Tuesday, September 03, 2024

प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी


इंग्रजांनी भारतात जी शिक्षणपद्धति सुरू केली होती त्यात मराठी, कानडी यासारख्या स्थानिक भाषांमधून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या व्हर्नाक्युलर स्कूल्सपासून ते उच्च शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटीजपर्यंत एक मनोरा उभारला होता. युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ हा त्यातला सर्वात वरचा मजला होता. त्या काळात पहिली चार वर्षे मराठी प्राथमिक शाळा शिकल्याानंतर इंग्रजी शाळेत प्रवेश मिळत असे. ज्यांना इंग्रजी शिकायचे नसेल त्यांच्यासाठी सलग सात वर्षे मराठी शाळेत शिकल्यानंतर व्हर्नाक्युलर फायनल नावाची परीक्षा दिली की त्यांचे शालेय शिक्षण संपत असे. इंग्रजी शाळेत सात वर्षे शिकल्यानंतर मॅट्रिक्युलेशनची परीक्षा असे. ती पास करणे फार कठीण समजले जात असे आणि मॅट्रिक पास झालेल्यांना सरकारी नोकरी मिळत असे. ज्यांना ही पायरी ओलांडता आली नाही ते लोक नॉनमॅट्रिक अशी पदवी लावून घेत असत. मॅट्रिक पास झालेल्या विद्यार्थ्यांमधले थोडे विद्यार्थी कॉलेजमध्ये प्रवेश घेत असत आणि एफवाय, इंटर, टीवाय अशा पायर्‍या चढून अखेर ग्रॅज्युएट होत असत. शंभर वर्षांपूर्वीच्या काळात बहुतेक लोक बीए हीच पदवी घेत असत. बीए पास झालेले लोकही अभिमानाने आपल्या नावापुढे बीए ही पदवी लावत असत. थोडे विद्यार्थी विशिष्ट कॉलेजांमध्ये शिकून डॉक्टर, वकील वगैरे होत असत. या सगळ्या परीक्षा युनिव्हर्सिटीज घेत असत. फारच थोडे हुषार विद्यार्थी त्यानंतर युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन एमए, पीएचडी वगैरे उच्च पदव्या घेत असत.

इंग्रजांच्या काळात त्यांनी मुंबई,  कलकत्ता, मद्रास अशासारख्या काही मोठ्या शहरांमध्ये युनिव्हर्सिटीज स्थापन केल्या होत्या आणि त्यांना त्या शहरांची नावे दिली होती. ती अजूनही तशीच राहिली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रात पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ यासारखी अनेक नवी विद्यापीठे स्थापन झाली. अलीकडच्या काळात अनेक कॉलेजांना डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाल्यामुळे आता देशात एक हजारांपेक्षा अधिक विद्यापीठे झाली आहेत. 

 मी कॉलेजच्या शिक्षणासाठी मुंबईला आलो तेंव्हा तिथली राजाबाई टॉवरच्या नावाने प्रसिद्ध असलेली फोर्ट भागातली प्राचीन इमारत पाहिली होती.  तिच्या आजूबाजूला इतर मोठमोठ्या इमारती होत्या, त्या आवारात कँपससाठी मोकळी जागा नव्हती. कित्येक वर्षांनंतर सांताक्रूझजवळ कलीना भागात मुंबई विद्यापीठाचे प्रशस्त कँपस बांधण्यात आले. मी इंजिनियरिंग शिकायला पुण्याला आलो तेंव्हा तिथले गणेशखिंडीतले विद्यापीठ पाहिले. ते सुरुवातीपासूनच खूप विस्तीर्ण भागात एका वनराईत पसरलेले होते. आता या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. आमच्या पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजलाच आता विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.  गुजरातमधील गांधीनगरजवळ पंडित दीनदयाल उपाध्याय एनर्जी युनिव्हर्सिटी आहे. मला एकदा तिथे जाऊन काही व्याख्याने देण्याचा योग आला होता. एवढी सोडून भारतातली आणखी कुठली विद्यापीठे मी आतून पाहिल्याचे आठवत नाही.

 एका विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रामध्ये अनेक कॉलेजेस असतात असा माझा इथला अनुभव होता. मी अमेरिकेत पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा तिथे रस्त्यावरून जातायेतांना एकाच  शहरामध्ये अनेक युनिव्हर्सिटीजच्या पाट्या पाहिल्या, पण त्या मानाने कॉलेजेसच्या कमी पाट्या पाहिल्या. तिकडे कशाला स्कूल म्हणतात, कशाला कॉलेज म्हणतात आणि कशाला युनिव्हर्सिटी म्हणतात याचे एक गौडबंगाल मला तेंव्हा वाटले आणि ते अजूनही पूर्णपणे समजलेले नाही. 

