Saturday, August 30, 2008

लेने के देने

कालच ईमेलवरून एक मजेदार चुटका आला. अशा गोष्टी अमेरिकेतच घडू शकतात असे वाटल्याने त्याचे भाषांतर करतांना भारतीयीकरण केले नाही. फक्त गोष्टीमध्ये थोडा बदल करून तिचा बराच विस्तार केला आहे.
ही एका अमेरिकन 'धनिकवणिकबाळा'ची गोष्ट आहे. त्याचे नांव जॉन आहे असे समजू. गडगंज दौलत वारशात मिळाल्यामुळे जॉनला त-हेत-हेचे छंद लागले होते आणि त्याने राजेशाही षौक बाळगले होते. त्यामुळे उत्तमोत्तम आणि महागड्या वस्तू विकत घेण्याची संवय त्याला पडली होती. त्यासाठी त्याच्याकडे असलेले पैसे अपुरे पडत असल्यामुळे विनासायास थोडीफार जादा मिळकत करण्याची संधी तो पहात असे. एकदा एका दुकानातून त्याने अतिशय महागड्या सिगार्सचे पॅकेट खरेदी केले. 'विमा उतवण्यायोग्य वस्तू' असा शेरा त्या पॅकेटवर छापलेला असल्यामुळे त्याने लगेच त्याचा विमाही उतरवला. घरी आणल्यावर ते पॅकेट उघडल्याशिवाय तो थोडाच राहणार आहे. त्याने एका सिगारचा आस्वाद घेतला, तो त्याला इतका आवडला की दुसरी, तिसरी करत तो त्या सिगार फुंकतच राहिला. थोड्याच दिवसात ते पॅकेट रिकामे झाले.
रिकाम्या पॅकेटकडे पाहता पाहता जॉनला एक नामी संधी सुचली. त्याने उतरवलेल्या विम्यात 'आगीपासून होणारे नुकसान' भरून निघण्याबद्दलचे कलम होते. त्याने विमा कंपनीकडे एक रीतसर अर्ज पाठवला. विमा उतरवलेली उंची सिगार्स शंभर छोट्या छोट्या आगींमध्ये जळून खाक झाल्यामुळे त्याची नुकसानभरपाई मिळावी अशी याचना करून ती न दिल्यास आपण न्यायालयात दाद मागू अशी धमकीही त्याने दिली. विमा कंपनीच्या कायदापंडितांनी कागदपत्रे तपासून पाहिली. विमा उतरवण्यायोग्य वस्तूंमध्ये त्या उंची सिगार्सची गणना होत होती. त्यामुळे त्यांचा विमा उतरवण्यात चूक झालेली नव्हती. अपघात, पाऊसपाणी, पूर, दंगेधोपे अशा कित्येक कारणांच्या जोडीने आग या कारणामुळे होणारी हानी भरून देण्यात येईल असे कलम त्या करारपत्रात होते. आगीच्या स्वरूपाबद्दल कोणताच खुलासा नव्हता. लहानात लहान ती केवढी असावी हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे या सगळ्याचा कीस न्यायालयात निघाला तर आपली बाजू लंगडी पडेल, तसेच निष्कारण त्यावर खर्च करावा लागेल आणि शेवटी आपलेच हंसे होण्याची शक्यता आहे वगैरे गोष्टी त्यांच्या नजरेस आल्या. त्यापेक्षा त्या गृहस्थाला विम्याची रक्कम देऊन टाकणे इष्ट आहे असे ठरवून त्यांनी पूर्ण रकमेचा चेक त्याला पाठवून दिला.
विम्याची रक्कम मिळताच जॉन खूष झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी तो बाहेर जाऊन मौजमजा करण्यावर आणखी पैसे उधळून आला. परत येतो तो त्याच्या घराबाहेर त्याची वाट पहात पोलिस उभे होते. "माझा काय गुन्हा आहे?" असे विचारताच "तुझ्याविरुध्द फौजदारी गुन्हा नोंदवला गेला आहे." असे उत्तर मिळाले. जॉन चाटच पडला. त्याचे मनमौजी वागणे कसेही असले तरी तो कायद्याची चौकट न ओलांडण्याची खबरदारी घेत आला होता. "आपल्या पैशाची आपण उधळपट्टी केली तर त्यात कुणाच्या बापाचे काय जाते?" असा प्रश्न त्याला पडला. त्याने पुन्हा विचारले, "माझ्याविरुध्द कोणता गुन्हा केल्याची तक्रार आहे?"इन्स्पेक्टरने सांगितले, "तू ज्या वस्तूंचा विमा उतरवला होतास त्यांची शक्य तेवढी काळजी घेणे हे तुझे कर्तव्य होते. अपघाताने जर त्याला एकादी आग लागली असती तर ते समजण्यासारखे होते, पण तुझ्या घरी त्यांना शंभर वेळा आगी लागल्या तेंव्हा प्रत्येक वेळी तू काय झोपा काढत होतास? पहिल्यांदा लागलेली आग विझवण्यासाठी तू कोणते प्रयत्न केले होतेस? पुन्हा ती लागू नयेस यासाठी कोणती उपाययोजना केली होतीस? आग लागल्याची खबर तू पोलिसात एकदासुध्दा कां दिली नाहीस? ती आग पसरली असती तर किती नुकसान झाले असते?" वगैरे प्रश्नांची सरबत्ती करून " या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरे आम्हाला हवी आहेत." असे त्याला बजावले.
या प्रश्नांना काय उत्तर द्यावे तेच जॉनला सुचेना. आपल्याकडे शंभर वेळा छोट्या छोट्या आगी लागल्या असे विधान तो लेखी देऊन चुकला होता. आता त्याला ते नाकारता येत नव्हते. शंभर वेळा आगी लागल्या आणि त्याने त्या लागू दिल्या यात त्याचा निष्काळजीपणा तर होताच, पण तो स्वतः त्या कृत्यात सहभागी असावा असा संशय कोणालाही येईल. तो त्याचे खंडन कसे करणार होता? त्याचे आग लावणे किंवा त्या गोष्टीला प्रोत्साहन देणे, त्यात मदत करणे वगैरे सिध्द झाले तर त्याची गणना दहशतवादी कारवाया करणा-या 'आतंकवादी' लोकात होऊ शकली असती. या सगळ्या घोळातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःच ते सिगार ओढले असल्याचे कबूल केले. "विमा उतरवलेल्या वस्तूंना आग लावून ती नष्ट करणे." या गुन्ह्यासाठी त्याला जबरदस्त दंड ठोठावला गेला आणि 'लेनेके देने पड गये

Thursday, August 28, 2008

भाषा आणि परिभाषा

'विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान' या विषयावर एक तेख मी उपक्रम या संकेतस्थळावर दिला होता. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. विशेषतः दोन विद्वान सदस्यांमध्ये झालेल्या संवादातून त्यात मोलाची भर पडली. या प्रतिसादांवर विचार करतांना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. तिचा थोडासा विस्तार मी या लेखात करणार आहे. 'भाषा' या विषयाचा आवाका तसा खूपच मोठा आहे. मी त्याचा अभ्यासही कधी केलेला नाही. त्यामुळे या लेखाचा विषय फक्त माझ्या पूर्वीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांचा भाषेच्या अनुषंगाने परामर्श घेणे एवढ्यापुरताच मर्यादित आहे.

बहुतेक भाषांमध्ये कांही शब्दांना अनेक अर्थ असतात तर कांही वेळा एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात, पण त्या अर्थांना भिन्न छटा असतात. जो शब्द नेहमी वापरात असतो तोच बोलतांना आपल्याला पटकन सुचतो. लिहितांना थोडा विचार करून योग्य असा शब्द लिहिण्याचा प्रयत्न आपण करतो. कधी पुनरुक्ती टाळण्यासाठी किंवा यमक, अनुप्रास वगैरे जुळवण्यासाठी वेगवेगळे शब्द वापरतो. ते वाचकाच्या ओळखीचे नसतील तर त्या शब्दांचा आपल्याला अभिप्रेत अर्थ त्याला न समजण्याचा घोका असतो, पण अशा वेगवेगळ्या शब्दप्रयोगामुळे लेखनाची वाचनीयता वाढते. कांही वेळा श्लेष साधण्यासाठी द्व्यर्थी शब्दांचा कौशल्याने उपयोग केला जातो. एक सभ्यपणाचा आणि दुसरा चावट असे दोन अर्थ निघणारी वाक्ये स्व.दादा कोंडके यांच्या चित्रपटात नेहमी दिसत असत आणि अशा वाक्यांना टाळ्यांच्या कडकडाटाने प्रेक्षकांची दादही मिळत असे.

विज्ञान, तंत्रज्ञान, विधी यासारख्या क्षेत्रात आशयाच्या नेमकेपणाला अतिशय महत्व असते. त्यामुळे एकाद्या वाक्यातून दोन अर्थ निघू शकणार नाहीत याची मुद्दाम काळजी घेतली जाते. अनेक पुस्तकांत सुरुवातीला किंवा परिशिष्टांमध्ये त्यातील महत्वाच्या शब्दांची व्याख्या दिलेली असते. एकाद्या माणसाने भररस्त्यात दहा लोकांसमोर दुस-याला भोसकले आणि तो रंगेहाथ पकडला गेला असला तर त्या क्षणापासून सर्वसामान्यपणे तो माणूस 'खुनी' म्हणून ओळखला जातो. पण कायद्याच्या भाषेत तो आधी 'संशयित' असतो, त्याच्यावर खटला भरला गेल्यावर तो 'आरोपी' होतो आणि न्यायालयाने त्याला दोषी ठरवल्यानंतर तो 'गुन्हेगार' समजला जातो असे आपण नाटक, सिनेमे आणि मालिकांमधल्या कोर्टसीन मध्ये पाहतोच.
इंग्रजी भाषेत फोर्स, प्रेशर, स्ट्रेस, थ्रस्ट हे शब्द एरवी साधारणपणे समान अर्थाने वापरले जातात, त्याचप्रमाणे एनर्जी, पॉवर आणि स्ट्रेंग्थ या शब्दांचा उपयोग एकमेकांच्या बदल्यात होत असतो. पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिभाषेत यातील प्रत्येक शब्दाची वेगळी व्याख्या आहे आणि समीकरणात वापरण्यासाठी रोमन आणि ग्रीक लिपींमधली विशिष्ट मुळाक्षरेच त्यांचेसाठी वापरली जातात. तिथे एका शब्दाच्या बदल्यात दुसरा घेतला तर गणितच चुकेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करता करता त्याची परिभाषा कांही लोकांच्या रक्तात भिनत जाते आणि त्यांच्या विचार करण्याच्या किंवा विचार व्यक्त करण्याच्या प्रक्रियेत ती गोष्ट जाणवते असे मला वाटते. माझे बहुतेक मराठी भाषिक मित्र वैज्ञानिक किंवा तांत्रिक विषयांवर मराठीत बोलतांनासुध्दा इंग्रजी शब्दांचाच उपयोग करतात. मी तरी अद्याप त्यांच्यातल्या कोणाच्या तोंडून 'फोर्स' व 'एनर्जी' या अर्थाने 'बल' किंवा 'ऊर्जा' हे शब्द ऐकलेले नाहीत. माझीही हीच परिस्थिती असणार. यामुळे 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन' हे शब्द ऐकतांना त्या शब्दांचे वैज्ञानिक परिभाषेतील अर्थच माझ्या नजरेसमोर येतात आणि त्या अर्थाशी विसंगत असलेल्या गोष्टी मला मान्य होत नाहीत.
नमनाला एवढे घडाभर तेल घातल्यानंतर आपण कांही निवडक प्रतिसाद पांहू. भाषा आणि परिभाषा यांमधली सीमारेषा किती पुसट आहे याचे प्रत्यंतर यात येईल.

"परंतु व्हायब्रेशन्सचा मानवी मनावर परिणाम होतच नाही असे ठाम सांगणे कठीण वाटले. मधुर संगीत, कर्कश्श संगीत अगदी रातकिड्यांची किरकिर या लहरींचा मानवी मनावर परिणाम घडतो असे वाटते."

ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला संगीत ऐकू येते. ध्वनीचे वहन लहरींमधून होते, तसेच प्रकाशकिरणांचेही होते. आपण डोळ्यांनी प्रकाश पाहतो तसेच कानांनी आवाज ऐकतो. याशिवाय जिभेने चंव घेतो, नाकाने वास घेतो आणि त्वचेला स्पर्श जाणवतो तसेच कंपनेसुध्दा जाणवतात. या सर्व संवेदना वरील ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे जातात, तिथे त्याला त्यांचा अर्थ उमगतो आणि मनामध्ये असलेली आवडनिवड, त्या वेळची मनःस्थिती वगैरेंप्रमाणे त्याविषयी तदनुसार भावना मनात उठतात. पदार्थविज्ञानाच्या दृष्टीने संगीतामधून निघालेल्या ध्वनीलहरींचा फक्त कानापर्यंत झालेला प्रवास महत्वाचा असतो. ध्वनी ऐकण्याचा अनुभव हा प्रत्यक्ष घडणारा अनुभव असतो. त्यात 'अंतर्ज्ञाना'चा अज्ञात असा भाग नाही. त्यामुळे ज्या अजब व्हायब्रेशन्सचा उल्लेख मी माझ्या लेखात केला आहे त्यापेक्षा हा अनुभव सर्वस्वी वेगळ्या प्रकारचा असतो. अंतर्ज्ञानातील व्हायब्रेशन्स थेट बुध्दीला किंवा मनाला जाऊन भिडतात किंवा भाग्यात (म्हणजे नक्की कुठे कोणास ठाऊक) प्रवेश करून त्याला उजळवतात असे म्हणतात!

"स्पर्शाने उर्जेचे संक्रमण होते हे ही खरे आहेच. ...... हात जोडणे, डोक्यावरून हात फिरवणे, गळाभेट वगैरे गोष्टीतून उर्जा वाहत नाही हे कसे स्पष्ट होते? "
भौतिकशास्त्रातल्या नियमांत ऊर्जेचे जे प्रकार येतात त्यातल्या फक्त वीज व ऊष्णता तेवढ्या स्पर्शामधून संक्रमित होतात. विजेचा धक्का क्वचित आणि अल्पकाळ बसत असल्यामुळे यातून वगळला तरी चालेल. एका व्यक्तीला ताप आला असेल तर ऊष्णता संक्रमित होते, पण तिचे प्रमाण इतके अल्प असते की ताप आलेल्या माणसाचा हात हातात धरल्यामुळे आपला हात गरम झाला असे सहसा जाणवत नाही. थंडीने गारठलेल्या माणसांच्या अंगात स्पर्शामुळे ऊब नक्कीच येते. तेवढ्यापुरते प्रतिसादातले विधान बरोबर आहे. टाळी वाजवणे, शड्डू ठोकणे, बुक्का किंवा थप्पड मारणे अशा क्रियातून जो ध्वनी निर्माण होतो त्यातली ऊर्जा हवेत विरून जाते. या प्रकारांमधूनसुध्दा फारच थोडी ऊर्जा एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे जाते. स्पर्शामुळे शरीरात जी स्पंदने निर्माण होतात, हृदयाचे ठोके वाढतात त्या प्रकारच्या गोष्टी वाचनातूनसुध्दा घडतात. त्यावेळी कोठलाही बाह्य स्रोत नसतो. त्या शारीरिक क्रियांसाठी लागणारी (भौतिकशास्त्रातली) सर्व ऊर्जा त्या माणसाने खाल्लेल्या अन्नापासून त्याला मिळत असते. अंगात उत्साह भरला, वीरश्री संचारली, शक्तीपात झाला वगैरे गोष्टींचा कॉन्झर्वेशन ऑफ (फिजिकल) एनर्जीशी कांही संबंध नसतो. माणसाच्या मनातला जोम किंवा त्याच्या अंगातली (स्नायूमधली) शक्ती या गोष्टी एनर्जीच्या परिभाषेतल्या व्याख्येत येत नाहीत, पण साध्या भाषेत सर्रास त्यांचा वापर होतो.

"एखादा मनुष्य बोलताना "स्वतःच्या संवेदनशक्तीचा किंवा सहनशक्तीचा" उल्लेख करतो. ही शक्ती नेमकी कशी मोजावी यासाठी भौतिकशास्त्राचे सूत्र किंवा परिमाण लागू होईलच असे नाही."
या वाक्यात 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'क्षमता' या अर्थाने केला गेला आहे. विज्ञानाच्या परिभाषेतल्या 'पॉवर' या अर्थाने नाही. ज्या गोष्टीचा उपयोग ज्या परिमाणात मोजला जातो त्याच परिमाणात तिची क्षमता व्यक्त करतात. उदाहरणार्थ : पिपाची क्षमता लीटरमध्ये. कांही गोष्टींची क्षमता सुरक्षित वापराच्या दृष्टीने दिली जाते. लिफ्टमध्ये इतक्याच माणसांनी यावे, पुलावरून एवढ्याच वजनाचे वाहन न्यावे वगैरे. ही जड वस्तूंची उदाहरणे झाली. संवेदनक्षमता किंवा सहनशक्ती वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. मला इतका सूक्ष्म आवाज ऐकू येतो किंवा एवढा उजेड सहन होत नाही. या उदाहरणात आपण डेसिबल किंवा ल्यूमेन ही एकके वापरू शकतो. पण नर्म विनोद समजणे किंवा संताप सहन न होणे अशा गोष्टीत विनोद आणि संताप या अंकात न मोजता येणा-या बाबी आहेत. या गोष्टींचा अनुभवाने अंदाज बांधू शकतो पण तो व्यक्त करता येत नाही. मुलाच्या बौध्दिक विकासाचे मूल्यमापन करण्यासाठी त्याची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती वगैरे मोजण्याच्या पध्दती निघाल्या आहेत. अमूक इतक्या प्रश्नांची अमूक इतक्या वेळात बरोबर उत्तरे देण्यावरून त्या मुलाचे बुध्द्यांक काढले जातात. या उदाहरणातही भाषा आणि परिभाषा यातला भेद दिसतो.

