Saturday, February 28, 2015

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन (उत्तरार्ध)

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे हे सुश्राव्य कीर्तन एका शिवमंदिरात चाललेल्या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये चालले होते. विठ्ठलभक्त वारकरी सांप्रदायातले बाबामहाराज आज शिवलीलेच्या कोणत्या कथेचे आख्यान लावणार आहेत याची मला उत्सुकता वाटत होती. पण कीर्तन सुरू झाल्यानंतर काही वेळाने लक्षात आले की हरिनाम हाच त्यांच्या या कीर्तनाचा विषय होता. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" अशा प्रकारे त्यात शंकराचा नावापुरता उल्लेख आला होता. कुठल्याही देवाचे किंवा परमेश्वराचे नाव घेणे का आवश्यक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी वळणावळणाचा मार्ग निवडला होता.

आपल्या डोळ्यांना देव दिसत नाही म्हणून काही लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, पण जगातल्या सगळ्याच गोष्टी डोळ्यांना दिसतातच असे नाही या सत्याचा आधार घेऊन त्यातून देवाचे अस्तित्व पटवून देण्याचे अनंत तर्क सांगितले जातात. आपल्या आजूबाजूच्या हवेपासून ते प्राध्यापकाच्या मेंदूपर्यंत याची अनेक उदाहरणे मी आजवर ऐकली आहेत. "आपल्याला हवा दिसते का? पण ती असते हे आपल्याला माहीत आहे. याचप्रमाणे देव डोळ्यांना दिसत नसला तरी तो असतो.", "आपल्या या (नास्तिक) प्रोफेसराचा मेंदू कुणी पाहिला आहे का? नाही ना? मग कशावरून त्याच्या डोक्यात मेंदू आहे?" वगैरे वगैरे. बाबामहाराजांनी त्यांच्या कीर्तनात एक वेगळे उदाहरण दिले. ते म्हणाले, "मी आज तुम्हा सगळ्यांना पाहतो आहे, तुमच्यातल्या कुणाच्याच बापाला मी कधी पाहिले नसेल, पण त्यांच्या असण्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे, त्याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही. मग ज्या देवाने सर्व जगाला जन्माला घातले त्याच्याबद्दल कोणाला का शंका असावी?"

बापावरून सांगतांना बापाचे नाव न घेतल्याने एकदा काय घोटाळा झाला याची एक गोष्ट त्यांनी सांगितली. एका माणसाचे त्याच्या म्हाता-या बापाशी पटत नव्हते. एकदा त्या दोघांमध्ये खडाजंगी वाद झाला आणि "आता मी तुमचे नावदेखील लावणार नाही बघा." असे तणतणत ते माणूस घराबाहेर पडला आणि ऑफीसला गेला. तो नेमका पगाराचा दिवस होता. पगार घेण्यासाठी तो माणूस कॅशियरकडे गेला. कॅशरने त्याला सही करायला सांगितले. त्याने त्याच्या सहीमघले बापाचे नाव गाळून सही केली. कॅशियरने त्याला पैसे दिले नाहीत. त्याची सही रेकॉर्डशी मॅच होत नाही असे म्हणाला. तो माणूस तणतणला, कॅशियरशी भांडला, "इथे माझा बाप काम करतो का? मी केलेल्या सामाचे पैसे मला मिळायला नकोत का?" वगैरे वगैरे. कॅशियरने नियमांवर बोट ठेवले आणि आपण त्यात बदल करू शकत नसल्याचे सांगितले.

तो माणूस चिडून मोठ्या बॉसकडे गेला, त्याच्याकडे कॅशियरची तक्रार केली. बॉसने त्याला त्याचे नाव विचारताच त्याने पुन्हा बापाचे नाव वगळून फक्त आपले नाव व आडनाव सांगितले. त्यावर साहेबाने त्याला समजावले, "हे पहा, तू नोकरीला लागलास त्या वेळी आपले पूर्ण नाव दिले होतेस आणि तशी सही केली होतीस. तुझ्या सगळ्या प्रमाणपत्रांमध्ये (सर्टिफिकेट्समध्ये) तुझे तेच पूर्ण नाव लिहिलेले आहे. यामुळे तुझी हीच अधिकृत ओळख (आयडेंटिटी) आहे. तुझ्या आयडेंटिटी कार्डवर हेच नाव आणि सही आहे. तुझे नातेवाईक, जुने शेजारी, गावातले लोक तुला अमक्या माणसाचा मुलगा म्हणून ओळखतात. तू बापाचे नाव टाकलेस तरी तुमचे नाते नाहीसे होणार नाही. तुझी आतापर्यंतची ओळखच शिल्लक राहील. ती नको असेल तर तुला ही नोकरी, हे गाव वगैरे सोडून दूर कुठे तरी जावे लागेल. त्यापेक्षा हा हट्ट सोड आणि नीट सही करून तुझा पगार घेऊन जा."

हे सांगून बाबामहाराज म्हणाले, "पाहिलेत? आपल्या बापाचे नाव सोडले तर त्या माणसाचा पगार थांबला, नोकरीवर गदा आली. त्यातून त्यालाच राग आला, दुःख झाले, मनस्ताप झाला. त्याने ते घेतले आणि त्याला पुन्हा सगळे मिळाले, त्याचे मन शांत झाले. तुम्ही देवाचे नाव घेतले नाही म्हणून तो नाहीसा होणार नाही, तरीसुद्धा तो तुमची काळजी वहातच राहणार आहे, पण त्याचे नाव घेतलेत तर तुम्हालाच अपूर्व मनःशांती मिळणार आहे.."

हा धागा धरून त्यांनी आपली कथा मूळपदावर आणली आणि पुढले निरूपण चालू ठेवले. "शिव हालाहले तापला। नामे तोही शीतल झाला।।" या अभंगाचा संदर्भ एका पौराणिक कथेशी आहे. समुद्रमंथनाच्या वेळी मेरू पर्वताची रवी करून तिला वासुकी नागाची दोरी गुंडाळली. एका बाजूला देव आणि दुस-या बाजूला दानव यांनी तिला धरून क्षीरसमुद्रात चांगले घुसळले. या मंथनात समुद्रामधून चौदा रत्ने बाहेर निघाली. हलाहल विष हे त्यातले एक होते. देव आणि दानव यांच्यापैकी कोणीच ते घ्यायला तयार नव्हते. त्या जालिम विषाने सगळी सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता. त्या वेळी सर्वांनी भगवान शंकराची आराधना केली. ते प्रगट झाले आणि त्यांनी ते विष प्राशन केले. त्या विषाच्या प्रभावामुळे त्यांचा गळा निळा पडला म्हणून शंकराला नीलकंठ असेही म्हणतात. ही सगळी कथा थोडक्यात सांगून कीर्तनकारांनी पुढे सांगितले की या वेळी नीलकंठ शंकराच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो कसा थांबवावा यावर त्यांना नामसंकीर्तनाचा उपाय सापडला. श्रीराम श्रीराम श्रीराम असा जप केल्याने त्यांना शीतलता प्राप्त झाली म्हणे. इतक्या भयंकर प्रसंगावर जर जप करण्याने मात करता येत असेल तर आपल्या जीवनात आपल्याला डिस्टर्ब करणा-या लहान सहान कारणांवर ही मात्रा खचित लागू पडणार नाही का? असा युक्तीवाद त्यांनी केला.

शंकराने हा मंत्र सुरुवातीला कोणालाही न सांगता आपल्याजवळच ठेवला होता, पण जगाच्या कल्याणासाठी तो सर्वांना कळणे आवश्यक होते. हे कसे झाले याची एक कथा बाबामहाराजांनी सांगितली. शंकरभगवान कैलास शिखरावर एकांतात बसून हा जप करायचे आणि त्यातून त्यांना अपूर्व आनंद मिळायचा हे एकदा नारदमुनींनी पाहिले आणि त्यांच्या संवयीप्रमाणे कळ लावायचे ठरवले. त्यांनी पार्वतीकडे जाऊन तिला विचारले, "तुमचा नवरा तुमच्यावर खरेच प्रेम करतो का हो?"
पार्वती म्हणाली, "अर्थातच. तुम्हाला अशी शंका का आली?"
"तसे नाही, पण तुम्ही एकदा त्याची परीक्षा करून पहाल का?"
"त्यासाठी मला काय करायला हवे?"
"त्यांना विचारा की त्यांना कशामधून सर्वात जास्त आनंद प्राप्त होतो. ते ही गोष्ट सांगतात का? हे पहा."
शंकर भगवान परत आल्यानंतर पार्वतीने त्यांना हा प्रश्न विचारला. शंकराला नामस्मरणाचे गूढ गुप्तच ठेवायचे होते. त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्या दोघांची जुंपली. अखेर शंकराने हार मानली आणि हा मंत्र पार्वतीला सांगितला. तिथून तो सर्वांमुखी झाला.

ही गोष्ट सांगतांना बाबामहाराजांनी पदोपदी काँटेंपररी (आजच्या काळातली) उदाहरणे देऊन त्यात रंजकता आणली. समुद्रमंथनाची गोष्ट सांगतांना ते म्हणाले, कुठल्याही (विचार) मंथनामधून जो (यशाचा) लोण्याचा गोळा निघतो तो ह़डपण्यासाठी सगळे हपापलेले असतात, पण त्यातून अपयशाचे कडवट द्रव निघाले तर ते एकमेकांवर ढकलत असतात. ते पिऊन पचवण्यासाठी एकादा खंबीर नीळकंठच पुढे येतो आणि तो पुढे सर्वांच्या आदराचा धनी होतो. शंकराला भोळासांब म्हणतात, पण तो भोळा बिळा नव्हता, कुठलाच नवरा नसतो, पण घरात शांतता रहावी म्हणून बावळटपणा दाखवतो. कुठलेही गुपित एकदा बायकोला कळले की ते गुपित रहाणार आहे का? ही काही उदाहरणे झाली.

श्रीराम हा अवतार फारच आदर्श होता, त्याच्यासारखे असामान्य आचरण करणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे होते. त्या नंतरचा कृष्ण अवतार लोकांना थोडा जवळचा वाटण्यासारखा होता. विशेषतः त्याचे गोकुळातले बालपण, त्यातला निरागस खोडकरपणा, गोपिकांशी रचलेल्या रासलीला वगैरे गोष्टी मनमोहक होत्या. या दोन्ही अवतारातले मुख्य कार्य दुष्टांचे निर्दाळन हे होते. विठ्ठलावतारातला देव फक्त भक्तांच्या कल्याणासाठी कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा राहिला. रामाच्या हातात धनुष्यबाण तर कृष्णाच्या तर्जनीवर सुदर्शन चक्र असायचे. विठ्ठलाच्या किंवा हरीच्या हातात कोणतेही शस्त्र नाही. या तीघांची सांगड घालून तयार झालेला रामकृष्णहरी हा मंत्र संत तुकारामांना मिळाला आणि त्यांनी तो वारकरी पंथाला दिला. गेली चारपाचशे वर्षे तो पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढीतल्या माळकरी वारक-यांना दिला जात आला आहे आणि त्या पंथातले लोक या मंत्राचा नियमितपणे जप करीत आले आहेत. वगैरे माहिती त्यांनी दिली.

