न्यूयॉर्क या अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध शहराचे नांव मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो होतो. सगळ्यांनीच ते ऐकलेले असते. या 'नवीन यॉर्क'चे नांव मूळच्या ज्या गांवाच्या नांवावरून ठेवले गेले ते जुने 'यॉर्क' कोठे असेल याबद्दल मनात कुतूहल वाटत होते. क्रिकेटच्या बातम्यांमध्ये 'यॉर्कशायर' नांवाच्या कौंटीचा उल्लेख यायचा. पण 'यॉर्क' या नांवाच्या गांवाची बातमी मात्र कधी वाचनात आली नव्हती. लीड्सला गेल्यावर आपण यॉर्कशायरमध्ये आलो असल्याचे समजले आणि 'यॉर्क' बद्दलचे कुतूहल अधिकच वाढले. आता प्रत्यक्ष तिथे जाऊन पहाणे आवश्यक होते तसेच ते सहज शक्य होते.
लंडनच्या उत्तरेला सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर 'यॉर्क' हे शहर आहे. 'यॉर्कशायर' हा परगणा बराच लांब रुंद पसरला आहे. औद्योगीकरण आणि व्यापार यांमुळे गेल्या तीन चार शतकांत इतर शहरांची झपाट्याने वाढ झाल्यामुळे ती आता अधिक प्रसिद्ध झाली आहेत आणि यॉर्क हे शहर आता मुख्यत्वे पर्यटनस्थळ बनले आहे. या शहराच्या जुन्या भागाचे ऐतिहासिक स्वरूप जाणीवपूर्वक राखून ठेवले आहे, तसेच पर्यटकांसाठी खास सुविधा व आकर्षणे तिथे निर्माण केली आहेत.
इसवी सनाच्या पहिल्याच शतकात रोमन साम्राज्याने इंग्लंडवर कब्जा मिळवला होता त्या वेळेस यॉर्क येथे आपले ठाणे प्रस्थापित केले होते. त्यानंतर रोमन सैनिक व सेनापती येथे येत राहिले. चौथ्या शतकात येथे आलेल्या कॉन्स्टन्टाईन याने यॉर्क इथूनच आपल्या सम्राटपदाची घोषणा केली आणि रोमला जाऊन सत्तेची सूत्रे हातात घेतली असे सांगतात. त्याने पुढे रोमन साम्राज्याचा अधिक विस्तार केला आणि कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर वसवले.
सातव्या का आठव्या शतकात नॉर्वे स्वीडनकडून व्हायकिंग लोक समुद्रातून या भागात आले. इथले हवामान त्यांना आवडले आणि मानवले यामुळे ते इथेच स्थायिक झाले. यॉर्क इथे त्यांनी भक्कम तटबंदी बांधून एक गढी बनवली. आजूबाजूचा बराच प्रदेश जिंकून घेऊन त्यांनी तेथे आपला अंमल सुरू केला. कित्येक शतके त्यांची राजवट तिथे होती आणि यॉर्क ही त्या प्रदेशाची राजधानी होती. हळूहळू वांशिक संकर होऊन त्यांचे वेगळे 'व्हायकिंग'पण राहिले नाही. तसेच इंग्लंडच्या बलाढ्य राजाने त्यांचे राज्य आपल्या राज्यात विलीन करून घेतल्यानंतर यॉर्कशायर हा एक परगणा उरला.
लीड्सहून यॉर्क अगदी जवळ आहे, तसेच दर दहा पंधरा मिनिटांनी तिथे जाणा-या रेल्वेगाड्या आहेत. इंग्लंडमध्ये रेल्वेचे खाजगीकरण झाले असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या तिथल्या रुळावरून धांवत असतात. त्यामुळे आपल्याला हवे तेंव्हा लीड्सहून यॉर्कला जाता येते. तिथे तिकीटांचे दर ठरलेले नसतात. कामाचा दिवस किंवा सुटीचा दिवस, सकाळची, दुपारची किंवा रात्रीची वेळ याप्रमाणे ते बदलत असतात. आयत्या वेळी तिकीट काढले आणि 'रश अवर' असेल तर ते सर्वात महाग पडते. त्यामुळे मला तरी गर्दीने भरलेल्या गाड्या कधीच दिसल्या नाहीत. दोन चार दिवस आधी तिकीट काढले तर त्यात अनेक प्रकारच्या 'डील्स' मिळतात. घरबसल्या इंटरनेटवरून बुकिंग करता येते आणि तिकीट देणा-या यंत्रामधून क्रेडिट कार्ड वापरून हवे तेंव्हा ते तिकीट छापून मिळते. आम्हीही सुटीचा दिवस पाहून यॉर्कला जाण्याचा प्रोग्रॅम आंखला आणि सोयिस्कर वेळेला जाण्यायेण्याची तिकीटे काढून ठेवली.
इंग्लंडमधल्या रेल्वेगाडीचा सामान्य दर्जाचा डबाच आपल्या राजधानी एक्सप्रेसच्या चेअरकारच्या तोडीचा असतो. त्याहून वेगळा वरच्या दर्जाचा डबा असला तरी मी कांही तो कधी पाहिला नाही. सर्वसामान्य गाड्यांना वेगवेगळ्या दर्जाचे डबे नसतातच. जवळच्या अंतरासाठी धावणा-या गाड्याच मुळी फक्त दोन किंवा तीन डब्यांच्या असतात. त्यांना वेगळे इंजिन नसते. मुंबईच्या लोकल ट्रेनप्रमाणे एक लहानशी केबिन असते. तिथे प्रत्येकाच्या घरी माणशी एक कार असतांना रेल्वेने जाणारे लोक थोडेच असतात. लंडन ते एडिंबरो अशा लांब टप्प्याच्या गाड्या मात्र मोठ्या म्हणजे दहा बारा डब्यांच्या असतात. भारतात दिसतात तसल्या वीस पंचवीस डब्यांच्या गाड्यांची तिथे गरज नाही.
तिकीटात दाखवल्याप्रमाणे आम्हाला दिलेल्या डब्यात आणि स्थानांवर आम्ही जाऊन बसलो. पण आजूबाजूला दुसरे तिसरे कोणी आलेच नाही. गाडीत गर्दी अशी नव्हतीच. हवेत थंडी असल्यामुळे आम्ही जरी स्वतःला कपड्यांमध्ये गुरफटून घेतले असले तरी धुके निवळले असल्यामुळे बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. लीड्सपासून यॉर्कपर्यंतचा प्रवास अवघ्या अर्ध्या पाऊण तासात होतो. तेवढा वेळ इंग्लंडमधले रम्य 'कंट्रीसाईड', तिथली गालिच्यांसारखी पसरलेली यांत्रिक शेती, हिरवे गार डोंगर आणि त्यांच्या उतारावरले गवत, त्यात चरणारी मेंढरे, क्वचित दिसणारी गायी, गुरे वगैरे पाहिली आणि ईशा व इरा यांना ती दाखवली. यॉर्क स्टेशनात पोचलो तेंव्हा हवेत खूप गारठा होता. त्यामुळे स्टेशनाच्या इमारतीतच असलेल्या रेस्तरॉँमध्ये बसून न्याहरी केली आणि यॉर्क शहराचा फेरफटका करण्यासाठी बाहेर पडलो.
. . .. . . . . . . . . . . . .. . (क्रमशः)
1 comment:
waiting for continued part .. :) simple yet intresting articles abt travel ... !
Post a Comment