"उर्जा कशाकशातून निर्माण होते हे शास्त्रीय दृष्ट्या सांगता येत असेल, पण काही उर्जा / कंपने त्याचा परिणाम शरिरावर होतो याचे विश्लेषण करता येते का ? आणि त्यामुळे खरे विज्ञान बाजूला पडेल की माहित नाही पण अशा उर्जांबद्दल अनेकदा आपण ऐकत असतो, मला उल्लेख करण्याचा मोह होतो तो 'रेकी' या उर्जेचा... क्षणभर अशी एक उर्जा बाहेर पडते असे ग्रहीत धरले तर त्याच्या आदराबरोबर विश्लेषन केले पाहिजे म्हणजे विज्ञानाची वाट मोकळी होईल असे वाटते."
ऊष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आदि ज्या उर्जांचा विचार विज्ञान व तंत्रज्ञानात केला जातो त्यांचा मानवी शरीरावर कसकसा आणि किती परिणाम होतो याबद्दल फार पूर्वीपासून संशोधन होत आले आहे आणि ते चाललेच राहील. यातील निष्कर्ष प्रसिध्द केले जातात एवढेच नव्हे तर त्या आधारांवर त्या ऊर्जेचा वापर करण्यावर प्रतिबंधात्मक नियम केले जातात. विजेचा प्रवाह, बॉयलरमधील वाफेचा दाब, किरणोत्सर्गी स्रोतांचा वापर याबद्दल कायदे केलेले आहेत. भौतिकशास्त्रात ऊर्जेचे मापन तिच्या दृष्य परिणामांवरून केले जाते. थर्मॉमीटरमधील पा-याचे प्रसरण, विद्युतचुंबकीय परिणामामुळे सुईचे फिरणे वगैरे उपकरणांद्वारे मोजमापे घेऊन त्या ऊर्जेची तीव्रता ठरवली जाते.रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांच्या क्षेत्रामध्ये 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' या शब्दांचा जो उपयोग केला जातो त्या संकल्पनाच वेगळ्या असतात. त्या शुध्द, अशुध्द, लाभदायक, हानिकारक वगैरे असतात आणि तडक मनाला किंवा भाग्याला जाऊन भिडतात. त्यांना भौतिकशास्त्राचे कोणतेच नियम लागू पडत नसल्यामुळे त्या बाह्य उपकरणांद्वारे कशा मोजता येणार? त्यातले तज्ज्ञ जे सांगतील तेवढेच आपण ऐकू शकणार. याबाबतीतली त्यांची परिभाषाच वेगळी असते.

परीकथांमध्ये एक वेगळी परिभाषा असते. त्यातल्या प-या, राक्षस आणि चेटकिणी त्याप्रमाणे वागतात. पण ते काल्पनिक असते हे लहान मुलांनादेखील ठाऊक असते. माझ्या लहानपणी ज्या धार्मिक कथा सांगितल्या जात असत त्यांचीसुध्दा एक विशिष्ट परिभाषा होती. वरदान, शाप, दृष्टांत, सिध्दी, मंत्रतंत्र, अंतर्ज्ञान, दिव्यदृष्टी, पापक्षालन, पुण्यसंचय, पूर्वजन्म अशासारख्या संकल्पनांमधून सगळ्या चमत्कारांचे व्यवस्थित स्पष्टीकरण केले जात असे. त्याबद्दल शंका घेण्याची कोणाची प्राज्ञा नसे. त्या कथांचा दाखला देऊन आज घडणा-या घटनांचे स्पष्टीकरण केले जात असे. कांही लोक मंतरलेला गंडा, दोरा वगैरे बांधत, अंगारा लावत आणि त्यापासून आपले संरक्षण होईल किंवा भरभराट होईल अशी त्यांची श्रध्दा असे. हे नेमके कसे घडते ते समजण्याची तेंव्हा आवश्यकता नव्हती. शिक्षणाच्या प्रसारानंतर लोकांना थोडे प्रश्न विचारायचे धैर्य आले आहे. तसेच फेंगशुई व रेकीसारख्या कांही विद्या परदेशातून आल्या आहेत. कदाचित त्यामुळे 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' अशा सायंटिफिक व आधुनिक वाटणा-या शब्दांचा उपयोग करणे सुरू झाले असावे.

एका प्रतिसादात "अस्पृश्य असे कांहीच नाही " असे म्हंटले आहे. त्याच्याशी मी सहमत आहे. माझ्या लेखात लिहिल्याप्रमाणे माझ्या ज्ञानज्योतीच्या मिणमिणत्या उजेडात जेवढे मला स्पष्ट दिसते ते 'आहे' असे मी खात्रीपूर्वक सांगू शकेन, जे अस्पष्ट दिसते ते 'असावे' असे वाटते आणि त्याच्या पलीकडले काही दिसतच नाही. तिथे काय काय आहे याची मला कल्पना नाही. त्यामुळे 'आहे' आणि 'नाही' यांच्या दरम्यान 'कदाचित असेल' ते 'बहुधा असावे' यांच्या एक ते नव्व्याण्णऊ टक्के इतक्या शक्यता असतात. "रेकी, फेंगशुई, वास्तूशास्त्र यासारख्या शास्त्रांपासून आपल्याला खूप फायदा झाला" असे सांगणारे लोक आपल्याला भेटतात. हा त्यांचा प्रत्यक्ष आलेला अनुभव असल्यास त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. हे नेमके कशामुळे घडते हे आपल्याला समजायलाच पाहिजे असेही नाही. कारचे हँडल फिरवल्यावर त्यामुळे अख्खी कार कशी फिरते हे किती लोकांना माहीत असते? पण त्यांना कार चालवता येते. क्रोसिनच्या गोळीने ताप कसा उतरतो हे आपणास माहीत नसते, पण तो उतरतो असे दिसते. त्यामुळे ज्यांना जी विद्या अवगत असेल तिचा त्यांनी (चांगल्या कामासाठी) उपयोग करावा हे सांगायची गरज नाही कारण ते लोक तो करतच असतात. पण असे विशेषज्ञ जी भाषा वापरतात ती विज्ञानातल्या परिभाषेपेक्षा वेगळी आहे याची जाणीव ऐकणा-याने ठेवावी. म्हणजे त्याची दिशाभूल होणार नाही.

'एनर्जी' या नांवाचे एक शीतपेय आहे, कांही लोक आपल्या मुलांना किंवा दुकानांना 'ऊर्जा', 'तरंग' वगैरे नांवे देतात. त्यांना विज्ञानाच्या परिभाषेतल्या या संकल्पनाचे नियम लागू पडत नाहीत. त्यांचे विश्व वेगळे असते. मात्र 'एनर्जी' आणि 'व्हायब्रेशन्स' यासारख्या विज्ञानाच्या परिभाषेतल्या खास शब्दांचा उपयोग करून झटपट आणि हमखास यश, सुख, संपदा वगैरे सबकुछ देऊ करणा-या कोठल्याही मार्गाकडे डोळसपणे लक्ष देऊन त्यावरून प्रवास केल्यास फसगत होण्याची शक्यता टाळता येईल.

Wednesday, August 27, 2008

विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान

पाण्यात दगड टाकला तर तो बुडतो, पण लाकूड पाण्यावर तरंगते, जमीनीवर पडलेला दगड त्याला कोणी ढकलले, ओढले किंवा उचलले तरच तो जागेवरून हलतो, नाही तर जागीच पडून राहतो, सरळ वर उचलून सोडलेला दगड त्याच जागी खाली येतो आणि समोर भिरकवलेला दगड थोड्या अंतरावर जाऊन खाली पडतो वगैरे निसर्गात घडणा-या अनंत गोष्टी अशिक्षित माणसालासुध्दा अनुभवाने समजलेल्या असतात.

आदिमानवाच्या काळापासून माणसाला त्या माहीत होत्या. जग हे असेच असते असे समजून सहसा त्यावर कोणी जास्त विचार करत नाही. आर्किमिडीज आणि न्यूटन वगैरेंसारख्या विद्वानांनी असा विचार केला आणि त्यातून निसर्गाचे कांही मूलभूत नियम शोधून ते सूत्रांच्या किंवा समीकरणांच्या रूपात जगापुढे मांडले. त्या शोधांची नोंद त्यांच्या नांवावर झाली. अशा प्रकारच्या अनेक अनुभवांचा, निरीक्षणांचा आणि त्यावरून काढलेल्या निष्कर्षांचा विचार करून जे सिध्दांत मांडले गेले त्या सर्वांना एकमेकांशी प़डताळून पाहिल्यानंतर त्यातले कांही सर्वमान्यता पावले. त्यांचा एकत्रित विचार करून त्यातून एक शास्त्र बनत गेले. त्याला 'सायन्स' असे नांव दिले गेले. परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण आणि निष्कर्ष या पध्दतीने अधिकाधिक माहिती मिळवण्याचे एक प्रभावी तंत्र बनले, ते 'सायंटिफिक मेथड' या नांवाने प्रचारात आले. इंग्रजांनी सुरू केलेल्या शिक्षणपध्दतीतून भारतात आल्यावर 'सायन्स'ला मराठीत 'विज्ञान' या नांवाने संबोधले गेले आणि आजही जात आहे.

वैज्ञानिक पध्दतींचा उपयोग करून माहिती मिळवतांनासुध्दा शारीरिक ज्ञानेंद्रियांच्या मर्यादा आड येतातच. जगात जे कांही अस्तित्वात असते वा घडत असते त्यातला अत्यंत थोडा भागच आपल्या ज्ञानेंद्रियांना जाणवतो. त्यापलीकडे खूप कांही असते. शिवाय आरशात दिसलेले प्रतिबिंब म्हणजे खरी वस्तू नसते किंवा परावर्तनातून आलेला प्रतिध्वनी मूळ आवाज नसतो. त्यामुळे जे जाणवते त्यातलासुध्दा कांही भाग शंकास्पद असतो. यातून मार्ग काढण्यासाठी बुध्दीचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतांना डोळ्यांना दिसतो पण तो एका जागेवर स्थिर आहे आणि आपण फिरत आहोत अशी कल्पना मनाने करावी लागते. अगणित विद्वानांनी अशा विविध कल्पना करून त्यांच्या आधारे निरनिराळे सिध्दांत मांडले आणि तर्काने व प्रयोगाने त्यांची सत्यता पटवली.

न्यूटन, पास्कल वगैरे पूर्वीच्या काळातल्या शास्त्रज्ञांनी मांडलेले सिध्दांत अशा प्रकाराने प्रयोगशाळेत सिध्द केले गेले आणि आजही विज्ञानाच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळाकॉलेजांमधून ते करून दाखवले जातात. त्यांच्या आधारावर निसर्गातल्या अनेक घटनांचे तसेच विविध पदार्थांच्या गुणधर्मांचे अर्थ समजून घेता आले आणि त्या माहितीचा उपयोग करून नवनवी साधने व यंत्रे बनवण्यात आली. यातून यंत्रयुग सुरू होऊन त्याचा विकास होत गेला. पण कांही निरीक्षणांचे स्पष्टीकरण जुन्या सिध्दांतातून समाधानकारकरीत्या होत नव्हते. ते समजून घेण्यासाठी नवनव्या संकल्पना मांडल्या गेल्या आणि त्यांच्या आधारे तर्कशुध्द विचाराने नवे सिध्दांत मांडले गेले. अणुपरमाणूंची आंतरिक रचना, सापेक्षता सिध्दांत यासारख्या गोष्टी डोळ्यांना किंवा कानाला जाणवू शकत नाहीत, पण त्या तशा आहेत असे गृहीत धरून गणिताच्या आधाराने अनेक दृष्य परिणामांचे स्पष्टीकरण देता येते. विज्ञानातल्या या संकल्पनांनादेखील शंभरावर वर्षे होऊन गेली आहेत. पण त्या नीट समजण्यासाठी उच्च दर्जाच्या गणिताची बैठक तसेच जेवढी कुशाग्र बुध्दीमत्ता लागते त्यांची अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून करता येणार नाही. त्यामुळे शाळेत शिकवले जाणारे बहुतेक विज्ञान निदान शंभर वर्षे जुने असते. त्यानंतर झालेल्या विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीबद्दल सामान्य लोकांना फारसे माहीत नसते.

असे असले तरी नवनव्या संशोधनाच्या आधाराने ज्या तंत्रज्ञानाचा विकास होतो त्याचा फायदा सामान्य लोकांना मिळतोच. पूर्वीच्या काळात तलवारबाजीत निपुण असलेल्या वीराला पोलाद कसे बनते ते ठाऊक असण्याची गरज नव्हती, पण कणखर पोलादाची तलवार चालवून तो पराक्रम गाजवू शकत असे. त्याचप्रमाणे हातात मोबाईल धरणा-या माणसाला त्यातल्या मायक्रोप्रोसेसर चिपसंबंधी कांहीही माहिती नसली तरी तो त्या साधनाचा उपयोग करून कोणाशी बोलू शकतो, फोटो काढू शकतो, गाणे ऐकू शकतो आणि आता इंटरनेटसुध्दा पाहू शकतो. हे सगळे कसे साध्य होते याबद्दल मात्र तो अनभिज्ञच असतो. आज ज्या वेगाने विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात रोज नवी भर पडत आहे तो कोणत्याही माणसाच्या आकलनशक्तीच्या असंख्यपटीने अधिक आहे. वैज्ञानिकांच्या विनयामुळे म्हणा किंवा सत्यपरिस्थितीच्या जाणीवेमुळे ते नेहमीच आपण एक प्रवासी आहोत असे सांगत असतात. विज्ञानातल्या सिध्दांतांबद्दल थोडी अनिश्चितता बाळगतात. आज हे असे दिसते आहे, उद्या काय दिसेल ते सांगता येत नाही असा सूर लावतात. या सर्वांमुळे विज्ञानाबरोबरच त्याविषयीचे अज्ञान आणि अविश्वास जास्त वाढत चालले आहेत की काय असे कधीकधी वाटते.

मला असे वाटते की अज्ञान हे अमावास्येच्या रात्रीतल्या काळोखासारखे अथांग असते. आपण आपल्या ज्ञानाच्या पणतीच्या उजेडात आपल्या आसपासच्या कांही गोष्टी पाहू शकतो. यात आणखी अशी गंमत आहे की आपल्या शेजारी एकादा माणूस हजार वॉटचा दिवा लावून लख्ख उजेडात बसला असला तरी आपल्याला तो प्रकाश दिसत नाही. आणखी दूरवर पहायचे असेल तर ज्याने त्याने स्वतःच्या पणतीतली वातच मोठी करावी लागते. त्यामुळे विज्ञानाच्या प्रसाराबरोबर त्यासंबंधीचे अज्ञान आणि अविश्वास आपोआप दूर होईल अशी भाबडी आशा बाळगणा-यांची निराशा होते.

आज बहुतेक लोकांच्या घरी टीव्ही, कॉम्प्यूटर आणि खिशात मोबाईल असतात. त्यातल्या प्रत्येक साधनातून तो चित्रे पाहू शकतो आणि ध्वनी ऐकू शकतो. जगभरातून असंख्य ठिकाणांहून आणि अगणित लहरींच्या माध्यमामधून या संदेशांचे प्रसारण होत असते. त्यातले त्याला हवे ते संदेश त्याचे यंत्र ग्रहण करते, पण इतर असंख्य विद्युतचुंबकीय लहरीसुध्दा त्याच्या किंवा आपल्याही आसपास आणि आरपार सारख्या वहातच असतात. पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो. आपण त्याबद्दल पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात असतो.

मात्र अदृष्यपणे येणारे संदेश आपल्याला समजतात असा कांही लोकांचा दावा असतो, किंवा त्यांना ती विद्या प्राप्त आहे अशी इतर लोकांची त्यांच्याविषयी समजूत असते. कोणाला पूर्वपुण्याईने, कोणाला सद्गुरूच्या अनुग्रहाने, कोणाला मंत्रतंत्र, ध्यान धारणा वगैरेंमुळे ही सिध्दी प्राप्त होते, कोणाच्या अंगात ही दैवी शक्ती असते तर कोणाकडे पैशाचिक, अशा अनेक शब्दात आपण त्याचा उल्लेख ऐकतो. या सगळ्या प्रकारांचा समावेश मी 'अंतर्ज्ञान' या शब्दात करीत आहे.

माझ्या लहानपणी अशा अद्भुत शक्तीबद्दलच्या असंख्य कथा मी ऐकल्या आहेत. पण ती शक्ती धारण करणारे सिध्दपुरुष कधीकाळी होऊन गेलेले असत किंवा जीवंत असलेच तर त्यांची भेट घडणे माझ्या आंवाक्याबाहेरचे असे. त्यामुळे मला स्वतःला कसलाही चमत्कार पहायला मिळाला नाही. माझ्या आजूबाजूला असणा-या ज्या व्यक्तींच्या 'अंगात' येत असे त्यांची वागणूक पाहता मला कधीच त्यांचा विश्वास वाटला नाही. अशिक्षित लोकांचा त्यांवर जास्त विश्वास असल्यामुळे शिक्षणाच्या प्रसाराबरोबर चमत्कारांचे प्रमाण कमी होईल अशी माझी समजूत होती. आज मात्र मला एक वेगळेच चित्र दिसत आहे.

एनर्जी (ऊर्जा) आणि व्हायब्रेशन्स ( कंपन) या पदार्थविज्ञानात विशिष्ट अर्थ असलेल्या शब्दांचा उपयोग करून त्यातून निर्माण होत असलेल्या अचाट अशा सामर्थ्याबद्दल आजच्या सुशिक्षित लोकांना बोलतांना मी सर्रास ऐकतो. एनर्जी ही वेगवेगळ्या स्वरूपात असते आणि त्यानुसार योग्य त्या परिमाणात ती मोजली जाते. तिच्या वहनाबद्दल निश्चित असे नियम असतात. तसेच तिच्यामुळे होणारे परिणाम माहीत आहेत, व्हायब्रेशन्सना एक कंपनसंख्या असते आणि अँप्लिट्यूड असतो, त्यापासून निर्माण झालेल्या लहरींना या दोन्हीशिवाय वेव्हफॉर्म असतो एवढे मी कॉलेजमध्ये असतांना फिजिक्समध्ये शिकलो होतो. आता आत्मिक, प्राणिक, कॉस्मिक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यासारख्या त-हेत-हेच्या एनर्जी तसेच कल्याणकारी, दुःखदायक, मैत्रीपूर्ण, वितुष्ट वाढवणारे, निर्मळ, कलुषित किंवा दूषित वगैरे प्रकारची व्हायब्रेशन्स आणि त्यांचे मानवाच्या व्यवसायातल्या नफ्यातोट्यावर, सुखशातीवर, आरोग्यावर, आयुष्यमानावर होणारे बरेवाईट परिणाम वगैरेंची वर्णने ऐकून मी थक्क होतो.

या ऊर्जा आणि ही कंपने कशाकशातून निर्माण होतील याचा तर कांहीच नेम नाही. दारावर टांगलेले तोरण, घराची खिडकी, त्यात बसवलेली लोखंडाची जाळी, भिंतीवरची तसबीर, टेबलावरले धातूचे कासव, गळ्यातला रुद्राक्ष किंवा ताईत, मनगटावर बांधलेला दोरा किंवा कडे, कुपणावरची जास्वंदी किंवा बोगनवेल, जन्मपत्रिकेतले ग्रह, तोंडाने किंना मनातल्या मनात एकादा श्लोक म्हणणे वगैरेमधून ती येतातच शिवाय टाळी किंवा चुटकी वाजवणे, डोळ्यांना ओली बोटे लावणे, हात जोडणे, मांडी घालून बसणे वगैरे क्रियांमधून होणा-या नाना प्रकारच्या व्हायब्रेशन्समधून ही एनर्जी वहात राहते असे सांगतात. कोणाच्या पायावर डोके ठेवले की त्याच्या पायातून ती आपल्या मस्तकात येते आणि आपल्या मस्तकावर त्याने हात ठेवला तर त्याच्या पंजातून आपल्या शरीरात त्याचा धोधो ओघ वहात येतो. या गोष्टी आदर व्यक्त करण्यासाठी करतात अशी माझी समजूत होती. त्यातून कंपने निर्माण होऊन ऊर्जेचा प्रवाह वाहता होतो असे कधी वाटले नव्हते. अशा प्रकारच्या तथाकथित विज्ञानाच्या गर्दीत आपल्या देशातले खरेखुरे सायन्स कुठेतरी हरवून जाईल की काय अशी आशंका मला वाटायला लागली आहे.