बाबामहाराजांनी केलेल्या कीर्तनाचे माझ्या लक्षात आलेले आणि आठ दिवसानंतर टिकून राहिलेले सार देण्याचा एक तोकडा प्रयत्न मी या लेखात केला आहे. कीर्तन संपल्यावर त्यांनी असे आवाहन केले की ज्या लोकांना वारकरी होण्याची इच्छा असेल, किंवा निर्माण झाली असेल त्यांनी लगेच पुढे येऊन त्यांच्यापाशी यावे. त्यांच्या हस्ते त्या लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ घालण्यात येईल. त्यानंतर त्यांनी काही नियम पाळायचे आहेत. रोज सकाळी गुरुमंत्राचा उच्चार करायचा, मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचे नाही, वर्षातून एकदा पंढरीची आणि आळंदीची वारी करायची आणि एकदा दुधिवरे गावी बाबामहाराजांनी उभारलेल्या देवस्थानाचे दर्शन घ्यायचे वगैरे सोपे नियम पाळायचे.

मी आपला मागच्या पावलांनी परत फिरलो आणि घरी गेलो.  .

Thursday, February 26, 2015

बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन (पूर्वार्ध)

"हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन, दिल को बहलाने को ‘गालिब' ये खयाल अच्छा है।" असा मिर्झा गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे. या बाबतीतले माझे मतही फारसे वेगळे नाही. सौंदर्य, सुख, आनंद वगैरेची अगदी परिसीमा ज्या ठिकाणी असते ती जागा' म्हणजे 'स्वर्ग' अशी स्वर्गाची व्याख्या किंवा संकल्पना आहे. असा एक अद्भुत स्वर्गलोक आकाशात कुठेतरी असेल असे मला मुळीच वाटत नाही. अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागा असोत, आश्चर्यचकित करणारी मानवनिर्मित स्थळे असोत किंवा माणसांनी आपल्या चांगल्या वागणुकीमधून घरातच निर्माण केलेले आनंदी वातावरण असो, या सगळ्या सुंदर आणि आनंददायी जागा आपल्या पृथ्वीवरच असतात, आपल्याला त्या पहायच्या किंवा घडवायच्या असतात अशी माझी स्वर्गाची कल्पना आहे. जन्ममरणाच्या चक्रापासून मुक्ती, मोक्ष वगैरेंचे मला कधीच कणभरही आकर्षण वाटले नाही, त्यामुळे मला आध्यात्माची गोडी लागली नाही. पण असे असले तरी मला भजनकीर्तनाचे वावडेही नाही. भक्तीरसात ओथंबलेली मधुर गीते किंवा टाळमृदुंगाच्या तालावर गायिलेले अभंग ऐकणे मला मनापासून आवडते. चांगल्या कीर्तकारांनी केलेले कथानकाचे रसाळ वर्णन हा उत्कृष्ट प्रकारच्या कथाकथनाचा (स्टोरीटेलिंगचा) नमूना आहे आणि ते कानावर पडले तर ऐकत बसावे असे मला वाटते. कीर्तनातली कथा खरी आहे की काल्पनिक वगैरेंचा विचार करून मी त्यातली मजा घालवत नाही. मजेदार कथानक, चटपटीत संवाद, त्यांचे उत्तम सादरीकरण, मध्येच कर्णमधुर संगीत, एकादा मुद्दा पटवून देण्याची हातोटी अशा अनेक गोष्टी पारंपरिक कीर्तनात असतात. याच प्रकारच्या गोष्टीसाठी आपण मनोरंजनाचे कार्यक्रम पाहतोच ना? शिवाय कीर्तनांमध्ये मनोरंजनाबरोबरच ज्ञानामृतही मिळते.

दहा पंधरा वर्षांपूर्वी टीव्हीवर एका विशिष्ट वेळेला ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन लागत असे. त्या वेळी मी घरी असलो तर तो कार्यक्रम पहात आणि ऐकत असे. काही लोकांना हे पाहून त्याचे आश्चर्य वाटायचे. या निमित्याने देवाचे नामस्मरण माझ्या कानावर पडेल आणि त्यातून माझा उद्धार होईल किंवा मी सन्मार्गाला लागेन असेही कदाचित काहीजणांना वाटत असे. तसा मी काही कुठल्याही वाईट मार्गाला लागलो नव्हतो किंवा पापाच्या राशी जोडत नव्हतो, पण उपासतापास, नामस्मरण, तीर्थयात्रा वगैरे मार्गाने पुण्य जोडायचा प्रयत्नही करत नव्हतो. सरळ मार्गाने चालून आपली नोकरी, कुटुंब, समाज वगैरेंसाठी माझी जी काही कर्तव्ये आणि जबाबदा-या आहेत त्या पार पाडायचा मी प्रयत्न करत असे आणि करत आलो आहे. हे काम करता करता स्वतःसाठी आनंदाचे काही कण मिळवणे आणि इतर लोकांनाही थोडा आनंद वाटणे याचाही जमेल तेवढा प्रयत्न मी करत असतो. त्या काळातली बाबामहाराजांची कीर्तने ऐकतांना त्यांचा खणखणीत आवाज, ओघवत्या भाषेमधून होत असलेले सुश्राव्य निवेदन, नर्मविनोद, रोजच्या जीवनातली उदाहरणे देणे, संतवाणीचा प्रचंड व्यासंग, अधून मधून भजनांचे सुमधुर गायन या सगळ्याचा चांगला प्रभाव पडत असे. यामुळे मला कीर्तनाचा तो कार्यक्रम ऐकायला आवडत असे. त्यातून बाबामहाराजांबद्दल कुतुहल वाटत गेले, कधी तरी त्यांचे कीर्तन प्रत्यक्षात ऐकावे अशी एक अंधुक इच्छाही मनाच्या कोप-यात कुठे तरी उगम पावली. पुढे त्या कार्यक्रमाचे टीव्हीवर प्रक्षेपण होणे थांबले किंवा मला तो पहायला वेळ मिळेनासा झाला आणि ती गोष्ट पार विस्मरणात गेली. गेली दहा बारा वर्षे बाबामहाराजाच्या नावाचा उल्लेखही इतर कोणाच्या बोलण्यातून माझ्या कानावर आला नाही.

आमच्या घराजवळ असलेल्या शंकराच्या देवळात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत असतो. आमच्या पोस्टबॉक्समध्ये येऊन पडलेले या वर्षीच्या कार्यक्रमाचे पत्रक पाहिले, तर त्यात पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी संध्याकाळी ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असल्याचे वाचले. माझ्या जुन्या आठवणींवर पडलेली विस्मृतीची धूळ थोडी पुसली गेली आणि कधीकाळी मनात उठलेली इच्छा पुन्हा जागी झाली. तिची पूर्ती होण्याची संधी आता आयती माझ्यासमोर चालत आली होती. रात्रीचे जेवण जरा आधीच उरकून घेतले आणि बाबामहाराजांना एकदा प्रत्यक्षात पहावे, त्यांचे चार मधुर शब्द ऐकावे आणि परत यावे असा विचार करून मी घरातून निघालो. शिवमंदिर नजरेच्या टप्प्यात यायच्या आधीच लाउडस्पीकरवरून येणारे सामूहिक भजनाचे सूर कानावर पडायला लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यातले शब्द कळायला लागले. "शिव हालाहले तापला।" हा एकच चरण आळवून आळवून गायिला जात होता. "नामे तोही शीतल झाला।।" हा पुढचा चरणही अधून मधून त्याच्या सोबतीला ऐकू येऊ लागला.

मंदिराच्या फाटकापाशी जाऊन आत पाहिले. उत्सवातल्या कार्यक्रमांसाठी देवळाजवळ एक तात्पुरते व्यासपीठ उभारले होते. त्यावर दहा बारा टाळकरी उभे राहून भजन गात होते. समोरच्या पटांगणात जाजमे अंथरलेली होती,  त्यातल्या निम्म्याहून जास्त भागात दोनतीनशे श्रोते दाटीवाटीने बसले होते. त्यांच्या मागे थोडी जागा सोडून मागच्या बाजूला शंभर दीडशे खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, त्या मात्र पूर्णपणे भरलेल्या दिसत होत्या. शिवमंदिराच्या परिसराच्या दुस-या गेटमधून आत जाऊन पाहिल्यावर कोप-यातली एक खुर्ची रिकामी दिसली. मी तत्परतेने जाऊन तिचा ताबा घेतला. स्टेजवरचे तेच भजन अजून सुरूच होते. तो अभंग संपल्यावर जय जय राम कृष्ण हरी या नामाचा घोष सुरू झाला. त्याला श्रोत्यांनीही साथ दिली. दहा बारा मिनिटे हरीनामाचा गजर झाल्यानंतर तो थांबला. बाबामहाराजांचा धीरगंभीर आवाज कानावर पडायला लागला.

