दिला जायला लागला आहे. सूर्याच्या उन्हामधून पृथ्वीवर भरपूर ऊर्जा येत असते. पण त्या ऊर्जेचे विजेत रूपांतर करणे इतके सोपे नसते. आता ते तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहे. सोलर पॅनेल नावाच्या तबकड्यांवर बसवलेले सोलर सेल्स हे रूपांतर करतात. आधी त्यांची किंमत फार जास्त असल्यामुळे ही वीज परवडत नव्हती. आता त्याच्या किंमती आवाक्यात येऊ लागल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा उपयोग करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. पण ही वीज फक्त सूर्यप्रकाशातच तयार होऊ शकते त्यामुळे ती दिवसाच उपलब्ध असते, पण उजेडासाठी तिची रात्री गरज असते. त्यामुळे दिवसा तयार झालेली वीज बॅटऱ्यांमध्ये साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी लागते. तेसुद्धा खूप खर्चिक असते. हे केंद्र दिवसभरातून फक्त काही तासच विजेचे उत्पादन करत असल्यामुळे या केंद्राची कार्यक्षमता कमी असते.

वाहत्या वाऱ्याने फिरणाऱ्या चक्रांमधून पवनऊर्जा तयार केली जाते. पण फक्त काही ठिकाणीच जोरात वाहणारे वारे असतात आणि तेही वर्षातल्या काही काळातच वाहतात. तेवढा वेळच ही वीज निर्मिती होऊ शकते. अशा जागा शोधून काढून तिथे पवनचक्क्या उभ्या करण्याचे काम चालू आहे, पण याला निसर्गाच्याच मर्यादा आहेत. या पवनऊर्जेतसुद्धा मिळेल तेंव्हा वीज तयार करून तिचा वापर इतर वेळी करण्यासाठी व्यवस्था करावी लागतेच. या केंद्रांची कार्यक्षमता कमीच असते.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) नावाचा शाश्वत ऊर्जेचा आणखी एक प्रकार आहे. वनस्पती आणि प्राणिमात्रांची शरीरे ज्या असंख्य सूक्ष्म पेशींपासून बनतात त्यांचे रेणू (मॉलेक्यूल्स) मुख्यतः कार्बन, हैड्रोजन आणि ऑक्सीजन या मूलद्रव्यांनी भरलेले असतात. या सगळ्याला बायोमास असे म्हंटले जाते. झाडांची मुळे, खोडे, फांद्या, पाने. फुले, फळे वगैरे भाग आणि त्यापासून तयार केले जात असलेले कागद व कापड यासारखे कृत्रिम पदार्थ, तसेच प्राणिमात्रांचे मृतदेह, मलमूत्र वगैरे सर्वांचा समावेश या बायोमासमध्ये होतो. हे जैव पदार्थ कुजतात तेंव्हा काही सूक्ष्म जंतू या पदार्थांच्या अवाढव्य रेणूंचे विघटन करून त्यापासून लहान लहान आणि साधे रेणू वेगळे करतात. त्यातून कार्बन व हैड्रोजन यांची मीथेनसारखी वायुरूप संयुगे (काँपौंड्स) निघतात. त्यांना बायोगॅस म्हणतात. या ज्वलनशील वायूला जाळून त्यामधून ऊर्जेची निर्मिती करता येते. हीच जैवऊर्जा झाली. हा बायोगॅस स्वयंपाकघरातला एलपीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस) आणि वाहनांमध्ये भरला जाणारा सीएनजी (काँप्रेस्स्ड नॅचरल गॅस) यांच्यासारखाच असतो. गोबर गॅसच्या स्वरूपात ही ऊर्जा खेड्यापाड्यांमधून उपयोगात आणण्याचे प्रयत्न बरेच वर्षांपासून चाललेले आहेत. अधिक मोठ्या प्रमाणात या गॅसचे उत्पादन करून त्यापासून विजेची निर्मिती केली तर त्यांमुळे भारत विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पण जितका बायोमास आपण जाळू तितकाच नवा बायोमास निर्माण करता येणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन झाडे लावणे आणि त्यांना वाढवणे यांच्यावर लक्ष द्यावे लागेल. ते जमले तरच ही शाश्वत ऊर्जा होईल.  बायोमासच्या ज्वलनामुळेसुद्धा हवेत कार्बन डायॉक्साइड वायू टाकला जाईलच, पण नवीन वृक्षांच्या वाढीत तो शोषला जाईल आणि वातावरणातला समतोल कायम राहील. 