Tuesday, August 26, 2008

दशावतार


प्रत्येक नाशवंत गोष्ट उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्थांमधून जाते. ब्रम्हा, विष्णू आणि महेश ही परमेश्वराची तीन रूपे या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे संपूर्ण नियंत्रण करतात अशी हिंदू धर्मीयांची मान्यता आहे. यातील स्थिती म्हणजेच सांभाळ करणे हे महत्वाचे कार्य विष्णूभगवान एरवी आपल्या वैकुंठामधील निवासस्थानी राहूनच करीत असतात. ते कार्य आपल्याआपणच व्यवस्थितपणे चालत रहावे यासाठी अगणित निसर्गनियम करून ठेवलेले आहेत. त्यानुसार कालचक्राचे रहाटगाडगे फिरत असते. तरीही कधीकधी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर चालली आहे असे वाटल्यास श्रीविष्णू स्वतः पृथ्वीतलावर अवतरतात. "यदायदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ।।" असे भगवंतांनीच गीतेमध्ये सांगून ठेवले आहे. याच कारणासाठी त्याने दहा अवतार घेतले असे सांगतात.


पण खरे तर मुळात याची त्याला काय गरज होती? उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन्ही गोष्टीवर नियंत्रण ठेवणा-या परमात्म्याने आधी कुठल्याही दुरात्म्याला जन्मालाच घातले नाही, चुकून तो जन्माला आलाच तर त्याचे हृदयपरिवर्तन करून त्याला संधीसाधूऐवजी साधूसंत बनवले किंवा त्याला कुठल्या तरी आधीव्याधी किंवा अपघाताने त्वरित नष्ट करून टाकले तर जगातील सज्जनांना त्याचा त्रासच होणार नाही. त्याने मनात आणले असते तर कांहीही करणे जर त्याला शक्य होते तर समजा जेंव्हा सीतेचे हरण करायला रावण आला तेंव्हा त्याला उलट्या होऊ लागल्या असत्या किंवा द्यूत खेळायला आलेल्या दुर्योधनाला लकवा मारला असता तर पुढचे सगळे रामायण आणि महाभारत सहजपणे टळले असते आणि लक्षावधी कां कोट्यावधी निरपराध सैनिकांचे प्राण वाचले असते. पण देवाने असला सोपा मार्ग अवलंबिला नाही, त्याची तशी योजना नाही, रामायण आणि महाभारत घडायला त्याला हवेच होते. चांगले वाईट, सुष्ट दुष्ट वगैरेंचे सगळे प्रकार त्याच्या अनुमतीने या जगात उपस्थिती लावत असतात. त्यात जास्तच असंतुलन व्हायला लागते तेंव्हा तो अवतार घेऊन त्यात हस्तक्षेप करतो असे फार तर म्हणता येईल.


मुळात या जगात देव आहे किंवा नाही हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. कारण तो नसेलच तर या लेखाचे प्रयोजन उरत नाही. तेंव्हा घटिकाभरायाठी तो आहे असे गृहीत धरू. तरीसुद्धा अमूर्त असा परमेश्वर जेंव्हा मूर्त अवतार घेऊन या जगात येतो तेंव्हा तो या विश्वाच्या निसर्गनियमांचे पालनसुद्धा कटाक्षाने करणारच अशी माझी श्रद्धा आहे. ते नियम तोडून अशक्यप्राय असे चमत्कार दाखवण्यासारखा रडीचा डाव खेळण्याची त्याला गरज नाही. पण दशावतारांच्या सर्व कथा सुरस आणि चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेल्या आहेत, त्यामुळे त्या प्रत्यक्षात तशा घडल्या असणे केवळ अशक्य आहे असे मला तरी वाटते. "आपले महान पूर्वज खोटे कशाला बोलतील? त्यांना खोटे म्हणणारा हा दीडशहाणा कोण?" वगैरे म्हणत लगेच माझ्या अंगावर धांवून यायचे कांही कारण नाही, कारण मी तसे कांही म्हणतच नाही. "मुलांनी दंगा करून घर डोक्यावर घेतलं किंवा अमकी गोष्ट शोधण्यासाठी मी घर पालथं घातलं" असं कोणी म्हंटलं तर ते खोटे बोलणे झाले कां? ते मराठी भाषेतले वाक्प्रचार आहेत. आपण जेंव्हा लहान मुलांना पंचतंत्र किंवा इसापनीतीमधील गोष्टी सांगतो तेंव्हा थापा मारणे हा आपला उद्देश असतो कां? त्या गोष्टींच्या निमित्ताने त्यातील तात्पर्य त्यांच्या मनावर बिंबवावे हा चांगला हेतू मनात धरून आपण त्या मनोरंजक काल्पनिक गोष्टी त्यांना सांगतो. अगदी तशाच प्रकारे सर्वसामान्य वकूबाच्या माणसाला समजतील आणि आवडतील अशा सुरस कथा रचून त्या पुराणादिक वाङ्मयामध्ये सांगितल्या गेल्या आहेत. ज्या काळात त्या रचल्या गेल्या त्या वेळी त्यांचा मतितार्थ सुद्धा सांगितला जात असेल पण तो काळाच्या उदरात लुप्त होऊन गेला आणि मनोरंजक चमंत्कृतीपूर्ण कथा तेवढ्या आजच्या पिढीपर्यंत येऊन पोचल्या असणार. मधल्या काळातील लोकांनी, विशेषतः अनुवाद करणा-यांनी त्यांची रंजकता वाढवण्याठी त्यात भरपूर तपशिलांचा मालमसाला मिसळला असणारच. तेंव्हा आपण आता जाणून बुजून त्यांचा शब्दशः अर्थ कशाला घ्यायचा?


त्यामागील अर्थ शोधण्याचे प्रयत्न झाले आहेतच. दशावतारांचा अनुक्रम आणि डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्यात एक विलक्षण साम्य आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी प्रथम पाण्यात निर्माण झाली असावी असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे. मत्स्यावतार हा विष्णूचा पहिला अवतारसुद्धा जलचर आहे. त्यानंतरचा दुसरा कूर्मावतार हा पाण्यामधून निघून सरपटत जमीनीवर येणा-या कासवाचा आहे. त्यानंतर वराह हा अरण्यात राहणारा पशु आहे आणि नरसिंह हा अर्धा पशू आणि अर्धा मानव अशी मधली अवस्था आहे. वामनावतारापासून मानवाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यामधील पहिला वामन हा एक बुटकासा लघुमानव आहे. त्यानंतर परशुराम हा सशक्त शूर योद्धा आहे पण तो परशूसारखे साधे आयुध धारण करतो. त्यानंतर आलेल्या रामाकडे अनेक प्रकारची अमोघ अस्त्रे तर आहेतच, त्याशिवाय आदर्श जीवनाचे वस्तुपाठ तो आपल्या वागण्यातून घालून देतो. त्यानंतरच्या कृष्णावतारात तर त्याने अनेक प्रकारच्या लीला दाखवल्या, दुष्टांचा संहार केला आणि किंकर्तव्यमूढ झालेल्या पार्थाला गीतोपदेश करून कर्तव्याचा मार्ग दाखवला. मनाचा व बुद्धीचा विकास शारीरिक बलापेक्षा उच्च दर्जाचा असतो हे त्यानंतरच्या बुद्धावतारात दाखवून दिलेले आहे. कदाचित आता यापुढे काय हा प्रश्न पडल्यामुळे कल्की अवताराबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसावी.


दशावतारांचा हा क्रम पाहूनसुद्धा लगेच "उत्क्रांतीचा सिद्धांत आमच्या द्रविणमहर्षींनी कधीच लावून ठेवला होता. पाश्चात्यांनी तो चोरून आपल्या नांवावर खपवला पहा." अशी बाष्कळ बडबड करण्याचे धैर्य मी करणार नाही. निसर्गामध्ये रोज घडत असलेला बदल पाहून त्यामागील उत्क्रांतीचे तत्व आपल्या ऋषीमुनींच्या लक्षात आले असणे सहज शक्य आहे. पण त्या सिद्धांताला पार पाताळात गाडून टाकून "विश्वाची उत्पत्ती करतांना परमेश्वराने सगळे कांही उत्कृष्ट निर्मिले होते. त्यानंतर प्रत्येक युगात अवनती होत होत आता घोर कलीयुगात जगाच्या अधःपाताची परमावधी झालेली आहे." अशी एक उफराटी समजूत मधल्या काळातील आपल्याच विद्वानांनी पिढ्यान पिढ्या आपल्या समाजाच्या मनावर बिंबवून ठेवली आहे ते कशामुळे झाले हा अवघड प्रश्न समोर येईल. दुसरी मनोरंजक गोष्ट अशी आहे की ख्रिस्ती धर्मगुरूंनासुद्धा डार्विनचा सिद्धांत अजून मान्य नाही. तेंव्हा या बाबतीत धर्म आणि विज्ञान यांची गल्लत न करणेच श्रेयस्कर ठरेल.


समाजात चाललेल्या घटना आणि त्यांच्या मागे असलेल्या प्रवृत्ती पाहतांना मला नेहमी कोणत्या ना कोणत्या अवताराचे रूप त्यात दडलेले दिसते. त्याचा अनुक्रम कालानुसार न लावता दर्जानुसार लावला तर आपल्याला त्यातही दशावतार दिसतील. ते दाखवण्याचा एक प्रयत्न या लेखात केला आहे. मोठा मासा छोट्या माशाला खातो आणि त्याच्यापेक्षा मोठा मासा त्याला गट्ट करतो हे जलचरांच्या दैनंदिन जीवनातील वास्तव आहे. त्यामुळे आपल्या भक्षकापासून प्राण वाचवीत ते स्वतःचे भक्ष्य शोधत फिरत असतात. असे असले तरी त्या सगळ्यांना एकाच जलाशयात रहायचे असते. त्यातल्या मोठ्या माशांना खाणारा महाकाय देवमासा हा लहानग्या माशाला आपला रक्षक वाटतो. त्याच्याबद्दल तो एकाच वेळी भीती तसेच आदर बाळगून असतो. मानवी समाजाची परिस्थिती याहून फारशी वेगळी नाही. आदिमानवाच्या काळात बलिष्ठ माणूस दुर्बलाला जिवानिशी मारून टाकीत असे. आजकाल अगदी तसे केले नाही तरी त्याच्या क्षेत्रामधील त्याचे अस्तित्व नष्ट करणे सर्रास चालते. हीच गोष्ट विलीनीकरण आणि संपादन या माध्यमातून संस्था करतात. विजेत्या समाजाने पराजित समाजाला उध्वस्त केल्याच्या कितीतरी घटनांनी इतिहास भरलेला आहे. हा सगळा प्रकार मत्स्यावतार झाला. सर्वात तळातला, प्राणिमात्रांच्या निव्वळ जगण्याच्या सहजप्रवृत्तीवर आधारलेला.


त्यानंतर कूर्मावतार. कासव हा तसा निरुपद्रवी प्राणी असतो. तो कुणावर हल्ला करायला जात नाही. हळूहळू सरपटत पुढे जातो. पण निग्रहपूर्वक चालत राहून चंचल सशाबरोबर लावलेली शर्यत जिंकू शकतो. त्याच्या अंगावर एक संरक्षक कवच असते. गरज पडल्यास आपले सारे अंग तो त्याच्या आंत दडवून ठेवतो. ते त्याचे संरक्षण करतेच पण वेळ पडल्यास इतरांना आधार देते. समाजातला एक वर्ग असाच असतो. तो निमूटपणे आपला मार्ग चोखाळत असतो. विरोधाचे प्रहार त्याला प्रतिकार न करता सहन करतो पण त्यातून तो वाचतो. वाटल्यास स्वतःला कोषात गुरफटून घेतो. अप्रत्यक्षपणे तो अनेकांना आधार देत असतो. त्या आधाराच्या बलावर इतर लोक पुढे येतात. मेरू पर्वताचा भार स्वतःच्या पाठीवर पेलून घेऊन देवदानवांना समुद्रमंथन करणे शक्य करून देणा-या व त्यात मिळालेली रत्ने त्यांनाच वाटून घेऊ देणा-या कूर्मावताराची ती रूपे आहेत असे मला वाटते. सुरक्षितता आणि स्थैर्य या प्राणिमात्रांना हव्या असलेल्या प्रवृत्ती त्यात दिसतात.


पण सगळेच लोक अल्पसमाधानी वृत्तीचे नसतात. कांही जणांना वेगाने पुढे जायची इच्छा असते. इच्छित दिशेने एकाद्या वराहासारखी मुसंडी मारून त्यांच्या मार्गात येणारे अडथळे ते बाजूला करीत जातात. मुद्दाम कोणाला इजा करावी असा त्यांचा उद्देश नसतो. त्यांना फक्त आपला मार्ग सुकर करून घ्यायचा असतो. आपला शक्य तितका विकास साधण्याची इच्छा नैसर्गिक रीत्या प्रत्येक जीवाच्या मनात उत्पन्न होतच असते आणि ती पूर्ण करण्याची धडपड तो करीत असतो. कासवाला जे जमणार नाही ते आपल्या ताकतीच्या जोरावर वराह करू पाहतो. प्रगतीची ही पुढची पायरी वराह अवतारात दिसते. स्वतःचा हव्यास पुरवत असतांना राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांचा तोल सुटतो. स्वतःला हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी इतरांकडून त्या हिसकावून घेणे सुरू होते. त्यासाठी सत्ता मिळवणे आणि ती मुठीत ठेवणे यासाठी जरब बसवणे सुरू होते. दुर्बल जनता आधी कांही काळ ते अत्याचार एखाद्या निर्जीव खांबासारखे स्वस्थपणे पाहते, पण त्याचा अतिरेक असह्य होताच ती चवताळून उठते, अक्राळ विक्राळ रूप धारण करते. नृसिंहावतार हे या प्रकारच्या उत्स्फूर्त आणि हिंस्र उद्रेकाचे स्वरूप आहे. दुष्ट हिरण्यकश्यपूचे त्यात निर्घृणपणे निर्दाळण होते. फ्रान्स आणि रशीयामधील राज्यक्रांतीच्या घटना तसेच नागपूरच्या गोरगरीब महिलांनी कुख्यात गुंडाला लाथाबुक्क्यांच्या माराने चेचून टाकले त्यात समाजाचे तेच उग्र रूप दिसले. मानवी हक्कासाठी त्याने तात्पुरते पाशवी रूप धारण करणे या अवतारात दिसून येते.


बळी हा एक सज्जन राजा असतो. त्याच्या मनात आपल्या प्रजेवर अत्याचार करण्याची इच्छा नसते. प्रजेलासुद्धा त्याची जाणीव असते. पण आपल्या राज्याचा अनिर्बंध विस्तार करण्याच्या नादात तो अधिकाधिक प्रदेश पादाक्रांत करण्यात मग्न असतो. त्यामुळे त्याचा प्रजेबरोबर संपर्क रहात नाही. मात्र त्याच्या नांवाने कारभार हांकणा-या अधिका-यांचा जुलूम असह्य झाल्यामुळे प्रजा नाराज होऊन बळीराजाची लोकप्रियता नाहीशी होते. बटु वामन जेंव्हा राजाला भेटतो तेंव्हा तो उदार मनाने त्याला पाहिजे ते मागायला सांगतो. आपण त्याच्या मागण्या सहज पुरवू शकू असा मोठा आत्मविश्वास त्याला स्वतःच्या सामर्थ्यावर वाटत असतो. इथे बटु वामन हे त्याच्या राज्यामधील लहान (सामान्य) लोकांचे प्रतीक असावे. तो फक्त तीन पावलाइतकी जमीन मागतो. त्याचे पाऊल हे जनतेमधील असंतोषाचे प्रतीक धरल्यास पहिल्या पावलाने सर्व पृथ्वी व्यापून जाते याचा अर्थ सगळ्यांनाच तो राजा अप्रिय झालेला असतो. दुस-या पावलांने स्वर्ग व्याप्त होतो. तो तर त्याने जिंकून घेतलेला प्रदेश, तिथे कोणाला तो हवासा वाटणार? हा व्यापक असंतोष सत्तेच्या बडग्याखाली दडपून टाकल्यास तो हिंसक रूप धारण करून उसळी घेऊ शकेल याचा विचार करून बळी राजा तो जनादेश शिरसावंद्य मानून तिसरे पाऊल स्वतःच्या मस्तकावर ठेऊन घेतो. थोडक्यात आपल्या राज्यात कुठेच थारा न मिळाल्यामुळे त्याला अज्ञात पाताळात स्थलांतर करावे लागते. अशा प्रकारची रक्तहीन क्रांती हा निश्चितच पुढचा टप्पा म्हणता येईल.


राज्याचे संरक्षण करण्यासाठी त्याचा खड्गहस्त बनलेला समाजाचा एक वर्ग आपल्या बलाचा दुरुपयोग करून निःशस्त्र प्रजेला नाडू लागतो तेंव्हा त्याचा प्रतिकार करण्यासाठी कुणीतरी ठामपणे उभे रहावे लागते. ऋषीमुनींच्या कुळात जन्मलेला परशुराम जपतप करणे सोडून देऊन हातात परशु धारण करून त्या लढाईत उतरतो आणि त्या उद्दाम झालेल्या वर्गाला वठणीवर आणतो. या अवतारातसुद्धा मला पुरशुराम हा एक व्यक्ती न वाटता तो समाजाचा प्रतिनिधी असावा असेच वाटते. मात्र त्याचा लढा पूर्वीच्या दोन अवतारामधे होता तशासारखा क्षणिक नसून तो प्रदीर्घ काळ चालत राहतो. त्याची एकवीस आवर्तने त्याला करावी लागतात.