सुरुवातीला त्यांनी त्या जागी जमलेल्या श्रोत्यांचे या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल स्वागत केले म्हणण्यापेक्षा त्यांचे अभिनंदन केले. त्यातले बरेचसे लोक हा कार्यक्रम पाहण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबईच्या इतर भागांमधून वाशीला आले होते. डोक्यावर पागोटे किंवा पांढरी टोपी घालून फिरणारे मराठी लोक आमच्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत इतक्या मोठ्या संख्येने रहात असतील असे मला वाटत नव्हतेच. श्रोत्यांमधली त्यांची सोठी संख्या पाहून मला जरा नवलच वाटत होते. बाबामहाराजांच्या सांगण्यातून त्याचा उलगडा झाला. काल, परवा, तेरवा कुठे कुठे त्यांचे कीर्तन होऊन गेले आणि उद्या, परवा, तेरवा ते आणखी कुठे कुठे कीर्तन करणार आहेत याची माहितीही त्यांनी दिली. आजही त्यांचे किती भरगच्च कार्यक्रम असतात याची कल्पना त्यावरून आली. त्यांच्याकडे गडगंज वडिलोपार्जित मालमत्ता आहे, आपल्या कीर्तनासाठी ते कुणाकडेही बिदागी मागत नाहीत, हेसुद्धा त्यांनी सांगितले, ऐंशीचे वय झाले असल्यामुळे आता त्यांच्या पायात शक्ती उरली नाही, चालण्यासाठी आधाराची गरज पडते, पण त्यांना व्यासपीठावर नेऊन बसवले की मग तासन् तास अस्खलितपणे अव्याहत बोलायला मात्र काही अडचण येत नाही. त्यांना मिळालेले तल्लख बुद्धी आणि अस्खलित वाणी यांचे वरदान त्यांनी हे धार्मिक कार्य पुढे चालू ठेवावे यासाठीच देवाने अद्याप शाबूत ठेवले आहे. त्याचा उपयोग देवाच्या कामासाठी करणे हे त्यांचे कर्तव्य आहे या भावनेने ते हा ज्ञानयज्ञ करत आहेत असेही त्यांनी सांगितले. देवाविषयी असलेल्या भक्तीभावानेच सारे श्रोते जमलेले असल्यामुळे त्यांनीही शांत राहून मनोभावे या कीर्तनाचे श्रवण करावे, गडबड गोंधळ किंवा हालचाली करून त्यात व्यत्यय आणू नये, मध्येच उठून जागा बदलू नयेत किंवा बाहेर जाऊ नये वगैरे सूचना केल्या. शिवाय असे केल्यास तो बाबामहाराजांचा नव्हे तर प्रत्यक्ष देवाचा अपमान केल्यासारखे होईल अशी भीतीही घातली. लहान मुलांना हे समजण्यासारखे नसल्यामुळे त्यांची चुळबुळ चालली होती. त्यांनी यापेक्षा घरी जाऊन टीव्ही पहावा, भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा दाखवत आहेत ती पहावी असेही त्यांनी गंमतीने सांगितले.

 . . . . . .  . . . . . . . . . . . . .  . . . . . . (पूर्वार्ध)

Wednesday, February 18, 2015

जुगाड पुराण (भाग ३)





कसलाही एक जुना सांगाडा घ्यायचा किंवा जोडतोड करून तयार करायचा, त्याला चाके लावायची आणि एक इंजिन बसवायचे अशा प्रकारे बनवलेली खतरनाक जुगाडे गाड्या म्हणून रस्त्यावरून जातांना कधी कधी दिसतात. पण काही वेळा याच्या विरुद्ध प्रकारदेखील पहायला मिळतात. एका ठिकाणी गायीम्हशींच्या गोठ्यासमोर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाच्या शक्तीचे दोहन वेगळ्याच कामासाठी होत असलेले पहायला मिळाले. त्या काळात त्या लहानशा आडगावी पराकाष्ठेचे भारनियमन (लोडशेडिंग) चाललेले होते. दिवसातून कधी तरी अचानक वीज यायची आणि काही वेळाने आली तशीच एकदम गुल व्हायची. इमर्जन्सीसाठी लोकांनी घरोघरी इन्हर्टर लावलेले होते, पण वीज आलेली असतांना त्यांची बॅटरी जेवढी चार्ज होत असे तेवढी संपून जायलाही जास्त वेळ लागायचा नाही. त्यानंतर मेणबत्त्या आणि कंदिलांच्या मिममिणत्या उजेडात विजेची आराधना करत वाट पहात बसावे लागायचे. आमच्या यजमानांनी यावर तात्पुरता उपाय म्हणून कुठून तरी एक जनरेटर आणून गोठ्याजवळच्या एका कट्ट्यावर ठेवला होता आणि समोर उभ्या केलेल्या ट्रॅक्टरच्या इंजिनाला बेल्टने जोडला होता. दिवसातून दोन तीन वेळा त्या जनरेटरचा उपयोग करून इन्वर्टरची बॅटरी चार्ज केली जात होती आणि तिच्यामधूनन मिळणा-या विजेवर घरातले काही दिवे लावले जात होते आणि पंखे चालवले जात होते. मुंबईपुण्याकडून आलेल्या आमच्यासारख्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही खास व्यवस्था केली गेली होती. शेतातल्या विहिरीवरील पंप, कापलेल्या पिकाची मळणी करणारे यंत्र किंवा उन्हाळ्यात घराला थंड हवा पुरवण्यासाठी खिडकीत बसवलेल्या जंगी कूलरचा अवाढव्य पंखा यांना चालवण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरच्या इंजिनाचा उपयोग केला जात असतांना मला पहायला मिळाला आहे.

खेडेगावांमध्ये यथायोग्य साधनांचा अभाव आणि कल्पकतेने त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न यातून अशा प्रकारच्या जुगाडांचा जन्म होतो. वर दिलेल्या पहिल्या चित्रात एका मोटारसायकलीच्या चाकाला पाण्याच्या पंपाला जोडलेले आहे, तर दुस-या चित्रात सायकलीचे पॅडल मारून पिठाची चक्की फिरवली जात आहे. मध्यंतरी एक मजेदार बातमी वाचली. हातापायांचा व्यायाम करण्याची जिममधली यंत्रे एका हॉटेलात बसवली होती म्हणे आणि त्या यंत्रांना जनरेटर्स जोडून त्यातून निर्माण होणारी वीज त्या हॉटेलमध्ये वापरली जात असे. पैसे भरून महागड्या जिममध्ये जाण्याऐवजी लोकांनी एक दमडी खर्च न करता या हॉटेलात जावे, हवा तेवढा वर्कआउट करून घ्यावा आणि वर फुकट नाश्तापाणी करून घ्यावा अशी योजना तिथे होती. ती किती काळ चालली ते काही समजले नाही, पण या जुगाडाची कल्पना मजेदार होती.

भारतात इंग्रजांचे राज्य असतांना इथल्या देशी लोकांपेक्षा ते लोक किती वेगळे आहेत हे दाखवण्याची त्यांना खूप हौस असायची, त्यांच्या वागण्यामधून ते नेहमी दिसत असे. क्रिकेट नावाचा खास साहेबी खेळ त्यांनी इकडे आणला. त्यातले सगळे खेळाडू परीटघडीचा पांढरा शुभ्र पोशाख नखशिखांत परिधान करून मैदानावर उतरायचे आणि त्यावर जास्त डाग पडू नयेत याची काळजी घेत ते लोक हा खेळ बहुतकरून उभ्या उभ्या खेळत असावेत. खास डगले आणि टोपी घातलेले दोन अंपायर मैदानावरल्या त्यांच्या विशिष्ट जागी येऊन तिथे खांबासारखे उभे रहायचे आणि तिथूनच विशिष्ट प्रकारचे हातवारे करत रहायचे. बॅट्समनने कुठे उभे रहायचे, बॉलरने कसे बॉल टाकायचे, फील्डरने त्या चेंडूंना कसे झेलायचे वगैरे क्रिया आणि बॅट, बॉल, स्टंप्स, पिच, क्रीज वगैरे गोष्टींची लांबी, रुंदी नेमकी किती असायला हवी या सगळ्यांसाठी त्यांचे सतराशे साठ नियम असायचे. नेहमी इंग्रजांच्या संपर्कात असणारे किंवा त्यांचे अनुकरण करणारे राजेरजवाडे, नबाब, इंग्रजांचे मुलकी किंवा लष्करी अधिकारी वगैरे बडी मंडळी हे सगळे नियम पाळून हा इंग्रजांचा खेळ खेळतही असत. त्यातून त्यांना किती थरार किंवा आनंद मिळत असे हे सुद्धा त्यांच्या परीटघडी केलेल्या चेहे-यावर दिसले तरी ते जंटलमनपणाच्या मर्यादेत असावे यासाठी त्यांना ते जरा जपूनच व्यक्त करावे लागत असावे.

देशातल्या आपल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः लहान मुलांनी मात्र या खेळाला जुगाडू वृत्तीची नवी परिमाणे देऊन त्याला आपलेसे करून टाकले. इंग्रजांच्या मूळ क्रिकेटचे पाच दहा ढोबळ नियम घेऊन आणि बाकीचे सगळे धाब्यावर बसवून किंवा आपापसात वेगळे कायदे ठरवून हा खेळ गल्लीबोळातून, चाळीमधल्या मोकळ्या जागेत, इतकेच काय भररस्त्यांवरसुद्धा खेळला जाऊ लागला, हुतूतू, खोखो, कुस्ती यासारख्या अस्सल भारतीय खेळांपेक्षासुद्धा हे जुगाड क्रिकेट जास्त प्रमाणात खेळले जाऊ लागले आणि त्यातून सर्वांनी अमाप आनंद लुटला. आजही तो अशाच उत्साहाने जिकडे तिकडे बेधडक खेळला जातो. या खेळाच्या सध्याच्या जुगाडांमध्ये कसलाही चेंडू, कुठलीही फळी, पुठ्ठा, बांबूचे तुकडे आणि विटांचा ढीगदेखील कसा उपयोगाला आणला जातो हे वरील चित्रातच पहावे.

गेली कित्येक शतके पाहता इंग्लंड आणि अमेरिकेतल्या दोन दोन राजकीय पक्षांमध्ये दरवेळी चुरशीच्या निवडणुका होऊन त्यातल्या विजयी पक्षाचा राज्यकारभार त्या देशांमध्ये चालत आला आहे. स्वतंत्र झालेल्या भारतात सुरुवातीच्या काळातली बरीच वर्षे काँग्रेस पक्षाचे एकछत्री राज्य होते. त्या पक्षाची शकले झाल्यानंतर गेली अनेक वर्षे अनेक पक्षातल्या लोकांनी एकत्र येऊन या देशाचा राज्यकारभार चालवला आहे. किंबहुना असे म्हणण्यापेक्षा कदाचित असे म्हणता येईल की काँग्रेस किंवा भाजप या मुख्य पक्षांनी परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या भिन्न पक्षांचा टेकू (आधार) घेऊन आपला गाडा कसाबसा रेटला आहे. या राजकीय जुगाडांमधला कधी एक टेकू निसटायचा तर कधी दुसरा निखळून पडायचा, मग त्यावेळी तिसरा किंवा चौथा शोधून त्या जागी बसवायचा, काही वेळा पुन्हा पहिल्याला घासून पुसून जागेवर ठेवायचे असे सगळे गेली अनेक वर्षे चालत आले आहे. नावे घेऊ नयेत, पण ज्या नेत्यांना हे कौशल्य जमेल असे पक्षातल्या लोकांना वाटले त्यांना पंतप्रधानपदी बसवले गेले, ज्यांनी ते जुगाड यशस्वीपणे सांभाळले ते टिकले आणि ज्यांना हे काम जमले नाही ते स्वतःच कोसळले. या जुगाडू राजकारणाचे अनेक तोटे झाले असतील, पण देशात संपूर्ण अनागोंदी माजली नाही, बरीचशी काम होत राहिली, देशाची प्रगती होत राहिली हे देखील कमी महत्वाचे नाही.    