शहरामध्ये रोज गोळा होणारा टनावधी कचरा ही नगरवासियांपुढे असलेली एक मोठी समस्या आहे. त्याचे काय करायचे हेच उमजेनासे झाले नसल्यामुळे तो नष्ट करणे हेच महत्वाचे आहे. अशा वाया जाणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती केली तर त्याचेपासून सुटका होईलच, शिवाय त्यापासून ऊर्जा निर्माण करून तिचा वापर करता येईल. यामुळे शहरांसाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे. बायोगॅसच्या निर्मितीपर्यंत होणारा खर्च नगरविकासाखाली केला (म्हणजे गॅस फुकट मिळवला) आणि त्यापासून पुढे वीजनिर्मिती करण्याचा खर्च वीजग्राहकाकडून वसूल केला तर ती वीज माफक दरात प्राप्त करता येईल. या कारणाने शहरांमध्ये अशा प्रकारे ऊर्जेची निर्मिती करणे गरजेचे आहे. शहरातला नागरिक टाकाऊ जैव वस्तूंचे काहीही करू शकत नाही किंवा त्या साठवूनही ठेवू शकत नाही, त्यामुळे त्यांचा योग्य प्रकारे निचरा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर येते.

पण खेड्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. भाजीची साले, फोलपटे, देठ, पालापाचोळा, उरलेले अन्न, गवत वगैरे गोष्टी तिथे जनावरांना खाऊ घातल्या जातात, त्यांचे शेण आणि उरलेला चुरा, भूसा वगैरेंचासुध्दा खत म्हणून किंवा ज्वलनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे जैव कचऱ्यापासून मुक्ती मिळवणे हा तिथे इतका मोठा प्रश्न नाही. वीजउत्पादन करण्यासाठी भरपूर बायोमासाचा सतत पुरवठा करावा लागेल आणि तो उत्पन्न करण्यासाठी एलेफंट ग्रास, जट्रोपा यासारखी लवकर वाढणारी खास झाडे मुद्दाम लावून वाढवली,  अन्नधान्ये, तेलबिया, ऊस, कापूस, पालेभाज्या, फळफळावळ यासारख्या उपयुक्त पिकांऐवजी शेतात ही झाडे लावली आणि त्यांच्यापासून तेवढेच किंवा जास्त उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा बाळगली तर त्याला लागणारा खर्चसुध्दा विजेच्या उत्पादनखर्चात धरावा लागेल आणि ते केले तर ही वीज केवढ्याला पडेल हे पहावे लागेल.

वीज निर्माण न करताही जैवऊर्जेचा उपयोग पूर्वीपासून रोजच्या जीवनात  केला जात आहेच ते ही थोडे पाहू. सूर्यप्रकाशात झाडांची पाने हवेमधील कर्बद्विप्राणील (कार्बन डायॉक्साइड) वायू ग्रहण करतात आणि त्यामधील कार्बन अणूचा पाणी व इतर क्षारांसोबत संयोग घडवून त्यातून निरनिराळ्या सेंद्रिय (ऑर्गॅनिक) पदार्थांचे अणू तयार करतात. या प्रक्रियेत कर्बद्विप्राणील वायूमधील प्राणवायूचे (ऑक्सीजनचे) हवेत उत्सर्जन केले जाते आणि सूर्यप्रकाशामधील ऊर्जा सेंद्रिय पदार्थांमध्ये सुप्त रासायनिक ऊर्जेच्या (केमिकल पोटेन्शियल एनर्जी) स्वरूपात साठवून ठेवली जाते. हे सेंद्रिय पदार्थ झाडांच्या निरनिराळ्या भागांमध्ये पाठवून देऊन तिकडे ते साठवले जातात. त्यांच्यावरच जगातील इतर सर्व पशुपक्षी, कृमीकीटक, मासे वगैरे सजीवांचे प्रत्यक्ष किंवा परोक्ष रीतीने पोषण होते. या सेंद्रिय पदार्थांचे ज्वलन होत असतांना त्यांच्यामध्ये सुप्त असलेली ऊर्जा पुन्हा प्रकट होते. ही जैव ऊर्जा दोन प्रकारांने उपयोगात आणली जाते. 