रामावतारामध्ये राजा विरुद्ध प्रजा असा संघर्ष नाही. अयोध्या आणि लंका या दोन्ही राज्यामधील प्रजा आपापल्या राज्यकर्त्यावर खूष असलेली सुखी जनता असते. रामायणाच्या कथेमध्ये राम आणि रावण या दोन भिन्न प्रकृतीच्या मुख्य व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे आईवडील, भाऊ, पत्नी, मुले, मित्र, भक्त वगैरे अनेक पात्रांची वेगवेगळ्या छटांनी युक्त व्यक्तीचित्रे रेखाटलेली आहेत. त्याचा चरित्रनायक राम हा एक आदर्श तत्वनिष्ट महामानव आहे. त्याच्या वागण्यामधील प्रत्येक कृती जगापुढे आदर्श वर्तनाचे उदाहरण झाले आहे. रामरावणयुद्धामधील रामाचा विजय म्हणजे सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तीवर विजय असे दाखवले आहे.


कृष्णावतारामध्ये त्याच्या जीवनात कमालीचे वैविध्य दाखवले आहे. बालपणी सवंगड्यांबरोबर खेळणारा नटखट कान्हा तसेच गोकुळातील सर्वांना आपल्या वर्तनाने तसेच बॉँसुरीच्या सुरावर भुलवणारा मोहन अचानक त्या सगळ्यांना सोडून मथुरेला जातो आणि कंसाची अन्यायी राजवट उलथून टाकतो. रुक्मिणीहरण करून तिच्याशी प्रेमविवाह करतो. स्वतः चक्रवर्ती सम्राट वगैरे बनून सत्ताधीश व्हायचा विचारही करीत नाही. त्याऐवजी पांडवांचा मित्र व सल्लागार बनतो. त्यांचा दूत बनून कौरवांकडे शिष्टाई करायला जातो आणि ती सफल न होऊन युद्धाला तोंड फुटल्यानंतर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असे म्हणत अर्जुनाचा सारथी बनतो. सुरुवातीलाच गुरुजनांना समोर पाहून किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला रणांगणावरच धर्मशास्त्राची मूलतत्वे सांगून कर्तव्यपालनाला प्रवृत्त करतो. भीष्मपितामहांपासून दुर्योधनापर्यंत कौरवसैन्याचे जितके सेनापती झाले त्या प्रत्येकाच्या पतनाचा मार्ग शोधून पांडवांना मदत करतो. अशा प्रकारे त्याचे एक परिपूर्ण व्यक्तित्व दाखवले आहे.


नवव्या अवतारातील गौतम बुद्ध आधी सिद्धार्थ या नांवाचा राजकुमार असतो. पण समाजातील दुःखे पाहून त्याला इतका कळवळा येतो की हातात येऊ घातलेल्या राजसत्तेला दूर लोटून तो वनात निघून जातो. बोधीवृक्षाखाली विचारमग्न असतांना त्याला तत्वबोध होतो आणि पुढील सर्व आयुष्य तो दया, क्षमा, शांती, समता, बंधुत्व वगैरे सद्गुणांचा प्रसार करण्यात घालवतो. "अभिलाषा ही दुःखाची जननी आहे" हे सांगून खरा सुखाचा मार्ग आपल्या मनावर ताबा ठेवण्यात आहे हे सत्य पुन्हा अधोरेखित करतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक शांती उच्च दर्जाची आहे असे मानणारा मतप्रवाह या अवतारात दिसतो. विठ्ठल हा नववा अवतार आहे असा पर्याय लक्षात घेतल्यास तो सुद्धा निःशस्त्र आहे. त्याने कोणा राक्षसाचे दमन केल्याची कथा नाही. त्याच्या भक्तजनांनी अवघ्या महाराष्ट्राला त्याच्या भक्तीमधून उन्नतीचा मार्ग दाखवला आहे.


कल्की अवताराबद्दल मला अस्पष्ट अशी किंचित माहिती सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे शक्य नाही. सध्या वाहणारे वारे पाहता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावर विश्वाला थक्क करणारा अद्भुत चमत्कार त्याने करून दाखवणे कदाचित शक्य आहे. एका अधांतरी तर्कापलीकडे त्यात कांही अर्थ नाही.


सारांशात पाहता मत्स्य, कूर्म व वराह हे पहिले तीन अवतार माणूस व पशू यांच्यामधील समान अशा प्रवृत्ती दाखवतात. नरसिंह, वामन व परशुराम अवतारात मानवसमूहाच्या प्रवृत्ती आढळतात. राम, कृष्ण व बुद्ध अवतारात माणसाच्या व्यक्तीगत उत्थानाचे नमूने दिसतात. कल्की अवतार कधी झालाच तर तो त्याच पठडीतला होणार अशी माझी अपेक्षा आहे. हे सर्व अवतार कालातीत आहेत. यातील प्रत्येकाची उदाहरणे भूतकाळात होऊन गेलेली आहेत तसेच आज आपल्या डोळ्यासमोर घडतांना दिसतात. ती ओळखून त्यातून काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे हे समजण्याइतके शहाणपण आले तरी खूप फायदा होईल.

विठ्ठल हा कितवा अवतार?

विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची खूप सविस्तर माहिती बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल पुन्हा थोडा संभ्रम आहे.

दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक समजतात, पण 'विष्णूचा अवतार' म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच 'विष्णूचा नववा अवतार' मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच 'बुद्ध' नांवाचा नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट पाहिला होता त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले गेले.

भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता, म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण "आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही नको" असे पुंडलीकाने सांगितले. "स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग." असे म्हणताच "देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा." असे मागणे त्याने मागितले आणि देवाने "तथास्तु" म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.

'अवतरणे' म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक 'अवतार' ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही. गौतमबुद्धाने मात्र 'सिद्धार्थ' या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.

विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला. विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका आहेत. "देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा" ही मागणी अशा रीतीने पूर्ण होतांना दिसते.

आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला 'धम्म'च वेगळा मानतात आणि चीन, जपान, श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.

Monday, August 25, 2008

तुका आकाशाएवढा


विठ्ठलाच्या भक्तीच्या संप्रदायाचा "ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा" असे म्हंटले जाते. ज्ञानेश्वरांनी सुरू केलेल्या या कार्याचा नामदेव, जनाबाई, चोखा मेळा, गोरा कुंभार, सांवता माळी, सेना न्हावी, एकनाथ प्रभृती अनेक संतांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रसार केला. तुकारामांनी आपल्या रसाळ वाणीमध्ये लिहिलेल्या अभंगातून भक्तीमार्ग घराघरात नेऊन पोचवला. त्यांनी रचलेल्या अभंगांची मोठी संख्या, उच्च दर्जा आणि अमाप लोकप्रियता यामुळे 'अभंग' हा शब्द ऐकताच तुकारामांचेच नांव लगेच डोळ्यासमोर येते, इतकी "अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची" झालेली आहे.

संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांमध्ये विषयांची भरपूर विविधता आहे. परमेश्वराची, मुख्यतः विठ्ठलाची भक्ती हा मुख्य उद्देश असला तरी त्यातसुद्धा "सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ॥", "राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥" आणि "सावळे सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयी माझे॥" यासारख्या कांही अभंगामध्ये त्याचे वर्णन किंवा स्तुती केली आहे. "घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे।", "विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥" आणि "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥" सारख्या अभंगात त्याच्या नामस्मरणाचा महिमा वर्णिला आहे. "जाऊ देवाचिया गावा । देव देईल विसावा ॥" अशा अभंगात त्याच्या गांवाला जाऊन त्याचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे तसेच त्यामुळे नक्की मनाला विसावा मिळेल असे सांगितले आहे. "अगा करुणाकरा करितसे धांवा । या मज सोडवा लवकरी॥" यासारख्या कांही अभंगात काकुळतीला येऊन त्याचा धांवा केला आहे. त्याला भेटण्याची मनाला लागलेली आस आणि त्यामुळे होणारी जिवाची तगमग खालील प्रसिद्ध अभंगात व्यक्त केली आहे.

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझे मन वाट पाहें ॥२॥
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माऊलीची ॥४॥
तुका म्हणे मज लागलीसे भुक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥५॥

कन्या सासुराशीं जाये । मागे परतोनी पाहे ॥१॥
तैसे झालें माझ्या जीवा। केंव्हा भेटसी केशवा ॥२॥
चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥
जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळे ॥४॥

विठ्ठलाची प्राप्ती झाल्यावर झालेली मनाची उन्मन अवस्था काय वर्णावी?

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो झालें कांहीचिया बाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिता मुखा आला ॥४॥

विठोबाखेरीज इतर देवांची आराधनासुद्धा तुकारामांनी केली आहे. "ॐकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥" यात गणेशाची तर "कृष्ण माझी माता, तर कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा।।" यात कृष्णाची प्रार्थना केली आहे. विष्णूची स्तुती करतांनाच भागवत धर्माचे मर्म खालील अभंगात विषद केले आहे.

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
आइकाजी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥

चांगल्या वागणुकीचा उपदेश करणारे अनेक अभंग आहेत. नरसी महेतांच्या "वैष्णवजन तो तेणे कहिये जो पीर परायी जाणे रे।" परदुःखे उपकार करे ते मन अभिमान न आणे रे।।" या सुप्रसिद्ध भजनामधील उपदेश तुकारामांनी "पुण्य पर‍उपकार पाप ते परपीडा । आणिक नाहीं जोडा दुजा यासी ॥" या अभंगात केला आहे. त्यांच्या खालील अभंगाचा उल्लेख आपल्या नव्या राष्ट्रपतींनी आपल्या शपथविधीमध्ये केला होता.

जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ॥२॥
मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासीं अपंगिता पाही । त्यासई धरी जो हृदयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी । तोचि दासा आणि दासी ॥५॥
तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ति ॥६॥

पंढरीला जाण्याची इच्छा, त्यासाठी लागलेली अतीव ओढ व्यक्त करून तेथे गेल्यावर काय पहायला मिळेल याचे सुंदर वर्णन "खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे । क्रोध अभिमान गेला पावटणी, एकएका लागतील पायी रे ।।" या अभंगात तुकारामांनी केले आहे. पण त्यांना सुद्धा सर्व विश्वात भरून राहिलेल्या विश्वंभररूपाची ओळख पटली होती. एका अभंगात ते म्हणतात,
"जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हाती धरुनियां ॥ चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार । चालविसी भार सवें माझा ॥" दुस-या एका अभंगात भक्त आणि देव यांचे अद्वैत त्यांनी इतक्या सुंदर उपमा देऊन दाखवले आहे की त्या कोणालाही सहज समजाव्यात.

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ॥१॥
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ॥२॥
जसे दुग्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ॥३॥
देव देहात देहात, का हो जाता देवळात ॥४॥
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ॥५॥
भक्तीरसपूर्ण रचना करतांनासुद्धा त्यातील विविध अलंकारांच्या प्रयोगातून आपल्याला तुकारामांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडते. सोप्या सब्दात अगदी रोजच्या जीवनामधील उदाहरणे देत ते आपला मुद्दा किती प्रभावीपणे मांडतात हे आपण वरील कित्येक उदाहरणात पाहिले आहे. त्यांच्या कल्पकतेचा एक आविष्कार खालील अभंगात कसा दिसतो हे पहा. "तुला स्वतःला तुझे महत्व कसे समजणार? ते तर आम्ही भक्तजनच जाणतो." असे ते देवालाच त-हेत-हेची उदाहरणे देऊन विचारतात.

कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥१॥
कैसें तुज ठावें नाही तुझें नाम । आम्हीच तें प्रेमसुख जाणों ॥२॥
माते तृण बाळा दुधाचि ते गोडी । ज्याची न ये जोडी त्यासी कामा ॥३॥
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपीपोटीं । नाही त्याची भेटी भोगती ये ॥४।।

आजकाल पर्यावरणाला मोठे महत्व प्राप्त झाले असल्यामुळे आपले लक्ष वनस्पतींकडे गेले आहे. निवांतपणा मिळण्यासाठी अनेक लोक शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत जातात. तुकारामांनासुद्धा निसर्गरम्य वातावरण भावत होते. पण या एकांताचा सदुपयोग ते मनन, चिंतन आणि ईश्वराची आराधना करण्यासाठी करीत असत. ते म्हणतात,

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षीही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत ॥२॥
आकाश मंडप पृथिवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥
कंथा कमंडलु देह उपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥
हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपणांसी ॥६॥

तुकाराम महाराजांनी जे लोकांना सांगितले तसेच वर्तन स्वतः केले. ते संसाराचा त्याग करून त्यापासून दूर गेले नाहीत. पण आपला प्रपंच करतांना "जोडावे धन उत्तम वेहारे" अशी सचोटी त्यांनी कठोरपणे पाळली. खरे तर त्यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे त्यांनी फारसे "धन" गोळा केलेच नाही. ते एकदा एका जमीनदाराच्या शेताची राखण करीत असतांना त्या शेतात जनावरे घुसवण्यात आली. तरी देखील विठ्ठलाच्या कृपेने त्यात भरघोस पीक आले. त्यामुळे खजील झालेल्या जमीनमालकाने त्याच्या अपेक्षेहून अधिक आलेले धान्य तुकारामांच्या घरी पाठवून दिले. तुकारामांनी ते सरळ गोरगरीबांना वाटून टाकले. प्रत्यक्ष शिवाजी
महाराजांनी आपल्या सेवकांकरवी त्यांच्या कुटुंबियांसाठी वस्त्राभूषणांचा नजराणा पाठवून दिला. "न बोलावता आपल्या पायाने चालत आलेली ही लक्ष्मी आहे." असा लंगडा युक्तीवाद न घालता "आम्हाला ती विषासमान आहे." असे म्हणून त्यांनी तो नजराणा साभार परत करून दिला. अशा कित्येक घटना त्यांची सात्विकता आणि सत्याचा आग्रह दाखवतात.

त्यांचा मत्सर करणा-या सालोमालोमुळे तुकारामांना अनेक प्रकारचा त्रास भोगावा लागला. पण "निंदकाचे घर असावे शेजारी" असे म्हणत त्यांनी तो स्वखुषीने सहन केला. तुकारामाच्या अभंगाची गाथा नदीच्या पाण्यात बुडवून टाकण्यापर्यंत त्याची मजल गेली. इंद्रायणी नदीने स्वतः तिला तारून तुकारामाला ती परत आणून दिली अशी आख्यायिका आहं. "जनमानसाच्या अंतरंगात भिनलेले भाव कागद नष्ट केल्यामुळे नाहीसे होत नाहीत आणि अक्षर वाङ्मय अजरामर होण्यासाठी नश्वर कागदावर अवलंबून नसते." हा याचा मतितार्थ आहे.

तुकाराम महाराजांना जनसामान्यांकडून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असला तरी त्यांना त्याचा कधी गर्व झाला नाही किंवा त्याचे आकर्षणही वाटले नाही. त्यांनी अहंकारावर पूर्ण विजय मिळवलेला होता. त्यांना मोठेपणाचा बडेजाव नकोच होता. सगळे लोक आपल्या समृध्दीची मागणी देवाकडे करतांना दिसतात. तुकाराम महाराज त्याच्या उलट लहानपणाचे वरदान देवाकडे मागतात.

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।

पण लहान होणे याचा "किडामुंगीसारखे राहणे" असा अर्थ त्यांना अभिप्रेत नव्हता. त्याच्या जोडीला इतर अनेक गोष्टींची मागणी त्यांनी देवापुढे ठेविली आहे. "सगळ्या जगाचे भले होवो" असे दान त्यांनी मागितलेले नाही. स्वतःसाठी धनसंपदा तर त्यांना कधीच महत्वाची वाटली नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांना मरणोपरांत स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षसुद्धा नको होता. या जन्मातच त्यांना ज्या गोष्टींची गोडी लागली होती त्या ईशभक्ती, संतसंग वगैरे देऊन "मला खुषाल पुन्हा जन्माला घालावे." असे वरदान त्यांनी देवाकडे मागितले. खालील अभंगांवरून हे स्पष्ट होते.

हेचि मज व्हावी आंस। जन्मोजन्मी तुझा ध्यास।।
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी।।
संतसंग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।
चंदभागे स्नान। तुका मागे हेचि दान।।

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्ति आणि संपदा । संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी ॥४॥

परमेश्वराबरोबरचे अद्वैत त्यांनी साधले होते. त्या क्षणी ते सामान्य मानवी न राहता देवाशी मनोमन एकरूप झाले होते. अणुरेणूपासून ते अथांग अवकाशापर्यंत सगळे विश्व व्यापलेला परमेश्वरच त्यांच्या अंतरंगात नांदत असतांना शरीराच्या, मनाच्या, गुणदोषांच्या किंवा शंकाकुशंकांच्या विचाराच्या पलीकडे जाऊन ते म्हणतात,

अणुरेणिया थोकडा । तुका आकाशाएवढा ॥१॥
गिळुन सांडिले कलेवर । भव भ्रमाचा आकार ॥२॥
सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटी ॥३॥
तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता।।४।।
--------------------------------------------------------------
ऋणनिर्देश
गेल्या महिनाभरात विठ्ठल आणि संतमंडळीं यासंबंधात लिहितांना संतांनी रचलेल्या अनेक सुंदर रचना मी उद्धृत केल्या आहेत. त्यातील बहुतेक गीते अनेक वेळा ऐकल्यामुळे त्यातील ब-याच ओळी स्मरणात राहिलेल्या असल्या तरी त्यामधील अचूक शब्दरचना वाचून नीट समजून घेण्यासाठी 'आठवणीतील गाणी' आणि 'मराठीवर्ल्ड' या संकेतस्थळांचा भरपूर आधार मला मिळाला. या दोन्ही स्थळांनी लोकप्रिय तसेच कांहीशा अप्रसिद्ध पण उत्कृष्ट गाण्यांचा खजीना मराठी रसिकांसाठी मुक्तहस्ते उपलब्ध करून दिला आहे, तसेच आपल्याला हवे असलेले गाणे शोधण्याची उत्कृष्ट सोय करून दिलेली आहे. त्याबद्ल ही दोन्ही स्थळे चालवणा-या संयोजिकांचा मी शतशः ऋणी आहे. या संकेतस्थलांचे दुवे असे आहेत.