जुगाडांबद्दल लिहायचे झाल्यास आमीरखानच्या थ्री ईडियट्स या सिनेमाचा उल्लेख करणे अत्यावश्यक आहे. त्यातल्या रँचो या मुख्य पात्राचा या सिनेमाच्या सुरुवातीच्या भागात प्रवेश होताहोताच तो एक झटपट जुगाड रचून त्याच्या हॉस्टेलमधल्या रॅगिंग करायला आलेल्या एका गुंड सीनीयरला विजेचा जोराचा झटका देतो. त्यानंतरचे दोन तास तिथला डीन असलेल्या व्हायरसला तो आपल्या निरनिराळ्या जुगाडू प्रयोगांनी सळो की पळो करून सोडतो आणि पाऊसपाणी व वादळवा-यामुळे घरात अडकून पडलेल्या एका अडलेल्या गर्भवती महिलेचे बाळंतपण जुगाडांच्या पराकाष्ठेने करून अखेर सगळे ऑल ईज वेल् करून देतो. या अद्भुत कामगिरीसाठी त्या रँचोला जुगाडसम्राट, जुगाडशिरोमणी, जुगाडविभूषण किंवा जुगाडरत्न असा एकादा खिताब द्यायला हवा.

तर असे आहे हे जुगाडपुराण! जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्या माणसाकडे अडचणींशी झगडून त्यांच्यावर मात करण्याची झुंजार वृत्ती आहे, ते करण्यासाठी लागणारी कल्पकता आहे, धारिष्ट्य आहे, तोपर्यंत निरनिराळ्या स्वरूपांची जुगाडे होतच राहणार आहेत. जय जुगाड ! 

.  . . . . . . . . . . .. (समाप्त)


Friday, February 13, 2015

जुगाड पुराण (भाग २)


आमच्या विद्युत्केंद्रांच्या उभारणीसाठी लागणारी यंत्रे आणि साधने (इक्विपमेंट) यांच्या भागांना (पार्ट्सना) आकार देण्याचे काम कारखान्यांमधल्या विविध यंत्रांकडूनच केले जात असते. त्या पार्ट्सना लेथ, मिलिंग, प्लेनिंग, बोअरिंग आदि मशीन्स, प्रेस वगैरें यंत्रांवर विशिष्ट आकार देऊन झाल्यावर ग्राइंडिंग, होनिंग, लॅपिंग यासारख्या काही प्रक्रियांनी त्यांचेवर अखेरचा हात फिरवून त्यांना टॉलरन्स लिमिट्समध्ये आणले जाते आणि अधिक गुळगुळितपणा व झळाळी दिली जाते. ही कामे सुकर करणे, त्यांचेसाठी लागणारा वेळ वाचवणे आणि कारखान्यांमधील यंत्रांची रेंज (आवाका) व अॅक्युरसी (अचूकता) यात वाढ करणे इत्यादि कामांसाठी निरनिराळी जुगाडे (फिक्स्चर्स) डेव्हलप केली जातात. अर्थातच या प्रकारच्या जुगाडांचा रोल उपयुक्त असला तरी तसे पाहता तो दुय्यम किंवा पूरक असतो.

पॉवर प्रॉजेक्ट्सच्या बहुतेक सर्व इक्विपमेंटना साईटवरील त्याच्या विवक्षित ठिकाणी नेऊन ठेवण्याचे काम मात्र मुख्यतः मॅन्युअली म्हणजे मजूरांकडूनच करून घ्यावे लागते आणि त्यात जुगाडांचा उपयोग भरपूर प्रमाणात होत असतो. त्या सगळ्या सामुग्रीला ट्रेलरमधून उतरवून घेण्यापासून त्यांना त्यांच्या जागेवर नेऊन ठेऊन त्यांची एकमेकांशी जोडणी करण्याचे काम करतांना क्रेन्स वगैरे यंत्रांची थोडी फार मदत मिळते, पण काही भागात क्रेन उपलब्ध नसते किंवा असली तरी ती पुरेशा क्षमतेची नसते. क्रेन्स या यंत्रांची उभारणी करण्यापूर्वी तर त्या जागी काहीच सोय नसते. ही इक्विपमेंट निरनिराळ्या आकारांची असतात. त्यानुसार त्यांना ओढून नेण्यासाठी तात्पुरत्या गाड्या (ट्रॉल्या) तयार करतात, जमीनीवर तात्पुरते रूळ बसवतात किंवा पोलादी प्लेट्स अंथरतात, त्या इक्विपमेंटना ओढण्यासाठी किंवा उचलण्यासाठी चेन पुली ब्लॉक्सचा किंवा हॉइस्ट्सचा उपयोग करतात, त्यांना जाडजूड दोरखंड किंवा साखळदंडांनी जकडतात, या साधनांना अडकवण्यासाठी इमारतीच्या खांबांवर (कॉलम्सवर) आणि छताखाली तात्पुरते ब्रॅकेट्स जोडतात आणि ते काम करण्यासाठी मोठमोठी स्कॅफोल्ड्स उभारतात. या इक्विपमेंट्सची आधी बांधून ठेवलेली फाउंडेशन्स आणि प्रत्यक्षात येऊन पोचलेली सामुग्री यात कधीकधी फरक असतो, त्यासाठी आयत्या वेळी काही बदल करावे लागतात. या यंत्रांना विजेचे कनेक्शन, पाइपांची जोडणी वगैरे करायची असते. अशा प्रकारची कामे करणा-या मजूरांना रिगर असे नाव आहे. जुगाड या शब्दाला जसा फारसा मान दिला जात नाही तसेच रिगरच्या बाबतीत होत असते. 'रिग' म्हणताच आपल्या डोळ्यासमोर 'बोगस मतदान' येते. 'इंजिनियर्ड' या शब्दाचा उपयोग पूर्वनियोजित घातपात किंवा दंगल यासारख्या घटनांसाठी केला जातो आणि 'डॉक्टर्ड रिपोर्ट' हा नेहमी फेरफार केलेला असतो. तसाच हा प्रकार आहे.     

या रिगर्सचे बहुतेक काम 'जुगाड' याच सदरात मोडते. तात्पुरत्या ट्रॉल्या, ब्रॅकेट्स, स्कॅफोल्डिंग वगैरे सगळे काही त्यांचे काम संपल्यावर उचकटून टाकण्यात येते, काही काळानंतर त्यांचे नामोनिशाण शिल्लक रहात नाही. यामुळे त्या गोष्टी तयार करतांना कुठले रॉ मटीरियल (कच्चा माल) वापरले, ते कुठून आणले वगैरेंची जन्मकुंडली मांडली जात नाही. बहुतेक वेळा स्टोअर यार्डमध्ये मिळतील ते अँगल्स, चॅनेल्स, बीम्स, प्लेट्स, पाइप, ट्यूब वगैरेंना कापून आणि त्या तुकड्यांना जोडून ही जुगाडे तयार केली जातात आणि उपलब्ध असतील ते नटबोल्ट वापरून ते जोडले जातात. त्यांचे स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रेस अॅनॅलिसिस वगैरे केले जात नाही, अंदाजानेच त्यांना भरपूर मजबूत केलेले असते. त्यांचे आकार अनुभव आणि अंदाजाने ठरवले जातात. मिळतील ते पाइप, बांबू, काथ्या, दोरखंड वगैरेंचा उपयोग करून स्कॅफोल्डिंग बांधले जाते. या सगळ्या गोष्टींची तपासणीही जुजबीच होते, यातल्या कशाचाच कायमस्वरूपाचा रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसते, त्यांची काही रफ स्केचेस असली तर असतील, पण त्यांची रीतसर डीटेल ड्रॉइंग्ज सहसा तयार केली जात नाहीत. या सगळ्या बाबतीत रिगर्सच्या गँगचे अनुभवी फोरमन जागच्या जागी निर्णय घेऊन लगेच त्याची अंमलबजावणी करत असतात.

यातही काही लोक प्रचंड प्राविण्य संपादन करतात. आमच्या पॉवर प्रॉजेक्ट्सवर काम करणारा डिंगी नावाचा एक कुशल माणूस होता. त्याची शैक्षणिक पातळी किती होती कोण जाणे, पण त्याची आकलनशक्ती आणि निरीक्षणशक्ती जबरदस्त होती, तसेच कल्पकता वाखाणण्याजोगी होती, त्याच्या कामाचा उरक दांडगा होता. मोठमोठी अवजड यंत्रसामुग्री इकडून तिकडे घेऊन जाण्यासाठी काय करावे लागेल, काय केल्यावर त्याचे काय परिणाम होतील वगैरेचे अचूक अंदाज तो करत असे. त्या मौल्यवान यंत्रसामुग्रीला किंचितही धक्का न लागू देता तिला सुरक्षितपणे विवक्षित जागेवर नेऊन ठेवणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन तो झपाटल्यासारखा कामाला लागे, एकामागोमाग एक जुगाडे तयार करून ते अवघड किंवा काही वेळा अशक्य वाटणारे काम पाहता पाहता उरकून टाकत असे. त्याच्या कौशल्याची ख्याती पसरत गेली आणि एका पाठोपाठ एक निरनिराळ्या प्रॉजिक्ट्सवरील महत्वाच्या इक्विपमेंटच्या उभारणीसाठी त्याला आवर्जून बोलावून घेण्यात येऊ लागले. त्याच्यासारखा दुसरा जुगाडू मला तरी कुठेच दिसला नाही. त्याला श्रमवीर वगैरे कोणता पुरस्कार मिळाला होता की नाही ते मला माहीत नाही, पण तो मिळण्याची पात्रता त्याच्यात नक्कीच होती.






रस्त्यावरून धावणारी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी किंवा त्याहून अधिक चाकांवर चालणारी बहुतेक सगळी म्हणजे स्कूटर्स, बाइक्स, मोटारी, ट्रक्स, ट्रेलर्स वगैरे वाहने मोठमोठ्या अधिकृत कारखान्यांमध्ये तयार केली जातात, त्यांच्या सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतरच त्यांची निर्मिती करण्यात येते. त्यांना बाजारात आणण्यासाठी परवानगी मिळते. त्या वाहनांना रस्त्यावर धावण्यासाठी आरटीओसारख्या ऑफिसमधून लायसेन्सेस घ्यावी लागतात. असे सगळे असले तरी काही लोक एकाद्या रस्त्याकडेच्या वर्कशॉपमध्ये काही कामचलाऊ जुगाडू वाहने तयार करतात. कुठले तरी इंजिन, दुसराच कसला तरी सांगाडा, तिसरीच चाके यांना एकमेकांना जोडून येन केन प्रकारणे तयार केलेल्या काही खटारगाड्यासुद्धा ग्रामीण भागातल्या रस्त्यावरून धांवतांना आपल्याला काही वेळा दिसतात. मात्र त्यांना अशा प्रकारे तयार करणा-या जुगाडू लोकांच्या कल्पकतेचे कौतुक करावे की रस्त्यावरून जाणा-या इतर वाहनांना किंवा पादचा-यांना त्यातून धोका निर्माण करण्यासाठी त्यांचा धिक्कार करावा असा अवघड प्रश्न मनात पडतो.