वर दिल्याप्रमाणे सेंद्रिय पदार्थ कुजवून त्यातून जैव वायू (बायोगॅस) बाहेर काढून तो जाळणे हा अलीकडील काळातला उपाय आहे. लाकडाच्या किंवा सुकलेल्या पालापाचोळ्याच्या स्वरूपातील त्या पदार्थांनाच जाळून ऊष्णता निर्माण करणे हे माणसाला अग्नीचा शोध लागल्यापासून आजतागायत चालत राहिले आहे. भूगर्भामधील दगडी कोळसा आणि खनिज तेल हेसुध्दा लक्षावधी किंवा कोट्यावधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जगत असलेल्या वनस्पतींपासूनच निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या ज्वलनातून मिळणारी ऊर्जासुद्धा मुळात सौर ऊर्जेपासून तयार झालेली आहे असेही म्हणता येईल. जैव ऊर्जेचा माणसाच्या कामासाठी उपयोग करण्यात तसे काहीच नवीन नसले तरी हा उपयोग अधिकाधिक कार्यक्षम रीतीने करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत.

खेडी आणि लहान नगरे या भागात मुख्यतः स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या चुली, शेगड्या वगैरेंमध्ये सुधारणा करून त्या जास्त कार्यक्षम कशा करता येतात यासाठी प्रयत्न होत आहेत. काही नव्या सुधारणांमुळे इंधनाची बचत होईल, तसेच धुराचा त्रास होणार नाही आणि त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करता येईल असा तिहेरी लाभ होतो. खेड्यांमधील काही महिला जळणासाठी लाकूडफाटा गोळा करणे, शेणाच्या गोवऱ्या थापणे, त्या वाळवणे आणि ते जाळून त्यावर स्वयंपाक करणे यावरच दररोज निदान तीन चार तास घालवतात.  आधुनिक बायोगॅस शेगडीवर त्यांचा सगळा स्वयंपाक एका तासात तयार होऊ शकतो. अर्थातच उरलेल्या वेळात त्या कुक्कुटपालन, दूधदुभते यासारखे कोणतेही दुसरे उत्पादक काम करू शकतात. शिवाय स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाची बचत होते.  परंपरागत पध्दतीच्या चुलीशेगड्यांमध्ये लाकूडफाटा, पालापाचोळा वगैरे जाळल्याने त्यामधील फक्त दहावीस टक्के ऊर्जेचा उपयोग होतो आणि उरलेली बरीचशी ऊर्जा वाया जाते, पण तिच्या लहान लहान चपट्या गोळ्या (पेलेट्स) किंवा कांड्या बनवून त्या खास प्रकारच्या भट्ट्यांमध्ये जाळल्या तर त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो. जैववस्तुमानाचा भुगा करून त्यांना यंत्रात घालून चेपून त्याच्या गोळ्या किंवा कांड्या बनवल्यास त्यांची साठवणूक आणि वाहतूक करणे, तसेच त्यांना शेगडी किंवा भट्टीमध्ये भरणे सोपे जाते आणि ते काम स्वयंचलित यंत्रांद्वारे करता येते.

रसायने, रंग, औषधे वगैरे तयार करणाऱ्या अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांसाठी लागणारी ऊष्णता बॉयलर्समध्ये खनिज तेल जाळून मिळवली जाते. त्यामधील  कमी तपमानावरील ऊष्णता निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग करता येईल. उन्हात ठेवलेल्या विशिष्ट प्रकारच्या नळ्यांमध्ये पाणी तापवून ते तप्त पाणी पुरेशा आकारांच्या पात्रांमध्ये (ड्रम्समध्ये) साठवायचे आणि ऊष्णता विनिमयस्कांद्वारे (हीट एक्स्चेंजरमार्गे) त्यामधील ऊष्णता संयंत्राला पुरवायची असे करता येते. आजकाल काही वसाहतींमध्ये गच्चीवर असे संयंत्र बसवून रहिवाशांना आंघोळीसाठी गरम पाणी नळातून पुरवले जाते. 