आठवणीतील गाणी http://www.aathavanitli-gani.com/
मराठीवर्ल्ड http://www.marathiworld.com/gani/gani.php

Sunday, August 24, 2008

श्रीकृष्णाची गीते - भाग १,२,३


१. संत सूरदासांच्या रचना

व्यासांच्या महाभारतातल्या श्रीकृष्णाला घराघरात पोचवण्याचे काम त्याच्या भक्तांनी लिहिलेल्या सुरस पदांनी केले. त्यात सूरदास आणि मीराबाई यांची नांवे सर्वात मुख्य आहेत. दोघेही निस्सीम कृष्णभक्त होते, पण त्यांच्या भक्तीचे मार्ग भिन्न होते. सूरदासांच्या पदांमध्ये बाळकृष्णाच्या लीलांचे कौतुक केले आहे. चोरून लोणी खातांना यशोदामाईने रंगेहाथ पकडल्यानंतरसुद्धा कृष्ण आपला कशा प्रकारे बचाव करतो, कोणकोणती कारणे सांगतो ते या सुप्रसिद्ध पदात पहा.
मैया मोरी मैं नहीं माखन खायो
ख्याल परै ये सखा सबै मिलि मेरैं मुख लपटायो॥
भोर भई गइयन के पाछे मधुबन मोहे पठायो
चार पहर बंसी बट भटक्यों साँझ परी घर आयो ।।
देखि तुही छींके पर भाजन ऊंचे धरि लटकायो।
हौं जु कहत नान्हें कर अपने मैं कैसें करि पायो॥
मुख दधि पोंछि बुद्धि इक कीन्हीं दोना पीठि दुरायो।
डारि सांटि मुसुकाइ जशोदा स्यामहिं कंठ लगायो॥
ये ले अपनी लकुटि कमरिया बहुत ही नाच नचायो
सूरदास तब हँसी जशोदा ले निधि कंठ लगायो ।।
बाल बिनोद मोद मन मोह्यो भक्ति प्राप दिखायो।
सूरदास जसुमति को यह सुख सिव बिरंचि नहिं पायो॥
"माझ्या मित्रांनी दुष्टपणाने बळजबरीने माझ्या तोंडाला लोणी फासले, मी तर पहाटेच गायी चारायला रानात गेलो होतो तो संध्याकाळी घरी परत आलो, तू लोणी इतक्या उंच शिंक्यावर टांगून ठेवले होतेस तिथे माझे इवलेसे हात कसे बरे पोचतील?" वगैरे कारणे देऊन झाल्यावर थोडेसे दही शिल्लक असलेला द्रोण कृष्णाने हळूच लपवून दिला. हे सगळे एकून यशोदेला हंसू आवरले नाही. तिने कृष्णाला मायेने जवळ घेतले. भगवान शंकर किंवा ब्रह्म्याला जे सुख मिळाले नाही ते यशोदेला प्राप्त झाले असे सूरदास म्हणतात.
सूरदासांनी कृष्णाच्या बालपणावर अनेक गीते लिहिली आहेत. त्यातील जसोदा हरि पालनैं झुलावै। हलरावै दुलरावै मल्हावै जोइ सोइ कछु गावै॥
मैया मोहि दाऊ बहुत खिझायौ।मोसौं कहत मोल कौ लीन्हौ, तू जसुमति कब जायौ।।
वगैरे कांही गीते आजही खूप लोकप्रिय आहेत.
सूरदासांनी लिहिलेली भजने तर खूपच गाजली आहेत. त्यातील कांही प्रसिद्ध भजने खाली दिली आहेत.
अब मै नाच्यूँ बहुत गोपाल।
कामक्रोधको पहिरी चोलना कंठ विषयकी माल।।
अखियाँ हरि दर्शन की प्यासी ।
देखो चाहत कमल नयन को, निस दिन रहत उदासी ॥
प्रभू मोरे अवगुण चित न धरो ।
समदरासी है नाम तिहारो चाहे तो पार करो ॥
राधे कृष्ण कहो मेरे प्यारे भजो मेरे प्यारे जपो मेरे प्यारे ॥
भजो गोविंद गोपाळ राधे कृष्ण कहो मेरे ॥
एका भजनात सूरदासांनी जगातील अनेक विसंगतींचे मार्मिक दर्शन घडवून आणले आहे. गोड्या पाण्याने भरभरून नद्या वाहत समुद्राला मिळतात पण समुद्राचे पाणी मात्र खारट, बगळ्याला पांढरे शुभ्र पंख आणि कोकिळा काळी, हरणाला सुंदर डोळे दिले आहेत पण तो रानावनात भटकत असतो, मूर्ख लोक राज्य करतात आणि पंडित भिकेला लागतात वगैरे दाखवून अखेरीस घनःश्यामाला भेटण्यासाठी आपण किती व्याकुळ झालेलो आहोत ते त्यांनी सांगितले आहे.
उधो करमनकी गति न्यारी ।
सब नदियाँ जल भरि भरि रहियाँ। सागर केहि बिध खारी।।
उज्ज्वल पंख दिये बगुलाको । कोयल केहि गुन कारी ।।
सुंदर नैन मृगाको दीन्हे । बन बन फिरत उजारी ।।
मूरख मूरख राजे कीन्हे । पंडित फिरत भिखारी ।।
सूर स्याम मिलनेकी आसा । छिन छिन बीतत भारी ।।
---------------------------------------------------------------

श्रीकृष्णाची गीते - भाग २  August 24, 2008
संत मीराबाईच्या रचना

मीराबाईची श्रीकृष्णभक्ती अगदी आगळ्या प्रकारची होती. ती सर्वस्वी फक्त कृष्णाचीच आहे अशी तिची गाढ श्रद्धा होती. त्याचेशिवाय आपले असे दुसरे कोणीसुद्धा नाही. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे कोणी आपले नाही. तिचे बालपणीचे लग्न करून दिलेले होते, पण तिने कृष्णाला सर्वार्पण केले होते. लग्नाच्या नव-याला ती आपला पती मानतच नव्हती. त्यामुळे त्याच्या निधनाचा शोकही तिने केला नाही. घरदार, लोकलाज सारे सोडून देऊन ती साधुसंतांच्या संगतीत राहू लागली. राजघराण्यात वाढलेल्या मीराबाईने गांवोगांव वणवण फिरत तिने स्वतःला पूर्णपणे कृष्णभक्तीलाच वाहून घेतले. डोक्यावर फक्त मोरपीस खोचणारा गिरधर गोपाल तिचा पति होता आणि तशाच साधेपणाने राहणे तिला पसंत होते. "बाला मैं बैरागण हूंगी। जिन भेषां म्हारो साहिब रीझे, सोही भेष धरूंगी।" असे मीराबाईने एका गीतात म्हंटले आहे. संपूर्ण चेहेरा झाकून टाकणारी भरजरी राजस्थानी चुनरी सोडून देऊन तिने साध्या कापडाचा पदर माथ्यावर घेतला आणि मोती मूँगे यासारख्या रत्नांचे हार गळ्यात घालण्याऐवजी फुलांची वनमाला धारण केली. अश्रूंचे सिंचन करून कृष्णप्रेमाची वेल लावली आणि तिची वाढ होऊन त्याला आनंदाचे फळ आले. दुधाच्या मंथनातून निघालेले लोणी इतरांना खाऊ दिले आणि स्वतः ताकावर समाधान मानले. भक्तांना पाहून ती राजी झाली, पण जगाची रीत पाहून तिला रडू आले. आता गिरधर गोपालच तिला तारून नेईल अशी तिची श्रद्धा होती. किती अप्रतिम काव्य या गीतात आहे?
मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई।।
जाके सिर मोर मुकुट मेरो पति सोई।
तात मात भ्रात बंधु आपनो न कोई।।
छांडि दई कुलकी कानि कहा करिहै कोई।
संतन ढिग बैठि बैठि लोकलाज खोई।।
चुनरी के किये टूक ओढ़ लीन्ही लोई।
मोती मूंगे उतार बनमाला पोई।।
अंसुवन जल सीचि सीचि प्रेम बेलि बोई।
अब तो बेल फैल गई आंणद फल होई।।
दूध की मथनियाँ बड़े प्रेम से बिलोई।
माखन जब काढ़ि लियो छाछ पिये कोई।।
भगति देखि राजी हुई जगत देखि रोई।
दासी मीरा लाल गिरधर तारो अब मोही।।

हीच भावना दुस-या एका गीतात आहे. तिच्या जगावेगळ्या वागण्यामुळे अस्वस्थ झालेल्या तिच्या सास-याने आपल्या अब्रूखातर विषाचा प्याला तिच्याकडे पाठवून दिला आणि तिने तो हंसत हंसत पिऊनही टाकला. पण "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय आला.

पग घूँघरू बाँध मीरा नाची रे।
मैं तो मेरे नारायण की आपहि हो गई दासी रे।
लोग कहै मीरा भई बावरी न्यात कहै कुलनासी रे॥
विष का प्याला राणाजी भेज्या पीवत मीरा हाँसी रे।
'मीरा' के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनासी रे॥

मीराबाईच्या एक एक रचना अनमोल मोत्यासारख्या आहेत. कधी ती मला आपल्याला नोकरीत ठेऊन घेण्याची विनंती कृष्णाला करते. "तुझ्या बागेत काम करतांना रोज तुझे दर्शन घेऊन तुझे गुण गाईन" असे म्हणते.
स्याम! मने चाकर राखो जी । गिरधारी लाला! चाकर राखो जी।
चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसण पासूं।
ब्रिंदाबन की कुंजगलिन में तेरी लीला गासूं।।
आपल्या विरहव्यथा तिने "हे री मैं तो प्रेम-दिवानी मेरो दरद न जाणै कोय। या गाण्यात अतिशय उत्कटपणे मांडल्या आहेत. तर कधी "पपैया रे पिवकी बाणि न बोल। सुणि पावेली बिरहणी रे थारी रालेली पांख मरोड़।।" असे पपीहाला सांगून "ही विरहिणी तुझे पंख पिरगाळून टाकेल" अशी धमकी त्याला देते. "पीहू पीहू पपीहो न बोल " या लोकप्रिय गाण्याची प्रेरणा कवीला याच पदावरून मिळाली असेल. "म्हारो प्रणाम बांकेबिहारीको।" असा नमस्कार घालून ती "प्रभुजी मैं अरज करुँ छूं म्हारो बेड़ो लगाज्यो पार।।" अशी विनंती करते. "बसो मोरे नैनन में नंदलाल। मोहनी मूरति सांवरि सूरति, नैणा बने बिसाल।" या मीराबाईच्या प्रार्थनेवरून तिला 'दरसदिवानी' म्हंटले गेले असेल.

मीराबाईची सारीच गीते दुःखी नाहीत.
बरसै बदरिया सावन की सावन की मनभावन की।
सावन में उमग्यो मेरो मनवा भनक सुनी हरि आवन की।
या गाण्यात तिला काळ्या मेघातून बरसणा-या श्रावणधारांमधून घननीळाची चाहूल लागते आणि तिचे मन उल्हसित होते. "माई री! मैं तो लियो गोविंदो मोल।" या गीतात तर ती "मी विकत घेतला श्याम" असे ठासून सांगते.
मीराबाईच्या गीतांमध्ये कमालीची भावपूर्ण शब्दरचना तर आहेच, ती अत्यंत तालबद्ध आहेत आणि त्यांतील शब्दांनादेखील नादमाधुर्य आहे. त्यामुळेच महान संगीतकारांनी त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि आघाडीच्या गायकांनी त्या रचना अजरामर करून ठेवल्या आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------

August 25, 2008
श्रीकृष्णाची गीते - भाग ३
लोकधारा

सूरदास आणि मीराबाई यांच्याही आधी बंगालमध्ये होऊन गेलेल्या जयदेवांनी 'गीतगोविंद' या संस्कृत काव्याची रचना केली. कृष्ण आणि राधा यांचे प्रेम हा या काव्याचा मध्यवर्ती विषय आहे. धार्मिक विषयावरील ग्रंथात क्वचितच आढळणारा नवरसांचा राजा शृंगाररस या काव्यात पहायला मिळतो. त्यांच्यानंतर त्याच भागात होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू मीरेसारखेच कृष्णाचे निस्सीम भक्त होते आणि कृष्णाचे भजन करतांना तल्लीन होऊन नाचत असत. त्यांनी सुरू केलेल्या कृष्णभक्तीच्या परंपरेची छाप तिकडच्या लोकनृत्यांवरही पडलेली दिसते. ओडिसी तसेच मणिपुरी शैलीच्या नृत्यांमध्ये कृष्णाच्या जीवनावर आधारलेले प्रसंग बहुधा असतातच.

उत्तर प्रदेशातील ब्रजभूमी तर कृष्णाचे जन्मस्थान. त्याचे बालपण पण तिथेच गेले. सूरदासांनी आपल्या प्रतिभेने ते रंगवले आहेच, पण त्या भागात विकसित झालेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या "आज कैसी ब्रजमे धूम मचायी", "बिरजमे धूम मचाये स्याम", "होरी खेलत नंदलाला बिरजमे", "सांवरे ऐजैहो जमुनाकिनारे मोरा गांव " आदि अनेक चीजांमध्ये कृष्णाचा उल्लेख येतो. राजस्थानमध्ये मीराबाईची भजने लोकप्रिय झालीच पण शेजारच्या गुजरातमध्येही कृष्णाची गाणी म्हणत गरबा, दांडिया रास वगैरेच्या प्रथा सुरू झाल्या. कर्नाटकातले 'बैलाटा' हे पारंपरिक नृत्यनाट्य आता 'यक्षगान' या नांवाने प्रसिद्ध झाले आहे.
यात श्रीकृष्ण, रुक्मिणी व सत्यभामा यांच्या प्रमुख भूमिका असलेले पारिजातक आख्यान रंगमंचावर सादर करतात. पुरंदरदासांचे 'कृष्णा नी बेगने बारो (कृष्णा तू लवकर ये ना)' हे भजन सुप्रसिद्ध आहे. कांही वेळा या भजनाच्या आधारावर भरतनाट्यम किंवा कुचिपुडी नृत्यसुद्धा केले जाते. अशा प्रकारे भारताच्या विविध भागात कृष्णाचे वर्णन करणारी किंवा त्याला उद्देशून म्हंटलेली पदे परंपरागत लोकसंगीतात प्रचलित झालेली आहेत.

महाराष्ट्रातसुद्धा संतवाङ्मयामध्ये कृष्णभक्तीला महत्वाचे स्थान आहे. "कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥" असे ज्ञानेश्वर महाराज विचारतात. तर "वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ।।" असे वर्णन संत एकनाथ करतात. तुकाराम महाराज म्हणतात,

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ।।
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारू । उतरी पैलपारू भवनदीची ।।
कृष्ण माझे, मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ।।
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटो ना करावा परता जीवा ।।

मुख्यतः अभंग गाऊन भजन करतांना त्याबरोबर भारुडे, जोगवा, गवळणी वगैरे म्हणायची प्रथा आहे. त्यातला गौळण हा प्रकार देवळातून उचलून तमाशातसुद्धा आणला गेला. सुरुवातीला गण आळवून झाल्यावर गौळण सादर केली जाते आणि त्यानंतर वगाला सुरुवात होते. दह्यादुधाने भरलेली गाडगी मडकी डोक्यावर घेऊन गवळणींनी मथुरेच्या बाजाराला जायला निघायचे. कृष्णाने त्यांना वाटेत अडवायचे आणि त्यानंतर त्यांचे उडणारे खटके विनोदी पद्धतीने दाखवले जातात. शाहीरांच्या इतर रचनांमध्येसुद्धा कृष्ण हा विषय येतोच. "घनःश्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला । उठी लवकरि वनमाळी उदयाचली मित्र आला ।।" या 'अमर भूपाळी'सारखेच "सांगा मुकुंद कुणी हा पाहिला " हे गीतसुद्धा प्रसिद्ध आहे. लोककला आणि कृष्ण यांचे नाते इतके घट्ट जमले होते की मराठी भाषेत जी पहिली संगीत नाटके व्यावसायिक रंगभूमीवर आली आणि त्यांनी नाट्यकलेचे नवे युग सुरू केले त्यात 'स्वयंवर' आणि 'सौभद्र' ही नाटके ठळकपणे समोर येतात. आज शंभर वर्षे होऊन गेल्यानंतरसुद्धा त्यांचे प्रयोग करणे आणि पाहणे रसिकांना आवडते.
--------------------------------------------------------------------------------------------------

Saturday, August 23, 2008

ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप (उत्तरार्ध)


गणेशाची किंवा श्रीकृष्याची मूर्ती, शंकराची पिंडी, शाळिग्राम, साधुसंतांच्या तसबिरी वगैरेंची आपण पूजा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांची आराधना करतो. निराकार परमेश्वरावर विश्वास ठेवणारे या गोष्टींना मान्यता देत नाहीत. निर्जीव दगड किंवा धातूच्या आकारात किंवा कागदाच्या चिटो-यामध्ये ते लोक परमेश्वराला पाहू शकत नाहीत. पण मूर्तिपूजक असो वा मूर्तिभंजक असो सगळेच लोक झेंडा हे देशाचे, धर्माचे किंवा माणसांच्या विशिष्ट गटाचे प्रतीक आहे असे मात्र मानतात. 'प्रतीक' या संकल्पनेचे ध्वज हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.


राष्ट्रीय पशु, पक्षी, फूल वगैरे इतर अनेक प्रतीकांची नांवे सरकारी आदेशाने जाहीर केली जातात, शाळेतल्या मुलांना ती शिकवतात आणि त्यातली तल्लख बुद्धीची मुले ती लक्षात ठेऊन क्विझमध्ये मार्क मिळवतात. आम जनतेला मात्र त्यातल्या कोणत्याही प्रतीकावरून आपल्या देशाची आठवण येते असे दिसत नाही. नोटेवर आणि नाण्यावर छापलेली मुद्रा आणि सर्व महत्वाच्या प्रसंगी उभारलेला झेंडा ही प्रतीके तेवढी सर्वांना ठाऊक असतात. ध्वजाला मान दिला जातो, त्याच्या पुढे सारे नतमस्तक होतात, कोणी त्याची आरती करतात, कोणी त्याला राखी बांधतात, त्याचे रक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुतीसुद्धा दिल्याचा इतिहास आहे. इथे झेंडा म्हणजे एक कापडाचा तुकडा उरलेला नसतो. तो संपूर्ण राष्ट्राचे किंवा निदान एका विशाल जनसमूहाचे प्रतीक बनलेला असतो. लोकांच्या मनात तो कर्तव्यबुद्धी, इमानदारी, राष्ट्रभक्ती, अस्मिता यासारख्या उच्च कोटीच्या भावना जागृत करतो.


पूर्वापारपासून 'झेंडा' या प्रतीकात्मक संकल्पनेचा उपयोग होत आलेला आहे. एका राजाने किंवा माणसांच्या समूहाने दुस-याशी लढाई करून त्याला चारी मुंड्या चीत केले, पराजित लोक नष्ट झाले, पळून गेले किंवा शरण आले आणि विरोध शिल्लकच राहिला नाही असे झाल्यावर जेते लोक आपला झेंडा उंच फडकवून
आनंद व्यक्त करीत असत. दुरूनही तो दिसत असल्यामुळे आणि ओळखता येत असल्यामुळे आसमंतातील सर्वांना ते दिसत असे. कोणताही किल्ला काबीज केला की त्यावर तो जिंकणा-याचे निशाण फडकवण्याची पद्धत होती. त्या जागी कोणाची सत्ता चालते हे त्यावरून कळत असे. राघोबादादांनी मराठेशाहीचा झेंडा
अटकेपार फडकवला हे इतिहासात वाचतांना आपल्या अंगावर मूठभर मांस चढते. एखाद्या जागी दंगेधोपे चालले असतील तर तिथे सैन्य पाठवले जाते आणि तिथे गेल्यावर ते त्या भागाच्या हमरस्त्यावरून ध्वजसंचलन करते. "आता कोणाची हिंमत असेल तर पुढे या" असा इशारा त्यातून दिला जातो. या सगळ्या जागी झेंडा हे सत्तेचे प्रतीक आहे.