 . . . . . . .  . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

Tuesday, February 10, 2015

जुगाड पुराण (भाग १)



आपल्या ओळखीतले काही लोक केंव्हा ना केंव्हा उत्तर भारतात राहिले असतात किंवा अधून मधून तिकडे जात येत असतात, तर काही लोक इथेच रहात असले तरी काही ना काही कारणाने उत्तर भारतीय लोकांच्या संपर्कात आलेले असतात. त्यांच्याशी होत असलेल्या संभाषणामध्ये 'जुगाड' या शब्दाचा उपयोग इतक्या वेळा होत असतो की हा शब्द या सगळ्यांच्या चांगल्या ओळखीचा वाटतो. या सर्वसमावेशक शब्दाला चपखल असा प्रतिशब्द मला तरी मराठीत किंवा इंग्रजीत सापडत नाही. माझ्याशी नेहमी मराठी किंवा इंग्रजी भाषेत बोलणा-या कित्येक लोकांच्या बोलण्यातसुद्धा जुगाड या शब्दाचा एवढ्या वेळा उल्लेख येतो की कधी कधी मला हा शब्द त्या त्या भाषांमधलाच वाटतो. तसा तो सध्या कदाचित नसला तरी माझ्या मते या भाषांमध्ये त्या शब्दाचा समावेश करायला हरकत नसावी. त्यामुळे या भाषा समृद्धच होतील. या जुगाडांची व्याप्ती एकादे साधेसुधे औजार किंवा पैशाची तात्पुरती व्यवस्था इतक्या क्षुल्लक बाबींपासून ते थेट केंद्रातल्या मंत्रीमंडळाच्या जोडणीपर्यंत झालेली दिसते. ज्यांनी हा शब्द अजून ऐकला नसेल अशा लोकांना मात्र "हे जुगाड म्हणजे असते तरी काय?" असा प्रश्न कदाचित पडेल.

'जुगाड' या शब्दाचा अनेक प्रकारे उपयोग केला जात असतो. त्याचा अगदी सर्वसामान्य अर्थ म्हणजे 'कामचलाऊ उपाय किंवा उपाययोजना'. पण तो उपाय किंवा ती योजना त्यांच्या सर्वसामान्य रूढ उपयोगापेक्षा वेगळ्या असायला मात्र हव्यात. जुगाडाला एक पर्यायी व्यवस्था म्हंटले तर ती 'व्यवस्थित' असण्यापेक्षा तशी नसण्याचीच जास्त शक्यता असते. त्याच्या वैधतेत आणि विश्वासार्हतेत संदिग्धपणाची छटा असते. सुव्यवस्थित चाकोरीबद्ध पद्धतीने काम करण्याऐवजी त्यासाठी एकादे 'जुगाड' वापरणे काही लोकांना कमीपणाचे किंवा काही वेळा धोकादायक वाटते. ही जुगाडाची एक बाजू झाली. तिच्यातसुद्धा जुगाडाच्या नावाने नाकाने कांदे सोलत नुसतेच स्वस्थ बसून राहण्यापेक्षा कसे का होईना पण त्याने आपले काम पुढे सरकत आहे का हे पाहणे काही वेळा अधिक श्रेयस्कर किंवा महत्वाचे असते. काही वेळा तर 'जुगाड' या शब्दाचा उपयोग अशा जागीही होतो जिथे दुसरा उपायच अस्तित्वात नसतो. सहजपणे उपलब्ध साधनसामुग्रीचा उपयोग करून निर्माण केलेल्या औजारांना अनेक वेळा 'जुगाड' म्हणतात. त्याच प्रमाणे कोणालाही सहजपणे करता येईल अशा सोप्या कृतींमधून एकादी गोष्ट करण्याच्या विधीलाही 'जुगाड करना' असे म्हणतात. बहुतेक वेळा जुगाडांच्या या प्रकारांमध्ये त्या वस्तूच्या किंवा विधीच्या गुणवत्तेत काही फरक येत नाही. काही वेळा तर आपल्याला हवी असलेली चांगली क्वालिटी मिळवण्यासाठी खास 'जुगाड' तयार करून वापरावे लागते.

'जुगाड' हा शब्द मुख्यतः कामचलाऊ गोष्टींबाबत वापरला जात असला तरी तो आणखी काही प्रकारांनीसुद्धा कानावर येतो. एटीएम, एसटीडी, तत्काल रिझर्वेशन वगैरे सोयी होण्याच्या पूर्वीच्या काळात कधीकधी असे घडत असे की एकाद्या उत्तर भारतीय सहका-याला दुपारच्या वेळी त्याच्या घरातून एक तार यायची, त्यात त्याला तातडीने गावी बोलावलेले असायचे. चिंताक्रांत मुद्रेने तो ती बातमी त्याच्या सहका-यांना सांगायचा.
"अब तुम क्या करोगे? कैसे घर जाओगे?"
"देखते हैं, कुछ जुगाड कर लेंगे।" म्हणजे हमालाला किंवा टीसीला पैसे चारून वगैरे.
"जानेके वास्ते तुम्हारे पास पैसे तो हैं?"
"कहाँ भाई? उसकाभी कुछ जुगाड करनाही पडेगा।" म्हणजे उधार, उसनवार वगैरे, वगैरे...

आता तांत्रिक जुगाडाची काही उदाहरणे पाहू.  एकदा मला प्रेशर कूकरमध्ये डाळ आणि तांदूळ शिजवायचे होते, त्यांची भांडी कूकरमध्ये ठेवून झाकण लावतांना मला असे दिसले की त्याच्या बॅकेलाइटच्या मुठीच्या दोन भागांना जोडणारे स्क्र्यू खूप ढिले झाले आहेत. ते जर गळून पडले तर कुकरची मूठ जागेवर राहणार नाही आणि गरम झालेल्या कूकरचे झाकण मला उघडता येणार नाही. मी अशा वेळी त्या स्क्र्यूच्या मापाचा स्क्र्यूड्रायव्हर शोधत बसलो नाही, कारण माझ्या घरात तो असलाच तरी त्या वेळी तो नेमका कुठे ठेवला गेला होता याची मला सुतराम कल्पना नव्हती. अशा वेळी मी स्वयंपाकघरातल्या सेल्फमधले दोन तीन चमचे काढले आणि ज्या चमच्याच्या मागच्या बाजूचे टोक त्या स्क्र्यूच्या खाचेमध्ये फिट्ट बसले त्याने त्या स्क्र्यूंना पिरगाळले. खरे तर स्क्र्यूला फिरवणे हा काही त्या चमच्याचा अधिकृत उपयोग नाही, पण आयत्या वेळी सुचलेल्या या 'जुगाडा'ने माझे काम तर पटकन झाले. जुगाड या संकल्पनेचे हे एक सोपे उदाहरण झाले.

आता एकादे कठीण उदाहरण पाहू. अणुविद्युत केंद्रांसाठी लागणा-या विशिष्ट यंत्रसामुग्रीची निर्मिती करणे किंवा करवून घेणे हे सर्व संबंधितांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यातल्या एका अवाढव्य यंत्रासाठी सुमारे पंधरा मीटर लांब एवढ्या अगडबंब आकाराचे पण सगळ्या बाजूंनी अर्धा मिलिमीटरमध्ये सरळ व सपाट अशा आकाराचे कॉलम तयार करून हवे होते. पोलादाच्या जाड प्लेट्सचे तुकडे कापून, त्यांना वेल्डिंगने जोडून आणि मोठमोठ्या मशीन्सवर त्या स्ट्रक्चर्सचे मशीनिंग करून ते खांब तयार करायचे असतात. इतकी मोठी मशीनरी सहसा कुणाकडेच नसते आणि तिला परदेशातून मुद्दाम तयार करवून घेऊन मागवणे कोणालाही परवडणारे नसते. शिवाय प्रत्येक मशीनची रेंज आणि अॅक्युरसी ठरलेली असते. त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम करायचे असले तर शंभरातले नव्याण्णऊ कामगार आणि दहापैकी नऊ इंजिनियरसुद्धा ते अशक्य आहे असेच सांगतात, पण एकादा कल्पक, धाडशी आणि उत्साही (जुगाडू) माणूस ते आव्हान स्वीकारतो. ते काम उपलब्ध साधनसामुग्रीमधूनच कसे करता येईल यावर सकारात्मक दृष्टीकोनातून स्वतः विचार करतो आणि इतरांशी विचारविनमय करतो, त्यासाठी अनेक प्रकारची निरनिराळी फिक्स्चर्स तयार करतो, त्यावर वारंवार छोटे छोटे प्रयोग करून त्यात सुधारणा करत राहतो आणि अखेरीस हे अशक्य वाटणारे काम तो यशस्वी रीत्या करून दाखवतो. दुस-या एकाद्या यंत्राचा एकादा विशिष्ट भाग मुठीत धरण्याइतका छोटा पण खूप कॉम्प्लिकेटेड आकाराचा असतो, आणि त्याची अॅक्युरसी एक दोन मायक्रॉन्स म्हणजे एक दोन हजारांश मिलिमीटरमध्ये इतकी सूक्ष्म असावी लागते. कुठल्या मशीनने ती मिळवायची आणि ती कशी मोजून खात्री करून घ्यायची हे सर्वसामान्य पद्धतींमधून समजत नाही. यासाठी वेगळ्या प्रकारची खास फिक्स्चर्स बनवावी लागतात.

या दोन्ही प्रकारची फिक्स्चर्स तयार करता करता आणि त्यांचा उपयोग करता करता त्यात वेळोवेळी बदल करावे लागत असतात, त्यामुळे त्यांची व्यवस्थित ड्रॉइंग्ज, स्पेसिफिकेशन्स, इन्स्पेक्शन रिपोर्ट्स वगैरे डॉक्युमेंटेशन करायला वेळच नसतो आणि त्या फिक्स्चर्सचे काम संपल्यानंतर त्यांची काही गरजही नसते. यामुळे आयएसओच्या नियमानुसार त्याचे डॉक्युमेंटेशन किंवा रेकॉर्ड्स बनत नाहीत किंवा ठेवले जात नाहीत. तशाच प्रकारची मूळ यंत्रसामुग्री पुन्हा पुन्हा बनवून घ्यायची असली तर तेच फिक्स्चर उपयोगी पडते आणि तशी गरजच नसली तर तो एक तात्पुरता कामचलाऊ उपाय असतो. या अर्थाने ही फिक्स्चर्स म्हणजे उच्च दर्जाची असली तरी जुगाडेच असतात. अशा कित्येक जुगाडांच्या डेव्हलपमेंटमध्ये मी सहभागी झालो होतो. त्यांचा उपयोग करून आपले काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर होणारा आनंद अनुपमेय असायचा. यामुळे मला तरी जुगाड या शब्दाबद्दल प्रेम किंवा आदर वाटत आला आहे.