आता काही खाजगी कंपन्या आणि सेवाभावी संस्था अपारंपरिक ऊर्जेकडे गंभीरपणे लक्ष देऊ लागल्या आहेत. यातून नफा मिळवणे हा खाजगी कंपन्यांचा उद्देश असतो आणि निदान 'ना नफा ना तोटा' या तत्वावर सेवाभावी संस्था चालवणे आवश्यक असते. त्यामुळे त्यांचे प्रयत्न व्यावहारिक (प्रॅक्टिकल) असण्याची अधिक शक्यता असते. पण अपारंपरिक ऊर्जेसंबंधीच्या प्रत्येक बाबतीत  आज तरी 'अनुदान', 'सहाय्य' किंवा 'कायद्यानुसार करावी लागणारी गोष्ट' अशा प्रकारचे उल्लेख येतात. या अपारंपरिक ऊर्जा असल्या कुबड्यांवर अधिक काळ किंवा मोठ्या प्रमाणात उभ्या राहू शकणार नाहीत. सौर ऊर्जेपासून वीज तयार करण्यासाठी लागणारी सोलर पॅनेल्स किंवा पवनचक्कीमधील यंत्रसामुग्री यांचे उत्पादन करण्यासाठी आधी खूप ऊर्जा खर्च करावी लागते. ती ऊर्जा अन्य स्वस्त मार्गाने तयार करूनसुध्दा आपण स्वस्त दरात सौर किंवा वायुऊर्जा निर्माण करू शकत नसू तर त्याला फारसा अर्थ उरत नाही. फक्त सौर किंवा वातऊर्जेचाच वापर करून जर आपण त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार करू शकलो आणि तिचा उपयोग करून मिळणारी वीज वाजवी भावात मिळाली तरच हा पर्याय खऱ्या अर्थाने स्वावलंबी म्हणता येईल आणि शाश्वत ठरेल. औष्णिक ऊर्जेला ठाम नकार दिला तर भविष्यकाळात हे होऊ शकेल.

जैवऊर्जा (बायोएनर्जी) या बाबतीत बरीच आशादायी वाटते. स्वयंपाकघरात होत असलेल्या ज्वलनाच्या पारंपरिक पध्दतींमध्ये सुधारणा करून त्यातून ऊर्जेची बचत करणे आणि प्रदूषण कमी करणे हे तर उपयुक्तच नव्हे तर अत्यंत आवश्यक आहे आणि ते शक्य होत आहे असे दिसते. युकॅलिप्टस किंवा सुबाबूळ ही जलद वाढणारी झाडे मोठ्या प्रमाणावर लावून आणि योजनाबध्द पध्दतीने त्यांची कापणी करून त्यापासून संततऊर्जा निर्माण करण्याची स्वप्ने वीस काही दशकांपूर्वी पाहिली गेली होती. पण त्याबाबतीत निराशाच पदरी आली हा ताजा इतिहास आहे. त्यामुळे सुपीक जमीनीवर वृक्षांची लागवड करून त्यामधून ऊर्जा मिळवत राहण्याची कल्पना आजच्या घटकेला तितकीशी व्यवहार्य वाटत नाही. पण खनिज तेलाची उपलब्धता कमी होत गेली आणि त्याच्या किंमती अशाच वाढत गेल्या तर मात्र लवकरच जैवऊर्जा तुलनेने वाजवी भावात मिळू लागेल. टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून ऊर्जा निर्माण करणे तर नक्कीच लाभदायक आहे. त्याच्या मार्गात येणारे गैरतांत्रिक (नॉनटेक्निकल) अडथळे दूर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजाच्या प्रबोधनाची गरज आहे. 

या सगळ्याच्या सोबतीला किंवा अधिक अग्रक्रम देऊन रोजच्या जीवनात ऊर्जेचा वापरच कमी करून तिची शक्य तितकी बचत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्व अनावश्यक वापरावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. 

----

मी हा लेख विज्ञानधारा या मासिकासाठी लिहिला होता. तो या मासिकाच्या दिवाळी विशेषांकात (ऑक्टोबर नोव्हेंबर २०२३) प्रसिद्ध झाला आहे.