मी मागच्या वर्षी  न्यूजर्सीमध्ये रहात असतांना एकदा त्या भागातली सुप्रसिद्ध प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी पहायला गेलो होतो. भारतात ब्रिटिश राजवट सुरू होण्याच्याही आधी आणि जेंव्हा अमेरिकेत  ब्रिटिशांचे राज्य होते त्या काळात म्हणजे इसवी सन १७४६मध्ये न्यूजर्सी भागात एक कॉलेज सुरू झाले होते. पुढे रक्तरंजित क्रांति होऊन अमेरिकेतली काही संस्थाने स्वतंत्र झाली आणि त्यांनी अमेरिकन संघराज्य (यूएसए) स्थापन केले.  त्यानंतर सन १८९६मध्ये त्या कॉलेजचे रूपांतर होऊन प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी स्थापन झाली. ती आजतागायत यशस्वीपणे चालत आली आहे आणि अमेरिकेतली एक प्रतिष्ठित शिक्षणसंस्था  म्हणून नावारूपाला आली आहे. या विद्यापीठातील अनेक शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे आणि इथे शिकलेले विद्यार्थी निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर जाऊन पोचले आहेत.  

आपल्याकडे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंचे सहा सोहळे साहित्यामध्ये रंगवले गेले आहेत, पण प्रत्यक्षात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा (थंडी) हे तीन ऋतु चांगले जाणवतात.  अमेरिकेत स्प्रिंग, समर, ऑटम किंवा फॉल आणि विंटर असे चार सीझन्स सांगतात, त्यातले समर आणि विंटर हेच मुख्य असतात आणि बाकीचे दोन संधीकाल आहेत. मी जून महिन्यात अमेरिकेला गेलो तेंव्हा पुण्यात पावसाळ्याला नुकतीच सुरुवात होत होती तर अमेरिकेतला स्प्रिंग सरून समर हळूहळू रंगात येत होता. सगळीकडे हिरवीगार झाडे आणि गवत पसरले होते आणि विपुल प्रमाणात फुलांना बहर आल्यामुळे प्रसन्न वातावरण होते. इथल्या मानाने बराच गारवा होता त्यामुळे तिथे गेल्यावर उन्हात बसायला मजा वाटत होती आणि मी आमच्या बागेतच खुर्च्या ठेऊन दिवसातला बराच वेळ तिथे घालवत होतो. तिथे पावसाळा असा वेगळा ऋतु नसतो, वर्षभरात केंव्हाही पावसाची सर येते आणि थांबून जाते. अर्थातच पाऊस आला की मी घरात येत होतो. काही दिवस असे गेल्यानंतर एकदा सलग चारपाच दिवस रोजच कमालीचे ढगाळ वातावरण असायचे आणि अधून मधून पावसाची पिरपिर सुरू व्हायची असे झाले. त्यानंतर वीकएंडला एकदम निरभ्र आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला. त्यामुळे आम्हालाही घराबाहेर पडून फेरफटका मारायला उत्साह आला.


मी मुलासह त्याच्या गाडीत बसलो, आम्ही दक्षिणेच्या दिशेने प्रयाण केले आणि तासाभरात प्रिन्स्टनच्या परिसरात जाऊन पोचलो. जीपीएसने आम्हाला त्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोचवून आमचे गन्तव्य स्थान आले असल्याची खबर दिली. पण आता तिथे गाडी कुठे उभी करायची हा प्रश्न पडला. आजकाल पुण्यातही हा प्रश्न पडतो, अमेरिकेत तर कुठल्याही रस्त्याच्या कडेला मोटारगाडी उभी करणे हा एक मोठा गुन्हा समजला जातो, त्याला जबर दंड असतो आणि तो भरायला कुणीही तयार होत नाही. आम्ही पार्किंग प्लेसच्या शोधात इकडे तिकडे हिंडत असतांना एका गल्लीतल्या एका इमारतीच्या तळघरात जागा सापडली. तिथे गाडी उभी करून आम्ही बाहेर पडलो आणि त्या गल्लीच्या खाणाखुणा बघून ठेऊन मी आपली काठी टेकत टेकत विद्यापीठाकडे चालायला सुरुवात केली.