जुगाड हा शब्द माझ्या कानावरसुद्धा पडला नव्हता त्या काळापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी काही नसते उद्योग करत होतो. आमच्या घराच्या अर्ध्या भागावर माडी होती. मी बहुतेक वेळ तिथे बसून अभ्यास करत असे किंवा पुस्तके वाचणे, चित्रे काढणे वगैरेंमध्ये वेळ घालवत असे. माडीला लागूनच उरलेल्या भागात गच्ची होती आणि तिच्या भिंतींवर तीन चार ठिकाणी दहा बारा सेंटीमीटर लांब मोळे (मोठे खिळे) ठोकून ठेवले होते. कधी उन्हात कपडे वाळवायचे असले तर या मोळ्यांना जाड दो-या बांधून ते त्यावर वाळत टाकायचे आणि संध्याकाळी कपडे काढल्यानंतर पुन्हा त्या दो-या सोडवून ठेवून द्यायचा असा क्रम असायचा. एकदा हे काम करत असतांना माझे लक्ष त्या मोळ्याच्या सावलीकडे गेले. सकाळी पश्चिमेकडे पसरलेली सावली हळूहळू संध्याकाळी पूर्वेकडे सरकली होती. या गोष्टीचे दोन तीन दिवस निरीक्षण केल्यावर मी त्या भिंतीवर जागोजागी शिसपेन्सिलीने खुणा केल्या आणि मोळ्याच्या सावलीकडे पाहून त्या खुणांच्या आधाराने मला वेळ समजायला लागली. सकाळी अकरा किंवा बारा वाजता नाही तर दुपारी चार किंवा पाच वाजता जेंव्हा केंव्हा खाली यायला मला माझ्या आईने सांगितलेले असेल बरोबर त्या वेळी तिने हाक मारायच्या आधीच मी तिच्या समोर जाऊन उभा राहिलो तर तिला नवल वाटायचे. त्या काळात माझ्याकडे स्वतःचे घड्याळ असण्याचा प्रश्नच नव्हता आणि सोप्यातल्या घड्याळातली वेळ मला माडीवर बसून कशी कळते हे तिने विचारलेच. पण मलाही माझे सीक्रेट उघड करायचे नव्हते. माझ्याकडे एक जादू आहे असे म्हणून टोलवाटोलवी केली. पुढे नात्यातल्या एका लग्नाच्या निमित्याने मुंबई पहायला मिळाली तेंव्हा मलबार हिलवरच्या कमला नेहरू पार्कमध्येही गेलो.  तिथली प्रचंड आकाराची सनडायल पाहून मला कळले की हा शोध तर पूर्वीच कुणीतरी लावून ठेवला होता. तो माणूससुद्धा एक प्रकारचा जुगाडूच असणार! 

.  . . . . . . . . . .  . . . . . . .  (क्रमशः)

Wednesday, February 04, 2015

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (पूर्वार्ध)

माझ्या आयुष्यातल्या निरनिराळ्या टप्प्यांवर मला भेटलेली आणि माझ्या आठवणींच्या पानांवर आपले कायमचे ठसे उमटवून गेलेली अशी अनेक माणसे आहेत. या लेखमालेत मी त्यांच्यातल्या एकेकाबद्दल चार शब्द लिहीत आलो आहे. आतापर्यंतच्या दहा भागातल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, गाव, त्यांचा माझ्याशी जुळलेला संबंध यांच्यासंबंधी मी सविस्तर लिहिले आहे. या लेखाच्या नायकाला मात्र मी फक्त 'अप्पा' एवढेच म्हणणार आहे. लेख वाचल्यानंतर कदाचित त्याचे कारणही समजेल.

हा अप्पा साधारणपणे माझ्याच वयाचा होता, तो कदाचित माझ्याहून थोडा लहान असेल, पण अपटुडेट पोशाख, आकर्षक हेअरस्टाइल आणि एकंदरीतच आरशाचा चांगला उपयोग करून घेण्याच्या त्याच्या संवयीमुळे तो माझ्याहून जरा जास्तच तरुण दिसत असे. त्याच्या देखण्या चेहे-यावरील तरतरीतपणा आणि बेदरकारीची छटा वगैरे मिळून तो राजबिंडा दिसत असे. बोलण्यातली चतुराई, हजरजबाबीपणा, मिश्किलपणा वगैरेंमधून ते ऐकणा-यावर त्याचा चांगला प्रभाव पडत असे. तो मला पहिल्यांदा भेटला त्या वेळी आम्ही दोघेही विशीत होतो. त्या मेळाव्यातल्या सर्व लोकांबरोबर तो मिळून मिसळून वागत होता, वडीलधारी मंडळींचा आदर, समवयस्कांची मनमुराद थट्टामस्करी आणि लहान मुलांशी गोड बोलून त्यांना आपलेसे करणे हे सगळे त्याला सहज जमत होते. यामुळे तो सुद्धा तिथल्या सर्वांच्या गळ्यातला ताईत झालेला दिसत होता. त्याचे दिसणे, बोलणे, वागणे या सगळ्यांमुळे मलाही तो पहिल्याच भेटीत थोडा जवळचा वाटला होता. 

पहिला ठसा (फर्स्ट इम्प्रेशन) हा कायम स्वरूपाचा असतो असे म्हणतात, पण ते पूर्णपणे खरे नसावे. आपल्याला कोणताही माणूस पहिल्यांदा भेटतो त्या वेळची एकंदर परिस्थिती, आपली मनस्थिती आणि त्या माणसाचे त्या वेळचे दिसणे, बोलणे वागणे वगैरेंवरून आपण त्याला जोखत असतो. त्याचा ठसा आपल्या मनावर उमटत असतो. तो गडद असला तर दीर्घकाळ टिकून राहतो. पुसट असला तर काळाबरोबर विरून जातो. ती व्यक्ती त्यानंतर पुन्हा पुन्हा भेटली आणि त्या वेळीही आपल्यावर तिचे तसेच इम्प्रेशन पडले तर तो ठसा अधिक गडद होत जातो. पण दरम्यानच्या काळात आपल्याला अनेक अनुभव येऊन गेले असतात, त्यामधून प्रगल्भता आलेली असते, आपला दृष्टीकोन बदललेला असतो, मूड वेगळा असू शकतो आणि त्या माणसातही बदल झालेला असतो, त्याचे दुसरे काही पैलू आपल्या समोर येतात. त्यातून वेगळे इम्प्रेशन तयार झाले तर तो आधीच्या ठशावर पडून वेगळे आकार दिसायला लागतात. अशा प्रकारे त्याच्याबद्दलच्या आपल्या धारणा बदलत असतात. अप्पाच्या बाबतीत असेच काहीसे होत गेले.

अप्पाबद्दल लिहितांना मला पु.लंचा नंदा प्रधान आठवतो. अप्पासुद्धा त्याच्यासारखा देखणा होता आणि श्रीमंत घराण्यात जन्मला होता. इतर लोकांवर छाप पाडण्यासाठी नव्हे तर स्वतःची आवड म्हणूनच तो नेहमी स्टाइलिश कपडे घालायचा. मी त्याला एकदा विचारले, "तुमचा हा नवा शर्ट खरंच मस्त आहे, कुठून आणलात?"
त्याने किंचित बेदरकारपणे उत्तर दिले, "कुणास ठाऊक? माझ्याकडे असे पंच्याहत्तर शर्ट आणि अशा पंचेचाळीस पँट्स आहेत."
ते उत्तर ऐकून मी क्षणभर अवाक् झालो. मला समजायला लागल्यापासून मी घातलेल्या सगळ्या कपड्यांची बेरीज एवढी झाली नसती आणि त्यातला एकही कपडा अप्पाच्या अंगातल्या कपड्यांच्या तोडीचा नव्हता. त्या वेळी अप्पा जर खरे बोलत असला तर माझ्या मते ती निव्वळ उधळपट्टी होती आणि जर त्याने थाप मारली असेल तर असला बडेजाव दाखवण्याचा मला तितकाच तिटकारा होता. त्यामुळे त्या वक्तव्याचे खरे खोटे करण्यात मला काही स्वारस्य नव्हते. आम्हा दोघांच्या विचारांमध्ये केवढी मोठी दरी आहे याची जाणीव मात्र मला झाली.

तो श्रीमंत घराण्यात जन्मला होताच. मराठेशाहीच्या काळातल्या त्याच्या पूर्वजांनी मुलुखगिरी करून काही ठिकाणच्या जहागिरी मिळवल्या होत्या. सात पिढ्यांनी बसून खाल्ले तरी कमी होणार नाही इतकी मालमत्ता त्यांनी त्या ऐतिहासिक काळात जमवली होती. त्यानंतर आलेल्या सव्वादीडशे वर्षांच्या इंग्रजी अंमलात होऊन गेलेल्या पाचसहा पिढ्यांनी बहुधा तेच काम केले असावे. त्या काळातही त्यांच्या घरात जितके अन्न शिजवले जात असेल त्याच्या अनेकपटीने जास्त अन्नधान्य त्यांच्या शेतात पिकत असे आणि गोठ्यातल्या गाय़ीम्हशींपासून त्यांना मुबलक दूधदुभते मिळत असे. त्यामुळे तसे पाहता (अक्षरशः) खाण्यावर त्यांचा फारसा खर्च होतच नसावा. नोकरचाकरांना त्यांच्या सेवेचा मोबदला शेतात पिकलेल्या धान्याच्या स्वरूपात देण्याची पद्धत त्या काळात रूढ होती. जो काही रोख खर्च होत असे तो देवधर्म, दानधर्म, पोशाख, दागदागिने, मौजमजा, शौक वगैरेंसारख्या बाबींवर होत असेल. काही जण कदाचित जास्तच शौकीन असावेत. त्यांचे खर्च भागवल्यानंतर आणि पिढी दर पिढी वाटण्या होत गेल्यानंतरही अप्पाच्या वडिलांच्या कुटुंबाकडे बरीच मालमत्ता आली होती. त्यांच्या अवाढव्य वाड्यातले फक्त स्वयंपाकघर किंवा न्हाणीघरसुद्धा माझ्या संपूर्ण वन रूम किचन घरापेक्षा मोठे होते. दिवाणखाना तर प्रेक्षणीय होता. त्यात दोन्ही बाजूला नक्षीदार आकाराचे कोरीव खांब रांगेने उभे केलेले होते आणि त्यांना जोडणा-या कलाकुसर केलेल्या सुंदर कमानी होत्या. छताला टांगलेल्या मोठमोठ्या हंड्या आणि झुंबरे त्याची शोभा वाढवत होती. पुरातन काळामधली सुबत्ता त्यातून दिसत होती.