गिर्यारोहणासारखी आव्हानात्मक कामगिरी फत्ते झाल्यावर त्या जागी त्याची खूण झेंड्याच्या रूपाने ठेवतात. उत्तर व दक्षिण ध्रुवावर आणि एव्हरेस्ट शिखरावर जे साहसी वीर सर्वात आधी पोचले ते तेथे आपल्या देशाचा ध्वज रोवून परत आले. नील आर्मस्ट्रॉंगने तर चंद्रावर निशाण फ़डकवले. ऑलिंपिक किंवा कोठल्याही आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये विजयी वीरांना पदके दिली जात असतांना त्यांच्या देशांचा ध्वज उंचावला जातो. तो पाहून त्यांच्या मनातला आनंद द्विगुणित होतो. ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचाच एक खास ध्वज आहे. स्पर्धा सुरू करतांना त्याचे समारंभपूर्वक आरोहण होते आणि कार्यक्रमाचे सूप वाजवतांना तो सन्मानाने खाली उतरवला जातो.


राष्ट्रध्वज ही आपल्या देशाची खूण असते व कधी कधी त्यावरून माणसाची ओळख करून दिली जाते. टेलीव्हिजनवर होत असलेल्या खेळांच्या प्रक्षेपणात त्यात खेळत असलेल्या खेळाडूच्या किंवा संघाच्या नांवासोबत अनेक वेळा त्याच्या देशाचा झेंडा दाखवतात. ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा सुरू होण्यापूर्वी सर्व खेळाडूंचे सांघिक संचलन होते तेंव्हा प्रत्येक देशाच्या संघाचे नेतृत्व करणारा (किंवा करणारी) हातात त्या देशाचा झेंडा घेऊन चालत असतो. मागे एकदा मी जर्मनीतल्या एका कारखान्यात कांही कामासाठी गेलो होतो तेंव्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेल्या दोन खांबांवर भारत आणि जर्मनी या देशांचे ध्वज लावलेले पाहून मला किती आनंद झाला की ते शब्दात सांगता येणार नाही. समुद्रातून जाणारी गलबते आपल्या देशाचा ध्वज अभिमानाने शिडावर लावीत असत. त्यामुळे ते जहाज कोणत्या देशातले आहे हे दुरून पाहतांना न सांगताच समजत असे. एवढेच नव्हे तर चांचेगिरी करणारे पायरेट्सदेखील दोन हाडे आणि कवटीचे चित्र असलेला झेंडा फडकावत होते हे आपण कॉमिक्समध्ये पाहतो.


सत्ता किंवा विजय यातील धुंदीपासून अगदी दूर अशा वेगळ्या भावनादेखील ध्वजारोहणाद्वारे व्यक्त करतात. "विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला । वाळवंटी चंद्रभागेच्या कांठी डाव मांडिला ।" असे म्हणत वारकरी हरिनामाच्या कल्लोळात डुंबतात. विठ्ठलाच्या भक्तीची प्रेरणा घेऊन सारे हरिभक्त एका झेंड्याखाली जमा होतात. त्याच प्रकारे समविचाराचे लोक एक संघटना निर्माण करतात तेंव्हा अनेक वेळा तिचा एक ध्वज बनवला जातो. हातोडा आणि कोयता यांचे चित्र असलेल्या लाल बावट्याखाली सा-या दुनियेतील कामगारांना एकत्र आणण्याचे स्वप्न एके काळी जगभरातील साम्यवादी पहात होते. इतर राजकीय पक्षांच्या कार्यातसुद्धा त्यांच्या ध्वजाला केवढे महत्व आहे हे आपण रोजच पहातो.


युद्धविराम करण्यासाठी रणभूमीवर पांढरा ध्वज दाखवतात. ऐन लढाईच्या हमरीतुमरीतदेखील रेडक्रॉसचा झेंडा दाखवत मानवी सेवाभावाचे कार्य चालले होते. रेल्वे असो वा रस्ता असो, त्यावरून पुढे जाणे धोक्याचे असल्यामुळे थांबायचे असेल तर लाल झेंडा दाखवतात आणि सर्व कांही ठीक आहे हे पाहून पुढे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जातो. हल्ली या कामासाठी दिव्यांचा उपयोग केला जात असला तरी लाल किंवा हिरवा झेंडा दाखवणे हा शब्दप्रयोग शिल्लक आहे. ध्वजाचे महत्व सांगणा-या सगळ्याच गोष्टींचा उल्लेख एका लेखात करणे अशक्य आहे. त्याची महती अपरंपार आहे आणि त्याला अनेक पैलू आहेत. म्हणूनच "पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीन्ही लोकी झेंडा । " अशी मनोकामना सगळे करतात.

गोकुळाष्टमी


दर वर्षी आपण गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्याहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. सांगता येण्यासारखे असे त्यांचे चरित्र नाही.

परशुराम आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाहून भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे कठीण आहे. गोपालकृष्ण मात्र आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, मस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.

कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना त्याला मिळते आणि त्याचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी ओसरून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.

त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची जाणीव कंसाला होते आणि त्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक उपायसुद्धा तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो.

अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. "मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।" वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.

असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणा-या लढायंच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर द्वारका नगरी वसवून तिथे स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर त-हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.

युद्ध अटळ झाल्यावर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।" असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच "सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते। " असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। " हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.

असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आणि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे त्या सर्वांना सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.

ध्वज आणि त्यांचे बदलते स्वरूप


स्व.मादाम कामा यांनी शंभर वर्षांपूर्वी जर्मनीमधील स्टूटगार्ट येथे भरलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय समाजवादी संमेलनात भारतातर्फे भाग घेऊन भारताचा म्हणून एक झेंडा त्या संमेलनात फडकवला. सामान्यपणे हा भारताचा पहिला ध्वज मानला जातो. या घटनेला मागच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली याप्रीत्यर्थ भारतात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एका राष्ट्रभक्त संघटनेने त्या दिवशी भारतातील निरनिराळ्या किल्यांवर मादाम कामा यांचा ध्वज फडकावून त्याला वंदना दिली होती. या विषयावर संवाद या लोकप्रिय मालिकेत एका मुलाखतीचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्या प्रक्षेपणात जो ध्वज दाखवला गेला होता तो माझ्या संग्रहामधील चित्रापेक्षा वेगळा होता. गूगल आणि याहूच्या शोधयंत्रावर पाहू जाता त्यात दोन्ही प्रकारची चित्रे सापडली. याहून अधिक संशोधन करणे मला शक्य नसल्याने मी त्यामागील सत्य शोधण्याचा मार्ग सोडून दिला होता.
जुनी कागदपत्रे पाहता पाहता मला २००१ साली लिहिलेला एक लेख सापडला. ध्वज या विषयाचे अभ्यासक, तज्ञ आणि छंद म्हणूनहा विषय जोपासणारे श्री.सदानंद बांदेकर यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे श्री.प्रमोद सावंत यांनी हा लेख लिहिला होता. लेखामध्ये दिलेल्या सविस्तर वर्णनावरून मला तो विश्वसनीय वाटतो. या लेखात छत्तीस ध्वजांची चित्रे दिली असून त्यातला प्रत्येक ध्वज कोणी ना कोणी कधी ना कधी वापरला असल्याची माहिती दिली आहे. याखेरीज भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा साडेपाचशेहून अधिक संस्थाने शिल्लक होती. त्या प्रत्येकाचा आपापला झेंडा होता. त्यापूर्वी किती तरी राज्ये ब्रिटीशांनी खालसा केली असतील. इतिहासकालात किती राज्ये स्थापन झाली आणि लयाला गेली याचा तर हिशेबच नाही. अगदी रामायण महाभारताच्या काळापासून ध्वजाची परंपरा चालत आलेली आहेच. यातील कोणत्याही ध्वजाचा या छत्तीसात समावेश नाही.
स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात ब्रिटीश राज्यकर्ते तर युनियन जॅकलाच सलाम ठोकत होते आणि सर्व भारतीयांनी तेच करावे अशी त्यांची अपेक्षा व आज्ञा होती. त्यामुळे भारताचा वेगळा अधिकृत राष्ट्रध्वज कोण ठरवणार? देशभक्तांच्या मनात राष्ट्रभावनेला सर्वाधिक महत्व होते. अमक्या वा तमक्या रंगाला किंवा चित्राला तेवढे महत्व देण्याची गरज नव्हती. आपला असा एक वेगळा ध्वज फडकावून त्याला वंदन करणे ही राष्ट्रभक्तीची खूण होती. लेखात दिलेल्या चित्रांमधील क्रमांक १३ पासून २३ पर्यंतच्या चित्रांमध्ये दाखवलेल्या ध्वजांबरोबर मादाम कामा यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध आलेला होता असे या लेखावरून दिसते. यात दोन्ही प्रकारची रंगसंगती दिसते. तसेच कोठे कमळे तर कोठे सूर्य, चंद्र व तारे दिसतात. ही सगळीच राष्ट्रीय प्रतीके आहेत.


वरील चित्रामधील ध्वज खालीलप्रमाणे आहेत.
१) आपला राष्ट्रध्वज
२) जम्मू काश्मीरचा ध्वज
३) क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज (१६००)
४) रॉयल बॅनर ऑफ इंग्लंड (१४०५-१६०६)
५) पहिला युनियन जॅक (१६०६-१६१२)
६) ब्रिटीश ईस्ट इंडियाचा झेंडा(१६१२-१८५८)
७) स्पेशल कॉमनवेल्थ फ्लॅग (१६४९-१६६०)
८) दुसरा युनियन जॅक (१६५८-१८०१)
९) तिसरा युनियन जॅक (१८०१-१९४७)
१०) बारीसालचा ध्वज (१९०६)
११) सिस्टर निवेदिता ध्वज (१९०६)
१२) सिस्टर निवेदिता व त्यांच्या विद्यार्थ्यांचा ध्वज
१३) स्वदेशी ध्वज
१४) कलकत्ता ध्वज (१९०६)
१५) हेमचंद्र दास कानुनगो नमूना ध्वज
१६) मॅडम कामा ध्वज (१८-८-१९०७)
१७) मॅडम कामा ध्वज (२१-८-१९०७)
१८) मॅडम कामा ध्वज (२३-८-१९०७)
१९) वीर सावरकर- मॅडम कामा ध्वज (१९०७)
२०) मॅडम कामा ध्वज (१९०८)
२१) गदर पार्टी ध्वज(१९०८)
२२) गुरू गोविंदसिंग जयंती मंडळ ध्वज
२३) मॅडम कामा ध्वज (१९०९)
२४) कोमागाता मारू ध्वज (१९१४)
२५) बर्लिन कमिटी (१९१५)
२६) होमरूल ध्वज (१९१६)
२७) होमरूल ध्वज-२ (१९१६)
२८) ध्वज चर्चा (१९१७)
२९) एस.एस.गलीया यांचा ध्वज (१९२०)
३०) पिंगळे केंकय्या यांचा ध्वज (१९२१)
३१) महात्मा गांधी यांचा ध्वज (१९२१)
३२) फ्लॅग कमीटीचा ध्वज (१९३१)
३३) टाइम्स वृत्तपत्रसमूहाचा ध्वज (१९३१)
३४) भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा ध्वज (१९३१)
३५) इंडियन लिजन ध्वज (१९४१)
३६) ब्रिटिश इंडिया ध्वज (१९४५)
श्री.प्रमोद सावंत यांच्या लेखावरून

Thursday, August 21, 2008

मादाम कामा यांचा राष्ट्रध्वज


बरोबर एकशे एक वर्षांपूर्वी ऑगस्ट १९०७ मध्ये जर्मनीमधील स्टुटगार्ट या शहरात समाजवादी लोकांचे आंतरराष्ट्रीय संमेलन भरले होते. त्या काळात युरोपात रहात असलेल्या मादाम कामा या भारतीय विदुषीने त्या संमेलनात भाग घेतला व भर सभेत हिंदुस्थानचा झेंडा फडकवून सर्व उपस्थितांनी त्याच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले. या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली याचा उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मागच्या वर्षी महाराष्ट्रातील विविध गडांवर एकाच दिवशी हा ऐतिहासिक ध्वज फडकवून त्याला मानवंदना देण्याचा उपक्रम एका दु्र्गमित्र संस्थेतर्फे करण्यात आला. त्याचे वृत्त एका लोकप्रिय कार्यक्रमात ऐकायला मिळाले.


ते ऐकल्यावर मादाम कामा यांच्याविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने थोडे आंतर्जालावर उत्खनन केले. त्यात बरीच उद्बोधक माहिती मिळाली आणि त्या ऐतिहासिक ध्वजाची दोन वेगवेगळी चित्रे सापडली. दोन्ही चित्रे तिरंगी असून त्यात तीन आडवे पट्टे आहेत. एका चित्रात सर्वात वर भगव्या रंगाच्या पट्ट्यात पिवळसर छटेमध्ये आठ कमळांच्या आकृती आहेत. मधला पट्टा पिवळ्या रंगाचा असून त्यावर 'बंदेमातरं' असे लिहिलेले आहे. खालच्या हिरव्या रंगाच्या पट्ट्यावर पांढ-या रंगात सूर्य व चंद्रकोर रेखाटल्या आहेत. दुस-या चित्रात सर्वात वरच्या बाजूला हिरवा पट्टा आणि खालच्या बाजूला लालभडक पट्टा आहे. हिरव्या पट्ट्यावर कमळांची आणि लाल पट्ट्यावर चंद्रसूर्यांची चित्रे असली तरी त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. मधल्या पिवळ्या रंगाच्या पट्ट्यावर छापील अक्षरांत 'वंदे मातरम्' असे लिहिले आहे. फक्त शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राष्ट्रीय महत्वाच्या आणि स्वातंत्र्यसंग्रामासारख्या विषयाशी जोडल्या गेलेल्या या घटनेच्या तपशीलात इतके अंतर असावे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. यातील कोठल्या चित्रावर विश्वास ठेवायचा? त्यातील किमान एक चित्र तरी चुकीचे असणार. मग त्याच्यासोबत दिलेल्या मजकुराच्या विश्वासार्हतेचे काय?


मादाम कामा यांनी स्व.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मदतीने हा ध्वज बनवला असाही उल्लेख आहे. या दोन महान देशभक्तांनी जी रंगसंगती साधली असेल ती त्या काळातील परिस्थितीमध्ये उत्कृष्टच असणार यात मला शंका नाही. त्यात काय बरोबर आहे किंवा नाही हा मुद्दाच नाही. त्यांनी यापेक्षा वेगळे रंग वापरले असते तरीही तो झेंडा वंदनीयच ठरला असता. एका आंतरराष्ट्रीय मंचावर तो फडकवण्यात मादाम कामा यांनी औचित्य, चातुर्य आणि अतुलनीय धैर्य या सर्वांचा सुरेख संगम साधला होता. भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्यसंगामाला त्यातून एकदम जगभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळे त्या झेंड्यावर कोणत्या रंगात कोणती चित्रे काढलेली होती यापेक्षा असा झेंडा तयार करून तो फडकवला गेला हे महत्वाचे आहे. तरीही त्याचे स्मरण करतांना त्यात अचूकपणा असावा असे मला वाटते कारण माझ्या माहितीप्रमाणे ही दोन्ही चित्रे प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली आहेत आणि लक्षावधी लोकांनी ती पाहिली असणार.

मादाम कामा

मादाम कामा यांनी एकशे एक वर्षापूर्वी याच दिवशी 'स्वतंत्र' भारताचा ध्वज एका आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फडकवला होता. त्यामुळे त्या काळातील वृत्तपत्रातून ही खळबळजनक बातमी जगभर पसरली. या साहसी कामगिरीसाठी त्यांचे नांव भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या इतिहासात ठळक अक्षरांनी लिहिले गेले आहेच. त्यांनी तर आपले पूर्ण आयुष्य देशसेवेला वाहून घेतले होते. कदाचित या गोष्टीला योग्य तितकी प्रसिद्धी मिळाली नसेल. त्यांनी जी इतर कामे केली त्यातली बरीचशी त्या काळात लपून छपून गुप्तपणे केलेली होती. त्यातली कांही अखेरपर्यंत गुलदस्त्यातच राहिली असण्याचीही शक्यता आहे. अशी कोणकोणती कामे त्यांनी केली ते थोडक्यात पाहू.

त्यांचा जन्म मुंबईतल्या एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नांव भिकाजी सोराबजी पटेल असे होते. 'भिकाजी'हे मुलीचे नांव आपल्याला ऐकायला विचित्र वाटेल, पण त्या काळात म्हणजे १८६१ साली त्यांना ते नांव ठेवले गेले होते. त्यांच्या आयुष्यात कधीही भीक मागण्याचा प्रसंग त्यांच्यावर येण्याचा प्रश्नच नव्हता. गडगंज संपत्ती घरात असलेल्या इतर तत्कालीन मुलींप्रमाणे दागदागीने, पोषाख, बंगले, बगीचे, कुत्री, मांजरे वगैरे षौक करून ऐषोआरामात लोळत राहणे त्यांनाही शक्य होते. पण या अत्यंत बुद्धीमान व संवेदनाशील मुलीवर तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचा खोलवर प्रभाव पडत होता आणि तिला देशभक्तीची ओढ आकर्षित करीत होती. इंग्रजांच्या राज्यात त्यांची अवकृपा ओढवून घेण्याचा धोका पत्करणे तिच्या वडिलांना शक्य नव्हते. तो टाळण्याच्या दृष्टीने त्यांनी रुस्तम कामा या उमद्या, देखण्या आणि श्रीमंत वकीलाबरोबर आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.

संसाराला लागल्यावर भिकाजीचे लक्ष घरात गुंतून जाईल आणि त्या देशसेवेच्या 'धोकादायक' कार्यापासून दूर राहतील अशी सर्वांची अपेक्षा असणार. पण तसे झाले नाही. त्यात रुस्तम हा इंग्रजांचा कट्टर भोक्ता असल्यामुळे त्या पतिपत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांचा चारचौघासारखा 'सुखी संसार' होऊ शकला नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे." हे वाक्य लोकमान्य टिळकांनी अजून उच्चारलेले नव्हते. स्वातंत्र्याचा लढा असा सुरू व्हायचा होता. त्या काळात देशासाठी जी कांही सौम्य आंदोलने होत होती त्यात आणि समाजसेवेच्या कार्यात भाग घेणे पतीच्या विरोधाला न जुमानता भिकाजीने सुरूच ठेवले. त्यात मुंबईला प्लेगच्या साथीने पछाडले. तेंव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. रोग्यांची शुश्रुषा करणे, त्यांना धीर देणे वगैरे करतांनाच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. पण अखेर ज्याची भीती होती तेच झाले आणि भिकाजीलाच प्लेगचा संसर्ग झाला.