चारपाच दिवसांनंतर उघडीप मिळाल्यामुळे तिथेही सगळ्याच लोकांना घराबाहेर पडून त्या प्रसन्न हवेत फिरण्याचा उत्साह आला होता. रस्त्यांवर तर मोटारीची ही गर्दी होतीच, तिथल्या पदपथावरही लोकांचे घोळके रमतगमत फिरतांना दिसत होते. त्यात बरेचसे तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दिसत होत्या, तसेच मध्यमवयीन आणि माझ्यासारखे उतारवयातले अनेक लोकही दिसत होते.  ते कदाचित त्या विद्यार्थ्यांचे आप्तस्वकीय असतील, तिथले प्राध्यापक किंवा शास्त्रज्ञ असतील, गावातले रहिवासी असतील किंवा आमच्यासारखे पर्यटक असतील. त्यांच्यामध्ये काळे, गोरे, करडे, पिवळे अशा सगळ्या रंगांची सरमिसळ होती. दर चार पाच लोकांमधला एक तरी दक्षिण आशियातला म्हणजे भारतीय उपखंडातला दिसत होता, तसेच एक तरी पूर्व आशियातला म्हणजे चीन, जपान, कोरिया या भागातला होता आणि दहा बारांमधला एखादा कृष्णवर्णीय आफ्रिकन होता. त्यामुळे आपण मुख्यतः गोऱ्या इंग्रजांच्या देशात आलो आहोत असे वाटत नव्हते. तो एक आंतरराष्ट्रीय मेळावा वाटत होता.


विद्यापीठाच्या परिसरात शिरताच तिथले वेगळेपण जाणवते. सगळीकडे रुंद अशा फरसबंद वाटा होत्या आणि त्यांच्या बाजूला हिरवेगार लॉन पसरलेले होते. मध्ये मध्ये सावली देणारे डेरेदार वृक्ष होते.  काही खूपच जुन्या दगडी इमारती होत्या तर काही त्या मानाने नव्या विटांच्या किंवा सिमेंट कॉंक्रीटच्या इमारती होत्या.  त्या पदपथांवरून आणि गवतावरूनसुद्धा मुलामुलींचे घोळके गप्पा मारत किंवा एकटीदुकटी मुले सावकाशपणे तिकडे तिकडे चालत होती, कुणी हातात एक पुस्तक किंवा सेलफोन धरून ते पहात लॉनवर ऐसपैस बसली होती.


तिथली बहुधा सर्वात जुनी इमारत दोन अडीचशे वर्षांपूर्वी बांधलेली असेल. त्या दगडी इमारतीच्या भिंतीवर अनेक सुबक पुतळ्यांमधून काही दृष्ये दाखवली होती. ती कदाचित बायबल किंवा तत्सम धार्मिक पोथ्यांमधल्या घटनांची असावीत. तिथे मोठमोठ्या अक्षरांमध्ये कोरलेला मजकूर कुठल्या भाषेत लिहिला आहे हेच आम्हाला समजत नव्हते, त्यामुळे त्याचा काहीच बोध झाला नाही.

    


तिथली मुख्य वाटणारी चार मजली दगडी बिल्डिंग जुन्या काळातल्या इमारतींचा नमूना आहे. तिच्या प्रवेशद्वारापाशी एक सिंहांची जोडी रखवाली करतांना दाखवली आहे. मधोमध उंच मनोरा आहे. या इमारतीच्या तळाशी लावलेल्या वेली भिंतींवरून वाढत वाढत चौथ्या मजल्यापर्यंत पोचल्या आहेत आणि त्यांनी संपूर्ण भिंतीला हिरव्या गार पानांनी झाकून टाकले आहे. असे दृष्य क्वचितच पहायला मिळते.  दुसऱ्या एका बिल्डिंगवरही मोठा चौकोनी मनोरा आहे. 

प्रिन्स्टन विद्यापीठाच्या आवारात प्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याचे  Oval with points नावाचे एक खूप मोठे अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) शिल्पही उभे करून ठेवले आहे. शिल्पकाराला त्या शिल्पामधून नेमके काय सुचवायचे आहे हे सुध्दा समजत नाहीच. ते पहायला येणारे लोक त्याच्या बाजूला उभे राहून किंवा आत बसून संस्मरणीय फोटो काढून घेत होते.


त्या भागातून फिरत असतांना रस्त्यातच एका अभ्यासू मुलाचे छान शिल्पही दिसले. हा पुतळा या विद्यानगरीला साजेसाच होता.