त्या काळात त्यांच्या शेतातल्या सगळ्या कामांची व्यवस्था पाहणारे जिराती ठेवलेले असायचे, शेतीविषयक नांगरणी, पेरणी, राखण, मळणी वगैरे सगळी कामे ते कुळांकडून किंवा शेतमजूरांकडून करवून घेत असत. घरातली सगळी कामे गडीमाणसे करत, बाजारातल्या वस्तू घरी बसून मागवल्या जात असत आणि दुकानदारांकडून त्या घरपोच मिळत, या सगळ्या बाबी सांभाळणे आणि पैशाअडक्यांचा हिशोब ठेवणे यासाठी दिवाणजी असत. मालक मंडळींना स्वतः इकडची काडीसुद्धा उचलून तिकडे ठेवायची कधी गरज पडत नसे. अप्पाच्या जन्माच्या काळात असा सगळा थाट होता. घराण्याचा वारस म्हणून त्याचे भरपूर लाड केले जात असत, तो मागेल ते त्याला मिळत असे

नंदा प्रधान या वल्लीबद्दल पु.लंनी लिहिले आहे की (त्याच्यासारख्या) यक्षांना काही शाप असतात असे म्हणतात, अप्पाच्या बाबतीतही काहीसे तसेच म्हणता येईल. त्याने स्वतः याबाबत कधी खंत व्यक्त केली नाही की तक्रारीचा रडका सूर काढला नाही. इतर कुणाला आपल्याबद्दल कणव वाटावी, कुणी आपल्याला सहानुभूती दाखवावी हेच त्याला बहुधा मान्य नसावे. पण आयुष्यात त्याला खूप काही सहन करावे लागले होते हे मला इतरांकडून कळत गेले.  तो चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मला होता (बॉर्न विथ सिल्हर स्पून). त्याच्या आईने त्याला रोज चांदीच्या वाटीत केशरमिश्रित दूध प्यायला दिले असेल. पण दुर्दैवाने त्याला हे सुख जास्त दिवस लाभले नाही. त्याच्या लहानपणीच ती माउली अचानक देवाघरी गेली. अप्पाच्या वडिलांनी दुसरा विवाह केला, त्या भार्येपासून त्यांना आणखी दोन मुलगे झाले आणि त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. अप्पाची सावत्र आई चांगली होती, पण ती पुण्यासारख्या शहरातल्या आधुनिक वातावरणात वाढली होती आणि डबलग्रॅज्युएट होती. पतिनिधनानंतर काही काळाने आपल्या दोन मुलांना घेऊन ती पुण्याला रहायला गेली. अप्पा काही काळ त्या आईसोबत, काही काळ काकाकडे, काही काळ मामाकडे रहात मोठा झाला.

कॉलेज शिक्षणासाठी तो त्याच्या मामांकडे पुण्याला राहिला होता. मामाही गडगंज श्रीमंत होते, त्यांनीही आईबापाविना पोरक्या झालेल्या आपल्या भाच्याचे सगळे लाड पुरवले. अप्पाने कॉलेजात कुठल्या विषयात प्राविण्य मिळवले ते माहीत नाही, पण तो शहरातला छानछोकीपणा मात्र शिकला, त्याला सिगरेटचे व्यसनही बहुधा त्या काळातच लागले असावे. शिक्षण संपल्यावर तो आपली इस्टेट सांभाळण्यासाठी गावी परत गेला. माझी आणि त्याची भेट होण्यापूर्वीच हे सगळे होऊन गेले होते. त्याचे लग्न होऊन तो संसाराला लागला. आपण त्याच्या पत्नीला माई म्हणू. ती ही त्याच्यासारखी उत्साही आणि हंसतमुख होती, पण अधिक विचारी आणि व्यवहारी होती. म्हणजे काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. म्हणजे ती काही प्रमाणात त्याला अनुरूप आणि काही प्रमाणात पूरक होती. त्यांची जोडी चांगली जमेल आणि त्यांचा संसार सुखाचा होईल असेच सर्वांना वाटले होते.  

----

स्मृती ठेवुनी जाती - भाग १३ - अप्पा (उत्तरार्ध)

अप्पाच्या जन्माच्या नंतरच्या काळात भारतातली सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्वीची सगळी संस्थाने भारतात विलीन करण्यात आली त्याप्रमाणे जहागिरी सुद्धा खालसा केल्या गेल्या. लोकशाहीमध्ये सरसकट माणशी एक मत असल्यामुळे जमीनमालकाला फक्त एकच मत आणि त्यावर काम करणा-या अनेक मजूरांनाही प्रत्येकी एक मत असा हिशोब झाला. अर्थातच जास्त मतदारांचा फायदा होऊ शकेल अशी लोकाभिमुख धोरणे सरकारकडून आखली गेली, समाजवादी समाजरचनेच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आणि त्याला अनुसरून "कसेल त्याची जमीन" आणि "वसेल त्याचे घर" अशी बोधवाक्ये तयार झाली. कमाल जमीनधारण कायदा, कूळकायदा वगैरेसारखी बिले विधानसभांमध्ये पास करून घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू झाली. आजच्या काळातल्या वंशजांनी आपल्या वाडवडिलांनी जुन्या काळात केलेली कमाई स्वस्थ बसून खाण्याचे दिवस राहिले नाहीत. सरकारच्या या धोरणांना प्रत्यक्षात मूर्त स्वरूप देणारी बरीचशी राजकारणी मंडळी आणि सरकारी अधिकारी हे सुद्धा जमीनदार किंवा सुखवस्तू वर्गांमधून आलेले असल्यामुळे ते काम जरा संथ गतीने केले गेले आणि त्यात काही पळवाटा सोडण्यात आल्या. 

दरम्यानच्या काळात काही हुषार लोकांनी त्या पळवाटांचा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. काही जमीनमालकांनी आपण स्वतःच शेतकरी असल्याचे जाहीर केले, त्यासाठी त्यांनी रोज भर दुपारच्या उन्हातान्हात किंवा रात्रीच्या अंधारातसुद्धा शेतावर जाऊन शेतात चाललेली कामे पहायला सुरुवात केली आणि शक्य तेवढ्या जमीनीची मालकी वाचवून घेतली. त्यातल्या काही लोकांनी कालांतराने त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवून शेतमालाच्या उत्पन्नात घसघशीत वाढही करून घेतली. काही जणांना कृषीतज्ज्ञ, कृषीपंडित वगैरे उपाधीसुद्धा मिळाल्या. पण हे करण्यासाठी त्यांना मानसिक तयारी आणि बरेच शारीरिक श्रम करावे लागले. ज्यांना हे शक्य नव्हते किंवा ज्यांचा शेतीकडे अजीबात ओढा नव्हता अशा लोकांचा त्यांच्या वडिलोपार्जित जमीनीवरला ताबा सैल होत सुटत गेला. अप्पाच्या बाबतीत बहुधा तसेच झाले असावे. अंगात सफारी सूट परिधान केलेला अप्पा कपाळावर आलेली जुल्फे एका हाताने मागे सारीत दुस-या हातातल्या काठीने शेतातल्या पिकात शिरलेल्या ढोरांना पळवतो आहे किंवा टाइट जीन्स आणि चितकबरे टी शर्ट घालून चिखलात उभा राहिलेला अप्पा पाटाचे पाणी एका बाजूच्या पिकाकडून दुसरीकडे वळवत आहे अशी चित्रे माझ्या डोळ्यासमोर काही केल्या येत नाहीत. त्याने स्वतः शेती करण्याचा मार्ग चोखाळला नाही. यामुळे त्याला शेतीमधून मिळणारे उत्पन्न आटत गेले असणार आणि कदाचित त्याला त्याच्या मालकीच्या जमीनी मिळेल त्या भावाने विकून टाकाव्या लागल्या असतील.

अप्पाने त्याच्या अवाढव्य वाड्याच्या काही भागात भाडेकरू ठेवले होते, पण घरभाडेनियंत्रण कायद्याने घरांची भाडी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आकड्यांवर गोठवली गेली होती. त्यानंतर महागाई भडकत गेली, सगळ्या वस्तूंचे भाव कित्येक पटींमध्ये वाढत गेले, पण घराची भाडी मात्र स्थिर राहिली. घराच्या दुरुस्तीचा खर्चच त्याच्या भाड्याच्य़ा तुलनेत फार जास्त व्हायला लागला. यामुळे अप्पाच्या उत्पन्नाचे हे साधनही कमी कमी होत गेले. त्याच्या मालकीची एवढी मोठी टोलेजंग वास्तू असली तरी त्यामधून त्याला जास्त उत्पन्न मिळत नव्हते, उलट तिच्या दुरुस्तीचा खर्च मात्र वाढत चालला होता. थोडक्यात सांगायचे झाल्यास त्याची खर्चिक वृत्ती आणि कमी होत चाललेले उत्पन्न यांचा मेळ जमेनासा झाला. त्याला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काही उपाय करणे भाग पडायला लागले होते.

यासाठी त्याने नेमके काय केले हे मला कधीच नीटसे समजले नाही. कोणाकडे नोकरी करायची असल्यास त्यातून परावलंबित्व येते, वेळेची शिस्त पाळावी लागते, वरिष्ठांनी सांगितलेले नेहमी ऐकावे लागते तसेच काही वेळा त्यांची बोलणीही ऐकावी लागतात. कलंदर वृत्तीच्या अप्पाला हे नक्कीच जड गेले असते. प्रत्यक्षात त्याला हवी तशी नोकरी मिळाली की नाही, त्याने ती टिकवून धरली की नाही वगैरेबद्दल मला नेमके काही समजले नाही, पण त्याने कुठे नोकरी धरली असल्याचे मी कधी ऐकलेही नाही. अप्पाच्या मालकीचे एक सिनेमा थिएटर होते. त्यातून त्याला नियमित उत्पन्न मिळत असे. कदाचित त्याने इतरही काही उद्योग व्यवसाय केले असतील, काही पैसे त्या व्यवसायांमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवले असतील. कमाईचे आणखीही काही मार्ग चोखाळले असतील.