त्या आजारातून त्या जेमतेम बचावल्या ख-या, पण त्या रोगाने त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. इथेच राहिल्या तर तब्येतीला न जुमानता त्या पुन्हा कामाला लागतील या भीतीने त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना हवापालटासाठी युरोपमध्ये पाठवून दिले. तिथल्या हवेत त्यांची तब्येत सुधारली. त्या अवधीमध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये रहात असलेल्या दादाभाई नौरोजी यांच्या संपर्कात त्या आल्या. भारतीयांचे पितामह (ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया) समजले जाणारे दादाभाई त्या काळात इंग्लंडमध्येच राहून भारतवासीयांच्या हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढा देत होते. भिकाजीं त्यांचे सचिव म्हणून काम करू लागल्या. चाळिशीला पोचलेल्या भिकाजी आता 'मॅडम कामा' झाल्या होत्या. त्या काळात उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा ते निमित्य सांगून भारतीय युवक इंग्लंडला जात असत. मॅडम कामा सतत त्यांच्या संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करीत.

स्टुटगार्ट येथील संमेलनात भाग घेऊन भारताचा झेंडा फडकवल्यानंतर त्या अमेरिकेच्या दो-यावर गेल्या. एक उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्यांची ख्याती झाली होती. अमेरिकेत ठिकठिकाणी भाषणे देऊन त्यांनी आपले स्वतंत्र विचार परखडपणे मांडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या बाजूला तेथील जनमत वळवण्याचा प्रयत्न केला. तेथून त्या इंग्लंडला परत आल्या, पण आता ब्रिटिश सरकारची नजर त्यांच्याकडे वळलेली होती. इंग्लंडमध्ये राहून काम करणे दिवसेदिवस कठीण होत गेल्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसला स्थलांतर केले. तेथून त्या इतर क्रांतिकारकांच्याबरोबर संपर्कात राहिल्या. फक्त भारतीयच नव्हे तर आयर्लंडसारख्या इतर देशातील क्रांतिकारकांनासुद्धा त्या मदतीचा हात देत होत्या. रशीयात ज्यांनी राज्यक्रांती घडवून आणली ते लेनिन त्यांना भेटायला आले होते.

युरोपमधल्या वास्तव्यात त्यांनी 'वंदे मातरम्'नांवाचे देशभक्तीपर नियतकालिक काढायला सुरुवात केली आणि कांही काळ ते नेटाने चालवले. इंग्रजांनी त्याचेवर बंदी घातलीच होती. त्यामुळे पॅरिसमधूनसुद्धा ते उघडपणे प्रकाशित करता येत नव्हते. मादाम कामा यांनी कधी बर्लिन, कधी जिनीव्हा कधी हॉलंड अशा वेगवेगळ्या जागा बदलून ते गुप्तपणे छापून घेणे सुरू ठेवले. या छापलेल्या मॅगझिनच्या प्रती भारतात चोरट्या मार्गाने पाठवणे आणि तिथे पोचल्यावर त्यांचे देशभर वितरण करणे हे त्याहून जास्त कठीण होते. तरीही तत्कालीन क्रांतीकारक त्या दृष्टीने चिकाटीने प्रयत्न करीत राहिले. मादाम कामा त्यात आघाडीवर होत्या.

हे सगळेच काम छुप्या रीतीने होत असल्यामुळे प्रत्यक्षात किती प्रती योग्य जागी पोचल्या, किती मध्येच जप्त झाल्या, त्या वाचून किती युवकांना देशभक्तीची प्रेरणा मिळाली, त्यातून किती जणांनी सशस्त्र लढ्यात उडी घेतली आणि कांही हिंसक कृती करून दाखवली वगैरेचे संख्यात्मक मूल्यमापन करणे आज शक्य नाही. पण त्यामुळे "ब्रिटीश सरकार डळमळीत झाले, थरथर कांपू लागले" वगैरे म्हणणे जरा अतीशयोक्त होईल. कारण हजारोंच्या संख्येने भारतीय लोकच त्यांची नोकरी करण्यासाठी स्वखुषीने पुढे येत होते आणि मूठभर गो-यांच्या सहाय्याने ते आपला इथला अंमल व्यवस्थितपणे हांकत होते. क्रांतिकारकांनी टाकलेल्या ठिणग्या पडून देशात जागोजागी असंतोषाचे विस्फोट होतील आणि स्थानिक लोक ब्रिटीशांना मारून टाकतील किंवा पळवून लावतील अशी आशा प्रत्यक्षात फलद्रुप झाली नाही. थोडक्यात म्हणजे लेनिनला ज्याप्रमाणे रशीयातली झारची सत्ता उलथून टाकता आली तसे भारतात घडले नाही.

मादाम कामा यांच्या कार्याला लगेच अपेक्षेइतके यश त्या काळात मिळाले नसले तरी त्यामुळे त्यांनी घेतलेल्या कष्टांचे मोल कमी होत नाही. शंभर वर्षापूर्वीच्या काळात एक भारतीय स्त्री आपले सुखवस्तु कुटुंब व आपला देश सोडून परदेशात, किंबहुना शत्रूपक्षाच्या देशात जाऊन राहते. अत्यंत प्रतिकूल वातावरणात निर्भयपणे आपण ठरवलेले जीवितकार्य अखेरपर्यंत करत राहते. हे सगळे कल्पनातीत आहे.

ज्ञानेश्वर माउली


आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी महिन्याभरापूर्वी गांवागांवातून गाजावाजा करीत निघालेल्या बहुतेक दिंड्या आणि पालख्या आता आपापल्या गांवी परतल्या आहेत. त्यामुळे वातावरणामधील "ग्यानबा तुकाराम"चा जल्लोष शांत झाला आहे. या संतद्वयीबद्दल जी कांही अल्प माहिती माझ्याकडे आहे तिचा
थोडक्यात गोषवारा देण्याचा प्रयत्न करीत आहे.
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ व त्यांच्या इतर साहित्यिक रचनांवर कोणताही अभिप्राय देण्याएवढी माझी पात्रता नाही. पं.भीमसेन जोशी, स्व.बाबूजी, मंगेशकर मंडळी यांच्यापासून अजित कडकडे, सुरेश वाडकर वगैरेपर्यंत अनेक गायकगायिकांनी आजवर आपल्या सुस्वर संगीतामधून त्यांचे जे अभंग व ओव्या आपल्या मनावर ठसवल्या आहेत त्यावरूनच त्यातील दिव्यत्वाची प्रचीती येते. ज्ञानेश्वर महाराजांचे श्रेष्ठत्व पटवून देण्यासाठी त्याला चमत्कारांचा आधार देण्याची कधीच आवश्यकता नव्हती. विज्ञानामधून सिद्ध झालेल्या निसर्गाच्या नियमांचा भंग करणा-या घटना वगळूनसुद्धा ज्ञानदेवांचे जीवनचरित्र अद्भुत म्हणावे लागेल.
जन्माला आल्यापासूनच त्यांची "संन्याशाची मुले" म्हणून हेटाळणी सुरू झाली. लहानपणीच माथ्यावरचे आईवडिलांचे छत्र अत्यंत दुर्दैवी पद्धतीने हरपले. मोठा भाऊ निवृत्ती अरण्यात वाट चुकून हरवला. त्याला वाघाने खाल्ले असल्याची आशंका असल्याने तो परत येईल अशी फारशी आशा नव्हती. ज्या समाजाकडून त्यांचा पदोपदी अपमान होत होता त्याच्याकडेच भिक्षांदेही करून बालवयातील ज्ञानदेवांना आपल्या दोन लहान भावंडासह स्वतःचे पोट भरण्यासाठी धडपड करावी लागली. तरीही आपली ज्ञानपिपासा आणि अस्मिता जागृत ठेऊन जेवढे ज्ञान कानावर येत होते, दृष्टीला पडत होते ते त्यांनी ग्रहण करून ठेवले. निवृत्तीनाथ गुरूकडून दीक्षा घेऊन परत येताच ज्ञानेश्वरांनी त्याचे शिष्यत्व पत्करले आणि रीतसर शास्त्राभ्यास सुरू केला.
त्या काळात धर्मशास्त्राचे सगळे ज्ञान संस्कृत भाषेमधील ग्रंथात दिलेले होते. पाठांतर करून ते पिढ्यानपिढ्यांनी जतन करून ठेवलेले असले तरी निव्वळ घोकंपट्टी करणा-या लोकांना त्यामागील तत्वांचा बोध होत नव्हता. ते जाणू शकणारे पंडित काशी किंवा पैठण अशा तीर्थस्थळी रहात असत आणि संपर्कसाधनांच्या अभावी त्यांचा विचार घेणे सर्वसामान्य लोकांना अशक्य होत असे. याचा अतिशय दुःखद अनुभव ज्ञानदेवांच्या वडिलांना आला आणि त्यात त्यांचे कुटुंब होरपळून निघाले. ही परिस्थिती बदलण्यासाठी ते ज्ञान लोकांच्या बोलीभाषेत आणणे आवश्यक आहे हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. इतर सर्व धर्मग्रंथांचे सार असे ओळखल्या जाणा-या भगवद्गीतेवर 'भावार्थदीपिका' या नांवाचे भाष्य त्यांनी मराठी भाषेत लिहिले. तेच आज ज्ञानेश्वरी या नांवाने ओळखले जाते. त्या काळात हा एक क्रांतिकारक आणि धक्कादायक उपक्रम होता. तो करतांना मूळ गीतेमधील गोडवा किंचितही कमी होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. "माझा मराठाचि बोलू कवतुके, तरी अमृताते पैजा जिंके, ऐली अक्षरे रसिके, मेळवीन।" एवढा आत्मविश्वास त्यांनी दाखवला. त्यांच्या या महान कार्याबद्दल त्यांचे समकालीन संत नामदेव म्हणतात,
"संस्कृत भाषा जनासी कळेना, म्हणूनि नारायणा दया आली हो ।
देवाजीने परी घेतला अवतार, म्हणति ज्ञानेश्वर तयालागी हो ।।
ज्ञानेश्वरी ग्रंथ साराहूनि सार, फोडिले भांडार वैकुंठीचे ।
नामा म्हणे माझा ज्ञानराज प्राण । तयाचे चरण वंदीन मी ।।"
ज्ञानदेवांनी हा ग्रंथ तर लिहिला पण त्यातील भाव लोकांपर्यंत कसा पोचवायचा हा एक प्रश्न होता. त्या काळात मुद्रण आणि प्रकाशनाची सोय नव्हती. एका पोथीमधील एक एक शब्द काळजीपूर्वकरीत्या सुवाच्य अक्षरात लिहून तिची दुसरी प्रत काढावी लागत असे. त्या पोथीचे दहा जणांच्या समक्ष वाचन केले किंवा
कोणी ती तोंडपाठ करून तिचे सार्वजनिक पारायण केले तरच त्यातील मजकूर इतरांना समजत असे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेला भावार्थ या पद्धतीने फारच थोड्या लोकांपर्यंत पोहचू शकला असता. शिवाय गीतेमधील योगांच्या संकल्पना समाजातील निरक्षर घटकांना कळायला कठीण होत्या. त्यामुळे सर्व समाजाला चटकन समजू शकतील, लक्षात ठेवता येतील अशा सोप्या शब्दात लिहिलेल्या चार ओळींच्या अनेक अभंगांची रचना त्यांनी केली.
"देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधलिया ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करीं ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेग करीं । वेद-शास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेवो म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचे राणे पांडवां घरीं ॥४॥"
यासारखे रोज म्हणता येतील असे हरिपाठाचे अभंग त्यांनी सामान्य जनांना शिकवले. "रूप पाहता लोचनी, सुख जाले वो साजणी। " यासारखी विठ्ठलाची स्तुती करणारे अनेक अभंग लिहिले. त्याची भक्ती करण्यामध्ये संसाराचे सुखाचा मार्ग आहे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगितले. एका अभंगात ते सांगतात,
"अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी । आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥"

"एकतत्व नाम दृढ धरीं मना । हरीसि करुणा येईल तूझी ॥१॥
तें नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद । वाचेसीं सद्‌गद जपें आधीं ॥२॥
नामापरतें तत्व नाहीं रे अन्यथा। वायां आणिका पंथा जाशी झणें ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप-माळ अंतरीं। धरोनि श्रीहरि जपे सदा ॥४॥"
यासारख्या अभंगातून "भक्तीमार्ग अगदी सोपा आहे. त्याचे पालन करणे सर्वांना शक्य आहे. ईश्वरप्राप्तीसाठी मोठी तपश्चर्या करण्याची गरज नाही." अशा अर्थाचा उपदेश जनसामान्यांना केला. "जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत" असे सांगून सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करण्याची प्रेरणा दिली. त्यांना भजनामध्ये गोडी
वाटावी यासाठी "कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसि कां दिली वांगली रे ॥" यासारखी आकर्षक भारुडे लिहिली. "पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥" आणि "रंगा येईं वो येईं, अंगणी । विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई ।।" यासारख्या मनोरंजक रचना केल्या. "घनु वाजे घुणघुणा । वारा वाजे रुणझुणा । भवतारकु हा कान्हा । वेगीं भेटवा का ॥" यासारख्या विराण्या रचल्या. इतकेच नव्हे तर मोक्षपट नांवाच्या एका खेळाची संकल्पना त्यांनी दिली. आजकालच्या सापशिडीच्या खेळासारख्या एका पटावरील घरात वेगवेगळ्या पापपुण्यांची नांवे लिहिलेली असत. कवड्या किंवा फांसे टाकून मिळालेल्या दानाप्रमाणे आपली सोंगटी पुढे सरकवत न्यायची. परोपकारासारख्या पुण्यश्लोक घरात पोचल्यास तेथील सोपान चढून वरचे घर गांठायचे आणि चोरीसारख्या पापमय घरात गेल्यास सापाने गिळंकृत केल्यामुळे त्याच्या शेपटीपर्यंत खाली घसरत यायचे असा हा खेळ होता. पापपुण्याच्या ख-या कल्पना अगदी खेळता खेळता लोकांच्या मनात मुराव्यात यासाठी केलेला तो अफलातून प्रयत्न होता. आता तो मूळ स्वरूपात फारसा पहायला मिळत नाही.
भक्तीमार्गाचेच थोडे उच्च पातळीवरील वर्णन ज्ञानदेवांनी या अभंगात केलेले आहे.
"समाधि साधन संजीवन नाम । शांति दया, सम सर्वांभूतीं ॥१॥
शांतीची पैं शांति निवृत्ति दातारू । हरिनाम उच्चारू दिधला तेणें ॥२॥
यम-दम-कळा, विज्ञानेंसी ज्ञान ।परतोनि अज्ञान न ये घरा ॥३॥
ज्ञानदेवा सिद्दी-साधन अवीट । भक्ति-मार्ग नीट हरिपंथीं ॥४॥"
तर थोडे गूढ वाटणारे वर्णन असे आहे.
"इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ।
मोगरा फुलला, मोगरा फुलला। फुले वेचिता अति भारू कळियासी आला ।।१।।
मनाचिये गुंथी गुंफियला शेला । बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला ।।२।।"
सामान्य लोकांसाठी लिहिलेल्या अभग व ओव्यामधूनसुद्धा त्यांच्या विचारांची उंची कशी दिसते पहा! विठ्ठलाचे दर्शन घडल्यावर मनाला होणारा आनंद ते "अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू । मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥" असा व्यक्त करतात तर चंचल मनाला स्थिर राहण्यासाठी ते आवाहन करतात,
"रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥
चरणकमळदळू रे भ्रमरा । भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ॥२॥
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळु विद्गदु रे भ्रमरा ॥३॥
सौभाग्यसुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा ॥४॥"
ज्ञानेश्वरी लिहितांना प्रारंभी गणपतीची आराधना करतांनासुद्धा सरळसोटपणे "वक्रतुंड महाकाय" अशी शारीरिक वर्णनापासून सुरुवात न करता ते अशी करतात.
"ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥
देवा तूंचि गणेशु । सकळमति प्रकाशु ॥ म्हणे निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥"
सामान्य लोकांना समजायला सोपा असा भक्तीमार्ग त्यांनी दाखवला असला तरी "चिदानंदरूपः शिवोहम् शिवोहम् ।" या शब्दात आदि शंकराचार्यांनी सांगितलेले अद्वैत त्यांनी अनुभवलेले होते. निर्गुण निराकार परब्रह्माची ओढ त्यांच्या मनात होती. तशा अर्थाच्या कित्येक रचना त्यांनी केल्या आहेत. खालील रचनांमध्ये ते स्पष्टपणे दिसते.
अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों आले ॥१॥
तुझा तूंचि देव तुझा तूंच भाव । फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥
मुरडूनियां मन उपजलासी चित्तें । कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥
दीपकीं दीपक मावळल्या ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥
वृत्तीची निवृत्ति अपणांसकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥
निवृत्ति परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले । अवघे चि जालें देह ब्रम्ह ॥१॥
आवडीचें वालभ माझेनि कोंदटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥
रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रम्हाकारें ॥३॥
"कानडा हो विठ्ठलू" या अभंगात ते निराकार विठ्ठलाचे वर्णन करून अखेरीस म्हणतात,
"बाप रखुमादेवीवरू हृदयीचा जाणुनी। अनुभवु सौरसु केला।।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेले तंव। भीतरी पालटु झाला।।"
द्वैत आणि अद्वैत या दोन्ही विचारात त्यांना विरोधाभास दिसत नाही. दोन्ही माग्र आपापल्या जागी योग्यच आहेत असे ते "तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे ।।" या अभंगात सांगतात. तर दुस-या ठिकाणी म्हणतात,
"अजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥
हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी ॥२॥
दृढ विटे मन मुळी । विराजित वनमाळी ॥३॥
बरवा संतसमागमु । प्रगटला आत्मारामु ॥४॥
कृपासिंधु करुणाकरू । बाप रखुमादेवीवरू ॥५॥"
संस्कृत भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान जनसामान्यांना आकलन व्हावे म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली याचे जनाबाईसारख्या सुसंस्कृत मनाच्या,सगुणभक्ती आचरणा-या आणि परमात्मज्ञानाची उत्सुकता बाळगणा-या साधकाला खूपच अप्रूप होते. त्यामुळे असा ज्ञानेश्वर आपला सखा, नातेवाईक असावा असे वाटल्यामुळे ती म्हणते.
ज्ञानाचा सागर। सखा माझा ज्ञानेश्वर ।। १।।
मरोनिया जावे। बा माझ्या पोटा यावे ।। २ ।।
ऐसे करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ।। ३ ।।
जावे वोवाळूनी । जन्मोजन्मी दासी जनी ।।४।।
संतशिरोमणी तुकाराम महाराजांनीसुद्धा ज्ञानेश्वराच्या श्रेष्ठपणाचे गुणगान असे केले आहे.
ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ॥१॥
मज पामरासी काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रम्हादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतरां तुळणे काय पुढे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीचिया खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥
राम जनार्दनांनी त्यांची आरती रचली आहे.
आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा । सेविती साधूसंत मनु वेधला माझा ।।
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग, नाम ठेविले ज्ञानी ।।
प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मचि केले । राम जनार्दनी, पायी ठकचि ठेले ।।
अशा प्रकारांनी अनेक संतांनी तर ज्ञानेश्वराच्या कार्याचा गौरव केलाच. संतपरंपरेचा जो धर्म होता तोच माझा धर्म आहे असे अभिमानाने सांगणा-या आजच्या युगातील कवीश्रेष्ठ ग.दि.माडगूळकरांनी ज्ञानेश्वर आणि त्याची भावंडे यांचे देदिप्यमान रूप या गीतामध्ये दाखवले आहे.
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ।
ज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव नाचती वैष्णव, मागेपुढे ।
मागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड अंगणात झाड, कैवल्याचे ।
उजेडी राहिले, उजेड होऊन निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ।
ज्ञानेश्वरांनी अगदी लहान वयात अनेक प्रकारांच्या रचना केल्या. त्यांची अगाध विद्वत्ता, लालित्यपूर्ण शब्दरचना, कल्पनेची भरारी, साध्या सोप्या तसेच गूढ रहस्यमय रचना करण्याची हातोटी वगैरे विविध अंगांनी त्या बहरल्या आहेत हे पाहून मन थक्क होते. हे सगळे करतांना आपण हा एक यज्ञ करीत आहोत अशी भूमिका त्यांनी घेतली. यातून त्यांना आपला कसलाही स्वार्थ साधण्याची मनोकामना नव्हती. संपूर्ण विश्वाचे कल्याण होवो असे पसायदान त्यांनी अखेरीस मागितले आहे.
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ।
येथ म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
"चिंता करतो विश्वाची" असे सांगणारे ज्ञानदेव अवघ्या जगावर प्रेम करीत होते. त्यांनी भोगलेल्या कष्टामुळे कडवटपणाचा लवलेशसुद्धा त्यांच्या स्वभावात आला नाही की त्याची छायासुद्धा त्यांच्या लेखनात डोकावली नाही. "पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद। " इतक्या सहज भावनेने त्यांनी त्यांना त्रास
देणा-या लोकांना क्षमा केली. म्हणूनच आजसुद्धा त्यांचे भक्त त्यांना 'ज्ञानेश्वर माउली' या नांवाने संबोधतात. ---------------------------------------

एक धागा सुखाचा


एक धागा सुखाचा (पूर्वार्ध)'विठ्ठला, तू वेडा कुंभार' या महाकवी ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेल्या गीतामधील आशय शोधण्याचा प्रयत्न मी नुकताच सहा भागात केला होता. 'एक धागा सुखाचा' या अशाच धर्तीच्या गीतामधील कांही ओळींचा उल्लेख त्या लेखात आला होता. राजा परांजपे यांच्या 'जगाच्या पाठीवर' या प्रसिद्ध चित्रपटासाठी गदिमांनीच हे गीत लिहिले आहे. या गीतामध्येसुद्धा त्यातील ओळींचा शब्दशः अर्थ आणि त्यामागील भावार्थ वेगवेगळे आहेत. 'वेडा कुंभार' या लेखात केलेल्या विश्लेषणाची पुनरुक्ती न करता त्याहून जे कांही वेगळे या गीतात सांगितले गेले आहे तेवढेच या लेखात थोडक्यात मांडणार आहे.

'जगाच्या पाठीवर' या चित्रपटात एका सरळमार्गी सज्जन माणसाची मध्यवर्ती भूमिका राजाभाऊंनी स्वतः अप्रतिम साकार केली आहे. त्यातील कथानायकाला त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्यासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होते. सक्तमजूरीसाठी तुरुंगात असतांना त्याला हातमागावर कापड विणण्याचे काम दिले जाते. हे काम करता करता स्वतःशीच पण अवघ्या मानवजातीला उद्देशून हे गाणे म्हणतांना त्याला एका प्रसंगात दाखवले आहे. तुरुंगामधील कष्टाचे जीवन तो ज्या मनस्थितीमध्ये जगत असेल त्यात सुखापेक्षा अनंतपटीने अधिक दुःखच त्याला भोगावे लागत असणार. शिवाय "सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे।" असे तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. दोस्ती या चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यात "राही मनवा दुखकी चिंता क्यूँ सताती है। दुख तो अपना साथी है।। सुख तो इक छाँव ढलती आती है जाती है।" असे मजरूह सुलतानपुरी यांनी म्हंटलेले आहे. सुख हे कधीकधी येते, दुःख मात्र पांचवीलाच पूजलेले असते, असा अनुभव अनेक जणांना येतो. भरपूर कष्ट केल्यानंतर कुठे त्याचे फळ मिळते, महिनाभर राबल्यानंतर पगाराचा एक दिवस येतो, वगैरे सांगायची गरज नाही. त्यामुळेच या गाण्यातला नायक म्हणतो,

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ।।
या गीतामध्ये जीवनालाच 'वस्त्र' असे म्हंटले आहे."वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही।।" या श्लोकात मानवाच्या शरीराला वस्त्राची उपमा देऊन, "प्रत्येक जीवाचा आत्मा ते वस्त्र पांघरून वावरत असतो, एक जन्म संपताच जुने कपडे अंगावरून उतरवून नव्या जन्मात नवे कपडे परिधान करतो." असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. याच्याही एक पाऊल पुढे जाऊन केवळ शरीराऐवजी 'आयुष्य' हेच एक वस्त्र असे मानण्यामध्ये त्या शरीराबरोबरच त्या जीवाच्या जीवनामधील इतर गोष्टीही येतात. "कान्होबा, तुझी घोंगडी चांगली। आम्हासि कां दिली वांगली।।" असे संत ज्ञानदेव म्हणतात, किंवा "चदरिय़ा झीनी झीनी रे।" असे कबीर म्हणतात ते याच अर्थाने. यामुळेच "मैली चादर ओढके कैसे द्वार तिहारे आऊँ।" असे एका भजनात भक्ताने भगवंताला विचारले आहे. त्याच अर्थाने सुख आणि दुःख यांच्या धाग्यांमधून आयुष्याचे वस्त्र विणले जात आहे असे कवी 'एक धागा सुखाचा' या गीतात म्हणतो.

वरवर पहाता हे एक रडगाणे वाटेल. पण खोलवर विचार करता त्यातील सकारात्मक अंतःप्रवाह अधिक महत्वाचा असल्याचे लक्षात येईल. शंभर दुःखाच्या धाग्यांमध्ये एक सुखाचा धागा या प्रमाणात विणलेले कापड दुःखमयच होणार. पण जरीच्या एका कांठानेच एकादे लुगडे किंवा धोतर 'जरतारी' बनते. त्यातून जर शंभर दुःखाचे धागे घेऊन एकाच जरीच्या धाग्याने विणले तर ते संपूर्ण वस्त्रच 'भरजरी' होते. तेंव्हा 'एक धागा सुखाचा' हा दुःखाच्या शंभर धाग्यांनी विणलेल्या वस्त्रालासुद्धा 'जरतारी' बनवतो याला महत्व आहे.

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा ।
कपड्यासाठी करिसी नाटक, तीन प्रवेशांचे ।।
माणसाचे आयुष्य त्याच्या जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूच्या वेळी संपते. त्यामुळे जेंव्हा तो जन्माला येतो त्याच क्षणी हे वस्त्र विणण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यापूर्वी ते अस्तित्वात नसते आणि मरणानंतरही ते नष्ट झालेले असते. त्यामुळे त्या वेळेस आत्मा वस्त्राविनाच असतो. पण या दोन्हीमधल्या काळात आयुष्य जगण्यासाठी तो जी धडपड करतो ती एका नाटकापेक्षा कमी नसते. त्यात तो विविध भूमिकांमधून जगत असतो. त्यात कुठकुठले रोमहर्षक नाट्यमय प्रसंग, कसकसले अनुभव त्याच्या वाट्याला येतात? या नाटकाच्या तीन अंकांबद्दल पुढील चरणात विस्ताराने सांगितले आहे.

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची ।
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे ।।
बहुतेक लोकांचे लहानपण त्यांच्या घरी आईवडिलांच्या प्रेमळ छायेत जाते. लहान बाळांची आईच त्यांना हौसेने अंगडी टोपडी घालून, तीटकाजळ वगैरे लावून मायेने सजवते. त्यांना स्वतःला कांही करण्याचे फारसे स्वातंत्र्य नसते, म्हणून ती 'मुकी'. पण त्यांच्याकडे पालकांच्या मायेची पाखर आणि संरक्षणाचे कवच असते. आयुष्याच्या सुरुवातीचा हा सगळा काल 'मुकी अंगडी' या शब्दांत येतो. तारुण्यामध्ये माणूस मनासारखे वागून आपल्याला हवी तेवढी मौज करून घेऊ शकतो. त्यामुळे अंगड्याचे रूपांतर रंगीबेरंगी पोशाखात होते. म्हातारपणी अंगातली रग आणि शक्ती क्षीण होते. पण त्याच्या आयुष्याची वस्त्रे जीर्ण झाली तरी त्यांची 'शाल' झालेली असते आणि ते वार्धक्याचे 'लेणे' असते. या शब्दप्रयोगावरून कवीचा सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट दिसतो.

या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन ।
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकराचे ।।
जगामधील अब्जावधी माणसांची आयुष्ये कशा रीतीने चालत असतात? त्यांच्या जीवनाची वस्त्रे कुठल्या मागावर कोणता अदृष्य विणकर सारखा विणत असतो? त्या सर्वांचे पोत वेगळे, रंग निराळे, तऱ्हातऱ्हांचे नक्षीकाम त्यांवर चितारलेले! असा हा अजब कारीगर परमेश्वराखेरीज आणखी कोण असू शकेल? असे अप्रत्यक्षरीत्या त्याची प्रशंसा करणारे उद्गार काढून हे गीत संपते. या गीताच्या मुख्य विषयावरील माझे विचार या लेखाच्या उत्तरार्धात मांडीन.

. . . . . . . . . . . . . . . . . 

  • एक धागा सुखाचा  (उत्तरार्ध)


"एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे।" असे आपल्याला खरेच नेहमी वाटते कां? "तुम्ही कसे आहात?" किंवा "तुमचं कसं चाललंय्" असे आपण कुणालाही विचारतो तेंव्हा तो "ठीक आहे", "बरं चाललंय्" असे म्हणतो. तेंव्हा सरसकट सगळ्या लोकांनी "शंभर धागे दुःखाचे" असे म्हणणे कितपत बरोबर आहे? ते ठरवण्यापूर्वी इतर कांही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. "सुख कशाला म्हणायचे आणि दुःख म्हणजे नेमके काय?", "त्यांचे मोजमाप कसे करणार?", "त्याची बेरीज वजाबाकी करून हिशोब मांडता येईल कां?" अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यासाठी आवश्यक आहेत. पण जरी कोणाला कधी ती मिळाली तरी इतरांना ती
पटतील असे वाटत नाही.

सुखी माणसाचा सदरा शोधणा-या राजाची गोष्ट सर्वांना माहीत आहे. "सुखी माणसाचा सदरा अंगात घातलास तर तू सुद्धा सुखी होशील." असा सल्ला मिळाल्यानंतर तो राजा आपल्या सर्व राज्ययंत्रणेला तो सदरा शोधून आणण्याच्या कामाला लावतो. त्याचे शिपाई राज्यामधील प्रत्येक माणसाकडे जाऊन "जगी सर्वसुखी असा कोण आहे?" अशी विचारणा करीत सुटतात. पण प्रत्येक नागरिक तो कोठल्या ना कोठल्या दुःखाने ग्रस्त असल्याचे सांगतो. अखेरीस घनदाट जंगलात राहणारा एक माणूस सुखी असल्याचे त्यांना समजते, पण त्या दरिद्री माणसाने आयुष्यात कधी अंगात सदरा घातलेला नसतो. त्यामुळे राजाला देण्यासाठी त्याच्याकडे सदराच नसतो. या गोष्टीवरून त्या राजाने कोणता बोध घेतला आणि तो 'सुखिया जाला' की नाही ते माहीत नाही. पण त्या दोघांच्या सुखाबद्दलच्या कल्पनांमध्ये जमीन आसमानाएवढा फरक नक्कीच असणार. त्यामुळे केवळ त्या रानातल्या माणसासारखा उघडाबंब राहिल्याने तो राजा सुखी होऊ शकला असता कां? अलीकडच्या काळात सलमानखानने मात्र या प्रकारे सुखी व्हायचे ठरवलेले दिसते!

दुस-या एका 'सुखी' माणसाची गोष्ट एकदा माझ्या वाचनात आली होती. तो रशियामधला एक थोर विचारवंत होता. एकदा तिथल्या शिपायांनी नामसादृश्यामुळे एका अट्टल गुन्हेगाराऐवजी त्यालाच पकडून नेले आणि कोठडीत टाकून दिले. जुलमी झारची राजवट असो वा कम्युनिस्टांची, दोन्हीमध्ये 'अंधेरनगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा' हाच खाक्या होता. या बाबतीत त्यांच्यात विशेष फरक नव्हता. त्या कैद्याच्या कोठडीमध्ये जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. पण त्याला तिथे टाकून गेलेल्या पोलिसांची पाठ फिरताच तो माणूस लगेच कामाला लागला. जमीनीवर पसरलेला सगळा कचरा त्याने गोळा करून कशात तरी गुंडाळून व्यवस्थित कोप-यात ठेऊन दिला. कागदाचे कपटे, कापडाच्या चिंध्या वगैरे जे साधन हातात मिळेल, त्याने घासून भिंतीवरचे डाग काढले, खिडक्यांची तावदाने पुसली. खिडकीच्या बाहेर झुडुपांचे रान वाढले होते. त्यांवरच उमललेली चार रानफुले गजामधून बाहेर हात काढून तोडून घेतली आणि शोभेसाठी खोलीमध्ये मांडून ठेवली. संध्याकाळी निरीक्षण करायला आलेला तुरुंगाचा अधीक्षक त्या कोठडीचे पालटलेले रूप पाहून चकित झाला. कैद्याने स्मितहास्य करून आणि "गुड इव्हनिंग सर!" असे म्हणत त्याचे स्वागत केले.
त्याने कैद्याला विचारले, "तू कोण आहेस?"
आपले नांव सांगून "मी एक प्राध्यापक आहे आणि फुरसतीच्या वेळात पुस्तके लिहितो." ही माहिती दिली.
"मग तू या इथे काय करतो आहेस?"
"आपल्या शिपायांनी मला इथे आणून ठेवले आहे. आता इथून सुटका होईपर्यंत मला इथेच रहायचे आहे म्हणून मी आपल्या या नवीन घराची साफसफाई करीत होतो."
तेवढ्यात कैद्यांसाठी चहा आला. तोच कप अधिका-याला देत तो कैदी म्हणाला,"खरेच मी किती सुदैवी आहे? घरी आलेल्या पाहुण्याचा कांही पाहुणचार करता येणार नाही या गोष्टीची मला केवढी चुटपुट लागली होती. आता कृपया तुम्ही या चहाचा स्वीकार करावा अशी विनंती आहे."
जेलर पार गोंधळून गेला आणि म्हणाला, "अरे भल्या माणसा, तुला विनाकारण इथे आणले आहे असे तू म्हणतो आहेस, तुला इतके दुःख देऊनसुद्धा तू आनंदी कसा?"
"सर, भले कोणी मला दुःख देईल, पण मी ते घेऊन त्याला कुरवाळत बसायलाच पाहिजे कां? आपण आनंदात रहायचे की दुःख करत बसायचे हे स्वतःच ठरवावे असे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो आणि पुस्तकात लिहितो. मलासुद्धा त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना!"

महाकवी मंगेश पाडगांवकरांच्या काव्यवाचनाचा एक कार्यक्रम मी मागच्या महिन्यात पाहिला. त्यांच्या एका प्रसिद्ध कवितेची जन्मकथा त्यांनी सांगितली. एकदा ते एक इंग्रजी पुस्तक वाचत होते. त्या पुस्तकाचा लेखक आधी शाळामास्तर होता. परिस्थिती मनाजोगती नसल्यामुळे तो सतत चिडचिड करीत रहायचा. एकदा त्याच्या एका विद्यार्थिनीने वहीत लिहून आणलेली हकीकत वाचल्यानंतर त्याचा स्वभाव आमूलाग्र बदलला.
ती गोष्ट अशी होती. "आम्ही एक गाणारा पक्षी पाळला आहे. रोज संध्याकाळी आम्ही त्याला पिंज-याबाहेर काढून घरातल्या घरात उडू देतो. एके दिवशी तो उडता उडता कोठल्यातरी अडगळीत कडमडला आणि त्यात त्याचा एक पाय मोडला. माझ्या वडिलांनी त्याला हळूच उचलून पुन्हा पिंज-यात ठेवले. आम्ही यापेक्षा अधिक कांहीच करू शकत नव्हतो. तो पक्षी आता बहुतेक मरणार असेच आम्हाला वाटत होते. मला कांही त्या रात्री शांत झोप लागली नाही. मध्येच उठून मी त्या पक्ष्याला पहायला गेले. तो अजून जीवंत असलाच तरी मान टाकून निपचित पडलेला किंवा असह्य वेदनेने कळवळत असेल अशी माझी अपेक्षा होती. पण तो तर एक पाय लोंबकळत असलेल्या स्थितीमध्येसुद्धा चक्क नेहमीसारखे गोड गाणे गात होता."
ही गोष्ट वाचल्यानंतर पाडगांवकरांना शब्द सुचले, "सांगा, कसं जगायचं । कण्हतकुण्हत, कां गाणं म्हणंत, तुम्हीच ठरवा ।" तेंव्हा आपल्या आयुष्याच्या महावस्त्रातले धागे सुती असावेत कां रेशमाचे कां जरीचे हे ज्याने त्यानेच ठरवणे चांगले असते. त्यातील सुखकारक किंवा दुःखदायी घटना घडवून आणण्याचे काम तो अदृष्य विणकर करीत असेल. त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येणार नाही. पण त्यावर आपली जी प्रतिक्रिया आपण करतो तिच्यावर आपण काबू मिळवला, आपण नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर कदाचित शंभर धागे सुखाचे वाटतील. "सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे" असे म्हणणा-या तुकोबांनीच त्यानंतर "मन करारे प्रसन्न, मन सिद्धीचे कारण" असा उपदेश केलेला आहे तो यासाठीच.