माझी नोकरी आणि संसाराचा व्याप वाढत गेल्यावर मला कुठेही जाण्यासाठी वेळ मिळेनासा झाला. मी अगदीच आवश्यक अशा समारंभांना जाऊन उभ्या उभ्या उपस्थिती लावून येत असे. तेवढ्या वेळात जे कोणी ओळखीचे लोक भेटत त्यांची तोंडदेखली विचारपूस करत असे. "तुम्ही कसे आहात?", "सध्या कुठे असता?" आणि वाटल्यास "तुमची तब्येत आता कशी आहे?" एवढेच प्रश्न विचारत असे. "तुम्ही काय करता?" हा प्रश्न मला नेहमीच जरा  आगाऊपणाचा वाटत असल्यामुळे मी तो कुणालाही कधीच विचारला नाही. आपणहून कोणी ती माहिती दिली तर ती लक्षात रहात असे. काही लोक इतरांच्या बाबतीतली माहिती देत असतात. काही समारंभांमध्ये माझी आणि अप्पाचीही अशी ओझरती गाठ पडत असे. त्याने आपणहून मुद्दाम माझ्याकडे यावे किंवा मी त्याच्याकडे जावे असे कोणते कारणच नव्हते आणि आम्ही बिनाकारणाचे एकमेकांकडे जावे इतकी जवळीक आमच्यात झाली नव्हती. तो कसलासा बिझिनेस करतो एवढेच मला दुस-या कोणाकोणांकडून अधून मधून कळत असे. 

"अजगर करे न चाकरी पंछी करे न काम । दास मलूका कह गये सबके दाता राम ।" असा एक दोहा आहे. सुस्त अजगर किंवा स्वैर पक्षी यांनासुद्धा त्यांचे खाणे भगवान श्रीराम मिळवून देतो (मग तो आपल्याला का नाही देणार?) अशा अर्थाच्या या वचनावर बरेच दैववादी लोक विसंबून असतात. अजगर आणि पक्षी यांनासुद्धा आपली शिकार किंवा भक्ष्य स्वतःच शोधावे लागते आणि झटापट करून मिळवावे लागते याचा विचार कदाचित त्यांच्या मनात येत नसेल. आमचा अप्पा रामाचा परमभक्त नव्हता, देवी हे त्याचे श्रद्धास्थान होते. नवरात्राच्या उत्सवात तो काहीही न खाता पिता तीन तीन तास साग्रसंगीत पूजा करायचा. देवीची अनेक स्तोत्रे त्याला तोंडपाठ होती आणि त्यांच्या सामूहिक पठणाच्या कार्यक्रमात अप्पाचा खडा आवाज ठसठशीतपणे वेगळा ऐकू येत असे. त्या कार्यक्रमातला तो लीड सिंगर असायचा. इतर लोक त्याच्या आवाजात आपला आवाज मिसळत असत.

आपले ठीक चालले आहे असेच तो वर वर सांगत असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे इतरांकडून कानावर येत होते. शेतजमीनींनंतर थिएटरही त्याच्या हातातून गेले होते. पूर्वजांकडून वंशपरंपरेने त्याच्याकडे आलेल्या मौल्यवान वस्तू एक एक करून विकल्या जात होत्या. मोठमोठी पुरातन भांडी, वाड्यातली झुंबरे, हंड्या वगैरे अनावश्यक वस्तू तर नाहीशा झाल्याच, दिवाणखान्यातले नक्षीदार खांब, कमानी आणि दरवाजेसुद्धा विकले गेले असे समजले. या सगळ्या काळात आमच्या गाठीभेटी क्वचितच झाल्या होत्या. कधी अचानक त्याच्याशी गाठ पडली तरी ती औपचारिकतेच्या पलीकडे जात नव्हती. 

मी एका कार्यक्रमामध्ये माईला पाहिले आणि माझ्या पोटात धस्स झाले. तिचा मूळचा प्रफुल्लित चेहरा पार कोमेजून गेला होता, तिची सडसडीत अंगकाठी खंगून अगदी अस्थिपंजर झाली होती, ती अकालीच थकल्यासारखी दिसत होती. गेले बरेच दिवस तिला बरे वाटत नव्हते आणि तिच्या उपचारासाठी अप्पाने पुण्यात घर केले असल्याचे समजले. ते एक कारण होतेच, शिवाय माई आणि अप्पा या दोघांचेही काही जवळचे आप्त आधीपासून पुण्यात रहात होते आणि काहीजण सेवानिवृत्तीनंतर पुण्याला स्थाईक झाले होते. कदाचित त्यांच्या आधाराची आवश्यकता वाटल्यामुळेही त्या दोघांनी लहान गावातला आपला प्रशस्त वडिलोपार्जित वाडा सोडून मोठ्या शहरातल्या लहानशा घरात येऊन रहाण्याचा निर्णय घेतला असावा. या उपचारांनी माईला गुण आलाच नाही. तिने कायमचा निरोप घेतल्याची दुःखद बातमी एक दिवस समजली. त्याबरोबर हे ही कानावर आले की अप्पाची तब्येतसुद्धा खालावत चालली होती. त्याला नेमका कोणता आजार झाला होता याची कोणी वाच्यता करत नव्हते.

त्या काळात माझ्या मुलाचे लग्न ठरले. झाडून सगळ्या आप्तस्वकीयांना या कार्यासाठी आमंत्रण द्यायचे होते. त्यांची यादी करून प्रत्येकाचा अद्ययावत पत्ता, फोन नंबर वगैरे माहिती आम्ही गोळा केली आणि कामाला लागलो. या यादीत अप्पाचा नंबर बराच वर होता. त्याने माझ्या मुलाला एके काळी अंगाखांद्यावर खेळवले होते. शिवाय पूर्वीच्या आठवणी काढल्या तर कोठल्याही मेळाव्यात त्याच्या असण्यामुळे चैतन्य सळसळत असे. लग्नकार्यांमध्ये तर त्याच्या उत्साहाला उधाण येत असे. वरातीत नाचण्यापासून ते पंक्तीत आग्रह करण्यापर्यंत सगळ्या गोष्टीत तो हौशीने सर्वात पुढे असायचा. वाजंत्रीवाल्यांपासून मांडव सजवणारे आणि आचारी वाढप्यांपर्यंत सगळ्यांना तो धाकात ठेवत असे. नव-या मुलाला झोकदार फेटा बांधावा तर तो अप्पानेच असे ठरलेले होते. त्याच्याकडे असलेले खास खानदानी जरतारी पागोटे कडक इस्त्री करून तो त्यासाठी घेऊन यायचा. आमच्या अशा किती तरी मजेदार जुन्या आठवणी अप्पाशी जोडलेल्या होत्या. तो आला नाही तर त्याची उणीव सर्वांना भासणार हे उघड होते.

पण या वेळी त्याला बोलवावे की नाही यावर निर्णय करणे कठीण जात होते. हे लग्न ऐन हिवाळ्यात आणि उत्तर भारतातल्या कडाक्याच्या थंडीत होणार होते. अप्पाच्या बिघडलेल्या प्रकृतीबद्दल जे ऐकले होते, त्यावरून त्याला तिथे येणे कितपत झेपेल याची शंका वाटत होती. तरीही त्याचा बिनधास्त स्वभाव माहीत असल्यामुळे तो कशालाही न जुमानता तिथे येईल अशीही शक्यता होती. पण तिथे आल्यावर त्याची तब्येत जास्तच बिघडली तर त्या अनोळखी गावात किती धावपळ करावी लागेल आणि ती कोण करेल हा मोठाच प्रश्न होता. दुसरी अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला जडलेल्या अवघड आणि संसर्गजन्य व्याधीसंबंधी थोडी कुजबुज व्हायला लागली होती. लग्नाला आलेल्या प्रत्येक पाहुण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे शक्यच नसल्यामुळे मंगल कार्यालयात सगळे एकत्रच राहणार हे उघड होते. कोणासाठी खास वेगळी व्यवस्था करायचीच झाली तर मुलीकडच्या मंडळींना तसे करण्यासाठी काय कारण सांगावे? ते तशी व्यवस्था करू शकतील का? असे प्रश्न मनात येत होते. लग्नकार्याला आलेल्या प्रत्येक पाहुण्यावर सारखे लक्ष ठेवता येत नाही. त्यातला कोणी तरी अप्पाला त्याच्या आजाराबद्दल काही अनुचित बोलला तर पंचाईत होईल आणि त्याच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी कोणी स्वतःच ते कार्य सोडून चालला गेला तर? सगळेच अशुध्द आणि अवघड होऊन बसले असते. 

तो आला असता तर त्याला सगळ्यांमध्ये मिसळू देणेही अवघड आणि तो बाजूला वेगळा बसून राहिला तरी तेही जास्तच खटकणार. काय करावे ते आम्हाला सुचेना. हे कार्य निर्विघ्न पार पडावे, त्यात गडबड गोंधळ होऊ नये असे आम्हाला वाटले. आपण व्यक्तिशः अप्पाच्या मनाचा कितीही विचार केला आणि त्याला सन्मानाने वागणूक दिली तरी इतर सर्व लोकांबद्दल तशी खात्री देता येणार नाही असेच वाटले. हो नाही करत त्याला बोलावणे करण्याचे टाळले गेले. वाटल्यास नंतर त्याचा दोष टपालखात्यावर टाकू असे मनोमन ठरवले. अर्थातच हे काही लोकांना खटकले आणि त्यावरून थोडे गैरसमज, रागावणे, रुसणे वगैरेही झाले, पण त्याला काही इलाज नव्हता.

त्या घटनेनंतर बराच काळपर्यंत आमचा अप्पाशी थेट संपर्क झालाच नव्हता. त्याच्या अगदी जवळच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. ते लग्न गावातलेच असल्यामुळे तो येणार अशी आमची अपेक्षा होती आणि तो आलाही. तो आला म्हणण्यापेक्षा त्याला स्ट्रेचरवरून आणले गेले असे म्हणावे लागेल. त्याला मी पहिल्यांदा पाहिले तेंव्हा तो अत्यंत देखणा, तल्लख, चपळ तसाच मस्तीखोर आणि खट्याळ होता. निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या योजून तो इतरांना हसवत, चिडवत आणि क्वचित थोडेसे रडवत असे. अशा चैतन्यमूर्ती अप्पाला निश्चेष्ट पडलेल्या अवस्थेत पहावे लागेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. त्याच्या अंगात हिंडण्याफिरण्याचे त्राण नव्हतेच. त्याला एका खोलीत झोपवून ठेवले होते, तिथूनच तो सगळा सोहळा पहात होता आणि ऐकत होता. आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा आम्हाला पाहून त्याने एक मंद स्मित केले, क्षीण आवाजात एक दोन शब्द बोलला. तेवढ्यानेही त्याला त्रास होत असल्याचे जाणवत होते. पूर्वीच्या अप्पाच्या सावलीपेक्षाही तो फिका पडला होता. त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देऊन आम्ही तिथून हळूच काढता पाय घेतला. यानंतर पुन्हा त्याची भेट घडेल की नाही याची शाश्वती वाटत नव्हतीच. तसा चमत्कार घडलाही नाही. त्याच्या आठवणीच तेवढ्या शिल्लक राहिल्या.